Thursday, 18 February 2016

नमस्कार लाईव्ह १८-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ...आणि अॅनाकोंडाने शेन वॉर्नच्या डोक्याचा चावा घेतला 
२- पाकिस्तानातील सिंध प्रांतातील हिंदू लग्न कायद्यात बदल 
३- व्हेनेझुएलाच्या चलनाचे 37 टक्के अवमूल्यन 
४- घणामध्ये बस-ट्रकमध्ये अपघातात 53 ठार 
५- उत्तर कोरियाचे दक्षिण कोरियावर आक्रमण? 
६- तुर्कस्तानातील स्फोटांमागे कुर्दिश बंडखोर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- राहुल गांधींच्या ताफ्यावर दगडफेक, आंदोलकांवर लाठीचार्ज 
८- राजस्थान; राहुल गांधीसुद्धा देशद्रोही, त्यांना गोळ्या घाला’ - भाजपचे आमदार कैलाश चौधरी 
९- भारत सरकारने रोहीत वेमुलाचं इतक खच्चीकरण केलं की त्याने आत्महत्या केली - राहुल गांधी.
१०- देशप्रेम माझ्या रक्तात - राहुल गांधी 
११- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत फॅशन बनलीय : भाजप खासदार 
१२- फोटोप्रेमी नरेंद्र मोदींचा इन्स्टाग्रामवरही दबदबा 
१३- माझ्या जीवाला धोका;जामीन मिळावा: कन्हैय्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- मुंबईकर शिक्षकाचा अटकेपार झेंडा, जागतिक पुरस्कारासाठी नामांकन 
१५- मिठाईच्या वेष्ठणासह ‘वजन’ विक्रेत्यांना महागात! 
१६- मेक इन इंडियाला ८.९ लाख पाहुण्यांची भेट 
१७- मुंबई; नगरसेविका नयना शेठ यांनी पालिका सभागृहात महापौरांच्या टेबलावर कचरा फेकल्याचे वृत्त.
१८- एप्रिल अखेरपर्यंत शिवस्मारकाचं भुमीपूजन होणार, शिवस्मारक समितीच्या बैठकीत निर्णय 
१९- वाहन नोंदणीवर मर्यादा आणण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- मालाड; लोखंडी सळई डोक्यात आरपार घुसूनही 'तो' बचावला 
२१- मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावर उद्यापासून तीन दिवस मेगाब्लॉक 
२२- लोहा; दि. २० रोजी लोहा तालुका भाजपच्या कार्यकारणीची बैठक 
२३- मुखेड: विज्ञान मेळाव्यातून विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो - शिक्षणाधिकारी शिवाजी पवार 
२४- केवळा तांडा येथील शोषखड्डयाचे काम कौतुकास्‍पद- जि.प. सदस्‍या वर्षाताई भोसीकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- 'फ्रीडम 251' ची बुकिंग सुरु होताच वेबसाईट क्रॅश 
२६- वाकवा, पुन्हा सरळ करा.. जगातला पहिला फ्लेक्झिबल स्मार्टफोन 
२७- सोनम कपूरचा 'नीरजा' पाहून सचिन म्हणतो... 
२८- हेराफेरी, हंगामा फेम दिग्दर्शक प्रियदर्शन घटस्फोटाच्या वाटेवर 
२९- सनी लिओनी लवकरच दिसणार बॉलीवूडच्या ‘संस्कारी’ बाबूजींसोबत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेत तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात...कारण धनुष्याचा बन लांब जाण्यासाठी आधी मागे खेचाव लागतो 
[सुरेश मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.


=============================================

मालाड; लोखंडी सळई डोक्यात आरपार घुसूनही 'तो' बचावला

लोखंडी सळई डोक्यात आरपार घुसूनही 'तो' बचावला!
मुंबई : सात फुटांची लोखंडी सळई डोक्यात आरपार घुसूनही एक मजूर बचावल्याची आश्चर्यकारक घटना मुंबईत घडली आहे. मालाडच्या तानाजीनगरमधील एका कन्स्ट्रक्शन साईटवर 24 वर्षीय मोहम्मद गुड्डू सिमेंट एकत्र करण्याचं काम करत असताना हा प्रकार घडला. चौथ्या मजल्यावरुन पडलेली एक लोखंडी सळई थेट त्याच्या डोक्यावर आदळली आणि त्याच्या कवटच्या आरपार घुसली. या घटनेनंतर गुड्डूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला आश्चर्यकारकरित्या वाचवलं. महत्त्वाचं म्हणजे ही सळई डोक्याच्या आरपार घुसूनही गुड्डूच्या मेंदूची प्रमुख धमनीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. पण गुड्डूच्या शरीराच्या डाव्या भागाला पक्षाघात झाला आहे. पण  तीन महिन्यात त्याच्या सुधारणा होईल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर गुड्डूच्या डोक्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाली होती.
असा झाला अपघात
रविवारी मालाड पश्चिमच्या तानाजीनगरमधील एका कन्स्ट्रक्शन साईटवर गुड्डू सिमेंट मिक्स करण्याचं काम करत होता. मात्र त्याचवेळी चौथ्या मजल्यावरुन सात फुटांची लोखंडी सळई थेट त्याच्या डोक्यावर आदळून आरपार घुसली. गुड्डूला तातडीने संजिवनी रुग्णालय आणि त्यानंतर सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायन रुग्णालयात डॉ. बटुक दियोरा यांच्या नेतृत्त्वात डॉक्टरांच्या एका टीम त्याच्यावर शस्त्रक्रिया केली.
=============================================

मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावर उद्यापासून तीन दिवस मेगाब्लॉक 

मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावर उद्यापासून तीन दिवस मेगाब्लॉक
मुंबई हार्बर रेल्वेमार्गावर 12 डब्यांच्या प्लॅटफॉर्म आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी 19 फेब्रुवारीपासून 72 तास म्हणजेच तीन दिवस मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर रेल्वेमार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र, हे काम प्रवाशांच्या सोयीसाठी असल्याने प्रवाशांकडून या कामाचं स्वागतही करण्यात येत आहे.
19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी मेगाब्लॉक
19 फेब्रुवारीपासून घेण्यात येणारा 72 तासांचा ब्लॉक 21 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येईल. या ब्लॉकला आज मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. या दोन दिवशी सीएसटी ते वडाळा दरम्यान लोकलसेवा बंद राहील, तर वडाळ्यापासून डाऊन लोकलसेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
=============================================

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत फॅशन बनलीय : भाजप खासदार 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत फॅशन बनलीय : भाजप खासदार
मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही फॅशन बनत असल्याचं गोपाळ शेट्टी म्हणाले. महाराष्ट्रात एकट्या जानेवारी महिन्यात 124 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्याचवेळी खासदार शेट्टी यांनी हे वक्तव्य करुन वाद ओढावून घेतला आहे.
मुंबईच्या बोरीवलीमध्ये आदित्य ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या चौथ्या नॅशनल इनोव्हेशन समिटमध्ये गोपाळ शेट्टी बोलत होते.
=============================================

'फ्रीडम 251' ची बुकिंग सुरु होताच वेबसाईट क्रॅश 

'फ्रीडम 251' ची बुकिंग सुरु होताच वेबसाईट क्रॅश
मुंबई : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम 251’ खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून या 251 रुपये किंमतीचा स्मार्टफोन विकत घेण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग सुरु झाली खरी, पण बुकिंगची सुरुवात होताच वेबसाईट क्रॅश झाली. अवघ्या साडेतीन डॉलर्सला हा फोन उपलब्ध आहे.
किंमतीच्या आधारावरच या स्मार्टफोनचं नाव ‘फ्रीडम 251’ ठेवण्यात आलं आहे. भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारीला (17 फेब्रुवारी) हा स्मार्टफोन लॉन्च केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या योजने अंतर्गत या स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आली आहे.
=============================================

वाकवा, पुन्हा सरळ करा.. जगातला पहिला फ्लेक्झिबल स्मार्टफोन 

वाकवा, पुन्हा सरळ करा.. जगातला पहिला फ्लेक्झिबल स्मार्टफोन
टोरंटो : अनब्रेकेबल स्क्रीन असलेला स्मार्टफोन नुकताच ग्राहकांच्या भेटीला आला. स्क्रीनच्या बाबतीत असेच काही प्रयोग करण्याचे प्रयत्न या क्षेत्रातील तज्ञ करत आहेत. कॅनडातील काही संशोधकांनी तर फोनची स्क्रीन वाकवता येणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा जगातला पहिला फ्लेक्झिबल स्मार्टफोन ठरला आहे. 
या स्मार्टफोनवर तुम्ही स्क्रीनला टच न करता ऑनलाईन गेम खेळू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन पुस्तकांची पानंही उलटू शकाल. उजवीकडे फोन वाकवल्यास पानं उजवीकडून डावीकडे उलटली जातील. अगदी हातातल्या पुस्तकाला वाकवल्यावर जी क्रिया होते, अगदी तशीच. तुम्ही पानं उलटण्याची ही क्रिया स्क्रीनवर बोट ठेवून अनुभवूही शकता.


Reflex Flexible Bend Smartphone 2
त्याचप्रमाणे बेन्ड जेस्चर वापरुन अनेक अॅप्स वापरता येतील. रिफ्लेक्स या फोनला एचडी डिस्प्ले असलेला फ्लेक्झिबल ओएलईडी टच स्क्रीन आहे. अँड्रॉईडचं 4.4 (किटकॅट) वर्जन फोनमध्ये आहे.
कॅनडातील क्वीन्स विद्यापीठातील ह्युमन मीडिया लॅबमधील संशोधकांनी हा फोन तयार केला आहे. रिफ्लेक्स असं या फोनचं नामकरण करण्यात आलं आहे. हाय रेजोल्युशन असलेल्या या फोनमध्ये मल्टी टच आणि बेन्ड इन्पुट्सचं एकत्रिकरण करण्यात आलं आहे.
=============================================

...आणि अॅनाकोंडाने शेन वॉर्नच्या डोक्याचा चावा घेतला 

...आणि अॅनाकोंडाने शेन वॉर्नच्या डोक्याचा चावा घेतला!
मुंबई : एका अॅनाकोंडाने क्रिकेट लिजंड शेन वॉर्न याच्या डोक्याचा चावा घेतला. गेट मी आऊट ऑफ हिअर या ऑस्ट्रेलियन रिअलिटी शोमध्ये शेन वॉर्न सहभागी झाला होता. त्यात अॅनाकोंडा त्याच्या डोक्याचा चावा घेतला.
शेन वॉर्नला सापांची प्रचंड भिती वाटते. पण त्याने शोमधील टास्क स्वीकारला. अॅनाकोंडा असलेल्या एका बॉक्समध्ये डोकं घालायचं असं टास्क त्याला दिलं होतं.
सुरुवातीला डोळ्याला पट्टी बांधलेल्या शेनने एका उंदिर असेलल्या बॉक्समध्ये डोकं घातलं. यानंतर त्याने अॅनाकोंडा असलेल्या बॉक्समध्ये डोकं घातलं. पण उंदरांचा वास त्याच्या डोक्याला आणि त्वचेला येत असल्याने अॅनाकोंडाला त्याचं भक्ष्यच समोर आल्यासारखं वाटलं. एपिसोडचा होस्ट डॉक्टर क्रिस ब्राऊन यानेही शेनला याबाबत बजावलं होतं.
Shane_Warne
या बॉक्समध्ये अॅनाकोंडा, रॅट स्नेक आणि कॉर्न स्नेक होते. त्यापैकी एका छोट्या अॅनाकोंडाने शेनच्या डोक्यावर हल्ला केला. हा साप बिनविषारी असला तरी खूपच आक्रमक होता. हा टास्क संपल्यानंतर शेन वॉर्नवर तातडीने उपचार करण्यात आलं. त्याच्या डोक्यावर सापाने चावल्याची खुण आहे. शिवाय तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे, असं चॅनल टेनच्या प्रवक्तांनी सांगितलं.
शेन वॉर्नला सापाने चावलेला हा एपिसोड आज रात्री 7.30 वाजता चॅनल टेनवर पाहता येणार आहे.
=============================================

सोनम कपूरचा 'नीरजा' पाहून सचिन म्हणतो... 

सोनम कपूरचा 'नीरजा' पाहून सचिन म्हणतो...
मुंबई : सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या, शूर हवाईसुंदरी नीरजा भानोतवर आधारित ‘नीरजा’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. क्रिकेटचा देव, विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग पाहून स्तुतिसुमनं उधळली आहेत. 
‘नीरजा भानोत किती निस्वार्थी आणि शूर होती. एका दुलर्क्षित हिरोवर चित्रपट केल्यामुळे अत्यंत आनंद होत आहे. सर्वांचेच परफॉर्मन्स अप्रतिम. नीरजा चित्रपट पाहायलाच हवा.’ असं सचिन तेंडुलकर म्हणतो.
=============================================

मुंबईकर शिक्षकाचा अटकेपार झेंडा, जागतिक पुरस्कारासाठी नामांकन 

मुंबईकर शिक्षकाचा अटकेपार झेंडा, जागतिक पुरस्कारासाठी नामांकन
लंडन : मुंबईकर शिक्षक रॉबिन चौरसियाच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. रेड लाईट एरियातील मुलींसाठी ना नफा न तोटा तत्त्वावर चालवलेल्या ‘क्रांती फाऊण्डेशन’ या शाळेसाठी रॉबिनला जागतिक पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झालं आहे. 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहा जणांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. 1 मिलिअन यूएस डॉलर म्हणजे सुमारे 6.84 कोटी रुपये इतकी पुरस्काराची रक्कम आहे. पुरस्कारासाठी रॉबिनची यूके, यूएस, नैरोबी, पॅलेस्टाईन, जपान, फिनलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या शिक्षकांशी स्पर्धा असेल. 
रॉबिनच्या शाळेत 12 ते 20 वयोगटातील विद्यार्थी आहेत. हे सर्व मुंबईतील रेड लाईट एरिआतील सेक्स वर्कर्सची मुलं आहेत. क्रांती शाळेतील विद्यार्थी म्हणून रॉबिन त्यांना ‘क्रांतिकारी’ असं संबोधतो. 
प्रत्येक यशस्वी कलाकारामागे, तत्त्वज्ञामागे, शास्त्रज्ञामागे एक शिक्षक असतो. आयुष्य कितीही खडतर असलं तरी शिक्षक योग्य मार्ग दाखवण्यासाठी सोबत असतात, असं नामांकनांची घोषणा करताना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनी म्हटलं
=============================================

फोटोप्रेमी नरेंद्र मोदींचा इन्स्टाग्रामवरही दबदबा 

फोटोप्रेमी नरेंद्र मोदींचा इन्स्टाग्रामवरही दबदबा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेचा गाजतात. विविध देशांच्या प्रमुखांसोबत मोदींनी काढलेल्या सेल्फींना अनेकांच्या पसंतीची पावती मिळते. मात्र ट्विटर, फेसबुकप्रमाणेच इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवरही मोदींच्या ऑफिशिअल अकाऊण्टने सरशी घेतली आहे. 
मोदी हे इन्स्टावर तिसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते ठरले आहेत. बर्सन-मार्सलर या फर्मच्या ‘द वर्ल्ड लीडर ऑन इन्स्टाग्राम’ या सर्वेक्षणानुसार बराक ओबामा हे 60 लाख फॉलोअर्स असलेले सर्वात लोकप्रिय नेते आहेत. 
दुसऱ्या क्रमांकावर रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेद्वेदेव असून त्यांचे 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मोदी असून त्यांचे 19 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. मोदींच्या ऑफिशिअल इन्स्टापेजवर 38 फोटो आहेत, तर पहिल्या क्रमांकावरील ओबामांचे 206 पोस्ट आहेत. 
जगभरातील 70 टक्के राज्यकर्त्यांची इन्स्टाग्राम अकाऊण्ट आहेत. मात्र 305 पैकी सुमारे एक तृतीयांश अकाऊन्ट्स तितकीशी अॅक्टिव्ह नसल्याचं सर्वेक्षणातून पुढे आलं आहे.
=============================================

हेराफेरी, हंगामा फेम दिग्दर्शक प्रियदर्शन घटस्फोटाच्या वाटेवर 

हेराफेरी, हंगामा फेम दिग्दर्शक प्रियदर्शन घटस्फोटाच्या वाटेवर
चेन्नई : बॉलिवूडमध्ये सध्या घटस्फोट आणि ब्रेकअपचं सुरु झालेलं वारं काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. हेराफेरी, हंगामा, हलचल, मालामाल विकली यासारख्या बॉलिवूडमध्ये गाजलेल्या अनेक विनोदी चित्रपटांचे दिग्दर्शक प्रियदर्शनही घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. 
प्रियदर्शन आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री लिसी यांनी परस्पर संमतीने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दोघांनी मालमत्तेच्या वादातून फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर आता त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. 
प्रियदर्शन यांनी त्यांचं निवासस्थान आणि नुंगामबक्कममधील त्यांचं प्रीव्ह्यू थिएटर हे एकट्याच्या मालकीचं असल्याचा दावा केला होता. तर पत्नी लिसी यांनी दोन्ही मालमत्तांचे दोन वाटे करण्याची मागणी केली होती. लिसी यांनी 2015 मध्ये प्रियदर्शन यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत तक्रारही नोंदवली होती. 
दोघांनी पुन्हा दिलजमाईचे प्रयत्न फोल असल्याचं सांगत मुलांसाठी हे प्रकरण समजुतीने मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. लिसी यांनी आपल्याविरुद्ध लावलेले आरोप मागे घेतल्यास, आपण घटस्फोटास तयार होऊ असं प्रियदर्शन यांनी सांगितलं. 
लिसी आणि प्रियदर्शन 1990 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांचं 14 वर्षांचं सहजीवन झालं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
=============================================
राहुल गांधीसुद्धा देशद्रोही, त्यांना गोळ्या घाला’ - राजस्थानातील भाजपचे आमदार कैलाश चौधरी



जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) देशविरोधी घोषणाबाजी करणाऱया विद्यार्थ्यांची बाजू घेणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा देशद्रोही असून, त्यांना गोळ्या घालून ठार केले पाहिजे, असे विधान राजस्थानातील भाजपचे आमदार कैलाश चौधरी यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘जेएनयू’ वादावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार सध्या अटकेत असून, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या वादात राजकीय नेत्यांनी उडी घेतल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले आहे. राहुल गांधी यांनी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर जोरदार टीका केली.
दहशतवादी अफझल गुरूची प्रशंसा करणाऱया आणि देशविरोधी वक्तव्य करणाऱया विद्यार्थ्यांना भेट देऊन राहुल गांधी यांनीही देशद्रोही कृत्य केले आहे. त्यांना फासावर चढवायला हवे किंवा गोळ्या घालून ठार करायला हवे, असे बेधडक विधान भाजप आमदार कैलाश चौधरी यांनी केले. चौधरी यांच्या या विधानाचा व्हिडिओ देखील समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे.
=============================================

=====================

मिठाईच्या वेष्ठणासह ‘वजन’ विक्रेत्यांना महागात!

मिठाईच्या आवरणासह मिठाईची विक्री करून ग्राहकांना ‘गुंडाळणे’ विक्रेत्यांना महागात पडले आहे. कारण नुकत्याच वैधमापनशास्त्र विभागाने शहरात केलेल्या तपासणीत मिठाईच्या खोक्यासह मिठाईची विक्री करणाऱ्या ४४९ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याच धर्तीवर ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी वैधमापनशास्त्र विभागाकडून ग्राहकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नामांकित मिठाई विक्रेते मिठाईचे वजन करताना खोक्यासह वजन करत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात होत्या. याच धर्तीवर वैधमापनशास्त्र विभागाने मुंबई व उपनगरांत राबविलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल ४४९ मिठाई विक्रेत्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यात मिठाईच्या खोक्यासह वजन करताना मिठाई कमी देणे, वजनकाटय़ात फेरफार करणे, वस्तूंच्या किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणे, असे विविध प्रकार उघडकीस आले आहेत. शहरात वस्तूंच्या आवरणावर छापील किमतीपेक्षा अधिक किंमत आकारण्याचे गैरप्रकार विक्रेते करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना वस्तूवर दिलेल्या किमतीप्रमाणेच वस्तूची खरेदी करावी. किमतीनुसार वजनाच्या मापात वस्तू बरोबर मिळत आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे. याशिवाय वजनकाटय़ावर वजन करताना त्यावरील आकडय़ावर लक्ष ठेवावे. मिठाई व इतर वस्तू खरेदी करते वेळी त्यांचे वजन खोक्याशिवाय करण्याचे दुकानदाराला सांगावे, असे विभागाने सांगितले आहे. अशात काही गैरप्रकार आढळून आल्यास ०२२-२२८८६६६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
=============================================

सनी लिओनी लवकरच दिसणार बॉलीवूडच्या ‘संस्कारी’ बाबूजींसोबत

पोर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये जम बसवलेली अभिनेत्री सनी लिओनी लवकरच बॉलीवूडमध्ये संस्कारी बाबूजी अशी ओळख असलेल्या आलोकनाथ यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. हे दोघंही एका तंबाखूविरोधी मोहिमेअंतर्गत जाहिरातीत काम करणार आहेत. धुम्रपानामुळे होणारे तोटे आणि ते टाळण्यासाठीचा सामाजिक संदेश सनी आणि आलोकनाथ जाहिरातीतून देणार आहेत. याशिवाय, या दोघांसोबत विनोदी कलाकार दीपक डोबरिया देखील जाहीरातीत दिसेल.
सनी लिओनी जाहिरातीत हरियाणातील एका मुलीची भूमिका साकारणार असून, दीपक डोबरिया धुम्रपानामुळे मरणासन्न अवस्थेत आलेल्या तरुणाच्या भूमिकेत दिसेल. आलोकनाथ जाहिरातीचे सूत्रसंचलन करताना दिसून येतील.

=============================================

देशप्रेम माझ्या रक्तात - राहुल गांधी 

 देशप्रेम माझ्या रक्तात, माझ्या ह्दयात आहे. माझ्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहे असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 
जवाहरलाल नेहरु विद्यापाठीतील घडामोडींवरुन सुरु असलेल्या वादा प्रकरणी त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. जर कोणी आपल्या देशाचा अपमान करत असेल तर, त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे, पण त्यासाठी संपूर्ण विद्यापीठाला बदनाम करणे योग्य नाही असे राहुल गांधी म्हणाले. 
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ त्यांची विचारसरणी विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे पण आम्ही तसे होऊ देणार नाही. विद्यार्थ्यांच्या कल्पनांमुळे आज देशाची उन्नती झाली आहे. त्यांच्यावर विचारसरणी लादण्याचा देशाला फायदा होणार नाही असे राहुल गांधी म्हणाले. 
पत्रकारांना सर्वांसमक्ष मारहाण होते आणि पोलिस फक्त बघत रहातात. यामुळे संपूर्ण जगभरात भारताची प्रतिमा मलिन झाली आहे असे राहुल म्हणाले. राहुल गांधी यांनी जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे समर्थन केल्याबद्दल भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. 
राहुल गांधींना देश हित आणि देश विरोधातला फरक समजत नाही अशी बोचरी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. 

=============================================

मेक इन इंडियाला ८.९ लाख पाहुण्यांची भेट 


महाराष्ट्रात गुंतवणूकीचा ओघ वाढावा आणि त्याव्दारे रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाला एकूण ८.९ लाख पाहुण्यांनी भेट दिली. मेक इन इंडिया सप्ताहात पाच दिवसात महाराष्ट्रात विविध प्रकल्पांच्या गुंतवणूकीचे ७.९४ लाख कोटी रुपयांचे २५०० सामंजस्य करार करण्यात आले अशी माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली. 
मेक इन इंडिया सप्ताह संपला असून, आता मेक इन इंडिया मोहिम सुरु झाली आहे  असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेक इन इंडिया सप्ताहात मराठवाडा, विदर्भात १.५ लाख कोटींची गुंतवणूक, खानदेशात २५ हजार कोटी, पुण्यात ५० हजार कोटी, मुंबई आणि कोकणात ३.२५ लाख कोटीच्या गुंवतणूकीचे सामंजस्य करार झाले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 
भारताच्या इतिहासात मेक इन इंडियाने आपली छाप उमटवली असून, भारतात भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मेक इन इंडियाने पायंडा घालून दिला आहे  असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 
महाराष्ट्रात ८.५ लाख कोटीची गुंतवणूक होणार असून, त्याव्दारे तीस लाख रोजगार निर्मिती होईल हे मोठे यश आहे असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. जे सामंजस्य करार झाले आहेत ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता प्रयत्न केले पाहिजेत. 
या सप्ताहात गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात १५.२० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कटिबद्धता दाखवली आहे. या सप्ताहात एकूण १०२ देश सहभागी झाले होते. १५० कार्यक्रमात १२५० वक्त्यांनी सहभाग घेतला. ९ हजार स्वदेशी आणि दोन हजार परदेशी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. 
महाराष्ट्रात उद्योग-व्यवयास करणे सोपे बनले आहे, उद्योग अनुकुलतेचे महाराष्ट्र उत्तम उदहारण आहे, मंत्री आणि सरकारी अधिकारी आता उपलब्ध असतात आणि लवकरात लवकर मुद्दे सोडवतात असे मेक इन इंडियाला आलेले जेसीबी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विपीन सोधी म्हणाले. 
=============================================

पाकिस्तानातील सिंध प्रांतातील हिंदू लग्न कायद्यात बदल 

पाकिस्तानील सिंध प्रांतात राहणारे हिंदू आता लग्न नोंदणीकृत करु शकतात. सिंध प्रांतात असं विधेयकच पास झाल्याने गेली अनेक वर्ष सिंध प्रांतात राहणा-या हिंदूंना मोठा दिलासा मिळाला आहे. 
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यापासून पाकिस्तानात राहणा-या हिंदूंना त्यांच्या लग्नाची नोंदणी करण्याचा कोणताही अधिकार दिला नसल्यानं त्यांचे लग्न अधिकृत मानले जात नव्हते. नोंदणी होत नसल्याने लग्न झाल्याचा कोणताच पुरावा त्यांच्याकडे नसायचा त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत त्यांना अडथळा येत होता.  
 सिंध प्रांतात 30 लाख हिंदू राहतात. या निर्णयामुळे बँक खाते खोलण्यासाठी, व्हीजा अर्ज करण्यासाठी तसंच संपत्तीत भागीदारी मिळण्यासाठी फायदा होणार आहे. 
या विधेयकामध्ये घटस्फोट घेण्यासाठीची तरतूददेखील करण्यात आली आहे. सिंध प्रांतातील हिंदूंनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
=============================================
व्हेनेझुएलाच्या चलनाचे 37 टक्के अवमूल्यन 
कॅरॅकस: व्हेनेझुएलाने सरकारी चलन बोलिव्हरचे 37 टक्के अवमूल्यन केले असून, कच्च्या तेलाच्या भावात घसरण होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या "ओपेक‘ देशांनी सुरू केलेल्या उपाययोजनांचा हा भाग आहे. तसेच, देशात प्रथमच 20 वर्षांमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलाय मडुरो यांनी बोलिव्हर या चलनाचे 37 टक्के अवमूल्यन जाहीर केले. याआधी अमेरिकी डॉलरचा भाव 6.3 बोलिव्हर होता. तो आता 10 बोलिव्हरपर्यंत जाणार आहे. हा भाव कायम बदलत राहणार आहे. हा भाव जीवनावश्‍यक वस्तू आणि औषधांसाठी लागू राहणार आहे. व्हेनेझुएलाची 95 टक्के अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या भावातील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेची घसरण होत असल्याने सरकारने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. "ओपेक‘ तेल उत्पादक देशांची संघटना आहे. कच्च्या तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय पातळीवर मागील 19 महिन्यांपासून घसरण होत आहे. त्यातच इराणवर आण्विक कार्यक्रमामुळे लादण्यात आलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध उठविण्यात आले आहेत. यामुळे इराणकडून पुरवठ्यात वाढ झाल्याने भावात सातत्याने घसरण होत आहे. याचा परिणाम म्हणून "ओपेक‘ सदस्य देशांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

=============================================
माझ्या जीवाला धोका;जामीन मिळावा: कन्हैय्या
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याने तिहार तुरुंगामध्ये आपल्याला प्राणभय असल्याचे सांगत आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज केला. कन्हैय्या याला देशद्रोहाच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आली आहे. कन्हैय्या याच्यावर काल (बुधवार) पटियाला न्यायालयाच्या आवारामध्ये वकिलांच्या एका गटाने हल्ला केला होता. या पार्श्‍वभूमीवर, वकिल अनिंदिता पुजारी यांच्याद्वारे दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये कन्हैय्या याने आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर, आपल्या जीवाला धोका असून या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी विनंती या अर्जाद्वारे कन्हैय्या याने केली आहे. "पोलिसांना मला न्यायालयात सादर करणेदेखील कठीण जात असल्याने अशा प्रकारे तुरुंगात ठेवून कोणताही हेतु साध्य होणार नाही,‘ असे त्याने म्हटले आहे. कन्हैय्या याच्या जामीन अर्जावर न्यायालय उद्या (शुक्रवार) सुनावणी करणार आहे. दरम्यान, कन्हैय्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे.
=============================================
घणामध्ये बस-ट्रकमध्ये अपघातात 53 ठार
अक्रा- पश्‍चिम मध्य घणामध्ये बस व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 53 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किंताम्पो गावाजवळ बुधवारी (ता. 17) सायंकाळी बस व ट्रकमध्ये अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात 53 जणांचा मृत्यू झाले असून अन्य 23 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघाताची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
=============================================
उत्तर कोरियाचे दक्षिण कोरियावर आक्रमण?
सेऊल - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी लष्करास दक्षिण कोरियावर आक्रमण करण्याची तयारी करण्याचे आदेश दिल्याचा इशारा दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने दिला आहे. उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या आण्विक व क्षेपणास्त्र चाचणीनंतर दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. 
उत्तर कोरियाने याआधीही दक्षिण कोरियावर आक्रमण केले आहे. मात्र सद्यास्थितीत या देशातील घडामोडींची खातरजमा अन्य कोणत्याही माध्यमाने करता येणे अशक्‍य असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियातील गुप्तचर विभाग व सत्ताधारी सनुरी पक्षाच्या बैठकीस उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. 
दरम्यान, अमेरिकेने दक्षिण कोरियास ठाम पाठिंबा व्यक्‍त केला आहे. दोन्ही देशांमधील तणाव सतत वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने नुकतीच अण्वस्त्रसज्ज विमानासह इतरही अत्याधुनिक लढाऊ विमाने दक्षिण कोरिया येथे पाठविली होती. आण्विक कार्यक्रमाचा त्याग न केल्यास त्याची परिणती उत्तर कोरिया कोसळण्यात होईल, असा इशारा दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.
=============================================
तुर्कस्तानातील स्फोटांमागे कुर्दिश बंडखोर
अंकारा - तुर्कस्तानची राजधानी असलेल्या अंकारा येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागे सीरियातील वायपीजी ही कुर्दिश बंडखोर संघटना असून यासंदर्भात आत्तापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती तुर्कस्तानचे पंतप्रधान अहमत दावुतोग्लु यांनी आज (गुरुवार) दिली. 
तुर्कस्तानमधील कुर्दिस्तानी वर्कर्स पार्टी (पीकेके) या बंदी घालण्यात आलेल्या राजकीय पक्षाच्या सहकार्याने दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या हल्ल्यास उत्तर म्हणून तुर्कस्तानने काल (बुधवार) पीकेकेच्या उत्तर इराकमधील तळांवर हला केला. या हल्ल्यात पीकेकेचे काही वरिष्ठ नेते ठार झाल्याचे दावुतोग्लु यांनी सांगितले. तुर्कस्तानच्या लष्कराला लक्ष्य करून घडवून आणलेल्या स्फोटामध्ये काल (बुधवार) अंकारामध्ये किमान 28 जण ठार झाले. या स्फोटात 61 नागरिक जखमी झाले. 
दहशतवाद्यांनी एका चारचाकी गाडीमध्ये बॉम्ब ठेवला होता. सैनिकांना घेऊन निघालेला लष्कराच्या गाड्यांचा ताफा सिग्नलला थांबलेला असताना हा स्फोट झाला. गेल्या काही महिन्यांपासून तुर्कस्तानमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. कालच्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी तुर्कस्तानचे लष्करी मुख्यालय आणि संसदेजवळ स्फोट घडवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. ‘स्वसंरक्षणासाठी कुठेही, कधीही आणि कसाही हल्ला करण्याचा आमचा अधिकार आता वापरला जाईल,‘ असा निर्धार तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगन यांनी व्यक्त यासंदर्भात बोलताना व्यक्त केला होता. 
=============================================
केवळा तांडा येथील शोषखड्डयाचे काम कौतुकास्‍पद- जि.प. सदस्‍या वर्षाताई भोसीकर


नांदेड, 18- केवळा तांडा येथील ग्रामस्‍थांनी आपले गाव डासमुक्‍त करण्‍याचा निर्धार केला आहे. यासाठी मोठया प्रमाणावर हाती घेण्‍यात आलेल्‍या शोषखड्डयाचे काम कौतुकास्‍पद असल्‍याचे प्रतिपादन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले.
      कंधार तालुक्‍यातील फुलवळ ग्राम पंचायत अंतर्गत केवळा तांडा येथील शोषखड्डयाच्‍या कामांची पाहणी भोसीकर यांनी करुन शोषखड्डयांचे उद्घाटन केले. यावेळी संजय भोसीकर, मि‍नी बिडीओ अरुण घोडके, उप सरपंच धोंडीबा मंगनाळे, खंडेराव पांडागळे, हनुमंत पेटकर, शिवहार मंगनाळे, बसवेश्‍वर मंगनाळे, नागेश तादलापुरे, गंगाधर शेळगावे, आनंदा पवार, माधव जाधव, लक्ष्‍मण जाधव, ग्रामसेवक जे.डी. देवकत्‍ते, सोमला पवार, विजय जाधव, महेश मंगनाळे, गोविंद चव्‍हाण, दिलीप बसवंते यांची उपस्थिती होती.
      केवळा तांडयामध्‍ये एकूण तीस कुटूंब राहतात त्‍यापैकी विस गावक-यांनी  आपली शोषखड्डे पूर्ण केली आहेत. येत्‍या आठ दिवसात संपूर्ण कुटूंबातील सांडपाणी शोषखड्डयाव्‍दारे जमिनीत मुरविण्‍यात येणार आहे. याची पहाणी जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी करुन समाधान व्‍यक्‍त केले. टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने फुलवळ सर्कलमधील संपूर्ण गावे डासमुक्‍त करण्‍यात येतील. दूष्‍काळावर मात करण्‍यासाठी गावातील सर्व सांडपाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्‍यासाठी शोषखड्डयांचा यशस्‍वी प्रयोग असल्‍याचे जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर म्‍हणाल्‍या.
=============================================
मुखेड: विज्ञान मेळाव्यातून विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो - शिक्षणाधिकारी शिवाजी पवार

" जि.प.हायस्कुल मुलिंच्या शाळेतील १३० विद्यार्थ्यींनी घेतला सहभाग "
मुखेड :- 
      विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यासाठी शाळेत प्रयत्न केले जात आहेत. अपूर्व विज्ञान मेळावा हे प्रभावी माध्यम आहे. जि.प. मुलिंचे हायस्कुल याशाळेतील 130 विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले, ही अभिमानाची बाब आहे. आपल्या प्रयोगाचे स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांच्या चेह-यावरून निर्भयता दिसत असुन याशाळेतील अनेक विद्यार्थी नक्कीच शास्त्रज्ञ होतील असा विश्वास शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार यांनी व्यक्त केला. 
   शहरातील जिल्हा परिषद मुलिंचे हायस्कुल च्यावतीने आयोजीत अपूर्व विज्ञान सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यामेळाव्यात जि.प.मुलिंचे हायस्कुल च्या 130 विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पनेच्या उंच भरारी पाहून शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार, गटविकास अधिकारी व्हि.एन.घोडके, सहायक गटविकास अधिकारी रामराजे आत्राम, गटशिक्षणाधिकारी सतीष व्यवहारे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी येवतीकर, मुखेड भुषण डाँ.दिलीप पुंडे, मुख्याध्यापक गोविंद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप दिली. याप्रसंगी वरिल मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोग पाहण्यासाठी शहरातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, शालेय विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे समारोप मुखेड भुषण डाँ.दिलीप पुंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवराज साधु यांनी केले. मुख्याध्यापक जि.सी.चव्हाण, अरुण दरबस्तवार, व्यंकट जाधव, गोपाळ धनशेट्टी, श्रीमती ए.एस.स्वामी, सि.एस. आतार, सौ.कविता ताटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सोहळा यशस्वी करण्यासाठी गंगाधर सिरसे, मारोती कांबळे, सौ.मधुमती लोणीकर, अंबादास देशमुख, ओमकार धुळशट्टे, सौ.अंचितवार जे.व्ही., सौ.कोटलवार बी.बी., श्रीमती तम्मेवार, सौ.एस.व्ही.उजडे, सौ.आय.सी.जाधव, सौ.ए.व्ही.कांबळे, हरी पवार, प्रकाश डोईजड, सौ.ए.सी. टाकळीकर, माधव हिवराळे, भवानीसिंह चौहाण, श्रीमती एम.एन. शेटवाड, लिपीका रणभिडकर, गायकवाड़, बोईनवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.
=============================================

राहुल गांधींच्या ताफ्यावर दगडफेक, आंदोलकांवर लाठीचार्ज

राहुल गांधींच्या ताफ्यावर दगडफेक, आंदोलकांवर लाठीचार्ज
लखनौ: जेएनयू प्रकरणात दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा सुरु असताना आता त्याचं लोण लखनौपर्यंत पोहोचलं आहे. राष्ट्रपतींची भेट घेऊन राहुल गांधी आज लखनऊच्या दौऱ्यावर गेले. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली आहे. यामुळे तणाव निर्माण होऊन भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
याचवेळेस दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक करण्‍यात आली. परिस्थ‍ती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दोन्ही बाजूनं दगडफेक सुरु झाल्यानं काही काळ पोलिसही गोंधळात पडले होते.
दरम्यान, आज राहुल गांधींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेतली. देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना शिक्षा व्हावी. पण, त्यासाठी सरकारनं जेएनयूमधील विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये असं राहुल गांधींनी म्हटलं. यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि आरएसएसवर जोरदार टीका केली.
भारतातल्या तरुणांचे विचार केंद्र सरकार आणि आरएसएस दाबत असल्याची टीका राहुल गांधींनी केली. काँग्रेस याला कडाडून विरोध करणार असल्याचंही राहुल यांनी म्हटलं. विद्यार्थी आणि पत्रकारांचं रक्षण हे सरकारचं काम असून आरएसएस किंवा सरकार विरोधात बोलणाऱ्यांना दाबलं जातं आहे असंही राहुल गांधींनी म्हणाले.
=============================================

वाहन नोंदणीवर मर्यादा आणण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव 


  • मुंबई, दि. 18 - मुंबईतील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असून मुंबईकरांच्या वाहन वापरावर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला आहे. 
    द इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार महापालिकेने सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी या प्रस्तावात 3 पर्याय सुचवण्यात आले आहेत. ज्यामध्ये नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांची ठराविक तारखेनंतर नोंदणी केली जाऊ नये; नव्या वाहन नोंदणींवर मर्यादा तसंच पार्कीग करण्यासाठी जागा असल्याचा पुरावा दिला तरच वाहन नोंदणी करुन देणे हे पर्याय सुचवण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल आणि याचा परिणाम वाहतुकीची समस्या मिटेलच सोबत पार्कींगलादेखील जागा मिळेल असं या प्रस्तावात सांगितले गेले आहे.
     या प्रस्तावात काही उपायदेखील सुचवण्यात आले आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूकीच्या पायाभूत सुविधा सुधारण्याची गरज असल्याच सांगितल आहे जेणेकरुन लोकांना आणि वाहनांना अडथळा येणार नाही. 34 बस मार्ग बांधण्यात यावेत ज्यावर फक्त बसेसना वाहतुकीची परवानगी असेल, ज्यामुळे त्यांचा वेग आणि फे-या वाढण्यास मदत होईल. यासोबतच मेट्रो नेटवर्क, 19 प्लायओव्हर, 100 सायकलिंग ट्रॅक आणि 6 एलिवेटेड रस्ते बांधण्याचंदेखील सुचवण्यात आले आहे. 
    राज्य सरकारचे अधिकारी यावर काही बोलत नसले तरी लवकरच हा प्रस्ताव अंमलात आणला जाण्याची चर्चा आहे. काही अधिका-यांनी खाजगी वाहनांवर सरसकट बंदी घातली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. 
=============================================

No comments: