Thursday, 4 February 2016

नमस्कार लाईव्ह ०४-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- मोगादिशु; उडत्या विमानातून खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू 
२- देवनार कचरा डेपोतील आग आणि धुराचे लोट 'नासा'ने टिपले 
३- हाफीझ सईदची पुन्हा धमकी, पठाणकोट हल्लेखोरांचे कौतुक 
४- नासाचे शक्तीशाली रॉकेट २०१८ मध्ये आंतराळात घेऊन जाणार १३ सॅटेलाइट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- महिलांसोबत आता पुरुषांनाही शनी चौथर्‍यावर बंदी, ग्रामस्थांनी मांडला ठराव 
६- रेल्वे अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला आणि केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला सादर होणार 
७- बंगळुरुत परदेशी विद्यार्थिनीला कपडे फाडून मारहाण 
८- टंझानियन विद्यार्थिनी मारहाण प्रकरण, बंगळुरु पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक  
९- निष्पाप युगची हत्या करणा-या राजेश आणि अरविंदला फाशीची शिक्षा 
१०- भुवनेश्वरमध्ये ६० दलित विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढले 
११- समीर भुजबळांच्या अटकेनंतर अजित पवार, तटकरे खडसेंच्या भेटीला 
१२- मुंबईत स्वस्तात भूखंड मिळवल्या प्रकरणी हेमा मालिनी यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- भुजबळांनंतर राष्ट्रवादी खासदार संजय काकडे ईडीच्या रडारवर 
१४- भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ?, चौकशीसाठी ईडीचं पथक नाशकात 
१५- शिक्कामोर्तब, महापौर बंगल्यातच बाळासाहेबांचं स्मारक 
१६- वर्षभरातच होऊ शकतो एक्स्प्रेसवेवरचा टोल माफ 
१७- मुंबई; व्यापाऱ्याची भररस्त्यात हत्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद 
१८- विरारमध्ये बंदुकीच्या धाकावर भर रस्त्यात महिलेचं अपहरण 
१९- डोंबिवली; धनश्री गोडवे मृत्यूप्रकरण;  तिचे लटकून प्रवास करणे नेहमीचेच!  रेल्वे सुरक्षा दलाचा दावा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- घाटकोपर; रिक्षात सोनं सापडलं, दोन महिने प्रवाशाचा शोध घेऊन परत केलं 
२१- मुरुड दुर्घटना : आबेदा कॉलेजात पालकांवर संस्थाचालकांची अरेरावी 
२२- बीड : गहाण शेतीची मागणी, सावकाराची महिलांना अमानुष मारहाण 
२३- मॉडेलवर बलात्काराचा प्रयत्न, सिनेनिर्मात्या विरोधात गुन्हा दाखल 
२४- बेळगाव; अंगात शाळेचा गणवेश; हातात नशेचं साहित्य 
२५- जळगाव; यावल पालिका मुख्याधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- हॅप्पी बर्थडे फेसबुक, 12 व्या वर्धापन दिनानिमित्त FB कडून खास गिफ्ट 
२७- विद्या बालन म्हणते.. ‘बॉलीवूडमध्ये असुरक्षित वाटते! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२८- नेरली येथे कुष्ठरोग निवारण मोहीम पंधरवाड्याचे उद्घाटन 
२९- राष्ट्रीय लोकन्यायालयाचे १३ फेब्रुवारी रोजी आयोजन 
३०- लॉयन्स क्लबतर्फे आयोजित मधुमेह शिबिरात ९९४८ रुग्णांची तपासणी 
३१- खडकमांजरी; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शोषखड्डे उपयुक्त - अभिमन्यू काळे 
३२- सगरोळी परिसरात रसायन मिश्रित ताडीची विक्री 
३३- मरडगा गावाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक, ३६२ शोषखड्डे कडून गाव केले डासमुक्त 
३४- बिलोली; २० स्वस्त धान्य दुकानाचे निलंबन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
दीपक वाघमारे, राजरत्न सूर्यवंशी, रवींद्र वाघमारे, आदित्य सिंघ, नितीन मामडी, गंगाधर कांबळे, राजकुमार केकटे, हनमंत खानापुरे, माधुरी 

खिल्लारे, पावन गिरी, साहेब कांबळे, दिनेश कवडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं
(भगवान शिरसे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट 
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
http://goo.gl/uS8DX4

========================================================================


बंगळुरुत परदेशी विद्यार्थिनीला कपडे फाडून मारहाण

बंगळुरु : बंगळुरुमध्ये टांझानियाच्या विद्यार्थिनीला विवस्त्र करुन मारहाण केल्या प्रकरणाचे गंभीर पडसाद उमटत आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणावर कर्नाटक सरकारकडून अहवाल मागवला आहे. पोलिसांनी 5 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
बंगळुरुच्या ‘आफ आफ्रिकन स्टुडंट्स युनियन’ च्या माहितीनुसार बंगळुरुत शिक्षणासाठी आलेल्या सुदानच्या एका विद्यार्थ्याकडून रविवारी अपघात झाला. अपघातात एका महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या जमावाने संबंधित विद्यार्थ्याला मारहाण करत त्याच्या गाडीला आग लावली. याच वेळी 21 वर्षीय पीडित विद्यार्थिनी या परिसरात आपल्या तीन मित्रांसोबत गाडीतून जात होती.
त्यावेळी उपस्थित जमावाने चोरी केल्याचा आळ घेत या घटनेशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या टांझानियाच्या विद्यार्थिनीला जबर मारहाण केली. त्यानंतर तिला विवस्त्र करुन मारहाण केल्याचंही वृत्त आहे.
पीडिता ही बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंटची विद्यार्थिनी आहे. पोलिसांकडे मदत मागूनही कुठलीही कारवाई न झाल्याचा दावा तिने केला आहे.
या घटनेनंतर टांझानियाच्या उच्चायुक्तांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे तक्रार नोंदवत कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दखल घेतली असून प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
==========================================================

भुजबळांनंतर राष्ट्रवादी खासदार संजय काकडे ईडीच्या रडारवर

मुंबई : छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता अंमलबजावणी संचलनालयाच्या रडारवर आहे.
ईडीने राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांची चौकशी करून जबाब नोंदवला आहे. संजय काकडे यांच्या ‘काकडे इन्फ्रास्टक्चर’ या कंपनीने भुजबळांच्या फर्ममध्ये 10 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ईडीने त्यांची चौकशी केली.
काय आहे प्रकरण?
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळी बांद्रा पूर्वमधल्या 100 एकर भूखंडाच्या पुनर्विकासाचं काम (PWD गव्हर्न्मेंट कॉलनी) डी बी रिअल्टी, काकडे इन्फ्रास्टक्चर आणि आक्रिती या कंपन्यांना दिलं होतं. सुमारे 10,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प होता.
यावेळी डी बी रिअल्टीने 5 कोटी, द बलवा ग्रुप ऑफ कंपनीने 20 कोटी आणि आक्रितीकडून 10 कोटी भुजबळांच्या आर्मस्ट्राँग एनर्जी आणि परवेश कन्स्ट्रक्शनमध्ये गुंतवले. या दोन्ही कंपन्यांवर भुजबळांचं नियंत्रण आहे. तर संजय काकडे हे भुजबळांच्या अत्यंत जवळचे समजले जातात.
याआधीही काकडे यांना पालिकेनं नोटीस बजावली होती. मात्र त्यावेळी खासदार संजय काकडे अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे आता ईडीनं काकडे यांना हजेरी लावण्याचे आदेश दिले आहे.
या तीनही कंपन्यांनी पुनर्विकासाचं काम आपल्याला मिळावं, यासाठी भुजबळांना पैसे दिल्याचा आरोप आहे. त्यामुळेच संजय काकडेंची चौकशी होत असल्याचं, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

==========================================================

रिक्षात सोनं सापडलं, दोन महिने प्रवाशाचा शोध घेऊन परत केलं!

मुंबई : कुणी विसरलेलं किंवा कुणाचा सापडलेला ऐवज परत करण्याची मानसिकता फार कमी बघायला मिळते. मात्र घाटकोपरच्या एका रिक्षाचालकाला सापडलेलं तब्बल लाखभर रुपयाचं सोनं त्यानं प्रवशाला परत केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सापडलेलं सोनं परत करण्यासाठी रिक्षाचालकाने संबंधित प्रवाशाचा तब्बल दोन महिने शोध घेतला.
अरुण शिंदे असं या रिक्षाचालकाचं नाव आहे. अरुण यांनी दोन महिने शोध घेऊन हिरावती खत्री यांचा शोध घेऊन, सोने परत केलं.
मुंबईत एखाद्या प्रवाशाचा शोध घेणं सोपी गोष्ट नाही.पण शिंदेंनी हिरावतींचा शोध घेतला आणि विना मोबदला सोन साखळी परत केली.
काय आहे प्रकरण?
हिरामती खत्री दोन महिन्यापूर्वी पतीसोबत डोंबिवलीला जात होत्या. त्यावेळी घाटकोपर रेल्वे स्थानकावर जाण्याकरिता त्या अरुण शिंदेंच्या रिक्षात बसल्या. रिक्षा चालकानं त्यांना स्थानकवर सोडलं आणि निघून गेला. मात्र स्टेशनवर पोहचल्यावर त्यांना आपल्या गळ्यातील सोनसाखळी नसल्याचं लक्षात आलं. त्यांनी सगळीकडे शोध घेतला. पोलिसातही तक्रार केली. दोन महिने सोनं न सापडल्यानं सोनं परत मिळण्याची अपेक्षा सोडून दिली. मात्र दोन महिन्याननंतर अरुण शिंदे हा रिक्षाचालक हिरामती खत्रींचा शोध काढत त्यांना भेटला आणि त्यांची चार तोळ्याची सोनसाखळी परत केली.
ज्यावेळी हिरामती रिक्षात बसल्या त्यावेळी त्यांच्या गळ्यातील साखळी रिक्षात पडली होती. दुसऱ्या एका प्रवाशाला ही सोनसाखली रिक्षातच मिळाली. त्यांनी ती रिक्षाचालकास दिली. आणि रिक्षाचालकनं त्या वस्तूच्या मालकाचा शोध सुरु केला.
वेळ मिळेल तसा ज्या ठिकाणाहून त्यांनी हिरामतींना रिक्षात घेतलं होतं त्या कामा लेनमध्ये चकरा सुरु केल्या. दोन महिन्यांनी अचानक हिरामती भेटल्या आणि शिंदेंनी त्यांच्या सोनं सुपूर्द केलं.
खरं तर हिरावती यांनी सोनसाखळी मिळण्याची आशा सोडून दिली होती. सोनं सापडल्यानंतर इतरांनी कदाचित दोन महिन्यांचा संयम पाळला नसता. पण अरुण शिंदेंनी रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणाचा नवा आदर्श उभा केला आहे.
==========================================================

मोगादिशु; उडत्या विमानातून खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू

उडत्या विमानातून खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू
मोगादिशू : सोमालियामध्ये एका प्रवासी विमानाने आकाशात उड्डाण केल्यानंतर एक प्रवासी विमानातून खाली कोसळून मृत्युमुखी पडला आहे. सोमालियाची राजधानी मोगादिशूहून जिबुदीच्या दिशेने जाताना हा अपघात घडल्याची माहिती आहे. 
विमान आकाशात असताना एक स्फोट झाला. त्यामुळे विमानाला भगदाड पडलं आणि प्रवासी खाली पडला. सोमालियाच्या पोलिसांनी त्याचा मृतदेह शोधून काढला आहे. 
विमानतळ अधिकाऱ्यांनी मात्र विमानात अचानक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग केल्याचं सांगितलं असून एक प्रवासी बेपत्ता असल्याचा दावा केला आहे. विमानात 74 प्रवासी होते. 
somalia_aeroplane_hole 2
प्रवाशांनी विमानात स्फोट झाल्याची तक्रार केली आहे. विमान खाली उतरवल्यानंतर प्रवाशांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यात विमानाला मोठं भगदाड पडल्याचं दिसत आहे.
==========================================================

मुरुड दुर्घटना : आबेदा कॉलेजात पालकांवर संस्थाचालकांची अरेरावी

मुरुड दुर्घटना : आबेदा कॉलेजात पालकांवर संस्थाचालकांची अरेरावी
पुणे : मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर 14 विद्यार्थी बुडून मृत्युमुखी पडल्यानंतर घटनेचा जाब विचारण्यासाठी पालकांनी कॉलेजमध्ये धाव घेतली. त्यानंतर आबेदा इनामदार महाविद्यालयात पालक आणि संस्थाचालकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. यावेळी संस्थाचालक पालकांशी अरेरावीची भाषा करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी गेलेल्या 14 विद्यार्थ्यांचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी पालक महाविद्यालयात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार आणि पालकांमध्ये वाद झाला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीनं पालकांना कॉलेज बाहेर काढण्यात आलं.
आवाज खाली करुन बोला, असं संस्थाचालकांनी दटावलं. काही पालकांनी आम्हाला वाद घालायचा नसून विनम्रतेने बोला, असंही सांगितलं. मात्र शब्दाने शब्द वाढत गेला आणि आक्रमक पालक आणि संस्थाचालकांमध्ये खटके उडाले.
दरम्यान वेगवेगळ्या प्रकारची प्राथमिक माहिती येत असल्यामुळे चौकशी करुनच जबाबदार व्यक्तींवर कारवाईचं आश्वासन संस्थाचालकांनी दिलं.
==========================================================

समीर भुजबळांच्या अटकेनंतर अजित पवार, तटकरे खडसेंच्या भेटीला

समीर भुजबळांच्या अटकेनंतर अजित पवार, तटकरे खडसेंच्या भेटीला
मुंबई : एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळीकतेबाबत चर्चा होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची भेट घेतली. भुजबळ कुटुंबीय अडचणीत असताना भाजप-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या भेटीमुळे भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
खडसेंच्या रामटेक या निवासस्थानी जाऊन अजित पवार आणि तटकरेंनी ही भेट घेतली. तब्बल अर्धा तास नेत्यांमध्ये ही चर्चा झाली. सरकारने ज्या दूधसंघांची थकबाकी होती त्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे महानंदा दूध सहकारी संस्थेसंदर्भात भेट घेतल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मतदारसंघातील कामांसाठी ही भेट घेतल्याचं यावेळी सुनील तटकरेंनी सांगितलं. मात्र समीर भुजबळ यांच्यावर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सिंचन घोटाळ्याचे आरोप असलेल्या अजित पवार आणि सुनील तटकरेंनी खडसेंची भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
==========================================================

हॅप्पी बर्थडे फेसबुक, 12 व्या वर्धापन दिनानिमित्त FB कडून खास गिफ्ट

हॅप्पी बर्थडे फेसबुक, 12 व्या वर्धापन दिनानिमित्त FB कडून खास गिफ्ट
कॅलिफोर्निया: जगभरातल्या मित्रांना जोडणारं फेसबुक आज 12 वर्षांचं झालं आहे. अवघ्या 19व्या वर्षी मार्क झुकेरबर्ग या तरूणानं 4 फेब्रुवारी 2004 रोजी आपल्या चार मित्रांसोबत फेसबुकची सुरूवात केली आणि काही काळातच फेसबुकनं गगनभरारी घेतली. 
आज जगभरात 1.5 अरब लोक फेसबुक वापरतात. त्यामुळे आजचा दिवस हा फ्रेंड्स डे म्हणून साजरा करावा असं आवाहन फेसबुकचे निर्माते मार्क झुकेरबर्ग यांनी केलं आहे. फेसबुक माहित नाही, असा माणूस आज शोधून सापडणार नाही. आज जगात सगळीकडे लोकप्रिय असणार्‍या संकेतस्थळात फेसबुक वरच्या स्थानावर आहे. 
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्गनं 4 फ्रेबुवारी हा दिवस फ्रेंड्स डे म्हणून साजरा करावा असं आवाहन केलं होतं.
फेसबुकची यूजर्ससाठी खास भेट… Happy Friends Day!
12व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत फेसबुकनं आपल्या यूजर्ससाठी एक खास भेट आणली आहे. Happy Friends Day! या नावानं तुम्हाला तुमच्या आजवरच्या खास फोटोंचा एक व्हिडिओ दिसेल. या व्हिडिओमध्ये तुमचे आणि तुमच्या मित्रांचे खास क्षण तुम्हांला पाहायला मिळणार आहेत. फेसबुकवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच याबाबत नोटिफिकेशन दिसून येईल. त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करु शकता. अथवा एडिट करुन त्यात काही बदलही करु शकता.

fd

फेसबुक आपल्या यूजर्सना कायमच काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत असतं. आज फेसबुकच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात आलेलं Happy Friends Day!चा व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. आपले खास क्षण जे कॅमेऱ्यात कैद झाले होते ते या व्हिडिओच्या माध्यामातून पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
==========================================================

मुंबई; व्यापाऱ्याची भररस्त्यात हत्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

व्यापाऱ्याची भररस्त्यात हत्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
मुंबई: मुंबईच्या अंधेरी परिसरात एका व्यापाऱ्याची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. रामु धोत्रे असं या व्यापाऱ्याचं नाव असून धोत्रे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यापार आहे. गिलबर्ट रोड परिसरात झालेल्या या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अज्ञात व्यक्तीने धोत्रेंवर शस्त्राने हल्ला केल्यानंतर धोत्रे यांचा भाऊ त्यांना वाचवण्यासाठी आला. पण या आरोपीने त्यांच्या भावावरही हल्ला केला. या गोंधळात हत्येसाठी आलेल्या 3 आरोपींपैकी दोघांना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. पोलीस तिसऱ्या आरोपीचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहेत.
हल्लेखोरांनी रामू धोत्रेंवर हल्ला केल्यानंतर त्यांना तात्काळ अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यानच मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून सगळ्या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
==========================================================

बीड : गहाण शेतीची मागणी, सावकाराची महिलांना अमानुष मारहाण

बीड : गहाण शेतीची मागणी, सावकाराची महिलांना अमानुष मारहाण
बीड : कर्जासाठी गहाण ठेवलेली शेती मागण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना सावकारांनी अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातल्या पाचंग्री गावात ही घटना घडली आहे.
सीता मुंडे आणि सावित्रीबाई मुंडे या दोघींना जबर मारहाण करण्यात आली आहे. सीता मुंडे यांनी काही वर्षांपूर्वी गावातील सावकार अर्जुन मुंडे यांचा मुलगा अभिजीत याच्याकडून 35 हजार रुपये कर्ज घेतलं होतं. त्यानंतर सात वर्षात त्यांनी तब्बल तीन लाख रुपयांची परतफेड केली.
मात्र तारण ठेवलेली जमीन परत देण्यास नकार दिल्यानं सीता मुंडे यांनी जिल्हा निबंधक आणि पोलिसात तक्रार दिली. तक्रार केल्यानंच या सावकारानं दोघींना जबर मारहाण केली.
दरम्यान आरोपींना अटक केल्यानंतर जामीनही मिळाला आहे. मात्र पाटोदा पोलिसांनीही सावकारीचं कलम वगळता विनयभंगाचाच गुन्हा दाखल केला आहे.
==========================================================

मॉडेलवर बलात्काराचा प्रयत्न, सिनेनिर्मात्या विरोधात गुन्हा दाखल

मॉडेलवर बलात्काराचा प्रयत्न, सिनेनिर्मात्या विरोधात गुन्हा दाखल
मुंबई: चित्रपटात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार एका मॉडेलनं सांताक्रूज पोलिसात दाखल केली आहे. सुरेश मेहता असं या चित्रपट निर्मात्याचं नाव असल्याचं या मॉडेलचं म्हणणं आहे.
चित्रपटात काम देतो असं सांगत या मॉडेलला सुरेश मेहता यांनी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावलं. त्यानंतर तिला दारू पाजण्याचा प्रयत्न केला आणि नंतर बलात्काराचाही प्रयत्न केला असा आरोप या पीडित मॉडेलनं केला आहे.
ही मॉडेल गेल्या अनेक महिन्यांपासून सिनेनिर्मात्याला ओळखत होती. मात्र, आपल्यासोबत घडल्या प्रकारानंतर तिने सांताक्रूज पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, निर्माता सुरेश मेहता सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
==========================================================

देवनार कचरा डेपोतील आग आणि धुराचे लोट 'नासा'ने टिपले

देवनार कचरा डेपोतील आग आणि धुराचे लोट 'नासा'ने टिपले
मुंबई : देवनार कचरा डेपोत लागलेल्या आगीमुळे मुंबईत सर्वत्र धुराचं साम्राज्य पसरलं होतं. देवनार आणि चेंबूर परिसरात या आगीच्या धुराचा सर्वात जास्त त्रास झाला. या आगीचे दृश्य अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने टिपले असून काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर आगीच्या आणि धुराच्या या भीषणतेची कल्पना येते.
पूर्व उपनगरात असलेला देवनार कचरा डेपो ठाणे खाडीजवळ 326 एकर परिसरात आहे. या ठिकाणी दररोज 3700 मेट्रिक टन कचरा टाकला जातो, जो शहराच्या एकूण कचऱ्याच्या एक तृतीयांश आहे. इथे कचरा टाकून या डम्पिंग ग्राऊंडला डोंगराचं स्वरुप प्राप्त झालं आहे. याची उंची सुमारे 100 फूट झाली आहे.
27 जानेवारी 2016 पासून टेरा, अक्वा आणि सुओमी एनपीपी या सॅटेलाईट्सनी देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील आगीची दृश्य कैद केली. ही आग सलग चार दिवस कायम होती. त्यामुळे शहरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. या धुरामुळे मुंबईतील 70 शाळा बंद ठेवल्या होत्या.
लॅण्डसॅट 8 या उपग्रहावरील द ऑपरेशनल लॅण्ड इमेजरने (ओएलआय) या आगीचे फोटो कैद केले. यामध्ये धुराचे लोट अतिशय स्पष्ट दिसत आहेत.
==========================================================

विरारमध्ये बंदुकीच्या धाकावर भर रस्त्यात महिलेचं अपहरण

विरारमध्ये बंदुकीच्या धाकावर भर रस्त्यात महिलेचं अपहरण
ठाणे : विरारमध्ये बंदुकीचा धाक दाखवून 40 वर्षीय महिलेचं अपहरण करण्यात आलं आहे. पोलिस मागील 24 तासांपासून आरोपीचा शोध घेत असून त्यांना अद्याप यश आलेलं नाही. शिल्पी वर्मा असं अपहृत महिलेचं नाव आहे. विरारच्या डोंगरपाडा परिसातून तिचं अपहरण झालं.
विरारच्या पश्चिमेला शिल्पी वर्मा आणि आपल्या मैत्रिणीसह ग्लोबल सिटी इथे जात होत्या. त्यावेळी विवा कॉलेज परिसरात त्यांच्या कारचा धक्का एका व्यक्तीला धक्का लागला. यावरुन किरकोळ वादही झाला. पण त्यानंतर त्या व्यक्तीने शिल्पी वर्मा आणि त्यांची मैत्रिण निपुर कुमारी यांना बंदूक दाखवली आणि कारच्या मागच्या बाजूला बसून गाडी एक तास विरारमध्ये फिरवली.
यानंतर विरारच्या डोंगरपाडा परिसरात टायर फुटल्याने गाडी एका खांबाला धडकली. त्यानंतर त्या व्यक्तीने शिल्पी वर्मा यांना बंदुकीचा धाक दाखवत रिक्षामध्ये बसवलं आणि फरार झाला.
या प्रकरणी निपुर कुमारी यांनी अर्नाळा सागरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेला 24 तास उलटून गेले आहेत. तरीही आरोपीचा आणि शिल्पी वर्मा यांचा पोलिसांना शोध लागलेला नाही.
==========================================================

बेळगाव; अंगात शाळेचा गणवेश; हातात नशेचं साहित्य

अंगात शाळेचा गणवेश; हातात नशेचं साहित्य
बेळगाव : बेळगावमध्ये नशा करणाऱ्या शाळकरी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. व्हाईटबॉण्ड नावाचं रसायन प्लास्टिकमध्ये घालून हे विद्यार्थी नशा करत होते. समाजसेवकाने या विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
विशेष म्हणजे हे विद्यार्थी शाळा चुकवून गणवेशावरच नशा करत होते.  हायस्कूलचे विद्यार्थी नशेच्या आहारी जात असल्याचं उघडकीस आल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय ते नवे कोर्ट कॉम्प्लेक्स दरम्यान भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गावर शाळेच्या गणवेशातील काही मुलं हातात प्लास्टिक धरुन हुंगत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते किट्टू राजपूत यांनी पाहिलं. संशय आल्याने त्यांनी मुलांच्या हातातील प्लास्टिक काढून बघितलं. त्यात व्हाईटबॉण्ड रसायन असल्याचं राजपूत यांना समजलं.
ही मुले नाव तसंच मोबाईल नंबर सांगण्यास तयार नव्हती, त्यामुळे त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. मुलांच्या पालकांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं. त्यानंतर समज देऊन पोलिसांनी मुलांना सोडून दिलं.
==========================================================

जळगाव; यावल पालिका मुख्याधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

यावल पालिका मुख्याधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न
जळगाव : अतिक्रमण मोहीमेचं नेतृत्त्व करणाऱ्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यावर रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न जळगाव जिल्ह्यातील यावल इथे घडला आहे. विशेष म्हणजे माजी नगराध्यक्ष बाळू शिर्के आणि त्यांच्या मुलानेच हे कृत्य केलं.
सुदैवाने पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मुख्याधिकारी सोमनाथ आढाव या घटनेतून सुखरुप बचावले आहेत.
यावल महापालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव आणि अध्यक्ष अतुल पाटील अतिक्रमण हटाव मोहीमेचं नेतृत्व करत होते. त्यावेळी माजी नगराध्यक्ष शिर्केने त्यांच्या अंगावर रॉकेलची कॅन ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.
पोलिसांनी या प्रकरणी बाळू शिर्के आणि त्यांच्या मुलाला अटक केली आहे.
==========================================================
विद्या बालन म्हणते.. ‘बॉलीवूडमध्ये असुरक्षित वाटते!

हार्बर रेल्वेमार्गावरील बदललेल्या वेळापत्रकामुळे आधीपासूनच गेले काही दिवस विस्कळीत झालेली हार्बर रेल्वेसेवा गुरूवारी सकाळी ऐनगर्दीच्या वेळी रेल्वेरुळाला तडा गेल्याने पूर्णपणे ठप्प झाली आहे. वडाळा-शिवडी दरम्यान रेल्वेरुळाला तडा गेल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्रवाशांचे अतोनात हाल होत असून, वडाळा, शिवडी, चुनाभट्टी या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस हा प्रवास मध्य रेल्वेच्या मार्गाने करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रशासनाकडून तशी घोषणा करण्यात येत आहे. रुळ दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 
==========================================================
डोंबिवली; धनश्री गोडवे मृत्यूप्रकरण;  तिचे लटकून प्रवास करणे नेहमीचेच!  रेल्वे सुरक्षा दलाचा दावा 

मध्य रेल्वे मार्गावर गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या लोकलमधून खाली पडून प्रवाशांचे बळी जात असताना दोन दिवसांपूर्वी धनश्री गोडवे या डोंबिवलीकर तरुणीच्या अपघाताप्रकरणी रेल्वे सुरक्षा विभागाने तयार केलेल्या अहवालामुळे नवा वाद ओढविण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. धनश्रीचा अपघात हा लोकलमधील गर्दीमुळे नव्हे तर सतत दरवाजात उभे राहण्याच्या तिच्या आग्रहामुळे झाला, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. डोंबिवली स्थानकातून दररोज प्रवास करणारी धनश्री सोमवारी सकाळी घरातून बाहेर पडली. नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर कार्यालयात जायचे असल्याने तिने जलद गाडीतून जाण्याचा प्रयत्न केला आणि तिचा अपघात घडला. यामध्ये तिचा मृत्यू झाल्याने डोंबिवलीकर प्रवाशांमध्ये नाराजीचे तीव्र सूर उमटू लागले आहेत. बुधवारी सकाळी या भागातील काही प्रवासी संघटनांनी संघटित होत मूक आंदोलनही केले. या वेळी प्रवासी संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांना या अहवालासंबंधी माहिती देण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाने सादर केलेल्या अहवालानुसार धनश्री ही डब्यात बाहेर लोंबकळत असल्याच्या चित्रीफिती हाती लागल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा अहवाल सादर केला असल्याचे सूत्रांकडून समजते. गर्दी असो वा नसो धनश्री नित्यनेमाने लोकलच्या दारात उभी राहून प्रवास करीत असे. गेल्या २० दिवसांचे सीसीटीव्ही रेल्वे सुरक्षा दलाने तपासले आहे. त्यामध्ये धनश्री सतत लोकलच्या दरवाजात उभी राहत असल्याचे दिसून आले आहे.याबाबतचा सविस्तर अहवाल सुरक्षा दलाने मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडे पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. धनश्रीच्या प्रवासाचे सीसी टीव्ही फुटेज तपासले असून ती लोकलच्या डब्यात शेवटच्या क्षणी चढताना दिसून येते. ती प्रवास नेहमीच लोकलच्या दारातून केला जात होता का याचा तपास करत आहोत. प्रथमदर्शनी ती दारातून प्रवास करत असल्याचे दिसते. – एम. के. श्रीवास्तव, वरिष्ठ निरीक्षक रेल्वे सुरक्षा दल एका तरुण मुलीचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यानंतर गर्दीकमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सोडून रेल्वे अपघातात चूक कोणाची, याचा तपास करते? ही रेल्वेची असंवेदनशीलताच आहे. – लता आरगडे, उपाध्यक्ष उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ 
==========================================================
शिक्कामोर्तब, महापौर बंगल्यातच बाळासाहेबांचं स्मारक !

अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात होणार यावर शिक्कामोर्तब झालंय.
महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी लवकरच ट्रस्टकडे सुपूर्द केली जाणार आहे. राज्य शासनाचं तसं पत्रच पालिका आयुक्तांकडे आलं होतं. त्यानंतर ही जागा ट्रस्टकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रिया सुरू झालीये. पण, महापौर कुठे राहणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यातच होईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केली होती. या घोषणेला आता वर्ष उलटले. बाळाबाहेब ठाकर यांची मागील महिन्यात जयंती झाली. त्यानिमित्ताने बाळासाहेबांचं स्मारक आता तरी होईल का असा प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थिती केला गेला. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यात उभारू नये असा कडाडून विरोध केला. पण, आता महापौर
बंगल्याच्या जागेवरच स्मारक होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. तसंच महापौर बंगल्यालगत पार्क क्लब आहे. त्याचीही जागा घेता येईल असाही यामागचा हेतू आहे. पण आता महापौर बंगल्यात जर स्मारक होत असेल तर महापौर कुठे राहणार असा प्रश्न आता उपस्थित झालाय.
==========================================================
तर वर्षभरातच होऊ शकतो एक्स्प्रेसवेवरचा टोल माफ !

सरकारने मनात आणलं तर पुढच्या वर्षीच मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वेवरची टोल वसुली बंद होऊ शकते. कारण या टोलनाक्यावर 2015पासून ते आतापर्यंत तब्बल 2454 कोटी रूपये वसूल झालीये आणि कराराप्रमाणे आता फक्त 415 कोटी रूपये होणं बाकी आहे. जे येत्या वर्षाभरात अगदी सहजरित्या वसूल होऊ शकते. आता यावर आपलं सरकार असंही म्हणेल की हे कसं शक्य आहे. म्हणून आम्ही तुम्हाला एक्स्प्रेव-वेवरच्या टोलधाडीचं हे गणित जरा आणखी सोपं करून सांगतोय. 
एक्स्प्रेस वेवरील टोलधाड खरंतर यापूर्वीच आरटीआयच्या माध्यमातून उघड झालीय. पण सरकार आणि कंत्राटदार दोघेही ही बाब मान्य करायला तयार नव्हते. म्हणूनच आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी गेल्या दहा वर्षातली टोल वसुलीची सगळी माहिती वेबसाईटवर टाकण्याची मागणी केली होती. सरकारनेही आता ही माहिती आता वेबसाईटवर टाकली आहे. यातूनच टोलधाडीची मोठी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
‘एक्स्प्रेस-वे’वरील टोलधाड
- करारानुसार 2019 पर्यंत 2,869 कोटींची टोलवसुली अपेक्षित
– 2005 पासून आतापर्यंत 2,454 कोटींचा टोल वसूल
– 2015 मधील अपेक्षित टोलवसुली 258 कोटी
– प्रत्यक्षात टोलवसुली 433 कोटी (जवळपास दुप्पट)
– आता फक्त 415 कोटींची टोलवसुली बाकी
– उर्वरित रक्कम 2016 मध्ये होऊ शकते वसूल
– मग 2019 पर्यंत टोलवसुली कशासाठी?
एक्स्प्रेस-वेवरची ही टोलधाड 2019पर्यंत अशीच सुरू राहिली तर कंत्राटदार किमान अकराशे कोटी रुपये जादा वसूल करू शकतो. म्हणूनच मुंबई -पुणे एक्स्प्रेस-वरची टोलवसुली सरकारने चालू वर्षातच बंद करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे.
ही टोलधाड कमी की काय म्हणून वाहनांच्या संख्येतही कंत्राटदाराने मोठा घोळ केल्याचं सरकारच्या व्हिडिओग्राफीत समोर आलं आहे. अगदी आकडेवारीत बोलायचं झालं तर कंत्राटदाराने तब्बल 40 टक्के वाहनसंख्या कमी दाखवलयाचं समोर आलं आहे.
शासकीय व्हिडिओग्राफीतली वाहनसंख्या ग्राह्य धरली तर कंत्राटदाराचे पैसे एव्हाना वसूल देखील झाले असतील. तरीही मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे-वरची टोलधाड बंद करण्याच्या दृष्टीने सरकार कोणत्याच हालचाली करताना दिसत नाही. त्यामुळे किमान येत्या वर्षाकाठी तरी ही टोलधाड बंद करा, अशी मागणी जोर धरतेय.
==========================================================
भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ?, चौकशीसाठी ईडीचं पथक नाशकात

बेनामी मालमत्ता प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपला तपास पुढे सुरू ठेवलाय. भुजबळ कुटुंबींयाच्या चौकशी करण्यासाठी इडीचं एक पथक आज (गुरूवारी) नाशिकमध्ये दाखल झालं आहे. भुजबळ कुटुंबीयांच्या विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर टाकण्यात आलेल्या छाप्यातून मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याचे सांगण्यात येतं आहे. दरम्यान समीर भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ मनमाड आणि नाशिकमध्ये सुरू झालेली निदर्शनं आजही होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सदनन आणि इतर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने काळ्या पैशाविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, तसंच पंकज आणि समीर भुजबळ हे संचालक असलेल्या विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर सोमवारी छापे टाकले होते. तब्बल 20 अधिकार्‍यांच्या पथकाने राज्यात 9 ठिकाणी हे छापे टाकले. ‘महाराष्ट्र सदन’ गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले समीर भुजबळ यांना 8 फेब्रुवारीपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनाविण्यात आली आहे. सोमवारी रात्री ईडीकडून नऊ तासांच्या चौकशीत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात समीर भुजबळ अपयशी ठरल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.
==========================================================
महिलांसोबत आता पुरुषांनाही शनी चौथर्‍यावर बंदी, ग्रामस्थांनी मांडला ठराव 

शनी मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश न देण्यावर ठाम असलेल्या शनैश्वर देवस्थानानंतर आता ग्रामस्थही पुढे सरसावले आहे. महिलांना काय आता पुरुषांनाही चौथर्‍यावर जाऊ दिलं नाही पाहिजे असा ठरावच ग्रामस्थांनी मांडलाय.
प्रसिद्ध शनी शिंगणापूरच्या शनी मंदिराच्या चौथर्‍यावर महिलेनं जाऊन दर्शन घेतल्यानंतर एकच वादंग निर्माण झालंय. अलीकडे भूमाता ब्रिगेडच्या महिलांनाही शनी मंदिराच्या चौथर्‍यावर जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी होणार्‍या या आंदोलनांमुळे आता ग्रामस्थांनी यावर तोडगा काढत कुणालाच चौथर्‍यावर जाऊ देऊ नका असा निर्णय घेतलाय. चौथर्‍यावर महिलांसोबत पुरुषांनाही प्रवेश बंदीचा ठराव आज शनि शिंगणापूर ग्रामसभेत मांडण्यात आला. हा ठराव शनी शिंगणापूर देवस्थानकडे पाठवण्यात येणार आहे. तसंच श्री श्री रवीशंकर यांच्या मध्यस्थीला ग्रामस्थांनी विरोध केलाय. 7 फेब्रुवारीला श्री श्री रवाशंकर मध्यस्थी करायला येणार आहेत. त्यांनी इथं येऊ नये असा इशारा ही ग्रामस्थांनी दिलाय.
==========================================================

निष्पाप युगची हत्या करणा-या राजेश आणि अरविंदला फाशीची शिक्षा


बहुचर्चित युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 
राजेश धनालाल दवारे  आणि अरविंद अभिलाष सिंगने दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा सेंटर पॉर्इंट शाळेत चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा युग याचे या आरोपींनी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लकडगंज छापरूनगर भागातील गुरुवंदना सोसायटी समोरून अपहरण केले होते.
अपहरणकर्त्यांनी आधी १० कोटी आणि नंतर ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. अपहरणकर्त्यांनी युगचा दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात निर्घृणपणे खून केला होता. दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबर रोजी खुद्द दोन्ही आरोपींनी आपल्या कृत्याची कबुली देऊन नाल्यातील रेतीमध्ये पुरलेला युगचा मृतदेह दखवला होता. 
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या बहुचर्चित खटल्याच्या सुनावणीस १९ जानेवारी २०१५ पासून प्रारंभ झाला होता. सरकार पक्षाने एकूण ५० आणि बचाव पक्षाने ७ साक्षीदार तपासलेले होते. 

==========================================================

भुवनेश्वरमध्ये ६० दलित विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढले


 हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशात दलित विद्यार्थ्यांवर होणा-या अन्यायाचा मुद्दा केंद्रस्थानी आलेला असतानाच बिहार सरकारने दलित विद्यार्थ्यांबद्दल दाखवलेले असंवेदनशीलतेचे एक प्रकरण समोर आले आहे. 
बिहार सरकारकडून वेळेवर विद्यावेतन न मिळाल्यामुळे बिहारच्या ६० दलित विद्यार्थ्यांना भुवनेश्वरमधील राजधानी अभियांत्रिकी महाविद्यालय सोडण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे. वारंवार विनंती करुनही बिहार सरकारने वेळेवर विद्या वेतन न दिल्यामुळे आठ जानेवारीला या विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि वसतिगृह सोडावे लागले. 
हे सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेच्या विविध अभ्यासक्रमांच्या दुस-यावर्षाला शिकत आहे. सरकारकडून आर्थिक मदत मिळाली नाही तर, आयुष्य संपवण्याची धमकी या विद्यार्थ्यांनी दिली आहे. बिहारच्या पूर्व चंपारणमधील १८ आणि पश्चिम चंपारणधील ४२ विद्यार्थी आहेत. 
दोनवर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांनी बिहार सरकारच्या दलित विद्यावेतन योजनेतंर्गत भुवनेश्वरच्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. बिहार सरकारने या विद्यार्थ्यांचे दीडवर्षापूर्वी शेवटचे विद्यावेतन कॉलेजकडे जमा केले होते. 

==========================================================

हाफीझ सईदची पुन्हा धमकी, पठाणकोट हल्लेखोरांचे कौतुक


सातत्याने भारत विरोधी चिथावणीखोर वक्तव्ये करणारा अतिरेकी हाफीझ सईदने पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अतिरेक्यांचे कौतुक केले आहे. पठाणकोटसारखे भारतावर आणखी हल्ले करण्याची आणि भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असलेली शांतता चर्चा उधळून लावण्याची धमकी हफीझने दिली आहे. 
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये एका सभेमध्ये तो बोलत होता. आठ लाख भारतीय सैनिक काश्मीरमध्ये काश्मिरीजनतेचा आवाज दडपून टाकत आहेत. मग त्यांनी स्वत:च्या संरक्षणासाठी पठाणकोट सारखे हल्ले केले तर त्यांची काय चूक ?   असे सईद म्हणाला. 
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला सईद पाकिस्तानात मोकाट फिरत आहे. पठाणकोट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणा-या युनायटेड जिहाद काऊंन्सिलचा नेता सय्यद सालाउद्दीनचेही त्याने कौतुक केले. तुम्ही फक्त पठाणकोट सारखा एक हल्ला बघितला आहे आणखी हल्ले होऊ शकतात असा इशारा त्याने दिला. 


No comments: