Wednesday, 23 March 2016

नमस्कार लाईव्ह २३-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ब्रुसेल्स हल्ला घडवून आम्ही 230 लोक मारले- इसिस 
२- मोहालीत आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- नरेंद्र मोदी 'गॉडस गिफ्ट' - संघ नाराज 
४- इंदिरा गांधी सर्वात प्रभावशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू
५- होळीनिमित्त स्पाईसजेटच्या विमानात स्टाफचे 'बलम पिचकारी'वर ठुमके 
६- ISच्या मुदब्बीर शेखच्या हट्टामुळे टळले भारतावरील दहशतवादी हल्ले 
७- जम्मू; महिलांसाठी सर्व मंदिरे खुली असावीत - फारुख अब्दुल्ला 
८- विजय मल्ल्यांमुळे खाजगी क्षेत्र बदनाम : जेटली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- नाशिक; भाजप महिला मेळाव्यात राडा, शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा 
१०- बँकेचे व्यवहार आजच उरकून घ्या, उद्यापासून चार दिवस बँका बंद 
११- पुणे; फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा, प्राचार्यांची कारवाईची मागणी 
१२- महिलांवर पाण्याचे फुगे फेकाल, तर थेट पोलिसांत एफआयआर 
१३- 'आधी मल्ल्याकडून वसुली करा, मग माझ्याकडून दंड घ्या' 
१४- पाण्यासाठी अवमान याचिका दाखल करणार 
१५- हिंमत असेल तर मराठवाड्यात पाय ठेवून दाखवा - खासदार चंद्रकांत खैरेंचं श्रीहरी अणेंना आव्हान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- ठाणे; आई-वडिलांवर हल्ला करुन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू  
१७- कोलकाता; १३ तासांचा विलंब, प्रवाशांची रात्र विमानातच 
१८- रियासी; काश्मिरात तयार होतोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल 
१९- चांगले दिवस आले म्हणून सूड उगवू नका - सुप्रिया सुळे 
२०- भारत मातेचा जयघोष शिखांनी करू नये - शिरोमणी अकाली दल प्रमुख  
२१- सरकारने पाच हजार कोटी दडपले- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयंत पाटील  
२२- पाणी संवर्धन काळाची गरज; लोकसहभागाची आवश्‍यकता - माजी आमदार ईश्‍वरराव भोसीकर
२३- कर्नाटकच्या कलबुर्गी येथील मध्य कारागृहातून चार कैद्यांचे पलायन. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- अन्यथा प्रिती झिंटाला तुरुंगात जावं लागलं असतं.. 
२५- बंगळूरू; म्हणून मी फेसबुक, ट्विटर वापरत नाही : नेहरा 
२६- आयफोन SE च्या भारतातील मुहूर्ताची तारीख ठरली 
२७- राहुल महाजन लवकरच बोहल्यावर, कोल्हापूरच्या अमृतासोबत लगीनगाठ 
२८- ट्वेन्टी20 विश्वचषकात भारतासमोर बांगलादेशचं आव्हान 
२९- मोहाली; विजयाच्या हॅटट्रिकसह न्यूझीलंडची सेमीफायनलमध्ये धडक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
ज्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव
(उदय देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
रमेश सोनाळे, मीना तनोजे, अंकित व्यास, संजय लोहेकर, साईनाथ दासरवाड, विलास धाबाले, महेंदार सिंघ, किरण धंगे, पिराजी गुंजाळ, 

सुशांत नांदलवार, मिलिंद केणी, मुन्ना जैस्वाल, ईश्वर बावणे, विजय जाधव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


===============================================

आई-वडिलांवर हल्ला करुन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू 


ठाणे : आई-वडिलांवर हल्ला करुन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. वर्तक नगरमधील इमारत क्रमांक 27 मधील ही घटना आहे.
या घटनेत आई विद्या पेडणेकर यांचा मृत्यू झाला असून वडील सिताराम पेडणेकर जखमी झाले आहेत. तसंच मुलगा प्रथमेश पेडणेकरही जखमी आहे. सर्व जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रथमेशच्या हाताच्या नसा कापल्या असून त्याच्या मानेवरही जखमा असल्याचं कळतं.
दरम्यान, आई-वडिलांवर हल्ला करुन प्रथमेश आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे.
===============================================

भाजप महिला मेळाव्यात राडा, शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा


नाशिक : शिवसेनेने भाजपच्या महिला मेळाव्यात केलेल्या तोडफोडीमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप महिला नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई नाका पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा हा गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे यात दरोड्यासारख्या गंभीर आरोपांचाही समावेश आहे. या हल्ल्यामागे नेमके कोण आहेत याचा शोध घ्यावा, अशी मागणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.

स्वतंत्र मराठवाड्यावरुन शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर श्रीकृष्ण लॉन्सवर असलेल्या भाजपच्या महिला मेळाव्यात धुडगूस घालत तोडफोड केली. भाजपच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दुपारी वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीचं समर्थन केलं होतं. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

शिवसेनेने महिलांवर केलेला हल्ला संस्कृतीला न शोभणारा असल्याची टीका भाजप आमदार आणि शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप महिला मेळावा उधळल्यानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनी  नाशिक-पुणे हायवेवर रास्ता रोको केला.
===============================================

मोहालीत आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य

मोहालीत आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य
मोहाली : भारताविरुद्धच्या पराभवानंतर टीकेचा धनी बनलेला पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. टी ट्वेण्टी विश्वचषकात मोहालीमध्ये काल न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानचा सामना होता. न्यूझीलंडने पाकिस्तानला धूळ चारून सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
या सामन्यावेळी मोहालीत पाकिस्तानला मिळणाऱ्या प्रोत्साहनाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी इथे काश्मिरी प्रेक्षक आल्यानेच आम्हाला प्रोत्साहन मिळाल्याचं वादग्रस्त वक्तव्य आफ्रिदीने केलं. 
नाणेफेकीदरम्यान प्रेक्षक आफ्रिदीला प्रोत्साहन देत होते. त्यावेळी पाकचा माजी कर्णधार रमीझ राजाने विचारलं, इथे पाकिस्तानी संघाला प्रेक्षकांचं प्रोत्साहन मिळत आहे. त्यावर आफ्रिदी म्हणाला, “इथे खूप प्रेक्षक काश्मिरीहून आले आहेत. आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांचे धन्यवाद”
===============================================

अन्यथा प्रिती झिंटाला तुरुंगात जावं लागलं असतं...

अन्यथा प्रिती झिंटाला तुरुंगात जावं लागलं असतं...
प्रीति झिंटा
मुंबई : बॉलिवूडची नवविवाहित अभिनेत्री प्रिती झिंटाला कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रसिद्ध पटकथा लेखक अब्बास टायरवाला यांनी 2013 मध्ये चेक बाऊन्स प्रकरणी केलेल्या तक्रारीतून प्रितीची निर्दोष सुटका झाली आहे. अन्यथा प्रिती झिंटाला तुरुंगवास होऊ शकला असता.

20 फेब्रुवारी 2013 रोजी अब्बास टायरवाला यांनी प्रिती विरोधात चेक बाऊन्सची तक्रार नोंदवली होती. ‘इश्क इन पॅरिस’ चित्रपटाच्या लेखनाचं 18.9 लाखांचं मानधन प्रितीने दिलं नसल्याचा दावा टायरवालांनी केला, तर आपलं काम करु न शकल्यामुळे चेक थांबवल्याची बाजू प्रितीने मांडली होती.

‘अकाऊण्टमध्ये रक्कम नसल्यामुळे चेक इश्यू करण्यापूर्वी एकदा आपल्याला माहिती द्यावी, मात्र काहीही न कळवता त्यांना चेक टाकल्याने बाऊन्स झाला’ अशी माहिती प्रितीच्या वकिलांनी कोर्टात दिली. यानंतर कोर्टाने प्रिती झिंटाची निर्दोष मुक्तता केली.
===============================================

बँकेचे व्यवहार आजच उरकून घ्या, उद्यापासून चार दिवस बँका बंद

बँकेचे व्यवहार आजच उरकून घ्या, उद्यापासून चार दिवस बँका बंद
मुंबई : बँकेचे व्यवहार आजच उरकून घ्या. कारण उद्यापासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. 24 मार्च ते 27 मार्च यादरम्यान सलग चार दिवस बँकांना सुट्टी असणार आहेत. 
24 मार्चला धुलिवंदन आणि 25 मार्चला गुड फ्रायडे असल्याने या दिवशी बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर 26 मार्च रोजी चौथा शनिवार आणि 27 मार्चला रविवार, म्हणजे हे दोन दिवसही बँका बंद असतील. त्यामुळे लोकांचे आर्थिक व्यवहार सुरु राहावेत यासाठी एटीएममध्ये पुरेशी रक्कम ठेवण्याची खबरदारी बँका घेणार आहेत. 
या सुट्ट्यांमुळे बँकांची कामं 23 मार्चलाच उरकून घ्यावी लागतील. शिवाय, चार दिवसांमध्ये ग्राहकांना पूर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागणार आहे. 
दरम्यान, 28 मार्च रोजी आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या एका गटाने संप पुकारला आहे. हा संप झाला तर आयडीबीआय बँक आणखी एक दिवस बंद राहू शकते.
===============================================

फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा, प्राचार्यांची कारवाईची मागणी

फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा, प्राचार्यांची कारवाईची मागणी
पुणे : दिल्लीच्या जेएनयूनंतर आता पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याची घटना घडली आहे. देशविरोधी घोषणा देणाऱ्या आंबेडकरवादी संघटनेच्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असं पत्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी डेक्कन पोलिसांना पाठवलं आहे. 
फर्ग्युसन कॉलेजमध्ये मंगळवारी जेएनयूच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष अलोक सिंहचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अलोक सिंह फर्ग्युसन कॉलेजमध्ये आला आहे. महत्त्वाचं म्हणजे परवानगी नसताना हा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता.
Principal_Letter
===============================================

महिलांवर पाण्याचे फुगे फेकाल, तर थेट पोलिसांत एफआयआर

महिलांवर पाण्याचे फुगे फेकाल, तर थेट पोलिसांत एफआयआर
मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होळीच्या निमित्ताने पाण्याची होणारी नासाडी थांबवण्याची ओरड सर्व स्तरातून होत आहे. दुसरीकडे काही टवाळखोर रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांना, विशेषतः महिलांना टारगेट करण्यात धन्यता मानतात. मात्र महिलांवर पाण्याचे फुगे फेकणं याची गणती आता महिलांविरोधी गुन्ह्यामध्ये होणार आहे.

होळीला पादचारी महिलांवर फुगे फेकून त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन दिली आहे. टवाळखोरांवर थेट एफआयआर नोंदवण्यात येणार आहे.

तक्रारकर्त्या महिलेने शक्य झाल्यास आरोपीचा, अन्यथा परिसराचा फोटो काढावा आणि मुंबई पोलिसांच्या (@MumbaiPolice) ट्विटर अकाऊण्टवर शेअर करावा, सोबत घटनेचं थोडक्यात वर्णन, स्वतःचं पूर्ण नाव आणि ठिकाण लिहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

तक्रार नोंदवात तातडीने पोलिस पथकं घटनास्थळी रवाना होतील आणि आरोपींवर कारवाई होईल, अशी हमी पोलिसांनी दिली आहे. मात्र हे करताना महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी, कुठल्याही भांडणात पडू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
===============================================

म्हणून मी फेसबुक, ट्विटर वापरत नाही : नेहरा

म्हणून मी फेसबुक, ट्विटर वापरत नाही : नेहरा
बंगळुरु : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आपण सोशल मीडियावर नसल्याची माहिती दिली. ‘मी अजुनही नोकियाचा जुना फोन वापरत असल्यामुळे फेसबुक, ट्विटरवर माझं अकाऊण्ट नाही’ असं नेहराने मंगळवारी सांगितलं.

भारत बांगलादेशमध्ये सोशल मीडियावर रंगलेल्या युद्धाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नेहरा म्हणाला, ‘तुम्ही हा प्रश्न चुकीच्या व्यक्तीला विचारत आहात. मी सोशल मीडियावर नाही. मी नोकियाचा जुना फोन वापरत असल्यामुळे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर माझं अकाऊण्ट नाही. मी वर्तमानपत्र वाचत नाही. कदाचित मी जुनाट विचारांचा असेन.’ 
नेहराच्या या कमेंटनंतर ट्विटरवर मात्र अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. जुना फोन वापरण्यावरुन नेहराची अनेक ट्विटराईट्सनी टर खेचली. बीसीसीआयने सेहवागला ट्वीट करुन विचारलं, तुम्ही नेहरा सोशल मीडियावर आणायला मदत कराल का? यावर वीरुने मी नक्की प्रयत्न करेन, असं उत्तर दिलं.
===============================================

इंदिरा गांधी सर्वात प्रभावशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू

इंदिरा गांधी सर्वात प्रभावशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू
नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले आहेत. ‘इंदिरा गांधी या देशातील सर्वात प्रभावशाली पंतप्रधान होत्या’ असं प्रभू म्हणाले.

‘अमेरिकेला आतापर्यंत महिला अध्यक्ष मिळालेली नाही. मात्र भारताला महिला राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान लाभलेल्या आहेत. इंदिरा गांधी या देशातील सर्वात प्रभावशाली पंतप्रधान होत्या’ असं प्रभू महिलांसाठी आयोजित रेल्वेच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

‘रेल्वेत अनेक महिला कर्मचारी उत्तम काम करत आहेत. साधारणतः महिला कोणत्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करतात.’ असं मतही त्यांनी व्यक्त केलं. रेल्वेमध्ये 13 लाखपैकी एक लाख महिला कर्मचारी आहेत.

महिलांना सहानुभूती देण्याऐवजी साक्षरता, शिक्षण, आर्थिक क्षेत्रात समसमान संधी द्यायला हव्यात, असंही सुरेश प्रभू म्हणाले.
===============================================

आयफोन SE च्या भारतातील मुहूर्ताची तारीख ठरली

आयफोन SE च्या भारतातील मुहूर्ताची तारीख ठरली
सिलिकॉन व्हॅली: अॅपलचा स्वस्त स्मार्टफोन असं मार्केटिंग करत काल ‘आयफोन SE’ या नव्या स्मार्टफोनचं अॅपलनं मोठा गाजावाजा करुन लाँचिंग केल. मात्र, अॅपलच्या या स्वस्त स्मार्टफोनचा फुगा अवघ्या २४ तासांच्या आतच फुटला आहे. 

भारतामध्ये सुरुवातीला आयफोन SE स्मार्टफोनची किंमत 30,000 जाहीर करण्यात आली होती. मात्र, काही वेळानं एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं ज्यामध्ये या स्मार्टफोनची किंमत 30,000 नसून 39,000 हजार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 8 एप्रिल रोजी भारतात लाँच होणार आहे. 
आयफोन SE हा 4 इंच डिस्प्ले असून 16 जीबी आणि 64 जीबी व्हेरिएंटमध्ये मिळेल. आयफोन SE चा लूक आयफोन 5Sसारखाचं असून आयफोन 6S एवढी बॅटरी क्षमता आहे. या नव्या आयफोन SE चा उच्चार ‘आयफोन एस्से’ असा केला जाईल.
===============================================

होळीनिमित्त स्पाईसजेटच्या विमानात स्टाफचे 'बलम पिचकारी'वर ठुमके

होळीनिमित्त स्पाईसजेटच्या विमानात स्टाफचे 'बलम पिचकारी'वर ठुमके
नवी दिल्ली : स्पाईस जेटच्या क्रू मेंबर्सनी विमानातच होळी साजरी केली. दिल्लीहून उड्डाण घेण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी विमानात डान्स केला. विशेष म्हणजे प्रवाशांनाही चीअर करुन त्यांना दाद दिली. 
उड्डाणापूर्वी विमानाचा स्टाफ ‘हैलो हैलो’ आणि ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर थिरकला आणि प्रवाशांना सरप्राईज दिलं. स्टाफने प्रत्येक प्रवाशाला ओवाळलं. त्यानंतर ठुमके लगावत सर्व क्रू मेंबर्सनी प्रवाशांसोबत होळी साजरी केली. 
विमानात नाचणं आणि गाण्यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती स्पाईस जेटने मागील महिन्यात डीजीसीएला केली होती. मात्र विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत हेळसांड केली जाणार नाही, असं सांगत डीजीसीएने ही विनंती फेटाळली. परंतु विमानाचं उड्डाण होण्यापूर्वी होळी साजरी करता येईल, असंही डीजीसीएने सुचवलं होतं. 
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी विमानाच्या पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टमवरुन गायक सोनू निगमला गाण गाण्यास सांगणाऱ्या जेट एअरवेजच्या पाच एअरहोस्टेसना निलंबित करण्यात आलं होतं. 
तर दोन वर्षांपूर्वी गोव्याहून बंगलोरला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानात ‘बलम पिचकारी’ गाण्याच्या तालावर विमान स्टाफ तब्बल अडीच मिनिटं थिरकला होता. डीजीसीएच्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याच्या कारणावरुन दोन्ही पायलटचं निलबंन करण्यात आलं होतं. तर एअरहोस्टेसला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
===============================================

'आधी मल्ल्याकडून वसुली करा, मग माझ्याकडून दंड घ्या'

'आधी मल्ल्याकडून वसुली करा, मग माझ्याकडून दंड घ्या'
मुंबई : आधी विजय मल्ल्यांनी बुडवलेल्या कर्जाची रक्कम वसूल करा, मग माझ्याकडून दंड घ्या, असं म्हणत विनातिकीट लोकल ट्रेनचा प्रवास करणाऱ्या एका महिलेने सुमारे 12 तास अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.  मुंबईमध्ये हा प्रकार घडला असून प्रेमलता भन्साळी असं या महिलेचं नाव आहे. 
विजय मल्ल्यांनी बुडवलेला पैसा कसा वसूल करणार? असा सवाल उपस्थित करुन, प्रेमलता भन्साळीने दंड भरण्यास नकार दिला. महालक्ष्मी स्टेशनवर याच मुद्द्यावरुन प्रेमलताने प्रचंड गोंधळ घातला. मात्र लोकलचं तिकीट न काढल्यामुळे तिला सात दिवसाच्या तुरुंगावासाची हवा खावी लागली आहे. 
प्रेमलता भन्साळी यांनी पश्चिम रेल्वेच्या एलफिस्टन रोड ते महालक्ष्मी स्टेशनदरम्यान तिकीट न काढता प्रवास केला. महालक्ष्मी स्टेशनवर तिकीट तपासणी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी भन्साळींनी अडवलं आणि त्यांना दंड भरण्यास सांगितलं. 
त्यावेळी आधी विजय मल्ल्याकडून वसुली करा मग माझ्याकडून असं म्हणत दंडाची रक्कम भरण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी दिवसभर रेल्वे अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली.
अखेर कोर्टात हजर राहण्याच्या अटीवर भन्साळी यांना वैयक्तिक जामीन घेऊन सोडून देण्यात आलं.  आज प्रेमलता भन्साळी कोर्टासमोर हजर झाल्या. कोर्टात गुन्हा कबूल केला. कोर्टाने दंड भरण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी पुन्हा विजय मल्ल्यांची आठवण करुन दिली. 
यावर कोर्टाने प्रेमलता भन्साळीला सात दिवसांची शिक्षा सुनावली आहे. सध्या तिची रवानगी भायखळ्यातील महिला जेलमध्ये करण्यात आली आहे.
===============================================

राहुल महाजन लवकरच बोहल्यावर, कोल्हापूरच्या अमृतासोबत लगीनगाठ

राहुल महाजन लवकरच बोहल्यावर, कोल्हापूरच्या अमृतासोबत लगीनगाठ
मुंबई : नेहमीच वादात असणारा राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. मूळची कोल्हापूरची असलेली मॉडेल अमृता मानेसोबत राहुल विवाहबंधनात अडकणार आहे. 
राहुलचं हे तिसरं लग्न असेल. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर एका टीव्ही चॅनलवरील रिअॅलिटी शोमध्ये राहुलने स्वत:चं स्वयंवर रचलं. यामध्ये 16 तरुणींमधून त्याने डिंपी गांगुलीची पत्नी म्हणून निवड केली होती. 6 मार्च 2010 रोजी दोघं विवाहबंधनात अडकले होते. 
लग्नानंतर केवळ चार महिन्यांतच राहुलने मारहाण केल्याची तक्रार डिंपीने केली होती. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि राहुलच्या आयुष्यात मॉडेल अमृता माने आली. आता लवकरच हे दोघे लगीनगाठ बांधणार आहेत.
===============================================

ट्वेन्टी20 विश्वचषकात भारतासमोर बांगलादेशचं आव्हान

ट्वेन्टी20 विश्वचषकात भारतासमोर बांगलादेशचं आव्हान
बंगळुरु : धोनीची टीम इंडिया सज्ज झाली आहे ट्वेन्टी20 विश्वचषकातल्या आपल्या तिसऱ्या लढाईसाठी. सुपर टेनच्या दुसऱ्या गटाच्या सामन्यात आज भारताला बांगलादेशशी मुकाबला करायचा आहे. 
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम ठेवायचं, तर टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. 
विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं पाकिस्तानचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखलं. पण उपांत्य फेरीत धडक मारायची, तर धोनी ब्रिगेडला उर्वरीत दोन सामन्यांतही बरीच मेहनत करावी लागणार आहे. साखळी फेरीतल्या आपल्या तिसऱ्या लढतीत टीम इंडियाला बंगळुरुच्या मैदानात मुकाबला करायचा आहे आशिया चषकाच्या उपविजेत्या बांगलादेशचा. 
ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या सलामीला न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवातून सावरत टीम इंडियानं पाकिस्तानला लोळवलं. पण भारतीय फलंदाजांची कामगिरी ही धोनीसाठी चिंतेची बाब बनली आहे. रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैनासारखे शिलेदार फॉर्मसाठी झगडत आहेत. 
ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांत मिळून शिखर धवनच्या खात्यात सात धावाच जमा होत आहेत, रोहितनं 15 धावा केल्या आहेत, तर रैनानं केवळ एक. धवन, रोहित आणि रैना या तिकडीचं अपयश टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरली आहे. पण दिलासा देणारी गोष्ट म्हणजे विराट कोहलीचा फॉर्म आणि त्याला मिळालेली युवराज सिंगची साथ. 
विराटनं न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या सामन्यात 23 तर पाकिस्तानविरुद्ध नाबाद 55 धावांची खेळी केली होती. पाकिस्तानविरुद्ध युवराजनं 24 धावांची खेळी करुन विराटला चांगली साथ दिली होती.
===============================================

विजयाच्या हॅटट्रिकसह न्यूझीलंडची सेमीफायनलमध्ये धडक

विजयाच्या हॅटट्रिकसह न्यूझीलंडची सेमीफायनलमध्ये धडक
मोहाली : विजयाची हॅटट्रिक करत न्यूझीलंडने ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मोहालीत झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानवर 22 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानला 20 षटकांत पाच बाद 158 धावांचीच मजल मारता आली. पाकिस्तानच्या शर्जील खान आणि अहमद शहजादने 65 धावांची सलामी दिली. शर्जील खानने 47 धावांची आणि अहमद शहजादने 30 धावांची खेळी रचली. तर उमर अकमलने 24 आणि शाहिद आफ्रिदीने 19 धावा केल्या.
न्यूझीलंडसाठी मिचेल सॅन्तनर आणि अॅडम मिल्नने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. याआधी मार्टिन गप्टिलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडनं 20 षटकांत पाच बाद 180 धावांची मजल मारली होती. गप्टिलने 48 चेंडूंत दहा चौकार आणि तीन षटकारांसह 80 धावांची खेळी केली. दरम्यान सलग दोन पराभवांमुळं शाहिद आफ्रिदीच्या पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येण्याची चिन्ह आहे.
===============================================

नरेंद्र मोदी 'गॉडस गिफ्ट' - संघ नाराज

  •  ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाने देशाला दिलेली भेट आहे हे भाजप नेत्यांचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पटलेले नसून, संघाने आपली नाराजी भाजप नेत्यांच्या कानावर घातल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. संघाने भाजपाला राष्ट्रवादाचा मुद्दा लावून धरताना विकासाचा दृष्टीकोन ठेवून काम करण्याचा सल्ला दिला आहे. 
    राजस्थान नागौरमध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेनंतर मंगळवारी दीनदयाळ शोध संस्थेच्या कार्यालयात आरएसएस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. आरएसएसकडून सुरेश भय्याजी जोशी, क्रिष्ण गोपाळ, दत्तात्रय होसांबळे बैठकीला उपस्थित होते तर, भाजपकडून पक्षाध्यक्ष अमित शहा, सरचिटणीस रामलाल आणि उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्ध उपस्थित होते. 
    नरेंद्र मोदी हे देशाला मिळालेले गॉड गिफ्ट आहे या केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या विधानावर आरएसएस नेत्यांनी आपली नाराजी प्रगट केली. संघटना सर्वोच्च असून व्यक्तीपूजेपासून दूर रहाण्याचा सल्ला त्यांनी भाजप नेतृत्वाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.  
===============================================

ISच्या मुदब्बीर शेखच्या हट्टामुळे टळले भारतावरील दहशतवादी हल्ले

  • डिप्पी वांकाणी  
    मुंबई, दि. २३ - इसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया) या दहशतवादी संघटनेचा भारतातील दहशतवादी मुदब्बीर शेखने एकाच वेळी देशात अनेक ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखली होती. मात्र इसिसच्या इतर सदस्यांनी या योजनेला विरोध दर्शवत योग्य संधी मिळताच एकामागोमाग एक हल्ले करण्याची सूचना केली होती. मुदब्बीर शेखच्या या हट्टामुळे भारतातील अनके संभाव्य दहशतवादी हल्ले टळले आणि मोठा अनर्थ टळला.
    राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र एटीएसने इसिसच्या १६ दहशतवाद्यांना अटक केली आणि देशावरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. या दहशतवाद्यांच्या केलेल्या चौकशीतून अनेक महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. मुंब्र्यातील आयटी इंजिनिअर असलेल्या मुदब्बीर शेखने एकाच वेळी देशात अनेक ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखली होती. मात्र इसिसने या योजनेला विरोध दर्शवला होता. देशात अनेक ठिकाणी एकाच वेळी हल्ले केल्याने दहशतवादविरोधी यंत्रणा सतर्क होतील असे सांगत योग्य संधी मिळाल्यावरच हा हल्ला करावा असे इसिसने स्पष्ट केले होते. 
    लोकमतच्या सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार शफी अम्मार उर्फ युसुफ हाताळत असलेल्या इसिसच्या १६ ऑपरेटीव्हना अटक करण्यात आली असून त्यात मुदब्बीर शेखचादेखील समावेश आहे. लखनऊमध्ये पार पडलेल्या इसिसच्या बैठकीला मुदब्बीरने हजेरी लावली होती. या बैठकीत त्याने इसिसची एक आर्मी तयार करुन देशभरात हल्ले करण्याची योजना मांडली होती. एकाच वेळी हे हल्ले करावेत ज्यामागे काही हेतू नसावा असंही मुदब्बीरने सांगितल्याची माहिती गुप्तचर खात्यातील एका अधिका-याने दिली आहे. 
    माझगावमधून अटक करण्यात आलेला उद्योजक खान मोहम्मद हुसेननेदेखील या बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीत त्याने इसिसला आर्थिक मदत देण्याची शपथ घेतली होती. तसंच दहशतवाद्यांना राहण्यासाठी घर देण्याचं आश्वासनदेखील दिलं होतं मात्र या ऑपरेशनमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शवला. शफी अम्मार उर्फ युसुफने हुसेनला 1.5 किलो स्फोटक पाठवली होती. चौकशीत स्फोटक मिळाल्याची कबुली मोहम्मद हुसेनने दिली आहे. मात्र ही स्फोटक आपण शौचालयात टाकून दिल्याचं तो सांगत आहे ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. हे प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडून एनआयएकडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे हुसेनने दिलेल्या माहितीवरुन ते तपास करुन निर्णय घेतील अशी माहिती अधिका-याने दिली आहे. 
    तरुणांना सोशल मिडियाच्या आधारे भरती करण्याची जबाबदारी उत्तरप्रदेशच्या 21 वर्षीय रिझवान शेखवर देण्यात आली होती. महाराष्ट्र एटीएसने त्यालाही अटक केली आहे. सुरुवातील फेसबुकवरुन चॅटींग करत व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला जायचा. आणि त्यानंतर नवीन अॅप्लिकेशन्स वापरले जायचे. रिझवान तरुण असल्याने त्याच्यावर तरुणांना भरती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 
===============================================

महिलांसाठी सर्व मंदिरे खुली असावीत - फारुख अब्दुल्ला

  • ऑनलाइन लोकमत - 
    जम्मू, दि. २३ - 'महिला सक्षमीकरण व्हावं असं खरच वाटत असेल तर सर्व मंदिरे महिलांसाठी खुली करावीत', असं मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मांडलं आहे. उत्तरप्रदेशमधील वृंदावनमध्ये विधवा महिलांनी जुनी परंपरा मोडीत काढत मंदिरात होळी साजरी केल्याच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते. 
    'महिलांसाठी मंदिरे खुली होत आहेत ही खुप चांगली गोष्ट आहे. त्या या देशाचाच भाग आहेत आणि जर तुम्हा सक्षमीकरण हवं असेल तर सर्व मंदिरे महिलांसाठी खुली करावीत', असं फारुख अब्दुल्ला बोलले आहेत. 'हे होत आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. भारत सकारात्मक पद्धतीने पुढची वाटचाल करत आहे ही चांगली गोष्ट आहे', असं फारुख अब्दुल्लांनी म्हंटलं आहे.
    ब्रुसेल्स हल्ल्यावर बोलताना जगाने दहशतवाद धोका असल्याचं मान्य केलं आहे. जेव्हा आपण त्यांना सांगत होतो तेव्हा त्यांनी विश्वास नाही ठेवला. आज तेच शब्द त्यांच्या कानात वाजत असतील असं म्हंटल आहे. या जगाला दहशतवाद्यांपासून धोका आहे आणि दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. त्याला फक्त आपलं लक्ष टार्गेट करुन स्फोट करायचा असतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाशी लढण्याची गरज असल्याचं फारुख अब्दुल्ला बोलले आहेत. 
===============================================

पाण्यासाठी अवमान याचिका दाखल करणार

  • मुंबई : पाण्याचा हक्क हा जगण्याच्या मूलभूत हक्कात अंतर्भूत असून, १५ फेब्रुवारी २०१५पर्यंत मुंबईतील सर्वांनी पाणीपुरवठा करणाऱ्या धोरणाचा प्रस्ताव देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले होते. मात्र, महापालिकेकडून आदेशाचे उल्लंघन झाले असून, त्याविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय याचिकाकर्त्या पाणी हक्क समितीने घेतला आहे.
    मुंबईतील गरीब वस्त्यांतून राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे, म्हणून समितीने २०११ साली याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने ज्या नागरिकांची घरे अनधिकृत असतील, त्यांनाही पाण्याची जोडणी मिळणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले होते. शिवाय सर्वांना पाणी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असून, त्यानुसार महापालिकेने १५ फेब्रुवारी २०१५ च्या आत पाणीपुरवठा धोरणाचा प्रस्ताव देण्याचे आदेश दिले.
    न्यायालयाच्या आदेशावर पालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा धोरणाचा मसुदा स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केल्याची माहिती समितीचे सीताराम शेलार यांनी दिली. ते म्हणाले की, ‘स्थायी समितीने संबंधित मसुदा फेटाळत आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठवला होता. पालिकेच्या या निर्णयामुळे कोर्टाचा व घटनेचा अवमान करण्यात आला आहे.
===============================================

१३ तासांचा विलंब, प्रवाशांची रात्र विमानातच

  • कोलकाता : तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाच्या बोर्इंग ७८७ या विमानाच्या उड्डाणास तब्बल १३ तासांचा विलंब लागला. परिणामी दिल्लीला जाणाऱ्या १५० प्रवाशांना अख्खी रात्र विमानातच घालवावी लागली. कोलकाता विमानतळावर रविवारी रात्री ही घटना घडली.
    एअर इंडियाचे फ्लाईट एआय ७०१ हे विमान २३६ प्रवाशांना घेऊन कोलकाता विमानतळावरून रविवारी सायंकाळी ५.३० वाजता दिल्लीला उड्डाण करणार होते. विमान प्रवाशांमध्ये माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, गायक शफाकत अमानत अली आणि भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा समावेश होता. विमान दिल्लीला उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. बिघाड दूर करण्यास वेळ लागेल, हे समजल्यानंतर बासित, येचुरी आणि अन्य २१ प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात येऊन त्यांची दुसऱ्या विमानात दिल्लीला जाण्याची सोय करण्यात आली. अन्य प्रवाशांना मात्र विमानातच बसून राहण्यास सांगण्यात आले होते. विमानातील बिघाड दुरुस्त होणार नाही हे रात्री १० वाजता लक्षात आल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठविण्याचे ठरले. त्यानंतर एअर इंडियाचे दुसरे विमान कोलकाता विमानतळावर उतरले आणि प्रवाशांना एआय ७०१ या विमानाने दिल्लीला रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व प्रवासी बंद पडलेल्या विमानातून उतरून दुसऱ्या विमानात चढले. परंतु वैमानिकाची फ्लार्इंग ड्युटी संपल्याने हे विमानही सोमवारी सकाळी ६.३० वाजेपर्यंत उड्डाण करू शकले नाही, त्यामुळे प्रवाशांना विमानातच रात्र घालवावी लागली.
===============================================

काश्मिरात तयार होतोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल

  • रियासी (जम्मू) : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गावरील चेनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्यात येत आहे. २०१९ मध्ये हा रेल्वे पूल बांधून पूर्ण केला जाईल.
    चेनाब नदीवर बांधण्यात येत असलेला हा ३५९ मीटर उंचीचा आणि शत्रू राष्ट्राच्या सीमेजवळील निर्जन स्थळी बांधण्यात येत असलेला रेल्वे पूल जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर जास्त उंच असेल. जगात सध्या फ्रान्समधील टॉम नदीवर बांधण्यात आलेला पूल सर्वांत उंच पूल मानला जातो. या पुलाचे खांब नदीपात्रापासून ३४० मीटर उंचीवर आहेत.
    चेनाब नदीवर बांधण्यात येत असलेला हा कमानीच्या आकाराचा रेल्वे पूल बक्कल (कत्रा) आणि कौरी (श्रीनगर) या दोन नदीकाठांना जोडणार आहे.
    ताशी २६६ कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा तडाखा सहन करू शकेल, अशा पद्धतीने या पुलाची रचना करण्यात आली आहे. या रेल्वे पुलाच्या जम्मू ते कत्रा सेक्शनचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि हा मार्ग २०१४ मध्येच खुला करण्यात आला आहे. उर्वरित कत्रा-बनिहाल सेक्शनवरील बांधकाम सुरू आहे.
    वाऱ्याचा वेग तपासण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे या पुलावर संवेदक (सेन्सर) बसविण्यात येतील. वाऱ्याने ताशी ९० कि.मी.चा वेग घेतला की रेल्वे मार्गावरील सिग्नल आपोआप लाल होतील आणि रेल्वेला पुलावर येण्याआधीच थांबविता येईल. केआरसीएलने आतापर्यंत या प्रकल्पावर २९०० कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ६१०० कोटी रुपये आहे, असे गुप्ता म्हणाले.
===============================================
ब्रुसेल्स हल्ला घडवून आम्ही 230 लोक मारले- इसिस
ब्रुसेल्स- येथील विमानतळावर मंगळवारी झालेल्या आत्मघातकी बाँब हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट तथा इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यांमध्ये 230 पेक्षा अधिक मारल्याचा दावा इसिसने केला आहे. दरम्यान, मृतांची एकूण संख्या 35 झाली असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. 

ब्रुसेल्स येथील विमानतळ आणि मेट्रो रेल्वे स्थानकावर हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. 
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याच्या संशयावरून ब्रुसेल्समधून सालेह अब्देसलाम या दहशतवाद्याला अटक करण्यात आल्यानंतर चौथ्या दिवशी दहशतवाद्यांनी ब्रुसेल्सला लक्ष्य केले. 

इसिसने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याचे अमाक या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इसिसच्या सदस्यांनी स्फोटक पट्टे आणि शस्त्रांनी बाँबस्फोट घडवून आणले. बेल्जियन राजधानीतील मध्यवर्ती ठिकाणी मेट्रो स्थानक व विमानतळावर निशाणा साधला. इस्लामिक स्टेटविरोधात आंतरराष्ट्रीय गटात सहभागी झालेल्या बेल्जियमला आम्ही लक्ष्य केले असे इसिसने म्हटले आहे. 

ब्रुसेल्समधील सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असल्याचे भारताच्या परराष्ट्र खात्याच्या वतीने सांगण्यात आले.
===============================================
विजय मल्ल्यांमुळे खाजगी क्षेत्र बदनाम : जेटली
मुंबई : विजय मल्ल्या यांनी हजारो कोटींचे कर्ज बुडविल्यामुळे केवळ त्यांचेच नव्हे तर देशातील संपूर्ण खाजगी उद्योग क्षेत्राचे नाव बदनाम झाले आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.

येथे एका कार्यक्रमामध्ये बोलताना जेटली यांनी मल्ल्या यांच्यावर निशाणा साधला.
जेटली म्हणाले, "देशभरातील 17 बँकांची तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचे कर्जे बुडवून लंडन येथे निघून गेलेल्या मल्ल्या यांना त्यांच्या बुडवेगिरीमुळे बँकांची काय अवस्था झाली आहे; याची पूर्ण जाणीव असणार आहे."

इतर अनेक असे उद्योग आहेत; की ज्यांना व्यवसायातून आपले कर्ज फेडता आले नाही. मात्र त्यांनी आपल्या मालमत्ता विकून कर्जांच्या रकमेची पूर्तता केली आहे. मात्र माल्ल्या तसे करण्यास तयार नाहीत; असेही जेटली यांनी नमूद केले.
===============================================
चांगले दिवस आले म्हणून सूड उगवू नका
नगर - राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सुसंस्कृत पक्ष आहे. आम्ही आणि कॉंग्रेसने सत्तेत असताना कधीही सुडाचे आणि घाणेरडे राजकारण केले नाही. चांगले दिवस आले म्हणून सूड उगवायला नको, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. 

येथे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ""छगन भुजबळ प्रकरणात आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे. तेथील प्रक्रिया पार पाडण्यासाठी पक्ष प्रयत्न करील. भुजबळ प्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस बॅकफूटवर गेलेली नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. मात्र प्रत्येकाने मोजून-मापूनच बोलले पाहिजे.‘‘ खासदार किरिट सोमय्या यांच्याबाबत "त्यांचे आमच्या कुटुंबावर जास्त प्रेम आहे!‘ एवढीच टिप्पणी सुळे यांनी केली. 

श्रीहरी अणे यांच्या मराठवाडा स्वतंत्र करण्याच्या वक्तव्यावर खासदार सुळे म्हणाल्या, ""विधानसभा आणि विधान परिषदेत यावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी आता राजीनामाही दिला आहे. मात्र, त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. राज्यात आज कुपोषण, शिक्षणाचा दर्जा, महिलांवरील अत्याचार, विधवांचे प्रश्‍न असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावर किती चर्चा केली गेली? कोणत्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचे, हे ठरविले पाहिजे.‘‘ 

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेबाबतही सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ""पुणे शहराचा एक भाग त्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण शहर स्मार्ट कसे होईल? ज्या भागाचा समावेश होईल, तेथील जागांच्या किमती किती वाढतील, याचा विचार व्हायला हवा.‘‘
===============================================
भारत मातेचा जयघोष शिखांनी करू नये - शिरोमणी अकाली दल प्रमुख 
मुंबई - "भारत माता की जय‘ म्हणण्यावरून वाद सुरू असतानाच शिरोमणी अकाली दलाच्या प्रमुखांनीही ही घोषणा म्हणण्यास नकार देऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे. "भारत माता की जय‘ म्हणण्यास नकार दिल्यावरून "एमआयएम‘चे आमदार वारीस पठाण यांना नुकतेच निलंबित केले आहे. 

शीख समाज महिलांची कोणत्याही स्वरूपात पूजा करत नसल्याने ते भारत माता की जय म्हणू शकत नाहीत, असे अमृतसर येथील शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सिमरनजितसिंग मान यांनी आज सांगितले. शिखांनी फक्त "वाहेगुरूजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह‘ असेच म्हणावे, असे मान म्हणाले. मान हे खलिस्तानचे समर्थक आहेत. मान म्हणाले की, शीख नागरिक वंदे मातरम्‌ सुद्धा म्हणू शकत नाहीत, हे भाजपला ठाऊक आहे. भाजपशासित हरियानामध्ये गीतेचा अभ्यास लादण्यात येत आहे, हे चुकीचे असल्याचा दावाही त्यांनी केला.
===============================================
सरकारने पाच हजार कोटी दडपले- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयंत पाटील 

मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने 8500 कोटी रुपयांची तूट असतानाही 3645 कोटींची तूट दाखवली असून, पाच हजार कोटींची तूट दडपल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला. अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना त्यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी व प्रत्यक्ष आकडे यांचा लेखाजोखा घेत, राज्याची आर्थिक स्थिती हलाखीची असतानाही नियोजनात अर्थमंत्र्यांना अपयश आल्याची टीका केली. 

सरकारने जुन्या योजना व जुन्या तरतुदींना नव्याने सादर करत आकड्यांचा खेळ केल्याचा आरोप पाटील यांनी केला. अपेक्षित महसुलात पाच हजार कोटींची घट झाल्याचे सरकारने अर्थसंकल्पाच्या विवरणात कबूल केले आहे. पण केवळ मोठ्या घोषणा करण्याच्या प्रेमात सरकारचे हे अपयश दडवण्याचा प्रयत्न केल्याचे जयंत पाटील म्हणाले आणि राज्याची वार्षिक योजना कर्नाटक, गुजरात व तेलंगणपेक्षाही कमी झाल्याचे आश्‍चर्य व्यक्त करताना, नियोजन कोलमडल्याचे हे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. 

कर्जाचा बोजा वाढवल्याची टीका आघाडी सरकारवर करत असताना युती सरकारने 2015-16 मधे 26 हजार कोटी, तर 2016-17 मधे 36 हजार कोटींचे कर्ज काढल्याचे निदर्शनास आणण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी सरकारी यंत्रणेवर कोरडे ओढत भाषण केले. 

आकडेवारीत हातचलाखी ः विखे 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अर्थसंकल्पातल्या आकडेवारीत हातचलाखी केल्याचा आरोप केला. सावकारांचे कर्ज माफ करून सरकारने सावकारीला प्रोत्साहन दिले असून, मागील वर्षी सावकारांच्या संख्येत दहा टक्के वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. 
===============================================
पाणी संवर्धन काळाची गरज; लोकसहभागाची आवश्‍यकता
माजी आमदार ईश्‍वरराव भोसीकर

नांदेड, 22- पाणी संवर्धन काळाची गरज आहे त्‍यासाठी पाण्‍याचा थेंब अन् थेंब जमिनीत मुरवून भू-गर्भातील पाणी पातळीत वाढ करण्‍यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन माजी आमदार ईश्‍वरराव भोसीकर यांनी केले. कंधार तालुक्‍यातील पानभोसी येथे नाला खोलीकर व सरळीकरणाचा शुभारंभ जागतिक जलदिनानिमित्‍त उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्‍याहस्‍ते मंगळवार दिनांक 22 मार्च रोजी करण्‍यात आला, त्‍यावेळी ते बोलत होते.
यावेळी गुरु गैबी नागेंद्र भारती महाराज, जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर, सरपंच सुवर्णताई नाईकवाडे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड, कार्यकारी अभियंता जी.पी. निवडंगे, तालुका कृषि अधिकारी गायकवाड, विश्‍वंभरराव मंगनाळे, उप विभागीय अभियंता गंगाधर एंबडवार, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, प्राचार्य राजेंद्र भोसीकर, जिल्‍हा कॉग्रेस कमीटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, अभियंता विशाल कदम, मिनी बिडीओ गोविंद मांजरमकर, कनिष्‍ठ अभियंता प्रशांत यल्‍लाळे, भगवान वरपडे आदींची उपस्थिती होती.
      पुढे ते म्‍हणाले, जलसंवर्धनासाठी नागरिकांनी गावातील मतभेद बाजूला सारुन एकत्र येण्‍याची गरज आहे. पाण्‍याची बचत करुन, पावसाचा प्रत्‍येक थेंब जमिनीत मुरविण्‍यासाठी गावस्‍तरावर उपाययोजना कराव्‍या लागतील. लोकसहभागातून पाणी स्‍त्रोताच्‍या संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. पूर्वी शेतीत तीन हंगाम घेतले जात. परंतु पाण्‍याच्‍या अभावामुळे आता एकच हंगाम शेतकरी घेत आहेत. ही परिस्थिती पूर्ववत आणण्‍यासाठी पाणी सवंर्धन होणे आवश्‍यक असल्‍याचे मत माजी आमदार ईश्‍वरराव भोसीकर यांनी व्‍यक्‍त केले.
      प्रारंभी उपस्थित मान्‍यवरांचा ग्राम पंचायतीच्‍या वतीने शॉल व पुष्‍पहार देऊन सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना उप विभागीय अधिकारी अश्विनी पाटील म्‍हणाल्‍या,  दुष्‍काळजन्‍य परिस्थितीवर मात करण्‍यासाठी राज्‍यात विविध प्रयोग केले जात आहेत. यात जलयुक्‍त शिवार अभियान उत्‍तम पर्याय असून नाला सरळीकरण व खोलीकरणासाठी लोकसहभागाची गरज आहे. ही कामे लोकसहभागातून करणा-या गावात शासनाच्‍या वतीने सहाय्यकारी यंत्र पुरविण्‍यात येतील. गावक-यांनी डि‍झेलचा भार उचलल्‍यास गावे जलयुक्‍त होण्‍यास वेळ लागणार नाही. आज पाण्‍याअभावी शेती उत्‍पन्‍न कमी होत असल्‍यामुळे शेतक-यांनी जोडव्‍यवसायावर भर देणे काळाची गरज आहे. यासाठी मुद्रा योजनेसारख्‍या योजनेतून दहा लाख रुपयांपर्यंत कर्जही उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे, अशी माहिती अश्विनी पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड यांनीही गावक-यांना मार्गदर्शन करतांना म्‍हणाले, शोषखड्डे करुन गावातले पाणी जमिनीत मुरविल्‍यास पाण्‍याची टंचाई भासणार नाही.
      पानभोसी येथे जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने चार लक्ष रुपयांचा निधी नाला खोलीकरण आणि सरळीकरणासाठी देण्‍यात आला असून सातशे मिटरपर्यंतचे काम यातून करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संजय भोसीकर यांनी केले. सुत्रसंचालन सोनटक्‍के तर उपस्थितांचे आभार गोविंद मांजरमकर यांनी मानले. यावेळी मन्‍मथ नाईकवाडे, बाबूसाहेब शेख, गंगाधर जोंधळे, बालाजीराव भातमोडे, माधव कांबळे, गजानन नाईकवाडे, विश्‍वांबर डुबूकवाड, शेख पाशा, संग्राम नरंगले, बालाजी भातमोडे यांच्‍यासह गावकरी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

No comments: