Friday, 25 March 2016

नमस्कार लाईव्ह २५-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- इस्लामाबाद; 'रॉ'च्या अधिकाऱ्याला अटक केल्याचा पाकचा दावा 
२- बेल्जियम; बॉम्बस्फोटानंतर ब्रसेल्समध्ये अडकलेले भारतीय मायदेशी 
३- काठमांडू; नेपाळचा चीनसोबत इंधन करार 
४- बीजिंग; चीनच्या अध्यक्षांवर टीका; 17 जण ताब्यात 
५- भारतीय पुजाऱ्याला इसिस चढविणार क्रूसावर? 
६- हिंदू-मुस्लिम शरणार्थींच्या पायांचे पोपकडून चुंबन! 
७- ब्रसेल्समध्ये पोलिसांच्या छाप्या दरम्यान स्फोट, १ ठार 
८- अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक, मेलानिया ट्रम्पच्या न्यूड फोटोचा वापर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
९- यंदा मान्सून तीन जूनलाच धडकणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज 
१०- नाशिक; किरीट सोमय्यांची भुजबळांच्या फार्म हाऊसवर धडक 
११- कॉंग्रेसविरुद्ध काही करायचे तर उघडपणे करेल - बाबा रामदेव 
१२- 'गुगल मॅप'वर जेएनयू ठरले 'अँटी नॅशनल' 
१३- वनस्पती तेलाची आयात ९.५१ टक्के वाढणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- भाजप म्हणजे निव्वळ भुंकणारं कुत्रं: शिवसेना  
१५- तुम्ही नाक दाबा, सरकार तोंड उघडेल, राज यांचा सराफांना सल्ला 
१६- पुणे; फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत : पोलिस 
१७- हज यात्रेसाठी सात हजार जागा 
१८- श्रीनगर; मेहबुबा बनणार काश्मीरच्या मुख्यमंत्री 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- दिल्ली; बॉल लागल्याने लाठ्या, लोखंडी रॉडने मारहाण, डॉक्टरचा मृत्यू 
२०- जम्मू; लडाखमध्ये हिमस्खलनात जवान बेपत्ता 
२१- नाशिक; महिलांना दर्शन मिळण्यासाठी त्र्यंबकेश्वरला साकडे 
२२- हसन अलीनंतर ‘ईडी’ आता कुरेशीच्या मागे 
२३- मुखेड; दुष्काळात तहानलेल्यांना पाणी पाजवणे सर्वात मोठे सत्कर्म - डाँ.दिलीप पुंडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- पाक विश्वचषकाच्या बाहेर, कांगारुंचा 21 धावांनी दणदणीत विजय 
२५- धोनी सर्वात हुशार खेळाडू अन् चांगला व्यक्ती - अभिनेता सुशांतसिंह राजपूत 
२६- निवृत्तीबाबत अद्याप विचार नाही- शाहीद आफ्रिदी 
२७- बंगळूरू; पाक संघाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांना समन्स 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही
(ऋषिकांत कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


========================================

भाजप म्हणजे निव्वळ भुंकणारं कुत्रं: शिवसेना 


नाशिक: भाजप आणि शिवसेनेतील वाद आता खालच्या थराला पोहोचला आहे. कारण ‘भाजप म्हणजे निव्वळ भुंकणारं कुत्रं आहे, त्यांना सत्तेचा गर्व चढला आहे.’ अशी थेट टीका शिवसेनेचे संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी केली आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. 
स्वतंत्र मराठवाड्याला भाजप नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रहाटकरांच्या कार्यक्रमात अक्षरश: धुडगूस घातला. ज्यात खुर्च्यांची आणि फर्निचरची मोडतोड तर केलीच. पण यामध्ये काही महिला जखमीही झाल्या. त्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या 9 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना गजाआड केलं आहे. तर 100 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 
पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शिवसेना संतापली आहे. जर नाशकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात, तर तिकडं पुण्यात फर्ग्युसनमध्ये राडा घालणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना मोकाट का सोडता? असा सवालही शिवसेनेनं केला आहे. 
दरम्यान, याप्रकरणी बोलताना भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी सेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘आजवर शिवेसना कायमच एकतर्फी वागत आली आहे. आमच्याकडून कधीच सेनेवर टीका केली जात नाही. सेनेकडून कायमच आमच्यावर टीका केली जाते.’ असं भंडारी म्हणाले.
========================================

पाक विश्वचषकाच्या बाहेर, कांगारुंचा 21 धावांनी दणदणीत विजय

पाक विश्वचषकाच्या बाहेर, कांगारुंचा 21 धावांनी दणदणीत विजय!
मोहाली: मोहालीच्या मैदानात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 21 धावांनी पराभव करुन टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं. या पराभवामुळं पाकिस्तानचं ट्वेन्टी20 विश्वचषकातलं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे. 
पीसीए स्टेडियमवर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला विजयासाठी 194 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, पाकिस्तानला 20 षटकांत आठ बाद 172 धावांचीच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉकनरनं 5 तर अॅडम झॅम्पानं 2 विकेट्स काढल्या. 
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ, शेन वॉटसन आणि ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर कांगारूंनी 20 षटकांत 4 बाद 193 धावांची मजल मारली. स्मिथनं नाबाद 61 धावांची खेळी केली. तर शेन वॉटसननं 21 चेंडूंमध्येच नाबाद 44 धावा कुटल्या. त्याआधी ग्लेन मॅक्सवेलनंही 18 चेंडूंत 30 धावा फटकावल्या आणि कांगारूंच्या विजयाचा पाया रचला.
========================================

बॉल लागल्याने लाठ्या, लोखंडी रॉडने मारहाण, डॉक्टरचा मृत्यू

बॉल लागल्याने लाठ्या, लोखंडी रॉडने मारहाण, डॉक्टरचा मृत्यू
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका डॉक्टराची हत्या केल्याचं समोर आलं आहे. क्रिकेटचा बॉल लागल्याने आरोपींनी डॉक्टरला बेदम मारहाण केली. या प्रकरणी एका महिलेसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी चार जण अल्पवयीन आहेत. 
काय आहे प्रकरण?
ही घटना बुधवारी रात्री घडली. भारताने बांगलादेशवर थरारक विजय मिळवला होता. विजयाच्या आनंदात डॉक्टर पंकज नारंग मुलासह क्रिकेट खेळण्यासाठी गेले. मात्र त्याचवेळी स्कूटीवरुन जाणाऱ्या तरुणांना रबरचा बॉल लागला.  त्यामुळे स्कूटीवरील नियंत्रण सुटलं. यावरुन त्यांच्यात वाद झाला. तसंच ‘बघून घेऊ’ अशी धमकी देऊन दुचाकीस्वार तिथून निघून गेला. 
काही वेळाने आरोपी त्यांच्या साथीदारांसह डॉ. पंकज नारंग यांच्या घरी धडकले. त्यानंतर डॉक्टरांना फरफटत घराबाहेर आणलं. आरोपींनी लाठ्यांनी आणि लोखंडाच्या रॉडने डॉक्टर नारंग यांना मारहाण केली. आरोपींनी डॉ. नारंग यांना कुटुंबीयांसमोरच मरेपर्यंत मारहाण केली. यावेळी डॉक्टर नारंग यांच्या मेव्हण्याने आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली.
========================================

तुम्ही नाक दाबा, सरकार तोंड उघडेल, राज यांचा सराफांना सल्ला

तुम्ही नाक दाबा, सरकार तोंड उघडेल, राज यांचा सराफांना सल्ला
मुंबई: वाढीव एक्साईज ड्युटीसंदर्भात मुंबई सराफा असोसिएशनच्या सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी “सणासुदीच्या काळातही दुकानं बंद ठेवा आणि सरकारला वठणीवर आणा. कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही”, असा सल्ला राज ठाकरेंनी सराफांना दिला. 
जगभरातल्या मोठया व्यापाऱ्यांना पुढे आणण्यासाठी सरकारने एक्साईज ड्युटी वाढवल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. 
यावेळी सराफांनीही भाजपला मतदान करुन चूक केल्याचं सांगत ज्वेलर्स संघटनेनं ‘हमारी भूल कमल का फूल’ अशा घोषणा दिल्या. 
यंदाच्या बजेटमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर वाढीव एक टक्का एक्साईज ड्युटी लावण्यात आली आहे. त्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून सराफा व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार त्यावर काहीच तोडगा काढत नसल्यानं आता सराफांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
========================================

'धोनी सर्वात हुशार खेळाडू अन् चांगला व्यक्ती'

'धोनी सर्वात हुशार खेळाडू अन् चांगला व्यक्ती'
मुंबई: ‘जगभरातील खेळाडूंपैकी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सर्वात हुशार खेळाडू आहे.’ या शब्दात अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने धोनीचं कौतुक केलं आहे. 
धोनीच्या जीवनावर आधारित सिनेमात सुशांत सिंह प्रमुख भूमिका साकरणार आहे. ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाचं दिग्दर्शन नीरज पांडे करणार आहे.
========================================

फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत : पोलिस

फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत : पोलिस
पुणे : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील घोषणाबाजीप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांना क्लीन चीट दिली आहे. कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत, अशी माहिती पोलिस उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली आहे.
 विद्यार्थ्यांनी केवळ मनुवाद आणि साम्राज्यवादविरोधीच घोषणा केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे याप्रकरणी आता अधिक तपास करणार नाही. तसंच देशविरोधी घोषणांचं हे प्रकरण आता बंद करण्यात आल्याचं दोषी यांनी स्पष्ट केलं.
========================================

यंदा मान्सून तीन जूनलाच धडकणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

यंदा मान्सून तीन जूनलाच धडकणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
मुंबई: यंदा पावसाचं आगमन चार दिवस आधीच म्हणजे 3 जून रोजी होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यंदा मान्सून केरळात 26 ते 27 मे दरम्यान येईल तर कोकणात 28 ते 29 मे दरम्यान दाखल होण्याचा अंदाज आहे. 
सध्या मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तापमानवाढ दिसून येत आहे.  गेल्या तीन वर्षांतील ही मोठी तापमानवाढ असून मान्सूनच्या पथ्यावर पडणारी आहे. 
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये राज्यातलं तापमान १.५ ते १.६ अंशांनी वाढलं आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होईल.
 दरम्यान येत्या 27 आणि 28 मार्च रोजी विदर्भात गारपीटीसह पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
========================================

किरीट सोमय्यांची भुजबळांच्या फार्म हाऊसवर धडक

किरीट सोमय्यांची भुजबळांच्या फार्म हाऊसवर धडक
नाशिक : भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या फार्महाऊसवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या चले जावच्या घोषणा देत, परिसर दणाणून सोडला. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी सोमय्यांना सुरक्षेच्या कारणास्तव त्याठिकाणी जाण्यास मनाई केली. 
सोमय्या पोलिस आयुक्तांच्या भेटीला 
किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांची भेट घेतली. 
सोमय्यांनी महाराष्ट्र सदन आणि पैशांच्या अफरातफरीप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांवर आणखी नवे आरोप केले आहेत. भुजबळांनी नाशिकमध्ये उभारलेल्या बंगल्यासाठी अशोक बिल्डकॉन या कंपनीचा पैसा वापरला, या व्यवहारात ४० कोटींचा भ्रष्टाचार झाला,असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. 
भुजबळांचा राजमहल 100 कोटींवर आहे. अशोक बिल्डकॉन या कंपनीच्या पैशांनी भुजबळांनी बंगला बांधला. टोल कॉन्ट्रॅक्टरच्या पैशातून भुजबळांनी बंगला बांधला, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. 
सोमय्या यांनी  पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ईडीसह एसीबीकडे याबाबत तक्रार दिली. त्यासोबतच मैत्रेय आणि केबीसी प्रकरणातही त्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली.
========================================

बॉम्बस्फोटानंतर ब्रसेल्समध्ये अडकलेले भारतीय मायदेशी

बॉम्बस्फोटानंतर ब्रसेल्समध्ये अडकलेले भारतीय मायदेशी
बेल्जियम : बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अडकेलेले भारतीय आज दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. जेट एअरवेजचं 9W 1229 हे विशेष विमान आज पहाटे 5 वाजता दिल्लीत दाखल झालं. 214 प्रवाशांसह आलेल्या या विमानातून 70 जण दिल्ली विमानतळावर उतरले, तर उर्वरित प्रवासी मुंबईला रवाना झाले. 
ब्रसेल्स विमानतळावर मंगळवारी झालेल्या चार शक्तीशाली स्फोटात 34 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 200 हून अधिक जण जखणी झाले होते. मात्र यानंतर अनेक भारतीय ब्रसेल्समध्ये अडकले आहेत.
brussels airport blast
दरम्यान, दोन विमानांनी भारतीयांना मायदेशी परत आणण्यात येणार होतं. मात्र एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने एकाच विमानातून 214 जणांना भारतात आणलं. आता हेच विमान पुन्हा ब्रसेल्समध्ये जाऊन आणखी काही भारतीयांना आणणार आहे. हे विमान संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबईहून ब्रसेल्ससाठी टेक ऑफ करणार आहे. 
मायदेशी परतलेले हे भारतीय रिकाम्या हातानेच परतले आहे. त्यांच्याकडे कोणतंही सामान नाही. इतकंच नव्हे तर त्यांच्या हॅण्डबॅग आणि पर्सही त्यांच्याजवळ नाहीत.
========================================
निवृत्तीबाबत अद्याप विचार नाही- शाहीद आफ्रिदी
मोहाली- क्रिकेटमधून निवृत्तीबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर याबाबत विचार करेल, असे पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने म्हटले आहे. 

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर निवृत्तीचे संकेत आफ्रिदीने दिले होते. पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया आज झालेल्या सामन्यापूर्वी छत्तीस वर्षीय आफ्रिदी म्हणाला, ‘निवृत्तीबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. परंतु, माझ्या देशात गेल्यानंतर याबाबत विचार करेल.‘ 
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान भारत, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा पराभव झाला आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर कर्णधार पदावरून आफ्रिदीला दूर करणार असल्याचे संकेत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिले आहेत.
========================================
'कॉंग्रेसविरुद्ध काही करायचे तर उघडपणे करेल'
हरिद्वार (उत्तराखंड) - उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या राजकारणामध्ये आपला काहीही सहभाग नसल्याचे म्हणत आपल्याला जर कॉंग्रेसविरुद्ध काही करायचे असेल तर आपण ते उघडपणे करू अशा प्रतिक्रिया योगगुरू रामदेवबाबा यांनी दिल्या आहेत. 
उत्तराखंडमधील कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्यामागे रामदेवबाबा आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते किशोर उपाध्याय यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर बोलताना रामदेवबाबा म्हणाले, ‘सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी उत्तराखंडमधील कॉंग्रेसची स्थिती नियंत्रणात आणावी. मी कोणाच्याही मदतीने काहीही केलेले नाही, हे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जर मला कॉंग्रेसच्याविरुद्ध काही करायचे असेल तर ते मी उघडपणे करेल‘ तसेच "काहीही असो मी राजकारणातून बाहेर पडलो आहे. सध्या मी योगा आणि आयुर्वेदाच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केले आहे. कॉंग्रेसने समंजसपणे वागावे. त्यांनी विनाकारण मला डिवचू नये आणि माझ्यावर खोटे आरोप करू नयेत‘, असा इशाराही रामदेवबाबांनी दिला.
========================================
लडाखमध्ये हिमस्खलनात जवान बेपत्ता
जम्मू- लडाखमध्ये आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या हिमस्खलनात दोन जवान गाडले गेले होते. एका जवानाला बाहेर काढण्यात यश असून एक जवान अद्याप बेपत्ता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बर्फाखाली अडकलेल्या जवानाला बाहेर काढून उपचारासाठी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. दुसऱ्या बेपत्ता असलेल्या जवानाचा शोध घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.‘
जम्मू-काश्‍मीरमधील पर्वतभागांत हिमवृष्टीचा अंदाज आज वर्तविण्यात आला होता. नागरिकांना उंच ठिकाणी न जाण्याचे आदेश देण्यात आले होते. सियाचिन येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या हिमस्खलनामध्ये 10 जवान हुतात्मा झाले होते.
========================================
'रॉ'च्या अधिकाऱ्याला अटक केल्याचा पाकचा दावा
इस्लामाबाद- भारतीय गुप्तचर संस्थेच्या (रॉ) एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून भारतीय उच्चायुक्तांकडे याबाबतची माहिती देण्यात आली आहे, असा दावा पाकिस्तानने आज (शुक्रवार) केला आहे. 
पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव भूषण यादव असे आहे. यादव हे भारतीय नौदलातील अधिकारी आहे. ‘रॉ‘ने त्यांना बलुचिस्तान व कराचीमधील माहिती मिळविण्यासाठी धाडले होते. शिवाय, स्थानिक अतिरेक्‍यांना मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबतची माहिती भारतीय उच्चायुक्तालयाला देण्यात आली आहे.‘ 
‘रॉ‘च्या एका अधिकाऱ्याला दक्षिण बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती स्थानिक दहशतवादाला मदत करत होती. भारताने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नोंदविलेली नाही, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 
दरम्यान, पाकिस्तानचे सर्व आरोप भारताने फेटाळले आहेत.
========================================
'गुगल मॅप'वर जेएनयू ठरले 'अँटी नॅशनल'!
नवी दिल्ली - ‘गुगल मॅप‘ वर आज ‘anti national‘, ‘sedition‘ किंवा ‘leftist‘ असा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) दर्शविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 




संपूर्ण जगाचा नकाशा आणि त्यातील प्रमुख रस्ते, ठिकाणे इत्यादी माहिती दाखविणारी ‘गुगल मॅप‘ ही ‘गुगल‘ची सेवा आहे. गुगल मॅपवर जगभरातील कोणत्याही स्थळाचे नाव टाईप केल्यावर ते ठिकाण नकाशावर दाखविण्यात येते. मात्र आज शोध घेताना ‘anti national‘, ‘sedition‘ किंवा ‘leftist‘ असा शब्द टाईप केला तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दर्शविण्यात येत आहे. हा प्रकार चुकून झाले आहे की हॅकरने केले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 9 फेब्रुवारीला देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. देशद्रोहाच्या आरोपाखाली विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. 
ट्‌विटरवर "गुगल मॅप‘ ट्रेण्डमध्ये! 
हा प्रकार समोर आल्यानंतर नेटिझन्स या विषयावर चर्चा करत असून ट्‌विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये "गुगल मॅप‘ आढळून येत आहे. नेटिझन्सकडून यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
========================================
नेपाळचा चीनसोबत इंधन करार

काठमांडू - इंधनाच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नेपाळने भारतावरील परावलंबित्व दूर करण्यासाठी चीनसमवेत विविध करार केले आहेत. त्यामुळे यापुढे भारताशिवाय चीनकडूनही नेपाळ इंधन खरेदी करू शकणार आहे. 
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नुकतीच बीजिंगला भेट दिली. त्यावेळी हे करार करण्यात आले. भारत हा नेपाळला अनेक वर्षांपासून इंधनपुरवठा करणारा पारंपारिक निर्यातदार देश समजला जातो. नेपाळच्या राज्यघटनेत अलिकडे काही बदल करण्यात आले आहेत. मात्र यामुळे मैदानी भागात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मधेशी नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मधेशी नागरिक आंदोलन करत आहेत. त्यामुळे नेपाळचे भारताशी असलेले संबंध ताणले गेले आहेत. या सर्व प्रकारामुळे नेपाळ भारतावर अवलंबून असल्याचे दिसून आले. परिणामी नेपाळने भारतावर अघोषित नाकेबंदीचा आरोपही केला होता. नेपाळच्या मते, भारताकडून होणाऱ्या अघोषित नाकेबंदीमुळे नेपाळला गॅस, औषधे आणि इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा भासत आहे. त्यामुळेच नेपाळ आणि चीनदरम्यान चार अब्ज डॉलरचे करार झाले आहेत. नेपाळमध्ये तेलसाठ्याची गोदामे बांधणे, तिबेट रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून नेपाळपर्यंत रेल्वेजाळे उभारणे असे विविध करारांचा त्यामध्ये समावेश आहे.
========================================
चीनच्या अध्यक्षांवर टीका; 17 जण ताब्यात

बीजिंग : अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या 17 जणांना चीनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. ‘बीबीसी‘ने दिलेल्या वृत्तानुसार, जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे पत्र ‘वुजी न्यूज‘ या चीनच्या सरकारी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले होते. ते तातडीने हटविण्यात आले. 
अशा प्रकारची टीका आणि राजीनाम्याची मागणी थेट सरकारी संकेतस्थळावरच होणे चीनमधील प्रशासनास रुचलेले नाही. या प्रकरणावर कडक भूमिका घेण्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या पत्रप्रकरणामध्ये चीनमधील प्रसिद्ध स्तंभलेखक जिया जिया यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ‘याच प्रकरणामध्ये इतर 16 जणांनाही ‘ताब्यात‘ घेतले आहे‘ अशी माहिती या संकेतस्थळाशी संबंधित एका कर्मचाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ‘बीबीसी‘ला दिली. यामध्ये वरिष्ठ संपादक आणि व्यवस्थापकांसह संकेतस्थळाचे काम पाहणारे सहा कर्मचारी आणि त्या संकेतस्थळाशी निगडीत असलेल्या एका तंत्रज्ञान कंपनीतील दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 
चीनमधील सर्व सत्ता शी जिनपिंग स्वत:च्या हातात राखू इच्छित आहेत, असा आरोप त्या पत्रामध्ये करण्यात आला होता. तसेच, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणखी मर्यादा लादण्यात आल्याचाही आरोप त्यात होता. अर्थात, चीनमधील निर्बंध पाहता, कोणताही सुज्ञ पत्रकार किंवा संपादक अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध करण्याची शक्‍यता कमी वाटते, असे निरीक्षकांचे मत आहे. ‘वुजी न्यूज‘चे संकेतस्थळ ‘हॅक‘ झाले असावे किंवा एखादे ‘ऑटो-पब्लिशिंग‘ सॉफ्टवेअर वापरल्याने हा गोंधळ झाल्याचेही सांगितले जात आहे.
========================================
भारतीय पुजाऱ्याला इसिस चढविणार क्रूसावर?


सना- भारतीय कॅथॉलिक पुजाऱ्याची इसिसकडून आज गुड फ्रायडेच्या दिवशी क्रूसावर चढवून हत्या होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी येमेनमध्ये इस्लामिक स्टेट तथा इसिस या दहशवादी संघनटनेकडून फादर टॉम उझूनल्लील यांचे अपहरण करण्यात आले होते.
एडन येथील एका वृद्धाश्रमावर इसिसने 4 मार्च रोजी हल्ला करून किमान 15 जणांना ठार केले होते. त्यावेळी इसिसच्या दहशतवाद्यांनी 55 वर्षीय फादर टॉम उझूनल्लील यांचे अपहरण केले होते. 
फादर टॉम हे मूळचे बंगळूर येथील आहेत. त्यांना गुड फ्रायडे या ख्रिश्चन सणादिवशी त्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने मारण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली असल्याचे अनेक धार्मिक संघटनांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.  
‘फ्रँसिस्कन सिस्टर्स ऑफ सेलेशियन‘ या दक्षिण आफ्रिकन ख्रिश्चन साध्वींच्या संघटनेने सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. "आम्हाला अशी माहिती देण्यात आली आहे की, सेलेशियन पंथाच्या पुजाऱ्याचा छळ करण्यात येत असून, गुड फ्रायडेला त्यांना क्रूसावर चढविण्यात येणार आहे. आपल्या सर्वांच्या गंभीर प्रार्थनांची गरज आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
========================================
पाक संघाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांना समन्स

बंगळूर- ट्‌वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघादरम्यान झालेल्या सामन्यावेळी पाकिस्तान संघाला पाठिंबा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना समन्स देण्यात आले आहे. 
कोलकता येथे 19 मार्च रोजी भारत-पाकिस्तान संघादरम्यान सामना झाला होता. यावेळी सफवान व अब्दुल रशीद (दोघेही रा. सत्तूर, दक्षिण कन्नड) या दोन विद्यार्थ्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद‘ व ‘जय पाकिस्तान‘ असा मजकूर व्हॉट्‌सऍपवर टाकला होता. याबाबतची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. 
पोलिस अधीक्षक एस. डी. शरणप्पा म्हणाले, ‘तांत्रिकदृष्ट्या त्यांना अटक करण्यात आली नसली तरी त्यांना समन्स देण्यात आला आहे. शिवाय, पुढील तपास सुरू आहे.‘
========================================
हिंदू-मुस्लिम शरणार्थींच्या पायांचे पोपकडून चुंबन!

कासेलनोवो दी पोरटो- पोप फ्रान्सिस यांनी हिंदू-मुस्लिम व ख्रिश्‍चन शरणार्थींचे पाय पवित्र पाण्याने धुवून त्याचे चुंबन घेतले. सर्वजण एकाच ईश्वराचे लेकरे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 
ईस्टर सप्ताहानिमित्त गुरुवारी (ता. 24) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी बोलताना पोप म्हणाले, ‘ब्रुसेल्स हल्ल्यानंतर मुस्लिम विरोधी व शरणार्थी विरोधी भावना प्रबळ होत आहेत. विविध शस्त्रास्त्रांद्वारे दहशतवादी हल्ले घडवून नागरिकांचे बळी घेतले जात आहेत. मात्र, हे चुकीच्या मार्गाने जात आहेत. आपण सर्वजण विविध धर्माचे व वेगवेगळ्या संस्कृतीत वाढत असलो तरी एकमेकांचे भाऊ आहोत. सर्वांचा देव एकच आहे. सर्वांनी शांततेत रहायला हवे.‘
========================================
महिलांना दर्शन मिळण्यासाठी त्र्यंबकेश्वरला साकडे
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात तृप्ती देसाई यांनी पूजा केली. गाभाऱ्यामध्ये महिलांना दर्शन मिळावे यासाठी देसाई यांनी येथे साकडे घातले. 
देसाई मंदिरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना स्थानिक महिलांनी विरोध दर्शवत गाडी अडवली. पोलिसांनी गाडी पुढे नेत मार्ग काढला. 
भूमाता ब्रिगेडने यापूर्वी शनिशिंगणापूर येथील चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन केले होते. आता त्र्यंबकेश्वरमधील मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
शनिशिंगणापूर येथील शनिमंदिरात महिलांना प्रवेश मिळायला हवा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले होते. नगर जिल्ह्यातील या शनिमंदिरातील चौथऱ्यावर प्रवेश केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मंदिर व्यवस्थापनाने महिलांना प्रवेश देण्यास विरोध केला होता. 
========================================

ब्रसेल्समध्ये पोलिसांच्या छाप्या दरम्यान स्फोट, १ ठार


  • ब्रसेल्स, दि. २५ - ब्रसेल्सच्या स्चारबीक जिल्ह्यामधील एका घरात शोध मोहिम सुरु असताना स्फोटाचा मोठा आवाज झाल्याचे वृत्त बेल्गा न्यूज एजन्सीने दिले आहे. सुरक्षापथकांनी एका व्यक्तीला अटक केली आहे पण यासंबंधी अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही असे आरटीबीफ वृत्तवाहिनीने सांगितले. 
    बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये मंगळवारी अतिरेक्यांनी तीन स्फोट घडवून आणले. या स्फोटामध्ये ३१ जण ठार झाले तर, ३१६ जण जखमी झाले. याच अतिरेकी हल्ल्या प्रकरणी शोध मोहिम सुरु असताना स्फोट झाला. या हल्ल्या प्रकरणी आतापर्यंत सहाजणांना अटक झाली आहे. 
========================================

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक, मेलानिया ट्रम्पच्या न्यूड फोटोचा वापर


  • वॉशिंग्टन, दि. २५ - रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांच्यात सुरु असलेल्या राजकीय लढाईने खालची पातळी गाठली आहे. मंगळवारी ट्रम्प विरोधी गटाने एरिझोनामध्ये मतदानापूर्वी सोशल मिडीयावर ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्पचा एका विवस्त्र फोटो प्रसिद्ध केला. 
    'मेलानिया ट्रम्प यांना भेटा तुमच्या भविष्यातील फर्स्ट लेडी' तुम्हाला हे चित्र नको असले तर, तुम्ही टेड क्रूझ यांना मंगळवारी पाठिंबा द्या असा प्रकारचा प्रचार ट्रम्प विरोधी गटाने चालवला होता. स्लोवानियन-अमेरिकन ज्वेलरी डिझायनर असलेल्या ४५ वर्षाच्या मेलानिया ट्रम्प आधी मॉडलिंग करायच्या. 
    मेलानिया यांचा हा न्यूड फोटो विवाहापूर्वीचा आहे.  २००० साली जीक्यू मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटच्यावेळचा हा न्यूड फोटो आहे. ट्रम्प यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांचे विरोधक आता या फोटोचा उपयोग करत आहेत. 
    या प्रचारावर खवळलेल्या ट्रम्प यांनी टेड क्रूझ यांना तुमच्या पत्नीचाही अशाच प्रकारे प्रचार होऊ शकतो असा इशारा दिला आहे. त्यावर क्रूझ यांनीही लगेच प्रत्युत्तर दिले आहे. ट्रम्प तुमच्या पत्नीचा हा फोटो आम्ही समोर आणलेला नाही. पण तुम्ही माझ्या पत्नीबाबत असे करायचा विचार करत असाल तर, मी समजतो त्यापेक्षा तुम्ही तुम्ही डरपोक आहात असेच मी म्हणेन. 
========================================

वनस्पती तेलाची आयात ९.५१ टक्के वाढणार

  • नवी दिल्ली : तेलबियांचे उत्पादन कमी आणि खाद्यतेलाची मागणी जास्त राहणार असल्याने २०१५-१६ या काळात वनस्पती तेलाची आयात ९.५१ टक्क्यांनी वाढून १६० लाख टन होण्याची शक्यता आहे.
    २०१५-१६ या पीक वर्षात कपाशी बियाणे (सरकी) आणि खोबरे यासह खरीप आणि रबी हंगामात होणारे तेलबियाणे उत्पादन ३१८.१६ लाख टन होण्याची शक्यता आहे. २०१४-१५ मध्ये ते ३३६.७९ लाख टन होते. सॉल्व्हेंट अ‍ॅक्स ट्रॅक्टर्स असोसिएशन (एसईए) या औद्योगिक संघटनेने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, २०१५-१६ (नोव्हेंबर ते आॅक्टोबर) या काळात वनस्पती तेलाची एकूण आयात १६० लाख टन राहण्याची शक्यता आहे. २०१४-१५ मध्ये ही आयात १४६.१ लाख टन होती.
    या निवेदनात पुढे म्हटले आहे की, समान व्यावसायिक संधीसाठी कच्चे आणि रिफाईन्ड तेलातील आयात शुल्काचे अंतर ७.५ टक्क्यांवरून वाढवून १५ टक्के केले पाहिजे. सध्या रिफायनरीची जेवढी क्षमता आहे, त्याच्या ४० ते ५० टक्के क्षमतेचाच वापर केला जातो. आयात शुल्क वाढविल्यास या कारखान्यांची क्षमताही वाढेल.
    सध्या वनस्पती तेल उद्योगाला वाईट दिवस आले आहेत. गेल्या काही महिन्यांत रिफाईन्ड तेलाची आयात वाढल्याने तेल कारखान्यांच्या क्षमतेवर वाईट परिणाम झाला आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
    गेल्या वर्षी सरकारने सप्टेंबरमध्ये कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क ७.५ टक्क्यांवरून वाढवून १२.५ टक्के, तर रिफाइन्ड खाद्यतेलावरील शुल्क १५ टक्क्यांवरून वाढवून २० टक्के केले होते.
========================================

हज यात्रेसाठी सात हजार जागा

  • - जमीर काझी,  मुंबई
    मुस्लीम धर्मामध्ये अत्यंत पवित्र व महत्त्वपूर्ण मानल्या जात असलेल्या सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी यंदा केंद्रीय हज कमिटी आॅफ इंडियाने राज्य व केंद्रशासित प्रदेशनिहाय यात्रेकरूंच्या जागा (कोटा) जाहीर केल्या आहेत. देशात सर्वाधिक २१,८२५ जागा उत्तर प्रदेशला मिळालेल्या आहेत, तर महाराष्ट्रातून कमिटीच्या मार्फत ७,३५७ भाविकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार आहे. या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यादरम्यान हजचा मुुख्य विधी होणार आहे. त्यासाठी भारतातून कमिटीमार्फत जाण्यासाठी तब्बल ४ लाख ५ हजार १८७ जण इच्छुक असताना समितीच्या वाट्याला ९८ हजार ८२० जागा आल्या आहेत. त्यामुळे सोडतीद्वारे (ड्रॉ) यात्रेकरूंची निवड केली जाणार आहे. या सोडतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे हज कमिटी आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अताऊर रहमान यांनी  सांगितले.
========================================

मेहबुबा बनणार काश्मीरच्या मुख्यमंत्री

  • श्रीनगर : मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षपदी व मुख्यमंत्रीपदीच्या उमेदवार म्हणून मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड झालीे. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या मेहबुबा काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील. आज पार्टी अध्यक्षांच्या निवडीसाठी मेहबुबा यांच्या घरी पीडीपीच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली. त्यात मेहबुबा यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते मुजफ्फर हुसेन बेग यांनी दिली. भाजपाच्या पाठिंब्याचे पत्र मिळाल्यानंतर शुक्रवारी त्या सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना भेटणार आहेत. त्यानंतर मेहबुबा मुफ्ती आणि भाजपा नेते मिळून शपथविधीची तारीख ठरवतील. कोणतीही अट नाही... मंगळवारी मेहबुबा मुफ्ती यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पीडीपी-भाजपा युतीच्या चर्चांना वेग आला होता. त्यात ठरलेल्या अजेंड्यानुसार आणि कोणत्याही अटींविना सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचेही बेग यांनी सांगितले. एकूण ८७ सदस्यसंख्या असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीकडे सर्वाधिक २७ आमदार असून, भाजपाकडे २५ आमदारांचे बळ आहे.
========================================

हसन अलीनंतर ‘ईडी’ आता कुरेशीच्या मागे


  • संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गाडण्यात आलेल्या जुन्या प्रकरणांशी संबंधित सर्व फायलींवरील धूळ झटकण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या महिन्यात पुण्यातील घोडे व्यापारी हसन अली यांच्याशी संबंधित करचोरी आणि हवाला व्यवहाराबद्दलच्या प्रकरणांच्या फायली पुन्हा उघडल्या होत्या आणि आता दिल्लीतील मांस निर्यातदार मोईन अख्तर कुरेशी हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.
    ईडीने पुन्हा एकदा हसन अलींच्या पुणे आणि अन्य शहारांमधील प्रतिष्ठानांवर छापे घातले आहेत. ईडीचे संचालक कर्नल सिंग यांनी ईडीच्या प्रादेशिक प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांच्या फायलींवरील धूळ झटकण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यासोबतच अनेक काँग्रेस नेत्यांसोबत निकटचे संबंध असलेले मोईन अख्तर कुरेशी यांच्याविरुद्धच्या सर्व प्रकरणांचा पुन्हा तपास करण्याचा निर्णय आयकर विभाग आणि ईडीने घेतल्याचे समजते.
========================================
 दुष्काळात तहानलेल्यांना पाणी पाजवणे सर्वात मोठे सत्कर्म - डाँ.दिलीप पुंडे

सर्वांनी अनुकरण करण्याचे आवाहण "
मुखेड:- 
      तालुक्यातील दुष्काळसदृष्य परिस्थिती मध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असुन पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणुन राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष डाँ.रामराव श्रीरामे यांनी मोफत  राष्ट्रीय समाज पक्ष शाखा मुखेड च्यावतीने टँकर द्वारे शहरात मोफत पाणीपुरवठा करणार असुन दुष्काळात तहानलेल्यांना पाणी पाजवणे सर्वात मोठे सत्कर्म असुन तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक नेते कार्यकर्त्यांनी याचे अनुकरण करावे असे आवाहण मुखेड भुषण डाँ.दिलीप पुंडे यांनी केले.
       राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शहरात टँकर द्वारे मोफत पाणीपुरवठा होणार असुन या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणुन डाँ.पुंडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रासपचे जिल्हाध्यक्ष भगवानराव हाक्के, प्रदेश सचिव गोविंद सुरनर, पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, युवा नेते महेश राठोड, भाजपाचे टी.व्ही.सोनटक्के, शहराध्यक्ष बाबुराव मरेवाड, सरचिटणिस नामदेव बोमनवाड, कोषाध्यक्ष कल्याण सावकार भालके आदी उपस्थित होते. मोफत टँकर चा उद्घाटन डाँ.दिलीप पुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक डाँ.रामराव श्रीरामे यांनी केले. 
      मुखेड तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यात गेल्या दोन वर्षापासुन तीव्र पाणीटंचाई भासत आहे. घागरभर पाण्यासाठी मैलभर प्रवास करताना नागरिक दिसत आहेत. महिलांसह शाळकरी मुलेही पाण्यासाठी भटकंती करत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणुन राष्ट्रीय समाज पक्ष शाखा मुखेड च्यावतीने तालुक्यात टँकर द्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शासनाकडुन अपेक्षा न ठेवता स्वपुढाकारातुन जनसेवेसाठी सर्वांनी प्रयत्न करने गरजेचे आहे. याउपकृमाची सर्व स्तरातुन प्रशंसा होत आहे. याप्रसंगी शहर व तालुक्यातील रासपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: