Tuesday, 9 August 2016

नमस्कार लाईव्ह ०९-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
1- डास पळविण्यासाठी प्यायल्या जातात दररोज १०० सिगारेट 
2- पाकमध्ये रुग्णालयात स्फोट, ७० जण ठार 
3- डेल्टा एअर लाइनची सेवा विस्कळीत 
4- जपानवरील अणुबॉम्ब हल्याला ७१ वर्षे.... 
5- पॉल पोग्बा जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
6- अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मृतावस्थेत आढळले 
7- राष्ट्रपतींपेक्षा मुख्यमंत्र्यांचा तर राज्यपालांपेक्षा सचिवांचा पगार जास्त 
8- 'आयर्न लेडी' आज 16 वर्षांनी उपोषण सोडणार 
9- एकटाच हनीमूनला गेलेल्या पतीच्या मदतीस धावल्या सुषमा स्वराज 
10- बु-हान वानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 3 जवानांना केलं ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
11- उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर सव्वा तास चर्चा 
12- राज्यातील 30 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 
13- महाराष्ट्रातील 3 आमदारांनी वेतनवाढ नाकारली 
14- चार शिक्षक आमदारांना पगारवाढही नको 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
15- कोल्हापुरात डॉक्टर दाम्पत्याची हत्या, डोकं आणि मानेवर वार 
16- आर्चीने उद्घाटन केलेल्या वायफाय सेटची बीडकरांकडून तोडफोड 
17- जायकवाडीचा पाणीसाठा 50 टक्के, उद्योगांची पाणीकपात रद्द 
18- मुंब्य्रात बाळंतीण सुनेसह विहिणीची हत्या, सासू ताब्यात 
19- ऐन गर्दीच्या वेळी मध्य, हार्बर रेल्वेचा बोजवारा 
20- केसांचा टोप घालून नमाजपठण करु नका - देवबंद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
21- शोभा डेंकडून रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची थट्टा 
22- झेनचा सिनेमॅक्स 3 बाजारात 
23- फुटबॉलपटू पॉल पोग्बाचा मॅन्चेस्टर युनायटेडशी 815 कोटींचा करार 
24- वाढदिवसाला जिम्नॅस्ट दीपा कर्माकर नजरकैदेत! 
25- रिओ ऑलिम्पिक : तीन दिवसात ४ लाख ५० हजार कंडोमचे वाटप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
===========================================

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मृतावस्थेत आढळले

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मृतावस्थेत आढळले
इटानगर : अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल आज राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. ते 47 वर्षांचे होते.

राष्ट्रपती राजवटीदरम्यान कलिखो पूल हे फेब्रुवारी ते जुलै 2016 या चार महिन्यांसाठी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मात्र राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडलं लागलं होतं.

काही वृत्तानुसार, कलिखो पूल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप या शक्यतेला दुजोरा दिलेला नाही.

===========================================

कोल्हापुरात डॉक्टर दाम्पत्याची हत्या, डोकं आणि मानेवर वार

कोल्हापुरात डॉक्टर दाम्पत्याची हत्या, डोकं आणि मानेवर वार
कोल्हापूर : कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावात डॉक्टर दाम्पत्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. डॉ. उद्धव आणि प्रज्ञा कुलकर्णी असं या डॉक्टर दाम्पत्याचं नाव आहे.


हे दाम्पत्य मागील 40 वर्षांपासून रुकडी गावात 10 बेडचं छोटसं हॉस्पिटल चालवत होतं. पण तीन दिवसांपासून रुग्णालय बंद होता. त्यामुळे आज सकाळी ग्रामस्थांनी दरवाजा फोडला असता त्यांना दोघांचेही मृतदेह आढळले.


डॉ. उद्धव आणि प्रज्ञा यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर वार करुन त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

===========================================

राष्ट्रपतींपेक्षा मुख्यमंत्र्यांचा तर राज्यपालांपेक्षा सचिवांचा पगार जास्त

राष्ट्रपतींपेक्षा मुख्यमंत्र्यांचा तर राज्यपालांपेक्षा सचिवांचा पगार जास्त
मुंबई : भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हा देशाचा पहिला नागरिक असतो तर राज्यपाल हा संबंधित राज्याचा प्रमुख असतो. या हिशेबाने त्यांचा पगारही जास्त असेल असा सगळ्यांचा समज आहे. मात्र लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालांचा सचिव त्यांच्यापेक्षा जास्त पगार घेणार आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींपेक्षा बक्कळ मानधन मिळणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर ही पगारवाढ होणार आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर मंत्री आणि आमदारांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

===========================================

शोभा डेंकडून रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची थट्टा

शोभा डेंकडून रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची थट्टा
मुंबई : प्रसिद्ध लेखिका शोभा डे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. शोभा डे यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची थट्टा उडवली आहे. ट्विटरवरुन शोभा डे यांनी भारतीय पथकावर निशाणा साधला

Goal of Team India at the Olympics: Rio jao. Selfies lo. Khaali haat wapas aao. What a waste of money and opportunity.

भारतीय पथकाचं एकच लक्ष आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या. पैसा आणि संधी वाया घालवा अशा प्रकारचा ट्वीट शोभा डे यांनी केला. त्यानंतर देशभरातल्या ट्विटराईट्सकडून शोभा डे यांच्यावर टीकेचा भडीमार केला जातो आहे.
===========================================

आर्चीने उद्घाटन केलेल्या वायफाय सेटची बीडकरांकडून तोडफोड

आर्चीने उद्घाटन केलेल्या वायफाय सेटची बीडकरांकडून तोडफोड
बीडः ‘सैराट’फेम रिंकू राजगुरुच्या हस्ते दोन दिवसांपुर्वीच मोठ्या थाटात मोफत वायफाय सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र फुकट्या वायफाय युझर्सचा त्रास वाढल्यामुळे नागरिकांनी एक अॅक्सेस पॉईंटच तोडून टाकला आहे.


बीड नगरपालिका आणि रिलायन्स यांनी शहरात मोफत वायफाय सेवेचा शुभारंभ केला आहे. मात्र फुकट्या युझर्सचा नागरिकांना रात्री बेरात्री त्रास सहन करावा लागत आहे. संतप्त नागरिकांनी ही सेवाच तोडण्याचा प्रयत्न केला.

का केली तोडफोड?

वायफाय युझर्सचे टोळके अॅक्सेस पॉईंट असलेल्या ठिकाणी रात्रभर ठिय्या घालतात. त्यामुळे या टवाळखोरीचा नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांनी अॅक्सेस पॉईंटचे बॉक्स तोडून काही ठिकाणचे वायर टाकले आहेत. त्यामुळे काही काळासाठी इंटरनेट सेवा ठप्प झाली होती.

===========================================

राज्यातील 30 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या


राज्यातील 30 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : महाराष्ट्रातील 30 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव जे. पी. गुप्ता यांच्यासह बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

IAS अधिकाऱ्यांची नावं आणि नवीन नियुक्ती :

अरविंद कुमार
आधी- व्यवस्थापकीय संचालक, कृषी उद्योग विकास महामंडळ
नवीन नियुक्ती- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई (MPCL)

एन. आर. गद्रे
आधी- प्राधन सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी, सामान्य प्रशासन
नवीन नियुक्ती- प्रधान सचिव आणि एसईओ-I, सामान्य प्रशासन


===========================================

झेनचा सिनेमॅक्स 3 बाजारात


झेनचा सिनेमॅक्स 3 बाजारात
मुंबई : झेन कंपनीने आपला नवा स्मार्टफोन “सिनेमॅक्स 3” बाजारात आणला आहे. सँडस्टोन फिनीशसोबत काळ्या रंगातील या फोनची किंमत 5,499 आहे. या फोनची विक्री रिटेल स्टोअर आणि ई-कॉमर्स साईट्सवर सुरू आहे.

या मोबाईलसह 499 रूपयांमध्ये प्रोटेक्शन कीट मिळणार आहे, ज्यात स्क्रीन गार्डसोबतच प्रोटेक्टिव्ह केसही दिली जाणार आहे. हा फोन अॅक्वा फिश, कार्बन ऑरा पॉवरसारख्या स्मार्टफोनना टक्कर देणार आहे.

सिनेमॅक्स 3 फिचर्स

डिस्प्ले- 5.5 FWVA IPS डिस्प्ले
प्रोसेसर- 1.3 GHz क्वाड कोअर प्रोसेसर
रॅम- 2जीबी
मेमरी- 16जीबी इंटर्नल मेमरी
कॅमेरा- 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 3.2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
बॅटरी- 2900 mAh
कनेक्टिविटी- 3जी, ब्लूटूथ आणि वायफाय
ओएस- अँड्रॉइड लॉलिपॉप 5.1

===========================================

फुटबॉलपटू पॉल पोग्बाचा मॅन्चेस्टर युनायटेडशी 815 कोटींचा करार

फुटबॉलपटू पॉल पोग्बाचा मॅन्चेस्टर युनायटेडशी 815 कोटींचा करार
लंडन : फ्रान्सचा पॉल पोग्बा जगातला सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे. पॉल पोग्बानं इंग्लंडच्या मॅन्चेस्टर युनायटेडशी 5 वर्षांसाठी जवळपास 815 कोटी रुपयांचा करार केला आहे.

पोग्बानं कमाईच्या बाबतीत आता गॅरेथ बेल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना मागे टाकलं आहे. गॅरेथ बेलनं 2013 साली रिआल माद्रिदशी 740 कोटी रुपयांचा करार केला होता.

दरम्यान पॉल पोग्बानं आपल्या कारकीर्दीची सुरुवात ही मॅन्चेस्टर युनायटेडकडूनच केली होती. पण 2012 साली मॅन यूला रामराम ठोकून पोग्बा इटलीच्या युवेंटस संघात दाखल झाला. त्यावेळी पोग्बानं  युवेंटसशी केवळ 7 कोटी रुपयांच्या आसपास करार केला होता.

गेल्या चार वर्षात पोग्बानं दमदार कामगिरी करुन फुटबॉलविश्वावर आपला ठसा उमटवला. त्यामुळंच मॅन्चेस्टर युनायटेडनं पोग्बाला पुन्हा एकदा आपल्या संघात दाखल करुन घेतलं.

===========================================

जायकवाडीचा पाणीसाठा 50 टक्के, उद्योगांची पाणीकपात रद्द

जायकवाडीचा पाणीसाठा 50 टक्के, उद्योगांची पाणीकपात रद्द
औरंगाबादः जायकवाडी धरण 2008 सालापासून एकदाही पूर्ण क्षमतेनं भरलं नव्हतं. मात्र या घडीला 50 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठाने गेल्या काही महिन्यांपासून मद्य कारखाने आणि उद्योगांसाठी केलेली पाणीकपात मागे घेतली आहे.


जिवंत पाणीसाठा संपून जायकवाडी यंदा मार्चच्या सुरुवातीलाच मृतसाठ्यात गेलं होतं. मात्र नाशिक, नगर पट्टयात झालेल्या पावसामुळं जायकवाडीतला उपयुक्त जलसाठा आता 47 टक्क्यांवर पोहोचला आहे. औरंगाबादमध्ये नागरिकांना चौथ्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो. याबाबतही प्रशासन काही निर्णय घेईल, अशी आशा आहे.


औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील 12 जिल्ह्यांमधल्या मद्य उद्योग आणि इतर व्यवसायांना ही पाणी कपात लागू होती. खंडपीठाने ती कपात आता मागे घेतली आहे. मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी जायकवाडीतल्या या साठ्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

===========================================

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर सव्वा तास चर्चा

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर सव्वा तास चर्चा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रतोद यांची वर्षा बंगल्यावरील बैठक संपली असून, या बैठकीत शिवसेना पक्ष प्रतोद आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सव्वा तास विभागनिहाय वन टू वन चर्चा केली. या बैठकीत भाजप आमदारांइतकाच निधी सेना आमदारांनाही देण्याचे निश्चित झाले,असल्याचे सू्त्रांकडून समजते.

या बैठकीवेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, संजय शिरसाठ, शंभुराजे देसाई, सुभाष साबणे, अनिल कदम, प्रताप सरनाईक, अजय चौधरी,  नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रत्येक प्रतोदाने आपल्या विभागातील आमदारांच्या समस्या समजावून सांगितल्या. तसेच या समस्या सोडवण्यातील सर्व अडचणी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी समजून घेतल्या. या बैठकीवेळी शिवसेनेच्या विभागनिहाय आमदारांची सर्व लोकोपयोगी कामेही लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

===========================================

महाराष्ट्रातील 3 आमदारांनी वेतनवाढ नाकारली

महाराष्ट्रातील 3 आमदारांनी वेतनवाढ नाकारली
मुंबई : महाराष्ट्रातील 3 आमदारांनी वेतनवाढ नाकारली आहे. नुकताच महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला. अमरावतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सर्वप्रथम ही वेतनवाढ नाकारली होती.

वेतनवाढ नाकारणाऱ्या आमदारांमध्ये अमरावतीच्या श्रीकांत देशपांडेंसह रामनाथ मोते आणि कपिल पाटील यांचा समावेश आहे. हे तिघेही शिक्षक आमदार आहेत. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळे वेतनवाढ स्वीकारणे चुकीचे ठरेल असे मत त्यांनी मांडल आहे.

महाराष्ट्रातील 288 विधानसभा आमदार, 78 विधानपरिषद आमदार आणि 39 मंत्र्यांच्या वेतनात वाढ झाली आहे.
दरम्यान, अशाप्रकारे वेतनवाढ नाकारता येत नाही. त्यामुळे वाढलेले वेतन त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

===========================================

वाढदिवसाला जिम्नॅस्ट दीपा कर्माकर नजरकैदेत!

रिओ दी जनेरोः रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठल्यानंतर भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दीपाचा आज 23 वाढदिवस आहे. मात्र तिला प्रशिक्षकाने नजरकैदेत ठेवलं आहे. त्यामुळे कोणीही दीपाला शुभेच्छा देऊ शकणार नाही.


दीपा 14 ऑगस्टला व्हॉल्टमध्ये अंतिम फेरीत खेळणार आहे. त्यापूर्वी तिला कोणीही भेटी नये यासाठी प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी तिला नजरकैदेत ठेवलं आहे. दीपाला केवळ तिचे आईवडील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतील.

सेलिब्रिशन थांबवू शकतो, पण संधी नाही- बिश्वेश्वर नंदी

दीपाच्या मोबाईलमधून सिम कार्ड काढण्यात आलं आहे. तिला भेटण्यासाठी सर्वांना मनाई करण्यात आली आहे. दीपाचे आई-वडील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतील. दीपाचं सर्व लक्ष सध्या खेळावर केंद्रीत केलं आहे, असं नंदी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

===========================================

'आयर्न लेडी' आज 16 वर्षांनी उपोषण सोडणार

'आयर्न लेडी' आज 16 वर्षांनी उपोषण सोडणार
इंफाळः मणिपूरची ‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला आज तब्बल 16 वर्षांनी उपोषण सोडणार आहे. स्थानिक न्यायालयात आज सकाळी साडे 10 वाजता शर्मिला उपोषण सोडणार आहेत. शर्मिला यांनी मागील महिन्यात उपोषण सोडण्याची घोषणा केली होती.


मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्यासाठी 2000 साली उपोषण सुरु केलं. मात्र सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी तब्बल 16 वर्ष उपोषण सुरु ठेवलं.

कोण आहेत इरोम शर्मिला?

शर्मिला यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं. शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्यासाठी गेल्या 16 वर्षांपासून त्यांचं उपोषण सुरु आहे. या काळात त्यांना अनेकदा अटक करण्यात आली. शिवाय त्यांना जबरदस्ती अन्न देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

===========================================

मुंब्य्रात बाळंतीण सुनेसह विहिणीची हत्या, सासू ताब्यात

मुंब्य्रात बाळंतीण सुनेसह विहिणीची हत्या, सासू ताब्यात
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये एका महिलेने आपल्या सुनेसह तिच्या आईची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपी सासूला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुनेच्या हत्येमुळे अवघ्या 40 दिवसांच्या बाळाचं मातृत्व हरपलं आहे.

मुंब्य्रातील शिमला पार्कमधील सहयोग बिल्डिंगमध्ये हे हत्याकांड घडल्याचं वृत्त आहे. सासूने सून आणि सुनेच्या आईची म्हणजेच विहिणीला शीतपेयातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर दोघींची गळा कापून हत्या केली.


मुंब्रा पोलिसांनी केला हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी सासूला ताब्यात घेतलं आहे. मृत सुनेला 40 दिवसांचं बाळ असून हुंड्यासाठी सासू सुनेचा छळ करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान मुंब्रा पोलिस अधिक तपास करत आहेत.

===========================================

वाढदिवशी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर नजरकैदेत


  • ऑनलाइन लोकमत - 
    रिओ दि जानेरो, दि. 9 - 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचा आज वाढदिवस आहे. मात्र तिला वाढदिवसाचं कोणतही सेलिब्रेशन करण्याची परवानगी नसून तिला नजरैदेत ठेवण्यात आलं आहे. यामागचं कारण म्हणजे दीपा कर्माकरने व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठली असल्याने तिला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. जिम्नॅस्टिक्‍सच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय महिला ठरली आहे.
    दीपाचा आज 23वा वाढदिवस आहे. प्रशिक्षकांनेी नजरकैदेत ठेवलं असल्याने कोणालाही दीपाला भेटण्याची परवानगी नाही.  दीपा 14 ऑगस्टला व्हॉल्टमध्ये अंतिम फेरीत खेळणार आहे. त्यापूर्वी तिला कोणीही भेटी नये यासाठी प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी तिला नजरकैदेत ठेवलं आहे. दीपाला केवळ तिचे आईवडील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतील.
===========================================

रिओ ऑलिम्पिक : तीन दिवसात ४ लाख ५० हजार कंडोमचे वाटप


  • शिवाजी गोरे 
    रिओ दि जानेरो, दि. ९ - आॅलिम्पिक स्पर्धेत विविध विक्रमांची नोंद होत असते. त्यातच रियो आॅलिम्पिकमध्ये अवघ्या तीन दिवसात एका नवीन विकमाची नोंद झाली आहे. गेम्स व्हिलेजमद्ये ४ लाक ५० हजार कंडोम वाटले गेले आहेत. जगातील विविध स्पर्धांच्या वेली किती कंडोम वाटले जाता याचा सर्व्हे करणारे  लंडन येथिल क्वीन मेरी विद्यापीठाचे स्पोट्स मेडिसिनचे प्राध्यापक निकोला मालफुल्ली  यांनी सांगितले. 
    निकोला म्हणाले, पहिल्या तीन दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम वाटप होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अथेन्स्, बीजिंग आणि लंडन आॅलिम्पिक स्पर्धेत मी वैद्यकिया अधिकारी म्हणून काम केले आहे. पण त्या तिन्ही वेळेस एवढ्या मोठ्या  प्रमाणात मागणी झाली नव्हती. या स्पर्धेत  अशीच जर मागणी राहिली तर कंडोमचा तुटवडा नक्कीच भासणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, वैद्यकिय शास्त्रनुसार जर खेळाडूने सामन्याच्या आधी कोणत्याही पुरूष व महिला खेळाडूने सेक्स केले तर दोघांच्याही कामगिरीवर चांगला परिणार होतो. त्याच्या कॅलेरीज सुध्दा वाढतात. अनेक प्रकारच्या खेळांचे खेळाडू कंडोमचा  उपयोग करतात. क्रीडा क्षेत्रात सेक्स करणे हे उत्तेजक प्रकारात येत नाही. त्यामुळे खेळाडू कंडोमचा जास्त उपयोग करतात. आॅलिम्पिक स्पर्धेत कंडोम वाटण्याची प्रथा १९८८ मध्ये  सोऊल येथून झाली. 
    निकोला शेवटी म्हणाले, नागरीक या गोेष्टीकडे वेगळ्या नजरेने पहातात. पण सध्याच्या काळात याची जास्त आवश्यकता आहे. स्पर्धेच्या काळात खेळाडूंनी सेक्स करणे काहीच गैर नाही. लंडन, अमेरीका, युरोप, ग्रीस, पोर्तुगाल, इटली येथिल खेळाडू स्पर्धेच्या पूर्वी एकदा करी सेक्स करतात. हे त्याचे व्यवस्थापक आणि मार्गदर्शकांना सुध्दा माहित असते. पुढे असे व्हयला नको की हा प्रकार सुध्दा उत्तेजक म्हणून बंद व्हावा. कारण आपण क्रीडा क्षेत्रात उत्तेजन द्रव्य सेवन असे म्हणतो. याचा अर्थ असा कि त्या खेळाडूने त्याच्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी गोळ्या किंवा इंजेक्शन घेतले असेल, मग सेक्समुळे सुध्दा खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होते. म्हणून सेक्स बंद करायचे!.  


===========================================

एकटाच हनीमूनला गेलेल्या पतीच्या मदतीस धावल्या सुषमा स्वराज


  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 9 - हनिमूनसाठी परदेशी जायची सर्व तयारी झाली होती. तिकीटही बुक झाली, व्हिसाही मिळाला. आणि ऐन वेळेला पत्नीचा पासपोर्ट हरवला. मग काय पत्नीला सोडून हे महाशय एकटेच हनिमूनसाठी निघून गेले. पण हनिमून एकट्याने करायचा कसा ? शेवटी फैजान पटेल याने आपल्या पत्नीच्या फोटोसहित काढलेला फोटो ट्विटरवर टाकत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली. 
    ट्विटरवर नेहमी अॅक्टिव्ह असणा-या सुषमा स्वराज यांनी नेहमीप्रमाणे दखल घेत लगेच उत्तर दिलं. 'तुमच्या पत्नीला माझ्याशी संपर्क साधायला सांगा. तुमच्यासोबत बाजूच्या सीटवर ती असेल याची खात्री देते', असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं. सुषमा स्वराज यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे डुप्लिकेट पासपोर्टही मिळवून दिला. सुषमा स्वराज यांच्या मदतीने एकमेकांची सोबत मिळालेल्या या दांपत्याने सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. 

===========================================

डास पळविण्यासाठी प्यायल्या जातात दररोज १०० सिगारेट


  • पुणे : डास पळविण्यासाठी सामान्य माणूस दररोज १०० सिगारेट ओढण्याइतका धूर स्वत:च्या शरीरात घेत असल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे. डास पळविणाऱ्या कॉईल जाळताना दरवाजे-खिडक्या बंद केल्यामुळे
    हा प्रकार घडतो. यामुळे काळा दमा
    हा आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे.
    काळा दमा हा आजार अतिशय हलक्या पावलाने शरीरात प्रवेश करत असल्याने त्याच्या ९५ टक्के
    रुग्णांचे निदानच होत नसल्याचे चेस्ट रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
    घरातील विविध उपकरणांतून निघणारा धूर हा नकळत व्यक्तीच्या फुफ्फुसात गेल्याने फुफ्फुसाची श्वसन क्षमता कमीकमी होत जाते. असे वारंवार झाल्यास ही क्षमता खूपच खालावते आणि व्यक्तीला श्वसनास मोठ्या प्रमाणात त्रास होतो.

===========================================

चार शिक्षक आमदारांना पगारवाढही नको


  • पुणे : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने, त्याचा निषेध म्हणून चार शिक्षक आमदारांनी वेतनवाढच नव्हे, तर वेतनही न घेण्याची घोषणा सोमवारी येथे केली. याशिवाय रामनाथ मोते आणि कपिल पाटील यांनी पगारवाढ नाकारत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
    महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, डॉ. सुधीर तांबे आणि श्रीकांत देशपांडे सहभागी झाले होते. शिक्षण आयुक्तालयासमोर झालेल्या सभेमध्ये काळे यांनी वेतन न घेण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, ‘शिक्षकेतर आकृतीबंधाबाबत नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, तसेच इतर मागण्या आश्वासन देऊनही मान्य केल्या जात नाहीत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत होऊ लागला आहे. त्यामुळे आम्ही चार शिक्षक आमदारांनी वेतनवाढच नव्हे, तर वेतनही न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण हक्क कायदा लागू झालेला असला, तरी त्यातील तरतुदींकडे कानाडोळा केला जात आहे, असे डॉ. तांबे यांनी सांगितले. कारभार स्वीकारल्यानंतर शासनाकडे पैसे नाहीत, असे मंत्री म्हणत आहेत, पण एकदा जबाबदारी स्वीकारली आहे, तर शिक्षणातील प्रश्न वाढू देऊ नका, असे देशपांडे व सावंत म्हणाले. दरम्यान, आमदारांच्या वेतनवाढीविरोधात हायकोर्टात याचिका करण्यात आली आहे. 

===========================================

ऐन गर्दीच्या वेळी मध्य, हार्बर रेल्वेचा बोजवारा


  • मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वेचा बोजवारा उडाल्याच्या घटना सोमवारी घडल्या. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील विद्याविहार येथे सकाळच्या सुमारास सिग्नलमध्ये बिघाड झाला. तर संध्याकाळी हार्बरच्या गुरू तेज बहादूर नगर स्थानकाजवळ (जीटीबी) एका लोकलच्या टपावरील प्रवाशाला ओव्हरहेड वायरचा शॉक लागला. यात त्याचा मृत्यू झाला. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे हार्बर एक तास विस्कळीत झाली होती.
    मध्य रेल्वेवरील विद्याविहार स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत सकाळी १0.२५च्या सुमारास बिघाड झाला. या बिघाडामुळे मेन लाइनच्या धिम्या मार्गावरील लोकल तब्बल २0 मिनिटे उशिराने धावत होत्या. बिघाड दुरुस्त होण्यास सकाळचे ११ वाजले. त्यामुळे लोकल आणखीनच उशिराने धावू लागल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. त्यानंतर संध्याकाळी ६.४0च्या सुमारास पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल जीटीबी स्थानकाकडे पोहोचत असतानाच टपावरील एक प्रवासी ओव्हरहेड वायरला चिकटला. या घटनेमुळे हार्बरवरील लोकल सेवेचा बोजवारा उडाला. चिकटलेल्या प्रवाशाला काढण्यासाठी ६.४९नंतर त्या ठिकाणचा ओव्हरहेड वायरचा विद्युतप्रवाह बंद करण्यात आला आणि प्रवाशाला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर रात्री ७.४५च्या सुमारास विद्युतप्रवाह सुरू करून लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या. तब्बल एक तास हार्बरचा बोऱ्या वाजल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यात हार्बरच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मृत प्रवाशाचे नाव बदरू यादव (२८) असून, सायन कोळीवाडा झोपडपट्टीत राहणारा आहे. 

===========================================

केसांचा टोप घालून नमाजपठण करु नका - देवबंद


  • मेरठ, दि. ९ - देशातील सर्वात मोठी मुस्लिम शिक्षण संस्था दारूल उलूम देवबंदने मुस्लिमांना नवीन सल्ला दिला आहे. केसांचा कुत्रिम टोप आणि कुत्रिम दाढी लावून नमाज पठणाला बसू नका असा सल्ला देवबंदने दिला आहे. 
    केसांचा टोप आणि कुत्रिम दाढीमुळे नमाज पठण अपूर्ण रहाते असे देवबंदने म्हटले आहे. नमाजपठणापूर्वी हात-पाय, चेहरा धुणे आणि डोक्यावर पाणी घेणे आवश्यक आहे. पण केसाच्या टोपामुळे पाणी डोक्याच्या त्वचेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे 'वाझू'चा उद्देश पूर्ण होत नाही आणि शरीर अशुद्ध रहाते असे देवबंदचे प्रवक्ते अश्रफ उस्मानी यांनी सांगितले. 
    केसांचा विग घालणे इतके आवश्यक असेल तर, नमाजपठणाच्यावेळी तो विग काढून ठेवावा असे उस्मानी यांनी सांगितले. ज्यांनी केसांचे प्रत्यारोपण ( हेअर ट्रान्सप्लांट) केले आहे त्याने काही समस्या नाही असेही देवबंदने स्पष्ट केले. 

===========================================

बु-हान वानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 3 जवानांना केलं ठार


  • ऑनलाइन लोकमत - 
    श्रीनगर, दि. 9 - हिजबूल मुजाहिद्नीनचा दहशतवादी बु-हान वानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच सोमवारी कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी हल्ला करण्यात आला. बीएसएफ जवानांवर करण्यात आलेल्या या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. तर काही जवान जखमीदेखील झाले आहेत. यावेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. 'कमांडर बु-हान वानीला श्रद्धांजली देण्यासाठीच आम्हीच भारतीय जवानांवर हल्ला केल्याचं', हिजबूलचा प्रवक्ता बु-हान-उद-दीन याने सांगितलं आहे. 
    पाकिस्तानलगत असलेल्या सीमारेषेजवळील मछिल सेक्टरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी बीएसएफच्या पोस्टवर फायरिंग केली. दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरच्या समस्या सोडवण्याच्या आणि लोकांमधील रोष कमी करण्याच्या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

===========================================

पाकमध्ये रुग्णालयात स्फोट, ७० जण ठार


  • कराची : बलुचिस्तान प्रांतात सरकारी रुग्णालयावर तालिबानने सोमवारी केलेल्या हल्ल्यात ७० ठार, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. मृत आणि जखमींपैकी बहुतांश लोक वकील असून, दोन पत्रकारांचाही मृतांत समावेश आहे.
    हल्लेखोरांनी आधी आत्मघाती बॉम्बस्फोट आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करीत रुग्णालयाला लक्ष्य केले. आज सकाळी हत्या करण्यात आलेले बार असोसिएशनचे अध्यक्ष बिलाल अन्वर कसी यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यांच्या मृत्यूने दु:खी झालेले वकील तिथे पोहोचले. त्यांचा मृतदेह अपघात विभागात होता. तेथेच भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटानंतर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचे व त्यासाठी आठ किलो स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. हल्लेखोराने स्फोटके त्याच्या शरीराला बांधली असावीत. 
    • =======================================================
    • डेल्टा एअर लाइनची सेवा विस्कळीत


      • अटलांटा (जॉजिर्या):   आंतरराष्ट्रीय संगणक यंत्रणेतील बिघाडामुळे तब्बल सहा तास ठप्प झालेली डेल्टा एअर लाइनची सेवा अखेर र्मयादित स्वरुपात सोमवारी रात्री सुरू झाली. या बिघाडामुळे अमेरिक ा, जपान, इटलीसह जगभरातील लाखो प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
        डेल्टा ही जगातील दुसरी सर्वात मोठी हवाई सेवा असून, अँटलांटा येथील पॉवर हबमध्ये झालेल्या बिघाडामुळे जगभरातील संगणक तथा संचार यंत्रणा ठप्प झाली आहे. यामुळे ४५१ विमानाच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून डेल्टा एअर लाइनला करोडो डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
        या घटनेची व्याप्ती पाहता विमानसेवा पूर्ववत होण्यासाठी दोन दिवसांचा अर्थात बुधवारपर्यंत वेळ लागणार असल्याचे डेल्टा एअर लाइनच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

      • =======================================================
      • जपानवरील अणुबॉम्ब हल्याला ७१ वर्षे....


        • ऑनलाइन लोकमत
          मुंबई, दि. ९ : दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर विध्वासंक अणुबॉम्ब टाकले होते यामध्ये अनेक निरापराध लोकांचे बळी गेले होते. हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. त्यात सुमारे १ लाख ४० हजार नागरिक ठार झाले होते. ९ ऑगस्ट रोजी नागासाकी वर दुसरा अणुबॉम्ब टाकला होता. कित्येक जण त्या अणुबॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या आगीत ठार झाले. नंतर कितीतरी जखमी आणि स्फोटामुळे निर्माण झालेल्या किरणोत्सर्गाने आजारी पडून आठवड्यात, महिन्यात आणि वर्षात मरण पावले. तीन दिवसांनंतर नागासाकी शहरावर अमेरिकेने दुसरा अणुबॉम्ब टाकला, त्यात ७४ हजार लोक ठार झाले होते.
          जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. मात्र आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. मात्र, रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला. त्यानंतर दुसरा अणुबॉम्ब हल्ला ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर केला होता .

        • =======================================================
        • पॉल पोग्बा जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू


          • ऑनलाइन लोकमत - 
            लंडन, दि. 9 - फ्रान्सचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाने इंग्लंडच्या मॅन्चेस्टर युनायटेडशी जवळपास 815 कोटी रुपयांचा करार केला आहे.  5 वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. या करारासोबत पॉल पोग्बा सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे. गेल्या चार वर्षात पॉल पोग्बाने केलेल्या कामगिरीच्या आधारे त्याच्याशी ही करार करण्यात आला आहे. 
            पोग्बानं कमाईच्या बाबतीत आता गॅरेथ बेल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनाही मागे टाकलं आहे. गॅरेथ बेलनं 2013 साली रिआल माद्रिदशी 740 कोटी रुपयांचा करार केला होता. मॅन्चेस्टर युनायटेडमधून आपल्या करिअरची सुरुवात कऱणा-या पॉल पोग्बाने 2012 साली पोग्बा इटलीच्या युवेंटस संघात प्रवेश केला होता. त्यावेळी पोग्बानं युवेंटसशी केवळ 7 कोटी रुपयांच्या आसपास करार केला होता. 
          • =======================================================

No comments: