Thursday, 17 March 2016

नमस्कार लाईव्ह १७-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- न्यूयॉर्क -आंनदी देशांच्या यादीत भारत 118 व्या क्रमांकावर 
२- चीनमधल्या 'या' गावामध्ये कोब्रा, अजगर पाळीव प्राणी 
३- कराची; माझ्या पोटात आफ्रिदीचं बाळ, मॉडेल अर्शी खानचा दावा 
४- सत्तावन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी दलाई लामांनी सोडले तिबेट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ 
६- मेरठ; आमदारकीचं तिकीट पाहिजे? फेसबुकवर 25 हजार लाईक्स मिळवा 
७- सावधान! तुमच्या दुधात डिटर्जंट, व्हाईट पेन्ट, रिफाइन्ड ऑईल तर नाही  
८- मुख्यमंत्रीपदासाठी मायावतींना पसंती, अखिलेश सरकारवर नाराजी, एबीपी-नेल्सनचा सर्वे 
९- मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये आता मोदींचा पुतळा 
१०- युपीएने दोन वर्षे काहीच केले नाही- सोनिया गांधी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- ओवेसीची गर्दन कायद्यानं उडवा, ‘सामना’मधून टीकास्त्र 
१२- लोकलखाली 24 तासात 17 जणांचा चिरडून बळी  
१३- विजय मल्ल्यांच्या किंगफिशर हाऊसचा आज लिलाव 
१४- कोर्टात हजर होण्यापूर्वी भुजबळांनी तब्येत बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी 
१५- अमेझॉन फ्लिपकार्टला विकत घेण्याच्या तयारीत? 
१६- बंद फ्लॅटमध्ये बायका नाचवणं गुन्हा नाही : हायकोर्ट 
१७- जयपूर; 'बीफ' न सापडल्याने काश्मिरी विद्यार्थ्यांना जामीन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- अलाहाबाद; 'ओवेसीची जीभ कापणाऱ्याला १ कोटीचं बक्षीस', भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान 
१९- हैदराबाद; 2.26 लाखांची पाणीपट्टी थकित, दिया मिर्झाला नोटीस 
२०- वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पुण्यातील महिलेच्या जीवावर 
२१- म्हैसूर; अजब योगायोग... ४५ वर्षांच्या विवाहानंतर एकाच दिवशी झाला पती-पत्नीचा मृत्यू 
२२- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसला भीषण अपघात, १ ठार 
२३- लखनऊ; ४ वर्ष पूर्ण झाली म्हणून अखिलेश सरकारने आणले समाजवादी परफ्युम 
२४- नाशिक; ड्रीमसिटी'च्या रहिवाशांनी केली पाणीटंचाईवर मात  
२५- देहरादून; 'त्या' भाजप आमदाराकडून घोड्याची पाहणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- रंगीला मल्ल्या' व्हिडिओ यू-ट्यूबवर व्हायरल, 5 दिवसात 15 लाख हिट्स  
२७- ...म्हणून टीम इंडियाचा इकॉनॉमी क्लासनं प्रवास 
२८- गेलचं अवघ्या 47 चेडूंत शतक, विडींजचा इंग्लंडवर दणदणीत विजय 
२९- आजच्याच दिवशी सचिननं 'तो' विश्वविक्रम रचला होता 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३०- पवन नगरमध्ये भरदिवसा सत्तर हजाराची चोरी 
३१- किनवट; बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी आदिवासी १८ आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट 
३२- टेंभूर्णीच्या ग्रामस्थांचे जि.प. समोर भजन आंदोलन 
३३- कारागृहातील महिला कैद्यांना साडी व मिठाईचे वाटप 
३४- उन्हाची तीव्रता वाढली; मोठ्या प्रमाणात मटके बाजारात दाखल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो. विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो. मैत्री असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो
(नामदेव येलकटवार, नमस्कार लाईव्ह)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
साई पावडे, सोनू मिसळे, नरेश जाधव, अरुण गिरी, रविंदर बोल्लाराम, योगेश जगताप, सुर्यकांत पोवाडे, राज धुळे, सुमित तागम्पुरे, मधुकर खंदारे, सत्यनारायण जोड, प्रवीण दुब्बेवार, सागर सोनावणे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


==================================

रंगीला मल्ल्या' व्हिडिओ यू-ट्यूबवर व्हायरल, 5 दिवसात 15 लाख हिट्स 

'रंगीला मल्ल्या' व्हिडिओ यू-ट्यूबवर व्हायरल, 5 दिवसात 15 लाख हिट्स
नवी दिल्ली: एबीपी न्यूजनं 11 मार्चला विजय मल्याच्या जीवनावरील एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता. हा व्हिडिओ यूट्यूबवर भलताच व्हायरल झाला असून या व्हिडिओला मागील पाच दिवसात 15 लाख हिट्स मिळाले आहेत.

सौंदर्याचा दिवाणा, फॅशनचा चाहता, घर, घोड्यांच शौकिन अमेरिकापासून आफ्रिेकेपर्यंत संपत्ती असणारा मल्ल्या गेल्या दिवसांपासून बऱ्याच चर्चेत आहे. कारण की 17 बँकांचं जवळजवळ 9 हजार 19 कोटींच कर्ज थकवून मल्ल्या फरार झाला आहे.

मल्ल्या पळालाचा कसा असा प्रश्न विरोधकांनी उचलून संसंदेतही बराच हंगाम केला. मात्र याच मल्ल्याचा एबीपी न्यूज नेटवर्कनं ठावठिकाणा शोधून काढला.

सध्या विजय मल्ल्या ब्रिटनमधील एका गावात असणाऱ्या आपल्या अलिशान बंगल्यात राहत आहे. 30 एकरवर असणाऱ्या प्रचंड मोठ्या अशा बंगल्यात तो राहत असून ब्रिटनमधील सर्वात मोठ्या घरांपैकी एक असल्याचं मानण्यात येत आहे. मल्ल्याचा हा ठावठिकाणा एबीपी माझाच्या प्रतिनिधी पूनम जोशींनी शोधून काढला आहे.

पाहा विजय मल्याची ‘रंगीली दुनिया’:  


==================================

लोकलखाली 24 तासात 17 जणांचा चिरडून बळी 

लोकलखाली 24 तासात 17 जणांचा चिरडून बळी
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनखाली 24 तासात 17 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी आहेत. मागील 24 तासात मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवर झालेल्या अपघातात 17 प्रवाशांचा बळी गेला आहे. यातील सर्वाधिक अपघात मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावर झाले असल्याचं समोर आलं आहे.
कल्याण येथील अपघातात 3 पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तर डोंबिवली, ठाणे, कुर्ला, सीएसटी, चर्चगेट, अंधेरी, बोरिवली, वसई रोड, पालघर, वडाळा, वांद्रे या स्थानकांवर झालेल्या अपघातात एकूण 11 जणांनी आपला जीव गमावला आहे. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर फलाटांची उंची वाढवण्याचं काम सुरु आहे. मात्र गर्दी आणि लोकल पकडण्याची घाई हीच अपघातांमागील प्रमुख कारणे असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितलं. मृतांमध्ये 11 पुरुष आणि तीन महिला आहेत. तर 3 मृतदेहांची ओळख अद्यापही पटली नसल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं.
लोकलमधून दररोज 75 लाख नागरिक प्रवासी करतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस जनजागृती मोहीम राबवतात. मात्र अपघातात प्रवाशांचा बळी जाण्याचं सत्र सुरुच आहे.
==================================

ओवेसीची गर्दन कायद्यानं उडवा, ‘सामना’मधून टीकास्त्र

ओवेसीची गर्दन कायद्यानं उडवा, ‘सामना’मधून टीकास्त्र
मुंबई : गळ्यावर चाकू ठेवून जरी कुणी ‘भारत माता की जय’ म्हणायला सांगितलं, तरी घोषणा देणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एमआयएमचे खासदार असदुद्दीने ओवेसींवर शिवसेनेने ‘सामना’तून सडकून टीका केली आहे. “ओवेसींच्या गळ्यास फक्त चाकू कसला लावता? त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी”, अशा शब्दांत ‘सामना’च्या संपदकीय लेखातून ओवेसींचा समाचार घेण्यात आला आहे.
 भारत मातेचा अपमान करणाऱ्यांचं नागरिकत्व रद्द करण्याची मागणीही शिवसेनेने ‘सामना’च्या संपादकीय लेखातून केली आहे. 
“ओवेसीची कायद्यानं गर्दन उडवा”
 “आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी ‘भारतमाता की जय’ असे कधीच बोलणार नाही अशी बांग ओवेसीने ठोकली. खरे म्हणजे अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू कसला लावता? त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी. ओवेसी यांनी भारतमातेचा अपमान केला आहे. आता ओवेसीच्या विरोधात मुसलमानांनी भारतमातेचा जयजयकार करावा. जे भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, बेशक काढून घ्या!” असे ‘सामना’त म्हटले आहे.
==================================

विजय मल्ल्यांच्या किंगफिशर हाऊसचा आज लिलाव

विजय मल्ल्यांच्या किंगफिशर हाऊसचा आज लिलाव
मुंबई : कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्या यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने दणका दिला आहे. स्टेट बँक आज मुंबईतील किंगफिशर हाऊसचा लिलाव करणार आहे. किंगफिशर हाऊस मुंबई विमानतळाजवळील हायवेजवळ आहे.
किंगफिशरवर सुमारे 6963 कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यापैकी काही कर्जदारांनी सुमारे 1600 कोटी रुपयांचे शेअर्स विकून पैशांची वसुली केली, ज्यात एसबीआयचं कर्ज सर्वाधिक आहे.
बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला स्टेट बँकेने 6 हजार 963 कोटींचं कर्ज दिलं होतं. मात्र ते कर्ज बुडवून विजय मल्ल्या लंडनला पळाले. आता हे कर्ज वसूल करण्यासाठी ई-लिलावाच्या माध्यामातून ही प्रक्रिया पार पडणार आहे.
2,401.70 चौरस मीटर असं किंगफिशर हाऊसचं क्षेत्रफळ आहे. या हाऊसची बेस प्राईज दीडशे कोटी रुपये ठेवली असून पाच लाखांच्या हिशेबाने प्रत्येक बोली वाढेल. लिलावात सहभागी होणाऱ्या कंपन्यांनी 15 लाख रुपये आधीच डिपॉझिट केले आहेत.
कर्ज प्रकरणाचा निकाल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूने लागल्यानंतर गेल्या वर्षीच किंगफिशर हाऊस ताब्यात घेण्यात आलं होतं.
किंगफिशर हाऊस बरोबरच गोव्यातलं किंगफिशर व्हिला या आलिशान घराचाही लिलाव होणार आहे. या घराची किंमत जवळपास 90 कोटी आहे.
2005 मध्ये विजय मल्ल्या यांनी किंगफिशर एअरलाईन सुरु केली. पण तोट्यात राहिल्याने एअरलाईन ठप्प झाली. त्यानंतर ऑक्टोबर 2012 पासून किंगफिशर एअरलाईन जमिनीवरच आहे.
==================================

सावधान! तुमच्या दुधात डिटर्जंट, व्हाईट पेन्ट, रिफाइन्ड ऑईल तर नाही

सावधान! तुमच्या दुधात डिटर्जंट, व्हाईट पेन्ट, रिफाइन्ड ऑईल तर नाही?
नवी दिल्ली दुधाच्या भेसळीबाबत अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भारतात तब्बल 68 टक्के दुधात भेसळ आढळून आली आहे. 2011 सालच्या खाद्य नियामक प्राधिकरणाच्या अहवालातून हे स्पष्ट झालं आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली.
 प्रकृतीसाठी धोकादायक असणारे पदार्थांची दुधात भेसळ केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, ग्लुकोज, पांढरे पेंट आणि रिफाइन्ड ऑइल यांसारख्या शरीराराला धोकायादायक असणारे पदार्थांची दुधात भेसळ असते.
 दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन स्कॅनर
 दुधाच्या भेसळीवर उपाय म्हणून केंद्र सरकार एका नव्या स्कॅनरवर काम करत आहे,. या स्कॅनरमुळे अवघ्या 40 सेकंदात भेसळयुक्त दूध ओळखता येणार आहे. आतापर्यंत दूध भेसळ ओळखण्यासाठी स्वतंत्र केमिकल टेस्ट करावी लागत असे. मात्र, आता ज्या स्कॅनरवर सरकार काम करत आहे, त्यामार्फत भेसळ रोखणं शक्य होणार आहे. 10 हजार रुपये या स्कॅनरची किंतम असणार आहे, तर प्रत्येक भेसळ चाचणीसाठी जवळपास 5 ते 10 पैशांचा खर्च येऊ शकतं.
==================================

आमदारकीचं तिकीट पाहिजे? फेसबुकवर 25 हजार लाईक्स मिळवा

आमदारकीचं तिकीट पाहिजे? फेसबुकवर 25 हजार लाईक्स मिळवा!
मेरठ : 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. भाजपच्या दृष्टीने उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सर्वच पक्ष उत्तर प्रदेशात जीवाचं रान करतात. अशातच उत्तर प्रदेशमध्ये भाजपने तिकीट वाटपासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे आणि एका वेगळ्या प्रकारे ‘पार्टी विथ डिफरन्स’ असल्याचे दाखवून दिले आहे. 
“जो उमेदवार सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव्ह असेल, त्याचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल. शिवाय, फेसबुकवर प्रत्येक पोस्टला 25 हजार लाईक्स असलतील, त्या व्यक्तीला आमदारकीच्या उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाईल. येत्या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव मोठा असेल”, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बोलले आणि अगदी दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेश भाजपने ते मनावरही घेतले. 
तिकीट वाटप करताना लोकप्रियता हा महत्त्वाचा निष्कर्ष उत्तप्रदेशात लावला जाणार आहे. म्हणूनच की काय उत्तर प्रदेशमध्ये सोशल मीडियावरील लोकप्रियता आमदारकीची तिकीट मिळण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या उमेदवाराचे फेसबुकवर 25 हजार फॉलोअर्स आहेत किंवा प्रत्येक पोस्टला 25 हजार लाईक्स असतील, त्यांनाच तिकीट मिळेल, असं फर्मानच निघालंय.
==================================

कोर्टात हजर होण्यापूर्वी भुजबळांनी तब्येत बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी

कोर्टात हजर होण्यापूर्वी भुजबळांनी तब्येत बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी
मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली आहे. जेजे रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी काल अंमलबजावणी संचलनालय कार्यालयात भुजबळांची वैद्यकीय तपासणी केली. भुजबळांचा जुना ईसीजी आणि नुकताच काढलेल्या ईसीजीमध्ये बदल असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार भुजबळांना छातीचा कोणाताही त्रास नसला चाचणी गरजेची आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना आज तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणण्यात येणार आहे. काल संध्याकाळच्या सुमारास भुजबळांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी ईडी ऑफिसमध्ये त्यांची तपासणी केली.
दरम्यान, 11 तास चौकशींनतर अंमलबजावणी संचलनालयाने छगन भुजबळ यांना 14 मार्च अटक केली होती. भुजबळांची दोन दिवसांची ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल.
==================================

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 3 रुपये 7 पैशांनी, तर डिझेल प्रतिलीटर 1 रुपया 90 पैशांनी महाग झालं आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.

पेट्रोलची किंमत मुंबईत 62 रुपये 72 पैसे होती, मात्र नवीन दरानुसार मुंबईत पेट्रोलची किंमत 65 रुपये 79 पैसे असेल.

29 फेब्रुवारी रोजी झालेल्या बदलावेळी पेट्रोलच्या किमतीत 3 रुपये 2 पैशांनी घसरण झाली होती, तर डिझेलचे दर 1 रुपया 47 पैशांनी वाढले होते.
==================================

...म्हणून टीम इंडियाचा इकॉनॉमी क्लासनं प्रवास

...म्हणून टीम इंडियाचा इकॉनॉमी क्लासनं प्रवास!
ट्वेन्टी20 विश्वचषकातल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया आज संध्याकाळी नागपूरहून कोलकात्यात दाखल झाली. नागपूरहून कोलकात्याला जाण्यासाठी एकच विमान असून, त्यात बिझनेस क्लास प्रवासाची सोय नाही. त्यामुळं धोनी आणि त्याच्या शिलेदारांनी इकॉनॉमी क्लासमधूनच नागपूरहून कोलकात्यापर्यंतचा प्रवास केला.

साहजिकच, त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली होती. अनेकांनी विराट कोहली आणि सुरेश रैनाला स्वाक्षरीसाठी विनंती केली. खेळाडूंनीही चाहत्यांना निराश केलं नाही.

नागपूरच्या मैदानात झालेल्या सलामीच्या लढतीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता 19 मार्चला कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर भारताला पाकिस्तानचा मुकाबला करायचाय
==================================

गेलचं अवघ्या 47 चेडूंत शतक, विडींजचा इंग्लंडवर दणदणीत विजय

गेलचं अवघ्या 47 चेडूंत शतक, विडींजचा इंग्लंडवर दणदणीत विजय
मुंबई: ख्रिस गेलच्या स्फोटक शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं इंग्लंडचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात विजयी सलामी दिली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ख्रिस गेलनं इंग्लिश गोलंदाजीची अक्षरश: लक्तरं काढली.

गेलनं 47 चेंडूंत शतक झळकावून ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये तिसरं वेगवान शतक ठोकलं. गेलनं 48 चेंडूंत नाबाद 100 धावांची खेळी पाच चौकार आणि 11 षटकारांनी सजवली. त्यामुळं वेस्ट इंडिजला 18.1 षटकांतच विजय साजरा करता आला.

या सामन्यात इंग्लंडनं वेस्ट इंडिजला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडीजचा सलामीवीर जॉन्सन चार्ल्स भोपळाही न फोडता माघारी परतला. पण त्यानंतर विंडीज फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजीवर वर्चस्व गाजवलं. विंडीजकडून मार्लन सॅम्युअल्सनं 27 चेंडूंत 37 धावांची खेळी केली.
==================================

मुख्यमंत्रीपदासाठी मायावतींना पसंती, अखिलेश सरकारवर नाराजी, एबीपी-नेल्सनचा सर्वे

मुख्यमंत्रीपदासाठी मायावतींना पसंती, अखिलेश सरकारवर नाराजी, एबीपी-नेल्सनचा सर्वे
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मायावतींना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्रिपदासांठी मायावतींना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुका वर्षभरावर राहिल्या असताना एबीपी न्यूज आणि नेल्सन सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये या घडीला मायावतींचं पारडं जड आहे. 
सर्व्हेनुसार भाजप दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या सरकारमध्ये असलेल्या अखिलेश यादव यांच्याबद्दल मात्र लोकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. 
उत्तरप्रदेशमधील याच पार्श्वभूमीवर येथील लोकांनी अखिलेश सरकारला फटकारलं आहे. त्यामुळे सध्या तरी उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा जादू चालताना दिसते आहे.
==================================

'ओवेसीची जीभ कापणाऱ्याला १ कोटीचं बक्षीस', भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

'ओवेसीची जीभ कापणाऱ्याला १ कोटीचं बक्षीस', भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान
अलाहाबाद: ‘गळ्यावर सुरी ठेवून ‘भारत माता की जय’ म्हणायला सांगितलं, तरी म्हणणार नाही.’ या असदुद्दीन ओवेसींच्या वक्तव्यावरुन बरंच राजकारण चांगलंच तापतं आहे. आता याच वक्तव्यावर अलाहाबादमधील भाजप नेते श्याम द्विवेदींनी ओवेसींची जीभ छाटणाऱ्याला एक कोटीचं बक्षीस देण्याचं वादग्रस्त विधान केलं आहे. 
याआधी बॉलिवूड अभिनेता आणि मोदी समर्थक अनुपम खेर यांनी म्हटलं होतं की, ‘भारत माता की जय बोलणं गरजेचं आहे. ही राष्ट्रवादाची एकमात्र व्याख्या असायला हवी.’ 
असदुद्दीन ओवेसींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करीत म्हटलं होतं की, ‘गळ्यावर सुरी ठेवून ‘भारत माता की जय’ म्हणायला सांगितलं, तरी म्हणणार नाही.’ त्यानंतर श्याम द्विवेदींनी त्यांच्याविरोधात जीभ छाटण्याचं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, याआधी सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, नव्या पिढीला भारत माता की जय बोलायला शिकवायला हवं. आज राज्यसभेतही या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली. त्याला राज्यसभेचे खासदार आणि गीतकार जावेद अख्तर यांनी ओवेसींचं नाव न घेता चांगलंच उत्तर दिलं.
==================================

अमेझॉन फ्लिपकार्टला विकत घेण्याच्या तयारीत?

अमेझॉन फ्लिपकार्टला विकत घेण्याच्या तयारीत?
मुंबई: संपूर्ण जगाला घरबसल्या ऑनलाईन शॉपिंगचं वेड लावणारी अॅमेझॉन कंपनी प्रतिस्पर्धी फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी उत्सुक असल्याचं समजतं आहे. दबक्या आवाजात का होईना पण उद्योग जगतात तशी जोरदार चर्चा आहे. 
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये या व्यवहारासंदर्भात प्राथमिक पातळीवर वाटाघाटी देखील झाल्या होत्या अशी सुत्रांची माहिती आहे. आजच्या घडीला फ्लिपकार्टचं व्हॅल्युएशन 15 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक आहे. फ्लिपकार्टसाठी अॅमेझॉननं किती बोली लावली आहे हे अद्याप गुलदस्त्यातचं आहे. मात्र, फ्लिपकार्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या अफवा असल्याचं सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 
ई-कॉमर्स क्षेत्रातील या दोन दिग्गज कंपन्या एकत्र आल्या तर त्यांना टक्कर देणं उर्वरित प्रतिस्पर्ध्यांना जवळपास अशक्य असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळं उद्योग जगताचं अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या हालचालींवर बारीक लक्ष असणार आहे.
==================================

2.26 लाखांची पाणीपट्टी थकित, दिया मिर्झाला नोटीस

2.26 लाखांची पाणीपट्टी थकित, दिया मिर्झाला नोटीस
हैदराबाद : माजी मिस एशिया पॅसिफिक, अभिनेत्री दिया मिर्झाला पाणीपट्टी थकवल्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. 2.26 लाख रुपयांचं पाण्याचं बिल न भरल्याने हैदराबाद महापालिकेच्या पाणी विभागाने रेड नोटीस पाठवली आहे.

विशेष म्हणजे 2008 पासून म्हणजे गेल्या 8 वर्षांची पाणीपट्टी दियाने भरलेली नाही. पाणीपट्टी विभागाच्या नोंदीनुसार ज्युबिली हिल्स या हैदराबादेतील दियाच्या राहत्या घराचं हे थकित बिल आहे. संबंधित विभागातर्फे दिया मिर्झाला अनेक वेळा नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र अद्यापही तिने बिल चुकवलेलं नाही. नोव्हेंबर 2012 मध्ये तिच्या घरातील पाण्याची जोडणी काढून टाकण्यात आली.
 जर कोणीच घरात राहत नसेल, तर पाण्याची जोडणी काढण्याबाबत त्यांनी कळवणं आवश्यक आहे, मात्र दियातर्फे कोणीच अशी माहिती दिली नसल्याचं पाणी विभागाने स्पष्ट केलं आहे. 
1 एप्रिल 2009 रोजी दियाची पाणीपट्टी 33 हजार 480 रुपये होती. मात्र थकित रक्कम, व्याज यामुळे ती रक्कम सव्वा दोन लाखांच्या घरात गेल्याचं सांगितलं जातं.
==================================

मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये आता मोदींचा पुतळा

मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये आता मोदींचा पुतळा
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळ्याचीही वर्णी लागणार आहे. भारतासह जगभरातील अनेक व्यक्तिमत्त्वांचे मेणाचे पुतळे आतापर्यंत बनवण्यात आले असून आता त्यात मोदींचाही समावेश होणार आहे.

‘जागतिक पातळीवरील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक’ या शब्दांत म्युझियमतर्फे मोदींचा गौरव करण्यात आला. मोदींच्या शरीराचं मोजमाप, केस-त्वचेचा रंग, बोटांचे ठसे, पेहराव इत्यादी गोष्टींची माहिती घेण्यासाठी मादाम तुसाँतर्फे एक पथक दिल्लीत आलं होतं. या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओही यूट्यूबवर जारी करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात मोदींच्या मेणाच्या पुतळ्याचं लंडन, सिंगापूर, हाँगकाँग आणि बँकॉकमधील वॅक्स म्युझियममध्ये अनावरण करण्यात येईल. मोदींची ओळख असलेला कुर्ता, क्रीम रंगाचं जॅकेट अशा पारंपरिक पेहरावात मोदींचा पुतळा असेल. हात जोडून नमस्कार करणारा असा पंतप्रधानांचा पुतळा असेल.
==================================

माझ्या पोटात आफ्रिदीचं बाळ, मॉडेल अर्शी खानचा दावा

माझ्या पोटात आफ्रिदीचं बाळ, मॉडेल अर्शी खानचा दावा
कराची : पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदी भारतप्रेमामुळे आधीच अडचणीत आला असताना आता आणखी एक खळबळजनक दावा केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी आफ्रिदीसोबत सेक्स केल्याचा दावा करणारी मॉडेल अर्शी खान आता प्रेग्नंट असल्याचं सांगत आहे. 
मी तीन महिन्यांची प्रेग्नंट असून माझ्या पोटात आफ्रिदीचं बाळ वाढत आहे, असा दावा पाकिस्तानी मॉडेल अर्शी खानने केला आहे. अर्शीने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन संबंधित ट्वीट केलं असून एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओतही अर्शी हाच दावा करताना दिसत आहे.
==================================

बंद फ्लॅटमध्ये बायका नाचवणं गुन्हा नाही : हायकोर्ट

बंद फ्लॅटमध्ये बायका नाचवणं गुन्हा नाही : हायकोर्ट
मुंबई : बंद फ्लॅटमध्ये बायका नाचवणे, त्यांच्यावर पैसे उडवणे, नाचणाऱ्या बायकांशी अश्लील वर्तन करणे, याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी 13 जणांवर नोंदवलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. हा निर्णय मुंबई पोलिसांना चांगलीच चपराक ठरली आहे.

गेल्यावर्षी अंधेरी येथील एका फ्लॅटमध्ये खाजगी पार्टी सुरु होती. तिथे महिला बिभत्स कपडे घालून नाचत होत्या. पार्टी करणारे पुरुष महिलांवर पैसे उडवत होते. महिलांशी बिभत्स वर्तन सुरु होते. त्या घरात डीजेही सुरु होता. एका पत्रकाराने याची अंधेरी पोलिसांकडे तक्रार केली. त्याची दखल घेत पोलिसांनी या घरावर छापा टाकला. तेव्हा एका महिलेनेच घराचे दार उघडले. त्यावेळी फ्लॅटमधून गाण्यांचा आवाज येत होता. पोलिस आतमध्ये गेला, तेव्हा महिलांवर पुरुष पैसे उडवत होते.
त्यांचं बिभत्स वर्तन सुरु होतं. त्याची नोंद करुन घेत पोलिसांनी तेथे असणाऱ्या 13 पुरुषांवर आयपीसी कलम 294 अंतर्गत गुन्हा नोंदवला. यानुसार, सावर्जनिक ठिकाणी बिभत्स वर्तन केल्यास तीन महिन्यांची शिक्षेची तरतुद आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी या 13 जणांनी ज्येष्ठ वकील राजेंद्र शिरोडकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

जस्टिस नरेश पाटील व जस्टिस ए. एम. बदार यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. आयपीसी कलम 294 अंतर्गत याचिकाकर्त्यांवर गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. कारण बंद फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरु होता. या कलमाच्या व्याख्येत कोठेही बंद फ्लॅटमधील बिभत्स प्रकारांचा गुन्हा घ्यावा, असे म्हटलेले नाही. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी अॅड. शिरोडकर यांनी केली.
==================================

वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पुण्यातील महिलेच्या जीवावर

वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पुण्यातील महिलेच्या जीवावर
पुणे : शरीराचं वाढलेलं वजन अनेकांसाठी काळजीचं कारण असतं. त्यामुळे ते कमी करण्यासाठी कधी व्यायामाचा मार्ग लोक निवडतात, कधी डाएटचा तर कधी चक्क शस्त्रक्रियेचाही. अशीच वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एका महिलेच्या जीवावर बेतल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. 37 वर्षांच्या ज्योती दुबे पेशाने डॉक्टर होत्या. पती सचिन दुबे आणि 5 वर्षांचा मुलगा असा त्यांचा परिवार. वजन जास्त असल्यामुळे त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची पद्धत निवडली. याला वैद्यकीय भाषेत बॅरिएट्रिक सर्जरी म्हणतात. मात्र ही शस्त्रक्रिया त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला महागात पडली.
शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांकडून हलगर्जी झाल्यामुळे पत्नीला जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांच्या पतीने केला आहे. 8 मार्चला ज्योती यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे ज्योती यांची 10 मार्चला पुन्हा तपासणी झाली. त्यावेळी त्यांची अन्ननलिका फाटल्याचं समोर आलं. 
शस्त्रक्रियेदरम्यानच्या हलगर्जीमुळे हे झाल्याचं म्हणत आता सचिन यांनी वानवडी पोलीस स्थानकात कमांड हॉस्पिटलविरोधात तक्रार दाखल केली आहे. 
दरम्यान शस्त्रक्रियेनंतर नैसर्गिकरित्या आलेल्या काही गुंतागुंतीमुळेच मृत्यू ओढावला असून यामध्ये हलगर्जी झाली नसल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. परंतु अशा शस्त्रक्रिया करताना अतिशय जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते असं या क्षेत्रात मागील अनेक वर्ष काम करत असलेल्या बॅरिएट्रिक सर्जन म्हणतात.
==================================

आजच्याच दिवशी सचिननं 'तो' विश्वविक्रम रचला होता

आजच्याच दिवशी सचिननं 'तो' विश्वविक्रम रचला होता!
मुंबई: सचिन रमेश तेंडुलकर… सिर्फ नामही काफी है! मैदानात येताच ज्याच्या नावावर नवा विक्रम जमा व्हायचा अशा या मास्टर ब्लास्टरनं चार वर्षापूर्वी आजच्याच दिवशी एक असा विक्रम रचला की जिथवर पोहचण्याचं फक्त स्वप्नंच पाहिलं जाऊ शकतं. 
होय! आजच्याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शतकांचं शतक ठोकलं होतं. सचिनचं 100वं शतकं… बांगलादेशविरोधात मिरपूरमध्ये वनडे सामन्यात सचिननं शतकांचं महाशतकं पूर्ण करुन एक आगळावेगळा विक्रम रचला होता. 
सचिननं 463 वनडे सामन्यात 49 शतकं ठोकली तर 200 कसोटी सामन्यात 51 शतकं ठोकली. क्रिकेटच्या दोन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 100 शतकं ठोकणारा सचिन तेंडुलकर हा पहिलाच खेळाडू आहे. 
सचिननं कसोटी क्रिकेटमध्ये 15921 धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये 18246 धावा केल्या आहेत. आज सचिन क्रिकेटच्या मैदानापासून दूर गेला असला तरी त्याच्या अनेक खेळी चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. अशा या महान फलंदाजला मानाचा मुजरा
==================================

चीनमधल्या 'या' गावामध्ये कोब्रा, अजगर पाळीव प्राणी


  • बीजिंग, दि. १७ - एखाद्या ठिकाणी साप असतो असे कोणी सांगितले तर, माणस पुन्हा त्या दिशेला जाण्याच धाडस करत नाही. सापापासून चार पावलं दूर रहाण्यातच आपली भलाई मानतात. पण चीनची राजधानी बिजींगमधील एका गावात विषारी साप पाळण्याची परंपरा आहे. 
    'जिसिकियाओ' नावाच्या गावात वर्षभरात ३० लाख साप जन्म घेतात. या गावाची लोकसंख्या फक्त १ हजार आहे. पण गावातील प्रत्येक घरामध्ये तुम्हाला विषारी साप सापडतील. अजगर, कोब्रा, वायपरसारखे विषारी साप इथे पाळले जातात. 
    फक्त आवड म्हणून नव्हे तर, व्यवसाय म्हणून इथे साप पाळले जातात. औषधांच्या निर्मितीसाठी सापाच्या विविध भागांची या गावात विक्री होते. या गावातील लोक अजगर, कोब्रा, वायपर या विषारी सापांना घाबरत नाहीत पण फाईव्ह स्टेप नावाच्या सापाला घाबरतात. हा साप चावला तर अवघी पाच पावल चालल्यानंतर तुमचा मृत्यू होतो. 
==================================

अजब योगायोग... ४५ वर्षांच्या विवाहानंतर एकाच दिवशी झाला पती-पत्नीचा मृत्यू


  • म्हैसूर, दि. १७ - खरं प्रेम असेल तर मृत्यूही तुम्हाला एकमेकांपासून दूर करू शकत नाही असं म्हणतात, पण कर्नाटकमध्ये मात्र हीच उक्ती प्रत्यक्षात आल्याची घटना घडली. सुमारे ४५ वर्ष एकमेकांशी विवाहबद्ध असलेल्या जोडप्याला मृत्यूही दूर करू शकला नाही, पतीवर निरातिशय प्रेम असलेल्या पत्नीने पतीच्या निधनानंतर अवघ्या काही काळातच प्राण सोडले. कर्नाटकच्या मालवली तालुक्यातील दोडाभुवल्ली गावात गेल्या आठवड्यात ही दुर्दैवी घटना घडली. 
    परशिवमुर्थी आणि जयम्मा असे त्या जोडप्याचे नाव असून ते दोडाभुवल्ली गावचे रहिवासी होते. ६५ वर्षीय परशिवमुर्थी यांचा शनिवारी आजारपणामुळे मृत्यू झाला, मात्र त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल झालेल्या जयाम्मांना सावरणे अतिशय कठीण होते. पतीता मृतदेह पाहून जयम्मा खाली कोसळल्या आणि काही वेळातच त्यांचाही मृत्यू झाला. परशिवमुर्थी आणि जयम्मा यांच्या पश्चात दोन मुले आहेत.
    एकमेकांवर अतिशय प्रेम करणा-या आणि एकत्रच मृत्यूला कवटाळणा-या या प्रेमळ जोडप्याला अंतिम निरोप देण्यासाठी शेकडो नागरिक गावात जमले होते. 
==================================

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसला भीषण अपघात, १ ठार

मुंबई, दि. १७ - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एक खासगी बस डिव्हाडयरला धडकून झालेल्या भीषण अपघातात १ जण ठार तर १०-१२ प्रवासी जखमी झाले आहेत. गुरूवारी सकाळी खोपोलोनजीक हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील मजुरांना मुंबईत घेऊन येणापरी ही बस खोपोलीजवळ एका डिव्हायडरला धडकली. त्यावेळीच बस वेगात असल्याने भीषण धडक बसली आणि  बसमधील बरेचसे प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यातच एकाचा मृत्यू झाला तर अनकेजण गंभीर जखमी झाले.  जखमींवर खोपोलीतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
==================================

५७ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी दलाई लामांनी सोडले तिबेट


  • नवी दिल्ली, दि. १७ - चीन विरुद्धचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा याच दिवशी १७ मार्च १९५९ रोजी भारतात येण्यासाठी निघाले होते. हिमालयीन पर्वतरागांमधून १५ दिवस पायी प्रवास करुन चीनी सैनिकांना चुकवत दलाई लामा भारतात दाखल झाले होते. 
    १७ मार्चला तिबेटची राजधानी ल्हासा सोडल्यानंतर त्यांच्या विषयी कोणतीही माहिती मिळत नव्हती. त्यांच्यासोबत २० जण होते. यात तिबेटचे सहा मंत्री होते. त्यांच्याविषयी कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे चीनी सैनिकांच्या सापळयात ते अडकले असा अनेकांनी तर्क काढला होता. 
    चीनी सैनिकांची नजर चुकवण्यासाठी त्यांना रात्रीच्यावेळी प्रवास करावा लागला. रात्रीच्यावेळी हिमालयातील अत्यंत प्रतिकुल वातावरणाचा सामना करत त्यांनी ब्रम्हपुत्रा नदी पार केली. अखेर खेनझिमना पास पार करुन ते भारतात दाखल झाले. 
==================================

४ वर्ष पूर्ण झाली म्हणून अखिलेश सरकारने आणले समाजवादी परफ्युम


  • लखनऊ, दि. १७ - उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारला चारवर्षपूर्ण झाली म्हणून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समाजवादी सुगंध नावाचे अत्तर लाँच केले आहे. या समाजवादी सुगंधमध्ये आग्रा, लखनऊ, बनारस आणि कनौज या शहरांचा सुंगध आहे असे अखिलेश यादव यांनी सांगितले. 
    आपण समजादवादी रुग्णवाहिका, समाजवादी लॅपटॉपचेही वाटप केले आहे. उत्तरप्रदेशातील नद्यादेखील समाजवादी आहेत कारण त्या त्यांचे कार्य करताना कोणताही भेदभाव करत नाहीत. समाजवादी सुंगध देखील लोकांमधील भेदभाव दूर करेल असे त्यांनी सांगितले. ही सुवासिक अत्तरे फक्त राज्यातील मंत्री आणि नोकरशहांसाठी उपलब्ध असतील. 
    समाजवादी पक्षाने अशी विचित्र कल्पना लढवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी समाजवादी पक्षाने अमेरिकन संगीतकार बिली जोएलच्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेटेड झालेल्या “We didn’t Start the Fire” या गाण्याचे अधिकार विकत घेतले होते आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारामध्ये या गाण्याचा वापर केला होता
==================================
ड्रीमसिटी'च्या रहिवाशांनी केली पाणीटंचाईवर मात 
नाशिक - पिण्याच्या पाण्याच्या तुटवड्याने ग्रासलेल्या 305 कुटुंबांच्या नाशिक रोड भागातील ड्रीमसिटी सहकारी हाउसिंग सोसायटीने पिण्याच्या पाण्याच्या स्वावलंबनाचे स्वप्न साकारले आहे. बंद चार विंधन विहिरी कार्यान्वित करीत त्याच्या पाण्यातील "हार्डनेस‘ कमी करण्यासाठी "सॉफ्टनर युनिट‘ बसविले आहे. यामुळे टॅंकरवर दर महिन्याला खर्च होणाऱ्या दीड लाखाची बचत केली आहे. 
सभासदांच्या सहभागातून सोसायटीचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिन देशमुख आणि सचिव डॉ. माधवी गायकवाड यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. डॉ. गायकवाड म्हणाल्या, की सोसायटीला महापालिकेतर्फे दोन इंची जलवाहिन्यांच्या चार कनेक्‍शनच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्हायचा; पण मधल्या काळात पाण्याच्या चणचणीमुळे सभासदांच्या मागणीनुसार टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याचा मार्ग निवडला होता. बारा हजार लिटर क्षमतेचे दहा टॅंकर मागवावे लागत होते. मात्र, हा कायमस्वरूपी उपाय नसल्याने पर्यायांचा शोध घेण्यात आला. विंधन विहिरींचे पाणी एनव्हारोकेअर प्रयोगशाळेकडून तपासण्यात आले. तपासणी अहवालात पाण्यात "हार्डनेस‘ अधिक असल्याने पाणी वापरण्यास योग्य नसल्याचे स्पष्ट झाले. पाण्यात "हार्डनेस‘ 450 ते 500 पीपीएम इतका आढळून आला.
==================================
न्यूयॉर्क -आंनदी देशांच्या यादीत भारत 118 व्या क्रमांकावर!
न्यूयॉर्क - जगभरातील 156 देशांच्या अभ्यासात आनंददायी देशांच्याबाबतीत भारत 118 व्या क्रमांकावर पोचला आहे. डेन्मार्क हा जगातील सर्वांत आनंदी देश असून बुरुंडी या देशाने सर्वांत खालचे स्थान पटकावले आहे. 

शाश्‍वत विकासासाठी काम करणाऱ्या "सस्नटेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क‘ आणि कोलंबिया विद्यापीठाने संयुक्त राष्ट्रासाठी जगातील आनंदी देशांचा अहवाल तयार केला आहे. येत्या 20 मार्च रोजी असलेल्या जागतिक आनंद दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात राष्ट्रीय देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), आयुर्मान, सामाजिक वातावरण आणि स्वातंत्र्य आदी घटकांचा अभ्यास करण्यात आला असून त्यानुसार क्रमवारी करण्यात आली आहे. 

आनंदी देशांच्या यादीतील पहिले दहा देश 
डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आइसलॅंड, नॉर्वे, फिनलंड, कॅनडा, नेदरलंड, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन 

आनंदी देशांच्या यादीतील शेवटचे दहा देश 
मेदागास्कर, टांझानिया, लिबेरिया, जिनिया, रुवांडा, बेनिन, अफगाणिस्तान, टोगो, सिरीया, बुरुंडी
==================================
==================================
'बीफ' न सापडल्याने काश्मिरी विद्यार्थ्यांना जामीन
जयपूर - जयपूरमधील मेवार विद्यापीठातील वसतिगृहात गोमांस (बीफ) शिजवत असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या चार काश्मिरी विद्यार्थ्यांना त्याठिकामी गोमांस न मिळाल्याने जामीनावर मुक्त करण्यात आले आहे.
या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या समितीने विद्यार्थी त्याठिकाणी गोमांस नव्हे तर मटण शिजवत होते, असा अहवाल दिला. त्यानंतर चित्तोरगड उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयाने या विद्यार्थ्यांना जामीन मंजूर केला. सोमवारी रात्री शाकीब अश्रफ, हिलाल फारुक, मोहम्मद मकबूल आणि शौकत अली या चार विद्यार्थ्यांना वसतिगृहात गोमांस शिजवत असल्याच्या आरोपावरून स्थानिक नागरिकांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्याठिकाणी आलेल्या पोलिसांनी या चौघांना अटक केली होती.
विद्यापीठाचे जनसंपर्क प्रमुख हरीश गुरनानी यांनी सांगितले की, हे पूर्ण प्रकरण दोन गटातील वादामुळे घडले. आम्ही या दोन्ही गटांचे प्रबोधन करणार आहोत.
==================================
युपीएने दोन वर्षे काहीच केले नाही- सोनिया गांधी
नवी दिल्ली - आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दोन वर्षे काहीच केले नसल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. कॉंग्रेसच्या मुख्यालयात आंध्र प्रदेशमधील पक्षाच्या प्रतिनिधींना गांधी संबोधित करत होत्या. यावेळी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशच्या प्रतिनिधींना भेट घेत नसल्याबद्दल टीका केली. "जवळपास दोन वर्षे निघून गेली आहेत. तरीही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने काहीही केले नाही. मला माहित आहे तुम्ही (आंध्र प्रदेश कॉंग्रेस प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र मोदी यांना तुम्हाला भेटण्याची भीती वाटत आहे.‘ नेहमी विरोधात असलेल्या केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवरच टीका केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी "मोदी यांना केवळ दबावाची भाषा समजते‘ असे म्हणत मोदींवर टीका केली. यावेळी आंध्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. रघुवीर रेड्डी यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जाची मागणी करण्यासाठी एक कोटी स्वाक्षऱ्या असलेले निवेदन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे दिले. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग उपस्थित होते.
==================================
'त्या' भाजप आमदाराकडून घोड्याची पाहणी

डेहराडून - दांडक्याने अमानुषपणे मारहाण करून घोड्याचा पाय तोडणारे उत्तराखंडमधील मसुरी येथील भाजप आमदार गणेश जोशी यांनी आज (गुरुवार) सकाळी या जखमी घोड्याची पाहणी केली. घोडा पायावर उभा राहू शकत नाही. या घोड्यावर उपचारासाठी मुंबई आणि पुण्यातून डॉक्टरांचे पथक बोलविण्यात येईल, अशी माहिती पोलिस अक्षीक्षक सदानंद दाते यांनी दिली. शक्तिमान असे नाव असलेल्या या घोड्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याची काळजी घेण्यात येत आहे. घोड्याच्या पायावर इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या घोड्याचा प्रशिक्षणासाठी आतापर्यंत 98 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. जोशी यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आज त्यांनी आज या घोड्याची पाहणी केली. जोशी यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात आंदोलन करताना हा संतापजनक प्रकार घडला होता. आंदोलनातील कार्यकर्त्यांनी सुरवातीला घोड्याच्या तोंडावर मारले, त्यानंतर जोशींनी घोड्याच्या पायावर दांडक्याने प्रहार करत त्याला खाली पाडले. या मारहाणीत घोड्याचा पाय तुटला होता.
==================================

No comments: