Saturday, 26 March 2016

नमस्कार लाईव्ह २६-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- लंडन; शेक्सपिअरच्या मृतदेहाची कवटी दफनभूमीतून झाली चोरी 
२- अमेरिकेतील शाळेने योगा अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळले 
३- लंडन; मुलीच्या मृत्यूपुर्वी वडिलांनी लग्न लावून पाळलं वचन 
४- कराची; 'त्या' अधिकाऱ्याशी भारत सरकारचा संबंध नाही! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- काँग्रेसला पैसे खायची सवय आहे असं ऐकलं आहे - नरेंद्र मोदी. 
६- ....तर विदर्भ आंदोलन बंद करेन : श्रीहरी अणे 
७- सांगली : अबकारी कराच्या निषेधार्थ दुकान बंद, बंदच्या धक्क्याने सराफाचा मृत्यू 
८- जम्मू काश्मीर - अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथे पोलीस ठाण्याजवळ ग्रेनेड हल्ला 
९- देवनार डंपिंग ग्राऊंडविरोधात काँग्रेसचा रास्ता रोको, पोलिसांनी संजय निरुपम आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- पुणे; कन्हैया धाकट्या भावासारखा, पुण्यात सभा घेणार : कुमार सप्तर्षी 
११- स्वत:च्या आवाजात राज ठाकरेंचा शिवरायांना मुजरा 
१२- मुंबई विमानतळाजवळ शिवशाही, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण 
१३- नागपूर; पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो - श्रीहरी अणे 
१४- तारखेप्रमाणे तिथीलादेखील शिवजयंती साजरी झाली पाहिजे - राज ठाकरे. 
१५- यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- तिरुअनंतपुरम; श्रीशांत भाजपत डेरेदाखल, मतदारसंघही ठरला  
१७- चिंचवड; आई गेली परदेशी, बाबा गेला दूरदेशी... 
१८- पुणे; सुधीर तांबे यांच्यावर खुनाचा गुन्हा 
१९- अलाहाबाद; दहशतवादी होण्यास नकार देणाऱ्या बालकाची हत्या 
२०- पश्चिम बंगालमधूल नानूर येथून पोलिसांनी जप्त केले १४० देशी बाँब 
२१- जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात लष्कराच्या २ जवानांसह २ नागरिकही जखमी.
२२- तेलंगणामधील नालगोंदा येथे एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या, 3 अल्पवयीन मुलांचा समावेश. 
२३- बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये माओवाद्यांचा बांधकाम साईटवर हल्ला, 11 गाड्या पेटवून दिल्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- शाहरुख आणि सनी लिऑन चित्रपटात एकत्र झळकणार 
२५- लिशा शर्माकडून हार्दिक पांड्या क्लीन बोल्ड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मनात नेहमी जिंकण्याची अशा नसावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते
(साईनाथ शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 


=============================================

१- लोकमत आयकॉन मिळाल्याबद्दल फ्लावर एन फ्लावरचे संचालक श्रीकांत बाहेती यांची नमस्कार लाईव्हनी घेतलेली एक्सक्लूसीव्ह मुलाखत 

लोकमत आयकॉन मिळाल्याबद्दल प्रथमतः नमस्कार लाईव्ह तर्फे आपले हार्दिक अभिनंदन.....!
पश्र  १- सर,  लोकमत आयकॉन मिळाल्याबद्दल आपल्या थोडक्यात आपले मत वा भावना सांगा 
उत्तर- निश्चितच फार चांगले वाटते, आपण करत असलेले कार्य योग्य दिशेने वाटचाल करत आहे. याची शाश्वती झाली आणि नकळतच  "झाले मोकळे आकाश" या गीतासारखी भावना मनात वाटू लागली.

प्रश्न २ - आपण या उद्यागाची सुरुवात कशी केली? प्रथम कोणत्या अडचणी आल्या?
उत्तर- सुरुवात करण्यासाठी अनुभव नव्हता किंवा नातेवाईकांत या व्यवसायाविषयी माहितीही कोणाकडे नव्हती. ही माहिती मिळविणे मोठे जिकरीचे काम होते. या काळात कोणी पाठीवरून हात फिरवून प्रोत्साजन देण्यापेक्षा "तू या व्यवसायाच्या नादाला लागू, चार महिन्यात हे दुकान बंद होईल अशी पैज लावणारेही जास्त भेटले, त्यावर मत करणे हीच मोठी कसरत होती. 

प्रश्न २- आपल्याला कुणाकुणाचे सहकार्य लाभले?
उत्तर- घरच्यांचा माझावर विश्वास होता. स्वतःची जिद्द, मेहनत यामुळे मी आज इथपर्यंत पोहचलो. 

प्रश्न ३- आपल्या यशाचे श्रेय कोणास द्याल?
उत्तर- माझ्या यशाचे वाटेकरी म्हणून माझे कुटुंबीय, आमचा तत्पर स्टाफ, संतुष्ट  ग्राहक यांचा प्रामुख्याने उल्लेख करेन. आज मी त्यांच्याच सहकार्यामुळे ह्या व्यवसायात उभा आहे. हा आयकॉन पुरस्कार या सर्वांनाच समर्पित आहे. 

प्रश्न ४- आपले भविष्यातील आणखी ध्येय कोणते?  
उत्तर- प्रत्येक तालुका पातळीवर फ्लावर एन फ्लावर्सचे शाखा स्थापन करणे. ग्राहकांच्या मागणीनुसार मालाची गुणवत्ता व सेवांमध्ये सुधारणा करणे. शेतकऱ्यांचा माल. फळे थेट विक्रेत्याच्या हातात जावून त्यांना योग्य दर मिळवून देणे. या सर्व उद्यागामधून कमीत-कमी तीस ते चाळीस हजार बेरोजगारांना रोजगार निर्मिती करण्याचा मानस आहे. 

प्रश्न ५- नवीन उद्योजकांसाठी कोणता संदेश द्याल?
उत्तर- "स्वप्न पहा, स्वप्नात जगा" आपण स्वप्नात ज्या गोष्ठी पाहतो त्य सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न करा, यश तुमचेच आहे. 

धन्यवाद सर...आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल...
आपल्यास लोकमत आयकॉन मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा नमस्कार लाईव्ह तर्फे हार्दिक अभिनंदन 

=============================================

स्वत:च्या आवाजात राज ठाकरेंचा शिवरायांना मुजरा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी केली जात आहे. शिवसेना आणि मनसेकडून शिवजयंतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शिवसेनेकडून मुंबई विमानतळावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येत आहे.  छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्यासमोर गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ढोलताशे, तुताऱ्या,  मावळ्यांच्या वेशातील शिवसैनिक, पारंपरिक वेशातील महिला-पुरुष अशा थाटात मुंबई विमानतळावर शिवजयंतीनिमित्त शिवशाही अवतरली आहे.
तर दुसरीकडे मनसेने मुंबईतील शिवाजी पार्कावर जय्यत तयारी केली आहे. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: आपल्या आवाजात शिवाजी राजांना वंदना दिली आहे. राज ठाकरेंनी आपल्या आवाजातील एक ध्वनीफित प्रसारित केली आहे.
VIDEO:
=============================================

शाहरुख आणि सनी लिऑन चित्रपटात एकत्र झळकणार

शाहरुख आणि सनी लिऑन चित्रपटात एकत्र झळकणार
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि फिल्मस्टार सनी लिऑन आता एकाच पडद्यावर दिसणार आहेत. आगामी ‘रईस’ चित्रपटात एसआरके आणि सनीने एक आयटम साँग केलं आहे. 
1980 च्या दशकात गाजलेल्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील ‘लैला ओ लैला’ हे गाणं नवा साज चढवून ‘रईस’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. मूळ गाण्यात फिरोझ खान आणि झीनत अमान झळकले होते. तीच जादू उभं करण्याचं आव्हान सनी आणि शाहरुखने पेललं आहे. 
मेहबूब स्टुडिओमध्ये रेट्रो बारचा सेट उभा करुन गाण्याचं शूटिंग करण्यात आलं. हे एक आयटम साँग असून ते अंतिम नामावलीचा नाही, तर चित्रपटाचाच भाग असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. 
बारमध्ये मद्य विक्री करत असल्याच्या प्रसंगानंतर हे गाणं येईल. 50 ज्युनिअर आर्टिस्ट आणि 20 डान्सर्ससह 4 दिवस सिनेमाचं शूटिंग चालत आहे. 
राहुल ढोलकिया दिग्दर्शित रईस चित्रपटात गुजरातमधील 1980 चा काळ दाखवण्यात येत आहे. शाहरुखसोबत नवाझुद्दीन सिद्दिकी, पाक अभिनेत्री माहिरा खानही सिनेमात भूमिका साकारत आहे. ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
=============================================

श्रीशांत भाजपत डेरेदाखल, मतदारसंघही ठरला 

श्रीशांत भाजपत डेरेदाखल, मतदारसंघही ठरला !
तिरुअनंतपूरम : आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलची हवा खाऊन आलेला क्रिकेटपटू एस.श्रीशांतने अखेर राजकारणात प्रवेश केला आहे. श्रीशांत भाजपमध्ये डेरेदाखल झाला असून, त्याने विधानसभा निवडणूक लढवण्याचीही घोषणा  केली आहे. 
आगामी केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीशांत भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीसाठी भाजपने श्रीशांतला उमेदवारी देण्याचं जाहीर केलं आहे. श्रीशांत तिरुअनंतपूरममधून निवडणूक लढवणार आहे. 
दोन दिवसांपूर्वीच श्रीशांत भाजपामध्ये प्रवेश करेल, अशी चर्चा होती.  त्या वृत्ताला आता दुजोरा मिळाला आहे. 
केरळमध्ये भाजप संघटन कमकुवत आहे.  त्यामुळे या उमेदवारीनं काय फायदा होतो, हे वेळचं सांगणार आहे. 
आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी एस श्रीशांतवर क्रिकेट खेळण्यास आजीवन बंदी घालण्यात आली आहे. 
दरम्यान, येत्या एप्रिल महिन्यात पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. ज्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू , केरळ, पद्दुचेरीचा समावेश आहे. त्यामुळे भाजपनं आता मोर्चेबांधणीसाठी सुरूवात केली आहे.
=============================================

....तर विदर्भ आंदोलन बंद करेन : श्रीहरी अणे

....तर विदर्भ आंदोलन बंद करेन : श्रीहरी अणे
नागपूर: विदर्भ वेगळा झाल्यावर आम्ही काय खाऊ, याची चिंता तुम्ही करु नका, पण जर विदर्भ वेगळा झालाच, तर तुम्हाला खायला काय मिळेल, याची चिंता करा, असा सल्ला आज राज्याचे माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना दिला. 
पदाच्या राजीनाम्यानंतर आज पहिल्यांदाच ते नागपुरात आले आणि संविधान चौकात त्यांनी वेगळ्या विदर्भाबात लोकांपुढे आपली जाहीर भूमिका मांडली. 
पश्चिम महाराष्ट्राने पैसा चोरला 
विदर्भाचा पैसा नेहमीच पश्चिम महाराष्ट्रानेच चोरला असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. विदर्भ वेगळा झाल्यास तुम्ही खाणार काय, असा सवाल पश्चिम महाराष्ट्रातील नेते करतात, मात्र  आमची काळजी करण्यापेक्षा विदर्भ वेगळा झाल्यास महाराष्ट्र काय खाणार याचीही काळजी करा,असा सल्ला अणेंनी दिला. 
महत्वाचं म्हणजे वेगळ्या विदर्भासाठी जनमत घ्या, त्यात 51 टक्के लोकांनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनं कौल दिला नाही, तर वेगळ्या विदर्भाबाबतचं आंदोलन सोडून देईनं, असंही अणे यांनी सांगितलं.
 तर आंदोलन सोडून देऊ 
विदर्भ आंदोलनाला लोकांचे समर्थन नाही असे वाटत असेल तर विदर्भातील रस्त्यांवर लोकांना विचारा. 3 वर्षापूर्वी झालेल्या जनमत चाचणीची आकडेवारी पाहा. वेगळ्या विदर्भाबद्दल कल – चाचणी घ्यायला सरकार का धजावत नाही. 51 टक्के लोक समर्थनात आले नाही तर वेगळ्या विदर्भाची मागणी सोडून देऊ,  हे मी आधी ही बोललो आहे, आता पण बोलतो.  पण सरकार घाबरत आहे, असा आरोप त्यांनी केला.
=============================================

मुंबई विमानतळाजवळ शिवशाही, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

मुंबई विमानतळाजवळ शिवशाही, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
शिवसेना विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पाडला जाणार आहे.
मुंबई : तिथीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, य़ुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विमानतळावर शिवशाहीचा थाट उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्यासमोर गडकिल्ल्यांची प्रतिकृती, ढोलताशे, तुताऱ्या, मावळ्यांच्या वेशातील शिवसैनिक, पारंपरिक वेशातील महिला-पुरुष जमले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर शिवजयंतीनिमित्त शिवशाही अवतरल्याचं चित्र आहे.
=============================================

कन्हैया धाकट्या भावासारखा, पुण्यात सभा घेणार : कुमार सप्तर्षी

कन्हैया धाकट्या भावासारखा, पुण्यात सभा घेणार : कुमार सप्तर्षी
पुणे : कन्हैया कुमारला पुण्यात बोलावून गांधी भवन येथे त्याची सभा घेण्याचा विचार असल्याचं ज्येष्ठ गांधीवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी म्हटलं आहे. पुणेकर त्याला ऐकायला उत्सुक आहेत, त्यामुळे आम्ही गांधी भवनमध्ये कन्हैयाला बोलवून एक सभा घेण्याचा मानस असल्याचं सप्तर्षी म्हणाले. 
कन्हैया हा धाकट्या भावासारखा आहे, त्याला देशद्रोहाचं लेबल लावून नष्ट केलं जाईल अशी भीती वाटत असल्याची भावनाही सप्तर्षी यांनी व्यक्त केली. त्याला गांधी समजावेत हे ही एक कारण असल्याचं कुमार सप्तर्षींनी स्पष्ट केलं. 
एकीकडे पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूट अर्थात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाने कन्हैयाला पुण्यात बोलावण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे धमक्या येत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. त्यात कुमार सप्तर्षी यांनीही कन्हैयाला निमंत्रित करण्याचा विचार बोलून दाखवला आहे.
=============================================

लिशा शर्माकडून हार्दिक पांड्या क्लीन बोल्ड

लिशा शर्माकडून हार्दिक पांड्या क्लीन बोल्ड?
मुंबई: टी ट्वेण्टी विश्वचषकात भारताने बांगलादेशविरुद्ध अवघ्या एका धावेने थरारक विजय मिळवला. धोनीने शेवटच्या ओव्हरसाठी नवख्या हार्दिक पांड्याच्या हाती चेंडू सोपवला. पांड्यानेही तमाम भारतीयांच्या अपेक्षा सार्थ ठरवत, भारताला विजय मिळवून दिला. तेव्हापासून हार्दिक पांड्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. 
मात्र या विजयानंतर हार्दिक पांड्याचा एका मॉडेलसोबत फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. भारताच्या थरारक विजयानंतर पांड्याच्या फॅन्समध्ये वाढ झाली आहे. मात्र पांड्यासोबत फोटोत दिसणारी ही त्याची नवी फॅन नाही. ही मॉडेल लिशा शर्मा आहे.
=============================================

शेक्सपिअरच्या मृतदेहाची कवटी दफनभूमीतून झाली चोरी


  • लंडन. दि. २६ -  प्रसिद्ध कवी, नाटककार विल्यम शेक्सपियर यांची कवटी चोरीला गेली असल्याची माहिती समोर येत आहे. पुरात्तव खात्याने ही माहिती दिली आहे. होली ट्रिनिटी चर्चमध्ये विल्यम शेक्सपियर यांच्या मृतदेह दफन करण्यात आला होता. माहितीपटासाठी संशोधकांनी रडारच्या माध्यमातून दफनभुमी स्कॅन केले असताना ही माहिती समोर आली आहे. विल्यम शेक्सपियर यांच्या मृतदेहासंबंधी याअगोदरही अनेक बातम्या समोर आल्या होत्या. 1974 मध्ये चोरांनी शेक्सपियर यांची कवटी चोरल्याची बातमीदेखील समोर आली होती.
=============================================

अमेरिकेतील शाळेने योगा अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळले


  • पालकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर मुख्याध्यापकांनी माफी मागितली आणि अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळण्यास सांगितले. सोबतच  भारतीय धर्माचा प्रतिक म्हणून दाखवत येणारी रंगीत पानेदेखील अभ्यासक्रमातून काढण्यात आली आहेत. अमेरिकेतील सार्वजनिक शाळांमध्ये धार्मिक प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्रार्थनेचादेखील समावेश आहे. 
  • ख्रिश्चन धर्मातील रुढी परंपरांवर गदा येत असल्याचं सांगत पालकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर अमेरिकेतीलशाळेने योगाच्या अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळले आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही व्यक्तिला अभिवादन करताना आपण नमस्ते करतो. मात्र यामुळे ख्रिश्चन धर्मात नसलेल्या गोष्टी शिकवत जात असल्याचं सांगत पालकांनी यावर आक्षेप घेतला. 
=============================================

पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो - श्रीहरी अणे


  • नागपूर, दि. २६ - पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो असा आरोप करत आपण अजूनही वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचं श्रीहरी अणे बोलले आहेत. वेगळ्या मराठवाड्याच्या मुद्यावरुन झालेल्या गदारोळानंतर महाधिवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतरप्रथमच अणे नागपुरात आले होते यावेळी ते बोलत होते. नागपुरात संविधान चौकात श्रीहरी अणेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. 
    विदर्भासाठीचा पैसा तसाच तिजोरीत राहतो. पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो. आम्ही काय खाणार यापेक्षा तुम्ही तुमची काळजी करा असा टोलाही श्रीहरी अणेंनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना लगावला आहे. विदर्भ वेगळा झाल्यास पश्चिम महाराष्ट्र काय खाईल ? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. 60 वर्षात महाराष्ट्राने विदर्भाला धरणे दिली नाहीत. विदर्भाला साधं पाणीही मिळालं नाही. 
=============================================

मुलीच्या मृत्यूपुर्वी वडिलांनी लग्न लावून पाळलं वचन


  • लंडन, दि. २६ - अँडी बरनार्ड याच्या पत्नीने जेव्हा एका सुंदर मुलीला जन्म दिला तेव्हाच अँडी बरनार्डने आपल्या मुलीला थाटामाटत विवाह करणार असं वचन दिलं होतं. सर्व काही ठिक चालू असताना एक दिवस डॉक्टरांनी अँडी बरनार्डला त्याची मुलगी पॉपीला ब्रेन ट्यूमर असल्याचं सांगितलं. अँडी बरनार्डला हे ऐकून धक्काच बसला कारण तिच्याकडे फक्त काहीच दिवस बाकी होते. या आजारावर काहीच उपचार होणं शक्य नव्हत. 
    जेव्हा ही गोष्ट अँडी बरनार्डच्या मित्रांना कळली तेव्हा त्यांनी आपल्या मित्राचं वचन पुर्ण करण्याचं ठरवलं. त्यांनी पॉपीचा लग्नसोहळा आयोजित केला. पॉपीसाठी फुगे आणि रिबीन लावून सजावटदेखील करण्यात आली. पॉपीलादेखील तिच्या आईने सजवलं आणि लग्नासाठी तयार केलं. हे सगळं काय चालू आहे ? आणि का चालू आहे ? माहित नसणा-या ही चिमुरडी पॉपी नंतर आपल्या वडिलांच्या खांद्यावर झोपी गेली. 
    'जेव्हा मला कळलं होतं मला मुलगी झाली तेव्हाच मी एक दिवस तिचा थाटामाटात विवाह करण्याचं ठरवलं होतं. हे असं होईल कधीच वाटलं नव्हतं. आम्हाला अश्रू अनावर झाले आहेत मात्र तरीही मला माझं वचन पाळायचं आहे. तिचं लग्न असं करायच ठरवलं नव्हत पण तिला तो क्षण जगायला दिला आहे', असं सांगताना अँडी बरनार्ड भावूक झाले होते. 
    'पॉपीला आजारी वाटत असल्याने डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. सुरुवातीला फॅमिली डॉक्टरांनी साधा आजार असल्याची शक्यता सांगितली होती. मात्र तिच्या तब्बेतीत सुधारणा होत नव्हती म्हणून आम्ही दुस-या डॉक्टरांकडे गेलो. पॉपीला उलट्या होत असल्याने तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी किडनी कॅन्सर असल्याची शक्यता व्यक्त केली होती. तपासणी केल्यावर तिला ब्रेन ट्यूमर असल्याचं लक्षात आलं ज्यावर काहीच उपचार करु शकत नाही. तिच्याकडे फक्त दोनच दिवस बाकी आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं. ती आमची एकुलती एक मुलगी असल्याने आम्ही नेहमी तिच्या लग्नाबद्दल बोलायचो. पण आपल्या नशिबात काय लिहिलं आहे कोणालाच माहित नसतं', असं सांगताना पॉपीची आई सॅमीला अश्रू अनावर झाले होते. 
=============================================

आई गेली परदेशी, बाबा गेला दूरदेशी...

  • चिंचवड : गुरुवार रात्री १०.३०ची वेळ. सर्व परिसरात शांतता पसरलेली... चिंचवड बिजलीनगर... नक्षत्रम सोसायटीचा परिसर... दीड महिन्याच्या बाळाला उराशी धरते... बेवारस अवस्थेत सोडून निघून जाते... सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या सुरक्षारक्षकाच्या नजरेस ते बाळ पडते... त्यासोबत महिला एक चिठ्ठीही सोडते.
    चिठ्ठीत असा उल्लेख केला आहे की, ‘‘माझा मुलगा साईला मी सोडून जात आहे. माझ्या काही वैयक्तिक अडचणी आहेत. त्यामुळे माझ्या मुलाची काळजी घ्या. मी त्याचा सांभाळ करू शकत नाही. मी परत मुलाला घेऊन जाईल. तुझे अभागी आई-वडील.’’सुरक्षारक्षकाने महिलेला पाहिले होते. त्यानंतर सुरक्षारक्षकाची नजर चुकवून ती महिला तेथून पलायन करते. घडलेली घटना सोसायटीत सांगितल्यानंतर तेथील रहिवाशांना समजताच सर्व नागरिक त्या ठिकाणी धाव घेतात. सोसायटीच्या बाकडावर त्या बाळाला ठेऊन बाळ सुरक्षित आहे का, याची नागरिकांनी पाहणी केली.चिंंचवड पोलीस स्टेशनला फोन करून घडलेला प्रकार नागरिक सांगतात. पोलीस घटनास्थळी धाव घेतात. मुलाबरोबर त्याचे कपडे, औषध व काही इतर साहित्य पोलीस ताब्यात घेतात.त्यानंतर बाळाला तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात नेतात. बाळाला मात्र याची जराशीही चुणूक नव्हती. बाळ अगदी निरागसपणे हसत होते. दोन तासांनी ते रडू लागले. त्यानंतर मात्र सर्वांचीच धांदल उडाली. अगदी गुटगुटीत व हसऱ्या चेहऱ्याच्या बालकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांच्या डोळ्यांतही मात्र अश्रू तराळले. सर्वांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला की, अवघ्या दीड महिन्याच्या बालकाला या मातेने का सोडून दिले असावे? त्यानंतर बालकासाठी पूर्ण वेळ एका केअरटेकर महिलेची नियुक्ती करण्यात आली.
=============================================

यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस

  • मुंबई : दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक सुखद वार्ता आहे. गेली तीन वर्षे मान्सूनला अडसर ठरलेल्या अल निनोचा प्रभाव ओसरत असल्याने यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. वातावरणातील बदलांचे स्वरूप पाहता यंदा ३ ते १० जून या कालावधीत मान्सून मुंबईत दाखल होईल, यावरही भारतीय हवामान खात्याने शिक्कामोर्तब केले आहे. यंदा २६ ते २७ मेदरम्यान केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता असून, २८ आणि २९ मेदरम्यान तो कोकणात येईल, असा अंदाज आहे. आजघडीला मुंबईसह राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मागील तीन वर्षांपासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तापमानात सरासरी १.५ अंशानी वाढ झाली आहे. तापमानवाढीची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचे राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे. तर समुद्री वातावरणातील बदल आणि तापमानवाढीमुळे फारतर १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. 
    १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत
    मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, हवामानाचा सरासरी अंदाज पाहिला तर १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा आहे. केरळात मान्सूनचे आगमन झाल्यानंतरच मुंबई व राज्यात तो कधी सक्रिय होणार याबाबत ठामपणे सांगता येते. त्यामुळे मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर मुंबईतील आगमनाची तारीख हवामान खात्याकडून जाहीर केली जाईल.
=============================================

सुधीर तांबे यांच्यावर खुनाचा गुन्हा

  • पुणे : संगमनेर महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेच्या १९९१ साली भाजून झालेल्या मृत्यूप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तब्बल २५ वर्षांनी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि पुण्यातील सूर्या हॉस्पिटलचे डॉ. जयसिंग शिंदे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा तपास पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्राध्यापिका विजया देशमुख यांचा १९९१ साली भाजून मृत्यू झाला होता. रहात्या घरी ३५ भाजलेल्या देशमुख यांना डॉ. तांबे यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांना पुण्यातील सुर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविलेल्या मृत्यूपूर्व जबाबात स्टोव्हच्या भडक्यामुळे आपण भाजलो असून कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे विजया देशमुख यांनी म्हटले होते.
    फरासखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन या गुन्ह्याची कागदपत्रे संगमनेर पोलिसांकडे पाठवून दिली होती. त्यानंतर १९९४-९५ च्या काळात देशमुख यांच्या नातेवाईकांनी डॉ. तांबे आणि डॉ. शिंदे यांच्या दुर्लक्षामुळे विजया यांचा मृत्यू झाल्याची जनहित याचिका दाखल करीत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, या याचिकेवर निर्णय होण्याआधीच ती मागेही घेण्यात आली.
    दरम्यान, २००८ मध्ये सामाजिक कार्यकर्ते हेमंत यशवंत ढगे (वय ३४, रा. हडपसर) यांनी उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात पुन्हा जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. सर्वोच्च न्यायालयाने पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी फरासखाना पोलिसांना १९ मार्च रोजी कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी कलम भा.द.वि. ३०२, २०१,३४ (खून, पुरावा नष्ट करणे आणि संगनमत) या कलमान्वये डॉ. तांबे आणि डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ढगे यांनाच फिर्यादी केले आहे.
=============================================
दहशतवादी होण्यास नकार देणाऱ्या बालकाची हत्या

अलाहाबाद (उत्तर प्रदेश) - दहशतवादी बनण्यास नकार देणाऱ्या 11 वर्षाच्या बालकाची त्याच्या शिक्षकाने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मागील आठवड्यात 19 मार्च रोजी अलाहाबाद जिल्ह्यातील कसेरुवा खुर्द गावात रवी पालची (11 वर्षे) त्याची शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने हत्या केली. रवीच्या वडिल पप्पूलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफानने रवीवर इसीस या दहशतवादी संघटनेचा सदस्य होण्यासाठी दबाव टाकला. मात्र त्यास नकार दिल्याने त्याची हत्या करण्यात आली. रवीची बहिण प्रितीने दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्च रोजी शिकवणीला गेलेला रवी संध्याकाळपर्यंत परत न आल्याने आम्ही त्याचा शोध घेतला. "19 मार्च रोजी संध्याकाळी आमच्याकडे पीडित बालकाच्या कुटुंबियांनी तक्रार दिली. त्यानंतर आम्ही शोधमोहिम सुरू केली‘, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश कुमार यांनी दिली. मात्र दहशतवादी होण्यास नकार दिल्याने त्याची हत्या केल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला.
=============================================
'त्या' अधिकाऱ्याशी भारत सरकारचा संबंध नाही!
कराची - पाकविरोधी कृत्यांच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेला कुलभूषण जाधवशी भारत सरकारचा कसलाही संबंध नसल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केले आहे.

भारताला कोणत्याही देशाच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये रस नसून पाकिस्तानमध्येही शांती नांदावी अशी भूमिका असल्याचेही स्वरूप म्हणाले. पाकविरोधी कृत्यांच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेला कुलभूषण जाधव याने लष्करातून निवृत्ती घेऊन जगभर दौरे केले होते. तसेच तो मुंबईतील रहिवासी असून मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर जाधव यांचा तो पुत्र असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 

कुलभूषण जाधव भारतीय नौदलात कमांडर दर्जाच्या पदावर कार्यरत असून, सध्या "रॉ‘ मध्ये काम करत असल्याचा आरोप बलुचिस्तान प्रांताचे गृहमंत्री मीर सरफराझ बुग्ती यांनी केला आहे. त्याच्यावर बलुचिस्तान आणि कराचीतील बंडखोर गटांना मदत केल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलभूषणने तीन महिन्यांपूर्वी कुटुंबातील एका सदस्याशी बोलला होता. त्याबाबत माहिती देताना सदस्याने सांगितले की, "स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याने लष्करातील नोकरी सोडली. त्यानंतर तो व्यवसायाच्या निमित्ताने जगभरात प्रवास करत होता. त्यासाठी त्याने आवश्‍यक ती कागदपत्रेही सोबत नेली होती.‘ 

कुलभूषणकडे सापडलेला एक पासपोर्ट हा हुसैन मुबारक पटेल या नावाचा असून तो महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील असल्याचे एका पाकिस्ताने अधिकाऱ्याने सांगितल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. पाकिस्तानात हिंसेला भारताकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप पाकिस्तानकडून अनेकदा केला जातो. मात्र, भारताने हा दावा नेहमीच फेटाळला आहे.
=============================================

No comments: