Tuesday, 2 August 2016

नमस्कार लाईव्ह ०२-०८-२०१६ चे बातमीपत्र


==================================

मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : फडणवीस

मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : फडणवीस
मुंबई : मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आलेलाच नाही. तो निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही, तर केंद्राचा असतो. भाजपची पहिल्यापासून छोट्या राज्यांची भूमिका, तर शिवसेनेची सुरुवातीपासून अखंड महाराष्ट्राची भूमिका आहे. मात्र आम्ही युती सरकार म्हणून सत्तेत असलो, तरी वेगळ्या विदर्भाचा प्रस्तावाच नसल्यामुळे, ही चर्चा इथेच थांबवावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळात विदर्भाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजप आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी केल्याने, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत, अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या.

तसंच मुख्यमंत्री आणि भाजप सरकराने स्वत:ची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी लावून धरली  होती. मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. जर त्यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडून विदर्भ वेगळा करायचा असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, मग मागणी करावी, अशी आक्रमक मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं.

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, धरणं तुडुंब, गोदामाईला पूर


नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, धरणं तुडुंब, गोदामाईला पूर
नाशिक नाशिक जिल्ह्यातली गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळं नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे.

 गोदामाईला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी


मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातली धरणं तुडुंब भरली आहेत. त्यामुळं सध्या गंगापूर  धरणातून 3 हजार 647, दारणा धरणातून 11 हजार 688, नांदुर मध्यमेश्वर- 10 हजार 925 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नाशकात पूर स्थिती निर्माण झाली आहे.

==================================

मोदी सरकारचं सेलिब्रेशन, जाहिरातींचा खर्च तब्बल 35 कोटी

मोदी सरकारचं सेलिब्रेशन, जाहिरातींचा खर्च तब्बल 35 कोटी
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमीत्त करण्यात आलेल्या जाहिरातबाजीवर तब्बल 35.58 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. मोदी सरकारला 26 मे रोजी सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाले, त्यानिमीत्त 35.58 कोटी रुपयांची जाहिरातबाजी करण्यात आली.
 

माहिती अधिकर कार्यकर्ते अनिल गलगली यांनी देशभरातील जाहिरातीवर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती मागवली होती. डीएव्हीपीने देशभरातील 11 हजार 236 वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातींची माहिती दिली आहे.


मोदी सरकारच्या ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, विकासाची गती, गुंतवणूक अशा सरकारच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी हा निधी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती डीएव्हीपीने दिली आहे. गलगली यांनी काँग्रेस सरकारच्या काळात द्वितीय वर्षपूर्तीनिमीत्त किती खर्च करण्यात आला याचीही माहिती मागवली होती. मात्र काँग्रेसने कसलंही जाहिरात अभियान राबवलं नव्हतं अशी माहिती, डीएव्हीपीने दिली आहे.
==================================

दिघा अनधिकृत इमारतींवरील लक्षवेधी पुढे ढकलली, उद्या हायकोर्टात सुनावणी

दिघा अनधिकृत इमारतींवरील लक्षवेधी पुढे ढकलली, उद्या हायकोर्टात सुनावणी
मुंबई :  नवी मुंबईमधील दिघा परिसरातील 96 अनधिकृत इमारतींबाबत लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली आहे. दिघ्यातील अनधिकृत इमारतींबाबत मुंबई हायकोर्टात उद्या सुनावणी असल्यामुळे लक्षवेधी पुढे ढकलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विनंती केली होती. त्यानंतर लक्षवेधी पुढे ढकलण्याचा निर्णय झाला.

दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई हायकोर्टात राज्य सरकाराने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. हायकोर्टात उद्या यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर राज्य सरकार दिघा प्रकरणावर विधिमंडळात माहिती देणार आहेत.

दिघ्यातील अनधिकृत इमारती पाडण्याला 31 जुलैपर्यंत मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली होती. मात्र, 31 जुलैपर्यंत नवे धोरण आणण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर सरकारने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे सरकारने दिघाप्रश्नावर नक्की कोणते धोरण आणि कोणती भूमिका घेतली आहे, हे उद्या हायकोर्टातील सुनावणीनंतरच कळणार आहे.
==================================

आमचं नातं भाऊ-बहिणीचं, पण लोकांच्या संशयामुळे आत्महत्या करतोय

'आमचं नातं भाऊ-बहिणीचं, पण लोकांच्या संशयामुळे आत्महत्या करतोय'
नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे येथे राहणाऱ्या दोघांनी रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात शैलेश आमरे या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे.

सोमवारी मध्यरात्री 12.30च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. खान्देश्वर ते मानसरोवर या स्थानकांदरम्यान ही घटना घडली असून यात जखमी महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या महिलेला वाशीच्या मनपा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला असून त्यांना घटनास्थळावरुन सुसाईडनोटही सापडली आहे. आमचं नातं भाऊ-बहिणीचं आहे, पण लोक सतत संशय घेत असल्याने आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

==================================

कोकणात 2 दिवसांपासून मुसळधार, नद्यांच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ

कोकणात 2 दिवसांपासून मुसळधार, नद्यांच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ
रत्नागिरीः कोकणात वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहर आणि ग्रामीण तसेच चिपळूण आणि खेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे. वशिष्ठी आणि नारिंगी नद्यांच्या जलपातळीत वाढ झाल्यामुळे या दोन्ही शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे.


पावसामुळे काही भागात पूल कोसळण्याच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. पावसाचा वाढता जोर पाहता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर रत्नागिरी शहरातही पावसाची संततधार सुरुच आहे. चांदेराई परिसरात पुराचं पाणी चढल्यामुळे काल ही बाजारपेठ रिकामी करावी लागली आहे.


पावसाची सध्याची परिस्थिती पाहता नद्यांतील पाण्याचा वेग कायम राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. कोकणात येत्या काळात मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वेधशाळेने वर्तवली होती.

==================================

राजेश खन्ना-नसिरुद्दीन शाह वादावर अक्षयने मौन सोडलं!

राजेश खन्ना-नसिरुद्दीन शाह वादावर अक्षयने मौन सोडलं!
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने राजेश खन्ना-नसिरुद्दीन शाह वादावर मौन सोडलं आहे. “नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या दिवंगत सासऱ्यांबद्दल जे बोलले त्यावर आपल्याला काही भाष्य करायचे नाही, त्यांनी माफी मागितल्यामुळे यावर बोलणे योग्य होणार नाही”, अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली आहे.

राजेश खन्ना वादावर अक्षय कुमारला विचारले असता अक्षयने हा मुद्दा संपल्याचे सांगितले. “नसिरुद्दीन शाह यांनी माफी मागितल्याने हा विषय संपला आहे. आता यावर काही बोलणे योग्य नसून हा विषय मागे पडला आहे. त्यामुळे माझ्याकडे मीडियाला सांगण्यासाठी काही नाही,” असंही तो म्हणाला.

राजेश खन्ना 70च्या दशकातील कमी दर्जाचे अभिनेता असल्याचं नसिरुद्दीन शाह म्हणाले होते. तसेच त्यांनी खूप सामान्य चित्रपट केले आहेत, असंही म्हटलं होतं. पण यावर बोलताना अक्षय म्हणाला की, “सिनेमा जगताला एकत्र राहू द्या, जेव्हा कोणी माफी मागतो तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवत वाद मिटवला पाहिजे”.

==================================

मालिका मिळत नसल्याने 'भाभीजी...' फेम शिल्पा शिंदेचा निर्णय


==================================

No comments: