Tuesday, 23 February 2016

नमस्कार लाईव्ह २३-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- जैशचा प्रमुख मसूद अझर पाकिस्तानच्या ताब्यात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- संसदेचंं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, गदारोळाचे संकेत 
३- अर्थसंकल्पी अधिवेशन फलदायी ठरेल- मोदी 
४- मोदी सरकारकडून राष्ट्रभक्तीची नकली चर्चा - सोनिया
५- येशू ख्रिस्त तामिळ ब्राह्मण, बाबाराव सावरकरांचा दावा 
६- उमर खालिद, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? 
७- नांदेडमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज, 25 जण जखमी 
८- गरिबी हा हिंसेचा सर्वात वाईट प्रकार- राष्ट्रपती 
९- 'एनडीए'मुळे देशात भीती- सीपीआय 
१०- कन्हैया कुमारच्या जामीनावर उद्या सुनावणी  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- मुख्यमंत्र्यांचं विकासापेक्षा अहंकाराचं राजकारण: पृथ्वीराज चव्हाण 
१२- खुशखबर! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवली 
१३- आमदार शाळा दत्तक योजना, शैक्षणिक प्रगतीसाठी उपक्रम  
१४- समीर भुजबळांच्या अडचणीत भर, न्यायालयीन कोठडीत वाढ 
१५- पुणे; संजय दत्तची गुरुवारी सुटका, 8 महिनेआधीच येणार जेलबाहेर 
१६- घटस्फोटाची धमकी देणे हे पतीविरुद्धचे ‘क्रूर कृत्य’ - दिल्ली उच्च न्यायालय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- भूज; भिकाऱ्याचं लाखो रुपयांचं दान, मंदिरात पक्षांसाठी घर 
१८- इंदापूर; चोरीच्या संशयातून अल्पवयीन मुलीला विवस्त्र करुन मारहाण 
१९- पुणे; हात गमावलेल्या साहिलच्या जिद्दीला सलाम, 12 वीचे पेपर पायाने सोडवले 
२०- श्रीनगर; जवान लढत असताना मशिदीमधून अतिरेक्यांचे कौतुक सुरु होते 
२१- पुणे: पौड फाटा चौकाजवळ तरुणाचा खून 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- 'जय गंगाजल'चा नवा ट्रेलर, दबंग अवतारात प्रियंकाची डायलॉगबाजी 
२१- दिलीप कुमार वयाच्या 94 व्या वर्षी कोर्टाची पायरी चढणार 
२४- 5G; एक श्वास घ्या, तोपर्यंत 3 तासाचा सिनेमा डाऊनलोड झाला असेल 
२५- रविना टंडन टीव्हीवर सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री 
२६- बिग बॉस फेम अभिनेता आर्य बब्बर लग्नाच्या बेडीत 
२७- आशिया चषक: कर्णधार धोनीला दुखापत, पार्थिव पटेलचा संघात समावेश 
२८- संजय दत्तची कमाई केवळ ४४० रुपये 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मोहनसिंग ठाकूर, संदीप पाटील, शशिकांत तालीमकर, शहेद शिद्दीकी, श्यामसुंदर शिंदे, किशोर देशमुख, दीपक खराडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


=======================================

येशू ख्रिस्त तामिळ ब्राह्मण, बाबाराव सावरकरांचा दावा

येशू ख्रिस्त तामिळ ब्राह्मण, बाबाराव सावरकरांचा दावा
मुंबई : ख्रिस्त धर्माचे संस्थापक खुद्द येशू ख्रिस्तच तामिळ हिंदू ब्राह्मण होते, असा दावा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकरांनी 1946 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात केला होता. रा. स्व. संघाच्या पाच संस्थापकांपैकी एक असलेल्या बाबारावांचे पुस्तक येत्या 26 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलं जाणार आहे. 
1946 मध्ये लिहिलेल्या ख्रिस्त परिचय या पुस्तकाचं मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात येशू ख्रिस्ताने काश्मीरमध्ये समाधी घेतल्याचा दावा केला आहे. 
येशू ख्रिस्ताच्या जन्मभूमीचा स्पष्ट उल्लेख पुस्तकात नसावा, मात्र पॅलेस्टाईन आणि अरब भूमी ही पूर्वी भारताचा भाग होती व जीजस (येशू) हे योग शिकण्यासाठी भारतात आले होते, असं म्हटलं आहे. योग आणि आध्यात्मिकतेमुळेच येशूना सुळावर चढवल्यानंतरही ते जिवंत राहू शकले. त्यानंतर हिमालयातील जडी-बुटींनी त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांची प्रकृती सुधारली, असं म्हटलं आहे. 
पुस्तकात कोणकोणते दावे? 
*केशव कृष्णा यावरुन येशू ख्रिस्त हे नाव
*त्यांचे आई-वडील तामिळ हिंदू, अर्थात मातृभाषाही तामिळ
*येशू सुतारकाम करत, कुटुंबाला आचार्य ही पदवी बहाल
*येशूचा रंगही काळा-सावळा
 *येशूच्या वडिलांचे नाव जोसेफ हे शेषफचा अपभ्रंश. शेषफ म्हणजेच शेषप्पा, हे नाव तामिळमध्ये सर्रासपणे वापरले जाते
*वयाच्या 12 व्या वर्षी मंदिरात येशूची मुंज
=======================================

दिलीप कुमार वयाच्या 94 व्या वर्षी कोर्टाची पायरी चढणार 

दिलीप कुमार वयाच्या 94 व्या वर्षी कोर्टाची पायरी चढणार
मुंबई : ट्रॅजेडी किंग आणि दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना वयाच्या 94 व्या वर्षी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. मुंबईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 18 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात दिलीप कुमार यांना आज (23 फेब्रुवारी) कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 
त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना दु:ख होत आहे की, 18 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात दिलीप साहब उद्या कोर्टात हजर राहणार आहेत. गिरगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी एस खराडे हे या प्रकरणावर सुनावणी करणार आहेत, असं ट्वीट सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन केलं आहे.
=======================================

उमर खालिद, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?

उमर खालिद, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील भारतविरोधी घोषणांमागे नेमकं कोण? हा प्रश्न अद्याप गूढ आहे. मात्र, यात ठळकपणे एक नाव पुढे आलं होतं, ते म्हणजे उमर खालिद. फरार घोषीत केलेला उमर जेएनयूमध्ये रविवारी रात्री परतला आहे. त्याच्यासोबत अन्य 5 आरोपी विद्यार्थीही परतले आहेत. पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं आहे. मात्र अद्याप त्यांनी समर्पण केलेलं नाही.
उमर खालिदने काल जेएनयूमध्ये येऊन 15 मिनिटे भाषणबाजी केली. ‘माय नेम इज उमर खालिद, अँड आय एम नॉट अ टेररिस्ट’ अशी डायलॉगबाजी करणाऱ्या खालिदने सरकार, मीडिया आणि पोलिसांवर हल्लाबोल केला. पण सुमारे 15 मिनिटांच्या भाषणात ना त्याने देशविरोधी घोषणाबाजीबद्दल बोलला, ना त्याने आपण स्वत: अशी घोषणाबाजी न केल्याचं सांगितलं, ना अफजल गुरुच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बोलला. त्यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान फरार घोषीत केलेल्या उमर खालिदसह 5 विद्यार्थ्यांनी पोलिसांसमोर समर्पण केलेलं नाही. त्यामुळे ते कायद्याचं पालन का करत नाहीत, असा सवाल आहे.
या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?
*संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरुच्या समर्थनार्थ जेएनयूमध्ये कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं की नाही?
*जर असा कार्यक्रम झाला असेल, तर तो कोणी आयोजित केला?
* उमर खालिदने आपण स्वत: घोषणा दिल्या की नाही, याबाबत कालच्या भाषणात चकार शब्दही का काढला नाही?
* पोलिसांनी आत्मसमर्पणाचं आवाहन केलं असतानाही, खालिदचा समर्पणाला विरोध का?
*कन्हैया कुमारच्या अटकेनंतर उमर खालिद आठवडाभर का लपून बसला?
*अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रमाच्या आयोजनात उमर खालिदचा पुढाकार होता, असा कन्हैयाने जबाब दिला आहे. मग कोण खरं? असा कार्यक्रम झाला नाही म्हणाणारे जेएनयूतील विद्यार्थी, कन्हैया कुमार की तिसरंच कोण?
=======================================

खुशखबर! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवली

खुशखबर! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवली!
मुंबई : पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. खुल्या प्रवर्गासाठी आता 25 ऐवजी 28 वयोमर्यादा, तर मागासवर्गीयांसाठी 30 ऐवजी 33 एवढी वयोमर्यादा करण्यात आली आहे. 
पोलीस शिपाई भरतीबाबत सुधारित मसुदा जाहीर करताना खुल्या आणि मागासवर्गीयांसाठी वाढलेल्या वयोमर्यादेबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्र कुमार संगल यांनी दिली. 
खुल्या वर्गातील पोलीस भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा कमीत कमी वय 18 वर्षे, तर जास्तीत जास्त वय 28 वर्षे असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी वय 18 वर्षे, तर जास्तीत जास्त वय 33 वर्षे असणार आहे. 
पोलीस भरती आधीच सुरु झाली आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वीच ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
=======================================

संसदेचंं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, गदारोळाचे संकेत

संसदेचंं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, गदारोळाचे संकेत
नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला टप्पा 23 फेब्रुवारी ते 16 मार्च, तर दुसरा टप्पा 25 एप्रिल ते 13 मे असा असणार आहे. 
अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी काल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसात रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, जेएनयूचा वाद यासारख्या विषयावर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. 
आगामी अधिवेशनात संसदेचं कामकाज चालू देण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. त्यामुळे या अधिवेशन कसं पार पडणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
=======================================

भिकाऱ्याचं लाखो रुपयांचं दान, मंदिरात पक्षांसाठी घर

भिकाऱ्याचं लाखो रुपयांचं दान, मंदिरात पक्षांसाठी घर
भुज : देवाच्या चरणी प्रार्थना करुन किंवा नवस पूर्ण झाल्यावर दान देणं हे तसं नित्याचंच आहे. पण कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेल्या दानाला विशेष महत्त्व आहे. श्रीमंत व्यक्ती दान करतातच, पण एखाद्या भिकाऱ्याने दान करणं आणि त्याचा उपयोग पक्ष्यांसाठी होणं हे निश्चितच कौतुकास्पद आहे. ही गोष्ट आहे गुजरातच्या भुजमधील पोपट नावाच्या भिकाऱ्याची. पोपट मानसिकदृष्टा आजारी आहे. तो एक भिखारी आहे. आयुष्याची जवळपास 40 वर्ष त्यांनी कच्छमधील शूरवीर राजपूत राजांना समर्पित छत्रीखाली भीक मागून घालवली आहे. पण लवकरच पोपट यांच्या नावाने एक काँक्रिटचा चबुतरा बनणार आहे, तेही दानकर्ता म्हणून. हे चबुतरा बनवण्यासाठी पोपट यांनी दान दिलं आहे. भुजमधील प्रसिद्ध शिव मंदिराचे पुजारी स्वत: या चबुतराच्या निर्मितीची देखरेख करणार आहे. हा चबुतरा  उभारण्यासाठी पोपट यांनी तब्बल 1.15 लाख रुपये दान केले आहेत. मागील 40 वर्षांपासून भीक मागून जमा केलेले पैसे ते दररोज मंदिरात दान म्हणून देतात. पोपट यांना नाणी आणि नोटांची ओळख नाही. त्यामुळे बिहारीलाल महादेव मंदिराचे पुजारी मौनी बाबा यांनी पोपट यांच्या नावाने वेगळं खातं उघडलं आहे. पोपट 1973 पासून मिळालेले पैसे मौनी बाबा यांच्याकडे देत आहेत आणि बाबांनी सगळा पैसा या खात्यात जमा केला आहे.
chabutro
“पोपट 1973 पासून न चुकता मंदिरात येतात. दर्शनानंतर आम्ही त्यांना चहा देतो. मानसिक संतुलन ठीक नसतानाही ते कधीही पैसे देण्यास विसरले नाहीत. त्यांनी दिलेलं दान वेगळ्या खात्यात जमा केलं आहे. आता ही रक्कम 1.15 लाख झाली आहे. आम्ही पोपट यांचं नाव अमर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चबुतऱ्यावर दानकर्ता म्हणून पोपट यांचं नाव लिहिण्यात येणार आहे,” असं मौनी बाबा यांनी सांगितलं. पोपट संपूर्ण शहरात फिरतात आणि भीक मागतात. पण ते त्यांचा जास्त वेळ शाही छत्रीजवळच्या छोबी तालानमध्ये घालवतात. नुकतंच काही लोकांनी मदत म्हणून पोपट यांच्या डोळ्याचं ऑपरेशनही करुन दिलं आहे. गुजरातच्या ग्रामीण परिसरात चबुतरे आढळतात. इथे चबुतरांचं सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या विशिष्ट महत्त्व आहे. हे चबुतरे प्रत्यक्षात काँक्रिटचे टॉवर असतात. त्यात खाचा बनलेल्या असतात, ज्यात चिमण्या घरटं बनवतात. शिवाय त्यांच्या दाण्यांसाठीही विशेष सोय असते.
=======================================

आमदार शाळा दत्तक योजना, शैक्षणिक प्रगतीसाठी उपक्रम 

आमदार शाळा दत्तक योजना, शैक्षणिक प्रगतीसाठी उपक्रम
मुंबई : खासदार आदर्श ग्राम दत्तक योजनेच्या आधारावर राज्यात आता आमदारांसाठी नवीन योजना लागू करण्यात आली आहे. प्रगत शैक्षणिक कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातील एक शाळा दत्तक घ्यावी लागणार आहे. राज्यातील शिक्षणाचा दर्जा वाढावा आणि शाळा प्रगत करण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत या परिपत्रकावर सूचना मागवण्यात आल्या आहेत. मतदारसंघातील कोणती शाळा दत्तक घेणार, याची माहिती आमदारांनी द्यायची आहे. त्याचप्रमाणे तसा फलक शाळेच्या दर्शनी भागात लावायचा आहे. विशेष म्हणजे या शाळेचं अनुकरण मतदारसंघातील इतर शाळा करतील, याकडेही लक्ष द्यायचं आहे. या योजनेला राज्यातले आमदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

=======================================

चोरीच्या संशयातून अल्पवयीन मुलीला विवस्त्र करुन मारहाण

]चोरीच्या संशयातून अल्पवयीन मुलीला विवस्त्र करुन मारहाण

इंदापूर : चोरी केल्याच्या संशयाने अल्पवयीन मुलीला विवस्त्र करुन भररस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना इंदापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी आणि तिची आई आठवडी बाजारात फळे विक्रीसाठी रिक्षामधून येत होते. त्याचवेळी या मुलीने रिक्षात आपली सोन्याची माळ चोरल्याचा आरोप करत एका महिलेने आणि तिच्या पतीने तिला विवस्त्र करुन मारहाण केली. मुलगी आणि तिच्या आईने मारहाण न करण्याची विनवणी करुनही हे दाम्पत्य थांबलं नाही. यानंतर मुलीची झाडाझडती घेतली, पण चोरीला गेलेली सोन्याची माळ पीडित मुलीकडे सापडलीच नाही. मात्र तरीही या दाम्पत्याने भररस्त्यात अल्पवयीन मुलीला विवस्त्र करुन मारहाण केली. या प्रकारामुळे आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.
=======================================

एक श्वास घ्या, तोपर्यंत 3 तासाचा सिनेमा डाऊनलोड झाला असेल !

एक श्वास घ्या, तोपर्यंत 3 तासाचा सिनेमा डाऊनलोड झाला असेल !
मुंबई : सध्याच्या इंटरनेट स्पीडपेक्षा 100 पट जास्त, इतकंच नव्हे तर पाच सेकंदात संपूर्ण सिनेमा डाऊनलोड करण्याची क्षमता असं तुम्हाला कोणी सांगितलं तर कदाचित खोटं वाटेल. पण आता हे शक्य होणार आहे. इंटरनेटच्या 5G स्पीडमुळे आख्खा सिनेमा अवघ्या एका श्वासाच्या कालावधीत किंवा त्यापेक्षाही कमी म्हणजे 5 सेकंदात डाऊनलोड होऊ शकेल. सध्या 4G इंटरनेटचा बोलबाला सुरु आहे. मात्र हे नेटवर्क अद्याप सर्वत्र पोहोचलं नसतानाच, 5G तंत्रज्ञान आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. जगातील प्रसिद्ध टेक कंपन्या याबाबत परीक्षण करत आहेत. 5G इंटरनेट तंत्रज्ञान 2018 पर्यंत उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सध्याच्या स्पीडपेक्षा 100 पट स्पीड?
ब्रिटनच्या युनिव्हर्सिटीत सॅमसंग आणि फुजित्सु कंपन्या 5G तंत्रज्ञानाबाबत काम करत आहेत. 5G तंत्रज्ञानाबाबत काम करणाऱ्या संशोधकांच्या मते, 2018 पर्यंत सर्वांना याचा लाभ घेता येईल. त्यावेळी इंटरनेटचं स्पीड हे सध्याच्या स्पीडपेक्षा 100 पट असेल, असा दावा या तंत्रज्ञांनी केला आहे.
5G तंत्रज्ञानासाठी चीन, अमेरिका आणि स्वीडनसारखे देशही अब्जावधी रुपये खर्च करत आहेत.
मात्र जपानी कंपनी या सर्वांच्या आधी 5G आणून श्रेय घेण्याच्या तयारीत आहे. 5G तंत्रज्ञान जेव्हा उपलब्ध होईल, तेव्हा मोबाईल क्षेत्रातही मोठी क्रांती झाली असेल.
=======================================

रविना टंडन टीव्हीवर सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

रविना टंडन टीव्हीवर सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री!
मुंबई : अभिनेत्री रविना टंडन लवकरच ‘शाईन ऑफ इंडिया’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे. या शोच्या एका एपिसोडसाठी त्याला 1.25 कोटी रुपये मानधन मिळणार आहे. 
याबरोबरच रविना टंडन ही छोट्या पडद्यावर सर्वाधिक कमाई करणारी बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे. रविना याआधी ‘साहिब, बिवी और गुलाम’, ‘छोटे मियाँ’ आणि ‘कॉमेडी का महामुकाबला’ या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. 
‘शाईन ऑफ इंडिया’मध्ये ती अभिनेता गोविंदा आणि कोरिओग्राफर सरोज खान यांच्यासोबत परीक्षकांच्या खुर्चीत दिसेल. रविनाशी संबंधित एका जवळच्या सुत्रांच्या माहितीनुसार, या शोसाठी तिला मोठी रक्कम मिळणार आहे.
=======================================

बिग बॉस फेम अभिनेता आर्य बब्बर लग्नाच्या बेडीत

बिग बॉस फेम अभिनेता आर्य बब्बर लग्नाच्या बेडीत
नवी दिल्ली : हिंदी-पंजाबी चित्रपटांनंतर टीव्हीकडे वळलेला अभिनेता, दिग्गज अभिनेते राज बब्बर यांचा पुत्र आर्य बब्बर विवाहबंधनात अडकला आहे. गेल्या काही वर्षांपासून जास्मिन पुरीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांनंतर त्यांनी लगीनगाठ बांधली. ट्विटरवर लग्नाचे फोटो शेअर करुन आर्यने ही घोषणा केली. द बब्बर शेर हॅज गॉट इज शेरनी, अशा अनोख्या पद्धतीचं कॅप्शन देत आर्यने आपला आनंद व्यक्त केला. एका गुरुद्वारामध्ये छोटेखानी समारंभात दोघे विवाहबद्ध झाले.
=======================================

मुख्यमंत्र्यांचं विकासापेक्षा अहंकाराचं राजकारण: पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्र्यांचं विकासापेक्षा अहंकाराचं राजकारण: पृथ्वीराज चव्हाण
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारी खासदारांची बैठक यंदा झाली नाही. त्यामुळे परंपरा मोडीत निघाली असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस हे अहंकारी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत महाराष्ट्राच्या खासदारांची बैठक होते. पण यंदा अशी बैठक झाली नाही. आमचे 42 खासदार आहेत. त्यामुळे बैठक घेण्याची गरज नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. असा दावाही पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. याशिवाय अॅक्सिस बँकेकडे एसआरए प्रोडेक्टची खाती कशाला असा सवालही त्यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अॅक्सिस बँकेत नोकरीला आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात नेमलेले ओएसडी हे संघाची लोकं आहेत. मुख्यमंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तर त्यांची नियुक्ती केली आहे का असा सवालही त्यांनी विचारला आहे.
=======================================

संजय दत्तची गुरुवारी सुटका, 8 महिनेआधीच येणार जेलबाहेर

संजय दत्तची गुरुवारी सुटका, 8 महिनेआधीच येणार जेलबाहेर
पुणे: अभिनेता संजय दत्त येत्या शुक्रवारी तुरुंगाबाहेर येणार आहे. त्याच्या स्वागतासाठी दत्त कुटुंबियांनी जोरदार तयारी केली आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता तो येरवडा तुरुंगातून बाहेर पडेल. मात्र, शिक्षा संपण्याच्या 8 महिने आधीच तो तुरुंगातून सुटणार आहे.
1993 मधील बॉम्बस्फोटांच्यावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची 16 मे 2013 ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला मे 2013 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यातली दीड वर्षांची शिक्षा संजयनं आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती. त्यानुसार तो ऑक्टोबरमध्ये तुरुंगाबाहेर येणं अपेक्षित होतं. पण शिक्षेच्या आठ महिनेआधीच तो जेलमधून बाहेर येणार आहे.
दरम्यान, तुरुंग प्रशासनाला शिक्षा माफीचे अधिकार असतात. त्यानुसार संजय 25 फेब्रुवारीला तुरुंगबाहेर येणार आहे. यापूर्वी पॅरोल आणि फर्लो अंतर्गत मिळणाऱ्या सुट्ट्यांमुळेही संजय दत्तवर टीका झाली होती.
=======================================

नांदेडमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज, 25 जण जखमी

नांदेडमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज, 25 जण जखमी
नांदेड: नांदेडमध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी काढलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं. नांदेडच्या कौठामध्ये महात्मा बस्वेश्वरांचा पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. 
नांदेड पालिका आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांजवळ येऊन निवेदन घेण्यास नकार दिला. याचवेळी हे प्रकरण चिघळलं आणि पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात तब्बल 25 जण जखमी झाले आहेत. काँग्रेस वगळता अन्य सर्व राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी या मोर्चात सहभागी झाले होते. 
कौठा इथं महात्मा बस्वेश्वारांचा पुतळा उभारला जाईल असे आश्वासन देण्यात आलं होतं,  मात्र अद्यापही पुतळा उभारण्यात न आल्यामुळं पालिकेवर हा महामोर्चा काढण्यात आला होता. मात्र याचवेळी आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केली. तर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अनेक जण जखमी झाले. या लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून उद्या नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेस सोडून सर्व पक्षांनी या बंदची हाक दिली आहे. 
=======================================

'जय गंगाजल'चा नवा ट्रेलर, दबंग अवतारात प्रियंकाची डायलॉगबाजी

'जय गंगाजल'चा नवा ट्रेलर, दबंग अवतारात प्रियंकाची डायलॉगबाजी
मुंबई: प्रिंयका चोप्राचा चर्चेत असणारा आगामी सिनेमा ‘जय गंगाजल’चा नवा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये प्रियंकाच्या अॅक्शनची बरीच चर्चा आहे. बाजीराव मस्तानी, क्वांटिकोच्या यशानंतर आता प्रियंका जय गंगाजल सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आभा माथुर या पोलीस अधिकाऱ्याची प्रियंका भूमिका साकारत आहे. 

ट्रेलरमध्ये प्रियंकाची दमदार डायलॉगबाजी आणि बोल्ड, निडर अवतार पाहायला मिळतो. प्रियंकाने या सिनेमाचा मेकिंगचाही व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला असून या सिनेमच्या शुटींगवेळी चांगला अनुभव आला असंही ती म्हणाली. 

=======================================

आशिया चषक: कर्णधार धोनीला दुखापत, पार्थिव पटेलचा संघात समावेश

आशिया चषक: कर्णधार धोनीला दुखापत, पार्थिव पटेलचा संघात समावेश
मुंबई: आशिया चषक मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पाठीत उसण भरली आहे. सोमवारी सरावादरम्यान धोनीच्या पाठीचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून पार्थिव पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आल्याचं बीसीसीआयच्या निवड समितीनं जाहीर केलं आहे. आशिया चषकात खेळण्यासाठी टीम इंडिया कालच बांगलादेशात दाखल झाली. आज सरावादरम्यान धोनीला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळं तो नेट प्रॅक्टिससाठी मैदानातही आलाच नाही. 24 तारखेला आशिया चषकात सलामीच्या लढतीत भारताला बांगलादेशचा सामना करायचा आहे. या सामन्यात कदाचित धोनी खेळू शकणार नाही.
=======================================

समीर भुजबळांच्या अडचणीत भर, न्यायालयीन कोठडीत वाढ

समीर भुजबळांच्या अडचणीत भर, न्यायालयीन कोठडीत वाढ
मुंबई महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी समीर भुजबळांच्या अडचणीत भर पडली आहे. कारण समीर भुजबळ यांच्या परवेश कंपनीमार्फत आणखी ३० कोटी रुपयांचे अनधिकृत ट्रान्सॅक्शन आढळून आले आहेत, ईडीनं आज कोर्टाला ही माहिती दिली. याआधारे तपास करुन ईडी आणखी एकाला अटक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती इडी सूत्रांनी दिली आहे. समीर भुजबळांना 7 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या सुनावणीच्या वेळी इडीनं न्यायालयात सादर केलेल्या रिमांड पत्रानुसार समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यातून जवळपास 870 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा माहिती इडीनं कोर्टाला दिली होती. त्यापैकी 170 कोटी रुपयांचे कागदोपत्री पुरावे सापडले आहेत.
=======================================

हात गमावलेल्या साहिलच्या जिद्दीला सलाम, 12 वीचे पेपर पायाने सोडवले

हात गमावलेल्या साहिलच्या जिद्दीला सलाम, 12 वीचे पेपर पायाने सोडवले
पुणे : बारावीच्या परिक्षेला राज्यभरात सुरूवात झाली आहे. या परिक्षेचं दडपण घेऊन आत्महत्या करणारे विद्यार्थी दरवर्षी कुठे ना कुठे दिसतात. पण अशा वेळी, अपघातामुळे आलेल्या शारिरीक व्यंगावर मात करून चक्क पायानं पेपर देणाऱ्या विद्यार्थ्याची गोष्ट तुम्हाला आम्हाला सर्वांनाच एक वेगळा दृष्टीकोन देऊन जाते. साहिल शेख… पुण्याच्या ‘पुना कॉलेज’मध्ये वाणिज्य शाखेची 12 वीची परीक्षा देत आहे. पण तो सर्वसामान्य नाही तर विशेष आहे. कारण 7 वर्षांपूर्वी साहिल शिवजयंतीची तयारी करत असताना हातात लोखंडी रॉड घेऊन दांडपट्टा खेळायला गेला आणि बरोब्बर टेरेसच्या वरून जाणाऱ्या हाय व्होल्टेज वायरला लोखंडी रॉड लागला.. अन् क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. साहिलला वीजेचा जोरदार धक्का बसला. तो जगेल याची शाश्वतीही नव्हती. पण दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. मात्र त्याने दोन्ही हात गमावले होते. अभ्यासात गती असलेल्या साहिलला हाताविना पहिलं वर्ष असह्य गेलं. पण नंतर त्यानं कोचिंग क्लास गाठला आणि हातानं नाही, पण पायानं तर लिहिता येऊ शकतं, हे त्याच्या धान्यात आलं. आणि मग मात्र त्यानं कधी मागे पाहिलंच नाही. आता तर सीए होण्याचं स्वप्न साहिलला शांत बसू देत नाही.
=======================================

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात


  • नवी दिल्ली, दि. २३ - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. संसदेमध्ये राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करत आहेत. राष्ट्रपतीं आपल्या भाषणात सरकारकडून नागरीकांच्या हितासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजना आणि सरकारच्या यशस्वी कार्याची माहिती देत आहेत. 
    संसदेचे अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा १६ मार्च रोजी संपेल. दुसरा टप्पा २५ एप्रिलपासून सुरु होईल. रेल्वे अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्या टप्प्यात मांडण्यात येईल. 
=======================================

जैशचा प्रमुख मसूद अझर पाकिस्तानच्या ताब्यात


  • नवी दिल्ली, दि. २३ - पठाणकोट येथील भारतीय वायू दलाच्या तळावरील हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना १४ जानेवारीपासून अझर ताब्यात असल्याची माहिती दिली. भारतीय माध्यमांमध्ये अझरच्या अटकेबद्दल चर्चा असली तरी, कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. पाकिस्तानकडून प्रथमच अझरच्या अटकेला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. पठाणकोट हल्ल्यासंदर्भात भारताने जे दूरध्वनी क्रमांक दिले ते बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाशी संबंधित असल्याचेही अझीझ यांनी स्पष्ट केले.  भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या भेटीनंतर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यासंदर्भात एफआयआर दाखल केला पण त्यात कोणाचेही नाव नव्हते.  अझरच्या अटकेमुळे भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेचा मार्ग सुकर होईल अशी पाकिस्तानची आशा आहे. भारताने हुरियतच्या नेत्यांना परदेशी प्रवास करण्यापासून रोखू नये अशीही मागणी पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेमध्ये पाकिस्तानचा सर्व भर काश्मीर मुद्यावर रहाणार आहे. 
=======================================

जवान लढत असताना मशिदीमधून अतिरेक्यांचे कौतुक सुरु होते


  •  ऑनलाइन लोकमत 
    श्रीनगर, दि. २३ - तीन दिवस चाललेल्या पाम्पोर चकमकीत भारतीय जवान आपल्या प्राणांची बाजी लावून दहशतवाद्यांशी दोन हात करत असताना इथल्या स्थानिक मशिदींमधून अतिरेक्यांचे गुणगान, कौतुक सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 
    टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार फ्रेस्टाबाल, द्रांगबाल, कडलाबाल आणि सेमपोरा या भागातील मशिदींच्या लाऊडस्पीकरवरुन जाहीरपणे जवानांवर गोळया झाडणा-या अतिरेक्यांचे कौतुक सुरु होते. 'जागो, जागो सुबह हुई' तसेच स्वतंत्र काश्मीर आणि पाकिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा या मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन देण्यात येत होत्या.
    पाम्पोरमध्ये ज्या ठिकाणी चकमक सुरु होती तिथे शेकडो युवका गोळा झाले होते आणि ते चकमकीला विरोध करत होते. यावेळी सुरक्षापथकांबरोबर त्यांची झडपही झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी संध्याकाळी सुरु झालेली ही चकमक सोमवारी संध्याकाळी संपली. येथील शासकीय इमारतीत लपून बसलेल्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले पण या चकमकीत भारताचे पाच जवान शहीद झाले. 
=======================================

==========================

घटस्फोटाची धमकी देणे हे पतीविरुद्धचे ‘क्रूर कृत्य’ - दिल्ली उच्च न्यायालय 

  • नवी दिल्ली : घटस्फोटाची धमकी देणारे एक साधे पत्रदेखील ‘क्रूर कृत्य’ ठरते, असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी एका इसमाला त्याच्या विभक्त पत्नीपासून घटस्फोट घेण्याची परवानगी दिली.
    हा इसम मागील २८ वर्षांपासून पत्नीपासून वेगळा राहात आहे. १९८० मध्ये त्याचा विवाह झाला होता. १९८७ मध्ये पत्नी व चार वर्षांच्या कन्येला भारतात सोडून तो अमेरिकेला निघून गेला होता. १९९० मध्ये त्याला पत्नीने पाठविलेले एक पत्र प्राप्त झाले. ‘आपला जुना मित्र आपल्याला मिळाला आहे आणि तो माझ्या अल्पवयीन मुलीसह माझा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास तयार आहे. त्यामुळे आपण आता घटस्फोट घ्यायला पाहिजे,’ असे पत्नीने या पत्रात लिहिले होते. १९९५ मध्ये हे प्रकरण न्यायालयासमक्ष आले तेव्हा या पत्रातील मजकूर असत्य होता आणि आपण खोटे बोलल्याची आणि आपल्या पतीसोबत विदेशात किंवा भारतात कुठेही नांदण्यास तयार असल्याची कबुली पत्नीने दिली होती. तथापि दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्या. नाजमी वझिरी यांनी पत्नीचे ते धमकी पत्र क्रूर कृत्य असल्याचे आणि या पत्रामुळे पतीला ४-५ वर्षेपर्यंत प्रचंड मानसिक वेदना सहन कराव्या लागल्याचे स्पष्ट केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. क्रौर्याच्या आधारावर हा विवाह मोडण्याचा कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय उचलून धरताना न्या. वाझिरी म्हणाल्या, ‘१९८७ पासून पत्नीपासून वेगळे राहणाऱ्या पतीला त्याच्या पत्नीने; आपण घटस्फोट घेऊन पुनर्विवाह करणार असल्याचे नमूद करणारे पत्र मिळाले होते.
=======================================

संजय दत्तची कमाई केवळ ४४० रुपये 


  • मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तने कारागृहात गेल्या तीन वर्षात कागदी पिशव्या तयार करण्याच्या कामामधून अवघी ४४० रुपयांची कमाई केली आहे. तो २५ फेब्रुवारीला बाहेर येणार असून त्याला सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारात सोडण्यात येईल. त्याला २५६ दिवसांची सूट देण्यात आली आहे. नियमानुसार त्याच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होत असल्याची माहिती कारागृह प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी दिली. गुरुवारी त्याला नियमानुसार न्यायालयीन कक्षामध्ये नेऊन नोंदीनुसार त्याच्या शरीरावरील चिन्हे तपासून तो संजय दत्तच असल्याची शहानिशा करण्यात येईल. त्याला न्यायला येणाऱ्या कुटुंबीयांना कारागृहाबाहेरच थांबवण्यात येईल. संजय दत्तचा निरोप समारंभ होणार नाही. येरवडा कारागृहातील रेडिओ स्टेशनवर कार्यक्रम होणार नाही,असे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तो आमच्यासाठी सामान्य कैदीच असून, आजवर केलेल्या कागदी पिशव्या बनवण्याच्या कामाची कमाईचे ४४० रुपये त्याला देण्यात येतील, असे कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले. संजय दत्त २१ मे २०१३ पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. आॅक्टोबर २०१३ मध्ये त्याला फर्लो मंजूर झाली होती. त्यांनतर त्याला १४ दिवसांची सुटी वाढवून देण्यात आली होती. पुन्हा २०१४ मध्ये त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. ही सुट्टी पुढे ६० दिवस वाढवण्यात आली. डिसेंबर २०१४ मध्ये पुन्हा १४ दिवसांची फर्लो मंजूर करण्यात आली. ती संपल्यानंतर कारागृहात दोन दिवस उशिरा त्याने हजेरी लावली होती.
=======================================
गरिबी हा हिंसेचा सर्वात वाईट प्रकार- राष्ट्रपती 

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन्ही सभागृहांना संबोधित करत आहेत. गरिब, शेतकऱयांचे कल्याण, तरुणांना रोजगार हाच सरकारचा उद्देश असल्याचे प्रणव मुखर्जींनी यावेळी सांगितले. यासोबतच गरिबी हा हिंसेचा सर्वात वाईट प्रकार असल्याचे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. जनधन योजना सर्वसामन्यांसाठी महत्त्वाची असून, ती यशस्वी ठरल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढले. याशिवाय, सरकारचा उद्देश ‘सबका साथ, सबका विकास’ असा आहे. गरीबातील गरीब व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले. गॅस सबसिडी सोडण्याच्या सरकारच्या आवाहनाला देशात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती देत आजवर देशातील ६२ लाख लोकांनी गॅसची सबसिडी सोडल्याची माहिती राष्ट्रपतींनी यावेळी दिली. याशिवाय, शेतकऱयांच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले. देशाच्या विकासासाठी शेतकरी समृद्ध होणे गरजेचे असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या आवारात माध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्ष गंभीर आणि मजबूत असेल तर लोकशाही सशक्त होते, सर्व राजकीय पक्ष अधिवेशन यशस्वी करतील अशी अपेक्षा असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. 
=======================================
 'एनडीए'मुळे देशात भीती- सीपीआय

नवी दिल्ली - केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या धोरणांमुळे देशात वैफल्य आणि भीतीचे वातावरण असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते डी. राजा यांनी म्हटले आहे.

संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशनास आजपासून सुरवात झाली आहे. केंद्र सरकारने हे अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी सर्वांना मदतीचे आवाहन केले आहे. मात्र, जेएनयूमध्ये झालेल्या घटनेमुळे अधिवेशनाच गोंधळ होण्याची शक्यता आहे. जेएनयूतील विद्यार्थ्यांना यापूर्वीच सीपीआय पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. राजा म्हणाले की, देशातील सध्याचे वातावरण भीतीदायक आहे. सर्वपक्षीय बैठकीत मी याबाबतची माहिती सरकारपर्यंत पोचविली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार याला जबाबदार आहे. भाजपने अशी काही कार्यकर्ते आणि नेत्यांची निवड केली आहे, ते भीतीचे वातावरण पसरवत आहेत. हे अधिवेशनही वादळी ठरल्यास त्याला पूर्णपणे जबाबदार भाजप असेल. 
======================================= 
पुणे: पौड फाटा चौकाजवळ तरुणाचा खून
पुणे - शहरातील पौड फाटा चौकाजवळ आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास एका 28 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पौड फाटा चौकातील दशभुजा गणपती मंदिराजवळ हा  खून झाला. मोटारीतून आलेल्या चौघांनी कोयत्याने वार करून सागर शिंदे (वय 28) याचा खून केला. गुन्हेगारी वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस तपास करीत असून, अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. सागर शिंदे हा केदारी एम्पायर, पौड फाटा येथे राहत होता. तसेच तो दशभुजा मित्र मंडळाचा अध्यक्षही होता.
=======================================
सालगड्याच्या मुलीने केले भारतीय संघाचे नेतृत्व
जिल्ह्याची उमटविली मोहर - भूतानमध्ये झालेल्या इंडो आशियायी स्पर्धेत मारली बाजी

देवणी - सालगड्याच्या मुलीने भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करीत भूतानवर विजय संपादन केला आहे. घरी गरिबीची परिस्थिती असताना केवळ मेहनत व इच्छाशक्तीच्या बळावर परदेशातही भारताची व तालुक्‍याची ओळख निर्माण केली आहे. 

नीता अंतेश्‍वर सोमवंशी ही अनंतवाडी (ता. देवणी) येथील रहिवासी असून ती सध्या धनेगाव येथील महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. घरची आर्थिक स्थिती बेताचीच असून तीन एकर कोरडवाहू शेतीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने वडील सालगडी म्हणून गेल्या वीस वर्षांपासून कामाला आहेत. तर आई घरकाम करून उदरनिर्वाह करते. लहान भाऊ शिवशंकर हा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. कठीण आर्थिक स्थिती, अनंतवाडीसारखा ग्रामीण भाग, शैक्षणिक व खेळाच्या सुविधांचा अभाव, मुलीकडे बघण्याचा ग्रामीण भागातील नागरिकांचा पारंपरिक दृष्टिकोन व अभ्यासाचे ओझे याला छेद देत नीता सोमवंशी या विद्यार्थिनीने केवळ इच्छाशक्तीच्या बळावर क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

धनेगाव येथील महादेव विद्यालयाचे प्राचार्य रामलिंग मुळे यांचे सततचे प्रोत्साहन व कुटुंबाचा भक्कम पाठिंबा यामुळे तिने आतापर्यंत राज्यपातळीवर मुलींच्या संघात अनेक क्रिकेट सामने जिंकले आहेत. शिवाय १६ फेब्रुवारी रोजी भूतान येथे झालेल्या इंडो आशियायी क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय मुलींचे नेतृत्व करीत कप्तानाची भूमिका पार पाडली. 
=======================================
कन्हैया कुमारच्या जामीनावर उद्या सुनावणी 

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या जामीनअर्जावरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे. 

दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमारच्या जामीनाला विरोध केला आहे. तर, न्यायालयाने दिल्ली पोलिसांना उद्यापर्यंत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात सरकारी वकीलांवर विश्वास नसल्याची तक्रार नायब राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राहुल मेहरा यांना हटविले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने जेएनयूमध्ये प्रवेश करून उमर खालीदसह चार जणांना अटक करण्यासाठी परवानगीची दिल्ली पोलिसांची याचिका दाखल करुन घेतली आहे. खालीदने आत्मसमर्पण करण्यासाठी सुरक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

कन्हैया कुमारची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग करून या प्रकरण योग्य रीतीने हाताळण्याचे आदेश दिले होते. जेएनयूमध्ये भारतविरोधी घोषणा दिल्याचा कन्हैया कुमारवर आरोप असून, दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला दाखल केला आहे. 
=======================================
अर्थसंकल्पी अधिवेशन फलदायी ठरेल- मोदी
नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरेल. अधिवेशनाच्या कालावधीचा योग्य कारणासाठी उपयोग होईल, अशी आशा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन आजपासून (मंगळवार) सुरु होत आहे. या अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याची चुणूक सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतून मिळाली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), रोहित वेमुलाची आत्महत्या यासह सर्व विषयांवर चर्चा करण्याची ग्वाही देत सरकारने विरोधकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वस्तू आणि सेवा विधेयक (जीएसटी), रिअल इस्टेट विधेयकांच्या मंजुरीचे आवाहन केले आहे. २३ फेब्रुवारी ते १६ मार्च असा अधिवेशनाचा पहिला टप्पा असेल, तर २५ एप्रिल ते १३ मे असा दुसरा टप्पा असेल. 
मोदी म्हणाले, की या अर्थसंकल्पी अधिवेशनावर देशातील सव्वाशे कोटी नागरिकांचे लक्ष आहे. मला आशा आहे, की या अधिवेशनात वेळेचा सदुपयोग होईल. विरोधी पक्षांनी अधिवेशन फलदायी ठरण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. जगाचे भारताच्या संसद अधिवेशनावर लक्ष आहे. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होईल.
=======================================
मोदी सरकारकडून राष्ट्रभक्तीची नकली चर्चा:सोनिया
नवी दिल्ली - "आर्थिक, सामाजिक आघाडीवर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच मोदी सरकारने आता "राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादा‘ची नकली चर्चा सुरू केली आहे,‘‘ असा घणाघाती हल्ला चढवून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनात कॉंग्रेसची रणनीतीच ठरवली. विरोधक, सिव्हिल सोसायटीच्या दडपशाहीनंतर आता सरकारने विद्यापीठांकडे मोर्चा वळविला असल्याचाही हल्लाबोल सोनियांनी केला.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला "देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती‘वर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस मुख्यालयात बोलावलेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत सोनियांनी अक्षरशः मोदी सरकारचे वाभाडे काढले. त्या म्हणाल्या, की देशात आतापर्यंतची सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून सत्ताधारी भाजप आघाडीने लोकशाही संकेतांचे सर्रास उल्लंघन चालवले आहे. आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी चौकशी करणे, प्रश्‍न उपस्थित करणे, संवाद साधणे आणि विरोध व्यक्त करणे या मूलभूत तत्त्वांनाच हरताळ फासला आहे. सरकारने प्रथम लोकसभेत विरोधकांचा आवाज दडपला. त्यानंतर संस्थांची दडपशाही केली. आता दडपशाहीसाठी विद्यापीठांकडे मोर्चा वळवला आहे. जातीभेदाला खतपाणी घालून सामाजिक न्याय नाकारला जात आहे. महत्त्वाच्या संस्था सत्ताधाऱ्यांचे मुखपत्र बनल्यासारख्या वागत असून, न्यायालयांचा आखाडा बनला आहे. 
=======================================
=======================================
=======================================
=======================================

No comments: