[अंतरराष्ट्रीय]
१- निर्बंधाच्या इशा-यानंतरही उत्तर कोरियाची रॉकेट चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- 'पाकिस्तानात शरीफ यांच्या घरी मोदी-दाऊद भेट'- समाजवादी पक्षाचे नेते आझम खान
३- ईडीकडून पंकज भुजबळांचा पासपोर्ट जप्त, चौकशीसाठी समन्स
४- भारत अत्यंत सहिष्णू देश, आयुष्यभर भारतातच राहणार : कतरिना कैफ
५- महाबळेश्वर; श्रीमंती खेळासाठी हजारो वृक्षांची कत्तल; ‘पोलो मैदाना’साठी वनश्रीमंतीला वन विभागाचेच नख
६- गेल्या तीन दशकांत ८७९ जवानांना ‘हिम समाधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- सहकार मंत्री चंद्रकांत पाटलांच्या कारवरच फॅन्सी नंबर
८- कोल्हापूर टोलमुक्त, करवीरवासियांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार
९- पाय तोडण्याची धमकी दिल्यानंतर DLFचं मिहानमध्ये काम सुरु : गडकरी
१०- विदर्भात रामदेव बाबा १५ हजार कोटी गुंतवणार
११- नवी समृद्ध पिढी शिक्षकांनी घडवावी - शरद पवार यांचे आवाहन
१२- हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- पंढरपूर; वाहनचालकांना लुटताना भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष अटकेत
१४- आईला बाबा रोज मारतात..मी मोठी झाल्यावर आईला बाबांपासून खूप दूर घेऊन जाईन.-चिमुकलीचा निबंध
१५- विठ्ठल मंदिरावर आता विद्युत रोषणाई, तर चंद्रभागेच्या वाळवंटात लेझर शो
१६- मुंबई; हरवलेला लेहंगा शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांची विशेष पथकं
१७- खेमकरणमध्ये बीएसएफच्या गोळीबारात चार तस्कर ठार
१८- नागपुरजवळ अपघातात चार जणांचा मृत्यू
१९- पुणे:हेल्मेट न घालणाऱ्या 101 पोलिसांवर कारवाई
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- जेव्हा पंतप्रधान मोदी अक्षय कुमारच्या मुलाचा कान ओढतात आणि म्हणतात..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२१- बिलोली; लाच घेणाऱ्या ग्राम्सेविकेला सक्त मजुरी
२२- लोह्यात धाडसी चोरी, दागिन्यासह अडीच लाखांचा ऐवज लंपास
२३- लातूरच्या शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांकडून रुग्णासह नातेवाईकास मारहाण
२४- गोदावरीतील ११ दलघमी पाणी प्रदूषित, संबंधितांवर कारवाई करा- आ. हेमंत पाटील
२५- जिल्ह्यात २० लाख २६ हजारांवर लाभार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
सैकेत मनमवार, शाम कल्याणकर, सत्यवीर बिष्णोई, राजकुमार भालके, विनीत नायक, महेश श्रीरामवार, रविराज शिंदे, दयानंद
बालशंकर, बालाजी ढवळे, पंढरीनाथ बोकारे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जीवनात एवढ्याहि चुका करू नका,
कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ........
रबराला एवढाही वापरू नका,
कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.
(मिनाक्षी मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
======================================================
सहकार मंत्री चंद्रकांत पाटलांच्या कारवरच फॅन्सी नंबर
सोलापूर : एकीकडे महाराष्ट्रातलं युती सरकार हेल्मेटची सक्ती करत असताना सरकारमधील मंत्रीच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलं आहे. सोलापुरात सहकार मंत्री चंद्रकांत पाटलांनीच फॅन्सी क्रमांकाची कार वापरल्याचं समोर आलं आहे.
चंद्रकांत पाटील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी वापरलेल्या गाडीची नंबरप्लेट मात्र फॅन्सी स्टाईलनं लिहिल्याचं आढळलं, ज्यावर बीजेपी असं लिहिलं आहे. त्यामुळे हा क्रमांक एमएच 13 सीएफ 8110 असा असण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे त्या गाडीवर लालदिवा सुद्धा होता. मात्र पाटलांच्या ताफ्यात असलेल्या एकाही पोलिसानं त्यावर आक्षेप घेतला नाही किंवा त्यांच्याकडून दंडही वसुल केला नाही. त्यामुळे हेल्मेटसक्तीसारखे वाहतुकीचे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे.
कोल्हापूर टोलमुक्त, करवीरवासियांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार
कोल्हापूर : कोल्हापुरातून टोल अखेर हद्दपार झाला आहे. शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर असणारे टोल बूथ हटवण्यात आले असून टोलनाके हटवण्याचं कामही आयआरबीकडून सुरु झालं आहे. कोल्हापूर टोलमुक्त झाल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून टोलबंदीसाठी कोल्हापुरात आंदोलनं सुरु होती. कोल्हापुरात टोलबंदीची मागणी करत दोन वेळा महामोर्चे आणि आठ वेळा कोल्हापूर शहर बंद ठेवण्यात आलं. तर अनेकदा आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे.
राज्य सरकारने गेल्या वर्षी 31 मे रोजी राज्यातले काही टोल बंद केले. मात्र कोल्हापुरातल्या टोलचा प्रश्न कायम होता. त्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूरकर रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने दोनदा अधिसूचना काढली आणि काल महापालिकेच्या वतीने मोठी यंत्रसामुग्री लावून टोलनाके हटवण्यात आले.
'पाकिस्तानात शरीफ यांच्या घरी मोदी-दाऊद भेट'
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी पाकिस्तान भेटीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा दावा समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केला आहे. मोदींनी सांगितलं तर दाऊद भेटीचे फोटो पुरावे म्हणून सादर करु शकतो असा दावाही आझम खान यांनी केला आहे.
‘महिनाभरापूर्वी अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर मोदी असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता नियम मोडून लाहोरला गेले. तिथे ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी जाऊन शरीफ कुटुंबीयांना भेटले. यावेळी दाऊदही तिथे हजर होता’ असं आझम खान यांनी म्हटलं आहे.़
मोदींनी शरीफ यांच्या मातोश्रींना पश्मिना शाल भेट दिली, त्याच्या बदल्यात मोदींना शीक कबाब आल्याचंही त्यांनी म्हटलं. भारत सरकारने आझम खान यांचा आरोप खोडून काढला आहे. आझम खान यांचा आरोप तथ्यहीन असल्याचं सरकारने म्हटलं आहे.
भारत अत्यंत सहिष्णू देश, आयुष्यभर भारतातच राहणार : कतरिना कैफ
नवी दिल्ली : भारतातील असहिष्णुतेबाबत बॉलिवूडमधील खान मंडळींची वक्तव्य येत असतानाच बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने मात्र भारत हा अत्यंत सहिष्णू देश असल्याचं म्हटलं आहे. आयुष्यभर मला भारतातच राहायला आवडेल, असंही कतरिनाने स्पष्ट केलं आहे.
‘भारतातील असहिष्णुतेबाबत सुरु असलेल्या चर्चेविषयी मला फारशी माहिती नाही, मात्र हा भारत हा प्रचंड सहिष्णू देश आहे, असं माझं मत आहे. भारतासाठी माझ्या मनात विशेष स्थान आहे.’ असं कतरिना म्हणते.
‘जेव्हा मी भारतात आले, तेव्हा मला घरीच आल्यासारखं वाटलं. इथे जी ऊब आहे, ती इतरत्र कुठेही अनुभवता येत नाही. मला जन्मभर इथेच राहायची इच्छा आहे’ असं कतरिनाने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. कतरिनाचा ‘फितूर’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.
हरवलेला लेहंगा शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांची विशेष पथकं
मुंबई : एकीकडे अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. मात्र पोलिसांना त्या तपासाऐवजी एक लेहंगा शोधणं जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. तो लेहंगा शोधण्यासाठी पोलिसांनी पथकं देखील रवाना केली आहेत.
पोलिसांनी कुठल्या अट्टल गुन्हेगारांना किंवा मारेकऱ्याला शोधण्यासाठी विशेष पथकं नेमली नसून रेल्वे पोलीस लग्नाच्या लेहंग्याचा शोध घेत आहेत. चर्चगेट स्टेशनवर रेल्वेतून उतरणाऱ्या महिलेवर लेहंगा चोरल्याचा संशय आहे.
मुंबईतील मिती बोरा यांनी लग्नासाठी 40 हजार रुपयांचा लेहंगा खरेदी केला. 30 जानेवारीला हा लेहंगा घेऊन मिती बोरा लोकलमधून टेलरकडे निघाल्या. मात्र मरीन ड्राईव्ह स्टेशनवर उतरताना लेहंगा लोकलमध्येच विसरला आणि त्यानंतर शोधाशोध सुरु झाली.
महिलांची छेडछाड करणारे अनेक गुन्हेगार रेल्वे पोलिसांना अजूनही सापडत नाहीत. पोलिसांची संख्या कमी असल्यानं महिलांच्या डब्यात पोलीस नसतात. आणि इथे दोन दोन पथकं लेहंगा शोधण्यात लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पंढरपूर; वाहनचालकांना लुटताना भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष अटकेत
पंढरपूर : टेंभुर्णीच्या भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कोकाटे यांना हायवेवर वाहन चालकांची लूटमार करताना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने कोकाटे यांना 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे भाजप नेत्यांची कोंडी झाली असून अद्याप कोकाटेंविरुद्ध भाजपने कोणतीही कारवाई केल्याची माहिती नाही. विजय कोकाटेंसह साथीदार गणेश पाचंगेलाही यावेळी पोलिसांनी अटक केली.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गाड्या गाड्या आडव्या लावून वाहनचालकांना लुटण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गस्त वाढवली होती. अशाच गस्तीच्या वेळी काही तरुण एका वाहनाला अडवून दमदाटी करत असल्याचं दिसलं.
पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यावर ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. या दोघांनी महामार्गावर अनेक गाड्या लुटल्याचा पोलिसांना संशय असून त्या पद्धतीने पोलिस तपास करत आहेत.
पाय तोडण्याची धमकी दिल्यानंतर DLFचं मिहानमध्ये काम सुरु : गडकरी
नागपूर : नागपूरच्या महत्वाकांक्षी मिहान प्रकल्पासाठी अनेकांना धमकी देऊन काम करुन घेतलं अशी कबुली केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. ते नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
“मिहानमध्ये काम सुरु न करता जमीन वापस घ्या आणि आमचे पैसे परत द्या, अशी मागणी डीएलएफ या कंपनीनं केली. मी मात्र त्या कामाबद्दल ठाम होतो. वापस जा पण दोन्ही पाय तोडीन” अशी धमकीही आपण डीएलएफला दिल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही टोला लगावला. काल पृथ्वीराज चव्हाण यांनी स्मार्ट सिटी बोगस योजना असल्याची टीका केली. त्याला गडकरींनी उत्तर दिलं.
ईडीकडून पंकज भुजबळांचा पासपोर्ट जप्त, चौकशीसाठी समन्स
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ कुटुंबीयांची अडचणी वाढतच आहे. अंमलबजावणी संचलनालयाने समीर भुजबळ यांच्यापाठोपाठ पंकज भुजबळ यांचा पासपोर्ट जप्त केला आहे. देशाबाहेर जाऊ नये यासाठी ईडीने ही कारवाई केली आहे.
यासोबतच अंमलबजावणी संचलनालयाने चौकशीसाठी पंकज भुजबळ यांना समन्सही बजावला आहे. शिवाय छगन भुजबळांनाही लवरकच समन्स बजावण्यात येईल, असं कळतं.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने यापूर्वीच समीर भुजबळ यांना अटक केली आहे. आता पंकज भुजबळ यांना चौकशीसाठी बोलावल्याने त्यांच्या अटकेची शक्यताही वाढली आहे.
दरम्यान, भुजबळांच्या कुटुंबीयांची चौकशी होत असतान छगन भुजबळ मात्र अजूनही अमेरिकेत आहेत.
“आईला बाबा रोज मारतात..मी मोठी झाल्यावर आईला बाबांपासून खूप दूर घेऊन जाईन.”
प्रातिनिधिक फोटो
कोलकाता : कोलकात्यातील एका चिमुकलीच्या निबंधाची सर्वत्र चर्चा सुरु झालीय. या चिमुरकलीने ‘माझे कुटुंब’ या विषयावर लिहिलेल्या निबंधाने शाळेतील शिक्षक अक्षरश: हादरुन गेले आहेत. काळीज पिळवटून टाकणारं लेखन या चिमुकलीने केलं आहे.
“माझ्या आईला बाबा रोज रात्री मारतात. मग मी आणि आई रोज रात्री रडतो. आजूबाजूच्या कुणालाही आमची काळजी वाटत नाही. काकाही आमच्याकडे दुर्लक्ष करतात. मी मोठी झाल्यावर आईला बाबांपासून खूप दूर घेऊन जाईन”, असे या चिमुकलीने ‘माझं कुटुंब’ या निबंधात लिहिलं आहे. चिमुकलीने लिहिलेला हा निबंध वाचून शाळेतील शिक्षकांना जबर धक्का बसला.
कोलाकात्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवी इयत्तेत ही चिमुकली शिकते. वर्गात कायम शांत असणाऱ्या या चिमुकलीने घरची परिस्थिती निबंधात मांडल्याने शिक्षकांना धक्का बसला आणि त्यांनी थेट मुख्याध्यापकांना या निबंधाबाबत माहिती दिली.
त्यानंतर शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी चिमुकलीच्या पालकांना शाळेत बोलावून घेतलं आणि त्यांचं काऊंन्सिलिंग केलं गेलं. काही दिवस चिमुकलीच्या आई-वडिलांना वेगळं राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यासोबतच घरातील वर्तणूक सुधारण्याचा सल्लाही दिला आहे.
जेव्हा पंतप्रधान मोदी अक्षय कुमारच्या मुलाचा कान ओढतात आणि म्हणतात...
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने ट्विटर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अक्षय कुमरच्या मुलाचं म्हणजेच आरवचा कान ओढताना दिसत आहेत. अक्षय कुमारने हा फोटो त्याच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.
ट्विटर फोटो शेअर फोटोसोबत अक्षयने लिहिलं आहे, “एखाद्या वडिलासाठी तो क्षण अत्यंत अभिमानाचा असतो, जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्या मुलाची मस्करी करत कान ओढतात आणि म्हणतात, मुलगा चांगला आहे.”
ट्विंकल खन्नानेही अक्षय कुमारने ट्वीट केलेला फोटो शेअर केला आहे. आरव हा अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आहे. या दोघांना नितारा नावाची एक मुलगीही आहे.
विठ्ठल मंदिरावर आता विद्युत रोषणाई, तर चंद्रभागेच्या वाळवंटात लेझर शो
पंढरपूर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल-रखुमाईचं मंदिर लवकरच आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे. मंदिर आकर्षक दिसावं यासाठी ही विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली.
सध्या केवळ आषाढी यात्रेच्या काळात मंदिराला अशा पद्धतीची विद्युत रोषणाई केली जात असते. आता मात्र या निर्णयाने कायम स्वरूपी विठूरायाची राऊळी कायमच या दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघणार आहे. हे रोषणाईचे काम पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्याची तयारी मंदिर समितीने केली असून याला दीड कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
याचबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटात मंदिर समिती अर्धा लेझर शो सुरु करणार असून यातून पंढरपूर आणि विठ्ठल मंदिराचा इतिहास सांगितला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
विदर्भात रामदेव बाबा १५ हजार कोटी गुंतवणार
नागपूरमध्ये फूडपार्क; काटोलचा संत्रा प्रकल्पही सुरू करणार; नितीन गडकरी यांची माहिती योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर महाराष्ट्र सरकार मेहरबान आहे. रामदेव बाबांच्या कंपनीला नागपूर व अमरावती येथे फूडपार्क सुरू करण्यासाठी सरकार जागा उपलब्ध करून देणार असून या माध्यमातून ते १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्याच बरोबर काटोल येथील बंद पडलेला संत्रा प्रक्रिया प्रकल्पही रामदेव बाबांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. शनिवारी जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. बाबा रामदेव यांची भारतीय जनता पक्षासोबत विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेली जवळीक सर्वश्रूत आहे. त्यातूनच रामदेव बाबांवर महाराष्ट्र सरकार मेहरबान झाले आहे. नागपूर आणि विदर्भाचा औद्योगिक विकास व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करणे आवश्यक आहेत. ही बाब लक्षात घेऊनच रामदेवबाबाबांना नागपूर आणि अमरावतीत फूड पार्क उभारण्यासाठी जागा देण्यात येणार आहे. तसेच काटोल येथील बंद असलेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रामदेवबाबा त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून विदर्भात १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यापैकी १५०० कोटींचा प्रकल्प नागपुरात उभारला जाणार आहे. प्रकल्पाच्या संदर्भात रामदेव यांनी काही अटी टाकल्या आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यावर हा प्रश्न सोडविला जाईल. याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांना दिल्या. तत्पूर्वी, गडकरी यांनी त्यांच्या भाषणात रामदेवबाबा सुरू करणार असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाट या भागात मोठय़ा प्रमाणात आयुर्वेदिक वनौषधी आहेत. त्यावर प्रक्रिया करून औषधनिर्मिती करणारे प्रकल्प बाबा रामदेव सुरू करणार असून जागा मिळाल्यास ते रुग्णालयही सुरू करण्यास तयार आहेत. १५०० कोटींचे नवीन विमानतळ नागपूर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून त्यासाठी १५०० कोटी रुपयांच्या विकास आराखडय़ाला मान्यता देण्यात आली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. त्याच बरोबर ‘लॉजिस्टिक हब’ च्या प्रस्तावालाही राज्य सकारच्यावतीने मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे आता नागपूरच्या मिहान प्रकल्पाला भरारी मिळण्याची शक्यता आहे. या विमानतळालासुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येणार आहे.
======================================================नवी समृद्ध पिढी शिक्षकांनी घडवावी - शरद पवार यांचे आवाहन; राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्याची गरज असून पालकांमध्ये शैक्षिणक गुणवत्तेविषयी विश्वास वाढविण्याकरिता शालेय शिक्षकांनी मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तर महाराष्ट्राचे नवीन सृमद्ध पिढी शिक्षकांनीच घडवली पाहिजे असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रवार्षिक अधिवेशन व राज्यस्तरीय शिक्षण परिषदमध्ये केले. नवी मुंबईच्या ऐरोली येथील पटनी मैदानात शनिवारी हे अधिवेशन पार पडले. या वेळी पवार म्हणाले की, बदलत्या शिक्षणाबरोबर मुलांची मानसिकतादेखील बदलत असून त्यांच्या मध्ये नव्या शैक्षणिक विचांराची रुजवण करण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या शिक्षणाबरोबर गुणवत्तेवर भर देणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट करत येत्या ३ वर्षांत शिक्षकांसाठीधोरणात्मक निर्णय सरकार घेईल असे सांगितले. शिक्षक भरतीवरील बंदी उठवली -तावडे राज्यातील शिक्षकांच्या भरतीवरील बंदी सरकारने उठवली असून लवकरच शिक्षक भरती सुरू करणार असून आंतरजिल्हा बदली व शिक्षकांच्या आरोग्यासाठी असणारी कॅशलेस विमा योजनाची मागणी राज्यात लवकरच लागू होणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले.
======================================================महाबळेश्वर; श्रीमंती खेळासाठी हजारो वृक्षांची कत्तल; ‘पोलो मैदाना’साठी वनश्रीमंतीला वन विभागाचेच नख
श्रीमंती खेळ असलेल्या पोलोच्या विकासाची पालखी क्रीडा विभागाने नव्हे तर थेट वनविभागानेच उचलली असून महाबळेश्वरच्या जंगलातील ‘पोलो ग्राऊंड’च्या विस्तारासाठी वन विभागाच्याच पुढाकाराने हजारो दुर्मीळ वृक्षांची थेट कत्तलच करण्याची योजना आकार घेत आहे. पर्यावरणप्रेमींमधून या विरोधात तीव्र सूर उमटत आहे. महाबळेश्वर पर्यटनस्थळाची निर्मिती करताना इंग्रजांनी ३.६७ हेक्टर क्षेत्रफळ जागेवर ‘पोलो ग्राऊंड’ही तयार केले. वन विभागाकडे असलेल्या या मैदानावर सध्या हा खेळ खेळला जात नाही. मध्यंतरी राज्यपालांनी या मैदानाला भेट देऊन हा खेळ पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर सरकारी यंत्रणा गतिमान झाली. वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी मदानाची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यात पोलो मदानाच्या विकास आणि विस्ताराची चर्चा झाली. यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. उपवनसंरक्षक तिचे सदस्य सचिव आहेत, तर जिल्हा क्रीडा अधिकारी, राज्य पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी सदस्य आहेत. या मदानावर लवकरच प्रदर्शनीय पोलो सामने होणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी या मैदानाचा दोन हेक्टरने विस्तार होणार आहे. त्यासाठी भोवतीच्या वृक्षांची कत्तल अटळ आहे. यातील अनेक वृक्ष शंभर वर्षे जुने आहेत. त्यात दुर्मीळ प्रजातीही आहेत. हा भाग पर्यावरणदृष्टय़ा अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे वृक्षतोडीतील कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन वन विभागाकडूनच या मदानाचा विकास व विस्तार करण्याचा घाट घातला गेला आहे, असे समजते. महाबळेश्वरची जैवविविधता मोठी आहे. वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. कुक यांनीही इथल्या वनश्रीमंतीचा उल्लेख केला आहे. अगोदरच पर्यटनाच्या नावाखाली या दुर्मीळ ठेव्याचे खूप लचके तोडले गेले असताना आता पुन्हा या श्रीमंती लाडासाठी दुर्मीळ झाडे तुटू नयेत. – डॉ. संदीप श्रोत्री, पर्यावरण अभ्यासक या मैदानावर येत्या एप्रिल-मे महिन्यांत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पोलो स्पर्धा घेतल्या जाणार असल्याने त्याचा विकास आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.
======================================================हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुण्यात सर्वपक्षीय राजकीय नेते हेल्मेटसक्तीला विरोध करत असताना पुण्याच्या विश्रामवाडी परिसरात एका दुचाकीस्वाराचा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पुण्याच्या विश्रामवाडीमध्ये शनिवारी रात्री एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले नसल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्यू झाला.
या दुचाकीस्वाराचे नाव समजू शकलेले नाही. हा दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला तेव्हा त्याच्या शरीरावर डोक्याचा भाग वगळता अन्यत्र कुठेही इजा झालेली नव्हती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मागच्यावर्षी पुण्यात दुचाकीच्या अपघातात १०० पेक्षा जास्त मृत्यू झाल्याचे एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सांगितले.
पुण्यात सध्या दुचाकीस्वाराला करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीवरुन राजकारण सुरु आहे. सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन या हेल्मेट सक्तीला विरोध करत आहेत. यासाठी पुण्यात आंदोलने सुरु आहेत.
दुचाकी चालवणारा चालक आणि मागे बसणारा दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती शनिवारपासून राज्यभरात लागू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तांनी सांगितले.
======================================================खेमकरणमध्ये बीएसएफच्या गोळीबारात चार तस्कर ठार
पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवर खेमकरण गावामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार तस्कर ठार झाले. या चार तस्करांमध्ये दोन पाकिस्तानी नागरीक असून, त्यांच्याकडून हेरॉईनची १० पाकिटे जप्त करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण पाच तस्कर होते. त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांना हे तस्कर बेकायदरित्या भारताच्या हद्दीत प्रवेश करत असल्याचे आढळले. त्यांनी तस्करांना शरण येण्याचे आवाहन केले.
पण त्यांनी बीएसएफच्या इशा-याकडे दुर्लक्ष करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात हे चार तस्कर ठार झाले. ठार झालेल्या चार तस्करांमध्ये दोन पाकिस्तान तर, दोन भारतीय नागरीक आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हॅरोईनची किंमत बाजारात कोटयावधी रुपये आहे.
======================================================निर्बंधाच्या इशा-यानंतरही उत्तर कोरियाची रॉकेट चाचणी
निर्बंधाच्या इशा-याकडे दुर्लक्ष करुन उत्तर कोरियाने रविवारी लांब पल्ल्ल्याच्या रॉकेटची चाचणी केली. उत्तरकोरियाने ही चाचणीकरुन संयुक्त राष्ट्राच्या ठरावाचे उल्लंघन केले आहे.
मागच्या महिन्यात उत्तरकोरियाने अणू स्फोटाची चाचणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने उत्तरकोरियाला कठोर निर्बंधांचा इशारा दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करुन उत्तरकोरियाने ही चाचणी केली.
दक्षिणकोरियाच्या यॉनहॅप न्यूज एजन्सीनुसार ही रॉकेट चाचणी अयशस्वी ठरल्याची शक्यता आहे. उत्तरकोरियाने या चाचणीला वैज्ञानिक अवकाश कार्यक्रमाचे नाव दिले असले तरी, जग या चाचणीकडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित करण्याचा भाग म्हणून पाहत आहे.
दक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीनुसार उत्तरकोरियाच्या उत्तरपश्चिम तळावरुन सकाळी नऊ वाजता ही चाचणी घेण्यात आली. उत्तरकोरियाची ही चाचणी जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी धोका असून, संयुक्त राष्ट्राने कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पार्क ग्युन यांनी केली.
जपाननेही या चाचणीवर कठोर आक्षेप नोंदवला आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी ही चाचणी म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. जपान आणि दक्षिण कोरिया दोन्ही देशांनी उत्तरकोरियाने डागलेले रॉकेट आपल्या हद्दीत आले तर, उडवून देण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान उत्तर कोरियाच्या या रॉकेट चाचणीचा जगभरातून निषेध होत असताना उत्तर कोरियाने ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
======================================================
जम्मू-काश्मीरच्या सियाचीनमध्ये हिमकडे कोसळून एक लष्करी चौकीच बर्फाखाली गेल्याने भारताने पुन्हा आपले १० जांबाज जवान गमावले आहेत. या ७४ किलोमीटर बर्फाच्छादित क्षेत्रावर आपला ताबा कायम ठेवण्याच्या कवायतीत गेल्या तीन दशकांत ८७९ जवान मृत्युमुखी पडले आहेत.सियाचीन ही जगातील सर्वाधिक धोकादायक युद्धभूमी आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान गेल्या तीन दशकांपासून या क्षेत्राचा वाद सुरू असून, या ग्लेशिअरवर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी भारतातर्फे येथे १० हजारांवर जवान तैनात करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सियाचीनमधील लष्कराच्या तैनातीवर दररोज सुमारे सात कोटी रुपये खर्च केला जातो. शिवाय या बर्फाच्छादित क्षेत्रासाठी भारतीय सेनेलाही जवानांच्या रूपात फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
======================================================नागपुरजवळ अपघातात चार जणांचा मृत्यू
नागपूर - शहराजवळील खापरी येथे आज (रविवार) पहाटे मोटारीने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेचारवाजता खापरीजवळ ही दुर्घटना घडली. मोटारीतून एक कुटुंब बुटीबोरीहून नागपूरला येत असताना हा अपघात घडला. मोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक बसली. यामध्ये मोटारीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण जखमी असून, त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
======================================================पुणे:हेल्मेट न घालणाऱ्या 101 पोलिसांवर कारवाई
पुणे - हेल्मेट परिधान न करता मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 101 दुचाकीस्वार पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन दिवसांपासून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. आज शनिवारी तिसऱ्या दिवशी हेल्मेट परिधान न करणाऱ्या दीड हजार दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण एक लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट न घालणाऱ्यामध्ये 101 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. गेल्या तीन दिवसांत सुमारे 12 हजार विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
हेल्मेटसक्तीला विरोध; रावते आज करणार चर्चा
‘हेल्मेटसक्तीविरोधी कृती समिती‘ने हेल्मेट सक्तीला जोरदार विरोध केल्याची दखल परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतली आहे. त्यामुळे उद्या (रविवारी) रावते हे पुण्यात येऊन "हेल्मेटविरोधी कृती समिती‘सोबत चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी ही माहिती दिली. शहरात सर्वच स्तरांतून हेल्मेटसक्तीला विरोध होत आहे. शहरातील वाहनांचा वेग लक्षात घेता सक्तीची गरज नाही. या विरोधात शिवसेनाही रस्त्यावर उतरली आहे. हेल्मेटसक्ती करण्यापूर्वी जनजागृती करणे आवश्यक आहे. रावते यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कानावर हा विरोध घातला आहे. त्यामुळे कृती समितीसोबत चर्चा करण्यासाठी येण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानुसार, रविवारी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात रावते हे कृती समितीसोबत चर्चा करणार असल्याचे निम्हण यांनी सांगितले.
======================================================
No comments:
Post a Comment