Saturday, 5 March 2016

नमस्कार लाईव्ह ०५-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- आधी अर्धमुंडन; आता थेट धोनीचं शीर हातात; बांगलादेशात संतापजनक पोस्टर्स 
२- अमेरिकेत बंदूकधारी दरोडेखोराला भारतीय महिलेचा हिसका 
३- जर्मनी: फेसबुकवर बनावट नाव वापरण्यास बंदी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- अमेरिकी पेन्टागॉनच्या खात्यात भारताचे 20 हजार कोटी पडून : पर्रिकर 
५- प्रस्तावित ईपीएफ टॅक्स मागे घेण्याची पंतप्रधानांची सूचना 
६- ..कॉंग्रेसला लाज वाटायला हवी: अमित शहा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- सिंधुदुर्गात डंपर मालकांसह नितेश राणेंची गुंडगिरी, जिल्हाधिकारी कार्यलयात धुडगूस 
८- होळीच्या तोंडावर साखर कडू, वर्षभरात पहिल्यांदाच साखर महाग 
९- 'कन्हैयाची जीभ कापा' म्हणणाऱ्याची हकालपट्टी 
१०- 'जेएनयूतून पुन्हा जिना जन्मल्यास तेथेच गाडू' 
११- भूज:लष्करी तळाजवळ हेरगिरी करणारा अटकेत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- मुंबईकरांना अंडी स्वस्त दरात मिळणार 
१३- ठाणे हत्याकांडात नवा खुलासा, आरोपीनं मृतांना गुंगीचं औषधच दिलेलं 
१४- हैदराबाद, जेएनयूनंतर आता अलाहबाद विद्यापीठात वादंग 
१५- नागपूर; दहशतीतून गडगंज संपत्ती कमावणारा डॉन अखेर कायद्यापुढे नतमस्तक 
१६- गाझियाबाद; लग्नाआधी वर फरार, आता त्याच्या भावाशी विवाह 
१७- मुखेड; शौच्छालयाचे अनुदान वाटप करण्यासाठ्ठी निवेदन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- ...आणि कंगना क्रू मेंबरवर भडकली, व्हिडीओ व्हायरल 
१९- 'रिंगिंग बेल्स' दुसऱ्या कंपनीचे फोन विकणार 
मिरपूर; आम्ही भारताचा पराभव करु- तमीम इक्बाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
हृदयात नेहमीच परोपकाराची भावना बाळगतात. त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते
(विठ्ठल वानखेडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.


======================================

सिंधुदुर्गात डंपर मालकांसह नितेश राणेंची गुंडगिरी, जिल्हाधिकारी कार्यलयात धुडगूस

सिंधुदुर्गात डंपर मालकांसह नितेश राणेंची गुंडगिरी, जिल्हाधिकारी कार्यलयात धुडगूस
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये डंपरमालक संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. आंदोलक डंपर लॉबीसह काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिस आणि महसूल विभागाच्या त्रासाविरोधात डंपर मालकांनी हे आंदोलन पुकारलं आहे.

डंपर मालकांनी ओरसमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर आंदोलकांनी कार्यालयात घुसून तोडफोड केली. यावेळी नितेश राणे यांनी गुंडगिरी करत पोलिसांशी हुज्जत घातली. आंदोलकांनी कायदा हातात घेतल्याने लाठीमार करावा लागला, असं स्पष्टीकरण पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिलं.
======================================

होळीच्या तोंडावर साखर कडू, वर्षभरात पहिल्यांदाच साखर महाग

होळीच्या तोंडावर साखर कडू, वर्षभरात पहिल्यांदाच साखर महाग
मुंबई ऐन होळी सणाच्या ग्राहकांच्या खिशाला चटका बसवणारी बातमी आहे. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच साखरेच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळते आहे. साखरेचे दर प्रतिकिलो 4 ते 5 रुपयांनी वाढले आहेत.

सध्या 2900 ते 3100 रुपये प्रति क्विंटल दरानं साखर विकली जाते आहे. त्यामुळं अडचणीत असलेल्या कारखान्यांना आता या दरवाढीन चांगला आर्थिक दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वसामान्यांना याचा फटका बसतो आहे.

जुलै 2015 मध्ये साखर 1900 रुपये प्रति क्विंटलवर घसरलेली होती. आता या वाढीमुळं साखरेचे दर प्रतिकिलो 4 ते 5 रुपयांनी वाढले आहेत. दरम्यान सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आहे.
======================================

आधी अर्धमुंडन; आता थेट धोनीचं शीर हातात; बांगलादेशात संतापजनक पोस्टर्स

आधी अर्धमुंडन; आता थेट धोनीचं शीर हातात; बांगलादेशात संतापजनक पोस्टर्स
मिरपूर : आशिया चषकाच्या विजेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी एक फोटो बांगलादेशमधील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो आहे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मुर्तझा यांचा. या फोटोमध्ये मश्रफे मुर्तझाच्या हातात महेंद्रसिंह धोनीचं शीर आहे. अंतिम सामन्यात भारताला हरवून बांगलादेशच विजेतेपदावर नाव कोरेल, असा संदेश या फोटोमधून दिला जात आहे.

दरम्यान, यजमान बांगलादेशने आश्चर्याचा धक्का देत, ट्वेन्टी-20च्या लढाईत पाकिस्तानला पाच विकेट्सनी हरवून थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. आता 6 मार्च रोजी म्हणजेच उद्या मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर अंतिम लढाई खेळवली जाईल.
======================================

मुंबईकरांना अंडी स्वस्त दरात मिळणार

मुंबईकरांना अंडी स्वस्त दरात मिळणार!
मुंबई : मुंबईकरांना अंडी आता स्वस्त किंमतीत मिळणार आहेत. अंडी उत्पादकांकडून थेट खेरदी करुन ती विकण्याचा निर्णय मुंबई एग ट्रेडर्स असोसिएशनने घेतला आहे.

याआधी नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीकडून अर्थात नेककडून अंडीविक्रेत्यांना माल विकत घ्यावा लागत होता. त्यामुळे अंडी चढ्या किंमतीने मिळत असल्याचा आरोप मुंबई एग्ज ट्रेडर्स असोसिएशनने केला होता.

आता थेट उत्पादकांकडून माल घेऊन ग्राहकांना विकला जाणार असल्याने अंडी स्वस्त दरात मिळणार आहे. नेकच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलनही केलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
======================================

ठाणे हत्याकांडात नवा खुलासा, आरोपीनं मृतांना गुंगीचं औषधच दिलेलं


ठाणे हत्याकांडात नवा खुलासा, आरोपीनं मृतांना गुंगीचं औषधच दिलेलं!
ठाणे: कासारवडवलीच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी पोलिस सूत्रांकडून नवीन खुलासा झाला आहे. 14 हत्या करण्यापूर्वी हस्नैन वरेकरनं सगळ्यांना गुंगीचं औषध दिलं होतं. अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

हस्नैन वरेकर स्किझोफ्रिनियाचा पेशंट होता. त्यामुळे त्याच्याकडे क्लोझॅपिन नावाचं औषध होतं. या औषधानं गुंगी येते. त्यामुळे हस्नैननं जेवणातून सगळ्यांना औषध देऊन बेशुद्ध केलं आणि नंतर सर्वांची गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी अधिकृतरित्या यासंदर्भात माहिती दिली नसली, तरी विश्वसनीय सूत्रांकडून हे खात्रीलायक वृत्त हाती येतं आहे.
======================================

हैदराबाद, जेएनयूनंतर आता अलाहबाद विद्यापीठात वादंग

हैदराबाद, जेएनयूनंतर आता अलाहबाद विद्यापीठात वादंग!
नवी दिल्ली : हैदराबाद विद्यापीठ किंवा दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील वाद अद्याप शांत झालेला नसताना आणखी एका विद्यापीठातील वाद समोर आला आहे. अलहाबाद विद्यापीठातील पहिली महिला विद्यार्थी संघटना अध्यक्षा ऋचा सिंगचं अॅडमिशन विद्यापीठाच्या चौकशी पथकाने चूकीचं ठरवलं आहे. यानंतर ऋचा सिंगने आरोप केला आहे की, अभाविपचा विरोध केल्याने मला टार्गेट केलं जातं आहे.

प्रकरण काय आहे?

सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यापीठ प्रशासनाच्या चौकशीत ऋचाचं अॅडमिशनमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनाच्या लीक झालेल्या चौकशी अहवालानुसार मार्च 2014 मध्ये ऋचाचं अॅडमिशन डीफिलमध्ये आरक्षित सीटवर दाखल करण्यात आलं होतं. मात्र, ते चूक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. चौकशी समितीने अहवाल व्हीसीकडे सुपूर्द केली आहे, मात्र व्हीसी सुट्टीवर असल्याना सध्या यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
======================================

अमेरिकेत बंदूकधारी दरोडेखोराला भारतीय महिलेचा हिसका

अमेरिकेत बंदूकधारी दरोडेखोराला भारतीय महिलेचा हिसका
न्यूयॉर्क : अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या महिलेने दरोडेखोराला चांगलीच अद्दल घडवली आहे. या महिलेच्या धाडसामुळे बंदुकीच्या धाकावर दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दरोडेखोराला तिथून पळ काढावा लागला. अमेरिकेतील एका जनरल स्टोअरमध्ये ही घटना घडली आहे. 
भूमिका पटेल असं या धाडसी महिलेचं नाव आहे. बंदुकधारी दरोडेखोर दुकानात घुसला त्यावेळी भूमिका काऊंटर होत्या. भूमिका यांनी आधी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या या दरोडेखोराच्या हातातून बंदूक घेतली. त्यानंतर की बोर्डने त्याच्या डोक्यावर हल्ला केला. अखेर स्वत:ला वाचवण्यासाठी आरोपीला तिथून पळ काढावा लागला.

======================================

अमेरिकी पेन्टागॉनच्या खात्यात भारताचे 20 हजार कोटी पडून : पर्रिकर

अमेरिकी पेन्टागॉनच्या खात्यात भारताचे 20 हजार कोटी पडून : पर्रिकर
एनआयए दहशतवाद्यांचे डीएनए टेस्ट करणार – पर्रिकर
नवी दिल्ली : अमेरिकी प्रशासनाच्या संरक्षण मंत्रालयात म्हणजे पेन्टागॉनच्या खात्यात पडून असलेल्या तब्बल 20 हजार कोटी रूपयांचा तपास संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लावलाय. अमेरिकी संरक्षण मंत्रालयामार्फत भारताला शस्त्रास्त्र खरोदीसाठी ही अॅडव्हान्स रक्कम पेन्टॉगॉनच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. एवढी भली मोठी रक्कम कोणत्या सरकारच्या कालावधीत ट्रान्सफर झाली, याविषयी माहिती दिली नाही.
अमेरिकी प्रशासन आणि भारत सरकार यांच्यातील करारन्वये अमेरिकेतील बोईंग किंवा लॉकहीड मॉर्टिन यासारख्या शस्त्रास्त्र आणि विमाने तसंच युद्धसाहित्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून पेन्टॉगॉन भारतीय सैन्यासाठी खरेदी करतं आणि भारताला सोपवतं. त्यासाठी भारत सरकारकडून तब्बल 20 हजार कोटी रूपयांची रक्कम आगावू पाठवण्यात आली होती, मात्र त्यानंतर याची काहीच कार्यवाही झाली नाही. हा पैसा पेन्टागॉनच्या खात्यात पडून होता. विशेष म्हणजे त्यावर एक रूपयाचंही व्याज भारताला मिळालं नाही.
संरक्षण मंत्रालय किंवा भारत सरकारच्या कोणत्याही खात्याने या रकमेचा पाठपुरावाच केला नाही किंवा हिशेबही मागितला नाही. त्यामुळे या रकमेची वाच्यताच झाली नाही. मात्र संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना मागील अनेक खरेदी व्यवहाराचे तपशील तपासताना या रकमेचा शोध लागला. या तब्बल 20 हजार कोटी रूपयांच्या रकमेमुळे देशातच्या संरक्षणविषयक बजेटची मोठी बचत होणार आहे. तसंच देशाचं यावर्षातील परकीय चलनातही मोठी बचत होणार आहे.
मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रालयाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना या रकमेची माहिती मिळाली, त्यामुळेच त्यांनी संरक्षणासाठी अर्थमंत्रालयाने निश्चित केलेल्या बजेटमध्ये मोठी बचत केली. या 20 हजार कोटी रूपयांमधून जवळपास सहा हजार कोटी रूपयांची जुनी थकीत देणीही चुकती करण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी संरक्षण खर्चासाठी निश्चित करण्यात आलेल्या बजेटमध्ये बचत होऊन तब्बल 700 ते 800 दशलक्ष डॉलर्स परकीय चलनाची बचत झाली.
संरक्षणविषय आणि शस्त्रास्त्रे खरेदी करारात पारदर्शकता आणून आणि यामधील मध्यस्थांची हकालपट्टी केल्यामुळे देशाचे तब्बल तीन हजार कोटी रूपये वाचल्याही माहितीही मनोहर पर्रिकर यांनी दिली.
======================================

दहशतीतून गडगंज संपत्ती कमावणारा डॉन अखेर कायद्यापुढे नतमस्तक



नागपूर: एका नंतर एक भयानक गुन्हे, त्याच्यातून प्रचंड दहशत आणि दहशतीच्या जोरावर कमावलेली गडगंज संपत्ती. सराफा बाजारातील चहा टपरीवाल्यापासून विदर्भातील गुन्हेगारी जगताचा बादशाह बनू पाहणाऱ्या गुंड संतोष आंबेकरला अखेर कायद्यापुढे नतमस्तक व्हावे लागले आहे. 
नागपूर पोलिसांनी त्याच्या सर्व नाड्या आवळल्यानंतर तो पोलिसांसमोर शरण झाला.  त्यामुळे गुन्हेगार किती ही मोठा असो. तो कायद्यापुढे ठेंगणाच ठरतो अशी चर्चा सध्या नागपुरात रंगत आहे. 
४० वर्षांचा संतोष आंबेकर नागपूरच नव्हे तर विदर्भातील गुन्हेगारी जगतातला डॉन मानला जातो. मात्र, सध्या कायद्यापुढे त्याची सर्व चमक फिकी पडली. ९०च्या दशकात नागपूरच्या सराफा बाजारात संतोष आंबेकर चहाची साधी टपरी चालवायचा. नागपूरच्या सराफा बाजारात व्यवसाय करणाऱ्या अनिल निनावे नावाच्या व्यापाऱ्याने संतोष आंबेकरला सराफा व्यवसायातील सर्व बारकावे शिकविले आणि श्रीमंत बनण्याची प्रचंड हाव असलेल्या संतोष आंबेकर मोठमोठ्या ज्वेलर्सच्या दुकानात चहा पोहोचवता पोहोचवता सराफा व्यवसायाची सर्व गुपिते आत्मसात करू लागला. 
चोरीचं सोनं कसं खरेदी केलं जातं या माहितीच्या आधारावर तो व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करू लागला आणि १९९९ मध्ये संतोष आंबेकरने त्याचाच गुरु असलेल्या सराफा व्यापारी अनिल निनावेची बाजारातच हत्या केली. संपूर्ण सराफा बाजारावर संतोष आंबेकरची दहशत निर्माण झाली. त्याचाच पुरेपूर फायदा घेत संतोष आंबेकरने स्वतःच गुन्हेगारी विश्व उभं केलं. 
बाजारावरील दहशतीच्या जोरावर खंडणी रूपाने संतोष आंबेकरकडे गडगंज संपत्ती येऊ लागली. नागपूरचे इतर गुन्हेगार त्याच्या अवतीभवती जमू लागले. काही शरण आले आणि जे नाही आले त्यांना रस्त्यातून हटवण्यात आले. फक्त नागपूरच नव्हे तर मुंबईतील कुख्यात दगडी चाळीपर्यंत संतोष आंबेकरने त्याचे संबंध प्रस्थापित केले. मोठ्या व्यापाऱ्यांकडून खंडणी घेणे, लोकांची मोक्याची संपत्ती बळकावणे, केबलच्या व्यवसायात हिस्सेदारी मागणे, छोट्या मोठ्या गुन्हेगारांना संरक्षण देत स्वतः गुन्हे न करता त्यांच्या जोरावर संपत्ती बनविणे. अशा पद्धतीने संतोष आंबेकर कोट्याधीश डॉन बनला. नागपूरच्या इतवारी परिसरात जयपुरी दगडांनी मढवलेला त्याचा महाल नागपूरच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गुन्हेगाराचा स्वप्न बनला. इतवारीतील महालात गुन्हेगारांचा डॉन दरबार भरवू लागला. त्याच्या वाढदिवसाचे गुन्हेगारांमध्ये मोठे सेलिब्रेशन होऊ लागले.
======================================

प्रस्तावित ईपीएफ टॅक्स मागे घेण्याची पंतप्रधानांची सूचना

प्रस्तावित ईपीएफ टॅक्स मागे घेण्याची पंतप्रधानांची सूचना?
नवी दिल्ली: नोकरदारांनी आपल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफमधून 60 टक्के रक्कम काढल्यावर त्यावर टॅक्स आकारण्याचा प्रस्ताव मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली मंगळवारी याबाबत संसदेत निवेदन करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रस्तावित ईपीएफ टॅक्स मागे घेतला जाणार असल्याची माहिती राजधानीतील उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळाली आहे. अर्थसंकल्पातील ईपीएफ टॅक्सबाबत देशभरात बरीच ओरड झाल्यानंतर पंतप्रधानांनी जेटली यांना आपल्या प्रस्तावाचा फेरविचार करण्याची सूचना केली आहे.

प्रस्तावित ईपीएफ टॅक्सवर फक्त विरोधी पक्ष किंवा कामगार संघटनाच नव्हे तर भाजपमधूनही मोठा विरोध झाला होता. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयात प्रस्तावित ईपीएफ टॅक्सबाबत एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्येच पंतप्रधानांनी अर्थमंत्री जेटली यांना ईपीएफ करप्रस्तावाचा फेरविचार करण्याची सूचना केली. त्यानुसार अर्थमंत्री जेटली यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना संसदेत निवेदन करण्याविषयीचं पत्रही दिलं होतं. मात्र काल माजी लोकसभा अध्यक्ष पी ए संगमा यांच्या निधनाचं वृत्त आल्यानंतर सभागृहाचं कामकाज दोन दिवसांसाठी तहकूब करण्यात आलं. त्यामुळे आता जेटली प्रस्तावित ईपीएफ टॅक्सबाबत मंगळवारी सभागृहात निवेदन करण्याची शक्यता आहे.
======================================

...आणि कंगना क्रू मेंबरवर भडकली, व्हिडीओ व्हायरल

...आणि कंगना क्रू मेंबरवर भडकली, व्हिडीओ व्हायरल
मुंबई : बिनधास्त अंदाजात दिसणारी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री कंगना रनौत सध्या खूपच चर्चेत आहे. कंगनाचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगना तिच्या व्हॅनिट व्हॅनमध्ये एका क्रू मेंबरसोबत रागाने बोलताना दिसत आहे.

चित्रपटात काही दृश्यांमध्ये तिच्याऐवजी बॉडी डबलचा वापर करण्याबाबत कंगना नाराजी व्यक्त करताना व्हिडीओत दिसत आहे.

बॉलिवूड स्टार स्टंट करण्यासाठी बरेचदा बॉडी डबलचा वापर करतात. पण कंगनाला हे स्टंट सीन स्वत:च करायचे आहेत. त्यावरुनच ती रागाने बोलताना दिसत आहे. “मला काय करायचंय हे तुम्ही शिकवू नका. ती असं काय करणार आहे, जे मी करु शकत नाही?,” असं कंगना या तावातावाने बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आता लीक झालेला हा व्हिडीओ तिचा आगामी ‘रंगून’ या सिनेमातील आहे की ती कोणत्या अड फिल्मची शूटिंग करत आहे, हे सांगणं कठीण आहे. मात्र तिचा हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

======================================

गाझियाबाद; लग्नाआधी वर फरार, आता त्याच्या भावाशी विवाह


लग्नाआधी वर फरार, आता त्याच्या भावाशी विवाह
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या मसूरीमधील एका गावात लग्नाच्या आधी नवरा फरार झाला. त्यामुळे मुलीचं लग्न नवऱ्याऐवजी त्याच्या भावाशी करण्याचा निर्णय पंचायतीने घेतला. आता या तरुणीचा विवाह निर्धारित तारखेलाच होणार आहे.

खरंतर वधुपक्षाकडील मंडळी साखरपुड्यासाठी आले होते. पण तिथे पोहोचल्यावर त्यांना कळलं की, ज्याच्याशी साखरपुडा होणार आहे, तो मुलगा तर गायब आहे. यानंतर वधुकडच्या लोकांनी प्रचंड गोंधळ करण्यास सुरुवात केली.

पंचायतीचा निर्णय
संबंधित प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी समजावल्यानंतर गावात पंचायतीची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत असा निर्णय झाला की, नवऱ्याच्याजागी त्याच्या भावाशी मुलीचा विवाह करण्यात येईल आणि ठरवलेल्या मुहूर्तावरच विवाहसोहळा पार पडेल.

मित्रांसह नवा फरार 
मेरठच्या नई बस्तीमधील धर्मपाल सिंह यांच्या लहान मुलीचा साखरपुडा, गाझियाबादच्या थाना मसूरीमधील श्यामपाल सिंह यांचा मुलगा करण सिंहशी होणार होता. साखरपुड्यासाठी धर्मपाल सिंह मुलीसह वराच्या घरी पोहोचले. परंतु त्याआधीच करण सिंह त्याच्या मित्रांसह फरार झाला होता.

करण सिंहच्या भावासह मुलीचं लग्न
धर्मपाल सिंह यांनी करणबाबत विचारलं असता, श्यामपाल सिंह यांना काहीही सांगता आलं नाही. त्यामुळे वधुपक्षाने संध्याकाळी आठच्या सुमारास पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनास्थळी आल्यानंतर मोठ्या संख्येने लोक जमा झाल्यांचं पोलिसांना दिसलं. त्यानंतर पंचायतीची बैठक बोलवण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत श्यामपाल सिहं यांनी त्यांचा तिसरा मुलगा हरेंद्र सिंहसोबत मुलीचं लग्न ठरवलं.

करण सिंहचा शोध सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितलं. मात्र हा घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.
======================================
'रिंगिंग बेल्स' दुसऱ्या कंपनीचे फोन विकणार 
नवी दिल्ली - अवघ्या 251 रुपयांमध्ये आधुनिक स्मार्ट फोन देण्याची घोषणा करताना "ऍडकॉम‘ कंपनीचा 3 हजार 600 रुपये किंमतीचा स्मार्ट फोन नमुन्यादाखल उपस्थित पत्रकारांना दाखविल्याचा खुलासा "ऍडकॉम‘ने केला आहे. तसेच जर स्वत:चे नाव वापरून या फोनची विक्री केली तर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही दिला आहे. 

अवघ्या 251 रुपयांमध्ये "फ्रिडम 251‘ नावाचा स्मार्ट फोन तयार केल्याचा दावा "रिंगिंग बेल्स‘ नावाच्या कंपनीने अलिकडे केला होता. त्याला प्रचंड प्रतिसाही मिळाला होता. मात्र याबाबतची घोषणा करताना पत्रकारांना दाखविण्यात आलेला फोन हा "ऍडकॉम‘ या कंपनीने तयार केल्याची माहिती समोर आली आहे. "या योजनेची घोषणा करताना पत्रकारांना आमचे मोबाईल दाखवून त्यांनी दिशाभूल केली‘, असा आरोप "ऍडकॉम‘ने केला आहे. या आरोपांबाबत रिंगिंग बेल्सने माहिती देताना सांगितले की, "ऍडकॉम‘कडून नमुन्यादाखल आम्ही 1 हजार फोन खरेदी केले होते. मोबाईल निर्मितीकरिता आम्ही सहकारी कंपनीच्या शोधात आहोत‘ तसेच ज्या ग्राहकांनी 251 रुपये भरून नोंदणी केली त्यांना जर दिलेल्या मुदतीत फोन देणे शक्‍य झाले नाही तर त्यांना नियमानुसार पैसे परत केले जातील, असेही "रिंगिंग बेल्स‘ने स्पष्ट केले आहे.
======================================
..कॉंग्रेसला लाज वाटायला हवी: अमित शहा

वृंदावन : ‘देशाच्या विरोधातील घोषणाबाजी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते का‘ असा प्रश्‍न उपस्थित करत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शनिवार) कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) भेटीवर टीका केली. ‘राहुल यांनी ‘जेएनयू‘ला भेट दिली, याची कॉंग्रेसला लाज वाटायला हवी‘ असे अमित शहा म्हणाले. 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका बैठकीमध्ये शहा यांनी कॉंग्रेसला टीका केली. ते म्हणाले, "देशात विचित्र वातावरण तयार केले जात आहे. ‘देशविरोधी घोषणा म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य‘ असे भासविले जात आहे. तशात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ‘जेएनयू‘ला भेट देतात आणि ‘अशा घोषणा ऐकल्या पाहिजेत‘ असे सल्ले देतात.‘‘ देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांचे राहुल यांनी केलेले समर्थन कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना मान्य आहे का, असा प्रश्‍नही शहा यांनी उपस्थित केला. 

‘देशाला विश्‍वगुरू करण्याचे काम पाच वर्षांत नाही होऊ शकत. यासाठी पुढील 25 वर्षे भाजप सत्तेत असायला हवा. कार्यकर्त्यांनी या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे,‘ असेही शहा म्हणाले.
======================================
'कन्हैयाची जीभ कापा' म्हणणाऱ्याची हकालपट्टी
बदायूँ - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारची जीभ कापून आणणाऱ्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करणाऱ्या नेत्यावर कारवाई करत भारतीय जनता पक्षाने त्याची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

भारतीय जनता युवा मोर्चाचे बदायूँ जिल्हाध्यक्ष कुलदीप वाष्णेय यांनी कन्हैयाने केलेल्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत बक्षीस जाहीर केले होते. सुटकेनंतर कन्हैया प्रत्येकावर टीका करत असल्याचेही कुलदीप यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची भारतीय जनता पक्षाने गंभीरपणे दखल घेतली आहे. त्याला पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. अशाप्रकारची कारवाई करून प्रक्षोभक किंवा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना भाजपने एक प्रकारे स्पष्ट संदेश दिला आहे.
======================================
'जेएनयूतून पुन्हा जिना जन्मल्यास तेथेच गाडू' 

नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा मोहम्मद अली जिना यांनी जन्म घ्यायला नको. जर जेएनयूत पुन्हा जिना यांचा जन्म झाल्यास त्याला तेथेच गाडून टाकू, असे भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या जामीनानंतर भाजप नेत्यांकडून त्याला लक्ष्य करण्यात येत आहे. बदायूँतील भाजप जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षाने त्याची जीभ कापून आणणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. कन्हैयाने कारागृहाबाहेर आल्यानंतर भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

आदित्यनाथ म्हणाले की, जेएनयूसारखी संस्था देशद्रोह्यांचा अड्डा बनू देणार नाही. कन्हैयाला न्यायालयाने कोणत्या अटींवर जामीन दिला आहे, हे पाहिले पाहिजे. त्याला फक्त अंतरिम जामीन देण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अर्थ असा होत नाही की तुम्ही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी व्हावे.
======================================
आम्ही भारताचा पराभव करु- तमीम इक्बाल
मीरपूर - आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ केला तर मला विश्वास आहे की आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आम्ही भारताचा पराभव करू, असे बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमीम इक्बाल याने म्हटले आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवारी आशिया करंडक स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. भारताने या स्पर्धेत सर्व चारही साखळी सामने जिंकलेले आहेत. ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारताला विजेतेपद मिळविण्याची संधी आहे. तर, बांगलादेशही आपला फॉर्म कायम ठेवत पहिल्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहे.

तमीम म्हणाला की, 2007 मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा केलेला पराभव आम्ही विसरलेलो नाही. भारताविरुद्ध जिंकलेले काही सामने आमच्या स्मरणात आहेत. मला विश्वास आहे, की आम्ही क्षमतेनुसार खेळ केला तर नक्की भारताचा पराभव करु. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आम्ही त्यांना पराभूत केले आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 मध्येही करु शकतो. जसप्रीत बुमराहची गोलंदाजी आमचे फलंदाज योग्यरित्या खेळून काढतील. आमच्यादृष्टीने फक्त बुमराहच नाही तर प्रत्येक भारतीय खेळाडू महत्त्वाचा आहे. 
======================================
भूज:लष्करी तळाजवळ हेरगिरी करणारा अटकेत
भूज - गुजरातमधील भूज जिल्ह्यातील लष्करी तळाजवळ हेरगिरी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. याबरोबरच भूजजवळील समुद्रात पाकिस्तानी नाव सापडल्याने खळबळ उडाली आहे.

लष्कराच्या गुप्तहेर विभागाने या व्यक्तीच्या मोबाईलची तपासणी केली असून, त्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील काही ठिकाणांची छायाचित्रे आहेत. या प्रकरणी या व्यक्तीचा तपासणी करण्यात येत आहे. छायाचित्रे घेत असताना त्याला अटक करण्यात आली.

भूज जिल्ह्यातील कोटेश्वर समुद्र किनाऱ्याजवळ पाकिस्तानी नाव सापडली आहे. सुरक्षारक्षक याची तपासणी करत असून, जवळपासच्या भागात शोध घेण्यात येत आहे. तसेच आक्षेपार्ह काही आढळल्यास तत्काळ सुरक्षा रक्षकांना कळविण्याची माहिती परिसरातील नागरिकांना देण्यात आली आहे. गेल्या महिन्यातही गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात एक नाव पकडण्यात आली होती. या नावेतील सर्वजण पाकिस्तानमधील मच्छिमार होते.
======================================
जर्मनी: फेसबुकवर बनावट नाव वापरण्यास बंदी

 साईट फेसबुकवर बनावट नावावर जर्मनीमध्ये लवकरच प्रतिबंध येण्याची शक्‍यता असून न्यायालयाने त्याबाबत फेसबुकला आदेश दिले आहेत. 

जर्मनीमध्ये फेसुबकच्या युजर्सनी खरे नाव वापरावे यासाठी फेसबुकने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी "रिअल नेम पॉलिसी‘ही आणली आहे. या पॉलिसीनुसार फेसबुकच्या युजरला आपली ओळख पटवून देण्यासाठी कायदेशीर ओळखपत्र देणे बंधनकारक आहे.
त्यामुळे या पॉलिसीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. गोपनीयतेचा अधिकार भंग होत असल्याचे म्हणत हॅम्बर्ग डेटा प्रोटेक्‍शन यंत्रणेने युजर्सना टोपणनाव वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र गुरूवारी जर्मनीच्या न्यायालयाने फेसबुकने बनावट नावांवर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
======================================
मुखेड; शौच्छालयाचे अनुदान वाटप करण्यासाठ्ठी निवेदन 

मुखेड :- जनहित संघर्ष समिती च्यावतीने शहरातील वैयक्तिक शौच्छालयाचे थकित अनुदान वाटप करावे यामागणीसाठी लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी डाँ. अमितकुमार सोंडगे यांना घेराव घालुन निवेदन दिले. यावेळी श्रावण रँपनवाड, टी.व्ही.सोनटक्के, श्याम कुलकर्णी सह लाभार्थी दिसत आहेत.
छाया:- हाफिज खान पठाण मुखेड 

No comments: