Thursday, 2 June 2016

नमस्कार लाईव्ह ०२-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- भारत-पाकदरम्यान अणुयुद्धाची अमेरिकेला भीती 
2- झिम्बाब्वे छापणार स्थानिक 'अमेरिकी डॉलर' 
३- चीनचा इस्लामिक दहशतवाद्यांना सज्जड इशारा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- खडसे वाद : अमित शाह-फडणवीस यांच्यात 40 मिनिटे चर्चा 
५- शिवसेनेने भाजपच्या अंतर्गत विषयांमध्ये लुडबूड करु नये: भाजप 
६- गुलबर्ग जळीतकांड : २४ दोषी, ३६ जणांची सुटका, ६ जून रोजी सुनावणार शिक्षा 
६- 'अभारतीयांसाठी "सो कॉल्ड सिंगर' शब्द वापरला' 
७- योगा शिकण्यासाठी मिळणार भारताचा व्हिसा 
८- संपूर्ण देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस 
९- ऑगस्टमध्ये 104 टक्के पावसाचा अंदाज- हवामान विभाग 
१०- मोदींची बंदूक राज्यपालांच्या खांद्यावर- केजरीवाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- “तुमची उणीव भासतेय...”, मुंडेंच्या स्मरणार्थ खडसेंचे पोस्टर्स
१२- खडसे प्रकरणात मुख्यमंत्री शांत का? संजय राऊत यांचा तिखट सवाल 
१३- माजी मुख्यमंत्री अजित जोगी कॉंग्रेसमधून बाहेर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- कुलाब्यातील इमारतीची आग पुन्हा भडकली 
१५- नागपुरात कूलरचा शॉक लागून एकाच घरातील तिघांचा मृत्यू 
१६- मुंबई: मध्य रेल्वे कोलमडली, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत 
१७- सांगली; झोपडीत 3 कोटी, जामीनावर सुटलेला मैनुद्दीन पळाला 
१८- मुरादाबाद; 'मॉक ड्रिल'दरम्यान अपघात; शिक्षिका जखमी 
१९- झारखंड - पलामू येथे दोन प्रेशर कूकर बॉम्ब सापडला 
२०- मुंबई- सेंट्रल रेल्वेची वाहतूक विस्कळीत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

======================================

खडसे वाद : अमित शाह-फडणवीस यांच्यात 40 मिनिटे चर्चा

खडसे वाद : अमित शाह-फडणवीस यांच्यात 40 मिनिटे चर्चा
नवी दिल्ली: महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अहवाल भाजप अध्यक्षांकडे सोपवला आहे, त्यामुळं त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय अमित शाह स्वत: घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यालयात बंद दाराआड अमित शाह यांच्याशी सुमारे 40 मिनिटे चर्चा केली.

यावेळी अंबरनाथमधील जमिनीसाठी लाच मागितल्याचं प्रकरण, लिमोझिनचं मॉडिफिकेशन आणि भोसरी एमआयडीसीतील जमिनीच्या खरेदीचा वाद याबाबतची सखोल माहिती मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांना दिली.

खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं त्यांचा राजीनामा घेऊऩ त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी सर्व स्तरातून होतेय.
======================================

कुलाब्यातील इमारतीची आग पुन्हा भडकली

LIVE : कुलाब्यातील इमारतीची आग पुन्हा भडकली

======================================

नागपुरात कूलरचा शॉक लागून एकाच घरातील तिघांचा मृत्यू

नागपुरात कूलरचा शॉक लागून एकाच घरातील तिघांचा मृत्यू
नागपूर : कूलरचा शॉक लागून एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली आहे. मृतांमध्ये आई, वडील आणि मुलीचा समावेश आहे.


मानकापूर परिसरात असलेल्या दामले कुटुंबातील किशोर दामले (वय 61 वर्ष), अंजली दामले (वय 55 वर्ष), विनिशा काळे (वय 33 वर्ष) दगावले.


निवृत्त पोलिस अधिकारी किशोर दामले यांची मुलगी माहेरी आली होती. मुलगी विनिशा कूलरमध्ये पाणी टाकण्यासाठी गेली असता तिला विजेचा झटका बसला. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी वडील तिथे गेले आणि तेही चिकटले. यानंतर आई या दोघांना वाचवण्यासाठी गेली असता, तिलाही विजेचा झटका बसला. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
======================================

शिवसेनेने भाजपच्या अंतर्गत विषयांमध्ये लुडबूड करु नये: भाजप

शिवसेनेने भाजपच्या अंतर्गत विषयांमध्ये लुडबूड करु नये: भाजप
मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं, असा सल्ला देणाऱ्या शिवसेनेला भाजपने खरमरित उत्तर दिलं आहे. शिवसेनेने भाजपच्या अंतर्गत विषयांमध्ये लुडबूड करु नये, असा सल्ला भाजपने शिवसेनेला दिला आहे.

“एकनाथ खडसेंबाबत भाजपने काय करावं, हे शिवसनेने सांगू नये. भाजपच्या अंतर्गत विषयांत शिवसेनेने लुडबूड करु नये. आमचं नेतृत्त्व निर्णय घ्यायला सक्षम आहे.”, असे भाजपने शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

एकनाथ खडसेंनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी होईपर्यंत पद सोडावं, निर्दोषत्व सिद्ध करुन सन्मानाने मंत्रिमंडळात यावं, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपने संजय राऊत यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाय, खडसे यांच्याविरोधात लाचखोरी, जमीन लाटल्याच्या प्रकरणासह इतर गंभीर आरोप आहेत. अशावेळी पारदर्शक कारभाराचा हवाला देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यावा असेही संजय राऊत म्हणाले होते.
======================================

मुंबई: मध्य रेल्वे कोलमडली, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मुंबई: मध्य रेल्वे कोलमडली, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
प्रातिनिधिक फोटो
मुंबई काल हार्बर रेल्वेमार्गावरील प्रवाशांना वाहतूक कोलमडल्याचा फटका बसला, तर आज मध्यरेल्वेवरील प्रवाशांना फटका बसला आहे. कल्याणजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या तांत्रिक बिघाडामुळे कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून, मध्य रेल्वेवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरु आहे.

दरम्यान, ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वमार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
======================================

“तुमची उणीव भासतेय...”, मुंडेंच्या स्मरणार्थ खडसेंचे पोस्टर्स

“तुमची उणीव भासतेय...”, मुंडेंच्या स्मरणार्थ खडसेंचे पोस्टर्स
मुंबई : राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ आदरांजली व्यक्त करणारे पोस्टर्स मुंबईभर लावले आहेत. “तुमची उणीव भासतेय..”, “असा नेता पुन्हा होणे नाही..”, “कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्त्व” अशी वाक्य असणारे हे पोस्टर्स मुंबईत लावले गेले आहेत.

पाहा आणखी फोटो : “तुमची उणीव भासतेय…”, मुंडेंच्या स्मरणार्थ खडसेंचे पोस्टर्स


विशेष म्हणजे या पोस्टर्सवर भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करण्यात आला नसून, केवळ महसूलमंत्री खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे-खाडे यांचा उल्लेख या पोस्टर्सवर आहे. त्यामुळे या पोस्टर्सवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
======================================

खडसे प्रकरणात मुख्यमंत्री शांत का? संजय राऊत यांचा तिखट सवाल

खडसे प्रकरणात मुख्यमंत्री शांत का? संजय राऊत यांचा तिखट सवाल
मुंबई : भोसरीतील जमीन ही एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं, उद्योगमंत्र्यांनी सांगितलं आहे. मात्र असं असूनही ती जमीन महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या नातेवाईकांच्या नावे कशी? या सर्वप्रकरणात मुख्यमंत्री शांत का? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या खडसेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा द्यावा. निर्दोषत्व सिद्ध करुन पदभार स्वीकारावा ही महाराष्ट्राची आणि देशाची परंपरा आहे, असं राऊत म्हणाले.

तसंच जो न्याय घरकुल घोटाळाप्रकरणात सुरेश जैन यांना लावला, तोच न्याय खडसेंना का नाही? असाही सवाल संजय राऊत यांनी केला.
======================================

झोपडीत 3 कोटी, जामीनावर सुटलेला मैनुद्दीन पळाला

झोपडीत 3 कोटी, जामीनावर सुटलेला मैनुद्दीन पळाला
(संग्रहित फोटो)
सांगली: मिरजमध्ये झोपडीत 3 कोटी सापडल्याप्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. कारण याप्रकरणातला आरोपी मैनुद्दीन मुल्ला 70 लाख रुपये घेऊन पसार झाला आहे.

एका झोपडीत 3 कोटी सापडल्यानं मैनुद्दीनला पोलिसांनी अटक केली होती. मात्र 20 दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर मैनुद्दीनं त्याचा साथीदार विनायक जाधव याच्याकडे ठेवलेले 70 लाख रुपये घेतले आणि तो पसार झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विनायक जाधव आणि मैनुद्दीनच्या पत्नीला अटक केली आहे.
======================================

गुलबर्ग जळीतकांड : २४ दोषी, ३६ जणांची सुटका, ६ जून रोजी सुनावणार शिक्षा


  • ऑनलाइन लोकमत
    अहमदाबाद, दि. ०२ - गुजरातमधील गुलबर्ग सोसायटी जळीतकांडप्रकरणाचा तब्बल १४ वर्षांनी निकाल लागला असून या जळीतकांडप्रकरणी अहमदाबाद न्यायालयाने २४ जणांना दोषी ठरवले असून ३६ जणांची सुटका केली आहे. गुरूवारी न्यायालयाने दिलेल्या निकालात ११ जणांवर हत्येच्या गुन्ह्यासह इतर आरोप लावण्यात आले आहेत. थोड्याच वेळात दोषींना शिक्षा सुनावण्यात येईल.
     
    २००२ साली गुजरात दंगलीनंतर काँग्रेसचे नेते एहसान जाफरी हे राहत असलेल्या गुलबर्ग सोसायटीला आग लावण्यात आली होती. त्यात जाफरींसह ६९ जण मृत्यूमुखी पडले होते.
     
    या प्रकरणी एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया या गेल्या १४ वर्षआंपासून न्यायालयात लढा देत असून न्यायालयाच्या आजच्या निकालाने त्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. याप्रकरणी एसआयटीने ६६ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी ९ आरोपी गेल्या १४ वर्षांपासून तुरूंगात असून इतर आरोपी जामीनावर बाहेर आहेत.
======================================

भारत-पाकदरम्यान अणुयुद्धाची अमेरिकेला भीती

  • वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानातील पारंपरिक संघर्षाची परिणती अण्वस्त्रांचा उपयोग करण्यात होऊ शकते, अशी भीती व्यक्त करताना अमेरिकेने उभय देशांनी चर्चा सुरू ठेवून अधिकाधिक संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
    ‘आम्ही दक्षिण आशियातील अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र विकासाबाबत आम्ही चिंतीत आहोत’, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक डॉ. अब्दुल कदीर खान यांच्या अलीकडील एका वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हा प्रवक्ता बोलत होता. पाच मिनीटांत दिल्लीला लक्ष्य बनविण्याची पाकिस्तानकडे क्षमता आहे, असे डॉ. खान यांनी म्हटले होते.
    भारत-पाकमधील द्विपक्षीय संबंधात सुधारणा झाल्याने प्रदेशात शाश्वत शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त होईल, असेही या अधिकाऱ्याने म्हटले.
======================================
'अभारतीयांसाठी "सो कॉल्ड सिंगर' शब्द वापरला'

नवी दिल्ली - लोकप्रिय पार्श्‍वगायिका लता मंगेशकर यांचा ‘सो कॉल्ड सिंगर‘ असा उल्लेख करणाऱ्या ‘न्यूयॉर्क टाईम्स‘ने ‘सो कॉल्ड‘ हा शब्द अभारतीय लोकांना समजण्यासाठी वापरला असल्याचे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. 

भारतरत्न आणि गानकोकिळा लता मंगेशकर आणि सचिन तेंडुकलर यांच्यावर विनोदी कलाकार तन्मय भटने वादग्रस्त व्हिडिओ तयार केला होता. त्यावरून तन्मवर टीका करण्यात येत होती. दरम्यान यासंबंधातील एक लेख देताना ‘न्यूयॉर्क टाईम्स‘ने लता मंगेशकर यांचा ‘सो कॉल्ड सिंगर‘ असा उल्लेख केला होता. त्यामुळे प्रचंड टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर ‘न्यूयॉर्क टाईम्स‘ने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘न्युयॉर्क टाईम्स‘च्या आशिया विभागातील प्रमुख एलेन बेरी यांनी याबाबतचा ट्विटरद्वारे खुलासा करण्याचा प्रयत्न केला. ‘जे अभारतीय वाचक ‘प्ले बॅक सिंगर‘ या संकल्पनेबाबत अनभिज्ञ आहेत त्यांच्यासाठी ‘सो कॉल्ड सिंगर‘ हा शब्द वापरला. यात कोणत्याही प्रकारची टिपणी केलेली नाही‘ असा खुलासा बेरी यांनी केला आहे.
======================================
योगा शिकण्यासाठी मिळणार भारताचा व्हिसा

नवी दिल्ली - भारतातील प्राचीन योगा पद्धतीचा संपूर्ण जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी योगाचा अल्पावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी परदेशी नागरिकांना पर्यटक व्हिसा तसेच ई-टुरिस्ट व्हिसा देण्याचा निर्णय भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतला घेतला आहे. 

======================================
माजी मुख्यमंत्री अजित जोगी कॉंग्रेसमधून बाहेर

रायपूर- छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी आज (गुरुवार) कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडले आहेत. लवकरच ते नवीन पक्षात प्रवेश करणार आहेत. कॉंग्रेस पक्षात महत्त्व मिळत नसल्याचे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे जोगी यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना जोगी म्हणाले, ‘पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी अनेक नागरिकांशी चर्चा केली आहे. कॉंग्रेस पक्ष हा नेहरू व राजीव गांधी यांचा पक्ष आता राहिलेला नाही. पक्षाला काम करणाऱयांची किंमत नाही. छत्तीसगडमध्ये रमन सिंग यांची ‘बी-टीम‘ आहे. लवकरच नवीन पक्षात प्रवेश करणार आहे.‘
======================================
संपूर्ण देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

नवी दिल्ली - हवामान विभागाने यंदाच्या मॉन्सूसबाबतचा ताजा अंदाज व्यक्त केला असून त्यानुसार यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्‍यता असून अपुऱ्या पावसाची कोणतीही शक्‍यता नसल्याचे म्हटले आहे. 



हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज 
  • अपुऱ्या पावसाची शक्‍यता शून्य टक्के 
  • पुढील चार ते पाच दिवसात मॉन्सूनचे देशात आगमन 
  • मध्य भारतात 113 टक्के पावसाचा पडेल 
  • उत्तर-पूर्व भारतात 94 टक्के पावसाची शक्‍यता 
  • जुलैमध्ये 107 टक्के तर ऑगस्टमध्ये 104 टक्के पावसाची शक्‍यता 
  • बेटांच्या परिसरात 94 टक्के पावसाची शक्‍यता
======================================
झिम्बाब्वे छापणार स्थानिक 'अमेरिकी डॉलर'

हरारे: झिम्बाब्वेत रोख तुटवड्याच्या समस्येचा सामना करण्यासाठी तेथील सरकारने अमेरिकी डॉलर स्थानिक स्वरुपात छापण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, पैसे काढून घेण्याच्या मर्यादेवर बंदी घालण्याचादेखील निर्णय घेण्यात आला आहे.

2009 साली तयार झालेल्या ‘हायपरइन्फ्लेशन‘नंतर झिम्बाब्वेने अमेरिका आणि दक्षिण अफ्रिकेचे चलन स्वीकारले होते. त्यावेळी देशातील महागाईत 231 दशलक्ष टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे झिम्बाब्वेची अर्थव्यवस्था पार कोलमडली होती.

सध्या निर्माण झालेल्या रोख तुटवड्यावर उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर John Mangudya यांनी देशाच्या आर्थिक धोरणात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत बँकेतून रोख रक्कम काढून घेण्याची मर्यादा प्रति दिवस 1,000 डॉलरपर्यंत किंवा 20,000 दक्षिण अफ्रिकन रँड इतकी करण्यात आली आहे. शिवाय, तेथील रिझर्व्ह बँक डॉलर-समकक्ष बॉण्ड नोटा छापणार असल्याचे Mangudya यांनी सांगितले. तसेच देशाबाहेर रक्कम नेण्यावरदेखील बंदी घालण्यात येणार आहे. 
======================================
चीनचा इस्लामिक दहशतवाद्यांना सज्जड इशारा

बीजिंग - शिनजियांग प्रांतामधील इस्लामिक दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कठोर कारवाईचे समर्थन करत चीनने आज (गुरुवार) कोणत्याही परकीय संघटनेस वा नागरिकास देशातील धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करु दिला जाणार नाही, असा इशारा दिला.

"फ्रीडम ऑफ रिलिजियस बिलिफ इन शिनजियांग‘ या नावाने प्रकाशित करण्यात आलेल्या "व्हाईट पेपर‘मध्ये येथील सरकारने या भागामध्ये धार्मिक मूलतत्त्ववादी धार्मिक सत्ता आणण्यासाठी कडव्या विचारसरणीचा प्रसार करत असल्याची टीका केली आहे. याचबरोबर, शिनजियांग प्रांतात याआधी इतके धार्मिक स्वातंत्र्य कधीही देण्यात आले नव्हते, असा दावाही या व्हाईट पेपरच्या माध्यमामधून करण्यात आला आहे. 
======================================
'मॉक ड्रिल'दरम्यान अपघात; शिक्षिका जखमी

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) - एका खाजगी शाळेतील आपत्ती व्यवस्थापनाच्या "मॉक ड्रिल‘ दरम्यान (सराव) इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोरीने खाली येत असलेल्या शिक्षिकेला अपघात झाला असून यामध्ये शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुरादाबादमधील आशियाना परिसरातील आरआरके शाळेत एक आपत्ती व्यवस्थापनाचा सराव सुरू होता. आपत्तीजन्य परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना आणि अन्य व्यक्तींना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोरीने खाली आणण्याबाबतचे प्रात्यक्षिक सुरू होते. दरम्यान शाळेतील श्रद्धा शर्मा नावाच्या शिक्षिकेला तिसऱ्या मजल्यावरून खाली सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. दरम्यान तोल गेल्याने तसेच दोरीची गाठ सुटल्याने श्रद्धा खाली पडली. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटिंग करण्यात येत होते. त्यामध्ये हा संपूर्ण प्रकार चित्रित झाला आहे. मोरादाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
======================================
मोदींची बंदूक राज्यपालांच्या खांद्यावर- केजरीवाल

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.



ट्विटरद्वारे मोदींवर टीका करताना केजरीवाल म्हणाले, "दिल्ली सरकारमधील प्रत्येक फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपाल आक्रमकपणे अडचणी निर्माण करत आहेत. मोदी हे राज्यपालांच्या खांद्यावरून बंदूक ठेवून चालले आहेत.‘ दिल्लीमध्ये सरकार स्थापन केल्यापासून केंद्र सरकार, नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकारमध्ये विविध विषयांवरून अनेकदा संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या, दिल्लीतील सम-विषय योजना आदी विषय चांगलेच गाजले होते. वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय सामाईप पात्रता परीक्षा (नीट) बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्याविरूद्ध कोणताही अध्यादेश आणू नये, असे म्हणत "नीट‘च्या अध्यादेशाला केजरीवाल यांनी विरोध केला होता. तर दोन वर्षांत केंद्र सरकारने जाहिरातींवर एक हजार कोटींहून अधिक खर्च केल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला होता.

======================================
======================================
======================================
======================================
======================================
======================================
======================================
======================================
======================================

No comments: