Saturday, 4 June 2016

नमस्कार लाईव्ह ०४-०६-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना 
2- कब्जा केलेला प्रांत सोडा : भारताने पाकला सुनावले 
३- अथेन्स; समुद्रकिनारी आढळले ११७ मृत निर्वासित 
४- दहशतवादाविरुद्ध भारत-ट्युनिशिया एकत्र लढणार 
५- वॉशिंग्टन; भारतीयांना अमेरिकी विमानतळावर विशेष सवलत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- प्रत्येक एटीएमधारकांना 5 लाखापर्यंतचे विमा कवच 
६- मथुरा हिंसाचार प्रकरणी ३२० जणांना अटक, भाजपचं आज धरणं आंदोलन 
७- मथुरेतील हिंसाचाराची सीबीआय चौकशी व्हावी - हेमामालिनी 
८- पुढील चार दिवस पावसाचे!  
९- पाच महिन्यांत भाज्यांचे भाव पाचपट 
१०- राज्यसभेत तिरंगी झेंड्याचा बिल्ला लावण्यास अनुमती 
११- मॉन्सून मंगळवारपर्यंत केरळमध्ये 
१२- इंटरनेटच्या प्रसारात भारतच 'ब्राईट स्पॉट' 
१३- जागतिक दहा नेत्यांमध्ये मोदींना स्थान- नायडू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- एकनाथ खडसेंचा राजीनामा
१५- महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची मान्यता स्थगित 
१६- राज्यभरात पावसाची हजेरी; मराठवाड्यात वीज पडून सहा ठार  
१७- मुंबई; छुप्या हुक्का पार्लरवर छापा 
१८- एसी लोकल १२ चाचण्यांमध्ये पास 
१९- मुंबई; काँक्रिटच्या जंगलात गाडले जलखांब 
२०- सरकार बळिराजाच्या पाठीशी - फडणवीस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- कोल्हापुरात पंधरवड्यात 17 घरफोड्या, एकाच इमारतीत 5 चोऱ्या 
२२- नागपुरात पती आणि मुलाची हत्या करुन महिलेची आत्महत्या 
२३- पिंपरी-चिंचवड; शौचालय नसल्यामुळे सरपंचपद गमावलं  
२४- वडाळा-घाटकोपर- ठाणे- कासारवडवली मेट्रोला मंजुरी, 32 किमीवर 32 स्टेशन 
२५- पुणे; चिमुकलीने पाहिला आईचा करुण अंत  
२६- कुलाबा; मेट्रो हाऊस इमारतीला टाळे ठोकले 
२७- येरवडा; हरवलेली आई मुलांना भेटली नऊ वर्षांनंतर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- जगविख्यात बॉक्सर मोहम्मद अली यांचं निधन 
२९- कॅशियस क्ले ते मोहम्मद अली, ग्रेटेस्ट बॉक्सरचा प्रवास
३०- प्राची देसाईचा नैसर्गिक फंडा, सेंद्रिय शेती करणार 
३१- टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी संदीप पाटील उत्सुक 
३२- पेस जिंकला, सानिया हरली, पेस-हिंगिसला फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचं जेतेपद 
३३- पुन्हा ‘तेच ते’ पण अक्षय कुमार उत्तम  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शिवकुमार कल्याणी, कपिल गोडेगावकर, सोपान चव्हाण, माधव हणमंते, गंगाधर गायकवाड, गोविंद निलपत्रेवार, संजय धनजकर, संतोष रामतीर्थकर, सुरेश भोसीकर, संजय जाधव, मारोती कदम, गोपीचंद हिंगोले, हनमंतराव शिंदे, नितीन सुर्वे, विठ्ठल रेवले, बालाजी नाईकवाडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

======================================

अखेर एकनाथ खडसेंचा राजीनामा

अखेर एकनाथ खडसेंचा राजीनामा
जळगाव/मुंबई : अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची अखेर उचलबांगडी झाली आहे. खडसेंनी आपल्या सर्व मंत्रिपदांचा राजीनामा दिला आहे.

खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला.

अखेर गच्छंती होणं अटळ असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकनाथ खडसेंना मंत्रिपद सोडण्याचे आदेश देणार असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. फक्त महसूलमंत्रिपदच नाही, तर खडसेंची सर्व मंत्रिपदं काढली जाण्याचे संकेत आहेत. तसा आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

 
कथित पीएची लाचखोरी, दाऊदच्या कॉललिस्टमधील खडसेंचा कथित नंबर, तसंच भोसरीतील जमीन खरेदीप्रकरण या आरोपांमुळे खडसेंना विरोधकांसह सत्ताधारी शिवसेनेने घेरलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून पक्षनेतृत्वाने अखेर खडसेंचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे.
======================================

जगविख्यात बॉक्सर मोहम्मद अली यांचं निधन

जगविख्यात बॉक्सर मोहम्मद अली यांचं निधन
न्यूयॉर्क : चॅम्पियन अशी जगविख्यात ख्याती असलेले बॉक्सर मोहम्मद अली यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरु होते. इथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

मोहम्मद अलींना श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पार्किंसनमुळे श्वासाचा त्रास

श्वसनासह मोहम्मद अली पार्किंसन आजारानेही त्रस्त होते. या आजारामुळे कंपवाद होऊन शरीर थरथरतं, त्यामुळे शरीरावर  नियंत्रण राहात नाही.

1980 मध्ये आजाराचं कारण समोर

मोहम्मद अलींना पार्किंसनच्या आजाराबाबत 1980 मध्येच माहिती झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र पार्किंसनने अखेर त्यांना हरवलं.
======================================

कॅशियस क्ले ते मोहम्मद अली, ग्रेटेस्ट बॉक्सरचा प्रवास

कॅशियस क्ले ते मोहम्मद अली, ग्रेटेस्ट बॉक्सरचा प्रवास
मुंबई : गेल्या शतकातील जगातला सर्वोत्तम खेळाडू कोण, असा प्रश्न विचारला, तर एका नावावर बहुतेकांचं एकमत होईल आणि ते म्हणजे मोहम्मद अली. पार्किंसनच्या आजाराने मोहम्मद अलींचं आज 74 व्या वर्षी निधन झालं.

कॉशियस क्ले ते मोहम्मद अली

पूर्वाश्रमीचा कॉशियस क्ले. एका कृष्णवर्णिय अमेरिकन कुटुंबात जन्मलेला सामन्य मुलगा. बारा वर्षांचा असताना क्ले एका सायकल चोराला बेदम चोप देणार होता. क्लेचा आवेष पाहून जो मार्टिन नावाच्या एका पोलिस अधिकारी आणि कोचने त्याला बॉक्सिंगकडे वळण्यास सांगितलं. क्लेने तो सल्ला मानला आणि जगाला मिळाला एक महान चॅम्पियन..
======================================

प्राची देसाईचा नैसर्गिक फंडा, सेंद्रिय शेती करणार

प्राची देसाईचा नैसर्गिक फंडा, सेंद्रिय शेती करणार
मुंबई : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाईच्या ‘अझर’मधील भूमिकेचं कौतुक आहे. मात्र या हरहुन्नरी अभिनेत्रीला अभिनयाव्यतिरिक्त शेतीचीही आवड असल्याचं समोर आलं आहे. प्राचीला तिच्या फार्म हाऊसवर सेंद्रिय शेती करण्याची इच्छा आहे.
 
पुण्याजवळ देसाई कुटुंबाचा एक प्लॉट आहे. या जागेवर भाज्यांची शेती करण्याची सर्वतोपरी जबाबदारी प्राचीने उचलली आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे प्राचीचा भर असणार आहे.
 
आरोग्यदायी लाईफस्टाईलकडे प्राची देसाईचा ओढा असल्यामुळे स्वतःच सेंद्रिय शेती करुन योग्य तो आहार घेण्याकडे तिचा कल आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी नोकर ठेवण्याऐवजी स्वतःच इत्यंभूत माहिती घेऊन शेती करण्याची तिची इच्छा आहे.
 
प्राची सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी, मातींचे गुणधर्म, कुठल्या भाज्या किंवा फळं कोणत्या हवामानात घ्यावात अशी सर्व माहिती ती तज्ज्ञांकडून घेत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात प्राचीच्या हाती नांगर दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.
======================================

टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी संदीप पाटील उत्सुक

टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी संदीप पाटील उत्सुक
मुंबई :  बीसीसीआयच्या सिनियर निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील हे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी उत्सुक आहेत.

संदीप पाटील यांनी या पदासाठी अर्जही केला असून त्यांच्यापाठोपाठ निवड समिती सदस्य विक्रम राठोड, प्रवीण अमरे, लालचंद राजपूत आणि ऋषीकेष कानिटकर अशी बडी नावं या पदाच्या शर्यतीत दाखल होण्याची शक्यता आहे.

पाटील यांच्या निवड समिती अध्यक्षपदाची चार वर्षांची टर्म आता अखेरच्या टप्प्यात आहे.

आपण अचानक मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत का दाखल झालात असा प्रश्न विचारला असता संदीप पाटील यांनी एबीपी माझाला सांगितलं की, “खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर माझी खरी करियर ही प्रशिक्षक म्हणूनच उभी राहिली आहे. मी गेली २० वर्ष प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे”.

त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच समजेल.
======================================

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सकाळी साडेनऊ वाजता मोदी दिल्लीतून अफगाणिस्तानसाठी रवाना झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये भारताच्या मदतीने बांधलेल्या 1457 कोटींच्या सलमा धरणाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे.
 
हेरातमध्ये पोहचल्यानंतर मोदी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अब्दुल गनी यांच्यासोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर मोदी कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोचाही दौरा करणार आहेत. या दौऱ्यावरुन परतताना ते जर्मनीलाही जाण्याची शक्यता आहे.
 
एकूण सहा दिवसांच्या या दौऱ्यात प्रत्येक देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी मोदी चर्चा करणार आहेत. दरम्यान मोदींच्या या दौऱ्यामुळे काळा पैसा भारतात आणण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

चौथा अमेरिका दौरा, तर दुसरा अफगाणिस्तान दौरा
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा चौथा अमेरिका दौरा आहे आणि दुसरा अफिगाणिस्तान दौरा आहे. याआधी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तानातील संसद इमारतीचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं होतं.
======================================

कोल्हापुरात पंधरवड्यात 17 घरफोड्या, एकाच इमारतीत 5 चोऱ्या

कोल्हापुरात पंधरवड्यात 17 घरफोड्या, एकाच इमारतीत 5 चोऱ्या
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एकाच अपार्टमेन्टमध्ये भरदिवसा 5 घरफोड्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या 12 दिवसांतील एकूण घरफोड्यांचा आकडा 17 वर पोहचला आहे.


निर्माण चौकातील ओअॅसिस अपार्टमेन्टमध्ये तब्बल 5 फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. बंद फ्लॅट हेरुन, इमारतीत सीसीटीव्ही आणि वॉचमन नसल्याची रेकी करुन चोऱ्या करणाऱ्या या टोळीने पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या या चोरट्यांचा सध्या शोध सुरु आहे.
 
घरफोड्या टोळीचं धाडस तर इतकं की एकाच अपार्टमेंटमध्ये ते किमान 5 ते 6 फ्लॅट फोडतात. दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असल्यानं नागरिक हैराण झाले आहे.


या टोळीची नागरिकांमध्ये चांगलीच दहशत परसली असताना पोलिस मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
======================================

नागपुरात पती आणि मुलाची हत्या करुन महिलेची आत्महत्या

नागपुरात पती आणि मुलाची हत्या करुन महिलेची आत्महत्या
नागपूर : नागपूरमध्ये पतीसह आपल्या 5 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करुन एका महिलेने आत्महत्या केली आहे. आलम कुटुंबातील या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.


महिलेने आपल्या पती व मुलाला खाद्यपदार्थातून गुंगीचं औषध दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  मृत पतीचं नाव सर्वर आलम असून मुलाचं नाव दादू आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
 
आलम कुटुंब हे मूळचं कानपूरमधील असून 8 महिन्यांपूर्वी ते नागपूरमध्ये आले होते. ते परिसरात कोणाशी जास्त संबंध ठेवत नव्हते. दिवसभर आलम कुटुंब कोणालाच दिसले नाही. संध्याकाळी घरचे नळ वाहत असल्यामुळे शेजाऱ्यांनी दार वाजवलं. कोणीच प्रतिसाद न दिल्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आलं आणि ही घटना उघडकीस आली.
======================================

प्रत्येक एटीएमधारकांना 5 लाखापर्यंतचे विमा कवच

प्रत्येक एटीएमधारकांना 5 लाखापर्यंतचे विमा कवच
atm card
नवी दिल्ली: आजकाल प्रत्येकाकडेच कोणत्या ना कोणत्या बँकेचे एटीएम कार्ड असते. पण तुम्हाला हे माहित आहे का ? तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डमुळे 5 लाखांचे विमा संरक्षणदेखील मिळालं आहे. कोणतीही बँक तुम्हाला ही माहिती देणार नाही. पण वास्तविक, बँकेने तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डसोबत 25 हजार ते 5 लाखांचा विमा उतरवलेला असतो. ही योजना गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे, पण 90 ते 95 टक्के एटीएमधारकांना याची माहिती देखील नाही.
या योजनेनुसार, जर तुम्हाला एखाद्या अपघातात अपंगत्व आले, किंवा तुमचा मृत्यू झाला तर बँकेला तुम्हाला विविध नियमांनुसार नुकसान भरपाई द्यावी लागते. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून कोणताही हप्ता द्यावा लागत नाही. पण याची माहिती तुम्हाला तुमची बँक कधीही देत नाही.
किती मिळते नुकसान भरपाई ?
जर तुमच्याकडे कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड आहे, तर त्या बँकेकडून तुम्हाला 1 लाखांचं अपघाती विमा संरक्षण मिळते. तसेच जर तुमच्याकडे मास्टर कार्ड असेल तर बँक तुम्हाला 2 लाखांचा अपघात विमा देते. याशिवाय एखाद्या दुर्घटनेत तुम्हला तुमचा एखादा पाय किंवा हात गमवावा लागला असेल, तर बँकेकडून तुम्हाला 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळते. तसेच तुम्हाला पूर्ण अपंगत्व आल्यास बँकेकडून तुम्हाला एक लाख नुकसान भरपाई मिळते.
======================================

उस्मानाबादमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू, राज्यभरात पावसाची हजेरी

उस्मानाबादमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू, राज्यभरात पावसाची हजेरी
उस्मानाबादः दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याला वरुणराजाने काहीसा दिलासा दिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वारा आणि जोरदार गारपीटीसह पावसाने हजेरी लावली. यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनावरंही दगावल्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद शहरात वारा इतका सुसाट होता की, विजेचे खांब कोसळून पडले आहेत. कळंब तालुक्यातील खोंदला गावात वीज पडून एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


मराठवाड्यात पावसाची हजेरी
उस्मानाबादसह मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. नांदेडमधल्या अनेक ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडला.
======================================

मथुरा हिंसाचार प्रकरणी ३२० जणांना अटक, भाजपचं आज धरणं आंदोलन

मथुरा हिंसाचार प्रकरणी ३२० जणांना अटक, भाजपचं आज धरणं आंदोलन
Mathura Riots
मथुरा : उत्तर प्रदेशातील मथूरामध्ये भडकलेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 320 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील मुख्य सुत्रधार रामवृक्ष यादव अजूनही फरार आहे.
दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजप आज धरणं आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यलयासमोर होणाऱ्या या आंदोलनात मथुरेच्या खासदार हेमामालिनी सहभागी होणार आहेत.
उत्तर प्रदेशमधील अखिलेश सरकार आणि भू-माफियांच्या युतीमुळे हा हिंसाचार भडकल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे याची सीबीआयकडून चौकशी व्हावी ;  अशी मागणी त्यांनी केली आहे.
======================================

पेस जिंकला, सानिया हरली, पेस-हिंगिसला फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचं जेतेपद

पेस जिंकला, सानिया हरली, पेस-हिंगिसला फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचं जेतेपद
पॅरिस : भारताच्या लिअँडर पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसच्या साथीने फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. पेस आणि हिंगिस जोडीचं हे मिश्र दुहेरीतलं तिसरं ग्रँड स्लॅम ठरलं.


पेस आणि हिंगिसने अंतिम फेरीत भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इव्हान डॉडिग या दुसऱ्या मानांकित जोडीवर 4-6, 6-4, 10-8 अशी टायब्रेकरमध्ये मात केली.


तर लिअँडर पेसचं हे ग्रँड स्लॅम कारकीर्दीतलं दहावं मिश्र दुहेरी विजेतेपद ठरलं. या विजयाबरोबरच पेसनं मिश्र दुहेरीत करियर ग्रँड स्लॅमही पूर्ण केलं आहे. 42 वर्षांच्या पेसच्या नावावर मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तीन, विम्बल्डनमध्ये चार आणि अमेरिकन ओपनमध्ये दोन विजेतेपदही जमा आहेत.
======================================

पिंपरी-चिंचवड; शौचालय नसल्यामुळे सरपंचपद गमावलं 

शौचालय नसल्यामुळे सरपंचपद गमावलं
पिंपरी चिंचवडः घरात शौचालय असण्याचे अनेक फायदे आपल्याला माहित आहेत. मात्र शौचालय नसल्यानं एखाद्याचं केवढं नुकसान होऊ शकतं हे पिंपरीतल्या माण गावात दिसून आलं आहे. एका सरपंचाला घरात शौचालय नसल्यामुळे आपल्या खुर्चीवरुन पायउतार व्हावं लागलं आहे.



pimpri


आयएसओचा दर्जा असलेल्या आणि विकासाचं परिपूर्ण मॉडेल म्हणून गौरवलेल्या माण ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. स्मिता भोसले असं सरपंचाचं नाव आहे. निवडणुकीच्या वेळी घरात शौचालय नसतानाही, शौचालय असल्याची मारलेली थाप स्मिता भोसले यांना चांगलीच महागात पडली आहे.


निवडणुकीपूर्वी केलेली चतुराई भोवली
2015 च्या ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी जुलैमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार स्मिता भोसले यांनी घरात शौचालय असल्याचा पुरावा दिला होता. मात्र सरपंचपदावर विराजमान झाल्यानंतर 22 सप्टेंबर 2015 रोजी स्मिता यांचे पती सागर भोसले यांनी शौचालयाच्या अनुदानासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला.
======================================

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची मान्यता स्थगित

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची मान्यता स्थगित
परभणीः  भारतीय कृषी संशोधन परिषदने महाराष्ट्राच्या चारही कृषी विद्यापीठाची मान्यता स्थगित केली आहे. विद्यापीठांमधील शेती शिक्षणाचा घसरता दर्जा आणि विद्यापीठांमधील रिक्तपदं, खाजगी कॉलेजांमुळे वाढलेला ताण यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

या निर्णयानुसार सध्या सुरु असलेले आणि होणारे विद्यार्थ्यांचे प्रवेशही बेकादेशीर आहेत. तसंच विद्यापीठांना कारभार करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून एक छदामही मिळणार नाही.

विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात

महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, आणि दापोलीचं डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार 5 मे रोजी या चारही विद्यापीठांची मान्यता स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या चारही विद्यापीठांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे.
======================================

वडाळा-घाटकोपर- ठाणे- कासारवडवली मेट्रोला मंजुरी, 32 किमीवर 32 स्टेशन

वडाळा-घाटकोपर- ठाणे- कासारवडवली मेट्रोला मंजुरी, 32 किमीवर 32 स्टेशन
मुंबईः मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. कारण वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.  हा 32 किलोमीटर आणि 32 स्टेशनचा मेट्रो मार्ग असून यासाठी 14 हजार 549 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा  प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दीष्ट आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. अंतिम मंजुरीसाठी प्रकल्पाचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

32 स्थानकांचा समावेश

वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो मार्गावर एकूण 32 स्थानकांचा समावेश आहे.
======================================

मथुरेतील हिंसाचाराची सीबीआय चौकशी व्हावी - हेमामालिनी


  • ऑनलाइन लोकमत
    मथुरा, दि. ०४ - दोन पोलिसांसह २४ जणांचा बळी घेणा-या मथुरेतील हिंसाचाराची सीबीआय चौकशी केली पाहिजे अशी मागणी मथुरेतील भाजपाच्या खासदार हेमामालिनी यांनी केली आहे. अतिक्रमण हटवण्यास गेलेले पोलीस आणि कब्जा करणाऱ्या लोकांमध्ये गुरुवारी उडालेल्या भीषण चकमकीनंतर एकूण २४ जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला. याच पार्श्वभूमीमवर हेमामालिनी यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. 
     
    •  
    ' घटनास्थळावर सुमारे ३ हजार लोकांकडे शस्त्रास्त्र आढळली, प्रशासनाला याची पूर्वकल्पना नव्हती का? त्यांच्याकडे (या प्रकाराची) सर्व माहिती असतानाही ते ही घटना रोखण्यात वा सांभाळण्यात अपयशी ठरले' असा आरोप हेमामालिनी यांनी केला. ' अतिक्रमण हटवण्यासाठी राज्य सरकारने योग्य पावले उचलून कारवाई करायला हवी होती' असेही त्या म्हणाल्या. 
======================================

पुणे; चिमुकलीने पाहिला आईचा करुण अंत 


  • पुणे : निपचित पडलेली आई... आक्रोशणारी ‘ती’... अवघ्या सात महिन्यांची चिमुकली... असहाय... आईच्या ओढीने तिला
    बिलगण्याचा अयशस्वी प्रयत्न... मात्र प्रतिसाद शून्य... पतीच्या त्रासाला कंटाळून आईने
    केलेल्या आत्महत्येची तिला कल्पना नसते... पाणावलेल्या डोळ्यांनी ती आई जागी होण्याची वाट पाहत असते... दोन दिवस आईच्या मृतदेहासोबत घालवल्यानंतर कोणीतरी दरवाजा उघडतो... त्यांना पाहायला मिळते हृदय चिरत जाणारे विदारक चित्र...
    दीपाली श्याम हांडे (वय २५, रा. विश्वसाकार बिल्डिंग, आदर्शनगर, पिंपळे निलख) ही हुशार तरुणी. एमएससी कॉम्प्युटरपर्यंत शिक्षण झालेल्या दीपालीचे संगणक अभियंता असलेल्या श्याम हांडे याच्यासोबत २ फेब्रुवारी २०१४ रोजी थाटामाटात लग्न झाले. दोघेही लातूर जिल्ह्यातलेच. ती मंगरुळची तर तो चिंचोली जोगनचा. उच्चशिक्षित असला, तरी श्याम पैशासाठी हपापलेला. बिटवाईज या नामवंत संगणक कंपनीत गलेलठ्ठ पगार घेत असूनही दीपालीचा त्याने माहेराहून पैसे आणावेत म्हणून छळ सुरू केला.
    पुण्यात भूखंड आणि आलिशान मोटार घेण्यासाठी त्याने पैशांचा तगादा लावला. गृहिणी असलेल्या दीपालीने पैसे आणण्यास नकार दिला होता. पतीकडून होणाऱ्या छळाची कल्पना तिने माहेरच्यांना दिली होती. अशातच त्यांना सात महिन्यांपूर्वी मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर तर त्याने आणखीनच त्रास द्यायला सुरुवात केली. तिला तो वारंवार मारहाण करू लागला. दोन दिवसांपूर्वी श्यामच्या आजीचे गावी निधन झाले. अंत्यविधीसाठी पत्नी आणि सात महिन्यांच्या मुलीला सोडून तो लातूरला निघून गेला.
    अंत्यविधीनंतर तेराव्याच्या कार्यक्रमाला दीपालीचे आई-वडीलही गेले होते. दीपालीबाबत त्यांनी श्यामकडे चौकशी केली. ती घरीच असून, आपल्याला फारसे काही माहिती नसल्याचे सांगितले. संशय आल्यामुळे आई-वडिलांनी दीपालीच्या मोबाइलवर फोन करायला सुरुवात केली. दिवसभर वारंवार फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेवटी श्याम आणि दीपाली राहत असलेल्या फ्लॅटच्या मालकाला फोन करण्यात आला. घरमालकाने शुक्रवारी घरी जाऊन पाहिले असता घर आतून बंद असल्याचे त्यांनी पाहिले. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, दोन दिवसांपासून घर बंद असून, घरातून लहान मुलाचा रडण्याचा आवाज येत असल्याचे त्यांना शेजाऱ्यांनी सांगितले. घरमालकाने शेजारच्यांच्या मदतीने घराचे दार उघडले. घरातील दृष्य पाहून सर्वजण जागीच थबकले.
======================================

पुन्हा ‘तेच ते’ पण अक्षय कुमार उत्तम 


  • हिंदी चित्रपट - अनुज अलंकार
    चांगल्या चाललेल्या चित्रपटाचा सिक्वेल करण्यात मोठी जोखीम ही असते की आधीच्या कलाकृतींशी ताळमेळ राखण्यात त्यांना बहुतांशवेळा अपयश येणे. ‘हाऊसफुल्ल ३’बाबतही असेच काहीसे घडले आहे. ताज्या हाऊसफुल्लमध्येही प्रेक्षकांना हसविण्यासाठी आधीच्या चित्रपटांत जे काही करण्यात आले होते ते सगळे ठासून भरले आहे. आधीच्या आवृत्त्यांमध्ये जे बघितले तेच पुन:पुन्हा यातही बघावे लागते. क्वचित एखाद्या दृश्याचा अपवाद असेल.
    हाऊसफुल्ल ३ची कथा परत लंडनमध्येच सुरू होते. बटुक पटेल (बोमन इराणी) यांना तीन मुली आहेत. गंगा पटेल (जॅकलीन फर्नांडिस), जमुना पटेल (लिसा हेडन) आणि सरस्वती पटेल (नरगिस फाकरी). आपल्या कोणत्याच मुलीने लग्न करू नये अशी बटुक पटेलची इच्छा असते. वडिलांच्या उपस्थितीत या तिन्ही मुली मोठ्या सालस व सामान्य दिसतात. परंतु त्यांच्या मागे तिघीही मॉडर्न व ग्लॅमरस असतात. तिघीही आपली नावेसुद्धा बदलून घेतात. गंगा बनते ग्रेसी, जमुना जैनी तर आणि सरस्वती बनते सारा. तिघींना बॉयफ्रेंडही मिळतात. सँडी (अक्षय कुमार) मिळतो गंगाला. जमुनाचा असतो बंटी (अभिषेक बच्चन) आणि टेडी (रितेश देशमुख) साराचा बॉयफ्रेंड बनतो. या तीन प्रेमकथांना मुंबईचा माफिया डॉन जॅकी (जॅकी श्रॉफ) नवे वळण देतो. अपेक्षेनुसार चित्रपटाचा शेवट आनंदी होतो.
======================================

पुढील चार दिवस पावसाचे! 


  • पुणे : मान्सून येत्या तीन दिवसांत केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची गोड बातमी हवामानशास्त्र विभागाने दिली आहे़ पुढील चार दिवसांत विदर्भासह राज्यभरात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता असून वैशाख वणव्यात पोळून निघालेल्या जनतेला त्यामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
    आग्नेय बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि नैऋत्य व मध्य पूर्व बंगालच्या उपसागरातून मान्सूनची वाटचाल दमदारपणे सुरू आहे. सध्यातरी त्यामध्ये कोणताही अडथळा नसल्याने येत्या तीन दिवसांत मॉन्सून केरळात धडक्याची शक्यता आहे. त्यानंतर तो राज्यभरात सक्रीय होण्यास आठवडाभराचा कालावधी लागतो. परंतु त्यापूर्वी मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्याने हा आठवडा चिंब करणारा असेल, असा अंदाज आहे.
    गेल्या २४ तासात राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस झाला़ कोकणातील पेडणे, सावंतवाडी, वाल्पोई, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, चिपळूण, दोडामार्ग, खेड, लांजा, मालवण, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला़़ सातारा जिल्ह्यातील खटाव, वडूज,तसेच सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ या दुष्काळग्रस्त भागातही पाऊस झाला.
    दरम्यान विदर्भ पुन्हा तापला आहे. अनेक शहरांच्या कमाल तापमानात २ ते ४़८ अंश सेल्सिअस इतकी वाढ नोंदविली गेली़ किमान तापमानातही वाढ झाली आहे़ राज्यात शुक्रवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६़८ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली़ 
======================================

पाच महिन्यांत भाज्यांचे भाव पाचपट


  • नामदेव मोरे,  नवी मुंबई
    दुष्काळामुळे भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. राज्यभरातील सर्वच बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने दर गगनाला भिडले आहेत. भेंडी, टोमॅटोचे दर पाच महिन्यांत पाच पट वाढले आहेत. किरकोळ बाजारात दोडका, घेवडा व इतर काही भाज्याही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
    राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. पाणीच नसल्याने अनेकांनी भाजीपाल्याचे उत्पादनच घेतले नाही. परिणामी, राज्यभर भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज ६०० ते ७०० वाहनांची आवक होते. परंतु सद्य:स्थितीत ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे. त्यातही लहान वाहनांचा समावेश जास्त आहे. राज्यातून आवक घटल्याने गुजरात व कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. सद्य:स्थितीमध्ये मुंबईमध्ये ४० ते ५० ट्रक माल परराज्यातून येत आहे. पुढील दोन महिने बाजारभाव असेच राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
    मुंबईतील दर
    जून
    भेंडी ७५ ते ८०
    दुधी भोपळा ६० ते ७०
    फरसबी ८० ते १००
    फ्लॉवर ६० ते ८०
    गवार ६० ते ८०
    घेवडा १६० ते १८०
    कारली ६० ते ८०
    कोबी ४० ते ५०
    दोडका १०० ते १२०
======================================

मराठवाड्यात वीज पडून सहा ठार


  • औरंगाबाद : बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विविध ठिकाणी वीज कोसळून सहा जणांसह सहा शेळ्या व दोन म्हशी दगावल्या तर चार जण जखमी झाले.
    बीड शहरासह तालुक्यातील केतूरा, लिंबा रूई भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान घरावरील पत्रे उडून गेले. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे सायंकाळी ५ वाजता पावसाला सुरुवात झाली. धारूर तालुक्यातील आसरडोह (जि.बीड) येथील अर्जुन सखाराम काळे (५३) हे शेतामध्ये बेलाची पाने आणण्यासाठी गेले होते. यावेळी वीज कोसळली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील दत्तनगर भागात बाभळीच्या झाडावर वीज कोसळल्याने शेतकरी बळीराम देवीदास शिंदे यांच्या झाडाखाली बांधलेल्या दोन म्हशी जागीच दगावल्या. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे वादळीवाऱ्यामुळे घराच्या पत्र्यावरील दगड डोक्यात पडल्याने महिलेचा तर आर्वी येथील ३२ वर्षीय अशोक रामराव कदम शेतकऱ्याचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला.
    उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब व वाशी तालुका व परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला़ ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती़ तर कळंब तालुक्यातील नायगाव शिवारात वीज पडल्याने सुब्राव माने व पापा शेख यांच्या सहा शेळ्या ठार झाल्या़ तर बाळू वामन मोटे (४५) या मेंढपाळाचा मृत्यू झाला़
======================================

मुंबईत दम मारो दम सुरूच, छुप्या हुक्का पार्लरवर छापा


  • मुंबई : हुक्का पार्लरवर बंदी असताना छम छमपाठोपाठ हुक्का पार्लरमधील दम मारो दम... छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे समाजसेवा शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आले. गावदेवी आणि डी.बी. मार्ग परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात समाजसेवा शाखेने ५४ जणांना अटक केली. डी.बी. मार्ग येथील आॅपेरा हाऊस येथील रॉयल पफ हुक्का पार्लरमध्ये हुक्का सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार, समाजसेवा शाखेचे प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला या विभागांची तपासणी करण्यात आली. माहितीची खातरजमा होताच गुरुवारी त्यांच्या तपास पथकाने या ठिकाणी छापा टाकला. तपास पथकाने घटनास्थळावरील हुक्का पॉट्स, फ्लेवर्स जप्त केले. या दरम्यान १६ जणांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅफे फुमो येथील हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आली. घटनास्थळाहून ११ हुक्का पॉट्स, ६ फ्लेवर्ससहित ३८ जणांना ताब्यात घेतले. गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ३८ जणांना अटक करण्यात आली. 
======================================

मेट्रो हाऊस इमारतीला टाळे ठोकले


  • मुंबई : पुरातन वास्तू व लाकडी बांधकाम असलेली कुलाबा येथील मेट्रो हाऊसची इमारत भीषण आगीमुळे खिळखिळी झाली आहे़ त्यामुळे सावधगिरी म्हणून म्हाडाने या उपकरप्राप्त इमारतीला आज सील ठोकले़ तसेच या इमारतीच्या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे़ त्याचबरोबर इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट तत्काळ करून घेण्यासाठी संबंधित मालकाला नोटीसही बजाविण्यात आली आहे़
    १४८ वर्षे जुन्या असलेल्या मेट्रो हाऊसला लागलेली आग अग्निशमन दलाने नौदलाच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणली़ तर मेट्रो हाऊसच्या ए, बी व सी अशा तीन विंगमध्ये पसरलेली ही आग आज दुपारी २़५७ ला पूर्णपणे विझली़ दुर्घटनेवेळी या परिसरातील सर्व रहिवासी, गाळेधारक व फेरीवाल्यांना येथून तत्काळ हटविण्यात आले होते़ मात्र ही इमारत आगीनंतर सुरक्षित नसल्याने फेरीवाले येथे परतू नयेत, म्हणून काळजी घेण्यात येत आहे़ कुलाबा पोलीस ठाण्यात डायरी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. आगीमागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली आहे.
======================================

एसी लोकल १२ चाचण्यांमध्ये पास


  • मुंबई : कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकलच्या प्राथमिक चाचण्यांना सुरुवात झाली असून यात शंटिंगसारख्या चाचणीचा समावेश आहे. जवळपास १६ विविध चाचण्यांपैकी १२ चाचण्यांत एसी लोकल पास झाली असून चार सॉफ्टवेअरच्या चाचण्या बाकी असल्याची माहिती रेल्वेतील
    सूत्रांकडून देण्यात आली. तर कारशेडमधून बाहेर पडल्यानंतर जूननंतर एसी लोकलच्या मुख्य चाचण्यांना सुरुवात होईल.
    या लोकलची चाचणी १६ मेपासून ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार होती. मात्र एसी लोकलच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक समस्या असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी संबंधित कंपनीचे कर्मचारी परदेशातून बोलाविण्यात आले आणि सॉफ्टवेअरमधील समस्या सोडविण्यासाठी काम नुकतेच सुरू झाले. सध्या कुर्ला कारशेडमध्ये उभ्या असलेल्या या लोकलच्या मध्य रेल्वेकडून कारशेडमध्येच विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. यासंदर्भात रेल्वेतील सूत्रांनी सांगितले की, सॉफ्टवेअरमधील समस्या सोडविण्यात येत असतानाच कारशेडमध्ये मध्य रेल्वेकडून चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. सॉफ्टवेअरमधील समस्या याच महिन्यात सोडवून त्याचीही चाचणी घेतली जाईल. मध्य रेल्वेकडून १६ चाचण्या घेतल्यानंतर १ जुलै ते १५ जुलैपर्यंत पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या १६ चाचण्या आरडीएसओकडून (रीसर्च डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन) घेतल्या जातील. कारशेडमधून बाहेर पडल्यानंतर २१ मुख्य चाचण्या या ठाणे ते कर्जत पट्ट्यात किंवा ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्याचा विचार आहे. मुख्य चाचण्यांसाठी साधारपणे एक ते दीड महिना लागू शकतो.
======================================

काँक्रिटच्या जंगलात गाडले जलखांब


  • मुंबई : कुलाबा येथील मेट्रो हाऊसची आग विझवत असताना अचानक पाणी अपुरे पडू लागले़ वाऱ्यामुळे आग मात्र वाढतच होती़ अशा वेळी पाण्याचे जलखांब (फायर हायड्रंट) दिलासा देऊ शकले असते़ मात्र महानगरातील सिमेंट कॉँक्रिट जंगलात ९० टक्के
    जलखांब जमिनीखाली गाडले गेले आहेत़
    गेल्या काही वर्षांपासून आगीच्या प्रत्येक मोठ्या दुर्घटनेवेळी ही बाब प्रकर्षाने जाणवते. मात्र पालिकेकडून त्याबाबत काहीच ठोस कार्यवाही केली जात नसल्याने त्याचा मोठा फटका बसत आहे.
    गुरुवारी कुलाब्यातील मेट्रो इमारतीला लागलेल्या भीषण आगीमुळे फायर हायड्रंटचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठ्या दुर्घटनेच्या वेळी तत्काळ पाणी उपलब्ध होण्यासाठी मुंबईत पदपथ व रस्त्यांवर पाण्याचे जलखांब बसविण्यात आले आहेत़ मात्र कालांतराने रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि विविध युटिलिटिजच्या खोदकामांमध्ये असे पाण्याचे जलखांब जमिनीखाली गाडले गेले आहेत़ गुुरुवारी कुलाबा येथे लागलेल्या भीषण आगीवेळी
    पाणी अपुरे पडू लागले़ त्या वेळी तेथील पाण्याचे जलखांब
    निकामी असल्याचे आढळून आले़
======================================

कब्जा केलेला प्रांत सोडा : भारताने पाकला सुनावले


  • नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला भूभाग तत्काळ
    रिकामा करा आणि या मुद्याला विनाकारण आंतरराष्ट्रीय स्वरूप देऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत भारताने पाकिस्तानला व्याप्त भाग सोडण्यास सांगितले आहे.
    ‘पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या ज्या भागांवर बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला आहे, तो भाग पाकिस्तानने आता रिकामा करण्याची गरज आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटले आहे.
    काश्मीर मुद्यावर पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका संमेलनाच्या संदर्भात मत व्यक्त करताना स्वरूप बोलत होते. ‘संपूर्ण जम्मू-काश्मीरवर भारताचे सार्वभौमत्व आहे आणि हितसंबंधीयांचे भारताविरुद्धचे सर्व आक्षेप आम्ही फेटाळले आहेत. तसेच काश्मीर मुद्याला जागतिक आयाम मुळीच नाही यावर आम्ही भर दिलेला आहे.
    परंतु या द्विपक्षीय मुद्याला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनविणे हे ज्यांच्या मनात आहे, तेच लोक त्याला जागतिक आयाम देण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ असे स्वरूप
    म्हणाले.
======================================

राज्यसभेत तिरंगी झेंड्याचा बिल्ला लावण्यास अनुमती


  • नवी दिल्ली : येत्या जुलैमध्ये प्रारंभ होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापासून राज्यसभेच्या सदस्यांना आपल्या परिधानांवर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी बिल्ला लावून सभागृहात प्रवेश करता येऊ शकेल.
    राज्यसभा सदस्यांना तिरंगी बिल्ला लावण्यास अनुमती देणाऱ्या प्रस्तावाला सभापती हमीद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभेच्या सर्वसाधारण व्यवहार समिती (जनरल पर्पज कमेटी)ने एकमताने मान्यता दिली होती. त्यानंतर शुक्रवारी राज्यसभेने एक निवेदन जारी करून या निर्णयाची अंमलबजावणी पुढील पावसाळी अधिवेशनापासून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. राज्यसभेचे सदस्य विजय दर्डा यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर व आग्रही प्रस्तावानुसार हा विषय समितीपुढे आला होता. या प्रस्तावास मान्यता देताना १९८५ सालचा सभापतींचा निर्णय बदलण्यात आला आहे. राज्यसभेच्या सर्वसाधारण व्यवहार समितीने शिफारस केल्याप्रमाणे आता राज्यसभा सदस्यांना सभागृहात आपल्या परिधानांवर तिरंगी बिल्ला लावण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
    समितीने आपल्या ३ मे रोजीच्या बैठकीत अशाप्रकारची शिफारस केली होती. सर्व सदस्यांना आपला कोट, शर्ट अथवा जाकिटावर तिरंगा बिल्ला लावण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी केली होती. त्यांच्या या सूचनेवर व्यापक विचार केल्यानंतर समितीने ही शिफारस केली होती. (वृत्तसंस्था)
    राज्यसभेच्या सभापतींनी १९८५ सालीच सभागृहात राष्ट्रध्वजासह अशी कोणतीही प्रतीके शर्ट, कोट वा जॅकेटवर मिरवण्यास मनाई करणारा आदेश दिला होता. त्याआधी लोकसभेच्या नियम समितीने राष्ट्रध्वजाचा सन्मान म्हणून खासदारांना असा तिरंगा बिल्ला लावून सभागृहात येण्याची अनुमती दिली होती. त्यासाठी तत्कालीन अध्यक्ष मीराकुमार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीला नियम ३४९ मध्ये दुरुस्ती करावी लागली होती.
======================================

अथेन्स; समुद्रकिनारी आढळले ११७ मृत निर्वासित


  • अथेन्स : लिबियाच्या समुद्रकिनाऱ्यावर निर्वासितांचे शंभराहून अधिक मृतदेह आढळले आहेत. हे निर्वासित समुद्रमार्गे युरोपातील वेगवेगळ्या देशांत आश्रयाला निघाले होते.
    लिबियाच्या नौदलाच्या माहितीनुसार पश्चिम लिबियाच्या एका शहराजवळ समुद्रकिनारी ११७ निर्वासितांचे मृतदेह सापडले. ते नेमके कोणत्या देशाचे आहेत त्याबाबत माहिती मिळू शकली नाही. संयुक्त राष्ट्र शरणार्थी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीपासून दोन लाखांहून अधिक निर्वासितांनी युरोपात प्रवेश केला आहे, तर प्रवासादरम्यान दुर्घटनेत २,५०० निर्वासितांचा मृत्यू झाला आहे.
======================================

दहशतवादाविरुद्ध भारत-ट्युनिशिया एकत्र लढणार


  • ट्युनिस : दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारत आणि ट्यूनिशिया यांनी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे ट्युनिशियाच्या दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, दहशतवादाचे धोके दूर करण्यास समान विचारधारा असलेल्या सहकाऱ्यांनी सहकार्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
    उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ट्युनिशियाचे पंतप्रधान हबीब एस्सिदी यांच्यासोबत चर्चा केली. हस्तशिल्प आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी एका करारावर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना अन्सारी म्हणाले की, आम्ही प्रामुख्याने दहशतवादावर चर्चा केली. दोन्ही देश या संकटाचा सामना करीत आहेत. अन्सारी व एस्सिदी यांच्यात झालेल्या व्यक्तिगत स्तरावरील बैठकीनंतर दोन्ही देशांत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील बैठक झाली. तसेच डिजिटल अर्थव्यवस्थेशी संबंधित दोन करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या. अन्सारी म्हणाले की, आगामी पाच वर्षांत भारत ट्युनिशियातील ३५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देईल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान प्राप्त करण्यास भारताच्या प्रयत्नांना ट्युनिशियाने जे समर्थन दिले आहे त्याबद्दल अन्सारी यांनी समाधान व्यक्त केले.
======================================
भारतीयांना अमेरिकी विमानतळावर विशेष सवलत
-

वॉशिंग्टन - भारतीयांचा अमेरिकेचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा, यादृष्टीने सरकारने अमेरिकेसोबत विशेष करार केला आहे. भारताने अमेरिकेच्या ‘ग्लोबल एन्ट्री प्रोग्राम‘ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘इंटरनॅशनल एक्स्पडिटेड ट्रॅव्हलर इनिशिएटिव्ह‘ करारावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे.

भारत अमेरिकेसोबत अशा प्रकारचा करार करणारा नववा देश आहे. याअंतर्गत नोंदणी करणाऱ्या सामान्य भारतीय प्रवाशांना अमेरिकी विमानतळावर उतरल्यानंतर त्वरित सुरक्षा मंजुरी मिळणार आहे. भारताचे अमेरिकी राजदूत अरुण के. सिंह आणि अमेरिकी कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाचे डेप्युटी कमिशन्र केविन के. मॅक्लीनन यांनी या विशेष करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

दोन्ही देशांकडून संयुक्तपणे चौकशी होऊन सुरक्षा मंजुरी मिळालेल्या भारतीय नागरिकांना काही ठराविक अमेरिकी विमानतळांवर असलेल्या स्वयंचलित किऑस्कमार्फत अमेरिकेत लवकरात लवकर प्रवेश मिळेल. येत्या काही महिन्यांमध्ये कराराची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, असे दोन्ही देशांनी सादर केलेल्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले.
======================================
मॉन्सून मंगळवारपर्यंत केरळमध्ये

पुणे - नैर्ऋत्य मौसमी पावसाने (मॉन्सून) चौदा दिवसांनंतर अंदमानमधील मुक्काम हलविला असून, तो आता वेगाने भारतीय उपखंडाच्या दिशेने प्रवास करत आहे. मॉन्सून येत्या मंगळवारपर्यंत (ता. 7) केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

मॉन्सून बंगलाच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार बेटे आणि अंदमानच्या दक्षिण किनाऱ्यावर 18 मे रोजी दाखल झाला होता. 20 मेपर्यंत त्याने अंदमानाद्वीपसमूह व्यापले होते. मात्र त्यानंतर आलेल्या चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा अंदमानमधील मुक्काम वाढला होता. आता त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे. मंगळवारपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विषुववृत्तीय बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची दिशा पोषक ठरल्याने मॉन्सूनने पुढील वाटचाल सुरू केली. मॉन्सूनने बंगालच्या उपसागरातील दक्षिण-पूर्व आणि दक्षिण-पश्‍चिम भागात प्रगती करत श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंतचा टप्पा पूर्ण केला.
======================================
इंटरनेटच्या प्रसारात भारतच 'ब्राईट स्पॉट'

नवी दिल्ली - संपूर्ण जगाला एकत्र जोडणाऱ्या इंटरनेटच्या प्रसारामध्ये सध्या भारत हाच जगातील ‘ब्राईट स्पॉट‘ असल्याचे ‘इंटरनेट ट्रेंड्‌स 2016‘ या अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षभरात भारतातील इंटरनेट यूझर्सच्या संख्येत 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. या अहवालानुसार, इंटरनेट यूझर्सच्या संख्येत आता भारताने अमेरिकेला मागे टाकले असून, अव्वल क्रमांकावर चीन आहे. विशेष म्हणजे, 2014 मध्ये यूझर्सच्या संख्येत 33 टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. या टक्केवारीत वाढ होणारा भारत हा एकमेव देश आहे.

भारतातील इंटरनेटवर आधारित अर्थव्यवस्था 2018 पर्यंत एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज ‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप‘ आणि "आयएएमएआय‘ यांनी काही महिन्यांपूर्वीच व्यक्त केला होता. "इंटरनेट ट्रेंड्‌स‘च्या ताज्या अहवालाने याची एकाअर्थी पुष्टीच झाली आहे. 
======================================
हरवलेली आई मुलांना भेटली नऊ वर्षांनंतर

येरवडा - परभणी येथील शिवाजी आणि सुभाष जाधव या ऊसतोडणी भावंडांना त्यांची हरवलेली आई तब्बल नऊ वर्षांनंतर भेटली. त्यांची आई सखुबाई मानसिक अवस्थेत फिरत असताना नांदेड पोलिसांना आढळल्या होत्या. पोलिसांनी त्यांना मनोरुग्ण असल्याचे समजून येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयातील समाजसेवकाच्या प्रयत्नानंतर या भावंडांना ही माउली परत भेटली.

ऊसतोडणी मजुरांची नेहमीच भटकंती. हंगाम आटोपल्यावर पुन्हा मूळ गावी परतायचे, असा त्यांचा नित्यक्रम. महागाव (ता. पूर्णा जंक्‍शन, जि. परभणी) येथील जाधव कुटुंबाचासुद्धा हाच नित्यक्रम होता. नऊ वर्षांपूर्वी ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेल्या जाधव भावंडांची आई सखुबाई अचानक बेपत्ता झाल्या. त्यांना अल्पसा मानसिक आजार असल्यामुळे त्या भटकत भटकत नांदेडला गेल्या. त्यांना पूर्ण पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना येरवडा मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील उपचार आणि समाजसेवक सुभाष चव्हाण यांच्या नियमित समुपदेशनामुळे त्यांनी मुलांची नावे आणि घरचा पत्ता सांगितला. 
======================================
सरकार बळिराजाच्या पाठीशी - फडणवीस

पीक, मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क, नोंदणी फी माफ 
मुंबई - अडीच लाख रुपयांपर्यंतच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आगामी वर्षभरासाठी माफ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली "वर्षा‘ या शासकीय निवासस्थानी पीककर्जाबाबत आढावा बैठक झाली. या वेळी दुष्काळी चौदा जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून त्यांनी पीककर्जाचा आढावा घेतला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार संजय कुटे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, प्रधान सचिव एस. एस. संधू, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी आदी या वेळी उपस्थित होते.

पीककर्ज वितरणाचा आढावा घेऊन फडणवीस म्हणाले की, बऱ्याच ठिकाणी पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतकऱ्याला पीकविम्याची मिळालेली रक्कम बॅंकांकडून कापून घेण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने बॅंकांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांवर आर्थिक भार न पडता पीककर्ज सुलभरीत्या उपलब्ध होण्यासाठी ज्या प्रक्रिया आहेत, त्यांची संख्या कमी करावी यासंदर्भातील स्पष्ट मार्गदर्शक सूचना राज्यस्तरीय बॅंक समितीने तातडीने सर्व बॅंकांना पाठवाव्यात, कर्ज पुनर्गठन करतेवेळी सर्च रिपोर्टसंदर्भातही रिझर्व्ह बॅंकेने नव्याने सूचना सर्व बॅंकांना द्याव्यात. 
======================================
जागतिक दहा नेत्यांमध्ये मोदींना स्थान- नायडू

पंतप्रधानांच्या परदेश वाऱ्यांवरील टीकेला उत्तर 
हैदराबाद - पंतप्रधानांच्या परदेश वाऱ्यांवर विरोधकांकडून टीका-टिप्पणी केली जाते. यावर "जागतिक पातळीवर ज्यांचे विचार ऐकले जातात, त्या दहा प्रमुख नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे,‘ अशा शब्दांत संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी उत्तर दिले.

भारताला आता जागतिक पातळीवर ओळख मिळाली असून, जगभरात मान दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत प्रत्येक देशातून होत आहे. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या योजनांची महती परदेशांत पोचली असून, जागतिक पातळीवरील पहिल्या दहा नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. भारताला ज्या पद्धतीने मोदी यांनी विकासाच्या वाटेवर आणले आहे, त्याचे जगभरात कौतुक होत आहे, असे नायडू यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

‘ब्रिक्‍स‘ परिषदेचे नेतृत्व भारताने यंदा प्रथमच केले. तसेच मोदी यांच्या सूचनेवरून संयुक्त राष्ट्र संघटनेने "जागतिक योग दिन‘ जाहीर केला. 196 देशांनी त्यास मान्यता दिली. तसेच वैश्‍विक हवामान बदल व दहशतवादासंदर्भातील मोदी यांची मते विचारात घेण्यात आली आहेत, असे नायडू यांनी सांगितले. मोदी यांच्या परदेश दौऱ्याविषयी विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. त्याला नायडू यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याचा लाभ देशाच्या विकासासाठी केला जातो, असे ते म्हणाले. 
======================================

No comments: