Sunday, 28 February 2016

नमस्कार लाईव्ह २८-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- आशियातील टॉप टेनमध्ये 3 भारतीय सागरकिनारे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- चिदंबरमनी इशरतसंदर्भात केले वादग्रस्त बदल 
३- हरियाना सरकारची कृती लज्जास्पद- कॉंग्रेस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
४- ठाणे; दोन वर्षांपूर्वीच्या विषबाधेचा ठाण्याच्या हत्याकांडाशी संबंध 
५- नगरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, गृहराज्यमंत्र्यांच्या समोरच कार्यकर्ते भिडले 
६- राजेश खन्ना यांचा ‘आशीर्वाद’ अखेर जमीनदोस्त 
७- छत्तीसगडमधील बस्तरमध्ये 23 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
८- पुणे; आयटी पार्कमधील 24 वर्षीय तरुणीवर सहकाऱ्यांचा गँगरेप 
९- वसई; समुद्रात वऱ्हाडी बोट उलटली, एकाचा मृत्यू 
१०- परभणी; 331 जोडपी विवाहबंधनात, शिवसेनेचा पुढाकार 
११- सोलापूर; फाटक्या नोटा बदलून देणारा सोलापूरचा उच्चशिक्षित अवलिया 
१२- नाशिक; कॅनव्हासवर उतरल्या काळारामाच्या छटा 
१३- जळगाव; जिवाची पर्वा न करता तरुणांनी विझवला वणवा 
१४- जळगाव; रक्तबंबाळ झाल्यानंतरही महिलेने चोरट्याला पकडले 
१५- अमरावती- चांदूर बाजार तालुक्यात गारपीट झाल्याने संत्रा पिकांचे नुकसान 
१६- केरळमध्ये मंदिर महोत्सवादरम्यान हत्तीने हैदोस घालत केली गाड्यांची तोडफोड 
१७- कोल्हापूरच्या लाड चौकात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- रोबो 2 : अक्षय-रजनी आमनेसामने, एका सीनसाठी 20 कोटी 
१९- 'पीएफ'मध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचाऱ्यांची नापसंती - एक सर्व्हेक्षण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते
(आशिष देशमुख नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.


====================================

दोन वर्षांपूर्वीच्या विषबाधेचा ठाण्याच्या हत्याकांडाशी संबंध

दोन वर्षांपूर्वीच्या विषबाधेचा ठाण्याच्या हत्याकांडाशी संबंध?
ठाणे : ठाण्यातील सामुहिक हत्याकांडाबाबत एक नवीन खुलासा समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी वरेकर कुटुंबातील सहा जणांना विषबाधा झाल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे या घटनेचा काल रात्री झालेल्या सामुहिक हत्येशी काही संबंध आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. 
दोन वर्षांपूर्वी दावतमध्ये वरेकर कुटुंबियांना अन्नातून विषबाधा झाली होती. सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण अन्न शिळं झाल्यानं ही बाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त करुन कोणतीही पोलीस तक्रार झाली नाही. मात्र आजच्या हत्याकांडाचा त्या घटनेशी काही संबंध आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत. 
काय घडलं? 
आपल्याच कुटुंबातील 14 जणांची हत्या करुन आरोपी हसनैन वरेकरने आत्महत्या केली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. ठाण्याच्या कासारवडवली परिसरातील वडवली मशिदीजवळ हे हत्याकांड घडलं. चौदा जणांची सुरीने भोसकून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्यांमध्ये 7 मुलं, 6 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. 
आरोपी हसनैन वरेकर हा इन्कम टॅक्स संबंधित कंपनीत कार्यरत असल्याची माहिती आहे. त्याचं वय 35 ते 37 वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
====================================

नगरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, गृहराज्यमंत्र्यांच्या समोरच कार्यकर्ते भिडले

नगरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, गृहराज्यमंत्र्यांच्या समोरच कार्यकर्ते भिडले!
अहमदनगर शिस्तप्रीय पक्षाचा डांगोरा पीटनाऱ्या भाजपचा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अहमदनगर जिल्हाध्यक्षपदासाठी बोलवलेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याच उपस्थितीत कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. विशेष म्हणजे हे सारं राम शिंदेंच्या उपस्थित घडलं. 
पक्ष भाड्यानंच दिल्याचा जाहीर आरोपच काही कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळं गोंधळात आणखीच भर पडल्यानं खुद्द गृहराज्यमंत्र्यांनाच सुनावण्याची वेळ आली. मात्र त्यानंतरही शाब्दिक बाचाबाची सुरु झाल्यानं वातावरण पुन्हा तापलं.
bjp
जाहीर आरोप-प्रत्यारोपामुळे प्रकरण हातघाईवर आलं. काहीजण तर हात जोडून गप्प राहण्यासाठी विनवण्या करताना ही दिसत होते. मात्र तरीही गोंधळ थांबत नसल्यानं शेवटी पोलीस बैठकीत हजर झाले. त्यानंतर गोंधळातच काही मिनिटात भानुदास बेरड यांची जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान या प्रकरणी काहीजणवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.
====================================

पुण्यात आयटी पार्कमधील 24 वर्षीय तरुणीवर सहकाऱ्यांचा गँगरेप

पुण्यात आयटी पार्कमधील 24 वर्षीय तरुणीवर सहकाऱ्यांचा गँगरेप
पुणे : हिंजवडीतल्या आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या 24 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्याने आणि त्याच्या मित्रांनी या तरुणीवर गँगरेप केल्याचा आरोप आहे. गँगरेप प्रकरणी पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ऑफिसमधल्या आरोपी मित्राने पीडित तरुणीला पार्टीसाठी बोलावलं. पार्टीत या तरुणीला ज्यूस पाजला. या ज्युसमध्ये मिसळलेल्या कुठल्यातरी गुंगीच्या औषधामुळे तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत या तरुणीला एकाच्या धानोरीतल्या फ्लॅटवर नेण्यात आलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
====================================

वसईजवळ समुद्रात वऱ्हाडी बोट उलटली, एकाचा मृत्यू

वसईजवळ समुद्रात वऱ्हाडी बोट उलटली, एकाचा मृत्यू
वसई : नायगावहून पाणजू बेटावर जात असलेल्या लग्नाच्या वऱ्हाडाची फेरी बोट समुद्रात उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत हरिश्चंद्र म्हात्रे या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. 
दोन लग्नांची वऱ्हाडं घेऊन या बोटी जात होत्या. दोन्ही बोटींमध्ये मिळून 70 ते 80 वऱ्हाडी होते. यावेळी क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्यामुळे बोट कलंडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र स्थानिकांच्या प्रसंगावधानामुऴे एक मोठी दुर्घटना टळली. 
पाण्यात बुडत असलेल्या 11 जणांना स्थानिकांनी बाहेर काढलं. 40 ते 50 जणांवर पालिकेच्या रुग्णालयात, तर 10 जणांवर कार्डिनल ग्रेसेस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
====================================

राजेश खन्ना यांचा ‘आशीर्वाद’ अखेर जमीनदोस्त

राजेश खन्ना यांचा ‘आशीर्वाद’ अखेर जमीनदोस्त!
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा पहिला सुपरस्टार अर्थात अभिनेते राजेश खन्ना यांचा प्रसिद्ध ‘आशीर्वाद’ बंगला जमीनदोस्त झाला आहे. मुंबईतील बांद्रास्थित ‘आशीर्वाद’ बंगला खरेदी केलेल्या मालकाकडून गेल्या दोन आठवड्यांपासून पाडकाम सुरु होतं. बांद्र्यामधील कार्टर रोडवर हा बंगला आहे. 
अभिनेते राजेश खन्ना यांचं 2012 साली निधन झालं. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हा बंगला ऑलकार्गो लॉजिस्टिक्सचे संस्थापक आणि अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांना सुमारे 90 कोटी रुपयांना विकला. सूत्रांच्या माहितीनुसार, शशी किरण शेट्टी यांनी ‘आशीर्वाद’ बंगल्याच्या ठिकाणी चार मजली अलिशान बंगला बांधण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: शेट्टी हे या नव्या बंगल्यात आपल्या नातेवाईकांसह राहणार आहेत. राजेश खन्ना यांनी हा बंगला 1990 च्या दशकता प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार यांच्याकडून खरेदी केला होता.
====================================

परभणीत 331 जोडपी विवाहबंधनात, शिवसेनेचा पुढाकार

परभणीत 331 जोडपी विवाहबंधनात, शिवसेनेचा पुढाकार
परभणी परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या पुढाकारातून सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्यात आला. तब्बल 331 जोडपे विवाहबंधनात अडकले. 
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेतंर्गत शिवसेनेनं या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेतला होता. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेतेही उपस्थित होते. 
विवाहानंतर शिवसेनेकडून नवदाम्पत्यांना आपला संसार उभा करण्यासाठी आर्थिक मदतही दिली जाणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या पुढाकारावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होतो आहे.
====================================

फाटक्या नोटा बदलून देणारा सोलापूरचा उच्चशिक्षित अवलिया

फाटक्या नोटा बदलून देणारा सोलापूरचा उच्चशिक्षित अवलिया
सोलापूर : फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा ही सगळ्यांसाठीच डोकेदुखी असते. या नोटा बँकेत द्यायच्या म्हटल्यास त्यासाठी वेळ काढणं जमत नाही आणि दुसरं कोणी या नोटा घेत नाहीत. अशावेळी या नोटांचं करायचं काय या प्रश्नावर तोडगा काढलाय सोलापुरातल्या उच्चशिक्षित विजय पाटील यानं. 
डोक्यावर टोपी, खिशात बोर्ड आणि खांद्याला एक बॅग एवढंच भांडवल घेऊन सोलापुरातल्या विजयनं सुरु केला जगातला आगळावेगळा व्यवसाय. फाटलेल्या नोटा बदलण्याचा व्यवसाय. 
निसर्गाचा लहरीपणा शेती करु देत नाही आणि वशिलेबाजीनं नोकरी मिळत नाही अशा परिस्थितीत हार न मानता अतिशय चिकाटीनं विजय हा व्यवसाय करतोय. विजयचे वडीलही पदवीधर असून नोकरीअभावी त्यांनीही हाच व्यवसाय केला होता. 
सोलापूर आणि शेजारच्या जिल्ह्यातल्या बाजारपेठांच्या शहरांमध्ये फिरुन विजय हा व्यवसाय करतोय. नोटा कशाही असो, योग्य ते कमिशन घेऊन त्या घरबसल्या बदलता येतात. एकेकाळी नोकरीसाठी दारोदार फिरणाऱ्या विजयला आताही फिरावं लागतंय. मात्र त्यातून त्याला महिन्याकाठी 30 ते 35 हजारांचं उत्पन्न मिळतं.
====================================

रोबो 2 : अक्षय-रजनी आमनेसामने, एका सीनसाठी 20 कोटी

रोबो 2 : अक्षय-रजनी आमनेसामने, एका सीनसाठी 20 कोटी
मुंबई : रजनीकांतच्या आगामी रोबो 2 चित्रपटाच्या शूटिंगसाठी अक्षयकुमार चेन्नईला रवाना झाला आहे. सोमवारपासून रोबो 2 चित्रपटातील अक्षयकुमारच्या कामाचा श्रीगणेशा होईल. पुढील काही आठवडे चित्रपटाचं नॉन स्टॉप शूटिंग करण्याचा दिग्दर्शक शंकर यांचा मानस आहे. 
चित्रपटाचा हिरो रजनीकांत आणि व्हिलन अक्षयकुमार यांच्यातील अॅक्शन सीन्सचं शूटिंग सुरु होणार आहे. एका सीनवर 20 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. दोन्ही सुपरस्टारना शूटिंग पटकन आटपता यावं, म्हणून अशा प्रकारचा सेट अप उभारण्यात आला आहे. 
हॉलिवूडच्या तोडीचा सीन व्हावा यासाठी पाश्चात्य देशातून स्टंट एक्स्पर्ट, व्हीएफएक्स टीम बोलवण्यात आली आहे. 
2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या, शंकर यांचं दिग्दर्शन असलेल्या रोबो चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. पहिल्या भागात ऐश्वर्या राय बच्चने भूमिका साकारली होती, तर सिक्वेलमध्ये एमी जॅक्सन दिसणार आहे. चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयकुमार बऱ्याच वर्षांनी निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. 
रोबो 2 चं बजेट 250 कोटींच्या घरात असून हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. चित्रपटाचं चित्रीकरण 3D मध्ये होणार असून 2017 मध्ये चित्रपटगृहात झळकण्याची शक्यता आहे.
====================================
नाशिक; कॅनव्हासवर उतरल्या काळारामाच्या छटा
नाशिक : सुर्यकिरणांनी उजळलेले मंदिर. झाडांच्या थंडगार सावलीतून निर्माण झालेले शेड. दर्शनाला आलेले भाविक. अशा असंख्या बारकाव्यांसह काळारामाच्या विविध छटा थेट कॅनव्हासवर उतरल्या होत्या. औचित्य होते पंचवटीतील काळाराम मंदिर येथे "सकाळ‘तर्फे आयोजित केलेल्या "कलांगण‘ या अनोख्या उपक्रमाचे. 

शहरातील अनुभवी चित्रकारांसोबतच नवोदित चित्रकारांनी चित्रे रेखाटली. या चित्रांना ज्येष्ठ चित्रकारांसोबतच मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांनी दाद दिली. कुणी वॉटर कलरचा वापर करुन, तर कुणी ऍक्रॅलिक, ऑईल कलरचा वापर करून आपआपल्या दृष्टीने मंदिराचे दृष्य टिपले. बालचित्रकारांनीही यावेळी चित्रकला काढत आनंद लुटला. 
सकाळी आठला ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश भिडे आणि वारली पेंटींगच्या अभ्यासिका सौ. अदिती भिडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यानंतर शहर परीसरातील विविध चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या दृष्टीने काळाराम मंदिरचे विविध पैलू टिपत कॅनव्हासवर उतरविले. प्रत्येक चित्रकाराने आपल्या वेगळ्या अशा शैलीने उपस्थितांना आकर्षित केले होते. या उपक्रमाला नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक यांनी भेट देत चित्रकारांना प्रोत्साहित केले.
====================================
'पीएफ'मध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचाऱ्यांची नापसंती - एक सर्व्हेक्षण

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (ईपीएफ) पैसे काढण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे 70 टक्के कर्मचारी ईपीएफमध्ये पैसे गुंतविण्यास उत्सुक नसल्याचे एका आर्थिक सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. 

आर्थिक सर्व्हेक्षण 2015-16 च्या एका पाहणीमध्ये ही माहिती आढळून आली आहे. पैशांची उणीव आणि मिळालेला पैसा पटकन खर्च करावेसे वाटत असल्याने 70 टक्के कर्मचारी पीएफमध्ये पैसे गुंतविण्यात इच्छुक नसतात. याशिवाय पीएफ रक्कम काढण्यासाठी असलेली किचकट प्रक्रियाही अनिच्छेचे कारण असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय पैसे काढताना लागणारे शुल्क हे देखील कारण असल्याचे सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. विशेष म्हणजे नेहमीच नोकरी बदलणाऱ्या व्यक्तींना पैसे काढण्याच्या किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यामुळे पीएफमध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचारी नापसंती दर्शवित आहेत. देशातील निम्म्यापेक्षा अधिक पीएफ खात्यांमध्ये मागील तीन वर्षांपासून कोणताही व्यवहार झाला नसल्याने ती खाती निष्क्रिय असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
====================================
आशियातील टॉप टेनमध्ये 3 भारतीय सागरकिनारे 

मुंबई - ट्रिप ऍडव्हाईजर या पर्यटन व्यवसायामधील प्रसिद्ध कंपनीने जगभरातील पर्यटकांची पसंती असलेल्या आशिया खंडामधील पहिल्या 10 समुद्र किनाऱ्यांच्या तयार केलेल्या यादीमध्ये भारतामधील तीन समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 
अगोंदा व पलोलेम (दोन्ही किनारे गोव्यामधील) आणि अंदमान द्वीपसमुहामधील हवेलॉक बेटांवरील राधानगर समुद्रकिनाऱ्याचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 
""भारतास विस्तृत व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. तेव्हा भारतामधील सागर किनाऱ्यांना जागतिक पातळीवर मान्यता मिळणे, ही निश्‍चितच अत्यंत आनंदाची बाब आहे,‘‘ असे या कंपनीचे भारत विभाग व्यवस्थापक निखिल गांजु यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले. 
====================================
जळगाव; जिवाची पर्वा न करता तरुणांनी विझवला वणवा

जळगाव - जामनेर-बोदवड रस्त्यावर भवानी मंदिराच्या जवळ सामरोद बीट या ठिकाणी भर दुपारी आगीच्या ज्वाळा निघत होत्या. जंगलात कुणीतरी वणवा पेटवला होता. अशा वेळी तेथुन जाणाऱ्या दोघा तरुणांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी जीवाची पर्वा न करता वणवा विझवण्यासाठी प्रयत्न केला. जवळपास पाऊणतास हे तरुण आगीच्या ज्वाळा विझवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि भरदुपारी सुरू असलेला हा थरार अखेर थांबला. 
अजय पाटील आणि अजय मनुरे हे दोघे तरुण दुचाकीने गुरूवारी जामनेरहून बोदवडकडे निघाले होते. दुपारी चारला ते सामरोद बीट समोरून जात असताना जंगलाच्या दिशेने त्यांना मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दुचाकी धुराच्या दिशेने वळविली. जवळ गेल्यावर जवळपास ५० एकर परिसरात वणवा पेटल्याचे त्यांच्या लक्षात आले.
स्वत: घेतला पुढाकार
वणवा पेटलेला असताना शांतपणे कसे बघत रहायचे हा विचार करून अजय पाटील आणि अजय मनुरे यांनी झाडाचा पाला तोडुन आग विझवण्याचे काम हाती घेतले. तीन-चार फुट उंच आगीच्या ज्वाळा अन धुराचे प्रचंड लोळ यांच्याशी सामना करत त्यांनी आग विझवायला सुरवात केली. पाऊण तास ते दोघे आग विझवत होते. आग विझवता विझवता दोघे एकमेकांपासुन दूर गेले, धुराच्या लोळांमुळे ते एकमेकांना दिसत नव्हते. पाऊण तासानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. 
====================================
जळगाव; रक्तबंबाळ झाल्यानंतरही महिलेने चोरट्याला पकडले
जळगाव - जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागातील कर्मचारी नम्रता नेवे दुपारी जेवायला आल्यावर त्यांना घर उघडे दिसले. त्यांनी सावधपणे आत प्रवेश केला. चोरटा पळून जाण्याच्या तयारी असताना त्याला पकडले. त्याने हातातील टॉमी मारुन जखमी केल्यानंतर पळ काढला. रक्तबंबाळ होऊनही त्यांनी आरडाओरड करीत त्याचा पाठलाग केला. पोलिस संजय हिवरकर व नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडण्यात आले. ही घटना आज दुपारी गुरूदत्त कॉलनीत घडली.
गणेश कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिरापुढील गुरुदत्त कॉलनीतील श्री अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ९ मध्ये नम्रता नागेश नेवे (वय ३६) राहतात. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिका विभागात सेवेत आहेत. आज दुपारी दोनला त्या जेवण्यासाठी आल्या. दरवाजा उघडा दिसताच त्या गोंधळल्या. घरफोडी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी सावधपणे घरात प्रवेश केला. बेडरूमकडून हातात कॅमेरा घेऊन येत असलेल्या तरूणाला त्यांनी पाहिले तू कोण, घरात काय करतोय असा जाब विचारला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चोरट्याने हातात असलेली टॉमी नम्रता यांच्या डोक्‍यावर मारली. रक्‍तबंबाळ अवस्थेतही त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला. यावेळी त्यांनी इतरांच्या मदतीसाठी आरडाओरडही केली. अपार्टमेंटच्या गेटजवळच समोरून येत असलेले शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी संजय हिवरकर व नम्रता नेवे यांनी काही जणांच्या मदतीने त्या चोरट्याला पकडले.
====================================
चिदंबरमनी इशरतसंदर्भात केले वादग्रस्त बदल

नवी दिल्ली - गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या इशरत जहॉं या महिला दहशतवाद्यासंदर्भात केंद्र सरकारने 2009 मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रातील वादग्रस्त बदल तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी स्वत: पुढाकार घेऊन केल्याची धक्कादायक माहिती तत्कालीन गृहसचिव जी के पिल्ले यांनी दिली आहे. 
चिदंबरम यांच्यामुळे इशरत लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा उल्लेख या शपथपत्रामधून काढून टाकण्यात आल्याचे पिल्ले यांनी म्हटले आहे. ""सरकारतर्फे आधी दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात इशरत ही लष्करे तैयबाची दहशतवादी असल्याचा उल्लेख होता; मात्र चिदंबरम यांनी त्यानंतर यासंदर्भात काही बदल करावयाचे असल्याचे सांगत कागदपत्रे संयुक्त सचिवांकडून मागविली. बदलण्यात आलेले शपथपत्र पुन्हा माझ्यापर्यंत आलेच नाही,‘‘ असे पिल्ले म्हणाले. इशरतला ठार करण्यात आल्यानंतर लष्करे तैयबाकडून तिचा हुतात्मा म्हणून गौरव कराण्यात आला होता.
====================================
हरियाना सरकारची कृती लज्जास्पद- कॉंग्रेस
जाट समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या बलात्काराच्या घटनांबाबत प्रत्यक्षदर्शी माध्यमांसमोर येऊन माहिती देत असताना हरियाना सरकार आणि पोलिसांना पुरावे मिळत नाहीत, हा प्रकार लज्जास्पद आणि निषेधार्ह असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.

याबाबत बोलताना कॉंग्रेस नेत्या शोभा ओझा म्हणाल्या, "या सर्व प्रकारापासून हरियाना सरकार आणि पोलिस सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे प्रत्यक्षदर्शी माध्यमांसबोर येत असून घटनेबाबत सविस्तर माहिती देत आहेत. सर्वांत लज्जास्पद गोष्ट म्हणजे या घटनेची माहिती देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मदत क्रमांक चुकीचा असून इतर दोन मदत क्रमांकावर कोणीही उत्तर देत नाही. या सर्व घटनांवरून ही घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.‘ तसेच सरकार आणि पोलिसांवर विश्‍वास नसल्यानेच एकही पीडित गुन्हा दाखल करण्यासाठी समोर येत नसल्याची टीकाही ओझा यांनी केली. 

हरियानामध्ये जाट आंदोलनादरम्यान सोनपेठजवळ असलेल्या मुर्थल येथे महिलांवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. पंजाप आणि हरियानाच्या उच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वत:हून (सुओ मोटो) हस्तक्षेप केला आहे. त्यानंतर या घटनेबाबत पुरावा मिळत नसल्याने प्रत्यक्षदर्शींनी याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केले आहे.
====================================

No comments: