Sunday, 14 February 2016

नमस्कार लाईव्ह १४-०२-२०१६चे बातमीपत्र

दिनविशेष:- Valentine Day 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
व्हॅलेंटाईन स्पेशल : 
A- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रेमकहाणी 
B- असं बहरलं अरविंद-सुनिता केजरीवालांचं प्रेम 
C- नागपूर; शैलाचे डोळस, तर प्रतिभाचे आंधळे प्रेम 
D- प्रेमाच्या गुलाबाला महागाईचे काटे; दुष्काळाचा प्रभाव प्रेमविरांवरही; बाजारात शुकशुकाट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय] 
१- वॉशिंग्टन- वायू प्रदूषणाने दरवर्षी लाखोंचा मृत्यू 
२- कोलंबो : बेपत्तांच्या शोधासाठी घेणार रेडक्रॉसची मदत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- भारताला गुंवणुकीचे केंद्र बनवा - मोदी 
४- भाजप सरकार देशद्रोही, जेएनयू वादात राहुल गांधींची उडी 
५- मुंबईत पंतप्रधान मोदींच्या डिनरला आमीरची उपस्थिती 
६- गुरुत्वीय लहरींचे कोडे उलगडणारा ‘धुरंधर’ 
७- सुनंदा पुष्कर मृत्यू; थरुर यांची पुन्हा चौकशी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- सुरक्षिततेसाठी शहांकडून ऋषभदेव मूर्तीचे हवाईमार्गे दर्शन  
९- अस्तित्वातील यंत्रणांना आव्हान देण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन -जावडेकर 
१०- श्रीगोंदा; विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला अपघात, तीन ठार २२ जखमी 
११- २० हजार लिटर पाणी मोफत देऊनही दिल्ली जल बोर्डाला १७६ कोटींचा नफा - अरविंद केजरीवाल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- रविवारच्या व्हॅलेण्टाइन डेमुळे साताऱ्याच्या शिक्षणविश्वात सुटकेचा नि:श्वास! 
१३- गोवा- अत्यंत टोकावरचे नेत्रावळी गाव- ‘आदर्श ग्राम’चा विध्वंस! 
१४- आनंद शर्मांची 'अभाविप' विरोधात तक्रार 
१५- सातारा; उंब्रजजवळ अपघातात तिघांचा मृत्यू 
१६- प्रशांत किशोर आता पंजाबमध्ये काँग्रेससोबत 
१७- नागपूर; 452 संसाराची घडी बसविणारा "देवमाणूस' 
१८- नागपूर; प्रेमासाठी खाल्ली तुरुंगाची हवा  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- नटसम्राट हिंदीत, बिग बी महत्त्वपूर्ण भूमिकेत 
२०- धोनी ब्रिगेडची अखेरच्या टी-20 सामन्यात श्रीलंकेशी टक्कर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
प्रवीण कटकमवार, दत्ता जाधव, अनिल सोनारीकर सचिन गायकवाड, संग्राम पामलवार, अंकुश पोवाडे, राम तरटे, साहिल खान, विठ्ठल मुंडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्याकुट्याना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही
(अमित ग्रोवर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
http://goo.gl/uS8DX4
=======================================

धोनी ब्रिगेडची अखेरच्या टी-20 सामन्यात श्रीलंकेशी टक्कर

धोनी ब्रिगेडची अखेरच्या टी-20 सामन्यात श्रीलंकेशी टक्कर
विशाखापट्टणम रांचीच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत श्रीलंकेवर मिळवलेल्या निर्विवाद विजयानं धोनीच्या टीम इंडियाचं मनोबल उंचावलं आहे. आता विशाखापट्टणमच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीतही श्रीलंकेला हरवून तीन सामन्यांची मालिका जिंकण्याचा निर्धार आहे. 
भारत आणि श्रीलंका संघांमधला हा तिसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री साडेसात वाजता सुरू होईल. पुण्याच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीवर श्रीलंकेनं निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. 
पुण्याच्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर श्रीलंकेनं टीम इंडियाचा अवघ्या 101 धावांत खुर्दा उडवून तो सामना पाच विकेट्सनी जिंकला होता. पण रांचीत भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या आक्रमणाचा खरपूस समाचार घेऊन, वीस षटकांत सहा बाद 196 धावांची मजल मारली. मग भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर विजयासाठी 197 धावांचं लक्ष्य गाठणं श्रीलंकेसाठी अशक्य ठरलं. 
आता विशाखापट्टणमच्या मैदानात टीम इंडियाला आपल्या शिलेदारांकडून पुन्हा त्याच कामगिरीची अपेक्षा आहे.
=======================================

मुंबईत पंतप्रधान मोदींच्या डिनरला आमीरची उपस्थिती

मुंबईत पंतप्रधान मोदींच्या डिनरला आमीरची उपस्थिती
मुंबई : मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिनरमध्ये अभिनेता आमीर खानही सहभागी झाला होता. मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. असहिष्णुतेबाबतच्या वक्तव्यानंतर मोदी आणि आमीर खान समोरासमोर आले. 
देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आमीर खान गेल्या वर्षी चर्चेत आला होता. त्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्टवर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. 
देशात असहिष्णुता वाढत असून त्यामुळे आपल्या पत्नीने देश सोडून जाण्याची भीती बोलून दाखवली, असं वक्तव्य केल्यावर टीकेची झोड उठल्यामुळे आमीरने स्पष्टीकरणही दिलं होतं. त्यानंतर अतिथी देवो भव या अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदावरुन त्याला पायउतार व्हावं लागलं होतं.
=======================================

भाजप सरकार देशद्रोही, जेएनयू वादात राहुल गांधींची उडी

भाजप सरकार देशद्रोही, जेएनयू वादात राहुल गांधींची उडी
नवी दिल्ली : जेएनयूत घोषणाबाजी करणारे विद्यार्थी देशद्रोही नसून त्यांचा आवाज दाबणारं सरकार देशद्रोही आहे असं वक्तव्य करुन राहुल गांधींनी देखील या वादात उडी घेतली आहे. जेएनयूमध्ये घोषणाबाजी करणाऱ्यांमध्ये डी. राजा यांच्या मुलीचा समावेश होता असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. 
डी. राजा यांच्या मुलीच्या समर्थनार्थ डाव्या पक्षाचे आणि काँग्रेसचे नेते एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर राहुल गांधींनी देखील जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र त्यापूर्वी अभाविप आणि इतर विद्यार्थी संघटनांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले. 
यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरशी केली. मात्र अभाविप आणि इतर विद्यार्थी संघटनाचा आक्रमक पवित्रा पाहून राहुल गांधींनी दुसऱ्या गाडीनं बाहेर पडावं लागलं.
=======================================

नटसम्राट हिंदीत, बिग बी महत्त्वपूर्ण भूमिकेत

नटसम्राट हिंदीत, बिग बी महत्त्वपूर्ण भूमिकेत
मुंबई : नाना पाटेकरांच्या अभिनयाने सजलेला नटसम्राट हा चित्रपट लवकरच हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. नानाच आप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत दिसणार असून अमिताभ बच्चन बेलवलकरांच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. 
विक्रम गोखले यांनी नटसम्राट चित्रपटात साकारलेली भूमिका बिग बी साकारणार आहेत. महेश मांजरेकरच चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. नटसम्राट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत कमाईचे विक्रम रचले होते. 
‘नटसम्राट’ 1 जानेवारी रोजी 190 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मराठीतील सर्वोत्तम ओपनिंग मिळालं होतं. ‘नटसम्राट’ने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. 
या सिनेमाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 
नुकतंच या सिनेमात साडेसहा मिनिटांचा नवा सीन अॅड करून तो पुन्हा नव्याने प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांनी ‘नटसम्राट’ला डोक्यावर घेतलं आहे.
=======================================

व्हॅलेंटाईन स्पेशल : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रेमकहाणी 

व्हॅलेंटाईन स्पेशल : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रेमकहाणी
नांदेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष अशोक चव्हाण… जन्मापासून लाल दिवा आणि सुरक्षा बाळगणारा युवराज अशी त्यांची ओळख… 
अशोकरावांचे वडील कै. शंकरराव चव्हाण यांनी केंद्र असो वा राज्य दोन्ही ठिकाणी अनेक महात्वाची पदे भूषवली. वडिल राजकारणात असल्याने साहजिकच अशोकरावांचे बहुतांश शिक्षण मुंबईतच झाले. अशोकरावांनी अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. 
अशोक चव्हाण यांच्यासोबत वर्गमित्र म्हणून महेश कोठारे, महेश मांजरेकर, डी पी सावंत आदी मंडळी होती. एवढ्या मातब्बर नेत्याचा मुलगा असल्याने अशोक चव्हाण यांचे एखाद्या बड्या नेत्याच्या मुलीशी लग्न होईल अशी सर्वाना खात्री होती… पण पुढे काही औरच झाले…
 अशोक चव्हाण यांच्याच महाविद्यालात एक सोज्वळ आणि घरंदाज मुलगी शिकायला होती… वर्ग मैत्रीण असल्याने तिच्याशी अशोकराव यांची मैत्री होती… याच मैत्रीतून अनेकदा गप्पा टप्पा व्हायच्या… मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे कळलेच नाही… 
अशोकरावांनी ही बाब त्यांच्या आईवडिलांना सांगितली… त्यांनाही ही मुलगी भावली आणि थेट 1981 साली अशोकरावांचा त्या वर्ग मैत्रिणीशी विवाह झाला… तिचेच नाव सौ. अमिता अशोक चव्हाण. 
पूर्वाश्रमीची अमिता शर्मा आता अशोक चव्हाणांची अर्धांगिनी आहे…सौ अमिता या तश्या मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या.. पण त्यांनी चव्हाणांच्या घराची सून म्हणून पदभार स्वीकारला… बघता बघता त्यांनी सर्व रितीरिवाज समजून घेतले… सौ अमिता चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचा संसार सुरळीत सुरु आहे. 
सौ. अमिता यांनी त्यांचे सासू सासरे यांचा एवढे मन जिंकले की कै. शंकरराव चव्हाण मला 5 नाही तर 6 मुली आहेत असा उल्लेख आनंदाने करायचे… राजिक वारसा असलेल्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो पण सौ अमिता यांनी आनंदाने सर्व लोकांचे आदरातिथ्य केले, करत आहेत… 
सौ अमिता या नेहमीच अशोक रावांची जमेची बाजू म्हणून उभ्या राहिल्या… पतीच्या कामाचा व्याप कमी व्हावा म्हणून त्यांनी हळूहळू राजकारणातही लक्ष देण्यास सुरुवात केली.. आजघडीला त्या स्वतः आमदार आहेत… आज त्यांचे सासू सासरे हयात नाहीत पण सौ अमिता यांनी अशोकरावांच्या बहिणींना कधीच आई वडिलांची कमतरता जाणवू दिली नाही… 
लग्नाच्या 8 वर्षांनी सौ अमिता आणि श्री अशोकराव यांच्या संसारवेलीवर २ जुळ्या मुलींच्या रूपाने फुल उमलले… ३५ वर्ष झाली या जोडीचा सुखी संसार सुरु आहे…
=======================================

व्हॅलेंटाईन स्पेशल : असं बहरलं अरविंद-सुनिता केजरीवालांचं प्रेम

व्हॅलेंटाईन स्पेशल : असं बहरलं अरविंद-सुनिता केजरीवालांचं प्रेम
मुंबई : टिपीकल द्वितीय श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यासारखी कपडे, गळ्याला मफलर, डोळ्यांना चष्मा, पायात नोकरदाराची असते तशी चप्पल आणि हातात कसलीशी सुटकेस घेऊन फिरणारे केजरीवाल देशाने पाहिले होतेच…अण्णांच्या आंदोलनानं देश चेतला होता तेव्हा केजरीवालच त्या आंदोलनाच्या यज्ञाला फुंकर घालत आहेत हे सर्वश्रृत होतंच…राळेगणसिद्धी आणि महाराष्ट्रात परिचित असलेल्या अण्णांची ओळख देशाला ज्या आंदोलनानं दिली त्या आंदोलनानेच केजरीवालांच्या संघटन, आयोजन-नियोजनक्षमतेचं दर्शन देशाला घडवलं… 
मोदीलाट असतानाही दिल्लीने देशातील वाऱ्याची दिशा बदलली…देशातला झंझावात दिल्लीने रोखून धरला…देशभरात हवा केलेल्या भाजपचा दिल्लीत धूर निघाला…नाव होतं केजरीवाल… 
सोप्पं नव्हतं…सत्ताधीशांशी दोन हात करत देश जिथून हाकला जातो त्या राज्याच्या पटावर आपलं नाव कोरणं येड्या-गबाळ्याचं काम नव्हतं…पण केजरीवाल मागे हटले नाहीत…सामाजिक चळवळींचा चेहरा होताच…डोळ्यांत सच्चेपणा…बोलण्यात स्पष्टपणा…चालण्या-बोलण्यात संयम आणि आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला…गल्लोनगल्ली पिंजून काढली…हातात झाडू काय…डोक्यावर टोपी काय…..पुढे काय आणि कसं झालं ते सर्वांनी पाहिलं आहेच… 
सामाजिक-राजकीय वाऱ्याची घुसळण झाली आणि केजरीवाल नावाचा माणूस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना जगाने पाहिला…केजरीवालांचा शपथविधी सुरू असताना तोबा गर्दीतून टाळ्यांचा आवाज घुमत होता तेव्हा एका खुर्चीवर बसून सुनीताचेही हात अलगद जोडले जात होते…डोळ्यांत आनंदाची, अभिमानाची चमक दिसत होती…शपथविधी संपन्न झाल्यावर केजरीवालांची पावलं सुनिताकडे आपसूक ओढली गेली…कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघालेल्या केजरीवालांनी डोळे मिटून सुनिताला अलिंगन दिलं आणि फक्त एवढंच म्हणाले…’थँक्स’ 
पुढे कधीतरी एका मुलाखतीत केजरीवालांनी सुनिताची ओळख करून दिली… ”सुनिता नसती तर माझा हा प्रवास घडला नसता…माझ्या आयुष्यातील यशाच्या व्यासपीठावर ती कधी आली नाही, पण सोबत मात्र कायम होती…तिनं माझ्या हातात तिचा हात दिला तो क्षण माझ्या पुढच्या प्रवासाची नांदी ठरला…त्या क्षणाच्या सुगंधाने माझं आयुष्य दरवळून टाकलं…तो दरवळ भविष्यभर पुरेल…त्या क्षणापासून ती माझ्यासोबत आहे…अगदी प्रत्येक क्षण…माझ्या यशाचे हारतुरे तिच्या गळ्यात नाही पडले कधी, पण ती ते हारतुरे कायम वागवत राहिली…निस्वार्थीपणाने..!” 
रुक्ष, कर्तव्यकठोर, वातट तोंडवळा असलेला केजरीवाल नावाचा माणूस प्रेमाच्या वेलीला बिलगेल असं वाटतंही नाही…पण हो, ते खरंय..! अरविंद केजरीवाल आणि सुनिता यांची प्रेमवेल जन्माला आली…बाळसं धरलं आणि ती वाढली महाराष्ट्रातल्या नागपुरात…मूळ हरियाणाच्या हिस्सार भागातले केजरीवाल अभ्यास-कष्ट-जिद्द-सचोटी-नियोजनाच्या बळावर आयआरएस परीक्षेत यशस्वी झाले…प्रशिक्षणासाठी केजरीवाल येऊन थडकले ते नागपुरात…सुनिताही तिथेच ट्रेनिंगला…केजरीवाल आणि सुनिताची ओळख तिथलीच…प्रशिक्षण, अभ्यास, चर्चा करताना मनांची गुंफण आपसूक झाली…विचार जुळतायत असं कुठंतरी वाटू लागलं…दोघांच्या मनाचा हळवा कोपरा पाझरू लागला…आणि…आणि… 
ऑरेज सिटी नागपुरातील ट्रेनिंग सेंटरच्या गार्डनमध्ये झाडा-झुडुपांच्या, फुला-पानांच्या, आभाळ-जमीन-वारा-भोवतालाच्या साक्षीनं बोचऱ्या गुलाबी थंडीत प्रपोज सोहळा पार पडला…प्रेमाच्या आणाभाका घेतल्या गेल्या…एकमेकांच्या साथीनं आयुष्य फुलवायचं ठरलं… दोघांच्या घरच्यांनी विरोध केला नाहीच… 
दोघांचं शुभमंगल झालं…आज एक मुलगी…एक मुलगा असा छोटा सुखी परिवार आनंदाने नांदतोय…देशभरात चर्चेचा विषय ठरलेला दिल्लीतला ‘ऑड इव्हन फॉर्म्युला’ किती फायद्याचा किती तोट्याचा माहित नाही, पण खुद्द केजरीवालांनी वैयक्तिक आयुष्यात साधलेला ‘गॉड गिव्हन फॉर्म्युला’ मात्र त्यांच्या आयुष्याची वाहतूक सुरळीत करून गेला… 
पुढे दोघांनी आयआरएसमध्ये सेवा केली…नंतर केजरीवालांनी सामाजिक, राजकीय ओढीनं नोकरीला रामराम ठोकला…सुनिता अजून नोकरी करतायत… 
नागपुरात अरविंद केजरीवाल नावाच्या वृक्षाला बिलगलेली ही सुनिता नावाची वेल बहरत गेली…वृक्षाला यशाचं सौंदर्य बहाल करत…
=======================================
प्रेमाच्या गुलाबाला महागाईचे काटे; दुष्काळाचा प्रभाव प्रेमविरांवरही; बाजारात शुकशुकाट 

२० फुलांची जुडी ६०वरून १०० रुपयांवर; शनिवारी दर २०० रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’चे प्रत्येकालाच अप्रूप असते. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला एखादी चांगली भेटवस्तू द्यावी, याची तयारी अनेक दिवस आधीपासून सुरू होते. पण अचानक प्रेम व्यक्त करण्याचा प्रसंग ओढवतो, तेव्हा गुलाबपुष्पासारखी भेट दुसरी कुठलीच नाही. त्यामुळेच हा दिवस जवळ येताच फुलांच्या राजाचा भाव अधिकाधिक वाढू लागतो. यंदाही तोच कल दिसू लागला असून गेल्या काही दिवसांत २० गुलाबपुष्पांची एक जुडी ६० रुपयांवरून १०० रुपयांवर पोहोचली आहे. तर शनिवापर्यंत हेच दर २०० रुपयांवर पोहोचतील, असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे. दुसरीकडे, चिनी गुलाबांच्या किमतीतही जुडीमागे तब्बल ५० रुपयांची वाढ झाली आहे. गुलाबाच्या फुलाकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे ‘व्हॅलेंटाइन डे’च्या काळात या फुलांची मागणी गगनाला भिडलेली असते. त्यामुळेच सर्वसाधारणपणे ६० रुपयांना मिळणारी गुलाबाची जुडी सध्या १०० रुपयांवर पोहोचली आहे. हे दर ‘व्हॅलेंटाइन डे’ला २०० रुपयांवर पोहोचतील, असा दावा ठाण्यातील फुलबाजारातील विक्रेत्यांनी केला. सध्या गुलाबांमध्ये टॉप सिक्रेट गुलाब, बोर्डी गुलाब, टाटा गुलाब अशा फुलांच्या जाती बाजारात उपलब्ध असतात. या फुलांना ग्राहकांची जास्त मागणी असल्याने चार ते पाच रुपये किमतीच्या एका गुलाबाची किंमत व्हॅलेंटाईनच्या दिवशी तब्बल १५ ते २० रुपयांपर्यंत वाढणार आहे. बटर गुलाबाची बारा फुले असलेली जुडी सध्या ३० रुपयांना विकली जाते. मात्र १४ फेब्रुवारीला हे दर दुप्पट होण्याची शक्यता आहे. बंगळुरू, सातारा, सोलापूर, बारामती, जुन्नर, पुणे या ठिकाणाहून गुलाबाची फुले कल्याणच्या बाजारात येत असतात. दररोज फुलबाजारात दोन हजार जुडय़ांची आवक होत असते. मात्र, येत्या शनिवारी पाच हजार जुडय़ांची आवक होईल, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली. ‘व्हॅलेंटाईन डे’ला लाल, पिवळा, सफेद, गुलाबी रंगात असणाऱ्या चायना गुलाबाच्या फुलांना ग्राहकांची जास्त पसंती असते. दरवर्षी दीडशे रुपयांपर्यंत मिळणार २० चिनी गुलाबांचा गुच्छ आता दोनशे रुपयांत मिळत आहे. सर्वसाधारणपणे चार रुपयाला एक अशा दरात मिळणारा चिनी गुलाब सध्या दहा रुपयांना विकला जात आहे.

=======================================
गुरुत्वीय लहरींचे कोडे उलगडणारा ‘धुरंधर’ 

गुरुत्वतरंगांचे अस्तित्व शोधून काढल्याची ऐतिहासिक घोषणा नुकतीच अमेरिकेच्या लायगो प्रकल्पाअंतर्गत करण्यात आली. त्यात भारताच्या ‘इंडिगो टीम’चाही मोठा सहभाग होता. या चमूचे नेतृत्व आयुकाचे वैज्ञानिक डॉ. सुकांत बोस यांनी केले. पण त्याआधी गुरुत्वतरंगांचे मापन करण्याच्या पद्धतींबाबतचे पायाभूत संशोधन याच संस्थेतील वरिष्ठ वैज्ञानिक व मानद प्राध्यापक डॉ. संजीव धुरंधर यांनी केले होते. ‘लायगो’ प्रकल्पात ज्या भारतीय संशोधकांनी लक्षणीय कामगिरी बजावली, त्यात त्यांच्या विद्यार्थिनी डॉ. अर्चना पई यांचाही समावेश होता. 
=======================================
सुरक्षिततेसाठी शहांकडून ऋषभदेव मूर्तीचे हवाईमार्गे दर्शन 

सुरक्षिततेच्या कारणास्तव बागलाण तालुक्यातील श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथील डोंगरात साकारलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना हवाई मार्गाचा आधार घ्यावा लागला. या मूर्तीकडे जाणारा घाटमार्ग विहित निकषाप्रमाणे नसल्याने आणि उपरोक्त ठिकाणी जाण्यास विशिष्ठ क्षमतेच्या वाहनांचाच वापर करावा लागत असल्याने त्यांना त्या ठिकाणी जाऊ देण्यास सुरक्षा यंत्रणेने नकार दिला. वाहनाने जाऊनही मूर्तीजवळ पोहोचण्यासाठी १५० पायऱ्या पार करणे क्रमप्राप्त ठरते. पोलीस यंत्रणेने ऐनवेळी त्यासाठी तयारी दर्शविल्याचे सांगितले जाते. परंतु, सावधगिरी म्हणून शहा यांनी या भव्य मूर्तीचे हेलिकॉप्टरमधून दर्शन घेणे पसंत केले. मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथील उंच डोंगराच्या मध्यावर भगवान ऋषभदेव यांची भव्य पूर्णाकृती मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व मस्ताभिषेक सोहळा सध्या सुरू असून शनिवारी त्यासाठी भाजप अध्यक्षांनी हजेरी लावली. सुमारे दीड दशकांच्या प्रयत्नातून साकारलेली ही अखंड पाषाणात असणारी एकमेव मूर्ती असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे. ‘अहिंसेचे प्रतिक’ मानल्या जाणाऱ्या या मूर्तीचे शहा यांनी प्रत्यक्ष दर्शन करावे असा संयोजकांचा प्रयत्न होता. तथापि, या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पायथ्यापासून ज्या घाटमार्गे जावे लागते, तो शहा यांच्या दर्शन सोहळ्यातील मुख्य अडसर ठरला. महोत्सव समितीने या मार्गाची बांधणी केली असून त्याची या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर बांधकाम विभागाने तपासणी केली होती. पायथ्यापासून डोंगराच्या विशिष्ट एका भागापर्यंत जाणारा हा दीड ते दोन किलोमीटरचा मार्ग वाहतुकीच्या दृष्टिने आवश्यक ते निकष पूर्ण करणारा नसल्याचे बांधकाम विभागाने सूचित केले होते. या मार्गावर जाण्यासाठी महोत्सव समितीची अधिक क्षमता असणारी वाहने कार्यरत आहेत. अन्य कोणतेही वाहन या ठिकाणी पोहोचू शकत नाही. वाहनाने जाऊनही मूर्तीजवळ पोहोचण्यासाठी जवळपास १५० पायऱ्यांचा चढ-उतार क्रमप्राप्त ठरतो. ही एकंदर स्थिती लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा शहा यांना मूर्तीकडे नेण्यास तयार नव्हती. शहा यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाल्यावर त्यांची इच्छा असल्यास यंत्रणेने काही निवडक वाहनांना घाटमार्गाने जाऊ देण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले जाते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कार्यक्रमस्थळी आल्यावर शहा यांनी जैन धर्माचे महंत व साध्वी यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्य सोहळ्यात ते सहभागी झाले. हा कार्यक्रम विहित वेळेपेक्षा काहीसा लांबल्याने शहा यांच्या वाहन ताफ्याने थेट हेलिपॅड गाठले. कार्यक्रमास हजेरी लावूनही शहा यांना भव्य मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य झाले नाही. हेलिकॉप्टर आकाशात झेपावल्यावर मांगीतुंगी डोंगराला प्रदक्षिणा घालून ते मार्गस्थ झाले. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने तब्बल २० कोटीचा निधी दिला आहे. अतिशय विलंबाने हा निधी दिला गेल्यामुळे विहित मुदतीत काम करणे अवघड झाले. 
=======================================
रविवारच्या व्हॅलेण्टाइन डेमुळे साताऱ्याच्या शिक्षणविश्वात सुटकेचा नि:श्वास! 
यंदा १४ फेब्रुवारीचा दिवस रविवारी आल्याने, सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अन्यथा, उद्या सर्व शाळांमध्ये ‘हंबरूनि वासर आले चाटती जवा गाय’ या गीताचे बोल घुमवून त्याची छायाचित्रे शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठविण्याची आफत त्यांच्यावर ओढवणार होती. यंदाचा व्हॅलेण्टाइन डे रविवारी, सुट्टीच्या दिवशी आल्याने या दिवशी मातृप्रेमाची महती सांगणारे कार्यक्रम साजरे करण्याचा प्रसंग यंदा टळला आहे. दर वर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेण्टाइन डे’ म्हणून साजरा केला जातो. अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये या दिवसाचा उत्स्फूर्त आविष्कार पाहावयास मिळू लागल्यापासून या दिवसाला राजकीय आणि सांस्कृतिक विरोधही सुरू झाला होता. याच विरोधामुळे गेल्या काही वर्षांपासून या दिवशी सांस्कृतिक संघर्षांची चिन्हे व काही ठिकाणी तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने तर ‘व्हॅलेण्टाइन डे’च्या विरोधात थेट भूमिका घेतल्याने हा तिढा कसा सोडवावा अशी चिंता शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत होती. राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या वर्षी प्रथमच, शाळांमध्ये व्हॅलेण्टाइन डेच्या उत्साहावर उतारा कसा शोधायचा या विचाराने शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. 
=======================================
अस्तित्वातील यंत्रणांना आव्हान देण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन -जावडेकर 
अस्तित्वात असलेल्या यंत्रणांना आव्हान देण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन आहे. याच संशोधनावर अवलंबून असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी अर्थव्यवस्था ही एक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, हवामानबदल आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. नागपुरातील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (व्हीएनआयटी) सुरू झालेल्या ‘संशोधन: पुनरुत्थानासाठी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘शिक्षणातील संशोधन आणि नवोन्मेष’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य व सत्यवान मेश्राम होते. नाविन्यता आणि कल्पकतेवर आधारित समाजच प्रगत देश घडवू शकतो. चौकसबुद्धी हा संशोधनवृत्तीचा गाभा आहे. त्यामुळे आपली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांची चौकसबुद्धी नष्ट तर करत नाही ना, याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. संशोधकांमध्ये प्रचलित व्यवस्थेला आव्हान देणारी एक बंडखोरी आणि संशोधनाची तीव्र ओढ असण्याची गरज असते. यावेळी त्यांनी अंदमान येथे पक्ष्यांवर संशोधन करण्यासाठी गेलेल्या कोल्हापुरातील एका मुलीची कथा सांगितली. परिस्थिती अनुकुल नसतानाही या संशोधक मुलीने तब्बल १२ तास एकाच पक्ष्यावर लक्ष केंद्रित केले. ही चिकाटी आणि जिद्द संशोधकांमध्ये हवी. अम्युर फाल्कन या मंगोलियातील पक्ष्याचे उदाहरणही त्यांनी दिले. १६० ग्रॅम वजनाचा हा पक्षी सुमारे १६० तास सतत उड्डाण करून स्थलांतर करतो आणि पिलांना जन्म घालतो. प्रस्थापित ज्ञानव्यवस्थेत महत्त्वाची भर घालणारेच खरे संशोधन समजले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने संशोधनक्षेत्राचीही गती वाढवली असून गेल्या एक हजार वर्षांंपेक्षा, गेल्या शंभर वर्षांत अधिक वेगाने संशोधन झाले, असे जावडेकर म्हणाले.
=======================================
गोवा- अत्यंत टोकावरचे नेत्रावळी गाव- ‘आदर्श ग्राम’चा विध्वंस! 

  • गोव्यातील अत्यंत टोकावरच्या नेत्रावळी गावात राबवण्याचे निश्चित केलेल्या आदर्श ग्राम योजनेचा बट्ट्याबोळ कसा उडविण्यात आला त्याची ही गावकऱ्यांच्यादृष्टीने करूण; परंतु गोव्याच्या दृष्टिकोनातून संतापजनक अशी गोष्ट आहे. सरकारात अनास्था, बेफिकीरी आणि निर्विकारपणा असेल तर चांगल्या योजनेचा पार धुव्वा कसा उडविला जातो, याचाच हा धडा!
    अर्थसंकल्पात सरकारने १० कोटींची तरतूद केली. पर्रीकर १० वेळा गावात जाऊन आले. पर्रीकरांच्या पुत्राने गावात जमीन खरेदी करून शेती, दुग्धव्यवसायाला सुरुवातही केली; परंतु गावाला या योजनेचा ओलावाही स्पर्श झाला नाही. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या गावात, ही योजना कुठवर पोहोचली हे पहायला एकदाही पाऊल टाकलेले नाही! नेत्रावळीने गोवा डेअरीविरुद्धचा राग ‘सुमुल’ला पाठिंबा देऊन काढला असला तरी त्यांचा खरा राग राज्य सरकारविरोधात आहे. शेतकरी आणि आदिवासींचे वास्तव्य असलेल्या शेवटच्या टोकावरील या खेड्यात सततच्या अवहेलनेमुळे ज्वाालामुखीचा उद्रेक होण्याचाच अवकाश आहे. आपले खेडेपण अभिमानाने सांभाळणारे आणि शहरीकरणाचा तडाखा रोखूनही त्यात वैभव शोधणारे असे येथील लोक. त्यांच्यात आज फसविल्याची भावना निर्माण झाली आहे. वास्तविक भाजपाला संपूण पाठिंबा देणारा हा गाव. हिंदू बहुसंख्य; परंतु भाजपाच्या पाठी राहूनही दुर्लक्ष आणि अवहेलना केल्याची भावना प्रत्येकाच्या मुखावर आहे.आदर्श ग्राम योजनेत भाजपाने या गावाची निवड केली होती. भाजपाच्या जाहीरनाम्यात तसा उल्लेख करण्यात आला. एवढेच नव्हे तर भाजपाच्या सच्चाईची ओळख पटवण्यासाठी त्या पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मनोहर पर्रीकर यांच्या महत्त्वाकांक्षी जनसंपर्क यात्रेत हा एक महत्त्वाचा टप्पा ठेवला गेला. पर्रीकरांनी त्या गावात सरपंचाच्या घरी मुक्कामही केला व लोकांना शब्द दिला, तुमचा गाव आम्ही आदर्श बनवून देणार. त्यानंतर आपल्या अर्थसंकल्पात पर्रीकरांनी तशी घोषणा केली.
=======================================
आनंद शर्मांची 'अभाविप' विरोधात तक्रार 
 जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी आलेले कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांना मारहाण झाल्याबद्दल त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विरोधात तक्रार दाखल केली आहे.
आनंद शर्मा यांना शनिवारी रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रोषाला सामोरे जावे लागले. या वेळी ‘अभाविप‘ कार्यकर्त्यांनी केलेल्या हाणामारीमध्ये शर्मा यांच्या कानास दुखापत झाली. या घटनेचा कॉंग्रेसने निषेध केला असून, पंतप्रधान मोदींनी यावर उत्तर द्यावे, अशी आग्रही मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. 
या प्रकरणी आज (रविवार) सकाळी आनंद शर्मा यांनी वसंतकुंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याठिकाणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एवढा गोंधळ घातला की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दुसऱ्या वाहनाने विद्यापीठाबाहेर पडावे लागले. 
=======================================
सातारा; उंब्रजजवळ अपघातात तिघांचा मृत्यू
सातारा - मुंबई-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताराजवळील उंब्रज येथे आज (रविवार) सकाळी खासगी ट्रॅव्हल्स बसची उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, 5 जण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी खासगी बसने कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. बसने उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने एका बाजूने बसचे पूर्णपणे नुकसान झाले. यात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल. तर, पाच जण गंभीर जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
=======================================
प्रशांत किशोर आता पंजाबमध्ये काँग्रेससोबत


नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सल्लागार असलेले प्रशांत किशोर आता पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत काम करणार आहेत. 
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरोधात रणनीती रचणाऱ्या प्रशांत किशोर यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सल्लागारपदी नियुक्त केले आले. निवडणूक काळात जदयू, राजद आणि कॉंग्रेस महागठबंधनसाठी केलेल्या कार्याचा पुरस्कार म्हणूनच हे पद देण्यात आले होते. आता त्यांनी पंजाबमध्ये 2017 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. 
पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले, की अखिल भारतीय काँग्रेस समितीने प्रशांत किशोर यांची मदत घेण्यास परवानगी दिली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेबाहेर असल्याने पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

=======================================
452 संसाराची घडी बसविणारा "देवमाणूस' 

नागपूर - दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होतात. विशेष करून एका व्यक्‍तीच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंबाची होरपळ होते. दारुड्या पतीमुळे अनेकींना माहेरच वाट धरावी लागते. समाजातील हे सत्य लक्षात घेऊन दारूच्या व्यसनामुळे 452 जणांची विस्कटलेली संसाराची घडी पुन्हा घालून देणारा पूर्णचंद्र झिटूजी मेश्राम हा अवलिया आज समाजासमोर आदर्श ठरला आहे. आज वयाच्या पासष्टीतही ते समाजसेवेत अग्रेसर आहेत. अनेकांचे ते प्रेरणास्रोत आहेत. 
आकाशनगर मानेवाडा चौक येथे राहणारे पूर्णचंद्र मेश्राम 1970 मध्ये शासकीय सेवेत रुजू झालेत. 40 वर्षे शासकीय सेवेत असताना त्यांना अनेकांचे संसार दारूने नेस्तनाबूद होताना दिसले. त्यामुळे त्यांनी नोकरीसह समाजसेवेचेही व्रत स्वीकारले. दारूचे व्यसन असलेल्या अनेकांची त्यांनी भेट घेतली. दारू पिण्याची कारणे आणि स्थितीबाबत सखोल अभ्यास केला. त्यांनी दारू सोडविण्यासाठी दारुड्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. कोणत्याही दैवी शक्‍तीवर विश्‍वास न ठेवता त्यांनी दारुड्यांना व्यायाम, प्रवचन आणि काही वनौषधीच्या माध्यमातून दारू सोडविण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी 452 जणांचे मन वळवून सन्मार्गाला लावले. आज त्या सर्वांचे संसार सुरळीत सुरू आहेत. अनेकींनी पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून माहेर गाठले होते. मात्र, त्या दारुड्यांची दारू सोडवून त्यांच्या पत्नी आणि माहेरच्यांशी संपर्क साधून त्यांच्या संसाराची घडी पुन्हा बसवून देण्याचे पुण्याचे काम पूर्णचंद्र यांच्या हातून घडले. या कार्यात त्यांची पत्नी मनोरमा यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. 
=======================================
नागपूर; प्रेमासाठी खाल्ली तुरुंगाची हवा 

नागपूर - प्रेम आंधळे असते. प्रेमात जात, वय, भाषा, श्रीमंती, प्रतिष्ठा काहीच बघितले जात नाही. वयाच्या 17 व्या वर्षी संजय आणि प्रतिभा एकमेकांच्या प्रेमात पडले. एमआयडीसी परिसरात तेव्हा फार मोजकी घरे होती. संजयच्या घरासमोर सवर्ण जातीच्या प्रतिभा तीन भावंडांसोबत राहत होत्या. या दोघांच्या आईंची छान मैत्री जमली. संजय यांनाही तीन भावंडे होती. कॅरम, क्रिकेट खेळता-खेळता हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. एक दिवस संजय यांनी प्रतिभा यांना "तू माझ्याशी लग्न करतेस का,‘ असा प्रश्‍न विचारला आणि प्रतिभा यांनी आईजवळ सांगितले. त्यावर प्रतिभा यांच्या आईने संजयच्या घरी जाऊन भांडण केले. "मेरे सामनेवाली खिडकी मे एक चांदसा टुकडा रहता है‘ गाणाऱ्या संजय यांना प्रतिभाचा चेहराही मग कित्येक दिवस दिसेनासा झाला. 
संजय यांच्या वडिलांनी संजयला शिक्षणासाठी गोंदियाला नातेवाइकांकडे पाठवले. बी.कॉम. अंतिम वर्षात असतानाच संजय यांना बॅंकेत नोकरी लागली. बौद्ध धम्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे त्यांनी प्रतिभासोबत घरच्यांना न कळवताच लग्न केले. लग्नानंतर दीड वर्ष ते आपापल्या घरीच राहिले. मात्र, प्रतिभा यांच्या आई-वडिलांनी भोपाळ येथील स्थळ प्रतिभा यांच्यासाठी आणताच लग्नाचे बिंग फुटले. एमआयडीसी पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी संजय यांना पोलिस चौकीत नेले. अनेक दिवस वृत्तपत्रांचे रकाने यांच्या प्रेम कहाणीने भरत राहिले. शेवटी लग्नाच्या नोंदणीचा क्रमांक संजयच्या वडिलांनी वृत्तपत्रात छापून आणला आणि 17 फेब्रुवारी रोजी वाढदिवशी प्रतिभा संजयच्या घरी रीतसर नांदायला आल्या. पुढे तीन महिन्यांनंतर प्रतिभा यांच्या घरच्या लोकांचा राग निवळला व मोठे रिसेप्शन नातेवाइकांना देण्यात आले. आज हे जोडपे लग्नाचा रौप्यमहोत्सव साजरा करीत असून, एकुलती एक मुलगी सी.ए. करीत आहे. संजय नागपूर नागरिक बॅंक, धरमपेठ शाखेत प्रबंधक पदावर कार्यरत आहेत. 
=======================================
नागपूर; शैलाचे डोळस, तर प्रतिभाचे आंधळे प्रेम

नागपूर - ऐंशीच्या दशकात एखादी स्त्री डोळस असताना स्वमताने एखाद्या अंध व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेते तेव्हा निश्‍चितच ती एक प्रकारची वैचारिक क्रांतीच गणली जाते. माहेरच्या प्रा. शैला कोल्हे यांना लग्नच करायचे नव्हते. मात्र आईच्या आग्रहाखातर त्यांनी वयाच्या 36 व्या वर्षी लग्न केले; तेही एका अंध व्यक्तीशी. 

अंबाझरी येथील धरमपेठ सायन्स कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवात पोस्ट ग्रॅज्युएट टीचिंग डिपार्टमेंट ऑफ लॉचे (पीजीटीडी) प्रा. शिरीष देशपांडे यांचे "शहाबानो‘ प्रकरणावर व्याख्यान झाले. शैला तेव्हा वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. शिरीष यांचे व्याख्यान ऐकून त्या त्यांच्या बुद्धिमत्तेच्या प्रेमात पडल्या. प्रा. शिरीष यांच्यापेक्षा शैला दीड वर्षाने मोठ्या होत्या हे विशेष! शैला यांच्या मैत्रिणीचा भाऊ प्रा. शिरीष यांच्या मार्गदर्शनात शोधप्रबंध करीत होता. त्याने प्रा. शिरीष यांचा फोन नंबर मिळवून दिला. बर्डी येथील चाळीत राहणाऱ्या विजया नानिवडेकर- ज्यांना शैला वहिनी म्हणत होत्या- त्यांनी या लग्नासाठी पुढाकार घेतला. 
शैला यांच्या सुशिक्षित आईने मात्र फक्त एकच अट घातली, एकदा लग्न केले तर परत यायचे नाही. याचे कारण आईला प्रा. शिरीष यांच्याविषयी जास्त जिव्हाळा वाटत होता. कोणाच्या आयुष्याचा खेळ व्हावा, असे त्यांना वाटत नव्हते. आज शिरीष त्याच संस्थेत विभाग प्रमुख आहेत. शैला यांनी लग्नाचा रौप्यमहोत्सव गेल्या वर्षीच साजरा केला. डोळ्याने नाही, पण मनाने डोळस असणाऱ्या प्रा. शिरीष यांच्या प्रेमात पंचवीस वर्षे कशी सरली कळले नाही, असे प्रा. शैला सांगतात. त्यांचा एकुलता एक मुलगा ऍड. तेजस देशपांडे वकील आहे. प्रेम आयुष्याची साधना असते. आजच्या तरुणाईने प्रेम जरूर करावे; मात्र ते आंधळे नाही तर डोळसपणाने करण्याचा सल्ला अनुभवातून त्या देतात. सुप्रसिद्ध नाट्यलेखक महेश एलकुंचवार यांनीही शैला यांच्या या डोळस आणि धाडसी निर्णयाला तेव्हा नैतिक पाठबळ दिले. 
"टेलिफोन रिंगच एंगेजमेंट रिंग‘ 
शैला यांचे आई-वडील दोघेही आजारी पडल्याने काही काळ लग्नाची पुढील बोलणी खोळंबली. तेव्हा शिरीष यांना वाटले इतर मुलींप्रमाणेच शैला यांचाही एका अंध माणसासोबत संसार करण्याचा विचार बदलला असावा. ते ऑक्‍सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी निघून गेले. मात्र, विजया नानिवडेकर यांनी पुन्हा प्रयत्न करून फोनवरून बोलणी करून दिली, तेव्हा शिरीष यांचे शब्द होते "आर यू ऍब्स्युल्युटली शुअर?‘ आजही "आमची साक्षगंधाची रिंग म्हणजे ती टेलिफोनची रिंग होती‘ असे शिरीष गमतीने सांगतात. 
आठ दिवसांत शिकल्या ब्रेल लिपी 
प्रेमाच्या नात्यात संवाद फार महत्त्वाचा असतो. लग्नाची बोलणी शिरीष ऑक्‍सफर्डला शिकत असताना झाली. मात्र, शैला यांना त्यांना इंग्रजीत पत्रे लिहावी लागत होती. ती पत्रे ऑक्‍सफर्डमध्ये शिरीष यांना कोणी तरी वाचून दाखवीत होते. याकरिता शैला यांनी अंध विद्यालयाचे विरकर काका यांच्याकडून आठ दिवसांत ब्रेल लिपी शिकून घेतली व ब्रेल लिपीतील पहिले पत्र पाठवले, तेव्हा शिरीष यांनाही हे पत्र शैला यांनी स्वत: लिहिले आहे यावर विश्‍वास बसला नाही.
=======================================
सुनंदा पुष्कर मृत्यू; थरुर यांची पुन्हा चौकशी 

कॉंग्रेस नेते शशी थरूर यांची त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी शनिवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून पुन्हा चौकशी करण्यात आली आहे. 

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळेच झाला आणि त्यांच्या पोटात अल्प्रैक्‍स औषधाचा अंश होता, असा निष्कर्ष एम्स वैद्यकीय मंडळाने सर्वसंमतीने काढला आहे. मंडळाने सुनंदा यांच्या व्हिसेरा नमुन्यांवर एफबीआयच्या अहवालावर आपले मत व्यक्त केले आहे. सुनंदा यांच्या शरीरावर एक खास खूण असल्याचे लक्षात घेता मंडळाने इंजेक्‍शनद्वारा विष दिले गेल्याच्या शक्‍यतेचा इन्कार केला नाही. मंडळाने म्हटले आहे, की एफबीआय अहवालानुसार सुनंदा यांच्या शरीरात लिडोकाइन असल्याच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला आहे. आम्ही आमचे मत दिल्ली पोलिसांना कळवले होते. 
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी बनविण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून शनिवारी सुमारे पाच तास थरुर यांची चौकशी करण्यात आली. शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर जानेवारी 2014 मध्ये दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्यांनी शशी थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा आरोप केला होता.
=======================================
भारताला गुंवणुकीचे केंद्र बनवा - मोदी 

भारत ही सुवर्णसंधींची भूमी आहे. आम्हाला लोकशाही, भौगोलिकता आणि मागणी याचे खंबीर आशीर्वाद आहेत. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताला गुंतवणुकीचे केंद्र बनवावे, असे आवाहन करतानाच "मेक इन इंडिया‘ला सर्वांत मोठा ब्रॅंड बनवू, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. 

वरळी येथील एनएसयूआय स्टेडियमवर "मेक इन इंडिया‘ सप्ताहाचे मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी स्विडनचे पंतप्रधान स्टीफन लोव्हेन, पोलंडचे उपपंतप्रधान पिओत्र ग्लिन्स्की, फिनलॅंडचे पंतप्रधान जुहा पॅट्री सिपीला, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या.
भारतभूमी विविध संधींनी नटली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी वाट पाहू नका, असे आवाहन करताना मोदी म्हणाले, ""देशातील सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) कारखाना उत्पादनाचा वाटा 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने "मेक इन इंडिया‘ हा सप्ताह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारत हे जगाचे उत्पादन केंद्र बनावे, यासाठी आम्ही मोठ्या हिरिरीने उपक्रम राबवत आहोत. यासाठी आम्ही सरकारच्या धोरणात्मक पातळीवर सध्या आणि यापुढेही लक्षणीय सकारात्मक बदल करणार आहोत. त्यामुळे भारतात आमच्या विदेशी बांधवांना सहजासहजी गुंतवणूक करण्यास आनंद वाटेल. त्याचाच एक भाग म्हणून विदेशी गुंतवणूकदारांना सर्वोत्तम सुविधा देताना उत्पादन, संशोधन व पायाभूत सुविधा देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे.‘‘ 
=======================================

श्रीगोंदा; विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला अपघात, तीन ठार २२ जखमी

सातारा, दि. १४ - पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी तळबीडजवळ कॉलेजच्या सहलीची बस आणि अन उसाच्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. २२ जण जखमी झाले असून, त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. 
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा इंजिनिअरींग महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांची ही बस होती. सहलीवरुन गोव्याहून परतत असताना हा भीषण अपघात झाला. 
दौंडचा अभिजीत पंडीत पेठकर हा विद्यार्थी, श्रीगोंद्यातील पेडगावचा सुर्यकांत सुदाम कानडे हा शिपाई आणि पिंपरीचे प्रकाश बसवराज बिराजदार क्लिनर या तिघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. जखमींवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
=======================================
कोलंबो : बेपत्तांच्या शोधासाठी घेणार रेडक्रॉसची मदत

श्रीलंकेत सुमारे तीन दशके चाललेल्या यादवीत बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी सरकार रेडक्रॉसची मदत घेणार आहे. श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्रालयाने ही माहिती दिली. श्रीलंकेत तामिळ फुटीरवाद्यांच्या संघर्षामुळे तीन दशके यादवी चालली. या काळात मोठ्या प्रमाणावर लोक बेपत्ता झाले. यादवी संपुष्टात आल्यानंतर २०१३ पासून सरकारकडे २० हजार लोक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्रालयाने आंतराष्ट्रीय रेडक्रॉस समितीच्या प्रतिनिधी मंडळाशी चर्चा केली त्यातच हा निर्णय घेण्यात आला. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सरकारने उचललेल्या अनेक पावलांचा या बैठकीत उल्लेख करण्यात आला. त्यात बेपत्ता असलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी बेपत्ता प्रमाणपत्रे देण्याचाही प्रस्ताव आहे.बेपत्ता प्रमाणपत्रे देण्याच्या प्रस्तावावर संसदेत बोलताना गृहमंत्री वज्र अबेवर्धन म्हणाले की, या प्रमाणपत्रांमुळे बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रमाणपत्र दिले तरीही तपास चालूच राहील.दरम्यान, २०१३ पासून आतापर्यंत बेपत्ता लोकांबाबत २० हजार तक्रारी आल्याचे आणि या लोकांचा शोध घेण्याची विनंती करण्यात आल्याचे एका सरकारी पत्रकात म्हटले आहे. 
=======================================
वॉशिंग्टन- वायू प्रदूषणाने दरवर्षी लाखोंचा मृत्यू

वॉशिंग्टन : वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ५५ लाख लोक मरतात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त बळी वेगाने आर्थिक विकास करणाऱ्या भारत आणि चीनमधील आहेत, अशी माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे.
सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या भारत आणि चीन या देशातील वायू सर्वात जास्त प्रदूषित आहे. चीनमध्ये कोळसा जाळण्यात आल्याने त्यातून निघणाऱ्या कणामुळे जास्त प्रदूषण होते. या देशात वायू प्रदूषणाने दरवर्षी ३,६०,००० मृत्यू होतात.भारत, चीन, अमेरिका आणि कॅनडा येथील वैज्ञानिकांनी अमेरिकन असोसिएशन फॉर दी अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ सायन्समध्ये (एएएएस) आपले संशोधन सादर केले. त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांमुळे भारतात १४ लाख तर चीनमध्ये १६ लाख लोकांचा मृत्यू झाला.युनिव्हर्सिटी आॅफ ब्रिटीश कोलंबियाचे संशोधक मायकेल ब्राऊर म्हणाले की, जगभरात वायू प्रदूषण हे मृत्यूचे चौथे मोठे कारण आहे. पर्यावरणाकडून निर्माण झालेला धोका हे आजारपणासाठी कारणीभूत आहेत. केवळ उच्च रक्तदाब, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी आणि धूम्रपान यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मात्र वायू प्रदूषणाच्या तुलनेत जास्त आहे. पत्रकार परिषदेत नवीन संशोधनाची माहिती देताना ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या ‘सुरक्षित स्तरा’पेक्षा जगात घनदाट ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या भागात जास्त वायू प्रदूषण आहे.
=======================================
=======================================
=======================================
=======================================

No comments: