Sunday, 7 August 2016

नमस्कार लाईव्ह ०७-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- रिओ ऑलिम्पिक: संशयास्पद वस्तूचा पोलिसांनीच नियंत्रित स्फोट घडवला 
२- विमाने घ्याल, तरच कारखाना भारतामध्ये! 
३- NSG साठी पाठिंबा देण्यास नकार देणा-या चीनला हवी आहे भारताची मदत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
४- देशातील 80 टक्के गो-रक्षक ढोंगी आणि बनावट: पंतप्रधान मोदी 
५- ...तर मोदींवर टीका होणार नाही- कॉंग्रेस 
६- निलंबित भाजप नेते दयाशंकर सिंह तुरुंगाबाहेर 
७- ..तर गायींना संघ शाखेत ठेवा: नितीशकुमार 
८- भाजपा गायीची पूजा करते पण रक्षा करत नाही - शीला दिक्षित 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
९- महाड दुर्घटना: ओव्हळे गावाजवळ आणखी एक मृतदेह सापडला 
१०- गंगापूर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, गोदीवरीच्या पातळीत वाढ 
११- हेल्मेट न घातल्यास पाचशे रुपये दंड 
१२- पंकजांना भगवानगडावर राजकीय भाषण करता येणार नाही: नामदेवशास्त्री 
१३- पुण्यातील पाणीकपात रद्द, पालकमंत्री गिरीश बापटांची घोषणा 
१४- खडकवासला धरणातील पाणीसाठा 97 टक्के 
१४- सव्वीस शिक्षकांना हवी इच्छामरणाची परवानगी! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१५- भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या 3 वर, बचावकार्य सुरु 
१६- चालत्या लोकलमध्ये पोलीस शिपायाची छातीत गोळी झाडून आत्महत्या 
१७- नंदुरबारमध्ये भीषण अपघात, 6 मजुरांचा मृत्यू, 17 जखमी, 7 गंभीर 
१८- आर्चीसाठी बीडकर सैराट, तरुणांचा 'झिंगाट'वर ठेका 
१९- सातारा; सुई-दो-याने नागाचे तोंड शिवून दूध पाजण्याचा अघोरी प्रकार ! 
२०- उत्तराखंडमध्ये येत्या ७२ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता 
२१- संगमनेरमध्ये रानडुकराच्या हल्ल्यात शेतक-याचा मृत्यू  
२२- उत्तरप्रदेशात चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार, संशयिताला अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२३- रिओ ऑलिम्पिक : बार्शीकन्या प्रार्थना ठोंबरे आणि सानिया मिर्झा पहिल्याच फेरीत बाद 
२४- वरुण-नताशा लवकरच लग्नाच्या बेडीत? 
२५- आर्टिस्टिक जिम्नॅस्ट समीर सैदचा पाय गुडघ्याखालून मोडला 
२६- भारतीय महिला वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानू रिओ ऑलिम्पिकमधून बाहेर 
२७- ग्रेट ब्रिटनचा जलतरणपटू अॅडम पीटीचा विश्वविक्रम 
२८- एअर पिस्टल प्रकारात भारताच्या जीतू रायचं आव्हान संपुष्टात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

==========================================

भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या 3 वर, बचावकार्य सुरु

LIVE : भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या 3 वर, बचावकार्य सुरु
LIVE UPDATE : मृतांची संख्या 3 वर, ढिगाऱ्याखाली आणखी 5 जण अडकल्याची भीती

LIVE UPDATE : भिवंडीत 206 इमारती धोकादायक, 17 इमारती अत्यंत धोकादायक – स्थानिक आमदार रुपेश म्हात्रे

LIVE UPDATE :  मृतांची संख्या 2 वर, ढिगाऱ्याखाली 6 ते 7 जण अडकल्याची भीती

LIVE UPDATE : अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

भिवंडी (मुंबई) भिवंडीत पुन्हा एकदा इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. हनुमान टेकडी भागातील महादेव नावाची ही इमारत असून ती दोन माळ्यांची होती. या इमारतीखाली 6 ते 7 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.

सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

==========================================

चालत्या लोकलमध्ये पोलीस शिपायाची छातीत गोळी झाडून आत्महत्या

चालत्या लोकलमध्ये पोलीस शिपायाची छातीत गोळी झाडून आत्महत्या
मुंबई : बोरिवली-चर्चगेट ट्रेनमध्ये पोलीस शिपायाने आत्महत्या केली आहे. मालाड ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पोलीस शिपाई अमर गायकवाड यांनी स्वत:च्या रायफलने छातीत गोळी घालून जीवनयात्रा संपवली. 
बोरिवली चर्चगेट ट्रेनमध्ये लोकल पेट्रोलिंग ड्युटीवर असलेल्या अमर गायकवाड यांनी सेकंड क्लास डब्यात स्वत:वरच गोळी झाडली. 
त्यानंतर एएसआय धाडवे यांनी त्यांना उपचारासाठी जीटी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तपोर्यंत गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. 
पोलीस शिपाई अमर गायकवाड यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

==========================================

रिओ ऑलिम्पिक : बार्शीकन्या प्रार्थना ठोंबरे आणि सानिया मिर्झा पहिल्याच फेरीत बाद

रिओ ऑलिम्पिक : बार्शीकन्या प्रार्थना ठोंबरे आणि सानिया मिर्झा पहिल्याच फेरीत बाद
रिओ दी जनैरो : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे जोडीचं ऑलिम्पिकमधलं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं आहे. चीनच्या शुई पेन्ग आणि शुई झॅन्ग जोडीनं सानिया-प्रार्थना जोडीवर 7-6, 5-7, 7-5 असा तीन सेट्समध्ये विजय मिळवला असून भारताचा टेबलटेनिसपटू शरद कमलही रिओ ऑलिम्पिकमधून पहिल्याच फेरीत बाद झाला आहे.

सानिया-प्रार्थना जोडीनं दोन तास आणि 44 मिनिटं चाललेल्या या सामन्यात पहिला सेट टायब्रेकरमध्ये गमावला आहे. पण दुसरा सेट जिंकून त्यांनी जबरदस्त कमबॅक केलं. मात्र तिसऱ्या सेटमध्येही सानिया-प्रार्थना जोडीनं अनेक चुका केल्या. त्यामुळे त्यांना आपला गाशा पहिल्याच फेरीत गुंडाळावा लागला आहे.

तसेच रोमानियाच्या अॅड्रियन क्रिसननं शरद कमलवर 11-8, 14-12, 9-11, 11-6, 11-8 असा सहज विजय मिळवला. अॅड्रियन क्रिसनसमोर शरद कमल केवळ 38 मिनिटंच टिकाव धरु शकला. शरद कमलच्या या पराभवामुळं रिओ ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसमधलं भारताचं आव्हानही संपुष्टात आले आहे. याआधी भारताच्या सौम्याजित घोष, मनिका बत्रा आणि मौमा दास यांनाही पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे.


==========================================

वरुण-नताशा लवकरच लग्नाच्या बेडीत?

वरुण-नताशा लवकरच लग्नाच्या बेडीत?
मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. बालपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत वरुण सध्या डेटवर आहे. नताशा इंटिरिअर डिझायनर असून, दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली, तरी त्यांनी आपल्या प्रेमाला नकारही दिलेला नाही. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

याआधीही वरुण बऱ्याचदा नताशासोबत डिनर डेटवर दिसला होता. मात्र, वरुणने नताशासोबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, या साऱ्या अफवा आहेत. शिवाय, आम्हाला लग्न करायचे की नाही, हा निर्णय आताच घेणे घाईचे ठरेल, असेही वरुण म्हणाला.

‘ढिशूम’ सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये नताशा दिसली होती. ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, नताशा धवन कुटुंबींयांसोबत बऱ्याचदा दिसून आली आहे. तसंच धवन कुटुंबाचीही इच्छा आहे की, वरूण-नताशाचं लवकर लग्न व्हावं.

नताशाचं कुटुंब जून्या विचारांचे असल्याने वरूणचं नाव कुणा दुसऱ्या अभिनेत्रीसोबत जोडलं जाण्यापूर्वी लग्न व्हावं अशी धवन परिवाराची इच्छा आहे.

==========================================

आर्टिस्टिक जिम्नॅस्ट समीर सैदचा पाय गुडघ्याखालून मोडला

RIO 2016: आर्टिस्टिक जिम्नॅस्ट समीर सैदचा पाय गुडघ्याखालून मोडला
रिओ दि जनैरो रिओ ऑलिम्पिकमध्ये फ्रान्सचा आर्टिस्टिक जिम्नॅस्ट समीर ऐत सैदला गंभीर दुखापत झाली आहे. पुरुषांच्या वॉल्टिंग प्रकारादरम्यान समीर सैदचा पाय गुडघ्याखालून मोडल्याची घटना घडली.

रिओच्या ऑलिम्पिक अरेनात झालेल्या पात्रता फेरीत समीर सैदनं सुरुवात अगदी योग्य केली होती. पण वॉल्टवरुन उडी मारत असताना सैदचा पाय मोडला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

यावेळी डॉक्टरांनी तात्काळ सैदवर उपचार सुरु केले आणि काही वेळानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

26 वर्षांच्या समीर सैदचा गेल्याच वर्षी फ्रान्सच्या राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला होता. समीर सैदनं 2013 साली झालेल्या युरोपियन विजेतेपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. तर 2015 साली त्याला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं.

==========================================

भारतीय महिला वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानू रिओ ऑलिम्पिकमधून बाहेर

भारतीय महिला वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानू रिओ ऑलिम्पिकमधून बाहेर
Chanu Saikhom Mirabai, of India, fails in an attempt in the women's 48kg weightlifting competition at the 2016 Summer Olympics in Rio de Janeiro, Brazil, Saturday, Aug. 6, 2016. (AP Photo/Mike Groll)
रिओ दी जनैरो : भारतीय महिला वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानू रिओ ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. शनिवारी झालेल्या 48 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला पराभव स्विकारावा लागला आहे. मीराबाईने स्नॅच स्पर्धेत समाधानकारक होती. क्लीन अँड जर्कमध्ये तिला पदक मिळण्याची शक्यता होती. पण क्लीन अँड जर्कच्या तिन्ही प्रयत्नात तिला यश मिळाले नाही.

स्नॅच स्पर्धेत मीराबाईने दुसऱ्या प्रयत्नात आपले सर्वाधिक 82 किलोग्रॅम वजन उचललं. पण तिसऱ्या प्रयत्नात ती 84 किलो वजन उचलू शकली नाही. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 104 किलो वजन उचलण्यात तिला अपयश आले आणि पुढील 2 प्रयत्नातही ती 106 किलो वजन ती उचलू शकली नाही. त्यामुळे मीराबाई स्पर्धेतून बाहेर पडली.

मीराबाई 12 स्पर्धकांमध्ये 11व्या स्थानावर होती. या स्पर्धेत थायलँडच्या सोपिता तानसानने सुवर्ण पदक पटकावलं असून इंडोनेशियाच्या श्री वाह्यूनी ऑगस्टियानी आणि जपानच्या हिरोमी मियाके यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं आहे.

==========================================

ग्रेट ब्रिटनचा जलतरणपटू अॅडम पीटीचा विश्वविक्रम

RIO 2016 : ग्रेट ब्रिटनचा जलतरणपटू अॅडम पीटीचा विश्वविक्रम
रिओ दि जनैरो : रिओ ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी ग्रेट ब्रिटनचा जलतरणपटू अॅडम पीटीनं नवा विश्वविक्रम रचला. पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात अॅडम पीटीनं 57.55 सेकंदाची वेळ नोंदवून आपलाच विश्वविक्रम मोडून काढला.

अॅडम पीटीनं गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 57.98 सेकंदाची वेळ नोंदवली होती.

दरम्यान, अॅडम पीटीनं 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकाराची उपांत्य फेरी गाठली असून त्याच्याकडून आता सुवर्णपदकाची अपेक्षा केली जाते आहे. कारण 1988 सालानंतर ग्रेट ब्रिटनच्या एकाही जलतरणपटूला ऑलिम्पिकचं सुवर्णपदक जिंकता आलेलं नाही आहे.

==========================================

देशातील 80 टक्के गो-रक्षक ढोंगी आणि बनावट: पंतप्रधान मोदी

देशातील 80 टक्के गो-रक्षक ढोंगी आणि बनावट: पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली: गुजरातच्या उनामधील दलित मारहाणीला 25 दिवस झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.

गोरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी सुरु आहे. एवढंच नाही तर 80 टक्के गोरक्षक ढोंगी आणि बनावट आहेत. असं म्हणत गोरक्षकांना मोदींनी सुनावलं आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पीएमओ मोबाईल अॅप लाँच करण्यात आले. त्यावेळी मोदी बोलत होते.

11 जुलै रोजी गुजरातमधील उनामध्ये गाईचं मांस बाळगल्याच्या संशयावरुन दलित तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच मोदींनी त्यावर भाष्य केलं आहे. याविषयी पंतप्रधान मोदींनी अद्यापही भाष्य केलेलं नाही. अशी टीका विरोधकांकडून सुरु होती.

==========================================

महाड दुर्घटना: ओव्हळे गावाजवळ आणखी एक मृतदेह सापडला

LIVE : महाड दुर्घटना: ओव्हळे गावाजवळ आणखी एक मृतदेह सापडला
महाड (रायगड) महाडमधील सावित्री नदीवरील दुर्घटनेत आज शोधकार्यादरम्यान दोन मृतदेह आढळले आहेत. केंबुर्लीजवळ हॉटेल नीलकमलच्या पाठीमागे एक, तर ओव्हळे गावाजवळ आज दुसरा मृतदेह सापडला. त्यामुळे मृतदेहांचा आकाडा आता 27 वर पोहचला आहे.

LIVE UPDATE (11.03 AM) :  विसावा हॉटेलजवळ नदी पात्रात एसटीच्या पत्र्याचा आणखी एक भाग सापडला

LIVE UPDATE (10.54 AM) : ओव्हळे गावाजवळ आणखी एक मृतदेह सापडला, मृतदेहांची संख्या 27 वर

LIVE UPDATE (09.05 AM) : केंबुर्लीजवळ आणखी एक मृतदेह सापडला, या मृचदेहाची अद्याप ओळख पटली नाही, मृतदेहांची संख्या 26 वर


==========================================

रिओ ऑलिम्पिक: संशयास्पद वस्तूचा पोलिसांनीच नियंत्रित स्फोट घडवला

रिओ ऑलिम्पिक: संशयास्पद वस्तूचा पोलिसांनीच नियंत्रित स्फोट घडवला
फाईल फोटो
रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकच्या सायकल ट्रॅकजवळ मोठा आवाज झाल्यानं काही काळ बराच गोंधळ माजला होता. पण, या आवाजाच्या मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पोलिसांनी एका संशयास्पद बॅगेचा नियंत्रित स्फोट घडवल्याचं उघड झालं आहे.
आयसिसनं रिओ ऑलिम्पिकमध्ये घातपात घ़डविण्याची धमकी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्पर्धा ठिकाणी मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यामुळेच संशयास्पद बॅगतून काही धोका उद्भवू नये म्हणून बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांनी थेट नियंत्रित स्फोट घडवत संशयाला पूर्णविरोम लावला.
पण, नियंत्रित स्फोटामुळं मोठा आवाज झाल्यानं परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

==========================================

नंदुरबारमध्ये भीषण अपघात, 6 मजुरांचा मृत्यू, 17 जखमी, 7 गंभीर

नंदुरबारमध्ये भीषण अपघात, 6 मजुरांचा मृत्यू, 17 जखमी, 7 गंभीर
नंदुरबार :  शहादा- दोंडाईचा रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंपजवळ भीषण अपघात झाला आहे. मजुरांच्या टॅक्टरला ट्रकने धडक दिली. त्यामुळे या अपघातात 6 मजूर जागीच ठार झालेत, तर 17 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 7 जण गंभीर आहेत.

जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व मजूर शहादा तालुक्यातील मोहिदा गावाचे रहिवाशी आहेत.

==========================================

एअर पिस्टल प्रकारात भारताच्या जीतू रायचं आव्हान संपुष्टात

एअर पिस्टल प्रकारात भारताच्या जीतू रायचं आव्हान संपुष्टात
रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज जीतू रायचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं आहे. जितू रायला अंतिम फेरीत 78.7 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं

खरं तर त्यानं अंतिम फेरी गाठली आहे. जीतू रायनं नेमबाजीच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई करत सहावं स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला होता.

मात्रा अंतिम फेरीत त्याला अचूक वेध साधता न आल्यानं त्याचं आव्हन संपुष्टात आलं आहे.

==========================================

आर्चीसाठी बीडकर सैराट, तरुणांचा 'झिंगाट'वर ठेका

आर्चीसाठी बीडकर सैराट, तरुणांचा 'झिंगाट'वर ठेका
बीड: ‘सैराट’मुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्ची उर्फ रिंकू राजगुरूची एक झलक पाहायला मिळावी यासाठी बीडकरांची अक्षरश: झुंबड उडाली होती. रिलायन्स आणि नगर पालिकेच्या मोफत वाय-फायचे उदघाटन करण्यासाठी आलेल्या रिंकूनं बीडकरांना अक्षरशः याड लावलं. यावेळी हजारो तरुणांची आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

बीड नगरपरिषद आणि रिलायन्सच्या वतीने जिओ वाय-फाय सेवेचे उदघाटन करण्यात आले. यासाठी सैराट फेम रिंकू राजगुरू उर्फ आर्ची हिच प्रमुख आकर्षण होती. साधारणपणे 11 वाजताच्या कार्यक्रमासाठी बीडकरांनी सकाळी 9 वाजेपासून तुफान गर्दी केली होती. तरुण मुलं, मुली आणि महिलांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती.

rinku 2

राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि अर्चीच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला

अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात रिंकूनं या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या वेळी तरुणांनी बेधुंद होत सैराटच्या झिंगाट गाण्यावर डान्स केला. ‘ए परश्या आर्ची आली आर्ची…’ हाच आवाज परिसरात घुमत होता.

==========================================

पुण्यातील पाणीकपात रद्द, पालकमंत्री गिरीश बापटांची घोषणा

पुण्यातील पाणीकपात रद्द, पालकमंत्री गिरीश बापटांची घोषणा
पुणे: पुण्यातली पाणीकपात रद्द करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री गिरीष बापट यांनी केली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पुण्यातली पाणीकपात रद्द कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाच्या जोरदार हजेरीमुळं पुण्यातल्या धरणांची पातळी वाढली आहे. तरी देखील पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता.

दरम्यान, पाणी कपातीच्या मुद्यावरून पुण्यात चांगलच राजकारण रंगलं होतं. महापौरांनी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आयुक्तांनी अंमलबजावणीला विरोध केला.

आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपात रद्द करण्यात आल्यामुळं पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

==========================================

गंगापूर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, गोदीवरीच्या पातळीत वाढ

गंगापूर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, गोदीवरीच्या पातळीत वाढ
नाशिक: गंगापूर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु झाल्यानं गोदावरी नदीत होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. परिणामी गोदावरीच्या पुराची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे अगोदरच नुकसान झालं असताना नदीची पुराची पातळी पुन्हा वाढण्यानं नाशिकरांची चिंता वाढली आहे. गोदावरीच्या पुरामुळे दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी गेलं आहे. त्यामुळे नाशिक शहारासह जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरणातून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

==========================================

पंकजांना भगवानगडावर राजकीय भाषण करता येणार नाही: नामदेवशास्त्री

पंकजांना भगवानगडावर राजकीय भाषण करता येणार नाही: नामदेवशास्त्री
औरंगाबाद: भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे. कारण भगवान गडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे नाही तर तीव्र आंदोलन करु असा इसारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला आहे.

भगवान गडावर राजकीय भाषण होणार नाही अशी भूमिका भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली आहे. त्याविरोधात वंजारी सेवा संघानं आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसात नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद सुरु झाले. त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

भगवान गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण होतं. मात्र मुंडेंच्या निधनानंतर आता भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरुन वादंग होण्याची शक्यता आहे.

==========================================

सुई-दो-याने नागाचे तोंड शिवून दूध पाजण्याचा अघोरी प्रकार !

  • ऑनलाइन लोकमत 
    सातारा, दि. ७ -  नागपंचमीच्या मुहूर्तावर चौका-चौकात दुधाच्या अभिषेकाने भिजू पाहणारा नाग अखेर सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे वन विभागाच्या कार्यालयात जाऊन विसावला. यावेळी सुई-दो-याने नागाचे तोंड शिवून त्याला टोपलीत बंद केल्याचे कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. 
    वाई येथील गंगापुरी भागात नागांना दूध पाजण्याच्या निमित्ताने दोन गारुडी महिलांकडून पैसे घेत असल्याची कुणकुण लागताच काही सर्पमित्र तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी बंदिस्त टोपली उघडून बघितली तेव्हा त्यात जीवंत नाग आढळून आला. समोरच्याला चावण्यासाठी तोंड उघडता येऊ नये म्हणून त्याचे तोंड दोन्ही बाजूने शिवण्यात आले होते. 
    हा विकृत प्रकार पाहून कार्यकर्त्यांनी लगेच वनखात्याशी संपर्क साधला. मात्र, ' यात विशेष काय ?' अशा अविर्भावात प्रकरण किरकोळीत काढण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा कायद्यावर बोट ठेवून सर्पमित्रांनी आक्रमक भूमिका घेतली. तक्रार दाखल केली. अखेर नागांसह गारुड्यांची वन विभागाच्या कार्यालयात रवानगी झाली. 
==========================================

रिओ ऑलिम्पिक - पहिल्या फेरीतच सानिया- प्रार्थना जोडीचा पराभव


  • शिवाजी गोरे
    रिओ दी जानेरो, दि. ७ -  भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस, रोहन बोपण्णा पाठोपाठ सानिया मिर्झा -प्रार्थना ठोंबरे जोडीला महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. सानिया-प्रार्थना जोडीला चिनच्या पेन सुई - झेंगे सुई जोडीने  ६-७, ७-५, ५-७ असे पराभूत केले. 
    लिएंडर आणि सानिया दुहेरीतील भारताचे अव्वल टेनिसपटू आहेत. त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा होती. रिओ ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी टेनिसटपटूंनी भारतीय क्रीडाप्रेमींना निराश केले. पुरुष आणि महिला दुहेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता टेनिसमध्ये फक्त मिश्र दुहेरीतील आव्हान जिवंत आहे. 
    लिएंडर आणि रोहन बोपण्णा जोडीलाही पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. पुरूष दुहेरीत मार्सिन मॅटकोवोस्की व लुकास्ड कोबोटने यांनी पेस-बोपण्णाचा ४-६, ६-७(६) असा पराभव केला. 

==========================================

विमाने घ्याल, तरच कारखाना भारतामध्ये!


  • नवी दिल्ली : जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या आमच्या एफ-१६ ब्लॉक ७० या विमानांचीच भारतीय हवाई दलासाठी खरेदी करण्याची हमी भारताने दिली तरच, कारखाना इथे हलविण्याची आमची तयारी आहे, असा प्रस्ताव लॉकहीड मार्टिन या संरक्षणसामुग्रीचे उत्पादन करणाऱ्या बलाढ्य अमेरिकी कंपनीने दिला
    आहे.
    ‘मेक इन इंडिया’चा फायदा घेऊन जगातील कंपन्यांनी भारतात यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यास अनुसरून लॉकहीड मार्टिन कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे. कंपनीच्या एफ-१६ व्यवसाय विभागाचे प्रमुख रॅण्डल एल. हॉवर्ड म्हणाले की, एफ-१६ ब्लॉक ७० लढाऊ विमाने भारतासाठी, तिथेच तयार करून त्यांची तेथूनच जगभरात निर्यात करण्याची कंपनीची तयारी आहे. ती भारतने घेण्याच्या अटीवरच कंपनी अमेरिकेतील कारखाना इथे हलविणार का, असे विचारता कंपनीचे भारतातील प्रभारी अभय परांजपे यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.
    भारताने विमाने खरेदी करायलाच हवीत, अशी अट घालताना तुम्ही एफ-१६ विमाने पाकिस्तानला न देण्याची हमी द्यायला तयार आहे का, या प्रश्नाला सरळ उत्तर देण्याचे टाळत ते म्हणाले, आमची विमाने भारतीय हवाई दलासाठी सर्वोत्तम आहेत. त्यामुळे दिलेला शब्द पाळेल, असा भागीदार भारताने निवडणे महत्त्वाचे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
    लॉकहीड मार्टिनचा प्रस्ताव
    लॉकहीड मार्टिन कंपनीने आत्तापर्यंत एफ-१६ जातीची ४,५८८ विमाने जगभर विकली आहेत. कंपनीकडे सध्या असलेल्या आॅर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांचा अमेरिकेतील कारखाना आणखी वर्षभर सुरु राहू शकेल. इतर देशांकडून मागणी आली तर कारखाना त्यापुढे पाच वर्षे सुरु राहू शकेल.
    भारतात कारखाना सुरु केल्यास भारताची गरज भागविण्याखेरीज इतरांसाठी आणखी १०० विमाने येथे उत्पादित करण्याची कंपनीची योजना आहे. -अमेरिकेच्या हवाई दलात एफ-१६ विमाने पुढील किमान एक दशक तरी वापरात राहणार आहेत.

==========================================

NSG साठी पाठिंबा देण्यास नकार देणा-या चीनला हवी आहे भारताची मदत


  • ऑनलाइन लोकमत - 
    बिजिंग, दि. 6 - न्यूक्लियर सप्लायर ग्रुप (एनएसजी) देशांच्या गटात भारताच्या समावेशाला आव्हान देणा-या चीनने दक्षिण चीन समुद्राचा मालकी हक्क मिळवण्यासाठी भारताची मदत मागितली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी तीन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. 12 ऑगस्टपासून त्यांच्या दौ-याला सुरुवात होणार आहे. या दौ-यात वांग यी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असून जी20 बैठकीत भारताने दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा उचलू नये यासाठी प्रयत्न करणार आहे. भारताने आपल्या बाजूने उभे राहावे अशी चीनची अपेक्षा आहे.
    दक्षिण चीन समुद्रावर चीनने केलेला मालकी हक्काचा दावा अयोग्य असून त्याला कायदेशीर व ऐतिहासिक आधार नाही, असा निकाल द हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाने दिला होता. फिलिपिन्सने दाखल केलेल्या या खटल्यावरील निकाल जाहीर होताच चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाने तो मान्य करण्यास साफ नकार दिला. आंतरराष्ट्रीय लवाद बेकायदेशीर असून दक्षिण चीन समुद्रातील वाद हा त्याच्या अधिकार कक्षेतील विषय नाही, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चिनी परराष्ट्र मंत्रालय यांच्या वतीने सांगण्यात आले होते.
    आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेल्या या निकालानंतर अमेरिकेसह अनेक देश हा मुद्दा उचलून धरतील याची चीनला भीती वाटत आहे. 

==========================================

No comments: