Saturday, 25 June 2016

नमस्कार लाईव्ह २५-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- वॉशिंग्टन; भारतीय राजकारण्यांनी केलं हिलरी क्लिंटनना अर्थसहाय्य - डोनाल्ड ट्रम्प
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- दिल्ली; ज्येष्ठाला मारहाण; 'आप' आमदाराला अटक 
३- ब्रेक्झिटमुळे टाटा समूहाच्या भागभांडवलाला 30 हजार कोटींचा फटका 
४- भाजपाचा शिवसेनेला नवीन झटका 
५- सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण आणा! - उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश  
६- मोदींकडून दिल्लीत आणीबाणी लागू- केजरीवाल 
७- व्हॉट्‌सऍप बंदीबाबत लवकरच सुनावणी 
८- एकत्रित विचार केला नाही तर विकास होणार नाही - नरेंद्र मोदी 
९- आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांना 27 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- दादरमधील आंबेडकर भवन जमीनदोस्त, नव्या वादाला तोंड 
११- पुणे; महापौरांचं नाराजी नाट्य संपलं, स्मार्ट सिटी कार्यक्रमाला हजेरी  
१२- बलात्कारप्रकरणी मुंबईतील काँग्रेसच्या बड्या कार्यकर्त्याला अटक 
१३- डोळस न्यायदेवता; न्यायाधीश म्हणाले, हवं तर मी भरतो गरीब मुलाच्या शाळेची फी 
१४- टीवायबीकॉमला ६६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण 
१५- आरक्षित तिकिटांचे अनधिकृतपणे हस्तांतरण 
१६- 'स्मार्ट सिटी' असो वा 'अमृत सिटी', महाराष्ट्र आघाडीवरच - मुख्यमंत्री 
१७- शिवसेना नुसतीच डरकाळ्या फोडते, सत्ता सोडण्याची धमक त्यांच्यात नाही - सुनील तटकरे 
१८- पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महिला भाविकाचा मृत्यु, डोंबिवलि येथील रहिवासी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- बीड; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं जलयुक्त शिवार शेतकऱ्यांच्या मुळावर 
२०- हैदराबाद; परजातीतील मुलावर प्रेम करणाऱ्या मुलीची हत्या 
२१- इंदूर; पालकांच्या शोधासाठी गीता करणार रेल्वे प्रवास 
२२- श्रीनगर; पोटनिवडणुकीत मेहबूबा मुफ्ती विजयी 
२३- कोकण आणि गोवामध्ये पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. 
२४- नांदेड- ड्रेनेज च्या चेंबर मध्ये पडून 4 जण गंभीर, उपचारा दरम्यान 2 मृत्यू. 
२५- पुणे- वीर धरणाजवळ 100 मेंढ्यांचा मृत्यू, पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- 1983 विश्वचषकाला आज 33 वर्ष पूर्ण 
२७- 'माझ्या मुलाखतीसाठी गांगुली उपस्थितच नव्हता', रवी शास्त्री 
२८- हव्या त्या रंगानं लिहिता येणारा हा ‘स्क्रिबल पेन’ 
२९- कल्पनेपलीकडील भन्नाट जाहिरात, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल! 
३०- ए.आर. रेहमानसोबत विराटने धरला ठेका 
३१- भारताची धावपटू द्युती चंद ऑलिंपिकसाठी पात्र 
३२- प्रशिक्षकपदासाठी द्रविडला विचारले होते : ठाकूर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*जिंतुरचे भुमिपुञ श्री. शिवप्रसादजी राठी यांची भाजपा उद्योग आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीत औद्योगिक वसाहत समितिच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!*
************************
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
===================================

महापौरांचं नाराजी नाट्य संपलं, स्मार्ट सिटी कार्यक्रमाला हजेरी 

महापौरांचं नाराजी नाट्य संपलं, स्मार्ट सिटी कार्यक्रमाला हजेरी लावणार
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी कार्यक्रमाला पुणे महापालिकेचे महापौर अखेर हजर राहणार आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये महापौरांच्या नाराजी प्रकरणी चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून फक्त महापौर हजर राहतील असं जाहीर करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापौर प्रशांत जगताप यांची समजूत काढली. तसंच शरद पवार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर महापौर कार्यक्रमाला हजेरी लावतील, असा निर्णय घेण्यात आला. आज सायंकाळी चार वाजता बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलावर हा कार्यक्रम होणार आहे.
===================================

बलात्कारप्रकरणी मुंबईतील काँग्रेसच्या बड्या कार्यकर्त्याला अटक

बलात्कारप्रकरणी मुंबईतील काँग्रेसच्या बड्या कार्यकर्त्याला अटक
मुंबई: बलात्काराच्या आरोपात एका बड्या काँग्रेस कार्यकर्त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शिवानंद हुल्याळकर असं अटकेत घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. शिवानंद हुल्याळकर यांनी आपल्या कार्यालयातल्या एका मुलीला कामाच्या निमित्तानं मॉरिशसला नेलं होतं. मात्र,  त्याठिकाणी हुल्याळकरकडून लैंगिक शोषण केलं गेलं. असा आरोप तक्रारदार मुलीनं केला आहे.
तक्रारदार मुलगी याआधी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कामाला होती. त्यानंतर शिवानंद हुल्याळकरशी तिचा परिचय झाला आणि ओळखीचं रुपांतर पुढे प्रेमातही झालं. तेव्हापासून तक्रारदार मुलगी शिवानंद हुल्याळकर यांच्या कार्यालयात कामाला होती. दरम्यान, याप्रकरणी शिवानंद हुल्याळकर यांची बाजू स्पष्टपणे पुढे आलेली नाही.
शिवानंद यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारदार मुलीनं केला आहे. दरम्यान, शिवानंद यांच्या ड्रायव्हरनं मात्र याबाबत वेगळीच माहिती दिली आहे. ‘आमचे मालक त्या मुलीवर जीवापाड प्रेम करायचे. तिला फ्लॅटही घेऊन दिला होता. तसेच सोनं आणि 10 लाख रुपयेही दिले होते. त्यांना तिच्याशी लग्नही करायचं होतं. ते तिला मॉरिशिअसला फिरायला देखील घेऊन गेले होते. पण तिला आणखी पैसे हवे होते. लग्नानंतर सारं काही तुझंच आहे असंही त्यांनी तिला सांगितलं होतं. पण मॉरिशिअसहून आल्यावर तिनं मालकांविरोधात तक्रार केलं.’
===================================

1983 विश्वचषकाला आज 33 वर्ष पूर्ण

1983 विश्वचषकाला आज 33 वर्ष पूर्ण
फोटो सौजन्यः बीसीसीआय
मुंबईः 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषकाला आज 33 वर्ष पूर्ण होत आहेत. भारताने आजच्या दिवशी म्हणजे 25 जून 1983 रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचला होता.


भारतीय संघाची 1983 विश्वचषकामधील परिस्थिती अत्यंत नाजूक होती. भारताला अनेकदा दुबळ्या संघांना तोंड देण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागली होती. मात्र भारताच्या शिलेदारांनी आपल्या मेहनतीच्या बळावर अनोखा इतिहास रचून भारताचं नाव इतिहासामध्ये कोरलं.
===================================

'माझ्या मुलाखतीसाठी गांगुली उपस्थितच नव्हता', रवी शास्त्री

'माझ्या मुलाखतीसाठी गांगुली उपस्थितच नव्हता', रवी शास्त्री
मुंबईः भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा उमेदवार निवडण्यासाठी बीसीसीआयच्या चार सदस्यांनी मुलाखती घेतल्या. यामध्ये सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि संजय जगदाळे यांचा समावेश होता. मात्र माझी मुलाखत घेण्यासाठी गांगुली उपस्थितच नव्हता, असा खुलासा रवी शास्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना केला आहे.
रवी शास्त्रींची मुलाखत व्हिडिओ लिंकद्वारे संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत झाली. मुलाखत घेण्यासाठी सचिन स्काईपद्वारे लंडनहून सहभागी होता. जगदाळे आणि लक्ष्मण हे दोघे ताज हॉटेलमध्ये होते. तर गांगुली कोलकाता क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयातून सहभागी होता.
मात्र, शास्त्री यांच्या मुलाखतीवेळी गांगुली कोलकाता क्रिकेट असोसिएशनच्या एका बैठकीमध्ये होता, जी बैठक साडे 6 वाजता संपली. गांगुलीने संपूर्ण मुलाखतीत एकही प्रश्न विचारला नाही, असं शास्त्री यांनी सांगितलं.
===================================
VIDEO: हव्या त्या रंगातील शाई देणारा स्मार्ट पेन, किंमत....
फोट सौजन्य: फेसबूक व्हिडिओ
मुंबई: जर तुम्हाला हव्या त्या रंगांची शाई असणारा पेन मिळाला तर? हो आता असा पेन बाजारात उपलब्ध आहे. हव्या त्या रंगानं लिहिता येणारा हा ‘स्क्रिबल पेन’ आहे.
हा स्मार्ट पेनमुळे तुम्ही हव्या त्या रंगांच्या शाईमध्ये लिहू शकता. यामध्ये स्पेशल इंक कार्टरेज आणि स्कॅनर बसविण्यात आला आहे. कलर सेन्सरला टच केल्यानंतर तो रंग स्कॅन होतो आणि त्या रंगाची शाई तुम्हाला मिळते.
या पेन तयार करणाऱ्या वेबसाईटनुसार या पेनमध्ये रंगाची कधीही कमतरता येणार नाही. हा पेन तुम्ही आयओएस 7 आणि अँड्रॉईड 4.0 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर चालवू शकता.
हा स्मार्ट पेनची किंमत 249 डॉलर म्हणजे जवळजवळ 17000 रु. एवढी आहे. हा स्मार्ट पेन प्रीऑर्डरसाठीही उपलब्ध आहे.
===================================

कल्पनेपलीकडील भन्नाट जाहिरात, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!

कल्पनेपलीकडील भन्नाट जाहिरात, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!
फोटो सौजन्य: फेसबूक व्हिडिओ
मुंबई: टीव्हीवर आपण अनेक वेगवेगळ्या जाहिराती पाहतो. काही जाहिराती आपल्याला त्यांच्या वेगळेपणामुळे नेहमीच लक्षात राहतात. त्यामुळे आपली जाहिरात कशी हटके होईल याचाच जाहिरातदार विचार करीत असतो. पण अनेकदा काहीतरी हटके देण्याच्या नादात बऱ्याचदा घोळही होतो. पण अशा जाहिरातीचीही बरीच चर्चा होते.

अशीच एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे. फिनोलेक्स कंपनीची ही जाहिरात असून ही जाहिरात फारच व्हायरल होत आहे. कालच अपलोड केलेली ही जाहिराती आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिली आहे. तर 11 हजारांपेक्षा जास्त जणांनी ही जाहिरात शेअर केली आहे.

असं म्हणतात की, जाहिरात क्षेत्रात काम करताना तुमच्या कल्पनांना मर्यादा नसेत. अशीच भन्नाट कल्पना वापरुन ही जाहिरात तयार करण्यात आली आहे. पाहा काय आहे हे नेमकी जाहिरात
===================================

ए.आर. रेहमानसोबत विराटने धरला ठेका


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २५ - भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला आपण निवांत मूडमध्ये असताना अनेक वेळा मैदानावर नाचताना किंवा एखाद्या कार्यक्रमात गाताना पाहिलं आहे. इतर खेळाडूंबरोबर मजा करतानाचे त्याचे असे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले असून त्याच्या डान्सचा अनोख अंदाज अनेकांनी पाहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पार्टींमध्ये विराटचा गाता गळाही ब-याच जणांनी अनुभवला आहे. त्याच्या या रूपावर चाहते नेहमीच खूप खुश असतात. पण आता विराट एका व्हिडीओमध्ये चक्क ऑस्करविजेता संगीत दिग्दर्शक ए.आर.रेहमानसोबत नाचता-गाताना दिसणार आहे. 
===================================

ब्रेक्झिटमुळे टाटा समूहाच्या भागभांडवलाला 30 हजार कोटींचा फटका


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 25 - इंग्लंडमधला बडा उद्योगसमूह अशी ओळख असलेल्या टाटा समूहाला ब्रेक्झिटचा चांगलाच फटका बसला असून टाटा समूहातील बड्या कंपन्यांच्या शेअरचे भाव कोसळले आणि एकत्रितपणे कंपनीच्या भागभांडवलाला तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा कौल ब्रिटनमधल्या जनतेने दिल्यानंतर अर्थकंप झाला असून त्याची झळ जगभरात जाणवत आहे. टाटा मोटर्सच्या मालकिची जग्वार लँड रोव्हर ही ब्रिटिश कंपनी आहे, तसेच टाटा स्टीलही ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. ब्रेक्झिटनंतर भारतीय शेअर बाजारात चांगलीच पडझट झाली, ज्यामध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील व टीसीएसचे शेअर अनुक्रमे 8 टक्के, 6 टक्के व 3 टक्के घसरले, ज्यांचे एकत्रित मूल्य 30 हजार कोटी रुपये आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री टाटा समूहाची नाव या वादळातून कशी तारतात, याकडे सगळ्या उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.

===================================
भारताची धावपटू द्युती चंद ऑलिंपिकसाठी पात्र

नवी दिल्ली : भारतीय धावपटू द्युती चंद हिने महिलांच्या 100 मीटर शर्यतीसाठी ऑलिंपिक पात्रता मिळविली आहे. कझाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत आज (शनिवार) द्युतीने पात्रतेसाठी आवश्‍यक असलेली कामगिरी नोंदविली. रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली द्युती ही 99 वी भारतीय खेळाडू आहे.

रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी महिलांच्या 100 मीटर शर्यतीसाठी 11.32 सेकंद ही पात्रतेसाठीची आवश्‍यक कामगिरी होती. द्युतीने आज 11.30 सेकंद अशी वेळ नोंदविली.

महिलांच्या 100 मीटर शर्यतीसाठी पात्रता फेरी घेण्यास सुरवात झाल्यानंतर ऑलिंपिकसाठी पात्र ठरणारी द्युती ही पहिलीच भारतीय महिला धावपटू आहे. यापूर्वी 1980 मध्ये भारताच्या पी. टी. उषाने ऑलिंपिकमध्ये महिलांच्या 100 मीटर शर्यतीत भाग घेतला होता. त्यावेळी या क्रीडा प्रकारासाठी पात्रता फेरी होत नसे.
===================================
प्रशिक्षकपदासाठी द्रविडला विचारले होते : ठाकूर

नवी दिल्ली : ‘भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविडने स्वीकारावे, अशी माझी इच्छा होती; मात्र 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणूनच काम करण्याची इच्छा द्रविडने व्यक्त केली,‘ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी दिली. ठाकूर यांच्यासह अनेक क्रिकेटप्रेमींचीही अशीच इच्छा होती. अखेर द्रविडने अर्ज न भरल्याने ‘बीसीसीआय‘ने तज्ज्ञांच्या समितीद्वारे मुख्य प्रशिक्षकाची निवड केली.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांच्याकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला होता. ही निवड करण्यासाठी सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि संदीप जगदाळे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.

या घोषणेनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकूर म्हणाले, "भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी मी द्रविडला विनंती केली होती. त्याने यास नकार दिला नाही; मात्र ज्युनिअर संघाबरोबरच काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद, त्याचे भरभक्कम मानधन वगैरे गोष्टींचा विचार द्रविडने केला नाही. त्याला ज्युनिअर संघाबरोबर काम करत नवे खेळाडू घडविण्याची इच्छा आहे.‘‘ 
===================================
ज्येष्ठाला मारहाण; 'आप' आमदाराला अटक

नवी दिल्ली - एका ज्येष्ठ नागरिकाच्या गालावर थप्पड मारल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी मोहनिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आज (शनिवार) सकाळी त्यांच्या निवासस्थावरून त्यांना अटक केल्याचे वृत्त आहे.

शुक्रवारी दिल्लीतील तुघलकाबाद परिसरात सर्व्हेक्षणासाठी आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया आले होते. त्यावेळी एका 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने मोहनियासह आलेल्या अन्य कार्यकर्त्यांना ओळखले नाही. याबाबत माहिती देताना पीडित नागरिक म्हणाले, "मी गर्दी पाहिली. मी तिकडे गेलो. माझ्याभोवती लोक गोळा झाले आणि मोहनिया यांनी माझ्या गालावर थप्पड मारली. एका मुलाने माझे हात पिरगळले.‘

विशेष म्हणजे मागील आठवड्यातच पाण्याची तक्रार घेऊन गेलेल्या एका महिलेलाही मोहनिया यांनी अशाच प्रकारची वागणूक  दिली होती. मोहनिया यांच्यावर कलम 323 आणि कलम 341 अंतर्गत गोविंदपुरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे.
===================================

दादरमधील आंबेडकर भवन जमीनदोस्त, नव्या वादाला तोंड

दादरमधील आंबेडकर भवन जमीनदोस्त, नव्या वादाला तोंड
मुंबईः सिद्धार्थ कॉलेजच्या पाठोपाठ दादरमधील आंबेडकर भवनही वादाच्या भोवऱ्यात आलं आहे. या भवनाची मालकी असलेला आंबेडकर ट्रस्ट आणि आंबेडकरांचे कुटुंबिय यांच्यामध्ये या जागेच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरुन वाद आहेत.

या इमारतीच्या पुनर्विकासासाठी आंबेडकर भवनाचे काल रात्री पाडकाम करण्यात आले, त्याला आंबेडकरांच्या कुटुंबियांनी जोरदार विरोध करत पाडकामाचा निषेध केला.

ट्रस्ट विरुद्ध आंबेडकर कुटुंब वाद?
आंबेडकर भवनची इमारत रात्री पाडण्यात आली. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडल्याचा दावा आंबेडकर भवन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांनी आंबेडकर भवनच्या पाडकामाला जोरदार विरोध केलाय. आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी दादरमध्ये परिसराला भेट देऊन घटनेचा निषेध केला आहे.
===================================

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं जलयुक्त शिवार शेतकऱ्यांच्या मुळावर

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं जलयुक्त शिवार शेतकऱ्यांच्या मुळावर
बीडः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वरदान ठरलेली शासनाची जलयुक्त शिवार योजना आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जलयुक्त शिवार योजनेतील बंधारा पहिल्याच पावसात फुटून तब्बल 250 एकर शेतीचं नुकसान झालं आहे.

गेवराई तालुक्यातील भेंड इथे ही घटना घडली आहे. बंधारा तयार करत असताना खोद काम केलेली माती ठेकेदाराने न काढल्यामुळं ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. बंधाऱ्याच्या बाजुची माती तत्काळ काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र ठेकेदाराने माती काढलीच नसल्याचं उघड झाले आहे.

प्रशासनाचा हलगर्जीपणा
बंधाऱ्यातील पाण्याचा विसर्ग येवढा प्रचंड होता की, काही क्षणातच संपूर्ण शेतातील माती आणि नव्याने पेरलेली बियाणे वाहुन गेली आहेत. चार वर्ष दुष्काळाशी झुंज देत असताना यंदा पाऊस चांगला आहे, म्हणून बळीराजा मोठ्या उत्साहाने कामाला लागला आहे. मात्र बंधाऱ्याच्या पाण्यामुळे इथला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
===================================

डोळस न्यायदेवता - न्यायाधीश म्हणाले, हवं तर मी भरतो गरीब मुलाच्या शाळेची फी


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 25 - न्यायदेवता निष्ठूर असते, आंधळी असते असा एक समज आहे. परंतु, गरीब मुलाची शाळेची फी हवी तर मी भरतो, पण त्याला शाळेत दाखल करून घ्या असा आदेश वजा विनंती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली आहे. आणि न्यायदेवता प्रसंगी दयाळू आणि डोळस असू शकते याचे एक उदाहरण समोर ठेवले आहे. न्यायाधीश व्ही. एम. कानडे व एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे चेंबूरच्या शाळेतले एक प्रकरण सुनावणीसाठी आले आहे. चार वर्षांच्या मुलाला ज्युनिअर केजीत अॅडमिशन मिळावी व आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे शाळेची 10,500 रुपयांची फी हप्त्या हप्त्याने भरण्याची अनुमती मिळावी अशी विनंती गरीब आईने केली होती. रिता कनोजिया असं या मुलाच्या आईचं नाव असून ती विधवा आहे. घरकाम करून ती उदरनिर्वाह चालवते. तिला दोन मुली असून त्या त्याच म्हणजे टिळकनगर, चेंबूरच्या लोकमान्य टिळक विद्यालयात तिसरी व चौथीत शिकत आहेत.
    लहान मुलगा कार्तिक यालाही याच शाळेत अॅडमिशन मिळावी, फक्त फी हप्त्या हप्त्याने भरण्याची सवलत द्यावी अशी कनोजिय यांची मागणी होती. जी शाळेने मान्य केली नव्हती. हप्त्या हप्त्याने पैसे भरण्याची मागणी शाळा व्यवस्थापनाने फेटाळल्यामुळे कनोजिया यांनी कोर्टात धाव घेतली होती.
    अखेर, न्यायाधीश कानडे यांनी या मुलाला शाळेत दाखल करून घ्यावं. त्याची आई हप्त्या हप्त्याने पैसे भरेल आणि जर तिने पैसे भरले नाहीत, तर मी भरेन असं सांगितलं. अशा कारणासाठी मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये असंही कानडे यांनी पुढे म्हटलं आहे. 
    सदर आदेश दिल्यानंतर कोर्टाने शाळा व्यवस्थापनाला आपली बाजू 27 जून रोजी मांडण्याचे आदेश दिले आहेत.
===================================

भारतीय राजकारण्यांनी केलं हिलरी क्लिंटनना अर्थसहाय्य - डोनाल्ड ट्रम्प


  • ऑनलाइन लोकमत
    वॉशिंग्टन, दि. 25 - भारत अमेरिका अणू कराराला पाठिंबा मिळावा यासाठी भारतीय राजकारणी आणि संस्थांनी हिलरी क्लिंटनला आर्थिक सहाय्य केल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी प्रकाशित केलेल्या 35 पानी पुस्तिकेमध्ये हे आरोप करण्यात आले असून ते याआधीही वेगवेगळ्या पातलीवर करण्यात आले होते. याआधीही क्लिंटन यांनी हे आरोप फेटाळले होते.
    क्लिंटन यांच्याबद्दल अचूक माहिती गोळा करण्यात आली असून ही माहितीही योग्य असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्ताचा दाखला देत ट्रम्प यांनी आरोप केला की 2008 मध्ये अमर सिंग या भारतीय राजकारण्याने एक ते पाच दशलक्ष डॉलर्सची मदत क्लिंटन फाउंडेशनला केली होती. भारताला नागरी वापरासाठी अणूतंत्रज्ञान मिळावे यासाठी सिंग यांनी अमेरिकेमध्ये काही गटांची भेट घेतली होती आणि त्यावेळी सिनेटर क्लिंटननी त्यांना भारताशी अणूकरार करण्याचे आश्वासन दिले होते. 
    कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री किंवा CII ने देखील क्लिंटन फाउंडेशनला पाच ते दहा लाख डॉलर्सचे अर्थसहाय्य केल्याचा आरोप ट्रम्प यांनी नव्याने केला आहे. भारतीय वंशाचा अमेरिकी व्यक्ती राज फर्नांडो यास क्लिंटनच्या अधिकाऱ्यांनी सरकारमध्ये महत्त्वाचे पद दिल्याचे आणि फर्नांडोंनीही क्लिंटन फाउंडेशनला 1 ते 5 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
    जगभरात इस्लामिक स्टेट पसरण्यास क्लिंटन यांचे विदेश धोरण कारण असून त्यामुळे अमेरिकेने हजारो माणसं आणि अब्जावधी डॉलर्स गमावल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे.
===================================

भाजपाचा शिवसेनेला नवीन झटका


  • मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी राज्य सरकारने मुख्य लेखापरीक्षक पाठविल्याची घटना ताजी असताना मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे़ स्मार्ट सिटी प्रकल्प स्वबळावर राबविण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत़ मात्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रमुख महापौरांऐवजी आयुक्तांना बनविण्यात आले आहे़ यामुळे संतप्त शिवसेनेने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे़
    केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून मुंबईसह आठ शहरांना वगळण्यात आले आहे़ मात्र मुंबई आणि नवी मुंबई वगळता अन्य सहा महापालिकांना सिडको आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून १०० कोटी रुपये अनुदान मिळणार आहे़ मुंबई आणि नवी मुंबई या महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्यांना कोणताही निधी देण्यात येणार नाही, असे राज्याच्या नगरविकास खात्याने परिपत्रकातून स्पष्ट केले आहे़मात्र या प्रकल्पासाठी तयार केलेल्या विशेष मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे आयुक्त अजय मेहता यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत़ या अभियानाच्या विशेष उद्देश वाहन कंपनीचे नाव ठेवणे व नोंदणीच्या कागदपत्रांवर सह्यांचे अधिकार आयुक्तांनाच देण्यात आले आहेत़
===================================

टीवायबीकॉमला ६६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण


  • मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा (टीवायबीकॉम) सहाव्या सत्राचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला. परीक्षेला बसलेल्या एकूण ६९ हजार ५२९ विद्यार्थ्यांपैकी केवळ ६६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
    याआधी ७० हजार ३६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील केवळ ७० हजार २८१ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. त्यातून केवळ ६०९ हजार ५२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर ७५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ३२१ विद्यार्थ्यांना ‘ओ’ ग्रेड मिळाली आहे. तर ७ हजार ८५७ विद्यार्थ्यांना ‘ए,’ १२ हजार २३० विद्यार्थ्यांना ‘बी’, १३ हजार २३२ विद्यार्थ्यांना ‘सी’, ७ हजार ५२७ विद्यार्थ्यांना ‘डी’ आणि ४५८ विद्यार्थ्यांना ‘ई’ ग्रेड मिळाली आहे. तर २० हजार ३१३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
===================================

सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण आणा!


  • मुंबई : दहीहंडीमध्ये लावण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाकडूनच स्पष्टीकरण घेऊन या, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले.
    दहीहंडीसाठी २० फुटांपर्यंतच मानवी मनोरे रचण्याचा निर्बंध उच्च न्यायालयाने घालूनही २०१५ मध्ये अनेक आयोजकांनी या आदेशाचे उल्लंघन केले. त्याविरुद्ध मूळ याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.
    उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर याचिका निकाली काढली.
    सर्वोच्च न्यायालयाने आदेशात उच्च न्यायालयाने मानवी मनोऱ्यांवर घातलेल्या निर्बंधासंबंधी काहीही उल्लेख न केल्याने उच्च न्यायालयाचा आदेश लागू होत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. तर न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने काहीही उल्लेख न केल्याने आधीचा आदेश लागू होतो, असे म्हटले.
    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत उच्च न्यायालय आणि राज्य सरकारचे वेगळे मत असल्याने खंडपीठाने सरकारला या आदेशाबाबत स्पष्टीकरण घेण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.
===================================

आरक्षित तिकिटांचे अनधिकृतपणे हस्तांतरण


  • मुंबई : रेल्वेची आरक्षित तिकिटे अनधिकृतपणे हस्तांतरित केल्याची प्रकरणे पश्चिम रेल्वेर उघडकीस आली आहेत. गेल्या तीन महिन्यांत जवळपास १,३१२ प्रकरणे उघडकीस आल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. यात सर्वाधिक प्रकरणे मे महिन्यात उघडकीस आणण्यात आली आहेत.
    रेल्वेच्या मेल-एक्सप्रेसची तिकिटे मिळवताना प्रवाशांच्या चांगलेच नाकी नऊ येतात. आॅनलाइन तिकीट आरक्षित करताना तर अवघ्या काही सेकंदांत मोठ्या वेटिंग लिस्टचा सामना प्रवाशांना करावा लागतो. त्यामुळे कशाही परिस्थितीत तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांकडून दलालांमार्फत तिकीट मिळवले जाते. काही प्रवासी तर अनधिकृत दलालांचा आधार घेत तिकीट मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. यात तर दलालांकडून एखाद्या प्रवाशाचे आरक्षित तिकीट दुसऱ्या प्रवाशाला अनधिकृतपणे हस्तांतरित केले जाते. आरक्षित तिकीट असलेल्या एखाद्या प्रवाशाने प्रवासाला जाण्याचे रद्द केल्यास तेच तिकीट दलालांकडून दुसऱ्या प्रवाशाला देण्यात येते. काही प्रवासी तर स्वत:हून आपले आरक्षित तिकीट ओळखीच्या व्यक्तीलाच देतात. अशाप्रकारे आरक्षित तिकीट हस्तांतरित करण्याची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यांत १,३१२ प्रकरणे उघडकीस आली असून, सर्वाधिक प्रकरणे
    मे महिन्यातील असल्याची माहिती देण्यात आली. एकट्या मे महिन्यात जवळपास ८९४ प्रकरणे उघडकीस आली आहेत. मे महिन्यात रेल्वेकडून विशेष ट्रेनही सोडल्या जातात.
===================================
'''स्मार्ट सिटी' असो वा 'अमृत सिटी', महाराष्ट्र आघाडीवरच''

पुणे : ‘स्मार्ट सिटी उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश झाला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील दोन शहरे आहेत. जगातील अनेक देश विकासासाठी इथे पैसे गुंतविण्यास तयार आहे. इतर शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकारनेही मदत केल्यास या प्रकल्पाला गती मिळू शकते,‘ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) केले. ‘स्मार्ट सिटी‘ असो वा ‘अमृत सिटी‘, महाराष्ट्र सदैव आघाडीवरच असेल, असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

‘शहर विकासाची जबाबदारी केवळ महापौर किंवा आयुतांची नाही. सर्व नगरसेवक आणि सर्वपक्षीयांनी मिळून विकासासाठी काम केले पाहिजे; तरच आपण विकास प्रत्यक्षात आणू शकतो,‘ असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी केले. ते म्हणाले, "केवळ हॅट-बुट-कोट-सुट म्हणजे ‘स्मार्ट‘ होत नाही. लोकांचे जीवन सुखदायी आणि जगण्यायोग्य करणे म्हणजे ‘स्मार्ट‘. पुण्यात अनेक ऐतिहासिक गोष्टींची सुरवात झाली आहे. मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी आहे; पण ‘हृदय‘ पुणे आहे. पुणे असो वा भुवनेश्‍वर किंवा सोलापूर, सगळ्याच ठिकाणी ‘स्मार्ट सिटी‘विषयी भरपूर उत्साह दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांना विविध क्षेत्रांमध्ये बदल घडवायचे आहेत, जेणेकरून सर्वांगीण विकास होऊ शकेल.‘‘ 
===================================
मोदींकडून दिल्लीत आणीबाणी लागू- केजरीवाल

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये आणीबाणी जाहीर केली असल्याचे खळबळजनक वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी आज (शनिवार) आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांना पोलिसांनी त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना अटक केले. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी ट्‌विटरद्वारे म्हटले की, ‘मोदी यांनी दिल्लीमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. दिल्लीमध्ये निवडून आलेल्यांना ताब्यात घेणे, धाड टाकणे, दहशत निर्माण करणे, खोटे गुन्हे दाखल करणे. (घडत आहे) दिनेश मोहनिया यांना पत्रकार परिषदेतून सर्व टीव्ही कॅमेऱ्यांसमोर अटक करण्यात आली.‘ असे म्हणत "मोदींना यातून कोणता संदेश द्यायचा आहे?‘, असा प्रश्‍न केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. 
===================================
व्हॉट्‌सऍप बंदीबाबत लवकरच सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली - व्हॉट्‌सऍपवरील एंड-टू-एंड इन्क्रिप्शनमुळे (सांकेतिक लिपीबद्ध करून मजकूर सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया) दहशतवाद्यांना संवाद साधणे अधिक सोपे झाले आहे. यामुळे व्हॉट्‌सऍपवर बंदी आणावी, अशी मागणी हरियानातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर यादव यांनी याचिकेद्वारे केली आहे. यावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.

व्हॉट्‌सऍपने एप्रिल महिन्यापासून सुरू केलेल्या या सुविधेमुळे प्रत्येक मेसेज 256-बिट एन्क्रिप्शनमधून जात असल्याने तो फोडून वाचणे अवघड झाले आहे. असा मेसेज फक्त सेंडरच (मेसेज प्राप्त व्यक्ती) वाचू शकत असल्याने याचा वापर करून दहशतवादी संवाद साधू शकतील व अनेक कारवाया करू शकतील, असे याचिकेत म्हटले आहे. विशेष म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा एखादा संदेश सरकारला हवा असल्यास व्हॉट्‌सऍप स्वत:ही तो प्राप्त करू शकत नसल्याने हे फारच धोकादायक असल्याचेही यादव यांनी याचिकेत नमूद केले आहे.
===================================
परजातीतील मुलावर प्रेम करणाऱ्या मुलीची हत्या

हैदराबाद - परजातीतील मुलासोबत प्रेमसंबंध ठेवल्याने 17 वर्षाच्या मुलीची तिच्या वडिलांनी पत्नी व त्याच्या आईच्या साह्याने गळफास देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आदिलाबाद जिल्ह्यात लक्ष्मण सिंगचे कुटुंब राहत आहे. दरम्यान कुटुंबातील 17 वर्षाच्या मुलीचे दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेमसंबंध होते. प्रियकर मुलाने मुलीच्या घरी येऊन दोघांच्या प्रेमाविषयी माहिती दिली. दरम्यान घरातील सदस्यांनी संताप व्यक्त केला. प्रियकर घराबाहेर गेल्यानंतर आपल्याच मुलीला संपविण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. मुलीचे वडिल लक्ष्मण सिंग याने आई आणि पत्नीच्या साह्याने पहाटे ओढणीला गळफास अडकवून स्वत:च्या मुलीची हत्या केली. "या तिघांना आपली मुलगी परजातीतील मुलाचा हात धरून पळून जाण्याची आणि त्यामुळे होणाऱ्या बदनामीची भीती वाटत होती. लक्ष्मणला आणखी दोन लहान मुली आहेत‘, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून आरोपींना कठोर शिक्षा होईल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली.
===================================
पालकांच्या शोधासाठी गीता करणार रेल्वे प्रवास

इंदूर - लहानपणी बेपत्ता झाल्याने पाकिस्तानमधील लाहोर स्थानकावर पोचलेली आणि "बजरंगी भाईजान‘नंतर भारतात परतलेली गीता नावाच्या मुलीने रेल्वेने भारतभर फिरून पालकांचा शोध घेण्याची इच्छा व्यक्तत केली आहे. याबाबत मध्य प्रदेश सरकारने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. 



लहानपणी बेपत्ता झालेली गीता समझोता एक्‍स्प्रेसमध्ये एकटीच बसलेली लाहोर स्थानकावर पाकिस्तानी सैनिकांना आढळली होती. तेव्हापासून ती तेथेच राहत होती. परराष्ट्र खात्याच्या प्रयत्नानंतर गेल्या वर्षी ती भारतात परतली. ती मूकबधिर असून सध्या इंदूर येथील मूकबधिरांसाठीच्या संस्थेत राहत आहे. गीता ही आपली मुलगी असल्याचा दावा करीत अनेक दांपत्य तिचा ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. पण गीताने यापैकी कोणालाही ओळखलेली नाही. त्यामुळे सर्व पालकांचे दावे फोल ठरले आहेत. त्यामुळेच आईवडिलांच्या शोधासाठी रेल्वेने प्रवास करण्याची इच्छा गीताने संस्थेच्या संचालिका मोनिका पंजाबी यांना खुणांच्या भाषेत सांगितले. ही माहिती मध्य प्रदेश सरकारने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. 
===================================
'हिलरींनी स्वीकारलेली भारतीय नेत्यांकडून देणगी'

वॉशिंग्टन - भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणुकराराला पाठिंबा देण्यासाठी हिलरी क्‍लिंटन यांनी भारतीय नेत्यांकडून निधी स्वीकारल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ट्रम्प आणि क्‍लिंटन हे आपापल्या पक्षाकडून संभाव्य उमेदवार आहेत.

ट्रम्प यांनी आपल्या प्रचार पुस्तिकेद्वारे हा आरोप केला आहे. हा आरोप अनेक वर्षांपासून केला जात असला तरी आणि हिलरी यांनी पूर्वी अनेकदा त्याचा इन्कार केला असला, तरी ट्रम्प यांनी तो पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. ट्रम्प यांनी आपल्या पुस्तकात हिलरी यांच्याविरोधातील सर्व आरोपांची यादीच दिली आहे. या पुस्तिकेत केलेल्या दाव्यानुसार, 2008 मध्ये अमरसिंह यांनी क्‍लिंटन फाउंडेशनला दहा ते पन्नास लाख डॉलरचा निधी दिला होता. "अमरसिंह यांनी 2008 मध्ये अमेरिका दौरा करत भारत-अमेरिका नागरी अणुकरारासाठी भेटीगाठी घेतल्या होत्या. या वेळी क्‍लिंटन यांनी त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून अडथळा न येण्याची शाश्‍वती दिली होती,‘ असे पुस्तिकेत म्हटले आहे. अमरसिंह यांच्याप्रमाणेच भारतीय उद्योगांतर्फे आलेल्या एका शिष्टमंडळानेही 2008 मध्ये क्‍लिंटन फाउंडेशनला दहा लाख डॉलरचा निधी दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 
===================================
पोटनिवडणुकीत मेहबूबा मुफ्ती विजयी

श्रीनगर - अनंतनाग मतदारसंघात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत जम्मू काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती विजयी झाल्या आहेत. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार हिलास शाह यांचा बारा हजार मतांनी पराभव केला.

दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांचे निधन झाल्यामुळे अनंतनागमध्ये पोटनिवडणुक घेण्यात आली होती. सईद यांच्यानंतर त्यांची कन्या आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सध्या अनंतनागमधूनच लोकसभेवर निवडून गेलेल्या मेहबूबा यांनी येथूनच विधानसभा लढवित ही जागा पक्षाकडे कायम ठेवली आहे. या निवडणुकीतील तिसरे उमेदवार नॅशनल कॉन्फरन्सचे नेते इफ्तिकार हुसेन मिसघर यांना केवळ 1700 मते पडली. एकेकाळी अनंतनाग हा नॅशनल कॉन्फरन्सचा बालेकिल्ला समजला जात होता.
===================================

No comments: