Friday, 19 February 2016

नमस्कार लाईव्ह १९-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पठाणकोट हल्ला प्रकरणी पाकमध्ये गुन्हा दाखल 
२- भारत दौ-यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना दाखविले काळे झेंडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, 1 ठार 9 जखमी 
४- काश्‍मीरमध्ये 'थॅंक यू, जेएनयू'चा मोर्चा रोखला 
५- चंदिगढ; जाट आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला 
६- जाट आरक्षण आंदोलन - आंदोलनकर्त्यांनी एक डझहून अधिक दुकानांची जाळपोळ 
७- जाट आंदोलनामुळे आज ७२ रेल्वे रद्द 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- मुंबईकरांची टोलमुक्ती अनिश्चितकाळासाठी लांबणीवर 
९- शिक्षक भरतीत वशिलेबाजीला 'नो एंट्री'- तावडे 
१०- पुणे; तीनशे कोटींचा दंड ४५ मिनिटांत माफ 
११- वैद्यकीय अहवालानुसार कन्हैया कुमार जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- मुंबई; विनातपासणी कॅन्सरचं निदान, आतड्यावर शस्त्रक्रिया, डॉक्टरचा परवाना रद्द 
१३- सोलापुर; मुस्लिम तरुणांकडून शिवजयंती साजरी 
१४- किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा संपन्न 
१५- बंगळूरजवळ ट्रक अपघातात 12 भाविकांचा मृत्यू 
१६- नाशिक; पाण्याच्या शोधात बिबट्या पोचला कंपनीत 
१७- केरळमध्ये कुत्र्यावर बलात्कार; बलात्कार करणाऱया व्यक्तीची ओळख पटवून देणाऱयास एक लाख रुपयांचे बक्षीस 
१८- बरेली; 'मी पृथ्वीराज चव्हाण आहे' म्हणत केला नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न 
१९- उत्तरप्रदेशातील संभलमध्ये ट्रकने 3 मुलींना चिरडले, दोघींचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- प्रीती झिंटा अडकणार लग्नाच्या बेडीत ? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो,
पडलेल्यांणा उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो...
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच,
ती म्हणजे चारित्र्य आणि माणुसकी......
(गजानन दवे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.


====================================

विनातपासणी कॅन्सरचं निदान, आतड्यावर शस्त्रक्रिया, डॉक्टरचा परवाना रद्द

विनातपासणी कॅन्सरचं निदान, आतड्यावर शस्त्रक्रिया, डॉक्टरचा परवाना रद्द
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : कॅन्सर नसतानाही रुग्णाचं आतडंच कापून टाकल्याप्रकरणी मुंबईत एका डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुलुंडच्या सुश्रुषा हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन रहाणे यांचं मेडिकल प्रॅक्टिसचा परवाना रद्द करण्यात आल आहे. कामात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ही कारवाई केली आहे. 
तक्रारदार चंद्रकांत कुलकर्णी 2012 मध्ये पोटदुखीवर उपचार करण्यासाठी रहाणे यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळी कोणतीही तपासणी न करता डॉक्टरांनी आतड्याच्या कॅन्सरचं निदान केलं होतं. शिवाय यासाठी तातडीने शस्त्रक्रिया गरजेची आहे, असं सांगून त्यांनी कुलकर्णींचं ऑपरेशनही केलं. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतरही चंद्रकांत कुलकर्णी यांची पोटदुखी थांबली नाही. त्यांनी दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं असता, त्यांना कॅन्सर कधी नव्हताच हे स्पष्ट झालं. 
यानंतर चंद्रकांत कुलकर्णी यांनी डॉ. नितीन रहाणेविरोधात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे धाव घेतली होती. मागील चार वर्षांपासून हा रहाणेविरोधात लढत होते. अखेर त्यांना न्याय मिळाला असून डॉ.रहाणेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
====================================

सोलापुर; मुस्लिम तरुणांकडून शिवजयंती साजरी

सोलापुरात मुस्लिम तरुणांकडून शिवजयंती साजरी
सोलापूर : हिंदू-मुस्लिम असा भेदभाव विसरुन महाराष्ट्राच्या मातीला एक वेगळी ओळख शिवरायांनी प्राप्त करुन दिली. याचाच प्रत्यय आज सोलापुरात दिसून आला. सोलापुरात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने आज शिवजयंती साजरी केली. 
यावेळी अनेक तरुण हातात भगवे आणि हिरवे झेंडे घेत शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत होते. यानंतर सर्व तरुणांनी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करुन दिमाखात मिरवणूकही काढली. शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे दैवत आहेत हा संदेश मुस्लिम ब्रिगेडने दिला. 
मुस्लिम समाजाच्या नव्या पिढीच्या मनात शिवाजी महाराजांविषयी आस्था निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सातत्याने करत आहे. त्याचाच परिपाक म्हणून शिवजयंती साजरी करण्याची परंपरा मुस्लिम ब्रिगेडची ही नवी पिढी जोपासत आहे.
Muslim_Shivjayanti_2
शिवाजी महाराजांना एका विशिष्ट चौकटीत ठेवणाऱ्या आणि मुस्लिम विरोधी म्हणून मांडणाऱ्या लोकांना ही एक चपराक आहे.

मुस्लिम ब्रिगेड दरवर्षी शिवजयंती मोठ्या आस्थेने साजरी करते. स्वराज्यात मुस्लिम समुदाय सुखी होता आणि आजही महाराजांच्या महाराष्ट्रात मुस्लिम सुरक्षित आहेत, हा संदेश या शिवजयंतीनिमित्ताने मुस्लिम समाजाने संपूर्ण देशाला दिला आहे. त्यामुळे सोलापुरातली ही शिवजयंती खऱ्या अर्थाने अनोखी वाटते.
====================================

मुंबईकरांची टोलमुक्ती अनिश्चितकाळासाठी लांबणीवर

मुंबईकरांची टोलमुक्ती अनिश्चितकाळासाठी लांबणीवर
मुंबई : मुंबई एन्ट्री पॉईंट आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील टोलधाडीबाबत वेगवेगळी आश्वासने देणाऱ्या फडणवीस सरकारने टोलमुक्तीबाबतचा अहवालच बासनात गुंडाळून ठेवलाय. सरकारने मोठा गाजावाजा करत नेमलेल्या आनंद कुलकर्णी समितीचा अहवाल सरकारला सादरच झालेला नाही, अशी माहिती माहिती अधिकारात मिळाली आहे. आनंद कुलकर्णी समितीचा अहवाल बासनात गुंडाळण्यात आल्यामुळे मुंबईकरांची टोलमुक्ती अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालंय. 
ठाण्यातील टोलबाबतचे अभ्यासक श्रीनिवास घाणेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आनंद कुलकर्णी समितीच्या अहवालाबाबत विचारणा केली होती. त्यावर त्यांना असं कळवण्यात आलंय की सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा अहवाल शासनास सादरच होऊ शकलेला नाही. 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सध्याचे अप्पर मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली पथकर विषयक समितीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचंही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सांगण्यात आलं आहे. 
11 जानेवारी 2016 रोजी श्रीनिवास घाणेकरांनी माहिती कायद्यानुसार केलेला माहितीचा अर्ज सांबा विभागाला दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 जानेवारी रोजी मिळाला तर त्यावरचं उत्तर त्यांना 10 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आलंय. 
टोलविषयी नुसत्या घोषणा आणि घोषणा करणारं शिवसेना-भाजप सरकार प्रत्यक्षात टोलमुक्तीसाठी किती उदासीन आहे, हे घाणेकरांच्या आरटीआय याचिकेला दिलेल्या पत्रावरून स्पष्ट होतंय.
====================================
काश्‍मीरमध्ये 'थॅंक यू, जेएनयू'चा मोर्चा रोखला
श्रीनगर : संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरुच्या समर्थनार्थ जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चास काश्‍मीरमधील काही गटांनी पाठिंबा दर्शविला. अफजल गुरुची छायाचित्रे आणि ‘थॅंक यू, जेएनयू‘ असा संदेश लिहिलेले फलक घेऊन निदर्शकांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा यंत्रणांनी त्यांना रोखले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि निदर्शकांमध्ये झटापट झाली.
ऐतिहासिक जामा मशिदीजवळून काही तरुणांच्या गटाने काश्‍मीरच्या ‘स्वातंत्र्या‘च्या घोषणा देत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही तरुणांनी पाकिस्तान आणि ‘इसिस‘चे झेंडेही फडकाविले. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना रोखताच चकमक सुरू झाली. आंदोलकांपैकी काही जणांनी पोलिसांवर दगडफेकही केली. या चकमकीमध्ये कुणीही जखमी झाले नाही.

====================================
चंदिगढ; जाट आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला
चंडिगड : मागासवर्गीयांमध्ये समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या जाट समुदायाच्या आंदोलनाला आज (शुक्रवार) हिंसक वळण लागले. रोहतकमध्ये निघालेल्या मोर्चादरम्यान अंदाजे पाच हजार आंदोलकांनी तोडफोड करत पोलिसांशी झटापटही केली. 
पोलिसांच्या एका वाहनास आंदोलकांनी आग लावली. जमावावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांत असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवरही जमावाने दगडफेक केली. जमाव हिंसक होत असल्याचे पाहून पोलिसांनी गोळीबार सुरू केल्याचेही वृत्त आहे. हरियानातील मंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घरावरही आंदोलकांनी हल्ला केल्याचे सांगितले गेले. येथील एका मॉलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या 14 गाड्यांसह तीन बस आणि पोलिसांची जीप आंदोलकांनी जाळली. 
रोहतकमध्ये आंदोलन करून रस्ता बंद करणाऱ्या जमावाला हटविण्यासाठी तीन बसमधून पोलिसांची कुमक मागविली होती. मात्र, दगडफेक आणि तोडफोड करत जमावाने पोलिसांना पळवून लावले. 
आरक्षण हवेच..! 
हरियानातील मतदारांपैकी 27 टक्के मतदार जाट समुदायाचे आहेत. हरियानामध्ये हा समाज ‘किंग मेकर‘ समजला जातो. जातीवर आधारित आरक्षणाची मागणी जाट समुदायाच्या नेत्यांनी केली आहे. मात्र, राज्य सरकारने इतर चार जातींबरोबर जाट समुदायालाही आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. इतर कुठल्याही जातीबरोबर आरक्षण देण्याच्या प्रस्तावास जाट नेत्यांनी विरोध केला आहे.
====================================
किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा संपन्न 

जुन्नर- छत्रपती शिवाजी महाराजांनी शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविलेल्या विविध योजनांचा अभ्यास करून राज्य सरकारने दुष्काळात होरपळत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जलसंवर्धनातून साडेसहा लाख हेक्‍टर जमीन ओलीताखाली आली आहे तर दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी 18 हजार कोटीच्या विविध योजना अंमलात आणल्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरी येथे बोलताना केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर आज (शुक्रवार) मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, गृहराज्य मंत्री राम शिंदे, संभाजीराजे भोसले, आमदार सुभाष देशमुख, विनायक मेटे, शरद सोनवणे, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथ लेंडे आदी मान्यवर तसेच शासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
====================================
शिक्षक भरतीत वशिलेबाजीला 'नो एंट्री'

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. बारावीची फेरपरीक्षा असो, की शाळांसाठी ‘सेंट्रल किचन‘ची सुविधा यात त्यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. त्यामुळे या खात्यात अनेक घडामोडी घडत आहेत. याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत.  
प्रश्न : शिक्षक संघटनांच्या अधिवेशनाला विशेष रजेला न्यायालयाने आक्षेप असतानाही रजा कशी दिली? 
उत्तर : शिक्षक संघटनांच्या दोन दिवशीय अधिवेशनांना राज्यभरातून शिक्षक येतात. त्यातील एक दिवस ते गुणवत्तेबाबत चर्चा करतात तर दुसऱ्या दिवशी ते आपल्या मागण्या मांडतात. आता अशी अधिवेशने सुटीच्या काळातच घ्यावीत किंवा परीक्षा काळात घेऊ नयेत, अशा सूचना मी त्यांना केलेल्या आहेत. त्यांनीही त्या मान्य केलेल्या आहेत. याशिवाय आता संपूर्ण राज्यभरात प्राथमिक शिक्षक संघ प्रत्येक तालुक्‍यातील एक शाळा दत्तक घेत आहे. ही शाळा राज्यात आदर्श करून दाखविण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. हेसुद्धा याच अधिवेशनाचे चांगले फलीत म्हणावे लागेल. 
प्रश्न : शाळाबाह्य कामांमुळे शिक्षक त्रस्त आहेत. याबद्दल काय सांगाल? 
उत्तर : गावागावांतील पंचनाम्याच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय निवडणुकांच्या कुठल्या कामांतून त्यांना दूर ठेवता येईल याबाबत शासन म्हणून निवडणूक आयुक्तांशी चर्चा सुरू आहे. अर्थात जनगणनेच्या कामाला पर्याय नाही. शिक्षकांसाठी शासन एवढा मोठ्या आकड्यात पगार देते ते फक्त इतर कामांशिवाय फक्त शिकविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी. मात्र शासकीय आणि वैयक्तिक शाळाबाह्य कामांबाबत कामांचेही राज्यव्यापी सर्व्हेक्षण सुरू असून लवकरच काही मोठे बदलही दिसतील. 
====================================
बंगळूरजवळ ट्रक अपघातात 12 भाविकांचा मृत्यू
चित्रदुर्ग- मदानायाकनहल्ली गावाजवळील तुरुवनूर रस्त्यावर लोखंड घेऊन निघालेला ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्यामुळे झालेल्या अपघातात 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मदानायाकनहल्ली या गावाजवळ आज पहाटे साडेतीनच्या सुमारास अपघात झाला. लोखंड घेऊन निघालेला ट्रक पांडूरंगस्वामी दिंडीच्या वाहनांवर पलटी झाला. यामुळे ट्रकखाली दबून 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुले व काही महिलांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.‘ 
‘एका वाहनाला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक भाविकांच्या वाहनावर जाऊन आदळला व पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाल्याने पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे,‘ अशी माहिती पोलिस अधिकारी कवालप्पा यांनी दिली.
====================================
पुणे; तीनशे कोटींचा दंड ४५ मिनिटांत माफ
बांधकाम व्यावसायिकांसाठी राष्ट्रवादी, भाजप व कॉंग्रेसची "सहमती‘ 
पुणे - पाणीपट्टीत 12 टक्के वाढ करून दरवर्षी 24 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वसाधारण सभेत तब्बल आठ तास चर्चा करणाऱ्या नगरसेवकांनी बांधकाम व्यावसायिकांचा सुमारे 300 कोटी रुपयांचा दंड माफ करण्याचा निर्णय अवघ्या 45 मिनिटांत घेतला. सत्तारूढ राष्ट्रवादी कॉंग्रेसने यासाठी पुढाकार घेतला आणि त्याला भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसनेही "सहमती‘ने साथ दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठरावाला तीव्र विरोध केला.
पूर्णत्वाचा दाखला न घेता सदनिका अथवा दुकानांचा वापर सुरू करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेकडून दंड ठोठावला जातो. बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीचे काम पूर्ण करूनच त्याचा ताबा ग्राहकांकडे द्यावा आणि त्यानंतर त्याचा वापर सुरू व्हावा, असा नियम आहे. परंतु, काम पूर्ण होण्यापूर्वीच ग्राहकांना ताबा दिला गेल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड त्यांनाच बसतो आणि सुविधांपासूनही ते वंचित राहतात. त्यामुळे महापालिकेने दंड आकारणे सुरू केले. 2011 मध्ये या दंडात वाढ झाली. तेव्हापासून पालिकेने 150 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांना सुमारे 300 कोटी रुपयांचा दंड केला आहे. हा दंड माफ करण्यासाठी कॉंग्रेसच्या एका नगरसेवकाने सादर केलेल्या ठरावाला सर्व पक्षीय नगरसेवकांनी वारंवार विरोध केल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तो लांबणीवर पडला होता. ठराव मंजूर होण्यासाठी काही बांधकाम व्यावसायिकही प्रयत्नशील होते. त्यांनी या बाबत न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या पार्श्‍वभूमीवर "सहमती‘ निर्माण झाल्यावर राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि भाजपच्या गटनेत्यांनी हा ठराव मंजूर केला. तत्पूर्वी राष्ट्रवादी, कॉंग्रेसमधील काही सदस्यांनीही या ठरावाला विरोध केला. 
====================================
नाशिक; पाण्याच्या शोधात बिबट्या पोचला कंपनीत
नाशिक - अंबड येथील क्रॉम्पटन ग्रिव्हज कंपनीत सकाळी नऊ वाजता आठ महिन्यांच्या बिबट्याच्या दर्शनाने कामगारांची त्रेधा तीरपीट उडाली. पाण्याच्या शोधात भटकंती करीत बिबट्या औदयोगिक वसाहतीत आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कंपनीच्या जीआयएस शॉपमध्ये लपलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. अखेर बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात यश आले. या बिबट्याच्या थराराची सकाळचे छायाचित्रकार केशव मते यांनी टिपलेली छायाचित्रे- 

====================================
====================================
वैद्यकीय अहवालानुसार कन्हैया कुमार जखमी
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या देशविरोधी आंदोलनाबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेला विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या शरीरावर मारहाणी झाल्याच्या खुणा आहेत, अशी माहिती वैद्यकीय अहवालातून पुढे आली आहे. 
पतियाळा हाउस न्यायालयात त्याच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आज (शुक्रवार) हाती आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘कन्हैया कुमार याच्या शरीरावर विविध ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. नाक, पाय व टाचेवर जखमा दिसत आहेत.‘ 
दरम्यान, वकिलांच्या वेशातील दहा ते पंधरा जणांच्या गटाने पतियाळा हाउस न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर ‘जेएनयू‘चे विद्यार्थी, प्राध्यापक व प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना मंगळवारी (ता. 16) जोरदार मारहाण केली होती. मारहाणीची घटना झाली त्या वेळी न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस हजर होते. मात्र त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
====================================
पठाणकोट हल्ला प्रकरणी पाकमध्ये गुन्हा दाखल
इस्लामाबाद- भारतातील पठाणकोट येथे हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी पंजाब प्रांतातील गुंजरावाला पोलिस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (शुक्रवार) दिली. 
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘दहशतवादी हल्ला करणारे व त्यांना भडकून देणाऱयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विविध पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत.‘
पठाणकोट येथील हल्ल्यावेळी सात जवान हुतात्मा झाले होते तर चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यांच्याजवळ पाकिस्तानातील वस्तू आढळून आल्या होत्या. या हल्ल्याला भारताने जैश-ए-मोहम्मद या संघटनेला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानने या संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकून ते बंद केले आहेत. शिवाय, काहींना ताब्यात घेतले आहे.

====================================
 केरळमध्ये कुत्र्यावर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल
कोची (केरळ)- कुत्र्यावर एक नागरिक बलात्कार करत असल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल झाला आहे. बलात्कार करणाऱया व्यक्तीची ओळख पटवून देणाऱयास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मल्याळम भाषेत बोलत असलेली व्यक्ती कुत्र्यावर बलात्कार करताना दिसत आहे. कुत्रा सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असून, व्हिडिओ दोन मिनिटांचा आहे. प्राणीमित्र संघटनेने याविरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस प्राणीमित्र संघटनेने जाहीर केले आहे.‘ 
‘सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्‌सऍपवरून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात येईल. याबाबतचा तपास सुरू आहे,‘ अशी माहिती एन. जी. जयसिम्हा यांनी दिली.
====================================

जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, 1 ठार 9 जखमी


  • रोहतक (हरयाणा), दि. 19 - आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून पोलीसांच्या गोळीबारात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जवळपास पाच हजारांच्या जमावानं केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागलं आहे. या जमावानं हरयाणाचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घराला आग लावल्याचं वृत्त आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी केलेल्या गोळीबारात 1 ठार तर नऊ जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
    जमावानं इन्स्पेक्टर जनरल यांच्या कार्यालयावरही दगडफेक केली आहे. पोलीसांनी या ठिकाणच्या जमावाला पांगवण्यासाठीही गोळीबार केल्याचे वृत्त आहे.जमावानं रस्त्यावर उभ्या असलेल्या 15 कार व 3 बसेसची तोडफोड केली आहे. काही ठिकाणी तर जमाव इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसक झाला की पोलीसांनीही पळ काढला व नंतर अधिक कुमकीने पोलीस दाखल झाले.जाट समाजाचं आरक्षणांचं आंदोलन हरयाणामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पसरत असल्याचे वृत्त असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अपयश आल्याचे व तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे.

====================================

प्रीती झिंटा अडकणार लग्नाच्या बेडीत ?

  • मुंबई, दि. 19 - अभिनेत्री प्रीती झिंटा बॉयफ्रेंड जेन गुडेनफसोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. लॉस ऐंजेलिसमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
    हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मार्च किंवा एप्रिलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाची तारीख अजूनही ठरलेली नाही आहे. या लग्नाला फक्त जवळच्याच लोकांना आमंत्रित केले जाणार आहे.  
    लॉस ऐंजेलिसमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार असला तरी लग्नानंतर मुंबईतदेखील कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मित्र, नातेवाईकांसह बॉलिवूड सेलिब्रेटीजना आंमत्रित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 
====================================

बरेली; 'मी पृथ्वीराज चव्हाण आहे' म्हणत केला नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न


  • उत्तर प्रदेश, दि. 19 - 'मी पृथ्वीराज चव्हाण आहे' म्हणत लग्नमंडपात घुसून नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना बरेलीत घडली आहे. स्वताला राजपूत लढवय्या समजणा-या या तरुणाला उपस्थितांनी मात्र चांगलाच चोप दिला.  
    बरेलीतील गावात हा विवाह सोहळा सुरु असताना ही घटना घडली. वैवाहिक विधी सुरु असताना महादेव नावाचा हा तरुण अचानक आपल्या मित्रांसोबत तिेथे आला आणि 'मी पृथ्वीराज चव्हाण आहे' म्हणत तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवत नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि नववधूची सुटका करुन घेतली. तरुणाला पोलिसांच्या हवाली केले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मात्र या तरुणाची मानसिक स्थिती नीट नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
====================================

====================================
====================================
====================================
====================================
====================================
====================================
====================================

No comments: