Friday, 18 March 2016

नमस्कार लाईव्ह १८-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- माले; अँबीव्हॅलीजवळ अपघात; तीन ठार 
२- चीन आणि पाकिस्तान भारतापेक्षा "आनंदी' - सर्व्हे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- रेल्वेकडून स्वच्छ रेल्वे स्टेशनची यादी जाहीर, पुणे स्थानकाचा शेवटून पहिला नंबर! 
४- देशाबद्दल आदर, मात्र 'भारतमाता की जय'ची सक्ती नको : इम्तियाज जलील
५- देहरादून; भाजपच्या आंदोलनाचा फटका घोड्याला, 'शक्तिमान'चा पाय कापला 
६- समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही- संघ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- विधानसभेत आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार 
८- सरकारी जाहिरातींवर आता मुख्यमंत्रीही झळकणार 
९- छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी 
१०- माहिम दर्ग्यावर तिरंगा फडकवल्याचा अभिमान: फडणवीस 
११- हैदराबाद; मेड इन इंडिया विमान, मराठमोळ्या गड्याची गगनभरारी 
१२- कल्याण; व्हॉट्सअप, फेसबूकवरुन मैत्री, लाखोंचा गंडा घालणारी 'ती' अटकेत 
१३- नवी मुंबईत फिरणारा ‘तो’ व्हॉट्सअॅप मेसेज बोगस, पोलिसांची माहिती 
१४- यवतमाळ; तर मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या पाया पडेन: सबनीस 
१५- नवी मुंबईकरांना सुरेश प्रभूंचं गिफ्ट, हार्बर रेल्वेवर लवकरच एसी लोकल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- मुंबई; म्हाडामार्फत बीडीडी चाळींचा पुनर्विकास, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी 
१७- ठाण्यात खाजगी बसवाल्यांची मुजोरी, प्रवाशाला बेदम मारहाण 
१८- पुणे; जर्मन बेकरी स्फोट: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप 
१९- औरंगाबाद; जखमी माकडाला वाचवण्यासाठी वानरसेनेचा संघर्ष 
२०- शेती करावी तर सुप्रियाताई सुळेसारखी, मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल 
२१- केज; सेवानिवृत्तीच्या पैशातून उभी राहतेय बुद्धसृष्टी 
२२- मेरठ; मुस्लिमाने रक्ताने लिहिले 'भारतमाता की जय 
२३- खडकी रुग्णालयाने दिली पुन्हा लढण्याची उमेद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- पटना; बिग बींना राष्ट्रपतीपदासाठी शत्रुघ्न सिन्हांची फील्डिंग 
२५- आपोआप लेस बांधलं जाणारं बूट, Nikeचा पहिलावहिला हायफंडू शूज लाँच 
२६- श्रीलंकेची विजयी सलामी, अफगाणिस्तानवर 6 विकेट मात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२७- विवाहिता विक्री प्रकरणात राजस्थानच्या महिला आरोपीस २१ पर्यंत पोलीस कोठडी 
२८- मुक्रमाबाद; डांबरटाक्या घेवून जाणारा ट्रक्टर उलटून चालक ठार 
२९- दारूच्या नशेत स्वतचे घर जळणाऱ्या आरोपीस एक वर्षाची शिक्षा 
३०- आयुक्तांनी शिवीगाळ केल्याने वसुली लीपिकांचे काम बंद आंदोलन 
३२- हिमायतनगर; विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ दाखवणाऱ्या मुख्याध्यापकाच्या बदलीची मागणी 
३३- हदगाव येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ४२ प्रकाराने निकाली 
३४- महाराष्ट्रातील पाणीप्रश्न पेटू देवू नका - चव्हाणांचा सरकारला इशारा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो
(सत्यजित तांबे, नमस्कार लाईव्ह वाचक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
सोनू टेकाळे, वंदना दवे, विष्णू जाधव, राहुल भोसले, बंटी पाटील, बसीद खान, फिरदोस खान, पंकज पाठक, परमेश्वर कदम, विक्रांत देशमुख, समीर मगले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


========================================

सरकारी जाहिरातींवर आता मुख्यमंत्रीही झळकणार

सरकारी जाहिरातींवर आता मुख्यमंत्रीही झळकणार
नवी दिल्ली : सरकारी जाहिरातींवर कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांचे फोटो न वापरण्याबद्दल दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने बदलला आहे.

आता सरकारी जाहिरातींवर मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे फोटो छापण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे.

याआधी कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सरकारी जाहिरातीत पंतप्रधान, राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचेच फोटो छापण्याची परवानगी दिली होती.

पण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात काही राज्यांनी फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय बदललाय.

नवीन नियमानुसार पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे फोटो छापण्याची परवानगी दिली आहे.
========================================

बिग बींना राष्ट्रपतीपदासाठी शत्रुघ्न सिन्हांची फील्डिंग

बिग बींना राष्ट्रपतीपदासाठी शत्रुघ्न सिन्हांची फील्डिंग
पाटणा : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी भारताचं पुढील राष्ट्रपतीपद भूषवावं अशी शॉटगन अभिनेत्याची इच्छा आहे. भाजपचे खासदार असलेल्या शत्रुघ्न सिन्हांनी गुरुवारी बिग बींचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केलं.

‘देशाचं सांस्कृतिक प्रतीक असलेल्या अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपतीपद मिळालं तर ती अत्यंत अभिमानाची बाब ठरेल. अमिताभ बच्चन यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अनेक मापदंड मिळवले आहेत. जर ते राष्ट्रपती झाले, तर देशासाठी गौरवाची गोष्ट ठरेल.’ अशा शब्दात शत्रुघ्न सिन्हांनी बिग बींचं कौतुक केलं आहे.

विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपतीपद मिळालं, तर मला खूप आनंद होईल, असंही सिन्हा म्हणाले. शत्रुघ्न यांनी बिग बींसोबत काला पत्थर, दोस्ताना, शान सारख्या अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

अभिषेक बच्चनच्या लग्नात बिग बी आमंत्रित न केल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा नाराज झाल्याची चर्चा होती. लग्नानंतर बच्चन यांच्याकडून पाठवलेली मिठाईही त्यांनी परत केल्याचं म्हटलं जातं
========================================

रेल्वेकडून स्वच्छ रेल्वे स्टेशनची यादी जाहीर, पुणे स्थानकाचा शेवटून पहिला नंबर!

रेल्वेकडून स्वच्छ रेल्वे स्टेशनची यादी जाहीर, पुणे स्थानकाचा शेवटून पहिला नंबर!
नवी दिल्ली: रेल्वे मंत्रालयानं ए-वन वर्गातील पहिल्या 75 स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी आज जाहीर केली आहे. स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील मोजक्याच रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

चौथ्या क्रमांकावर सोलापूरचं रेल्वे स्थानक असून त्यापाठोपाठ मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाचा क्रमांक लागतो. स्वच्छेतेच्या बाबतीत दादरची 26व्या तर कल्याणची 27व्या क्रमांकवर वर्णी लागली आहे.

या यादीत पुणे स्थानकाला शेवटून पहिला नंबर मिळाला आहे. स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत पुणे थेट 75व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. दरम्यान, सुरत हे देशातलं सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं घोषित केलं आहे.
========================================

आपोआप लेस बांधलं जाणारं बूट, Nikeचा पहिलावहिला हायफंडू शूज लाँच

आपोआप लेस बांधलं जाणारं बूट, Nikeचा पहिलावहिला हायफंडू शूज लाँच
मुंबई: अनेक सिनेमात अशा काही गोष्टी दाखविल्या जातात ज्यावर विश्वास ठेवणं बऱ्याचदा कठीण जातं. किंबहुना त्या गोष्टी अनेकदा अवास्तवच असतात. रोबोट, उडत्या कार आणि असंच काहीसं…

मात्र, जर तुमच्यासमोर अशीच काहीशी गोष्ट आली जिच्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल… तर?  होय… आता स्पोर्ट्स विअरच्या ब्राण्डनं Nike (नाइकी)नं futuristic self-lacing (आपोआप लेस बांधली जाणार) बूटाची पहिली झलक दाखवली आहे.

Nikeनं आपल्या नव्या सेल्फ-लेशिंग बुटाचं लाँचिंग केलं आहे. याचं नाव HyperAdapt असं आहे. जो 1.0 सेल्फ लेशिंग मशीननं लेस असेल.

हायपरएडप्ट 1.0च्या या शूजची खासियत म्हणजे जेव्हा तुम्ही या शूजमध्ये पाय टाकणार त्यावेळेस या शूजच्या लेस आपोआप बांधल्या जाणार आहेत. ही नवी टेक्नोलॉजी नाइकीनं लाँच केली आहे. हे शूज दिसायलाही फारच आकर्षक आहेत.

कंपनीनेच सीईओने या नव्या शूजचं न्यूयॉर्कमध्ये लाँचिंग केलं. पुढील महिन्यापासून या शूजची विक्री सुरु होईल अशी आशा करण्यात येते आहे. मात्र, नाइकीनं आतापर्यंत या बुटांची किंमत जाहीर केलेली नाही.

========================================

म्हाडामार्फत बीडीडी चाळींचा पुनर्विकास, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

म्हाडामार्फत बीडीडी चाळींचा पुनर्विकास, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुर्निविकासाच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

म्हाडाच्या माध्यमातूनच हा पुनर्विकास केला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र विकास नियमावली तयार केली जाणार आहे. पुनर्विकासानंतर रहिवाशांना वाढीव एफएसआय मिळणार असून किती एफएसआय द्यायचा याबाबतचा निर्णय म्हाडातर्फे घेतला जाणार आहे.

मुंबई विकास विभागामार्फत औद्योगिक कामगारांच्या निवासासाठी मुंबईतील वरळी, ना. म. जोशी आणि शिवडी परिसरात एकूण ९३ एकर जागेवर २०७ इमारती बांधण्यात आल्या आहेत. 1921 ते 25 या कालावधीत या इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळं या बीडीडी चाळींचं वयोमान तब्बल 90 वर्ष झाल्यानं त्या जर्जर झाल्या आहेत. त्यामुळं या बीडीडी चाळीचं पुनर्विकास करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. अखेर त्याला आता मुहूर्त मिळणार आहे.
========================================

ठाण्यात खाजगी बसवाल्यांची मुजोरी, प्रवाशाला बेदम मारहाण

ठाण्यात खाजगी बसवाल्यांची मुजोरी, प्रवाशाला बेदम मारहाण
ठाणे: ठाणे शहरात खाजगी बसवाल्यांच्या मुजोरीनं कळस गाठला आहे. खाजगी बसच्या क्नीनरनं शुक्राम तायेड या प्रवाशाला अमानूषपणे मारहाण करत रक्तबंबाळ केलं. पूर्व द्रुतगती महामार्गावर कॅडबरी जंक्शन परिसरात भर दुपारी झालेल्या या घटनेनं खळबळ उडाली.

याप्रकरणी बसचा चालक आणि क्लीनर यांना राबोडी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी खासगी बसच्या काचा फोडल्या. ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील ओवळा ते ठाणे पूर्व स्टेशनदरम्यान रात्रदिवस अनधिकृतपणे खाजगी बसेसची वाहतूक सुरू असते. इतर वाहनचालकांना आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला ही खाजगी बससेवा डोकेदुखी ठरू लागली आहे.

प्रवासी उचलण्याच्या नादात बसचालक रस्त्याच्या मधोमध बस उभ्या करतात.. तसेच इतर वाहनधारकांबरोबर हे खाजगी बसचालक भर रस्त्यातच हुज्जतही घालतात. त्यामुळे या खाजगी बसेसवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागिरकांमधून होते आहे
========================================

श्रीलंकेची विजयी सलामी, अफगाणिस्तानवर 6 विकेट मात

श्रीलंकेची विजयी सलामी, अफगाणिस्तानवर 6 विकेट मात
गतविजेत्या श्रीलंकेनं अफगाणिस्तानला 6 विकेट्सनी हरवून ट्वेन्टी20 विश्वचषकात विजयी सलामी दिली. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं श्रीलंकेला विजयासाठी 154 धावांचं लक्ष्य दिलं होतं.

तिलकरत्ने दिलशानच्या भक्कम फलंदाजीच्या जोरावर लंकेनं त्या लक्ष्याचा आरामात पाठलाग केला. दिलशाननं 56 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 83 धावा फटकावल्या. त्यामुळं लंकेला सहा विकेट्स आणि सात चेंडू राखून विजय साजरा करता आला. त्याआधी अफगाणिस्तानच्या असगर स्टॅनिकझाईनं 47 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि चार षटकारांसह 62 धावाची खेळी केली. त्यामुळं अफगाणिस्तानला 20 षटकांत 7 बाद 153 धावांची मजल मारता आली.

श्रीलंकेसाठी थिसारा परेरानं तीन विकेट्स काढल्या रंगना हेराथनं दोन तर अँजलो मॅथ्यूज आणि कुलशेखरानं प्रत्येकी एक-एक विकेट काढून लंकेच्या विजयाला हातभार लावला.
========================================

मेड इन इंडिया विमान, मराठमोळ्या गड्याची गगनभरारी

मेड इन इंडिया विमान, मराठमोळ्या गड्याची गगनभरारी!
हैदराबाद: मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात मराठमोळा विमान मेकर अमोल यादव यांच्या विमानानं जगभरातल्या पाहुण्यांचं लक्ष वेधलं होतं. अमोल यादव यांचं हे भारतीय बनावटीचं पहिल विमान हैदराबादमधील एअर क्राफ्ट शोमध्येही चर्चेचा विषय बनलं.

आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या विमानांनी जितका थरार निर्माण केला. तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त कुतुहल निर्माण केलं. हैदराबादच्या एअर शोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या छोट्याश्या विमानानं.

अमोल यादव… मूळच्या साताऱ्याच्या तरुणाच्या 17 वर्षांच्या तपःश्चर्येचं हे फळ आहे… दोन वेळा विमान तयार करण्याचा प्रयत्न हुकल्यानंतर अवघ्या 3 कोटी रुपयात तयार झालं. देशातलं पहिलं मेड इन इंडिया विमान.

लेकाच्या पराक्रमानं आई-वडील तर भारावून गेले. दोघांच्याही डोळ्यासमोर अमोलच्या 17 वर्षांचा संघर्ष तरळून गेला

अभिमानाची गोष्ट ही की राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही या विमानाला भेट देऊन अमोलच्या मेहनतीला दाद दिली. पण एकीकडे जमिनीवर कौतुक होत असलं, तरी हे विमान आकाशात भरारी घेण्यासाठी फार काही होत नाही.
========================================

व्हॉट्सअप, फेसबूकवरुन मैत्री, लाखोंचा गंडा घालणारी 'ती' अटकेत


व्हॉट्सअप, फेसबूकवरुन मैत्री, लाखोंचा गंडा घालणारी 'ती' अटकेत
कल्याण: मुंबईसह ठाणे परिसरात अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबली जोडगोळीतील बबलीच्या मुसक्या आवळण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलं आहे. सोनिया जागेशिया असं बबलीचं नाव आहे. तर तिचा सहकारी जयेश जागेशिया अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

हे बंटी आणि बबली व्यापारी आणि सधन लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचे. इतकेच नव्हे तर विश्वास संपादन करण्यासाठी समोरच्याला ते गोवा, अलिबाग, महाबळेश्वर येथे फिरायला घेऊन जात असे. फेसबुक, whats app च्या माध्यमातून मैत्री करून त्यांना आपण विमान तळावर, सरकारी ऑफिस, multi national कंपनी मध्ये नोकरी लावून देऊ अशी बतावणी करु लाखो रुपये उकळायचे.

अखेर पोलिसांकडे तक्रार आल्यावर गेली अनेक दिवस पोलिस सोनिया जागेशिया आणि तिच्या भामट्या टोळीचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी सोनिया जागेशियाला मुंबईतून अटक केली.
========================================

जर्मन बेकरी स्फोट: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप

जर्मन बेकरी स्फोट: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट
पुणे : पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटाप्रकरणी हिमायत बेगची फाशी रद्द करुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

हिमायत बेगवर एकूण 9 आरोप होते. पण आरोप सिद्ध न झाल्याने हायकोर्टाने हिमायत बेगची बॉम्बस्फोटासह आठ प्रकरणातून सुटका केली. तर घरात स्फोटकं मिळाल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पुण्यातील जर्मन बेकरीत 13 फेब्रुवारी 2010 रोजी स्फोट झाला होता. स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 58 जण जखमी झाले होते. या स्फोटामध्ये इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी हिमायत बेगला सप्टेंबर 2010 मध्ये अटक करण्यात आली. स्फोटात हात असल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने 2013 मध्ये त्याल फाशीची शिक्षा ठोठावली होती.

यानंतर हिमायत बेगने फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने बेगला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
========================================

देशाबद्दल आदर, मात्र 'भारतमाता की जय'ची सक्ती नको : जलील

देशाबद्दल आदर, मात्र 'भारतमाता की जय'ची सक्ती नको : जलील
मुंबई : लोकशाही देशात प्रत्येकाला काय करायचं, काय बोलायचं हे निवडण्याचा अधिकार असून कोणतीही गोष्ट तुम्ही एखाद्यावर लादू शकत नाही, असं सांगत एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी ‘माझा कट्टा’ वर ‘भारत माता की जय’ या घोषणा न देण्याच्या पक्षाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

‘भारत माता की जय’ या घोषणेला विरोध नसून अशाप्रकारची सक्ती अयोग्य असल्याचं जलील यांनी सांगितलं. सध्याचं सरकार हे नागपूरच्या आदेशांवरुन चालतं, असा टोलाही त्यांनी संघाला हाणला. असदुद्दीन ओवेसी यांनी ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार दिल्यानंतर देशभरात वादळ उठलं होतं. ओवेसींवर देशभरातून टीकेला सुरुवात झाली.
========================================

जखमी माकडाला वाचवण्यासाठी वानरसेनेचा संघर्ष

जखमी माकडाला वाचवण्यासाठी वानरसेनेचा संघर्ष
औरंगाबाद : एका जखमी माकडाला वाचवण्यासाठी 15 ते 20 जणांच्या वानरसेनेने एका घरावर कब्जा केला. औरंबादच्या दत्तविहार परिसरात हा प्रकार घडला. यानंतर वन विभागाला पाचारण करण्यात आलं. मात्र जवळपास 10 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वानरसेनेतील काही सैनिक वनअधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकले.

पिसादेवी रोडवरच्या दत्तविहार भागात वानरांची फौज दाखल झाली. या घरावरुन त्या घरावर अशी मर्कटलीला सुरु होती. पण काही वेळाने त्यांच्यात जुंपली. या भांडणात एक माकड अनिल संसारे यांच्या घराच्या किचनमध्ये पडलं. त्याला सोडवण्यासाठी इतर मांकडांचे प्रयत्न सुरु झाले. पण या सगळ्यात वानरसेने घरमालकाला प्रवेश करु दिला नाही. त्यामुळे संसारे कुटुंबीयांना घर सोडून शेजारच्या मंदिरात आश्रय घ्यावा लागला.

जखमी झालेलं माकड संसारेंच्या घरात तळ ठोकून बसलं होतं. मात्र त्या माकडापाठोपाठ 15 ते 20 जणांची टोळी देखील हजर झाली. कुणी स्वयंपाक घराचा ताबा मिळवला तर कुणी छतावर जाऊन कमान संभाळली. आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी वानरसेनेने संसारेच्या घरावर कब्जा केला.

घटनेचं गांभीर्य पाहता परिसरात वन अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. मग काय, रेस्क्यू ऑपरेशनच्या नावाखाली जो काही धुमाकूळ घातला तो या जन्मात तरी कोणी विसरणार नाही. माकडं पंधरा आणि वन अधिकारी चार, पण हे वनाधिकारी जाळीच आणायला विसरले.

========================================

नवी मुंबईत फिरणारा ‘तो’ व्हॉट्सअॅप मेसेज बोगस, पोलिसांची माहिती

नवी मुंबईत फिरणारा ‘तो’ व्हॉट्सअॅप मेसेज बोगस, पोलिसांची माहिती
नवी मुंबई : वॉटर कंपनीच्या नावानं काही दरोडेखोर घरात घुसून दरोडा घालत असल्याच्या मॅसेज सध्या नवी मुंबईत व्हॉट्सअॅपवर फिरतो आहे. विशेष म्हणजे हा मेसेज चक्क नवी मुंबईतील पोलिसांच्या नावाने फिरत आहे. मात्र, हा मेसेज बोगस असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या नावाने हा मेसेज व्हायरल झाला आहे.

दरोडेखोर घरातील शॉवर टॅब आणि बल्ब बदलण्याचा बहाणा करुन घराचा ताबा घेतात आणि मग शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घालतात, असा हा मेसेज असून यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

असा कोणताही चोरीचा प्रकार नवी मुंबईत झाला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. असं कोणतंही आवाहन पोलिसांनी केलं नसल्याचं पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बाजारे यांनी स्पष्ट केलं आहे.

========================================

तर मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या पाया पडेन: सबनीस

…तर मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या पाया पडेन: सबनीस
यवतमाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा. शेतकऱ्यांचं मरण थांबवलं, तर मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आपण पाय पडू, असं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी म्हटलं आहे.

भारत मातेच्या जयजयकाराला विरोध म्हणजे सांस्कृतिक पाप

तसंच, भारत मातेच्या जयजयकाराला विरोध करणे, हे सांस्कृतिक पाप आहे, असं म्हणत त्यांनी एमआयएमचे खासदार ओवेसींवरही टीका केली. सबनीस यवतमाळमध्ये बोलत होते.

स्त्रियांना मंदिरप्रवेश नाकारणं म्हणजे अस्पृश्यताच

“पुरुष आणि स्त्रियांना समान अधिकार आहेत आणि समतेचा विचार जर करीत आहोत तर जिथे जिथे पुरुषांना मंदिरात प्रवेश आहे, तिथे तिथे महिलांना प्रवेश द्यावा. महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे बंदी घालणे, ही सोवळी अस्पृश्यता आहे” असे महिलांच्या मंदिर प्रवेशावर बोलताना सबनीस म्हणाले.
========================================

छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई सत्र न्यायालयाकडून छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

पुढचे 14 दिवस भुजबळांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या कचाट्यात अडकलेल्या छगन भुजबळांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठ़डी सुनावण्यात आली आहे. चौकशीदरम्यान भुजबळ सहकार्य करत नाही,  ते सतत प्रकृतीची तक्रार करतात अशी माहिती ईडीनं आज न्यायालयाला दिली.

दरम्यान ईडीचे अधिकारी चौकशीच्या नावानं दिवसभर बसवून ठेवतात. मी त्यांना सकाळपासून जबाब देतोय . मी दोषी असल्याचा कोणताच पुरावा त्यांना मिळालेला नाही असा दावा भुजवळांच्या वतीनं करण्यात आला.

ईडीनं न्यायालयाला 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयानं ईडीची मागणी फेटाळत भुजबळांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
========================================

भाजपच्या आंदोलनाचा फटका घोड्याला, 'शक्तिमान'चा पाय कापला

भाजपच्या आंदोलनाचा फटका घोड्याला, 'शक्तिमान'चा पाय कापला
देहरादून : उत्तराखंडमध्ये सरकारविरोधी आंदोलनात शक्तिमान या पोलिसांच्या घोड्याला झालेल्या दुखापतीनंतर त्याचा पाय कापावा लागला आहे. शरीरात संसर्ग होऊ नये, यासाठी शस्त्रक्रिया करुन घोड्याचा पाय शरीरापासून वेगळा करावा लागला. त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

शक्तिमानचा पाय कापला नसता तर गँगरीन होण्याचा धोका होता.

मसुरीचे भाजप आमदार गणेश जोशी यांनी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं होतं. या दरम्यान पोलिसांनी घोड्यांसह आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी  झालेल्या गोंधळात शक्तिमानच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर घोड्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र ती दुखापत घोड्याच्या जीवावर बेतू नये म्हणून डॉक्टरांना घोड्याचा पाय कापावा लागला.

शक्तिमान पुन्हा चालू शकेल?
शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शक्तिमानला कृत्रिम पाय लावून चालवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं देहरादूनचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सदानंद दाते यांनी ऑपरेशननंतर सांगितलं.

शक्तिमान 11 वर्षांपासून पोलिसात सेवा करत आहे. तो पुन्हा चालू शकेल, अशी आशा आम्हाला आहे, असंही दाते म्हणाले.

दुसरीकडे घोड्याच्या पायाच्या बहाण्याने काँग्रेस सरकार भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उत्तराखंडचे भाजप अध्यक्ष अजय भट यांनी केला आहे. घोड्यावर जाणीवपूर्वक योग्य प्रकारे उपचार केले नाहीत, त्यामुळेच त्याचा पाय कापण्याची वेळ आहे, असंही भट म्हणाले.
========================================

माहिम दर्ग्यावर तिरंगा फडकवल्याचा अभिमान: फडणवीस

माहिम दर्ग्यावर तिरंगा फडकवल्याचा अभिमान: फडणवीस
मुंबई: ‘भारत माता की जय’ म्हणणार नाही अशी दर्पोक्ती एमआयएमकडून सुरु असताना मुंबईतही पुन्हा एकदा देशप्रमाचं दर्शन घडलं आहे. माहिमच्या दर्ग्यामध्ये आज याच पार्श्वभूमीवर तिरंगा फडकवण्यात आला आहे.

दर्गा कमिटीच्या वतीनं सध्याच्या हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मग दर्ग्यात जाऊन आशीर्वाद घेतले.

दर्ग्यात तिरंगा फडवण्याचा आपल्याला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच तिरंगा फडकवून तुम्ही एका सच्च्या मुसलमानाचे कर्तव्य पार पाडले, असंही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दर्ग्याच्या फेसबुक पेजचंही अनावरण करण्यात आलं.
========================================

शेती करावी तर सुप्रियाताई सुळेसारखी, मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल

शेती करावी तर सुप्रियाताई सुळेसारखी, मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भातील एका मेसेजची सध्या व्हॉट्सअॅपवर चर्चा सुरु आहे. 2009च्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी त्यांचा व्यवसाय शेतकरी असल्याचं नमूद केलं होतं. त्यावेळी शेतीतील उत्पादन होतं 52 कोटी. मात्र 2014 च्या निवडणुकीत हे उत्पन्न 113 कोटी रुपये झालं. म्हणजेच पाच वर्षांत उत्पन्नात तब्बल 61 कोटींची वाढ.

खरंतर राज्यात एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. पाण्याअभावी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. लाखो रुपये खर्च करुन फुलवलेली बाग शेतकरी स्वत:च्या हाताने तोडत आहे. पण या परिस्थितीत खासदार सुप्रिया सुळेंच्या उत्पन्नात मात्र भरमसाठ वाढ झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे फक्त 10 एकर शेती आहे. परंतु या शेतीत त्यांनी दहा एकर शेतीत पाच वर्षात 61 कोटींचं उत्पन्न मिळवलं. महत्त्वाचं म्हणजे 20 एकर शेती असणारे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना, सुप्रिया सुळे शेतीत जादू करत असाव्यात असं व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे.
========================================

नवी मुंबईकरांना सुरेश प्रभूंचं गिफ्ट, हार्बर रेल्वेवर लवकरच एसी लोकल

नवी मुंबईकरांना सुरेश प्रभूंचं गिफ्ट, हार्बर रेल्वेवर लवकरच एसी लोकल
फोटो : विकीपीडिया
मुंबई मुंबईतील एसी लोकल हार्बर रेल्वेवर चालवण्यात येणार आहे. मुंबईतल्या पश्चिम रेल्वेमार्गावर  सुरू होणारी एसी लोकल आता हार्बर मार्गावर सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर एसी लोकल चालवण्याची तयारी पूर्ण झाली असताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एसी लोकल ही मध्य रेल्वेवर चालवण्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे रेल्वे वर्तुळात संभ्रम आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या हार्बर किंवा ट्रान्स हार्बर मार्गावर ही एसी लोकल सुरू होण्याचे संकेत आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गाऐवजी हार्बर मार्गाची निवड करण्यामागची नेमकी कारणेही स्पष्ट झालेली नाहीत. मध्य रेल्र्वेवर वातानुकूलित गाडी चालवण्यात अडचणी असल्याने हार्बर मार्गावर ती चालविण्याचा विचार आहे. तिच्या चाचण्या एप्रिल अखेरपासून सुरू होतील..

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी ट्विटरवरुन माहिती दिली होती की, मध्य रेल्वेवर एसी लोकल चालवली जाणार आहे. त्यानंतर थोडा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता स्पष्ट झालं आहे की, पहिली एसी लोकल हार्बर रेल्वेवर चालवण्यात येणार आहे.
========================================

विधानसभेत आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

विधानसभेत आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
मुंबई राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या धर्तीवर राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण भागाला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.

दुष्काळामुळं कृषी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळं अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान काल विधानसभेत आर्थिक विकास पाहणी अहवाल सादर करण्यात आला.

आर्थिक विकास पाहणी अहवालाच्या आकडेवारीनुसार राज्याचा विकास दर 5.8 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत वाढणं अपेक्षित आहे. आर्थिक पाहणी अहवालातील जमेची बाब म्हणजे ‘मेक इन इंडिया’तंर्गत 7 लाख कोटींच्या गुंतवणूकीचे प्रस्ताव आहेत.

तसंच उद्योग आणि सेवा क्षेत्रात देखील समाधानकारक वाढ अपेक्षित असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
========================================
अँबीव्हॅलीजवळ अपघात; तीन ठार
माले - अँबीव्हॅली-लोणावळा रस्त्यावर आज सकाळी ट्रॅक्‍टर आणि दुचाकीदरम्यान झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. 

अँबीव्हॅली-लोणावळा रस्त्यावरील वळणावर घुसळखांब (ता.मुळशी) येथे ट्रॅक्‍टर व दुचाकी दरम्यान आज सकाळी नऊच्या सुमारास अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील दोन जागीच ठार, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यु झाला. नांदगाव येथून दगड-वीटा घेवून ट्रॅक्‍टर लोणावळयाच्या दिशेने निघाला होता. तर दुचाकीवरील तरुण लोणावळ्यकडून देवघरच्या दिशेने कामासाठी निघाले होते. घुसळखांब जवळील वळणावर ट्रॅक्‍टर-दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. तर तिसऱ्याला रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी लोणावळ्याला नेताना मृत्यु झाला. सर्व मृत परप्रांतातील कामगार आहेत. पुढील तपास सुरु आहे.
========================================
सेवानिवृत्तीच्या पैशातून उभी राहतेय बुद्धसृष्टी

केज - नोकरदार म्हटले, की एका चौकटीत बंदिस्त असलेल्या व्यक्तीची प्रतिमा समोर येते. मात्र चौकटीबाहेर जाऊन एक सेवानिवृत्त महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी आपल्या निवृत्तीच्या पैशातून बुद्धसृष्टी उभारून सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे.  त्रिवेणीताई कसबे या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावरून 2014 मध्ये निवृत्त झाल्या. यानंतर त्यांना भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण यासह इतर देयके मिळून वीस लाख रुपये मिळाले. ही रक्कम त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च न करता ज्यांच्या विचारामुळे व कायद्यातील तरतुदीमुळे आपणास सरकारी नोकरीची संधी मिळाली त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शांतिदूत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांच्या प्रसारासाठी खर्च करण्याचे ठरविले. त्यातून बुद्धसृष्टीची संकल्पना पुढे आली. केज-कळंब राज्य रस्त्यालगत तेले वस्तीजवळ त्यांची शेती आहे. तेथे एक एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर बुद्धसृष्टीची उभारणी त्यांनी सुरू केली. मागील वर्षात परिसरातील सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास आले.
========================================
समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही- संघ

नवी दिल्ली - समलैंगिक संबंध हा गुन्हा नसून तो लोकांचा खासगी विषय असल्याच्या प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्या आहेत. 

एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबोले म्हणाले, ‘समलैंगिक संबंधांवर राष्ट्रीय स्वयंसेवक प्रतिक्रिया का द्याव्यात? जोपर्यंत इतरांच्या आयुष्यावर परिणाम होत नाही तोपर्यंत समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरत नाही. तो लोकांचा खाजगी प्रश्‍न आहे. लैंगिक संबंध या विषयावर संघामध्ये चर्चा करण्यात येत नाही आणि आम्हाला त्याविषयी चर्चा करायचीही इच्छा नाही.‘ 

भारतीय दंड संहितेतील कलम 377 नुसार समलैंगिक संबंध हे अनैसर्गिक असून त्यासाठी जास्तीत जास्त दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. समलैंगिक संबंध गुन्हा ठरवण्यात येऊ नये, अशी मागणी वेळोवेळी करण्यात येते. दरम्यान अलिकडेच संघाचे सरचिटणीस राम माधव यांनी समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरावा का हा वादाचा मुद्दा असल्याचे म्हटले होते.
========================================
मुस्लिमाने रक्ताने लिहिले 'भारतमाता की जय'
मेरठ - उत्तर प्रदेशमध्ये एका मुुस्लिम व्यक्तीने आपल्या रक्ताने ‘भारत माता की जय‘ लिहून ‘भारतमाता की जय‘ म्हणण्यास नकार देणाऱ्या एमआयएमला सणसणीत चपराक दिली आहे. 

मानेवर धारदार सुरा जरी ठेवला तरीही ‘भारतमाता की जय‘ म्हणणार नाही, असे वक्‍तव्य एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील मोहम्मद इमरान यांनी आपल्या रक्ताने ‘भारतमाता की जय‘ असे लिहिले आहे. याबाबत बोलताना मोहम्मद म्हणाले, ‘ओवेसी आपल्या राजकारणासाठी अल्पसंख्यांकांना बदनाम करत आहेत. आपल्या वक्‍त्याने ते देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.‘ तसेच इस्लाम नेहमी ज्या देशात राहतो त्याच देशात फूट पाडू नका हेच शिकवत असल्याचे मोहम्मद म्हणाले. यावेळी मोहम्मद यांच्यासह उपस्थितांनी अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. तसेच ओवेसी यांचे खासदारपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली
========================================
चीन आणि पाकिस्तान भारतापेक्षा "आनंदी'
नवी दिल्ली - जगभरातील 156 आनंदी देशांच्या यादीत चीन आणि पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. भारत 118 व्या क्रमांकावर असून पाकिस्तानला 92 वा, तर चीनला 83 वा क्रमांक मिळाला आहे. डेन्मार्क हा जगातील सर्वांत आनंदी देश असून बुरुंडी या देशाने सर्वांत खालचे स्थान पटकावले आहे. 

शाश्‍वत विकासासाठी काम करणाऱ्या "सस्टनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क‘ आणि कोलंबिया विद्यापीठाने संयुक्त राष्ट्रसंघासाठी जगातील आनंदी देशांचा अहवाल तयार केला आहे. येत्या 20 मार्च रोजी असलेल्या जागतिक आनंद दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), आयुर्मान, सामाजिक वातावरण आणि स्वातंत्र्य आदी घटकांचा अभ्यास करण्यात आला असून त्यानुसार क्रमवारी करण्यात आली आहे.

आनंदी देशांच्या यादीतील पहिले दहा देश 
डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आइसलॅंड, नॉर्वे, फिनलंड, कॅनडा, नेदरलॅंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन

आनंदी देशांच्या यादीतील शेवटचे दहा देश 
मादागस्कर, टांझानिया, लायबेरिया, गिनिया, रवांडा, बेनिन, अफगाणिस्तान, टोगो, सीरिया, बुरुंडी
========================================
खडकी रुग्णालयाने दिली पुन्हा लढण्याची उमेद
राष्ट्रीय रायफल्सचे नाईक नीलेश यांची भावना 
पुणे - ‘मी दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावताना झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालो होतो. माझ्या हात व पायाला गोळ्या लागल्या होत्या. मला तातडीने श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी मला खडकी येथील लष्करी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. येथे मी पूर्ण बरा होऊन देशसेवेसाठी पुन्हा सज्ज झालो आहे...,‘‘ गेल्या वर्षी 27 जानेवारीला झालेल्या दहशतवाद्यांशी मुकाबला करताना जखमी झालेले 42 राष्ट्रीय रायफल्सचे नाईक नीलेश राऊत (वय 28) बोलत होते. 

ते म्हणाले, ‘येथे माझ्यावर मूळ पेशींचा वापर करून उपचार करण्यात आले. येथील अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्‍टर यांच्या पथकाने केलेल्या प्रभावी उपचारांमुळे मी आता पुन्हा सीमांच्या रक्षणासाठी सज्ज झालो आहे.‘‘

या रुग्णालयाची अधिक माहिती देताना कमांडर ब्रिगेडियर एच. एस. अग्रवाल यांनी सांगितले, की प्रत्येक जखमी सैनिक आमच्यासाठी मौल्यवान असून, आमच्या समोर त्यांना बरे करण्याचे आव्हान असते. त्यामुळे येथे प्रत्येक शस्त्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात कधीही जादू घडत
नाही. आत्मविश्‍वास व प्रामाणिकपणे डॉक्‍टरांनी केलेल्या कामामुळे जादूमय वाटणाऱ्या घटना घडतात. या रुग्णालयात 846 बेड असून, दरवर्षी येथे सहा हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या जातात. या रुग्णालयात मूळ पेशींच्या माध्यमातून उपचार, सांधे प्रत्यारोपण केले जातात, असे त्यांनी सांगितले. 
========================================
========================================
========================================

No comments: