Monday, 14 March 2016

नमस्कार लाईव्ह १४-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- तुर्की; दहशहतवादी हल्ल्याने तुर्कीची राजधानी हादरली, 34 जणांचा मृत्यू
२- लंडन; 'कुकर बॉम्ब' म्हटले म्हणून इंग्लंडमध्ये चारवर्षाच्या मुलावर कारवाईची शिफारस 
३- आयव्हरी कोस्टमध्ये ग्राण्ड बॅससॅमबीचवर गोळीबारात १६ ठार 
४- वॉशिंग्टन; मोदींपेक्षा माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री - त्रुदेऊ 
५- लॉस एंजिल्स; ऐकत नाही, उद्धट वागतो म्हणून मूल रुग्णालयात टाकून ‘ती’ निघून गेली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- सलमानच्या बीईंग ह्युमन स्टोअरमधील सेल्स गर्ल्सवर लैंगिक अत्याचार
७- लातूर; बच्चे बडे हो रहे हैं, संघाच्या फुल पँटवर ओवेसींची टीका 
८- ब्रिटीश नागरिकत्वाच्या मुद्यावरून राहुल गांधींना नोटीस 
९- कर्जबुडव्यांना शिक्षा ठोठाविणार -सरकारचा इशारा 
१०- इंदिरा गांधी विमानतळावर ५३२ किलो सोने जप्त 
११- ‘कांगारू कोर्टा’ने दिला ५३ जणांना मृत्युदंड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- छगन भुजबळ ईडी कार्यालयात, कार्यकर्त्यांचीही गर्दी  
१३- ठाणे; सूरज परमार आत्महत्या : चारही नगरसेवकांचं पद रद्द करण्याचे आदेश 
१४- नागपूर; आम्ही आधीच स्मार्ट, आणखी बनण्याची गरज नाही : गडकरी 
१५- दोन वर्षात मुस्लिम समाजाला फक्त दोन टक्के कर्ज मंजूर 
१६- राज्यात गारपिटीची शक्यता  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- दिल्ली; मिरची खाल्ल्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू 
१८- चेन्नई लोकप्रिय तामिळ अभिनेत्याची आत्महत्या 
१९- पुणे; मुलाच्या नशेबाजीला कंटाळून आईनेच केली लेकाची हत्या  
२०- नंदूरबार; कापूस व्यापाऱ्यांना ५ कोटींचा चुना  
२१- हर्बरवर विद्युत परिवर्तन चाचणी यशस्वी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- मलायका-अरबाजच्या घटस्फोटावर सलीम खान काय म्हणतात  
२३- यावेळी पाकिस्तानविरुद्ध विजय अवघड 
२४- बांगलादेशच्या तमिमचं वादळी शतक, ओमानचा पालापाचोळा  
२५- संजय दत्तच्या मुलीने शेअर केलं तिच्या आईचं शेवटचं पत्र 
२६- आता 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अर्जुन कपूरचं अफेअर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
'पुण्य' कमविण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणे गरजेचे नसते, तुम्ही जेंव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असते.
[उत्तम सुभाष मन्ना, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
समीर चक्रवर्ती, कृष्णा झंवर, विवेक राठी, अमित मुथा, विनय जैन, महादेव शिंगारे, नागोराव वानखेडे, नागेश सूर्या, बालाजी खंदारे, अमोल मानवतकर, अजित गतानी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


======================================

सलमानच्या बीईंग ह्युमन स्टोअरमधील सेल्स गर्ल्सवर लैंगिक अत्याचार



पुणे : सलमान खानच्या बीईंग ह्युमन एनजीओच्या पुण्यातील स्टोरमध्ये काम करणाऱ्या दोन सेल्स गर्ल्सवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी राजेश कौल आणि दीपक पाटील या दोघांना अटक केली. मात्र दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे.
 बीईंग ह्युमन एनजीओचे अधिकारी असल्याची बतावणी आरोपींनी केली होती. तुम्ही ग्राहकांना योग्य सुविधा देत नसून कामावरुन काढून टाकू अशी धमकी या दोघांनी दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी नवीन शोरुम दाखवण्याच्या बहाण्याने आरोपी सेल्स गर्ल्सना मॉलमध्ये घेऊन गेले. मॉलमध्ये जाताना आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तरुणींनी केली आहे. मात्र गाडी एका ठिकाणी थांबल्यानंतर मुलींनी तिथून पळ काढला. 
दरम्यान आरोपी दीपक आणि राजेश हे आमच्या संस्थेचे कर्मचारी नाहीत, असा दावा बीईंग हयुमनने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हडपसर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
======================================

छगन भुजबळ ईडी कार्यालयात, कार्यकर्त्यांचीही गर्दी LIVE : छगन भुजबळ ईडी कार्यालयात, कार्यकर्त्यांचीही गर्दी


मुंबई: नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयासमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही गर्दी केली आहे.

चौकशीला हजर राहण्याबाबत त्यांना आधीच समन्स बजावण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना सीबीआयनं अटकही केली. काही दिवस सीबीआय कोठडीत काढल्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली.

दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधकाम कंत्राटात अफरातफर केल्याचा आरोप छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीरवर आहे. याशिवाय मुंबईतील कलिना विद्यापीठ भूखंड घोटाळा, अंधेरी आरटीओ, मुंबई-नाशिक टोल रोड, नवी मुंबईतील हेक्स वर्ल्ड हौसिंग प्रकल्पसारखे  9 विविध प्रकल्पात आपल्या जवळच्या नातेवाईकांना कंत्राट देऊन सुमारे 870 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांच्यावर हवाला आणि मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
======================================

सूरज परमार आत्महत्या : चारही नगरसेवकांचं पद रद्द करण्याचे आदेश

ठाणे बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी नगरसेवकांची अपात्रतेची कारवाई सुरु झाली आहे. कारण या नगरसेवकांचं पद रद्द करा, असे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर ठाणे महापालिकेनं या नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या चारही नगरसेवकांवर आहे.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे,  काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे सुधाकर चव्हाण या चार नगरसेवकांची नावे परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत होती. सूरज परमार यांनी 7 ऑक्टोबर 2015 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

या चारही नगरसेवकांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे या चौघांना अटकपूर्व जामीन अर्ज मागे घ्यावा लागला. त्यानंतर या नगरसेवकांनी डिसेंबर 2015 मध्ये शरणागती पत्करण्यासाठी न्यायालयाकडे अवधी देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य करत या चौघांना सकाळी 9 वाजता ठाणे पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या नगरसेवकांनी शरणागती पत्करली.
======================================

मिरची खाल्ल्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

मिरची खाल्ल्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
नवी दिल्ली : मिरची खाल्ल्याने नाका-तोंडातून पाणी येतं, हे सगळ्यांनाच माहित आहे, पण मिरची किती धोकादायक ठरु शकते, याचं उदाहरण दिल्लीत पाहायला मिळालं. दोन वर्षांच्या एका मुलीचा मिरची खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे.

या चिमुकलीने चुकून मिरची चावल्याने तिचा मृत्यू झाला. मिरची खाल्ल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने चिमुकलीने जीव गमावला.

दोन वर्षांच्या मुलीचा दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु होते. द्रव पदार्थ श्वसननलिकेत गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मिरची खाल्ल्यानंतर मुलीला अनेक वेळा उलट्या झाल्या. परिणामी द्रव पदार्थ श्वसननलिकेत गेला. त्यामुळे श्वसनाला त्रास झाल्याने चिमुकलीचा अवघ्या 24 तासात गुदमरुन मृत्यू झाला, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

अटॉप्स सर्जन चित्तरंजन बेहरा यांच्या माहितीनुसार, “ही घटना दुर्मिळ नाही. पण एम्समधील हे पहिलंच प्रकरण आहे. मिरची खाल्ल्याने डॉक्टरांनी ही घटना मेडिको- लीगल जरनलमध्ये छापली आहे, जेणेकरुन अशी घटना पुन्हा घडली तर त्यावेळी कोणते उपाय करावेत याबाबत इतर डॉक्टरांना कळू शकेल.”
======================================

दहशहतवादी हल्ल्याने तुर्कीची राजधानी हादरली, 34 जणांचा मृत्यू

दहशहतवादी हल्ल्याने तुर्कीची राजधानी हादरली, 34 जणांचा मृत्यू
अंकारा : तुर्कीची राजधानी अंकारात कारमध्ये झालेल्या स्फोटात 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 125 जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हल्ला घडवलेल्या दोघांचाही समावेश आहे. स्फोट एवढा मोठा होता की, स्फोटाचा आवाज संपूर्ण शहरात ऐकायला गेला.

किजिले परिसरात एका बस स्टॉप आणि पार्कजवळ हा स्फोट झाला. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर या स्फोटाला जबाबदार संघटनेचं नाव जाहीर करु, असं तुर्कीच्या एका मंत्र्याने सांगितलं.

मागील महिन्यातही अंकारामध्ये झालेल्या स्फोटात एका सुमारे 30 जणांचा मृत्यू झाला होता. कुर्दिस्तान वर्कर पार्टीच्या (पीकेके) एका गटाने ही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

सहा महिन्याच्या अंतरात तुर्कीच्या राजधानीत तीन स्फोट झाले आहेत. यामुळे तुर्कीसमोर सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा आहे, हे समजतं.
======================================

आम्ही आधीच स्मार्ट, आणखी बनण्याची गरज नाही : गडकरी

आम्ही आधीच स्मार्ट, आणखी बनण्याची गरज नाही : गडकरी
नागपूर : जे आधीच स्मार्ट असतात, त्यांना स्मार्ट बनवण्याची गरज नसते, नागपूरचे आमदार स्मार्ट आहेत. आपले मुख्यमंत्री स्मार्ट आहेत. मी स्वतः स्मार्ट आहे. त्यामुळे आपल्याला वेगळ्या योजनेतून स्मार्ट बनण्याची गरज नाही, असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं. ते नागपुरात बोलत होते.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडल्या गेलेल्या २० शहरात नागपूरचा क्रमांक नाही. मात्र नागपूर आधीच स्मार्ट आहे, असा दावा नितीन गडकरींनी केला. अनेक योजना सुरु होण्याच्या आधीच आपण नागपूरला विकासाच्या पथावर नेलंय, असं त्यांनी म्हटलं. तसेच नागपुरात होऊ घातलेली मेट्रो ही देशात सर्वात स्मार्ट असेल असा दावाही त्यांनी केला.
======================================
यावेळी पाकिस्तानविरुद्ध विजय अवघड? 
टी ट्वेण्टी विश्वचषकात 19 मार्चला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. हा सामना धरमशालाऐवजी कोलकात्याच्या ईडन गार्ड्न्स मैदानावर होणार आहे. भारताच्या विजयाबाबत देशवासियांना विश्वास आहे. मात्र आकडेवारी काही वेगळंच सांगते.

======================================

बांगलादेशच्या तमिमचं वादळी शतक, ओमानचा पालापाचोळा 

धरमशाला मश्रफे मोर्तझाच्या बांगलादेशने ओमानचा 54 धावांनी धुव्वा उडवून ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या सुपर टेन फेरीत प्रवेश केला. धरमशालाच्या मैदानात झालेल्या या लढतीत पावसाचंच वर्चस्व पाहायला मिळालं.

पावसानं व्यत्यय आणण्याआधी, बांगलादेशनं 20 षटकांत 2 बाद 180 धावांची नोंद केली. तमिम इक्बालच्या नाबाद 103 आणि सब्बीर रहमानच्या 44 धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशनं ही मजल मारली. त्यानंतर ओमानच्या डावादरम्यान पावसानं वारंवार हजेरी लावली.

डकवर्थ लुईस नियमानुसार ओमानला आधी 16 षटकांत 154 आणि मग 12 षटकांत 120 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. पण ओमानला 9 बाद 65 धावांचीच मजल मारता आली. शाकिब अल हसननं सर्वाधिक चार विकेट्स काढून बांगलादेशच्या विजयाला हातभार लावला.
======================================

संजय दत्तच्या मुलीने शेअर केलं तिच्या आईचं शेवटचं पत्र

संजय दत्तच्या मुलीने शेअर केलं तिच्या आईचं शेवटचं पत्र
मुंबई : तुरुंगातून कायमची सुटका झाल्यानंतर अभिनेता संजय दत्त कुटुंब आणि मित्रांसमवेत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत.

संजय दत्तचे कुटुंब आणि मित्रांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. संजूबाबाच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यात त्याची मुली त्रिशला दत्तही मागे नाही. ती ट्विटरवर सातत्याने संजयबाबतचे ट्वीट करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या आईचं शेवटचं पत्र ट्विटरवर शेअर केलं.

त्रिशला ही संजय दत्त आणि रिचा शर्माची मुलगी आहे. रिचा शर्मा ही संजयची पहिली पत्नी आहे. रिचाचा वयाच्या 33 व्या वर्षी कॅन्सरने मृत्यू झाला होता.

त्रिशलाने तिच्या आईचं अतिशय भावनिक असलेलं शेवटचं पत्र ट्विटरवर शेअर करुन आठवणींना उजाळा दिला आहे.
======================================

आता 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अर्जुन कपूरचं अफेअर

आता 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अर्जुन कपूरचं अफेअर!
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर अफेअरमुळे चर्चेत असतो. सोनाक्षीसोबत वेगळं झाल्यानंतर अर्जुन आता अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथियाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

अर्जुन कपूर त्याच्या आगामी ‘की अॅण्ड का’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

अर्जुन आणि आथिया नुकतेच पुनीत मल्होत्राच्या पार्टीत एकत्र आले. पण कॅमेऱ्यासमोर येण्यास दोघांनीही नकार दिला. मात्र अर्जुनने या पार्टीतील एक फोटो शेअर केला आहे. या पार्टीत अर्जुनची एक्स गर्लफ्रेण्ड सोनाक्षी सिन्हा देखील आली होती.
======================================

लोकप्रिय तामिळ अभिनेत्याची आत्महत्या

लोकप्रिय तामिळ अभिनेत्याची आत्महत्या
चेन्नई : तामिळमधील लोकप्रिय टीव्ही अभिनेता साई प्रशांतने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 30 वर्षीय साई प्रशांतने रविवारी स्वत:च्या घरात विष पिऊन आयुष्य संपवलं.

साईच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र एकाकी आयुष्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

प्रशांतने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन, तीन महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं होतं. त्यानंतर त्याने लगेचच आत्महत्या केल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत.

प्रशांतने ‘अन्नामलाई’, सेल्वी, अरासी यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याने ‘नेरम’, ‘तेगीडी’ आणि ‘वाडाकरी’ यासारख्या तामिळ सिनेमातही भूमिका साकारल्या आहेत. प्रशांतने व्हिडीओ जॉकी म्हणून करिअरला सुरुवात केली होती.
======================================

बच्चे बडे हो रहे हैं, संघाच्या फुल पँटवर ओवेसींची टीका

बच्चे बडे हो रहे हैं, संघाच्या फुल पँटवर ओवेसींची टीका
लातूर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गणवेश बदलण्यापेक्षा विचार बदलण्याची गरज असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे. बच्चे बडे हो रहे है, असं म्हणत ओवेसींनी संघाला चिमटाही काढला आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात ‘पाकीस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, तर कोणीच आक्षेप घेतला नाही. मी घोषणा दिल्या असत्या, तर गद्दार ठरवलं असतं, असेही ओवेसी म्हणाले.

खासदार ओवेसींची लातूरमधील उदगीर येथे काल जाहीर सभा झाली. त्याआधी पत्रकार परिषदेत त्यांनी संघ आणि श्री श्री रविशंकर यांच्यावर टीका केली.
======================================

मुलाच्या नशेबाजीला कंटाळून आईनेच केली लेकाची हत्या 

मुलाच्या नशेबाजीला कंटाळून आईनेच केली लेकाची हत्या
पुणे : पोटच्या पोराच्या नशेला कंटाळून पुण्यात आईनेच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे.

दोन महिन्यांपूर्वी पुण्याच्या कोथरुड परिसरात इंदुबाई मालपोटे यांनी आपल्या तीन साथीदारांसोबत मुलगा अक्षयचा हत्या केली. यानंतर अक्षयचा मृतदेह ताम्हणी घाटातील निर्जन स्थळी टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला.

खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार पोलिसांनी तपासाची सूत्र हलवतं या प्रकरणात इंदूबाई आणि तिच्या साथीदारांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार अक्षय हा सतत नशा करायचा. त्याच्या या नशेबाजीमुळे इंदुबाई त्रस्त होत्या. त्यामुळे न राहवून आपल्या साथीदारांच्या मदतीने इंदुबाईंनी अक्षयचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खून केला.
======================================

ब्रिटीश नागरिकत्वाच्या मुद्यावरून राहुल गांधींना नोटीस 


  • नवी दिल्ली, दि. १४ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ब्रिटीश नागरिकत्वाच्या मुद्यावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. या मुद्यावरून संसदेच्या शिस्तपालन समितीतर्फे राहुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ब्रिटीश नागरिकत्वाबाबत विचारणा करण्यात आली आहे.
    अखेर लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीतर्फे राहुल गांधी यांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली. ' तुम्ही स्वत:ला कधी ब्रिटीश नागरिक म्हटले होते का?' असा सवाल त्यांना विचारण्यात आला आहे.  या समितीचे सदस्य अर्जुन राम मेघवाल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. ' या प्रकरणी राहुल गांधींकडून उत्तर आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले. 
    काही महिन्यांपूर्वी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींकडे भारतासोबतच ब्रिटनचे नागरिकत्व असल्याचा आरोप केला होता, त्यासाठी त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली होती. ब्रिटीश कंपनीतील कागदपत्रांमध्ये राहुल गांधी यांनी ब्रिटीश नागरिक असल्याचा उल्लेख केल्याचे स्वामी यांनी म्हटले होते. दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून राहुल यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर दिल्लीतील भाजपा नेते महेश गिरी यांनीही जानेवारी महिन्यात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी केली होती. 
======================================

दोन वर्षात मुस्लिम समाजाला फक्त दोन टक्के कर्ज मंजूर


  • मुंबई, दि. १४ - सरकारी बँकांकडून मुस्लिम समुदायाला २०१४-१५ मध्ये फक्त दोन टक्के कर्ज वितरीत झाल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते एम.ए.खालिद यांना माहिती अधिकारातंर्गत मुंबईतील अर्धा डझन बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१४-१५ मध्ये आणि २०१५-१६ मध्ये ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत मुस्लिम समुदायाला फक्त दोन टक्के कर्जे मंजूर झाली. 
    मुस्लिमांना कर्ज देण्यासाठी कुठलीही वेगळी मार्गदर्शक तत्वे नाहीत. २०११ च्या जनगणनेनुसार मुस्लिमांची लोकसंख्या १७.२२ कोटी आहे. त्यातुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे  विचारवंत आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. 
    पंजाब अँड सिंध बँक, अलहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, विजया बँक आणि आंध्रा बँकेकडून खालिद यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यापैकी अलहाबाद बँकेची आकडेवारी फक्त चांगली आहे. 
    कर्ज वाटपात मुस्लिमांचा वाटा वाढावा यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ, सबका विकास या घोषणेचा फोलपणा यातून दिसतो अशी टिका खालिद यांनी केली. 
======================================

मलायका-अरबाजच्या घटस्फोटावर सलीम खान काय म्हणतात 


  • मुंबई, दि. १४ - मलायका अरोरा आणि अरबाज खान या दोघांकडूनही घटस्फोटाच्या बातमीवर अद्यापपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये हे नाते तुटेपर्यंत इतके टोकाला का गेले ? याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. 
    अरबाजचे वडील सलीम खान यांना या घटस्फोटाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, मी एक लेखक आहे. मला कोणाच्या प्रेम प्रकरण आणि ब्रेक अपबद्दल विचारु नका. मी माझ्या मुलांच्या आयुष्यात हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे मला या विषयावर बोलायचे नाही असे सलीम यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.  
    मलायकची आई जॉयसी पॉलीकार्प यांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार मलायका आणि अरबाजमधले मतभेद दूर करण्यासाठी उपनगरातील एका हॉटेलमध्ये मलायकाचे आई-वडील आणि बहिण अमृता दोघांना भेटले होते. 
    पण त्यातून काहीही सकारात्मक घडले नाही. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर दोघे स्वतंत्र गाडीमधून निघून गेले होते. अरबाजचा भाऊ सलमानने देखील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण मलायका विवाहाला दुसरी संधी न देण्याच्या विचारात आहे.
======================================

'कुकर बॉम्ब' म्हटले म्हणून इंग्लंडमध्ये चारवर्षाच्या मुलावर कारवाईची शिफारस 


  • लंडन, दि. १४ - इंग्लंडमध्ये एका चारवर्षाच्या मुलाने कुकुंबरचा उल्लेख चुकून कुकर बॉम्ब असा केला म्हणून इंग्लंडमधल्या नर्सरी शाळेने त्या मुलाला डि-रॅडीकलायजेशन प्रोग्रॅमला (कट्टरपंथीय विचारांच्या प्रभावापासून दूर नेण्याचा कार्यक्रम) पाठवण्याची शिफारस केल्याची घटना समोर आली आहे. हा मुलगा आशियाई वंशाचा आहे. 
    या मुलाने एक माणूस हातात सूरा घेऊन भाज्या कापत असल्याचे चित्र काढले होते. त्यामुळे ल्युटॉन स्थित नर्सरी शाळेने या मुलाला कट्टरपंथीय विचारधारेच्या प्रभावापासून दूर नेण्याच्या कार्यक्रमाला पाठवण्याची शिफारस केल्याचे टेलिग्राफने आपल्या वृत्तात म्हटले आहे. 
    या मुलाला चित्राबद्दल विचारले तेव्हा त्याने कुकर बॉम्ब म्हटले असे नर्सरीच्या स्टाफने मुलाच्या आईला सांगितले. पोलिस आणि समाजसेवा समितीकडे हे प्रकरण गेले तेव्हा त्यांनी पुढे कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असे बीबीसी एशियन नेटवर्कने म्हटले आहे. 
======================================

राज्यात गारपिटीची शक्यता 

  • पुणे/मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात शनिवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते़ विदर्भात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून बुधवारी तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
    उष्णतेमध्ये वाढ झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आली. राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४०़१ अंश नोंदविले गेले़
    उत्तर भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे़ उत्तराखंड, पंजाब अशा अनेक शहरांमध्ये जोराचा पाऊस झाला आहे़ पुढील दोन ते तीन दिवस हा पाऊस राहणार आहे़
======================================

नंदूरबार; कापूस व्यापाऱ्यांना ५ कोटींचा चुना 

  • नंदुरबार : खान्देशातील सुमारे ५० कापूस व्यापाऱ्यांची रक्कम थकवून गुजरातमधील दोन जिनिंगचालक फरार झाले आहेत. त्यांनी व्यापाऱ्यांना जवळपास ५ कोटी रुपयांना चुना लावल्याचे सांगितले जात आहे.
    जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कापसाचे व्यापारी ग्रामीण भागात कापसाची खरेदी केल्यानंतर गुजरातमधील विविध भागातील जिनिंग फॅक्टऱ्यांमध्ये तर काही व्यापारी दलालामार्फत कापसाची विक्री करतात. माल दिल्यानंतर जिनिंगचालक टप्प्याटप्प्याने रक्कम देतात. व्यापाऱ्याने पुन्हा माल आणल्यानंतर आधीची रक्कम दिली जाते. साधारण १० दिवसांचा हा वायदा असतो.
    खान्देशातून विशेषत: जळगाव जिल्ह्यातून दररोज सर्वाधिक ३०० ते ४०० ट्रक कापूस गुजरातला रवाना होतो.
    गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गाठाणीचे दर ६५ सेंटवरून अचानक ५८ सेंटपर्यंत घसरले आणि त्याचा फटका जिनिंगचालकांना बसला. रूईचे दरदेखील अचानक खाली आहे. परिणामी, गुजरातमधील दोन जिनिंगचालकांनी येथून अचानक गाशा गुंडाळला.
======================================

हार्बरवर विद्युत परिवर्तन चाचणी यशस्वी

  • मुंबई : हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्री घेण्यात आलेली डायरेक्ट करंट (डीसी) ते अल्टरनेट करंट (एसी) विद्युत परिवर्तनाची चाचणी यशस्वी झाली आहे. परिणामी, आता हार्बरवर डीसी ते एसी विद्युत परिवर्तन शक्य झाले आहे.
    हार्बर मार्गावर भविष्यात डीसी ते एसी विद्युत परिवर्तनासाठी आता विशेष ब्लॉक घेऊन परिवर्तन करण्यात येईल. या मार्गावर एसी विद्युत प्रवाहावर पहिली लोकल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चालवण्यात येईल, तर बारा डब्यांची गाडी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चालवण्यात येईल. सद्यस्थितीमध्ये हार्बर मार्गावरील सेवेसाठी ३६ रेक्स लागतात. त्यापैकी १७ रेक्स डीसी-एसी दोन्ही विद्युत प्रवाहावर चालणारे आहेत, तर १९ रेक्स डीसीवर चालणारे आहेत. परिणामी, एसीवर चालणारे रेक्स प्राप्त झाल्यानंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. एसी विद्युत प्रवाह सुरू झाल्यानंतर सुरुवातीला केवळ नऊ डब्यांच्या गाड्या चालवण्यात येतील. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारा डब्यांची गाडी चालवण्यात येईल. कालांतराने सर्व गाड्या बारा डब्यांच्या करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या नियोजनाप्रमाणे हार्बरवरील एकूण ३६ गाड्यांपैकी २० गाड्या ३० एप्रिलपर्यंत बारा डब्यांच्या करण्यात येतील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हार्बर मार्गावरील तब्बल २०० फेऱ्या बारा डब्यांच्या चालविण्यात येतील. ३१ मेपर्यंत आणखी दहा गाड्या बारा डब्यांच्या करण्यात येतील. उर्वरित गाड्या जून महिन्यात बारा डब्यांच्या करण्यात येतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
======================================

कर्जबुडव्यांना शिक्षा ठोठाविणार -सरकारचा इशारा

  • नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.
    जागतिक मंदीमुळे झालेले व्यावसायिक नुकसान पाहता कर्ज फेडताना गल्लत केली जाऊ नये. सहेतुक कर्ज बुडवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाईलच, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. काही लोक खरोखरच बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतले असून, मुद्दाम कर्ज बुडवले जाते. अशा लोकांसाठी कठोर कायदा अवलंबला जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जावी यासाठी तपास संस्था कामाला लागल्या आहेत, असे ते पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.
    त्यांनी २ मार्च रोजी देशातून पसार झालेल्या मल्ल्या यांचा मात्र थेट उल्लेख केला नाही. बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडविल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी होण्याच्या काही दिवस आधीच ते लंडनला गेल्याचे मानले जाते.
======================================

इंदिरा गांधी विमानतळावर ५३२ किलो सोने जप्त

  • नवी दिल्ली : येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात १३० कोटींचे ५३२ किलो सोने जप्त करून सोने तस्करी करणाऱ्या २१८ आरोपींना अटक करण्यात आली. अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त विनायक आझाद यांनी ही माहिती दिली.
    अलीकडे सोने तस्करीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दुबई, अबुधाबी, बँकॉक, सिंगापूर आणि नेपाळहून येणाऱ्या प्रवाशांवर अबकारी खात्याचे अधिकारी खास करून नजर ठेवून असतात. बेल्ट, बॅग, ट्रॉलीत सोने लपवून आणले जाते. अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटण्यासाठी सोने तस्कर नवविवाहित जोडपे आणि गरीब युवकांची मदत घेतात.
    अनेकदा विमानतळ कर्मचाऱ्यांचाही सोने तस्करीसाठी वापर केला जातो; मात्र अधिकाऱ्यांची सावध नजर आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २०१५ मध्ये सोने तस्करीचे ३७० गुन्हे दाखल करण्यात आले. २१८ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५३२ किलो सोने जप्त करण्यात आले. बाजारपेठेत या सोन्याची किंमत १३०. १ कोटी रुपये आहे, असेही आझाद यांनी सांगितले.
======================================

‘कांगारू कोर्टा’ने दिला ५३ जणांना मृत्युदंड

  • नवी दिल्ली : मागील तीन वर्षांत देशातील पाच सर्वाधिक नक्षलग्रस्त राज्यांमध्ये ‘कांगारू कोर्टा’ने ५३ जणांना दोषी ठरवून मृत्युदंड ठोठावल्यानंतर नक्षलवाद्यांनी या शिक्षेची अंमलबजावणी करीत या सर्व लोकांना ठार मारले.
    केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये ‘कांगारू कोर्ट’ किंवा ‘जन अदालत’ने दिलेल्या आदेशानुसार १८ जणांना ते सर्व पोलिसांचे खबरे असल्याच्या किंवा माओवादी विचारधारा न मानल्याच्या आरोपावरून ठार मारण्यात आले.
    २०१५ मध्ये आंध्र प्रदेश (१), बिहार (६), छत्तीसगड (१४), झारखंड (१४) आणि ओडिशा (६) या पाच नक्षलग्रस्त राज्यांमध्ये नक्षलवाद्यांतर्फे एकूण ४१ जन अदालतचे आयोजन करण्यात आले होते.
    २०१४ मध्ये अशा ५४ जन अदालती भरविण्यात आल्या आणि या अदालतीच्या आदेशानुसार नक्षल्यांनी १५ जणांची हत्या केली, तर २०१३ मध्ये ६३ जन अदालती भरविण्यात आल्या आणि त्यांच्या आदेशानुसार नक्षल्यांनी २० जणांना ठार केले.
    लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी माओवादी अशा कांगारू कोर्ट किंवा जन अदालत किंवा प्रजा कोर्ट भरवून त्यात पोलिसांचा खबऱ्या किंवा माओवादी विचारधारा न मानणाऱ्यांना मृत्युदंड देतात, असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
    २०१६ या वर्षात १५ फेब्रुवारीपर्यंत अशा दोन जन अदालतींचे आयोजन करण्यात आले आणि या दोन्ही छत्तीसगडमध्ये आयोजित करण्यात आल्या. या नक्षलग्रस्त राज्यांमध्ये जवळपास एक लाखावर निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. असे असले तरी महाराष्ट्रासह सर्व दहा नक्षलग्रस्त राज्यांमध्ये गेल्या २०१५ या एका वर्षात नक्षलवादाशी संबंधित हिंसाचाराच्या १,०८८ घटनांमध्ये माओवाद्यांतर्फे २२६ जणांची हत्या करण्यात आली. त्यात १६८ जण सर्वसामान्य नागरिक आणि ५८ सुरक्षा दलांचे जवान आहेत.
======================================

आयव्हरी कोस्टमध्ये ग्राण्ड बॅससॅमबीचवर गोळीबारात १६ ठार

  • ऑनलाइन लोकमत 
    ग्राण्ड बससॅम, दि. १४ - आयव्हरी कोस्टमध्ये ग्राण्ड बॅससॅमबीचवर रविवारी एका दहशतवाद्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १६ जण ठार झाले. बीचवर अत्यंत ह्दयद्रावक दृश्य होते. रक्ताच्या थारोळयात अनेक मृतदेह पडले होते असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 
    आयव्हरी कोस्ट हा पश्चिम अफ्रिकेतील स्थिर देश समजला जातो. इथे अशा प्रकारचा झालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. अलकायदाशी संबंधित दहशतवाद्याने हा हल्ला केला. 
    ग्राण्ड बससॅमबीचवरील रिसॉर्टमध्ये स्थानिक आणि परदेशी नागरीकांची सतत वदर्ळ असते. या हल्ल्यात चार परदेशी नागरीक ठार झाले. यामध्ये एका फ्रेंच आणि एक जर्मन नागरीकाचा समावेश आहे. 
======================================

तुर्कस्थान अंकारामध्ये बॉम्बस्फोट ३४ ठार, १२५ जखमी


  • अंकारा, दि. १४ - तुर्कस्थानात मध्य अंकारामध्ये रविवारी संध्याकाळी एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बस्फोटामध्ये उडवून घेतले. या स्फोटात ३४ नागरीक ठार झाले तर, १२५ जण जखमी झाले. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये तुर्कीमध्ये झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला आहे. 
    सतत गजबज, वर्दळ असलेल्या किझीले चौकातील बस स्टॉपजवळ हा बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे मोठया प्रमाणावर जिवीतहानी झाली तसेच काही दुकांनाचेही नुकसान झाले. बसस्टॉपलाच जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याच्या उद्देशाने स्फोटकांनी भरलेली गाडी बसस्टॉपजवळ उडवून देण्यात आली असे अधिका-यांनी सांगितले. 
    पाच महिन्यात अंकारामध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. या भागात पंतप्रधान कार्यालय, संसद आणि परदेशी दूतावास आहेत. तुर्कीला कुर्दीश बंडखोर आणि इसिसपासून धोका आहे. अमेरिकन दूतावासाने शुक्रवारीच मध्य अंकारामध्ये हल्ला होऊ शकतो त्यामुळे अमेरिकन नागरीकांनी तिथे जाऊ असे आपल्या नागरीकांना आवाहन केले होते. 
======================================

मोदींपेक्षा माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री - त्रुदेऊ

  • वॉशिंग्टन : मोदी यांच्या मंत्रिमंडळाहून माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री आहेत, असे विधान केले आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांनी. उत्तर पश्चिम वॉशिंग्टनच्या अमेरिकी विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते.
    त्रुदेऊ म्हणतात की, माझ्या कॅबिनेटमध्ये मोदी यांच्या कॅबिनेटच्या तुलनेत जास्त शीख मंत्री आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर ४४ वर्षीय त्रुदेऊ यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये चार शीख नागरिकांना समाविष्ट केले होते. विश्वविद्यालयात अर्धा तास झालेल्या या चर्चासत्रात बोलताना पाकच्या पंजाब प्रांताचा विद्यार्थी जहान म्हणाला की, त्रुदेऊ यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या संख्येने पंजाबी नागरिक असणे ही कौतुकास्पद बाब आहे.
======================================

ऐकत नाही, उद्धट वागतो म्हणून मूल रुग्णालयात टाकून ‘ती’ निघून गेली

  • लॉस एंजिल्स : अजिबात ऐकत नाही, उद्धट वागतो म्हणून हा मला माझ्या घरात नको, अशी चिठ्ठी लिहून आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात टाकून आई निघून गेली.
    ही घटना पश्चिम जॉर्डनच्या उताह येथील जॉर्डन व्हॅली मेडिकल सेंटरमध्ये गेल्या महिन्यात घडली. या आईवर मुलाशी गैरवर्तन करणे आणि त्याला टाकून जाण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाला तर तिला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. या महिलेने मुलाच्या पाठीवरील पिशवीत मावतील एवढेच कपडे त्याच्यासोबत दिले होते व चिठ्ठी लिहिली. तीत म्हटले होते की, ‘हा मुलगा उद्धट आणि न ऐकणारा आहे. मला तो माझ्या घरात अजिबात नको आहे. मी वाईट आई आहे, असे मला अजिबात वाटत नाही. मला त्याने फारच जेरीस आणले आहे,’ असे या महिलेने म्हटल्याचे ‘फॉक्स थर्टीन’ ने वृत्त दिले. पालक जेव्हा अशा परिस्थितीला तोंड देतात तेव्हा त्यांच्या मदतीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत; परंतु या महिलेने जे काही केले ते मान्य न होणारे आहे, असे साल्ट लेक सिटी डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी सिम गिल यांनी म्हटले. तुम्ही जेव्हा मुलांशी वाईट वागता, त्यांना टाकून देता तेव्हा त्यांना शारीरिक किंवा मानसिक दहशत निर्माण होते व स्वत:चे संरक्षण करू न शकणाऱ्या मुलांचा विचार करता ही बाब मोठ्याच काळजीची आहे, असे गिल म्हणाल्याचे वृत्त आहे. तो मला नावाने हाका मारायचा. तो सार्वजनिक ठिकाणी स्वत:ची पँट खाली ओढायचा, असे तिने सांगितले.
    या मुलाला संगोपन केंद्रात ठेवण्यात आल्यापासून त्याची आई आणि वडील परत एकत्र आले आहेत. त्याची आई त्याला आता भेटायलाही येते. ती म्हणाली, ‘तो परत घरी यावा असे मला वाटते आणि त्याचीही तशी इच्छा आहे.’
======================================

No comments: