Tuesday, 8 March 2016

नमस्कार लाईव्ह ०८-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- भारतात येणाऱ्या पाकिस्तानी संघासमोर सिम कार्डचं संकट 
२- वॉशिंग्टन; महिला पत्रकाराचा नग्न व्हिडिओ बनविणाऱयास दंड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- डान्सबार बंदीचा कायदा करा, सहकार्य करू, विरोधकांचं आवाहन 
४- पीएफवरील प्रस्तावित कर मागे, जेटलींची घोषणा 
५- विजय मल्ल्यांचा पाय खोलात, बँकांची सुप्रीम कोर्टात धाव 
६- दिल्लीत अल्पवयीन मुलीला बलात्कार करुन जाळले  
७- श्री श्री यांच्या कार्यक्रमाला उपस्थितीस राष्ट्रपतींचा नकार 
८- 11 लाखाची बाईक घेऊन महिला खासदाराची संसदेत एण्ट्री 
९- माझ्यामुळे ईपीएफवरील कर लावण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला - राहुल गांधी  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- औरंगाबाद : मानसीच्या मारेकऱ्याला फाशीच 
११- सिंडिकेट बँकेच्या 1 हजार करोड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी 
१२- खुनाच्या धमकीनंतर कन्हैयाला सुरक्षा 
१३- सरकारच्या निर्णयामुळे करदात्यांना न्याय- कॉंग्रेस 
१४- बोलायचे म्हटले तरी देशद्रोहाची भीती- आढाव 
१५- केरळ; संघ कार्यकर्त्यांचा पोलिस स्थानकावर हल्ला 
१६- गुंतवणूकदारांनी गमावली 14 लाख कोटींची संपत्ती 
१७- चेन्नई; नलिनीला एक दिवसासाठी पॅरोल मंजूर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- पिंपरी-चिंचवड; लग्नाच्या आमिषाने मॉडेलवर बलात्कार, आरोपी फरार 
१९- पणजी महापालिका भाजपाच्या हातातून निसटली 
२०- कांदिवलीत सिग्नल बिघाड, पश्चिम रेल्वे विस्कळीत 
२१- महिलांनी नव्‍या युगाची आव्‍हाने स्विकारुन आत्‍मनिर्भर बनावे - जि. प. सदस्‍या वर्षाताई भोसीकर 
२२- नांदेड; राष्ट्रमाताच्या विद्यार्थ्यांची डिस्कव्हरी सायन्स सेंटरला भेट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- मुलांना व्यसनं जडली आहेत?, या सवयींवरुन काय ते ओळखा 
२४- हे चार संघ टी 20 ची सेमी फायनल गाठतील : सेहवाग 
२५- धोनी नाहीच, विराट कोहली मॅच फिनिशर: गौतम गंभीर 
२६- कतरिना नव्या घराच्या शोधात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे
(गणेश पाटिल शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


===================================

औरंगाबाद : मानसीच्या मारेकऱ्याला फाशीच

औरंगाबाद : मानसीच्या मारेकऱ्याला फाशीच !
औरंगाबाद: बहुचर्चित मानसी देशपांडे बलात्कार – हत्याप्रकरणी दोषी जावेद खानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी सत्र न्यायालायने जावेदला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. मात्र हायकोर्टाने सत्र न्यायालयाच्याही पुढे जात जावेदला फाशीची शिक्षा सुनावली. 
काय आहे प्रकरण? 
11 जून 2009 मध्ये 19 वर्षीय मानसी देशपांडे या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या जावेदने ही कृत्य केल्याचं तपासात समोर आलं होतं. याप्ररणी पोलिसांनी आरोपी जावेदला तब्बल दीड महिन्यांनी अटक केली होती. पोलिसांनी जावेदची ब्रेन मॅपिंक आणि नार्को टेस्टही केली होती. 
सत्र न्यायालयाने जावेदला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र जावेदने कमी शिक्षा व्हावी म्हणून सत्र न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. तर राज्य सरकारनं जावेदला फाशीच व्हावी म्हणून हायकोर्टात धाव घेतली होती. 
हायकोर्टाने या पाशवी कृत्याची गंभीर दखल घेत, सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा फाशीत बदलली. तसंच दोषी जावेदची मागणी अमान्य करत, क्रूर कृत्याला सहानुभूती देण्यास नकार दिला.
===================================

श्री श्री यांच्या कार्यक्रमाला उपस्थितीस राष्ट्रपतींचा नकार

श्री श्री यांच्या कार्यक्रमाला उपस्थितीस राष्ट्रपतींचा नकार
नवी दिल्ली : दिल्लीत यमुना किनारी होणाऱ्या श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमाभोवती वादाचं वलय वाढत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

13 मार्च रोजी होणाऱ्या श्री श्री यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित राहणार होते. त्यांच्या अनुपस्थितीचं कोणतंही कारण अद्याप राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेलं नाही.

येत्या शुक्रवारपासून यमुना नदीकाठी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे जागतिक शांतीसाठी तीन दिवसीय महासंमेलन भरवण्यात येत आहे. त्यासाठी जवळपास 35 लाखांचा जनसमुदाय यमुनातीरी जमण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र सध्या हे संमेलन पर्यावरणाच्या मंजुरीसाठी वादात अडकलं आहे.

दरम्यान, कार्यक्रमाची तयारी करताना एकही झाड कापण्यात आलं नाही आणि पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेतली गेल्याचा दावा श्री श्री रविशंकर यांनी केला आहे. आम्हाला यमुनेला तिचं सौंदर्य पुन्हा प्राप्त करुन द्यायचं आहे, असंही श्री श्री यांनी स्पष्ट केलं आहे.
===================================

भारतात येणाऱ्या पाकिस्तानी संघासमोर सिम कार्डचं संकट

भारतात येणाऱ्या पाकिस्तानी संघासमोर सिम कार्डचं संकट
कोलकाता : टी 20 विश्वचषकाच्या पात्रता सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. 15 मार्चपासून भारत – न्यूझीलंड सामन्याद्वारे प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होईल, मात्र सर्वांचं लक्ष आहे ते भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याकडे.

भारत – पाकिस्तान सामना 19 मार्चला हिमाचल प्रदेशातील धरमशाला इथं होणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणावरून इथे हा सामना होणार की नाही हे अद्याव स्पष्ट झालेलं नाही. त्यातच पाकिस्तानी संघासमोर आणखी एक अडचण उभी राहिली आहे. ही अडचण आहे मोबाईलमधील सीम कार्डची !

पाकिस्तानी संघाकडे सीम कार्ड कोण देणार?

पाकिस्तानचा पहिला सामना 16 मार्चला कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर आहे. त्यासाठी पाकिस्तानी संघ पहिल्यांदा कोलकात्यातच उतरेल. त्यामुळे ‘क्रिकेट असोसिएशन बंगाल’वर पाकिस्तानी संघाची जबाबदारी असेल. पाकिस्तानी खेळाडू आणि संघ व्यवस्थापकांना काय हवं-नको, सर्व सोई-सुविधा ‘क्रिकेट असोसिएशन बंगाल’ला कराव्या लागणार आहेत. मात्र पाकिस्तानी संघाला मोबाईलमधील सिमकार्ड कोण देणार हा मोठा प्रश्न ‘क्रिकेट असोसिएशन बंगाल’समोर उभा राहिला आहे. सिम कार्डची जुळवाजुळव करताना ‘क्रिकेट असोसिएशन बंगाल’ला अनेक अडचणी येत आहेत.

पाकिस्तानी पासपोर्टवर सिम कार्ड द्यायचं असेल, तर ‘क्रिकेट असोसिएशन बंगाल’च्या सदस्यांचं ओळखपत्राची मागणी सिम कार्ड पुरवणाऱ्या कंपन्यांनी केली आहे. मात्र स्वत:चं ओळखपत्र देऊन हमी देण्यास ‘क्रिकेट असोसिएशन बंगाल’मधील कोणीही सदस्य तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे ‘क्रिकेट असोसिएशन बंगाल’ आणि पाकिस्तानी संघासमोर छोटसं सिम कार्ड मोठी अडचण ठरत आहे.
===================================

पीएफवरील प्रस्तावित कर मागे, जेटलींची घोषणा

पीएफवरील प्रस्तावित कर मागे, जेटलींची घोषणा
नवी दिल्ली: प्रचंड गदारोळानंतर केंद्र सरकारने अखेर नोकरदारांचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफवरील प्रस्तावित कर मागे घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत याबाबतची घोषणा केली.

नोकरदारांच्या गुंतवणूक वाढीसाठी सरकार त्यांच्या पीएफच्या काही रकमेवर कर लावण्याच्या विचारातं होतं, मात्र आता हा निर्णय मागे घेत आहोत, अशी घोषणा अरुण जेटली यांनी केली.

बजेटमध्ये जेटलींनी काय म्हटलं होतं?

1 एप्रिल 2016 पासून जी रक्कम प्रॉव्हिडंट फंडात जमा होईल, त्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम काढल्यास त्यावर टॅक्स द्यावा लागेल. ही रक्कम न काढल्यास आणि ती पेन्शन फंडात जमा केल्यास टॅक्स भरावा लागणार नाही, असं अर्थमंत्री अरुण जेटलींनी बजेट भाषणात सांगितलं होतं.

मात्र याला देशभरातून विरोध झाल्यानंतर सरकारने आता हा निर्णय मागे घेतला आहे.
===================================

पिंपरी-चिंचवड; लग्नाच्या आमिषाने मॉडेलवर बलात्कार, आरोपी फरार

लग्नाच्या आमिषाने मॉडेलवर बलात्कार, आरोपी फरार
पिंपरी-चिंचवड : लग्नाच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. पीडित तरुणीने ही मॉडेल असून तिने काही व्हिडिओ अल्बममध्ये काम केलेलं आहे.

25 वर्षीय तरुणीच्या आरोपांनंतर मोशी येथील संकेत लांडे तसेच गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी त्याचा भाऊ अशा दोघांविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोशी येथे राहणाऱ्या संकेतचे पीडितेशी 2013 साली प्रेमसंबंध जुळले. संकेतने तिला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षात वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणी त्याच्याकडे वारंवार लग्नाची मागणी करु लागली. मात्र तो तिला टाळू लागला.

गेल्या एक महिन्यापासून तो तिला भेटलाही नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने संकेत विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संकेत अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
===================================

मुलांना व्यसनं जडली आहेत?, या सवयींवरुन काय ते ओळखा

मुलांना व्यसनं जडली आहेत?, या सवयींवरुन काय ते ओळखा!
मुंबई: व्यसन कोणतंही असो त्यामुळेच बऱ्याचदा नुकसानच होतं. एका रिपोर्टनुसार जगातील 5 टक्के लोकं नशेच्या एका खतरनाक मर्यादेच्या पलीकडे गेले आहेत. अशावेळी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं फारच महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुमची मुलं सिगरेट किंवा ड्रग्सच्या आहारी गेली असतील तर पुढील 10 गोष्टींवरुन ते तुम्हाला सहज कळू शकेल. 
एकटेपणा: जर तुमचा मुलगा घरात असूनही एकटं राहणं पसंद करत असेल तर नक्कीच चिंताजनक बाब आहे. तसं पाहायला गेलं तर हा एकटेपणा अभ्यासाठीही असू शकतो. मात्र, एकटेपणासोबतच जर तो चिडचिडेपणा करत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. 
पटकन मूड बदलणं: जर तुमच्या घरी किशोरवयीन कोणी आहे आणि तो मागील काही दिवसापासून वेगळं वागत असल्यास नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अशी मुलं जे पूर्वी खूप शांत राहायची किंवा खूप हसमुख होती. पण नंतर मात्र त्यांचा मूड लगेच बदलतो. तर या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. 
खिशात वारंवार च्युंगम मिळणं: जर तुमच्या मुलांच्या खिशात वारंवार च्युंगम सारख्या गोष्टी मिळू लागल्या तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण की सिगारेटच्या सवयीनंतर आपल्या तोंडातून वास येऊ नये यासाठी च्युंगम खाल्लं जातं. 
माचिस किंवा लायटर सापडणं: जर मुलांच्या कपड्यांच्या खिशातून माचिस किंवा लायटर सापडल्यास तात्काळ मुलांची बॅग आणि खिसे तपासा. 
रोलिंग पेपर: पारदर्शक रोलिंग पेपर जर खिसा किंवा बॅगेतून सापडल्यास हे सर्वाधिक धोकादायक लक्षण आहे. कारण की, रोलिंग पेपरमधून चरस अथवा गांजाचे सेवन केले जाते. 
खर्च वाढणं: जर तुमच्या मुलाचा खर्च अचानक वाढत असल्यास त्याकडे नक्की लक्ष द्या. तुमची मुलं कुठे एखाद्या रेव्ह पार्ट्ंयामध्ये तर सहभागी नाही होत ना यावर लक्ष ठेवा. 
डोळे लाल होणं: जर वारंवार तुमच्या मुलांचे डोळे लाल होत असतील आणि संध्याकाळनंतर पुन्हा व्यवस्थित झाले असतील तर मात्र, ही लक्षणं काही योग्य नाही एवढं नक्की. 
आयड्रॉप सापडणं: जर मुलांच्या बॅगेतून डोळ्यात घालण्याची औषधं सापडली तरी त्याची चौकशी करा. कारण की, अनेकदा आपल्या डोळ्यतील लालपणा दिसू नये याचा वापर केला जातो. 
वजन कमी होणं: जर तुमच्या मुलांचं वजन अगदीच कमी होत असेल तर त्याचं सगळ्यात मोठं कारण ड्रग्सचं सेवन असू शकतं. 
हट्ट करुन टूरला जाणं: जर मुलं थोड्या थोड्या दिवसांमध्ये वारंवार मित्रांसोबत पिकनिकला जाण्यासाठी हट्ट करीत असतील तर यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे.
===================================

11 लाखाची बाईक घेऊन महिला खासदाराची संसदेत एण्ट्री

11 लाखाची बाईक घेऊन महिला खासदाराची संसदेत एण्ट्री
स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत खासदार रंजीत रंजन 'हार्ले डेव्हिडसन' बाईकवरुन संसदेत दाखल झाल्या.
नवी दिल्ली : जगभरात महिला दिनाचा उत्साह आहे. भारतातही महिला दिन जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. महिला दिनाचं औचित्य साधून काँग्रेसच्या महिला खासदाराने आज थेट ‘हार्ले डेव्हिडसन’ बाईकवर संसदेत एण्ट्री केली.

स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत खासदार रंजीत रंजन ‘हार्ले डेव्हिडसन’ बाईकवरुन संसदेत दाखल झाल्या. रंजीत रंजन बिहारच्या खासदार आहेत. त्यांचे पतीन पप्पू यादवही खासदार आहेत.

भारतीय राजकारणात महिला स्वत:ला कमकुवत समजतात. महिलांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी बाईकवरून आल्याचं रंजीत रंजन यांनी सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून बाईकवरूनच संसदेत येण्याचा विचार करत होते, मात्र आज महिला दिनाचं औचित्य मिळाल्याने बाईकवरून एण्ट्री केल्याचं रंजन म्हणाल्या.

1600 सीसी ‘हार्ले डेव्हिडसन’

रंजीत रंजन ज्या बाईकवरून संसदेत आल्या, ती बाईक तब्बल 1600 सीसीची म्हणजे चार बुलेटच्या बरोबरीची आहे. या अवजड बाईकचं वजन 300 किलोच्या आसपास आहे. तर रंजीत रंजन घेऊन आलेली ही बाईक तब्बल 11 लाख रुपयांची आहे. उत्तम बायकर्सचं अशाप्रकारच्या बाईक्स हाताळू शकतात.
===================================

हे चार संघ टी 20 ची सेमी फायनल गाठतील : सेहवाग

हे चार संघ टी 20 ची सेमी फायनल गाठतील : सेहवाग
मुंबई टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि धडाकेबाज सलामीवर वीरेंद्र सेहवागने टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघालाच पसंती दिली आहे. टीम इंडियाच वर्ल्डकपवर नाव कोरेल असा विश्वास वीरुला आहे.

मात्र सेमी फायनलपर्यंत कोणते चार संघ पोहोचतील याबाबतही सेहवागने अंदाज बांधला आहे.

सध्या टी 20 मध्ये रोमांच आणि उत्साह वाढला आहे. फलंदाजी आणखी आक्रमक झाली आहे. गोलंदाजही टिच्चून गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे ज्या संघातील खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करतील ते संघ अर्थातच पुढे जातील.

सेहवागने सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या ज्या चार संघांची नावं घेतली आहेत, त्यामध्ये पहिला क्रमांक निश्चितच भारताचा आहे. यंदा 99 टक्के भारतच वर्ल्डकप जिंकेल असं सेहवाग म्हणतो.

सेहवागच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर फॅब ड्युप्लेसीचा दक्षिण आफ्रिका संघ आहे. भारत आणि आफ्रिकेदरम्यान अंतिम लढत होईल, असा सेहवागचा अंदाज आहे.
===================================

धोनी नाहीच, विराट कोहली मॅच फिनिशर: गौतम गंभीर

धोनी नाहीच, विराट कोहली मॅच फिनिशर: गौतम गंभीर
मुंबई: महेंद्रसिंह धोनी म्हणेज मॅच फिनिशर अशी सध्या त्याची ओळख बनली आहे. मात्र, टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या गौतम गंभीरचं म्हणणं मात्र, वेगळंच आहे. त्याच्या मते, धोनी नव्हे तर कोहली हा उत्कृष्ट मॅच फिनिशर आहे.

गंभीर एका कार्यक्रमात म्हणाला की, “हा टॅग मीडियानं दिलेला आहे. माझ्यासाठी विराट फिनिशर आहे. एक सलामीचा फलंदाजही फिनिशर होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही सहावा आणि सातव्या क्रमांकावर येण्याची गरज नाही.”

‘आपण कोणत्या क्रमांकावर यावं हे धोनीनं स्पष्ट केलं पाहिजे. त्याला वर फलंदाजीसाठी यायचं आहे असं आम्ही ऐकलं आहे.’ असं गंभीर म्हणाला. दुसरीकडे त्यानं धोनीच्या कर्णधार पदावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

“टीमच कर्णधाराला चांगलं बनवते. फक्त कर्णधारपद चांगलं निभावल्याने वर्ल्डकप जिंकता येत नाही. कर्णधार फक्त रणनिती आखतो. बाकी 10 खेळाडंच्या जीवावरच सामना जिंकला जातो.”

“देशासाठी खेळणं हिच मोठी प्रेरणा आहे. कोणत्याही व्यक्तीपेक्षा देश कायमच मोठा आहे.” असंही गंभीर म्हणाला.
===================================

विजय मल्ल्यांचा पाय खोलात, बँकांची सुप्रीम कोर्टात धाव

विजय मल्ल्यांचा पाय खोलात, बँकांची सुप्रीम कोर्टात धाव
नवी दिल्ली: उद्योगपती विजय मल्ल्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रचंड कर्जाचा डोंगर असणाऱ्या मल्ल्यांविरोधात आता बँकांनी मोठी पावलं उचलली आहेत. भारतीय स्टेट बँकेंसह अन्य 17 बँकांनी मल्ल्याविरोंधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

मल्या विदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना परदेशात जाण्यास बंदी घालण्यात यावी अशी बँकांनी मागणी केली आहे. मल्ल्यांवर जवळजवळ 7000 कोटींचं कर्ज आहे.

याआधी विजय मल्ल्यांना डेब्ट रिकव्हरी ट्रिब्यूनल (डीआरटी)नं मोठा झटका दिला होता. डीआरटीनं त्यांना मिळणाऱ्या 515 कोटींची खाती फ्रीज करण्यात आली आहेत. त्यामुळे डीआरटीच्या पुढील आदेशापर्यंत मल्ल्या या खात्यांमधून पैसे काढू शकत नाही. एसबीआयच्या याचिकेवर डीआरटीनं हा निर्णय सुनावला आहे. डीआरटीची पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे. त्या रकमेवर सगळ्यात आधी आमचा अधिकार आहे असं एसबीआयनं याचिकेदरम्यान सांगितलं होतं. कारण की, माल्यांनी बँकेचं कर्ज फेडलेलं नाही.
===================================

दिल्लीत अल्पवयीन मुलीला बलात्कार करुन जाळले 


  • नवी दिल्ली, दि. ८ - १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला जाळल्याची धक्कादायक घटना नोएडामध्ये घडली आहे. पिडीत मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक असून तिला सफरजंग रुग्णालयामधील आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. 
    सोमवारी पहाटे २.३० वाजता मुलीच्या पालकांनी घराच्या गच्चीवरुन मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी गच्चीवर धाव घेतली असता त्यांनी मुलीला जळलेल्या अवस्थेत पाहिलं. पिडीत मुलगी ९५ टक्के भाजली आहे. मुलीचा नेहमी पाठलाग करणा-या एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 
    साक्षीदारांनी सांगितल्याप्रमाणे एका तरुणाने जबरदस्ती घरात प्रवेश केला. बलात्कार केल्यानंतर त्याने मुलीला पेटवून दिलं. आम्ही वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहोत मात्र मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पिडीत मुलगी दहावीत शिकत होती. मात्र एक तरुण तिचा रोज पाठलाग करत असल्याने गेल्यावर्षी तिचं शाळेतून नाव काढून टाकण्यात आलं होतं. मुलीची शाळा बंद नाही केली तोपर्यंत तरुण रोज त्रास देत होता असं पिडीत मुलीच्या पालकांनी सांगितलं आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून मोठ्या प्रमाणात भाजल्याने तिच्यावर उपचार करणं कठीण जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 
===================================

पणजी महापालिका भाजपाच्या हातातून निसटली


  • पणजी, दि. ८ - पणजी महापालिकेची सत्ता भाजपाच्या हातातून निसटली आहे. देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी पणजी महापालिका निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची होती कारण हा सगळा भाग पणजी विधानसभा मतदार संघात येतो. आणि या मतदार संघातून सलग 5 वेळा पर्रिकर निवडून आले होते. मात्र राजधानी पणजीची महापालिका भाजपाच्या हातातून निसटली आणि महापालिकेवर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गटाने 17 जागा मिळवून निर्विवाद यशाचा झेंडा फडकावला. 
    भाजपाला केवळ 13 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण मोन्सेरात हे अलिकडेच काँग्रेसमधून हकालपट्टी केले गेलेले आमदार आहेत. त्यांनी या महापालिका निवडणूकीत काँग्रेस आणि भाजपाचा पराभव केला आहे. एक़ूण 30 प्रभागातून 14 महिला विजयी ठरल्या आहेत. 
===================================

कतरिना नव्या घराच्या शोधात


  • मुंबई, दि. ८  - रणबीर कपूरशी ब्रेक अप झाल्यानंतर कतरिनाला 'त्या' नात्यातील सर्व प्रेमळ आठवणींपासून दूर जायचे आहे. ब्रेक अप झाल्यानंतर रणबीरने थेट आपल्या आई-वडिलांचा 'क्रिष्णा राज' बंगला गाठला. कतरिना अजूनही रणबीर सोबत ज्या घरात रहात होती त्याच फ्लॅटमध्ये रहात आहे. 
    मात्र तिने आता नव्या घराचा शोध सुरु केला आहे. रणबीर आणि कतरिना कैफ प्रेमात असताना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. रणबीर आई-वडिलांच्या घरी न रहाता कतरिनासोबत रहात होता. बॉलिवुडलाईफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार कतरिना सध्या बांद्रयामध्ये घर शोधत आहे. ती लवकरात लवकर नव्या घरात प्रवेश करणार आहे. 
    व्यावसायिक दृष्टयाही कतरिनाचा सध्या वाईट काळ सुरु आहे. मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेला 'फितूर' बॉक्सऑफीसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. नव्या घरात गेल्यानंतर 'अच्छे दिन' येतील अशी तिची अपेक्षा असावी. बांद्रयामध्ये रहायला गेल्यानंतर कतरिनाला सलमानचा शेजारही लाभेल.
===================================

कांदिवलीत सिग्नल बिघाड, पश्चिम रेल्वे विस्कळीत


  • मुंबई, दि. ८ - कांदिवली येथे सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर दोन्ही दिशांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर गाडया वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहेत. युद्धपातळीवर सिग्नलमधील बिघाड दूर करुन वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सिग्नलमधील बिघाडामुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांचा खोळंबा होत आहे. संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्वपदावर आली नाही तर, कामावरुन घरी परतणा-या प्रवाशांचे हाल होऊ शकतात.
===================================

सिंडिकेट बँकेच्या 1 हजार करोड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. ८ - सिंडिकेट बँकेच्या कथित 1 हजार करोड घोटाळ्याची  केंद्रीय गुप्तचर विभागा (सीबीआय) चौकशी करत आहे. सीबीआयने याप्रकरणी आज जयपूर, उदयपूर आणि दिल्लीतील 10 ठिकाणांवर छापेमारीदेखील केली. खोटी बिल आणि खोट्या जीवन बिमा योजना दाखवत हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 
    सीबीआयने केलेल्या छापेमारीमध्ये बँकेच्या शाखा आणि कर्मचा-यांच्या निवासस्थानांचादेखील समावेश आहे. सीबीआयचे प्रवक्ते देवप्रीत सिंग यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. सिंडिकेट बँकेकडून मात्र अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. 
    याअगोदरही सिंडिकेट बँक वादात राहिली आहे. दीड वर्षापुर्वी बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) एस कै जैन यांना 50 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. एस कै जैन यांनी काही कंपन्यांना कर्जाची रक्कम वाढवून देण्यासाठी लाच मागितली होती. लाच घेत असतानाच सीबीआयने त्यांना अटक केली होती.
===================================

माझ्यामुळे ईपीएफवरील कर लावण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला - राहुल गांधी

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. ८ - मी केलेल्या प्रयत्नांमुळेच सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील (ईपीएफ) कर लावण्याचा प्रस्ताव मागे घेतल्यांचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सरकार हा प्रस्ताव मागे घेत असल्यांची माहिती दिली आहे.
    सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मध्यमवर्गीय कुटुंब दुखावली गेली होती. त्यामुळे मी सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय घेतला आणि मी घातलेल्या दबावाचा परिणाम झाला असं राहुल गांधी बोलले आहेत. राहुल गांधी यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (ईपीएफ) रक्कम काढल्यावर कर लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं होतं.
===================================

डान्सबार बंदीचा कायदा करा, सहकार्य करू, विरोधकांचं आवाहन

डान्सबार बंदीचा कायदा करा, सहकार्य करू, विरोधकांचं आवाहन
मुंबई: सरकारनं डान्सबार बाबत पुन्हा नव्यानं कायदा सभागृहात आणावा. आम्ही दोन्ही सभागृहात सहकार्य करु, असं आवाहन काँग्रेस- राष्ट्रवादीने फडणवीस सरकारला केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

काँग्रेसकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, तर राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भूमिका मांडली. दोन्हीही नेत्यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं. 
डान्सबारबाबत सरकारवर शंका 
सामान्य माणसांच्या मनातील डान्स बार बंदीबाबतचा संभ्रम दूर करायचा असेल तर 15 तारखेच्या आत नवा कायदा आणा, आम्ही त्याला पांठिबा देऊ, असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं.  पण नवं सरकार आल्यापासून बार मालकांसोबत काहीतरी अलबेल असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. कोर्टाचा आधार घेत ही बंदी उठवली जातेय. सरकारने नवा कायदा आणून ही शंका दूर करावी, असंही आवाहन त्यांनी केलं.
===================================
 महिलांनी नव्‍या युगाची आव्‍हाने स्विकारुन आत्‍मनिर्भर बनावे - जि. प. सदस्‍या वर्षाताई भोसीकर

[विठ्ठल कत्रे, स्थानिक पत्रकार]


नांदेड, 8 मार्च- महिलांनी नव्‍या युगाची आव्‍हाने स्विकारुन आत्‍मनिर्भर बनावे असे आवाहन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्‍त कंधार येथील प्रियदर्शिनी माध्‍यमिक कन्‍या शाळेत आयोजित कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या.
     यावेळी मुख्‍याध्‍यापिका राजश्री शिंदे, सरपंच सुवर्णा नाईकवाडे, सौ.देशपांडे, सौ.पाटील, सौ.चव्‍हाण, सौ.कुरुडे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना भोसीकर म्‍हणाल्‍या, प्रत्‍येक क्षेत्रात महिलांना 35 टक्‍के आरक्षण असून याचा फायदा महिलांनी घेणे आवश्‍यक आहे. आज प्रत्‍येक क्षेत्रात स्‍पर्धा निर्माण झाली असून या स्‍पर्धेत महिलांनी सहभागी होऊन नव्‍या युगाचे आवाहन स्विकारावे असे आवाहन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले.
      प्रारंभी क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले व मॉ जिजाऊ यांच्‍या प्रतिमांचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्‍यात आली. त्‍यानंतर महिला दिनानिमित्‍त उत्‍कृष्‍ट काम करणा-या शिक्षीकांचा सत्‍कार जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आला.
      या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार सौ.बडवणे यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थीनी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.  
===================================
नांदेड; राष्ट्रमाताच्या विद्यार्थ्यांची डिस्कव्हरी सायन्स सेंटरला भेट

नांदेड - येथील तरोडा खु. भागातील राष्ट्रमाता विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी केरवाडी येथील डिस्कव्हरी सायन्स सेंटरला भेट देऊन विद्युत निर्मिती संबंधी माहिती जाणून घेतली.
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या केरवाडी येथील डिस्कव्हरी सायन्स सेंटर येथे राष्ट्रमाता विद्यामंदिर शाळेची सहल आयोजित केली होती. यावेळी हवेपासून विजनिर्मीती, सौर ऊर्जेपासून विजनिर्मिती कशा प्रकारे होते. तसेच हवेचे अस्तित्त्व, प्रकाशाच्या परावर्तनामुळे विविध प्रतिमांची निर्मिती, पिल होल कॅमेरा, केंद्रीय बल, विद्युत गति, सूर्यभ्रमण, चंद्र भ्रमण, तारांगण आदी विविध बाबींवर येथील संशोधक विष्णू जाधव, डॉ. अभिजीत यांनी माहिती दिली. या सहलीत संस्थेतील ६१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या सहलीत त्यांच्यासोबत मुख्याध्यापक दिगंबर जाधव, गजानन जाधव, सौ. एस.बी.गिरी, सौ. सुनंदा जाधव, सी.डी. क्षीरसागर आदी शिक्षकांचा समावेश होता.
===================================
खुनाच्या धमकीनंतर कन्हैयाला सुरक्षा

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याला खूनाच्या धमक्‍या आल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा पुरविण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली आहे.

आज राज्यसभेत नक्वी यांनी कन्हैयाच्या तथाकथित वादग्रस्त भाषणाच्या व्हिडिओमध्ये फेरफार करणाऱ्या माध्यम समूहांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच कन्हैयाला धमक्‍या देणाऱ्यांवर केंद्र सरकार कारवाई करणार असल्याचे सांगत भारतीय जनता पक्ष या धमक्‍यांचा निषेध करत असल्याचेही सांगितले. कन्हैयाचा खून करणाऱ्याला 11 लाखाचे बक्षीस देण्यात येईल असे पोस्टर लावणाऱ्या "पूर्वांचल सेना‘ संघटनेचा अध्यक्ष आदर्श शर्मा याला दिल्ली पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. ‘जो कोणी जेएनयूच्या विद्यार्थ्याला उडवेल त्याला पूर्वांचल सेनेच्यावतीने 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल‘, असे पोस्टर लावण्यात आले होते. याशिवाय भारतीय जनता युवा मोर्चाचे बदायूँ जिल्हाध्यक्ष कुलदीप वाष्णेय यांनी कन्हैयाची जीभ कापणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देऊ, असे म्हटले होते. त्यावर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

===================================
सरकारच्या निर्णयामुळे करदात्यांना न्याय- कॉंग्रेस
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) व्याजावर कर आकारण्याचा निर्णय मागे घेतल्याने करदात्यांना संपूर्णपणे न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसने व्यक्त केली आहे.

संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना कॉंग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, "भविष्य निर्वाह निधीमधील रक्कम लोक घर बांधण्यासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी वापरतात. त्यामुळे सरकारने त्यावर कर आकारणे योग्य नाही. सरकारच्या या निर्णयामुळे करदात्यांना संपूर्णपणे न्याय मिळाला आहे.‘

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ईपीएफच्या व्याजावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे देशातील लाखो नोकरदारांना दिलासा मिळाला आहे. संसदेत 29 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात ईपीएफ रकमेसंदर्भात केलेल्या घोषणेमुळे नोकरदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

===================================
बोलायचे म्हटले तरी देशद्रोहाची भीती- आढाव
पुणे - ‘चौकशीच्या नावाखाली मुस्लिम तरुणांना पोलिस कधीही उचलून नेत आहेत. त्यामुळे मुस्लिम तरुणांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांना ओलिस ठेवलेय की काय, असे वाटते. साधे बोलायचे म्हटले तरी आपल्याला देशद्रोही ठरवतील, अशी सध्याची स्थिती आहे‘, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ व मुस्लिम सत्यशोधक महिला मंचच्या वतीने मुस्लिम महिलांच्या अधिकारासंदर्भात पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. आढावा बोलत होते. ते म्हणाले, ‘सर्व समाजातील स्त्रीयांप्रमाणेच मुस्लिम स्त्रियाही स्वतःच्या हक्कासाठी पुढे येऊन आपल्यावरील अन्याय-अत्याचाराविरुद्ध महिला दिनी आवाज उठविला जात आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे.‘ यावेळी प्रा.शमसुद्दीन तांबोळी, मंचच्या प्रमुख तमन्न शेख-इनामदार, डॉ.बेनझीर तांबोळी, जरीना मेहबूब तांबोळी आदी उपस्थित होते. 

तोंडी तलाक, बहुपत्नीत्व या प्रथा बंद करण्यासाठी कायदा करावा, जिल्हा पातळीवर कौटुंबिक न्यायालये, समान नागरी कायद्यासाठी समिती नेमावी, मुस्लिम महिलांसह सर्वच महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी कायदा करावा, सच्चर समिती, न्या. रंगनाथ मिश्रा आयोग, डॉ. महेमूद उर रेहमान अभ्यासगटाच्या शिफारसी अंमलात आणण्यासाठी धोरण आखावे, या मागण्याचे निवेदन राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.
===================================
केरळ; संघ कार्यकर्त्यांचा पोलिस स्थानकावर हल्ला
कोल्लम (केरळ) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी कोल्लम येथील पोलिस स्थानकावर हल्ला केला असून त्यामध्ये पोलिस निरीक्षकासह सहा पोलिस जखमी झाले आहेत. 

रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन कार्यकर्ते जात होते. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी एका कार्यकर्त्याने पोलिसांशी वाद घातले. त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिस स्थानकात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मध्यरात्री एक वाजता संघाचे कार्यकर्ते पोलिस स्थानकाच्या बाहेर जमा झाले. त्यांनी पोलिस स्थानकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच पोलिस अधिकाऱ्यांचे तीन वाहनांचेही नुकसान केले. या प्रकरणी तपास सुरु असून संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
===================================
गुंतवणूकदारांनी गमावली 14 लाख कोटींची संपत्ती
मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात तब्बल 14 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स उच्चांकी पातळीपासून 18 टक्क्यांनी खाली आला आहे. 4 मार्च 2015 रोजी सेंसेक्स 30,024.74 या उच्चांकी पातळीवर पोचला होता. मात्र गेल्या वर्षभरात सेंसेक्समध्ये 5,378.26 अंशांची घसरण झाली आहे.

सेंसेक्सने 29 फेब्रुवारी रोजी 22,494.61 ही वर्षभरातील नीचांकी पातळी गाठली होती. त्यामुळे बाजारातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या बाजार भांडवलात देखील मोठी घट झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना 13.82 लाख कोटी रुपयांचा फटका बसला. यासह मुंबई शेअर बाजारातील सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 91.56 लाख कोटींवर पोचले आहे.

ब्लूचिप कंपन्यांमध्ये भेलचा शेअर गेल्या वर्षभरात 60 टक्के तर टाटा मोटर्स 40 टक्के आणि एसबीआयचा शेअर 36 टक्क्यांनी कोसळला आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीतील घट व जागतिक मंदीच्या भीतीने परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी(एफपीआय) भारतीय भांडवली बाजारातून फेब्रुवारी महिन्यात 11,350 कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर काढून घेतली आहे. नवे वर्ष सुरु झाल्यापासून आतापर्यंत भांडवली बाजारातून 20,177 कोटी रुपयांची रक्कम बाहेर पडली आहे. शिवाय, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची बुडीत कर्जाची समस्या व वित्तीय तूटीचे कमी करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांविषयी अस्पष्टता निर्माण झाल्यामुळे ही गुंतवणूक कमी झाली आहे.

===================================
नलिनीला एक दिवसासाठी पॅरोल मंजूर
चेन्नई- माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी हिला एक दिवसासाठी पॅरोल मद्रास उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) मंजूर केला आहे. 

नलिनीच्या वडिलांचे गेल्या महिन्यात निधन झाले आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी 12 तासांसाठी पॅरोलवर सोडण्यात आले होते. तिच्या संरक्षणासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नलिनीच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तिच्या घराबाहेर शेकडो कार्यकर्त्यांप्रमाणेच राजकीय नेत्यांनीही गर्दी केली होती. या वेळी नलिनीने काही राजकीय नेत्यांचीही भेट घेतली. परंतु, धार्मिक कार्यासाठी तिने पुन्हा तीन दिवसांची सुटी मागितली होती. न्यायालयाने बुधवारी (ता. 9) एक दिवसासाठी (24 तास) पॅरोल दिला आहे. 

दरम्यान, राजीव गांधी हत्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर सत्र न्यायालयाने 28 जानेवारी 1998 मध्ये नलिनीस मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती, त्यानंतर 2000 मध्ये या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेमध्ये करण्यात आले.
===================================
महिला पत्रकाराचा नग्न व्हिडिओ बनविणाऱयास दंड 
वॉशिंग्टन- एका महिला पत्रकाराचा नग्न व्हिडिओ बनविणाऱ्या हॉटेल मालकाला 350 कोटी रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. 

फॉक्‍स वाहिनीची क्रीडा पत्रकार एरन ऍण्ड्रूचा पाच मिनिटाचा नग्न व्हिडिओ 2008 मध्ये व्हायरल झाला होता. एरनने याबद्दल हॉटेल मालकाला जबाबदार धरले होते. एरनने न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. दोन आठवडे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने सोमवारी (ता. 7) हॉटेल मालकाला दंडाची शिक्षा सुनावली. 

सुनावणीदरम्यान एरनने सांगितले की, ईएसपीएनमध्ये काम करत असताना एका हॉटेलमध्ये उतरले होते. यावेळी हॉटेल मालक मायकल बैरेट याने नग्न व्हिडिओ तयार केला होता. शिवाय, तो सोशल नेटवर्किंगवर शेअर केला होता. अशा प्रकारची घटना घडल्यापासून कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रथम छुप्या पद्धतीने कॅमेरे लपविले नसल्याची खात्री करते.
===================================
===================================

No comments: