Tuesday, 22 March 2016

नमस्कार लाईव्ह २२-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ब्रुसेल्स; बेल्जियमच्या ब्रसेल्स विमानतळावर शक्तीशाली बॉम्बस्फोट 
२- अमेझॉनवर पासवर्डऐवजी सेल्फी काढून पेमेंट 
३- इस्लामिक स्टेटने स्विकारली ब्रसेल्स हल्ल्याची जबाबदारी 
४- कराचीत विषारी दारू पिल्याने 24 हिंदू मृत्युमुखी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- महाराष्ट्राचे चार भागात विभाजन करा - संघ 
६- कुमार विश्वासांवर लैंगिक शोषणाचा आरोप, महिलेला हायकोर्टाची नोटीस 
७- लोकशाहीच्या हत्येकडे मोदींचं दुर्लक्ष- काँग्रेस 
८- इलाहाबाद ते कानपूर स्टेशनच्या दरम्यान २३ मार्चला मेमू ट्रेन धावणार. 
९- मुंबईहून ब्रसेल्सला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- अणे तर निमित्त, संघ-भाजपलाच महाराष्ट्र तोडायचा आहे : राज 
११- देवनार आगीनं जीव घेतला! 6 महिन्यांच्या चिमुरड्याचा धुरामुळं मृत्यू 
१२- पुणे; पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये कन्हैयाच्या समर्थनार्थ घोषणा 
१३- एस. श्रीशांत केरळ विधानसभा निवडणूक लढवणार 
१४- व्याजदर कपातीचा चेंडू रिझर्व्ह बँकेच्या कोर्टात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- भंडारा; भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर गँगरेप, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेलिंग 
१६- औरंगाबाद; पाण्यासाठी आलेले काळवीट पाईपलाईनला अडकले 
१७- देहरादून; घोड्याला मारहाणप्रकरणी भाजप आमदाराला जामीन 
१८- हैदराबाद: कुलगुरुंच्या कार्यालयात तोडफोड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- iPhone SE च्या लाँचिंगनंतर iPhone 5s स्वस्त 
२०- फ्लिपकार्ट होळी: सॅमसंगच्या स्मार्टफोनवर सूट, मस्त ऑफर 
२१- आजी-आजोबांच्या अनोख्या शुभेच्छांनी आलियाला अश्रू अनावर 
२२- होळीचे रंग उतरवण्यासाठी 11 सोप्या घरगुती टिप्स 
२३- मुलाखतीला या चुका टाळा अन् नोकरी पक्कीच समजा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र जबर घेतो 
(रवींद्र थोरात, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
==========================================

अमेझॉनवर पासवर्डऐवजी सेल्फी काढून पेमेंट

अमेझॉनवर पासवर्डऐवजी सेल्फी काढून पेमेंट!
वॉश्गिंटन: अमेरिकन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन आता पेमेंटसाठी पासवर्डऐवजी सेल्फीचा प्रयोग सुरु करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या मते, हा नवीन प्रयोग अतिशय सुरक्षित असेल.

मीडिया रिपोर्टनुसार, ग्राहक यामुळे आपल्या वस्तूसाठी सेल्फी किंवा एखाद्या छोट्या व्हिडिओचा वापर करु शकतात. हे प्रयोग असाच आहे ज्याप्रमाणे आयफोनमध्ये पासवर्ड टाकण्याऐवजी फिंगर सेन्सर.

सेल्फीचा खरेपणा चाचपण्यासाठी उपभोक्त्याला डोळा मारणं, डोकं हलवणं किंवा हसणं यासारख्या गोष्टी करण्यास सांगितल्या जातील. ज्यामुळे समोरची व्यक्ती स्वत: तीच आहे याची खात्री पटेल.

अमेझॉननं नुकतंच याच्या तांत्रिक पेटंटसाठी अर्ज केला आहे. या नव्या प्रयोगाची सुरुवात कधीपासून होणार याबाबत मात्र कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही.
==========================================

अणे तर निमित्त, संघ-भाजपलाच महाराष्ट्र तोडायचा आहे : राज

मुंबई : स्वतंत्र विदर्भ वा मराठवाडा ही संकल्पना मुळात श्रीहरी अणेंची नसून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

भाजप आणि संघ नेहमी अशी वक्तव्य दुसऱ्यांकडून वदवून घेऊन जनमताचा अंदाज घेत असतात. त्यामुळे हा अणेंच्या डोक्यात वळवणारा कीडा नाही, तर हा भाजपचाच आहे, असा घणाघात राज यांनी केला.

मूळात श्रीहरी अणेंना महाराष्ट्र तोडण्याची भाषा करण्याची हिम्मत झालीच कशी? असा सवाल त्यांनी केला.

“अणे हे नागपूरचे..मूळचे संघाचे..त्यांना राज्याच्या महाधिवक्तेपदी आणून बसवलं. त्यांची इच्छा नसताना त्यांना हे पद दिलं. त्यांनी आता महाराष्ट्र तोडण्याची भाषा करून राजीनामा दिला. म्हणजे ते सुटले. पण त्यांनी सोडलेला कीडा, पिल्लू घेऊन, मराठवाड्यातील छोटे छोटे नेते उठून बसतील आणि त्यांच्या तोंडून हे वदवायला लावतील, हे भाजपचं जुनं धोरण आहे”, असं टीकास्त्र राज यांनी सोडलं.
==========================================

देवनार आगीनं जीव घेतला! 6 महिन्यांच्या चिमुरड्याचा धुरामुळं मृत्यू

देवनार आगीनं जीव घेतला! 6 महिन्यांच्या चिमुरड्याचा धुरामुळं मृत्यू
मुंबई : देवनार कचरा डेपोमध्ये लागलेल्या आगीमुळे मुंबईची उपनगरं धुरकटून निघाली आहेत. आगीवर कालच नियंत्रण मिळवलं असलं तरी धगधगत असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून विषारी वायू हवेत पसरले आहेत. कचरा भूमीतून निघणाऱ्या या धुरानं चिमुकल्याचा जीव घेतला आहे.

देवनारचं प्रदूषण आता चिमुरड्यांच्या जीवावर उठलं आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जवळच राहणाऱ्या एका कुटुंबातील 6  महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सहा महिन्यांपासून ज्या चिमुरड्याचा किलबिलाट घरात घुमत होता, तेच घर आता सुन्न पडलं आहे. डोळ्यांसमोर खेळणारा, बागडणारा हुसनैन आता हे जगच सोडून गेला आहे.

गोवंडीत राहणाऱ्या सहा महिन्याच्या हसनैनला गेल्या दोन दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आज सकाळी हसनैननं जीव सोडला. या घटनेनंतर हसनैनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

विशेष म्हणजे देवनार, गोवंडी, शिवाजीनगर आणि परिसरातील शेकडो लोक सध्या श्वसनाच्या विकारानं त्रस्त आहेत. गेल्या महिन्याभरात देवनार डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याची ही दुसरी वेळ आहे.
==========================================

'महाराष्ट्राचे चार भागात विभाजन करा'

'महाराष्ट्राचे चार भागात विभाजन करा'
नागपूर: ‘महाराष्ट्राचे तीन नाही तर चार विभाजन करणं जास्त सोईचं आहे. आणि पूर्वीपासून संघाची तीच भूमिका आहे.’ असं म्हणत स्वतंत्र मराठवाडा आणि विदर्भाच्या मागणीला राष्ट्रीय स्वंयसेवक संघानं समर्थन दिलं आहे.

छोट्या राज्यांच्या स्थापनेसाठी राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना केली पाहिजे अशी मागणीही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केली आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. नव्या पुनर्रचनेत 3 कोटींपेक्षा जास्त आणि 50 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येचं राज्य नसावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. असं झालं तर महाराष्ट्राचे चार विभाजन होऊ शकतात.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यामध्ये यापूर्वी महाराष्ट्राचे चार प्रांत करण्यात आलेत. त्यामुळे कारभार सोईचा व्हावा म्हणून महाराष्ट्राचं चौभाजन करण्याची मागणी पुढे आली आहे. यावर भाजप सरकार काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान, मा. गो. वैद्य यांच्या वक्तव्यावर सेनेनं सावध पवित्रा घेतला आहे. सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘माझा’शी बोलताना स्पष्ट केलं की, सेनेने अखंड महाराष्ट्रासाठी कायमच आंदोलनं केली आहेत. मात्र, वैद्य हे संघाचे मोठे कार्यकर्ते असून आम्ही त्यांचा आदर करतो. असं सरनाईक म्हणाले.
==========================================

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये कन्हैयाच्या समर्थनार्थ घोषणा

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये कन्हैयाच्या समर्थनार्थ घोषणा
पुणे : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूतील छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये घोषणाबाजी करण्यात आली.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये आज जेएनयूतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष अलोक सिंगचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अलोक सिंग फर्ग्युसन कॉलेजमध्ये आला आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी कन्हैय्या कुमारच्या समर्थनात घोषणाबाजी केली.

फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेने जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. याप्रकरामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वीच जेएनयूमध्ये संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरुच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अफजलचा जयजयकार आणि देशाविरोधी घोषणा दिल्याचा आरोपामुळे कन्हैया कुमारला अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशाचं वातावरण ढवळून निघालं होतं. विरोधकांनी कन्हैयाच्या अटकेवरून मोदी सरकारला धारेवर धरलं होतं.

दरम्यान, आज कन्हैया कुमारने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
==========================================

भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर गँगरेप, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेलिंग

भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर गँगरेप, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेलिंग
भंडारा : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या नराधमांनी पीडित मुलीचा व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेलिंगही केलं. शिवाय, कुणाला सांगितल्यास आईला जीव मारण्याची धमकी दिली.

16 वर्षीय पीडित मुलगी 1 महिन्यापूर्वी आरोपी प्रियकराबरोबर फिरायला गेली. तिथे आरोपीने तिच्या बळजबरी केली. त्यानंतर तिथे त्याचे 2 मित्र आले आणि त्यांनीही तिच्यावर बळजबरी केली. अश्लिल व्हिडियो आणि फोटो काढले.

कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करुन तुझी बदनामी करू आणि तुझ्या आईला जीवे मारू, अशी  धमकी दिली गेली. या घटनेनंतर तिला त्याचा त्रास होऊ लागल्याने तिने पुन्हा आपल्या प्रियकराला सांगितले.

त्यानंतर औषध देण्याच्या बहाण्याने पुन्हा पीडित मुलीवर बळजबरी करत पाच नराधमांनी बलात्कार केला.

या प्रकरणातील एक फोटो मुलीच्या घरच्यांच्या हाती लागल्यानंतर सत्य बाहेर आलं. अखेर सहा नराधमांविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत 6 पैकी  5 जणांना अटक केले. मात्र, एक आरोपी अजूनही फरार आहे.
==========================================

बेल्जियमच्या ब्रसेल्स विमानतळावर शक्तीशाली बॉम्बस्फोट

बेल्जियमच्या ब्रसेल्स विमानतळावर शक्तीशाली बॉम्बस्फोट
ब्रसेल्स :  बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सच्या जॅव्हेन्टम विमानतळावर दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. डिपार्चर हॉलमध्ये झालेल्या स्फोटामुळे अनेक जण जखमी झाल्याचं कळतं. स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

महत्त्वाचं म्हणजे पॅरिस हल्ल्याचा संशयित दहशतवादी सलाह अब्देसलाम याला चार दिवसांपूर्वी ब्रसेल्समधूनच अटक करण्यात आली होती.

स्फोटानंतर विमानतळ रिकामं केलं जात आहे. हा स्फोट अमेरिकन एअरलाईन्सच्या चेक इन डेस्कजवळ भारतीय वेळेनुसार, दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. या स्फोटा 11 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

विमानतळ बंद करण्यात आलं आहे. विमानतळाच्या दिशेने येणारी रेल्वे आणि हवाई वाहतूक रोखण्यात आल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे. शिवाय विमानतळावर अडकलेल्या लोकांन बाहेर काढण्याचं प्रयत्न सुरक्षारक्षक करत आहेत.

दरम्यान विमानतळावर अनेक भारतीय नागरिक असल्याचंही कळतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यातच बेल्जियमच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

==========================================

iPhone SE च्या लाँचिंगनंतर iPhone 5s स्वस्त

मुंबई:  गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला iPhone SE अखेर लॉन्च झाला आहे. अॅपल इव्हेंटमध्ये अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या उपस्थितीत आयफोन SE लॉन्च करण्यात आला. हा फोन स्वस्त असेल असा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र या फोनची किंमत तब्बल 39 हजार रुपये आहे.

दुसरीकडे या फोनच्या लाँचिंगनंतर आयफोन 5s हा फोन स्वस्त होईल असा अंदाज होता. iPhone5s हा फोन निम्म्या किमवतीवर येईल असं सांगण्यात येत होतं. मात्र iPhone5s ची किंमत निम्म्यावर आली नसली तरी सध्या तो 18 हजार रुपयांच्या घरात आहे.

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘ईबे’ आणि अॅमेझॉनवर iPhone5s च्या किमती 18 हजार रुपयांच्या आसपास आहेत.
==========================================

पाण्यासाठी आलेले काळवीट पाईपलाईनला अडकले 


दुष्काळी मराठवाड्यात पाणी प्रश्न जीवावर उठला आहे. जिथं माणसं पाण्यावाचून जीव सोडत आहेत, तिथं जनावरांचं काय?..
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील नागद इथं पाण्याच्या शोधात फिरणारे काळवीट ड्रीपच्या पाईपला अडकून पडले.

==========================================

एस. श्रीशांत केरळ विधानसभा निवडणूक लढवणार

एस. श्रीशांत केरळ विधानसभा निवडणूक लढवणार?
मुंबई: आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलची हवा खाऊन आलेला क्रिकेटपटू एस.श्रीशांत आता राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

आगामी केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीशांत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजप श्रीशांतला उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.

यासाठी श्रीशांतशी आवश्यक ती चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या प्रकरणावर श्रीशांतची नेमकी बाजू अजून समजू शकली नाही.

श्रीशांत एर्नाकुलम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्याला याबाबत विचारलं असता, एक दिवस थांबा, तुम्हाला उत्तर मिळेल, असं श्रीशांत म्हणाला. याशिवाय भाजपसमावेशाबाबतही उद्याच माहिती मिळेल, असंही त्याने नमूद केलं.

श्रीशांतने कुटुंबीयांशी चर्चा करून अंतिम निर्णय देण्याबाबत भाजपच्या उच्च नेत्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येत्या एप्रिल महिन्यात पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. ज्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू , केरळ, पद्दुचेरीचा समावेश आहे. त्यामुळे भाजपनं आता मोर्चेबांधणीसाठी सुरूवात केली आहे.
==========================================

कुमार विश्वासांवर लैंगिक शोषणाचा आरोप, महिलेला हायकोर्टाची नोटीस

कुमार विश्वासांवर लैंगिक शोषणाचा आरोप, महिलेला हायकोर्टाची नोटीस
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेला दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महिलेला दिले आहेत.


कनिष्ठ कोर्टाने कुमार विश्वास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला विश्वास यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

या याचिकेवर सुनावणी करत न्यायमूर्ती सुनीता सिन्हा यांनी दिल्ली पोलिसांनाही नोटीस जारी करुन 21 जुलैपर्यंत स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेश आहेत.
==========================================

फ्लिपकार्ट होळी: सॅमसंगच्या स्मार्टफोनवर सूट, मस्त ऑफर

फ्लिपकार्ट होळी: सॅमसंगच्या स्मार्टफोनवर सूट, मस्त ऑफर
मुंबई: जर आपण स्मार्टफोन घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. होय… ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर होळीनिमित्त खास ऑफर आहे. सॅमसंगच्या स्मार्टफोनवर सूट मिळणार आहे.

सॅमसंग गॅलक्सी ON5, ON7 आणि गॅलक्सी कोर प्राइम स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळणार आहे. गॅलक्सी ON5, ON7 वर 1000 रुपयाची सूट मिळणार असून गॅलक्सी कोअर प्राइमवर 2000 रुपयाचं डिस्काउंट मिळणार आहे.

लाँचिगच्या वेळेस गॅलक्सी ON5ची किंमत रु. 8,990 होती तर ON7ची किंमत रु. 10,990 होती. या डिस्काउंटनतर गॅलक्सी ON5 हा रु. 7,990 तर गॅलक्सी ON7 रु. 9,790 मिळणार आहे.

गॅलक्सी कोअर प्राइम स्मार्टफोनही डिस्कांउट मिळणार आहे. यावर रु. 2000ची सूट आहे. या ऑफरनंतर हा स्मार्टफोन रु. 5,990 उपलब्ध आहे.

गॅलक्सी ON5 5 इंच डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 720×1280 पिक्सल आहे. यामध्ये 1.3Ghz क्वॉड कोअर प्रोसेसर असून 1.5 जीबी रॅम आहे. रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सल असून फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे.

गॅलक्सी ON7 5.5 इंच डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 720×1280 पिक्सल आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर याची बॅटरी क्षमता 3000 mAh आहे.
==========================================

आजी-आजोबांच्या अनोख्या शुभेच्छांनी आलियाला अश्रू अनावर

आजी-आजोबांच्या अनोख्या शुभेच्छांनी आलियाला अश्रू अनावर
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट 15 मार्च रोजी 23 वर्षांची झाली. ‘कपूर अॅण्ड सन्स’च्या प्रदर्शनानंतर आलियाने कुटुंबासोबत निवांत वेळ घालवला. आलियाच्या आजोबा आणि आजीने अतिशय क्यूट अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आजोबा-आजीने हॅप्पी बर्थ डे गाण्याच्या धूनवर स्वत: व्हायोलीन आणि माऊथ ऑर्गन वाजवून आलियाला शुभेच्छा दिल्या.
==========================================

होळीचे रंग उतरवण्यासाठी 11 सोप्या घरगुती टिप्स

होळीचे रंग उतरवण्यासाठी 11 सोप्या घरगुती टिप्स
मुंबई :  होळी आणि धुलिवंदन अगदीच दोन दिवसांवर आलं आहे. अशातच अनेक जण रंग खेळण्याची तयारी करत असतील. मात्र धुळवडीनंतरची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्वचेवरील न जाणारा रंग. या रंगांमध्ये मायका, लेड यांसारखी रसायनं असतात. यामुळे त्वचा आणि केसांचं प्रचंड नुकसान होतं.

मात्र त्वचेवरील रंग सहजरित्या काढण्याचे तसंच त्वचा आणि केस हेल्दी कायम राहण्यासाठी या टिप्स तुमची मदत करु शकतात.

1.  दह्यात थोडं मध मिक्स करा. हा लेप चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मालिश करा. रंग सहजरित्या निघेल आणि रंगातील रसायनाचा त्वचेवर परिणाम होणार नाही.

2.  दोन चमचे कच्च्या दुधात एक चमचा खोबरेल तेल आणि चिमुटभर हळद एकत्र करा. हे चेहऱ्याला लावून मालिश करा आणि त्यानंतर पाण्याने धुवा. यामुळे रंग निघून जाईल.

3. मुलतानी मातीमध्ये ग्लिसरीन आणि लिंबाचा रस एकत्र करुन पेस्ट बनवा. हा लेप त्वचेवर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. यामुळे रंग निघून जाईल आणि त्वचा मऊ होईल.

4. एक सफरचंद उकळून ते मॅश करा. त्यात थोडा संत्र्यांचा रस मिसळा. हा लेप त्वचेवर लावून मसाज करा. रंग सहजरित्या निघेल.
5. पपईची पेस्ट चेहऱ्यावर लावून मालिश करा आणि त्यानंतर पाण्याने धुवून टाका. रंग निघून जाईल.

6. रंगांमध्ये रसायनं असल्याने अनेकदा खाज येते. यासाठी एक कप पाण्यात 2 चमचे अॅपल व्हिनेगर टाका. खाज येणाऱ्या ठिकाणी हे मिश्रण लाव, खाज कमी होईल.

7. रंगपंचमी खेळण्यासाठी केसांना खोबरेल तेल लावा. यामुळे रंग निघण्यास मदत होईल आणि केसांची चमक टिकून राहिल.

8. रंग खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑलिव्ह ऑईल कोमट करुन त्यात लिंबू रस मिक्स करा. अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका. सगळा रंग निघून जाईल आणि ते मऊ राहतील.

9. रंग काढताना अनेकदा चेहऱ्याची आग होते. अशावेळी थोड्या पीठात मध, गुलाब पाणी आणि हळद मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. हा पॅक कोरडा झाल्यानतंर चेहरा धुवा आणि त्यानंतर मॉयश्चरायझर लावा.

10. दोन चमचे गव्हाच्या पीठात एक चमचा चंदन पावडर, मलई, हळद आणि टोमॅटोचा रस टाकून मिक्स करा. हा लेप स्कीनवर लावून मसाज करा, त्यानंतर पाण्याने धुवा. रंग जाण्यास मदत होईल.

11. धुलिवंदनाला रंग खेळण्याआधी 20 मिनिटं आधी त्वचेवर 20 SPF ची सनस्क्रीन लावावं. यानंतर पाच मिनिटांनी मॉयश्चरायझर लावालं. सूर्यकिरणांमुळे होणारे साईड इफेट्स टाळता येतील आणि त्वचा कोरड होणार नाही.
==========================================

मुलाखतीला या चुका टाळा अन् नोकरी पक्कीच समजा

मुलाखतीला या चुका टाळा अन् नोकरी पक्कीच समजा!
मुंबई: शिक्षण सुरु असताना आपल्याला चांगली नोकरी मिळावी अशी प्रत्येक तरुणाची अपेक्षा असते. पण जेव्हा तरुणाई नोकरीच्या शोधात असते त्यावेळेस काही गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळेच अपयश पदरी पडतं. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरीच्या मुलाखती वेळेस संपूर्ण तयारी करणं गरजेच आहे.

इंटरव्ह्यू दरम्यान या 6 चुका होतात. त्यामुळे या चुका टाळा आणि आपली नोकरी पक्की करा:

– पहिली गोष्ट लक्षात ठेवा: ज्या कंपनी किंवा सेक्टरमध्ये आपण कामासाठी जाणार आहोत त्याविषयी संपूर्ण माहिती नसणं. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी नोकरीसाठी जाणार आहात त्याची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्ही फ्रेशर नाही आहात तर तुम्हाला कंपनीविषयी माहिती असणं गरजेचंच आहे. नाहीतर तुम्ही जागरुक कामगार नाही असा समज होतो.

– दुसरी गोष्ट लक्षात ठेवा: तुमची देहबोली फारच परिणामकारक असायला हवी. कारण की, तुम्ही काही बोला अथवा नका बोलू तुम्ही देहबोली बरंच काही सांगून जाते. मुलाखतीच्या रुममध्ये गेल्यावर तुमची पाठ सरळ, मान सरळ आत्मविश्वासानं ठासून भरलेल्या चेहऱ्यावर हलकसं हास्य गरजेचं आहे. असं न केल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

जेव्हा तुम्हाला बसायला सांगितलं जाईल त्यावेळेस खुर्चीच्या काठावर बसा. ज्यामुळे तुमची पाठी ताठ राहिल आणि थेट डोळे भिडवून तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलू शकता. खुर्चीला रेलून बसू नका, कारण की, तुम्ही निवांत असल्याचं त्यातून दिसून येतं. असं बसणं म्हणजे अतिआत्मविश्वास वाटू शकतो. तसंच सगळ्यात शेवटी कधीही स्वत:हून हात मिळविण्यासाठी पुढं करु नका. जोवर समोरची व्यक्ती तुमच्याशी हस्ताआंदोलन करीत नाही.

– तिसरी गोष्ट लक्षात ठेवा: तुम्हाला जेव्हा एखादा प्रश्न विचारला जाईल त्यावेळी त्याचं उत्तर एकदम तांत्रिक देऊ नका. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यावेळी थोडं प्रॅक्टिकल उत्तर द्या. तुमचं उत्तर हे खरं वाटायला हवं ते रोबोटिक नको.
==========================================

इस्लामिक स्टेटने स्विकारली ब्रसेल्स हल्ल्याची जबाबदारी

  • ऑनलाइन लोकमत
    ब्रसेल्स, दि. २२ - बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स शहर मंगळवारी दहशतवादी हल्ल्याने हादरले. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. 
    ब्रसेल्समधील झॅव्हनटेम विमानतळवरील डिपार्चर हॉलच्या भागात मंगळवारी सकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर मालबीक मेट्रो स्थानकावर स्फोट झाला.  या स्फोटामध्ये आत्तापर्यंत २८जण ठार झाले असून, ३५ जण जखमी झाले आहेत.
    आरटीबीएफच्या वृत्तानुसार सकाळी आठच्या सुमारास हे स्फोट झाले. ब्रसेल्स विमातनळावरील बॉम्बस्फोट हा आत्मघातकी हल्ला असल्याचे बेल्जियमच्या सरकारी वाहिनीने म्हटले आहे. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. 
    नोव्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य संशयित सालाह अबडेस्लामला ब्रसेल्समध्ये अटक झाल्यानंतर चारच दिवसांनी ब्रसेल्समध्ये हल्ला करण्यात आला. 
==========================================
कराचीत विषारी दारू पिल्याने 24 हिंदू मृत्युमुखी
कराची- पाकिस्तानमधील सिंध प्रांतात विषारी दारू पिल्याने सहा महिलांसह 24 हिंदू नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. होळीचा सण साजरा करण्यासाठी या सर्वांनी दारू पिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

एकूण 35 जणांना दारू पिल्यानंतर त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेत बेकायदा असलेल्या दारूच्या दुकानावर कारवाई न केल्याचा निषेध केला.

==========================================
घोड्याला मारहाणप्रकरणी भाजप आमदाराला जामीन
डेहराडून- पोलिसांच्या ताफ्यातील घोड्याला अमानूष मारहाण करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

आमदार जोशी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या सरकारविरोधात आंदोलन करीत असताना पोलिसांच्या ताफ्यातील शक्तिमान नावाच्या घोड्याला काठीने जबर मारहाण केली होती. त्यामध्ये शक्तिमानच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्याचा पाय कापून कृत्रिम पाय बसवावा लागला. 

याप्रकरणी आमदार जोशी यांना अटक करण्यात आली होती. तसेच, 19 मार्च रोजी न्यायालयाने आमदार जोशी यांना जामीन नाकारला होता. आज (मंगळवार) 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 
==========================================
लोकशाहीच्या हत्येकडे मोदींचं दुर्लक्ष- काँग्रेस
विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारे अस्थिर करण्याची किंवा ती पाडण्याची मुभा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीच्या होणाऱ्या खुनाकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने उत्तराखंडमधील भाजपच्या राजकीय कुरघोड्यांवरून मोदींवर टीका केली आहे. काल एका निवेदनामध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, "संविधानाप्रती वचनबद्धता असल्याचा आणि त्यांचे आंबेडकरांप्रती नव्याने जागृत झालेले प्रेम हा मोदींचा सगळा दिखाऊपणा असून, देशातील लोकांनी निवडून दिलेल्या सरकारांमध्ये गोंधळ घालण्यासाठी मोदींनी त्यांच्या सहकाऱ्यांना मोकळे सोडले आहे... पहिल्यांदा अरुणाचल प्रदेश, नंतर मणिपूरमधील सरकार अस्थिर करण्याचा भाजपने प्रयत्न केला, आणि आता त्यांनी उत्तराखंडकडे त्यांचा मोर्चा वळविला आहे."

अरुणाचल प्रदेशमध्ये तीन-चतुर्थांश बहुमताने लोकांनी निवडून दिलेले सरकार उलथविण्यासाठी राज्यपालांच्या पदाचा वापर करण्यात आला. गुवाहाटी उच्च न्यायालयानेदेखील हे निरीक्षण नोंदविले आहे की येथे राज्यपालांच्या पदाचा वापर राजकीय हेतूने झाला. तसेच, उत्तराखंडमध्ये भाजप घोडेबाजारात व्यग्र आहे. ते केंद्र सरकारची आर्थिक ताकदीचा वापर सरकार पाडण्यासाठी करीत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. 
==========================================
हैदराबाद: कुलगुरुंच्या कार्यालयात तोडफोड
हैदराबाद - रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर रजेवर गेलेले हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरु पी. अप्पा राव यांच्या कार्यालयाची आज (मंगळवार) सकाळी संतप्त विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. अप्पा राव आज रजेहून कार्यालयात परतणार आहेत.

रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर अप्पा राव यांचे निलंबन करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आज राव हे कार्यालयात परतणार असल्याची माहिती मिळताच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. 

रोहितने आत्महत्या करण्यात त्यांचा प्रमुख वाटा आहे. न्यायालयात हे प्रकरण सुरु असताना, ते पुन्हा या पदावर कसे काय रुजू होऊ शकतात, असे एका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने सांगितले. रोहितने जानेवारीमध्ये विद्यापीठाच्या आवारात गळफास घेतला होता. अभाविपच्या नेत्याला मारहाण केल्यामुळे त्याला वसतिगृहातून निलंबित करण्यात आले होते. 
==========================================
व्याजदर कपातीचा चेंडू रिझर्व्ह बँकेच्या कोर्टात
मुंबई : टपाल खात्याच्या (पोस्ट) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर कपातीची कुऱ्हाड चालवून मोदी सरकारने सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना ‘जोर का झटका‘ दिला आहे. 
ही व्याजदर कपात करून ‘चेंडू‘ रिझर्व्ह बॅंकेच्या कोर्टात टाकला आहे. केंद्राने अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपात करून आरबीआयचा कर्ज स्वस्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे आता आरबीआयकडून व्याजदरात कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारने पीपीएफवरील व्याजदर 8.7 टक्क्यावरून 8.1 टक्क्यांवर आणला आहे. अल्पबचत योजनांवर कमी केलेले हे व्याजदर आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल ते जून 2016) लागू असतील. यामुळे सुरक्षित आणि निश्‍चित व्याजदराच्या योजनांत गुंतवणूक करणाऱ्यांना मिळणारी व्याजाची रक्कम कमी होणार आहे. विशेषतः व्याजावर गुजराण करणाऱ्यांना याचा विशेष फटका बसणार आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, सरकारने चेंडू आता आरबीआयच्या कोर्टात ढकलला आहे. आरबीआय आता व्याजदर कमी करू शकते. कारण पोस्टातील व्याजदर आता बँकेच्या व्याजदराचे प्रतिस्पर्धी बनले आहेत. बँकिंग क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मते, आरबीआयला अर्ध्या टक्क्यापर्यंत व्याजदर कपातीस वाव आहे. 

पोस्टातील बचतीचे व्याज कमी झाल्याने सामान्य लोक बँकांकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरबीआयने व्याजदरात कपात केल्यास कर्जाचे दर कमी होण्यास मदत होईल. परिणामी लोकांचे कर्जाचे मासिक हप्त्यांची रक्कम देखील कमी होण्याची शक्यता आहे. 
==========================================

No comments: