Saturday, 6 February 2016

नमस्कार लाईव्ह ०६-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 

१- पाकिस्तानमधील क्वेटामध्ये सुरक्षा दलाच्या बसवरील स्फोटात ८ जणांचा मृत्यू. ३५ जखमी 

२- टि्वटरनं इस्लामिक स्टेटशी संबंधित १.२५ लाख अकाउंट केली बंद 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

३- दुचाकीवर मागे बसणा-यासही हेल्मेटसक्ती लागू 

४- बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं विराट दर्शन 

५- सियाचीन हिमस्खलनात साताऱ्याचा सुनील सूर्यवंशी शहीद 

६- गुलाम अलींची दिल्लीतील कार्यक्रमास उपस्थिती  

७- ईडीकडून पंकज भुजबळांचा पासपोर्ट जप्त, चौकशीसाठी समन्स 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

८- शनिशिंगणापूर चर्चा निष्फळ, आता मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची 

९- मुंबईत सिलेंडर स्फोटात एकाच घरातील तिघांचा मृत्यू 

१०- ‘नाना’च्या नावाने फसवणूक 

११- हेल्मेट सक्ती ही कंपन्यांच्या फायद्यासाठी- राज ठाकरे

१२- भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी कच्छ येते पाकिस्तानी मच्छिमारांची बोट अडवून ११ जणांना ताब्यात घेतले 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

१३- पैठण; पाण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातील शेतक-यांचे 'शोले' स्टाईल आंदोलन 

१४- 1600 मीटर धावा आणि पोलीस बना 

१५- जऴगाव; रेमण्ड कंपनीच्या कर्मचा-यांनी पगार वाढीच्या मागणीसाठी संप

१६- तामिळनाडू; बस आणि ट्रकची जोरदार टक्कर, १३ ठार, २० जखमी 

१७- प्रख्यात व्यंगचित्रकार सुधीर तेलंग यांचं ब्रेन ट्युमरमुळे निधन 

१८- टांझानियाच्या महिलेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बंगळूर येथील यशवंतपूरमचे पोलीस उपायुक्त निलंबित 

१९- तामिळनाडू; वेल्लोर येथील भारती दासन इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये स्फोट, पाच बसगाड्यांचे नुकसान, एक ड्रायव्हर ठार

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

२०- जोडीदाराचा अपमान हेच घटस्फोटाचे प्रमुख कारण - मानसशास्त्रज्ञ जॉन गोटमॅन 

२१- इराफन पठाणचं सौदी अरेबियात गुपचूप लग्न 

२२- अंडर 19 वर्ल्ड कप : भारताचा 197 धावांनी विजय 

२३- आयपीएल लिलाव : वॉटसनला 9.5 कोटी तर युवराजला 7 कोटींची बोली 

२४- नवा चित्रपट : घायल वन्स अगेन  

२५- योग्य व्यक्ती जर बरोबर असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे असतो’; करण आणि बिपाशामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांना अधिक उधाण  

२६- ‘पोश्टर गर्ल- अख्या गावासाठी येकच बस’ शीर्षकामागचे रहस्य  

~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते

(विनया देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~

विकणे आहे 

भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.

संपर्क- 7350625656

~~~~~~~~~~~~~~~~~~~

घरांची आर्टिफिशिअल सजावट 

फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://goo.gl/lE9S67

**********************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://goo.gl/uS8DX4

========================================================

बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं विराट दर्शन


विशाखापट्टणम जवळ बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं विराट दर्शन घडलं. आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सध्या विशाखापट्टणममध्ये सुरू आहे. भारताचे राष्ट्रपती आणि सरसेनापती प्रणव मुखर्जी यांनी या संचलनाचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते. भारताच्या प्रमुख विनाशिका,पानबुड्या आणि युद्धनौकांनी धडाकेबाज शक्तीप्रदर्शन करत आपला दबदबा निर्माण केलाय.
भारताच्याही आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकासह महत्त्वाच्या विनाशिका आणि पाणबुडी या
संचलनात सहभागी झाल्यात. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ती भारताची आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत. या सर्व संचलनात एकुण 25 हजार नौसैनिक सहभागी झाले आहे. ‘महासागरातून एकात्मता’ असं बोधवाक्य असलेल्या या आंतरराष्ट्रीय नौदल संचलनात भारताचं सामरिक सामर्थ्यजगाला दिसणार आहे. यात अनेक कवायती सादर करण्यात आल्या. राष्ट्रपतींनी अनेक नौकांचा आढावा घेतला, आणि त्या नौकांवरच्या अधिकार्‍यांकडून मानवंदना स्वीकारली. पंतप्रधान मोदी अतिशय लक्ष देऊन सगळा कार्यक्रम बघत होते, आणि मध्येमध्ये दुर्बिणीचाही वापर करत होते. विशेष म्हणजे आज ते आपल्या बीएमडब्ल्यूमधून न येता रेंज रोव्हर या गाडीतून या संचलनासाठी आले. अमेरिका, रशिया, चीन, इंग्लँड, जपान आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य देशांच्या नौदलासह एकूण 50 देशांच्या युद्धनौका या संचलनात सहभागी झाल्या आहेत.

===================================================

इराफन पठाणचं सौदी अरेबियात गुपचूप लग्न

इराफन पठाणचं सौदी अरेबियात गुपचूप लग्न
नवी दिल्ली : भारताचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू इरफान पठाणने सौदी अरेबियातील मक्का शहरात गुपचूप ‘निकाह’ केला आहे. 31 वर्षीय इरफानने मक्का शहरात राहणाऱ्या 21 वर्षीय मॉडेल सफा बेग हिच्याशी लगीनगाठ बांधली.
हा संपूर्ण लग्नसोहळ मीडियापासून दूर ठेवण्यात आला होता. मात्र सोशल मीडियावर इरफानची लग्नपत्रिका आणि त्याची बायको सफाचे फोटो व्हायरल झाले.
इरफानच्या घरी रविवारी लग्नाचे विधी झाले. त्यानंतर इरफान त्याच्या परिवारासह सौदी अरेबियाला रवाना झाला.
दुबईत ओळख
इरफान आणि सफा यांची दोन वर्षापूर्वी दुबईत ओळख झाली होती. दोघांची मैत्री वाढली. इरफानच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी सफा बडोद्यालाही आली होती. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी इरफान- सफाचं लग्न ठरवलं. तीन महिन्यापूर्वीच त्यांचा साखरपुडाही झाला.
========================================================

अंडर 19 वर्ल्ड कप : भारताचा 197 धावांनी विजय

अंडर 19 वर्ल्ड कप : भारताचा 197 धावांनी विजय
ढाका : ईशान किशनच्या भारतीय संघानं नामिबियाचा 197 धावांनी धुव्वा उडवून एकोणीस वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
बांगलादेशातील फत्तुल्लामध्ये झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं नामिबियाला विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना नामिबियाचा डाव 38.5 षटकांत 152 धावांत आटोपला.
भारताकडून मयांक डागरनं आणि अनमोलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी तीन, तर वॉशिंग्टन सुंदरनं दोन विकेट्स काढल्या.
याआधी ऋषभ पंतच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतानं 50 षटकांत सहा बाद 349 धावांची मजल मारली होती. ऋषभ पंतनं 96 चेंडूंत 14 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 111 धावांची खेळी रचली. भारताकडून सरफराझ खाननं 76 आणि अरमान जाफरनं 64 धावांची खेळी केली.
========================================================

आयपीएल लिलाव : वॉटसनला 9.5 कोटी तर युवराजला 7 कोटींची बोली

आयपीएल लिलाव : वॉटसनला 9.5 कोटी तर युवराजला 7 कोटींची बोली
बंगळुरु: आयपीएलच्या नवव्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव बंगळुरुमध्ये सुरु आहे. या लिलावात आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. वॉटसनसाठी रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरने तब्बल नऊ कोटी 50 लाख रुपयांची बोल लावली.
तर युवराज सिंह हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. आयपीएलच्या नवव्या मोसमात युवराज सिंह सनरायझर्स हैदराबादचं प्रतिनिधित्त्व करताना दिसेल. सनरायझर्स हैदराबादने युवीसाठी 7 कोटी रुपयांची रक्कम मोजली. युवीसह हैदराबादने आशिष नेहरालाही आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं. नेहरासाठी हैदराबादने 5 कोटी 50 लाखांची बोली लावली.
दिल्ली डेअरडेव्हिल्सने ख्रिस मॉरिससाठी 7 कोटी आणि संजू सॅमसनसाठी 4 कोटी 20 लाख रुपये मोजले. पुण्यानं केविन पीटरसनसाठी साडे तीन कोटी, तर ईशांत शर्मासाठी 3 कोटी 80 लाखांची बोली लावली. तर मुंबई इंडियन्सने जोस बटलरवर 3 कोटी 80 लाखांची बोली लावून आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं.

========================================================

सियाचीन हिमस्खलनात साताऱ्याचा सुनील सूर्यवंशी शहीद

सियाचीन हिमस्खलनात साताऱ्याचा सुनील सूर्यवंशी शहीद
जम्मू-काश्मीर : सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात वीरमरण आलेल्या दहा जवानांमध्ये महाराष्ट्रातील एका जवानाचा समावेश आहे. सुनील विठ्ठल सूर्यवंशी असं या जवानाचं नाव असून ते सातारा जिल्ह्यातील आहेत.
सियाचीनमध्ये सैन्याची एक तुकडी दोन दिवसांपूर्वी 5800 मीटर म्हणजेच 19000 फूट उंचीवर गस्त घालत होती, त्यावेळी हिमकडा कोसळल्याने बर्फात अडकून दहा जवान शहीद झाले. यामध्ये साताऱ्याचे सुनील सूर्यवंशी, एका ज्युनियर कमिशन्ड अधिकाऱ्याचा समावेश होता.
या बातमीनंतर सूर्यवंशी यांच्या माण तालुक्यातील मस्करवाडी या गावावर शोककळा पसरली आहे. नुकतचं लग्न झालेल्या सूर्यवंशी यांना एका वर्षाची मुलगी आहे.
काही दिवसांपूर्वी सुनील यांनी आपल्या गावी नवीन घर बांधलं होतं, त्या घराची वास्तूशांत आणि मुलीचं बारसं एकत्र करण्याचा सूर्यवंशी कुटुंबाचा बेत होता. पण त्याआधीच सूर्यवंशी यांन वीरमरण आलं.
========================================================

दुचाकीवर मागे बसणा-यासही हेल्मेटसक्ती लागू


अपघाताची तीव्रता टाळण्यासाठी दुचाकीवरील दोन्ही व्यक्तिंना हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. परीवहन आयुक्तांनी आज शविनारी या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक काढले असून उच्च न्यायालयाने २००३मध्ये दिलेल्या आदेशानुसार दुचाकी वाहनचालक व त्याच्या मागे बसून प्रवास करणारा अशा दोघांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आल्याचे म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे शासनास बंधनकारक आहे. यासाठी दुचाकी खरेदी करतेवेळीच उत्पादक दोन हेल्मेट ग्राहकाला देतील असे निर्देशही परीवहन आयुक्तांनी दिले आहेत. 
वाहन नोंदणी अधिका-यानेही वाहनाच्या कागपत्रांसोबत ग्राहकाला दोन हेल्मेट देण्यात आल्याची खातरजमा करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

========================================================

शनिशिंगणापूर चर्चा निष्फळ, आता मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची 


शनिशिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, मंदिराचे विश्वस्त आणि महिला कार्यकर्त्या यांच्यामध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. ही परंपरा ४०० वर्षांची असल्याने ती मोडणे शक्य नसल्याचे विश्वस्तांचे म्हणणे होते, तर विश्वस्तांची भूमिका पटण्यासारखी नसल्याचे भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी सांगितले.
या बैठकीला संबंधितांबरोबरच स्थानिक नेतेही उपस्थित होते. प्रथा परंपरा पाळण्यावर विश्वस्त ठाम राहिले, तर पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही अधिकार मिळाला पाहिजे यावर कार्यकर्ते ठाम राहिले. कुणीच नमतं न घेतल्याने तिढा कायम राहिला आहे. मात्र, यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असे त्यांनी एकमताने ठरवले आहे. मंगळवारी भूमाता ब्रिगेडच्या प्रतिनिधी महिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.

========================================================

पैठण; पाण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातील शेतक-यांचे 'शोले' स्टाईल आंदोलन


 जायकवाडी धरणातून पाणी सोडा या मागणीसाठी ३ तारखेपासून पासून  सुरू असलेले शेतक-यांचे आंदोलन काल आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतक-यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारात केलेले 'शोले' स्टाईल आंदोलन खूप गाजले. शुक्रवारी शेतक-यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. 
अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने जयाजीराव सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बुधवार पासून पैठण येथे आंदोलन सुरू झाले. या शेतक-यांना पोलिसांनी स्थानबध्द करून रात्री ८ च्या दरम्यान मुक्त केले. त्यानंतर  दुस-या दिवशी सकाळी शेतकरी पावन गणपती मंदिर येथे जमा झाले, मात्र तेथे पुन्हा पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान हे शेतकरी पुन्हा तहसिल कार्यालयात जमा झाले, तेथे त्यांनी प्रशासनाच्या खुलाशाची वाट पाहिली पण निराशा पदरी पडल्याने शेवटी दुपारी ३च्या दरम्यान तहसिल कार्यालयाच्या प्रांगणा बाहेर बेमुदत उपोषण करण्यास प्रारंभ केला. जोपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय होत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहिल असे जयाजी सुर्यवंशी यांच्यासह शेतकर्यांनी भूमिका घेतली शेवटी तहसीलदार किशोर देशमुख भाजपा चे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांनी प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे यांच्याशी दि ५ रोजी आंदोलन करणा-या शेतक-यांचे संवाद साधला व त्यानंतर आंदोलक शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले 
========================================================

टि्वटरनं इस्लामिक स्टेटशी संबंधित १.२५ लाख अकाउंट केली बंद 


टि्वटरने गेल्या काही महिन्यांमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित सव्वा लाख अकाउंट बंद केली आहेत. ज्यावेळी अन्य युजर तक्रार करतात त्याचवेळी अकाउंट बंद करण्यात येतात असं टि्वटरनं म्हटलंय. तक्रारींची दखल घेणा-या अधिका-यांची संख्या वाढवण्यात आल्याचं आणि प्रतिसाद खूपच त्वरेने देत असल्याचं सांगितलं.
दहशतवादाचा वाढता धोका आणि त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा प्रसार रोखण्यासाठी फेसबुकसह अनेक कंपन्यांनी वादग्रस्त पोस्टना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. 
अर्थात, अशा प्रकारच्या बंदीची मागणी जगभरातल्या देशांकडून राजकीय कारणास्तव करण्यात येईल अशी काळजीही सोशल मीडिया कंपन्यांना वाटत आहे. तसेच, या कंपन्या विविध देशांमधल्या सरकारच्या हातचं बाहुलं बनतात की काय अशी भीतीही त्यांना सतावत आहे. 

========================================================

‘नाना’च्या नावाने फसवणूक


नाशिक : ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून एकीकडे अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करीत असताना, दुसरीकडे याच मदतीवर डल्ला मारण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे उघड झाले आहे. ‘नाम’ची मदत मिळालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाना पाटेकर यांचे नाव सांगून त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार झाल्याचे खुद्द मकरंद अनासपुरे यानेच नाशिकमध्ये सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना काही भामट्यांनी फोन केले. ‘तुम्हाला मदत म्हणून मिळालेल्या १५ हजारांपैकी तीन हजार रुपये अमुक खात्यावर जमा करा. तसे केल्यास नाना पाटेकर हे स्वत:च्या खात्यातून तुम्हाला पुन्हा एक लाख रुपयांची मदत देणार आहेत’, असे या कुटुंबांना सांगण्यात आले. अशा प्रकारे सहा कुटुंबांकडून पैसे उकळण्यात हे भामटे यशस्वी झाले; मात्र सातव्या वेळेला पकडले गेले. त्यामुळे नागरिकांनी फक्त ‘नाम’च्या अधिकृत खात्यावरच रक्कम जमा करावी व कोणाकडून रक्कम भरण्यासाठीचा फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अनासपुरेने केले. नाम कोणाकडूनही रोख पैसे स्वीकारत नसून, केवळ ‘नाम’च्या अधिकृत खात्यावर धनादेश व अधिकर्षाद्वारेच पैसे स्वीकारले जातात. नानांच्या नावाने सोशल मीडियावर फिरणारे सगळे मेसेज बनावट आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये, असेही त्याने स्पष्ट केले.नाम फाउंडेशनच्या वतीने शंकराचार्य संकुल येथे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी जिल्ह्यातील ८५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपये मदतीचे धनादेश शुक्रवारी सुपूर्द केले. नाना पाटेकर म्हणाला, नुसते पाणी अडवा, पाणी जिरवा करून भागणार नाही, तर गावातून शहराकडे जाणारी मुले अडवा आणि त्यांना गावातच जिरवा. कारण ही मुले नव्या पद्धतीने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करू शकतात. जुनी मंडळी तेवढ्या क्षमतेने हे करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘नाम’ पुरी पडणार नाही. पण यानिमित्ताने आम्ही सरकारपुढे एक मॉडेल सादर केले. काही यंत्रणा नसताना आम्ही एवढे करू शकतो, मग तुम्ही का नाही, असा जाब आता विचारू शकतो.‘तिला का उठवलं?’
एका महिलेचे बाळ रडू लागल्याने स्वयंसेवकाने तिला उठून मागे जायला सांगितले. नानाने ते टिपून लगेच त्या स्वयंसेवकाला ‘तिला का उठवलं’ असा जाब विचारला. त्याने ‘बाळ रडत होतं’ असे उत्तर देताच ‘मग रडू दे की’ म्हणत त्या महिलेला नाना व मकरंद यांनी पुन्हा बसायला सांगितले. एका स्वयंसेवकाने शेतकऱ्याला ढकलल्याचे पाहूनही नाना चांगलाच संतापले. पाच लाख देतो, कार्यक्रमाला या... : आम्हाला वैयक्तिक पैसे नको. अनेकांचे फोन येतात. पाच लाख रुपये मदत देतो, आमच्या कार्यक्रमाला याल का, अशी विचारणा होते. हे गंभीर कार्य आहे. अगदी साहित्य संमेलनात एक कोटी रुपयांची मदत देऊनही ती स्वीकारण्यास ‘नाम’चा प्रतिनिधी नव्हता, हे मकरंद यांनी नमूद केले.
========================================================
गुलाम अलींची दिल्लीतील कार्यक्रमास उपस्थिती 
नवी दिल्ली - पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा गेल्या महिन्यात मुंबईत होणारा ‘घर वापसी‘ चित्रपटाच्या संगीत प्रसिद्धी कार्यक्रम रद्द झाल्यानंतर, आता दिल्लीत 5 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक सुहैब इलियासी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम अली 5 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित असतील. शिवसेनेच्या धमक्यांमुळे आम्ही मुंबईतील कार्यक्रम रद्द केला होता. आता हा कार्यक्रम दिल्लीत घेण्यात येणार आहेत. गुलाम अली प्रथमच या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. तसेच या चित्रपटात त्यांनी काही गझल गायल्या आहेत.
यापूर्वी हा कार्यक्रम 29 जानेवारीला मुंबईत होणार होता. पण, शिवसेनेकडून पाकिस्तानी कलावंतांना होत असलेला विरोध पाहता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. गेल्यावर्षी गुलाम अली यांचे मुंबई आणि पुण्यात होणार गझल गायनाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते.
========================================================
जोडीदाराचा अपमान हेच घटस्फोटाचे प्रमुख कारण
लंडन - विवाहानंतर विभक्त होऊन घटस्फोट घेण्यामागे अपमानास्पद जोडीदाराला अपमानास्पद वागणूक देणे हे प्रमुख कारण असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ जॉन गोटमॅन आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील रॉर्बर्ट लेवेसन यांनी घटस्फोटाच्या कारणांचा सखोल अभ्यास केला आहे. फसवणुकीपेक्षाही जोडीदाराकडून होत असलेल्या अपमानाचा दांपत्यांच्या विवाहित जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. ताणतणाव किंवा नकारात्मक विचारांपेक्षा राग आणि किळस हेच अधिक भयानक असून विभक्त होण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. जोडीदाराने आपल्याला समान समजण्याऐवजी कमी लेखण्याची भावना विवाहितांना अपमानास्पद वाटते.
या अभ्यासामध्ये 79 नवविवाहितांचा तब्बल 14 वर्षे विविध दृष्टीकोनातून अभ्यास करण्यात आला. जर दुसऱ्या दीर्घ आणि सुखी वैवाहिक जीवन जगायचे असेल तर अवमान झटकून सकारात्मक विचार रूजविण्याची गरज असल्याचा निष्कर्षही संशोधनातून मांडण्यात आला आहे.
========================================================
नवा चित्रपट : घायल वन्स अगेन 
अमिताभ बच्चन यांच्यानंतर सनी देओलनं ‘अँग्री यंग मॅन‘ची ‘गादी‘ काही वर्ष चालवली व 1990च्या दशकातील ‘घायल‘ आणि ‘घातक‘सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना खिळवूनही ठेवलं होतं. सनी देओलला तब्बल 26 वर्षांनतर ‘घायल‘चा सिक्वेल काढण्याची इच्छा झाली ‘घायल वन्स अगेन‘ म्हणत तो पुन्हा एकदा अन्याय करणाऱ्यांविरुद्ध दंड (की ढाई किलो का हात) थोपटून उभा राहिला आहे. सनीसह सर्वच कलाकारांचा अभिनय, ‘कट टू‘ संकलन, श्‍वास रोखायला लावणारे पाठलाग या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, चित्रपटाचं कथानक आजच्या काळाला फारसं सुसंगत नसल्यानं व खलनायकांनी मुलीला ओलिस ठेवायचं आणि बापानं हाणामारी करायची हा फॉर्म्युला आता कालबाह्य झाल्यानं चित्रपट खिळवून ठेवू शकत नाही. 
‘घायल वन्स अगेन‘मध्ये आपला जुना हिरो अजय मेहरा (सनी देओल) पंधरा वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आला असून, ‘सत्यकाम‘ नावानं एक वर्तमानपत्र चालवतो आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींना शोधून त्यांना धडा शिकवणं हे (अर्थातच) या वर्तमानपत्राचं काम. मुलीवर अत्याचार केलेल्या एका प्रतिस्पर्धी वर्तमानपत्राच्या मालकाला तो असंच बुकलून काढतो. मागील भागातील इन्स्पेक्‍टर जो डिसूझा (ओम पुरी) आता अजयचे सहकारी आहेत. ते माहितीच्या अधिकारात उद्योजकांची कृष्णकृत्यं बाहेर आणू पाहतात. त्यामुळं राज बन्सल (नरेंद्र झा) हा बडा उद्योजक चिडतो व त्याचा मुलगा जोचा काटा काढतो. पक्ष्यांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला अपघातानेच या घटनेचं चित्रीकरण मिळतं. ही गोष्ट अजयला सांगण्याचा या विद्यार्थ्यांचा विचार असतो, मात्र त्यातील एकाचे वकील वडील (सचिन खेडेकर) हे चित्रण बन्सलला नेऊन देतात. मात्र, त्याची एक कॉपी अजयला मिळतेच. बन्सल आता अजय बरोबरच या मुलांच्या मागं लागतो. जो आणि मुलांना मारहाणीचा बदला घेण्यासाठी अजय सरसावतो. तुफान हाणामाऱ्या, पाठलाग आणि अनेक परदेशी पहिलवानांना धूळ चारल्यानंतर अजय शांत होतो... 
चित्रपटाची कथा अगदी अपेक्षित रस्त्यानं प्रवास करते. पात्रांची गर्दी आणि उपकथानकांच्या भडीमारामुळं मूळ कथा अनेकदा मागं पडतं. हॅकिंगचे प्रसंग, विमानातून चित्रीकरण आदी माध्यमातून दिग्दर्शक (स्वत: सनी) कथा आजच्या काळात आणू पाहतो, मात्र तिचा आत्मा जुनाच राहतो. मध्यंतरानंतर पाठलागाचे प्रसंग थांबतात आणि चित्रपटाचा वेगही कमी होतो. अजयचं इमारतीमध्ये हेलिकॉप्टर घुसवणं, बन्सलच्या गुडांनी बंदुका टाकून अजयला हातानंच (?) मारण्याचा निर्णय घेणं या प्रसंगात खरंतर हसूच येतं. बन्सलचे गुंड मॉलमध्ये मुलांचा पाठलाग करतात आणि अजय त्यातील एका गुंडाला रस्त्यात पाठलाग करून चित्रण हस्तगत करतो हे प्रसंग छान रंगले आहेत. शेवट मात्र ओढून-ताणून केल्यासारखाच वाटतो. 
सनी देओलचा 1990मधील जोश आता ओसरला आहे, मात्र त्यानं मोठ्यानं ओरडून म्हटलेले संवाद आणि जोरदार ठोसे अजूनही त्याच्या चाहत्यांना खूष करतात. ओम पुरी भूमिका छोटी असूनही लक्षात राहतात. नरेंद्र झा यांचा सर्वाधिक प्रभाव पडतो. उद्योजकाची अनेक छटा असलेली भूमिका त्यांनी जोशात साकारली आहे. (‘हैदर‘ या चित्रपटामध्ये त्यांनी शाहीद कपूरच्या वडिलांची भूमिका जबरदस्त साकारली होती.) सोहा अली खाननं डॉक्‍टरची भूमिका समरसून केली आहे. चित्रपटातील अनेक टीनएजर कलाकार आपापल्या भूमिका चोख बजावतात. सचिन खेडेकर, रमेश देव, नीना कुलकर्णी आदी मराठी कलाकारांचा चांगला प्रभाव पडतो. 
एकंदरीतच, बहुतांश आघाड्यांवर चांगला असलेला हा चित्रपटाला केवळ कथा कालसुंसगत नसल्यानं ‘नॉट‘ वन्स अगेन म्हणायची वेळ येते... 

========================================================

मुंबईत सिलेंडर स्फोटात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

मुंबईत सिलेंडर स्फोटात एकाच घरातील तिघांचा मृत्यू
मुंबई : मुंबईच्या विक्रोळीतील पार्कसाईड एका घरात झालेल्या सिलेंडर स्फोटात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. 
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत तिघांचे जीव गेले. 
मोहम्मद सलीम बेलीम (वय 8 वर्ष), मिराज सलीम बेलीम (वय 15 वर्ष) आणि सलमा सलीम बेलीम (वय 40 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.  राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु असताना तिघांचाही मृत्यू झाला.
========================================================

ईडीकडून पंकज भुजबळांचा पासपोर्ट जप्त, चौकशीसाठी समन्स


ईडीकडून पंकज भुजबळांचा पासपोर्ट जप्त, चौकशीसाठी समन्स
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ कुटुंबीयांची अडचणी वाढतच आहे. अंमलबजावणी संचलनालयाने समीर भुजबळ यांच्यापाठोपाठ पंकज भुजबळ यांचा पासपोर्ट जप्त केला आहे. देशाबाहेर जाऊ नये यासाठी ईडीने ही कारवाई केली आहे. 
यासोबतच अंमलबजावणी संचलनालयाने चौकशीसाठी पंकज भुजबळ यांना समन्सही बजावला आहे. शिवाय छगन भुजबळांनाही लवरकच समन्स बजावण्यात येईल, असं कळतं. 
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने यापूर्वीच समीर भुजबळ यांना अटक केली आहे. आता पंकज भुजबळ यांना चौकशीसाठी बोलावल्याने त्यांच्या अटकेची शक्यताही वाढली आहे. भुजबळांच्या कुटुंबीयांची चौकशी होत असतान छगन भुजबळ मात्र अजूनही अमेरिकेत आहेत.
========================================================
हेल्मेट सक्ती ही कंपन्यांच्या फायद्यासाठी- राज ठाकरे



हेल्मेट वापरणे योग्य असून, त्याने माणसाचा जीव वाचतो, हे मला मान्य आहे. पण त्याची सक्ती नको. कोणतीही सुविधा न देता हेल्मेट सक्ती नागरिकांच्या हितासाठी आहे की हेल्मेट उत्पादकांच्या फायद्यासाठी आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी आज केला. मनसे कसबा विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पूर्वी हेल्मेट सक्तीला विरोध करणारेच आता हेल्मेट सक्ती करीत आहेत. हे सत्तेचे शहाणपण आहे, असा टोला लगावत पुण्यात लागू करण्यात आलेली हेल्मेटसक्ती ही कंपन्यांच्या फायद्यासाठीच असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. हेल्मेट सक्ती करण्याआधी रस्ते नीट करण्याची सक्ती का नाही? असा सवालही राज यांनी यावेळी केला. रस्त्यांवर खड्डे आहेत, अनेक ठिकाणी डिव्हायडर नाहीत. रस्त्यावर आधी योग्य सुविधा द्या, या शब्दात त्यांनी सुनावले.
========================================================
योग्य व्यक्ती जर बरोबर असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे असतो’; करण आणि बिपाशामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांना अधिक उधाण 

तुमच्यासोबत जर योग्य व्यक्ती असेल तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असू शकतो अशी प्रतिक्रिया सध्या बिपाशा बासूच्या प्रेमात पडलेल्या करण सिंग ग्रोव्हरने दिली आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी केलेल्या प्लॅनबाबत विचारले असता करण म्हणाला, व्हॅलेंटाईन डेसाठी मी कोणताही प्लॅन केलेला नाही. माझ्यासाठी हा दिवस इतर दिवसांसारखाच असतो. जर तुमच्यासोबत योग्य व्यक्ती असेल तर तुमचा प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे असतो. पण माझा वाढदिवस आता जवळच आला आहे. त्यामुळे आम्ही बाहेर फिरायला जायचे ठरवले आहे. करण सिंग ग्रोव्हरचा त्याची दुसरी पत्नी जेनिफर विंगेट हिच्याबरोबर लवकरच घटस्फोट होणार आहे. नुकतेच करण आणि बिपाशाने नवर्वर्षाचे सेलिब्रेशन एकत्र साजरे केले होते. तसेच करणने नवर्वर्षाचे सेलिब्रेशन बरोबर बिपाशाचा वाढदिवस सुद्धा परदेशात एकत्र साजरा केला. त्यामुळे करण आणि बिपाशामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे. 
========================================================
‘पोश्टर गर्ल- अख्या गावासाठी येकच बस’ शीर्षकामागचे रहस्य 

‘पोश्टर गर्ल’चे पोस्टर प्रदर्शित झालेआणि सगळ्यांच्या ओठावर बसली या चित्रपटाची टॅगलाइन ती म्हणजे ‘अख्या गावासाठी येकच बस – पोश्टर गर्ल’चित्रपटाच्या पहिल्या – वहिल्या पोस्टरमध्ये ही अनोखी टॅगलाइन देण्याचे कारण म्हणजे संपूर्ण गावात असणारी एकुलती एक मुलगी. जिची भूमिका बजावली आहे सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने. चित्रपटात सोनाली एकमेव अभिनेत्री आहे. पण या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानही ती एकटीच होती. एकंदर १० पुरूष कलाकारांच्या गोतावळ्यात हे चित्रिकरण पार पडले. याचे कितपत दडपण आले होते असा प्रश्न केला असता ती म्हणाली, ‘धमाल, मजा आणि मस्तीमध्ये हे चित्रीकरण झाले, चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासूनच आमचं ट्युनिंग खूप छान जमलं होतं त्यामुळे दडपण येण्याचा प्रश्नच नव्हता.’ त्याशिवाय चित्रपटात आणि सेटवर एकुलती एक असल्याने खूप लाड झाल्याचा आनंदही तिने व्यक्त केला. अमितराज यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून क्षितिज पटवर्धन यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत.  समीर पाटील दिग्दर्शित अशी ही एकुलती एक….वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांची ‘पोश्टर गर्ल’. १२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 
========================================================

1600 मीटर धावा आणि पोलीस बना


मुंबई पोलीस बनण्याचं स्वप्न पाहणऱ्या तरुणांसाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. विशेष म्हणजे पोलीस भरतीदरम्यान धावण्याची चाचणी होते, त्या धावण्याचं अंतरही कमी केलं आहे.
4014 पदांसाठी प्रक्रिया, महिलांसाठी 30 जागा राखीव
राज्यात एकूण 4 हजार 14 पदांसाठी पोलिसांची भरती होणार आहे. यामध्ये 30 टक्के जागा महिलांसाठी राखवी असणार आहेत. 3 टक्के पदं पोलिसांच्या पाल्यांसाठी, तर 2 टक्के पदं ड्युटीवर असताना निधन झालेल्या पोलीस कर्माचाऱ्यांच्या पाल्यांसाठी असणार आहेत. विशेष म्हणजे राखीव जागांचे ही टक्केवारी यावर्षीपासून प्रत्येक पोलीस भरतीसाठी लागू असणार आहे.
धावण्याचं अंतरही कमी
याआधी झालेली पोलीस भरती वादात आली होती. कारण पोलीस भरतीतल्या धावण्याच्या चाचणीदरम्यान काही उमेदवारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धावण्याचं अंतर हा मुद्दा वादात आला होता. त्यामुळे धावण्याच्या चाचणीतील अंतरही कमी करण्यात आलं आहे. पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटरऐवजी 1600 मीटर आणि महिला उमेदवारांना 3 किलोमीटरऐवजी 800 मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.


========================================================

No comments: