Wednesday, 29 June 2016

नमस्कार लाईव्ह २९-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- कदाचित 'ब्रेक्झिट' प्रत्यक्षात येणार नाही!: केरी 
२- ब्रेक्झिटनंतर इंग्रजीचीही ‘एक्झिट’? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- देशभरातील मॉल्स, दुकानं आता 24 तास खुली राहणार 
४- जीसीए घोटाळा : माजीमंत्री नार्वेकरची पोलिसांकडून चौकशी 
५- मलकापूर; लॉटरीची लालसा पडली महागात, रेल्वे कर्मचा-याला २० लाखांचा गंडा 
६- चंडीगड; "स्मार्ट व्हिलेज' गावांची कर्मचाऱ्यांकडून पाहणी 
७- हैदराबादमध्ये स्फोटाचा कट उधळला 
८- सलमानने माफी मागितली नाही - महिला आयोग 
९- गोव्यात 'सेक्‍स टुरिझम' फोफावतंय: केजरीवाल 
१०- संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून होणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार 
१२- महिला आयोगाच्या नोटीसला सलमानचं उत्तर, मात्र माफी नाहीच 
१३- गोव्यात खेड्यांमध्ये बससेवेचा अभाव, 'कदंब'कडे ४0 प्रस्ताव पडून 
१४- लखनऊ; गुमनामी बाबां'च्या चौकशीसाठी आयोग 
१५- "व्हॉटसऍप'वर बंदी नाही - सर्वोच्च न्यायालय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- यवतमाळ; चार मुलीच झाल्याने पत्नीला गुरासारखी मारहाण 
१७- यवतमाळ : शिरोळी येथे आज दुपारी विज पडून पती पत्नीचा मृत्यू 
१८- इंदापूर : देन घरात चोरट्यांनी घातला दरोडा, २० तोळे सोन आणि १ लाखांसह पसार 
१९- जालना : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या परंतु परॉलवर आलेल्या आरोपीची आत्महत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- आमच्या कुणाहीपेक्षा खेळाडू अधिक महत्त्वाचे: अनिल कुंबळे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
======================================

चार मुलीच झाल्याने पत्नीला गुरासारखी मारहाण

चार मुलीच झाल्याने पत्नीला गुरासारखी मारहाण
यवतमाळ: चार मुली झाल्या, पण मुलगा नाही या कारणावरुन नवऱ्यानं बायकोला इतकी मारहाण केली आहे, की त्याची दृश्य पाहिल्यानंतर कोणाचाही थरकाप उडेल. इतकंच नाही तर चार मुलींसह पत्नीला घराबाहेरही काढण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील वडद इथं हा प्रकार घडला.
ज्ञानेश्वर मदन राठोड असं मारहाण करणाऱ्या पतीचं नाव आहे.
ज्ञानेश्वरचं 2008 साली कवितासोबत लग्न झालं. त्यानंतर त्यांना चार मुली झाल्या. मात्र मुलगा होत नसल्यामुळे पतीनं छळ केला. तसंच पत्नीला बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याप्रकरणी पुसद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
======================================

देशभरातील मॉल्स, दुकानं आता 24 तास खुली राहणार

देशभरातील मॉल्स, दुकानं आता 24 तास खुली राहणार
नवी दिल्ली :  लवकरच तुम्ही रात्री साडे तीन वाजता मॉल्समध्ये जाऊन शॉपिंग करु शकता. तुमच्या परिसरातली सर्व दुकानं दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु राहतील. इतकंच काय तुम्हाला एखाद्या सिनेमाचा पहाटेचा शोदेखील पाहू शकता. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने मॉडेल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच दुकानं आणि आस्थापना कायद्याला मंजुरी दिली आहे.


या कायद्यानुसार 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असणारी आस्थापनं त्यांच्या सोयीनुसार रात्रभर सुरु राहू शकतात. त्यामुळे  शहरांपुरती मर्यादित असणारी नाईट लाईफची फॅशन लवकरच गावागावातही पाहायला मिळणार आहे.


या कायद्याला मंजुरी मिळाल्याने आता महिलांनाही पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसह रात्रपाळीत काम करता येणार आहे. तसंच कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी, कॅन्टीन, प्राथमिक उपचारांचे साहित्य, स्वच्छतागृहं इत्यादी सोयी सुविधाही उपलब्ध होणार आहेत. मात्र या सवलतीतून उत्पादन क्षेत्रांना वगळण्यात आलं आहे.


कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार, हा कायदा राज्य स्वीकारु शकतात. तसंच यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याची सूट संबंधित राज्य सरकारला असेल.
======================================

शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार

शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार
मुंबई: शाब्दिक युद्धानंतर रस्त्यावर आलेल्या शिवसेना- भाजपमधील वाद वाढतानाच दिसत आहे.

स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमावर शिवसेनेनं बहिष्कार घातल्यानंतर आता भाजपनंही शिवसेनेचाच कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे. मुंबईत आज ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाला. या  कार्यक्रमासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आमंत्रण दिलं होतं. मात्र त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.

एवढंच नाही  तर भाजपचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत.  त्यामुळे सत्ताधारी सेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्ह आहेत.

या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे, रामदास कदम, आयुक्त अजॉय मेहता, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि भाजपच्या उपमहापौर अलका केरकर यांनी उपस्थिती लावली.
======================================

महिला आयोगाच्या नोटीसला सलमानचं उत्तर, मात्र माफी नाहीच

महिला आयोगाच्या नोटीसला सलमानचं उत्तर, मात्र माफी नाहीच
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर दिलं आहे. मात्र ‘बलात्कार पीडित’ वक्तव्याबाबत माफी मागितली नाही. राष्ट्रीय महिला आयोगाने सलमानला त्याच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागण्यास सांगितलं होतं. यासाठी महिला आयोगाने नोटीस पाठवून सलमानला स्पष्टीकरण देण्यासाठी सात दिवसांची मुदतही दिली होती.


या नोटीसनुसार सलमान खानला आज महिला आयोगासमोर हजर राहायचं होतं. मात्र सलमान स्वत: उपस्थित न राहता वकिलांना पाठवलं होतं.
======================================

आमच्या कुणाहीपेक्षा खेळाडू अधिक महत्त्वाचे: अनिल कुंबळे

आमच्या कुणाहीपेक्षा खेळाडू अधिक महत्त्वाचे: अनिल कुंबळे
बंगळुरु: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक या नात्यानं झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अनिल कुंबळेनं आपल्या विनयशील स्वभावाची झलक दाखवून दिली.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या सराव शिबिराला बुधवारी सकाळी बंगळुरूत सुरुवात झाली. शिबिराच्या सलामीलाच मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत रवी शास्त्रीला मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीतून डावलण्यात आल्याच्या वादावर प्रश्न येणं स्वाभाविक होतं. आणि त्यासाठी कुंबळेही तयार होता.

भारतीय क्रिकेटमध्ये मी, शास्त्री किंवा अन्य कुणाही पदाधिकाऱ्यापेक्षा खेळाडू अधिक महत्त्वाचे आहेत, असं सांगून कुंबळेनं त्या प्रश्नाला छान बगल दिली. यावेळी टीम इंडिया बद्दल कुंबळे म्हणाला की, ‘कायम चांगला खेळ करण्यासाठी टीम इंडियाला घरच्या मैदानावरच नाही तर परदेशातही चांगली कामगिरी करावा लागेल.’
======================================

व्हिडिओ: वंशाच्या दिव्यासाठी पतीची पत्नीला बेदम मारहाण


  • ऑनलाइन लोकमत
    यवतमाळ, दि. २९ - पाठोपाठ चारही मुलीच झाल्याने वंशाच्या दिव्यासाठी पत्नीला बेदम मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना महागाव तालुक्यातील वडद येथे घडली. याप्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी पतीसह सासू-सास-यांना ताब्यात घेतले. 
    ज्ञानेश्वर मदन राठोड (३०) रा. वडद, ता. महागाव, सासरा मदन राठोड (६०), सासू जनाबाई मदन राठोड अशी आरोपींची नावे आहेत. कविता ज्ञानेश्वर राठोड (२७) हिला चार मुलीच आहेत. वंशाला दिवा नाही म्हणून तिला सासरची मंडळी त्रास देत होती. २४ जून रोजी कविताला बेदम मारहाण करून पतीने घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी पती, सासू व सास-याविरुद्ध २४ जून रोजीच गुन्हा दाखल केला. दरम्यान आज या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास ठाणेदार धनंजय जगदाळे करीत आहे.

======================================

गोव्यात खेड्यांमध्ये बससेवेचा अभाव, 'कदंब'कडे ४0 प्रस्ताव पडून


  • ऑनलाइन लोकमत
    पणजी, दि. २९ : गोव्यात कदंब महामंडळाकडे ग्रामीण भागात बससेवा सुरु करण्यासाठी सुमारे ४0 वेगवेगळ्या मार्गांचे प्रस्ताव पडून आहेत. मात्र या खेडेगावांमध्ये बसेस सुरु केल्यास ते परवडण्यासारखे नसल्याने या मागणीला महामंडळ इतकी वर्षे न्याय देऊ शकलेले नाही.
    कदंब महामंडळ हे राज्य परिवहन महामंडळ आहे. महामंडळाचे वाहतूक सरव्यवस्थापक संजय घाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काही खेडेगावांमधून येट पणजीला येण्याजाण्यासाठी बसगाड्यांसाठी मागणी आहे परंतु ती केवळ सकाळी कार्यालयांमध्ये पोचण्यासाठी आणि सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी एवढ्यापुरतीच मर्यादित आहे. गाड्या सुरु केल्या तर मधल्या वेळेत प्रस्तुत मार्गांवर प्रवाशी मिळणे दुरापास्त असल्याने बसेस सुरु करणे मुश्किल बनले आहे. काही ठिकाणी परमिटचीही समस्या आहे.
    मोर्लपिर्ला (केपें) ते पणजी, कष्टी ते पणजी, बेतुल ते पणजी, बांबार ते मडगांव, धावें (वाळपई) ते पणजी, मांद्रे ते पणजी तसेच मांद्रेतील अंतर्गत भागातून पणजीला थेट येण्या-जाण्याची सोय व्हावी यासाठी बसगाड्या सुरु करण्याची मागणी आहे.
======================================

जीसीए घोटाळा : माजीमंत्री नार्वेकरची पोलिसांकडून चौकशी


  • ऑनलाइन लोकमत
    पणजी, दि. २९ : माजी मंत्री व अनेक वर्षे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहिलेले दयानंद नार्वेकर यांची गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून दोन तास चौकशी केली. जीसीएतील ३.१३ कोटी रुपयांच्या निधी अफरातफरी या नार्वेकर यांच्या कारकिर्दीतच घडल्या होत्या.
    वारंवार समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर न राहिलेले नार्वेकर हे तीसऱ्या समन्साला प्रतिसाद देताना सकाळी पणजी येथील आर्थिक गुन्हा विभागाच्या कार्यालयात हजर राहिले. पोलीस निरीक्षक प्रसन्न भगत आणि निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी त्याची चौकशी करून जबानी नोंदवून घेतली. गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
    कॉंग्रेस राजवटीत एकदा वित्तमंत्री व एकदा आरोग्यमंत्री ही पदे भुषविलेले नार्वेकर हे प्रदीर्घकाळ जीसीएचे अध्यक्षपदी होते. या घोटाळ््यात अटक करण्यात आलेले जीसीएचे विद्यमान अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला हे त्यांच्या नेतृत्वाखालील समित्यांवर होते. असे असतानाही अनाधिकृत बँक खाते खोलण्यासाठी देसाई यांनी अध्यक्ष म्हणून तर फडके यांनी सचीव म्हणून स्वाक्षरी केली असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यासाठी कागदोपत्री पुरावे असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. तिघांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि १० दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्यांना पणजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीनवर मूक्त केले होते.
======================================

लॉटरीची लालसा पडली महागात, रेल्वे कर्मचा-याला २० लाखांचा गंडा


  • ऑनलाइन लोकमत
    मलकापूर, दि. २९ -  अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याबाबत आलेल्या ‘एसएमएस’ला प्रतिसाद देणे एका रेल्वे कर्मचा-ला चांगलेच महागात पडले. शासकीय सेवेत असलेल्या शिवाजी रामभाऊ राऊत यांची लॉटरी प्रकरणात २० लाख रुपयाने फसवणूक झाली असून या संदर्भात त्यांनी केलेल्या तक्रारीवरुन मलकापूर पोलिसांनी १७ खातेदारांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
    मलकापूर शहरातील विष्णु नगर येथील शिवाजी रामभाऊ राऊत हे बोदवड येथे रेल्वे विभागात कार्यरत आहेत. एक वस राऊत यांना अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचा एसएमएस त्यांच्या मोबाईलवर मिळाला. तसेच मोबाईल व लॅपटॉपचे बक्षीस  मिळणार असल्याचा संदेशही मिळाला. त्या मेसेजनुसार शिवाजी राऊतने शेगाव येथील ‘एसबीआय’ बँकेच्या शाखेमधून सूचविण्यात आलेल्या संबंधीत बँक खात्यात २५ हजार रुपयांची रक्कम जमा केली. मात्र कोणतेही पार्सल त्याला मिळाले नाही. उलट वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असलेल्या खात्यांमध्ये आणखी रक्कम भरण्याच्या सूचना राऊतला देण्यात आल्या. याबाबत सुध्दा काहीही शहानिशा न करता अडीच कोटीच्या लालसेपोटी राऊतने विविध खात्यांमध्ये १२ लाख रुपये जमा केले. 
======================================
"स्मार्ट व्हिलेज' गावांची कर्मचाऱ्यांकडून पाहणी

चंडिगड - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दत्तक घेतलेल्या पाच गावांना राष्ट्रपती भवनमधील सचिवांच्या पथकाने बुधवारी भेट दिली. या गावांचा विकास करून त्यांचे "स्मार्ट व्हिलेज‘मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

"स्मार्ट व्हिलेज‘ या योजनेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 2 जुलै) राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. नीती आयोग, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, कृषी व अन्य विभागांतील प्रतिनिधीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मुखर्जी यांनी गुरगाव जिल्ह्यातील अलिपूर, दौला, हरचंदपूर, ताजनगर आणि मेवात जिल्ह्यातील रोजका मेवो ही गावे दत्तक घेतली आहेत. तेथे "स्मार्ट व्हिलेज‘च्या योजनेला दोन जुलैपासून प्रारंभ होणार आहे.

या गावांना भेट देऊन पथकातील सदस्यांनी गुरगावचे उपायुक्त टी. एल. सत्यप्रकाश यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रपती भवनातील सचिवालयाचे संचालक एन. के. सुधांशू, राष्ट्रपतींचे विशेष अधिकारी (ओएसडी) अभिजित राय, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे प्रतिनिधी कृष्णन गौर, राष्ट्रीय सूचना केंद्राचे एस. डी. शर्मा यांचा या पथकात समावेश आहे. 

======================================
हैदराबादमध्ये स्फोटाचा कट उधळला


हैदराबाद - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रात्री हैदराबादमध्ये छापे घालून बॉंबस्फोटाचा कट उधळून लावत "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया‘ (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित 13 संशयितांना ताब्यात घेतले. ही माहिती "एनआयए‘चे पोलिस महासंचालक संजीव कुमार यांनी बुधवारी दिली.

जुन्या हैदराबादमधील चंद्रयानगुट्टा, चारमिनार, मोगलपुरा, ताबालकट्टा, भवानीनगर, अमाननगर, बहादूरपुरासह 13 ठिकाणी "एनआयए‘ने मंगळवार (ता.28) रात्रीपासून बुधवारी पहाटे पाचपर्यंत छापे घातले. यात ताब्यात घेतलेल्या 13 जणांचा "इसिस‘चे सीरियातील मुख्यालयाशी थेट संपर्क असल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून स्फोटासाठी लागणारी रसायने, चीनी बनावटीची नऊ एम. एम. पिस्तुले, एअर गन व 15 लाख रुपयांची रोख रक्कम, पेन ड्राईव्ह, 25 मोबाईल फोन, लॅपटॉप, सिम कार्ड "इसिस‘शी संबंधित डीव्हीडी व व्हीडीओ क्‍लिप जप्त केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे सर्व संशयित एकमेकांशी संपर्कात होते. 
======================================
'गुमनामी बाबां'च्या चौकशीसाठी आयोग

लखनौ - "गुमनामी बाबा‘ हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते का, याचा शोध घेण्यासाठी एक सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला असून हा आयोग सहा महिन्यात अहवाल सादर करणार आहे.



उत्तर प्रदेशमधील फैजाबाद येथे 1985 पर्यंत "गुमनामी बाबा‘ राहात होते. ते नेताजी सुभाषचंद्र बोस होते असा बहुतेकांचा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने याबाबतची चौकशी करण्यासाठी एकसदस्यीय न्यायिक आयोग स्थापन केला आहे. "निवृत्त न्यायाधीश विष्णू सहाय यांचा हा एकसदस्यीय आयोग असून हा आयोग पुढील सहा महिन्यात याबाबतचा अहवाल सादर करेल. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे‘, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 
======================================
सलमानने माफी मागितली नाही - महिला आयोग

नवी दिल्ली : बलात्कार पीडितांवर केलेल्या अपमानजनक टीपण्णीबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने पाठविलेल्या नोटिशीला अभिनेता सलमान खानने आपल्या वकिलामार्फत उत्तर दिले. याबाबतची माहिती खुद्द आयोगाच्या अध्यक्षा ललिथा कुमारमंगलम यांनी दिली. मात्र, सलमानने त्याच्या वक्तव्याबद्दल कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नसून आयोग त्याने दिलेल्या उत्तराचा अभ्यास करत असल्याचे कुमारमंगलम यांनी सांगितले.

"सुलतान‘ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने स्वतःची तुलना बलात्कार पीडित महिलेशी केली होती. मुलाखतीदरम्यान सलमानला "सुलतान‘ चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका निभावणं किती कठीण गेलं ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. "सहा तास सलग शूटिंग करताना अनेक वेळा मैदानावर उचलणं, आपटणं चालू असायचं. शूटिंग संपल्यानंतर बाहेर पडताना बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं, असे विधान सलमानने केलं होतं. सलमानच्या या वक्तव्याबाबत त्याचे वडील व प्रख्यात लेखक सलिम खान यांनी ट्विटद्वारे माफीही मागितली होती. 
======================================
गोव्यात 'सेक्‍स टुरिझम' फोफावतंय: केजरीवाल

पणजी : ‘गोव्यामध्ये ‘सेक्‍स टुरिझम‘चे प्रमाण वाढत असून येथील राजकीय पक्षांचा त्याला पाठिंबा आहे,‘ असा आरोप ‘आम आदमी पार्टी‘चे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (बुधवार) केला. ‘राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर गोव्यात सुरू असलेला अंमली पदार्थांचा व्यवसाय आणि वेश्‍याव्यवसाय यामुळे राज्याची बदनामी होत आहे,‘ असेही केजरीवाल म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. प्रचारासाठी केजरीवाल यांनी येथील हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधितांची आज भेट घेतली.

केजरीवाल म्हणाले, "वेश्‍याव्यवसाय, अंमली पदार्थांचा विळखा आणि ‘सेक्‍स टुरिझम‘मुळे गोव्याचे नाव खराब होत आहे. राजकीय पक्षांचाच त्याला पाठिंबा असल्याने हे प्रकार रोखले जात नाहीत.‘‘ विकासासाठी गोव्यामध्ये दिल्लीचे ‘मॉडेल‘ राबविले जाईल, असे आश्‍वासनही केजरीवाल यांनी दिले. ‘गोव्याचा जाहीरनामा ‘आप‘ नव्हे, तर येथील जनताच तयार करत आहे,‘ असा दावाही त्यांनी केला. 
======================================
संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून होणार

नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट यादरम्यान घेण्यात येणार आहे, असे संसंदीय कामकाज मंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी आज (बुधवार) जाहीर केले. 

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवशेनामध्ये वस्तू व सेवा कर (GST) विधेयक, अणू पुरवठादार गटाचे (NSG) सदस्यत्व मिळविण्यात भारताला आलेले अपयश, तसेच दिल्लीतील आप आणि भाजपमधील राजकारण यावरून सरकारला विरोधकांना सामोरे जावे लागेल. 

संसदीय कामकाजासंदर्भात मंत्रिमंडळ समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
"पावसाळी अधिवेश 18 जुलै रोजी सुरू होईल... अधिवेशनात 20 दिवस कामकाज चालेल," असे नायडू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
======================================
"व्हॉटसऍप'वर बंदी नाही - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : "व्हॉटसऍप‘ या लोकप्रिय मेसेंजर ऍपवर बंदी घालता येणार नसल्याचे आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे "व्हॉटसऍप‘ लाखो वापरकर्त्यांना (युजर्स) दिलासा मिळाला आहे.

हरियानातील माहिती आधिकारी कार्यकर्ते सुधीर यादव यांनी व्हॉट्‌स ऍपवर बंदी आणण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. व्हॉट्‌सऍपवरील एंड-टू-एंड इन्क्रिप्शनमुळे (सांकेतिक लिपीबद्ध करून मजकूर सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया) दहशतवाद्यांना संवाद साधणे अधिक सोपे झाले असून यामुळे व्हॉट्‌सऍपवर बंदी आणावी, अशी मागणी यादव यांनी याचिकेद्वारे केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेवर आज (बुधवार) सुनावणी केली. त्यामध्ये ‘व्हॉटसऍप‘वर बंदी आणता येणार नसल्याचे म्हटले आहे. 

======================================

No comments: