Monday, 21 March 2016

नमस्कार लाईव्ह २१-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानचं राष्ट्रगीत गाण्यात चूक, अमानत अलींचा माफीनामा 
२- लंडन; 'क्रिश'चा शेकडो तरुणींना 'किस' अन् लाखोंची कमाई 
३- हवाना; अमेरिकेचे अध्यक्ष 88 वर्षांनंतर क्युबा दौऱ्यावर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- आरक्षण हा दलितांचा अधिकार - मोदी  
५- प्रगती खुपल्याने विरोधकांकडून खुसपटे-मोदी 
६- 'मोदी ही देवाकडून भारताला मिळालेली भेट, गरिबांसाठी मसिहा' - नायडू 
७- इम्रान खान यांचं निमंत्रण केजरीवालांनी स्वीकारलं 
८- भारत हा फक्त हिंदी, हिंदू, हिंदूस्तान नाही-थरुर 
९- 'अनिवार्य झाल्यास भारत माता की म्हणणार नाही'- भाई वैद्य 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- विदर्भच नव्हे, मराठवाडाही वेगळा करा : अणे 
११- श्रीहरी अणेेंची हकालपट्टी करा, विरोधकांसह शिवसेनेची मागणी 
१२- 5 वर्षात मुंबईत रस्ते अपघातात 2500 लोकांचा मृत्यू 
१३- चंदिगढ; पंजाबमध्ये शिवसेना युवा शाखा अध्यक्षावर गोळीबार 
१४- 'महावितरण'च्या मीटरमध्ये 'महाघोळ'! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- सोलापुरात वाहनाने 25 जणांना चिरडलं, चौघांचा मृत्यू 
१६- देवनार कचरा डेपोतील आग अजूनही धुमसतीच 
१७- घाटकोपर; कारमध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा गुदमरुन मृत्यू 
१८- सोलापूर; 300 मुस्लिम मुलांना मागे टाकत अजान पठणात सतीश अव्वल 
१९- जत; लमाणतांड्यात हापसा दोन किलोमीटरवर 
२०- अंबड; अपंगत्वावर मात करीत परिस्थितीशी संघर्ष 
२१- भोसरी; वडिलांची इच्छा केली पूर्ण-न्यायाधीश शीतल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- हॅप्पी बर्थडे ट्विटर, 10व्या वर्षाच्या खूप शुभेच्छा 
२३- विराटच्या जबराट खेळीनंतर अनुष्काचा आश्चर्यकारक रिप्लाय  
२४- पॅरीस; मल्लिका शेरावत प्रेमात पडली! लवकरच लग्नाच्या बेडीत? 
२५- म्हणूनच विराट जगावेगळा - धोनी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२६- बैतुल उलुम शाळेच्या प्रांगणात महिलेची छेड 
२७- जलसाक्षरतेसाठी शहरात रॅली 
२८- बिलोली ग्रामीण रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे; रुग्णांना परिणामकारक सेवांची अपेक्षा 
२९- शेततळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी 
३०- हदगाव; चालाकविना ट्रक धावला; पानटपरी चालक ठार 
३१- १ मेपर्यंत नांदेड येथे महसूल आयुक्तालय सुरु करा - आ. सावंत 
३२- खाटकाच्या ताब्यातून गायीची सुटका; कंधारमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 
३३- कर सल्लागार संघटना नांदेडची नव निर्वाचित कार्यकारणी निवड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेच नाही, असं काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला शंभर वर्ष लक्षात ठेवतील 
[समृद्धी जोशी]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
केदार साळुंके, राजेश वाकोडे, प्रशांत वाढेकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


=========================================

श्रीहरी अणेेंची हकालपट्टी करा, विरोधकांसह शिवसेनेची मागणी

श्रीहरी अणेेंची हकालपट्टी करा, विरोधकांसह शिवसेनेची मागणी
मुंबई: राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भानंतर आता स्वतंत्र मराठवाड्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे साहजिकच त्याचे पडसाद विधानसभेद उमटले आहेत.

सत्ताधारी शिवसेना श्रीहरी अणेंविरोधात हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहेत. तर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने अणेंची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

अणे यांनी आधी स्वतंत्र विदर्भाची भूमिका मांडली, त्यानंतर आता मराठवाडाही महाराष्ट्रापासून तोडा असं म्हणत आहेत, त्यामुळे हा संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अपमान आहे, असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.

तर वारंवार महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या अणेंना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा सरकारचीच अणेंना साथ आहे, असं म्हणावं लागले, असं राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
=========================================

सोलापुरात वाहनाने 25 जणांना चिरडलं, चौघांचा मृत्यू

सोलापुरात वाहनाने 25 जणांना चिरडलं, चौघांचा मृत्यू
सोलापूर :  मोहोळ-सोलापूर रस्त्यावर एका वाहनाने 25 जणांना चिरडलं. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. आज पहाटे 5.20 च्या सुमारास ही घटना घडली.

मृत्युमुखी पडलेले सर्व जण हे वडाळा गावचे राहिवासी होती. रामायणानिमित्त काही दिवस वनवासात जाऊन राहण्याची परंपरा सोलापुरातील काही गावात आहे. त्यानिमित्तांने हे नागरिक वनवासात निघाले होते.

मात्र रस्त्यावरुन जाणाऱ्या या दिंडीला एका वाहनाने चिरडलं. भाऊ जाधव, दत्ता शेंडगे, विलास साठे आणि जिजाबाई गाडे या चौघांचा अपघातात मृत्यू झाला.

दरम्यान, वाहन कोणतं होतं आणि चालकाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ग्रामीण पोलिसांचं एक पथक सध्या घटनास्थळावर दाखल असून पसार चालकाचा शोध सुरु आहे.
=========================================

विदर्भच नव्हे, मराठवाडाही वेगळा करा : अणे

विदर्भच नव्हे, मराठवाडाही वेगळा करा : अणे
जालना: आतापर्यंत वेगळ्या विदर्भाची भाषा करणारे राज्याचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांना आता मराठवाडादेखील महाराष्ट्रापासून वेगळा करायचा आहे. कारण, विदर्भापेक्षा मराठवाड्यावर जास्त अन्याय झाला असून वेगळ्या मराठवाड्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असं अणे यांनी म्हटलं आहे.

त्यामुळं श्रीहरी अणेंना महाराष्ट्राचे नेमके किती तुकडे करायचेत असा संतप्त सवाल विचारला जातोय.

जालनामध्ये मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीनं आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. त्या कार्यक्रमात बोलताना अणे यांनी वेगळ्या मराठवाड्या संदर्भात भाष्य केलं.

विदर्भापेक्षा मराठवाड्यावर जास्त अन्याय झाला असून वेगळ्या मराठवाड्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असं अणे म्हटलं. यावेळी बोलताना अणेंनी फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला. सध्याचं सरकार वेगळा विदर्भ स्थापन करेल की नाही याबाबत शंकाच आहे, असं अणे म्हणाले.
=========================================

5 वर्षात मुंबईत रस्ते अपघातात 2500 लोकांचा मृत्यू

5 वर्षात मुंबईत रस्ते अपघातात 2500 लोकांचा मृत्यू
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात गेल्या काही वर्षात रस्ते अपघातांमध्ये बळी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून आली आहे. गेल्या 5 वर्षात मुंबईच्या विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात अडीच हजार लोकं मृत्यूमुखी पावली असून 22 हजाराहून अधिक लोकं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानूसार मुंबईतल्या गेल्या 5 वर्षातली ही आकडेवाडी समोर आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेत एकट्या मुंबई 37 टक्के अपघात होत असल्याची माहिती आहे. 2015 झाली या अपघाताच्या संख्येत तब्बल 3.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सहाजिकपणे या अपघातात मृत्यूमुखी पावणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी रस्त्यावरुन चालण्यासाठी मुंबई खरच सुरक्षित आहे का? असा सवाल आता विचारण्यात येतो आहे.
=========================================

हॅप्पी बर्थडे ट्विटर, 10व्या वर्षाच्या खूप शुभेच्छा

हॅप्पी बर्थडे ट्विटर, 10व्या वर्षाच्या खूप शुभेच्छा!
मुंबई: जगातील सगळ्यात प्रसिद्ध मेसेजिंग वेबसाईट Twitterचा आज दहावा वाढदिवस आहे. लाँचिंगपासून ते आजवर या दशकभरात ट्विटरमध्ये बरेच बदल झाले. आज ट्विटरचा एवढा बोलबाला आहे की, जगभरातील अनेक सेलिब्रेटी याचा वापर करतात.

आज प्रत्येक इंटरनेट यूजर आपली मतं ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर मांडतो आहे. ट्विटरला आज दहा वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त जाणून घेऊयात ट्विटरबाबत काही खास गोष्टी.

ट्विटरचा इतिहास:

ट्विटर 21 मार्च 2006ला सुरु करण्यात आलं. ट्विटरवर सर्वात पहिलं ट्विट सहसंस्थापक जैक डॉर्सीनं केलं होतं. ‘जस्ट सिटिंग अप माय ट्विटर’ असं ते ट्विट होतं. ही कंपनी बिज स्टोन, ईवेन विलियम्स आणि जैक डॉर्सीनी अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात सुरु केली. आज ट्विटरवर दिवसभरात 50 कोटी ट्विट केले जातात. तर दरवर्षी 20 अब्ज ट्विट केले जातात.

ट्विटरचा यूजर बेस:

ट्विटरनं दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यात 30 कोटी 20 लाख यूजर्स अॅक्टिव्ह झाले आहेत.
=========================================

देवनार कचरा डेपोतील आग अजूनही धुमसतीच

देवनार कचरा डेपोतील आग अजूनही धुमसतीच
मुंबई : मुंबईच्या देवनार कचरा डेपोत लागलेली आग अजूनही धुमसत आहे. अग्निशमन दलाचे जवान दहा गाड्या आणि पाण्याच्या 8 टँन्कर्सच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. देवनार कचरा डेपोला रविवारी दुपारी आग लागली होती.

पहाटे चारच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचं अग्निशमन दलाने सांगितलं असलं तरी कचऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्या अद्यापही आग धुमसत असल्याचं वृत्त आहे.

या आगीमुळे पुन्हा एकदा परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे. आगीतून निघणाऱ्या विषारी धुराने स्थानिकांना श्वसनाचे विकार होत आहेत.

महिनाभरापूर्वी याच कचरा डेपोला मोठी आग लागली होती. महापालिका प्रशासनावर या आगीचा संशय आहे. त्यातच पुन्हा देवनार कचरा डेपोला आग लागल्याने सरकार या प्रकरणी काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
=========================================

इम्रान खान यांचं निमंत्रण केजरीवालांनी स्वीकारलं

इम्रान खान यांचं निमंत्रण केजरीवालांनी स्वीकारलं?
नवी दिल्ली: ‘पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ’ पक्षाचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल रात्री ही भेट झाली.

दोन्ही नेते आपपल्या देशात राजकीय पक्षांची धुरा सांभाळत आहेत. त्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाली.

“दोन्ही देश एकाचवेळी स्वतंत्र झाले. दिल्लीत केजरीवाल यांना काय अनुभव येत आहेत, याबाबत चर्चा केली. आमचे अनुभव मिळते-जुळते आहेत”, असं इम्रान खान यांनी भेटीनंतर सांगितलं.

याशिवाय इम्रान खान यांच्या पक्षाचं वर्चस्व असलेल्या पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांताला भेट देण्याचं आमंत्रण केजरीवालांना दिल्याचंही त्य़ांनी यावेळी सांगितलं. तसंच हे आमंत्रण केजरीवालांनी स्वीकारल्याचंही इम्रान यांनी सांगितलं.
=========================================

'मोदी ही देवाकडून भारताला मिळालेली भेट, गरिबांसाठी मसिहा'

'मोदी ही देवाकडून भारताला मिळालेली भेट, गरिबांसाठी मसिहा'
नवी दिल्ली: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मोदींवर स्तुतीसुमनं उधळण्यासाठीच आयोजित केली होती का? सध्या अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. कारण ‘नरेंद्र मोदी ही देवाकडून भारताला मिळालेली भेट आहे. मोदी हे गरिबांसाठी मसिहा आहेत.’ अशा शब्दात व्यंकय्या नायडूंनी मोदींची स्तुती केली.

भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठिकीच्या अखेरच्या दिवशी मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. विरोधकांच्या डावपेचामुळं भरकटू नका असं मोदी म्हणाले.

दरम्यान, भाजप नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता राहिला आहे. मात्र, राष्ट्रवादाशी तडजोड आम्ही कधीही खपवून घेणार नाही. अशी भूमिका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडली.
=========================================

विराटच्या जबराट खेळीनंतर अनुष्काचा आश्चर्यकारक रिप्लाय 

भारत- पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यात डॅशिंग विराट कोहलीने धडाकेबाज नाबाद 58 धावांची खेळी केली. केवळ भारताचेच नव्हे, पाकिस्तानचेच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी विराटवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
विराटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना, त्याची माजी प्रेयसी अनुष्का शर्माही मागे राहिलेली नाही. अनुष्कानेही आश्चर्यकारकरित्या विराटचं अभिनंदन केलं आहे.
अनुष्काने विराटला मेसेज करून त्याचं कौतुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
=========================================

पाकिस्तानचं राष्ट्रगीत गाण्यात चूक, अमानत अलींचा माफीनामा

पाकिस्तानचं राष्ट्रगीत गाण्यात चूक, अमानत अलींचा माफीनामा
इस्लामाबाद/कोलकाता : प्रसिद्ध पाकिस्तानी गायक शफकत अमानत अली यांनी भारत-पाकिस्तान सामन्याआधी पाकिस्तानचं राष्ट्रगीत गाताना झालेल्या चुकीबाबत माफी मागितली आहे.

ट्वेन्टी20 विश्वचषकात शनिवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही देशांचं राष्ट्रगीत झालं. यावेळी पाकिस्तानतर्फे शफकत अली यांनी राष्ट्रगीत गायलं तर भारताचं राष्ट्रगीत महानायक अमिताभ यांनी गायलं.

मात्र पाकिस्तानी चाहते शफकत अली यांच्यावर प्रचंड नाराज झाले. शफकत अली राष्ट्रगीत गाताना असं वाटलं की ते काही शब्द विसरले आहेत. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर शफकत यांच्यावर रोष व्यक्त केला.

“शफकत अलींना भारतात इतकं प्रेम मिळालं की, ते पाकिस्तानचं राष्ट्रगीतच विसरले,” असं एका ट्विपलने म्हटलं आहे. तर एका युझरने लिहिलं आहे की, “शफकत अमानत अली, एका फरफेक्ट पराभवासाठी फरफेक्ट सुरुवात.” तसंच शफकत अली यांनी अतिशय वाईट परफॉर्म केलं, यापेक्षा त्यांनी खुमारियांच गायलं असतं,” असं एका ट्विटराईटने त्याच्या हॅण्डलवर लिहिलं आहे.
=========================================

कारमध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा गुदमरुन मृत्यू

कारमध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा गुदमरुन मृत्यू
मुंबई : कारमध्ये श्वास गुदमरुन एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. कार लॉक झाल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. मुंबईतील घाटकोपर परिसरात ही घटना घडली आहे.

क्राईम ब्रान्चने काही दिवसांपूर्वी 15 गाड्यांवर कारवाई केली होती. या गाड्यांची पार्किंगची अडचणी असल्याने दामोदर पार्कमध्ये या गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. रविवारी दुपारी हा मुलगा खेळता खेळता गाडीमध्ये गेला आणि गाडी बाहेरुन अचानक लॉक झाली. त्यामुळे मुलाचा गुदमरुन मृत्यू झाला.

मृत चिमुकला हा दामोदर पार्क परिसरातीलच राहणारा होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
=========================================

पंजाबमध्ये शिवसेना युवा शाखा अध्यक्षावर गोळीबार

पंजाबमध्ये शिवसेना युवा शाखा अध्यक्षावर गोळीबार
चंदीगढ : पंजाबच्या कपूरथला जिल्ह्याच्या शिवसेना युवा शाखा अध्यक्षावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात सुमित भंडारी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रस्त्यावर झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

पक्षाचे प्रवक्ते विपीन शर्मा यांच्या माहितीनुसार, युवा शाखेचे जिल्हा अध्यक्ष सुमित भंडारी त्यांचं दुकान बंद करुन निघाले होते. त्याचवेळी एका कारने भंडारींच्या कारला धडक झाली. यानंतर भंडारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन जणांनी कारचा पाठलाग केलं. पण त्या कारमधी इसमाने भंडारींच्या कारच्या दिशेने गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी सुमित भंडारींच्या जांघेत लागली.

यानंतर आरोपीला पकडण्यात आलं आहे, त्याचं नाव राजकुमार बस्सी असल्याचं कळतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जालंधकरचा रहिवासी आहे. मात्र गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, फगवाडाचे पोलिस अधीक्षक अश्वनी कुमार यांनी सांगितलं.
=========================================

300 मुस्लिम मुलांना मागे टाकत अजान पठणात सतीश अव्वल

300 मुस्लिम मुलांना मागे टाकत अजान पठणात सतीश अव्वल !
सोलापूर: सतीश अशोक घोडके… चौथीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यानं अजान पठणामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. ते ही 300 मुस्लीम मुलांना मागे टाकून. त्यामुळं असहिष्णुतेच्या नावानं ओरडणाऱ्यांना सतीशने चांगलीच चपराक लावली आहे.

सतीशने दिलेली मन प्रसन्न करणारी अजान पाहून एखाद्या पट्टीच्या मुसलमानानं ही दिली असं प्रत्येकाला वाटू शकतं. या मुलाचं नाव अहमद किंवा अब्दुल असेल असं तुम्हाला वाटत असेल, तरी तुम्ही चुकताय.. कारण वाणी आणि पेहराव्यावरून जातीची लेबलं लावायची सवय आपल्याला लागली आहे, त्याला कोण काय करणार?

सोलापूरच्या होटगी गावात अजान देणारा हा मुलगा एका हिंदूच्या पोटी जन्माला आला आहे. त्याचं नाव सतीश घोडके.

सोलापूर सोशल असोसिएशन आणि जमाते उलेमा ए हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने ६ मार्च रोजी अजान स्पर्धा आयोजित केली होती. सतीशने स्वखुशीने या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही दिवस सराव केला. स्पर्धेत भाग घेण्याअगोदर अजान म्हणजे काय हे सतीशला माहीतही नव्हत. पण स्पर्धेत मात्र सतीशने सर्वांना मागे टाकून बाजी मारली. त्याच्या आवडीमुळे पालकांनी सुद्धा त्याला स्पर्धेत भाग घ्यायला परवानगी दिली.

रोज कानावर पडणारी अजान सतीशला खुणावत होती… त्यानं भाग घेतला… आणि पठ्ठ्याने 300 मुसलमान पोरांना मागे टाकत एक हिंदू मुलगा पहिला आला.

चोख पाठांतर… स्पष्ट उच्चार… आणि गळ्यातला गोडवा… सतीशच्या अजानमुळे सगळेच भारावले होते.
=========================================

मल्लिका शेरावत प्रेमात पडली! लवकरच लग्नाच्या बेडीत?

मल्लिका शेरावत प्रेमात पडली! लवकरच लग्नाच्या बेडीत?
पॅरिस: बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड आणि सेक्सी अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. पॅरिसमधील एका व्यापाऱ्यासोबत मल्लिका प्रेमात असल्याचं समजतं आहे.

मल्लिका सध्या पॅरिसमधील एक रिअल इस्टेट बिझनेसमन साइरिल ऑक्जेनफेंस याच्यासोबत डेटिंग करीत आहे. मल्लिकानं स्वत: हा फोटो सोशल साइटवर अपलोड केला आहे. एका मित्राच्या ओळखीनं तिची साइरिलशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं.

mallika 1

बॉलिवूडची ही हॉट नायिका मागील अनेक वर्षापासून परदेशातच राहत आहे. मल्लिकानं ज्याप्रमाणे आपल्या प्रेमाचा स्वीकार केला आहे त्यावरुन ती लवकरच लग्नाचा बेडीत अडकेल असं वाटतं. सध्या मल्लिका साइरिलसोबत पॅरिसमध्येच राहत आहे.
=========================================

'क्रिश'चा शेकडो तरुणींना 'किस' अन् लाखोंची कमाई

'क्रिश'चा शेकडो तरुणींना 'किस' अन् लाखोंची कमाई
फोटो सौजन्य: यूट्यूब
लंडन: एखाद्या सिनेस्टारनं आपल्या संपूर्ण आयुष्यात जितक्यांदा किस केलं नसेल तितक्यांदा या एका सामान्य मुलानं किस केलं आहे. इतकंच नव्हे तर, यासोबत त्यानं लाखो डॉलरची कमाईही केली आहे.

क्रिश हा एक ‘प्रँकस्टार’ आहे. तो पॉर्नस्टार नसून प्रँकस्टार आहे. आजवर त्याने अनेक मुलींना किस करुन लाखोंची कमाई केली आहे.

प्रँकस्टार म्हणजे लोकांना वेडं बनवून त्याचं शूटींग करुन ते यू-ट्यूबवर अपलोड करणं. कारण की, हे व्हिडिओ पाहून लोकांनी हसावं आणि आपल्या त्रस्त आयुष्यातून जरा निवांत व्हावं. क्रिश असंच काहीसं करतो. तो लोकांसोबत मजा-मस्ती करतो आणि तेच यू-ट्यूबवर अपलोड करतो.

याचप्रमाणे ‘क्रिश’ची किसची कहाणीही तितकीच भन्नाट आहे. त्याने एका दिवसात शेकडो मुलींना किस केलं आहे. यामध्ये प्रत्येक देशातील मुलगी आहे. आपण प्रँकस्टार असल्याचं त्यानं आधीच सगळ्यांना सांगितलं असून प्रत्येक किसचं त्यानं व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड केलं आहे. यामधूनच तो लाखोंची कमाई करतो.

क्रिश सध्या आपल्या किसमुळं जगभरात प्रसिद्ध झाला आहे. तो एखादा बॉडीबिल्डर नाही किंवा अभिनेता नाही. मात्र, तरीही अनेकजणी आजही त्याच्यावरुन जीव ओवाळून टाकतात.
=========================================
आरक्षण हा दलितांचा अधिकार - मोदी 

नवी दिल्ली - आरक्षण हा दलित, आदिवासी आणि वंचित समाजाचा अधिकार आहे. तो हिरावून घेण्याचा अधिकार कोणाला नाही. आमचे सरकार दलित विरोधी नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मेमोरियलच्या शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदींनी डॉ. आंबेडकर मेमोरियलवर आपली मते व्यक्त केली. 

मोदी म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांचे मसिहा म्हणून मर्यादित ठेवू नका. त्यांना भारताच्या सीमांमध्ये बांधून ठेवणे योग्य नाही. ते प्रत्येक समाजाचे नेते आणि प्रत्येक पीडित व्यक्तीचे आवाज आहेत. सरदार पटेल यांनी राजकीय एकीकरणाचे काम केले. तसेच समाजाला एकत्र करण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. दलितांना आरक्षणाचा अधिकार आहे. एका समाजाला दुर्बल करून देशाचा विकास साधताच येणार नाही. आम्ही सतत आल्यापासून चुकीचे संदेश पसरविले जात आहेत. आंबेडकरांचे राष्ट्रीय मेमोरियल शिलान्यास कार्यक्रमात बोलण्याचे भाग्य मला मिळाले आहे. या मेमोरियलसाठी 60 वर्षे वाट पहावी लागली. अटलबिहारी वाजपेयींनी या मेमोरियल पुढे आणले. पण, त्यानंतर पुढील सरकारच्या काळात आंबेडकर त्यांच्या हृदयात राहिले नाही. मी खात्री देतो, की 14 एप्रिल 2018 मध्ये या स्मारकाचे उद्घाटन माझ्याच हस्ते होईल.‘‘

बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मला आहे. बाबासाहेब हे विश्व मानव असून, जग मार्टिन ल्युथर किंग आणि बाबासाहेबांकडे एकाच दृष्टीने बघते, असे मोदी यांनी सांगितले.
=========================================
लमाणतांड्यात हापसा दोन किलोमीटरवर
जत - लमाणतांडा (दरीबडची) पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली, की मुलांना सांभाळण्याचं काम वृद्धांना करावं लागतं. दुसऱ्या छायाचित्रात गावाशेजारी तासभर चालणाऱ्या बोअरवर अख्खं गावच पाण्यासाठी आटापिटा करतं.

आमदारांकडून दत्तक गाव - खंडनाळला ग्रामसेवक येतच नाही

जत - लमाणतांडा (दरीबडची) हे नावही तसं कुणी फारसं ऐकलेलं नसतं...पण तालुक्‍यातील एका छोट्याशा ठिपक्‍यावर दुष्काळानं काळवंडलेला चेहरा घेऊन ते अस्तित्व दाखवून उभं देतं. घोटभर पाण्यासाठी धावाधाव करणारं. बाळंतीण असलेली मौजाबाईची सून हंडा भांडी घेऊन घोटभर पाण्यासाठी धावत होती. पाणी मिळाल्यावर घरातील चूल जागी होणार होती. अन्न शिजणार होतं. ती धावत असतानाच पोटचा गोळा भुकेच्या आकांतान रडत होता, पण पाण्यासाठी तिचा पाय थांबत नव्हता.

आमदारांनी दत्तक घेतलेलं गाव पाहावं म्हणून प्रवेश केला. उपसरपंच प्रकाश राठोड यांनी घागर घेऊन स्वागत केलं. तेच दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हापशावरून पाणी आणण्यास जात होते. गावाशेजारीच संतोष राठोड यांनी बोअर सुरू केल्याची आरोळी आली. अन्‌ सुरू झाली धावाधाव. गल्लीबोळातून चार-पाच घागरी घेतलेले हात नाचू लागले. पाय धावू लागले. पळणाऱ्या मुली, महिला, सायकलीवर घागरीचा सांगाडा घेऊन मुलं, तरुण धावत होते. बोअरवर खच्चाखच्च  गर्दी. प्रत्येकाची धडपड पाण्यासाठी. संतोष राठोड यांची दहा एकर शेती. आठशे दहा फूट खोल गेल्यावर होलाला एक इंच पाणी लागलं. पीक जाळून गावची तहान भागवण्याचं पुण्याचं काम ते करीत होते. दिवसातून एक तास बोअर पाणी टाकतं. तेवढ्या वेळेत पाणी भरण्यासाठी गाव पळत येतं.
=========================================
भारत हा फक्त हिंदी, हिंदू, हिंदूस्तान नाही-थरुर

नवी दिल्ली - भारत हा फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदूस्तान पुरता मर्यादित नाही. भारत हा कृष्ण आणि कन्हैया कुमार यांचाही आहे. भारतात  प्रत्येक नागरिकाला भविष्यात समान अधिकार मिळायला हवा, असे वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केले आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) रविवारी सायंकाळी शशी थरुर यांनी भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारची प्रशंसा केली. 

थरुर म्हणाले की, भारत माता की जय असे म्हणण्यावर आजकाल एखाद्याची राष्ट्रभक्ती ठरविण्यात येत आहे. लोकशाहीत नागरिकांना जे योग्य आहे ते स्वीकारण्याचा अधिकार आहे. तर, दुसऱ्यांचे विचार स्वतःवर थोपवून घेण्याचा नाही. भारत माता की जय म्हणण्यात मला आनंद आहे. पण, यासाठी बळजबरी करण्याचा अधिकार आपल्याला आहे का? जेएनयूत देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला कन्हैया कुमार आजच्या काळातील भगतसिंह आहे. भारत माती की जय न म्हटल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार वारिस पठाण यांना निलंबित करणे चुकीचे आहे.
=========================================
अमेरिकेचे अध्यक्ष 88 वर्षांनंतर क्युबा दौऱ्यावर
हवाना - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा रविवारी रात्री दोन दिवसीय ऐतिहासिक क्युबा देशाच्या दौऱ्यावर पोहचले. अमेरिकेच्या अध्यक्षाने तब्बल 88 वर्षांनंतर क्युबाचा दौरा केला आहे.

क्युबामध्ये 1959 मध्ये झालेल्या क्रांतिनंतर अमेरिका आणि क्युबामधील संबंध पूर्णपणे संपुष्टात आले होते. क्युबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी डिसेंबर 2014 मध्ये जुनै वैर सोडून पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी ओबामांशी बोलणे केले होते. अखेर ओबामा हे आपल्या कुटुंबियांसह क्युबा दौऱ्यावर पोहचले आहेत. अमेरिकेने नुकताच क्युबामध्ये आपला दुतावासही सुरु केला होता. 

ओबामा यांच्या दौऱ्याला विरोध करत 200 मानवधिकार कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पोलिसांनी तत्काळ निदर्शकांना ताब्यात घेतले. ओबामांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हवाना शहरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ओबामांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान दूरसंचार, हवाई संपर्क आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर काही करार होण्याची शक्यता आहे. 
=========================================
म्हणूनच विराट जगावेगळा - धोनी
सर्वोत्तम कामगिरी करण्याबरोबरच आव्हान स्वीकारण्याची क्षमता अफलातून

कोलकता - सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करत राहण्याची भूक आणि कोणतेही आव्हान स्वीकारण्याची क्षमता या गुणांमुळे विराट कोहली जगावेगळा आहे, अशी स्तुती टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या विराटवर भरभरून कौतुकांचा वर्षाव केला.

ट्‌वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत ईडन गार्डनवर झालेल्या ऐतिहासिक सामन्यात ११९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली. विराट प्रत्येक गोष्ट आव्हान म्हणून स्वीकारतो, प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तो आसूसलेला असतो आणि म्हणूनच त्याची तयारीही पराकोटीची असते, त्यासाठी तो तंदुरुस्तीही तेवढीच अव्वल दर्जाची ठेवतो, असे धोनी म्हणाला.

वेगवेगळ्या खेळपट्यांवर कशी फलंदाजी करायची, हे तो अचूकपणे जाणतो, त्याचा जम बसतो तेव्हा तो त्या डावाची मोठ्या खेळीत रूपांतर करणार याची खात्री आम्हाला असते. एखाद्या तरुण खेळाडूमध्ये असलेली ही सर्वांत मोठी गुणवत्ता आहे, असे धोनीने सांगितले.

धोनी पुढे म्हणाला, जेव्हा तुमच्या बॅटमधून धावा होत असतात, तेव्हा त्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. प्रत्येकावर बॅडपॅचची वेळ येत असते; परंतु हा कठीण काळ फार मोठा राहणार नाही, यासाठी प्रयत्न करायला हवे, म्हणूनच संधी असते तेव्हा धावांचा रतिब घालायचा असतो.
जगावेगळी क्षमता असलेल्या विराटमध्ये स्ट्राइक रोटेट करण्याचीही गुणवत्ता आहे, त्यामुळे त्याच्या डावाची उभारणी होण्यास मदत होते. दडपणाचा सामना करता करता तुम्ही स्ट्राइक बदलत राहिल्यामुळे दडपण कधी कमी होते, हे समजत नाही, काही वेळा दडपणातून मार्ग काढण्यासाठी आक्रमक फटका मारला जातो, परंतु माझ्यामते स्ट्राइक बदलत राहणे, हा उत्तम मार्ग आहे. कारण, असे केल्यामुळे तुमची एकाग्रताही कायम राहते आणि सकारात्मकताही सक्षम राहते, असे भारतीय कर्णधाराचे म्हणणे आहे. केवळ टायमिंग आणि फटक्‍यातील ताकदच नव्हे, तर धावा पळण्याच्या तंत्रामध्येही विराट श्रेष्ठ असल्याचे धोनी म्हणतो.
=========================================
अपंगत्वावर मात करीत परिस्थितीशी संघर्ष
जगन्नाथ ढेरे यांची हॉटेलवर काम करून उपजीविका

अंबड - अंबड शहरातील माळी गल्लीत राहणारा एका पायाने अपंग असलेला युवक जगन्नाथ नवनाथ ढेरे (वय ३५) याने परिस्थितीसमोर न झुकता संघर्ष सुरू केला आहे. हॉटेलात काम करून तो आई-वडिलांसह कुटुंबीयांचा सांभाळ करत आहे.

बालपणापासून जगन्नाथला अपंगत्व आले. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आपले कसेबसे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अपंग असूनही कुठेही हक्काची नोकरी मिळालीच नाही. अशा हलाखीच्या परिस्थितीमध्येही जगन्नाथने हिंमत सोडली नाही. जीवनात जगण्यासाठी संघर्ष केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. हे जगन्नाथच्या मनाला पटले होते. त्यामुळे न डगमगता हॉटेलात कामे सुरू केली. आईवडिलांची जबाबदारीही त्याने स्वीकारली. यथावकाश विवाह झाल्यावर साऱ्या कुटुंबीयांसाठी तो हसतमुखाने कष्ट घेत आहे. येथील उजव्या पायाने ६८ टक्के अपंग असूनही जगन्नाथ नवनाथ ढेरे हा आजतागायत शासकीय योजनेपासून कोसोमैल दूर आहे. जगन्नाथ हा भूमिहीन आहे. उत्पन्नाचे त्याच्याकडे दुसरे कोणतेही साधन नाही. राहण्यासाठी छोटेसे पत्र्याचे घर आहे. त्यातच त्याचा परिवार राहत आहे. सेवा योजना कार्यालयात नावनोंदणी करूनही आजतागायत त्याला नोकरीसाठी कॉल आलेला नाही.
=========================================
'महावितरण'च्या मीटरमध्ये 'महाघोळ'!
मुंबई - देशातील सर्वांत मोठी वीज वितरण कंपनी असणाऱ्या "महावितरण‘मध्ये मीटरचा "महाघोळ‘ उघडकीस आला आहे. मीटरचा पुरवठा करणाऱ्या रोलेक्‍स कंपनीकडून स्वस्त मीटर खरेदी करण्याचा नादात खरेदीतील आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा फटका महावितरणला लागला आहे. 

रोलेक्‍स कंपनीकडून खरेदी करण्यात आलेले अनेक मीटर बंद आहेत, तर काही हळू असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर लक्षात येताच महावितरणच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. मुंबई, पुणे आणि कल्याण झोनमध्ये सुमारे आठ लाखांहून अधिक मीटर रोलेक्‍स मीटर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून कंपनीकडून बसवण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत दोन लाख मीटर सदोष असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. अजूनही अशा हळू चालणाऱ्या मीटरचा शोध घेण्याचे काम महावितरणने सुरूच ठेवले आहे. हळू मीटरमुळे युनिटचे होणारे नुकसानही "रोलेक्‍स‘कडून भरून घेण्याची तयारी महावितरणने सुरू केली आहे. 

मीटरचा घोळ काय? 
रोलेक्‍सच्या मीटरमध्ये ठराविक कालवधी आणि युनिटच्या नोंदीनंतर मीटर हळू होत असल्याचे प्रामुख्याने निदर्शनास आले आहे. तिन्ही परिमंडळात 2014 मध्ये बसवण्यात आलेल्या मीटरमध्ये आता वर्षानंतर दोष असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळेच सद्यःस्थितीला ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचे निवारण व मीटर तपासणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. 
=========================================
प्रगती खुपल्याने विरोधकांकडून खुसपटे-मोदी
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारची प्रगती डोळ्यांत खुपणाऱ्या विरोधी पक्षांनी कितीही खुसपटे काढली तरी त्यांच्या सापळ्यात न अडकता भाजप कार्यकर्त्यांनी "विकास‘ या अभेद्य मूलमंत्राची कास धरून सरकारचे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम गावपातळीपर्यंत जास्तीत जास्त पोचवावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. 

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप करताना मोदी यांनी भाजपने फक्त "आपला स्वतःचा अजेंडा‘ घेऊनच पुढे जावे, असे स्पष्ट केले. या बैठकीच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांना पूर्ण बंदी असल्याने गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मोदींच्या भाषणाचा गोषवारा सांगितला. 

राष्ट्रवाद हीच आमची खरी ताकद असून, त्यावरच आम्ही पुढे जाऊ, असे सांगतानाच, राममंदिर, समान नागरी कायदा, कलम 370 आदी विषय "राष्ट्रवाद‘ या व्याख्येत येतात काय, याबद्दल मोदी व नंतर राजनाथसिंह यांनीही मौन बाळगले. गेल्या 22 महिन्यांत आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप करता न आल्याने विरोधक हताश व निराश आहेत, असा टोला त्यांनी कॉंग्रेसला लगावला. 

भाजप नेत्यांनी स्वच्छ भारत, बेटी बचाव... व पंतप्रधान कृषी विमा योजनेसारख्या विविध योजना, विशेषतः यंदाचा अर्थसंकल्प गावपातळीपर्यंत पोचवावा, असे सांगताना मोदींनी प्रमुख विरोधी पक्षाच्या तुलनेत भाजप नेते गरीब व शेतकऱ्यांसह तळागाळापर्यंत अजूनही पोचत नाहीत, याचीही अप्रत्यक्ष कबुली दिली. भाजप कार्यकर्त्यांना रचनात्मक कामाद्वारे राष्ट्रनिर्माण करण्याच्या हेतूने प्रशिक्षित करावे, अशी सूचना मोदी यांनी पक्षसंघटनेला केली. विरोधकांनी निर्माण केलेल्या बाष्कळ वादांत कार्यकर्त्यांनी अडकू नये व विकास व अंत्योदय हेच आपले अंतिम लक्ष्य असल्याचे ध्यानात ठेवावे, असे मोदी यांनी वारंवार सांगितले. महात्मा गांधींना वाढता जनाधार का मिळाला, याचे विवेचन करतानाच मोदींनी, किमान 2017 पर्यंत भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरच पक्षाला फोकस कसा ठेवायचा आहे, याचाही संदेश दिला. 

देशातील सर्व म्हणजे 18 हजार खेड्यांत 2017 च्या अखेरपर्यंत वीज पोचविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आम्ही साध्य करणारच, असे सांगताना मोदींनी, ज्या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोचली असेल, त्या गावात भाजप नेत्या-कार्यकर्त्यांनी जाऊन, "ऊर्जा-उत्सव‘ साजरा करावा, अशी सूचना केली. 
=========================================
'अनिवार्य झाल्यास भारत माता की म्हणणार नाही'
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते "समाज प्रबोधन‘ पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी वैद्य यांनी भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, रुबिना पटेल, तमन्ना शेख उपस्थित होत्या. 

वैद्य म्हणाले, ""भारत माता की‘ म्हणा, हे नव्या पिढीला शिकवावे लागेल, हे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी सहज केलेले नाही. ते आपण गंभीरपणाने घेण्याची गरज आहे. ते लोकस्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाले नाहीत. त्यांना नेमके आत्ताच "भारत माता की‘चा पुळका का आला? "भारत माता की‘ जो म्हणेल तोच भारतीय, असे म्हटले की याला कोणी विरोध करणार नाही, हे त्यांना माहिती आहे; पण या निर्णयामुळे मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करायची आहे. वातावरण गढूळ करायचे आहे. खरंतर राज्यसंस्था ही धर्मनिरपेक्ष असायला हवी.‘‘ 

डॉ. आढाव म्हणाले, ""बिहार, दिल्लीच्या निवडणुकीतून संघ, भाजप काहीही शिकलेले नाही. आम्ही सांगू तेच खरे, असे त्यांना वाटते; पण चुकीच्या प्रथा-निर्णयांच्या विरोधात आपल्याला उभे राहायचे आहे. या कामात आपल्याला हळूहळू पुढे जायचे आहे. निराश व्हायचे नाही.‘‘ 

मुमताज शेख म्हणाल्या, "बाई म्हणून आम्हाला जेथे नाकारले जाते, तेथे आम्हाला जायचे आहे. अडकवून ठेवणाऱ्या परंपरा आम्हाला नको आहेत.‘‘ 

=========================================
वडिलांची इच्छा केली पूर्ण-न्यायाधीश शीतल
भोसरी - मनात जिद्द, त्याला प्रामाणिकपणे कष्टाची दिलेली जोड आणि सासरच्या मंडळींची साथ यामुळे भोसरीतील शीतल विठ्ठल साळवी यांनी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षेत यश मिळवून "मुलीने न्यायाधीश झाले पाहिजे‘, ही वडिलांची इच्छा पूर्ण केली. 

भोसरीतील संत तुकारामनगरात राहणाऱ्या शीतल विठ्ठल साळवी यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पुणे महापालिकेच्या पोलिस वसाहतीजवळ असलेल्या वीर नेताजी पालकर या शाळेत झाले. वडील पोलिस व त्यात घरची परिस्थिती जेमतेम. अशाही परिस्थितीत वडिलांनी शीतलच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. शीतल यांनी एलएलबी, एलएलएम, डीटीएल आदी पदव्या मिळविल्या. वकिलीची सनद घेऊन शिवाजीनगर न्यायालयात त्या प्रॅक्‍टिस सुरू केली. 2007 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांची एकच इच्छा होती, की "मुलीने न्यायाधीश झाले पाहिजे.‘ 
प्रामाणिक प्रयत्न केला तर सर्व गोष्टी साध्य करता येतात. ध्येय निश्‍चित करून ते साध्य करण्यासाठी प्रामाणिक कष्टाची जोड दिली पाहिजे. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देणाऱ्या तरुण-तरुणींनी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अवांतर वाचनाबरोबरच वाचलेल्या भागाची स्वतः टिपणे काढण्याची सवय लावली पाहिजे. 
-शीतल विठ्ठल साळवी, प्रथम न्यायदंडाधिकारी 
=========================================

No comments: