Monday, 6 June 2016

नमस्कार लाईव्ह ०६-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- मार्क झुकरबर्गचं ट्विटर अकाऊण्ट हॅक 
२- टोकियो; सिंहाचा चिमुरड्यावर हल्ल्याचा प्रयत्न, काचेने वाचवलं 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- मान्सून दारात उभा, 48 तासात केरळात एण्ट्री 
४- शहीद महाडिकांची पत्नी 'इंडियन आर्मी'त 
५- शिवसेनेत जाणार ही अफवा - प्रिया दत्त 
६- मथुरा हिंसाचाराप्रकरणी जनहित याचिका दाखल 
७- गुलबर्ग सोसायटी;दोषींवरील शिक्षेचा निर्णय 9 जूनला 
८- परदेशी महिलेवरील बलात्कार प्रकरणी 5 दोषी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, मुख्यमंत्री पत्ते खोलणार 
१०- पक्ष पाठिशी आहे, चौकशीतून सत्य बाहेर येईल - एकनाथ खडसे 
११- सर्वाधिक कॉपीबहाद्दर औरंगाबादेत, तर तोतयेगिरीत नाशिक विभाग अव्वल 
१२- 'खडसेंना पुन्हा मंत्रिपद द्या, अन्यथा आत्महत्या करु' 
१३- रेल्वे स्टेशनवर 1 रुपयात मिळणार 300 मिली पाणी 
१४- गोदावरी पुर्नजीवनासाठी केंद्र-राज्याकडे पाठपुरावा 
१५- साध्वी प्रज्ञासिंहचा जामिनाचा मार्ग मोकळा 
१६- पुद्दुचेरी; नारायणसामींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- बेळगाव; दारु विक्रेत्याचं अर्धमुंडन, चपलांचा हार घालून काढली धिंड 
१८- अलीगड; क्रिकेट खेळताना छातीवर चेंडू आदळला, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू 
१९- मुंबई; गर्लफ्रेण्डशी लग्नासाठी पोलिसांचा खबऱ्या झाला सोनसाखळीचोर 
२०- सिंधुदुर्ग; दहावीत मिळाले १०० टक्के गुण 
२१- जम्मू; सेल्फी घेण्याच्या नादात युवक दरीत पडला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- 'सैराट' परशालाही लॉटरी, नव्या सिनेमाचं शुटिंग सुरू 
२३- यू टेलिव्हेंचर्सचा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन आपल्या भेटीला 
२४- सुशील कुमारचं रिओ ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं 
२५- आमीरची पत्नी किरण नवे फेक फेसबुक अकाऊंट; पोलिसांत धाव 
२६- 'हाऊसफुल 3' ची तीन दिवसात विक्रमी कमाई 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=======================================

मान्सून दारात उभा, 48 तासात केरळात एण्ट्री

मान्सून दारात उभा, 48 तासात केरळात एण्ट्री
तिरुअनंतपूरम:  ज्याची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून होती, तो अखरे दारात उभा राहिला आहे. पुढच्या 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात दाखल होईल. एबीपी माझाची मान्सून एक्स्प्रेस पावसाची वर्दी देण्यासाठी केरळमध्ये दाखल झाली आहे. केरळच्या वातावरणातील बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

दरम्यान पुढच्या तीन तासात अमरावती, बुलडाणा, नागपूर, नांदेडच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे.
=======================================

देखना है जोर कितना...शहीद महाडिकांची पत्नी 'इंडियन आर्मी'त

देखना है जोर कितना...शहीद महाडिकांची पत्नी 'इंडियन आर्मी'त !
सातारा : ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ए कातील में है’, असंच काहीसं देशप्रेम शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या संपूर्ण कुटुंबात ठासून भरल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण पतीच्या वीरमरणानंतर निर्धार केल्याप्रमाणे शहीद संतोष महाडिक यांची वीरपत्नीही ‘इंडियन आर्मी’त रुजू झाली आहे.

खडतर परिश्रमातून आर्मीची वर्दी

स्वाती महाडिक या ’21 पॅरा स्पेशल फोर्स’मध्ये दाखल झाल्या आहेत. स्वाती यांना आर्मीचा ड्रेस केवळ सहानुभूतीतून नव्हे, तर एका सामान्य सैनिकाला जे जे करावं लागतं, त्या सर्व खडतर परिश्रमातूनचा मिळाला आहे. त्यांना केवळ सूट मिळाली ते वयाच्या अटीतून.

स्वाती या अवघड अशी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अर्थात SSB ची परीक्षा पास झाल्या. त्यानंतर त्या ट्रेनिंगसाठी चेन्नईत दाखल झाल्या आहेत. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथं त्यांचं प्रशिक्षण होईल.
=======================================

'सैराट' परशालाही लॉटरी, नव्या सिनेमाचं शुटिंग सुरू

'सैराट' परशालाही लॉटरी, नव्या सिनेमाचं शुटिंग सुरू
मुंबई:  नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला परशा अर्थात आकाश ठोसर आता नव्या इनिंगला सज्ज झाला आहे. त्याची ही नवी इनिंग रंगणाराय थेट महेश मांजरेकरसोबत.

महेश मांजरेकरने आकाशला त्याच्या नव्या सिनेमासाठी कास्ट केलं आहे. या सिनेमात तो हिरो म्हणून झळकणार आहे.

या सिनेमाचं नाव जाहीर केलं नसलं तरी शुटिंग मात्र सुरु झालं आहे. मुंबईतल्या गोरेगांव फिल्म सिटीमध्ये सध्या परशा शूटिंग करतोय.

त्यामुळे ‘सैराट’ला मिळालेलं सैराट यश फक्त सिनेमापुरतंच मर्यादित राहिलं नसून, त्याचा परीसस्पर्श यातल्या कलाकारांनाही झालाय असंच म्हणावं लागेल.
=======================================

दारु विक्रेत्याचं अर्धमुंडन, चपलांचा हार घालून काढली धिंड

दारु विक्रेत्याचं अर्धमुंडन, चपलांचा हार घालून काढली धिंड!
प्रातिनिधिक फोटो
बेळगाव: दारुबंदी असलेल्या गावात चोरन दारु विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला दारु विकताना रंगेहाथ पकडून त्याचं अर्धमुंडन करुन गळ्यात चप्पलांचा हार घालून गावातून धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे.
 
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील हल्ळूर गावामध्ये हि घटना घडली. रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने महिलांनी दारूबंदीसाठी गावात पुढाकार घेतला होता. या प्रयत्नातून गावामध्ये दारुबंदीही करण्यात आली होती. मात्र, गावात दारुबंदी असतानाही एक व्यक्ती दारु विक्री करत असल्याचं गावातील महिलांना आढळून आलं.

या यानंतर संतप्त महिलांनी एकत्र येऊन दारू विक्रेत्यास चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विक्रेत्याला पकडलं. यामध्ये फक्त महिलाच सहभागी नव्हत्या तर गावातील तरुणांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. दारु विक्रेता सापडल्यानंतर त्याला कायमचा धडा शिकवण्यासाठी चक्क त्याचे अर्धमुंडन करण्यात आलं. संतप्त नागरिक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्याच्या गळ्यात चप्पलांचा हार घालून संपूर्ण गावातून धिंडही काढली. जेणेकरुन यापुढे कुणीही अशाप्रकारचं कृत्य करु नये.
=======================================

सर्वाधिक कॉपीबहाद्दर औरंगाबादेत, तर तोतयेगिरीत नाशिक विभाग अव्वल

सर्वाधिक कॉपीबहाद्दर औरंगाबादेत, तर तोतयेगिरीत नाशिक विभाग अव्वल
मुंबई : राज्याच्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 89.56 टक्के लागला आहे. निकाला 51,281 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मात्र त्याचवेळी कॉपी आणि तोतयेगिरीची (डमी) प्रकरणंही समोर आली आहेत.


राज्यात एकूण 16,01,406 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 922 कॉपीची प्रकरणं असून 13 प्रकरणं तोतयेगिरीची आहेत. सगळ्यात जास्त कॉपीबहाद्दर औरंगाबादमध्ये असून मुंबई विभागात हे प्रमाण सर्वात कमी आहे. तर तोतयेगिरीमध्ये नाशिक विभाग अव्वल ठरलं आहे.


औरंगाबादमध्ये कॉपीचे 314 प्रकरणं समोर आली आहेत. या विभागात एकूण 1,73,160 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यावेळी मुंबईत कॉपीचं प्रकणत सर्वात कमी असल्याचं उघड झालं आहे. मुंबई विभागात 3,23,955 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 18 जण कॉपी करताना आढळले.
=======================================

यू टेलिव्हेंचर्सचा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन आपल्या भेटीला

यू टेलिव्हेंचर्सचा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन आपल्या भेटीला
नवी दिल्लीः यू टेलिव्हेंचर्स या कंपनीचा Yu Yunicorn हा फ्लॅगशिप स्मार्टफोन उद्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.  या बजेट स्मार्टफोनची किंमत केवळ 12 हजार 999 रुपये असून यू टेलिव्हेंचर्स कंपनीचा एवढ्या कमी किंमतीचा हा पहिलाच फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. या फोनच्या किंमतीत एका महिन्यानंतर वाढ होणार असून 13 हजार 499 रुपये एवढी असणार आहे.

यू टेलिव्हेंचर्स कंपनीने यापूर्वी देखील Yu Yutopia हा फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनची किंमत 24 हजार 999 रुपये होती. इतर स्मार्टफोनच्या स्पर्धेत या स्मार्टफोनला म्हणावा तसा प्रतिसाद न  मिळाल्यामुळे कंपनीने Yu Yunicorn हा मिडबजेट स्मार्टफोन आणला आहे.

Yu Yunicorn स्मार्टफोनचे खास फीचर्स:

  • 5.5 इंच आकाराची मिराव्हिजन 2.0 ही एचडी स्क्रिन

  • Yu Yunicorn फोन मेटल बॉडीमध्ये उपलब्ध असून यात नवे फीचर्सही देण्यात आले आहेत.

  • मीडिया टेक हेलिओ P10 हे प्रोसेसर

  • 4GB ची रॅम आणि 32GB  स्टोअरेज

  • Yu Yunicorn फोनचे दोन्हीही कॅमेरा याचे खास आकर्षण आहेत. 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा

  • 4000mAh क्षमतेची बॅटरी आहे.
=======================================

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, मुख्यमंत्री पत्ते खोलणार

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, मुख्यमंत्री पत्ते खोलणार !
मुंबई : एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या दहा दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळे पत्ते आपल्याकडे राखून ठेवले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देऊन, मुख्यमंत्री धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

याशिवाय येत्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी नेहमीप्रमाणे मित्रपक्षातील सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांच्या नावाची चर्चा आहे.

कोअर कमिटीची बैठक
दरम्यान, खडसेंच्या राजीनाम्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी भाजपाची आज कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, संघटनमंत्री व्ही सतीश सहभागी होणार आहेत.  या बैठकीला एकनाथ खडसेही हजर राहण्याची शक्यता आहे.

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 12 आणि 13 जूनला अलाहाबादमध्ये होत आहे. तर राज्यातील कार्यकारिणीची बैठक 18 आणि 19 रोजी पुण्यात होणार आहे. त्यामुळे या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
=======================================

'खडसेंना पुन्हा मंत्रिपद द्या, अन्यथा आत्महत्या करु'

'खडसेंना पुन्हा मंत्रिपद द्या, अन्यथा आत्महत्या करु'
मुंबई: एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर आता भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ खडसेंना मंत्रिपद परत द्या अन्यथा आत्महत्या करु असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मुंबई भाजपच्या कार्यालयासमोर आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजीही केली. एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर आरोप झालेत असा दावाही यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर खडसे आणि पंकजा मुंडेंची कोंडी सुरु केल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्यावरुन भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
=======================================
मार्क झुकरबर्गचं ट्विटर अकाऊण्ट हॅक
मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट्सचा बेताज बादशाह अशी ज्याची ख्याती आहे, त्या फेसबुकच्या सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गचीच अकाऊण्ट सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मार्कचं ट्विटर आणि पिंटरेस्ट अकाऊण्ट हॅक झाल्याची माहिती आहे.
 
2012 मध्ये लाखो यूझर्सचं लिंक्डइन अकाऊण्ट हॅक झालं होतं. वर्च्यू बीटच्या एका रिपोर्टनुसार यामध्ये मार्क झुकरबर्गचाही समावेश आहे. OurMineTeam नावाच्या हॅकरने याच लिंक्डइन अकाऊण्टच्या मदतीने मार्कचं ट्विटर, इन्स्टाग्राम आणि पिंटरेस्ट अकाऊण्ट हॅक केल्याचा दावा केला आहे.
 
संबंधित हॅकरच्या ग्रुपचे ट्विटरवर 40 हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत. या ग्रुपने मार्कच्या कथित ट्विटर अकाऊण्टवरुन ट्वीट्सही केले आहेत. ‘मार्क, आम्ही सुरक्षा चाचणीसाठी तुझं ट्विटर, इन्स्टा आणि पिंटरेस्ट अकाऊण्ट हॅक केलं आहे. प्लीज आम्हाला उत्तर दे’ असं त्यात म्हटलं आहे.
=======================================

क्रिकेट खेळताना छातीवर चेंडू आदळला, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळताना छातीवर चेंडू आदळला, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
अलीगड : उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्याच्या हरदुआगंजमध्ये खेळाखेळात दुर्दैवी अपघात घडला. जटपुरा गावात गल्ली क्रिकेट खेळताना छातीवर चेंडू आदळल्याने 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आकाश असं मृत मुलाचं नाव आहे.

चौथीत शिकणारा आकाश घराशेजारीच क्रिकेट खेळत होता. मात्र यावेळी एक चेंडू त्याच्या छातीवर आदळला. यानंतर आकाश खाली कोसळला आणि त्याच मृत्यू झाला.


चेंडू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला दीनदयाळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र छातीला गंभीर दुखापत झाल्याचं सांगत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. तसंच शवविच्छेदन न करताच आकाशवर अंत्यसंस्कार केले.
=======================================

आमीरची पत्नी किरण रावची पोलिसात धाव

आमीरची पत्नी किरण रावची पोलिसात धाव
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानची पत्नी, निर्माती किरण रावने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम सेलमध्ये धाव घेतली आहे. फेक फेसबुक अकाऊण्ट सुरु करुन सोशल मीडियामध्ये प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील सायबर पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
 
फेसबुकवर किरण राव यांच्या नावे खोटं फेसबुक अकाऊण्ट उघडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. इतकंच नाही, तर संबंधित व्यक्ती किरण यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी चॅटिंग करत असल्याचा दावाही राव यांनी केला आहे. पोलिसांनी किरण राव यांची तक्रार दाखल केली असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
देशात असहिष्णुता वाढत असून भारत असुरक्षित असल्याची भीती किरण यांनी व्यक्त केल्याचं आमीर खानने जाहीर कार्यक्रमात सांगितल्यानंतर देशभरातून टीकेची झोड उठली होती. अनेकांनी किरण राव यांना देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही त्याचे गंभीर पडसाद उमटले होते.
 
किरण राव दिग्दर्शित धोबीघाट या चित्रपटात आमीर खानने भूमिका साकारली होती. तर त्यांनी पीपली लाईव्ह, देल्ही बेल्ली यासारख्या चित्रपटांचीही निर्मिती केली होती.
=======================================

'हाऊसफुल 3' ची तीन दिवसात विक्रमी कमाई

'हाऊसफुल 3' ची तीन दिवसात विक्रमी कमाई
मुंबई : अभिनेता अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘हाऊसफुल 3’ हा सिनेमा यंदाचा विकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.  या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 53 कोटींची कमाई केली आहे. तसंच ‘हाऊसफुल 3’ ने शाहरुखच्या ‘फॅन’ सिनेमाचा विक्रमही मोडला आहे.

यापूर्वी यंदा ‘फॅन’ने विकेंडमध्ये 52.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र आता ‘हाऊसफुल 3’ने त्यापुढे मजल मारली आहे.

‘हाऊसफुल 3’ने भारतात 53.31 तर जगभरात 26.77 मिळून 80.08 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘फॅन’पाठोपाठ अक्षय कुमारचा एयरलिफ्ट या सिनेमाने 44.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफच्या बागी या सिनेमाने तीन दिवसात 38 कोटींची कमाई केली होती.

‘हाऊसफुल 3’ ने पहिल्याच दिवशी 15.21 कोटी, दुसऱ्या दिवशी 16.30 कोटी तर तिसऱ्या दिवशी 21.80 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे कमाईचा आकडा 53.31 कोटींवर पोहोचला आहे.

यापूर्वी 2010 मध्ये हाऊसफुल हा सिनेमा आला, तर त्यानंतर 2012 मध्ये ‘हाऊसफुल 2’ आणि आता ‘हाऊसफुल 3’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

चित्रपट

पहिल्या दिवसाची कमाई

फॅन19.20 कोटी
हाऊसफुल 315.21 कोटी
एअरलिफ्ट12.35 कोटी
बागी11.94 कोटी
=======================================

गर्लफ्रेण्डशी लग्नासाठी पोलिसांचा खबऱ्या झाला सोनसाखळीचोर

गर्लफ्रेण्डशी लग्नासाठी पोलिसांचा खबऱ्या झाला सोनसाखळीचोर
फाइल फोटो
मुंबई : गर्लफ्रेण्डसोबत लग्नासाठी पैसे मिळवता यावेत, म्हणून पोलिसांचा खबऱ्यात सोनसाखळीचोर झाल्याची आश्चर्यकारक घटना मुंबईत घडली आहे. पोलिसांनी एका तरुणीसह चौघा सोनसाखळीचोरांना मालाडच्या रेस्टॉरंटमध्ये बेड्या ठोकल्या आहेत.
 
धनराज उर्फ बिट्टू या 21 वर्षीय खबऱ्यासह त्याची 26 वर्षीय गर्लफ्रेण्ड पूनम आणि दोन तरुणांना अटक झाली आहे. चौघांवर मुंबईत शिवाजी पार्क, वर्सोवा, समतानगर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. ‘मिड डे’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
 
पोलिस सोनसाखळीचोरांची धरपकड कशी करतात, ही पोलिसांच्या तपासाची पद्धत लक्षात घेऊन बिट्टू चोऱ्या करत असल्याचं समोर आलं आहे. दागिने विकून खाणंपिणं, कपडे आणि ड्रग्जवर हा पैसा उधळला जात असे.
=======================================

रेल्वे स्टेशनवर 1 रुपयात मिळणार 300 मिली पाणी


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 06 - तुम्ही रेल्वे स्थानकावर आहात आणि तुम्हाला प्रचंड तहान लागली आहे, समोर पाणपोई आहे मात्र त्याची अस्वच्छता पाहून तुम्ही नाक मुरडता आणि मनात नसतानाही 10 ते 20 रुपये देऊन बाटलीबंद पाणी खरेदी करता...हा अनुभव सर्वच रेल्वे प्रवाशांना एकदा तरी आलेला असतोच. मात्र रेल्वेने प्रवाशांसाठी आता फक्त 1 रुपयात 300 मिली पाणी देण्याची सोय केली आहे. 
     
    रेल्वे प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी रेल्वे स्थानकांवर 'वॉटर पॉईंट' स्टॉल उभे करण्यात येणार आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) याची जबाबदारी घेतली आहे. या माध्यमातून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना कमी दरात स्वच्छ पाणी मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे प्रवाशांना देण्यात येणा-या पाण्याची आरओ मेकॅनिझमच्या (पाणी स्वच्छ करण्याचं तंत्र) सात टप्प्यांमध्ये चाचणी करण्यात आली असून पुर्णपण जंतूमुक्त असणार आहे.
=======================================

दहावीत मिळाले १०० टक्के गुण


  • ऑनलाइन लोमकत
    सिंधूदुर्ग, दि. ६ : सध्या देशातील विविध राज्यांमध्ये १० वी आणि १२ वीचे निकाल येणे सुरू आहेत. अशात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक प्रेरणा ठरू शकेल, अशी कामगिरी तनया वाडकर नावाच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याींनीने केली आहे. साध्या मध्यमवर्गीय घरातील तनयाने स्वतच्या आफाट मेहनतीच्या बळावर ही कामगीरी केली आहे. ज्याला अनेक विद्यार्थी अशक्यप्राय गोष्ट मानतात असे काम तनया वाडकरने केलं आहे. दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. असून राज्यातील ३९ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. त्यापैकी तनया वाडकर एक आहे, सावंतवाडी येथिल मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. कुळसकर या छोट्याशा गावात राहणारी ही पोर.
     
     
    तनयाला मराठी ९५, संस्कृत ९९ इंग्रजी ९१, गणित ९७, विज्ञान ९८ आणि इतिहास-भुगोल ९६ गुण मिळाले आहेत. ५०० पैकी ४८५ गुण घेऊन उतीर्ण झाली आहे. ग्रेड पद्धत असल्यामुळे तिला १०० टक्के गुण दिले गेले आहेत. तिने यशस्वी होण्यामागे आई-वडिल-आजी-आजोबा असल्याचं सांगीतलं, त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केल त्यामुळे मी यशस्वी झाल्याचं सांगीतलं .
=======================================

पक्ष पाठिशी आहे, चौकशीतून सत्य बाहेर येईल - एकनाथ खडसे


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. ६ - भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या  असून काही ठिकाणी जाळपोळ व रास्ता रोकोच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी बोलताना एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन सोमवारी केले आहे.
    पक्ष माझ्या पाठिशी आहे, चौकशीतून सत्य सर्वांसमोर येईलच. माझ्यासाठी नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज नाही आहे. तसेच, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी यावेळी केले.
    एकनाथ खडसे यांच्यावर एकामागून एक आरोप झाल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.  
=======================================

जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत काँग्रेसमध्येच, शिवसेनेत जाणार ही अफवा - प्रिया दत्त


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 06 - काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण देत शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. प्रिया दत्त यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रिया दत्त शिवसेनेते प्रवेश करुन काँग्रेसला धक्का देत असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. 
     
     
    'जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत आपण काँग्रेसमध्येच राहणार आहोत. आमचं कुटुंब नेहमी काँग्रेससोबत राहिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी आमचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यासाठीच त्यांची भेट घ्यायला गेली होती. नर्गिस दत्त फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त जास्तीत जास्त फंड गोळा करता यावा यासाठी उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरण्याची विनंती त्यांना करण्यासाठी भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनात वापरण्यासाठी चार फोटोही दिले आहेत', असं प्रिया दत्त यांनी सांगितलं आहे. 
=======================================

सिंहाचा चिमुरड्यावर हल्ल्याचा प्रयत्न, काचेने वाचवलं




टोकियो, दि. 06 - अमेरिकेतील ओहाओ प्राणी संग्रहालयात 4 वर्षाच्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी गोरिलाला ठार मारावं लागलेली घटना ताजी असताना पुन्हा एकदा प्राण्याने चिमुरड्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. टोकियोमधील छिबा प्राणीसंग्रहालयात सिंहाच्या पिंज-याबाहेर उभ्या असलेल्या 2 वर्षाच्या चिमुरड्यावर सिंहाने एकदम उडी मारुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने सुरक्षेसाठी लावण्यात आलेली काच आडवी आल्याने चिमुरड्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. 
 
(व्हिडिओ - चिमुरड्याला वाचवण्यासाठी गोरिलाला केलं ठार)
 
सिंहाने चिमुरड्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सिंहाच्या पिंज-याबाहेर उभा राहून चिमुरडा कौतुकाने त्याच्याकडे पाहत होता. मात्र त्याचं लक्ष नसलेलं पाहून सिंहाने झेप घेतली आणि चिमुरड्यावर पंजा मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षेसाठी लावण्यात आलेली काच आडवी आली, आणि सिंहाची फजिती झाली. काचेवर सिंह जोरदार आपटल्यानंतर चिमुरडा थोडासा घाबरला, मात्र त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. 
 
सिंह जेव्हा कधी लहान मुलांना पाहतो तेव्हा अशाच प्रकारे वागतो अशी माहिती प्राणीसंग्रहालयातील कर्मचा-यांनी दिलेली आहे. 

=======================================
सेल्फी घेण्याच्या नादात युवक दरीत पडला

जम्मू- रियासी जिल्ह्यात आपल्या मोबाईलवर सेल्फी घेण्याच्या नादात एक युवक 50 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या युवकास किरकोळ जखमा झाल्या आहेत.

विनयकुमार हा काल रियासी जिल्ह्यातील सेहादबाबाच्या जवळून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात पाय घसरला आणि तो दरीत पडला. या घटनेची माहिती कळताच परिसरातील स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. 50 फूट खोल पडूनही तो वाचला हे चमत्कारापेक्षा वेगळे नाही, असे पोलिसांनी नमूद केले. जानेवारीत रियासी जिल्ह्यात एका किल्ल्यावर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा पडून मृत्यू झाला होता.
=======================================
मथुरा हिंसाचाराप्रकरणी जनहित याचिका दाखल

नवी दिल्ली - मथुरेतील हिंसाचारावरून आता राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून येथे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष अशी राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे.

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी या हिंसाचारासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना जबाबदार ठरविले असून भाजप नेत्या आणि मथुरेच्या खासदार हेमामालिनी यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मथुरा हिंसाचाराप्रकरणी सीबीआय चौकशीची जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

न्यायमूर्ती पी.सी घोष आणि अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर केली. वकील कामिनी जयस्वाल यांनी तातडीने सुनावणीचा उल्लेख केला आहे. जयस्वाल यांनी दाखल करून घेतलेल्या याचिकेत दिसणारे पुरावे, घटना पुरावे सुरवातीपासून नष्ट होत असल्याचे यात म्हटले आहे, या घटनेत सुमारे 200 वाहने आधीच जाळल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेची तीव्रता समजून सीबीआयने याची लवकरात लवकर चौकशी सुनावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या हिंसाचारात पोलिस दलातील वरिष्ठ आधिकाऱ्यांसह 29 नागरिक मृत्युमुखी पडले. ही याचिका आश्‍विनी उपाध्याय यांनी दाखल केली आहे.
=======================================
गोदावरी पुर्नजीवनासाठी केंद्र-राज्याकडे पाठपुरावा

नाशिक - स्वच्छ गोदावरी हाच उद्देश या भूमिकेतून नाशिककरांनी एकत्र येउन विकास आराखडयासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी एकत्रित पाठपुरावा करण्याचा निर्णय नाशिककरांनी घेतला.

सकाळ माध्यम समूहातर्फे येथील हॉटेल एसएसके सॉलिटिअर मध्ये झालेल्या चर्चासत्रात नाशिकचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय आधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
=======================================
साध्वी प्रज्ञासिंहचा जामिनाचा मार्ग मोकळा

मुंबई - मालेगावमध्ये आठ वर्षांपूर्वी घडलेल्या बाँबस्फोटाच्या खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) साध्वी प्रज्ञासिंबच्या जामीनास आपली हरकत नसल्याचे आज (सोमवार) न्यायालयात सांगितले.

एनआयएने नुकतीच साध्वी प्रज्ञासिंहसह सहा जणांना क्‍लीन चिट दिली होती. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंहच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान एनआयएने आपली जामिनास काही हरकत नसल्याचे सांगत आता न्यायालयाने निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. आता साध्वी प्रज्ञासिंहच्या जामीनावर 8 जूनला निर्णय होणार आहे.

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात साध्वी प्रज्ञासिंहसह सहा आरोपींविरोधात पुरावा आढळला नाही, असे म्हटले होते. विशेष म्हणजे आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितसह दहा जणांवरील ‘मोका’ही ‘एनआयए’ने हटविला आहे. यामुळे मुंबई ‘एटीएस’लाही चांगलाच दणका बसला होता. आता एनआयएकडून क्लिन चीट मिळाल्यानंतर साध्वी यांच्या वकिलांना जामिनासाठी अर्ज केला. त्यामुळे त्यांना जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे.
=======================================
गुलबर्ग सोसायटी;दोषींवरील शिक्षेचा निर्णय 9 जूनला

अहमदाबाद - गुजरातमधील 2002मध्ये झालेल्या दंगलीतील गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या 24 आरोपींच्या शिक्षेवरील सुनावणी 9 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारी वकीलांकडून सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आज (सोमवार) झालेल्या सुनावणीत करण्यात आली.

विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) विशेष न्यायालयाने 2 जून रोजी एकूण 24 आरोपींना या प्रकरणी दोषी ठरविले होती. दोषींपैकी खून केल्याचा आरोप असलेल्या 11 जणांना फाशीची शिक्षा ठोठाविण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. तर या 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केली. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. देसाई यांनी एकूण 66 पैकी 24 जणांना दोषी ठरविले आहे. दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींमध्ये विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्यासह भारतीय जनता पक्षाचा विद्यमान नगरसेवक बिपीन पटेल, कॉंग्रेसचा माजी नगरसेवक मेघश्‍याम चौधरी आणि तत्कालीन पोलिस निरीक्षकाचाही समावेश आहे. तसेच, या प्रकरणातील एकूण 66 आरोपींपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

गुलबर्ग सोसायटीत काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांची जाळून हत्या करण्यात आली होती. 
=======================================
परदेशी महिलेवरील बलात्कार प्रकरणी 5 दोषी

नवी दिल्ली - दिल्लीतील न्यायालयाने 2014 मध्ये एका  डॅनिश महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्कारप्रकरणी पाच जणांना दोषी ठरविले आहे.

अर्जुन, राजू उर्फ छक्का, मोहम्मद राजा, महेंद्र उर्फ गंजा, राजू उर्फ बज्जी आणि श्यामलाल यांच्यावर जानेवारी 2014 मध्ये दिल्ली रेल्वे स्थानकाजवळ एका डॅनिश महिलेने तिच्या हॉटेलचा पत्ता विचारला असता तिला लुटून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता. फेब्रुवारीमध्ये श्यामलालचा तिहार कारागृहात मृत्यू झाला. दोषींपैकी तीन जण अल्पवयीन असून त्यांच्यावर बालगुन्हेगार न्यायमंडळ कारवाई करत आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रमेश कुमार यांनी या पाच जणांना दोषी ठरवले आहे. नऊ जूनला होणाऱ्या सुनावणीत या दोषींना त्यांची बाजू मांडायची संधी दिली जाणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी या महिलेला विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांच्या क्लबजवळील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले व तिच्याजवळील वस्तू लुटून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता.
=======================================
पुद्दुचेरी; नारायणसामींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ 
पुद्दुचेरी - कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व्ही. नारायणसामी यांनी आज (सोमवार) पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नारायणसामी यांच्यासह कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी या वेळी मंत्रिपदाची शपथ घेतली.

पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी नारायणसामी यांच्यासह इतर पाच जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी शपथविधीचा कार्यक्रम झाला. पुद्दुचेरीमध्ये यूपीए सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहे. नारायणसामी यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यापूर्वी यूपीएच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांच्याकडे संसदीय कामकाज राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. 

नारायणसामी यांनी पुद्दुचेरी विधानसभेची नुकतीच झालेली निवडणूक लढविली नव्हती, त्यामुळे पुढील सहा महिन्यांत आमदारपदी निवडून यावे लागणार आहे. विधानसभेत निवडून न येता मुख्यमंत्री होणारे नारायणसामी हे दुसरे व्यक्ती आहेत. 
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================

No comments: