Tuesday, 29 March 2016

नमस्कार लाईव्ह २९-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- सना; भारतीय पाद्रीची आयसिसकडून सुळावर लटकवून हत्या 
२- केलिफोर्निया; अॅपलच्या मदतीशिवाय मारेकऱ्याचा आयफोन अनलॉक, एफबीआयचं यश 
३- वॉशिंग्टन; ब्रिटन आणि युरोपही आता सुरक्षित राहिले नाहीत - ट्रम्प 
४- कराची प्रेस क्लबवर गुंडांचा हिंसक हल्ला, काही पत्रकार जखमी 
५- लाहोर हल्ल्याचे लक्ष्य होते ख्रिश्चन 
६- ब्रसेल्स हल्ल्याप्रकरणी अजून तिघांना अटक 
७- इस्लामाबाद; भारतीय चॅनेल्ससारखा फक्त TRP चा विचार करू नका, देशाचा विचार करा - पाकिस्तानच्या कानपिचक्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
८- क्रिकेटर्सच्या हेल्मेटवरील तिरंग्यामुळे देशाचा अपमान, तक्रार दाखल 
९- लखनऊ; आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही - असदुद्दीन ओवेसी  
१०- छगन भुजबळ व सार्वजनिक बांधकाम खात्यातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्रात ६० पुरावे 
११- पर्सनल लॉ’वरील अहवाल मागविला 
१२- लखनऊ; जय मीम-जय भीम'ची ओवेसी यांची घोषणा 
१३- ब्रुसेल्स; बेपत्ता राघवेंद्रचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' द्यावा - उद्धव ठाकरे 
१५- ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू 
१६- दिल्लीतील मॉडेलवर पुण्यात बलात्कार? 
१७- पुढील वर्षी म्हाडाची दहा हजार घरे 
१८- चेन्नई; शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची न्यायालयात हजेरी 
१९- पुण्यात वाहनांच्या जळीतकांडाचे सत्र सुरुच 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- इटारसी; पाणी पिण्यावरून झाला वाद, तरूणाला धावत्या ट्रेनच्या खिडकीला लटकवले 
२१- बंगळूरू; एक कोटींचा कुत्रा, रॉकी हॅण्डसम 
२२- पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, 15 बाईक्स, दोन कारना आग 
२३- नागपूर; जागा बळकवण्यासाठी नागपुरात महिलेची जाळून हत्या 
२४- औरंगाबाद; एमआयएमच्या बालेकिल्ल्यात उभी फूट 
२५- कोल्हापूर; कोल्हापूरच्या राजारामपुरीत गँगवॉर, गज, खुरपं, तलवारींनी एकमेकांवर सपासप वार 
२६- ओडिशा; दुर्मिळ आॅलिव्ह रिडले कासवांची गर्दी ओसरू लागली 
२७- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर सोलापूरची मोहर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- ट्रिंग... ट्रिंग... व्हॉट्स अॅपवरुन लँडलाईन-मोबाईल कॉल शक्य 
२९- कोहलीने गेलचा टी-20 मधील विक्रम मोडला 
३०- युवराजच्या दुखापतीमुळे मनीष पांडे संघात 
३१- ...त्यामुळे विराटने मला पैसे द्यायला हवेत - धोनी 
३२- युवराज सिंह विश्वचषकातून बाहेर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३३- नांदेडचा शोषखड्यांचा पॅटर्न कामास शासनाची मान्‍यता, राज्‍यात सर्वत्र होणार कामे 
३४- दागिन्यावर उत्पादन सुळक लावण्याच्या विरोधात सराफांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
३५- देगलूरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त, नऊ जणांवर गुन्हा दाखल 
३६- नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची १ एप्रिलपासून सभासद नोंदणी 
३७- डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त १२५ महिलांना पांढऱ्या साड्यांचे वाटप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
अर्था बाहेती, सुरज दुधडकर, प्रदीप अमेठी, उमेश येडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
समुद्र हा सर्वासाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती उचलतात. काहीजण त्यातून मासे उचलतात तर काहीजण आपले पाय ओले करतात. हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे
(श्वेता कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


==============================================

क्रिकेटर्सच्या हेल्मेटवरील तिरंग्यामुळे देशाचा अपमान, तक्रार दाखल

क्रिकेटर्सच्या हेल्मेटवरील तिरंग्यामुळे देशाचा अपमान, तक्रार दाखल
मोहाली :  टी 20 विश्वचषकातील सामन्यांत हेल्मेटवर तिरंगा झळकवल्याप्रकरणी टीम इंडिया गोत्यात येण्याची शक्यता आहे.  सामाजिक कार्यकर्ते पी उल्हास यांनी मोहाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताच्या झेंड्याचा योग्य तो सन्मान राखला गेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हेल्मेटवर तिरंगा चिकटवणं हे अवैध असल्याचं पी उल्हास यांनी म्हटलं आहे. ‘अशा कृत्यामुळे आपल्या देशाचा सन्मान त्यामुळे धुळीला मिळतो. जिथे क्रीडापटू थुंकतात, त्याच मैदानावर ते हेल्मेट ठेवतात, ही शरमेची बाब आहे.’ असंही उल्हास म्हणाले. 
कॅप्टन कूल एम एस धोनीने हेल्मेटवर तिरंग्याचा वापर थांबवला आहे, मात्र विराट कोहलीसह इतर काही क्रिकेटपटू अजुनही भारताचा तिरंगा असलेलं हेल्मेट वापरतात. पी उल्हास यांनी सर्वप्रथम गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर जवळच्या पोलिस स्थानकात धाव घेतली. मात्र अद्याप आपल्यावर कारवाई करण्याचे कोणतेही आदेश दिले नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
==============================================

पाणी पिण्यावरून झाला वाद, तरूणाला धावत्या ट्रेनच्या खिडकीला लटकवले


दोन घोट पाणी प्यायल्याने तरुणाला ट्रेनबाहेर बांधून मारहाण
इटारसी : क्षुल्लक कारणामुळे डोक्यात शिरलेला राग कधी क्रौर्याची सीमा गाठेल, याचा अंदाज बांधता येत नाही. परवानगी न घेता आपल्या बाटलीतून पाणी प्यायल्यामुळे संतप्त झालेल्या तीन तरुणांनी सहप्रवाशाला ट्रेनबाहेर बांधून मारहाण केल्याची धक्कादायक बातमी आहे.

मुंबईत नोकरी करणारा सुमीत पाटणा-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चढला. मुंबईला जाण्यासाठी 25 मार्चला रात्री 11 वाजता त्याने जबलपूरला ट्रेन पकडली. प्रवास सुरु झाल्यानंतर तिघा आरोपींच्या बाटलीतील पाण्याचे दोन घोट त्याने परवानगी न घेता प्यायल्याचं म्हटलं जातं.

सुमीतच्या कथित कृत्यामुळे संतप्त झालेल्या तिघांनी त्याला मारहाण केली. इतक्यावरच समाधान न झाल्याने तिघांनी ट्रेनची आपत्कालीन साखळी खेचली. ट्रेन थांबताच आरोपींनी सुमीतला फरपटत बाहेर नेलं आणि ट्रेनबाहेर खि़डकीला बांधलं. मोटरमनला याचा अंदाज न आल्याने त्याने थांबवलेली ट्रेन पुन्हा सुरु केली.

यानंतर सलग चार तास ट्रेन नॉनस्टॉप धावत राहिली आणि सुमीत ट्रेनबाहेर लटकलेल्या अवस्थेतच राहिला. इटारसी स्थानकात प्रवेश केल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना हा प्रकार लक्षात आला. मात्र तेवढ्यात आरोपींना प्लॅटफॉर्मवर उडी मारुन त्याला बेल्टने मारहाण करायला सुरुवात केली. सुदैवाने प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी मध्यस्थी करत त्याची सुटका केली.

तिन्ही आरोपी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पाटण्याहून मुंबईला जात असल्याची माहिती आहे. आरपीएफने तिघांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
==============================================

भारतीय पाद्रीची आयसिसकडून सुळावर लटकवून हत्या

भारतीय पाद्रीची आयसिसकडून सुळावर लटकवून हत्या
सना : येमेनमध्ये अपहरण केलेल्या भारतीय पाद्रींची आयसिसने हत्या केल्याची माहिती आहे. रेवरंट थॉमस उजुनालिल असं या फादरचं नाव असून गुड फ्रायडेच्या दिवशी सुळावर लटकवण्यात आलं.

ज्याप्रमाणे येशू ख्रिस्तांना सूळावर लटकवण्यात आलं होतं, त्याचप्रमाणे फादर थॉमस यांची आयसिसने हत्या घडवून आणल्याचं म्हटलं जातं.

मूळ केरळचे रहिवासी असलेल्या फादर थॉमस धर्मप्रचाराच्या कामासाठी येमेनमध्ये गेले होते. त्यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात होते.

फादर थॉमस यांची हत्या झाल्याच्या वृत्ताला भारत सरकारने अद्याप दुजोरा दिला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात अधिकृत स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे.
==============================================

एक कोटींचा कुत्रा, रॉकी हॅण्डसम

एक कोटींचा कुत्रा,  रॉकी हॅण्डसम
बंगळुरू : आतापर्यंत तुम्ही अनेक जातीचे, हजारो किमतीचे श्वान पाहिले असाल. पण तुम्ही कधी 1 कोटीचं श्वान पाहिलंय का?. बंगळुरुमधल्या एक श्वानप्रेमीनं खास चीनवरुन श्वान मागवलं आहे. कसं आहे 1 कोटीचं श्वान?

थुलथुलीत अंग, गोबरे गाल, नकटे नाक आणि शेकडो वळ्यांमध्ये झाकून गेलेलं अंग. नुकतीच या श्वानाची चीनमधून भारतात एन्ट्री झाली आहे. त्यामुळं आम्हीच याचं रॉकी हॅण्डसम असं नामकरण केलं.
rocky handsome 3
सतीश सी नावाच्या व्यक्तीने रॉकीसाठी तब्बल 1 कोटी मोजले आहेत.

रॉकी कोरियर डोसा मॅस्टिफ जातीचा आहे. किमतीप्रमाणं रॉकीचा खर्च तगडा आहे.

कोरियर डोसा मॅस्टिफ जातीच्या श्वानांची वैशिष्ट्येही खास आहेत.
*या जातीच्या श्वानांना नेहमी वातानुकुलीत रुममध्ये ठेवावं लागतं. 
*जगभरात कोरियर डोसा मॅस्टिफ जातीचे केवळ 500 श्वान असल्याची माहिती आहे 
*सैल त्वचा हे कोरियर डोसा मॅस्टिफ जातीच्या श्वानांची खरी ओळख आहे. 
*या जातीच्या श्वानांमध्ये गंध घेण्याची क्षमता अतिशय तीव्र आहे
==============================================

दिल्लीतील मॉडेलवर पुण्यात बलात्कार?

दिल्लीतील मॉडेलवर पुण्यात बलात्कार?
पुणे: दिल्लीतील एका मॉडेलवर पुण्यात बलात्काराचा प्रयत्न आणि मारहाण झाली आहे. याप्रकरणी पुणे पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. 
पुण्यातील एका तरुणाची दिल्लीतील मॉडेलशी फेसबुकवरून मैत्री झाली. या मैत्रीनंतर दोघांचं चॅटिंग सुरु झालं. संबंधित तरुणी दिल्लीत मॉडेलिंग करत होती. 
आरोपी तरुणाने पीडित मॉडेलला चित्रपटात काम देतो असं आमीष दाखवून तिला पुण्यात बोलावून घेतलं. तीची खराडी इथल्या फ्लॅटमध्ये राहण्याची सोय केली. 
मात्र दोन दिवसानंतर आरोपी आणि त्याच्या मित्रांनी मिळून जबरदस्ती केल्याचा आरोप संबंधित तरुणीचा आहे. या आरोपींनी मारहाण आणि सिगारेटचे चटकेही देण्याचा प्रयत्न केला. मात्र कशीबशी सुटका करून पीडित मॉडेलने दिल्ली गाठली आणि गुन्हा दाखल केला.
 याप्रकरणी दिल्ली पोलीसांनी झिरो एफआयआर दाखल केली असून पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनला गुन्हा ट्रांन्सफर करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी या तीन आरोपींना अटक केली आहे.
==============================================

ट्रिंग... ट्रिंग... व्हॉट्स अॅपवरुन लँडलाईन-मोबाईल कॉल शक्य!

ट्रिंग... ट्रिंग... व्हॉट्स अॅपवरुन लँडलाईन-मोबाईल कॉल शक्य!
मुंबई: व्हॉट्स अॅप वापरणाऱ्या देशातलल्या तमाम जनतेसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता यापुढे आपल्या व्हॉट्स अॅपवरुन तुम्ही मोबाईल आणि लँडलाईनवरही फोन करु शकणार आहात. 
इंटरनेटची सेवा पुरवणारे आणि टेलीकॉम ऑपरेटर्स कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार ही सेवा लवकरचं उपलब्ध होणार आहे. याआधी फक्त व्हॉट्स अॅप टू व्हॉट्स अॅप कॉलिंग सेवा उपलब्ध होती. 
मुकेश अंबांनींचं रिलायन्स जिओ कॉम ही सेवा लवकरच सुरु करणार आहे. यासाठी आवश्यक त्या सरकारी परवानग्या देण्यात आल्या असून ही सेवा लवकरच सुरु होणार आहे. व्हॉट्स अॅप टू व्हॉट्स अॅप कॉलिंगसाठी लागणारा इंटरनेट डेटा वाचणार आहे. या व्हॉईस कॉलमुळे कमी चार्ज लागेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
==============================================

अॅपलच्या मदतीशिवाय मारेकऱ्याचा आयफोन अनलॉक, एफबीआयचं यश

अॅपलच्या मदतीशिवाय मारेकऱ्याचा आयफोन अनलॉक, एफबीआयचं यश
कॅलिफोर्निया: सॅन बर्नार्डिनोमध्ये दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचा आयफोन  अनलॉक करण्यात एफबीआयला अखेर यश आलं आहे. अॅपलच्या कोणत्याही मदतीशिवाय आयफोन अनलॉक करुन यातील डेटा अॅक्सेस करण्यात आला आहे.

दरम्यान, याआधी आयफोन अनलॉक करण्यास अॅपलनं कोर्टालाही नकार दिला होता. मात्र, एफबीआयनं मोठ्या मेहनतीनंतर हा फोन अनलॉक केला. याप्रकरणी अॅपलनं कोर्टाचा आदेश धुडकावून लावला होता. मात्र, खटला निकालात निघाल्यानं अॅपलवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे समजते आहे.

कंपनीला ऑटो इरेज फंक्शन निष्क्रिय करण्यास कोर्टानं सांगितलं होतं. तर फोनचा पासवर्ड आणि त्यातील डेटा मिळविण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचाही आदेश कोर्टाकडून देण्यात आला होता. पण अॅपलचा सीईओ टीम कुकनं मात्र, या गोष्टीला नकार दिला होता. कोर्टाचा हा आदेश अतिशय धोकादायक असून या आदेशाला आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

कोर्टाच्या आदेशनुसार, याचे अनेक सुरक्षा फीचर निष्प्रभ होतील आणि हे ग्राहकांच्या सुरक्षेबाबत चुकीचे ठरेल असं अॅपलचं म्हणणं होतं.

काय होतं प्रकरण:

मागील वर्षी दोन डिसेंबरला कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनोमतील सैयद रिजवाम फारुक आणि त्याच्या पत्नीनं गोळीबार करुन 14 जणांची हत्या केली होती. त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत त्या दोघांना पोलिसांनी कंठस्नान घातलं होतं. फारुककडून त्यावेळी आयफोन 5 हस्तगत करण्यात आला होता. हे दोघे मारेकरी नक्की कोणाच्या संपर्कात होते आणि ते कोणत्या संघटनेशी निगडीत होते हे या फोनच्या डेटावरुन समजू शकतं. मात्र, आयफोनमधील सुरक्षेच्या फीचरमुळं त्या फोनमधील माहिती पोलिसांना मिळू शकत नव्हती.
==============================================

कोहलीने गेलचा टी-20 मधील विक्रम मोडला!

कोहलीने गेलचा टी-20 मधील विक्रम मोडला!
मुंबई : मोहालीमध्ये विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 82 धावा ठोकणाऱ्या विराटने टी-20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे. आजपर्यंत हा विक्रम कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही. 
उपांत्य फेरीत भारत आणि वेस्ट इंडिज संघात काँटे की टक्कर होईल, असा अंदाज आहे. पण विंडीजविरुद्धच्या लढतीआधीच विराट कोहलीने तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. 
होय, ख्रिस गेल टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1500 धावा (45 डाव) बनवणारा फलंदाज होता. पण मोहालीच्या मैदानावर काल झालेल्या सामन्या विराट कोहलीने गेलला मागे टाकत हा विक्रम प्रस्थापित केला. त्याने केवळ 39 डावांमध्ये गेलचा रेकॉर्ड मोडला. 
विराटचा हा विक्रम आणि भारताच्या विजयानंतर स्वत: ख्रिस गेलने ट्वीट करत हार्टच्या सिम्बॉलसह भारत आणि वेस्ट इंडिज वाह!!, असं लिहिलं. 
आता सेमीफायनलमध्ये विराट आणि गेल अशीही टक्कर पाहायला मिळेल. पण ट्वेन्टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणजे न्यूझीलंडचा ब्रेण्डन मॅक्युलम. त्याच्या नावावर 2140 धावा जमा आहेत.
==============================================

ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू

ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू
मुंबई : ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बंगळुरुच्या राघवेंद्र गणेशन यांचा मृत्यु झाल्याची माहिती आहे. 22 तारखेला मॅबिलक मेट्रो स्टेशनवर झालेल्या बॉम्बस्फोटात राघवेंद्र मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. ब्रसेल्स प्रशासनाने राघवेंद्र यांच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे. 
28 वर्षीय राघवेंद्र हे इन्फोसिस कंपनीचे कर्मचारी होते. प्रोजेक्टच्या निमित्ताने ते बेल्जिअममध्ये राहत होते. 22 मार्चला ब्रसेल्समध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ते बेपत्ता झाले. 
त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानंतर ब्रसेल्समधील भारतीय दुतावासाने राघवेंद्र यांची शोध मोहीम सुरु केली. मात्र राघवेंद्र यांचा मृत्यू हल्ल्यातच झाला असल्याचं ब्रुसेल्स प्रशासनानं घोषित केलं आहे. हल्ल्याच्या तासाभरापूर्वीच राघवेंद्र यांनी भारतातील त्यांच्या आईशी फोनवरुन बातचित केल्याचं समजतं. 
मेट्रो स्टेशनवरील हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला होता, तर जेटच्या कर्मचारी निधी चाफेकर या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. 
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्विटरवरुन या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. दुर्दैवाने राघवेंद्र प्रवास करत असलेल्या मेट्रोच्या कोचमध्येच आत्मघातकी हल्ला झाल्याचं त्या म्हणाल्या. 
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बेल्जियमला रवाना होत आहेत. ब्रसेल्स शहरात होणाऱ्या युरोपीय संघाच्या शिखर बैठकीला ते उपस्थिती लावणार आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मोदींच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
==============================================

पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, 15 बाईक्स, दोन कारना आग

पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, 15 बाईक्स, दोन कारना आग
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा जळीतकांडाचं सत्र सुरु झाल्याची भीती आहे. कात्रज परिसरात मध्यरात्री 15 बाईक आणि दोन गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. 
मध्यरात्री अडीच वाजता परिसरात प्रचंड धूर झाल्याने हा प्रकार लक्षात आला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि एका वॉटर टँकरने ही आग वेळीच आटोक्यात आणली. या प्रकारामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 
दरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. जळीतकांडात एका इसमाला किरकोळ दुखापत झाल्याचीही माहिती आहे.
==============================================

जागा बळकवण्यासाठी नागपुरात महिलेची जाळून हत्या

जागा बळकवण्यासाठी नागपुरात महिलेची जाळून हत्या
नागपूर : नागपुरात एका महिलेची जाळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. लाखो रुपयांची जागा हडप करण्याच्या उद्देशाने प्रॉपर्टी डीलरच्या टोळीने ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. 
करुणा रामटेके नामक महिला 22 मार्चपासून बेपत्ता होती. तिचा लाखो रुपयांच्या किमतीचा प्लॉटही होता. प्रॉपर्टी विकण्यासाठी ती मुकेश राहुलकर नावाच्या प्रॉपर्टी डीलरच्या संपर्कात होती. मात्र हाच प्लॉट हडपण्यासाठी या बोगस प्रॉपर्टी डीलरसह त्याच्या टोळीने महिलेची हत्या घडवून आणली. 
मुकेश हा सराईत गुन्हेगार आहे. महिलेच्या प्रॉपर्टीवर त्याचा आधीपासूनच डोळा होता. म्हणूनच त्याने प्रॉपर्टीचे मूळ कागदपत्र हाती लागताच महिलेची जाळून हत्या केली. 
पोलिसांनी इमामवाडा परिसरात राहणाऱ्या मुकेश राहुलकरला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच मुकेश राहुलकरने गुन्हा कबूल केला आहे.
==============================================

एमआयएमच्या बालेकिल्ल्यात उभी फूट!

एमआयएमच्या बालेकिल्ल्यात उभी फूट!
औरंगाबाद : औरंगाबादेत एमआयएमला आता फुटीचे ग्रहण लागले आहे. एमआयएमचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यांची पदावरून उचलबांगडी केल्याने महानगरपालिकेत एमआयएममध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. 
दहा नगरसेवकांना सोबत घेत वेगळा गट स्थापन करण्याच्या कुरेशी गटाच्या हालचालींना वेग आला असून दोन दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे. एमआयएमने औरंगाबादेत मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करीत शहरातून काँग्रेस राष्ट्रवादीचा पुरता सफाया केला. 
महापालिकेत 25 नगरसेवकांची फौज घेऊनच एमआयएमने प्रवेश केला. पण आता वर्षभरातच एमआयएमला फुटीचे ग्रहण लागले आहे. 
पक्षात आमदार इम्तियाज जलील डॉ. गफ्फार कादरी यांचे महत्त्व वाढल्याने पक्षाचे सर्वात जुने निष्ठावान जावेद कुरेशी नाराज आहेत.
==============================================

कोल्हापूरच्या राजारामपुरीत गँगवॉर, गज, खुरपं, तलवारींनी एकमेकांवर सपासप वार

कोल्हापूरच्या राजारामपुरीत गँगवॉर, गज, खुरपं, तलवारींनी एकमेकांवर सपासप वार
कोल्हापूर कोल्हापुरातील राजारामपुरीत झालेल्या तलवार हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. गुंड स्वप्निल तहसिलदार आणि कवाळे यांच्यातील गँगवॉरमध्ये पूर्ववैमनस्यातून तलवारीसह गज, खुरपं,काठ्यांचा वापर करुन तुंबळ हाणामारी झाली. 
संध्याकाळी चार वाजता झालेल्या या प्रकारामुळं संपूर्ण राजारामपुरी क्षणात बंद झाली. रंगपंचमीच्या दिवशी मोबाईलचं कारण काढत सुरु झालेल्या वादानं कोल्हापुरातील गँगवॉरनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. 
एकीकडे रंग… तर दुसरीकडे तळपत्या तलवारी! 
कोल्हापुरात आज सर्वत्र रंगपंचमीचा रंग उडत असताना राजारामपुरीत मात्र तळपत्या तलवारी नाचत होत्या. दगड, खंजीर, खुरपं, गज यांच्या सह तलवारी घेऊन दोन गट आमनेसामने भिडले. दुपारी साडेतीनच्या सुमारास एका हॉटेलमध्ये स्वप्निल तहसिलदार गँग आणि कवाळे गँग मधील काही तरुणांमध्ये मोबाईलवरुन वाद सुरु झाला. तिथं या दोन्ही गटात किरकोळ हाणामारी झाली. यानंतर राजारामपुरीतील मारुती मंदिर चौकात स्वप्निल तहसिलदार आपल्या 50हून अधिक हत्यारधारी तरुणांना घेऊन आला आणि त्यांनी कवाळे गटावर हल्ला चढवला.
==============================================

युवराज सिंह विश्वचषकातून बाहेर

युवराज सिंह विश्वचषकातून बाहेर ?
मुंबई : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह टी 20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या युवराजची फिटनेस टेस्ट अयशस्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
==============================================

आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही - असदुद्दीन ओवेसी


  • लखनऊ, दि. २९ - 'कोणी गळ्यावर चाकू ठेवला तरीही भारत माता की जय म्हणणार नाही' या वक्तव्यामुळे वादाच्या भोव-यात सापडलेलेएमआयएम पक्षाचे नेते व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ' आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीचे प्रमाणापत्र मिळवण्याची गरज नाही' असे म्हटले आहे. सोमवारी लखनऊमधील एका सभेदरम्यान ते बोलत होते. विशेष म्हणजे या सभेपूर्वी झालेल्या पक्षबैठकीत त्यांनी 'हिंदुस्थान जिंदाबादा ' आणि 'जय हिंद' अशा घोषणा दिल्या. 
    मुस्लिमांनी या देशासाठी खूप काही केले आहे, मोठे बलिदान दिले आहे असे सांगत फक्त ' भारतमाता की जय ' ही घोषणा न दिल्याने कोणी आमच्या देशभक्तीबाबत शंका घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ' आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही' असेही सांगत आमच्या देशभक्तीवर शंका घेणारेच देशद्रोही असल्याचे ते म्हणाले. ' जे आमच्यावर शंका घेत आहेत त्यांचा १८५७ पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत कुठेच पत्ता नव्हता. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही ( मुस्लिम) जीवाचे बलिदान दिले, आम्ही ब्रिटीशांकडे कधीच दयेची भीक मागितली नाही' असेही ओवेसींनी नमूद केले. 
==============================================

स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' द्यावा - उद्धव ठाकरे


  • मुंबई, दि. २९ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारकडे केली आहे. काँग्रेसचं तोंड बंद करण्यासाठी सावरकरांना 'भारतरत्न' देण्यात यावा असे आवाहन एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेनेने सरकारला केले आहे. 
    महाराष्ट्रात सावरकरांकडे मोठ्या सन्मानाने पाहिले जाते, मात्र काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे सावरकर यांना तात्काळभारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारने सन्मानित करुन काँग्रेसचे थोबाड बंद करावे, असे  ठाकरे यांनी म्हटले आहे.
    सावरकरांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली होती. माफी न मागितल्यास काँग्रेस आमदारांच्या घराबाहेर आंदोलन करू असा इशाराही भाजपातर्फे देण्यात आला. मात्र ' सावरकरांना भारतरत्न देऊन बदनामी मोहिमेचे ढोंग बंद पाडा, मग आंदोलनाची गरज पडणार नाही' असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
    ज्यावेळी चंद्रशेखर आझाद भारतासाठी प्राणांची आहुती देत होते त्यावेळी सावरकर ब्रिटिशांकडे दयेची भीक मागत होते अशी टिपण्णी करत काँग्रसने सावरकरांवर टीका केली होती. तसेच शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानेही काँग्रेसने पुन्हा सावरकरांवर टीका करत त्यांचा देशद्रोही म्हणून उल्लेख केला होता. 
==============================================

पुढील वर्षी म्हाडाची दहा हजार घरे

  • मुंबई : सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण पुढल्या वर्षी कोकणासह मुंबईत दहा हजार परवडणाऱ्या दरातील घरे जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहे. तशी घोषणाच म्हाडाने सोमवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात केली आहे. म्हाडा प्राधिकरणाने ६ हजार ५०८.१९ कोटींचा अर्थसंकल्प मांडला आहे. घरे बांधण्यासाठी जमीन खरेदी करता यावी, म्हणून अर्थसंकल्पात २५७.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
    महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे २०१५-१६चे सुधारित अर्थसंकल्प अंदाजपत्रक व २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला प्राधिकरणाच्या सोमवारच्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राधिकरणांतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व कोकण ही सात प्रादेशिक गृहनिर्माण मंडळे तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ तसेच झोपडपट्टी सुधार मंडळ कार्यरत आहेत. अर्थसंकल्पानुसार, म्हाडाच्या उपलब्ध जमिनीवरील कार्यक्रमांबरोबरच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरबांधणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शिवाय त्यासह जवळपास ३ हजार ९०० कोटी रुपयांचा खर्च २०१६-१७ मध्ये अपेक्षित आहे. भविष्यकालीन आवश्यकता विचारात घेता २५७.९० कोटींची तरतूद जमीन खरेदी व जमीन विकासासाठी पुढील वर्षासाठी करण्यात आली आहे. इमारत दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून २०१५-१६ मध्ये ६७१ मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी ६८० इमारतींची दुरुस्ती करणे प्रस्तावित आहे. पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतील इमारतीच्या देखभालीसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
==============================================

छगन भुजबळ व सार्वजनिक बांधकाम खात्यातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्रात ६० पुरावे

  • कलिना लायब्ररी प्रकरण : भुजबळांवर अपसंपदेचाही गुन्हा दाखल होणार
    - डिप्पी वांकाणी, मुंबई
    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ व सार्वजनिक बांधकाम खात्यातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कलिना सेंट्रल लायब्ररी घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने १७,४८८ पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रात सुमारे ६० पुरावेही दिले आहेत.
    महाराष्ट्र सदन इमारत बांधकाम घोटाळ्यात भुजबळांविरुद्ध एसीबीने याआधीच आरोपपत्र दाखल केले आहे. बांधकाम विभागाने नियुक्त केलेल्या चार्टर्ड अकाउंटंटलाही एसीबीने यात आरोपी
    केले आहे. त्याने बोली लावणाऱ्यांच्या आर्थिक मूल्यमापनाचे (फिनान्शियल असेसमेंट) बनावट अहवाल सादर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. छगन भुजबळांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप दाखल झाले, त्यांच्यावर उत्पन्नाच्या ज्ञात मार्गांपेक्षाही जास्त संपत्ती असल्याप्रकरणीही गुन्हा दाखल होणार आहे. ‘‘आरोपीने बनावट फिजिबिलिटी रिपोर्टस् तयार केले. विकासकाला लायब्ररीच्या आणि त्याच्या खासगी प्रकल्पांच्या बांधकामासाठी खूप मोठा खर्च करावा लागल्याचे दाखविले होते. अपेक्षित विक्रीची किमत कमी असल्यामुळे विकासकाला नफाही कमी मिळेल आणि या प्रकल्पातून सरकारला जास्त लाभ मिळणार असल्यामुळेत्या बदल्यात विकासकाला मोक्याची जागा छोटा मोबदला म्हणून देता येईल, असे त्यात दाखविण्यात आले होते. ही मोक्यावरील जागा देण्याच्या बदल्यात विकासकाकडून लाच घेण्यात आली.
==============================================

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची न्यायालयात हजेरी

  • चेन्नई : लेखापाल राधाकृष्णन यांच्यावरील हल्ल्यासंबंधी माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.
    या प्रकरणी मुख्य आरोपी असलेले जयेंद्र सरस्वती तसेच कनिष्ठ सहकारी विजयेंद्र सरस्वती यांचे बंधू रघू, कांची मठाचे व्यवस्थापक सुरेंद्र अय्यर यांच्यासह आठ जणांनी प्रथम अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. राजामनीक्कम यांच्यासमक्ष हजेरी लावली.
    सुमारे एक तास जाबजबाब देताना ८० वर्षीय जयेंद्र सरस्वती म्हणाले की, सर्व काही खोटे आणि चुकीचे आहे.
    बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्यांनी हात हलवत नाही अशी दिली. साक्षींदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ६० पानी प्रश्नावली तयार करण्यात आली होती. त्यापैकी ९१ प्रश्नांची उत्तरे जयेंद्र सरस्वती यांनी दिली.
    राधाकृष्णन यांच्यावर २० सप्टेंबर २००२ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. जयेंद्र सरस्वती यांच्यासह १२ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदला होता. यामुळे हिंदू समाजात खळबळ उडाली होती.
==============================================

दुर्मिळ आॅलिव्ह रिडले कासवांची गर्दी ओसरू लागली

  • केंद्रपाडा (ओडिशा) : ओडिशाची किनारपट्टी गिळंकृत होऊ लागल्यामुळे आॅलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांसाठी सुरक्षित मानले जाणारे जगातील सर्वात मोठे ‘गहीरमाथा’ हे स्थानही धोक्यात आले असून तेथे दरवर्षी सामूहिकरीत्या अंडी घालण्यासाठी होणारी कासवांची गर्दी ओसरू लागली आहे.
    आॅलिव्ह रिडले या कासवांची यावेळी कमी झालेली गर्दी चिंतेचा विषय बनली आहे. किनारपट्टीवरील वाळूच्या खड्ड्यांमध्ये अंडी घालण्यासाठी मादी कासवे समुद्रातून सरपटत येत असतात. या महिन्यात अलीकडे या कासवांची गर्दी तुलनेत कितीतरी कमी असून १६ मार्चपासून केवळ ५१,७४८ मादी कासवांनी किनारा ओलांडल्याची नोंद झाली आहे. कासवांनी १९ मार्च रोजी सर्वाधिक गर्दी केली; मात्र नंतर ही संख्या झपाट्याने कमी होत गेली. गेल्या चार दिवसांमध्ये तर एकही कासव किनाऱ्यावर फिरकले नसल्याचे वन्यजीव विभागाचे अधिकारी बिमल प्रसन्ना आचार्य यांनी सांगितले. गेल्यावर्षी सुमारे ४.१३ लाख मादी कासवांनी किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी घरटी केली होती. ही संख्या कमी होण्यामागच्या कारणांचा अभ्यास करण्याची जबाबदारी कासव तज्ज्ञांकडे सोपविण्यात आल्याचे आचार्य यांनी नमूद केले.
==============================================

‘पर्सनल लॉ’वरील अहवाल मागविला

  • नवी दिल्ली : मुस्लिमांसह अन्य धार्मिक अल्पसंख्यक समाजातील विवाह, घटस्फोट आणि संरक्षणाशी संबंधित वैयक्तिक कायद्याच्या (पर्सनल लॉ) विविध पैलूंवर विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
    या समितीचा अहवाल सहा आठवड्यांच्या आत सादर करण्यात यावा, असे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्या. यू. यू. ललित यांच्या पीठाने केंद्रातर्फे न्यायालयात हजर झालेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले. शायरा बानो या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवरून या पीठाने अल्पसंख्यक कामकाज मंत्रालयाला उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. शायरा बानो हिने मुस्लिमांमधील प्रचलित बहुविवाह, तीनदा तलाक शब्द उच्चारणे (तलाक-ए-बिदत) आणि निकाह हलाल प्रथेच्या घटनात्मकतेलाच आव्हान दिलेले आहे.
    ‘माझा पती आणि सासरच्या लोकांनी हुंडा मागितला. माझा अनन्वित छळ केला आणि मादक पदार्थ दिले, ज्यामुळे माझी स्मरणशक्ती दुर्बल झाली. त्यानंतर पतीने तीनदा तलाकचा उच्चार करून मला घटस्फोट दिला,’ असे शायरा बानोने याचिकेत म्हटले आहे. बानोने मुस्लीम पर्सनल लॉ (शरियत) अप्लिकेशन कायदा १९३७ च्या कलम २ च्या घटनात्मकतेला तसेच ‘डिझॉल्यूशन आॅफ मुस्लीम मॅरिजेस अ‍ॅक्ट १९३९’लाही आव्हान दिले आहे.
==============================================

ब्रिटन आणि युरोपही आता सुरक्षित राहिले नाहीत - ट्रम्प

  • वॉशिंग्टन : ब्रिटन आणि युरोपही आता सुरक्षित राहिले नाहीत, अशा शब्दांत रिपब्लिकनचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रसेल्स हल्ल्यावर भाष्य केले आहे.
    येथे एका वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, युरोपमधील परिस्थिती कठीण आहे. तथापि, अमेरिकन नागरिकांसाठी अमेरिका सुरक्षित आहे, असाही विचार मी कधी केला नाही. इंग्लंड असो की, ब्रसेल्स अथवा युरोप हे आता सुरक्षित राहिलेले नाहीत. अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी जनतेला नुकतेच आवाहन केले आहे की, युरोपात गेल्यावर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी यावर भाष्य केले आहे, हे विशेष.
==============================================

कराची प्रेस क्लबवर गुंडांचा हिंसक हल्ला, काही पत्रकार जखमी


  • कराची, दि. 28 - कराची प्रेस क्लबवर रविवारी 60 ते 70 जणांच्या जमावाने हल्ला केला असून मुमताझ कादरीच्या फाशीच्या विरोधात धार्मिक संघटनांनी केलेल्या आंदोलनाचा हा एक भाग होता. पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर यांच्या हत्येप्रकरणी काझीला फाशीची शिक्षा झाली होती. 
    अंजुमन तलबा ए इस्लाम या संघटनेने  निदर्शने लाइव्ह का दाखवत नाही असे विचारत हिंसक जमावाने प्रेस क्लबवर हल्ला केला. प्रक्षेपणाचा व प्रेस क्लबचा काही संबंध नसतो, हे क्लबच्या पदिदिकाऱ्यांचे म्हणणे निदर्शकांच्या पचनी पडले नाही आणि त्यांनी लाठ्या काठ्या व पेट्रोल बाँबसह क्लबमध्ये घसून तोडफोड केली. काही पत्रकार जखमी झाले तर कॅमेरे व अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
    कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष फाझिल जामिली यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या गुंडांनी काही कॅमेरे व अन्य उपकरणे चोरल्याचा आरोपही जामिली यांनी केला. या हल्ल्याचे फोटो व चित्रीकरण उपलब्ध असून हल्लेखोरांची ओळख पटवायला याचा उपयोग होईल असे त्यांनी म्हटले आहे. आज या प्रकरणी सात संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
    भारतातल्या पत्रकारांनीही या घटनेचा निषेध केला आहे. 
==============================================

लाहोर हल्ल्याचे लक्ष्य होते ख्रिश्चन

  • लाहोर : येथील एका लोकप्रिय उद्यानात रविवारी करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यातील बळींची संख्या वाढूून ७२ झाली असतानाच तालिबानने या हल्ल्याचे लक्ष्य ईस्टर साजरा करणारे ख्रिश्चन होते, असा दावा केला आहे. मृतांत २९ बालकांचा समावेश आहे.
    जखमींपैकी तिघांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे बळींचा आकडा वाढला, असे पंजाब आपत्कालीन सेवेतील बचाव पथकाच्या प्रवक्त्या दीबा शहनाज यांनी सांगितले. ३०० जखमींपैकी २६ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, असेही त्या म्हणाल्या. मृतांत २९ बालके व आठ महिलांचा समावेश आहे. मृतांपैकी २० जण ख्रिश्चन तर उर्वरित बहुतांश मुस्लिम आहेत. अल्लाम्मा ए इक्बाल टाऊनमधील गुलशन-ए-इक्बाल उद्यानात लोकांची प्रचंड गर्दी असताना हल्ला करण्यात झाला.
    ईस्टर संडेमुळे ख्रिश्चन कुटुंबेही मोठ्या संख्येने उद्यानात आलेली होती. तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचा फुटीर गट जमातुल अहरारने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. विशीतील आत्मघातकी हल्लेखोराने हा हल्ला घडवून आणला होता. ईस्टर साजरा करणाऱ्या ख्रिश्चनांना लक्ष्य करण्यात आले होते, असे जमातुलचा प्रवक्ता एहसानउल्ला एहसान याने म्हटले. तथापि, पंजाब सरकारने केवळ ख्रिश्चनांना लक्ष्य केल्याचा तालिबानचा दावा फेटाळून लावला आहे.
==============================================

ब्रसेल्स हल्ल्याप्रकरणी अजून तिघांना अटक


  • ब्रसेल्स, दि. 28 - दहशतवादी हल्ला प्रकरणी पोलिसांचं धाडसत्र सुरु असून अजून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे यासिन, मोहम्मद आणि अबुबकेर अशी आहेत. त्यांच्याबद्द्ल अजून माहिती देण्या अधिका-यांनी नकार दिला आहे. या तिघांनी अटक करण्यात आली असून चौकशी सुरु आहे. 
    पोलिसांनी अजून एका व्यक्तीला अटक केली होती मात्र चौकशी करुन त्याला सोडून देण्यात आलं आहे. पोलिसांचं धाडसत्र सुरुच असूनरविवारी 13 ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये या 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली होती. दरम्यान बेल्जिअम अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात जखमी झालेल्या 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला असून 35 वर पोहोचला आहे. 
==============================================

भारतीय चॅनेल्ससारखा फक्त TRP चा विचार करू नका, देशाचा विचार करा - पाकिस्तानच्या कानपिचक्या


  • इस्लामाबाद, दि. 28 - भारतीय प्रसारमाध्यमे विधीनिषेधशून्य वागतात आणि केवळ टेलिव्हिजन रेटिंगचा विचार करून बातम्या देतात असा आरोप करत पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या नियामक मंडळाने संवेदनशील पद्धतीने बातमीदारी करण्याचे आवाहन प्रसारमाध्यमांना केले आहे.
    लाहोर, कराची व इस्लामाबादमध्ये घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नियामक मंडळाने सगळ्या प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे. आपले व्यावसायिक कर्तव्य पार पाडण्याच्या नादात अतिउत्साहीपणा करू नका, त्यामुळे राष्ट्राचा अॅक्शन प्लॅन धोक्यात येऊ शकतो अशी तंबीही देण्यात आली आहे.
    भारतीय प्रसारमाध्यमे निव्वळ व्यावसायिक नफ्यातोट्याचा विचार करत असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाऊ नका, असे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी ब्रसेल्सच्या हल्ल्यांच्यावेळी आंतरराष्ट्रीयप्रसारमाध्यमांनी ज्या संवेदनशीलतेने वार्तांकन केले त्या व्यावसायिक वृत्तीचे पालन करा असा सल्ला देण्यात आला आहे.
    भारतीय प्रसारमाध्यमांच्या नादी लागून मॅरेथॉन सेशन्स करत बसाल आणि राष्ट्राप्रती संवेदनशीलता दाखवली नाहीत तर पाकिस्तानबाबत देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरीह अस्थिरतेचा संदेश जाईल असा इशारा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना देण्यात आला आहे.
    अशा अवघड प्रसंगी वार्तांकन करताना प्रत्येकवेळी सकारात्मक व सारासार विचार करून प्रगल्भ वृत्तीचे दर्शन घडवावे अशी अपेक्षा पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने प्रसारमाध्यमांकडून व्यक्त केली आहे
==============================================
जय मीम-जय भीम'ची ओवेसी यांची घोषणा
लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी "जय मीम (मुस्लिम)-जय भीम‘ अशी घोषणा "एमआयएम‘चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आज दिली. "जय हिंद, जय भारत‘ अशा घोषणाही त्यांनी पत्रकार परिषदेत दिल्या. "भारत माता की जय‘ अशी घोषणा देण्यास नकार दिल्यामुळे ओवेसी वादात सापडले आहेत. 
उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आज लखनौला भेट दिली आणि समाजवादी पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप केला. "मेरी पार्टी सिर्फ मुस्लिम की नही है, ये हिन्दुस्तानियों की पार्टी है,‘ असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी ओवेसींना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी त्यांना पळवून लावले.
==============================================
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर सोलापूरची मोहर

‘रिंगण’साठी मकरंद माने, ‘सैराट’ची नायिका रिंकू राजगुरू, मिथुनचंद्र चौधरी यांच्या पायवाट लघुपटाचा गौरव
सोलापूर/पंढरपूर/नातेपुते/केम - ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज दिल्लीत करण्यात आली. यातील काही पुरस्कारांवर सोलापूरच्या मातीतील कलाकारांनी आपली मोहर उमटवली. अकलूज येथील मकरंद माने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रिंगण’ या चित्रपटाला मराठीमधील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा बहुमान मिळाला. तर येथीलच जिजामाता कन्या शाळेत शिकत असलेल्या रिंकू महादेव राजगुरूला ‘सैराट’ चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर पाटकूल (ता. मोहोळ) येथील मिथुनचंद्र चौधरी यांच्या पायवाट या लघुपटास सर्वोत्कृष्ट शैक्षणिक फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.


मकरंद माने यांनी माझा खूप मोठा सन्मान केला - सावजी 
रिंगण चित्रपटातील अभिनेते श्‍याम सावजी म्हणाले, की  ‘रिंगण’च्या ऑडिशनला मी जाऊ शकलो नव्हतो. पण ‘रिंगण’मधली अध्यक्ष ही व्यक्तिरेखा माझ्या नशिबातच असावी. ‘एलिझाबेथ एकादशी’ला सहदिग्दर्शक असणारे अक्षय खाडिलकर ‘रिंगण’ला पण सहायक होते. ‘एलिझाबेथ’मधले माझे काम त्यांनी बघितले असल्याने श्री. खाडिलकरांनी मला फोन करून ‘रिंगण’चे दिग्दर्शक मकरंद माने यांना भेटायला सांगितले. श्री. माने यांची भेट घेऊन त्यांना काही वाक्‍ये बोलून दाखवली आणि त्यानंतर लगेचच श्री. माने यांनी चित्रपटातील अध्यक्षाच्या भूमिकेसाठी आपली निवड केली. श्री विठ्ठल मंदिर परिसरात ‘रिंगण’चे चित्रीकरण झाले. ‘रिंगण’मध्ये मुख्य नायक म्हणून हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते शशांक शेंडे (कमिने, इश्‍किया, चिल्लर पार्टी, ख्वाडा, पांगिरा, ताऱ्याचे बेट वगैरे) हे होते आणि त्यांच्या सोबतच माझे मुख्य प्रसंग होते. त्यामुळे आपण काहीशा दडपणात होतो. 
==============================================
मराठी माध्यमात शिकून युवकाचे आयआयटीत यश
खटावच्या अक्षय तोडकरचे होतेय कौतुक
खटाव - लहानपणी खोडकर, खेळकर असलेल्या युवकाने मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनही आयआयटीमध्ये यश मिळविले. दुष्काळी खटावमधील अक्षय तोडकरने मिळविलेले हे यश परिस्थितीशी झगडणाऱ्या युवक-युवतींसाठी प्रेरणादायी आहे.

इंगरूळ (ता. शिराळा) येथून नोकरीनिमित्त खटाव येथे स्थायिक झालेले प्रा. डॉ. बाजीराव तोडकर हे खटावच्या शहाजीराजे महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषय शिकवतात. त्यांचा मुलगा अक्षय याचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण खटाव येथेच मराठी माध्यमातून झाले. बालपणापासून ते अगदी दहावीपर्यंत खोडकर, भांडखोर व कडकडी म्हणून अक्षय परिचित होता. त्यातूनच शाळेने त्याला ‘अ’ तुकडीतून ‘क’मध्ये दाखल केले होते. काही वेळा लोक अक्षयविषयी तक्रार घेऊन तोडकर सरांकडे येत असत. नंतर शांतपणे ते मुलाचे समुपदेशन करत होते. अक्षयची आई विद्या यांनीही त्याला नेहमी समजून घेतले. अशा वातावरणामुळे अक्षयची शालेय प्रगती सुरू झाली. बारावीनंतर त्याने पुण्यात बी. ई. केले. त्यानंतर त्याला मद्रास (चेन्नई) येथे आय. आय. टी. साठी प्रवेश मिळाला. त्यातही तो यशस्वी झाला. महिन्यापूर्वीच त्याचे आय. आय. टी. चे शिक्षण पूर्ण झाले आहे. आज तो त्याच्या यशाचे सर्व श्रेय आई-वडिलांना देतो. मला आई-वडिलांनी समजून घेतले नसते तर आज मी हे यश पाहू शकलो नसतो, असे तो नमूद करतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या हुशार युवकांना सहकार्य करणे, त्याचबरोबर ग्रामीण भागातील युवकांचा स्पर्धा परीक्षा, आय. आय. टी. बाबत मार्गदर्शन करण्याची इच्छा अक्षयने व्यक्त केली.

जीवनात केवळ पैसाच कमवायचा नाही, तर भविष्यात विधायक विचारांच्या युवकांना एकत्र आणून समाजासाठी त्यांच्या कौशल्याचा व्यापकपणे उपयोग करून घ्यायचा आहे.
==============================================
युवराजच्या दुखापतीमुळे मनीष पांडे संघात
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराज सिंगच्या घोट्याला दुखापत झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय क्रिकेट संघात मनीष पांडेचा समावेश करण्यात आला आहे.

ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 31 मार्चला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाने मनीष पांडेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा अजिंक्य रहाणेला अद्याप एकही संधी मिळाली नसतानाही, मनीषचा संघात सहभागी झाला आहे. मुंबईत हा सामना होणार असून, युवराजची दुखापत गंभीर असली तर या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना युवराजच्या घोट्याला दुखापत झाली होती. सध्या तो मोहालीतच असून, मुंबईत आल्यावर त्याच्या घोट्याचे एमआरआय स्कॅन करण्यात येईल. त्यानंतरच त्याच्या खेळण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
==============================================
...त्यामुळे विराटने मला पैसे द्यायला हवेत - धोनी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय कर्णधार खुश हुआ]

मोहाली - वेगाचा बादशहा उसेन बोल्टनेही महेंद्रसिंह धोनीच्या स्प्रिंटचे (जलद धावणे) कौतुक केलेले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयात अभूतपूर्व फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने धावा काढताना पळण्यात धोनीलाही मागे टाकले होते. त्याच्या या कौशल्याचे कौतुक करताना धोनी हसत हसत म्हणाला, ‘‘विराटच्या धावा पूर्ण करण्यासाठी मी दुसऱ्या बाजूने प्रयत्न केल्यामुळे विराटने मला पैसे द्यायला हवेत.’’

भारताच्या विजयात कोहली आणि धोनी यांची नाबाद ६७ धावांची भागीदारीदेखील निर्णायक होती. त्यांचे धावा चोरण्याचे तंत्र अफलातून होते. धाव नसताना एकेरी आणि एकेरी धाव असताना दुहेरी असा सपाटा या जोडीने लावला होता. त्यामुळेच धोनीने गमतीने मी धावत होतो, म्हणून विराटच्या धावा पूर्ण झाल्या, त्याने मला याचे पैसे द्यायला हवेत, असे सांगितले. धोनी गंमत करत असला, तरी त्यांची भागीदारी अवाक्‌ करणारी होती. तंदुरुस्तीच्या आघाडीवर कोहली कर्णधाराच्या एक पाऊल पुढेच होता. 

त्यांच्या भागीदारीत धोनीचा वाटा फक्त १८ धावांचा होता. धोनी म्हणाला, ‘‘वास्तविक पाहाता खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल नव्हती. काहीसे आखूड टप्प्याचे चेंडू टोलाविणे कठीण होते. खास करून फिरकी गोलंदाजांविरुद्ध हल्ला चढविणे सोपे नव्हते. विराट आणि माझी जोडी जमल्यानंतर आम्ही धावा अक्षरशः चोरून काढत होतो. युवराजच्या पायाला दुखापत झाल्यामुळे विराट अशा धावा काढताना हतबल झाला होता. त्यामुळे पुढच्या षटकांत धावांचे आव्हान वाढले. कोहलीने धाव काढताना दाखविलेली जिद्द आणि त्याला असणारी विजयाची आस थक्क करणारी होती. मला ती त्याच्या डोळ्यांत दिसत होती.’’
==============================================
पुण्यात वाहनांच्या जळीतकांडाचे सत्र सुरुच
पुणे - कात्रज परिसरातील गणेश पार्क सोसायटीमध्ये आज (मंगळवार) पहाटे अडीचच्या सुमारास 3 चारचाकी आणि 15 दुचाकी जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पुण्यात अद्याप वाहनांच्या जळीतकांडाचे सत्र सुरुच असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज चौकामध्ये पीएमपी बसस्टॉपशेजारी असलेल्या गणेश पार्क सोसायटी (भाजीमंडईच्या गल्लीत) 3 चारचाकी आणि 15 दुचाकी वाहनांना अज्ञात व्यक्तींनी आग लावली. या आगीनंतर मोठ्या प्रमाणात आग पसरली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आग लागल्यानंतर सर्व रहिवाशी छतावर गेल्याने कोणालाही इजा झालेली नाही. कात्रज, सिंहगड व मुख्यालयातील अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे पंधरा ते वीस मिनिटातच आग नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत एकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, चौकशी करत आहेत.
==============================================
ब्रुसेल्स; बेपत्ता राघवेंद्रचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट
नवी दिल्ली - ब्रुसेल्स येथे विमानतळावर आणि मेट्रो स्थानकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर बेपत्ता असलेला भारतीय अभियंता राघवेंद्र गणेश हा मृत झाल्याची खात्री पटल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले आहे. 

राघवेंद्र (वय 31) हा इन्फोसिस कंपनीचा कर्मचारी आहे. त्याच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मेट्रो स्थानकावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यातच तो मृत्युमुखी पडलेल्याचे बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याचा मृतदेह सध्या बेल्जियममध्येच असलेल्या त्याच्या कुटुंबीयांकडे लवकरच सुपूर्त केला जाणार आहे. राघवेंद्रच्या मृत्यूला ब्रुसेल्समधील भारतीय दूतावासाने दुजोरा दिला आहे. राघवेंद्रच्या मागे त्याची पत्नी आणि एका महिन्याचे बाळ आहे. तो ब्रुसेल्समध्ये गेल्या चार वर्षांपासून राहत होता. हल्ल्याच्या दिवशी कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे मेट्रोने जात असतानाच आत्मघाती स्फोट झाल्याने तो मरण पावला.

बेल्जियममध्ये "इसिस‘च्या दहशतवाद्यांनी 22 मार्चला घडवून आणलेल्या आत्मघाती बॉंबस्फोटांत 35 जणांचा मृत्यू झाला होता.
==============================================
नांदेडचा शोषखड्यांचा पॅटर्न कामास शासनाची मान्‍यता, राज्‍यात सर्वत्र होणार कामे

सर्व महाराष्‍ट्रास होणार फायदा
नांदेड - महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शोषखड्यांचे कामास मान्‍यता आहे. सदर कामांची जिल्‍हा परिषद नांदेड मार्फत प्रभावी अंमलबजावणी करून राज्‍यात नव्‍हे तर देशात नांदेड चा डासमुक्‍त, गटारमुक्‍त पॅटर्न नावारूपाला आला आहे. ईतर राज्‍यांनी तसेच महाराष्‍ट्रातील ईतर जिल्‍ह्यांनी या कामाची नांदेड येथे भेटीत पाहणी करून प्रशंसा केली आहे. सदर काम हे ग्रामीण भागात अतिशय उपयुक्‍त ठरत असून सदर कामाबाबत लोकांना महत्‍व पटल्‍याने मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्‍यात येत आहेत. गावे मोठ्या प्रमाणात डासमुक्‍त व गटारमुक्‍त झाली आहेत. ईतर राज्‍यांत व जिल्‍ह्यांत आता नांदेडचा शोषखड्यांचा पॅटर्न राबविण्‍यात येत आहे.  
परंतू सदर कामे घेतांना शासन निकषानूसार 2111 रू. च्‍या एक शोषखड्याच्‍या कामा करीता एक हजेरीपत्रक निर्गमीत करूनच काम करणे बंधनकारक होते. सदर कामाची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्‍याने एक कामाकरीता तांत्रिक बाब पाहाता लाभार्थीचे जॉबकार्ड तयार करणे, बँक खाते मिळवणे, अंदाजपत्रक तयार करणे व त्‍याची सर्व माहिती ऑनलाईन भरून हजेरीपत्रक काढणे या सर्व बाबी करणेस यंत्रणेचा बरेचसा वेळ जाउन विलंब होत होता. तसेच लाभार्थींना हजेरीपत्रक न मिळाल्‍याणे मजुरीची रक्‍कम मिळण्‍यास विलंब होत असे किंवा अनुदाना पासून वंचित राहत होते. जि.प. नांदेड प्रशासना मार्फत वरील अडचणीं करीता 25 शोषखड्यांचे कामाचे एकच हजेरीपत्रक काढण्‍याचा प्रस्‍ताव शासनास पाठविण्‍यात आला होता. परंतू त्‍यास मान्‍यता प्राप्‍त झाली नसल्‍याने लोकांना अनुदाना पासून वंचीत राहावे लागत होते. ही अडचण लक्षात घेउन जिल्‍ह्यातील खासदार, आमदार, जि.प. अध्‍यक्षा, उपाध्‍यक्ष, विषय समितींचे सर्व सभापती, सर्व जि.प. सदस्‍य व लोकप्रतिनिधींनी शासनाच्‍या बाब निदर्शणास आणली. तसेच  मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे, मंत्री (ग्रामविकास, रोहयो व जलसंधारण, महिला व बालकल्‍याण) यांची भेट घेउन वरील अडचण निर्दशणास आनूण दिली. तसेच सातत्‍याने पाठपुरावा केला, त्‍यांचे पाठपुराव्‍याने जि.प. नांदेड प्रशासनाणे शासनाकडे सादर केलेल्‍या 25 शोषखड्यांच्‍या कामाकरीता एक हजेरीपत्रक काढण्‍याच्‍या प्रस्‍तावास महाराष्‍ट्र शासनाने दि. 28 मार्च 2016 रोजी मान्‍यता दिली आहे. शासनाने नांदेडचा प्रस्‍ताव ग्राह्य धरून राज्‍यातील सर्व जिल्‍ह्यांना याची मान्‍यता प्रदान केल्‍याने राज्‍यात सर्वांना याचा फायदा होणार आहे.
मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यु काळे यांनी वरील प्रस्‍तावास शासनाने मान्‍यता दिल्‍या बाबत शासनाचे, मंत्री महोदयांचे तसेच ज्‍यांनी सतत या कामात, प्रस्‍तावाचा शासनाकडे पाठपुरावा करणा-या जिल्‍ह्यातील खासदार, आमदार, जि.प. अध्‍यक्षा, उपाध्‍यक्ष, विषय समितींचे सर्व सभापती, सर्व जि.प. सदस्‍य व लोकप्रतिनिधी यांचे आभार व्‍यक्‍त केले. यानंतर जिल्‍ह्यात सर्व ग्राम पंचायती डासमुक्‍त, गटारमुक्‍त व अरोग्‍यदायी करण्‍याचा संकल्‍प जिल्‍हा परिषद प्रशसनाने केला आहे, अशी माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. अभिमन्‍यु काळे यांनी दिली आहे. 

No comments: