Saturday, 19 March 2016

नमस्कार लाईव्ह १९-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- रशियात विमान कोसळून ६१ प्रवासी ठार 
२- ओहोयो; शिक्षा म्हणून सावत्र आईने उकळत्या पाण्यात टाकलं, चिमुकल्याचा मृत्यू 
३- नार्वे; लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान एका क्षणात गायब झाली महिला  
४- दुबई; 'कुंग-फू-योगा'साठी जॅकी चँग येणार भारतात 
५- लॉस एंजल्स; ५३ व्या मजल्यावरून पडून मृत्यू 
६- कराची; प्रवासबंदी उठताच जनरल मुशर्रफ पाकमधून रवाना 
७- ब्रुसेल्स; पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार सलाह अब्देसलामला अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
८- कोलकात्यामध्ये रिमझिम सरी, भारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट 
९- देशात हिटलर जन्माला येऊ देणार नाही: मोहन भागवत 
१०- पीपीएफसह अनेक बचतठेव योजनांच्या व्याजदरात मोठी कपात 
११- ओवेसींविरोधात निवडणूक लढल्यास सर्व मतं मलाच : जावेद अख्तर 
१२- भाजप सत्तेचा भुकेला - अरविंद केजरीवाल 
१३- केंद्र सरकारने मोडले मध्यमवर्गीयांचे कंबरडे; "पीपीएफ‘सह अनेक योजनांवरील व्याजदरात कपात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- नागपूर; विदर्भातील 6147 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करा : हायकोर्ट 
१५- भाजपचा उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या 9 आमदारांच्या जोरावर सत्तास्थापनेचा दावा 
१६- काका पुतण्याच्या मागे लागणारे काका-पुतणेच तुरुंगात : राज 
१७- अलिबाग; पवार, तटकरेंची यंदाची दिवाळी तुरुंगात जाईल: किरीट सोमय्या 
१८- मुंबई मेट्रोच्या दरवाढीवर 12 एप्रिलला अंतिम सुनावणी 
१९- मेटल व्यापाऱ्यांच्या दबावासमोर फडणवीस सरकार झुकलं 
२०- ‘डान्सबार’ला परवानगी देणारे पोलीस निलंबित 
२१- भुजबळांची तुरुंगातील रात्र गेली शांततेत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- पुण्यात नातवाचा खून करुन आजोबाची आत्महत्या 
२३- जालना; वसतिगृहातील छाप्यात बारावीच्या 2500 उत्तरपत्रिका जप्त 
२४- ठाणे; लग्नास नकार देणाऱ्या आत्याच्या मुलीवर गोळीबार, आरोपी अटकेत 
२५- अटकेमुळे आम्ही आणखी एकत्र आलो-उमर 
२६- वसमत; फ्रिज दुरुस्त करताना स्फोटात चार ठार 
२७- मुखेड; अस्मिता गँस एजन्सीच्या मनमानी कारभार गँस सिलेंडरचा साठा रस्त्यावर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- ईडन गार्डनवर आज भारत-पाकिस्तान महामुकाबला 
२९- इंग्लंड वि. आफ्रिका सामन्यात विक्रमांचं पाऊस 
३०- शिल्पाला 'भाभी जी घर पर हैं' सोडण्यासाठी कपिलने भडकावलं 
३२- इंग्लंडचा द. आफ्रिकेवर 2 गडी राखून सनसनाटी विजय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
ठरवलेले सर्व काही मिळत नाही पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर जे आपण ठरवतो त्यासाठी आपण कधीच प्रामाणिक नसतो
(विराज पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शंकर देशमुख, लखन मेहता, वेदांत घोगले, कपिल वर्मा, वेदांत वाल्लेपवार, कुणाल चौधरी, वैभव मिसाळ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


===================================

कोलकात्यामध्ये रिमझिम सरी, भारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट

कोलकात्यामध्ये रिमझिम सरी, भारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट
फाईल फोटो
कोलकाता: टी ट्वेंटी विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला रंगणार आहे. मात्र या हायव्होल्टेज सामन्यावर सध्या पावसाचं सावट आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. सध्या कोलकातामध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या पावसाची सरीही बरसत आहेत.

टी-20 विश्वचषकातील या सामन्याकडे दोन्ही देशातील चाहत्याचे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही देशासाठी हा सामना महत्वाचा असून या सामन्यातील निर्णयावर बरंच काही अवलंबून आहे. मात्र, पावसानं हजेरी लावल्यानं सामन्याबाबत नेमकं काय होणार याविषयी चाहत्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरम्यान, पाकिस्ताननं बांगलादेशला हरवून ट्वेन्टी20 विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. तर दुसरीकडे टीम इंडियावर सलामीच्या लढतीत न्यूझीलंडकडून पराभवाची नामुष्की ओढवली. त्यामुळं आज विजय मिळवण्याच्या उद्देशानं टीम इंडियावर मैदानावर उतरेल. विशेष म्हणजे भारतानं ट्वेन्टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या चारही लढतींमध्ये विजय साजरे केले आहेत. पाकिस्तानवरचं हे वर्चस्व कायम राखायचं असेल तर टीम इंडियाला आज कंबर कसून मैदानात उतरावं लागणार आहे.
===================================

पुण्यात नातवाचा खून करुन आजोबाची आत्महत्या

पुण्यात नातवाचा खून करुन आजोबाची आत्महत्या
पुणे : शांतीनगर जैन सोसायटी, कोंढवा
पुणे : दहा वर्षांच्या नातवाचा खून करुन आजोबाने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. कोंढवा बुद्रुकमधील शांतीनगर जैन सोसायटीमध्ये आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

जिनय शाह असं खून झालेल्या नातवाचं नाव असून सुधीर दगडूमल शाह (वय 65 वर्ष) यांनी आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिनय आजोबांसोबत झोपला होता. पहाटेच्या सुमारास सुधीर यांनी पहिल्यांदा जिनयचा गळा आवळून खून केला. त्यानंतर इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

सुधीर शाह यांनी हे कृत्य का केलं याचा कारण अद्याप स्पष्ट झालेलं. परंतु कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
===================================

ईडन गार्डनवर आज भारत-पाकिस्तान महामुकाबला

ईडन गार्डनवर आज भारत-पाकिस्तान महामुकाबला
कोलकाता : ट्वेन्टी 20 विश्वचषकात आज महामुकाबला रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

एकीकडे पाकिस्तानने बांगलादेशला हरवून ट्वेन्टी20 विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे, तर दुसरीकडे टीम इंडियावर सलामीच्याच लढतीत न्यूझीलंडकडून पराभवाची नामुष्की ओढवली. त्यामुळे आज विजय मिळवण्याच्या उद्देशानेच टीम इंडियावर मैदानावर उतरेल.

भारत आणि पाकिस्तान आजवर सात ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळवण्यात आले. त्यात टीम इंडियानं सहावेळा विजय साजरा केला. तर पाकिस्तानला केवळ एकच सामना जिंकता आला. विशेष म्हणजे भारताने ट्वेन्टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या चारही लढतींमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्तानवरचं हे वर्चस्व कायम राखायचं असेल, तर टीम इंडियाला आज कंबर कसून मैदानात उतरावं लागेल.
===================================

इंग्लंड वि. आफ्रिका सामन्यात विक्रमांचं पाऊस

इंग्लंड वि. आफ्रिका सामन्यात विक्रमांचं पाऊस
मुंबई : एक काळ अस होता की, वन डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना 250 धावांचं लक्ष्य ठेवणं ही खरंतर मोठी गोष्ट मानली जात असे. पण ट्वेन्टी 20 क्रिकेटचा जन्म झाला तेव्हा क्रिकेटपासून क्रिकेटरपर्यंत सगळ्यांचाच अंदाज बदलला. आता तर ट्वेन्टी-20 सामन्यातही 200 धावाही कमी पडायला लागल्या आहे. विश्वचषकात शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामन्यात हा विक्रम पाहायला मिळाला.
इंग्लंडचा वर्ल्ड रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 229 धावांचं डोंगराएवढं आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं. मात्र इंग्लंडने या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आणि दोन विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करुन सामना जिंकणं हा ट्वेन्टी20 विश्वचषकातील नवा विक्रम आहे. टी20 विश्वचषकात यापूर्वी कोणत्याही संघाने 210 धावांपेक्षा मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला नव्हता.

मात्र आव्हानाचा पाठलाग करुन सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम  वेस्ट इंडीजच्या नावावर आहे. विंडीजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2015 साली दक्षिण आफ्रिकेविरोधात 236 धावा केल्या होत्या.
===================================

रशियात विमान कोसळून ६१ प्रवासी ठार


रशियात प्रवाशी विमानाला अपघात, 55 प्रवासी ठार
प्रातिनिधिक फोटो
मॉस्को (रशिया): दक्षिण रशियामध्ये एका प्रवासी  विमानाला लँण्डिंग दरम्यान अपघात झाला असून यामध्ये क्रू कर्मचाऱ्यांसह तब्बल 55 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त समजतं आहे.

हे विमान रशियातील दक्षिण भागातील रोस्तोव-ऑन-डॉनमध्ये पडलं. हे विमान दुबईहून रशियाला जात असताना ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाईदुबईचं बोईंग 738 विमान लँण्डिंगवेळी रनवे सोडून पुढे निघून गेलं आणि काही क्षणातच संपूर्ण विमानानं पेट घेतला. अद्यापपर्यंत या दुर्घटनेचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र, खराब हवामानामुळं हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे. या दुर्घटनेनंतर दुसऱ्या विमानांच्या उड्डाणात बदल करण्यात आले आहेत.
===================================

देशात हिटलर जन्माला येऊ देणार नाही: मोहन भागवत

देशात हिटलर जन्माला येऊ देणार नाही: मोहन भागवत
पुणे: सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ‘भारत एक महान देश नक्कीच बनेल. मात्र, या प्रक्रियेत कोणताही हिटलर तयार होणार नाही.’ असं वक्तव्य भागवत यांनी केलं.

संत तुकाराम यांचं जन्मगाव देहूमध्ये एका वैदिक शाळेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळेस भागवत म्हणाले की, ‘भारत जगातील काही प्राचीन देशांपैकी एक आहे. अध्यात्मिकतेचा समृद्ध वारसा आणि महान संतांचं मार्गदर्शन हेच आपल्याला सर्वोच्च स्थानी नेईल.’

त्याचवेळेस बोलताना भागवत म्हणाले की, ‘भारताला एक मोठं आणि महान देश व्हायचं आहे. पण या मोठं होण्याच्या प्रक्रियेत कोणीही हिटलर तयार होणार नाही. आम्हाला महानता प्राप्त करण्यासाठी गरज आहे ती समर्पित भावनेनं काम करणाऱ्या लोकांची आणि समाजाची.’
===================================

शिल्पाला 'भाभी जी घर पर हैं' सोडण्यासाठी कपिलने भडकावलं

शिल्पाला 'भाभी जी घर पर हैं' सोडण्यासाठी कपिलने भडकावलं?
मुंबई : ‘भाभी जी घर पर हैं’ या टीव्ही मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेने माघार घेतली आहे. शिल्पा शिंदे ‘भाभी जी घर पर हैं’ला बाय बोलता आलं नाही. शि‍ल्पाला आता कपिल शर्माच्या शोमध्ये भाग होता येणार नाही.

मालिकेच्या निर्मात्यांनी फटकारल्यानंतर शिल्पाला कमबॅक करावंच लागलं. इतकंच नाही तर शिल्पा अनप्रोफेशनल आणि खोटारडी असल्याचाही ठपक ठेवला. सुत्रांच्या माहितीनुसार, या सगळ्या वादामागे कपिल शर्माचा हात असल्याचं म्हटतं जात आहे.

कपिल शर्माच्या शोमध्ये एन्ट्री करण्याच्या ऑफरवरुन या प्रकरणाला सुरुवात झाली. कपिलचा नवा शो सोनी टीव्हीवर 23 एप्रिलपासून सुरु होत आहे. शिल्पाला या शोमध्ये काम करायचं होतं, परंतु ‘भाभी जी घर पर हैं’ मालिकेच्या करारानुसार, शिल्पा कोणत्याही दुसऱ्या शोमध्ये काम करु शकत नाही.

कपिल शर्माने जाणीवपूर्वक शिल्पा शिंदेला ही मालिका सोडण्यासाठी भडकावलं होतं, कारण कपिलला ‘भाभी जी घर पर हैं’च्या टीआरपीची भीती वाटत होती.
===================================

शिक्षा म्हणून सावत्र आईने उकळत्या पाण्यात टाकलं, चिमुकल्याचा मृत्यू

शिक्षा म्हणून सावत्र आईने उकळत्या पाण्यात टाकलं, चिमुकल्याचा मृत्यू
ओहियो : शिक्षा म्हणून सावत्र आईने मुलाला चक्क उकळत्या पाण्यात टाकलं. या घटनेत चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या ओहियो शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

अॅना रिची या 25 वर्षीय महिलेने स्वत:च या प्रकाराची माहिती ओहियो पोलिसांना दिली. तिच्या म्हणण्यानुसार, “सकाळी उठले तेव्हा माझा सावत्र मुलगा ऑस्टिन कूपर श्वास घेत नसल्याचं दिसलं.”

दरम्यान ऑस्टिनला रुग्णालयात दाखल केलं, परंतु त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.
boiling water
रिचीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “तिने शिक्षा म्हणून मंगळवारी ऑस्टिनचे पाय उकळ्यात पाण्यात टाकले. त्यानंतर त्याला उचलून बेडवर ठेवलं. पण त्याला एवढी गंभीर दुखापत झाली असेल, असं वाटलं नव्हतं, अस अॅना रिची म्हणाली.”

चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी रिचीवर गुन्हा दाखल झाला असून तिला अटक केली आहे. तिची रवानगी वॉरेन कन्ट्री जेलमध्ये करण्यात आली आहे.

ऑस्टिनच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा तपास वॉरेन कन्ट्री कॉरोनर पोलिस करत आहेत.
===================================

विदर्भातील 6147 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करा : हायकोर्ट

नागपूर : विदर्भातील 6 हजार 147 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे.

केवळ पैसेवारी हा दुष्काळ जाहीर करण्याचा एकमेव निकष नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. याशिवाय सरकार गाढ झोपेत आहे, असे ताशेरेही ओढले आहेत.

दयानंद पवार यांनी यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती वैराळे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत विदर्भात दुष्काळ जाहीर करण्याची सूचना देण्यात आली.

त्यामुळे आता यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोल्यातल्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर होणार आहे.
===================================

पीपीएफसह अनेक बचतठेव योजनांच्या व्याजदरात मोठी कपात

केंद्र सरकारनं शुक्रवारी मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना मोठा झटका दिला आहे. सरकारनं पीपीफवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात केली आहे.

आतापर्यंत पीपीएफवर दरवर्षी 8.7 टक्के व्याज मिळत होतं. मात्र, आता नव्या नियमानुसार फक्त 8.1 टक्केच व्याज मिळणार आहे. यासोबतच किसान विकास पत्र यावर मिळणाऱ्या व्याजदरातही सरकारनं कपात केली आहे. किसान विकास पत्रावर आतापर्यंत 8.7 टक्के व्याज दिलं जात होतं. मात्र आता यापुढे ते 7.8 टक्के दिलं जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पात पीएफच्या किंमतीवरील व्याजावर टॅक्स लावण्याची घोषणा केली होती. त्यावर बराच गदारोळ झाल्यानंतर सरकरानं आपला तो निर्णय मागे घेतला.

सरकारनं केवळ पीपीएफ आणि किसान विकास पत्र याच्या व्याज दरातच कपात केलेली नसून इतरही बचत योजनांच्या व्याज दरात कपात केली आहे.
===================================

वसतिगृहातील छाप्यात बारावीच्या 2500 उत्तरपत्रिका जप्त

वसतिगृहातील छाप्यात बारावीच्या 2500 उत्तरपत्रिका जप्त
जालना : जालन्यामध्ये बारावी बोर्डाच्या तब्बल अडीच हजार उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. शहरातील संस्कार निवासी वसतिगृहांमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात उत्तरपत्रिका सापडल्या.

बारावीच्या विविध विषयांच्या अडीच हजार उत्तरपत्रिका आणि 5 हजार कोऱ्या उत्तरपत्रिकांचा यात समावेश आहे. उत्तरपत्रिकांवरील होलोक्राफ्ट आणि स्टिकरचं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.

याप्रकरणात पोलिसांनी वसतिगृहाच्या मालकाला ताब्यात घेतलं आहे. सापडलेल्या उत्तरपत्रिका या परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचा पोलिसांना संशय आहे.
===================================

भाजपचा उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या 9 आमदारांच्या जोरावर सत्तास्थापनेचा दावा

भाजपचा उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या 9 आमदारांच्या जोरावर सत्तास्थापनेचा दावा
नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकार अडचणीत सापडली आहे. काँग्रेसच्या 9 आमदारांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी भाजपनं सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून त्यामुळे काँग्रेसला उत्तराखंडमध्येही धक्का बसण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा आणि कृषीमंत्री हरकसिंह रावत यांच्यासह आणखी 7 आमदारांनी भाजप सोबत हातमिळवणी करत बजेट पास करण्यासाठी मतविभाजनाची मागणी केली आणि विधीमंडळातच धरणं आंदोलनाला बसले. मात्र, विधानसभेच्या अध्यक्षांनी मतदानाची परवानगी दिली नाही.

त्यामुळं काल रात्रीच भाजपच्या आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली आणि हरीश रावत यांचं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. तसंच भाजपनं 36 आमदारांच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
===================================

काका पुतण्याच्या मागे लागणारे काका-पुतणेच तुरुंगात : राज

काका पुतण्याच्या मागे लागणारे काका-पुतणेच तुरुंगात : राज
मुंबई : जे काका-पुतण्याच्या मागे लागले होते, ते काका-पुतण्याच आता तुरुंगात गेले आहेत, असं मार्मिक भाष्य भुजबळांच्या अटकेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात समीर भुजबळ आणि छगन भुजबळ न्यायालयीन कोठडीत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक वेळा एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भुजबळांच्या मफलरवरुनही राज यांनी अनेकदा टोले लगावले आहेत, तर ठाकरे काका-पुतण्यांना भुजबळांनी टोमणे मारले होते. त्यामुळे काका-पुतण्याला अडचणीत आणू पाहणारे स्वतःच अडचणीत आल्याचं राज ठाकरे म्हणाले.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या कचाट्यात अडकलेल्या छगन भुजबळांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत त्यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगातच असेल. शिवाय त्यांचे ईोपुतणे समीर न्यायालयीन कोठडीत आहेत.
===================================

इंग्लंडचा द. आफ्रिकेवर 2 गडी राखून सनसनाटी विजय

इंग्लंडचा द. आफ्रिकेवर 2 गडी राखून सनसनाटी विजय
मुंबई: ज्यो रुटच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा दोन विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात इंग्लंडनं 230 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
या लढतीत इंग्लंडच्या ज्यो रुटनं 44 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांसह 83 धावांची खेळी केली. इंग्लंडनं अवघ्या तीन षटकांत 50 धावांचा टप्पा ओलांडला. त्यांचा जेसन रॉयनं 16 चेंडूंतच पाच चौकार आणि तीन षटकारांसह 43 धावा फटकावल्या.
जोस बटलरनंही 21 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याआधी हशिम अमला, क्विंटन डी कॉक आणिजेपी ड्यूमिनीच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकातं चार बाद 229 धावांची मजल मारली होती.
===================================

पवार, तटकरेंची यंदाची दिवाळी तुरुंगात जाईल: किरीट सोमय्या

पवार, तटकरेंची यंदाची दिवाळी तुरुंगात जाईल: किरीट सोमय्या
अलिबाग: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांची यंदाची दिवाळी तुरुंगात जाईल. असं वक्तव्य भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

ते आज अलिबागमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी रायगडच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. आघाडी सत्तेत असताना सुनील तटकरेंनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी केल्या आहेत. त्याची चौकशी करा अशी मागणीही सोमय्यांनी केली.

सुनील तटकरेंनी माझ्यावर गुंडांकरवी दबाव आणला, असा आरोपही सोमय्या यांनी केला. खासदार किरीट सोमय्यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळातील अनेक घोटाळ्यांचा सातत्यानं पाठपुरावा केला. महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ हे अटकेत आहेत. या दोघांच्याही अटकेआधी सोमय्या यांनी भुजबळांना अटक होणार असं जाहीर वक्तव्य केलं होतं.
===================================

लग्नास नकार देणाऱ्या आत्याच्या मुलीवर गोळीबार, आरोपी अटकेत

लग्नास नकार देणाऱ्या आत्याच्या मुलीवर गोळीबार, आरोपी अटकेत
ठाणे: लग्नास नकार देणाऱ्या आत्याच्या मुलीवर गोळीबार केल्याची घटना ठाण्यातल्या कळव्यात घडली आहे. कमलाकांत सैनी असं आरोपीचं नाव असून त्याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. तर गोळीबारात जखमी झालेल्या तरुणीचं नाव ममता मोर्य असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरोपी मुळचा उत्तरप्रदेशचा असून तो 8 दिवसांपूर्वी आत्याकडे राहण्यास आला. घरामध्ये कोणी नसताना कमलाकांतनं ममताकडे लग्नाचा विषय काढला. पण ममतानं नकार दिल्यानं दोघांमध्ये भांडण झाले.
संतप्त झालेल्या कमलाकांतनं आपल्याजवळ असलेल्या देशी कट्ट्यानं ममतावर गोळीबार केला. एक गोळी मानेला स्पर्श करुन केल्यानं ममताची प्रकृती गंभीर आहे. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
===================================

मुंबई मेट्रोच्या दरवाढीवर 12 एप्रिलला अंतिम सुनावणी

मुंबई मेट्रोच्या दरवाढीवर 12 एप्रिलला अंतिम सुनावणी
मुंबई: मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना जास्तीचा खिसा खाली करावा लागणार की नाही हे 12 एप्रिलला स्पष्ट होणार आहे. कारण मेट्रो दरवाढी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 12 एप्रिलला अंतिम सुनावणी होणार आहे.

दरम्यान, मेट्रो दरवाढी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती देण्यात आली होती. परिणामी मुंबई उच्च न्यायालयानं रिलायन्स आणि एमएमआरडीएला चूक दुरूस्त करण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाडलं. त्यामुळं मेट्रो दरवाढीवरची अंतिम सुनावणी लांबणीवर पडली.

मात्र, 12 एप्रिलला मेट्रो दरवाढीवर अंतिम सुनावणी होणार असल्याचं आज उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
===================================

ओवेसींविरोधात निवडणूक लढल्यास सर्व मतं मलाच : जावेद अख्तर

ओवेसींविरोधात निवडणूक लढल्यास सर्व मतं मलाच : जावेद अख्तर
नवी दिल्ली : एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसींविरोधात राज्यसभेत टीकास्त्र सोडणारे खासदार आणि सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पुन्हा निशाणा साधला आहे. ओवेसींविरोधात निवडणूक लढवल्यास सर्व मतं मलाच मिळतील, असा दावा त्यांनी केला आहे.

हिंदू आणि मुस्लिम मतदार समसमान संख्येत असलेल्या मतदारसंघातून जर मी ओवेसींविरोधात निवडणुकीत उतरलो, तर मलाच सर्व मतं मिळतील, असा विश्वास अख्तर यांनी व्यक्त केला आहे. ते इंडिया टूडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

===================================

===================================

मेटल व्यापाऱ्यांच्या दबावासमोर फडणवीस सरकार झुकलं

मेटल व्यापाऱ्यांच्या दबावासमोर फडणवीस सरकार झुकलं!
मुंबई: मेटल व्यापाऱ्यांच्या दबावासमोर फडणवीस सरकार झुकलं आहे. कारण की, जवळपास सहा हजार कोटींच्या महसुलावर पाणी सोडण्यास युती सरकार तयार झालं आहे.

महाराष्ट्रातील मेटल व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र सोडून अहमदाबादमध्ये जाण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं मेटल व्यापाऱ्यांना सहा हजार कोटींचा दंड माफ केला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मेटल इंडस्ट्रीच्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र सोडून गुजरातला जाण्याची धमकी दिली होती.

मेटल व्यापाऱ्यांच्या धमकीनंतर सरकारनं एक पाऊल मागे घेत सेवा करावरील व्यास आणि दंड माफ केला आहे. ज्यामुळे राज्याच्या तिजोरीला जवळवजळव 6 हजार कोटींचा फटका बसला आहे.
===================================

लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान एका क्षणात गायब झाली महिला 

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. १९ - सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून ३० लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय नवल ना? पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल आणि पुन्हा पुन्हा पहाल.. नॉर्वेतील एका टीव्ही चॅनेलचा हा व्हिडीओ असून एका इंटरव्ह्यूदरम्यान दिसणारी महिला काही क्षणात गायब झाल्याचे त्यात दिसत आहे. 
    नॉर्वेतील एका टीव्ही चॅनेलवर स्पोर्ट्स सेंटरसाठी एका व्यक्तीची एअरपोर्टवर मुलाखत घेतली जात होती आणि त्याच्यामागे अनेक प्रवासी ये-जा करत होते. त्याचवेळी त्या व्यक्तीच्या मागे एका महिला उभी होती, पण अवघ्या काही क्षणांतच ती तेथून गायब झाली. हे पाहून त्या टीव्ही शोचे अँकरही अवाक् झाले. ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेण्यात येत होता, त्याच्या मागून एक स्त्री सूटकेसमधून आपले सामान घेऊन जाताना दिसत असून ती तेथे उभ्या असलेल्या महिलेशी बोलत होती. मात्र सामाना घेऊन जाणारी महिला चालताना पुढे गेली आणि तेवढ्यातच तिच्या मागे उभी असलेली स्त्री वळली आणि गायब झाली. जणू ती हवेतच मिसळून गेली. 
    सोशल नेटवर्किंग साईटवर हा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला असून सर्वजण त्या महिलेच्या गायब होण्यामागचं कोडं सोडवंत आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि सांगा बरं ही महिला कुठे गायब झाली...?
===================================

'कुंग-फू-योगा'साठी जॅकी चँग येणार भारतात 

  • ऑनलाइन लोकमत
    दुबई, दि. १९ - अॅक्शन स्टार जॅकी चॅनचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याचे अॅक्शन सिक्वेन्स,स्टंट्स, त्याची स्टाईल याचे भारतीय नागरिकही प्रशंसक आहेत. हाच जॅकी चॅन आपल्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात येत आहे. ' कुंग-फू-योगा' या चित्रपटासाठी तो २१ मार्च रोजी भारतात येणार असून जयपूरमध्ये वास्तव्य करणार आहे. भारतीयांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे या चित्रपटात जॅकीसोबत अभिनेता सोनू सूद आणि अमेयरा दस्तूरही झळकणार आहेत. 
    सोनू सूदनेच ही माहिती जाहीर केली आहे. ' जॅकी २१ मार्चला १५ दिवसांसाठी भारतात येत आहेत, ते जयपूरमध्ये राहणार आहेत. आम्ही या चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण केले असून आताता भारतातील शुटिंगची तयारी सुरू आहे, त्यानंतर आम्ही बीजिंगला रवाना होऊ' असे सोनूने सांगितले. 
    'कुंग-फू-योगा' हा अॅक्शनपट येत्या ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. 
===================================

‘डान्सबार’ला परवानगी देणारे पोलीस निलंबित

  • मुंबई : नियम व अटींची पूर्तता केली नसतानाही खोटा अहवाल सादर करून पोलिसांनी चार डान्सबारना तात्पुरत्या स्वरूपात परवानगी मिळवून दिल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी गृहविभागाने मुलुंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.अरुणकुमार लोहार, भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन सूर्यवंशी, टिळकनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मनीषा शिर्के व ताडदेव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभ्यंकर यांना निलंबित केले आहे.
    डान्सबार बंदी उठविल्यानंतर बारमालकांनी पोलिसांकडे परवानगीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. पहिल्या टप्प्यात इंडियाना (ताडदेव), नटराज (विद्याविहार), पद्मा पॅलेस (भांडुप), उमा पॅलेस (मुलुंड) या चार बारना तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात आला होता. या बारवर २०१४ ते मार्च २०१६दरम्यान ३ ते ४ वेळा समाजसेवा शाखेकडून कारवाई करण्यात आली होती. त्याच बारना परवानगी दिल्याचे लक्षात येताच मंगळवारी गृहविभागाचे प्रधानसचिव सतबीर सिंग यांनी चारही बारना भेट दिली. संबंधित पोलीस ठाण्यांकडून प्राप्त अहवालातील माहिती व प्रत्यक्षातील परिस्थितीत तफावत आढळल्याने सिंग यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.
    त्यानुसार सीसीटीव्ही, अग्निरोधक यंत्रणा यांसारख्या ३ ते ४ बाबींची कमतरता दिसून आली. पोलिसांनी बारमालकांच्या संगनमताने त्रुटी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत खोटा अहवाल सादर करून त्यांना परवानगी दिल्याचे दिसून आले. त्यामुळे संंबंधित पोलीस ठाण्यांतील पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
===================================

भुजबळांची तुरुंगातील रात्र गेली शांततेत

  • - डिप्पी वांकाणी,  मुंबई
    आर्थर रोडमध्ये गुरुवारी रवानगी झालेल्या छगन भुजबळांची तुरुंगातील गुरुवारची रात्र शांतपणे गेली. त्यांना रात्री फारशी झोप मात्र लागली नाही. त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि तुरुंगातील कैद्यांना जे काही दिले जाणारे जेवणच ते जेवले, आम्ही त्यांना समीर भुजबळपासून दूर असलेल्या जागी ठेवले आहे, असे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.
    त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘लोकमत’ला सांगितले की सध्या तरी आम्ही भुजबळांना घरचे जेवण आणि किंवा औषधे देण्यासाठी अर्ज करणार नाही. मात्र भुजबळांना जामीन मिळण्यासाठी कधी अर्ज करायचा यावर वकिलांची चर्चा सुरू आहे. हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज करताना आरोपी कसा दोषी नाही याचे पुरावे द्यावे लागतात. त्यामुळे एकदा चौकशी यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल झाले की जामिनासाठी अर्ज करणे शहाणपणाचे ठरेल. परंतु ताबडतोब अर्ज करावा का यावर आम्ही विचार करीत आहोत.
    मात्र, भुजबळ यांना मिळालेली न्यायालयीन कोठडी ही चौकशीला वरदानच ठरली आहे, असे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यांचा पुतण्या समीर याला आणल्यावर सगळा दोष तो स्वत:वर घेईल, अशी आम्हाला भीती होती त्यामुळे या दोघांना एकमेकांसमोर आणण्यात आले नाही. ईडीच्या खूप महत्त्वाच्या साक्षीदारांनी जे पुरावे या प्रकरणात दिले आहेत त्यामुळे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ असे दोघेही त्यात दोषी ठरू शकतील, असे हा अधिकारी म्हणाला.
    राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या माहितीनुसार सध्या वकिलांच्या तुकडीसोबत बैठका सुरू आहेत. या प्रकरणात छगन भुजबळांच्या जामिनासाठी नेमका कधी अर्ज करावा यावर मोठी चर्चा सुरू आहे.
===================================

लॉस एंजल्स; ५३ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

  • लॉस एंजल्स : अमेरिकेतील लॉस एंजल्स शहरात बांधकाम सुरू असलेल्या ५३ मजली इमारतीवरून पडून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाला.
    विलशायर ग्रॅण्ड सेंटर या इमारतीचे बांधकाम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर ही इमारत अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात उंच इमारत ठरणार आहे. दुर्दैवी इलेक्ट्रिशियनचा या ठिकाणी कामाचा हा दुसराच दिवस होता.
    हा कामगार एका कारच्या मागच्या बंपरवर पडला. या घटनेने कारचालक महिलेला मानसिक धक्का बसला. ती हवेत हात हलविण्यासह दोन्ही हातात डोके दाबू लागली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

===================================

प्रवासबंदी उठताच जनरल मुशर्रफ पाकमधून रवाना

  • कराची : वैद्यकीय उपचारासाठी परदेशी जाण्याची मुभा मिळाल्यानंतर काही तासांतच माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ शुक्रवारी पहाटे दुबईला रवाना झाले. देशद्रोहासह अनेक खटल्यांना तोंड देत असलेल्या मुशर्रफ यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे. ‘मी कमांडो आहे आणि माझे मातृभूमीवर प्रेम आहे. मी काही आठवड्यांत किंवा महिन्यांत परतेन’, असे मुशर्रफ देश सोडण्यापूर्वी म्हणाले.
    आपल्याविरुद्धच्या सर्व खटल्यांना तोंड देण्याचा निर्धार व्यक्त करताना मुशर्रफ यांनी परतल्यानंतर आपण राजकारणात सक्रिय सहभागी होणार असल्याचेही सांगितले. आपला जुना आजार उफाळून आला असून त्यात गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्यावर वैद्यकीय उपचारासाठी आपण परदेशात जात आहोत, असेही ते म्हणाले. कराचीहून पहाटे तीन वाजून ५५ मिनिटांनी (स्थानिक प्रमाणवेळ) त्यांनी दुबईला प्रयाण केले.
===================================
ब्रुसेल्स; पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार सलाह अब्देसलामला अटक
ब्रुसेल्स - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 13 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सलाह अब्देसलाम याच्यासह पाच जणांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. 

फ्रान्सच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेल्जियमचा राजधानी ब्रुसेल्सपासून जवळच असलेल्या मोलेनबीक भागात सलाह लपल्याची माहिती मिळाली होती. यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत त्याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. यावेळी गोळीबारही झाला. मात्र, यात कोणीही जखमी झालेले नाही. सलाहच्या हाताच्या ठशांवरून त्याला ओळखण्यात आले. 

पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी सहा ठिकाणी आत्मघाती हल्ले आणि बेछूट गोळीबार करत फ्रान्ससह संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. या घृणास्पद हल्ल्यामध्ये १२८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. दोनशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. ‘इसिस’ (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
===================================
भाजप सत्तेचा भुकेला - अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेश प्रमाणे उत्तराखंडमध्येही भाजपने घोडाबाजार सुरु केला आहे. यावरून भाजप सत्तेचा भुकेला असल्याचे दिसून येते, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसच्या नऊ आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले आहे. भाजपनेही राजकीय संधी साधत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार भगतसिंह कोशीयारी, उत्तराखंडचे भाजप प्रभारी श्‍याम जाजू आणि सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी मध्यरात्री राज्यपाल के. के. पौल यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. कॉंग्रेसमधील बंडखोर आमदारांना हाताशी धरून सरकार स्थापन करण्याचा भाजपचा इरादा आहे. 

यावर टीका करताना केजरीवाल म्हणाले की, भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, की त्यांचा पक्ष सर्वात मोठी भ्रष्टाचारी पक्ष आहे. अरुणाचलप्रमाणे उत्तराखंडमध्येही त्यांनी घोडाबाजार सुरु केला. सत्तेत असलेला देशद्रोही पक्ष सत्तेचा भुकेला असल्याचे दिसून येते. 
===================================
अटकेमुळे आम्ही आणखी एकत्र आलो-उमर
नवी दिल्ली - देशद्रोह प्रकरणातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना काही अटींवर न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर उमर खालिदने जेएनयूत रात्री भाषण केले. या भाषणात त्याने अटकेमुळे आम्ही आणखी एकत्र आले असून, कारागृहात जाण्याची लाज वाटत नसल्याचे म्हटले.

उमर आणि अनिर्बन यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्‍यावर अंतरित जामीन मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी 12 फेब्रुवारीला जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. तोही अंतरिम जामीनावर कारागृहाबाहेर आहे. जेएनयूमधील एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. उमर आणि अनिर्बान यांचे जेएनयूत आगमन होताच आझादी, लाल सलाम या घोषणांनी त्यांचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले.

उमर म्हणाला की, देशद्रोहाच्या आरोपाखाली कारागृहात गेल्याचा आम्हाला गर्व आहे, पश्चाताप नाही. आपला आवाज उठविल्याबद्दल आमच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याने आमचे नाव अरुंधती रॉय, विनायक सेन या कार्यकर्त्यांसोबत जोडले गेले. कारागृहात गेल्याचे मला लाज नाही. कारण, सत्तेत बसलेले गुन्हेगार आहेत. केंद्र सरकार आणि आरएसएस मिळून आमची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, या अटकेमुळे आम्ही वेगळे झालो नसून, आणखी जवळ आलो आहोत. प्रवीण तोगडीया आणि योगी आदित्यनाथ यांच्या सारख्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुभा आहे. 
===================================
केंद्र सरकारने मोडले मध्यमवर्गीयांचे कंबरडे
"पीपीएफ‘सह अनेक योजनांवरील व्याजदरात कपात 
नवी दिल्ली - छोट्या-छोट्या बचतीच्या माध्यमातून पैसे जमविणाऱ्या मध्यमवर्गीयांना केंद्र सरकारने शुक्रवारी मोठा धक्‍का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), तसेच किसान विकासपत्र यांसारख्या योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात केली आहे. 

पीपीएफवरील व्याजदर 8.7 टक्‍क्‍यांवरून 8.1 टक्‍क्‍यापर्यंत खाली आणण्यात आला आहे. किसान विकासपत्रावरीलही व्याजदर कमी करण्यात आले आहे. आतापर्यंत किसान विकासपत्रावर वार्षिक 8.7 टक्के व्याज देण्यात येत होते. आता त्यावर वार्षिक 7.8 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

त्याशिवाय सरकारने पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बचतपत्रावरील व्याजदरही कमी करून 8.1 टक्‍क्‍यांवर आणण्यात आले आहे. दोन वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 8.4 वरून 7.2 टक्के; तर टपाल कार्यालयातील 3 वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर 8.4 वरून 7.4 टक्‍क्‍यांवर आणले आहे. टपाल कार्यालयातील एक वर्ष कालावधीच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 8.4 टक्‍क्‍यांवरून 7.1 टक्के असे करण्यात आले आहे.
===================================
फ्रिज दुरुस्त करताना स्फोटात चार ठार
हट्टा (ता. वसमत, जि. हिंगोली) - गॅस वेल्डिंगच्या दुकानात फ्रिज दुरुस्ती करीत असताना कॉम्प्रेसरच्या स्फोटात चार जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. मृतांत एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. 

या गावातून जाणाऱ्या हिंगोली-परभणी रस्त्यावरील रहिमखान गुलाबखान पठाण (वय 30) यांच्या "जनता वेल्डिंग‘मध्ये ही घटना घडली. गॅरेज उघडल्यावर सकाळी रहिमखान यांनी फ्रिज दुरुस्ती हाती घेतली. त्या वेळी काही ग्राहक व ग्रामस्थ दुकानाशेजारी बसले होते. रहिमखान हे फ्रिजमधील तांब्याच्या तारेची चाचपणी करीत असताना गॅस असलेल्या कॉम्प्रेसरचा उष्णतेमुळे स्फोट झाला. स्फोटात रहिमखान गुलाबखान पठाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर अजिम रहिमखान पठाण (9), गुलाबखान जवाहरखान पठाण (62), शेख अतिक शेख इसाक (39) व तान्हाजी हरिभाऊ जाधव (27) हे दुकानापासून काही अंतरावर फेकले गेले. या चौघांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात नेत असताना अजिम रहिमखान पठाण, गुलाबखान पठाण, अतिक इसाक शेख यांचा वाटेतच मृत्यू झाला. तान्हाजी जाधव यांना नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
===================================
मुखेड; अस्मिता गँस एजन्सीच्या मनमानी कारभार गँस सिलेंडरचा साठा रस्त्यावर


" अस्मिता गँस एजन्सीच्या मनमानी कारभार गँस सिलेंडरचा साठा रस्त्यावर  ''
" मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण....? "
' भर उन्हाळ्यात गँस सिलेंडरचा साठा रस्त्यावर "
मुखेड :-
       शहरातील गँस एजन्सीचालकाच्या मनमानीमुळे भर उन्हाळ्यात गँसने भरलेले सिलेंडरांचा साठा भर नागरीवस्तीत ठेवण्यात येत आहे. याकडे संबंधित विभाग जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असुन जर उन्हाळ्यात उष्णतेमुळे दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहेत. याकडे संबंधित विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी स्टुडैट फेडरेशन आँफ इंडिया च्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देवुन करण्यात आली.
        मार्च महिण्याच्या सुरुवातीपासुन उन्हाचा पारा चढत आहे. अशा भर उन्हाळ्यात शहरातील अस्मिता गँस एजन्सी चालकाच्या मनमानीमुळे गँसने भरलेल्या सिलेंडरांचा साठा शहरातील ऊर्दू शाळा बालाजी मंदिर परिसर, शासकीय उपजिल्हा रुग्णालय समोर, अहिल्यादेवी होळकर स्मारक जवळ मोंढा, संभाजीराजे चौक सह अनेक रहिवासी वस्तीतील रस्त्यावर गँस सिलेंडरचा साठा ठेवत आहेत. उन्हाचा पारा दिवसेंन दिवस वाढत असुन जर भविष्यात उष्णतेमुळे दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण राहणार याची चर्चा होत आहे. संबंधित प्रशासनाने यावर कार्यवाही करावी अशी मागणी एस.एफ.आय. संघटनेच्या वतीने पोलिस निरिक्षक व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी तालुका अध्यक्ष विजय लोहबंदे, सचिव आकाश कलेपवार, रोहित नांदुरकर, क्रांती देव, गजानन देवकत्ते, नागेश देवके आदी उपस्थित होते.
===================================

No comments: