Tuesday, 15 March 2016

नमस्कार लाईव्ह १५-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैनिकांच्या उपस्थितीबद्दल चीनचे कानावर हात 
२- लंडन; पक्ष्याच्या धडकेमुळे प्रवासी विमानाला भगदाड 
३- अमेरिकी निवडणुकीतही लाटेची चर्चा  
४- भारतातून 700 ज्यू इस्त्राईलला जाणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- कन्हैयासह पाच विद्यार्थ्यांना जेएनयूमधून निलंबीत करण्याची शिफारस 
६- पाटणा; माझ्या टीकेनेच संघाने हाफ पँट बदलली-राबडीदेवी  
७- 'स्टिंग ऑपरेशन'च्या व्हिडिओत फेरफार - तृणमूल 
८- आरोग्य मंत्रालयाकडून 344 औषधांवर बंदी  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- राष्ट्रवादीची विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं 
१०- पुढील दोन-चार वर्ष भुजबळ जेलबाहेर येणार नाही: किरीट सोमय्या 
११- मुंबईतील कॉलेजांना मिळणार गणेशोत्सवाची नऊ दिवसांची सुटी 
१२- भुजबळांना अटक हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस: अंजली दमानिया 
१३- 70 हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांची दुरवस्था : मुख्यमंत्री 
१४- देहरादून; भाजप आमदाराची घोड्याला अमानुष मारहाण, पाय मोडला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- भुजबळांच्या अटकेचे राज्यात तीव्र पडसाद, अनेक ठिकाणी रास्तारोको 
१५- धुळयात फटाके फोडून छगन भुजबळ यांच्या अटकेचा आनंद साजरा  
१६- मथुरा; विवाह मंडपात नवरदेवाचा दारु पिऊन तमाशा 
१७- येवला; यावलकर 6 वर्षांपासून भागवताय पक्ष्यांची तहान 
१८- मुक्रमाबादेत श्री गणेश मंदिर व तुळजा भवानी मंदिर यांच्या वर्धापण दिनानिमीत्य विविध कार्यक्रम
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- नेक्सस 5x स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस सूट, होळी स्पेशल ऑफर 
२०- गूगल डूडलवरही भारत-न्युझीलँड सामन्याचा प्रभाव  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२१- अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 
२२- हेल्मेट सक्तीच्या नावाखाली 'मार्चएंड'ची वसुली 
२३- दीपक लॉजच्या तिसऱ्या मजल्यावरून कामगाराची उडी मारून आत्महत्या 
२४- शिरढोण येथे रानडुक्करासाठी लावलेल्या जाळ्यात आढळला बिबट्या 
२५- मुक्रमाबाद; टिप्परच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार 
२६- कलामंदिर भवनात T-20 मॅचचा LCD वर लाईव्ह शो 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
समुद्र हा सर्वासाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती उचलतात. काहीजण त्यातून मासे उचलतात तर काहीजण आपले पाय ओले करतात. हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे
(श्वेता कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
राजेश उत्तरवार, साजिद क़ुरेशि, वैभव खांडेकर, रवी सोनकांबळे, गजानन चापोले, राजेश पावडे, प्रदीप लिमकर, रामनारायण बंग, कृतीबास दास, रुपेश मंडलिक, प्रकाश पाटील. कालेश्वर जनापुरीकार, बालाजी जोगदंड, प्रकाश राचेवार, विशाल लोणारी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


=====================================

देहरादून; भाजप आमदाराची घोड्याला अमानुष मारहाण, पाय मोडला

भाजप आमदाराची घोड्याला अमानुष मारहाण, पाय मोडला
देहरादून (उत्तराखंड) : घोड्याला अमानुष मारहाण करणारे मसुरीचे भाजप आमदार गणेश जोशी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार महाशयांनी पोलिसांच्या घोड्याला निर्दयीपणे मारहाण केली. या मारहाणीत घोड्याचा एक पाय मोडल्याचं कळतं.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात आंदोलन करताना हा भीषण आणि संतापजनक प्रकार घडला. हरीश रावत यांनी फंडाचा गैरवापर केल्याचा आरोप करत आंदोलन सुरु होतं.
या आंदोलनादरम्यान, भाजपचे आमदार गणेश जोशी यांनी घोड्याला केलेली अमानुष मारहाण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर जोशींनी सुरुवातील घोड्याच्या तोंडावर मारलं आणि त्यानंतर त्याला जबर मारहाण केली.
देहरादूनचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सदानंद दाते यांच्या माहितीनुसार, “घोड्याला इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या व्हेटरीनरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार, असं डॉक्टरांनी सांगितलं.”
दरम्यान स्वत:च्या कृत्याचं समर्थन करताना गणेश जोशी म्हणाले की, “पोलिस आंदोलकांना निर्दयीपणे मारत होते. त्यानंतर आम्ही पोलिसांच्या लाठ्या घेतल्या. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी घोड्यांचा वापर केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत घोड्याला दुखापत झाली. हे गैर काहीही नाही.”
=====================================

राष्ट्रवादीची विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं

LIVE : राष्ट्रवादीची विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं
LIVE UPDATE : मनमाड-येवला मार्गावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रास्तारोको, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
 LIVE UPDATE : छगन भुजबळांवरील अटकेच्या कारवाईचा निषेध – राधाकृष्ण विखे-पाटील
 LIVE UPDATE : छगन भुजबळांना नामोहरम करण्याचा प्रयत्न- जयंत पाटील
 LIVE UPDATE : विधानसभेचे अध्यक्ष छगन भुजबळांच्या अटकेवर निवेदन देणार
 LIVE UPDATE : मुंबईतील वरळी भागात राष्ट्रवादीची निदर्शनं, भुजबळांच्या अटकेचा निषेध
 LIVE UPDATE : चड्डीवाल्या सरकारचा धिक्कार असो, राष्ट्रवादीच्या आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
 LIVE UPDATE : राष्ट्रवादीच्या आमदारांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन, अजित पवार, तटकरेंचा आंदोलनात सहभाग नाही
 LIVE UPDATE : “महाराष्ट्राची पुरोगामी चळवळ, छगन भुजबळ”, राष्ट्रवादीच्या आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
=====================================

पुढील दोन-चार वर्ष भुजबळ जेलबाहेर येणार नाही: किरीट सोमय्या

पुढील दोन-चार वर्ष भुजबळ जेलबाहेर येणार नाही: किरीट सोमय्या
मुंबई: ‘देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्यांनी यांनी दिलेलं वचन आज पूर्ण केलं. हे आज पहिलं यश आहे. भक्कम पुरावं सादर केले असल्यानं भुजबळ आता पुढील 2 ते 4 वर्ष काही बाहेर येणार नाही.’ अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. 
‘आम्ही दिलेलं वचन पूर्ण केलं असून आता समीर भुजबळांसोबत छगन भुजबळांना ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे.’ असं सोमय्या म्हणाले. 
‘छगन भुजबळ ही तर सुरुवात आहे. यानंतर आता 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी सुनील तटकरे आणि अजित पवार यांनाही जेलमध्ये जावं लागणार आहे. एवढंच नव्हे आता एकापोठापाठ एक अटक सुरु होणार.’ असा ठाम विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला.
=====================================

मुंबईतील कॉलेजांना मिळणार गणेशोत्सवाची नऊ दिवसांची सुटी

मुंबईतील कॉलेजांना मिळणार गणेशोत्सवाची नऊ दिवसांची सुटी!
मुंबई : मुंबई शहरातील म्हणजेच मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना गणेशोत्सवाच्या काळात पूर्ण सुटी मिळणार आहे. गणेशोत्सवाचा पहिला आणि शेवटचा म्हणजेच बाप्पाचं आगमन आणि विसर्जनाचा दिवस सार्वजनिक सुटी असतेच, आता गणेशोत्सवातील मधल्या सात दिवसांचाही सुटीच्या यादीत समावेश होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अॅकेडमीक कौन्सिलच्या अलीकडच्या बैठकीत या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देण्यात आलीय. गणेशोत्सवात पूर्ण नऊ ते दहा दिवस सुटी देण्याच्या बदल्यात दिवाळीच्या तीन आठवड्यांच्या सुटीमध्ये कपात केली जाणार आहे. सध्या दिवाळीसाठी तीन आठवड्यांची सुटी मिळते, त्यातील एक आठवड्याची सुटी गणेशोत्सवाच्या काळात देण्याचा प्रस्ताव आहे.
अॅकेडमिक कौन्सिलच्या या प्रस्तावाला अजून कुलगुरूंची मान्यता मिळायची आहे. कुलगुरूंच्या निर्देशानुसार आगामी शैक्षणिक वर्षाचं कॅलेंडर तयार झालं की या नव्या प्रस्तावाची अंमलबजावणी होऊ शकेल. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या जवळपास साडेसातशे कॉलेजमध्ये मग गणेशोत्सवात विद्यार्थ्यांना पूर्ण सुटी मिळू शकेल.
संपूर्ण गणेशोत्सवात महाविद्यालयांना सुटी देण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून विचाराधीन आहे, मात्र त्याला मंजुरी मिळून त्याबाबतचा अधिकृत निर्णय जारी होत नाही तोवर त्याची अंमलबजावणी होणार आहे. तरीही गणेशोत्सवाच्या सुटीचा मेसेज अनेक व्हॉट्स ग्रुपवर धुमाकूळ घालत आहे.
=====================================

भुजबळांना अटक हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस: अंजली दमानिया

भुजबळांना अटक हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस: अंजली दमानिया
मुंबई: ‘मी आज अतिशय आनंदी आहे. गेले चार वर्ष मी ज्यासाठी लढत होते. त्या लढाईतील आज हा पहिला विजय आहे.’ या शब्दात माजी ‘आप’ नेत्या अंजली दमानिया भुजबळांच्या अटकेनंतर ‘माझा’कडे पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. 
‘ही लढाई वाटत होती तेवढी सोपी नव्हती. पण ज्या दिग्ग्जांना वाटत होतं की, आपलं कुणी काही बिघडवू शकत नाही. त्यांना ही एक प्रकारची चपराक आहे.’ असंही दमानिया म्हणाल्या. 
‘या निर्णयानंतर वाटतं आहे की आता हा देश नक्की बदेलल. आम्ही केलेल्या आरोपात तथ्य होतं म्हणूनच ही अटक झाली आहे. मोठ्या प्रमाणात पैशाचा घोटाळा झाला होता आणि म्हणूनच आज भुजबळांना अटक झाली आहे. त्यामुळे आज माझ्यासाठी फारच आनंदाचा दिवस आहे.’ असं म्हणत दमानिया यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली.
=====================================

कन्हैयासह पाच विद्यार्थ्यांना जेएनयूमधून निलंबीत करण्याची शिफारस

कन्हैयासह पाच विद्यार्थ्यांना जेएनयूमधून निलंबीत करण्याची शिफारस
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीमधील देशविरोधी घोषणांप्रकरणी कन्हैया कुमार, उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह पाच विद्यार्थ्यांना निलंबीत करण्याची शिफारस जेएनयूच्याच चौकशी समितीने केली आहे. 
जेएनयू कॅम्पसमध्ये मागील महिन्यात झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर जेएनयूच्या उच्चस्तरिय समितीने ही शिफारस केली आहे. 
संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरुच्या फाशीविरोधात 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती.
एक महिन्यापेक्षा जास्त काळ तपास केल्यानंतर या समितीने पाच विद्यार्थ्यां काढून टाकण्याची शिफारस केली आहे. 
सखोल तपासानंतर कुलगुरु एम जगदीश कुमार आणि चीफ प्रॉक्टर ए दिमरी हे समितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय घेतील. 
कुलगुरुंच्या अध्यक्षतेखालील विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत समितीच्या अहवालावर चर्चा झाली. त्यानंतर विद्यापीठाने कन्हैया कुमार आणि उमरसह 21 विद्यार्थ्यांना कारणं दाखवा नोटीस जारी केली. हे सर्व विद्यार्थी विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत.
=====================================

70 हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांची दुरवस्था : मुख्यमंत्री

70 हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांची दुरवस्था : मुख्यमंत्री
मुंबई : कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे. आघाडीच्या काळातील 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांवर वाईट वेळा आल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. 
राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी विरोधकांनी केली. त्याला उत्तर देताना फडणवीसांना पुन्हा एकदा आघाडी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचा पाढा वाचून दाखवला. 
‘आघाडीच्या काळात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांवर ही वाईट वेळ आली.’ असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बँका मोडून खाल्ल्या, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. योग्य वेळी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल असं आश्वासनंही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. 
त्याआधी युतीच्या काळात सर्वात जास्त आत्महत्या झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. तर जयंत पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या मदतीचा हिशेब मागितला. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक झाले.
=====================================

'दंगल'च्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत आमीरचा खुलासा

'दंगल'च्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत आमीरचा खुलासा
मुंबई : आमीर खानचा बहुचर्चित चित्रपट ‘दंगल’ येत्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच आमीरने आपला सिनेमा स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज करायचं ठरवल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर खुद्द मिस्टर परफेक्शनिस्ट या गोंधळाबाबत खुलासा केला आहे. 
‘दंगल’ चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार, या केवळ अफवा आहेत. त्यात अजिबात तथ्य नाही. 15 ऑगस्ट ही तारीख दंगलसारख्या देशभक्तिपर चित्रपटासाठी आदर्श असल्याचं मी म्हटलं होतं. याचा अर्थ मी स्वातंत्र्यदिनी सिनेमा रिलीज करतोय, असा होत नाही’ असं आमीरने स्पष्ट केलं आहे. 
दंगल चित्रपट नाताळच्या मुहूर्तावरच प्रदर्शित होणार आहे. आम्हाला नेहमीच नाताळच्या आसपास सिनेमा रिलीज करायचा होता, असंही आमीरने सांगितलं. वाढदिवसानिमित्त आमीरने पत्रकारांशी बोलताना हा खुलासा केला. 
सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ चित्रपटात त्यांनी आपल्या दोन कन्या गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे. आमीर खान यात महावीर फोगट यांची भूमिका साकारत आहे. 
12 ऑगस्टला अक्षयकुमारचा ‘रुस्तम’ प्रदर्शित होणार आहे. अक्षयला टक्कर देण्यासाठी आमीरने आपला चित्रपट प्रीपोन केला, असं म्हटलं जात होतं. मात्र आमीरने स्पष्टीकरण दिल्याने चर्चेचा धुरळा खाली बसला आहे.
=====================================

नेक्सस 5x स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस सूट, होळी स्पेशल ऑफर

नेक्सस 5x स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस सूट, होळी स्पेशल ऑफर!
मुंबई: वर्षातील येणाऱ्या सर्वात मोठ्या सणासाठी गुगल खास ऑफर घेऊन आलं आहे. होळीच्या मुहुर्तावर गुगलनं आपल्या शानदार आणि नुकत्याच लाँच केलेल्या LG नेक्सस 5x स्मार्टफोनच्या किंमतीत बरीच कपात केली आहे.

तब्बल 4000 रुपयांपर्यंत ही सूट देण्यात आली असून ही ऑफर 27 मार्चपर्यंत उपलब्ध आहे. होली है! नावानं सुरु झालेला हा सेल 14 दिवसांपर्यंत सुरु राहणार आहे. ही ऑफर नेक्सस 5x 16 जीबी आणि 32 जीबीवर व्हेरिएंटवर आहे. हे दोन्ही फोन रु. 23,990 आणि रु. 27,990 उपलब्ध आहेत.

नेक्सस 5x फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवरही उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या 16 जीबी व्हेरिएंटची किंमत 24,978 रु. आहे. तर 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 29,930 रु. तर दुसरीकडे अॅमेझॉनवर या फोनच्या 16 जीबी व्हेरिएंटची किंमत 23,399 रु. आहे. तर 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 31,785 रु. आहे.
=====================================

पक्ष्याच्या धडकेमुळे प्रवासी विमानाला भगदाड

पक्ष्याच्या धडकेमुळे प्रवासी विमानाला भगदाड
लंडन : एक लहानसा पक्षी मोठ्या विमानासाठी किती त्रासदायक ठरु शकतो, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर लँडिंग करणाऱ्या एका प्रवासी विमानाला पक्षी धडकल्याने मोठं भगदाड पडलं.

सुदैवाने विमान जमिनीजवळ असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. धडक दिल्यानंतर पक्षी जागीच गतप्राण झाला आणि विमानावर त्याच्या रक्ताचे डाग पडले.


Airoplane
इजिप्तमधील काहिराहून आलेल्या इजिप्त एअरच्या बोईंग विमानाच्या लँडिंगवेळी ही घटना घडली. यावेळी विमानात 71 प्रवासी होते.

अपघातानंतर विमान 21 तास विमानतळावरच होतं. दुरुस्ती केल्यानंतर विमान पुढे रवाना करण्यात आलं. इजिप्त एअरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विमानाचे फोटो फेसबुकवर शेअर केले होते.
=====================================

भुजबळांच्या अटकेचे राज्यात तीव्र पडसाद, अनेक ठिकाणी रास्तारोको


  • मुंबई, दि. १५ - राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेचे राज्यभरात पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. भुजबळ यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक बनले असून राज्यात ठिकठिकाणी रास्तोरोको करून निदर्शने करण्यात येत आहेत. 
    नाशिकमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत, भुजबळ समर्थकांनी येवला येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या पुतळ्याचे दहन केले. तर मनमाडमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव-पाटणे गावाजवळ समर्थकांनी रास्तारोको करत वाहतूक अडवून ठेवली आहे. तसेच ओझर येथेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मुंबई हायवे रोखून ठेवल्याने धुळ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प  झाली आहे. 
    दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची थोड्याच वेळात बैठक होणार असून राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. तर वरळीतील मेला हॉटेल जंक्शनजवळही मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार निदर्शने करणार आहेत. 
    थोड्याच वेळात भुजबळ यांची कोठडी मिळवण्यासाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    मनी लाँडरिंगच्या आरोपावरून सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री १० वाजता भुजबळ यांना अटक केली. ते उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती देऊ न शकल्याने आणि चौकशीमध्ये सहकार्य करीत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री सांगितले. भुजबळ यांची सोमवार सकाळपासून चौकशी होती, तब्बल ११ तास त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यलयात अटक करण्यात आली.
=====================================

गूगल डूडलवरही भारत-न्युझीलँड सामन्याचा प्रभाव 


  • नागपूर, दि. १५ - टी-२० विश्वचषकात आज यजमान भारतीय संघाची लढत न्युझीलँडविरोधात होणार असून सर्वांनाच या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. या सामन्यातील थरार अनुभवण्यास क्रिकेट रसिक सज्ज झाले असून सोशल नेटवर्किंग साईट्सवरही भारत वि. न्युझीलँड सामना ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि हेच लक्षात घेऊन गूगलनेही खास 'डूडल' तयार करत ते 'भारत वि. न्युझीलँड' सामन्यास डेडिकेट केले आहे. 
    गूगल सर्चची विंडो उघडताच आपल्याला टगडद व फिक्या निळ्या रंगाच्या ( न्युझीलँड व भारतीय संघाच्या गणवेशाचे रंग) दोन बॅट्स व त्यामध्ये टी-२० विश्वचषक करंडक' असे चित्र पहायला मिळते. 'The Black Caps take on the Men in Blue' असेही त्यावर लिहीले आहे. या डूडलवर क्लिक केल्यास आपल्याला थेट मॅचचे शेड्यूल पहायला मिळते. 
    नागपूरच्या मैदानावर आज संध्याकाळी साडेसातला भारत वि. न्युझीलँडचा सामना रंगणार असून जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेल्या भारतीय संघाला अलीकडच्या यशस्वी कामगिरीच्या बळावर आजची सलामीची लढत जिंकून विजयी वाटचाल करण्याचे आव्हान असेल. या सामन्यासाठी असलेली खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असल्याचे मानले जात आहे.
    आशिया चषक चॅम्पियन, जबर फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघ स्थानिक चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर पहिला अडथळा कसा पार करतो, यावर भारताची स्पर्धेतील पुढील वाटचाल अवलंबून असेल. अपेक्षांच्या दडपणात असलेला भारतीय संघ टी-२०त अव्वल स्थानावर आहेच; शिवाय आशिया चषक जिंकून विश्वचॅम्पियनशिपसाठी सज्ज झाला आहे.
=====================================

मथुरा; विवाह मंडपात नवरदेवाचा दारु पिऊन तमाशा 


  • मथुरा, दि. १५ - विवाहमंडपात मद्यपान करुन आलेल्या नवरदेवाने सासू-सास-यांवर लग्नाची बायको बदलल्याचा आरोप केल्यामुळे चिडलेल्या नववधूने विवाहास नकार देत लग्न मोडले. उत्तरप्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील पारखान गावात १३ मार्चला ही घटना घडली. 
    नवरदेवाच्या या विक्षिप्त वागण्यामुळे राजस्थानच्या भारतपूर जिल्ह्यातून आलेल्या वरपक्षाला वधूशिवाय परतावे लागलेच शिवाय मुलीच्या आई-वडीलांनी लग्नासाठी केलेला सर्व खर्चही भरुन द्यावा लागला. राजस्थानच्या डीग शहरातून नवरदेव आणि त्यांचे नातेवाईक ११ मार्चला लग्नासाठी पारखान गावात आले होते. रविवारी रात्री १३ मार्चला लग्न होते. 
    नवरदेव आणि त्याचे नातेवाईक  विवाहस्थळी पोहोचले त्यावेळी नवरदेवाने मद्यपान केले होते. विवाहाची लगबग सुरु असताना अचानक नवरदेवाने मुलींच्या कुटुंबियांवर लग्नाची बायको बदलण्याचा आरोप केला. शेवटच्या क्षणी तुम्ही मुलगी बदलली असे त्याचे म्हणणे होते. तिथे उपस्थित असलेल्या चार मुलींमधून एकीची भावी पत्नी म्हणून आपण निवड करु असा हट्ट त्याने धरला. 
    नवरदेवाची ही मागणी ऐकल्यानंतर वधूने विवाह न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठांनी वधूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यानंतर हा वाद सोडवण्यासाठी पंचायत बोलवण्यात आली. 
    वरपक्षाची चूक असल्याने पंचांनी विवाहासाठी केलेला सर्व खर्च भरुन देण्याचा आदेश दिला. वरपक्षातील दोघांना पैसे आणण्यासाठी डीग येथे पाठवले तो पर्यंत राजस्थानातून आलेल्या सर्वांना बंधक बनवून ठेवले होते. 
=====================================

धुळयात फटाके फोडून छगन भुजबळ यांच्या अटकेचा आनंद साजरा 


  • धुळे, दि. १५ - राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असतानाच दुस-या बाजूला भुजबळ यांच्या अटकेचा आंनदोत्सवसाजरा करण्यात आला. 
    छगन भुजबळ यांच्या अटकेची बातमी येताच धुळयातील भाजप आमदार अनिल गोटे यांचे कार्यकर्ते, समर्थकांनी रस्त्यावर उतरुन फटाके फोडून आनंद साजरा केला. २००३-०४ साली राज्यात गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळयात अब्दुल करीम तेलगी बरोबर छगन भुजबळ आणि आमदार अनिल गोटे यांच्यावरही घोटाळयात सहभागी असल्याचे आरोप झाले होते. 
    जुलै २००३ मध्ये गोटे यांना अटक झाली ते चारवर्ष तुरुंगात होते. मात्र त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची सुटका झाली. विधानसभेत गोटे धुळे शहराचे प्रतिनिधीत्व करतात. भाजपच्या तिकीटावर दुस-यांदा ते निवडून विधानसभेवर गेले आहेत. 
=====================================
पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैनिकांच्या उपस्थितीबद्दल चीनचे कानावर हात
  • बीजिंग : पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैनिकांच्या उपस्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला चीनने सोमवारी थेट उत्तर दिले नाही.
    पाकव्याप्त काश्मीरच्या भारताच्या बाजूकडील प्रत्यक्ष सीमारेषेवरील भागात चीनी लष्कराचे जवान असल्याच्या प्रसार माध्यमातून सतत येणाऱ्या बातम्या या ‘खेदजनक’ असल्याचे, चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कोंग यांनी येथे प्रसारमाध्यमांना सांगितले.




=====================================
माझ्या टीकेनेच संघाने हाफ पँट बदलली-राबडीदेवी 

पाटणा - मी सतत करणाऱ्या टीकेमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (संघ) पोशाख बदलण्याचा निर्णय घेत हाफ पँट ऐवजी फुल पँट घालण्याचा निर्णय घेतल्याचे, राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) नेत्या राबडीदेवी यांनी म्हटले आहे.

संघाने रविवारी पोशाख बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पांढरा हाप शर्ट आणि खाकी हाप चड्डीऐवजी आता पांढरा शर्ट आणि तपकिरी रंगाची फुल पॅंट असा स्वंयसेवकांचा यापुढे पोशाख असणार आहे. संघाने 91 वर्षांपासूनची खाकी चड्डीची ओळख मोडीत काढली आहे. संघाने आपला पोशाख बदलण्याच्या निर्णयाचे श्रेय राबडीदेवी यांनी घेतले आहे.

राबडीदेवी म्हणाल्या की, संघातील ज्येष्ठ सदस्य सर्वसामान्य नागरिकांसमोर हाफ पँटमध्ये वावरताना दिसतात. त्यांना नागरिकांसमोर येताना लाज वाटत नाही का? असा प्रश्न मी उपस्थित केला होता. त्यानंतर आता त्यांनी हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाची फुल पँट घालण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या या निर्णयाचे मी स्वागत करते.
=====================================
येवला; यावलकर 6 वर्षांपासून भागवताय पक्ष्यांची तहान
चिचोंडी - दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तीव्रता, विहीर तसेच कूपनलिकांनी गाठलेला तळ, हंडाभर पाण्यासाठी सुरू असलेली पायपीट, असे चित्र सध्या परिसरात दिसत आहे. जेथे माणसांना पाणी मिळणे अवघड आहे, तेथे पशू-पक्ष्यांना अन्न-पाणी मिळणे अशक्‍यप्राय गोष्ट. मात्र, येथील रामचंद्र यावलकर सहा वर्षांपासून दर वर्षी वर्षभर शेकडो पशू-पक्ष्यांना पाणी पाजण्याचे काम करीत आहेत. 

चिचोंडी बुद्रुक (ता. येवला) येथे साताळी रोडवर नाशिक येथील रामचंद्र यावलकर यांची चिकूची बाग आहे. या बागेचे काम राजेंद्र आनप पाहतात. या बागेतील चिकूची घनदाट झाडी, हिरवेगार उंच वाढलेले झाडांचे कुंपन असल्याने येथे बाराही महिने 40 ते 50 मोरांसह विविध पक्षी वास्तव्यास असतात. पावसाळ्यात या पक्ष्यांना सहज पाणी उपलब्ध होते. मात्र उन्हाळ्यात पाणी मिळणे अवघड होते. येथील विहीर, कूपनलिका, पाण्याच्या टाक्‍या कोरड्याठाक होतात. मात्र, अशा वेळी येथील पक्षीप्रेमी राजेंद्र आनप या ठिकाणच्या शेकडो पशू-पक्ष्यांना जीवदान देण्याचे काम करताता. पाच-सहा वर्षांपासून दर वर्षी उन्हाळ्यात ते बागेत चार-पाच ठिकाणी पाण्याने भरलेले भांडे ठेवून पक्ष्यांची तहान भागवतात. घरातील घमेले, उथळ भांडे, पसरट भांड्यात पाणी ठेवून बागेतील पशू-पक्ष्यांसह रात्री वास्तव्य करणाऱ्या कोल्हे, लांडगे, तरस, रानबोके या प्राण्यांचीही नकळतपणे तहान भागवतात. 
=====================================
अमेरिकी निवडणुकीतही लाटेची चर्चा 
डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक राज्यांत मिळत चाललेले यश आणि लोकप्रियता यामुळे केवळ अमेरिकेतीलच नव्हे, तर जगातील अनेक लोक बुचकळ्यात पडले आहेत. ट्रम्प यांची सनसनाटी विधाने ऐकल्यावर ते जर अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष झाले, तर अमेरिकेचे परराष्ट्रधोरण काय असेल, याविषयी काळजीचा सूर व्यक्त होत आहे. 

मेरिकी निवडणूक पद्धत अनेकांना फार क्‍लिष्ट वाटते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एक तर निवडणूक प्रक्रिया आठ ते नऊ महिने चालते आणि ती विविध स्तरांवर होते. या दीर्घ प्रक्रियेमुळे ही निवडणूक जगातील सर्वांत महागडी निवडणूक असल्याचे खुद्द अमेरिकी लोकांनी मान्य केले आहे. भारतातील निवडणूक प्रक्रिया या मानाने अगदी झट की पट अशीच आहे.
=====================================
'स्टिंग ऑपरेशन'च्या व्हिडिओत फेरफार - तृणमूल 
मंत्री, खासदारांनी लाच घेतल्याच्या आरोपांना "तृणमूल‘चे उत्तर 
नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालमधील तीन मंत्री, काही खासदार आणि आमदार एका काल्पनिक आयात-निर्यात करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीकडून लाच स्वीकारत असतानाचा व्हिडिओ आज एका "न्यूज पोर्टल‘तर्फे उघड करण्यात आला. पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर समोर आलेला हा व्हिडिओ खरा नसून, त्यात बदल आणि फेरफार करण्यात आल्याचे सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

पश्‍चिम बंगालमधील एका "न्यूज पोर्टल‘ने केलेल्या "स्टिंग ऑपरेशन‘चा व्हिडिओ आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. मागील तीन वर्षांच्या काळात हे "स्टिंग ऑपरेशन‘ करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. एका काल्पनिक कंपनीच्या प्रतिनिधीकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची लाच पश्‍चिम बंगालमधील तीन मंत्री, काही खासदार आणि आमदार स्वीकारात असल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी ही लाच देण्यात आल्याचे "न्यूज पोर्टल‘चे म्हणणे आहे. काल्पनिक कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा खोटा दावा करणाऱ्या पत्रकाराकडून मंत्री, खासदार आणि आमदार लाच स्वीकारत असल्याचे चित्रीकरण व्हिडिओत असल्याचा "न्यूज पोर्टल‘चा दावा आहे.

"स्टिंग ऑपरेशन‘चा व्हिडिओ समोर आणणाऱ्या "न्यूज पोर्टल‘चे पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी सांगितले, की निवडणुकीच्या तोंडावर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असला, तरी तो निव्वळ योगायोग आहे. आपल्याला कुठल्याही पक्षाचे समर्थन नाही, असा दावाही सॅम्युअल यांनी केला आहे. 
=====================================
आरोग्य मंत्रालयाकडून 344 औषधांवर बंदी 
नवी दिल्ली - आरोग्य मंत्रालयाने शरीराला अपायकारक ठरणाऱ्या सुमोरे 344 औषधांवर बंदी घातली असून, त्यात काही खोकल्याच्या औषधांचाही समावेश आहे. या वेळी पर्यायी औषधांचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे. 

आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या वादग्रस्त औषधांवर बंदी तत्काळ लागू होणार असून, त्याबाबतची अधिसूचना आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. 344 कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशीनंतरच औषध निर्मिती केली जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की काही कंपन्यांनी या नोटिशीला प्रतिसाद दिला नाही. प्रत्येकाला संधी दिली जाणार आहे. त्यानंतरच कारवाईला सुरवात केली जाईल. अनेक चाचण्यानंतरच ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
=====================================
भारतातून 700 ज्यू इस्त्राईलला जाणार 
जेरुसलेम - ज्यू नागरिकांना इस्राईलमध्ये परत आणण्यासाठीच्या निधीत येथील सरकारने दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने भारतातील जवळपास 700 ज्यू नागरिक यंदा इस्त्राईलला स्थलांतरित होणार आहेत. 
इस्त्राईलच्या निर्मितीपासून जगभरात पसरलेले ज्यू नागरिक तेथे कायमस्वरूपी जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे सरकारही त्यांना मदत करत असते. भारतातील मणिपूर आणि मिझोरममध्ये राहणारे ब्नेई मेनाशे समुदाय हा ज्यूंच्या दहा प्रमुख टोळ्यांपैकी एक समजला जातो. त्यांना 2005 मध्येच इस्त्राईलने परतण्यास परवानगी दिली आहे. स्थलांतरितांना देशामध्ये आणून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या निधीत इस्त्राईलने मोठी वाढ केल्याने दर वर्षीपेक्षा तिप्पट संख्येने भारतातील ज्यू तिथे जाऊ शकतात. इस्त्राईलमध्ये सध्या ब्नेई मेनाशे समुदायाचे सुमारे तीन हजार नागरिक राहत असून, त्यापैकी सहाशे जणांचा जन्म भारतात झाला आहे.
भारतातून आणि इतर देशांमधून इस्त्राईलला गेलेल्या नागरिकांना तिथे गेल्यावर मात्र काही अडचणी येत आहेत. अनेकांना हिब्रू भाषा येत नसल्याने रोजगार मिळविण्यात त्यांना अडचणी येत आहेत. स्थलांतरित झालेल्या मुलांपैकी फक्त 42 टक्के मुलेच शाळेत जातात. 
=====================================
मुक्रमाबादेत श्री गणेश मंदिर व तुळजा भवानी मंदिर यांच्या वर्धापण दिनानिमीत्य विविध कार्यक्रम

 ...............
मुक्रमाबाद -   रज्जाक कुरेशी

येथील मुक्रमाबाद नगरीतील  श्री गणेश मंदिर व तुळजा भवानी मंदिर यांच्या 4 थ्था वर्धापण दिनानिमीत्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमात प्रसिध्द गायक सुरमणी समाजभुषण प्रा.सोमनाथ किडीले यांचा स्वर आविष्कार भजनसंध्या  दी.15 रोजी होणार आहे , व बुधवार 16 रोजी  सकाळी 7 ते 10 या वेळेत महापुजा, व दुपारी 1 ते 5 महाप्रसाद ठेवण्यात आले आहे
परिसरातील सर्व भावीकांनी या धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घ्यावे असे मंदिर व्यवस्थापन समीतीने कळविले आहे .
=====================================
क्रिकेट T20 वल्ड कप चा थरार पहा मोठया पडद्यावर

                                 भाजपा नांदेड महानगर व कलामंदिर च्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट टी20 वल्ड कपचे दरवर्षी प्रमाणे भारताचे सर्व सामने मंगळवारी सांयकाळी 7 वाजल्यापासून कलामंदिर येथे व्हिडिओ वाल च्या मोठ्या पडद्यावर मोफत दाखविणार असल्याची माहिती संयोजक भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
वर्ष 2003 पासून एक दिवसीय तसेच टी20क्रिकेट विश्व चषकाचे भारताचे सर्व सामने ऍड.दिलीप ठाकूर हे मोठ्या पडद्यावर दाखवितात.हे सामने पाहण्यासाठी क्रीडा प्रेमी नागरिकांची व तरुणांची मोठी गर्दी होत असते.2016 च्या विश्व चषका मध्ये भारत,पाकिस्तान,आस्ट्रेलिया,
न्यूझीलंड हे तगडे संघ एका ग्रुप मध्ये आल्यामुळे सर्व सामने चुरशीचे होणार आहेत.15,19,23,27,30,31मार्च व 3 एप्रिल रोजी होणारे सामने मोठया पडद्यावर दाखविण्यात येणार आहेत.पहिल्या सामन्याचे उद्धघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी सर्व नवनियुक्त भाजपा महानगर पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.सर्व सामने मोफत दाखविण्यात येणार असल्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेवर येऊन जागा आरक्षित करावी असे आवाहन ऍड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

No comments: