दिनविशेष:- Promise Day
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- उत्तर कोरियाच्या हुकुमशाहने लष्करप्रमुखाला फासावर लटकवलं
२- 'हिंदू राष्ट्रवादा'ला ब्रिटीश वृत्तपत्राचं आव्हान, 'मुंबई'ऐवजी 'बॉम्बे' लिहिणार
३- फेसबूक संचालकाच्या भारतविरोधी टिप्पणीमुळे झुकेरबर्ग नाराज
४- चीनच्या वैज्ञानिकांनी तयार केला सूर्याहून तिप्पट तेजस्वी कृत्रिम तारा
५- जर्मनीत दोन रेल्वेंची टक्कर; नऊ ठार
६- इस्लामाबाद; पाकच्या हिंदूंना मिळणार विवाह कायदा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- इशरत सुसाईड बॉम्बर होती, हेडलीची कबुली
८- इशरत जहाँबद्दल मला अभ्यास करावा लागेल: जितेंद्र आव्हाड
९- ...तर मेक इन इंडिया फेल ठरेल - आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन
१०- जशोदाबेन यांनी मोदींच्या पासपोर्टसंबंधी कागदपत्रांची मागितली माहिती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- किरीट सोमय्यांची भुजबळांविरुद्ध आणखी एक तक्रार
१२- गोरगरिबांच्या आड येणार्यांना आडवा केल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे
१३- दुसऱ्या पत्नीला निवृत्तिवेतनावर दावा करता येणार नाही - हायकोर्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 ठार, 28 जखमी
१५- सातारा; पोलीस भरतीसाठी व्यायाम करताना अपघात, 2 युवकांचा मृत्यू
१६- चेन्नई; भरधाव कारनं 5 जणांना उडवलं, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
१७- तामिळनाडूतील बस चालकाचा मृत्यू उल्कापातामुळं नाही - नासा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- टी-20 वर्ल्डकपसाठी धोनीचं नवं 'हत्यार' तयार
१९- 11 गुणांनी पिछाडीवर असतानाही यू-मुम्बाचा थरारक विजय
२०- २०१८ मध्ये ‘टायटॅनिक-२’ चे जलावतरण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२१- मार्कंडेय जयंतीनिमित्त आज शहरात शोभायात्रा
२२- भीषण पाणीटंचाई; जिल्ह्यात २३२ टँकर; प्रशासनाची दमछाक
२३- देगलूर; दोन गटात हाणामारी, चौदा जखमी, परस्परविरोधी गुन्हे दाखल
२४- जिल्हा परिषदेतील साठ सीसीटीव्ही कॅमेरे बंद
२५- किनवट; गोकुंदा गोकुंदा पंपाच्या पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
२६- गरोदर महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू, उपचार अर्ध्यावर सोडून परतणे बेतले जीवावर
२७- सायं. पाच वाजता नांदेडच्या आकाशवाणी केंद्रावर नरेंद्र महोत्सावाबाबत चर्चा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
बालाजी पवळे, संजय हापगुंडे, आकाश गोडबोले, भगवान पाटील, रवी चंद्रे, आदित्य साळगट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.
(आशिष बारे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
================================================
इशरत सुसाईड बॉम्बर होती, हेडलीची पुन्हा कबुली
मुंबई : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीने गौप्यस्पोटांची मालिका कायम ठेवली आहे. इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाची हस्तक होती, याचा पुनरुच्चार हेडलीने आजच्या साक्षीदरम्यान केली. यापूर्वी हेडलीने तपास यंत्रणांसमोर याबाबतची कबुली दिली होती. मात्र आता कोर्टातही त्याने पुनरुच्चार केल्याने, ही साक्ष महत्त्वाची मानली जात आहे.
इशरत जहाँ ही ठाण्याजवळच्या मुंब्रा परिसरातील रहिवाशी होती.पोलिसांसोबतच्या चकमकीत तिचा मृत्यू झाला होता. त्यावरून देशभरात मोठं वादळ उठलं होतं.
मात्र आजच्या साक्षीदरम्यान इशरत जहाँ ही महिला विंगची सुसाईड बॉम्बर होती, अशी कबुली दिली आहे.
काय म्हणाला हेडली?
ऑपरेशन बूस्टमध्ये इशरत जहाँसोबत लष्कर ए तोयबामधल्या आणखी एका पुरुष सदस्याचा सहभाग होता. त्यांचा पोलिसांवर हल्ला करण्याचा कट होता. पण तो कट त्यावेळेस फसला. अक्षरधाम हे इशरत जहाँचं टार्गेट होतं, असं हेडली म्हणाला.
================================================
इशरत जहाँबद्दल मला अभ्यास करावा लागेल: जितेंद्र आव्हाड
मुंबई: इशरत जहाँ ही लष्कर-ए-तय्यबाची सदस्य आणि एक सुसाइड बॉम्बर होती. अशी धक्कादायक माहिती मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीने दिल्यानंतर मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता याप्रकरणी सावध पवित्रा घेतला आहे. डेव्हिड हेडलीनं इशरत जहाँ ही एक सुसाईड बॉम्बर होती. अशी कबुली दिल्यानंतर आजही आपण इशरतला निर्दोष मानता का? याबाबत बोलताना आव्हाड यांनी सावध पवित्रा घेत म्हणाले की, ‘हेडली नेमकं काय म्हणाला हे मला अद्याप माहित नाही. त्याबाबत मला आधी जाणुन घ्यावं लागेल. पण इशरत जहाँ विषयी मला अभ्यास करावा लागेल.’हेडलीच्या कबुलीवरही आव्हाड यांनी संशय व्यक्त केला आहे. ‘जेव्हा इशरत जहाँ चकमकीत मारली गेली त्यावेळी हेडली ड्रग्स तस्कर होता. तोवर त्याचा लष्करशी संबंध नव्हता. म्हणूनच त्यांनं इशरतबद्दल दिलेली माहिती कितपत खरी आहे हे पाहावं लागेल. तसंच तो त्यावेळी अमेरिकेसाठीही हेरगिरी करीत होता. त्यामुळे हेडलीचा वादग्रस्त इतिहास पाहता या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवायचा हे ठरवावं लागेल.’ असंही आव्हाड म्हणाले.
मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 ठार, 28 जखमी
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर आज भीषण अपघातात चौघांचा मृत्यू आणि 28 जण जखमी झाले आहेत. कणकवली बेलणे इथे खाजगी बस आणि मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनरची धडक होऊन, हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना स्थानिकांनी रुग्णालयात हलवलं. सध्या त्यांच्यावर कणकवली, ओरोस आणि गोव्यात उपचार सुरु आहेत. खासगी बस गोव्याकडून लोणावळ्याच्या दिशेने जात होती, तर मासे वाहतूक करणारा कंटेनर रत्नागिरीकडून कर्नाटकच्या दिशेने जात होता. त्यावेळी बेलणे इथं दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहानांचा दर्शनी बाजूचा भागाचा चक्काचूर झाला आहे.
पोलीस भरतीसाठी व्यायाम करताना अपघात, 2 युवकांचा मृत्यू
सातारा: सातारा-लोणंद रोडवर वाठारजवळ कंटेनरनं चार जणांना उडवलं आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
जॉगिंगला करणाऱ्या ४ जणांना या कंटेनरनं धडक दिली असल्यानं यात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. पोलिस भरतीसाठी व्यायाम करीत असतानाच हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेनं धावताना अचानक आलेल्या कंटेनरनं या चार जणांना उडवलं.
दोघा जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघातामुळं दोन युवकांना हकनाक आपला जीव गमवावा लागल्यानं संतप्त झालेल्या जमावनं गाडीवर दगडफेकही केली.================================================
उत्तर कोरियाच्या हुकुमशाहने लष्करप्रमुखाला फासावर लटकवलं
प्योगाँग : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने देशाचे लष्करप्रमुख री योंग गिल यांना फाशी दिली आहे. दक्षिण कोरियाच्या योनहॅप न्यूज एजन्सीने आज या वृत्ताचा खुलासा केला आहे. मागील काही काळात अनेकांना फाशी दिल्याचं कळतं.
भ्रष्टाचाराच्या आरोपात फाशी
री योंग गिल यांना फाशी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. योनहॅन आणि दक्षिण आफ्रिकेच्या इतर मीडियाच्या वृत्तानुसार, कोरियन पीपल्स आर्मी जनरल स्टाफचे प्रमुख री योंग गिल यांना भ्रष्टाचार आणि कट रचल्याच्या आरोपात याच महिन्यात फाशी देण्यात आली.
हायप्रोफाईल फाशींची घोषणा
उच्च पदावरील अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची घोषणा उत्तर कोरिया फार कमी वेळा करतो. किम जोंग उनचे नातेवाईक आणि देशाचे दुसरे शक्तिशाली व्यक्ती जांग सोंग थेक यांना 2013 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपात फाशी दिली होती. या हायप्रोफाईल फाशीची औपचारिक घोषणा केली होती.
चेन्नई; भरधाव कारनं 5 जणांना उडवलं, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
चेन्नई: चेन्नईत एका भरधाव कारनं पाच जणांना उडवलं. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.
ही कार एका बँकेचा मॅनेजर चालवत होता. व्यंकटेश (35) असं या कार चालकाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या नागरिकांना उडवल्यानंतर या कारनं मुख्य रस्त्यावरच्या नागरिकांनाही उडवलं.
गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं आपल्याकडून हा अपघात झाल्यानं कार चालक व्यंकटेश यानं पोलिसांना सांगितलं. या अपघातात प्यारी लाल (62) आणि अब्दुल रहिम (44) यांचा मृत्यू झाला. तर ब्रिंदवेशवरन (55), वासुदेवन (62) हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत.
तर, एका सीनियर पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, व्यंकटेश हा नुकताच कार चालवणं शिकला होता. त्यामुळं अॅक्सिलेटर आणि ब्रेक या दोन्हीमध्ये तो गडबडला. यामुळेच त्यानं ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटरवर पाय दिला. या सगळ्या प्रकारामुळेच हा अपघात घडून आला.
टी 20 वर्ल्डकपसाठी धोनीचं नवं 'हत्यार' तयार
मुंबई : कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर पहिलाच टी ट्वेण्टी विश्वचषक जिंकण्याचा मान टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मिळवला होता. आता पुन्हा एकदा टी ट्वेण्टी विश्वचषक स्पर्धा तोंडावर आली आहे. या स्पर्धेसाठी धोनीने कंबर कसली आहे. यंदाही वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीला आपलं खास ‘हत्यार’ मदत करू शकतं.
गगनचुंबी फटके खेळण्यात पटाईत असलेल्या धोनीचं नवं ‘हत्यार’ म्हणजे त्याची बॅट. धोनीचं हे खास बॅट ऑस्ट्रेलियावरून आलं आहे.
11 गुणांनी पिछाडीवर असतानाही यू-मुम्बाचा थरारक विजय
कोलकाता: शेवटच्या मिनिटापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात, यू-मुम्बाने बंगळुरु बुल्सवर सनसनाटी मात केली.
यू मुम्बानं बंगळुरु बुल्सवर 29-28 असा एक गुणानं विजय मिळवून प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली.
किरीट सोमय्यांची भुजबळांविरुद्ध आणखी एक तक्रार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ईडीकडे तक्रार केली आहे.
वीज कंपनी नसतानाही भुजबळांनी इंडोनेशियात कोळसा खाण खरेदी करण्यासाठी पैसे पाठवले, तसेच खाण खरेदी तर केलीच नाही, मात्र पैसेही परत आले नाहीत. त्यामुळे भुजबळ परिवारावर फेमा कायद्याअंतर्गत कारवाई करा, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली.
अमेरिकेवरुन आल्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आणि कुटुंबीयांवरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसंच मी वीज कंपनीसाठी इंडोनेशियात कोळसा खाण खरेदी करणार होतो, असं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्याचा आधार घेत किरीट सोमय्यांनी भुजबळांवर कारवाईची मागणी केली आहे.
गोरगरिबांच्या आड येणार्यांना आडवा केल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे
शिवसेना-भाजप सरकार भक्कम असून कोणीही सरकार पाडण्याची वाट पाहू नये असं वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसंच गोरगरिबांच्या आड कुणी आलं तर त्याला आडवं करू असा इशाराही त्यांनी दिला. ते पालघर विधानसभेचे युतीचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत होते. शिवसेनेची गोर गरीब जनतेशी बांधिलकी असून त्यांच्या न्यायाच्या आड कोणी आलं तर त्याला आडवा केल्या शिवाय राहणार नाही असं या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले. आमचं युती सरकार पडावं म्हणजे आम्हाला परत सत्तेत बसता येईल अस विरोधकांना वाटते. युतीच सरकार हे मजबूत असून लांब गेल्यावर एकमेकांचं महत्त्व कळतं असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. तर अनेक वर्षांपासून मच्छीमार समाजाच्या लोकांना घर आहेत. त्या जागांचे सात बारे मिळत नाही ते लवकरात लवकर सरकार ला द्यायला भाग पाडू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी मच्छीमारांना दिलं. वाढवण बंदराला सेनेचा विरोध कायम असून लोकांच्या मतांचा आदर करून सरकारने निर्णय घ्यावा असंही उद्धव ठाकरे यावेळी बोलले.
================================================दुसऱ्या पत्नीला निवृत्तिवेतनावर दावा करता येणार नाही - हायकोर्ट
मुंबई : दुसऱ्या पत्नीला कायदेशीर पत्नीचा दर्जा दिला जाणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे पतीच्या मृत्यूपश्चात ती कुटुंब निवृत्तिवेतनावर दावा करू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
भारतीय विवाह संस्थेने एकपत्नी प्रथा स्वीकारली आहे. पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरा विवाह करणे, बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या पत्नीला कायदेशीर विवाह केलेल्या पत्नीचा दर्जा देणे अशक्य असल्याचे न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठाने मंगळवारी म्हटले. कायदेशीररीत्या केलेला विवाह अस्तित्वात असताना दुसरी पत्नी पतीच्या पश्चात त्याची विधवा म्हणून कुटुंब निवृत्तिवेतनावर दावा करू शकत नाही, असेही न्या. भाटकर यांनी स्पष्ट केले.
सरकारी कर्मचारी असलेल्या जयदेव पवार यांच्या मृत्यूनंतर त्याच्या निवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा, यासाठी जयदेव यांची पत्नी द्रौपदा यांनी वारसा प्रमाणपत्र मिळवण्याकरिता कनिष्ठ न्यायालयात अर्ज केला. हा अर्ज प्रलंबित असताना जयदेव यांच्या दुसऱ्या पत्नी इंदुबाई यांनीही त्या जयदेव यांची पत्नी असल्याचा दावा केला. मात्र सबळ पुरावे दाखल केले नसल्याचे म्हणत कनिष्ठ कोर्टाने द्रौपदा यांना वारसा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
न्या. भाटकर यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय अयोग्य ठरवत द्रौपदा याच जयदेव यांच्या पहिल्या पत्नी असून कायदेशीररीत्या विवाह केल्याने द्रौपदा निवृत्ती वेतनावर अधिकार सांगू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.
================================================
फेसबूक संचालकाच्या भारतविरोधी टिप्पणीमुळे झुकेरबर्ग नाराज
भारतातील टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीने (ट्राय) नेट न्यूट्रॅलिटीच्या बाजूने कौल दिल्याने फेसबूकला मोटा झटका बसला आहे. फ्री बेसिक्सची महत्त्वाकांक्षी योजना अडकल्याचे शल्य डाचत असल्याने फेसबूक कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्य मार्क अँडरसनने भारताबद्दल अतिशय अपमानास्पद टिप्पणी करत आपला राग व्यक्त केला आहे. ' हा निर्णय वसाहतवादी धोरणांच्या विरोधात असून भारत जर ब्रिटीशांच्या सत्तेखाली असता तर त्याचे कल्याण झाले असते' असे अपमानास्पद ट्विट केले. मात्र फेसबूकचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्गने मार्क अँडरसनच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी दर्शवत आपण त्याच्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र अँडरसनच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची तीव्र भावना आहे.
सिलिकॉन व्हलीतील अतिशय मोठे प्रस्थ असलेले मार्क अंडरसन हे फेसबुकच्या संचालक मंडळात असून फ्री बेसिक्स भारतात लागू करता आले नाही याचा राग त्यांच्या मनात आहे. ' इंटरनेट टेरिफबाबत भारताचा निर्णय योग्य नाही. हा देश ब्रिटिश अमलाखाली असता तर त्याची स्थिती अधिक चांगली असती. वसाहतवादाला विरोध केल्याने कित्येक दशकांपासून भारताचे आर्थिक नुकसान झाले आहे. मग आता हा विरोध कशासाठी?' असे ट्विट त्यांनी केले. मात्र सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच त्यांनी तातडीने हे ट्विट काढून टाकले.
मार्क झुकेरबर्गने मात्र या सर्व टिप्पण्यांबाबत असहमती दर्शवत आपली नाराजी स्पष्ट केली. ' मार्क अँडरसनची ही कॉमेंट अतिशय दु:खदायक असून मी वा फेसबूक (कंपनी) अशा प्रकारे कोणताही विचार करत नाही' असे त्याने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले. ' फेसबूक लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी व त्यांचे भविष्य घडवण्यासाठी मदत करतं' असंही त्याने म्हटले आहे.
================================================...तर मेक इन इंडिया फेल ठरेल
मुंबई : सरकारने २ लाख किंवा त्याहून अधिक सोने खरेदीवर लादलेली पॅन कार्ड सक्ती मागे घेतली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेला ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प यशस्वी होणार नाही, असा इशारा आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने दिला आहे. पॅन कार्ड सक्तीविरोधात फेडरेशनने बुधवारी एक दिवसाचा संप पुकारला होता. त्याला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
संपाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फेडरेशनने पुन्हा एकदा सरकारकडे चर्चेची मागणी केली. फेडरेशनचे संचालक अशोक मिनावाला म्हणाले की, केवळ २ लाख रुपयांसाठी पॅन कार्ड सक्ती करणाऱ्या सरकारने खरेदी मर्यादा वाढवून १० लाख रुपये करावी; टप्प्याटप्प्याने पॅन कार्डधारकांचे प्रमाण वाढवल्यानंतर खरेदी मर्यादेत कपात करावी. केवळ २२ कोटी ३० लाख लोकांजवळ पॅन कार्ड आहे. अशा परिस्थितीत केवळ २ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सोने खरेदीवर पॅन कार्ड सक्ती लादल्यास सराफा उद्योग उद्ध्वस्त होईल. पॅन कार्ड सक्तीचा फटका देशातील ३ लाख सराफांसोबतच १ कोटी कारागिरांना बसण्याचा दावा फेडरेशनने केला आहे. सराफा उद्योगातील ७० टक्के ग्राहक हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे पॅन कार्ड सक्ती केल्यामुळे हा ग्राहकवर्ग सराफा बाजारापासून दुरावू लागल्याची भीती फेडरेशनने व्यक्त केली आहे.
================================================जशोदाबेन यांनी मोदींच्या पासपोर्टसंबंधी कागदपत्रांची मागितली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयात काल (बुधवारी) आरटीआय अर्ज दाखल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पासपोर्ट मिऴविण्यासाठी विवाहसंदर्भात दाखल केलेल्या कागदपत्रांची माहिती जशोदाबेन यांनी आरटीआय अर्जाद्वारे मागितली आहे.
नोव्हेंबर २०१५ मध्ये जशोदाबेन यांनी पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता, त्यावेळी त्यांना विवाह प्रमाणप्रत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लग्न केल्याचे संयुक्त प्रतिज्ञापत्र यांचा पुरावा सादर केला नाही, म्हणून त्यांचा अर्ज नाकारला होता.
जशोदाबेन बुधवारी कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी आपल्या पासपोर्टसंदर्भात माहितीसाठी आरटीआय अर्ज दाखल केला आहे. आम्ही त्यांच्या अर्जाचे उत्तर योग्य त्यावेळी देऊ, असे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी झेड. ए. खान यांनी सांगितले. तसेच, जशोदाबेन यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्यावेळी पासपोर्टसाठी लागणा-या कागदपत्रांमध्ये कमतरता असल्यामुळे त्यांच्या अर्ज नाकारला होता, असे खान यांनी सांगितले.
जशोदाबेन यांचा भाऊ अशोक मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जशोदाबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पासपोर्टसाठी सादर केलेल्या विवाहसंदर्भातील कागदपत्रांची माहिती आरटीआय अर्जाद्वारे मागितली असल्याचे सांगितले.
तामिळनाडूतील बस चालकाचा मृत्यू उल्कापातामुळं नाही - नासा
उल्कापातामध्ये तामिऴनाडूतील बस चालकाचा मृत्यू झाल्याचा दावा 'नासा' या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने फेटाळून लावला आहे. जमिनीवर झालेल्या स्फोटामुळे बस चालकाचा मृत्यू झाला असल्याचे नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
शनिवारी वेल्लोर जिल्ह्यातील के.पंतारापल्ली गावातील इंजीनिअरिंग कॉलेजच्या आवारात एक स्फोट झाला. त्यात बसचालकाचा मृत्यू झाला. आकाशातून उल्केचा गोळा पडून हा स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला होता. स्फोटानंतर पाच फूट खोल आणि दोन फुट रुंद खड्डा पडला. पोलिसांना तिथे दगडही सापडला होता.
उल्कापातामध्ये मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्मिऴ आहे. आतापर्यंत नोंद असलेला जो वैज्ञानिक इतिहास आहे त्यामध्ये उल्कापातामध्ये मृत्यू झाल्याची कुठेही नोंद नसल्याचे नासाचे ग्रहमालेचे वैज्ञानिक लिंडले जॉन्सन यांनी अमेरिकन दैनिकाला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
================================================चीनच्या वैज्ञानिकांनी तयार केला सूर्याहून तिप्पट तेजस्वी कृत्रिम तारा!
बीजिंग: सूर्याच्या गर्भात असलेल्या उष्णतेहून तिप्पट उष्णतेचा एक अस्थायी कृत्रिम तारा निर्माण करण्याची विस्मयकारक वैज्ञानिक किमयागारी चीनच्या वैज्ञानिकांनी सोमवारी साध्य केली.
‘इस्टिट्यूट आॅफ फिजिकल सायन्स’च्या वैज्ञानिकांनी आण्विक सम्मीलन तंत्राने (न्युक्लियर फ्जुजन) प्रायोगिक अणुभट्टीत ४९.९९९ दशलक्ष सेल्सियस एवढ्या प्रचंड उष्णतेचे वस्तुमान तयार करण्यात यश मिळवले. सूर्यासारख्या ताऱ्यांच्या गर्भात अशीच आण्विक प्रक्रिया निरंतर होऊन उष्णतारूपी ऊर्जा उत्सर्जित होत असते. थोडक्यात, चिनी वैज्ञानिकांनी आपल्या सूर्याहून तिप्पट तेजस्वी असा कृत्रिम तारा प्रयोगशाळेत तयार केला. ऊर्जेचा हा स्रोत भूगर्भातील उष्णतेहून ८,६०० पट अधिक तप्त होता.
हा कृत्रिम तारा अस्थायी होता व अवघ्या १०२ सेकंदांनंतर तो ‘विझून’ गेला. ज्या अणुभट्टीत ही आण्विक प्रक्रिया घडवून आणली गेली तिचे आतील चेंबर एवढ्या उष्णतेत जास्त काळ टिकाव धरू शकले नाही. दुष्परिणाम न होणारा शाश्वत ऊर्जास्रोत म्हणून ‘न्युक्लिअर फ्जुजन’चे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरु आहेत. चिनी वैज्ञानिकांनी सोमवारी केलेला प्रयोग हा याचाच एक भाग होता.
यासाठी चीनमध्ये ईस्ट प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी सुमारे ३७ दशलक्ष डॉलर एवढा खर्च आला. ऊर्जानिर्मिच्या बाबतीत वैज्ञानिकांना एका समस्येवर गेली १५० वर्षांत मात करता आलेली नाही. ती म्हणजे एखाद्या ऊर्जास्रोतातून ऊर्जानिर्मिती करताना खर्ची पडणाऱ्या ऊर्जेहून अधिक ऊर्जा कशी निर्माण करायची. यादृष्टीने ‘न्युक्लिअर फ्जुजन’कडे एक आश्वासक तंत्र म्हणून पाहिले जात असले तरी यातून मिळणारा ऊर्जेचा स्रोत अखंडपणे कसा सुरु ठेवता येईल, याचे कोडे वैज्ञाानिकांना अद्यापही सुटलेले नाही.
================================================
२०१८ मध्ये ‘टायटॅनिक-२’ चे जलावतरण
सिडनी : रॉयल मरीन सर्व्हिसेसच्या टायटॅनिक या ऐतिहासिक जहाजाची प्रतिकृती ‘टायटॅनिक-२’ या नावाने २०१८ मध्ये सेवेत रुजू होईल. १०६ वर्षांपूर्वी मूळ टायटॅनिक जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडून १५०० पेक्षा जास्त लोक मरण पावले होते.
आणखी दोन वर्षांनी जलावतरण करणारे टायटॅनिक जहाज २१ व्या शतकातील सुरक्षेच्या गरजा नजरेसमोर ठेवून बनविण्यात येत आहे. त्यानुसार मूळ जहाजापेक्षा नवे चार मीटर रुंद असेल. टायटॅनिक -२ या जहाजाची कल्पना आॅस्ट्रेलियातील अब्जाधीश क्लाईव्ह पामर आणि त्यांची कंपनी ब्लू स्टार यांची आहे.१९१२ मध्ये तयार झालेल्या टायटॅनिकसारखाच तोंडवळा या नव्या जहाजाचा असेल; परंतु नवी आवृत्ती चार मीटर रुंद असेल. बुडालेल्या टायटॅनिकमध्ये पुरेशा जीवरक्षक बोटी नव्हत्या. ती उणीव आता दूर केली जाईल. त्याच्या जोडीला संकटात समुद्रातून सुटका करण्याची व्यवस्थाही आहे. ‘टायटॅनिक -२’ २७० मीटर लांब, ५३ मीटर उंच आणि ४० हजार टन वजनाची असेल, असे बेलफास्ट टेलिग्राफने म्हटले.नव्या टायटॅनिकमध्येही जुन्या बोटीत होते तसे प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीची तिकिटे असतील. नऊ मजल्यांच्या या बोटीला २४०० प्रवासी आणि ९०० कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी ८४० केबीन असतील.चीनमधील जियांगसू येथून दुबईला करणार प्रयाणया जहाजावर पोहण्याचा तलाव, तुर्कीश बाथरूम्स आणि जिमखाना असेल. या जहाजाचे नियंत्रण उपग्रहाद्वारे होईल व त्याला डिजिटल नॅव्हिगेशन आणि रडार सिस्टीम असेल, असे ब्लू स्टार लाईनचे मार्केटिंग संचालक जेम्स मॅकडोनाल्ड यांनी सांगितले.मूळ जहाजाचा प्रवास साउदम्पटन ते न्यूयॉर्क असा होता. नवा प्रवास मात्र पूर्व चीनमधील जियांगसू येथून दुबई असा असेल.मूळ टायटॅनिक जहाज १९१२ मध्ये त्याच्या पहिल्याच प्रवासाला निघाल्यानंतर उत्तर अटलांटिक महासागरात हिमनगाला धडकून बुडाले व १५०० पेक्षा जास्त लोकांना जलसमाधी मिळाली होती.
================================================जर्मनीत दोन रेल्वेंची टक्कर; नऊ ठार
बर्लिन : दोन प्रवासी रेल्वेंची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत ९ जण ठार, तर अन्य १५० जण जखमी झाले. दक्षिण जर्मनीतील दुर्गम भागात सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या भागातील ही आजवरची सर्वात भीषण रेल्वे दुर्घटना आहे. बॅव्हरियाधील बद एबलिंगनजीकच्या एकेरी रेल्वेमार्गावर घडलेल्या दुर्घटनेमुळे डबे रुळावरून घसरत एकमेकांवर चढले. चेंदामेंदा झालेले डबे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर नदीपार करून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. जखमींपैकी ५० जणांंना गंभीर दुखापत झाली आहे. डब्यांतून जखमींना बाहेर काढण्याचे काम दुपारपर्यंत चालू होते.
================================================पाकच्या हिंदूंना मिळणार विवाह कायदा
इस्लामाबाद : पाकिस्तानातील हिंदूंना अखेर अनेक दशकांनंतर हिंदू विवाह कायदा मिळणार आहे. या कायद्याची मागणी अनेक दशकांपासून होऊनही तिच्याकडे संबंधितांनी केलेले दुर्लक्ष व निष्क्रियता संपुष्टात आली असून, संसदीय मंडळाने एकमताने हिंदू विवाह विधेयकाला मान्यता दिली आहे.
नॅशनल असेम्ब्लीच्या स्थायी समितीने (कायदा आणि न्याय) सोमवारी हिंदू विवाह विधेयक २०१५ चा अंतिम मसुदा संमत केला. तेथे पाच हिंदू लोकप्रतिनिधींना मुद्दाम बोलावण्यात आले होते. विधेयकाला विलंब लावण्याच्या खेळी शेवटपर्यंत सुरूच होत्या तरीही समितीने विधेयक एकमताने संमत केले. त्याआधी विधेयकात स्त्री आणि पुरुषासाठी विवाहाचे किमान वय १८ निश्चित करणे आणि कायदा संपूर्ण देशात लागू करणे या दोन दुरुस्त्या करण्यात आल्या, असे वृत्त ‘डॉन’ने दिले. असेम्ब्लीमध्ये सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) (पीएमएल-एन) बहुमत असल्यामुळे ते सहजपणे संमत होईल.
आम्ही ९९ टक्के संख्येतील लोक एक टक्क्यातील लोकसंख्येला भीत असू तर आम्ही कोणते दावे करतो आणि आम्ही काय आहोत याचा स्वत:च्या मनात शोध घेतला पाहिजे, असे विर्क म्हणाले.
================================================
'हिंदू राष्ट्रवादा'ला ब्रिटीश वृत्तपत्राचं आव्हान, 'मुंबई'ऐवजी 'बॉम्बे' लिहिणारलंडन : ‘द इंडिपेन्डंट’ हे ब्रिटीश वृत्तपत्र आता भारताची आर्थिक राजधानी ‘मुंबई’चा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करणार आहे. वृत्तपत्राचे संपादक अमोल राजन यांनी आज याबाबतची माहिती दिली. अमोल राजन म्हणाले की, “संकुचित विचार करणाऱ्या हिंदू राष्ट्रवाद्यांविरोधात हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.”
1995 साली ‘बॉम्बे’चं नामकरण ‘मुंबई’
‘बॉम्बे’ला 1995 मध्ये अधिकृतरित्या ‘मुंबई’ नाव देण्यात आलं. शिवसेनेच्या दबावानंतर हा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेने हे नाव मुंबादेवीच्या नावावर ठेवलं आहे. तेव्हापासून या महानगराला ‘बॉम्बे’ऐवजी ‘मुंबई’च संबोधलं जातं.
जगासाठी या शहराचे दरवाजे उघडे : राजन
कोलकातामध्ये जन्मलेले आणि लंडनमध्ये वाढलेले राजन म्हणाले की, ”बॉम्बे’ची ओळख ही एक खुलं शहर आणि भारताचं प्रवेशद्वार अशी आहे, ज्याचे दरवाजे संपूर्ण जगासाठी खुले आहेत. जर तुम्ही त्या शहराचा उल्लेख ‘मुंबई’ असा केलात, तर ते हिंदू राष्ट्रवाद्यांचं हिताचंच आहे.
“एक पत्रकार आणि वृत्तपत्रात एडिटिंगचं काम करणारा व्यक्ती त्याच्या शब्दावलीबाबत स्पष्ट असावा. मी भारताचा तोच वारसा आत्मसात करेन जो जगासाठी खुला आहे, ना की सत्तेत असेल्या संकुचित विचारधारा असलेल्या पक्षाचा,” असंही अमोल राजन म्हणाले.
अमोल राजन यांच्या या निर्णयावर वाद होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment