Monday, 1 August 2016

नमस्कार लाईव्ह ०१-०८-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- पाकिस्तानला अणूभट्टी देऊन चीनने केले नियमाचे उल्लंघन 
२- सावधान! डिलिट केल्यानंतरही व्हॉट्सअॅप चॅट डिलिट होत नाही 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- एअर इंडियात 280 पदांसाठी भरती 
४- भाजपने स्वत:ला देशाचा मालक समजू नये, निलम गोऱ्हेंचा घणाघात 
५- मुस्लिमांच्या बदनामीसाठी एटीएसकडून अटकसत्र, अबू आझमींची टीका 
६- उरण परिसरातील पर्यटन स्थळांवर दारूबंदी 
७- आसामचा पूर आणि अहवालात फोटो बांगलादेशचा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
८- मोनोरेल भक्तीपार्क स्टेशनवर पुन्हा बंद पडली 
९- कोकण किनारपट्टीवर पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस : हवामान विभाग 
१०- आणि महिला खासदाराने डीएमके खासदाराच्या श्रीमुखात भडकावली! 
११- खडडयांमुळे महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण वाढले सातपटींनी 
१२- विदर्भातील आमदारांनी राजीनामे द्यावेत - विखे 
१३- पोलिसांसमक्ष पीडितेच्या घरावर दगडफेक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१४- कल्याण-सीएसटी लोकल रुळावरुन घसरली, वाहतूक विस्कळीत 
१५- पुण्यात रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण 
१६- मुंबईत चोरीच्या आरोपात तीन माकडं ताब्यात  
१७- प्रो कबड्डी लीग: पटना पायरेट्सला विजेतेपद, फायनलमध्ये जयपूरवर मात 
१८- लातुरात दमदार पाऊस, उद्यापासून नळाला पाणी येणार 
१९- भिवंडी इमारत दुर्घटनेत चमत्कार, ढिगाऱ्याखाली 7 महिन्यांचं बाळ सुखरुप 
२०- बुलंदशहर सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयित ताब्यात... 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२१- सख्ख्या नव्हे, चुलत भावाने केली कंदील बलोचची हत्या 
२२- लोकेश राहुलचं शानदार शतक, जमैका कसोटीवर भारताची पकड 
२३- षटकार ठोकून राहुलने इतिहास रचला 
२४- 'पसंत आहे मुलगी' निरोप घेणार, लवकरच नवी मालिका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 

8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=======================================

कल्याण-सीएसटी लोकल रुळावरुन घसरली, वाहतूक विस्कळीत


कल्याण-सीएसटी लोकल रुळावरुन घसरली, वाहतूक विस्कळीत
मुंबई : कल्याण-सीएसटी लोकल रुळावरुन घसरली आहे. कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ‘1-ए’वरुन लोकल सीएसटीच्या दिशेने निघाली असताना पत्री  पुलाजवळ रुळावरुन घसरली.

कल्याण स्थानकावरील क्रमांक 1 आणि 1-ए प्लॅटफॉर्मवरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. कल्याण स्थानकाहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरुन सोडल्या जात आहेत.

अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. डोंबिवली-कल्याण रेल्वेस्थानकांदरम्यानची वाहतूक फास्ट ट्रॅकवरुन सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत कुणीही जखमी झाला नसल्याची माहिती मिळते आहे.
=======================================

एअर इंडियात 280 पदांसाठी भरती

एअर इंडियात 280 पदांसाठी भरती
नवी दिल्ली : एअरलाईनमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिस लिमिटेडमध्ये 280 पदांसाठी भरती होणार आहे. ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी पदाच्या या जागा आहेत. एआयईएसएलने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.

पात्र उमेदवार 08 ऑगस्ट 2016 ते 15 सप्टेंबर 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. यानंतर ऑनलाईन फॉर्मची हार्डकॉपी आवश्यक कागदपत्रांसह 30 सप्टेंबरपर्यंत संबंधित पत्त्यावर पाठवता येईल.

* पदाचं नाव : ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी
* जागांची संख्‍या : 280
– जनरल : 143 जागा
– ओबीसी : 75 जागा
– एससी : 41 जागा
– एसटी : 21 जागा
* पात्रता : मान्‍यता प्राप्‍त संस्‍थेतून  BE किंवा B.Tech उत्तीर्ण
* पे स्‍केल : 25 हजार रुपये

=======================================

भाजपने स्वत:ला देशाचा मालक समजू नये, निलम गोऱ्हेंचा घणाघात

भाजपने स्वत:ला देशाचा मालक समजू नये, निलम गोऱ्हेंचा घणाघात
मुंबई भाजपने स्वत:ला देशाचा मालक समजू नये, असा घणाघात शिवसेना नेत्या निलम गोऱ्हेंनी केला आहे. वेगळ्या विदर्भावर बोलताना निलम गोऱ्हेंनी भाजपवर टीका केली.

“सरकारमधील काही प्रतिनिधी वेगळ्या विदर्भाबाबत जे वक्तव्य करत आहेत, ते सहन केले जाणार नाही. राज्यात आणि केंद्रात बहुमताचे सरकार असल्याने देशाचे विश्वस्तपदी किंवा संचालक भाजप आहे. मात्र त्यांनी स्वतःला देशाचे मालक समजू नये” अशी टीका निलम गोऱ्हेंनी भाजपवर केली.

दरम्यान, वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यासंदर्भात विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा मांडणार असून, सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करणार असल्याचे निलम गोऱ्हेंनी सांगितले.


=======================================

मोनोरेल भक्तीपार्क स्टेशनवर पुन्हा बंद पडली

मोनोरेल भक्तीपार्क स्टेशनवर पुन्हा बंद पडली
UPDATE : मोनोरेल भक्तीपार्क स्टेशनवर पुन्हा बंद पडली

मुंबई तब्बल चार तासांनंतर मोनोरेल सुरु झाली आहे. तांत्रिक बिघाड झालेल्या मोनोरेलचं दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. सकाळी 6 वाजल्यापासून तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल रखडली होती.

पहिली मोनोरेल बिघडल्याने रखडली होती. तिला काढण्यासाठी आलेली दुसरी मोनोरेलही अडकल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, अखेर दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून, मोनोरल सुरळीत झाली आहे.

रखडलेल्या मोनोरेलमध्ये प्रवशीही लटकले होते. दरम्यान, हे दृश्य पाहून काही काळ नागरिकांमधे कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं होतं.

=======================================

CCTV : पुण्यात रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण

CCTV : पुण्यात रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण
पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांना जबर मारहाण करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना संरक्षण देण्याचं आश्वासन देऊन आठवडाही उलटला नाही तेवढ्यात ही घटना घडली आहे. मृत रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. सादिक मुल्ला आणि डॉ. अभिजीत जवानजा यांना बेदम मारहाण केली आहे.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मारहाणीत दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससूनमध्येच उपचार सुरू आहेत. मारहाणीप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली.

दरम्यान गेल्या काही दिवसांत रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार वाढले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील मार्डनं उदया संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संप पुकारला आहे.

=======================================

लोकेश राहुलचं शानदार शतक, जमैका कसोटीवर भारताची पकड

लोकेश राहुलचं शानदार शतक, जमैका कसोटीवर भारताची पकड
जमैका : लोकेश राहुलच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या जमैका कसोटीवर पकड आणखी मजबूत केली आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद 358 धावांची मजल मारली असून विंडीजवर 162 धावांची आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अजिंक्य रहाणे 42 आणि रिद्धिमान साहा 17 धावांवर खेळत होते.

त्याआधी लोकेश राहुलने त्याच्या कसोटी कारकीर्दीतलं तिसरं शतकं झळकावलं. राहुलने 303 चेंडूंत 15 चौकार आणि तीन षटकारांसह 158 धावांची खेळी उभारली. तर चेतेश्वर पुजारानं 46 आणि विराट कोहलीने 44 धावांची खेळी केली.

विंडीजकडून रोस्टन चेसने दोन विकेट्स काढल्या. तर शेनॉन गॅब्रिएल आणि देवेंद्र बिशू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तत्पूर्वी जमैका कसोटीत भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 196 धावांत गुंडाळला होता.

=======================================

मुंबईत चोरीच्या आरोपात तीन माकडं ताब्यात 

मुंबईत चोरीच्या आरोपात तीन माकडं ताब्यात   

मुंबई : मुंबई लोकल आणि स्टेशनवर गोंधळ घालून पैसे चोरल्याप्रकरणी 3 माकडांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या माकडांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून लोकांना त्रास देणाऱ्या 3 महिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या महिला रेल्वेत आणि स्टेशनवरही लोकांना भीती दाखवून त्यांची लूट करत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

मुंबईतील लोकलमध्ये अपंगांच्या डब्यात जाऊन पैशांची मागणी या महिला करत होत्या. पैसे देण्यास नकार दिल्यावर माकडांना अंगावर सोडण्याची धमकीही देत होत्या. या माकडांना लोकांना घाबरवण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या माकडांना घाटकोपरच्या रेल्वे पोलिसांच्या चौकीत ठेवण्यात आले आहे. हे 3 महिलांचं टोळकं भीक मागण्यासाठी डब्यात चढत होतं आणि माकडांचा वापर करून लोकांकडून पैसे लूटत होतं. गेल्या 7 वर्षांपासून हे टोळकं सक्रीय असून याचा म्होरक्या वेगळाच असल्याचा संशय पोलिसांना आहे.

=======================================

षटकार ठोकून राहुलने इतिहास रचला!

षटकार ठोकून राहुलने इतिहास रचला!
जमैका : रोस्टन चेसच्या चेंडूवर षटकार ठोकून लोकेश राहुलने इतिहास रचला. कॅरेबियन मैदानावरील पहिल्यात कसोटीत दमदार शतक ठोकणारा लोकेश राहुल भारताचा पहिला फलंदाज बनला आहे. याआधी 1996-97 च्या दौऱ्यात पाच सामन्यांच्या मालिकेत, अजय जाडेजाने चौथ्या सामन्यात 96 धावांची खेळी रचली होती.

लोकेश राहुलच्या याच शतकी खेळीनं जमैका कसोटीवर भारतानं आपली पकड आणखी मजबूत बनवली. मुरली विजयला दुखापत झाल्यानं लोकेश राहुलला जमैका कसोटीत खेळण्याची संधी मिळाली, आणि त्यानं त्या संधीचं सोनंही केलं.

लोकेश राहुलने 303 चेंडूंत 15 चौकार आणि तीन षटकारांसह 158 धावांची खेळी उभारली. कसोटी क्रिकेटमध्ये राहुलचं हे तिसरं शतक ठरलंय. केवळ सहा सामन्यांतच राहुलच्या नावावर तीन शतकं जमा झाली आहेत. तीही तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये. राहुलने गेल्या वर्षी सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावांची खेळी केली होती. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत त्यानं 108 धावा केल्या होत्या. आता विंडीजमध्येही राहुलनं शतक ठोकलं आहे.

=======================================

'पसंत आहे मुलगी' निरोप घेणार, लवकरच नवी मालिका

'पसंत आहे मुलगी' निरोप घेणार, लवकरच नवी मालिका
मुंबई : झी मराठीवर लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पसंत आहे मुलगी’ ही मालिका निरोप घेणार असल्याचं कळतं.

‘पसंत आहे मुलगी’ची जागा आता ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही सीरियल दिसणार आहे. 22 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता ही मालिका ऑनएअर होईल.

=======================================

कोकण किनारपट्टीवर पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस : हवामान विभाग

कोकण किनारपट्टीवर पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस : हवामान विभाग
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : गेल्या 24 तासात पावसानं महाराष्ट्रातील अनेक भागांना अक्षरश: झोडपून काढलं. मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी पुढी 48 तास धोक्याचे असून, अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

याचा फटका किनारपट्टीलगतच्या भागांनाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे किनारपट्टीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

=======================================

कोकण किनारपट्टीवर पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस : हवामान विभाग

कोकण किनारपट्टीवर पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस : हवामान विभाग
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : गेल्या 24 तासात पावसानं महाराष्ट्रातील अनेक भागांना अक्षरश: झोडपून काढलं. मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी पुढी 48 तास धोक्याचे असून, अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

याचा फटका किनारपट्टीलगतच्या भागांनाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे किनारपट्टीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

=======================================

मुस्लिमांच्या बदनामीसाठी एटीएसकडून अटकसत्र, अबू आझमींची टीका

मुस्लिमांच्या बदनामीसाठी एटीएसकडून अटकसत्र, अबू आझमींची टीका
परभणी : देशातील मुस्लिम समजाला बदनाम करण्यासाठी एटीएसकडून अटकसत्र सुरू करण्यात आल्याची टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. ते काल परभणीच्या दौऱ्यावर होते.

आयसिस संशयितांच्या कुटुंबीयांची भेट

आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून अटक करण्यात आलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांची अबू आझमी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी एटीएसच्या कारवाईवर जोरदार टीका केली. अमेरिका,  इस्राईल आणि भारतानं जगभरातल्या मुस्लिमांना बदनाम करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप अबू आझमींनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीही अबू आझमी याबाबत बोलताना म्हणाले होते, “देशातील 30 कोटी मुस्लिमांचा प्रश्न आहे. मुस्लिमांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काहीजण याचं राजकारण करत आहेत. मराठवाड्यातून जर 100 तरुण बेपत्ता असतील तर पोलिसांनी त्यांचा शोध घ्यावा. कोणी तक्रार केली, कुटुंबीयांनी चौकशी केली का, याचा तपास करावा.”

=======================================

उरण परिसरातील पर्यटन स्थळांवर दारूबंदी

उरण परिसरातील पर्यटन स्थळांवर दारूबंदी
मुंबई : गेल्या काही दिवसात पर्यटन स्थळांवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये पर्यटन स्थळांवर दारुबंदी करण्यात आली आहे. सोबतच उरण तालुक्यातील समुद्रकिनारे आणि धरणांच्या परिसरही जाळ्या लावून पर्यटकांसाठी बंदी करण्यात आली आहे.

उरण तालुक्यातील रानसई धरण आणि पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर पावसाळ्यात मुंबई परिसरातून हजारो पर्यटक येतात. रानसई धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या पाण्यात उतरतात. रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खालापूर परिसरातील धरण आणि धबधब्यांवर जमावबंदी केल्यानंतर उरण तालुक्यातील पर्यटन स्थळांवर दारू बंदी करण्यात आली आहे . धरणाखालच्या पट्ट्यात जाळी लावून पर्यटकांना बंदी करण्यात आल्याने अनेक पर्यटक नाराज झाले आहेत.

या  मार्गावर  पोलिसांनी  मोठ्या प्रमाणात  नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. यामुळे पर्यटन स्थळावर ‘झिंगाट’  होण्यासाठी जाणाऱ्या  पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.  पोलिसांच्या या कारवाईचे काही पर्यटकांनी स्वागत केले असून समुद्रकिनाऱ्यावर होणारी गर्दीही कमी होणार आहे.

=======================================

प्रो कबड्डी लीग: पटना पायरेट्सला विजेतेपद, फायनलमध्ये जयपूरवर मात

प्रो कबड्डी लीग: पटना पायरेट्सला विजेतेपद, फायनलमध्ये जयपूरवर मात
मुंबई पटना पायरेट्सनं जयपूर पिंक पँथर्सचा 37-29 असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा प्रो कबड्डी लीगच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. उभय संघांमधला हा सामना पूर्वार्धात खूपच चुरशीचा झाला.

उत्तरार्धात पटना पायरेट्सनं सामन्यावर वर्चस्व गाजवून विजेतेपद पटकावलं. पटना पायरेट्सच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो प्रदीप नरवाल. त्यानं आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून चढाईत 16 गुणांची वसुली केली.

=======================================

लातुरात दमदार पाऊस, उद्यापासून नळाला पाणी येणार

लातुरात दमदार पाऊस, उद्यापासून नळाला पाणी येणार
लातूर दुष्काळामुळं जवळपास वर्षभर लातूरचे नळ कोरडे होते. पावसाचं आगमन होऊनही लातूरमधल्या टँकरच्या आणि वॉटर एक्स्प्रेसच्या फेऱ्या काही थांबल्या नव्हत्या. मात्र काल रात्री वरूणराजाची लातूरवर अशी काही कृपा झाली, की दुष्काळग्रस्त लातूर पाणीदार झालं. त्यामुळं लातूरकरांची तहान आता टँकर आणि वॉटर एक्स्प्रेसनं नव्हे, तर नळाच्या पाण्यानं भागवली जाणार आहे. लातुरात तब्बल दहा महिन्यानंतर नळाला पाणी येणार आहे.

लातूर शहराला पुढची आठ महिने पुरेल एवढा नागझरी आणि साईबंधाऱ्यात पाणीसाठा झाला आहे. अजूनही पाण्याची आवक सुरू आहे.

लातुरात वॉटर एक्स्प्रेसने पाणी पुरवलं जात होता. या गाडीच्या एका फेरीवर 14 लाख खर्च होत होतं.

शहराबरोबर ग्रामीण भागातही चांगला पाऊस पडला. तेरणा नदी भरभरून वाहू लागली. तेरणेसह मांजरा, रेणा, जाना, घरणी, तावरजा, मुडगुळ नदीसह छोटे मोठे ओढे भरून वाहिले. वेगवेगळ्या ठिकाणच्या चार बंधाऱ्यावरील 21 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

=======================================

भिवंडी इमारत दुर्घटनेत चमत्कार, ढिगाऱ्याखाली 7 महिन्यांचं बाळ सुखरुप

भिवंडी इमारत दुर्घटनेत चमत्कार, ढिगाऱ्याखाली 7 महिन्यांचं बाळ सुखरुप
भिवंड (ठाणे) भिवंडी दुर्घटनेत एक चमत्कार घडला आहे. दोन मजल्यांची इमारत कोसळूनही अवघ्या 7 महिन्यांचं बाळ या आपत्तीमधून सहीसलामत वाचलं आहे. अब्दुल रेहमान असं या मुलाचं नाव असून, त्याच्या जन्मदात्रीचा मात्र यात मृत्यू झालाय. अपघातानंतर सुमारे 6 तासांनी या बाळाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे.

काय आहे घटना?

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे 8 जणांना जीव गमवावा लागला. काळी साडे 9 च्या सुमारास शहरातल्या गैबी नगर भागातली एक इमारत कोसळली. ज्याखाली किमान 30 ते 35 जण अडकले. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं. पण त्याआधीच 8 जणांचा मृत्यू झाला.

=======================================

…आणि महिला खासदाराने डीएमके खासदाराच्या श्रीमुखात भडकावली!

…आणि महिला खासदाराने डीएमके खासदाराच्या श्रीमुखात भडकावली!
नवी दिल्ली दिल्लीत विमानतळावर तामिळनाडूच्या दोन खासदारांमध्ये हमरीतुमरी झाली. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, तामिळनाडूमधील एडीएमकेच्या खासदार शशिकला पुष्पा आणि डीएमकेचे खासदार तिरुची शिवा या दोघांमध्ये दिल्ली विमानतळावर वाद झाला.

विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्ही खासदारांची सीट एकाच एअरक्राफ्टमध्ये होती. जेव्हा डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांना याबाबत कळलं, तेव्हा त्यांनी शशिकला यांच्यासोबत प्रवास करण्यास नकार दिला आणि एडीएमकेच्या खासदार शशिकला पुष्पा यांना एअरक्राफ्टमधून उतरण्यास सांगितले.

तिरुची शिवा यांच्या या भूमिकेमुळे शशिकला भडकल्या आणि त्यांनी रागाच्या भरात विमानतळावर सर्वांसमोर तिरुची यांच्या श्रीमुखात भडकावली.

त्यानंतर तिरुची यांनी आपला प्रवास रद्द करुन, शशिकला यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी निघून गेले. मात्र, शशिकला चेन्नईच्या दिशेने रवाना झाल्या.

=======================================

सावधान! डिलिट केल्यानंतरही व्हॉट्सअॅप चॅट डिलिट होत नाही

सावधान! डिलिट केल्यानंतरही व्हॉट्सअॅप चॅट डिलिट होत नाही
नवी दिल्ली सोशल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हल्ली प्रत्येकाच्या स्मार्टफोन, आयफोनमध्ये असतं. किंबहुना, हल्ली फोनवरुन कमी आणि व्हॉट्सअॅपवरुनच अधिकाधिक संवाद साधला जातो. व्हॉट्सअॅपबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅप मेसेज डिलिट केल्यानंतरही व्हॉट्सअॅप किमान दोन महिन्यांपर्यंत तुमचे मेसेज सुरक्षित ठेवतं.

आयओएस रिसर्चर जोनाथन डिजायरस्की यांच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप आपला डेटा सुरक्षित ठेवतं. मात्र, यूझर्सना यांचा थांगपत्ताही लागू देत नाही. जोनाथन यांनी अनेक स्टोरेज डिस्कच्या तपासानंतर सांगितले की, फॉरेन्सिक पद्धतीने व्हॉट्सअॅप संपूर्ण चॅटच्या अनेक कॉपी तयार करुन ठेवतं. मात्र, या कॉपी यूझर्सना दिसत नाहीत.

एवढच नव्हे, तर या डेटामधून काही डेटा रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने रिकव्हरही केलं जाऊ शकतं. फोनमधील सर्व डेटा डिलिट केल्यानंतर अनेकदा व्हॉट्सअॅप मेसेजही डिलिट होतात. अशावेळीही काही अॅप्सच्या मदतीने डेटा रिकव्हर करता येतो.

याच प्रकारे फेसबुक एंड टू एंड इनक्रिप्शनच्या माध्यमासाठी सिग्नल प्रोटोकॉल टूलचा वापर करतं. त्याचसोबत चॅटिंग आयक्लाऊडसारख्या स्टोरेजमध्ये ठेवण्यात येतं. हा डेटा कोर्टाच्या नोटीसनंतरच परत मिळवला जाऊ शकतो.

=======================================

पाकिस्तानला अणूभट्टी देऊन चीनने केले नियमाचे उल्लंघन


  •  ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १ - पाकिस्तानला अणूभट्टया देऊन चीनने अणवस्त्रप्रसार बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. चीनने असे करुन अणवस्त्र तंत्रज्ञान पुरवठयासंबंधी अणवस्त्र प्रसारबंदी परिषदेत २०१० मध्ये एकमताने ठरलेल्या नियमाचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्थेच्या (IAEA) दिशा-निर्देशांनुसार काम करत नाही. 
    आयएईएने अणवस्त्र प्रसारबंदीच्या प्रगतीचा आढावा घेताना तयार केलेल्या अहवालात चीनबद्दल हे निरीक्षण नोंदवले आहे. भारताने अणवस्त्र प्रसारबंदीवर स्वाक्षरी न केल्याचा मुद्दा उपस्थित करुन चीनने भारताचा अणवस्त्र पुरवठादार देशांच्या गटात प्रवेशाचा मार्ग रोखला होता. 
    भारताच्या प्रवेशामुळे अणवस्त्र प्रसारबंदीचा उद्देश कमकुवत होईल असा चीनने त्यावेळी दावा केला होता. त्याच चीनने पाकिस्तानला अणूभट्टया देताना नियमांचे उल्लंघन केले आहे. चीनने २०१३ मध्ये पाकिस्तानला चष्मा ३ रिअॅक्टर देण्याचा करार केला. 
==========================================

खडडयांमुळे महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण वाढले सातपटींनी


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १ - खड्डे, स्पीड ब्रेकर आणि रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मागच्यावर्षभरात १०,७२७ जणांचा मृत्यू झाला.  २०१४ च्या तुलनेत हे प्रमाण थोडे कमी आहे. मात्र खड्डयांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. २०१५ मध्ये खड्ड्यांमुळे ३४१६ जणांना आपला प्राण गमवावा लागला. २०१४ मध्ये खडड्यांमुळे ३०३९ मृत्यू झाले होते. 
    वाहतूक मंत्रालयाच्या रस्ते अपघातासंबंधीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात खड्डयांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सातपटींनी वाढले आहे. या घटनांवरुन रस्ते देखभालीची जबाबदारी असलेल्या यंत्रणा कमी पडत असल्याचे  स्पष्ट होते. देशात उत्तरप्रदेशात सर्वाधिक खराब रस्ते आहेत. २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये तिथे खड्डयांमुळे मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. 
    ज्या दिल्लीमध्ये शनिवारी दुचाकी खड्डयात फसल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला त्याच दिल्लीमध्ये २०१५मध्ये खड्डयांमुळे दोन मृत्यू झाले. मागच्यावर्षी देशभरात खड्ड्यांमुळे १०,८७६ अपघातांची नोंद झाली. खड्डे, रस्ते अपघाताची सर्व माहिती गोळा करण्याचे प्रभावी माध्यम नसल्यामुळे हा आकडा वाढू शकतो. 
    अनेक अपघातांची नोंद होत नाही तसेच रस्ते अपघातातील मृत्यूची सखोल चौकशी सुद्धा होत नाही. अन्यथा हा आकडा आणखी वाढू शकतो. शहरातील पाणी निच-याची व्यवस्था सुधारत नाही तो पर्यंत खड्डे पडतच रहाणार असे सरकारी विभागामध्ये काम करणा-या रस्ते अभियंत्यांनी सांगितले. 
==========================================

विदर्भातील आमदारांनी राजीनामे द्यावेत - विखे


  • शिर्डी : वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भातील आमदारांनी राजीनामे द्यावेत व याच मुद्यावर पुन्हा निवडणूक लढवावी, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य राहील, असे आव्हान राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विदर्भवाद्यांना दिले़
    साईदर्शनासाठी आलेल्या विखे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला़ वेगळा विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या भावनेचा अनादर असल्याचे मत व्यक्त करतानाच विदर्भाच्या मुद्यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विखे यांनी केला़
    विधीमंडळात राज्य सरकारमधील मंत्र्यांविरूध्द भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणावर आरोप झाले़ सरकारची जनमानसातील प्रतिमा मलिन होवू लागल्याने लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच सरकारने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा समोर आणला असल्याचा आरोपही विखे यांनी केला़
    नागपूरला अनेक मोठे प्रकल्प येत आहेत, तेथे विकासाचा अनुशेष आहे, हे खरे आहे़ मात्र अनेक योजनांचा निधी राज्यपालांचे निकष डावलून तिकडे वळवला जात आहे़ तोही राज्याचाच भाग आहे़ त्यामुळे त्यात गैर काही नसले तरी मुख्यमंत्र्यांनी समतोल विकास करण्याबाबतही विचार करावा, अशी आपली भावना असल्याचे विखे यांनी सांगितले़
==========================================

पोलिसांसमक्ष पीडितेच्या घरावर दगडफेक


  • कर्जत(अहमदनगर) : भांबोरा (ता़ कर्जत) येथील पीडित मुलीच्या घरावर रविवारी दुपारी आरोपींच्या नातेवाइकांनी दगडफेक केली़ विशेष म्हणजे भांबोरा येथे पोलिसांचा ताफा असतानाही पीडितेच्या घरावर दगडफेक झाली़ घटनेची माहिती मिळताच पोलीस पीडितेच्या घराकडे धावले़ दगडफेक करणाऱ्यांनी पोलिसांसमोरूनच धूम ठोकली़ तरीही पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत़ या दगडफेकीत पीडित मुलगी जखमी झाली.
    शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या रविवारी दुपारी घटनेची माहिती घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यास भांबोरा येथे आल्या़ गोऱ्हे गावकऱ्यांशी संवाद साधत असतानाच पीडितेच्या घरावर आरोपींच्या नातेवाइकांनी दगडफेक केली़ त्यामुळे गोऱ्हे यांच्यासह सर्व गावकरी पीडितेच्या घराकडे धावले़ हे पाहून दगडफेक करणाऱ्यांनी तेथून धूम ठोकली़ विशेष म्हणजे त्या वेळी पोलीसही तेथेच होते़ मात्र, पोलिसांनी या दगडफेक करणाऱ्यांना पकडण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही़ या दगडफेकीत पीडित मुलीच्या हाताला जखम झाली. गोऱ्हे यांनी पीडितेच्या हातावर प्रथमोपचार केले़ यानंतर पीडितेच्या घराला संरक्षण देण्यात आले. 
==========================================

आसामचा पूर आणि अहवालात फोटो बांगलादेशचा


  • गुवाहाटी : सरकारी यंत्रणा कधी काय करील याचा नेम नाही. आता हेच पाहा ना, आसाममधील भयंकर पुरानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे आसामच्या दौऱ्यावर गेले होते.
    मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या पुराचा अहवाल दिला आणि पुराची भीषणता दर्शविणारी काही छायाचित्रेही सोबत जोडली. त्यातीलच हे एक छायाचित्र. या तरुणाच्या डोळ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे; पण हरिणाचा जीव वाचविण्यास हा आटापिटा
    चालला आहे. पण खरी गोम तर इथेच आहे. कारण, हे छायाचित्र
    आसामचे नसून बांगलादेशातील २०१४ च्या नोखालीतील पुराचे
    आहे. 
==========================================

बुलंदशहर सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयित ताब्यात...


  • ऑनलाइन लोकमत
    बुलंदशहर, दि. ३१ : महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावरील बुलंदशहर वळण रस्त्यावर अत्याचाराची घटना शुक्रवारी रात्री घडली. दरोडेखोरांनी महिला व मुलीला त्यांच्या कारमधून ओढून नेले होते.
    अखिलेश यादव यांनी बुलंदशहरच्या उप पोलीस अधीक्षकांना या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. त्याशिवाय त्या भागातील पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. बुलंदशहरचे उप पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा म्हणाले की गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष कृती दलाच्या १५ तुकड्या कामाला लावण्यात आल्या असून बुलंदशहर, मेरठ व इतर जिल्ह्यांत तसेच राज्यातही छापे टाकण्यात येत आहेत. १५ संशयितांना पकडण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. तो भटक्या जमातीचा असून गुन्हेगारीत सक्रिय आहे.
==========================================

सख्ख्या नव्हे, चुलत भावाने केली कंदील बलोचची हत्या


  • इस्लामाबाद : पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच (२६) हिची गळा दाबून हत्या तिच्या धाकट्या भावाने नव्हे, तर चुलत भावाने केली, असे पॉलिग्राफ चाचणीतून शनिवारी स्पष्ट झाले.
    कंदीलने फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट व असभ्य व्हिडीओमुळे कुटुंबाची बदनामी केली म्हणून तिचा धाकटा भाऊ व मुख्य आरोपी मोहम्मद वसीम याने गळा दाबून तिची हत्या केली, असे आधी सांगितले जात होते. वसीम यानेही तसे आधी कबूल केले होते.
    वसीम व कंदीलचा चुलत भाऊ हक नवाज या दोघांची पॉलिग्राफ चाचणी केल्यावर ही बाब स्पष्ट झाली. चाचणीनुसार वसीमने नव्हे, तर हक नवाजने १५ जुलै रोजी कंदीलचा गळा दाबला.
==========================================

No comments: