Thursday, 17 March 2016

नमस्कार लाईव्ह १७-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- टोकियोत ग्लायडर घरावर कोसळून दोघांचा मृत्यू 
2- पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकल्यास नग्न नृत्य करण्याचं कंदील बलुचचं आश्वासन 
3- मॉस्को; देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्या रशियन तरुणाला घडू शकतो एका वर्षाचा कारावास 
4- बर्लिन; चुलत भावाबरोबर लग्नाला नकार दिला म्हणून महिलेची हत्या
5- टोक्यो; महिलांना रडण्यासाठी हॉटेलमध्ये विशेष खोली 
6- वॉशिंग्टन; खराब झालेल्या टोमॅटोपासून होणार वीजनिर्मिती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
7- मल्ल्यांकडून पै न पै वसूल करणार- जेटली 
8- जर्मन बेकरी स्फोट: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप 
9- किंगफिशर हाऊसला एकही खरेदीदार नाही 
10- खडसेंवर हक्कभंग आणा, विधानसभेत विखे-पाटलांची मागणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
11- शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची कबुली 
12- कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ला सरकारचं उत्तर 
13- छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी  
14- घोड्याला मारहाणीचा आलिया, अनुष्काकडून निषेध  
15- छगनभुजबळ यांची आर्थर रोड जेलमध्ये होणार रवानगी  
16- शिवाजी महाराजांचं स्मारक 40 महिन्यात पुर्ण करणार - फडणवीस
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
17- परभणीच्या कृषी विद्यापीठात रॅगिंग, पाठीवर वळ उठेपर्यंत विद्यार्थ्यांना मारहाण 
18- राजकोट; 'गायीला राष्ट्रमाता करा' म्हणत आत्महत्येचा प्रयत्न
19- माजलगाव; दुष्काळात मल्चिंगवर फुलविली झेंडूची शेती
20- रत्नागिरी; गुन्हेगाराच्या घरात 225 जिवंत गावठी बाॅम्ब
21- नांदेड : सिरपल्लीत खिचडीतून 30 विद्यार्थ्यांना विषबाधा 
22- अकोला - हॉटेलमध्ये ट्रक घुसला. 4 जण ठार तर 5 जण जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
23- उद्योगपती विजय मल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळरुच्या सर्व पदावरुन राजीनामा दिला 
24- वानखेडेवरील ख्रिस गेलच्या तुफानी खेळीला कारणीभूत ठरलेला 'तो' कोण? 
25- स्फोटक खेळीनंतर ख्रिस गेलच्या नावावर जमा झालेले विक्रम 
26- गुगल'ने हटवली भारताची हेरगिरी करणारी ऍप 
27- एअरटेलकडून व्हिडिओकॉनच्या स्पेक्ट्रमची खरेदी  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
व्यर्थ गोष्टींची करणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा
(योगेश अभंग, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 



========================================

जर्मन बेकरी स्फोट: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप

जर्मन बेकरी स्फोट: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट
पुणे : पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटाप्रकरणी हिमायत बेगची फाशी रद्द करुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 
हिमायत बेगवर एकूण 9 आरोप होते. पण आरोप सिद्ध न झाल्याने हायकोर्टाने हिमायत बेगची बॉम्बस्फोटासह आठ प्रकरणातून सुटका केली. तर घरात स्फोटकं मिळाल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 
पुण्यातील जर्मन बेकरीत 13 फेब्रुवारी 2010 रोजी स्फोट झाला होता. स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 58 जण जखमी झाले होते. या स्फोटामध्ये इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी हिमायत बेगला सप्टेंबर 2010 मध्ये अटक करण्यात आली. स्फोटात हात असल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने 2013 मध्ये त्याल फाशीची शिक्षा ठोठावली होती. 
यानंतर हिमायत बेगने फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने बेगला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

========================================

किंगफिशर हाऊसला एकही खरेदीदार नाही

किंगफिशर हाऊसला एकही खरेदीदार नाही
मुंबई : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सच्या मालकीच्या किंगफिशर हाऊस या प्रॉपर्टीच्या लिलावाला कोणीही बोली लावण्यासाठी पुढे आलं नाही. मोठा गाजावाजा करत स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहांनी एसबीआयकॅप्स ट्रस्टी मार्फत ऑनलाईन लिलाव पुकारला, मात्र मूळ किंमत जास्त असल्याचं कारण सांगत कोणीही बोलीदार बोली लावण्यासाठी पुढे आला नाही.

एसबीआयकॅप्स ट्रस्टीने किंगफिशर हाऊससाठी 150 कोटी रूपये ही मूळ किंमत निश्चित केलीय. त्यामुळे बोलीदारांनी त्यापुढे बोली लावणं अपेक्षित होतं.
मुंबईतील विले पार्ले परिसरात ही प्रॉपर्टी असून जवळपास 17 हजार चौरस स्क्वेअरफूट बांधकाम झालेलं आहे. ऑक्शनटायगर या वेबपोर्टलमार्फत हा ऑनलाईन लिलाव आयोजित करण्यात आला होता. सरफैसी अॅक्टमधील तरतुदीनुसार एखादा कर्ज चुकवण्यास अपात्र असेल तर त्याने तारण ठेवलेल्या अटल संपत्तीचा लिलाव करून कर्जाची वसुली करण्यात येते.
मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सला स्टेट बँक आणि त्यांच्या नेतृत्वाखालील 17 बँकाच्या समूहांनी तब्बल नऊ हजार कोटी रूपयाचं कर्ज दिलंय. या कर्जाची परतफेड झालेली नाही. त्यामुळे स्टेट बँकेने गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ही प्रॉपर्टी ताब्यात जप्त केली.
मात्र आज आयोजित करण्यात आलेल्या लिलावात कोणीही इच्छुक खरेदीदार पुढे न आल्याने किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या कर्जाची वसुली कशी करायची हा मोठा प्रश्न निर्माण झालाय.
========================================

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ला सरकारचं उत्तर

‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ला सरकारचं उत्तर
मुंबई राज्याच्या आर्थिक विकास पाहणीचा अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला. ज्यामध्ये राज्याचा विकास दर 5.8 वरुन 8 टक्क्यांवर जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलीय. पावसाचा अभाव आणि अकाली पावसामुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचंही अहवालात म्हटलंय. त्यामुळे सलग दोन वर्षे कृपी उत्पन्नात घट झालीय. त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालाय. राज्यात फळ-भाज्यांच्या उत्पन्नात 15 टक्के घट झालीय. तर दुष्काळ असताना सुध्दा ऊसाचं उत्पादन मात्र 19 टक्क्यांनी वाढलंय.
========================================

वानखेडेवरील ख्रिस गेलच्या तुफानी खेळीला कारणीभूत ठरलेला 'तो' कोण?

वानखेडेवरील ख्रिस गेलच्या तुफानी खेळीला कारणीभूत ठरलेला 'तो' कोण?
मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने नाबाद शतक ठोकलं. इंग्लंडचा अक्षरश: धुव्वा उडवला. मात्र, तुम्हाला माहित आहे की, गेलच्या या तुफानी खेळीमागे काय कारण होतं, त्याच्या या धडाकेबाज खेळीला कोण कारणीभूत आहे? नाही ना…. मग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गेलच्या तुफानी खेळीमागचं कारण.
जवळपास 15 महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर वेस्ट इंडीजसाठी खेळणाऱ्या ख्रिस गेलला त्याच्याच टीममधील सहकारी स्पिनर सुलेमान बेनने उकसवलं होतं. सुलेमान आणि गेल हे दोघे वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
========================================

स्फोटक खेळीनंतर ख्रिस गेलच्या नावावर जमा झालेले विक्रम

स्फोटक खेळीनंतर ख्रिस गेलच्या नावावर जमा झालेले विक्रम!
मुंबई : ट्वेन्टी 20 विश्वचषकात ख्रिस गेलच्या तुफाळी खेळीमुळे वेस्ट इंडिजने इंग्लंडवर सहा विकेट्सनी शानदार विजयाची नोंद केली.  मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गेलने शतकी खेळीमध्ये अनेक रंजक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. 
– ख्रिस गेलने षटकारांचा अक्षरश: पाऊस पाडला. या सामन्यात गेलने 11 दमदार षटकार ठोकले. या षटकारांसह गेलने न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेण्डन मॅक्युलमचा विक्रम मोडला आणि टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 98 सिक्सर लगावणारा फलंदाज बनला. 
– यासोबतच्या भारतीय जमिनीवर टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मानही गेलला मिळाला आहे. त्याने तब्बल 253 षटकार लगावले आहेत. त्यानंतर युसूफ पठाण (170 षटकार), सुरेश रैना (166 षटकार) आणि रोहित शर्मा (164 षटकार) यांचा नंबर लागतो. 
– ख्रिस गेलने कालच्या सामन्यात ट्वेन्टी 20 क्रिकेटमध्ये 17 व्या शतकाची नोंद केली. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत गेलच्या पुढे कोणीही नाही. गेलनंतर ब्रेण्डन मॅक्युलम नंबर आहे. पण त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 
– आपल्या टी20 क्रिकेट करिअरमध्ये गेलने बारा वेळा 10 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला आपल्या कारकीर्दीत दोनपेक्षा जास्त वेळा ही कामगिरी करता आलेली नाही.
========================================

परभणीच्या कृषी विद्यापीठात रॅगिंग, पाठीवर वळ उठेपर्यंत विद्यार्थ्यांना मारहाण

परभणीच्या कृषी विद्यापीठात रॅगिंग, पाठीवर वळ उठेपर्यंत विद्यार्थ्यांना मारहाण
परभणी : परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आणि लातूरच्या कृषी महाविद्यालयात सिनीअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर मुलांवर रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परभणीत सुमारे 40-50 मुलांना विद्यापीठातील सीनियर विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे. तर लातूर कृषी महाविद्यालयातील सीनियर विद्यार्थ्यांनी दारु पिऊन विद्यार्थ्यांन मारहाण केली.

परभणीत 40-50 विद्यार्थ्यांची रॅगिंग
परभणीत गेल्या काही दिवसांपासून सीनियर विद्यार्थी विद्यापीठात नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करुन धमकावत होते. त्यातच काही दिवसांपूर्वी यातील काही विद्यार्थ्यांच्या पाठीवर वळ उठेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या घटनेची लेखी तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे केली. विद्यापीठाने या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समितीचे स्थापना केली आहे. दोन ते तीन दिवसात यासंदर्भात अहवाल सादर करणार असून त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाही करण्यात येईल, असं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे. तसंच पोलिसातही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
========================================

छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई सत्र न्यायालयाकडून छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली आहे. जेजे रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी काल अंमलबजावणी संचलनालय कार्यालयात भुजबळांची वैद्यकीय तपासणी केली. भुजबळांचा जुना ईसीजी आणि नुकताच काढलेल्या ईसीजीमध्ये बदल असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार भुजबळांना छातीचा कोणाताही त्रास नसला चाचणी गरजेची आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना आज तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणण्यात येणार आहे. काल संध्याकाळच्या सुमारास भुजबळांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी ईडी ऑफिसमध्ये त्यांची तपासणी केली. 
दरम्यान, 11 तास चौकशींनतर अंमलबजावणी संचलनालयाने छगन भुजबळ यांना 14 मार्च अटक केली होती. भुजबळांची दोन दिवसांची ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल
========================================

खडसेंवर हक्कभंग आणा, विधानसभेत विखे-पाटलांची मागणी

खडसेंवर हक्कभंग आणा, विधानसभेत विखे-पाटलांची मागणी
मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खडसे यांच्या हक्कभंगाची मागणी केली आहे. 
राज्यात 2015 मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या, मात्र खडसे यांनी विधानसभेत माहिती देताना 2012 मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहिती दिली. 
खडसेंनी जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती देऊन सभागृहातल्या सदस्यांचा हक्कभंग केल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
दरम्यान या सुचनेवर तपासून पुढचा निर्णय घेऊ असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं आहे.
========================================

पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकल्यास नग्न नृत्य करण्याचं कंदील बलुचचं आश्वासन


  • इस्लामाबाद, दि. 17 - पाकिस्तानने जर वर्ल्ड कप जिंकला तर कपडे उतरवत नग्न नृत्य करण्याचं आश्वासन पाकिस्तानी मॉडेल कंदील बलुचने दिलं आहे. 2011 मध्ये असंच आश्वासन पूनम पांडेनं भारतीय क्रीडरसिकांना व आपल्या चाहत्यांना दिलं होतं, जे प्रत्यक्षात आजपर्यंत उतरलेलं नाही. पाकिस्तानमधला पूनम पांडेचा अवतार मानली जाणारी कंदील पूनमच्या पावलावर पाऊल टाकत बिनधास्त विधानं करत प्रसिद्धी मिळवत असल्याचं मात्र दिसत आहे.
    कंदीलनं आपल्या फेसबुक पेजवर सदर व्हिडीयो पोस्ट केला असून सोशल मीडियावर हा चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकायलाच हवं असं सांगताना शाहीद अफ्रिदीला तू सांगशील ते मी करायला तयार आहे असं आमिषही कंदीलनं दाखवलं आहे.
========================================

शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची कबुली

  • ऑनलाइन लोकमत -
    मुंबई, दि. १७ - शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. 
    शेतक-यांच्या आत्महत्येवर कर्जमाफी हा उपाय नाही. कर्जमाफीने मतं मिळतील मात्र समस्या सुटणार नाहीत. कर्जमाफी हा रामबाण उपाय नाही, कर्जमाफीनंतरही शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
    शेतक-यांच्या कर्जाचं पुनर्गठन करणार आहोत. यावर्षी सिंचन विहीरींच टार्गेट पुर्ण होईल, वर्षभरात 33 हजार सिंचन विहीरी पुर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा विकासदर देशापेक्षा जास्त आहे. शेतक-यांशिवाय मेक इन महाराष्ट्र होणार नाही. मेक इन महाराष्ट्रामध्ये शेतमालाचा विचार केला आहे. तसंच नवी मुंबई विमानतळ आणि अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ट्रस्ट तयार करण्याचं काम सुरु असून ट्रस्टचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 
========================================

ईडीने केली समीर आणि छगन भुजबळांची 4 तास चौकशी

  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. १७ - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळआणि पुतण्या समीर भुजबळ यांची गुरुवारी एकत्र चौकशी करण्यात आली. सक्तवसुली संचलनालयात (ईडी) ही चौकशी करण्यात आली. चौकशी पुर्ण झाल्यानंतर समीर भुजबळ यांची पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली. 
    छगन भुजबळ यांना अटक झाल्यापासून पहिल्यांदाच छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासोर बसवून चौकशी करण्यात आली. तब्बल 4 तास ही चौकशी चालली.  सोमवारी ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भुजबळांना अटक केली होती. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
========================================

टोकियोत ग्लायडर घरावर कोसळून दोघांचा मृत्यू

  • ऑनलाइन लोकमत -
    टोकियो, दि. १७ - ग्लायडरचा अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त ग्लायजर रहिवाशी परिसरातच कोसळले. नरीटा विमानतळाच्या बाजूला असणा-या लोकवस्तीत हे ग्लायडर कोसळले. ग्लायडर घरांवर कोसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे. सोबतच ग्लायडरसोबत प्रवास करणा-या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
    ग्लायडरचा एक भाग तुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे ग्लायडरचे तुकडे झाले आणि घरांच्या छतावरच कोसळले. 69 वर्षीय शुजी यांच्यासोबत एकजण या अपघातात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. नेमका अपघात कसा झाला याचा तपास सुरु आहे. 
========================================

देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्या रशियन तरुणाला घडू शकतो एका वर्षाचा कारावास

  • ऑनलाइन लोकमत
    मॉस्को, दि. 17 - सोशल मीडियामध्ये टिप्पणी करताना देवाचं अस्तित्व नाकारणं एका रशियन तरुणाला महाग पडण्याची शक्यता आहे. व्हिक्टर क्रासनोव या 38 वर्षांच्या तरूणांनी दोन अनोळखी व्यक्तिंशी सोशल मीडियावर चर्चा करताना ईश्वर अस्तित्वात नसल्याचं मत मांडलं होतं. त्याच्याविरोधात धार्मिक लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली आणि त्याला आरोपी बनून कोर्टामध्ये हजर रहावं लागलं. जर त्याच्यावर हा आरोप सिद्ध झाला तर त्याला एका वर्षाचा कारावास होऊ शकतो.
    ऑक्टोबर 2014 मध्ये व्हिक्टरचा दोघा अनोळखी व्यक्तिंशी काँटॅक्ट या रशियन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संवाद झाला होता. अन्य व्यक्तिंनी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन परंपरांचा उल्लेख केला तर व्हिक्टरने देवाचं अस्तित्व नाकारलं. विशेष म्हणजे त्याने ज्यूंचा अपमान करणारी भाषाही वापरली, परंतु ज्याबद्दल त्याला आरोपी करण्यात आलेलं नाही. 
    त्याच्याविरुद्ध 2015च्या सुरुवातीला तक्रार करण्यात आली, ज्यानंतर व्हिक्टरची एक महिना मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली. आता व्हिक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अर्थात, व्हिक्टरच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा प्रतिवाद त्याच्या बाजुने करण्यात येत आहे. रशियन न्यायव्यवस्था व्हिक्टरला तुरुंगवासाची शिक्षा देते की त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेते हा रशियामधला चर्चेचा विषय झाला आहे.
========================================

चुलत भावाबरोबर लग्नाला नकार दिला म्हणून महिलेची हत्या

  • ऑनलाइन लोकमत 
    बर्लिन, दि. १७ - चुलत भावाबरोबर लग्न करायला नकार दिला म्हणून कुर्दीश महिलेची डोक्यात गोळया घालून हत्या करण्यात आल्याची घटना जर्मनीमध्ये घडली. या मुलीचा पिता असल्याचा दावा करणा-या व्यक्तीने या घटनेचे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत. 
    या फोटोमधील दुश्यानुसार ही मुलगी रक्ताच्या थारोळयात पडली असून, तिच्या आजूबाजूला विवाहासाठी आलेले नातेवाईक उभे आहेत. या फोटोसोबतच्या संदेशामध्ये विवाहासाठी नकार दिला म्हणून नवरदेव असलेल्या चुलतभावानेच हत्या केल्याचे म्हटले आहे. 
    आरोपीने मुलीच्या डोक्यात तीन गोळया झाडून तिची हत्या केली. 'बिल्ड' या जर्मन प्रसिद्धीमाध्यमानुसार आठवडयाच्या सुरुवातीला या महिलेची हत्या झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, पोलिस या हत्येचा तपास करत आहेत. हत्या करण्यासाठी वापरलेली बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पण आरोपी अजून फरार आहे. 
========================================

महिलांना रडण्यासाठी हॉटेलमध्ये विशेष खोली


  • टोक्यो, दि. १७ - प्रत्येक हॉटेलचा आपले एक वैशिष्टय जपण्याचा प्रयत्न असतो. हॉटेलचे चालक ग्राहकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळया कुल्पत्या लढवत असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जपानची राजधानी टोक्योमध्ये एका हॉटेलने खास महिलांच्या रडण्यासाठी एक वेगळया खोलीची व्यवस्था केली आहे. मित्सुई गार्डन योत्सुया असे या हॉटेलचे नाव आहे. रुममध्ये गेल्यानंतर महिलांना रडता यावे यासाठी विशेष प्रकारच्या सुविधा खोलीमध्ये आहेत. अनेकदा रडल्यानंतर काहींना भावना मोकळया केल्यासारख्या वाटतात. महिलांच्या मनावरील तणाव दूर व्हावा म्हणून ही व्यवस्था केल्याचे हॉटेलच्या प्रशासनाचा दावा आहे. या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे ५३२९ रुपये आहे. महिलांना अधिक सहजतेने रडता यावे यासाठी खास भावनिक चित्रपटांची व्यवस्था रुममध्ये आहे. 
========================================
मल्ल्यांकडून पै न पै वसूल करणार- जेटली

उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडून पै न पै वसूल केली जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. 

देशातील 17 बॅंकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकित असताना विजय मल्ल्या देश सोडून फरार झाले आहेत. त्यांच्याबाबत केंद्र सरकारने आज आपली भूमिका स्पष्ट केली. "विजय मल्ल्यांकडून एक एक पै वसूल केली जाईल. देशातील प्रत्येक चौकशी यंत्रणा व सक्तवसुली संचलनालय सध्या विजय मल्ल्यांच्या प्रकरणावर काम करत आहे.‘ असे जेटली म्हणाले. तसेच ‘वस्तुस्थिती अत्यंत स्पष्ट असून सरकारची प्रत्येक यंत्रणा मल्ल्यांविरोधात कठोर कारवाई करेल. सरकारी बॅंकाही मल्ल्यांकडून पै न पै वसूल करतील,‘ असं जेटली म्हणाले. 

दरम्यान आज (गुरुवारी) भारतीय स्टेट बॅंकेने मल्ल्या यांच्या ‘किंगफिशर हाऊस‘च्या खरेदीसाठी ऑनलाईन लिलाव आयोजित केला होता. मात्र कोणीही ही मालमत्ता खरेदी करण्यास पुढाकार न घेतल्याने बॅंकेकडे एकही निविदा आलेली नाही.
========================================
'गायीला राष्ट्रमाता करा' म्हणत आत्महत्येचा प्रयत्न

राजकोट (गुजरात) - गायीला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी करणाऱ्या गो रक्षा एकता समितीच्या सहा कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

गो रक्षा एकता समितीच्या कार्यकर्त्यांनी गायीला राष्ट्रमाता घोषित करावे अशी मागणी करणारे निवेदन राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी दिले होते. तसेच त्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. मात्र तरीही कोणीच त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यामध्ये कोणीही मृत झाले नाही. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

‘ते गायीला राष्ट्र माता घोषित करण्याची मागणी करत होते. आजही ते मागणी करत आले. त्यापैकी सहा जणांनी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून राजकोट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती किंचित गंभीर आहे‘, अशी माहिती पोलिस निरीक्षक कल्पेश चावडा यांनी दिली.
========================================
घोड्याला मारहाणीचा आलिया, अनुष्काकडून निषेध 

मुंबई- एका आमदाराने मारहाण करून घोड्याचा पाय मोडल्याच्या घटनेबद्दल बॉलिवूड अभिनेत्रींनी तीव्र संताप व्यक्त करीत निषेध नोंदविला आहे. "आपण असे कसे काय घडू देऊ शकतो?? आता प्राण्यांना आपण सोडणार नाही का?" असे प्रश्न उपस्थित करीत या घटनेबद्दल अभिनेत्री आलिया भटने संताप व्यक्त केला आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात देहरादूनमध्ये आंदोलन करताना भाजपचे आमदार गणेश जोशी यांनी दांडक्‍याने केलेल्या अमानुष मारहाणीत पोलिसांच्या घोड्याचा पाय मोडला होता. प्राणिमित्रांसह या घटनेचा निषेध करणाऱ्यांमध्ये बॉलिवूडकरही आहेत. संबंधितभाजप आमदाराकडून घोड्याची पाहणी केली. 

"हा प्रकार ‘किळसवाणा‘ म्हणण्यापलीकडचा आहे," अशा शब्दांत आलिया भटने ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करताना निषेध व्यक्त केला. आलिया म्हणते, "प्राण्यांना बोलता येत नाही. आपण त्यांचा आवाज बनायला हवे... आपण असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन करू शकत नाही. देहरादूनचा प्रकार दुखद व खरोखर लज्जास्पद आहे." 
अनुष्का शर्मानेही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासंदर्भात एक लेख शेअर करून तिने जीप आणि तंत्रज्ञान उपलब्ध असताना पोलिसांनी घोडे वापरणे चुकीचे आहे असे तिने म्हटले आहे. 
========================================
दुष्काळात मल्चिंगवर फुलविली झेंडूची शेती
माजलगाव -  तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असून पारंपरिक शेतीतून उत्पादन घटले आहे. त्यामुळे एकदरा (ता. माजलगाव) येथील एका तरुण शेतकऱ्याने तब्बल दहा एकर क्षेत्रांत अत्याधुनिक पद्धतीने फुलशेतीचा केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. दोन दिवसांत फुलांची पहिली तोडणी होणार असून पाच ते सहा तोडण्यांतून त्यांना दोन लाखांचे उत्पादन अपेक्षित आहे. 

तालुक्‍यातील एकदरा येथे गणेश बावणे यांची शेती आहे. वडील रामराव बावणे आणि गणेश हे शेती पाहतात. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती अडचणीत आली. पाणी आहे तर शेती आहे हे ओळखून श्री. बावणे यांनी शेतात विहीर खोदली. सुदैवाने विहिरीला पाणीही लागले. एक महिन्यापूर्वी दहा एकर शेतात मल्चिंग करून बेडवर एक बाय एक अंतरावर झेंडू व पपईची लागवड केली. केज येथील रोपवाटिकेतून 70 हजार गोल्ड स्पॉट टू या जातीची झेंडूची रोपे अडीच रुपयाला एक याप्रमाणे आणली. एक महिन्यापूर्वी या रोपाची बेड तयार करून ठिबकवर लागवड केली. सध्या झेंडूस फुले लगडली असून फुलांच्या विक्रीसाठी कल्याण येथे बाजारपेठ असून चाळीस ते पन्नास रुपये किलो या दराने विक्री करणार असल्याचे गणेशने सांगितले. दोन दिवसांत फुलांची पहिली तोडणी असून त्यात किमान दहा क्‍विंटल म्हणजे चाळीस हजारांचे उत्पादन अपेक्षित आहे. पुढील काळात पाच ते सहा तोडण्या होणार असून यातून दोन लाखांचे उत्पादन अपेक्षित असल्याचे तरुण शेतकरी बावणे यांनी सांगितले.
========================================
खराब झालेल्या टोमॅटोपासून होणार वीजनिर्मिती
वॉशिंग्टन डी सी - शास्त्रज्ञांनी खराब झालेल्या टोमॅटोंपासून जैविक इंधन निर्मितीचे तंत्र शोधून काढले असून त्यातून वीजनिर्मिती करता येणे शक्‍य होणार आहे. हे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या समूहात एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.



फ्लोरिडामध्ये दरवर्षी 3 लाख 96 हजार टन खराब टोमॅटो जमा होतात. मात्र त्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्र उपलब्ध नाही. त्यामुळे दक्षिण दकोटा येथील साऊथ दकोटा स्कूल ऑफ माइन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजीचे प्राध्यापक व्यंकटरमणा गधामशेट्टी यांनी या खराब टोमॅटोंचा चांगला उपयोग करण्यासाठी संशोधन सुरु केले. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, खराब झालेल्या टोमॅटोतून मिथेन वायू निर्माण होतो. त्यानंतर हे टोमॅटो पाण्यात फेकून दिले जातात. त्यामुळे पाण्यावरील प्रक्रियेमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होतात. शास्त्रज्ञांना खराब टोमॅटोपासून इलेक्‍ट्रिक करंट निर्माण करणारे मायक्रोबायल इलेक्‍ट्रोकेमिकल सेल तयार करण्यात यश मिळाले आहे. हे संशोधन कॅलिफोर्नियात झालेल्या अमेरिकन केमिकल सोसायटीच्या एका बैठकीत बुधवारी सादर करण्यात आले.

========================================
गुन्हेगाराच्या घरात 225 जिवंत गावठी बाॅम्ब
देवरूख/रत्नागिरी : संगमेश्‍वरजवळील कुंभारखाणी गावतळी येथील एका संशयिताच्या घरामध्ये सुमारे 225 जिवंत गावठी बॉम्बचा साठा आज सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही आजवरची सर्वांत मोठी कारवाई केली. हा संशयित पोलिसांच्या गुन्हेगारी यादीतील ‘टॉप टेन‘मध्ये आहे. गावठी बॉम्बची मोजदाद उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

संजय कांबळे असे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक एस. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने धाड टाकली. या वेळी संजय कांबळे यांच्या पडवीतील कपाटामध्ये कपड्यांच्या मागे स्फोटक सदृश गोळे सापडले. पोलिसांशी या संदर्भात चर्चा केली असता रानटी डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणारे गावठी बॉम्ब असल्याचे मत आहे; मात्र त्याबाबत ठाम भाष्य केलेले नाही. या कारवाईमध्ये संगमेश्‍वर पोलिसांची मदत घेण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. जगताप, सौ. गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपनिरीक्षक रविराज फडणीस, संगमेश्‍वरचे पोलिस निरीक्षक मनोहर चिखले, माखजन दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल डी. एस. पवार आणि संगमेश्‍वर पोलिस सचिन भुजबळराव आणि कर्मचारी असा मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी होता. या स्फोटकसदृश गोळ्यांची संख्या मोठी आहे. रात्री साडेदहापर्यंत सुमारे 225 बॉम्ब सापडले होते. अजून तपास सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.
========================================
गुगल'ने हटवली भारताची हेरगिरी करणारी ऍप

नवी दिल्ली - भारतीय लष्कराबद्दलची माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानमधील गुप्तचर विभाग, आयएसआय वापरत असलेली "स्मेश ऍप‘ गुगलने प्ले स्टोअरवरून काढून टाकली आहे.  पाकिस्तानमधून भारतीय लष्करावर पाळत ठेवून महत्वाची माहिती हॅक करण्यासाठी या ऍपचा उपयोग करण्यात येत होता. पठाणकोटवरील हल्ल्यासाठीही या ऍपची मदत घेण्यात आली होती. हल्ल्यादरम्यान भारतीय लष्कराची कारवाईबाबतची माहिती या ऍपद्वारे दहशतवाद्यांपर्यंत पोचत होती. पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने फेसबुकवर काही बनावट खाती तयार करून भारतीय लष्करातील जवानांकडून शक्‍य तेवढी माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारच्या 10 बनावट प्रोफाईल्सला अद्यापपर्यंत लष्करातील 10 जवान अनावधनाने जोडले गेल्याचेही समोर आले आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत "गुगल‘ने "स्मेश ऍप‘ गुगल ऍप स्टोअरवरून हटविली आहे.
========================================
एअरटेलकडून व्हिडिओकॉनच्या स्पेक्ट्रमची खरेदी 
नवी दिल्ली - भारती एअरटेलने व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सच्या सहा परिमंडळातील (सर्कल) स्पेक्ट्रमची 4,428 कोटी रुपयांना खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आयडिया व व्हिडिओकॉनमधील स्पेक्ट्रम शेअरिंगचा करार रद्द झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा झाली आहे.

भारती एअरटेल व्हिडिओकॉनच्या बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश(पुर्व) व गुजरात परिमंडळातील स्पेक्ट्रमची खरेदी करणार आहे. स्पेक्ट्रम व्यवहार मार्गदर्शक तत्वांमधील अटी व इतर अटींची पुर्तता झाल्यानंतर करार पुर्ण होईल, अशी माहिती एअरटेलने सादर केलेल्या निवेदनात दिली आहे.

गेल्यावर्षी केंद्र सरकारने दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम शेअरिंगची परवानगी देत ऐतिहासिक निर्णय दिला होता. त्यानंतर आयडिया व व्हिडिओकॉनतर्फे अशा प्रकारचा पहिलावहिला करार निश्चित झाला होता. परंतु काल (बुधवार) दोन्ही कंपन्यांनी हा करार रद्द झाल्याचे जाहीर केले. त्याचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. काही दिवसांपुर्वी भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) भारती एअरटेलसोबत स्पेक्ट्रम शेअरिंगसाठी बोलणी सुरु असल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु ही चर्चा केवळ प्राथमिक स्वरुपात असल्याचे बीएसएनलने सांगितले होते. रिलायन्स व व्होडाफोनमध्ये देखील याबाबत बोलणी सुरु आहे. 

या घोषणनंतर व्हिडिओकॉनचा इंडस्ट्रीजचा शेअर तब्बल 17 टक्क्यांनी वधारला होता तर भारती एअरटेलचा शेअर 3 टक्के वाढीसह व्यवहार करत होता. सध्या(गुरुवार, 12 वाजून 4 मिनिटे) व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजचा शेअर 118.05 रुपयांवर व्यवहार करत असून 7.91% वधारला आहे तर भारती एअरटेलचा शेअर 2.75 टक्के वाढीसह 349.00 रुपयांवर व्यवहार करत आहे.

========================================


No comments: