Tuesday, 22 March 2016

नमस्कार लाईव्ह २२-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- तास्मानिया; लेझर पेनमुळे मुलाने दृष्टी गमावली 
२- सँटा क्लारा; इंटेलचे माजी 'सीईओ' अँडी ग्रूव्ह यांचे निधन 
३- बीजिंग; 'अलिबाबा' लवकरच 'वॉलमार्ट'ला मागे टाकणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- अखेर श्रीहरी अणेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द 
५- ईडन गार्डनवरील राष्ट्रगीतावरुन बिग बींविरोधात पोलीस तक्रार 
६- चिपळूणजवळील मल्ल्यांची जागा जप्त 
७- जम्मू; बॉम्बस्फोट झाला तरी चिनाब पूल भक्कमच 
८- पठाणकोट हल्ला; हल्लेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध 
९- जलव्यवस्थापनाबाबत सगळ्यांचीच उदासीनता 
१०- अपयश झाकण्यासाठी भाजपची राष्ट्रवाद चर्चा
११- हैदराबाद विद्यापीठात कुलगुरुंविरोधात निदर्शन  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- भुजबळांच्या संपत्तीवर ईडीची टाच, 55 कोटींची जमीन जप्त 
१३- महाराष्ट्र तुमची आई आहे, तिची इभ्रत राखा- उद्धवनी मुख्यमंत्र्यांना सुनावले 
१४- भोपाळ; रस्ते अपघातात वडिलांचा झाला मृत्यू, १३ व्याला कुटुंबियांनी दान केले ' हेल्मेट' 
१५- देवनार डम्पिंग ग्राउंडवर प्रवेश बंदी 
१६- मुंबई : करीरोड येथील ३८ दुचाकींसह २ कार खाक 
१७- वीज दरवाढीचा शॉक शक्‍य 
१८- पुणे; सुरेश जैन यांच्याविरुद्ध आरोपनिश्‍चितीचे आदेश 
१९- दुष्काळामुळे अंधेरी दफनभूमीचा पाणी शिंपडण्याची प्रथा टाळण्याचा सल्ला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- देवनार कचरा डेपोच्या आगीने मुंबईसह उपनगरं धुरकटली 
२१- लखनौ; मत न दिल्याने दलित वस्तीला आग, दोन चिमुकल्यांचा मृत्यू 
२२- पुणे; जिद्दी सुनीताताईंच्या मदतीला धावले संवेदनशील हात 
२३- कारचा टायर फुटल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात, दोघांचा मृत्यू 
२४- औरंगाबाद; शहरात आज प्रथमच महिलेचे अवयवदान  
२५- छत्तीसगड: पोलिसांचा खबरी समजून सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केली तरूणाची हत्या 
२६- अलाहाबादमध्ये ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी. 
२७- शिर्डीत प्रेमी युगलाची आत्महत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- अॅपलच्या स्वस्त स्मार्टफोनचा फुगा फुटला 
२९- मिरपूर; 'हा तर बीसीसीआयचा कट,' बांगलादेशी मीडियाची ओरड 
३०- सातारा; पेशाने शिक्षक, मात्र हाडाचा शेतकरी, दुष्काळातही डाळिंबाची यशस्वी शेती 
३१- टी-20 विश्वचषकाच्या पुढील सामन्यात गेल फलंदाजी करणार नाही? 
३२- 'कपूर अॅण्ड सन्स'ची पहिल्या आठवड्यात तगडी कमाई 
३३- ...म्हणून मी अक्षय कुमारला ‘गुरुजी’ म्हणतो : जॉन अब्राहम 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३४- इसापूर धरणातून दोन दलघमी पाणी सोडले; आसनाच्या पाण्यातून भागणार नांदेडकरांची तहान 
३५- मराठवाड्यात फक्त पाच टक्के जलसाठा 
३६- जिल्ह्यात ९९६ विहिरींचे अधिग्रहण; २६६ टँकरने १६३ गावे; ११९ वाड्यावर पाणीपुरवठा 
३७- देगलूरमध्ये आज जलजागृती रॅली 
३८- देगलूर नाका भागात जुगार अड्ड्यावर छापा; १३ जन अटकेत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जन्मामुळे नव्हे तर केवळ सदगुणांमुळेच आपण थोर बनतो
(श्रद्धा जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गजानन इंगोले, सतीश गायकवाड, अभिजित शेळके, महेश मोरे, राजेश कुतुरवार, रमेश बाहेती, रोहित बाहेती, आशिष बाहेती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


=======================================

अॅपलच्या स्वस्त स्मार्टफोनचा फुगा फुटला

अॅपलच्या स्वस्त स्मार्टफोनचा फुगा फुटला!
सिलिकॉन व्हॅली: अॅपलचा स्वस्त स्मार्टफोन असं मार्केटिंग करत काल ‘आयफोन SE’ या नव्या स्मार्टफोनचं अॅपलनं मोठा गाजावाजा करुन लाँचिंग केल. मात्र, अॅपलच्या या स्वस्त स्मार्टफोनचा फुगा अवघ्या २४ तासांच्या आतच फुटला आहे. 
भारतामध्ये सुरुवातीला आयफोन SE स्मार्टफोनची किंमत 30,000 जाहीर करण्यात आली होती. मात्र, काही वेळानं एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं ज्यामध्ये या स्मार्टफोनची किंमत 30,000 नसून 39,000 हजार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन एप्रिल महिन्यापासून बाजारात उपलब्ध असणार आहे. 
आयफोन SE हा 4 इंच डिस्प्ले असून 16 जीबी आणि 64 जीबी व्हेरिएंटमध्ये मिळेल. आयफोन SE चा लूक आयफोन 5Sसारखाचं असून आयफोन 6S एवढी बॅटरी क्षमता आहे. या नव्या आयफोन SE चा उच्चार ‘आयफोन एस्से’ असा केला जाईल. 
‘आयफोन SE’बाबत अधिक माहिती: 
– टच आयडी 
– 12 मेगापिक्सेल कॅमेरा 
– 4k व्हिडीओ क्षमता 
– A9 प्रोसेसर 
– M9मोशन प्रोसेसर 
– वायफाय कॉलिंग 
– आयफोन 5S पेक्षा तीन पटीने वेगवान 
24 मार्चपासून नोंदणी सुरु होणार असून 31 मार्चपासून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. शिवाय, मे महिन्याच्या अखेरपर्यंत जगातील 110 देशांमध्ये आयफोन SE उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 
आयफोन SE सोबत आयपॅड प्रो आणि आयवॉचचे चार नव्या रंगातील व्हेरिएंटही लॉन्च करण्यात आले. 
यावेळी टीम कूक यांनी आयफोनच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली. “अॅपल कंपनी यूजर्सच्या खासगी गोष्टींच्या सुरक्षिततेबाबत तडजोड करणार नाही. अॅपल कंपनी कायमच यूजर्सना सुरक्षिततेची हमी देते.” असे टीम कूक यावेळी म्हणाले. शिवाय, जगभरातील एक अब्ज लोक आयफोन वापरतात, याचा आम्हाला गर्व आहे, असेही टीम कूक म्हणाले.
=======================================

अखेर श्रीहरी अणेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द

अखेर श्रीहरी अणेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द
मुंबई: विदर्भासह मराठवाडा वेगळा करण्याची मागणी करून वाद ओढवून घेणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजभवनावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेऊन अणे यांनी त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. 
शिवसेना आक्रमक 
महाधिवक्ते श्रीहरी अणे यांच्या विदर्भासह मराठवाडा वेगळा करण्याच्या वक्तव्यावर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. अणेंचा केवळ राजीनामा घेऊन भागणार नाही, तर त्यांनी केलेल्या विधानासंदर्भात त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. 
शिवसेनेने श्रीहरी अणेंविरोधात नागपूर अधिवेशनाप्रमाणे या अधिवेशनातही हक्कभंग नोटीस दिली आहे. आता विधानसभा अध्यक्ष हा हक्कभंग दाखल करुन घेणार की नागपूर अधिवेशनाप्रमाणे फेटाळून लावणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष आहे. 
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री या विषयावर निवेदन देणार असून यावर दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे.
=======================================

देवनार कचरा डेपोच्या आगीने मुंबईसह उपनगरं धुरकटली

देवनार कचरा डेपोच्या आगीने मुंबईसह उपनगरं धुरकटली
मुंबई : देवनार कचरा डेपोमध्ये झालेल्या आगीमुळे मुंबईची उपनगरं धुरकटून निघाली आहेत. आगीवर कालच नियंत्रण मिळवलं असलं तरी धगधगत असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून विषारी वायू हवेत पसरले आहेत. 
नवी मुंबई, उपनगरं अशा सर्वच भागात धूर ठळकपणे जाणवत आहे. अवघ्या मुंबईतील कचरा याठिकाणी इथे टाकला जातो. पण इथे आग लागल्याने त्यातून अनेक घातक वायू बाहेर पडत आहेत. इतकंच नाही तर या विषारी वायूमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनासह इतर त्रासांनाही तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे महापालिका, राज्य सरकारला या प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्याची गरज आहे. दरम्यान देवनार कचरा डेपोला आग लागण्याची दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. कचऱ्यासोबत अनेक उपयोगात येणाऱ्या वस्तू, लोखंड देखील याठिकाणी येतात. त्यामुळेच कचरा माफियांकडूनच आगी लावली जात आहे, असा संशय महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी व्यक्त केला आहे.
=======================================

मत न दिल्याने दलित वस्तीला आग, दोन चिमुकल्यांचा मृत्यू

मत न दिल्याने दलित वस्तीला आग, दोन चिमुकल्यांचा मृत्यू
लखनौ : उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधील दलित वस्तीत आग लागल्याने दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. सरपंचाना मत न मिळाल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. लखनौपासून सुमारे 110 किमी अंतरावर सीतापूर देहलिया परिसरात ही घटना घडली. 
नुकत्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच कमलेश वर्मा यांना दलित वस्तीतून मत पडली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या वर्मांनी आपल्या गुंडाकरवी या वस्तीतील लोकांना धमकवायला सुरुवात केली होती. शिवाय रागातून वर्मा आणि त्याच्या गुंडानी काल रात्री ही वस्तीच जाळून टाकल्याचा आरोप होत आहे. 
आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी वस्तीमधील 35 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहे. शिवाय या आगीत मुकेश आणि प्रियांशी या दोन मुलांचा मृत्यू झाला. मुकेशचं वय 8 वर्ष होतं, तर  प्रियांशी केवळ 4 वर्षांची होती. 
कमलेश वर्माने दलित वस्तीजवळच असलेल्या त्याच्या शेतात कचऱ्याचा ढीग लावला आणि वारा सुटला असताना कचऱ्याला आग लावली. वाऱ्यामुळे आग वस्तीजवळ पोहोचली. त्यामुळे आगीचे लोट वस्तीमधील घरात पोहोचले आणि बघता बघता संपूर्ण वस्ती जळून खाक झाली. 
दरम्यान, कमलेश वर्मा आणि त्याचे गुंड फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
=======================================

जिद्दी सुनीताताईंच्या मदतीला धावले संवेदनशील हात!

माझा इफेक्ट : जिद्दी सुनीताताईंच्या मदतीला धावले संवेदनशील हात!
पुणे पुण्याच्या सुनीता पवार यांच्यावर मदतीचा ओघ सुरु झाला आहे. गेल्या दोन दिवसात त्यांना साडेचार ते पावणेपाच लाख रुपयांची मदत मिळाली आहे. 
राज्या-परराज्यातील अनेक दानशूरांनी सुनीताताईंना स्वत:च्या पायावर उभं कऱण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे काही सामाजिक संस्थांनी सुनीताताई पवार यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचं जाहीर केलं आहे.
वर्षभरापूर्वी सुनीता पवार मजुरीसाठी इमारत बांधकामावर गेल्या होत्या. तिथं त्यांना शॉक लागला. ज्यात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले. यावेळी एका महिलेला जीवही गमवावा लागला होता. मात्र, त्यानंतर संबंधित बिल्डरनं सुनीताताईंना कुठलीही मदत केली नाही. 
विशेष म्हणजे वर्षभरातच सुनीताताईंच्या नवऱ्यानंही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर पाच वर्षाची मुलगी आणि काही महिन्याच्या मुलाला जगवण्यासाठी सुनीताताईंची धडपड सुरु आहे.
=======================================

ईडन गार्डनवरील राष्ट्रगीतावरुन बिग बींविरोधात पोलीस तक्रार

ईडन गार्डनवरील राष्ट्रगीतावरुन बिग बींविरोधात पोलीस तक्रार
नवी दिल्ली : कोलकात्यातील ईडन गार्डनवर झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याआधी महानायक अमिताभ बच्चन यांनी गायलेल्या राष्ट्रगीतावरुन वाद सुरु झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी नियमांनुसार वेळेत राष्ट्रगीत पूर्ण केलं नाही, असा आरोप करत पूर्व दिल्लीतील अशोक नगर पोलीस ठाण्यात अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
अमिताभ यांना राष्ट्रगीत गाण्यासाठी 52 सेकंदांऐवजी 1 मिनिट 10 सेकंद लागले. शिवाय, राष्ट्रगीतातील अनेक शब्दांचे उच्चारही अस्पष्ट आणि चुकीचे होते, असे आरोप तक्रारीत केले आहेत. डॉक्युमेंट्री फिल्ममेकर उल्हास पी. आर. यांनी ही तक्रार केली आहे. 
“अमिताभ बच्चन ‘दायक’ शब्दाच्या जागी ‘नायक’, तर ‘सिंधु’ऐवजी ‘सिंध’ म्हणाले.” असा आरोप अमिताभ यांच्यावर केला असून सुप्रीम कोर्टाच्या 2005 सालच्या यासंबंधित एका निर्णयाचं उल्लंघन केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
=======================================

'हा तर बीसीसीआयचा कट,' बांगलादेशी मीडियाची ओरड

'हा तर बीसीसीआयचा कट,' बांगलादेशी मीडियाची ओरड
मीरपूर: बांगलादेशचा वेगवान गोलंदाज टस्किन अहमद आणि डावखुरा स्पिनर अराफत सनी यांच्यावर आयसीसीनं केलेली निलंबनाची कारवाई म्हणजे बीसीसीआयचा कट असल्याची टीका बांगलादेशी मीडियानं केली आहे. 
आयसीसीनं गोलंदाजीच्या अवैध शैलीप्रकरणी टस्किन आणि अराफतचं निलंबन करण्यात आल्याचं शनिवारी जाहीर केलं होतं. त्यानंतर बांगलादेशी वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेल्सनी आयसीसीवर खरपूस टीका केली आहे. त्याचवेळी भारताच्या जसप्रीत बुमराच्या शैलीची टस्किनच्या गोलंदाजीच्या शैलीशी तुलना करून बांगलादेशी मीडियानं बीसीसीआयलाही लक्ष्य केलं आहे. 
बुमराचा हात हा टस्किनच्या हातापेक्षा कोपरात जास्त वाकत असल्याचं दाखवण्यात आलं. त्यामुळं टस्किनची शैली अवैध आहे. तर बुमराची शैली अवैध का नाही? असा सवाल बांगलादेशी मीडियाकडून विचारण्यात येत आहे. इतकंच काय, पण रवीचंद्रन अश्विनची गोलंदाजी शैलीही अवैध असल्याचा आरोप बांगलादेशी टीव्ही चॅनेल्सनी केला आहे. 
भारत आणि बांगलादेशच्या चाहत्यांमध्ये 2015 सालच्या विश्वचषकापासून संघर्ष सुरु आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्याआधी टस्किन अहमदच्या हातात धोनीचं शीर असलेला फोटो सोशल मीडियात वायरल झाला होता. त्याचा राग बीसीसीआयनं टस्किन आणि अराफतवर काढल्याची बांगलादेशी मीडियाची भावना आहे.
=======================================

पेशाने शिक्षक, मात्र हाडाचा शेतकरी, दुष्काळातही डाळिंबाची यशस्वी शेती


पेशाने शिक्षक, मात्र हाडाचा शेतकरी, दुष्काळातही डाळिंबाची यशस्वी शेती
सातारा: सातारा जिल्ह्यातल्या बिदालचे सतीश ढोक..पेशानं शिक्षक मात्र हाडाचे शेतकरी…वडिलोपर्जित 25 एकर जमिनीवर ते विविध पिकं घेतात. 2008 मध्ये त्यांनी आठ एकरावर डाळिंबाची लागवड केली.मात्र सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता यंदा फक्त दीड एकरातील डाळिंबाचा बहार धरलाय. 
दुष्काळाचं सावट असं की पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागतीय..यामुळं अनेक शेतकऱ्यांनी बागांवर कुऱ्हाड चालवलीय.मात्र अशातही सतीश यांनी जिद्द सोडलेली नाही.रोज विकतंच पाणी आणून ते या बागा जगवत आहेत. 
इथं फक्त दीड एकरावर बहार धरला आहे..तर उरलेल्या बागा जगवण्याचं काम सुरु आहे..1200 रुपये याप्रमाणं रोज 14 हजार लिटर पाण्याचा टँकर विहीरीत टाकला जातोय….सतीश यांनी या डाळिंबाचं युरोपिय देशांना निर्यात करण्याचं सुरुवातीपासूनच नियोजन केलं होतं…खतं आणि किडकनाशकांचा वापर करताना आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार त्यांनी केला. सेंद्रीय खतांच्या वापरावर सतीश यांनी भर दिला.
 या दीड एकराची बागा सध्या निर्यतक्षम डाळिंबांनी भरली आहे. प्रत्येक झाडासा 300 ते 350 ग्रॅमची फळ लागली आहेत…निर्यातीत अडथळा येऊ नये यासाठी सतीश यांनी फळाची प्रयोगशाळेत तपासणी केली आहे. 
आतापर्यंत सतीश यांच्या दीड एकराच्या बागेतून 12 टन डाळींबाची काढणी झाली आहे. ज्याला रिलायबल फ्रेश या निर्यात करणाऱ्या कंपनीनं 105 रुपये किलोचा दर दिला आहे. यातून अजून 13 टन डाळिंबाचं उत्पादन सतीश अपेक्षित आहे. 
आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणं यातील 20 टन डाळिंबाची जरी निर्यात झाली तरी त्यांना 21 लाख रुपये मिळतील. यातून 6 लाखांचा उत्पादन खर्च वजा जाता सतीश यांना या दीड एकरातून 15 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. 
सध्याची तीव्र पाणी टंचाई आणि आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करून सतीश ढोक यांनी फक्त दीड एकरावर लक्ष केंद्रीत केलं. तर उरलेल्या बागां फक्त जगवल्य़ा. ज्यामुळं त्यांच्या सगळ्या डाळिंब बागा तर वाचल्याच शिवाय कमी जागेत त्यांना जास्तीचा नफाही मिळाला.
=======================================

टी-20 विश्वचषकाच्या पुढील सामन्यात गेल फलंदाजी करणार नाही?

टी-20 विश्वचषकाच्या पुढील सामन्यात गेल फलंदाजी करणार नाही?
बंगळुरु : ट्वेन्टी20 विश्वचषकातील पुढील सामन्यात आता ख्रिस गेलची तुफानी खेळी पाहता येणार नाही. कारण वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल हॅम्स्ट्रिंग म्हणजेच गुडघ्याच्या मागील नसला दुखापत झाल्यामुळे टी-20 विश्वचषकाच्या पुढील सामन्यात फलंदाजी करु शकणार नाही. 
शनिवारी श्रीलंकाविरुद्ध झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान गेलने दुखापत झाल्याची तक्रार केली होती. यानंतर लंकेचा डाव आटोपण्याआधीच गेल मैदानातून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. मात्र हा सामना पाहायला आलेल्या बंगळुरुच्या प्रेक्षकांनी वी वॉण्ट गेल, अशा घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली होती.
 वेस्ट इंडीज क्रिकेटच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, ‘गेल दुखापतीमुळे त्रस्त आहे, यामुळे तो फलंदाजी करु शकणार नाही. ही मोठी दुखापत नाही, त्यामुळे कृपया दुसरे अंदाज लावू नका.’
=======================================

'कपूर अॅण्ड सन्स'ची पहिल्या आठवड्यात तगडी कमाई

'कपूर अॅण्ड सन्स'ची पहिल्या आठवड्यात तगडी कमाई
मुंबई : फवाद खान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांच्या ‘कपूर अॅण्ड सन्स’ने पहिल्या आठवड्यात तगडी कमाई केली आहे. नव्या जमान्यातील फॅमिली ड्रामा असलेल्या ‘कपूर अॅण्ड सन्स’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात 26.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 
सिनेमाने पहिल्याच दिवशी 6.85 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर शनिवारी 7.75 कोटी आणि रविवारी तब्बल 11.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. अशाप्रकारे या सिनेमाने पहिल्या आठवड्यात एकूण 26.35 कोटी रुपये कमावले. 
परदेशातील कमाईच्या बाबतीत चित्रपटाची कामगिरी चांगली आहे. सिनेमाने आतापर्यंत 29 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 19.3 कोटी रुपये कमावले. चित्रपटाने अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये चांगला बिझनेस केला. 
शकून बत्रा दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित ‘कपूर अॅण्ड सन्स’चं बजेट 40-50 कोटी रुपये आहे. मात्र पहिल्याच आठवड्यात सिनेमाने चांगली कमाई केली.
=======================================

...म्हणून मी अक्षय कुमारला ‘गुरुजी’ म्हणतो : जॉन अब्राहम

...म्हणून मी अक्षय कुमारला ‘गुरुजी’ म्हणतो : जॉन अब्राहम
मुंबई : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारसोबत ‘गरम मसाला’, ‘हाउसफुल्ल 2’, ‘देसी बॉईज’ यांसारख्या सिनेमात काम केलेला जॉन अब्राहम अक्षय कुमारला एक यशस्वी अभिनेता मानतो. इतकंच नाही तर तो अक्षयला ‘गुरुजी’ म्हणतो. झूम चॅनलवरील ‘यार मेरा सुपरस्टार’ या कार्यक्रमात जॉनने हे गुपित सांगितलं. 
“अक्षय कुमारची सिनेकारकीर्द अतिशय प्रेरणादायी आहे. मेहनत आणि जिद्दीमुळे तो आज या ठिकाणी आहे. 90 च्या दशकात अक्षय बॉलिवूडमध्ये आला आणि मी 2003 मध्ये पदार्पण केलं. तो माझ्यापेक्षा यशस्वी अभिनेता आहे. त्यामुळे मी त्याचा सन्मान करतो,” असं जॉन म्हणाला. 
अक्षय कुमारकडूनच मी कॉमेडी शिकलो. आम्ही एकत्र तीन चित्रपट केलं. मला विनोद करायला आवडतो. मी आजपर्यंत जेवढी कॉमेडी शिकलोय, ती अक्षयमुळेच. त्यामुळे मी त्याला ‘गुरुजी’ बोलतो, असं सांगत जॉनने हे गुपित उघड केलं. 
दरम्यान जॉन अब्राहम सध्या त्याच्या आगामी ‘रॉकी हॅण्डसम’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. निशिकांत कामत दिग्दर्शित ‘रॉकी हॅण्डसम’ 25 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 
‘यार मेरा सुपरस्टार’चा हा एपिसोड आज प्रसारित करण्यात येणार आहे.
=======================================

कारचा टायर फुटल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात, दोघांचा मृत्यू

कारचा टायर फुटल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात, दोघांचा मृत्यू
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरच्या भातन बोगद्याजवळ अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार तर 8 जण जखमी झाले आहेत. 
ही कार मुंबईकडे येत होती. महिंद्रा एसयूव्ही गाडीचा टायर फुटल्याने कार पुण्याला जाणाऱ्या लेनवर जाऊन इनोव्हा कारला धडकली. 
या धडकेत महिंद्रा एसयूव्हीमधील प्रशांत पाटील, निखिल सूद या दोघांचा मृत्यू झाला. तर 8 जखमींवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
=======================================

भुजबळांच्या संपत्तीवर ईडीची टाच, 55 कोटींची जमीन जप्त

भुजबळांच्या संपत्तीवर ईडीची टाच, 55 कोटींची जमीन जप्त
मुंबई बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची डोकेदुखी काही कमी व्हायला तयार नाही. कारण आधीच तुरुंगाची हवा खात असलेल्या भुजबळांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. 
भुजबळांचा गिरणा साखर कारखाना55 कोटी किमतीची 290 एकर जमीन ईडीनं जप्त केली आहे. त्यामुळे भुजबळांच्या अडचणीत भर पडली आहे. 
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ आणि पुतन्या समीर भुजबळ सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. त्यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. मात्र आता अंमलबजावणी संचलनालयानं थेट संपत्तीची जप्ती आणल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
=======================================

लेझर पेनमुळे मुलाने दृष्टी गमावली


  • तस्मानिया (ऑस्ट्रेलिया), दि. २२ - लहान मुलांसाठी बाजारात मिळत असलेली अत्याधुनिक खेळणी त्यांच्यासाठी धोकादायक असू शकतात. खेळणं म्हणून खरेदी करत असलेली वस्तू तुमच्या मुलाला काही इजा तर पोहोचवणार नाही ना ?  हे पाहणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियामधील तस्मानिया येथे लेझर पॉईंटमुळे मुलाला आपली दृष्टी गमवावी लागली आहे. ऑस्ट्रेलियामधील आरोग्य अधिका-यांनी पालकांना यासंबंधी चेतावणी दिली आहे.
    चमकणारे लेझर पॉईंट खेळताना डोळ्यावर मारल्यामुळे तस्मानिया येथील एका मुलाला 75 टक्के दृष्टी गमवावी लागली आहे. या मुलाला गेल्या काही दिवसांपासून पाहण्यामध्ये त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या डॉक्टरांनी नेत्र चिकित्सक बेन यांना बोलावलं होतं. त्यांनी तपासणी केली असता लेझर पेन डोळ्यात मारल्याने हा त्रास झाल्याचं त्यांना जाणवलं. 
    मुलाला डोळ्यांत कोणत्याही प्रकारची वेदना होत नव्हती मात्र लेझर पेनमुळे डोळ्यावर लगेच परिणाम झाला आणि त्यामुळे दृष्टी गमावली असल्याची माहिती बेन यांनी दिली आहे. लेझर पेन डोळ्यात मारलं त्यावेळी मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. मात्र त्याच्या डोळ्यातील महत्वाचा भाग जळाला आहे. यामुळे त्याला कायमस्वरुपी अंधत्व येण्याची शक्यता आहे. मुलाला फक्त 25 टक्के दृष्टीसोबत आपलं उर्वरित आयुष्य घालवावं लागण्याची शक्यता आहे. पालकांनी अशाप्रकारचे लेझर पेन तसंच मुलांनी हानीकारक असलेली खेळणी विकत घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
=======================================

महाराष्ट्र तुमची आई आहे, तिची इभ्रत राखा- उद्धवनी मुख्यमंत्र्यांना सुनावले


  • मुंबई, दि. २२ - विदर्भासोबतच वेगळ्या मराठवाड्याचीही भाषा करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यावर टीका करतानाच त्यांना पाठिशी घालणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टोला हाणला आहे. ओवेसीची जीभ कापून आणणार्‍यास लाखोचे इनाम लावणारे भाजपवाले महाराष्ट्रद्रोही श्रीहरी अणेंच्या बाबतीत इतके बुळबुळीत का झाले आहेत? शिवाजीराजांच्या आशीर्वादाची भाषा निवडणुकीपूर्वी करणारे मित्रवर्य अफझलखानाचा ‘महाराष्ट्र तोडो’ विडा का रंगवत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.  'मुख्यमंत्री, महाराष्ट्र ही तुमची आई आहे. तिच्याही इभ्रतीचे गांभीर्याने पाहा!' असा सल्लाही उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
    पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरुद्ध आरोप करणा-या दिग्विजय सिंग यांना नोटीस पाठवून पंधरा दिवसांत माफी मागण्यास सांगणारे, स्वत:च्या प्रतिमेबाबत इतके भावूक व संवेदनशील असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राची बदनामी सुरू असताना याच कारवाईचा बडगा का उगारीत नाहीत? असा सवालही उद्धव यांनी विचारला आहे. महाराष्ट्र त्यांची आई आहे, आईचा अपमान करणे हे मुख्यमंत्र्यांना चालत असेल तर ही विदर्भाची संस्कृती अजिबात नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत हा अणे इतक्या माकडचेष्टा करूनही मुख्यमंत्री त्याच्या बाबतीत इतके हळवे राहतात हे काही खंबीर राज्यकर्त्याचे लक्षण नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे. 
=======================================

रस्ते अपघातात वडिलांचा झाला मृत्यू, १३ व्याला कुटुंबियांनी दान केले ' हेल्मेट'


  • भोपाळ, दि. २२ - स्वत:च्या आप्ताला रस्ते अपघातात गमावल्यानंतर इतरांवर ही वेळ येऊ नये म्हणून एका कुटुंबाने १३व्याला 'हेल्मेट'चे दान दिल्याची घटना भोपाळमध्ये घडली आहे. मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यात राहणा-या राजेंद्र गुप्ता (वय ४९) हे ३ मार्च रोजी गाडीवरून जात असताना अपघात झाला आणि डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अशी वेळ इतर कोणावरही येऊ नये म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी 'ब्राह्मण भोज' देताना त्यांना पैसे वा वस्त्र देण्याऐवजी सुरक्षिततेचा उपाय असलेल्या ' हेल्मेट'चेच दान केले. 
    किराणा मालाचे दुकान चालवणारे राजेंद्र गुप्ता ३ मार्चला त्यांच्या दुचाकीवरून बाहेर जात होते, मात्र त्याचवेळी त्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका कारची त्यांना जोरदार धडक बसली आणि ते खाली कोसळले. या अपघातात जखमी झालेल्या गुप्ता यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि सुमारे आठवडाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र ते कोमात गेले आणि ८ मार्च रोजी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. 
    सोमवार, २१ मार्च रोजी त्यांचा १३ वा होता, यावेळी ' ब्राह्मण भोज' देण्याची पद्धत असते. त्यामध्ये मृत व्यक्तीचे आवडते पदार्थ वा वास्तू दान केल्या जातात. मात्र गुप्ता कुटुंबियांनी असे न करता बाह्मणांना ३५ हेल्मेट्स दान केnr.
    ' जर त्या दिवशी माझ्या वडिलांनी हेल्मेट घातले असते तर आज त्यांचा जीव वाचला असता. आमच्यावर जशी वेळ तशी इतर कोणावरही येऊ नये अशी आमची इच्छा आहे, त्यामुळेच आम्ही या लोकांना हेल्मेट वाटण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे आयुष्य तरी थोड्याफार प्रमाणात सुरक्षित राहील' असे गुप्ता यांचा मोठा मुलगा विवेक याने स्पष्ट केले.
=======================================

चिपळूणजवळील मल्ल्यांची जागा जप्त

  • चिपळूण : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची एक एकर जागा चिपळूणच्या तहसीलदार वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त करण्यात आली. ही कंपनी आतापर्यंत बंदच होती. या एक एकर जागेवर सुमारे १० ते १२ पडक्या इमारती आहेत.
    चिपळूण तालुक्यातील पिंपळ बुद्रुक गावी मल्ल्या यांची एक एकर जमीन आहे. या जमिनीवर युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड नावाची कंपनी उभी होती. ही जागा बिनशेती करण्यात आली होती. मात्र, गेली दोन वर्षे बिनशेतीचा सुमारे ४५ हजारांचा कर मल्ल्या यांनी थकवला होता. त्यामुळे चिपळूणच्या महसूल प्रशासनाने ही जमीन जप्त करण्याची कारवाई केली.
    तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळकवणेचे मंडल अधिकारी दिवाकर केळुस्कर, तलाठी शुभांगी गोंगाणे यांनी ही मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली.
=======================================

देवनार डम्पिंग ग्राउंडवर प्रवेश बंदी

  • मुंबई : देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये वारंवार लागणारी आग हा घातपात असण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे या डंपिंग ग्राऊंडला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे़ त्यानुसार डंपिंग ग्राऊंडच्या परिसरात यापुढे प्रवेश बंदी असणार आहे़ तसेच रात्रीच्या वेळेत या परिसरावर कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात येणार आहे़ वारंवार डंपिंग ग्राऊंडमध्ये लागणारी आग ही चिंतेचा विषय बनली असून यामागे घातपात असण्याची शक्यता खुद्द आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केली़ देवनारमध्ये दररोज पाच हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो़ या कचऱ्यात मौल्यवान सामानही असल्याने ते जमा करुन विकणारी टोळीच येथे कार्यरत आहे़ कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून या वस्तू शोधण्यासाठी कचरामाफिया ही आग लावत असण्याची शक्यता आहे़ त्यामुळे कचरा टाकण्यात येत असलेल्या परिसरात यापुढे कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, असे आयुक्तांनी जाहीर केले़ अंतर्गत रस्ते तयार करणार डंपिंग ग्राऊंड परिसरात आग विझविण्यासाठी जाणाऱ्या अग्निशमन दलास अनंत अडचणींचा सामना करावा लागतो़ प्रामुख्याने आतमधील रस्ते कचऱ्याने भरलेले असतात़ त्यामुळे पालिकेने अंतर्गत रस्ता तयार करण्यात येणार आहेत़ या कामाच्या निविदा मागविण्यात येणार आहेत़ तसेच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या कायमस्वरुपी तैनात ठेवण्यात येणार आहेत़
=======================================

३८ दुचाकींसह २ कार खाक

  • मुंबई : करीरोड येथील विघ्नहर्ता सोसायटीच्या आवारात पार्क केलेल्या वाहनांना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. या जळीतकांडात तब्बल ३८ दुचाकी आणि २ कार जळून खाक झाल्या आहेत, तर अनेक वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
    करी रोड येथील महादेव पालव मागावरील विघ्नहर्ता या सोसायटीमध्ये ५४० कुटुंबे राहतात. या सोसायटीच्या परिसरात सुमारे अडीचशे वाहने पार्क केली जात असल्याची माहिती सोसायटीचे सचिव संजय गुरव यांनी दिली. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास येथे पार्क केलेल्या वाहनांनी अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी इमारतीखाली धाव घेतली. स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देत आग विझविण्यास सुरुवात केली. या जळीतकांडात तब्बल ३८ दुचाकी आणि दोन कार जळून खाक झाल्या. अनेक बाईक या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क केल्यामुळे आगीच्या झळांमुळे त्याचे किरकोळ नुकसान झाल्याचे येथील स्थानिक किरण जाधव म्हणाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. या कृत्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
=======================================

बॉम्बस्फोट झाला तरी चिनाब पूल भक्कमच

  • सुशांत मोरे,  जम्मू
    पॅरिस येथील आयफेल टॉवर तसेच कुतूबिनारपेक्षाही सर्वात उंच असा रेल्वे पुल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर कोकण रेल्वेकडून उभारण्यात येत आहे. हा पुल उभारल्यानंतर त्याला असणारा दहशतवाद्यांकडून धोका पाहता कोकण रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टिने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. पुलाच्या बांधकामात उच्च दर्जाची सामुग्री वापरण्यात आली असून ४0 किलोग्रॅम आरडीएक्स किंवा टीएनटीसारखे भयंकर स्फोटके वापरुन स्फोट घडविल्यासही पुलाला फारसा धक्का लागणार नाही आणि या पुलावरुन ट्रेन सुखरुप धावू शकेल, याची खबरदारी घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. चिनाब नदीवर बांधण्यात येणारा पुल २0१८-१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही कोकण रेल्वेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
    जम्मू आणि काश्मीरमध्ये ३२६ किलोमीटरचा उधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल्वे जोडणी प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पात असणारे बोगदे, पुल, रेल्वे मार्गाचे काम हे उत्तर रेल्वे, कोकण रेल्वे आणि इरकोनला देण्यात आले आहे. या प्रकल्पात सर्वात महत्वाचा मानला जाणाऱ्या चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पुल साकारण्याचे काम हे कोकण रेल्वेकडून केले जात आहे. चिनाब नदीवरील हा पुल जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा मानला जातो. अशा या पुलाचे काम २00२-0३ पासून सुरु करण्यात आले. नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंचीवर पुल साकारताना कोकण रेल्वेला मोठे आव्हान स्वीकारावे लागत असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले. आयफेल टॉवरची उंची ही ३२४ किमी तर कुतूबिनारची उंची ही ७२ किलोमीटर एवढी आहे. त्यामुळे जगातील सर्वात उंच असा पुल बांधण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.पुलाचे काम ६0 टक्के पूर्ण झाले असून २0१८-१९ पर्यंत तो पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पुलाच्या बांधकामासाठी २५ हजार मेट्रीक टन स्टील वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर पुल बांधल्यानंतर त्यावर उभारण्यात येणाऱ्या रेल्वे रुळाच्या बाजूलाच वरच्या भागात काही जाळयाही बसविण्यात येतील. जेणेकरुन एखाद्या ट्रेनमधून जाताना दहशतवाद्यांनी स्फोटके टाकल्यास ती जाळीत अडकतील. मजबूत स्टीलचे बांधकाम आणि स्फोटकांमुळे पुलाला फारसा धक्का बसू नये यासाठी बांधकामाचे करण्यात आलेल्या नियोजनामुळे पुल सुरक्षित राहील याची पुरेपुर काळजी घेण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
=======================================

औरंगाबाद; शहरात आज प्रथमच महिलेचे अवयवदान 

तीन जणांना जीवदान - दोघांना मिळेल दृष्टी

औरंगाबाद - दुचाकीच्या धडकेत जखमी होऊन मेंदूचे कार्य थांबलेल्या एका महिलेचे अवयवदान करण्यात येणार आहे. अवयवदानाबद्दल जनजागृती झाल्यामुळेच अनेक जण यासाठी पुढाकार घेत असून शहरात प्रथमच एका महिलेचे अवयवदान करण्यात येणार आहे.

मंदाबाई गडवे (वय ५५) या शुक्रवारी (ता.१८) सकाळी सिडको एन-सहा परिसरात मॉर्निंग वॉकला जात असताना दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डोक्‍याला गंभीर मार लागल्याने त्यांच्या मेंदूचे कार्य थांबल्याचे डॉक्‍टरांनी सोमवारी (ता.२१) नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. आवश्‍यक तपासण्या करून मागणीनुसार अवयव देण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी रक्‍ताचे नमुने मुंबई येथे तातडीने पाठविण्यात आले. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास या प्रक्रियेस सुरवात होईल. 
मुंबई येथील फोर्टीस रुग्णालयात यकृत, एमजीएम रुग्णालयात एक किडनी, तसेच शहरातील अन्य एका रुग्णालयातील रुग्णास दुसरी किडनी देण्यात येईल. तसेच दोन्ही डोळ्यांचे एमजीएम रुग्णालयात प्रत्यारोपण केले जाईल. मंदाबाई यांना प्रदीप, विजय, दिलीप ही मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी दुपारपासून एमजीएम रुग्णालयात डॉक्‍टरांची लगबग वाढली आहे. रात्री उशिरापर्यंत रुग्णाच्या रक्‍त, रक्‍तदाब अशा तपासण्या सुरूच होत्या. कुटुंबीयांनी सर्वच अवयव देण्याची तयारी दर्शविल्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यात त्यांच्या हदयाला एक ब्लॉकेज आढळल्याने हदय पाठविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. सर्व अवयव वेळेत पोहोचावेत, यासाठी ग्रीन कॉरिडॉर  असणार आहे.

मेंदूचे कार्य थांबले असल्याने आमची आजी लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहे. त्या ब्रेनडेड असल्याचे सांगत डॉक्‍टरांनी समुपदेशन केले. त्यानुसार आम्ही अवयवदान करण्याची मानसिक तयारी केली. आजीमुळे कुणाचे तरी जीव वाचत आहेत, ही भावना मोठी असली तरी ती नसल्याचे दु:ख आहेच. 
=======================================
इंटेलचे माजी 'सीईओ' अँडी ग्रूव्ह यांचे निधन 
सँटा क्लारा- संगणकाचा महत्त्वाचा भाग ‘मदर बोर्ड‘ चिप बनविणारी जगातील आघाडीची व सर्वांत मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रूव्ह यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. 

नाझी राजवटीत वाढल्यानंतर तरुण वयातच हंगेरीतून बाहेर पडून अमेरिकेत गेलेल्या ग्रूव्ह यांनी 1980 च्या दशकात इंटेल कंपनीला दिवाळखोरीपासून वाचविले. ग्रूव्ह यांचे निधन सोमवारी झाले असल्याचे इंटेलच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण नमूद करण्यात आले नाही.

इंटेलमध्ये 37 वर्षे कार्यरत असताना कंपनीला चिप बनविणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी बनविण्यात ग्रूव्ह यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना पार्किन्सनचा आजार होता, तसेच 1990च्या दशकाच्या मध्यात त्यांना ग्रंथींचा कर्करोगही झाला होता. 
=======================================
पठाणकोट हल्ला; हल्लेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध
पंजाबमधील पठाणकोट येथील हवाईतळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांची छायाचित्रे आज (मंगळवार) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

पठाणकोट येथे 2 जानेवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातील चारही हल्लेखोरांना ठार मारण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले होते. या चारही मृत हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. 

या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी लवकरच पाकिस्तानचे चौकशी पथक भारतात येणार आहे. त्यापूर्वीच एनआयएने हल्लेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली 
आहेत. हे चारही हल्लेखोर पाकिस्तानचे नागरिक असल्याचा संशय आहे. चौकशीसाठी हल्लेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाच्या परवानगीनंतर ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

=======================================
'अलिबाबा' लवकरच 'वॉलमार्ट'ला मागे टाकणार 
बीजिंग - चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली ‘अलिबाबा‘ लवकरच जगातील सर्वांत मोठी रिटेल कंपनी असलेल्या ‘वॉलमार्ट‘ला विक्री आणि एकूण उलाढालीच्या बाबतीत पिछाडीवर टाकण्याची शक्यता आहे. ‘अलिबाबा‘ची विक्री 3 ट्रिलियन युआन म्हणजेच (तीन लाख कोटी युआन) 463 अब्ज डॉलरवर पोचली आहे.
‘अलिबाबा‘कडून आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च रोजी विक्रीच्या आकड्याची अधिकृत आकडेवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ‘वॉलमार्ट‘ने 31 जानेवारी 2016 पर्यंत 478.6 अब्ज डॉलर मूल्याची निव्वळ विक्री केली आहे. तर ‘अलिबाबा‘ची विक्री तीन लाख कोटी युआन म्हणजेच 463 अब्ज डॉलरवर पोचली आहे.
‘अलिबाबा‘च्या एकूण विक्रीची तुलना केल्यास ती चीनच्या सिचुआन प्रांताच्या निव्वळ देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) बरोबर आहे. अलिबाबाचे चीनमधील हंग्झहौ येथे मुख्यालय आहे तर अमेरिकेत बेंटोनविले, आर्कान्सा येथे वॉलमार्टचे मुख्य कार्यालय आहे.
=======================================
जलव्यवस्थापनाबाबत सगळ्यांचीच उदासीनता
उपलब्ध पाण्याचे स्रोत मागच्या २० वर्षांत अनियंत्रितपणे वापरले गेले. आजही भूगर्भातील पाणी प्रचंड उपसले जात आहे. नदी, तलाव आणि धरणांमधील पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले जात नाही. 
- रजनीश जोशी

भारतात कोसळणाऱ्या पावसाचे योग्य व्यवस्थापन केले तर पाण्याची समस्या भेडसावणार नाही. इस्राईलसारख्या कमी पाऊस पडणाऱ्या देशाने केलेली प्रगती हे जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. भारतात जलव्यवस्थापनाबाबत सर्व पातळ्यांवर उदासीनता दिसून येते. सरकारी यंत्रणा, जलसंपदा विभाग, शेतकरी, गावकरी आणि शहरातील नागरिक असे सारेच जलव्यवस्थापन आवश्‍यक असल्याचे मानायलाच तयार नाहीत. अनेकांना त्याचे महत्त्व पटले असले तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत मात्र उदासीनता आढळते. जलव्यवस्थापनाचा विचार करताना आपल्याला पाऊस, जलसाठे, सिंचन, पीकपद्धत, मानवी सवयी यांचा विचार करणे आवश्‍यक आहे. पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस. त्याच्या इतका ठोस पण बेभरवशाचा स्रोत दुसरा नाही. भारतात चेरापुंजीला सर्वाधिक पाऊस पडतो, त्या कोसळणाऱ्या पावसाचे नियोजन केले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात कोकणात सर्वाधिक पर्जन्यमान असते; पण योग्य व्यवस्थापनाअभावी सगळे पाणी वाहून समुद्रात जाते, उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. 
=======================================
वीज दरवाढीचा शॉक शक्‍य
मुंबई - भीषण दुष्काळाने राज्यातील शेतकरी संकटात आहे. उद्योगही अडचणीत असताना महावितरने 38 हजार 997 हजार कोटींची तूट भरून काढण्यासाठी वीजदरात तब्बल 22 टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे समजते. दरवर्षी साडेपाच टक्‍क्‍यांच्या दरवाढीस महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने हिरवा कंदील दाखविल्यास वीज ग्राहकांना शॉक बसणार आहे. 

मागील दोन वर्षांतील तूट आणि आगामी चार वर्षांत होणाऱ्या महसूल तुटीच्या वसुलीसाठी महावितरणाने वीज दरवाढीचा हा प्रस्ताव तयार केला आहे. महावितरण कंपनीने गेल्या 4 मार्च रोजी तो प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला. ही प्रस्तावित दरवाढ 2016-17 ते 2019-20 या चार वर्षांसाठी अपेक्षित असून, त्यात शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्व ग्राहकांचा समावेश आहे. या दरवाढीतून आगामी चार वर्षांत महावितरणाला 38 हजार 997 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. सध्याच्या वीजदरावर दरवर्षी साडेपाच टक्‍क्‍यांनी होणारी दरवाढ ही चौथ्या वर्षी 22 टक्‍क्‍यांपर्यंत पोचणार आहे. 

महावितरणच्या प्रस्तावानुसार 2014-15 मध्ये 1 हजार 897 कोटी आणि 2015-16 या वर्षी 2 हजार 992 कोटींची तूट झाली आहे. 2016-17 ते 2019-20 या आगामी वर्षात सध्याच्या दरानुसार 34 हजार 108 कोटी रुपयांची महसुली तूट होण्याचा अंदाज आहे. एवढी प्रचंड तूट भरून काढण्यासाठी ही दरवाढ अनिवार्य असल्याचा दावा महावितरणने केला आहे. 

गेल्या दोन वर्षांतील तूट आणि पुढील वर्षातील महसूल तफावत अशी मिळून 9 हजार 310 कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी पहिल्या वर्षीच 16.42 टक्के इतकी प्रचंड दरवाढ अपेक्षित होती; परंतु ग्राहकांचे हित लक्षात घेऊन प्रत्येक वर्षी साडेपाच टक्के दरवाढ मर्यादित ठेवण्यात आली आहे, असा युक्तिवाद राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. हा युक्तिवाद नियामक आयोगाने मान्य केल्यास राज्यातील दुष्काळी परिस्थितीत वीजदरवाढीचा जबरदस्त फटका शेतकरी, मध्यमवर्गीय, उद्योजकांना बसण्याची शक्‍यता आहे. 
=======================================
सुरेश जैन यांच्याविरुद्ध आरोपनिश्‍चितीचे आदेश
पुणे - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी केल्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांच्याविरुद्ध आरोप निश्‍चित करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शीतल एस. बांगड यांनी दिले आहेत. जैन यांच्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावा आढळून आल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांनी निकालात नमूद केले आहे. 

जैन यांनी मे 2003 मध्ये पत्रकार परिषदेत हजारे हे भ्रष्टाचारी व ढोंगी आहेत, हजारे यांच्याविरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत, असे आरोप केले होते. हे वृत्त प्रसारमाध्यमांत आले होते. याच काळात जैन यांनी पुन्हा एकदा माध्यमांतून हजारे यांच्यावर आरोप करीत त्यांना दिलेला पद्मश्री, पद्मभूषण हे पुरस्कार काढून घ्यायला हवेत, हजारे यांच्यावर मानसिक रुग्णालयात उपचार केले पाहिजे, अशी वक्तव्ये केली होती. यामुळे हजारे यांनी जैन यांच्याविरुद्ध येथील न्यायालयात तक्रार केली होती. 

हजारे यांचे वकील हर्षद निंबाळकर आणि मिलिंद पवार यांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडली होती. न्यायालयाने हजारे यांच्यासह काही पत्रकारांच्या साक्षी नोंदवून घेतल्या. हा साक्षी पुरावा झाल्यानंतर हजारे आणि जैन यांच्यातर्फे त्यावर युक्तिवाद केला गेला होता. मार्च महिन्यात या दाव्यातील तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या. न्यायदंडाधिकारी बांगड यांनी हजारे यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानला. जैन यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याइतका पुरावा आढळून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. या दाव्याची पुढील सुनावणी 28 मार्च रोजी होणार असून, त्या वेळी जैन यांना न्यायालयात हजर राहावे लागेल, अशी माहिती हजारे यांचे वकील पवार यांनी दिली.
=======================================
'अपयश झाकण्यासाठी भाजपची राष्ट्रवाद चर्चा '
नवी दिल्ली - कॉंग्रेसची राष्ट्रवादाची व्याख्या व्यापक असून, भाजपने आपले अपयश झाकण्यासाठी बनावट राष्ट्रवादाची चर्चा सुरू केली आहे, असे म्हणणाऱ्या अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीने महाराष्ट्र विधानसभेत "एमआयएम‘ आमदाराच्या निलंबनावरून सत्ताधारी भाजपच्या सुरात कॉंग्रेस नेत्यांनीही सूर मिसळल्याबद्दल डोळे वटारले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत जे काही घडले त्याचे उत्तर देण्यासाठी स्थानिक नेते सक्षम आहेत, असे म्हणत केंद्रीय कॉंग्रेसने हात झटकले आहेत. 

महाराष्ट्र विधानसभेमध्ये "एमआयएम‘चे आमदार वारीस पठाण यांनी "भारत माता की जय‘ म्हणण्यास विरोध दर्शविल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. या निलंबनाच्या कारवाईला सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेसोबतच विरोधी पक्षातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पाठिंबा दर्शविला होता. आता विरोधकांच्या पाठिंब्याचे भांडवल करत भाजपने राष्ट्रवाद विरुद्ध राष्ट्रद्रोह यावर पुन्हा चर्चा घडवून आणणे सुरू केल्यामुळे कॉंग्रेसची अडचण वाढली आहे. विधानसभेत भाजपच्या सुरात सूर मिसळल्याबद्दल केंद्रीय आणि प्रदेश कॉंग्रेसमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. कॉंग्रेसच्या आजच्या दैनंदिन वार्तालापादरम्यान प्रवक्ते मनीष तिवारी यांनी महाराष्ट्रातील निर्णयप्रक्रियेबद्दल हात झटकून सूचक शब्दांत पक्षाची नाराजी व्यक्त केली. 

ते म्हणाले, की सरकारच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर बनावट चर्चा घडवून आणली जात आहे. नकली राष्ट्रवादी हे राष्ट्रवादाचे ठेकेदार बनले आहेत. "भारत माता की जय‘ बोलल्यानंतरच एखाद्याला राष्ट्रवादी म्हटले जाईल आणि जयहिंद, हिंदुस्थान जिंदाबाद, मेरा भारत महान किंवा वंदेमातरम म्हटले तर ती व्यक्ती राष्ट्रभक्त नाही हा कोणता न्याय आहे? असे निकष असतील तर "जयहिंद‘चा नारा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना काय ठरवणार, हिंदुस्तान जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद म्हणत फासावर गेलेले शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे आकलन कसे करणार, असे सवाल मनीष तिवारी यांनी केले.

=======================================

हैदराबाद विद्यापीठात कुलगुरुंविरोधात निदर्शन

  • ऑनलाइन लोकमत - 
    हैदराबाद, दि, २२ - रोहीत वेमुला आत्महत्या प्रकरणावरुन विद्यार्थ्यांमध्ये असलेला संताप अजून कायम आहे. मंगळवारी हैदराबाद विश्वविद्यापाठीचे कुलगुरु आप्पा राव कामावर रुजू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात निदर्शन केलं. कुलगुरु आप्पा राव यांनी तब्ब्ल 2 महिन्यानंतर पुन्हा पदभार स्विकारला. विद्यार्थ्यांनी आप्पा राव यांच्या कार्यालयाची तोडफोड करत आपला राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी खुर्च्या, कुंड्यांची तोडफोड केली.कुलगुरुंना पदावरुन हटवण्याच्या मागणीवर विद्यार्थी अजूनही कायम आहेत.
     
    रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर अडचणीत आलेले कुलगुरु आप्पा राव मोठ्या सुट्टीवर गेले होते. आप्पा राव यांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ प्राध्यापक विपिन श्रीवास्तवर हे कुलगुरुंचा प्रभार सांभाळतील अशी माहिती हैदराबाद विश्वविद्यापीठाकडून देण्यात आली होती. आप्पा राव यांना पदावरुन हटवण्यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते. कुलगुरुंना पदावरुन हटवण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम असून त्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं होतं. 
     
    रोहीत वेमुला याने आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये माझ्या आत्महत्येला कोणी जबाबदार नसल्याचं लिहिलं होतं. मात्र आत्महत्येच्या एक महिना अगोदर रोहितने कुलगुरु आप्पा राव यांना पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये कॅम्पसमधील दलित विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यासाठी दोरी द्यावी असं म्हंटलं होतं.
=======================================

दुष्काळामुळे अंधेरी दफनभूमीचा पाणी शिंपडण्याची प्रथा टाळण्याचा सल्ला


  • मुंबई, दि. २२ - कबरीवर पाणी शिंपडल्यानंतर मृत व्यक्तीच्या आत्म्याची दु:ख, वेदना, नरकयातनांमधून सुटका होते असे मुस्लिम समाजामध्ये काहीजण मानतात. त्यामुळे मुस्लिम धर्मामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईक कबरीवर जाऊन पाणी शिंपडतात. मुंबईमध्ये सध्या काही भागांमध्ये पाणी टंचाई आहे. 
     
    त्यामुळे अंधेरी चार बंगला येथील मुस्लिम कबरस्तान ट्रस्टच्या विश्वस्तांनी दफनभूमीमध्ये मोठा फलक लावून कबरीवर पाणी टाकण्याची प्रथा टाळण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. इस्लाममध्ये या प्रथेला आधार नसल्याचे त्यांनी फलकावर लिहीले आहे. मशिदीला लागून असलेल्या चारबंगला येथील या दफनभूमीमध्ये पंधराशे ते सोळाशे कबरी आहेत. प्रसिद्ध ऊर्दू कवी कैफी आझमी आणि अभिनेता फारुख शेख यांच्यावर याच दफनभूमीत अंत्यसंस्कार झाले. 
     
    दफनभूमीत प्रवेशव्दाराजवळ पाण्याचे डब्बे ठेवले आहेत. दफनभूमीत प्रवेश केल्यानंतर मृतांचे नातेवाईक डब्ब्यांमध्ये पाणी भरुन शिंपडण्यासाठी कबरीवर नेतात. पाणी टंचाईची कल्पना यावी यासाठी दफनभूमीत हा फलक लावला आहे. विश्वस्तांना महापालिकेने कोणतीही विनंती केलेली नाही. त्यांनी स्वेच्छेने पाणी टंचाईची जाणीव ठेऊन हा फलक लावला आहे. सध्या पाणी जपून वापरणे गरजेचे आहे असे विश्वस्तांनी सांगितले. 
=======================================

शिर्डीत प्रेमी युगलाची आत्महत्या


  • शिर्डी, दि. २२ - काही महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झालेल्या प्रेमीयुगलाने शिर्डीत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. कैलास गाढवे (वय २५)असे मृत तरूणाचे नाव असून तो इगतपुरीचा तर कोमल कदम (वय २०) ही तरूणी रायगडची असल्याचे समजते. कैलास व कोमल या दोघांची फेसबूकच्या माध्यमातून झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे, ते दोघेही गेल्या १ मार्च पासून घरून बेपत्ता होते.
    काल, २१ मार्च रोजी येथील हेडगेवार नगर मधील हॉटेल हरजीवन येथे या युगलाने विष प्राशन केल्याचे पोलीसना रात्री साडेनऊ वाजता कळवण्यात आले, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व उपनिरीक्षक कहाळे तातडीने घटना स्थळी दाखल झाले व त्यांनी या दोघांना साईबाबा रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी कोमल मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर रात्री दोन नंतर कैलासनेही या जगाचा निरोप घेतला, मृत्यूपूर्वी या प्रेमी युगलाने कॉमन सुसाईड नोट लिहिली असून त्यात आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करत असून यास कुणालाही जबाबदार धरू नये असे सांगत आम्ही माफीला लायक नाही अशी खंतही व्यक्तही केली आहे, या सुसाईड नोट वर दोघांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
=======================================
=======================================

No comments: