Thursday, 31 March 2016

नमस्कार लाईव्ह ३१-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ब्रसेल्स; ब्रसेल्सवरील हल्लेखोरांनी बेल्जिअमच्या पंतप्रधानांचा पत्ता मिळवण्यासाठी केला इंटरनेटचा वापर 
२- संयुक्त राष्ट्राला दहशतवाद समजलेला नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी 
३- लंडन; ओलिसाचा सेल्फी व्हायरल 
४- वॉशिंग्टन; गर्भपात करणाऱ्या महिलांना शिक्षा द्या- ट्रम्प 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- दहशतवादाविरोधात एकत्र या, ब्रसेल्समध्ये मोदींचं आवाहन 
६- राष्ट्रपतीपदासाठी मोदींची अमिताभ यांना पसंती: अमर सिंह 
७- रॉयल एनफिल्डची 'हिमालयन' बाइक दिल्लीत लाँच, किंमत 1.73 लाख 
८- ३४ वर्षात प्रथमच 'पॅलेस ऑन व्हील्स'ची फेरी रद्द 
९- पाकचे पथक भारतात येणे लज्जास्पद- कॉंग्रेस 
१०- धर्म दहशतवाद शिकवत नाही - मोदी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- आमदार बच्चू कडू यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण 
१२- कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओत 102 कट्स 
१३- निधीवाटपावर ‘बाहेरचा कंट्रोल’ भाजपाला अमान्य 
१४- बांधकाम कचऱ्यासाठी नियमावली 
१५- सेना उपविभागप्रमुखावर चेंबूरमध्ये खंडणीचा गुन्हा 
१६- मंदिर प्रवेशबंदीवर सरकारची खरडपट्टी 
१७- दहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र 
१८- नगरसेवक निवडणुकीसाठी शौचालय बंधनकारक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- पुणे; कात्रजमधील गाड्या पेटवणारा सापडला 
२०- दिल्ली; कबूतराला वाचवताना मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू 
२१- चेंबूर; दोन पोलिसांना अतिकामाचा फटका 
२२- पनवेल; सहा दुर्मीळ कासवे दगावली 
२३- अहमदाबाद; गुजरातमध्ये बोर्ड परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना 'नमो पेन' वाटल्याने नवा वाद 
२४- पुलवामा: दहशतवाद्याकडून महिलेची हत्या 
२५- पुणे; साहित्य परिषद बनलीय कुरूपतेचा अड्डा - सबनीस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- टीम इंडियाचा आज विंडिजशी मुकाबला, फायनलचं तिकीट कोणाला 
२७- विंडीजविरोधात मुंबईकर जोडी सलामीला 
२८- इतिहास सांगतो, वानखेडेवर धावांचा पाऊस पडणार 
२९- महेंद्रसिंग धोनी की डॅरेन सॅमी, टॉस का बॉस कोण 
३०- 'कॅब्रे'मध्ये रिचा चढ्ढाचं आग लावणारं 'पानी पानी...' 
३१- वानखेडेवर रंगणार भारत-वेस्ट इंडिज उपांत्यफेरीचा थरार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३१- नांदेडचे सांडपाणी परळीला देणार, मुख्यमंत्र्याकडून हिरवा कंदील 
३२- ध्वनी मर्यादा पाळून डी.जे. वाजविण्यास बंदी 
३३- भाजप प्रदेश कार्यकारणीत नांदेडचे चार शिलेदार 
३४- जिल्ह्यात ४२४५ शेतकऱ्यांचे अर्ज; मागेल त्याला शेततळे योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद 
३५- लोहा; तीन दिवसाआड पाणीपुरवठा, सुनेगाव तलावात दीड महिना पुरेल एवढाच पाणी पुरवढा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
पंजाब देशमुख, योगी उलंगे, संदीप धबाले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो
(सत्यजित तांबे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


===========================================

दहशतवादाविरोधात एकत्र या, ब्रसेल्समध्ये मोदींचं आवाहन

दहशतवादाविरोधात एकत्र या, ब्रसेल्समध्ये मोदींचं आवाहन
ब्रसेल्स : ब्रसेल्समधील भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी दहशतवादावर निशाणा साधला. ब्रसेल्समध्ये झालेल्या आत्मघातकी स्फोटातील मृतांना यावेळी पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. तसंच दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र येण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्राला दहशतवादाला खतपाणी घालणारे कोण आहे हे ओळखण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान ब्रसेल्स दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीचं रिमोट कंट्रोलद्वारे अनावरण केलं. बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकेल यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ही दुर्बिण ‘आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट’ आणि बेल्जियम सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमधून तयार करण्यात आली आहे. अवकाशातील ताऱ्यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या दुर्बिणीची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच मोदींनी ब्रसेल्समधील भारत-युरोपीयन संघाच्या बैठकीत उपस्थित राहून अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. बेल्जियमनंतर पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनला रवाना झाले आहेत. वॉशिंग्टनमध्ये दोन दिवसीय आण्विक सुरक्षा संमेलनात मोदी सहभागी होणार असून 2 आणि 3 एप्रिलला मोदींचा सौदी अरबला दौरा असेल.
===========================================

राष्ट्रपतीपदासाठी मोदींची अमिताभ यांना पसंती: अमर सिंह

राष्ट्रपतीपदासाठी मोदींची अमिताभ यांना पसंती: अमर सिंह
नवी दिल्ली :  भारताचे आगामी राष्ट्रपती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव सूचवणार आहेत, असा दावा समाजावादी पार्टीचे माजी नेते अमर सिंह यांनी केला आहे. एका मुलाखतीदमरम्यान अमर सिंह यांनी हा दावा केला.
काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही अमिताभ बच्चनच आगामी राष्ट्रपती असतील असं भाकीत केलं होतं.
===========================================

आमदार बच्चू कडू यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

आमदार बच्चू कडू यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
मुंबई अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. यावेळी कडू यांच्यासोबत शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि किशोर पाटीलही आहेत. 
“माझ्यावर खोटे आरोप करुन गुन्हे दाखल केले आहेत.”, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. 
मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांना मारहाण केल्याने त्यांच्याविरोधात मंत्रालय कर्मचारी आक्रमक झाले आहेत. शिवाय, कामबंद आंदोलनही सुरु केलं होतं.
===========================================

कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओत 102 कट्स

कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओत 102 कट्स
मुंबई : हेरगिरीच्या आरोपातून पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओची सत्यता भारत सरकारनं नाकारली आहे. 358 सेकंद म्हणजे सुमारे 6 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तब्बल 102 कट्स असल्याचं समोर आलं आहे. 
पाकिस्तानने जारी केलेल्या कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याच्या व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव हे पापणी न हलवता बोलत आहेत, यावरुन ते टेलिप्रॉम्प्टर वाचत असल्याचं स्पष्ट होत आहे. बऱ्याच ठिकाणी व्हिडिओचं संकलन केल्याचंही स्पष्ट दिसत आहे. 
दबाव आणून भारताविरोधात बोलण्यासाठी कुलभूषण जाधव यांचा व्हिडिओ तयार केला असल्याचंही चित्र आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्करानं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा व्हिडिओ जारी केला होता. ‘मी भारतीय नौदलाचा अधिकारी असून 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार. 2002 मध्ये 14 वर्षांच्या सेवेनंतर मी गुप्त अभियान सुरु केलं. 2003 मध्ये मी इराणच्या चबाहारमध्ये एक छोटा उद्योगधंदा सुरु केला. माझ्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. 2003-04 मध्ये मी कराची दौरा केला. रॉसाठी भारतात काही काळ काम केल्यानंतर 2013 मध्ये मी रॉमध्ये सहभागी झालो.’ अशी कबुली कुलभूषण जाधव देताना दिसतात.
===========================================

टीम इंडियाचा आज विंडिजशी मुकाबला, फायनलचं तिकीट कोणाला

टीम इंडियाचा आज विंडिजशी मुकाबला, फायनलचं तिकीट कोणाला?
मुंबई: धोनीची टीम इंडिया आणि डॅरेन सॅमीची वेस्ट इंडीज टीम सज्ज झाल्या आहेत ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या उपांत्य लढाईसाठी. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज हा सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीजच्या संघांमध्ये आजवर झालेल्या चार ट्वेन्टी20 सामन्यांपैकी दोन भारतानं तर दोन वेस्ट इंडीजनं जिंकले आहेत. डॅरेन सॅमीची टीम ट्वेन्टी20 क्रिकेटमधली दादा टीम मानली जाते. विंडीजच्या संघात ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, डॅरेन सॅमी, मार्लन सॅम्युअल्स, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रॅथवेट अशा ट्वेन्टी20 स्पेशालिस्ट्सचा भरणॉ आहे. आयपीएलमुळं त्यांना भारतात खेळण्याचा चांगला अनुभवही आहे. त्याचीच झलक पाहायला मिळाली सुपर टेनमधल्या विंडीजच्या कामगिरीमध्ये. वेस्ट इंडीजनं सलामीला इंग्लंडचा धुव्वा उडवला. वानखेडे स्टेडियमवरच झालेल्या त्या सामन्यात ख्रिस गेलच्या झंझावाती शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजनं सहा विकेट्सनी विजय साजरा केला होता. वेस्ट इंडीजनं मग श्रीलंकेवर सात धावांनी आणि दक्षिण आफ्रिकेवर तीन विकेट्स राखून मात केली. पण साखळी फेरीत आपल्या अखेरच्या सामन्यात मात्र वेस्ट इंडीजला नवख्या अफगाणिस्तानकडून पराभवाचा धक्का बसला. दुसरीकडे टीम इंडियानं सलामीच्या सामन्यात नागपूरकडून झालेला पराभव मागे टाकत सलग तीन विजय साजरे केले. भारतानं पाकिस्तानला सहा विकेट्सनी हरवलं. मग बांगलादेशविरुद्ध अटीतटीच्या लढतीत अवघ्या एका धावेनं विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सनी हरवून उपांत्य फेरी गाठली.
===========================================

विंडीजविरोधात मुंबईकर जोडी सलामीला

विंडीजविरोधात मुंबईकर जोडी सलामीला?
नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकात गुरुवारी दुसऱ्या सेमीफायनलच्या मुकाबल्यासाठी टीम इंडियाची लढत वेस्ट इंडीजशी असणार आहे. मात्र, त्याआधी टीम इंडियाचे प्लेईंग इलेव्हनवरुन ‘एबीपी न्यूज’ला मोठी माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या वेस्ट इंडीजविरोधातील लढतीत टीम इंडियात दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 
टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीमध्ये मोठ्या बदलाची शक्यता आहे. वानखेडेवरील सामन्यात टीम इंडियाची सलमीवीर जोडी मुंबईकर असण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला सलामीसाठी अजिंक्य रहाणे पार्टनर म्हणून लाभणार आहे. दुसरीकडे विश्वचषकातून बाहेर झालेला युवराज सिंहच्या जागी मनीष पांडेला घेण्यात आलं आहे. 
मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलदाजांसाठी उत्तम आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटची अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडेला पसंती आहे. शिवाय, पत्रकार परिषदेत बोलताना टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनीही रहाणेला खेळवण्याबाबत संकेत दिले आहेत. 
मात्र, कर्णधार धोनी अजिंक्य रहाणेला मिडल ऑर्डरचा फलंदाज मानत नाही. त्यामुळे टुर्नामेंटमध्ये फ्लॉप कामगिरी करत असलेल्या धवनच्या जागीही त्याची वर्णी लागू शकते.
===========================================

इतिहास सांगतो, वानखेडेवर धावांचा पाऊस पडणार

इतिहास सांगतो, वानखेडेवर धावांचा पाऊस पडणार !
मुंबई: यंदाच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी सातत्यानं फलंदाजांसाठी नंदनवन ठरली आहे. भारत आणि विंडीज संघांमधल्या उपांत्य सामन्यात फलंदाजांचं तेच वर्चस्व कायम राहिल का, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. 
भारत आणि वेस्ट इंडीज संघांमधला ट्वेन्टी20 विश्वचषकाचा उपांत्य सामना म्हणजे आणखी एक रनफेस्टच ठरली, तर आश्चर्य वाटणार नाही. कारण मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये यंदाच्या विश्वचषकातही धावांची लयलूट झाली आहे. 
16 मार्चला वानखेडेवरच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं 182 धावांची मजल मारली होती, पण ख्रिस गेलच्या स्फोटक शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजनंही 183 धावांचं लक्ष्य सहज पार केलं. मग 18 मार्चला इंग्लंडनं 20 षटकांत 229 धावांची मजल मारली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेनं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. 20 मार्चला वानखेडेवरच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 209 धावांची मजल मारली. तेव्हा प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्ताननंही 172 धावा केल्या. 
केवळ ट्वेन्टी20 विश्वचषकातच नाही, तर गेल्या वर्षी इथं झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका वन डे सामन्यातही धावांची बरसात पाहायला मिळाली होती. दक्षिण आफ्रिकेनं तेव्हा 50 षटकांत अवघ्या चार विकेट्सच्या मोबदल्यात 438 धावा केल्या होत्या. तर भारताचा डाव 36 षटकांत 224 धावांत आटोपला होता. 
त्या सामन्यातल्या खेळपट्टीवरून टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री आणि वानखेडेचे पिच क्युरेटर सुधीर नाईक यांच्यात ठिणगी पडली होती. भारताचे माजी कर्णधार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या मध्यस्थीनंतर तो वाद मिटला. आता टीम इंडिया पुन्हा एकदा या मैदानात खेळेल तेव्हाही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
===========================================

महेंद्रसिंग धोनी की डॅरेन सॅमी, टॉस का बॉस कोण

महेंद्रसिंग धोनी की डॅरेन सॅमी, टॉस का बॉस कोण?
मुंबई: भारत-वेस्ट इंडिज संघांमधल्या उपांत्य सामन्यात नाणेफेकीचा कौल किती निर्णायक ठरणार, यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. काहींना वाटतं फलंदाजांचं नंदनवन असलेल्या वानखेडेवर नाणेफेक निर्णायक ठरणार नाही. पण काहींचा दावा आहे की, यंदाच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टॉस बहुतेक सामन्यात निर्णायक ठरला आहे. त्यामुळं उपांत्य सामनाही त्याला अपवाद ठरणार नाही. 
वानखेडेवर कोण ठरणार टॉस का बॉस? महेंद्रसिंग धोनी की डॅरेन सॅमी? 
नाणेफेक जिंकून उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत कोण जिंकणार, यावर या सामन्याचा निकाल अवलंबून राहिला तर आश्चर्य वाटू नये. कारण यंदा ट्वेन्टी20 विश्वचषकात नाणेफेक खूपच महत्त्वाची ठरली आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या सुपर टेनमधील 20 सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनाच विजयासाठी अधिक फेव्हरिट मानलं गेलं.
 या वीसपैकी पंधरा सामन्यांमध्ये, नाणेफेक जिंकणारा संघच विजयी ठरला. तर केवळ पाचवेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला पराभवाची चव चाखावी लागली. 
अफगाणिस्तान-श्रीलंका, भारत-बांगलादेश, श्रीलंका-इंग्लंड, वेस्ट इंडिज-अफगाणिस्तान आणि भारत-ऑस्ट्रेलिया या सामन्यांमध्ये टॉस हरणारा संघ विजयी ठरला. 
या 20 सामन्यांमध्ये अकरावेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी ठरला. तर नऊवेळा प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं बाजी मारली. भारतानं आपल्या चार साखळी सामन्यांत दोनदा धावांचा यशस्वी पाठलाग केला. आता वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकणारा कर्णधार काय निर्णय घेतो, यावर बरंच काही अवलंबून राहील.
===========================================

कात्रजमधील गाड्या पेटवणारा सापडला

कात्रजमधील गाड्या पेटवणारा सापडला
पुणे :  कात्रजमध्ये वाहने पेटवून जळीतकांड करणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आलं आहे. प्रणव धाडवे असं या आरोपीचं नाव असून तो मूळचा ट्रान्सपोर्ट व्यापारी असल्याचं समजतंय. 
कात्रज परिसरात रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री 15 बाईक आणि दोन गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. 
मध्यरात्री अडीच वाजता परिसरात प्रचंड धूर झाल्याने हा प्रकार लक्षात आला होता. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि एका वॉटर टँकरने ही आग वेळीच आटोक्यात आणली. या प्रकारामागे कोणाचा हात आहे, हे स्पष्ट झालेलं नव्हतं. मात्र पोलिसांनी अवघ्या चार दिवसात या प्रकरणाचा छडा लावला आहे.
===========================================

'कॅब्रे'मध्ये रिचा चढ्ढाचं आग लावणारं 'पानी पानी...'

'कॅब्रे'मध्ये रिचा चढ्ढाचं आग लावणारं 'पानी पानी...'
मुंबई : अभिनेत्री रिचा चढ्ढा आगामी ‘कॅब्रे’ चित्रपटात अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार आहे. ‘कॅब्रे’ सिनेमाच्या पोस्टर आणि टीझरनंतर सिनेमातील गाण्याचा पहिला व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. ‘मै तो तेरे वास्ते ही हुई पानी पानी’ या गाण्यात रिचाचा जलाविष्कार पाहायला मिळतो. 
‘मसान’गर्ल रिचा या चित्रपटात एका कॅब्रे डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. कॅब्रे चित्रपटाच्या टीझरला यूट्यूबवर दोनच दिवसांत दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. पूजा भट्ट आणि भूषण कुमार यांची निर्मिती असलेला हा चित्रपट कॅब्रेक्वीन हेलन यांच्या जीवनावर आधारित असल्याचं म्हटलं जातं. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 
चित्रपटात अत्यंत बोल्ड दृश्य दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्याचवेळी चित्रपट कॅब्रेक्वीनची भावनिक बाजूही अधोरेखित करणार आहे. 
कौस्तव नारायण नियोगी यांचं दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात ‘हंटरररर’ फेम अभिनेता गुलशन देवय्याही मुख्य भूमिकेत आहे. रिचा चढ्ढाच्या ‘मसान’ चित्रपटातील भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं. तर काहीच महिन्यांपूर्वी आलेल्या ‘मै और चार्ल्स’ चित्रपटात रणदीप हुडासोबत तिचे किसिंग सीन्सही चर्चेचा विषय होते. 
दुसरीकडे रिचा ‘सरबजीत’ या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या चरित्रपटात सरबजीतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणदीप हुडा आणि ऐश्वर्या राय-बच्चन आहेत.
===========================================

रॉयल एनफिल्डची 'हिमालयन' बाइक दिल्लीत लाँच, किंमत 1.73 लाख

रॉयल एनफिल्डची 'हिमालयन' बाइक दिल्लीत लाँच, किंमत 1.73 लाख
नवी दिल्ली: विशिष्ट प्रकाराच्या मोटरसायकल तयार करणारी कंपनी रॉयल एनफिल्डनं काल दिल्लीत विशेष बाइक हिमालयन लाँच केली. या बाइकची किंमत 1.73 लाख एवढी आहे. 
बुलेट बाइक तयार करणाऱ्या रॉयल एनफिल्ड कंपनीने आपल्या 411 सीसीची नवी बाइक बाजारात आणली आहे. ही ऑफरोड बाइक (हिमालयन) कोणत्याही रस्त्यावर चालविता येणारी असून डोंगर दऱ्यातही चांगला परफॉर्मंस देईल. 
तब्बल पाच वर्षाच्या मेहनतीनंतर ही बाइक तयार करण्यात आली आहे. हिमालयनमध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स असून याचं इंजिन 24.5 बीएचपी आहे. लाँग ड्राईव्हसाठी ही उत्कृष्ट बाइक असल्याचा कंपनीचा दावा आहे. 
भविष्यात कंपनीचा 250 ते 750 सीसीपर्यंतचा बाइक्स बनविण्याचा मानस आहे.
===========================================

संयुक्त राष्ट्राला दहशतवाद समजलेला नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • ऑनलाइन लोकमत 
    ब्रसेल्स, दि. ३१ - बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये बुधवारी भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्यावरुन संयुक्त राष्ट्रावर टीका केली. मागच्या आठवडयात ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, संयुक्त राष्ट्राला अजूनही दहशतवादाची व्याख्या ठरवता आलेली नाही हे दुर्देव आहे. 
    दहशतवादामुळे आज संपूर्ण जगासाठी धोका निर्माण झाला आहे. दहशतवादाला आसारा आणि पाठिंबा देणा-यांवर कठोर कारवाईची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. दहशतवादाला धर्माशी जोडू नका, दहशतवाद संपूर्ण मानवजातीसाठी धोका असून, ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्यांनी एकत्रितपणे याविरोधात लढा दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
    जगाला आता दहशतवादाचे परिणाम दिसत आहेत. भारत मागच्या ४० वर्षांपासून दहशतवादाने त्रस्त आहे. ९/११ च्या घटनेने संपूर्ण जगाला दहशतवादाचा धक्का दिला, तो पर्यंत वर्ल्ड़ पॉवर्सना भारत काय सोसतोय त्याची कल्पना नव्हती. पण भारत दहशतवादासमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही असे मोदींनी सांगितले. 
===========================================

कबूतराला वाचवताना मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ३१ - गटाराचे पाणी वाहून नेणा-या पाईपमध्ये अडकलेल्या कबूतराला वाचवताना दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दिल्लीत वझीराबादमध्ये घडली. १९ वर्षीय अनिल सहानी सोमवारी संध्याकाळी कबुतरांना दाणे घालण्यासाठी पाईपलाईन जवळ गेला होता. त्यावेळी त्याचे लक्ष उघडया मॅनहोलवर गेले. 
    तिथे चिखलामध्ये एक कबूतर अडकले होते. त्या कबुतराला मॅनहोलमधून बाहेर काढण्यासाठी म्हणून अनिल खाली वाकला पण त्याचा तोल गेला आणि तो गटारात पडला असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अनिलला बाहेर काढण्यासाठी नासीरुद्दीनला तिथे बोलवण्यात आले. पोहण्यात पारंगत असलेल्या नासीरने बुडणा-यान अनेकांचे प्राण वाचवले असल्याने स्थानिकांनी नासीरुद्दीनला बोलवून घेतले. 
    नासीर लगेच मॅनहोलमध्ये उतरला. पण पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांना गटारात धड उभेही रहाता येत नव्हते आणि चिखलामुळे पोहताही येत नव्हते. दोघेही तिथे अडकून पडले. गटारातील विषारी वायूमुळे लगेचच त्यांना श्वासोश्वासाचा त्रास सुरु झाला. त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आले. पण तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. 
===========================================

वानखेडेवर रंगणार भारत-वेस्ट इंडिज उपांत्यफेरीचा थरार

  • नामदेव कुंभार
    मुंबई, दि. ३० - यजमान भारत आणि धमाकेदार वेस्ट इंडिज यांच्यात आज टी२० विश्वचषकामधील दुसरी उपांत्य लढत मुंबईत वानखेडे स्टेडियमवर खेळली जाणार आहे. यासामन्याची दोन्ही संघांच्या खेळाडूंसोबतच सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सोबतच विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या दमदार खेळाकडेही सर्वांची लक्ष लागले आहे. टी२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकेमेकांसमोर लढणार असून साऱ्या क्रिकेटजगताचे या लढतीकडे लक्ष असेल. 
    तरीही, सर्वांची उस्तुकता असेल ती भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांच्या खेळीकडे. या दोघांच्या कामगिरीवर दोन्ही संघांचा विजय अवलंबून असेल. गोलंदाजीत भारताचे मुख्य अस्त्र रविचंद्रन अश्विन क्रिकेटचा गॉडझिला म्हणून ओळखाला जाणाऱ्या गेलचे हात बांधतो का? हे पाहणे लक्षवेधी ठरेल. आतापर्यंत अश्विनने एकूण नऊ टी२० सामन्यांमध्ये चार वेळा गेलची विकेट घेतली आहे. 
    आयसीसी टी २०च्या रँकीक मध्ये आघाडीवर असलेला वेस्ट इंडिजचा गोलंदाज सॅम्युल बद्री भारताच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या उच्च दर्जाच्या फलंदाजीने संघाला विजयाच्या ‘विराट’ मार्गावर आणणाऱ्या विराट कोहलीला धावा घेण्यापासून रोखतो का? हे आज होणाऱ्या टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात समजेल. यामधून जिंकणारा संघ अंतिम फेरीत धडक मारेल.  
    match
===========================================

निधीवाटपावर ‘बाहेरचा कंट्रोल’ भाजपाला अमान्य

  • मुंबई : विकास निधीचे वाटप पक्षश्रेष्ठींच्या निकषानुसार होत असल्याच्या खळबळजनक विधानामुळे महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असून, या विधानावरून विरोधी पक्षांसह मित्रपक्ष भाजपानेही शिवसेनेला कोंडीत पकडले आहे़ विरोधकांनी स्थायी समिती व महापौर दालनाबाहेर निदर्शने केली़ निधीच्या वाटपावर असा बाहेरचा ‘रिमोट कंट्रोल’ अमान्य असल्याची भूमिका भाजपाने मांडली आहे.
    या वर्षी महापौरांना मंजूर झालेल्या ५० कोटी रुपये निधीतून ८० टक्के रक्कम आपल्या पक्षाकडे वळवित, शिवसेना-भाजपा युतीने विरोधकांच्या तोंडाला पाने पुसली. मात्र, यावर विरोधकांनी महापौरांना जाब विचारताच, पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांनी ठरविलेल्या निकषानुसारच वाटप झाल्याची कबुली देऊन, महापौर आंबेकर यांनी शिवसेनेला गोत्यात आणले़ त्यांच्या या विधानाचे भांडवल करीत विरोधी पक्षांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज गोंधळ घातला़ निधीवाटपावर ‘बाहेरचा कंट्रोल’ हा सभागृहाचा अवमान आहे़ या प्रकरणी महापौरांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली़ या गोंधळातच स्थायी समितीचे कामकाज उरकून बैठक गुंडाळण्यात आली़ यामुळे संतप्त काँगे्रस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर दालनाबाहेर निदर्शने करण्यास सुरुवात केली़ मात्र, महापौर आपल्या दालनात नसल्यामुळे विरोधकांना घोषणाबाजीवरच समाधान मानावे लागले़
===========================================

दोन पोलिसांना अतिकामाचा फटका

  • मुंबई : टिळकनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मंगळवारी रात्री तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वरिष्ठ अधिकारी अधिक वेळ काम करून घेत असल्याने प्रकृतीवरील ताण वाढत असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात येत आहे.
    सध्या शहरातील अनेक पोलीस ठाण्यांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यांच्या कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर येत आहे. चेंबूरच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात असाच प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्रपाळीसाठी आलेले पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव आणि छाया निकम या दोन्ही अधिकाऱ्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यामुळे इतर सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
===========================================

बांधकाम कचऱ्यासाठी नियमावली

  • मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये बांधकामांचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे या बांधकामातून तयार होणारा दगड, माती म्हणजेच डेब्रिजच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे पालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. हा कचरा डम्पिंग ग्राऊंडवरच टाकला जात असल्याने देवनारचा
    भार वाढला आहे़ त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका लवकरच नियमावली तयार करणार आहे़
    मुंबईतून दररोज नऊ हजार मेट्रिक टन कचरा जमा होत असतो़ यामध्ये डेब्रिजचे प्रमाण अडीच हजार
    मेट्रिक टन आहे़ डेब्रिजही डम्पिंग ग्राऊंडवरच टाकण्यात येत असल्याने देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे डोंगर वाढत चालले आहे़ त्यातच डम्पिंग ग्राऊंडवर सतत आग लागण्याची घटना घडत असल्याने कचराप्रश्न पेटला आहे़ यावर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेच आज मुंबई महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागविले़
    यावेळीस बांधकामातून निर्माण होणारा धूळ आणि कचरा याविषयी नियम तयार करण्याचा निर्णय झाला़ डेब्रिजची विल्हेवाट योग्यप्रकारे लावली जाईल, याची खबरदारी घेण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाने पालिकेला दिले़ त्यानुसार डेब्रिजची विल्हेवाट लावण्याबाबत १५ दिवसांमध्ये नियम तयार करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे़
===========================================

सेना उपविभागप्रमुखावर चेंबूरमध्ये खंडणीचा गुन्हा

मुंबई : गॅरेज मालकाकडून पाच हजारांचा हप्ता मागणारा चेंबूरमधील शिवसेनेचा उपविभागप्रमुख अविनाश राणे याच्यावर गोवंडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. मात्र, चौकशीनंतरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती गोवंडी पोलिसांनी दिली आहे.
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालय परिसरात दोन महिन्यांपासून भाजपाचे १३४ चे प्रभाग अध्यक्ष रिंकेशकुमार झा यांचे गॅरेज आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उपविभागप्रमुख अविनाश राणे त्याच्या साथीदारांसह तेथे गेला. जर हे गॅरेज सुरू ठेवायचे असेल तर महिन्याला पाच हजारांचा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी त्याने झा यांना दिली.
त्याच्या साथीदारांनी गॅरेजमधील कामगारांना मारहाणही केली. याबाबत झा यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत विचारले असता गोवंडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम कोळेकर यांनी ‘तपास सुरू असून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल’, असे उत्तर दिले.
===========================================

सहा दुर्मीळ कासवे दगावली

  • - वैभव गायकर,  पनवेल
    मुंबई विमानतळावर २० मार्चला तस्कराकडून हस्तगत करण्यात आलेली एकूण १४३ कासवे संवर्धनासाठी २२ मार्चला कर्नाळा अभयारण्यात ठेवण्यात आली होती. आफ्रिका खंडातील एका बेटावरून ही कासवे मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आली होती. या कासवांची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. कर्नाळा अभयारण्यात ठेवण्यात आल्यानंतर या दुर्मीळ जातीच्या कासवांपैकी सहा कासवे दगावली आहेत. अ‍ॅनिमियामुळे या कासवांचा मृत्यू झाला असून वनविभागानेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
    मुंबई विमानतळावर कासवांची तस्करी करणारी टोळी पकडण्यात आली होती. त्यांच्याकडून हस्तगत केलेली १४३ वेगवेगळ्या दुर्मीळ प्रजातीची कासवे आफ्रिका खंडातील मादागास्कर बेटावरून मुंबईत आणण्यात आली होती. कासवाला घरात अथवा कार्यालयात ठेवल्यास धनसंपत्ती प्राप्त होते, असा मानस असल्यामुळे काही जण यासाठी कोट्यवधी रुपये मोजण्यास तयार असतात. दुर्मीळ जातीच्या या कासवांना भारतात मोठी मागणी असल्यामुळे ही कासवे या ठिकाणी आणली गेली. नवी मुंबईतील वन्य जीव नियंत्रण ब्युरो (पश्चिम क्षेत्र) यांनी ती सर्व कासवे संवर्धनासाठी कर्नाळा अभयारण्यातील वनविभागाकडे २२ मार्चला सोपविली. मात्र यापैकी सहा कासवे दगावली. वातावरणातील बदल अथवा उष्माघातामुळे कासवांना जीव गमवावा लागला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी कासवांचा हा मृत्यू अ‍ॅनिमियामुळे झाला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल एस.के. पवार यांनी दिली. पाच कासवे काही दिवसांपूर्वी दगावली होती. यापैकी सहावे कासव बुधवारी दगावले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकूण १४३ पैकी १३७ कासवे या ठिकाणी शिल्लक आहेत. उर्वरित सर्व कासव चांगल्या स्थितीत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
===========================================

३४ वर्षात प्रथमच 'पॅलेस ऑन व्हील्स'ची फेरी रद्द

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ३१ - प्रवाशांअभावी 'पॅलेस ऑन व्हील्स'ची फेरी रद्द करण्याची वेळ ओढवली आहे. ३४ वर्षात प्रथमच या ट्रेनची फेरी रद्द झाली आहे. नावाप्रमाणे या ट्रेनच्या प्रवासात राजेशाही थाटाचा अनुभव मिळतो. २००७-०९च्या दरम्यान जागतिक मंदी असतानाही या ट्रेनची फेरी रद्द झाली नव्हती. त्यावेळीही या गाडीला प्रवाशांकडून मिळणार प्रतिसाद कमी झाला नव्हता. 
    पॅलेस ऑन व्हील्सची आधीची फेरी होळीच्यावेळी झाली होती. त्यावेळीही १०४ प्रवाशांची क्षमता असूनही फक्त आठ जागांसाठी बुकिंग झाले होते.  पॅलेस ऑन व्हील्स ट्रेन चालवण्याचा खर्च प्रचंड मोठा आहे. कमी प्रवाशांमध्ये ही गाडी चालवणे व्यवहार्य नसल्याचे या गाडीचे जनरल मॅनेजर प्रदीप बोहरा यांनी सांगितले. 
    या ट्रेनला पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद कमी झाला असून, पुन्हा प्रवासी संख्या वाढवण्यासाठी नव्या योजनांची आवश्यकता आहे. या ट्रेनने एक मार्गी प्रवासासाठी प्रतिमाणसी अडीचलाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. 
===========================================

गुजरातमध्ये बोर्ड परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना 'नमो पेन' वाटल्याने नवा वाद

  • ऑनलाइन लोकमत
    अहमदाबाद, दि. ३१ - गुजरात बोर्डाच्या १०वी-१२वीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना 'नमो पेन' वाटण्यात आल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. या पेनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व भारतीय जनता पक्षाची निशाणी असलेले कमळ यांचा फोटो असून त्याच पेनांवर ' आय लव्ह मोदी' असेही लिहीले होते. एका खासगी फर्मकडून विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर लिहीण्यासाठी हे पेन देण्यात आले होते, मात्र त्यावरून नवा गदारोळ सुरू झाला आहे. गुजरातमध्ये ८ मार्चपासून बोर्डाची परीक्षा सुरू झाली होती, त्यापूर्वीच विद्यार्थ्यांमध्ये ही पेनं वाटण्यात आली. 
    अहमदाबादमधील शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 'नमो पेन'ची ५ ते १० पाकिटे देण्यात आली, ज्यामध्ये प्रत्येकी पाच पेनं होती. या पेनांसोबत एक चिठ्ठीही जोडण्यात आली होती. ' हे पेन बोर्डाची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आले आहे. तसेच ही पेनं वाटण्यासाठी गुजरातच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक बोर्डाचे अध्यक्ष आर.जे. शाह व उपाध्यक्ष आर.आर.ठक्कर यांची परवानगी घेण्यात आली आहे,' असे त्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले होते. 
    मात्र या संपूर्ण प्रकाराबात विरोधी पक्षांनी नाराजी दर्शवली असून शाळा प्रशासनाही नाराज आहे. ' यापूर्वी परीक्षांना असा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कधीच झाला नव्हता. त्या पेनांसबोत पक्षाची निशाणी असलेल्या कमळाचाही मोठआ फोटो छापण्यात आला होता,' असे अहमदाबादमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी नमूद केले.
    काँग्रेस प्रवक्ते मनीष दोशी यांनी या प्रकाराबाब तीव्र नाराजी वर्तवली आहे. 'राज्यातील शाळांमध्ये ५० हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत, मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी शिक्षणव्यवस्थेलाच राजकीय रंग देण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे' असे दोशी म्हणाले.
===========================================

ब्रसेल्सवरील हल्लेखोरांनी बेल्जिअमच्या पंतप्रधानांचा पत्ता मिळवण्यासाठी केला इंटरनेटचा वापर

  • ऑनलाइन लोकमत - 
    ब्रसेल्स, दि. ३० - ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला करणा-याहल्लेखोरांनी इंटरनेटद्वारे बेल्जिअमचे पंतप्रधान चार्ल्स मायकल यांच्या घराचा आणि कार्यालयाचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी कच-याच्या डब्यात टाकलेल्या संगणकामधून ही माहिती मिळाली आहे. 
    या संगणकामधून हल्ल्यासंबंधी महत्वाची माहिती मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच हल्लेखोराने टाकलेला शेवटचा संदेशही या संगणकामधून मिळाला आहे. इब्राहिम अल बक्रोई याने हल्ल्यानंतर संगणक कचरापेटीत टाकला होता. यामध्ये त्याने त आपली ‘शिकार झाली आहे तसंच सुरक्षित वाटत नसल्याचं' लिहिले होते. अटक करण्यात आलेला पॅरिस हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सलाह अब्देस्लाम याच्यासारखी माझी गत होऊ नये असे मला वाटते, असेही इब्राहिमने म्हंटले होते. 
===========================================

ओलिसाचा सेल्फी

  • लंडन : इजिप्त एअरच्या विमानाचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीसोबत ब्रिटिश नागरिकाने घेतलेला सेल्फी व्हायरल झाला आहे. या सेल्फीत साक्षात काळासोबत स्मित करणारा ब्रिटिश नागरिक दिसतो.
    इजिप्तचा नागरिक सैफ अल दीन मुस्तफा याने मंगळवारी इजिप्त एअरच्या विमानाचे अपहरण केले होते. या विमानातील प्रवाशांमध्ये ब्रिटिश नागरिक बेंजामिन इनेस यांचाही समावेश होता. मुस्तफाने आत्मघातकी पट्टा घातल्याचा दावा करून विमान वेठीस धरले असताना इनेस यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेतला. मुस्तफाचा आत्मघातकी पट्टा नंतर नकली निघाला. इनेस हसत मुस्तफाशेजारी उभे असल्याचे या सेल्फीत दिसते. सायप्रसमध्ये धावपट्टीवर सैनिकांनी विमानाला वेढा घातलेला असताना इनेस यांनी हा सेल्फी घेतला. लीडस् येथील रहिवासी असलेले इनेस याबाबत म्हणाले की, मी असे का केले हे मला ठाऊक नाही. मी त्या कठीण प्रसंगात आनंदी राहू पाहत होतो. मुस्तफासोबत सेल्फी घेऊ इच्छितो, असे मी विमान कर्मचाऱ्याच्या मदतीने त्याला कळविले. त्यावर तो म्हणाला ठीक आहे. त्यानंतर मी त्याच्याजवळ उभा राहिलो आणि हसत फोटो घेतला, असे इनेस यांनी सांगितले. 
===========================================
पाकचे पथक भारतात येणे लज्जास्पद- कॉंग्रेस

नवी दिल्ली - पठाणकोट हल्ल्यावरील तपासासाठी पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथक भारतात येणे लज्जपास्पद असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. 

वृत्तसंस्थेशी बोलताना कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाकिस्तानवर हल्ला करत असताना आपण त्यांना भारतामध्ये जागा देतो हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवे. पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या तपास पथकाला भारतामध्ये बोलावणे ही अलिकडील लज्जास्पद गोष्ट असून धोरणांच्या बाबतीतील ही फार मोठी चूक आहे.‘ 

पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक (जेआयटी) भारतात दाखल झाले आहे. पाकिस्तानच्या जेआयटीने साक्षीदारांना विचारल्या जाणाऱ्या 300 प्रश्‍नांची यादी बुधवारी एनआयएकडे दिली आहे. भारताच्या एनआयएच्या दहशतवादविरोधी तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी जेआयटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, जैशे महम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याच्या आवाजाच्या नमुन्याची मागणी केली आहे. पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यासाठी लवकरच भारताची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पाकिस्तानचा दौरा करणार आहे. एनआयएचा प्रस्तावित पाक दौरा म्हणजे "चाय पे चर्चा‘ असल्याची टीका बुधवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
===========================================
गर्भपात करणाऱ्या महिलांना शिक्षा द्या- ट्रम्प
वॉशिंग्टन - अमेरिकेत गर्भपातावर बंदी घातली पाहिजे. तसेच गर्भपात करणाऱ्या महिलांना शिक्षा झाली पाहिजे, असे वक्तव्य अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
सतत वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांसंबंधी आता वादग्रस्त विधान केले आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केलेले आहे. एमएसएनबीसीच्या ख्रिस मॅथ्यूजसोबत झालेल्या चर्चेमध्ये ट्रम्प यांनी गर्भपाताबद्दल हे विधान केले. ट्रम्प म्हणाले की, गर्भपात करणाऱ्या महिलांना शिक्षा झाली पाहिजे. मात्र, ती शिक्षा काय असावी आणि कशाप्रकारची असावी याबाबत मी अजून काही विचार केलेला नाही. महिलांनी सरकारी मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रावर गर्भपात करावा असे मला वाटते. अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या महिलांसह डॉक्टरांनाही दोषी ठरविले पाहिजे. 
===========================================
पुलवामा: दहशतवाद्याकडून महिलेची हत्या
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात बुधवारी रात्री फुटीरतावादी दहशतवाद्याच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील नुरपूरा गावातील एका घरात घुसून दहशतवाद्याने गोळीबार केला. यामध्ये हमीदा बेगम या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या अनेक गोळ्या लागल्याने जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या दहशतवाद्याचा परिसरात शोध घेण्यात येत असून, पोलिस आणि लष्करी जवान संयुक्तरित्या शोधमोहिम राबवत आहेत.
===========================================
धर्म दहशतवाद शिकवत नाही - मोदी

ब्रुसेल्स - दहशतवादाचे मानवतेला आव्हान असून, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ब्रुसेल्समधील भारतीय समुदायाला संबोधित करताना बुधवारी रात्री मोदींनी दहशतवादावर निशाणा साधला. ब्रुसेल्स विमानतळावर झालेल्या आत्मघातकी स्फोटातील मृतांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली. 
मोदी म्हणाले की, दहशतवादाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. भारत गेल्या चार दशकापासून दहशतवादाची झळ सोसत आहे. पण, जगाला दहशतवादाचा धोका अमेरिकेत 9/11ला झालेल्या हल्ल्यानंतर कळाला. संयुक्त राष्ट्राने (यूएन) दहशतवादाला खतपाणी घालणारे कोण आहे, हे ओळखण्याची गरज आहे. दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज आहे.  
बेल्जियमनंतर पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनला रवाना झाले आहेत. वॉशिंग्टनमध्ये दोन दिवसीय आण्विक सुरक्षा संमेलनात मोदी सहभागी होणार असून 2 आणि 3 एप्रिलला मोदींचा सौदी अरेबियाला भेट देतील.
===========================================
मंदिर प्रवेशबंदीवर सरकारची खरडपट्टी
मुंबई - हिंदू मंदिरांमध्ये जेथे पुरुषांना प्रवेश मिळतो तेथे महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे, महिलांच्या समान हक्कांच्या आड येणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशा शब्दांत मुख्य न्यायाधीशांनी आज राज्य सरकारला खडसावले.
सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, तसेच नीलिमा वर्तक यांनी सादर केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश डी. एच. वाघेला व न्या. एम. एस. सोनक यांनी सरकारची कानउघडणी केली. या संदर्भात शुक्रवारी निवेदन करण्याचे आदेशही सरकारला खंडपीठाने दिले आहेत.
महाराष्ट्रात काही मंदिरांमध्ये महिलांना जाऊ देत नाहीत, तर काही मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेशबंदी असते. या ठिकाणी पुरुषांना मात्र मुक्तद्वार असते, असे याचिकेत म्हटले आहे. महाराष्ट्र हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वर्शिप (एंट्री अँड ॲथोरायझेशन) ॲक्‍टनुसार कोणाही हिंदू व्यक्तीला मंदिर प्रवेशापासून रोखता येत नाही. या संदर्भात कायद्याच्या कलम तीनमध्ये विशिष्ट तरतूद असून, तिचा भंग करणाऱ्यास सहा महिने कैद किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते, असेही अर्जदारांनी दाखवून दिले. नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर मंदिरात महिलांना चौथऱ्यावर जाऊ दिले जात नाही. 
पुण्यातील कार्तिकेय मंदिरात, तसेच राज्यातील काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशांचे निर्बंध असल्याचे अर्जदारांनी सांगितले. मागील महिन्यात तृप्ती देसाई यांनी शनिशिंगणापूर व त्र्यंबकेश्‍वरच्या मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना शहरातच प्रवेश दिला नसल्याचेही अर्जदारांनी याचिकेत म्हटले आहे.
===========================================
साहित्य परिषद बनलीय कुरूपतेचा अड्डा - सबनीस
पुणे - ""महाराष्ट्र साहित्य परिषद ही गेल्या काही वर्षांत कुरूपतेचा अड्डा बनली आहे. राजकारण्यांनीही इथे येऊन राजकारणाचे प्रशिक्षण घ्यावे, अशी स्थिती आहे. त्यामुळे परिषदेचेच नव्हे तर पुण्याचेही नाव बदनाम होत आहे; पण यापुढे परिषदेच्या कार्यात सकारात्मक परिवर्तन व्हावे आणि ही संस्था सांस्कृतिक संचिताचे केंद्र बनावी,‘‘ अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. 
साहित्य महामंडळ आणि परिषदेची "खरकटी भांडी‘ कोणामुळे झाली, असा प्रश्‍न करून ती स्वच्छ व्हायलाच हवीत, असेही त्यांनी ठामपणाने सांगितले. 
साहित्यवेध प्रतिष्ठान आणि सह्याद्री फाउंडेशनतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह निवडून आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सबनीस यांनी परिषदेच्या आणि साहित्य महामंडळाच्या कारभारावर टीका केली. या वेळी आयोजक कैलास भिंगारे, नेताजी खंडागळे उपस्थित होते. 
सबनीस म्हणाले, ""साहित्य क्षेत्रातले पवित्र मंदिर म्हणून परिषदेकडे पाहिले जाते; पण राजकारणामुळे अनेक चांगले लेखक संस्थेपासून तोंड फिरवत आहेत. मराठी साहित्याला वेगवेगळे धुमारे फुटत असताना या संस्थेने स्वत:ची दारे बंद करून घेतली. त्यामुळे जानव्यात अडकलेली परिषद, असा आरोपही संस्थेवर होऊ लागला. अनेक पातळ्यांवर परिषदेची बदनामी झाली. हे सगळे आता धुऊन काढावे लागणार आहे. त्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांना विश्‍वासात घेऊन पुढील वाटचाल करायला हवी. तरच परिषदेचे चित्र बदलेल.‘‘ 
===========================================
दहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र
मुंबई - शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यावरून सध्या विधिमंडळात रणकंदन माजले आहे. दुसरीकडे पंधरा वर्षांत राज्यात २० हजार ८७३ आत्महत्यांपैकी १० हजार ३९० शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी यंत्रणेने अपात्र ठरविल्या आहेत. सरकारी मदतीच्या निकषात बसत नसल्याची सबब देत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत नाकारल्याची धक्कादायक माहिती ‘एसआयटी’ला मिळाली आहे.
महसूल, मदत व पुनर्वसन विभागाकडील अधिकृत नोंदीनुसार २००१ ते २०१५ या कालावधीत राज्यातील २० हजार ८७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ९ हजार ९०७  शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी मदत मिळाली. उर्वरित १० हजार ३९० शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, ५७६ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीत ४४८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. त्यातील औरंगाबाद विभागात १८२ आत्महत्या असून अमरावती १६०, नागपूर ५९ ,नाशिक ५४, पुणे विभागात ९ आत्महत्यांचा समावेश आहे. त्यापैकी १४८ शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळाली. तर ८७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरल्या. उर्वरित २२९ प्रकरणी मदतीचा निर्णय अपेक्षित आहे.  
दरम्यान, कोकणात २००६ ते २०१५ च्या दरम्यान २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली तर, ३ आत्महत्या अपात्र ठरल्या.
===========================================
इंग्लंडने काढले कोलकात्याचे तिकीट

किवींना 153 धावांत रोखले; रॉयची धुवाधार खेळी 
नवी दिल्ली - विश्‍वकरंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने कष्ट करून उभारलेल्या 153 धावांची इंग्लंडचा फलंदाज जॅसन रॉयने चटणी केली. 44 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकार मारत रॉयने सलामीला येऊन 78 धावा केल्या. ज्याने इंग्लंडला विजय मिळविणे सहज शक्‍य झाले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्तरार्धात केलेल्या अचूक माऱ्याने न्यूझीलंडच्या धावगतीला ब्रेक लागला. त्यानंतर रॉयने बॅटचा दांडपट्टा फिरवत किवी गोलंदाजांना खलास करून टाकले. विजयाकरिता लागणाऱ्या 154 धावांना 17.1 षटकांत गवसणी घालून इंग्लंडने अंतिम फेरीत वाजत गाजत प्रवेश केला. "सामन्याचा मानकरी‘ अर्थातच रॉय ठरला. 
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा मॉर्गनचा निर्णय काहीसा अनपेक्षित होता. सेहवागची आठवण गुप्टिलने करून दिली जेव्हा त्याने परत एकदा सामन्याचा पहिला चेंडू चौकार मारला. गुप्टिलच्या डोक्‍यात फक्त मोठे फटके मारायचाच विचार दिसला. तीन चौकार मारूनही त्याला डेव्हिड विलीला अजून एक मोठा फटका मारायचा मोह टाळता आला नाही. गुप्टिल बाद झाल्यावर मुन्‍रोने तशीच फटकेबाजी चालू केली. त्याच्याकडे भलतीच विविधता होती. कधी पारंपरिक तर कधी रिव्हर्स स्विपवर उलट्या बाजूला षटकार मारणाऱ्या मुन्‍रोला नक्की थांबवायचे कसे समजत नव्हते. कर्णधार विल्यमसनबरोबर त्याने 74 धावा जोडून मोठ्या धावसंख्येचा पाया मजबूत केला. 
===========================================
नगरसेवक निवडणुकीसाठी शौचालय बंधनकारक
मुंबई - राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढविण्यासाठी अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधनकारक करणारे विधेयक काही सुधारणांसह विधान परिषदेत बुधवारी मंजूर झाले. यानुसार सार्वजनिक शौचालयाचे प्रमाणपत्रही ग्राह्य धरण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर विधेयक संमत करण्यात आले.

केंद्र सरकारने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींना स्वतःचे शौचालय बंधनकारक करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता. या अनुषंगाने राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतःचे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत सादर करण्याचे बंधनकारक करण्याचे विधेयक मांडले. या विधेयकाला विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही प्रखर विरोध केला. लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विरोध करताना हे विधेयक लोकप्रतिनिधींचा अवमान करणारे, तसेच सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे असल्याचे सांगितले. प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, अनिल भोसले, अमरसिंह पंडित, शरद रणपिसे, प्रा. जनार्दन चांदूरकर, किरण पावसकर, प्रकाश बिनसाळे, हेमंत टकले आदींनी विधेयक मागे घेण्याची मागणी केली. शिवसेनेच्या ॲड. परब यांनीही विधेयकाला विरोध करत मुंबई महापालिकेतील किमान २५ नगरसेवक चाळीत राहत असल्याने ते सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आणली. सुनील तटकरे यांनी सार्वजनिक शौचालय वापरण्याची मुभा देणारी सुधारणा करण्यास सरकार तयार असेल तर विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. त्यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याने मूळ विधेयकाचा महत्त्वाचा मुद्दाच निकाली निघाला. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने सार्वजनिक शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र सादर केले, तरी पात्र ठरणार असल्याचे स्पष्ट झाले.

No comments: