Sunday, 20 March 2016

नमस्कार लाईव्ह २०-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- इस्लामाबाद; पराभवानंतर पाकिस्तानात टीव्ही फुटले  
२- इजिप्तमध्ये इसिसच्या हल्ल्यात 13 पोलिस ठार  
३- समुद्र सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या ८६ भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानने सदिच्छा म्हणून सुटका 
४- स्पेनमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या बसला अपघात १४ ठार, ३० जखमी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- विदेश मंत्रालयाच्या कॉन्फरन्स रूमला आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल 
६- राष्ट्रगीतासाठी एक छदामही घेतला नाही, बिग बींचं स्पष्टीकरण 
७- अल्पबचत योजनांवर व्याजदर कपात न्याय्य:जेटली  
८- मोदी व भाजपचा खरा चेहरा समोर आला- राहुल 
९- सत्तेच्या घोडेबाजाराविरोधात काँग्रेस लोकशाही मार्गाने लढेल - राहुल गांधी 
१०- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज इमरान खानची भेट घेणार. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- दिग्विजय सिंह माफी मागा, अन्यथा... : मुख्यमंत्री 
१२- उदयनराजेंचा कवितेतून भ्रष्टाचाऱ्यांवर हल्लाबोल 
१३- लातुरात गर्भपाताचा प्रयत्न महिलेच्या जीवावर बेतला 
१४- खासगी जागेत अश्लील कृती गुन्हा ठरत नाही - मुंबई उच्च न्यायालय 
१५- सरकार स्थापनेबाबत मेहबूबा मुफ्तींची लवकरच बैठक  
१६- भारताच्या जयजयकाराची लाज का?- उदयनराजे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- पुणे; 'चितळे बंधू'चे संस्थापक भाऊसाहेब चितळेंचे निधन 
१८- देवनार कचरा डेपोला पुन्हा आग, पुन्हा धुराचं साम्राज्य 
१९- पश्चिम बंगाल; खरगपूरमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनची ऑटोरिक्षाला धडक, तीन ठार, एक जखमी.
२०- मुंबई विमानतळावर नेपाळी नागरीकाच्या सामानातून कस्टम अधिका-यांनी १४६ कासव जप्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- 'पीसीबी'मध्ये वादळ, आफ्रीदीची लवकरच हकालपट्टी 
२२- दक्षिण आफ्रिकेचा अफगाणवर 37 धावांनी विजय  
२३- दहा षटकात अफगाणिस्तानने ओलांडला १०० धावांचा टप्पा, अफगाणिस्तानच्या १०.३ षटकात तीन बाद १०५ धावा.
२४- करिष्मा कपूरचं बॉलिवूडमध्ये पुनरागमन? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाहीत, हे जितकं खर तितकेच त्या प्रगतीचा मार्ग दाखवत नाहीत हे हि तितकच खर
(भगवान जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************

==========================================

उदयनराजेंचा कवितेतून भ्रष्टाचाऱ्यांवर हल्लाबोल 

उदयनराजेंचा कवितेतून भ्रष्टाचाऱ्यांवर हल्लाबोल
सातारा : धरणं, कालवे भ्रष्टाचाराने भरल्यानेच शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. ते आज साताऱ्यात बोलत होते.

“‘पूर्वी पाणी आडवा, पाणी जिरवा’ अशी घोषणा होती. मात्र आता स्वत:च्या स्वार्थासाठी ‘लोकांना आडवा आणि लोकांची जिरवा’ असा प्रकार सुरु झाला आहे. त्याचा गाभा हा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार झाला नसता तर धरणे पूर्ण झाली असती, लोकांपर्यंत पाणी पोहचले असते. त्यामुळे ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला आहे, त्यावर कारवाई गरजेची आहे. जनतेवर आलेले हे नैसर्गीक संकट आहे. अनेक ठिकाणी पाण्यामुळे गाव सोडून लोक चाललेत संचारबंदी लागलेली अवस्था झाली आहे. त्यामुळे भ्रष्ट झालेला प्रत्येक नेता हा गजाआडच झालाच पाहिजे”, अशी मागणी उदयनराजे यांनी आवर्जून केली.

उदयनराजेंचा रोख कोणाकडे?

महत्वाचं म्हणजे आपल्या पूर्ण पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी भ्रष्ट नेत्यांचा उल्लेख करताना ”जे कोण असतील, त्यांना तुरुंगात टाका” असं वारंवार म्हटलं. त्यामुळे उदयनराजेंचा बोलण्याचा रोख नेमका कुणीकडे होता?.अशी चर्चा स्वकीयांमध्येच रंगली आहे.
==========================================

राष्ट्रगीतासाठी एक छदामही घेतला नाही, बिग बींचं स्पष्टीकरण

राष्ट्रगीतासाठी एक छदामही घेतला नाही, बिग बींचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्धच्या टी-ट्वेन्टी सामन्याआधी गायलेल्या राष्ट्रगीतासाठी एक छदामही घेतला नसल्याचं खरमरीत स्पष्टीकरण महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलं आहे. 
राष्ट्रगीतासाठी पैसे घेणारा माणूस गरीब मनाचा : अमिताभ 
काल कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या भारत-पाक सामन्याआधी अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत पार पडलं. पण त्यासाठी अमिताभ यांनी 4 कोटी रुपये घेतल्याचा दावा सोशल मीडियावर सुरु होता. पण हे वृत्त पूर्णपणे निराधार असून, राष्ट्रगीत गाण्यासाठी पैसे घेणारा माणूस हा गरीब मनाचा असतो, असंही अमिताभ म्हणाले. 
बिग बींनी पैसे घेतल्याचं वृत्त गांगुलीनेही फेटाळलं! 
इतकंच नाही, तर टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनंही हे वृत्त फेटाळून लावत, अमिताभ यांची पाठराखण केली आहे. 
अमिताभ स्वखर्चाने कोलकात्यात, राष्ट्रगीतासाठीचं मानधन नाकारलं! 
अमिताभ यांनी कोलकात्यात येण्यासाठीही स्वतःच्या खिशातून चार्टर्ड प्लेनचं भाडं भरलं, इतकंच काय कोलकात्यात त्यांच्यासाठी हॉटेलचीही व्यवस्था केली होती. पण त्या सगळ्या खर्चाला फाटा देत अमिताभ हे थेट मैदानावर आले. शिवाय, या राष्ट्रगीतासाठी देऊ केलेलं मानधनही घेण्यास अमिताभ यांनी नकार दिल्याचं स्पष्टीकरण गांगुलीनं दिलं आहे.
==========================================

लातुरात गर्भपाताचा प्रयत्न महिलेच्या जीवावर बेतला

लातुरात गर्भपाताचा प्रयत्न महिलेच्या जीवावर बेतला!
लातूर : लातूर जिल्ह्यात परवाना नसलेल्या गर्भपात केंद्रात केलेलं ऑपरेशन महिलेच्या जीवावर बेतलं आहे. रबिया नवाज असं या महिलेचं नावं होतं. रबिया नवाज या महिलेचं वय अवघं 27 वर्षे होतं. 
14 मार्च रोजी लातूर शहरातील विक्रमनगर भागातील शांताई क्लिनिकमध्ये डॉक्टर संजय तुतोरीकर यांच्या क्लिनिकमध्ये नवाज हुसेन यांनी पत्नी रबियाच्या गर्भाचे लिंग परीक्षण केलं. स्त्रीभ्रूण असल्याने गर्भपात करण्याचे ठरले आणि गर्भपातादरम्यान रबियाचा मृत्यू झाला. 
16 मार्चला एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोद झाली. तपास पुढे सुरु झाला आणि काल रात्री उशिरा रबियाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला. त्यात रबियाच्या पोटात स्त्री भ्रूण असल्याचे समोर आले. गर्भपात करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने रुग्णाचा धक्क्यात मृत्यू झाल्याचे रिपोर्टमधून समोर आले. या घटनेत पोलिसांनी अवैधरित्या गर्भलिंग परिक्षण केल्याबद्दल डॉ. संजय तुतोरीकर आणि आणि रबियाचा पती नवाज हुसेनला अटक केली आहे.
==========================================
इजिप्तमध्ये इसिसच्या हल्ल्यात 13 पोलिस ठार 
कैरो : इसिसच्या दहशतवादी हल्ल्यात इजिप्तचे तेरा पोलिस कर्मचारी ठार झाले. संरक्षण आणि वैद्यकीय सूत्रांनी या घटनेबद्दल माहिती दिली. हा हल्ला अरिश येथील तपास नाक्‍यावर झाला. 

या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. सिनाई पेनिनसुला येथे दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला तसेच बॉंबफेक केली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, शहरात प्रवेश होणाऱ्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. त्यामुळे शहराबाहेर जाणारे रस्ते तातडीने बंद करण्यात आले. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. 
==========================================
अल्पबचत योजनांवर व्याजदर कपात न्याय्य:जेटली 
देशाला आता अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमी करण्यास सुरवात करावी लागणार आहे. व्याजदरात झालेली कपात न्याय्य असून हा दैनंदिन प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या व्याजदर कपातीचे समर्थन केले आहे. अल्पबचत योजनांचे व्याजदर बाजारतील सध्याच्या दरांशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्यावेळी ते बोलत होते. तसेच वस्तू व सेवाकर विधेयक संसदेत मंजुर होईल यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाय, दिवाळखोरी कायदादेखील लवकरच मंजुर होईल कारण बरेचसे पक्ष या विधेयकाच्या बाजूने आहेत, असेही ते म्हणाले. 

सराफांच्या संपाविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले उत्पादन शुल्क विभागाकडून सराफांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. 
==========================================
मोदी व भाजपचा खरा चेहरा समोर आला- राहुल
नवी दिल्ली- "प्रथम अरुणाचल प्रदेशमध्ये आणि आता उत्तराखंडमध्ये लोकशाही व संविधानावरील हल्ल्यामुळे मोदी आणि भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे," असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

उत्तराखंडमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना फोडून भाजपने त्यांच्याशी हातमिळवणी करीत सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या या राजकीय धुळवडीमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

"बिहारमधील दारुण पराभवानंतर घोडेबाजार आणि पैसे व बळाचा गैरवापर करून निवडून आलेली सरकारे पाडणे हे भाजपचे नवे मॉडेल आहे असे दिसते."
भाजपच्या अशा वर्तनाला काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीने उत्तर देईल, असे राहुल यांनी सांगितले.
==========================================
'चितळे बंधू'चे संस्थापक भाऊसाहेब चितळेंचे निधन
पुणे- पुण्यातील मिठाईचे प्रसिद्ध व्यावसायिक व ‘चितळे बंधू मिठाईवाले‘ या कंपनीचे संस्थापक रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे यांचे आज (रविवार) वृद्धापकाळाने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. 
सायंकाळी वैंकुठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
==========================================

सत्तेच्या घोडेबाजाराविरोधात काँग्रेस लोकशाही मार्गाने लढेल - राहुल गांधी 


  • नवी दिल्ली, दि. २० - उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला जबाबदार धरलं आहे. उत्तराखंडमध्ये जनतेने निवडून दिलेल सरकार पाडण्यासाठी भाजपने घोडेबाजार चालवला असून, पैसा आणि मसल पॉवरचा गैरवापर सुरु आहे असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला. 
    उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नरेंद्र मोदींच्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. काँग्रेस याविरोधात लोकशाही मार्गाने लढेल असे त्यांनी सांगितले. 
    उत्तराखंडमधल्या काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या विरोधात बंड पुकारलं आहे. राज्यपालांनी हरीश रावत यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी २८  मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. टि्वटरवरुन हल्ला चढवताना राहुल यांनी यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. 
==========================================

खासगी जागेत अश्लील कृती गुन्हा ठरत नाही - मुंबई उच्च न्यायालय

  • मुंबई, दि. २० - फ्लॅटमध्ये महिलेबरोबर अश्लील वर्तन केल्या प्रकरणी तेरा जणांविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रद्द करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान संहितेर्गत खासगी जागेत केलेली अश्लील कृती गुन्हा ठरत नाही असा उच्च न्यायालयाने सांगितले. 
    मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरी पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी १३ जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश एन.एच.पाटील आणि न्यायाधीश ए.एम.बदर यांनी या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. 
    १२ डिसेंबर २०१५ रोजी एका पत्रकाराने पोलिसांकडे शेजारच्या फ्लॅटमध्ये मोठया आवाजात म्युझिक वाजवले जात असून, तोकडया कपडयांमध्ये नृत्य करणा-या महिलांवर पैसे उडवले जात असल्याची तक्रार केली. 
    तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी फ्लॅटवर धाड टाकली त्यावेळी तिथे सहा महिला तोकडया कपडयांमध्ये नृत्य करत होत्या आणि तेरा पुरुषांनी मद्यपान केले होते. पोलिसांनी सर्व पुरुषांना अटक करुन त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. फ्लॅट सार्वजनिक स्थळ नाही. तिथे कोणीही येऊ शकत नाही असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. न्यायालयाने हा युक्तीवाद मान्य करुन एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला. 
==========================================

'पीसीबी'मध्ये वादळ, आफ्रीदीची लवकरच हकालपट्टी

'पीसीबी'मध्ये वादळ, आफ्रीदीची लवकरच हकालपट्टी?
इस्लामाबाद: भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या ट्वेन्टी20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकानंतर आफ्रिदीची कर्णधारपदावरून उचलबांगडी होण्याची चिन्हं आहेत. 
विश्वचषकातील उर्वरीत लढतींमध्ये पाकिस्तानची कामगिरी सुधारली, तरी आफ्रिदीला आपलं पद सोडावं लागेल, असं पीसीबीच्या एका पदाधिकाऱ्यानं म्हटलंय. इतकंच नाही, तर आफ्रिदीला निवृत्तीही स्वीकारावी लागू शकते. 
गेल्या काही दिवसांत आफ्रिदीनं मीडियासमोर केलेल्या विधानांवरही पीसीबीचे सदस्य नाराज आहेत. पीसीबी ट्वेन्टी20 विश्वचषकानंतर पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांच्यासोबतचा करारही वाढवणार नसल्याचं वृत्त आहे. तसंच हरून रशीद यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानची निवड समितीही बरखास्त केली जाईल, असेही संकेत पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी दिले आहेत.
==========================================
सरकार स्थापनेबाबत मेहबूबा मुफ्तींची लवकरच बैठक 
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमधील सरकार स्थापनेबद्दल सुरू असलेली शंकायुक्त चर्चा थांबविण्यासाठी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती लवकरच वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलाविण्याची दाट शक्‍यता आहे. जम्मू-श्रीनगर महामार्ग सध्या बंद असल्याने अडकून पडलेले नेते येईपर्यंत बैठकीची तारीख निश्‍चित करता येत नसल्याचेही सांगण्यात आले. 

मुफ्ती महंमद सईद यांच्या निधनामुळे जम्मू काश्‍मीरचे सरकार बरखास्त झाले होते. 8 जानेवारीपासून येथे राज्यपाल राजवट सुरू आहे. अनेक दिवस उलटूनही सरकार स्थापनेबाबत निर्णय झाला नसल्याने जनतेमध्ये द्विधा मनःस्थिती निर्माण झाली आहे. 

सहकारी पक्ष असलेल्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यात झालेल्या बैठकीतही काही निर्णय झाला नव्हता. पीडीपीच्या नव्या मागण्यांच्या आधारावर सरकार स्थापनेसाठी एकत्र येऊ शकत नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, आपण कोणत्याही नव्या मागण्या केल्या नसल्याचा पीडीपीचा दावा आहे. त्यामुळे मुफ्ती यांच्या आगामी बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे. 
==========================================
भारताच्या जयजयकाराची लाज का?- उदयनराजे

सातारा : "भारतमाता की जय ही काही शिवी नाही. भारत हा आपला देश आहे. त्याचा जयजयकार करायला कोणाला का लाज वाटते. राष्ट्रप्रेम ढासळले तर देश अखंड राहणार नाही. बघता बघता त्याचे तुकडे होतील. कोणीही मूठ भर लोकांच्या विचारांना, राजकारणाला बळी पडू नका. सर्व पक्षांना माझी हात जोडून विनंती आहे, कोणीही जातीय तेढ निर्माण करू नका" असे आवाहन आज (रविवार) खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. 
खासदार भोसले यांनी धरणं, कालवे भ्रष्टाचाराने भरल्यानेच शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली, असे सांगून भ्रष्टाचारी नेते गजाआडच झाले पाहिजेत अशी भावना व्यक्त केली.
==========================================
दक्षिण आफ्रिकेचा अफगाणवर 37 धावांनी विजय 

मुंबई- दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर 37 धावांनी विजय मिळविला. आफ्रिकेने ठेवलेले 210 धावांचे मोठे लक्ष्य गाठण्याचा नवख्या अफगाण संघाचा प्रयत्न अपुरा ठरला. अफगाणिस्तानने 20 षटके खेळून काढली, मात्र त्यांना 172 धावांपर्यंतच मजल मारता आली. दरम्यान, आफ्रिकेने शेवटच्या चेंडूवर बळी घेत अफगाणचे सर्व गडी बाद केले.

एबी डिव्हिलर्सने 34 चेंडूंमध्ये 64 धावांची धडाकेबाज फलंदाजी केली. तसेच, डीकॉक (31 चेंडूंत 45 धावा) आणि डुप्लेसी (27 चेंडूंत 41 धावा) यांनी जोरदार फलंदाजी करीत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतल्यामुळे आफ्रिकेने 210 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.



==========================================

देवनार कचरा डेपोला पुन्हा आग, पुन्हा धुराचं साम्राज्य

देवनार कचरा डेपोला पुन्हा आग, पुन्हा धुराचं साम्राज्य
मुंबई: मुंबईच्या देवनार कचरा डेपोला पुन्हा एकदा आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी 8 फायर इंजिन आणि 8 वॉटर टॅकर दाखल झाले आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 
या आगीमुळे पुन्हा एकदा परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे. 
महिनाभरापूर्वी याच कचरा डेपोला मोठी आग लागली होती. या आगीच्या संशयाची सुई पालिका प्रशासनाच्या मानगुटीवर आहे. अशातच पुन्हा देवनार कचरा डेपोला आग लागल्याने सरकार या प्रकरणी काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
==========================================

दिग्विजय सिंह माफी मागा, अन्यथा... : मुख्यमंत्री

दिग्विजय सिंह माफी मागा, अन्यथा... : मुख्यमंत्री
मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. 
दिग्विजय सिंह यांनी 18 मार्च रोजी केलेल्या वादग्रस्त ट्विटविरोधात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसा यांच्याबाबत ट्वीट करुन दिग्विजय यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वशिलेबाजीचा आरोप केला होता. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता अॅक्सिस बँकेत उपाध्यक्ष असल्याने मुख्यमंत्र्यांनी एसआरएच्या विकासकांना अॅक्सिस बँकेत खाते उघडण्यास सांगितल्याचा आरोप दिग्विजय सिंह य़ांनी केला होता. ट्विटरवरुन हा आरोप करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी या ट्विट्सविरोधात दिग्विजय सिंहांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. 
नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत माफी मागा किंवा ट्विट्स परत घ्या, नाहीतर अब्रुनुकसानीच्या खटल्याला तयार राहा, असं मुख्यमंत्र्यांनी या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

==========================================

पराभवानंतर पाकिस्तानात टीव्ही फुटले 


  • इस्लामाबाद, दि. २० - परंपरागत प्रतिस्पर्धी भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. पराभवानंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी रस्त्यावर उतरुन आपला संताप व्यक्त केला. 
    पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये काही जणांनी आपले टीव्ही संच फोडून राग व्यक्त केला. पाकिस्तानात या पराभवासाठी कर्णधार शाहीद आफ्रिदीला जबाबदार धरण्यात येत आहे. आफ्रिदीच्या चुकीच्या रणनितीमुळे पराभव झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. 
    पाकिस्तानने दिलेले ११९ धावांचे लक्ष्य भारताने अगदी आरामात पार केले. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असताना स्पिनर इमाद वसिमला संघात स्थान न देण्याच्या आणि स्वत: वनडाऊन फलंदाजीला येण्याच्या अफ्रिदीच्या निर्णयावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेपटूंनी टिका केली आहे. 
    पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी तर अजब तर्क लावला आहे. इमरान खान यांनी जाणीवपूर्वक पाकिस्तानी क्रिकेटपटूंना चुकीचा सल्ला दिला त्यामुळे पराभव झाल्याचे बासित अली यांनी म्हटले आहे.  
==========================================

कॉंग्रेसला घरघर; कॉंग्रेसमुंक्त भारताच्या दिशेने वाटचाल 

कॉंग्रेसला घरघर; कॉंग्रेसमुंक्त भारताच्या दिशेने वाटचाल एकेकाळी संपूर्ण देशात निर्विवाद सत्तेवर असलेली कॉंग्रेस हळूहळू एकेक राज्य गमावत आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर याचा वेग तर आणखीच वाढला. काही राज्यांच्या झालेल्या निवडणुकीनंतर कॉंग्रेस नऊ राज्यात सत्तेवर होती. परंतु काही दिवसापूर्वी  अरुणाचलप्रदेशमध्ये कॉंग्रेसच्या आमदारांनी आपली सत्ता हाणून पडली. व ते राज्य कॉंग्रेसच्या हातून गेले. आता उत्तराखंडमध्ये हि परिस्थिती ओढवली असून २८ मार्चनंतर तिथे कॉंग्रेसचे सरकार दिसणार नाही. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नाही. यांची लागण मणिपुरमध्ये झाली असून तिथेही थोड्याच दिवसात कॉंग्रेसचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. लोकसभेत जेमतेम चालीसिला आलेली कॉंग्रेस आपल्या खाज्दारांमधील विविध आरोप व कोर्ट केस मुळे जेरीस आलेली आहे. अगदी सोनिया गांधी राहुल गांधी पासून बरीच जन जामिनावर बाहेर आहेत. 

No comments: