Tuesday, 16 February 2016

नमस्कार लाईव्ह १६-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- सीरियासंदर्भात आणखी वाट पाहणे अशक्‍य:राष्ट्रसंघ 
२- जम्मू-काश्‍मीर चीनचा भाग - ट्‌विटरचा 'शोध'! 
३- बांग्लादेश; पुस्तकामधून मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुख:वल्याच्या आरोपावरुन प्रकाशक शमसुझोहा मनिकला अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- 'राहुल गांधीविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा', कोर्टात याचिका दाखल 
५- शहीद सुनील सूर्यवंशींवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार 
६- केजरीवालांकडून हनुमानाचा अवमान, ट्विटरवर टीकेची झोड 
७- केजरीवालविरोधात धार्मिक भावना दुखवल्याच्या आरोपावरुन सायबराबादमध्ये एफआयआर दाखल 
८- कर्जबुडव्यांची नावे द्या; सर्वोच्च न्यायालयाकडून रिझर्व्ह बँकेला आदेश 
९- अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार- व्यंकय्या नायडू 
१०- व्होडाफोनला 14,200 कोटी रु. भरण्याची नोटीस, सरकारच्या बोलणी व करणीत अंतर 
११- सरदारांवरील जोक्स बंद व्हावेत, पण थांबवणार कसे? - सर्वोच्च न्यायालय 
१२- सोनियांनी 'राष्ट्रीयते'ची परिभाषा सांगावी- साध्वी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय का ?, हायकोर्टाचा सरकारला सवाल 
१४- चारा छावण्या तात्पुरत्या बंद केल्या; मागणी केल्यास पुन्हा सुरु करण्यात येतील - एकनाथ खडसे
१५- शेतकर्‍यांना खुशखबर, आता शेतीमाल विका थेट ग्राहकांना 
१६- मुंबईत लोकलच्या धडकेत 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू 
१७- राज्यात पाणी योजनांसाठी समान धोरण हवे- पवार 
१८- पीटर मुखर्जींवर हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप 
१९- अफझल गुरू शहीद असेल तर हणमंतप्पांना काय म्हणायचे; कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा सवाल 
२०- मुख्यमंत्री निवासाजवळ बलात्कारित मुलीचा मृतदेह 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- अमरावती; आंतरजातीय विवाह केल्यानं पोटच्या मुलीची डोक्यात दगड घालून हत्या 
२२- नागपूर; शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांदेखत तलवारीने केक कापला 
२३- पुरंदर; माय मरो मावशी जगो.. माकडीणीची कुत्र्याच्या पिलावर माया 
२४- नाशिक; रिक्षाचालकाची हिरोगिरी, स्टंटबाजीच्या नादात रिक्षा पलटी 
२५- विलासपूर: इमारत कोसळून अनेक जखमी 
२६- नांदेड; बारावी परीक्षा कॅापीमुक्तीसाठी आधुनिक तंत्रज्ज्ञानाचा वापर - जिल्हाधिकारी काकाणी 
२७- मुखेड; माहिती अधिकारातील हक्काची माहीती देणा-या समतादुतांचे कार्य प्रशंसनीय - बीडीओ रामराजे आत्राम 
२८- मुखेड; उद्या भारीपच्या वतीने वैचारिक जनजागृती मेळाव्याचे आयोजन 
२९- वर्धा: विद्यार्थिनीची राहत्या घरी स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या 
३०- बेळगाव; केमिकल सिलेंडर घेऊन जाणा-या ट्रकमध्ये स्फोट, एक मृत्यू, 5 जखमी
३१- बिजनोर; अवैध फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याने इमारत कोसळली, 5 मृत्यू, 3 जखमी 
३२- हैदराबाद : आमदार मदन रेड्डी यांच्या सुरक्षारक्षकाकडून चुकून गोऴीबार, एकाचा मत्यू 
३३- नांदेड; शहरातील ट्राफिक सिग्नल- असून अडचण, नसून खोळंबा; बहुतेक नादुरुस्तच 
३४- नांदेड- शहरात हेल्मेट सक्ती आहे का नाही?; दुचाकीस्वार संभ्रमात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३५- 'त्या' दिग्दर्शकाकडून सेक्ससाठी विचारणा : आयुषमान खुराणा 
३६- प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या पहिल्या परीक्षेचा लेखाजोखा 
३७- आयपीएलमध्ये धोनीची नवी जर्सी, नवं राज्य 
३८- सलमानमुळे विराट आणि अनुष्काचं ब्रेकअप 
३९- सिंगल असल्याची भीती वाटते : सलमान खान 
४०- .. या गोष्टीची आमिरला वाटते भीती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
विचार असे मांडा कि तुमच्या विचारावर कोणीतरी विचार करेल 
[प्रिया वर्मा, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4

======================================

'राहुल गांधीविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा', कोर्टात याचिका दाखल 

'राहुल गांधीविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा', कोर्टात याचिका दाखल
नवी दिल्ली: देशाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या जेएनयूमधील आरोपींना समर्थन दिल्यानं आणि सभा घेतल्यानं अलाहाबाद जिल्हा न्यायालयात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनं केली आहे.
कोर्टानं याप्रकरणी आज सुनावणी पूर्ण केली असून उद्या दुपारी दोन वाजता याचा निर्णय सुनविण्यात येणार आहे. हायकोर्टाचे वकील आणि भाजप नेते सुशील मिश्र यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत कलम 124, 124 अ, 500 आणि 511 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. राहुल गांधींनी आरोपींना समर्थन देऊन देशद्रोहाचं काम केलं असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान, जेएनयूत घोषणाबाजी करणारे विद्यार्थी देशद्रोही नसून त्यांचा आवाज दाबणारं सरकार देशद्रोही आहे, असं वक्तव्य करून राहुल गांधींनी केलं होतं. जेएनयूच्या वादात राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता.
======================================

अमरावती; आंतरजातीय विवाह केल्यानं पोटच्या मुलीची डोक्यात दगड घालून हत्या

आंतरजातीय विवाह केल्यानं पोटच्या मुलीची डोक्यात दगड घालून हत्या
अमरावती: मुलीनं पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बापानं मुलीची दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातल्या सार्सी गावात घडली आहे.
अंजली भाले या मुलीचे गावात राहणाऱ्या अजय चव्हाणशी प्रेमसंबध होते. यातूनच दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं. या लग्नाला मुलीच्या वडीलांचा विरोध होता. लग्नाच्या 15 दिवसानंतर अंजलीचा यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात शोध लागला आणि मुलीला घरी घेऊन आले. मात्र घरी येताच अंजलीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. या घटनेनंतर वडीलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी संजय भाले यांची मुलगी अंजली आणि अजय चव्हाण यांनी पळून जाऊन विवाह केला. मात्र, वडिलांचा त्याला विरोध होता त्याच रागातून संजय भालेनं मुलीची हत्या केली. विशेष म्हणजे ज्या अजय चव्हाणचं लग्न अंजली भालेसोबत झालं तो अजय वडिलांच्याही ओळखीचा होता. अजयचं घरात येणं-जाणं होतं. त्यातूनच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. पण 15 दिवसानंतर त्यांचा शोध लागला.
पोलिसांनी आरोपी वडील संजय भालेला अटक केली. पण वडिलांची खोटी प्रतिष्ठा आणि आंतरजातीय विवाह यातून एका मुलीचं आयुष्य उद्धवस्त झालं. आता कोर्टात वडिलांना शिक्षा होईलंही पण अंजलीचा संसार सुरु होण्याआधीचं संपला.
======================================

मुंबईत लोकलच्या धडकेत 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू 

मुंबईत लोकलच्या धडकेत 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वेवरील भायखळा आणि सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान लोकलखाली येऊन एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ट्रेनखाली येऊन जखमी झालेल्या मुलाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. 
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गौरव व्होरा हा मुलगा शाळेतून परतत होता. भायखळा आणि सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा मृत्यू झाला. 
अपघातामुळे संतप्त प्रवाशांनी मध्य रेल्वे रोखून धरली. त्यामुळे सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा काही काळासाठी खोळंबा झाला.
======================================

नागपूर; शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांदेखत तलवारीने केक कापला

शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांदेखत तलवारीने केक कापला
नागपूर : ज्या वयात हाती पुस्तक आणि लेखणी असावी, त्या वयात शाळेतील मुलांनी हाती तलवार घेतली आणि चक्क त्या तलवारीने केक कापला. नागपूर महापालिकेच्या कपिलनगर हिंदी शाळेत हा प्रकार घडला आहे.
हा प्रकार घडत असताना शाळेतलेच 300 विद्यार्थी आणि खुद्द मास्तरही उपस्थित होते. गदारोळ झाल्याने शिक्षकांनी या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र पोलिस याप्रकरणी कारवाई करणार आहेत.
27 जानेवारीला कपिलनगर हिंदी शाळेत सुफी संत ताजुद्दीन बाबा यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. या निमित्त आणलेला केक कापण्यासाठी एका विद्यार्थ्याने तलावर हातात घेतली. त्यानंतर त्याच तलवारीने इतर विद्यार्थ्यांनीही केक कापले.
हा व्हिडीओ हाती लागल्यानंतर एखाद्या शाळेत तलवार पोहोचतेच कशी? असा प्रश्न ‘माझा’ने विचारला. त्यावर शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी घडलेल्या प्रकारावर माफी मागितली आहे.
शाळेत तलवारीने केक कापून चूक केली, असं विद्यार्थी सांगतात. पण बाहेर काही गुन्हेगारांना तलवारीने केक कापताना पाहिले होते. त्याचंच अनुकरण केल्याचं विद्यार्थी म्हणाले.
======================================

पुरंदर; माय मरो मावशी जगो.. माकडीणीची कुत्र्याच्या पिलावर माया

माय मरो मावशी जगो.. माकडीणीची कुत्र्याच्या पिलावर माया
वाल्हे : आई आणि मुलाचं नातं जगात सर्वात मौल्यवान मानलं जातं. काही वेळा माय मरो, मावशी जगो अशी स्थिती निर्माण होते. असंच काहीसं माकडीण आणि कुत्र्याच्या पिल्लाबाबत पाहायला मिळालं आहे.पुरंदर तहसील कार्यालयाच्या परिसरात एका माकडिणीने चक्क एका कुत्र्याच्या पिल्लाचं मातृत्व स्वीकारलं आहे. छत्र नसलेलं कुत्र्याचं पिल्लू या परिसरात आलं. कडाक्‍याच्या थंडीत त्या छोट्या जीवाचा आकांत माकडिणीला ऐकू आला आणि तिने त्या पिल्लाचं मातृत्व स्वीकारलं.गेल्या काही दिवसांपासून ही माकडीण आपल्या स्वतःच्या पिल्लाप्रमाणे या कुत्र्याच्या पिल्लाची काळजी घेत आहे. दिवसभर त्याच्यासोबत खेळताना त्या पिल्लाला साधे खरचटणार नाही, इतकी काळजी ती घेते. स्थानिक नागरिकांसह कर्मचाऱ्यांना मायलेकरांच्या अनोख्या नात्याचं कौतुक वाटत आहे.
======================================

'त्या' दिग्दर्शकाकडून सेक्ससाठी विचारणा : आयुषमान खुराणा 

'त्या' दिग्दर्शकाकडून सेक्ससाठी विचारणा : आयुषमान खुराणा
नवी दिल्ली : अभिनेता रणवीर सिंगने फिल्म इंडस्ट्रीत चालणाऱ्या कास्टिंग काऊचबाबत तोंड उघडल्यानंतर आणखी एक अभिनेता आपला अनुभव सांगायला पुढे आला आहे. मनोरंजन सृष्टीमध्ये प्रवेश घेताना आपल्यालाही ‘अशा’ घटनेला सामोरं जावं लागल्याचं अभिनेता आयुषमानने सांगितलं. 
‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत आयुषमानने एका कास्टिंग डिरेक्टरने आपल्याला सेक्ससाठी विचारणा केल्याचं सांगितलं. मी एक टीव्ही अँकर म्हणून स्थिरावत होतो. त्यावेळी ‘त्या’ कास्टिंग डिरेक्टरने मला
थेट शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. त्यावेळी, मी जर स्ट्रेट नसतो तर याबाबत विचार केला
असता, पण मी हे करु शकत नाही. असं त्याला सांगितल्याचं रणविजयने सांगितलं. 
‘इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच होतं. मात्र तुमचं टॅलेंट हा यशाचा एकमेव मार्ग आहे. असल्या भानगडीत पडायची तुम्हाला गरजच नाही’ असं आयुषमानने स्पष्ट केलं. आयुषमान, रणवीर यांच्याव्यतिरिक्त कल्की कोचलीन, कंगना रनौत यांनीही कास्टिंग काऊचबाबत वाचा फोडली होती. 
विकी डोनरमधून प्रकाशझोतात आलेला आय़ुषमान आगामी मनमर्झिया आणि मेरी प्यारी बिंदू चित्रपटात दिसणार आहे.
======================================

शहीद सुनील सूर्यवंशींवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार 

शहीद सुनील सूर्यवंशींवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
सातारा : सियाचीन हिमस्खलनात शहीद झालेले जवान सुनील सूर्यवंशी यांना लष्करी इतमामात आज अखेरचा निरोप देण्यात आला. साताऱ्यातील म्हसकरवाडी या त्यांच्या मूळगावी मद्रास रेजिमेंटने त्यांना सलामी दिली. सुनील शिंदे यांचा भाऊ आणि एक वर्षाची मुलीकडून पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आल्या. या वीराच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक आणि अवघी पंचक्रोशी म्हस्करवाडीत उपस्थित होती. दरम्यान, 3 फेब्रुवारीला सियाचीनमध्ये 19 हजार फूट उंचीवर 10 भारतीय सैनिकांची तुकडी गस्तीवर होती. त्यावेळी अचानक आलेल्या हिमवादळाने चौकीसहीत त्यांना गिळंकृत केलं. त्यात सुनील सूर्यवंशी यांच्यासह 9 जवान 25 ते 30 फूट खोल बर्फाखाली दाबले गेले. यानंतर भारतीय हवाई दलाने पूर्ण ताकद पणाला लावून या जवानांचा शोध घेतला. तब्बल सहा दिवसानंतर 9 जवानांचे मृतदेह सापडले. अखरे त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
======================================

प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या पहिल्या परीक्षेचा लेखाजोखा 

प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या पहिल्या परीक्षेचा लेखाजोखा
मुंबई : यंदाच्या अंडर-19 विश्वचषकात भारतीय टीमसोबतच सर्वांची नजर होती ती प्रशिक्षक राहुल द्रविडवर. कोच म्हणून द्रविडची ही पहिली मोठी परीक्षा होती. भारताच्या या महान फलंदाजाच्या सहवासात युवा खेळाडूंना काय शिकायला मिळालं, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.
ईशान किशनच्या टीमनं अंडर-19 विश्वचषक जिंकण्याची संधी गमावली. पण बांगलादेशात झालेली ही स्पर्धा भारताच्या युवा शिलेदारांना खूप काही शिकवून गेली. 
अंडर-19 टीमच्या या सदस्यांसाठी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन सर्वात महत्त्वाचं ठरलंय. त्याच्या सहवासात खेळताना युवा खेळाडूंनाही नवं स्फुरण चढलं.
द्रविडनं या टीमला फक्त खेळाचेच धडे दिलेले नाहीत, तर आणखीही खूप काही दिलंय. पराभव कसा पचवायचा, त्यापासून कसा धडा घ्यायचा, हे या टीमला राहुल सरांनी शिकवलंय.
======================================

आयपीएलमध्ये धोनीची नवी जर्सी, नवं राज्य 

आयपीएलमध्ये धोनीची नवी जर्सी, नवं राज्य
मुंबई : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता आयपीएलमध्ये नव्या जर्सीत खेळताना दिसेल. धोनीनं सोमवारी दिल्लीत आयपीएलमधली त्याची नवी टीम अर्थात रायझिंग पुणे सुपरजायंट्सची जर्सी लॉन्च केली. 
पुणे फ्रँचायझीचे ओनर संजीव गोयंकाही यावेळी उपस्थित होते. गुलाबी, निळा आणि केशरी रंगाचं मिश्रण असलेली ही जर्सी धोनीच्या चाहत्यांना कितपत पसंत पडेल याविषयी मात्र शंका आहे. कारण नव्या जर्सीचं अनावरण होताच सोशल मीडियात मिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. 
धोनी नव्या जर्सीमध्ये टीमसाठी आणि नव्या खेळाडूंसह आयपीएलमध्ये पुन्हा आपली छाप पाडण्यास उत्सुक आहे. सट्टेबाजीप्रकरणी चेन्नई सुपर किंग्सचं दोन वर्षांसाठी निलंबन झाल्यावर पुण्याच्या फ्रँचायझीनं आयपीएल ड्राफ्टमध्ये धोनीला पहिली पसंती दिली होती.
======================================

सलमानमुळे विराट आणि अनुष्काचं ब्रेकअप 

सलमानमुळे विराट आणि अनुष्काचं ब्रेकअप?
मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या ब्रेकअपमागचं कारण समोर आलं आहे. अनुष्का आणि विराट स्वत: ब्रेकअपचं कारण देणार नाही. पण दोघांचे मार्ग वेगळे होण्याचं कारण ‘सुलतान’ असल्याचं म्हटलं जात आहे. 
टीम इंडियाचे क्रिकेटर एकामागोमाग बोहल्यावर लढत आहेत. त्यामुळे अनुष्का शर्मासोबत संसार थाटावा, अशी इच्छा विराट कोहलीची होती. पण असं झालं नाही. विराटने अनुष्काला जानेवारीमध्ये लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण त्याचवेळी अनुष्काकडे सलमान खानच्या ‘सुलतान’चं प्रपोजल आलं होतं. 
सुत्रांच्या माहितीनुसार, विराट या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनुष्कारवर सातत्याने लग्नासाठी दबाद टाकत होता. मात्र त्याचवेळी अनुष्काला ‘सुलतान’साठी विचारणा झाली. त्यामुळे अनुष्का विराटला म्हणाली की, मला ‘सुलतान’मध्ये सलमानची हिरोईन बनण्याची संधी मिळत आहे. त्यावर विराटने अनुष्काला हा सिनेमा स्वीकारु नये, असा सल्ला दिला. 
विराट थट्टा करत आहे, असं अनुष्काला वाटलं, कारण तो सुरुवातीपासून तिला करिअरसाठी प्रोत्साहित करत होता. पण कोहलीकडून जेव्हा लग्नासाठी दबाव वाढला, त्यावेळी तिला समजलं की तो हे गांभीर्याने बोलत आहे. त्यामुळे अनुष्कानेही विराटला स्पष्टपणे सांगितलं की, मी कोणत्याही परिस्थितीत ‘सुलतान’ची ऑफर आणि करिअर सोडणार नाही. 
‘सुलतान’ सिनेमा दोघांमधील दुराव्यासाठी निमित्त ठरला आणि त्याचा शेवट ब्रेकअपमध्ये झालं.
======================================

केजरीवालांकडून हनुमानाचा अवमान, ट्विटरवर टीकेची झोड

केजरीवालांकडून हनुमानाचा अवमान, ट्विटरवर टीकेची झोड
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका कारटूनमुळे टीकेची झोड उठली आहे. लंकादहनाच्या प्रसंगाचं चित्र रेखाटत हनुमानाचा अवमान केल्याची टीका ट्विटरवर होत आहे. 
मुंबईत मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र रजनीच्या व्यासपीठावर लागलेल्या आगीचा संदर्भ या कारटूनला दिला आहे. मोदी उपस्थित असलेल्या मंचाला आगीच्या ज्वाळांनी वेढलं आहे. आणि हनुमानाप्रमाणे येऊन एकाने ‘सर, काळजी करु नका, सगळं लक्ष जेएनयूतील वादाकडे वेधून घेतलं आहे’ असं म्हटलं आहे.
======================================

सिंगल असल्याची भीती वाटते : सलमान खान

सिंगल असल्याची भीती वाटते : सलमान खान
मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर अशी ज्याची ओळख आहे, तो सुपरस्टार म्हणजे सलमान खान. सलमानच्या प्रेम प्रकरणांची चर्चाही सर्वाधिक चघळली जाते. मात्र आपण सिंगल आहोत या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटते, असं खुद्द सलमानने म्हटलं आहे. 
‘मला सगळ्यात जास्त भीती वाटते, मी अद्याप अविवाहित असल्याची. मात्र मला ही भीती आवडते. ही भीती मला आणखी काही काळ अऩुभवायची आहे’ असं सलमान म्हणतो. 
सोनम कपूरने सलमान खानचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. नीरजा व्हर्सेस फीअर असा लोगो व्हिडिओवर दिसत आहे. येत्या शुक्रवारी नीरजा भानोतच्या शौर्यकथेवर आधारित सोनमचा ‘नीरजा’ चित्रपट प्रदर्शित होत आहे.
======================================
चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय का ?, हायकोर्टाचा सरकारला सवाल 

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात जनावरांचा घास हिरावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयाची दखल घेत मुंबई हायकोर्टाने स्वत:हुन याचिका दाखल केली असून चारा छावणी बंद करण्याचा निर्णय कशासाठी घेण्यात आला अशी विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारकडे केली आहे. याबद्दल आता राज्य सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
उस्मानाबाद, लातूर, बीडमधील चारा छावण्या मे 2016 पर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या चारा छावण्यांमध्ये मे महिन्यांपर्यंत चारा उपलब्ध आहे. त्यामुळे या चारा छावण्या बंद करण्याची कारवाई करावी असं पत्र महसूल उपसचिव अशोक आत्राम यांनी बीड, उस्मानाबाद आणि लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे चारा असल्याचा उल्लेख करत छावण्या बंद करण्याचे आदेश दिले आहे. जर हा निर्णय झाला तर बीडमधील 163, लातूरमधील 6 आणि उस्मानाबादेतील 77 चारा छावण्या बंद होतील. चारा छावण्या बंदी प्रकरणी हायकोर्टाने दखल घेतलीये. हाय कोर्टाने याविषयी राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय का घेतला असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा आयबीएन लोकमतनं केला होता. आज हायकोर्टाने या प्रकरणी स्वत:हुन याचिका दाखल केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना आंदोलन करणार आहेत. उस्मानाबादेत शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सत्तेतून बाहेर पडण्यासाठी विनंती करण्यात येईल आणि शासनाने चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास आज रात्रीपासून तीव्र आंदोलन करण्यार असल्याचं शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितलंय.
======================================
शेतकर्‍यांना खुशखबर, आता शेतीमाल विका थेट ग्राहकांना ! 

शेतकर्‍यांसाठी एक आनंदाची बातमी…आता शेतकर्‍यांना शेतीमाल थेट ग्राहकांना विकता येणार आहे. बाजार समितीतर्फेच शेतीमाल विकण्याची सक्ती उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केलीये. आतापर्यंत शेतकर्‍याला शेतीमाल विकायचा असेल तर बाजार समितीतर्फे विकणं बंधणकारक होतं. मात्र, आता शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना विकू शकतो. त्यामुळे शेतकर्‍याला चांगला भावही मिळणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक बदल घडवले आहे. या निर्णयामुळे आता शेतकर्‍यांना आपला माल थेट बाजारपेठेत मर्जीप्रमाणे विकता येणार आहे. आतापर्यंत शेतकर्‍यांना आडते आणि दलालांच्या मार्फत आपला माल विकावा लागत होता. त्यामुळे हवी ती रक्कम शेतकर्‍यांच्या पदरात पडत नव्हती या निर्णयामुळे बळीराजाला आपल्या मेहनतीचा किंमत स्वत :चा ठरवता येणार आहे.
======================================
रिक्षाचालकाची हिरोगिरी, स्टंटबाजीच्या नादात रिक्षा पलटी 
रोड रोडरोमियोंचा त्रास सामान्य नागरिकांना नेहमीच होत असतो याच घटनेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. गंगापूर रोड येथील आसारामबापू पुलावर एका रिक्षाचालक स्टंट करण्याच्या प्रयत्नात असतांना अपघात झाला. यात रिक्षाचालकासोबत त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाला. हा स्टंट या दोघांच्या जीवावर देखील बेतू शकला असता. या भागाच्या जवळ पास महाविद्यालय असून,या पुलाजवळ नेहमीच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते,आणि त्यामुळे रोडरोमियों नेहमीच धिंगाणा घालत असता. परंतु, पोलीस या भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
======================================
कर्जबुडव्यांची नावे द्या; सर्वोच्च न्यायालयाकडून रिझर्व्ह बँकेला आदेश 

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय रिझर्व्ह बँकेला देशातील बँकांची कर्जे थकविणाऱ्या आघाडीच्या थकबाकीदारांची यादी न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राच्या अहवालाची दखल घेत न्यायालयाने स्वत:हून (स्युओ मोटो) ही याचिका दाखल केली. या अहवालात देशातील २९ राज्य सरकारी बँकांच्या डोक्यावर १.१४ लाख कोटी रूपयांची बुडीत कर्जे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानुसार न्यायालयाने आज गेल्या पाच वर्षांतील पाचशे कोटींपेक्षा अधिक रक्कम थकित असलेल्या कर्जदारांची माहिती द्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला (आरबीआय) दिले आहेत. गेल्या काही दिवसांत बँकांच्या तिमाही निकालांच्यावेळी वाढत्या बुडीत कर्जाच्या समस्येने ग्रस्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले होते. सार्वजनिक बॅंकांनी योग्य त्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता तसेच वसुलीसाठी योग्य ती यंत्रणा नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणातील कर्जे कशी देण्यात आली याबाबतही न्यायालयाने आरबीआयकडे एका नोटीसीद्वारे विचारणा केली आहे. त्यामुळे ज्या थकबाकीदारांनी जाणूनबुजून कर्जाचा भरणा केलेली नाही अशा थकबाकीदारांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे बॅंकांना कर्जवसुली करणे अधिक सोपे होणार असून बॅंकाही अधिक काटेकोरपणे आणि पारदर्शक पद्धतीने कर्जवाटप करतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 
======================================
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार- व्यंकय्या नायडू 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय अधिवेशन सुरळीत पार पाडण्यास विरोधक मदत करतील अशी आशा असल्याचेही ते म्हणाले. 
======================================
पीटर मुखर्जींवर हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप 

शीना बोरा हत्याप्रकरणात मंगळवारी सीबीआयने आरोपी पीटर मुखर्जी यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आलेल्या या पुरवणी आरोपपत्रात पीटर मुखर्जी यांच्यावर हत्या , पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या प्रकरणात पीटर यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी असून पोलिसांनी तिला १९ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले होते.
======================================
.. या गोष्टीची आमिरला वाटते भीती

आपल्या कुटुंबाबत प्रत्येक व्यक्तीच्या  मनात एक भीती असते. सामान्य माणसांना वाटणारी ही भीती मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानलादेखील वाटते. आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे यासाठी तो चिंतीत असतो. ‘नीरजा’ या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग झाले. त्यावेळी आमिरला आयुष्यात कोणत्या गोष्टीची भीती वाटते असा प्रश्न विचारण्यात आला असता तो म्हणाला की, मला आयुष्यात खूप गोष्टींची भीती वाटते. माझ्या जवळच्या किंवा कुटुंबातील व्यक्ती, माझी मुलं, माझी आई, किरण या सर्वांबाबत माझ्या मनात भीती असते. ही लोक कुठे बाहेर किंवा सहलीला गेल्यावर त्यांना काही होणार तर नाही ना असा विचार सतत मग माझ्या मनात असतो. मग हे सगळे घरी परतेपर्यंत मी त्यांना सतत फोन करत राहतो आणि त्यांची विचारपूस करतो. तसेच, माझ्या सर्वात जवळची व्यक्ती माझ्यापासून दूर जाईल याची मला सर्वात जास्त भीती वाटते. 
======================================
अफझल गुरू शहीद असेल तर हणमंतप्पांना काय म्हणायचे; कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा सवाल 
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) देण्यात आलेल्या देशद्रोही घोषणांच्या पार्श्वभूमीवर भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने फेसबुकवर कवितेच्या माध्यमातून मनातील भावनांना वाट करून दिली. हे कशाप्रकारचे भाषण स्वातंत्र्य आहे, जिथे लोक भारतमातेचा अपमान करतात? अफझल गुरू शहीद असेल तर मग लोकांनी हणमंतप्पांना काय म्हणायचे, असे सवाल योगेश्वर दत्तने या कवितेच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. योगेश्वर दत्त यांनी ही कविता फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ५८ हजारांहून अधिक लाईक्स या पोस्टला असून, ८ हजारांहून अधिक जणांनी पोस्ट शेअर केली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्या अटकेवरून सरकार विरुद्ध संघटनेतील विद्यार्थी व डावे पक्ष यांच्यातील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. 
======================================

व्होडाफोनला 14,200 कोटी रु. भरण्याची नोटीस, सरकारच्या बोलणी व करणीत अंतर 


  • नवी दिल्ली, दि. 16 - पूर्वलक्ष्यी प्रभावाने करआकारणी करणार नाही असे केंद्र सरकार वारंवार सांगत असतानाच, इन्कम टॅक्स विभागाने व्होडाफोनला 14,200 कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची आठवण करून सरकारची बोलणी व करणी यात अंतर असल्याचा प्रत्यय दिला आहे. जर हा करभरणा केला नाही तर मालमत्ता जप्त करण्याची धमकीही इन्कम टॅक्स विभागाने व्होडाफोनला दिली आहे.
    आयकर खात्याने 4 फेब्रुवारी रोजी सदर पत्र पाठवले असून व्होडाफोनने 2007मध्ये हचिसनचा व्यवसाय 11 अब्ज डॉलर्सना विकत घेतल्याचा संदर्भ दिला आहे, आणि यापोटी 14,200 कोटी रुपयांची करांची थकबाकी आहे, असे म्हटले आहे, असे व्होडाफोनच्या प्रवक्त्याने सांगितले.
    सध्या आंतरराष्ट्राय पातळीवर हा वाद असून हा व्यवहार भारताबाहेर झाल्यामुळे सदर कर लागू होत नसल्याचा व्होडाफोनचा दावा आहे. तर, व्होडाफोनला झालेला भांडवली नफा भारतातल्या मालमत्तेवर झाल्याचा इन्कम टॅक्स खात्याचा युक्तिवाद आहे. दोन वर्षांपूर्वी भारताने सध्या अस्तित्त्वात असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेतून सध्या अस्तित्वात असलेले वाद मिटवले जातील असे म्हटले होते. 
======================================

सरदारांवरील जोक्स बंद व्हावेत, पण थांबवणार कसे? - सर्वोच्च न्यायालय 

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 16 - सरदारांवर सर्रास जोक्स केले जातात आणि इंटरनेट व सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले जातात, ही अत्यंत चुकीची बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. परंतु, हे जोक्स थांबवणार कसे हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला पडला असून न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच सहा आठवड्यांमध्ये उपाय सुचवण्याचे आवाहन केले आहे.
    दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वांशिक, एखाद्या समाजाविरोधात विनोद पसरवणे थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची गरज अधोरेखीत केली आणि त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 
    एखाद्या समाजावर जोक करणे कसं चुकीचे आहे विद्यार्थ्यांसह समाजाला पटवून देणं महत्त्त्वाचं असल्याचं कमिटीनं याचिकेमध्ये म्हटलं होतं आणि यावर बंदी घालण्याची विनंती केली होती. 
    कुठल्याही समाज हा समाजाच्या हास्याचा विषय होऊ नये असं सांगतानाच, आम्ही देणारे आदेश अमलात येण्याजोगे असावेत असं समजावत सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात असलेल्या मर्यादाही अधोरेखीत केल्या आहेत. त्याचबरोबर लोकांनी सरदारांवर जोक करू नयेत तसेच पसरवू नयेत यासाठी काय मार्गदर्शक तत्त्वे आखता येतील यासंदर्भात सहा आठवड्यात उपाय सुचवण्याचे आवाहनही सर्वोच्च न्यायालयाने गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीला केले आहे.
======================================
राज्यात पाणी योजनांसाठी समान धोरण हवे- पवार 

तासगाव- आमची भूमिका पाणी योजना करायची आणि शेतक-यांना पाणी द्यायची अशी आहे ! शेतक-यांनी पाणीपट्टी भरावी या बाजूचा मी आहे, परंतु पाणीपट्टीच्या धोरणाचाच फेरविचार व्हायला हवा, राज्यात सर्वत्र समान पाणीपट्टी असेल तर सरकारला शेतक-यांनी पाणीपट्टी भरा ! असे म्हणण्याची वेळच येणार नाही. असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अंजनी ता.तासगाव येथे बोलताना केले. 

आर.आर.आबांचा कार्यक्रम आणि पाण्याचा विषय निघणार नाही असे कधीच झाले नाही ! त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमातही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि म्हेैशाळ योजनेचा विषय निघालाच ! माजी मंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्‍यकता आहे. यापूर्वी अनेकदा टंचाईतून म्हैशाळ योजना सुरू केली, हे करत असताना त्यामागे आर. आर. आबाची ताकद होती. आज म्हैशाळबाबत चर्चा सुरू आहेत. ज्यांनी पाणी घेतले त्यांनी पाणीपट्टी भरावी ज्यांना पाणी मिळाले नाही त्यांनी का भरायची ? असा प्रश्‍न उपस्थित केला. 
======================================
विलासपूर: इमारत कोसळून अनेक जखमी
विलासपूर - छत्तीसगड राज्यातील विलासपूर येथे आज (मंगळवार) काम सुरु असलेली एक इमारत कोसळल्याने काही जण जखमी झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विलासपूर येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या मागच्या भागामध्ये अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र बांधण्याच्या उद्देशार्थ या इमारतीचे काम सुरु होते. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी बहुसंख्य जण कामगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. 
======================================
सीरियासंदर्भात आणखी वाट पाहणे अशक्‍य:राष्ट्रसंघ

जिनेव्हा - सीरियामधील हिंसाचार थांबवून शांतता चर्चा पुन्हा सुरु करण्याच्या उद्देशार्थ संयुक्त राष्ट्रसंघाच्या सीरियासंदर्भातील विशेष प्रतिनिधीने सीरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त आज (मंगळवार) सूत्रांनी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सीरियामध्ये मानवतावादी दृष्टिकोनामधून पाठविल्या जाणाऱ्या मदतीस कोणत्याही प्रकारचा अडथळा उत्पन्न होऊ नये, यासाठी करावयाच्या उपाययोजनेच्या घटकाचाही समावेश होता. राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी स्टफान दे मिस्तुरा यांनी सीरियाचे परराष्ट्र मंत्री वालीद अल मौआलेम यांच्याशी या समस्येसंदर्भात दमास्कस येथे चर्चा केली. सीरियामधील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत असून यापलीकडे वाट पाहणे अशक्‍य असल्याचा इशारा राष्ट्रसंघाकडून देण्यात आला आहे. राष्ट्रसंघामधील मानवाधिकार विभागाचे प्रवक्ते रुपर्ट कोलविल्ले यांनी उत्तर सीरियातील रुग्णालये व शाळांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. या भागामध्ये सीरिया व रशियाची लढाऊ विमाने बॉंबफेक करत असल्याचे कोलविल्ले यांनी म्हटले आहे. याचबरोबर, रुग्णालये व शाळांवर जाणुबुजून हल्ला करण्यात आला असेल; तर तो युद्धगुन्हा ठरत असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
======================================
सोनियांनी 'राष्ट्रीयते'ची परिभाषा सांगावी- साध्वी

नवी दिल्ली- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या माता व कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीयतेची परिभाषा म्हणजे नेमके काय ते सांगावे, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) साध्वी प्राची यांनी दौरा केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘राहुल गांधी यांच्या माता भारताच्या पैशावर येथे राहतात अन्‌ पाकिस्तानची स्तुती करतात. या देशद्रोह्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. राष्ट्रीयतेची परिभाषा म्हणजे नेमके काय? या प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावे.‘ साध्वी प्राची यांना ‘जेएनयू‘च्या परिसरात जाण्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव नाकारण्यात आले. विद्यार्थ्यांवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘काही विद्यार्थी हिंदुस्तानचे खातात अन्‌ पाकिस्तानचे गुण गातात, अशा विद्यार्थ्यांना अटक केली पाहिजे.‘
======================================
मुख्यमंत्री निवासाजवळ बलात्कारित मुलीचा मृतदेह
लखनौ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या निवासस्थानाजवळ बलात्कार करून खून करण्यात आलेल्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीमध्ये शिकत असलेली दिपू नावाची विद्यार्थिनी 10 फेब्रुवारी रोजी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. तेव्हापासून ती गायब झाली होती. तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ एका रिक्षाचालकाला नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालामध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
======================================
जम्मू-काश्‍मीर चीनचा भाग - ट्‌विटरचा 'शोध'!
नवी दिल्ली - भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू-काश्‍मीर हा भाग ट्विटरने चीनमध्ये असल्याचे दर्शविले आहे. 



ट्‌विट करताना जर ठिकाण (लोकेशन) निवडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जम्मू आणि काश्‍मीर निवडले तर तो भाग "Jammu and Kashmir, People‘s Republic of China‘ असे दर्शविण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या आणि भारताचा भाग असलेल्या जम्मू-काश्‍मीरमध्ये पाकिस्तान सातत्याने कुरघोड्या करत असतो. इंटरनेटद्वारेही हा भाग भारतात आहे की अन्यत्र याबाबत वाद निर्माण केले जातात. आता ट्विटरनेही या प्रकारात उडी घेतली आहे. ट्‌विटरच्या या कृतीबद्दल भारतीय नेटिझन्स तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
======================================

बारावी परीक्षा कॅापीमुक्तीसाठी आधुनिक तंत्रज्ज्ञानाचा वापर - काकाणी


बारावीच्या परीक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ज्ञानाची मदत घेऊन, कॅापीमुक्तीचा नांदेड पॅटर्न यंदाही प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीचा परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात झालेल्या या बैठकीत त्यांनी परीक्षा कॅापीमुक्त आणि शांततेत व सुरळीत पार पडाव्यात यासाठीच्या उपाययोजनांसाठी विविध निर्देश दिले. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, शिक्षणाधिकारी संदिप सोनटक्के, निरंतर शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरंगे, उपशिक्षणाधिकारी चित्तप्रकाश देशमुख आदींची उपस्थिती होती. 
======================================

======================================
मुखेड; माहिती अधिकारातील हक्काची माहीती देणा-या समतादुतांचे कार्य प्रशंसनीय - बीडीओ रामराजे आत्राम

मुखेड :- 
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे समतादूत गावागावात जाउन नागरिकांना माहिती अधिकार कायदा २००५ ची माहिती देत आहेत. यामुळे सामन्यांमध्ये जनजागृती होत असुन समतादुतांचे हे कार्य प्रशंसनीय असल्याचे मत प्रमुख वक्ते सहायक गटविकास अधिकारी रामराजे आत्राम यांनी व्यक्त केले.
ते मुखेड पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात नुकतेच संपन्न झालेल्या कार्यशाळेत बोलत होते. यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार अतुल जटाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी घोडके, सरकारी अभिवक्ता अँड. आमेर काझी, पत्रकार मिलिंद कांबळे, माहीती तपास अधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय बनसोडे, शहराध्यक्ष शेख आयुब चिखलीकर आदींची उपस्थिती होती.
    यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, समतादूतांच्या माहिती अधिकार कायदा जनजागृतीमुळे प्रशासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि प्रशासन व जनता यांच्यातील दुरावा कमी होईल. माहिती अधिकार कायदा व अन्य कायद्याच्या कलमाविषयी लक्षवेधी माहिती दिली. तसेच कर्मचा-यांनी माहिती अधिकाराला घाबरून न जाता आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती संबंधिताना देवून सहकार्य करावे असे सांगून बार्टीच्या समतादूतांच्या कार्याचे कौतुकही केले.
>
> तर प्रमुख पाहुणे अँड.आमेर काझी यांनी उपस्थितांना कायद्याची सखोल माहिती देवून त्याचे फायदे व नुकसान याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कायदा हा सर्वांसाठी सामान आहे, म्हणून सर्वांनी कायद्याचे पालन करावे असे आवाहन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामतादूत कु.अनीता दहिकांबलके यांनी करून बार्टीच्या पथदर्शी प्रकल्पाबद्दल माहिती दिली. तसेच समता दुतांचे कार्य, कर्तव्य, आचारसंहिता यासह प्रकल्पाच्या माध्यमातून वाढत चाललेली जातीय विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. तसेच स्त्री - पुरुष विषमता स्त्रियांचे शिक्षणातील प्रमाण वाधाविन्ण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. तसेच प्रत्येक गावात संविधान व इतर महापुरुषांच्या २२ पुस्तकांचा संच पोचविण्याचे कार्य बार्टीच्या माध्यमातून होत असून, आजवर सहा गावात पुस्तके वितरीत करण्यात आले. तसेच माहिती अधिकार कायद्याचे महत्व सामन्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य हाती घेण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. या कार्यशाळेत समतादुत जगदीश निवळे, ज्ञानेश्वर हराळे सह मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
======================================
मुखेड; उद्या भारीपच्या वतीने वैचारिक जनजागृती मेळाव्याचे आयोजन
मुखेड :- 
       भारिप बहुजन महासंघ तालुका शाखा मुखेडच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी बुधवारी सकाळी 12 वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बहुजन कार्यकर्ता पदाधिकारी वैचारिक जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन या वैचारिक जनजागृती मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक भारीपचे महाराष्ट्र राज्य महासचिव वसंत साळवे, भारीपचे उपाध्यक्ष नागेश मामा सावंत प्रमुख पाहुणे अमित भुईगळ, डाॅ.बलभिम वाघमारे, पांडुरंग ढवळे मरशिवणिकर, युवा जिल्हाध्यक्ष डाॅ. बळीराम भुरके, अॅड.जि. एस कांबळे, अॅड. तानाजी वाघमारे, डाॅ. संघरत्न कु-हे, अशोक कापसीकर, उत्तम मोगले, भिमराव बेंद्रीकर, भगवान कोकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते उपस्थित रहावे असे आवाहन भारिप बहुजन महासंघ तालुका अध्यक्ष अॅड.संजय भारदे, शहराध्यक्ष डाॅ.राजकुमार जोंधळे, युवा तालुका अध्यक्ष मोहनदादा गायकवाड, गौतम गवळे, तुकाराम गायकवाड, साहेबराव कांबळे, युवा शहराध्यक्ष अशित भारदे, राज शिंगाडे आलुरकर,  रवि ढवळे, बाबुराव कोळगावकर, रमेश गायकवाड, सुधाकर जोंधळे, दिलीप बेटमोगरेकर, साईनाथ सोनकांबळे, अनिल बनसोडे, संजय गवळे आदिंनी केले आहे.
======================================

No comments: