Wednesday, 30 March 2016

नमस्कार लाईव्ह ३०-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ढाका; क्रूरतेची परिसीमा ...प्रियकराचं ह्रदय कापून बाहेर काढणा-या प्रेयसीला फाशीची शिक्षा 
२- लाहोर हल्ल्याप्रकरणी 5 हजारांहून अधिक जणांची चौकशी 
३- न्यॅपीताव; हितीन कॅओ यांनी घेतली अध्यक्षपदाची शपथ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- सहाराची संपत्ती विका, सुप्रीम कोर्टाचे सेबीला आदेश 
५- 'आप'चा आमदार खरेदी करून दाखवाच- केजरीवाल 
६- टाटा स्टील यूकेमधील स्टील उद्योग विकणार 
७- 'भारत माता की जय'न म्हणणाऱ्यांना मारहाण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- डान्सबारमध्ये दारुबंदी, बारबालांना स्पर्शासही मज्जाव 
९- महाराष्ट्रात सध्याची राज्यव्यवस्था मजबुरीतून - उद्धव ठाकरे 
१०- गणेश पांडे प्रकरण राज्य महिला आयोगाकडे, मुख्यमंत्र्यांची घोषणा 
११- विमान प्रवासात त्रिशुळ बाळगल्याप्रकरणी राधे माँवर गुन्हा दाखल 
१२- हेरगिरी प्रकरणी अटकेतील कुलभूषण जाधवांचा कबुलीनामा 
१३- शाळांचा आठवडा पाच दिवसांचा करा  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- पालघर; पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधमांनी दीड वर्षाच्या भावाचं गुप्तांग कापलं 
१५- नाशिक; नाशकात आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांचा तळ 
१६- संगमनेर; रिक्षाचालकाचा मुलगा होणार न्यायाधीश 
१७- सरूड; महिलांना घरबसल्या रोजगार 
१८- ... तर डॉ. आंबेडकर पहिले पंतप्रधान असते! - ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- धोनीची 'राजकन्या' आणि टीम इंडियाचा 'राजकुमार' एकाच सेल्फीत 
२०- घरच्या मैदानात रहाणेने घाम गाळला 
२१- भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी विंडिज टीम धोबी तलावावर 
२२- सोशल मीडियावरील खिल्लीनंतर हरभजनची सटकली 
२३- कोहलीच्या खेळीतून शिकण्यासारखे- विल्यम्सन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
सुरेश चतलावार, मयूर पवार, विष्णू ताटे, लक्ष्मण हसेकर, विलाश आडे, विशाल कदम, न्यूटन वांकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी मानसे कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभे राहतात
(अजय कागदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


==============================================

गणेश पांडे प्रकरण राज्य महिला आयोगाकडे, मुख्यमंत्र्यांची घोषणा

गणेश पांडे प्रकरण राज्य महिला आयोगाकडे, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : गणेश पांडेवरील विनयभंगप्रकरणी ‘एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनयभंगाच्या आरोपाचं प्रकरण महिला आयोगाकडे सुपूर्द केलं आहे. याप्रकरणी महिला आयोग चौकशी करुन कारवाई करेल. तसंच गरज भासल्यास पोलिसातही तक्रार दाखल करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यानी विधानपरिषदेत स्पष्ट केलं.
मुंबई भाजयूमोचा माजी शहराध्यक्ष असलेल्या गणेश पांडेवर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. 4 मार्चला गणेश पांडेने अश्लील वर्तन केल्याची तक्रार या महिलेने भाजपकडे केली. परंतु गणेश पांडेची फक्त पक्षतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र त्याच्यावर पोलिस कारवाई अजूनही झाली नाही.
आता मुख्यमंत्र्यांनी प्रकरण महिला आयोगाकडे सोपवलं आहे. दुसरीकडे भाजपनेही याप्रकरणी पक्षांतर्गत चौकशी समिती नेमली आहे. या समितीमध्ये विधानपरिषदेच्या सदस्या शोभाताई फडणवीस, मनिषा चौधरी, स्मिता वाघ यांचा समावेश आहे. ही समिती संबंधितांशी चर्चा करुन आणि वस्तुस्थितीची माहिती घेऊन अहवाल सादर करेल.
==============================================

सहाराची संपत्ती विका, सुप्रीम कोर्टाचे सेबीला आदेश

सहाराची संपत्ती विका, सुप्रीम कोर्टाचे सेबीला आदेश
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सहारा ग्रुपला मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने सेबीला सहारा ग्रुपची संपत्ती विकण्यासाठी परवानगी दिली आहे. सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना जामीन मिळवून देण्यासाठी त्यांची 86 संपत्ती विका आणि जामीनासाठी पैसा जमवा, असं न्यायालयाने सेबीला सांगितलं.

तसंच ही संपत्ती सर्कल रेटच्या 90 % पेक्षा कमी किंमतीत विकू नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने ज्या संपत्तीच्या विक्रीसाठी परवानगी दिली आहे, त्यांची किंमत सुमारे 40 हजार कोटी रुपये आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहाराच्या संपत्तीची विक्री करण्यास तातडीने सुरुवात करावी, असं न्यायमूर्ती टीएस ठाकूर यांनी सेबीला सांगितलं. 
का तुरुंगात आहेत सुब्रतो रॉय?
गुंतवणूकदारांचे 24 हजार कोटी रुपये परत देण्याचा न्यायलयाचा आदेश न पाळल्याने सुब्रतो रॉय आणि सहारा ग्रुपचे दोन संचालक 4 मार्च 2014 पासून तुरुंगात आहेत. आता या प्रकरणाची 27 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. 
एसआयआरईसीएल आणि एसएचएफसीएल या सहारा ग्रुपच्या दोन कंपन्यांनी 2007-2008 मध्ये 24 हजार कोटी रुपयांची रक्कम गुंतवणूकदारांकडून वसूल केली होती.
==============================================

धोनीची 'राजकन्या' आणि टीम इंडियाचा 'राजकुमार' एकाच सेल्फीत

धोनीची 'राजकन्या' आणि टीम इंडियाचा 'राजकुमार' एकाच सेल्फीत!
मुंबई : क्रिकेटच्या मैदानातील महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यातील पार्टनरशिपपेक्षा आणखी इंटरेस्टिंग काय असेल? विराट कोहलीचा नवा सेल्फी पाहिल्यावर याचं उत्तर मिळेल. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराटने झिवा धोनीसोबतचा एक क्यूट सेल्फी शेअर केला आहे. 
विराटने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर झिवासोबतचा सेल्फी शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या या सेल्फीला तब्बल एक लाखांहून अधिक लाईक्स आणि सुमारे 4000 कमेंट मिळाल्या आहेत. अशीच परिस्थिती फेसबुकवरही आहे.
==============================================

विमान प्रवासात त्रिशुळ बाळगल्याप्रकरणी राधे माँवर गुन्हा दाखल

विमान प्रवासात त्रिशुळ बाळगल्याप्रकरणी राधे माँवर गुन्हा दाखल
मुंबई: विमानातून बेकायदेशीररित्या त्रिशुळ घेउन प्रवास केल्याने स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँवर गुन्हा दाखल झाला आहे. २०१५ मध्ये ऑगस्ट महिन्यात औरंगाबाद ते मुंबई विमान प्रवासात राधे माँने त्रिशुळ घेऊन प्रवास केला होता. 
याप्रकरणी असद पटेल यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरुन कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई विमानतळ पोलिस स्थानकात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
राधे माँसह सीआयएसएफचे ३ अधिकारी आणि जेट एअरवेजच्या २ अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दरम्यान, याआधीही राधे माँ विरोधात अभिनेत्री डॉली बिंद्राने तक्रार नोंदवली होती. राधे माँनं अश्लील हावभाव केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप डॉलीनं केला होता.
==============================================

पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधमांनी दीड वर्षाच्या भावाचं गुप्तांग कापलं

पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधमांनी दीड वर्षाच्या भावाचं गुप्तांग कापलं
पालघर : बोईसरमध्ये पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून तिच्या दीड वर्षांच्या भावाच्या डोक्यावर वार करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर मुलाचं लिंग कापून आरोपी फरार झाला आहे. 
बोईसर दांडी पाडामध्ये हा पहाटेच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला. या घटनेत दोन्ही मुलं गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलांना उपचारांसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
या प्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पालघरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी जी यशोद, उपपोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्त्वात एक विशेष पथकाची स्थापना केली असून आरोपीचा शोध सुरु आहे.
==============================================

घरच्या मैदानात रहाणेने घाम गाळला

घरच्या मैदानात रहाणेने घाम गाळला
मुंबई: टीम इंडियाचा मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे मंगळवारी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरील नेट्समध्ये घाम गाळताना दिसला. मनीष पांडेनंही काही काळ फलंदाजीचा सराव केला. 
मोहालीतील सामन्यादरम्यान भारताचा युवराज सिंगचा घोटा दुखावल्यामुळं टीम इंडियानं मनीषला मुंबईत बोलावून घेतलं आहे. युवराजला विश्वचषकातून माघार घ्यावी लागली, तर रहाणे अथवा मनीषला टीम इंडियात स्थान मिळू शकतं. त्यामुळंच दोघं नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसले. 
धोनी ब्रिगेडच्या बाकीच्या शिलेदारांनी मात्र मंगळवारचा दिवस विश्रांती घेणंच पसंत केलं. 
दुसरीकडे डॅरेन सॅमीच्या वेस्ट इंडीज संघानं मंगळवारी दुपारी सरावासाठी मुंबईचं ब्रेबॉर्न स्टेडियम गाठलं. 2012 साली विंडीजनं ट्वेन्टी20 विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. यंदा साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकणाऱ्या विंडीजला चौथ्या सामन्यात अफगाणिस्तानकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता.
==============================================

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी विंडिज टीम धोबी तलावावर

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी विंडिज टीम धोबी तलावावर
मुंबई: भारताविरुद्ध उपांत्य लढतीआधी वेस्ट इंडीजची टीम अगदी रिलॅक्स्ड मूडमध्ये दिसली.  गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ट्वेन्टी20 विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी मंगळवारी कर्णधार डॅरेन सॅमीनं आपल्या टीमसोबत बातचीत केली, तेव्हाही कुणाच्या चेहऱ्यावर तणाव नव्हता. 
विंडीजच्या काही खेळाडूंनी मुंबईच्या धोबी तलाव परिसरातील एका दुकानाला भेट दिली आणि स्पोर्टस गॉगल्स खरेदी केले. 
विंडीजच्या संघातील ट्वेन्टी20 क्रिकेटचे स्टार्स भारतातही लोकप्रिय आहेत.  साहजिक कॅरिबियन खेळाडू जिथे जातात, तिथं त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहतेही उस्तुक दिसतात. 
दरम्यान, वेस्ट इंडीजचा अष्टपैलू आंद्रे फ्लेचरनं दुखापतीमुळं ट्वेन्टी20 विश्वचषकातून माघार घेतली आहे. फ्लेचर मायदेशी परतला असून, त्याऐवजी लेण्डल सिमॉन्सचा विंडीजच्या संघात समावेश करण्यात आल्याची माहिती पीटीआयनं दिली आहे. फ्लेचरनं साखळी फेरीत श्रीलंकेविरुद्ध सामन्यात 84 धावांची खेळी करून विंडीजच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. पण रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध साखळी सामन्यादरम्यान फ्लेचरच्या मांडीचे स्नायू दुखावले होते, त्यामुळंच त्यानं ट्वेन्टी20 विश्वचषकातून माघार घेतली.
==============================================

सोशल मीडियावरील खिल्लीनंतर हरभजनची सटकली

सोशल मीडियावरील खिल्लीनंतर हरभजनची सटकली
मुंबई : सोशल मीडियावरुन जसं एखाद्याचं कौतुक केलं जातं, तसंच खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट आणि जोक्सही व्हायरल होतात. टी 20 विश्वचषकात कामगिरी दाखवण्याची संधी न मिळाल्याने टीम इंडियाचा लाडका भज्जी म्हणजेच हरभजन सिंगही विनोदाचा विषय ठरला. मात्र या टवाळखोरांना हरभजनने चांगलंच धारेवर धरलं. 
आर अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांची कामगिरी सुधारत असताना भज्जी मात्र परफॉर्म करु शकलेला नाही. मात्र यावरुन ट्विटराईट्सनी उडवलेली खिल्ली हरभजनच्या पचनी पडलेली नाही. ट्वीट वाचल्यानंतर पंजाबच्या छोऱ्याने ऑल टाईम बॅकचोद या ट्विटर अकाऊण्टचा समाचार घेतला. 
‘हरभजन भाई, तुमचा भारत दौरा कसा चाललाय? मजा येत असेल ना? फुकट हॉटेल्स, जेवणं, सगळंच. मस्त आयुष्य आहे.’ असं संबंधित यूझरने लिहिलं. त्यावर उत्तर देताना ‘हाथी चले बजार, कुत्ते भौके हजार. तू त्यापैकीच एक आहेस.’ म्हणत भज्जीने त्याला सणसणीत चपराक दिली
==============================================

हेरगिरी प्रकरणी अटकेतील कुलभूषण जाधवांचा कबुलीनामा

हेरगिरी प्रकरणी अटकेतील कुलभूषण जाधवांचा कबुलीनामा ?
मुंबई : ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांच्या कबुलीनाम्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. आपण रॉसाठी काम करत असल्याचा दावा त्यांनी व्हिडिओत केला असून भारत सरकारने मात्र या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

पाकिस्तान सरकार आणि लष्करानं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव स्वतः रॉचे एजंट असल्याची कबुली देताना दिसत आहेत.

‘मी भारतीय नौदलाचा अधिकारी असून 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार. 2002 मध्ये 14 वर्षांच्या सेवेनंतर मी गुप्त अभियान सुरु केलं. 2003 मध्ये मी इराणच्या चबाहारमध्ये एक छोटा उद्योगधंदा सुरु केला. माझ्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. 2003-04 मध्ये मी कराची दौरा केला. रॉसाठी भारतात काही काळ काम केल्यानंतर 2013 मध्ये मी रॉमध्ये सहभागी झालो.’ अशी कबुली कुलभूषण जाधव देताना दिसतात.

भारत सरकारने मात्र त्या व्हिडिओची सत्यता आणि त्यात करण्यात आलेले आरोप सपशेल नाकारले आहेत. कुलभूषण हे ‘रॉ’चे एजंट नसल्याचं भारतानं ठणकावून सांगत हा सगळा प्रकार त्यांच्याकडून वदवून घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे.
सत्यता पडताळण्यासाठी भारतीय उच्चायुक्तांना कुलभूषण यांची भेट घेऊ देण्याची मागणी भारत सरकारतर्फे करण्यात आली आहे, मात्र पाकिस्तानने ती फेटाळून लावली आहे.
==============================================

नाशकात आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांचा तळ

नाशकात आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांचा तळ
नाशिक: विविध मागण्यांसाठी एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीनं काल नाशिककरांची दाणादाण उडवली. काल नाशिकमध्ये भारतीय किसान मोर्चाची सभा झाली. या सभेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सीबीएस चौकातच शेतकऱ्यांनी तळ ठोकल्यानं मंगळवारी सायंकाळी संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडली.

हे आंदोलन आजही सुरु असून यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मात्र, हाल झाले आहेत. या आंदोलनामुळे आज बिटको आणि आदर्श हायस्कूल या दोन शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच झोपून अनेक शेतकऱ्यांनी रात्र काढली. मागण्या मान्य होईपर्यंत हे महामुक्काम आंदोलन कायम राहिल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. कर्जमुक्ती, रास्त भाव, नुकसानभरपाई अशा विविध मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. ईदगाह मैदानावर झालेल्या या सभेसाठी २७ जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचूरी, पत्रकार पी. साईनाथ हे देखील या सभेला उपस्थित होते.

ईदगाह मैदानावरील दुपारची सभा आटोपल्यानंतर मोर्चेकरांना त्र्यंबकरोड, जिल्हा परिषद, शालिमार चौकातून शिवाजीरोड, आंबेडकर पुतळामार्गे सीबीएसवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेले जाणार होते. मात्र, मोर्चेकरांनी आपला मुक्काम सीबीएस चौकात थाटल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णत: ठप्प झाली. यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या.

रुग्णांचे हाल : याप्रकारामुळे जिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकांना फटका बसला.
==============================================

डान्सबारमध्ये दारुबंदी, बारबालांना स्पर्शासही मज्जाव

डान्सबारमध्ये दारुबंदी, बारबालांना स्पर्शासही मज्जाव?
मुंबई : डान्स बारमध्ये मद्य पिण्यास बंदी घालण्याची आणि बारबालेवर पैसे न उडवण्याची तरतूद राज्य सरकार आपल्या नव्या प्रस्तावित विधेयकात करण्यात येणार आहे. बारबालांसह इतर कर्मचाऱ्यांना डान्सबारमध्ये प्रवेश करताना बायोमेट्रिक हजेरीदेखील लावावी लागणार आहे. 
डान्स बार सुरु करायचा असल्यास नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. जर तुम्ही बारबालेला स्पर्श केला किंवा तिच्यावर पैसे उधळले, तर त्या व्यक्तीला 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात येणार आहे. हा गुन्हा अजामीनपात्र ठरणार असून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या डान्सबार मालकांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. 
बारच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असून धार्मिक स्थळांपासून एक किलोमीटर परिसरात डान्स बार ठेवता येणार नाहीत. बारबालांना निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी, वेतन आणि इतर भत्ते यांचा समावेश असलेल्या पगारपत्रकांचे करार बारमालकांना करावे लागणार आहेत. बारबालांच्या मुलांसाठी पाळणाघरांची सोयही प्रस्तावित विधेयकात करण्यात येणार असल्याचं समजतं.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या चार डान्सबारचे परवाने रद्द करण्यात आले होते. तूर्तास डान्सबार पुन्हा उघडू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. अटींची पूर्तता न झाल्याने चार डान्सबारना दिलेले परवाने रद्द केले. राज्य सरकारनं डान्सबारच्या परवानगीसाठी काही अटी ठेवल्या होत्या. या अटींविरोधात डान्सबार मालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
==============================================

महाराष्ट्रात सध्याची राज्यव्यवस्था मजबुरीतून - उद्धव ठाकरे


  • मुंबई, दि. ३० - महाराष्ट्रात सध्याची राज्यव्यवस्था ही एका मजबुरीतूननिर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अस्थिरता व राजकीय अराजकता निर्माण होऊ नये म्हणून शिवसेना सध्या सरकारसोबत आहे. येथे नैतिकता किंवा अनैतिकतेचा प्रश्‍न नसून राजकीय सोयीतून निर्माण झालेली ही तात्पुरती व्यवस्था आहे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तराखंडच्या निमित्ताने 'सामना'च्या अग्रलेखातून म्हटले आहे. 
    उत्तराखंडमध्ये हरीश रावत सरकारला विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्याआधीच राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. जे सरकार लोकशाही मार्गाने सत्तेवर आले ते लोकशाही मार्गानेच घालवायला हवे. उत्तराखंडच्या निमित्ताने देशातील विरोधकांना एकत्र येण्याची संधी आपणच मिळवून देत आहोत असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. उत्तराखंडमधील सरकार बरखास्त करण्याच्या निर्णयाला  भाजपने नैतिकतेशी जोडू नये असेही अग्रलेखात म्हटले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला नसता तर सरकार स्थापनेसाठी लागणार्‍या आकड्यांचा खेळ भाजपने कसा केला असता? नैतिकता वगैरे शब्दांचा वापर करून लोकशाहीची चौकट रुंद करून भाजपने पाच-पंचवीस आमदारांचे बळ साजूक तुपातून नक्कीच निर्माण केले नसते व उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना ज्या खटपटी लटपटी कराव्या लागत आहेत त्याच महाराष्ट्रातही कराव्या लागल्या असत्या. शिवसेनेने महाराष्ट्र हितासाठी हा घोडेबाजार होऊ दिला नाही असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
==============================================

टाटा स्टील यूकेमधील स्टील उद्योग विकणार


  • मुंबई, दि. ३० - ब्रिटनमधील सर्वात मोठी स्टील उत्पादक भारतीय कंपनी टाटा स्टील यूकेमधील आपला संपूर्ण स्टील उद्योग विकण्याचा विचार करत आहे. यासंबंधी निर्णय घेण्यासाठी मुंबईत अनेक तास टाटा स्टीलच्या संचालक मंडळाची बैठक चालली.  
    मागच्या काहीवर्षातील स्टील उद्योगाची कमकुवत स्थिती आणि मागच्या काही महिन्यात यूकेमध्ये टाटा स्टीलला मोठया तोटयाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे टाटा स्टील यूकेमधील स्टील उद्योग विकण्याचा विचार करत आहे. वाढता निर्माण खर्च, देशांतर्गत घटलेली मागणी आणि युरोपमध्ये चीनच्या स्टीलची वाढलेली आयात यामुळे कंपनीचा तोटा वाढत चालल्याने टाटा स्टील उद्योगविक्रीच्या निर्णयाप्रत आले आहे. स्टील उद्योगाचा युरोपमध्ये विस्तार करण्यासाठी टाटा स्टीलने २००७ मध्ये ब्रिटनमधील कोरस स्टील कंपनीचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर या कंपनीचे टाटा स्टील असे नामकरण झाले. पण स्टील उद्योगाची स्थिती खराब झाल्याने त्याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर झाला. टाटा स्टीलने खर्च कपातीचे विविध उपाय योजण्याचाही फायदा झाला नाही. टाटा स्टीलची यूके सरकार आणि विक्री संदर्भात ग्रेबुल कॅपिटलबरोबर चर्चा सुरु आहे. 
==============================================

शाळांचा आठवडा पाच दिवसांचा करा

  • मुंबई : ग्रामीण भागासह राज्यातील शहरी भागातही पाण्याचे दुर्भीक्ष आहे त्यामुळे सर्वत्र पाणीकपातीचा निर्णय होत असून त्याचा फटका शाळांनाही बसत आहे. परिणामी पाणी बचतीसाठी शाळांचा आठवडा पाच दिवसांचा करण्याची मागणी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक धरणक्षेत्रात पाण्याचा साठा कमी असल्याने लोकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. खबरदारीची बाब म्हणून कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेसह अनेक नगरपालिकांनीही पाणीपुरवठ्यात कपात सुरु केली आहे. त्याचा फटका शाळांनाही बसला आहे. राज्यात सुमारे १ लाखाहून अधिक शाळा असून त्यात सुमारे २ कोटींहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. शाळांना दैनंदिन पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासते. परिणामी राज्यात पाण्याची टंचाई असेपर्यंत शाळांचा आठवडा पाच दिवसांचा केला, तर पाण्याची
    व विजेची बचत होण्याचा पर्यायही बोरनारे यांनी सुचवला आहे. सध्या अनेक शाळांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले असून परीक्षा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा केल्यास शाळांना कोणताही अडथळा येणार नसल्याचा दावा बोरनारे यांनी केला आहे. पाण्याची बचत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन शाळांचा पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी शिक्षण विभागास आदेश देण्याची मागणी बोरनारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
==============================================

क्रूरतेची परिसीमा ...प्रियकराचं ह्रदय कापून बाहेर काढणा-या प्रेयसीला फाशीची शिक्षा


  • ढाका, दि. २९ - बांगलादेशमध्ये प्रेयसीने क्रूरतेची परिसीमा गाठतप्रियकराची हत्या करुन त्याचं ह्रदय कापून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराचा गळा कापून त्याची हत्या करणा-या या प्रेयसीला बांगलादेशमधील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. फातेमा अख्तर सोनाली असं या तरुणीचं नाव आहे. फातेमाला फासावर लटकवलं गेलं तर महिलेला फासावर लटकवण्यात येणारी ही बांगलादेशमधील पहिलीच घटना असेल. फातेमा आणि एमददुल यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र  एमददुलने लग्नास नकार दिला होता. तसंच त्यांच्यातील सेक्स करतानाचे व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केले होते. याच रागातून एमददुलची हत्या केली असल्याची कबुली फातेमाने न्यायालयात दिली आहे. हत्या करण्यापुर्वी फातेमाने सॉफ्टड्रींकमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. एमददुल बेशुद्ध झाल्यानंतर तिने त्याचे हात, पाय बांधले आणि त्याचा गळा चिरुन हत्या केली. फातेमा एवढ्यावरच थांबली नाही तर तिने धारदार शस्त्राने एमददुलच्या छातीवर वार करुन त्याचं ह्रदय बाहेर काढलं.  न्यायालयात फातेमाला असं का केलं विचारलं असता 'मला त्याचं ह्रदय किती मोठं आहे याबद्द्ल उत्कंठा होती. अशा प्रकारचे धाडसी गुन्हे करण्यासाठी माणसाकडे खुप मोठे ह्रदय असलं पाहिजे', त्यामुळे मी असं कृत्य केल्याचं सांगितलं. फातेमाने मार्च 2014मध्ये ही हत्या केली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला ती वरील न्यायालयात आव्हान देऊ शकते.  जर तिची फाशीची शिक्षा कायम ठेवली तर फासावर जाणारी बांगलादेशमधील ती पहिली महिला असेल अशी माहिती कारागृहाचे उपनिरीक्षक टिपू सुलतान यांनी दिली आहे. महिलेला फाशीची शिक्षा होणं ही दुर्मिळ घटना आहे. मात्र ही केसदेखील अपवादात्मक असल्याचं वकील काजी शब्बीर अहमद यांनी सांगितलं आहे.
==============================================

लाहोर हल्ल्याप्रकरणी 5 हजारांहून अधिक जणांची चौकशी


  • इस्लामाबाद, दि. २९ - लाहोर येथे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. दोन दिवसांत ही चौकशी केली असल्याची माहिती पाकिस्तानी अधिका-याने दिली आहे.लाहोरमधील उद्यानात रविवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ७२ लोकांचा मृत्यू झाला होता. तालिबानने या हल्ल्याचे लक्ष्य ईस्टर साजरा करणारे ख्रिश्चन होते, असा दावा केला आहे. मृतांत २९ बालकांचा समावेश आहे. चौकशी केल्यानंतर सर्वजणांची सुटका करण्यात आली. मात्र त्यापैकी 216 जणांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती पंजाब प्रांतातील राज्यमंत्री राना सनऊल्लाह यांनी दिली आहे. दहशतवाही हल्ल्यानंतर सर्व महत्वाच्या ठिकाणी धाडसत्र करण्यात आले आहे. पोलीस, दहशतवाद विरोधी पथक तसंच गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त कारवाईत या धाडी टाकण्यात येत आहेत. गरज लागल्यास निमलष्करी दलाचीदेखील मदत घेतली जाणार आहे. 
==============================================
'आप'चा आमदार खरेदी करून दाखवाच- केजरीवाल

नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून दिल्लीतील आम आदमी पक्षाचा एक आमदार खरेदी करून दाखवा असे आव्हानही दिले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, "उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा खून आहे. या प्रमाणेच दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमध्येही अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.‘ तसेच उत्तराखंडमध्ये "घोडेबाजार‘ सुरू असून गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे एका मोठ्या उद्योगपतीला विश्‍वास आहे की तो आपमधील आमदार खरेदी करेल. मात्र भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षाचा एकही आमदार खरेदी करून दाखवावा असे आव्हानही केजरीवाल यांनी यावेळी दिले. ‘भारतीय जनता पक्षाला माहित आहे की येत्या दोन वर्षांत ते कोणतीही निवडणूक जिंकणार नाहीत. त्यामुळे ते गुंडांचा वापर करत आहेत. हा प्रकार ते हिमाचल प्रदेशमध्ये अवलंबत असून त्यानंतर दिल्लीचा क्रमांक आहे‘ असा आरोप केजरीवाल यांनी केला.
==============================================
हितीन कॅओ यांनी घेतली अध्यक्षपदाची शपथ
न्यॅपीताव - अनेक वर्षांच्या लष्करशाहीनंतर म्यानमारला लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले नागरी अध्यक्ष मिळाले असून, लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांचे अनेक वर्षांपासूनचे समर्थक असलेल्या हितीन कॅओ यांची आज (बुधवार) अध्यक्षपदाची शपथ घेतली. म्यानमारसाठी ही ऐतिहासिक घटना ठरली आहे.

म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये स्यू की यांच्या राष्ट्रीय लोकशाहीवादी पक्षाला (एनएलडी) मोठे बहुमत मिळाले होते. मात्र, लष्करी राजवटीने स्यू की यांना कुठलेही पद स्वीकारण्यावर कायदेशीर निर्बंध घातले होते. त्यामुळे स्यू की यांनी आपले समर्थक असलेल्या कॅओ यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्‍चित केले होते. म्यानमारमधील लोकप्रतिनिधींनी कॅओ यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. अध्यक्षपदावर झालेली आपली निवड हा स्यू की यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया कॅओ यांनी निवडीनंतर व्यक्त केली होती. आज त्यांनी शपथ घेतली, ते 1 एप्रिलला कार्यभार स्वीकारणार आहेत.

म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी मोठा लढा दिलेल्या नोबल पारितोषिक विजेत्या स्यू की यांची अध्यक्षपदी निवड होणे अपेक्षित होते. मात्र, कुठल्याही पदासाठी स्यू की यांना अपात्र ठरविणारा कायदा रद्द करण्यास लष्करी राजवटीने नकार दिला होता. त्यामुळे स्यू की यांनी अध्यक्षपदासाठी कॅओ यांचे नाव पुढे केले होते. म्यानमारच्या संसदेत आज झालेल्या मतदानामध्ये एकूण 652 मतांपैकी कॅओ यांना 360 मते मिळाली. कॅओ यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर उपस्थित खासदारांनी एकच जल्लोष केला. पहिल्या नागरी अध्यक्षाच्या निवडीमुळे म्यानमारचा प्रवास लष्करी राजवटीकडून आता लोकशाहीवादी देश बनण्याकडे सुरू झाला आहे.
==============================================
कोहलीच्या खेळीतून शिकण्यासारखे- विल्यम्सन

नवी दिल्ली - न्यूझीलंड उद्या बुधवारी इंग्लंडविरुद्ध पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळणार असले, तरी त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन अजून विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळीतून बाहेर आलेला नाही. विराटच्या त्या खेळीतून खूप काही शिकण्यासारखे आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली. 

कोहलीची ऑस्ट्रेलिया आणि ज्यो रुटची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची खेळी सर्वोत्तम असल्याचे सांगून विल्यम्सन म्हणाला, ‘या दोघांसारखी खेळी करायला मलादेखील आवडेल. दोघांची खेळी सर्वोत्तम होती. मी तर या दोन्ही खेळींच्या प्रेमातच पडलो आहे.’

उपांत्य फेरीच्या आव्हानाविषयी बोलताना विल्यम्सन म्हणाला, ‘संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी माझ्यासह प्रत्येक खेळाडू प्रेरित झाला आहे. आतापर्यंत नियोजन तंतोतंत पाळण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहे. उद्यादेखील असेच होईल अशी आशा आहे. उद्या सामन्यापूर्वीच अंतिम संघ जाहीर करू.’’

नियोजन वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. त्यामुळे आम्हाला बोल्ट आणि साउदी या सर्वोत्तम गोलंदाजांनाही वगळावे लागत आहे. खेळपट्टीच्या स्वरूपानुसार आम्ही संघ निवडत आहोत.
==============================================
'भारत माता की जय'न म्हणणाऱ्यांना मारहाण

नवी दिल्ली - भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्या मदरशातील तीन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना राजधानी दिल्लीमध्ये घडली आहे.
दिल्लीजवळील रमेश एन्क्लेव भागात ही घटना घडली आहे. मदरशाजवळील पार्कमध्ये फिरण्यास गेलो असताना त्याठिकाणी जमाव आला आणि त्यांनी या तिघांना भारत माता की जय असे म्हणण्याची बळजबरी केली. या तिघांना भारत माता की जय म्हणण्यास नकार दिल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाचा हात तुटला असून, तिघांवरही स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणाची पोलिसांकडून दखल घेण्यात आली असून, आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. 26 मार्चला ही घटना घडली आहे. पोलिस तपास करत आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारत माता की जय म्हणण्यास नकार दिल्यानंतर ही घोषणा चर्चेत आली आहे.
==============================================
रिक्षाचालकाचा मुलगा होणार न्यायाधीश
गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून काय झालं?... या परिस्थितीचं ओझं हे आपलं प्राक्तन आहे, असं मानलं नाही की आयुष्य बदलायला सुरवात होते... त्याचं एक उदाहरण आणि गरीब परिस्थितीत जगणाऱ्या युवकांना प्रेरणादायी ठरावं, असं नाव म्हणजे जाहेद जाकीर इनामदार. 

जाहेद हा संगमनेरचा रहिवासी. घरची परिस्थिती हालाखीची. वडील पदवीधर पण रिक्षाचालक. जाहेद सर्वांत मोठा असल्यानं कुटुंबाची जबाबदारी वडिलांबरोबर त्याच्यावरही पडली. जाहेद बारावी झाला आणि त्यानं गोळ्या बिस्कीट आणि किरकोळ वस्तूचं टपरीवजा दुकान थाटलं. शिक्षण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पुढे शिकावं म्हणून त्यानं संगमनेरच्या ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. दुकानात काम आणि संध्याकाळी अभ्यास असं चक्र सुरू झालं. 

कष्टाला कधी तरी यशाची पालवी फुटतेच. पाच वर्षांचा अभ्यासक्रम जाहेदने पूर्ण केला. विशेष म्हणजे दिवसभर काम करीत असूनही या पाच वर्षांत तो महाविद्यालयात दरवर्षी प्रथम आला. तेव्हा त्याचं वय 22 वर्षे होतं. त्याने काही दिवस मालपाणी उद्योग समूहात काम केल्यानंतर काही काळ वकील केली. न्यायव्यवस्थेच्या न्यायासनावर बसण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी तो प्रयत्न करू लागला. त्यासाठी अभ्यास आणि त्याबरोबर वकिली सुरूच होती. 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या दिवाणी न्यायाधीश आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ही परीक्षा दिली. त्यातही जाहेद यशाचं बोट धरूनच पुढे गेला. परीक्षेत उत्तीर्ण झाला. आता वैद्यकीय चाचणी व अन्य सोपस्कार राहिले आहेत. अवघ्या 27 व्या वर्षी तो न्यायाधीश होणार आहे. 

माझ्या आयुष्याला शिक्षकांनी चांगला आकार दिला, असंही तो कृतज्ञपणे सांगतो. लोकशाहीच्या स्तंभांमध्ये न्यायव्यवस्थेला खूप महत्त्व आहे. तिथे तरुणांनादेखील चांगली संधी आहे, असा प्रेरणादायी विचार तो देतो. शिक्षण हे जाहेदनं लक्ष्य मानलं आणि ते साध्य केलं. त्यात गरीब परिस्थितीचा अडथळा त्याला वाटला नाही. आलेले अडसर पार करीत तो पोचला थेट त्याच्या लक्ष्यापर्यंत. 
==============================================
महिलांना घरबसल्या रोजगार
सरुड - शाहूवाडी तालुक्‍यातील खुटाळवाडी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाला लागून वसलेलं गाव. पाण्याची दर उन्हाळ्यात ठणठण ठरलेली. त्यामुळे गावात शेतीचा प्रश्‍नच नाही; पण दोनशे-सव्वाशे उंबरा असलेल्या या गावात जवळपास घरोघरी पारंपरिक पद्धतीचा चिंच उद्योग चालतो. यातून गावातील स्त्रियांना घरबसल्या हंगामी रोजगार उपलब्ध झाला आहे. असा व्यवसाय करणारे जिल्ह्यातील हे एकमेव खेडे आहे. 

साधारण साठ-सत्तर वर्षांपूर्वी गावातील (कै.) तुकाराम राऊ खुटाळे यांनी चिंचा घ्यायच्या आणि त्यावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय सुरू केला. आज घडीला गावातील व्यापारी पावसाळ्यातच चिंचेच्या उभ्या झाडाची पाहणी करतात आणि उभ्या झाडाची आगाऊ रक्कम देऊन खरेदी करतात. जानेवारी ते एप्रिल या काळात गावात चिंचा बडवून प्रक्रिया करण्याचा उद्योग दारोदारी चालतो. जिल्ह्याबरोबरच सांगली, सातारा आदी जिल्ह्यांत व्यापारी मंडळी चिंचा खरेदीस जातात. 

चिंचा वाळवायच्या, त्याची टरफले काढायची. टरफले काढण्यासाठी सव्वाशे रुपये हजेरी, तर टरफले निघालेल्या चिंचामधील चिंचोके काढून गर एकत्र करण्यासाठी किलोस नऊ रुपये हजेरी याप्रमाणे साधारण प्रत्येक स्त्रीला 90 ते 100 रुपये रोजगार मिळतो. चिंचेचा गर तासगाव (जि. सांगली) येते विक्रीस जातो. साधारण 72 ते 76 रुपये किलो दराने तो विकतो. चिंचोके 18 ते 20 रुपये किलोने विकले जातात. 

वर्षाकाठी 25 लाखांचा व्यवसाय 
चिंचेचे पाणी भेळसाठी, प्रक्रिया करून खाण्यासाठी व औषधी वापरासाठी, चॉकलेटसाठी वापरले जाते, तर चिंचोक्‍यापासून खळ तयार करून घोंगडी व्यवसायासाठी अथवा अन्य वस्त्रोद्योगांत प्रक्रिया करून वापर होतो. शिवाय चिंचांची टरफले व केसर कुंभार लोक वीटभट्टीसाठी घेऊन जातात. वर्षाकाठी 20-25 लाख रुपयांचा व्यवसाय कोणत्याही आधुनिक मशीनरीशिवाय करून हाताला काम आणि कष्टाला, घामाला दाम या आधारावर चालतो. काहीअंशी रोजीरोटीचा प्रश्‍न मार्गी लागतो. 
==============================================
... तर डॉ. आंबेडकर पहिले पंतप्रधान असते!
ठाणे - देश एका विचित्र परिस्थितीतून चाललेला असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार जेव्हा समोर येतो, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची महती पटते. आजच्या प्रतिकूल सामाजिक व्यवस्थेने सर्वसामान्यांच्या मुलांचे शिक्षणच कठीण करून ठेवले आहे. कामगारांच्या मुलांनी शिकूच नये, त्यांनी नाका कामगार बनावे, अशीच इच्छा बहुधा व्यवस्थेची असावी, अशी खंत ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केली.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान‘ या विषयावरील चर्चासत्र मंगळवारी (ता. 29) गडकरी रंगायतन येथे झाले. या परिसंवादामध्ये सुरेश सावंत, प्रा. विलास शेजुळ, प्रा. सुनील कदम या वक्‍त्यांनी मते मांडली. रत्नपाल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाचे औचित्य साधून उमेश वांद्रे यांनी हा कार्यक्रम घेतला. आपल्या अध्यक्षीय भाषणात अरुण म्हात्रे यांनी सामाजिक विषमतेवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, इतिहास बदलणे शक्‍य असते, तर डॉ. आंबेडकर या देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते आणि महात्मा गांधी यांचा खूनही झाला नसता. ज्यांना विकासाच्या गोष्टीपासून डावलले जात आहे, त्यांच्या बाजूने उभे राहून सामाजिक आव्हान स्वीकारण्याची गरज आहे. 
"संविधान आणि सद्यस्थितीतील आव्हाने‘ या विषयावर सुरेश सावंत यांनी मत व्यक्त केले. या वेळी त्यांनी बाबासाहेबांची व्यक्तीपूजा मांडताना त्यांचे माणूसपण हरवून टाकणाऱ्या वृत्तीचा निषेध केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विद्यार्थ्यांची मते, फाशीची शिक्षा, राष्ट्रद्रोह, संस्कृतीची मिसळ या विषयांवर सावंत यांनी परखड मत व्यक्त केले. 
==============================================

No comments: