Thursday, 4 February 2016

नमस्कार लाईव्ह ०४-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[आंतरराष्ट्रीय]

१- ती एकमेव प्रवासी असूनही विमानाने उड्डाण केलं... 

२- अमेरिकेमधील मुस्लीम आहेत भयग्रस्त - बराक ओबामा  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

३- 'मोदींसह मी काँग्रेसचाही जनाजा उचलेन,' ओवेसींची जहरी टीका 

४- भारतावरील बहुतांश दहशतवादी हल्ल्यांचे उगमस्थान पाकिस्तानच- राजनाथ सिंह 

५- ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात धाव 

६- बंगळूरचा प्रकार मानवजातीला लांच्छनास्पद- हृतिक रोषण 

७- "केजरीवाल हे घ्या पैसे, पण पायात बूट घाला", व्यावसायिकाने पाठविले ३६४ रुपये 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

८- आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांवर खटला चालवण्यासाठी राज्यपालांची परवानगी 

९- APMC ची मक्तेदारी मोडणार, शेतकऱ्यांच्या मालाची आता थेट विक्री 

१०- पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती, दुचाकीस्वारांना मात्र जाच 

११- सर जडेजाची रिवानं विकेट काढली, उद्या साखरपुडा 

१२- जयपूर; शाळेत न गेलेल्या हायटेक दलित सरपंच महिलेची कहाणी 

१३- राज्यात 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक 

१४- नोइडा; महिलेच्या हत्येप्रकरणी 11 जणांना फाशीची शिक्षा 

१५- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यालयात शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

१६- नांदेड; रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी सुरक्षा संबंधी मदतीसाठी हेल्प लाईन न. १८२ 

१७- मुखेड; शाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालयात चित्रकला स्पर्धा संपन्न 

१८- 'मराठी टायगर्स' चित्रपटावर चंदगडमध्ये बंदी, तहसीलदारांचा निर्णय 

१९- डोक्यावर ८ लाखांचे इनाम असलेला कुख्यात माओवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

२०- व्हॉट्सअॅप ग्रुप आणखी मोठा होणार, ग्रुप मेंबरच्या संख्येत वाढ 

२१- आपण टी-२० वर्ल्डकप जिंकावा, यंदा चांगली संधी आहे: सचिन तेंडुलकर 

२२- रा. स्व. संघाकडून अक्षयच्या 'एअरलिफ्ट'वर स्तुतिसुमनं 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते

(वर्षा मोहिते, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

घरांची आर्टिफिशिअल सजावट 

फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://goo.gl/lE9S67

************************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://goo.gl/uS8DX4


=========================================

बंगळूरचा प्रकार मानवजातीला लांच्छनास्पद- हृतिक

टांझानियाच्या युवतीसोबत बंगळूरमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यानंतर अभिनेता हृतिक रोशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

हृतिकने याबाबत ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अशा प्रकारचा अन्याय हा संपूर्ण मानवजातीला लांच्छनास्पद आहे. ज्यांनी हे चुकीचे कृत्य केले आहे त्यांना त्याची जाणीव करून देऊन त्यांना पश्चाताप करायला लावला पाहिजे.‘

एका 35 वर्षीय महिलेला एका वाहनाने धडक दिली व त्यामध्ये महिलेचा बंगळूर येथे शनिवारी रात्री जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ज्या वाहनाने धडक दिली त्या वाहनाच्या मागून एक टांझानियन महिला येत होती. तिला तिथे जमलेल्या संतप्त जमावाने मारहाण केली, तसेच त्यानंतर तिला विवस्त्र करून रस्त्यावरून तिची धिंड काढल्याची दुर्दैवी घटना समोर आली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून दोषींना कडक शिक्षा होईल असे म्हटले आहे.

===============================

"केजरीवाल हे घ्या पैसे, पण पायात बूट घाला", व्यावसायिकाने पाठविले ३६४ रुपये


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला सँडल्स घालून गेले होते, त्यामुळे त्यांना बूट खरेदी करण्यासाठी एका व्यावसायिकाने ३६४ रुपये पाठविले आहेत.

फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँक्वा ओलाँद भारत दौऱ्यावर आले असताना राष्ट्रपती भवनामध्ये मागील महिन्यात त्यांच्यासाठी आयोजित शाही भोजन समारंभासाठी अरविंद केजरीवाल सँडल्स घालून उपस्थित राहिले होते. ओलाँद यांनाही ते पायात सँडल्स घालूनच भेटले. या भेटीचे छायाचित्र चर्चेत आले होते. 
सुमित अग्रवाल असे या व्यावसायिकाचे नाव असून, विशाखापट्टणम येथून त्याने केजरीवाल यांना डिमांड ड्राफ्टने हे पैसे पाठविले आहेत. त्यांनी एक खुले पत्रही लिहिले आहे. त्यामध्ये केजरीवाल यांना कसे वागावे याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. 

अग्रवाल पत्रात म्हणतात की, "तुम्ही तिथे देशाचे प्रतिनिधित्व करीत होता. रामलीला मैदान किंवा जंतरमंतर येथे आम आदमी पक्षाचे धरणे आंदोलन करण्यासाठी तुम्ही गेला नव्हता, अशी खोचक टीका अग्रवाल यांनी केली आहे. केजरीवाल यांनी अशी पादत्राणे घालणे म्हणजे एक पब्लिसिटी स्टंट होता काय अशी शंका मला वाटते."
===============================
नोइडा; महिलेच्या हत्येप्रकरणी 11 जणांना फाशीची शिक्षा

नोईडा- पश्‍चिम बंगालमध्ये पंधरा महिन्यांपूर्वी जमिनीच्या वादातून एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने आज (गुरुवार) 11 जणांना फाशीची शिक्षा सुनावली. 

नदिया जिल्ह्यातील क्रिश्नगंज या गावात 23 नोव्हेंबर 2015 रोजी अपर्णा बग (वय 38) या महिलेचा जमिनीच्या वादातून खून झाला होता. तृणमूल पक्षाचा स्थानिक नेता लंकेश्वर घोष हा मुख्य आरोपी होता तर एक जण अल्पवयीन होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने 11 जणांना फाशीची शिक्षा सुनावली.
===============================

APMC ची मक्तेदारी मोडणार, शेतकऱ्यांच्या मालाची आता थेट विक्री


APMC ची मक्तेदारी मोडणार, शेतकऱ्यांच्या मालाची आता थेट विक्री?
मुंबईशेतकऱ्यांना त्यांचा माल थेट बाजारात विकता येईल, यासाठी राज्य सरकारने पावलं उचलली आहेत. यांसदर्भात आज सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात राज्य सरकारनं एपीएमसी कायद्यात प्रस्तावित बदल सुचवले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ खुली होऊ शकते.
मात्र राष्ट्रवादीसह काँग्रेसनं त्याला विरोध केला आहे.

महाराष्ट कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या कायद्यात राज्य सरकार बदल करणार आहे. हे बदल झाले तर लवकरच शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाची विक्री थेट बाजारात करता येईल.

खरं तर आघाडी सरकार सत्तेत असताना अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणार होता. मात्र व्यापारी आणि आडत्यांच्या विरोधामुळे तो झाला नाही. आता मात्र भाजप सरकारनं कायद्यात बदल कऱण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. मात्र विरोधकांनी त्याला विरोध केला आहे.

काय बदल सुचवले?

*शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री बाजार समितीमार्फत करण्याचं बंधन राहणार नाही
*शेतकरी त्यांच्याकडील भाजीपाला फळांची विक्री किरकोळ विक्रेत्यांना करू शकतील
*शेतकऱ्यांकडून बाजार समितीद्वारे कोणताही कर आकारणार नाही
*ज्या शेतकऱ्यांना बाजार समितीमार्फत शेतमालाची विक्री करायची असेल त्यांना ते स्वातंत्र्य राहील
*शेतमालाच्या पहिल्या खरेदीवर बाजार फी आकारली जाणार
*खरेदीदारांकडून अडत वसुली

===================================================

'मोदींसह मी काँग्रेसचाही जनाजा उचलेन,' ओवेसींची जहरी टीका

'मोदींसह मी काँग्रेसचाही जनाजा उचलेन,' ओवेसींची जहरी टीका
हैदराबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि काँग्रेसवर कायमच निशाणा साधणारे एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. ‘नरेंद्र मोदी, काँग्रेस आणि गांधी परिवाराला मी नेस्तनाबूत करुन टाकेन’ अशी दर्पोक्ती ओवेसींनी केली आहे.

हैदराबादमध्ये महापालिका निवडणुक तोंडावर येऊन ठेपल्यानं जोरदार प्रचार सुरु झाला आहे. याच प्रचार सभा दरम्यान एकमेकांवर  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं सुरु आहे.

30 जानेवारीला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एमआयएम)च्या बाबा नगरमध्ये झालेल्या सभेत ओवेसींनी आपल्या भाषणात मोदींसह काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. “मी आता यांना सोडणार नाही, पूर्ण भारतभर यांचा मी पिच्छा करेन. नरेंद्र मोदींसह या काँग्रेसचा जनाजाही उचलेल.” अशी टीका ओवेसींनी केली.

या भाषणाच्या व्हिडिओ यूट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे. भाषणाच्या शेवटी ओवेसींनी मोदी आणि काँग्रेसला नेस्तनाबूत करण्याचं वक्तव्य केलं आहे.

आपल्या भाषणात ओवेसींनी मोदींवरही बरीच टीका केली. ‘या देशाच अच्छे दिन फक्त एका चायवाल्याचे आहेत’ असं म्हणत त्यांनी अच्छे दिनबाबतही मोदींवर निशाणा साधला.
या वक्तव्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते हनुमंत राव यांनीही ओवेसींचा समाचा घेतला आहे. ‘ओवेसी आणि भाजपची छुपी युती आहे.’

=================================================

ती एकमेव प्रवासी असूनही विमानाने उड्डाण केलं...


ती एकमेव प्रवासी असूनही विमानाने उड्डाण केलं....
बीजिंग : एक काय, फक्त दहा प्रेक्षक आहेत म्हणून परवडत नसल्याचं कारण देत थिएटरमध्ये सिनेमाचा खेळ रद्द केला जातो. मात्र चीनमध्ये एकट्या प्रवाशासाठी विमान हवेत झेपावल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

चीनमध्ये नूतन वर्षी मायदेशी किंवा मूळगावी जाण्याची प्रथा आहे. त्यामुळे झँग ही एका मोटर कंपनीतील महिला कर्मचारी घरी जाण्यासाठी निघाली. मात्र जोरदार हिमवृष्टीमुळे सोमवारी अनेक प्रवाशांना हे फ्लाईट गाठता आलं नाही. अखेर एका महिलेसाठी बोईंग 377 जातीचं हे प्रवासी विमान दक्षिण चीनच्या गुआंगझाऊ भागातून आकाशात झेपावलं.

झँगचं CZ2833 हे विमानही 10 तासांनी लेट होतं. हिमवृष्टीमुळे ट्रेनचं वेळापत्रकही कोलमडलं, त्याचप्रमाणे लाखभर प्रवासी त्यांची नियोजित विमानं पकडू शकली नाहीत. मात्र झँग आल्याने चायना सदन एअरलाईन्सने एका प्रवाशासाठी विमान नेण्याचा निर्णय घेतला.

झँगने एक हजार 200 युआन म्हणजेच अंदाजे 12 हजार 370 रुपये मोजले. तिने तिचा हा दोन तासांचा ‘एक्स्क्लुझिव्ह’ प्रवास चिनी मायक्रोब्लॉगिंग साईटवर शब्दबद्ध केला आहे. ‘मला अत्यंत आनंद झाला आहे. हा माझ्या आयुष्यातला अत्यंत दुर्मीळ आणि अविस्मरणीय अनुभव आहे. मला एखादा
रॉकस्टार असल्यासारखं वाटतं.’

एकमेव प्रवासी असल्यामुळे केबिन क्रूकडून तिच्याकडे विशेष लक्ष पुरवलं गेलं. पायलटनेही तिची भेट घेतली. विमानातील रिकाम्या सीट्सचे तिने घेतलेले फोटो चीनी नेटिझन्सकडून अनेक लाईक्स, शेअर आणि कमेंट्स मिळवून गेले.

विशेष म्हणजे नवीन वर्षासाठी अनेक प्रवाशांची गर्दी असतानाही एकटीला हा प्रवासाचा योग जुळून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चीनी नूतन वर्ष हा जगभरातील सर्वाधिक मानवी स्थलांतराचा कालावधी मानला जातो, कारण या काळात अनेक चीनी नागरिक घरी जातात.
====================================================

आपण टी-२० वर्ल्डकप जिंकावा, यंदा चांगली संधी आहे: सचिन तेंडुलकर

आपण टी-२० वर्ल्डकप जिंकावा, यंदा चांगली संधी आहे: सचिन तेंडुलकर
मुंबई: आगामी टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताकडे उत्तम संधी आहे. टीम इंडियाकडे उत्कृष्ट खेळाडूही आहेत. असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं म्हणणं आहे.

एका टीव्ही मुलाखतीत सचिन म्हणाला की, ‘आपल्याला एक चांगली संधी आहे. मला वाटतं सीनियर खेळाडू संघात असल्यानं टी-२० टीम खूप संतुलित वाटते आहे. तसंच युवा खेळाडूही या संघात आहेत. त्यामुळे ही टीम नक्कीच चांगलं प्रदर्शन करेल असं मला वाटतं.’

‘आशीष नेहरा, युवराज आणि हरभजन यांचं टी-20 संघात पुनरागमन होणं ही फारच चांगली गोष्ट आहे. मला मनापासून वाटतं की, भारतानं हा विश्वचषक जिंकावा.’ असंही सचिन म्हणाला.

‘रैना दोन रन काढेल… विजय आपलाच आहे’

टीम इंडियानं नुकतंच कांगारुंना टी-२० मालिकेत धूळ चारली. या मालिकेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचंही सचिनंने कौतुक केलं आहे.

‘ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामना सुरु असताना मी कुठेतरी बाहेर गेलो होतो. पण, ज्यावेळी मी परत आलो तेव्हा अंजली आणि अर्जुन मॅच पाहत होते. त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की, शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय आणि आपल्याला विजयासाठी 2 धावा हव्या आहेत. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, रैना दोन रन नक्की काढेल. झालंही तसंच रैनानं पॉईंटच्यावरुन शानदार शॉट खेळून आपल्याला विजय मिळवून दिला.’
====================================================

पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती, दुचाकीस्वारांना मात्र जाच

पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती, दुचाकीस्वारांना मात्र जाच
पुणे : सर्वात जास्त दुचाकी असलेल्या पुणे शहरात आजपासून हेल्मेटसक्तीचा नियम लागू झाला आहे. त्यामुळे सकाळपासूनच वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर कारवाईला सुरुवात केली आहे. हेल्मेटसक्तीचा पुणेकरांना जाच वाटत असून अनेक जण वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत होते. त्यामुळे कारवाई करताना वाहतूक पोलिसांच्याच नाकी नऊ आल्याचं चित्र आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यात हेल्मेटसक्तीची कालच घोषणा केली होती. त्यानंतर आज अंमलबजावणीला सुरुवात झाली. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीस्वार पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
औरंगाबादमध्ये हेल्मेटसक्ती केल्यानंतर पुण्यातही त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. प्रशासनाने अजून थोडा वेळ द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली आहे.
पुण्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हेल्मेटसक्ती करण्यात येईल, अशी माहिती दिवाकर रावतेंनी दिली. याशिवाय दुचाकी विकतानाच गाडीसोबत हेल्मेट देण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचं रावते म्हणाले.
====================================================

सर जडेजाची रिवानं विकेट काढली, उद्या साखरपुडा

सर जडेजाची रिवानं विकेट काढली, उद्या साखरपुडा!
राजकोट: आपल्या फिरकी गोलंदाजीनं भल्याभल्यांची विकेट काढणारा टीम इंडियाचा ऑलरांऊडर रविंद्र जडेजाची मात्र रिवा हिने विकेट काढली आहे. नुकताच, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतलेला जडेजा लवकरच विवाह बंधनात अडकणार असून उद्या राजकोटमध्ये त्याचा साखरपुडा संपन्न होणार आहे.

रिवा हिच्यासोबत जडेजाचं लग्न ठरलं असून उद्या त्यांचा साखरपुडा जडेजाच्याच राजकोटमधील ‘जड्डूज’ हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या हॉटेलचा सारा कारभार जडेजाची बहीण नयनाबा सांभाळते.

जडेजाची होणारी पत्नी रिवा ही देखील राजकोटमधीलच आहे. रिवाचं शिक्षणही राजकोटमध्येच झालं आहे. तिने राजकोटमधील आत्मीय इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर मागील काही महिन्यापासून ती दिल्लीत राहून यूपीएससीच्या परीक्षेची तयारीही करीत आहे.

रवींद्र जडेजा आणि रिवा यांचा साखरपुडा हरेश राज्यगुरु हे पुरोहित करणार आहेत. उद्या होणाऱ्या साखरपुड्याच्या बातमीला हरेश यांनी दुजोरा दिला आहे.

जडेजा सध्या सत्तावीस वर्षाचा आहे. तर रिवासिंह सोलंकी ही पंचवीस वर्षाची आहे. जडेजाने आतापर्यंत 16 कसोटी, 126 वनडे आणि 25 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.
====================================================

व्हॉट्सअॅप ग्रुप आणखी मोठा होणार, ग्रुप मेंबरच्या संख्येत वाढ

व्हॉट्सअॅप ग्रुप आणखी मोठा होणार, ग्रुप मेंबरच्या संख्येत वाढ!
मुंबई: मोबाइल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमुळं अनेक ग्रुप तयार झाले. त्यात मित्र-मैत्रिणींना अॅड करणं ओघानं आलंच. पण, अनेकदा आपल्या काही मित्रांना ग्रुपमध्ये अॅड करण्याची इच्छा असूनही ग्रुप मेंबर लिमिटमुळं तसं करता येत नव्हतं. पण यापुढे तसं होणार नाही. कारण, व्हॉट्सअॅपने ग्रुप मेंबरच्या संख्येत वाढ केली आहे.

सुरुवातीला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 50 जणांपर्यंत मर्यादा होती. त्यानंतर ही सदस्यसंख्या 100 पर्यंत करण्यात आली होती. आता त्याच्याही पुढे जात व्हॉट्सअॅपने ही ग्रुप मेंबरची संख्या तब्बल 256 केली आहे. तर ब्रॉण्डकास्ट मेसेजसाठीही सुरुवातीपासूनच 256 जणांची मर्यादा होती.

app 256
व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक लोकप्रिय अॅप असून भारतात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे ग्रुप मेंबरची 50 किंवा 100 ही संख्याही कमी पडते. त्यामुळेच आता ग्रुप मेंबरची मर्यादा 256 पर्यंत करण्यात आली आहे.

नुकताच व्हॉट्सअॅपने 1 अब्ज यूर्जसचा टप्पा गाठला आहे. व्हॉट्सअॅपचा मालक मार्क झुकरबर्गनंच याबाबत माहिती दिली होती. फेब्रुवारी 2014 मध्ये फेसबुकनं 19 अब्ज डॉलरमध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतलं होतं. फेसबुककडून हा आजवरचा सर्वात मोठा व्यवहार होता.

फेसबुकवर एका पोस्टमध्ये व्हॉट्सअॅपचा सह-संस्थापक जॉन कोउमने सांगितलं की, या प्लॅटफॉर्मवर दररोज 42 अब्ज मेसेज, 1.6 अब्ज फोटो आणि 25 कोटी व्हिडिओ शेअर केले जातात.
====================================================

रा. स्व. संघाकडून अक्षयच्या 'एअरलिफ्ट'वर स्तुतिसुमनं

रा. स्व. संघाकडून अक्षयच्या 'एअरलिफ्ट'वर स्तुतिसुमनं
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारच्या ‘एअरलिफ्ट’ चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही चित्रपटावर स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत. एअरलिफ्ट हा देशभक्तिपर चित्रपट असून त्यात भारताच्या खऱ्याखुऱ्या चैतन्याचं प्रतिबिंब पाहायला मिळत असल्याचं संघाने म्हटलं आहे.

गल्फ युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमध्ये अडकलेल्या 1 लाख 70 हजार भारतीयांची भारत सरकारच्या मदतीने कशी थरारक सुटका करण्यात आली, यावर हा चित्रपट आधारित आहे. सद्दाम हुसेनने युद्ध पुकारल्यानंतर परक्या भूमीत भारतीय असल्याची ओळख विसरलेले नागरिक कशाप्रकारे भारतीयत्व जोपासत एकत्र आले, हे मांडलं आहे.

रा. स्व. संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्रातील संपादकीय लेखात चित्रपटाचा दाखला देत, जर देशातील सर्व नागरिक एकत्र आले तर भारत किती बलाढ्य होऊ शकतो, हे सांगितलं आहे. ‘चित्रपटात एका देशाचे नागरिक म्हणून भारतीय एकवटल्यास कुठल्याही प्रकारच्या अडथळ्यावर मात करु शकतात, हे दाखवलं आहे. आपणही जर एकाच दिशेने प्रयत्न केले, तर काहीतरी साध्य करु शकतो’ असं अग्रलेखात म्हटलं आहे.

मातृभूमीवरील प्रेम, सरकारी यंत्रणेची भूमिका यात मांडण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयासंदर्भातील एका सीनमध्ये चूक झाली असली, तरी तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास हरकत नाही, असंही त्यात म्हटलं आहे.
====================================================

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांवर खटला चालवण्यासाठी राज्यपालांची परवानगी

'आदर्श'प्रकरणी अशोक चव्हाणांची पुन्हा चौकशी होणार
मुंबई: ज्या आदर्श प्रकरणामुळं अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं, ते आदर्शचं भूत काही चव्हाणांची पाठ सोडायला तयार नाही. कारण आदर्श प्रकरणी पुन्हा एकदा अशोक चव्हाणांची चौकशी करण्यास राज्यपालांनी सीबीआयला हिरवा कंदील दाखवला आहे.

आज याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

8 ऑक्टोबर 2015 सीबीआयच्या सहसंचालकांनी आदर्शची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यपालांनी मंत्रिगटाचं मत मागवलं होतं. जे चौकशीसाठी अनुकूल होतं. त्यानंतर राज्यपालांनी सीबीआयला अशोक चव्हाण आणि आदर्शचं प्रकरण पुन्हा उकरण्यास होकार दिला आहे.

दरम्यान, ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

कारवाई सूडबुद्धीने नाही – खडसे

आदर्श घोटाळा हा भाजप सेना काळात झालेला नाही, त्यापूर्वी झाला आहे.  याची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी सुरु आहे. दरम्यान नवीन पुरावे समोर आल्याने मंत्रिमंडळने शिफारस केली आणि त्यानंतर राज्यपालांनी आता मग सीबीआयकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे, यामध्ये सूडबुद्धिने कारवाई करण्याचा प्रश्नच नाही, असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.


====================================================

जयपूर; शाळेत न गेलेल्या हायटेक दलित सरपंच महिलेची कहाणी

शाळेत न गेलेल्या हायटेक दलित सरपंच महिलेची कहाणी !
(Photo - The Hindu)
जयपूर : अंगभूत टॅलेंटला कोणत्याही डिग्री- पदवीची गरज नसते असं म्हणतात. राजस्थानच्या एका दलित सरपंच महिलेने हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. डोक्यावरचा पदर चुकूनही खाली पडणार नाही, पण गावाच्या विकासाच्या उद्देशाने उचललेला कॉम्प्युटरचा माऊस हातातून सुटणार नाही.

ना कोणती पदवी, ना कोणतंही शिक्षण, मात्र तरीही गावच्या विकासासाठी कॉम्प्युटरसारख्या तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर… ही कहाणी आहे साठी पार केलेल्या नौरोती देवी यांची.

ज्या वयात माणसं घर-संसारातून निवृत्ती घेऊन देवधर्माची वाट धरतात, त्या वयात नौरोती देवी चीन, अमेरिकासारख्या प्रगत देशात लेक्चर देत फिरत आहेत.

आयटी इंजिनिअरला लाजवेल असं कौशल्य
नौरोती देवी.. वय साठी पार केलेलं, मात्र कर्तृत्वाची उमेद तरुणांना लाजवेल अशी. ज्युनिअर-सीनिअर केजी ते एमबीए, एमबीबीसची दुनिया पाहिलेल्या नौरोती देवी एक इयत्ताही शिकलेल्या नाहीत. पण त्यांचं इंटरनेट हाताळण्याचं कौशल्य एखाद्या आयटी इंजिनिअरला लाजवेल असं आहे.

अजमेरच्या पवित्र भूमीत नौरोतींचं कर्तृत्त्व

पुण्य मिळवण्यासाठी अनेक भक्त ज्या अजमेर शरीफ दर्ग्यात जाऊन चादर चढवतात, त्याच अजमेर जिल्ह्यात, कर्तृत्त्वामुळे नौरोती देवींना अनेकजण पुण्यवान समजतात. त्याचं कारणही तसंच आहे. इथे नौरोती देवींनी आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला आहे.

हर्मदाच्या सरपंच, ग्राम पंचायतीचा कारभार कॉम्प्युटरवर

राजस्थानमधील अजमेर जिल्ह्याच्या किशनगड तालुक्यातील हर्मदा हे गाव. या गावाचं सरपंचपद दलित असलेल्या नौरोती यांनी भूषवलं आहे. सरपंचपदी असताना नौरोती यांनी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना गावाचा कारभार तंत्रज्ञानाद्वारे व्हावा, यासाठी कॉम्प्युटर शिकवलं.

ग्रामपंचायतीचा कारभार कागदपत्रात न अडकवता, त्याला तंत्रज्ञानाची जोड देत, झटपट कामं आटोपण्यासाठी नौरोती देवींनी कॉम्प्युटर बसवले. इतकंच नाही तर त्यांनी गावातील अनेक महिलांना त्याचं शिक्षणही दिलं.

विरोधकांनाही भुरळ

नौरोती देवींच्या कामाचा सपाटा पाहाता, विरोधकांनाही त्यांची भुरळ पडली. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात जाट समुदायाचं वर्चस्व. त्यातच हर्मदा गावात तर जाट समुदाय अधिकच. मात्र तरीही विरोधकांना न डगमगता, दलित नौरोतींनी गावाचा विकास घडवून आणला.

कब्रस्तानचा मोठा तिढा सोडवण्यात यश
हर्मदा गावात अनेक वर्षांपासून कब्रस्तानचा प्रश्न ऐरणीवर होता. मात्र नौरोती यांनी ज्या-ज्या प्रकरणात लक्ष घातलं, ती-ती प्रकरणं तडीस लावली. हर्मदा गावचं कब्रस्तान डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापरलं जात होतं. मात्र नौरोती देवींनी काही दिवसात ते साफ केलं आणि त्याच्या चहूबाजूंनी कम्पाऊंड बांधलं. तिथे बोअरवेल खणून पाणीही उपलब्ध करून दिलं. याशिवाय आरोग्य केंद्र, रस्ते, गटारी यासारखे प्रश्न हिरीरीने सोडवले. ही केवळ उदाहरणं आहेत.

13 लाखांचा निधी

गावची संपूर्ण विकासकामं पूर्ण करून, पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही नौरोती देवींनी ग्राम पंचायतीच्या खात्यात तब्बल 13 लाखांचा निधी राखून ठेवला. ग्रामसभेत जिथे रुपयाच्या हिशेबावरून गोळीबार होतात, त्याच गावाच्या खात्यात तब्बल 13 लाखांची रक्कम थोडीथोडकी नव्हती.
किमान वेतन निश्चितीसाठी लढा

हर्मदा गावच्या सरपंचपदी विराजमान होण्यापूर्वी नौरोती देवींनी अनेक सामजिक प्रश्नांसाठी आंदोलनं केली आहेत. त्यातील किमान वेतन निश्चितीसाठी केलेलं आंदोलन आजही नौरोती देवींचा यशस्वी लढा म्हणून ओळखलं जातं.

नौरोती देवी या 1981 पासून ‘मजदूर किसान शक्ती संघटनेच्या’ सदस्या आहेत. त्यांनी किमान वेतन निश्चितीसोबतच, राजस्थानातही माहिती अधिकार कायद्यासाठी लढा दिला.

नौरोतींचे परदेश दौरे

नौरोती देवींचं कर्तृत्त्व राजस्थानबाहेर कोणाला माहितही नसेल. पण जग ज्यांच्यासमोर झुकतं त्या अमेरिका, चीन आणि जर्मनीसारख्या देशांनी नौरोतींना सलाम केला आहे. नौरोती देवींनी या देशांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत. आता त्या लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत.

दररोज हिंदी वर्तमानपत्रांचं वाचन, दररोज इंटरनेट लॉग-ऑन

शाळेची पायरी न चढलेल्या नौरोती देवी दररोज, न चुकता वर्तमानपत्र वाचतात. हिंदी वर्तमानपत्रातील बातम्या वाचून, आपल्या गावासाठी काय करता येईल याचा वेध घेत असतात.

नौरोती देवी गावात फेरफटका मारायला विसरतील, पण दररोज इंटरनेटवर फेरफटका मारणं त्या विसरत नाहीत. जग कोणत्या दिशेने जात आहे आणि आपण कुठे आहोत, याचा ताळमेळ घालण्यासाठी त्या इंटरनेच्या मायाजालाचा योग्य वापर करत आहेत.

विकासकामात पदवीचा अडथळा

नौरोती देवी शिकलेल्या नाहीत हे सत्य आहे. मात्र पदवी नावाचा अडथळा नौरोती देवींच्या मार्गात आला आहे. कारण राजस्थानमधील नव्या कायद्यानुसार पंचायत निवडणुकीसाठी किमान शिक्षण हवं आणि यामध्ये त्या अपात्र ठरत आहे.

उच्च न्यायालयात याचिका

नव्या कायद्यामुळे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरत असल्याने, नौरोती देवी विकासकामांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाहीत. निर्णयप्रक्रियेसाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहावं लागेल, म्हणून नव्या नियमाविरोधात नौरोती देवींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

अंगठेबहाद्दरांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी किमान शिक्षणाची अट योग्य आहे. मात्र नौरोती देवींसारख्या दूरदृष्टी असलेल्या महिलांना त्याचा फटका बसत आहेत.

नौरोती देवींना डिग्री नावाची पिसं जोडलेली नाहीत. पण स्वत:ची हिम्मत, अंगभूत टॅलेंट, कामाचा अनुभव यासारखे पंख त्यांच्याकडे आहेत. त्यामुळेच नौरोती देवी आजपर्यंत भरारी घेत आल्या आहेत. मात्र आता त्यांची हीच भरारी डिग्री नावाच्या पिसांनी रोखली आहे, हे निश्चित!
====================================================
राज्यात 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक
उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच राज्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात प्रमुख शहरांमध्ये सध्याच्या स्थितीत फक्त 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
मराठवाड्यातील सर्व जिल्हे पाणीटंचाईने होरपळून निघाले आहेत. पुणे, नाशिक अमरावती जिल्हात मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठे खालानले आहेत.
अपुर्‍या पावसामुळे राज्यात सर्वत्र टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणं शंभर टक्के भरलेली नाहीत. सर्वात कमी पाणीसाठा हा मराठवाड्यांमधल्या धरणांमध्ये आहे. यावर्षी फक्त आठ टक्केच हा साठा आहे.
राज्यातलं एक मोठं धरण असलेल्या जायकवाडीमध्ये फक्त सहा टक्के पाणीसाठा आहे. तर मराठवाड्यातली अनेक धरणं कोरडी ठाक आहेत. उन्हाळ्याचे अजून चार महिने बाकी आहेत. अशा स्थितीत पिण्याचे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न जिल्हा प्रशासना समोर निर्माण झाला आहे.
====================================================
भारतावरील बहुतांश दहशतवादी हल्ल्यांचे उगमस्थान पाकिस्तानच- राजनाथ सिंह

भारतावर करण्यात आलेल्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांचे उगमस्थान पाकिस्तानच असल्याचे अधोरेखित करताना यापुढे पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवाद रोखण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले तरच भारत पाकिस्तानची साथ देईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते काल जयपूर येथे सुरू असलेल्या दहशवादविरोधी परिषदेत बोलत होते. संपूर्ण जगाला दहशतवादाचा धोका लक्षात येऊनही दहशतवादाच्या एकाही व्याख्येवर अद्यापपर्यंत  एकमत झालेले नाही. काही देश दहशतवादाचा वापर परराष्ट्र धोरणातील चाल म्हणून करतात, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. यावेळी राजनाथ यांनी पाक पुरस्कृत दहशतावादावरही निशाणा साधला. भारतावरील बहुतांश दहशतवादी हल्ल्यांचे उगमस्थान पाकिस्तानच असून आतातरी या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी पाकिस्तानकडून ठोस आणि प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानने त्यांच्या भूमीतील दहशतवादी संघटनांवर निर्णायक कारवाई केल्यासच भारत पाकिस्तानची साथ देईल. ही बाब फक्त दोन देशांचे परस्परसंबंध सुधारण्याइतकीच महत्त्वाची नसून त्यामुळे  संपूर्ण दक्षिण आशियाई परिसरात शांतता प्रस्थापित होईल, असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. 

====================================================
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात धाव
नॅशनल हेराल्ड प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्यास नकार देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या दोघांसोबत या प्रकरणातील उर्वरित आरोपींपैकी सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिवाळखोरांचा जामिनोत्सव भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप करत कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने सोनिया, राहुल यांच्यासह सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया लिमिटेड यांच्याविरुद्ध न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. या नेत्यांनी समन्सला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देऊन ते रद्द करण्याची मागणी केली होती. हे समन्स रद्द करण्यात यावे, तसेच आपल्याला कनिष्ठ न्यायालयात वैयक्तिकरीत्या हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती राहुल आणि सोनिया यांनी केली होती, परंतु उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील गौर यांनी त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. काय आहे हेराल्ड प्रकरण? सोनिया आणि राहुल हे दोघेही न्यायालयात उपस्थित राहिल्यानंतर त्यांना कनिष्ठ न्यायालयाकडून जमीन मंजूर करण्यात आला. त्यांच्यासह या प्रकरणातील अन्य आरोपी सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस यांनादेखील जामीन मंजूर करण्यात आला. 
====================================================

अमेरिकेमधील मुस्लीम आहेत भयग्रस्त - बराक ओबामा 


देशभरातील मुस्लीमांमध्ये खरं सांगायचं तर भीतीचं वातावरण असल्याचे उद्गार बराक ओबामा यांनी काढले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील इस्लामविरोधी सूर अक्षम्य असल्याचे मत अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले आहे. दहशतवादाशी मुकाबला करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे अमेरिकेने इस्लामची गळचेपी करू नये. मेरिलँडमधल्या बाल्टिमोरमधल्या मशिदीमधून मुस्लीम समुदायासमोर केलेल्या ऐतिहासिक भाषणात ओबामांनी एखाद्या धर्माविरोधात द्वेषनिर्मिती होत असताना अमेरिकी लोकांनी बघ्याची भूमिका घेऊ नये असे मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी मुस्लीमांसारखे दिसणा-या शीखांवरील हल्ल्यांचाही उल्लेख केला. 
खरंतर आत्ता देशभरातील मुस्लीमांमध्ये चिंतेचे आणि खरं सांगायचं तर भीतीचं वातावरण असल्याचे ओबामा म्हणाले.
अमेरिकेत धर्मस्वातंत्र्य आहे, त्यामुळे कुठल्याही धर्माविरोधात कारवाया होत असतील तर त्याविरोधात आवाज उठवायला हवा अशी अपेक्षा त्यांनी केली. काही लोकांच्या हिंसात्मक कारवायांमुळे संपूर्ण समाजाला लक्ष्य केले जात असल्याचे ओबामा म्हणाले. 
डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव न घेता ओबामा म्हणाले की, मुस्लीमांना या देशात जागा नाही असा अक्षम्य पवित्रा राजकीय व्यक्ति घेत आहेत, ज्यामुळे मुस्लीमांना दिल्या जाणा-या धमक्यांमध्ये व त्यांच्यावर होणा-या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.
मुस्लीमांनी कट्टरता आणि दहशतवाद यांना धिक्कारायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

====================================================
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी सुरक्षा संबंधी मदतीसाठी हेल्प लाईन न. १८२

भारतीय रेल्वे ने रेल्वे प्रवाश्यांना रेल्वे प्रवासा दरम्यान येणाऱ्या अडचणीचा विचार करून प्रवाश्यांच्या मदतीकरिता हेल्प लाईन न. १८२ हि सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 
रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या सुरक्षा संबंधी मदतीसाठी कृपया हेल्प लाईन न. १८२ वर कॉल करण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात येत आहे. हा १८२ क्रमांक मोबाईल वरून करता येतो तसेच इतर फोन वरूनही करता येतो. 
हा क्रमांक संपूर्ण भारतीय रेल्वे वर सारखाच राहील, आपण कुठूनही या नंबर वर कॉल करून रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षा संबंधी मदत मागू शकतो. 

जनसंपर्क कार्यालय,
नांदेड विभाग, नांदेड 
====================================================
मुखेड; शाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालयात चित्रकला स्पर्धा संपन्न

 पत्रकार संघातर्फे शैक्षणिक बक्षीस वितरण 
मुखेड :- रियाज शेख
      शहरातील शाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.बी.जाधव यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्य कलाशिक्षक बि.पी. लंगेवाड सरांनी चित्रकला स्पर्धा आयोजीत केली होती. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. चित्रकला स्पर्धेत घायाळे शिवशंकर माधव ने प्रथम क्रमांक पटकाविला. तर सुजाता दीपक पत्रे द्वितीय, राठोड पृथ्वीराज तृतीय, राठोड मयुर प्रकाश उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविला. सर्व विजयी स्पर्धकांना मुख्याध्यापक आर.बी.जाधव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रियाज शेख, पत्रकार संदिप पिल्लेवाड, शेख महेताब यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देवुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कदम सर यांनी तर आभार ग्रंथपाल वाकोडे यांनी मानले.
यावेळी उपमुख्याध्यापक एस.वाय. भांगे सर, उपप्राचार्य आर.जी.शिगनारे, पत्रकार बबलु मुल्ला, फुलारी, अध्यापक काझी सर, हेमंतकुमार घाटे, चांदपाशा सर, लिंगनवाड मँडम सह विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित होते.


====================================================

No comments: