Wednesday, 17 August 2016

नमस्कार लाईव्ह १७-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- अमेरिका, युरोपने पाठिंबा द्यावा - बलुचिस्तानातील नेत्यांची मागणी 
२- लंडनमध्ये डौलाने फडकला तिरंगा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- ‘नीट’मध्ये हेत शहा देशातून पहिला! 
४- किडनी रॅकेट प्रकरणी ईडीही करणार चौकशी 
५- ‘अटल बंधन’बाबत प्रदेश भाजपा अंधारात 
६- मुद्रा बँकेचा अधिक लाभ जुन्याच व्यावसायिकांना! 
७- क्रेडिट-डेबिट कार्ड, नेट बँकिंग फुकटात, ट्रँझॅक्शन कॉस्ट नाही 
८- जम्मू-काश्मीर: लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद   
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
९- मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे अचानक 'वर्षा'वर 
१०- बिहारमध्ये विषारी दारूचे १३ बळी 
११- विरार स्टेशनमध्ये आगीचा भडका 
१२- डॉ. पोळच्या फार्म हाऊसवर दोन खड्डे, आणखी 9 जण बेपत्ता 
१३- सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल ग्रुपला सेबीचा दणका 
१४- बेपत्ता तरण्याबांड जयची शिकार? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१५- मुंबई; नाल्यातील गाळ काढण्यासाठी कोट्यवधींची तरतूद 
१६- घारापुरी लेण्यांमध्ये सहा महिन्यांत वीज 
१७- वर भेगाळलेले डोंगर, मध्ये धरण, खाली गाव, आंबितवासिय कचाट्यात 
१८- मुंबई महापालिकेत वर्षाला लैंगिक अत्याचाराच्या 29 तक्रारी 
१९- पिंपरीत आर्थिक वादातून पत्नीने पतीला जाळलं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२०- जगज्जेत्या वॅंगला दणका, सिंधू सेमिफायनलमध्ये 
२१- ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशाला व्यवस्थाच कारणीभूत - अभिनव बिंद्राचे टीकास्त्र 
२२- चित्रपटसृष्टीतील क्युट कपल सचिन-सुप्रियाचा वाढदिवस 
२३- नरसिंह यादवची लढाई शेवट पर्यंत लढणार : ब्रिजभूषण सिंग 
२४- जगज्जेत्या वॅंगला दणका, सिंधू सेमिफायनलमध्ये 
२५- पदक हुकले असले, तरी मुलीचा गर्व वाटतो - शिवाजी बाबर 
२६- दूतावासातून उपाशीपोटी परतले भारतीय खेळाडू 
२७- नरसिंगबाबत 'नाडा'ने दिलेली क्लीन चिट 'वाडा'ने फेटाळली, नरसिंगच्या अडथळ्यात वाढ 
२८- पीव्ही सिंधू ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्य फेरीत धडक 
२९- क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अभिनेत्री नर्गिस फाक्रीची लूट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

*
============================================

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे अचानक 'वर्षा'वर


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १७ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले. राज यांच्यासोबतबाळा नांदगावकर, शिशिर शिंदे आदी  मनसे नेतेही उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री-राज ठाकरे यांच्या या अचानक भेटीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 
    या दोघांची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी भेट असून यापूर्वी 'नीट' परीक्षेप्रश्नी राज मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेले होते. पुढील वर्षी होणा-या मुंबई पालिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू तापत असताना मुख्यमंत्री फडणवीस व राज यांच्या वाढत्या भेटींचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
============================================

जगज्जेत्या वॅंगला दणका, सिंधू सेमिफायनलमध्ये


  • ऑनलाइन लोकमत
    रिओ, दि. १७ : रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचा आतापर्यंतचा प्रवास हा निराशाजनक पाहायला मिळत असला तरी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिच्याकडून पदकाची आशा अद्याप कायम आहे. रिओ ऑलिम्पिमधील महिला एकेरीच्या सामन्यांत प्रतिस्पर्धी चीनच्या खेळाडूवर शानदार विजय मिळवून पी.व्ही. सिंधूने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या विजयासह तमाम भारतीयांना सिंधूकडून पदकाच्या आशा वाढल्या आहेत. महिला गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अनुभवी सिंधू हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना चिनीची भींत भेदून पदकाकडे आगेकूच केली आहे.
    सिंधूने लंडन ऑलिम्पिमध्ये रौप्यपदकविजेत्या चीनच्या वांग यिहानला २२-२०, २१-१९ अशा फरकाने धूळ चारताना थाटात उपांत्य फेरी गाठली. सिंधूने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी करताना दोन वेळा चीनच्या भींतीचा अडथळा दुर केला. उपउपांत्याफेरीत तिने आठवे मानांकन प्राप्त चिनी-तैपेईच्या तेई जू यिंग हिला अवघ्या ४० मिनिटांत २१-१३,२१-१५ अशा फरकाने धूळ चारताना उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
    पहिल्या गेममध्ये सिंधूला चीनची भींत भेदन शक्य होणार नाही असे दिसत होते. मात्र गेम सुर झाल्यानंतर चीनच्या वांगने खेळाची सर्व सुत्रे आपल्याकडे राखत आघाडी मिळवली होती. पण ११-९ अशी पिछाडीवर असताना आपले मनोबल वाढत सिंधूने पहिला सेट २२-२० अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने आपला खेळ अधिक उंचावत सामना सहज जिंकला. भारताची 'फुलराणी' सायना नेहवालचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने आता पी.व्ही.सिंधूच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
============================================

ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशाला व्यवस्थाच कारणीभूत - अभिनव बिंद्राचे टीकास्त्र


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १७ - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकांचे खाते अद्याप खुले झाले नसून त्याबाबत चहुबाजूंनी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ' मात्र ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशसाठी येथील व्यवस्थाच जबाबदार आहे' अशी टीका भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राने केली आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणा-या अभिनवला यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मात्र पदक जिंकण्यात अपयश आले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये 10 मी. एअर रायफल इव्हेंटमध्ये अभिनव चौथ्या स्थानी राहिला होता, त्यामुळे त्याचं पदक थोडक्यात हुकलं होतं.
    मंगळवारी ट्विटरवरून अभिनवने पदकांच्या अपेक्षेबाबत मत व्यक्त केले. आपल्या ट्विटमध्ये ब्रिटनचे उदाहरण देत बिंद्राने म्हटले आहे , ' एखाद्या देशाने त्यांच्या खेळाडूंमध्ये गुंतवणूक केल्यावरच त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जाऊ शकते. ब्रिटनने प्रत्येक पदकावर 55 लाख पाऊंड इतका खर्च केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. जोवर देशातील व्यवस्था दुरुस्त होत नाही तोपर्यंत पदकाची अपेक्षा करता येणार नाही.’ असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
============================================

चित्रपटसृष्टीतील क्युट कपल सचिन-सुप्रियाचा वाढदिवस


  • संजीव वेलणकर
    पुणे, दि. १७ - प्रसिद्ध अभिनेते सचिन व अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर या दोाघांची जोडी 'क्युट कपल' म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्या दोघांचाही वाढदिवस (१७ ऑगस्ट) एकाच दिवशी असतो.
    १७ ऑगस्ट १९५७ साली जन्मलेेले सचिन पिळगवाकर गेल्या ५ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 
     अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.
    त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले. आपल्या कारकिर्दीत सचिननं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळींबरोबर काम केलं आहे. सचिन उर्दू भाषा आणि उच्चार शिकला थेट मीनाकुमारी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीकडून. अक्षरश- एखाद्या मुलाची शिकवणी घ्यावी तशी मीनाकुमारी यांनी सचिनची शिकवणी घेतली. हिंदी चित्रपटसृष्टीतील देव आनंद आणि विजय आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडून सचिनला खूप काही शिकायला मिळालं; तर "बैराग‘च्या निमित्तानं दिलीपकुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. संजीवकुमार यांच्याबरोबरचा त्याचा स्नेह घट्ट होता अमिताभ बच्चन यांच्याबोरबर त्यानं दोन-तीन चित्रपटात काम केलं. सचिन यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट "अष्टविनायक‘या चित्रपटात सचिनची भूमिका नास्तिक माणसाची आणि नायिका वंदना पंडित यांची भूमिका आस्तिक अशी होती. प्रत्यक्ष जीवनात बरोबर उलटं होतं. वंदना अगदी नास्तिक आणि सचिन आस्तिक आहेत. त्यांनी ''हाच माझा मार्ग'' नावाने आपली आत्मकथा लिहिली आहे. सचिन यांनी आपली पत्नी सुप्रियाच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.
============================================

बिहारमध्ये विषारी दारूचे १३ बळी


  • ऑनलाइन लोकमत
    पाटणा, दि. १७ - संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आलेली असतानाच राज्यातील गोपाळगंजमध्ये विषारी दारू प्यायल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने नव्हे तर आजारपणामुळे ते नागरिक मृत्यूमुखी पडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मृत्यू पावलेल्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे काय ते स्पष्ट होईल. 
    स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू प्यायल्यानंतर काही लोकांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या व त्यांना उलटीही झाली. त्यांना उपचारासांठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 
============================================

विरार स्टेशनमध्ये आगीचा भडका


  • वसई : विरार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १वरील केबल नियंत्रण कक्षाच्या बाहेर ऐन गर्दीच्या वेळी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे मोठी आग लागल्याने विरार स्थानकात एकच गोंधळ उडाला. आग आटोक्यात आल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे विरार ते वसईदरम्यानची लोकल वाहतूक ठप्प झाल्याने लाखो प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वसई-विरार पालिकेने विरार ते वसईदरम्यान बस सोडल्या.
    विरार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १वरील केबल नियंत्रण कक्षाच्या बाहेर असलेल्या विद्युत वाहिन्यांमध्ये अचानक शॉकसर्किट होऊन आग लागली. विद्युत वाहिन्यांनी पेट घेतल्याने फटाक्यासारखा आवाज होत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आग लागण्याच्या काही मिनिटे आधीच याच फलाटावर एक लोकल आल्याने मोठी गर्दी होती. केबल जळत असताना होणारा प्रचंड आवाज आणि त्यानंतर आगीचे रौद्र रूप पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली व एकच पळापळ झाली. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवून फलाट रिकामा केला.
    ही आग तब्बल २५ मिनिटे भडकलेली होती. रेल्वे आणि वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान पोहोचताच अवघ्या १० मिनिटांत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने प्रचंड आग लागली असतानाही प्लॅटफॉर्म क्रमांक १वर असलेल्या लोकलला आगीची झळ पोहोचली नाही. या आगीत कुणीही जखमी झाले नाही. खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनाने विद्युत पुरवठा बंद करून कामाला सुरुवात केली. विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याने ७पासून विरार ते वसईदरम्यान लोकल सेवा बंद करण्यात आली होती. या आगीमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊन विरार व पुढे डहाणूपर्यंतच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
============================================

‘नीट’मध्ये हेत शहा देशातून पहिला!


  • मुंबई : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकेंडरी एज्युकेशनने घेतलेल्या ‘नीट’(नॅशनल एलिजेबिलिटी कम इंट्रन्स टेस्ट) परीक्षेचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर झाला. या परीक्षेसाठी देशातून ७ लाख ३१ हजार २२३ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी ४ लाख ९ हजार ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हेत शाह हा विद्यार्थी देशातून पहिला आला आहे. एकांश गोयल आणि निखिल बाजीया यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय येण्याचा मान पटकावला आहे.
    वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदवी प्रवेशासाठी नीट-यूजी घेण्यात आली होती. १ मे आणि २४ जुलै अशा दोन टप्प्यांत पार पडलेल्या या परीक्षेसाठी एकूण ८ लाख २ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी ७ लाख ३१ हजार २२३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. मात्र, त्यांपैकी केवळ ४ लाख ९ हजार ४७७ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींची संख्या अधिक आहे. १ लाख ८३ हजार ४२४ मुले आणि २ लाख २६ हजार ४९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
============================================

किडनी रॅकेट प्रकरणी ईडीही करणार चौकशी


  • मुंबई : हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरणाचा अंमलबजावणी संचालनालयाकडूनही (ईडी) सखोल तपास करण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास करण्यासाठी ईडीने मुंबई पोलिसांकडून गुन्ह्यांची कागदपत्रे मागविली आहेत. या रॅकेटमधून मनी लॉड्रिंगच्या
    दिशेने ईडीकडून तपास करण्यात येत आहे.
    या गुन्ह्यांत हिरानंदानी रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांना अटक झाल्यानंतर या गुन्ह्यांचे गांभीर्य आणखीनच वाढले. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करत ईडी मनी लॉड्रिंग अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्याच्या तयारीत आहेत. मात्र यामध्ये जर पोलीस अथवा सीबीआयने पैशांच्या देवाणघेवाणीचा गुन्हा दाखल केला असेल तरच ईडी
    हा गुन्हा नोंदवू शकते. त्यामुळे यामध्ये दाखल गुन्हा, त्यातील
    डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कनेक्शनचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान झालेल्या पैशांचा व्यवहार, त्यामधील सहभागांची पाळेमुळे खणून काढण्याचा ईडीचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
============================================

‘अटल बंधन’बाबत प्रदेश भाजपा अंधारात


  • मुंबई : शिवसेनेच्या ‘शिवबंधन’ला आव्हान देत, मुंबईत भाजपाने हाती घेतलेल्या ‘अटल बंधन’ या कार्यक्रमाबाबत प्रदेश भाजपा पूर्णत: अंधारात असल्याचे आज स्पष्ट झाले.
    या कार्यक्रमाची आपल्याला कुठलीही कल्पना नव्हती, या शब्दांत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
    अटल बंधन हा भाजपाचा अधिकृत कार्यक्रम नसल्याचे दानवे यांनी सांगितले. मुंबई भाजपा ही एक व्यवस्थेचा भाग आहे. तेथील अध्यक्षांची नियुक्ती हे प्रदेशाध्यक्षच करीत असतात, या शब्दात दानवे यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना आपली जागा दाखवून दिली. भाजपामध्ये उपरे असलेले प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. शेलार यांच्या पुढाकाराने ‘अटल बंधन’ मनगटावर बांधून घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र दिनी केले होते.
    भाजपाचा हा अधिकृत कार्यक्रम नसल्याचेच दानवे यांनी एक प्रकारे स्पष्ट केले. राज्यात इतरत्र कोठेही ‘अटल बंधन’चे कार्यक्रम होणार नाहीत. दानवे म्हणाले की, ‘केंद्र सरकारची दोन वर्षांची कामगिरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदेश भाजपाने ठिकठिकाणी ‘विकास पर्व’चे कार्यक्रम घेतले. आता सर्वपक्षीय अशी तिरंगा यात्रा काढली जात आहे. प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत आपण विधिमंडळ अधिवेशनादरम्यान केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. विदर्भाबाबत, तसेच अखंड महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली, तीच आपली भूमिका आहे,’ असे दानवे म्हणाले.
============================================

नाल्यातील गाळ काढण्यासाठी कोट्यवधींची तरतूद


  • तीन नाल्यांच्या रुंदीकरणासाठी तब्बल ७३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी शुक्रवारी सादर होणार आहे़
    ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण सुरू आहे़ मात्र, २००६ पासून रखडलेल्या या प्रकल्पाचा खर्च कोटी-कोटीने वाढत चालला आहे़ अशाच तीन नाल्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने आणला आहे़ यामध्ये आझमीनगर येथे उगम पावून मालाड खाडीत विसर्जित होणारा मालवणी नाला, बिंबीसार नगरचा रॉयल पाम नाला आणि बोरीवलीच्या चंदावरकर नाल्याचा समावेश आहे़
    २००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुराचा पश्चिम उपनगरांना फटका बसला होता़ त्यामुळे पावसाळ्यात या विभागांना दिलासा देण्यासाठी नाल्यांचे रुंदीकरण आवश्यक ठरले आहे़ मालवणी नाला वाढविणे, त्याची साफसफाई आणि सुधारणा, रॉयल पाल नाला बिंबिसार नगर नाल्यापासून वालभाट नदीपर्यंत वळविणे व संरक्षण भिंत बांधणे आणि चंदावरकर नाल्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे़ 
============================================

घारापुरी लेण्यांमध्ये सहा महिन्यांत वीज


  • मुंबई : मुंबईनजीकच्या समुद्रातील सुप्रसिद्ध घारापुरी (एलिफन्टा) लेण्या आणि त्या परिसराचे अंधाराचे दिवस आता लवकरच संपणार असून, त्या ठिकाणी येत्या सहा महिन्यांत विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
    न्हावाशेवा, जेएनपीटीनजीकच्या मोराबंदर गावातून समुद्रमार्गे केबल टाकून घारापुरीला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचे हे काम निविदेद्वारे केबल कॉर्पोरेशन आॅफ इंडियाला देण्यात आले आहे.
    ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले की, येत्या एक महिन्यात केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. घारापुरी येथे वीज उपकेंद्र आणि वीजपुरवठा यंत्रणा उभारण्याच्या कामाची वेगळी निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. सहा महिन्यांत हे कामही पूर्ण करण्यात येईल.
    आज घारापुरीमध्ये राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून सायंकाळी ७.३० ते रात्री ११ या वेळेत जनरेटरद्वारे वीजपुरवठा केला जातो. देखभाल, दुरुस्तीचे कामही महामंडळ करते. त्या मोबदल्यात प्रत्येक घराकडून केवळ १५० रुपये बिल महिन्याकाठी आकारले जाते.
    आधी गेट वे आॅफ इंडियापासून केबल टाकून वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, हे अंतर जास्त होते, तसेच या मार्गावर चालणाऱ्या जलवाहतुकीत त्यामुळे अडचणी आल्या असत्या. त्यामुळे जेएनपीटीपासून वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    आमच्या गावात २४ तास वीज आल्याने येथे पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल. वर्षानुवर्षांची आमची मागणी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, असे मत घारापुरीचे सरपंच राजेंद्र पडते, यांनी मांडले.
============================================

अमेरिका, युरोपने पाठिंबा द्यावा - बलुचिस्तानातील नेत्यांची मागणी


  • ऑनलाइन लोकमत
    वॉशिंग्टन, दि. १६ - पाकिस्तान सरकारकडून होणा-या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिका आणि युरोपमधील देशांनीही पाठिंबा द्यावा अशी मागणी बलुचिस्तानातील नेत्यांनी केली आहे.
    पाकिस्तान धार्मिक दहशतवादाचा वापर करत असल्याचे जगाने समजून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या या धोरणाचा परिणाम सर्वत्र होईल. दहशतवाद हा आपोआप कमी होणारा नसून त्याला जोरदार विरोध केला पाहिजे, असे बलुचिस्तानातील राष्ट्रीय चळवळीचे नेते खलील बलोच यांनी सांगितले.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवी गुन्हांबाबत पाकिस्तानलाच जबाबदार धरले आहे. त्याला अमेरिका आणि युरोपातील देशांनीही पाठिंबा द्यावा अशी आशा बलुचिस्ताने केली आहे. गेली पाच वर्षे बलुचिस्तान स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात लढत आहे, असेही खलील बलोच यांनी सांगितले. तसेच, बलुचिस्तानातील सकारात्मक विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान उचित असल्याचेही यावेळी खलील बलोच म्हणाले.
============================================

लंडनमध्ये डौलाने फडकला तिरंगा


  • सतीश डोंगरे/ऑनलाइन लोकमत
    नाशिक, दि. 16 - दरवर्षी भारतीय वकिलातीच्या भिंतीआड होणारा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा यावर्षी लंडनमध्येदेखील उत्साहात साजरा करण्यात आला. लंडनस्थित शेकडो भारतीय नागरिकांनी बार्किंग टाऊन हॉल येथे एकत्र येऊन डौलाने तिरंगा फडकाविला. यावेळी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याचा आनंद आणखीच द्विगुणित केला.
    लंडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपला राष्ट्रीय उत्सव साजरा करून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर महापुरुषांना अभिवादन करता यावे या हेतूने भारतीय नागरिकांनी हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार बार्किंग टाऊन हॉल येथे सकाळी सात वाजताच शेकडोच्या संख्येने लहान-मोठ्यांसह नागरिक कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले होते. सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर खास भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. रंगीबेरंगी कपडे परिधान करून आलेल्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारी नृत्येही सादर करण्यात आली.
============================================

नरसिंह यादवची लढाई शेवट पर्यंत लढणार : ब्रिजभूषण सिंग


  • शिवाजी गोरे
    रिओ, दि. १७ : भारतीय संघाचा कुस्तीपटू नरसिंह यादव याची कोर्टाची लढाई आम्ही येथे शेवट पर्यंत लढणार असून त्याला न्याय मिळवून देणे आमचे कर्तव्य आहे असे भारतीय कुस्ती महासंघाचे प्रेसिडन्ट ब्रिजभूषण सिंह यांनी लोकमतला संगितले. नाडा ने पाठविलेला अहवालावर वाडाची सुनावणी आहे. आमचे वकील रिओला येऊ शकत नाहीत, त्यामुळे ते दिल्लीतूनच फोन किंवा कॉन्फ्रान्सवर आमचे म्हणणे मांडतील. भारतीय ऑलिम्पिकचे सचिव राजीव मेहता यांनी येथे एक वकील दिला आहे. तो आमची बाजू मांडणार आहे.
    काल नरसिंग यादवला निर्दोष ठरवण्याच्या राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीच्या निर्णयास जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) क्रीडा लवादाकडे आव्हान दिलं आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमधील नरसिंगच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लवादापुढील सुनावणी 18 रोजी होण्याची शक्‍यता आहे. नरसिंगची ऑलिंपिकमधील लढत 19 ऑगस्टला आहे.
============================================

मुद्रा बँकेचा अधिक लाभ जुन्याच व्यावसायिकांना!


  • सुरेश भटेवरा , नवी दिल्ली
    मुद्रा बँक हा पंतप्रधान मोदींचा स्वप्नांकित प्रकल्प. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही पंतप्रधानांनी या बँकेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महिला व्यावसायिकांना या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले. मोठ्या बँकांकडून नव्या व्यावसायिकांना सहजासहजी कर्ज मिळत नाही, अशांना ही बँक मदत करते. ताज्या आकडेवारीनुसार मुद्रा बँकेच्या पहिल्या वर्षात नव्याऐवजी जुन्याच व्यावसायिकांनी या योजनेचा अधिक लाभ उठवल्याचे चित्र सामोरे आले आहे. पंतप्रधानांच्या पुढाकाराने एप्रिल २0१५मध्ये मुद्रा बँकेचा वाजत गाजत प्रारंभ झाला. त्यानंतर, मुद्रा बँकेशी ३.४९ कोटी खाती संलग्न करून जोडण्यात आली. त्यात फक्त १.२५ कोटी नवे व्यावसायिक खातेधारक आहेत. वर्षभरातील कामगिरी पहिल्या वर्षाच्या अहवालानुसार खातेधारकांना मार्चअखेर फक्त ५.१७ लाख मुद्रा कार्ड वितरित करण्यात मुद्रा बँक योजना यशस्वी ठरली आहे.
============================================

डॉ. पोळच्या फार्म हाऊसवर दोन खड्डे, आणखी 9 जण बेपत्ता

डॉ. पोळच्या फार्म हाऊसवर दोन खड्डे, आणखी 9 जण बेपत्ता
सातारा : क्रूरकर्मा डॉक्टर संतोष पोळच्या फार्म हाऊसवर आणखी दोन खड्डे आढळून आले आहेत. सहा जणांची हत्या केल्यानंतर डॉक्टर पोळचा पुढचा निशाणा खुद्द त्याची नर्स असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
नर्सच्या हत्येचा बेत आखण्याआधीच डॉक्टर संतोष पोळनं हे दोन खड्डे खणून ठेवले होते. अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान वाई परिसरातील आणखी नऊ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

कसा लागला सुगावा ?

13 वर्षात 6 खून पडले, तरीही डॉ. संतोष पोळ मोकाट होता. मात्र डॉ. पोळचे दिवस भरले तेच अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवशी. 16 जून 2016 ला मंगल जेधे घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबानं पोलिसात तक्रार दिली आणि हाती लागला सर्वात मोठा पुरावा. अर्थात संतोष पोळची मैत्रीण आणि साथीदार ज्योती मांढरे.


कोणाच्या हत्या ?


साताऱ्याच्या वाईमध्ये मंगल जेधे यांची हत्या करणाऱ्या डॉक्टर संतोष पोळने एकूण 6 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मंगल जेधे, सलमा शेख, नथमल भंडारे, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे आणि वनिता गायकवाड अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. हत्या झालेले सहाही जण 2003 ते 2016 या कालावधीत सातारा आणि वाई परिसरातून बेपत्ता होते. यापैकी चार मृतदेह हे डॉ. संतोष पोळच्या फार्म हाऊसवर पुरण्यात आले होते.


कसं झालं हत्यांचं प्लॅनिंग ?
 
संतोष पोळ अतिशय थंड डोक्यानं हत्येचं प्लॅनिंग करायचा. दोन दोन महिने महिलांच्या मागावर असायचा. संतोषचा कबुलीजबाब ऐकून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही. हत्येच्या दोन महिने आधीच तो मोठे खड्डे खणायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

13 वर्ष.. सहा हत्या.. डॉ. पोळच्या कृष्णकृत्याने साताऱ्यात थरकाप



13 वर्षात संतोषशी संबंध आलेल्या 5 महिला बेपत्ता झाल्या. पोलिसात तशा तक्रारी आल्या. पण तपास लाल फितीत अडकल्यानं संतोष पोळ मोकाट होता. पोलिसांच्या दाव्यानुसार हत्यांमध्ये फक्त आणि फक्त आर्थिक देवाणघेवाणीचाच संबंध आहे. त्यामुळे 5 हत्यांशिवाय संतोषनं आणखी काही लोकांचाही गळा घोटलाय का? याचाही तपास सुरु आहे.


स्वत:ला डॉक्टर म्हणवणाऱ्या संतोषचा कारभार सुरुवातीला एका पडक्या घरातून चालायचा. माती आणि पत्र्याचं घर. धोमचा परिसर थोडा आडवळणाचा, त्यामुळं कुणी आजारी पडलं तर आजूबाजूच्या गावांमधील लोकांना संतोष पोळचाच आधार होता आणि त्याचाच फायदा संतोष घ्यायचा.

 
महिलांना गुप्तरोग आणि एड्स झाल्याची भीती दाखवून त्यांचं आर्थिक शोषण सुरु करायचा. अर्थातच भीतीचं भांडवलं. डॉक्टरकीच्या नावाखालीच संतोष पोळची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उठबस होती. त्यामुळे गावातलं कुणीही संतोषविरोधात बोलायचं धाडस करत नव्हतं. अगदी संतोषच्या वागण्याबोलण्यात संशय जाणवल्यावर सुद्धाही.
============================================

वर भेगाळलेले डोंगर, मध्ये धरण, खाली गाव, आंबितवासिय कचाट्यात

वर भेगाळलेले डोंगर, मध्ये धरण, खाली गाव, आंबितवासिय कचाट्यात
अहमदनगर : अकोले तालुक्यातील आंबित गावात माळीणसारखी दुर्घटना होण्याची भीती आहे.  चारही बाजूने डोंगराच्या कुशीत वसलेल्या आंबित गावातील डोंगरावर सुमारे पंधरा किमीपर्यंत तडे गेले आहेत. त्यामुळे भयभीत झालेल्या 80 कुटुंबांतील सुमारे अडीचशे लोकांनी लेकरा-बाळांसह गाव सोडून आश्रम शाळेत आश्रय घेतला आहे.

दोन ऑगस्टच्या दरम्यान झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील डोंगराला मोठे तडे गेले आहेत. दहा दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने गावातील डोंगर आणि रस्ता खचला आहे. तर गावातील तब्बल 80 कुटुंबांना गावापासून 5 किमी अंतरावर स्थलांतरीत करण्यात आलं आहे.


============================================

क्रेडिट-डेबिट कार्ड, नेट बँकिंग फुकटात, ट्रँझॅक्शन कॉस्ट नाही

क्रेडिट-डेबिट कार्ड, नेट बँकिंग फुकटात, ट्रँझॅक्शन कॉस्ट नाही
नवी दिल्ली : डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगवरील ट्रँझॅक्शन कॉस्टमुळे काही जणांचा कल ते न वापरण्याकडे असतो. मात्र कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही रक्कम आता स्वतःच्या तिजोरीतून देण्याची तयारी दर्शवली आहे.
 
व्यापारी सवलत दर किंवा मर्चंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) म्हणून ओळखली जाणारी ही ट्रॅँझॅक्शनची रक्कम सध्या ग्राहकांच्या खिशातून जाते. सरकार ही रक्कम स्वतःच्या तिजोरीतून पेलण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलत आहे, त्यामुळे यापुढे एमडीआरचा भार ग्राहकांना सोसावा लागणार नाही, असं वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
 
क्रेडिट कार्ड किंवा डिजीटल व्यवहारांना उत्तेजन देण्यासाठी सरकारतर्फे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 0.75 टक्के, तर दोन हजार रुपयांवरील व्यवहारांना एक टक्का रक्कम ट्रँझॅक्शन कॉस्ट आकारली जात होती.

============================================

सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल ग्रुपला सेबीचा दणका

सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल ग्रुपला सेबीचा दणका
उस्मानाबाद : राज्यमंत्रिमंडळात कलंकित नेत्यांच्या समावेशावरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं असताना फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो ग्रुपला शेअर बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातलेली आहे.
 
कंपनी कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करुन ‘लोकमंगल ग्रुप’ने जमवलेली 74.82 कोटी रुपयांची गुंतवणूक ही नियमबाह्य असल्याचं सेबीचं म्हणणं आहे. ही सर्व गुंतवणूक सव्याज परत करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. तसेच लोकमंगल समुहाकडून झालेला हा घोटाळा सहारा उद्योग समुहासारखा असल्याचं सेबीचं म्हणणं आहे.
 
लोकमंगल ग्रुपने उस्मानाबादच्या लोहारा गावात कारखाना काढण्यासाठी दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे 20 कोटींचं कर्ज घेतल्याचं समोर येत आहे. देशमुखांचं कुटुंब संचालक असलेल्या लोकमंगल समुहाला आपली बाजू मांडण्यासाठी 21 दिवसांचा वेळ देण्यात आला असून जोपर्यंत सर्व संचालक आपल्या डीमॅट खात्यांची विवरणपत्र सादर करत नाहीत तोपर्यंत त्यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

============================================

बेपत्ता तरण्याबांड जयची शिकार?

बेपत्ता तरण्याबांड जयची शिकार?
नागपूर : आशियातील सर्वात मोठा वाघ जयची शिकार झाली आहे का या दृष्टीने तपास सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. एसआयटी आणि सीबीआयच्या पथकाने नुकतीच दोन शिकाऱ्यांना अटक केली आहे. किसन इस्त्री समर्थ आणि मधुकर हतवार अशी या शिकाऱ्यांची नावं आहेत.

पवनी तालुक्यातील कोडुर्ली गावातून या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नायलॉनची दोरी आणि 1-18 आकाराची इलेक्ट्रिक वायर जप्त करण्यात आली आहे. वाघाची किंवा इतर प्राण्यांची शिकार करण्यासाठी हे साहित्य वापरलं जातं. त्यांच्याकडे जयसंदर्भात चौकशी सुरु आहे.

18 एप्रिलपासून जय बेपत्ता

दरम्यान, नागपूरच्या उमरेड अभयारण्याची ओळख बनलेला जय हा तरणाबांड वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी 100 हून अधिक स्वयंसेवकांनी मोहीम राबवली आहे. तब्बल 250 किलो वजन असलेल्या या वाघाची एक झलक पाहण्यासाठी उमरेडला भेट द्यायचे. मात्र अचानक हा वाघ  गायब झाल्याने वन्यप्रेमींच्या काळजीत भर पडली आहे.
============================================

पीव्ही सिंधू ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्य फेरीत धडक

पीव्ही सिंधू ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्य फेरीत धडक
Rio Olympics Badminton Women
रिओ दी जेनेरिओ: भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं चीनच्या वर्ल्ड नंबर टू आणि लंडन ऑलिम्पिकची रौप्यपदकविजेती वँग यिहानचा 22-20, 21-19 असा सरळ गेम्समध्ये धुव्वा उडवला. सिंधूनं हा सामना 54 मिनिटांत जिंकला.

या सामन्यात वँग यिहाननं सिंधूला कडवी टक्कर दिली. पण सिंधूनं वेळोवेळी वँग यिहानचं आव्हान मोडून काढलं. त्यामुळं आता सिंधू ऑलिम्पिकपदकापासून केवळ एक विजय दूर आहे. सिंधूसमोर आता उपांत्य फेरीत जपानच्या नोझोमी ओकूहाराचं आव्हान असून हा सामना 18 ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजून 50 मिनिटांनी खेळवला जाईल.

दरम्यान, पी. व्ही. सिंधू ही ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठणारी दुसरीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरलीय. याआधी सायना नेहवालनं 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठून कांस्यपदकाची कमाई केली होती.

============================================

No comments: