Thursday, 23 June 2016

नमस्कार लाईव्ह २२-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- बीजिंग; ..म्हणून चीनमधील बँक कर्मचाऱ्यांना मॅनेजरनं झोडपलं 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- नौदलाच्या जवानांनी सर केलं सतोपंथ हिमशिखर 
३- 'राऊत साहेब, तलाक केव्हा घेताय?' भाजपाच्या पाक्षिकातून सेनेवर शरसंधान 
४- नोकरीची संधी, बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा 
५- माझ्यावर कितीही दावे केले तरी, खडसेंना कोर्टात भ्रष्ट सिद्ध करेन: दमानिया 
६- काँग्रेस नेते गुरूदास कामतांचा राजकारणातील निवृत्तीचा निर्णय मागे 
७- ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये तरुणांना संधी देणार - पवार 
८- आता स्पेक्ट्रमचा होणार महालिलाव 
९- एटीएमच्या शुल्काने बँकेचा भरतोय खजिना
१०- रघुराम राजनच्या जागी अरुंधती भट्टाचार्य ? RBIच्या पहिल्या महिला गव्हर्नर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- पानसरे हत्येचा तपास सीबीआयकडे, मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल 
१२- कारशेडची जागा बळकावणाऱ्या शिवसेनेची दुटप्पी भूमिका : विरोधक 
१३- काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचं बंड 15 दिवसात थंड 
१४- सरकारी नोकरीची सुवर्ण संधी, तलाठी, लिपिक पदांसाठी मोठी भरती 
१५- औरंगाबाद; नवविवाहितेला सासरच्यांनी लोटले देहविक्री व्यवसायात
१६- बिहारमध्ये मुसळधार; विजा पडून ७० मृत्युमुखी 
१७- बेळगाव; महापालिकेच्या इमारतींत सोलारचा उजेड 
१८- ओडिशामध्ये प्रश्‍न सोडविण्यासाठी रेडिओची सेवा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- मुंबईत मालवणीमध्ये आजी आणि दोन नातवंडांची हत्या 
२०- मुंबईच्या सुमद्रात 66 महिने अडकलेल्या घानाच्या चौघांची सुटका 
२१- दुष्काळ ते पूर... लातुरातील औराद शहाजानीत पावसाची बॅटिंग 
२२- अलाहाबाद; कचरागाडीखाली चिरडून दुचाकीस्वार दाम्पत्याचा जागीच मृत्यू 
२३- दिल्ली; डॉक्टरांचा निष्काळजीपणा, उजव्या पायाला दुखापत, डाव्याची सर्जरी 
२४- कानपूर; सेल्फीचा मोह अंगलट, गंगेत बुडून 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू 
२५- सांगली; भटक्या कुत्र्याला वाचवताना कार अपघात, एकाचा मृत्यू 
२६- म्हैसूर; धक्कादायक, युवकाला भोसकण्याचा प्रत्यक्षदर्शींनी काढला व्हिडीओ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- मेरी कोमला रिओ ऑलिम्पिकची वाईल्ड कार्ड एन्ट्री नाहीच 
२८- भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची घोषणा 
२९- जुलैमध्ये सरकारी बँका ११ दिवस बंद राहणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचं बंड 15 दिवसात थंड

काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचं बंड 15 दिवसात थंड !
मुंबई/नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांचं बंड अखेर थंड झालं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर कामत यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. इतकंच नाही तर आपण उद्यापासून पुन्हा कामाला सुरुवात करणार असल्याचं कामत यांनी जाहीर केलं.

कामत यांनी 15 दिवसांपूर्वीच राजीनामा देत, राजकारणातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना, कामत यांनी संन्यास घेतल्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.

राजीनामा दिला तेव्हा गुरुदास कामत यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. त्यामध्ये ’10 दिवसांपूर्वी मी सोनिया गांधींना भेटून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्र पाठवून निवृत्तीबद्दल माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. त्यानंतर मी काँग्रेस आणि राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं कामत यांनी दिलेल्या निवदेनात म्हटलं होतं.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

पानसरे हत्येचा तपास सीबीआयकडे, मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल

पानसरे हत्येचा तपास सीबीआयकडे, मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासापाठोपाठ कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपासही आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. पानसरे कुटुंबीयांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी पानसरे कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीला आज मुख्यमंत्र्यांनी होकार दर्शवला. राज्याच्या मुख्य सचिवांनी यासंदर्भात पानसरे परिवाराला पत्र लिहीलं आहे.

दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार आपलं प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. त्यानंतर या तपासाची सूत्रं अधिकृतपणे सीबीआयकडे जातील. त्यामुळे दाभोलकरांपाठोपाठ पानसरेंच्या हत्येचा तपासही सीबीआय कसा करतं याकडे सर्वांचं लक्ष असेल.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

कारशेडची जागा बळकावणाऱ्या शिवसेनेची दुटप्पी भूमिका : विरोधक

कारशेडची जागा बळकावणाऱ्या शिवसेनेची दुटप्पी भूमिका : विरोधक
मुंबईमेट्रो-3 च्या कारशेडला मुंबईच्या आरे कॉलनीत जागा देण्यासाठी विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. कारण मेट्रोसाठी जागा देण्यास विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांवरच आता आरे कॉलनीतील जमीन हडपल्याचा आरोप होत आहे.

गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी 20 एकर जमीनीवर अवैध ताबा मिळवून व्यायामशाळा उभारल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. या प्रकरणी वायकरांनी राजीनामा देण्याची मागणीही निरुपम यांनी केली आहे.

स्थानिक मराठी माणसांना मुंबईबाहेर काढण्याचा डाव असल्याची आवई उठवत शिवसेनेने या कारशेडला जागा देण्यासाठी विरोध केला होता. मात्र त्याच जागेत शिवसेनेचे मंत्री जागेचा अवैधपणे जागेवर ताबा मिळवून व्यायामशाळा कशी उभारतात असं विचारत विरोधकांनी वायकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

मुंबईत मालवणीमध्ये आजी आणि दोन नातवंडांची हत्या

मुंबईत मालवणीमध्ये आजी आणि दोन नातवंडांची हत्या
मुंबई : मुंबईतल्या मालाडजवळ मालवणी भागात तिहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. एकाच परिवारात राहणाऱ्या तिघांची हत्या करण्यात आली आहे.

न्यू कलेक्टर कॉलनीत प्लॉट नंबर 23 वर रुम नंबर 92 मध्ये राहणाऱ्या शॉ कुटुंबीयांमध्ये तिहेरी हत्याकांड घडलं. मृतांमध्ये आजी आणि तिच्या दोन नातवंडांचा समावेश आहे. 47 वर्षीय बबली शॉ असं महिलेचं नाव असून 13 वर्षांचा आर्यन इस्माईल शेख आणि 8 वर्षांची सानिया इस्माईल शेख यांची हत्या झाली.

अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण चाकूने वार करुन तिघांची हत्या केली आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

मेरी कोमला रिओ ऑलिम्पिकची वाईल्ड कार्ड एन्ट्री नाहीच

मेरी कोमला रिओ ऑलिम्पिकची वाईल्ड कार्ड एन्ट्री नाहीच
मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं बॉक्सर मेरी कोमचं स्वप्न भंगलं आहे. ऑलिम्पिकसाठी मेरी कोमला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने नकार दिला आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये मेरी कोमला अपेक्षित कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे मेरी कोमची संधी नाकारल्याचं म्हटलं जात आहे.
खरं तर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपनंतरच मेरीच्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या आशा मावळल्या होत्या. मात्र मागील ऑलिम्पिकमधली कामगिरी पाहता असोसिएशनने मेरी कोमसाठी एका समितीची स्थापना केली होती. परंतु या समितीनेही मेरीला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यास नकार दिलाय.

महत्त्वाचं म्हणजे सुपरमॉम मेरीने हार मानली नसून निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. ‘मला समितीने याची कल्पना दिली होती. हा निर्णय निराशाजनक असला, तरी यावर माझं नियंत्रण नव्हतं. मी जोपर्यंत फीट आहे, असं मला वाटतं, तोपर्यंत मी खेळत राहणार’ असं मेरीने ठामपणे सांगितलं आहे.

2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरीने कांस्यपदकाची कमाई केली होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यावर आधारित, प्रियंका चोप्राची मुख्य भूमिका असलेला मेरी कोम हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

मुंबईच्या सुमद्रात 66 महिने अडकलेल्या घानाच्या चौघांची सुटका

मुंबईच्या सुमद्रात 66 महिने अडकलेल्या घानाच्या चौघांची सुटका
मुंबई : मुंबईतल्या समुद्रापासून अवघ्या 2 नॉटीकल माईल अंतरावर असलेल्या जहाजातून घाना देशाच्या चार नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चारही खलाशी या जहाजात गेली साडेपाच वर्ष अडकून पडले होते.

2011 साली मॅग्नम व्ही नावाचं जहाज तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतल्या बॅलार्ड पिअर परिसरात अडकलं होतं. यावेळी जहाजात असलेल्या चारही नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. त्यातच बिघाडामुळे जहाजातला वीजपुरवठा बंद झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ आणखी वाढ झाली. मुंबईतल्या समुद्रापासून अवघ्या 2 नॉटीकल माईल म्हणजे साधारण 3.7 किमी अंतरावर हे जहाज एकाच ठिकाणी बंद पडलं होतं.

अशा खडतर परिस्थितीतही त्यांनी जहाज सोडलं नाही. ज्या कंपनीचं हे जहाज होतं त्यांच्याकडून साडेपाच वर्षात कोणतीही मदत मिळाली नसतानाही आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी हे चौघे जण अत्यंत कमी अन्नसाठ्यावर एकाच जहाजात 66 महिने अडकून होते.

अखेर आपल्या सुटकेसाठी त्यांनी एका संस्थेची मदत घेऊन मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर या घानाच्या नागरिकांची सुटका करुन त्यांना रात्री विमानाने मायदेशी पाठवण्यात आलं.

गेले 66 महिने मुंबईच्या किनाऱ्यावर एक जहाज अडकून राहतं आणि याची सुरक्षायंत्रणांना काहीही माहिती लागत नाही, हा प्रकार खरंच धक्कादायक मानायला लागेल.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

दुष्काळ ते पूर... लातुरातील औराद शहाजानीत पावसाची बॅटिंग

दुष्काळ ते पूर... लातुरातील औराद शहाजानीत पावसाची बॅटिंग
पावसामुळे औराद शहाजानी गावात पुरस्थिती निर्माण झाली आहे.
लातूर : ज्या लातूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती, त्याच लातूरला आता  जोरदार पावसानं झोडपलं आहे. पावसामुळे बुधवारी औराद शहाजानी गावात पूरस्थिती निर्माण झाली होती.

काल दुपारपासून संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली. औसा, उदगीर, अहमदपूर, चाकूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. औराद शहाजानीत 90 मिनिटात 94 मिमी पावसाची नोंद झाली.

जोरदार पावसामुळे बसस्थानकातही पाणी शिरलं होतं. तसेच बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी गेलं.  तेरणा नदीच्या खोलीकरणाचं काम चार किलोमीटर झालं असून ही नदीसुद्धा दुथडी भरुन वाहत आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

नौदलाच्या जवानांनी सर केलं सतोपंथ हिमशिखर

नौदलाच्या जवानांनी सर केलं सतोपंथ हिमशिखर!
नवी दिल्ली: नौदलाच्या जवानांनी  पहिल्याच प्रयत्नात हिमालयातील सर्वात उंच असणारं हिमशिखर सतोपंथ (7075 मी.) आणि यासोबत आणखी एक शिखर सर करुन मोठ्या डौलानं भारताचा तिरंगा फडकवला.

हे सर्व जवान लेफ्टनंट कमांडर विनीत दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली 23 मे रोजी मुंबईहून उत्तरकाशीमधील नेहरु गिर्यारोहण संस्थेमध्ये जाण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर हे बाराही जवान दोन जूनला बेस कॅम्पला पोहचले. त्यानंतर तिथून त्यांनी आपलं सामान 4950 मी. उंच अॅडव्हान्स बेस कॅम्पवर पोहचवलं. त्यानंतर त्यांनी हिमालयातील सर्वात उंच ठिकाण गाठण्याचा प्रयत्न सुरु केला. या कॅम्पचे प्रमुख लेफ्टनंट कमांडर विनीत दोषी यांच्यासह या जवानांनी 16 जूनला सतोपंथ शिखर गाठलं. शिखर गाठताच त्यांनी तिरंगा आणि नौदलाचा ध्वज फडकवला.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

कचरागाडीखाली चिरडून दुचाकीस्वार दाम्पत्याचा जागीच मृत्यू

कचरागाडीखाली चिरडून दुचाकीस्वार दाम्पत्याचा जागीच मृत्यू
अलाहबाद : उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात ईदच्या खरेदीसाठी निघालेल्या दुचाकीस्वार पती-पत्नीला एका टेम्पोने चिरडलं. या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या कचरा उचलणाऱ्या टेम्पोने पती-पत्नीच्या दुचाकीला धडक दिल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. धडक दिल्यानंतर गाडीखाली चिरडल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर धडक देणाऱ्या कचरागाडीचा चालक गाडी रस्त्यावर सोडूनच घटनास्थळावरुन पसार झालाय.

अपघातात मृत्युमुखी पडलेले 50 वर्षीय रशिद अन्सारी अकाऊण्टंट जनरलच्या कार्यालयात अधिकारी होते. ऑफिसमधून घरी आल्यानंतर ईदच्या खरेदीसाठी नसीम बानोसह स्कूटीवरुन निघाले. घरापासून जवळच सुलेम सराय परिसरात गर्दीने गजबलेल्या रस्त्यावरच हा अपघात घडला.

या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन कचरागाडीची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा चालक आणि त्याच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल केलाय. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

डॉक्टरांचा निष्काळजीपणा, उजव्या पायाला दुखापत, डाव्याची सर्जरी

डॉक्टरांचा निष्काळजीपणा, उजव्या पायाला दुखापत, डाव्याची सर्जरी
नवी दिल्ली : डॉक्टरांचा निष्काळजीपणा काहीवेळा रुग्णाच्या जीवाशी खेळ करु शकतो, याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. दिल्लीच्या एका खाजगी रुग्णालयात 24 वर्षीय तरुणाच्या चुकीच्या पायावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्याचं समोर आलं आहे.

दिल्लीच्या अशोक विहार परिसरात राहणाऱ्या रवी राय या तरुणाच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. मात्र रुग्णालयाने चक्क त्याच्या डाव्या पायाची शस्त्रक्रिया केली. रविवारी पायऱ्यांवरुन घसरल्याने त्याचा उजवा पाय प्रचंड दुखत होता. त्याला तात्काळ शालिमार बागेतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा सीटी स्कॅन आणि एक्स रे काढल्यानंतर रवीला फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

रवीच्या उजव्या पायाच्या घोट्यात फ्रॅक्चर असून घोट्याला आधार देण्यासाठी पिन टाकाव्या लागतील. म्हणून रवीची तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं रवीचे पिता रामकरण राय यांनी म्हटलं आहे.

‘डॉक्टरांवर विश्वास ठेवत आम्ही तात्काळ सर्जरीसाठी तयार झालो. शस्त्रक्रियेनंतर जेव्हा रवीला शुद्ध आली, तेव्हा त्याच्या उजव्या नव्हे डाव्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचं आम्हाला समजलं. दुखापतग्रस्त उजव्या पायाऐवजी सुस्थितीतील डाव्या पायावर सर्जरी केल्याचं समजताच आम्हाला धक्का बसला’ अशी प्रतिक्रिया रवीच्या वडिलांनी दिली आहे. रवीला आता दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

राय यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. न्याय मिळवण्यासाठी त्यांनी मेडिकल काऊन्सिल आणि डीएमएकडेही धाव घेतली आहे. चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया करणं ही वैद्यकीय निष्काळजीपणाची परिसीमा आहे, असं रवीचे पालक म्हणतात.

दरम्यान, रुग्णाची सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्यक्रमावर असून या प्रकरणी आम्ही तातडीने लक्ष घालू. गरज वाटल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही रुग्णालय प्रशासनाने दिलं आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

अँकरचा इंग्रजीत प्रश्न, सरनचं हिंदीत उत्तर, मनदीप ट्रान्सलेटर

अँकरचा इंग्रजीत प्रश्न, सरनचं हिंदीत उत्तर, मनदीप ट्रान्सलेटर
हरारे : धोनी ब्रिगेडच्या यंग इंडियाने तिसरा टी ट्वेण्टी सामना 3 धावांनी जिंकत, मालिकाही खिशात टाकली. या मालिकेत नवखा गोलंदाज बरिंदर सरन चमकला. सरनने तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताकडून सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला मालिकावीराचा किताब देण्यात आला.

मात्र प्रेझेंटेशन दरम्यान त्याला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यात आल्याने सरनची गोची झाली. सरन मूळचा हरियाणाचा. मात्र त्याचं इंग्रजी कच्चं आहे. त्यामुळे अँकरने इंग्रजीत विचारलेला प्रश्न न समजल्यामुळे सरनची गोची झाली.

सरनने मग कर्णधार धोनीकडे पाहिलं. त्यानंतर तिथे जवळच असलेल्या मनदीप सिंहने लगेचच सरनकडे धाव घेत, ट्रान्सलेटरची भूमिका बजावली. सरनला विचारलेल्या इंग्रजी प्रश्नाचं भाषांतर मनदीप हिंदीत करुन सरनला सांगायचा. मग सरनचं हिंदीतील उत्तर मनदीप इंग्रजीत ट्रान्सलेट करायचा.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

सेल्फीचा मोह अंगलट, गंगेत बुडून 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू

सेल्फीचा मोह अंगलट, गंगेत बुडून 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू
कानपूर : सेल्फी घेणं वाईट नसलं, तरी विचित्र सेल्फी घेण्याच्या नादात दाखवलेला निष्काळजीपणा कसा जीवावर बेतू शकतो, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. गंगा नदीत सेल्फी घेण्याच्या मोहात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

कानपुरात गंगा नदीत मजामस्ती करण्यासाठी सहा विद्यार्थी पाण्यात उतरले. याचवेळी त्यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या नादात एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलेले इतर पाचजणही बुडाले. सहा जणांना बुडताना पाहून किनाऱ्यावर बसलेला युवक मकसूद अहमद त्यांच्या मदतीला गेला, मात्र तोही बुडाला. पोलिसांनी आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढले असून आणखी एकाचा
शोध सुरु आहे.

कानपुरात विनोबानगरमध्ये राहणारा सत्यम गुप्ता हा एलएलबीचा विद्यार्थी होता. सकाळपासून पडणारा पाऊस आणि आल्हाददायी वातावरणामुळे त्यांना गंगेत डुंबण्याचा मोह झाला. त्यामुळे भाऊ शिवमसह, शेजारचे रोहित, गोलू, संदीप गुप्ता आणि सचिन गुप्ता या मित्रांसह त्याने नदीवर जाण्याचा प्लॅन आखला.

सहा जणांच्या मृत्यूसाठी स्थानिकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. घटनेची माहिती दिल्यानंतर दोन तासांनी पोलिस घटनास्थळी पोहचल्यामुळे युवक बुडाल्याचं म्हटलं जात आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

'राऊत साहेब, तलाक केव्हा घेताय?' भाजपाच्या पाक्षिकातून सेनेवर शरसंधान

'राऊत साहेब, तलाक केव्हा घेताय?' भाजपाच्या पाक्षिकातून सेनेवर शरसंधान
मुंबई: शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवाच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडण्याची इच्छा नाही, असं वक्तव्य केलं असलं तरी भाजपनं सेनेला काडीमोड घेण्याचा सल्ला दिला आहे.

मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘राऊत साहेब तलाक केव्हा घेताय’, असं शिर्षक देऊन भाजप सरकारचा निजामांचा बाप असा उल्लेख करणाऱ्या राऊतांवर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी टीका केली आहे.

manogat sena

तसंच या पाक्षिकात उद्धव ठाकरेंची तुलना ‘शोले’ सिनेमातल्या जेलरच्या भूमिका साकारणाऱ्या ‘असरानी’ यांच्याशी करून खिल्ली उडवली आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

नोकरीची संधी, बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा

नोकरीची संधी, बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा
मुंबई बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये सहाय्यक फौजदार (एएसआय)(152) आणि हेड कॉन्स्टेबल (एचसी) (470) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  या दोन्ही पदांसाठी मिळून तब्बल 622 जागा भरण्यात येणार आहेत.

याबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारची अधिकृत न्यूजवेबसाईट महान्यूजवर प्रकाशित करण्यात आली आहे.

अर्ज करण्याचा कालावधी 16 जून ते 15 जुलै 2016 असा आहे. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in आणिhttp://bsf.nic.in/en/recruitment.html या वेबसाईटवर संपर्क साधावा.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी, तलाठी, लिपिक पदांसाठी मोठी भरती

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी, तलाठी, लिपिक पदांसाठी मोठी भरती
मुंबई सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. लिपिक, टंकलेखक, तलाठी या पदांसाठी मोठी भरती होणार असून, त्यासाठीच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे.

किती पदांसाठी भरती?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी भरती आहे, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी भरती आहे. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत आयोजित बैठकीत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी याबाबत माहिती दिली.

परीक्षा कधी?

लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी रविवार 4 सप्टेंबर रोजी, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी रविवार 11 सप्टेंबर 2016  रोजी  परीक्षा घेण्यात येणार आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

माझ्यावर कितीही दावे केले तरी, खडसेंना कोर्टात भ्रष्ट सिद्ध करेन: दमानिया

माझ्यावर कितीही दावे केले तरी, खडसेंना कोर्टात भ्रष्ट सिद्ध करेन: दमानिया
जळगाव: ‘एकनाथ खडसेंनी माझ्यावरही कितीही अब्रुनुकसानीचे दावे केले, तरी त्यांना कोर्टात भ्रष्ट असल्याचं सिद्ध करेन’, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

खडसेंची आणखी 23 प्रकरणं आपल्याकडे आली असून त्या प्रकरणातील माहिती आणि कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न सुरु असून ही सर्व कागदपत्र कोर्टात सादर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्या काल जळगावात बोलत होत्या.

नुकतीच पुण्याच्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडसेंना क्लीन चिट दिली आहे. मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे असतात एका पक्षाचे नसतात. यामुळे मुख्यमंत्र्यांनी समतोल भूमिका घ्यायला हवी होती. मात्र, ती त्यांनी न घेतल्यानं आता त्यांच्या कोणत्याही चौकशीवर आपला विश्वास राहिला नसल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. खडसेंविरोधात आता एकत्रितरित्या हायकोर्टात जाणार असून एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

भटक्या कुत्र्याला वाचवताना कार अपघात, एकाचा मृत्यू

भटक्या कुत्र्याला वाचवताना कार अपघात, एकाचा मृत्यू
सांगली : सांगलीत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कुत्र्याला वाचवण्याच्या नादात एकाला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. महावितरणचे अधिकारी दीपक जाधव यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अपघातग्रस्त दीपक जाधव स्वतःच्या कारने बाहेर चालले होते. यावेळी रस्त्यावर टोळीनं फिरणाऱ्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्यांनी गाडी वळवली आणि कुत्र्याला वाचवताना दीपक जाधव यांची कार वीजेच्या खांबाला धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की त्यातच जाधव यांचा मृत्यू झाला.

एकीकडे सांगलीत भटक्या कुत्र्यांमुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी थेट घरात घुसून लोकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्याने पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांना मारण्याची परवानगी दिली जावी का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

..म्हणून चीनमधील बँक कर्मचाऱ्यांना मॅनेजरनं झोडपलं

...म्हणून चीनमधील बँक कर्मचाऱ्यांना मॅनेजरनं झोडपलं!
बीजिंग: नोकरी करताना चांगलं काम केलं नाही तर तुम्हाला बऱ्याचदा बॉसची नाराजी सहन करावी लागते. पण चीनमध्ये बँक कर्माचाऱ्यांना त्यांच्या खराब कामगिरीबद्दल अशी काही शिक्षा देण्यात आली आहे की, ज्यानं चीनमध्ये बरंच वादळ उठलं आहे.


चीनच्या एका बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग सेशन आयोजित केलं होतं. मात्र, ट्रेनिंगनंतर ‘टीम बिल्डिंग वर्कशॉप’मध्ये खराब परफॉर्मन्स देणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना चक्क पार्श्वभागावर फटके देण्यात आले.

तब्बल 8 कर्माचाऱ्यांना स्टेजवर बोलवून सगळ्यांसमोर अशी मारहाण करण्यात आली आहे. या आठ कर्मचाऱ्यांमध्ये 4 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश होता.

मात्र, हा सर्व प्रकार सुरु असतानाच एका कर्मचाऱ्यानं याचं शुटींग केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. आतापर्यंत 3 लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

बँक मॅनेजरनं चक्क पट्टीने या आठही जणांना झोडपून काढलं आहे. यावेळी हा मार असह्य झाल्यानं एक महिला कर्मचारी जवळजवळ कोलमडलीच मात्र, निर्दयी मॅनेजरला याचा काहीही फरक पडला नाही. त्यानं मारणं सुरुच ठेवलं.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या बँकेवर बरीच टीका करण्यात आली. अशाप्रकारे मारहाण केल्याप्रकरणी मॅनेजरला निलंबित करण्यात आलं आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

काँग्रेस नेते गुरूदास कामतांचा राजकारणातील निवृत्तीचा निर्णय मागे


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २३ - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते असलेल्या कामत यांनी दोन आठवड्यांपूर्वी वैयक्तिक कारण देत कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती.
    •  
    मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच, त्यांनी अचानक राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला पण कामत त्यांच्या निर्णयावर ठाम होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली व अखेर आज त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला असून ते  गुजरात, राजस्थान आदी राज्यांच्या प्रभारीपदी कायम राहणार आहेत. 
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

मुंबई : मालवणीमध्ये तिहेरी हत्याकांड, आजीसह नातवंडांची निर्घृण हत्या


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २३ - मुंबईतील मालाड येथील मालवणीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे हत्याकांड घडले असून आजीसह दोन नातवंडाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. मालवणीतील न्यू कलेक्टर कॉलनीतील गेट. क्रमांक.६, प्लॉट नंबर २३ येथील रूम नंबरमध्ये ९२ येथे हे हत्यांकाड घडले असून त्यामागचे कारण अजून समजू शकलेले नाही. बाबली शॉ (४७), आर्यन इस्माइल शेख (१३) आणि सायना इस्माल शेख (८) अशी मृतांची नावे आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
    हे सर्वजण मूळचे बंगळुरूचे असून  बाबली यांच्या मुलीने मुस्लिम तरूणाशी प्रेमविवाह केला होता. मात्र त्या तरुणाने दुसरा विवाह केल्याने बाबली यांची मुलगी, आर्यन व सायना या तिच्या दोन मुलांसह पाच वर्षापुर्वी  माहेरी परत आली. वडील असून त्यांच्याविना वाढणा-या या मुलांचे दुर्दैव तिथेच संपले नाही, तीन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचेही आजाराने निधन झाले व तेव्हापासून त्यांची आजीच त्यांचा सांभाळ करत होती. मात्र काल रात्री अज्ञात व्यक्तीने या दोन्ही मुलांसह त्यांच्या आजीचाही खून केला. 
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

आज होणार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची घोषणा


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. २३ - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकापदासाठी सुरु असलेला शोध लवकरच संपणार आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची आज संध्याकाळी घोषणा होईल असे एएनआयने बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. अनुराग ठाकूर सध्या धरमशाळा येथे आहेत. 
    सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण या सल्लागार समितीकडे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भारतीय क्रिकेट संघाचे माजी संचालक रवी शास्त्री आणि माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदासाठी मुलाखत दिली होती. 
    शास्त्रींच्या तुलनेत अनिल कुंबळेचे पारडे जड आहे. मागच्यावर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेपासून भारतीय संघ प्रशिक्षकाशिवाय खेळत आहे. या दरम्यान रवी शास्त्री यांच्याकडे संघाच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते संघाला मार्गदर्शन करत होते. टी-२० वर्ल्डकपनंतर त्यांचा करार संपला आहे. एक जूनला बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी जाहीरात दिली होता. प्रशिक्षकपदासाठी एकूण ५७ अर्ज आले होते. 
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

धक्कादायक, युवकाला भोसकण्याचा प्रत्यक्षदर्शींनी काढला व्हिडीओ


  • ऑनलाइन लोकमत 
    म्हैसूर, दि. २३ - अपघात किंवा हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्या घटनेचे कॅमे-यात लाईव्ह चित्रीकरण करण्याची वाईट प्रवृत्ती दिवसेंदिवस समाजामध्ये वाढत चालली आहे. कर्नाटकातील हसन शहरात एका युवकावर वार होत असताना त्याची सुटका करण्याऐवजी प्रत्यशदर्शीं या घटनेचे कॅमे-यात चित्रीकरण करण्यात मग्न होते. 
    हसन शहरातील बस स्टँण्डवर युवकांच्या दोन गटांमध्ये मंगळवारी हाणामारी झाली. यावेळी धारदार शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला. ही घटना घडली त्यावेळी शेकडो लोक बसस्थानकावर होते. पण कोणीही या युवकांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट एकाने या हल्ल्याचे कॅमे-यात लाईव्ह चित्रीकरण केले. 
    हसन पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. जनतेच्या या प्रतिक्रियेने पोलिसांना धक्का बसला आहे. कारण वाद सोडवणे तर दूर पण कोणी साधा पोलिसांना फोनही केला नाही. मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हसन येथील परिवहन सेवेच्या बसस्टँण्डवर सुनील आणि धनुष या दोन तरुणांमध्ये एका मुलीवरुन वाद झाला. 
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

नवविवाहितेला सासरच्यांनी लोटले देहविक्री व्यवसायात


  • नवरा, सासू, सासरा अटकेत: हातावरची मेहंदी सुखण्याच्या आतच ठेवायला लावले अनेकांशी शरीर संबध
    औरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात लग्न झाले. सुखी संसाराची स्वप्न रंगवित तिने सासरी पाय ठेवला. मात्र लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसांत तिच्या स्वप्नांचा अक्षरक्ष: चुराडा झाला. हातावरची मेहंदीचा रंग उतरण्याआधीच पतीसह सासरच्या मंडळींनीच या नवविवाहितेला चक्क देहविक्री करण्यास भाग पाडले. मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगरात घडलेला धक्कादायक प्रकाराला तीन महिने नरकयातना भोगलेल्या पीडितेनेच काल कसेबसे मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठत वाचा फोडली.
    तिला देहविक्री करण्यास भाग पडणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून नवरा, सासू व सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
    घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हर्सूल परिसरातील रविवासी असलेल्या संगीता (वय १८, नाव बदलले आहे) हिचा विवाह तीन महिन्यांपूर्वी अंबिकानगरातील सुनिल (नाव बदलले आहे) याच्यासोबत झाला. संगीताच्या घरच्यांनी मोठ्या धुमधडाक्यात तिचा विवाह लावून दिला. लग्नानंतर भविष्यातील सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास संगीताने सुरूवात केली. लग्नानंतर दोन आठवडे सासरच्या मंडळींनी तिला नववधूसारखे गुण्यागोविंदाने नांदविले.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

जुलैमध्ये सरकारी बँका ११ दिवस बंद राहणार


  • नागपूर : जुलै महिन्यात सरकारी बँका तब्बल ११ दिवस बंद राहणार असून याचा ग्राहकांना फटका बसणार आहे. जुलैमध्ये पाच
    रविवार, दुसरा व चौथा शनिवार आणि ६ रोजी रमजान ईदमुळे बँकांना सुटी असेल तर युनियन आॅफ युनायटेड फोरम आॅफ बँकेने २९ जुलैला संप पुकारल्यामुळे या दिवशी सर्वच सरकारी बँकांचे कामकाज ठप्प राहणार आहे.
    याशिवाय भारतीय स्टेट बँकेच्या सहयोगी बँका, स्टेट बँक आॅफ बिकानेर व जयपूर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, स्टेट बँक आॅफ पतियाला, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँका विलीन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात स्टेट बँक आॅफ बिकानेर व जयपूरच्या कर्मचाऱ्यांनी १२ आणि २८ जुलैला देशव्यापी संप पुकारला आहे. या दोन दिवसांत अन्य सरकारी बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार नाहीत, पण २९ जुलैला होणाऱ्या युनायटेड फोरमच्या संपात सर्व सरकारी बँकांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

‘स्थानिक स्वराज्य’मध्ये तरुणांना संधी देणार


  • मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना अधिकाधिक संधी राष्ट्रवादी काँग्रेस देणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले. या निवडणुकांमध्ये जवळपास ७० टक्के उमेदवार हे तिशीच्या आतील असावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
    महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादीच्यावतीने सर्व जिल्ह्यांचे प्रभारी, राष्ट्रीय प्रतिनिधी, जिल्हा निरीक्षक, सर्व फ्रंटल प्रमुख व जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष यांची बैठक बुधवारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. प्रफुल पटेल, अरुण गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. फौजिया खान व अन्य मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, की तरुणांना संधी दिल्यास राष्ट्रवादी हा पक्ष तरुणांचा पक्ष आहे, असा संदेश सर्वत्र जाईल. त्यामुळे आतापासूनच नवे चेहरे शोधण्यास सुरुवात करा. तरुणांची नवी फळी उभी करा, त्यातून पक्षाला नक्कीच उभारी मिळेल, असे पवार यांनी सांगितले. 
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

आता स्पेक्ट्रमचा होणार महालिलाव


  • नवी दिल्ली : मोबाइल आणि इंटरनेट सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध बॅण्डमधील लघुलहरी मार्गिकांचा (स्पेक्ट्रम)च्या आगामी महालिलावासाठी राखीव किमतीसह अन्य प्रक्रियात्मक बाबींना केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.
    मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्र परिषदेत या निर्णयाची औपचारिक माहिती देण्यात आली नाही. मात्र स्पेक्ट्रम लिलावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.
    विक्रीला काढला जाणारा सर्व स्पेक्ट्रम विकला गेला, तर त्यातून सरकारला ५.६६ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळेल, अशी अपेक्षा आहे. देशातील टेलीकॉम सेवा उद्योगाची वर्ष २०१४-१५मधील एकूण उलाढाल २.५४ लाख कोटी रुपयांची होती. म्हणजेच या महालिलावातून सरकारला याहून दुप्पट महसूल मिळू शकेल.
    सूत्रांनुसार सध्या ठरलेल्या ढोबळ वेळापत्रकानुसार येत्या १ सप्टेंबरपासून स्पेक्ट्रमसाठी बोली सुरू होतील. त्याआधी इच्छुकांकडून अर्ज मागविणारी जाहिरात १ जुलैला प्रसिद्ध करून अर्जदारांची बोलीपूर्वीची बैठक ६ जुलै रोजी घेतली जाणे अपेक्षित आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

बिहारमध्ये मुसळधार; विजा पडून ७० मृत्युमुखी


  • एस.पी. सिन्हा,  पाटणा
    बिहारमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून आता ७0 लोक मृत्युमुखी पडले, तर २४ जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आपत्कालीन बैठक घेतली आणि बळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
    राज्यात मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाने सर्वसामान्यांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी पावसाने घातलेल्या थैमानाने अनेक घरांवर दु:खाची कुऱ्हाडच कोसळली. आपत्ती व्यवस्थापनमंत्री चंद्रशेखर यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, आतापर्यत ५६-५७ लोक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

एटीएमच्या शुल्काने बँकेचा भरतोय खजिना


  • इंदूर : मोफत एटीएम वापराची मर्यादा संपल्यानंतर खातेधारकांकडून वसूल केल्या जात असलेल्या शुल्कातून स्टेट बँक आॅफ इंडिया या सर्वांत मोठ्या बँकेची कमाई वाढत चालली आहे.
    २0१५-१६ या वित्तीय वर्षात एटीएम वापरावरील शुल्काने स्टेट बँकेने ३0१.४४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला. तो त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा ४७.५ टक्क्यांनी जास्त आहे. मध्य प्रदेशातील नीमच येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहितीच्या अधिकाराखाली याबाबत माहिती मागवली होती. त्यात त्यांना स्टेट बँकेतर्फे ही माहिती देण्यात आली. याबाबत स्टेट बँकेने
    २ जून रोजी गौड यांना दिलेल्या उत्तरात स्टेट बँकेने म्हटले आहे की, एटीएम मोफत वापरण्याची मर्यादा संपल्यावर त्याचा वापर केल्याबद्दल २0१४-१५ या वित्तीय वर्षात बँकेला २१0.४७ कोटी रुपयांची कमाई झाली होती.
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

रघुराम राजनच्या जागी अरुंधती भट्टाचार्य ? RBIच्या पहिल्या महिला गव्हर्नर

  • F
  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २३ : सध्याची तीन वर्षांची कारकिर्द सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्त होण्यात आपल्याला स्वारस्य नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांचे उत्तराधकारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर नव्या गव्हर्नरपदासाठी डझनभर नावे चर्चेत आली. त्यात डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल, कॅगचे माजी प्रमुख विनोद राय आणि एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची नावे आघाडीवर होती. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांचे नाव निश्चित झाले असल्याचे समजते. त्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदी नियुक्ती झाल्यास त्या पहिला महिला गव्हर्नर ठरतील.
    भारतातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकर म्हणून भट्टाचार्य प्रख्यात असून २०१५ आणि २०१६ अशा सलग दोन्ही वर्षी फोब्रर्जच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत भट्टाचार्य यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. राजन यांनी २०१३ मध्ये २३ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. राजन नंतर भारताच्या २४ व्या गव्हर्नर म्हणून अरुंधती भट्टाचार्य यांची निवड निश्चित मानली जात आहे. 
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++
महापालिकेच्या इमारतींत सोलारचा उजेड

स्मार्ट सिटीअंतर्गत योजना : हेस्कॉम, इतर सरकारी कार्यालयांवरही लवकरच अंमलबजावणी; 30 मेगावॉट विजेचे उद्दिष्ट


बेळगाव - महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह महापालिकेच्या, हेस्कॉमच्या आणि सरकारी सर्व इमारती सौरऊर्जेची निर्मिती करणार आहेत. या माध्यमातून 30 मेगावॉट सौरऊर्जेचे उत्पादन केले जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कंत्राटदार प्रथम इंटिग्रेटेड एनर्जी सोल्युशन्स कंपनीकडून मोजमाप सुरू झाले आहे. प्रकल्पाची सुरवात जुलै किंवा ऑगस्टमध्ये होणार आहे.
सौरऊर्जेबाबत इन्फ्रास्ट्रक्‍चर फॉर पॉवर डेव्हलपमेंट स्कीम (आयपीडीएस)नुसार प्रथम इंटिग्रेटेड एनर्जी सोल्युशन्सवर या योजनेचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे. या कंपनीचे अधिकारी श्रीनिवासमूर्ती बेळगावात आले आहेत. महापालिका आयुक्त जी. प्रभू यांची भेट घेऊन त्यांनी महापालिकेच्या इमारतींच्या छताचे मोजमाप करण्याची परवानगी घेतली आहे. महापालिकेचे सहायक कार्यकारी अभियंता सुब्बाराव यांच्याकडे आयुक्तांनी सौरऊर्जा प्रकल्पाची जबाबदारी सोपविली आहे.
महापालिकेची मुख्य इमारत सुभाषनगर येथे आहे. याशिवाय महापालिकेची उत्तर व दक्षिण विभागात प्रत्येकी दोन विभागीय कार्यालये आहेत. याशिवाय गोवावेस व मध्यवर्ती बस स्थानकाजवळील व्यापारी संकुल, दवाखाने, समुदाय भवन आदी इमारतीही आहेत. या सर्व इमारतींच्या छतावर सौरऊर्जा उपकरणे बसविण्यात येणार आहेत. ही माहिती प्रथम कंपनीला देण्यात येणार आहे. सौर उपकरणे बसविण्यासाठी जो खर्च येईल तो हेस्कॉमकडून केला जाणार आहे. हेस्कॉमच्या बेळगाव शहरातील सर्व इमारतींवरही सौर उपकरणे बसविली जाणार आहेत. त्यानंतर शहरातील सर्व शासकीय इमारतींवर ही योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे दोन वर्षांत शहरातील सर्व शासकीय इमारती सौरऊर्जेचे स्रोत बनणार आहेत. ही योजना हेस्कॉमची असली तरी स्मार्ट सिटी योजनेत त्याचा समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी योजनेची सुरवात 25 जूनला होणार आहे; पण सौरऊर्जा प्रकल्पाची सुरवात जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होईल, असे महापालिकेतून सांगण्यात आले.

एक नजर - कर्नाटकात शासकीय कार्यालयांवर प्रथमच
- महापालिकेच्या सर्व इमारती
- हेस्कॉमच्या 20 इमारतींवर पॅनेल
- कंत्राटदार कंपनीकडून मोजमाप सुरू
- मोजमापानंतरच खर्चाची तरतूद
- हेस्कॉम उचलणार सर्व खर्च 
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++
ओडिशामध्ये प्रश्‍न सोडविण्यासाठी रेडिओची सेवा

कोरापुट (ओडिशा) - मनोरंजनाचे पर्याय वाढल्याने रेडिओचे महत्त्व आधुनिक काळात कमी झाले असले तरी ओडिशामधील गावांना त्याचा आजही आधार वाटत आहे. ग्रामीण विकासासाठी व ग्रामस्थांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी एफएम रेडिओचा वापर प्रभावीपणे होत आहे.

कोरापुट जिल्ह्यातील उमरी पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या छप्पर गावात डिमसा एफएम रेडिओ स्टेशन उभारण्यात आले आहे. ग्रामस्थांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी या रेडिओची स्थापना "सोवा‘ या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. "युनिसेफ‘चे भारतातील उपप्रतिनिधी (प्रकल्प) हेन्‍रीट अरहन्स यांच्या हस्ते व कोरापुटाचे जिल्हाधिकारी जया कुमार व्ही यांच्या उपस्थित या एफएम रेडिओचे उद्‌घाटन मंगळवारी (ता.21) झाले. ग्रामीण विकासाशा संबंधित विषय रेडिओच्या माध्यमातून मांडण्यावर भर देण्यात येणार आहे. अन्नधान्याचे उत्पादन, सेंद्रिय शेती, महिलांचे आरोग्य, मुलांच्या समस्या तसेच सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी याचा वापर होणार आहे, असे "सोवा‘चे चिटणीस संजित पटनाईक यांनी सांगितले. 
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++
भारतापासून पाकिस्तानला धोका-असीम बाज्वा

इस्लामाबाद - भारतापासून पाकिस्तानला धोका वाटत असल्याने आमची सर्व संरक्षण यंत्रणा भारत केंद्रीत असल्याचे पाकिस्तानचे गुप्तचर संस्थेच्या सार्वजनिक माहिती विभागाचे महासंचालक असीम बाज्वा यांनी सांगितले.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुरळीत होण्यासाठी राजकीय आणि राजनैतिक मार्गांनी अनेक प्रयत्न सुरू असले तरी काश्‍मीर या मुद्यावर सर्व प्रयत्न अडून बसतात, असे बाज्वा यांनी येथील एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखतीत म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. उर्वरित जगाने मात्र पाकिस्तानला या मुद्यावर एकटे पाडले असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले,""जगाच्या दृष्टीने पाकिस्तानने दहशतवादाविरोधात फारसे काही केलेले नाही. हे चुकीचे असून पाकिस्तानवर हा अन्याय आहे. पाकिस्तानने जागतिक शांततेसाठी अनेक प्रयत्न केले आहेत.‘‘
======================================
++++++++++++++++++++++++++++++++++++++

No comments: