Monday, 15 February 2016

नमस्कार लाईव्ह १५-०२-२०१६चे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 
१- JNU वाद : ABVP कडून नवा व्हिडीओ जारी 
२- महाविद्यालयांमध्ये नक्षलवादी कनेक्शन, 46 विद्यार्थी संघटनांची यादी तयार 
३- जेएनयू’तील देशद्रोही विद्यार्थ्यांना गोळ्या घाला- साक्षी महाराज 
४- शरीरसंबंधांसाठी सेक्सवर्करची सहमती असेल तर, कारवाई नको - सर्वोच्च न्यायालय समिती 
५- केवळ सामंजस्य कराराने मेक इन महाराष्ट्र अशक्य’- अशोकराव चव्हाण 
६- मोदी-जेटलींनी जनतेला फसवले- ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी 
७- स्वीडनसाठी पुणे औद्योगिक व गुंतवणुकीचे ‘हब’ 
८- राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करावे-तिवारी 
९- सीताराम येचुरी यांना धमकीचा फोन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- मीटर डाऊन, मुंबईतील एक लाख रिक्षाचालक संपावर 
११- शहीद शंकर शिंदेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार 
१२- महाराष्ट्र रजनीच्या कार्यक्रमात काय झालं? संपूर्ण घटनाक्रम 
१३- महाराष्ट्र रजनीच्या सेटवरील भीषण आग 
१४- ‘मेक इन’ कार्यक्रमातील आगीचे मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 
१५- महाराष्ट्रात आणखी आठ एकात्मिक वस्त्रोद्योग संकुले 
१६- ठाण्यामध्ये धावणार हायब्रिड बस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- सिनेअभिनेत्री प्रणिता सुभाषचा अपघात, किरकोळ जखमी 
१८- पुणे; व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीत तरुणीवर बलात्कार 
१९- गडचिरोली - नऊ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण 
२०- गुरगाव; व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणा-या तरुणाला इमारतीवरुन फेकून दिले 
२१- अर्धापूर; लग्नातील खर्च वाचवून दुष्काळग्रस्तांना मदत 
२२- नागपूर; उसाच्या शेतीने जागविले आशेचे किरण 
२३- दिप्ती सरना अपहरण प्रकरणी 5 जणांना अटक 
२४- लोणावळा:विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या 
२५- नागपूर; अपंगाच्या पंखांना बळ देणारा देवदूत 
२६- लातूर; घोटभर पाण्यासाठी रक्ताच्या चिळकांड्या 
२७- कोल्हापूर; एसटी चालकाचा स्टेअरिंगवरच हार्ट अॅटकने मृत्यू, बस झाडावर आदळली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- टी-20 विश्वकरंडकाचा भारत दावेदार-धोनी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
उज्वलकुमार पालेकर, श्रीनिवास सुरकुतवार, बाबुराव खापटे, नितीन वाघमारे, श्रीकांत मुंडे, पी.एस. नादरे, प्रकाशचंद्र जातसरण, श्वेता जैन, सागर ढेंबे, विनायक गुडेवार, नागेश गुट्टे, मोंटीसिंग जहागीरदार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
विवेक हाती धरून घेतलेले काम अखेरपर्यंत करीत राहणं, यात जीवनाची सार्थकता आहे
(शुभम आपरे नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
http://goo.gl/uS8DX4

===========================================

शहीद शंकर शिंदेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद शंकर शिंदेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपूत्र शंकर शिंदे अनंतात विलीन झाले आहेत. नाशिकमधील चांदवडच्या भयाळ गावात शंकर शिंदे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. 
कुपवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना नाशिकचे शंकर शिंदे आणि विजापूरचे सहदेव मोरे यांना वीरमरण आलं. झुनरेशी गावात अतिरेक्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत नायक शंकर शिंदे आणि सहदेव मोरे यांना गोळी लागल्याने ते धारातीर्थी पडले. तर या चकमकीत भारतीय जवानांनी पाच अतिरेक्यांचा खात्मा केला होता. 
शंकर शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिक नेते आणि अवघी पंचक्रोशी भयाळे गावात उपस्थित होती. 
सुमारे 1400 लोकसंख्या असलेल्या भयाळे गावातील 80 पेक्षा अधिक जवान सीमेवर देशाची सुरक्षा करत आहेत. शहीद शंकर शिंदे हे चांदवड तालुक्यातील भयाळे गावचे आहेत. मागील 17 वर्षांपासून शंकर शिंदे सैन्यात होते. शंकर शिंदे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी सुवर्णा, मुलगी (वय 6 वर्ष 5 महिने) मुलगा (वय 1 वर्ष 8 महिने) असं कुटुंब आहे.
===========================================

JNU वाद : ABVP कडून नवा व्हिडीओ जारी 


JNU वाद : ABVP कडून नवा व्हिडीओ जारी
नवी दिल्ली दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा कोणी दिल्या, याप्रकरणी अनेक दावे-प्रतीदावे केले जात आहेत. त्याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात एबीव्हीपी विरुद्ध अन्य विद्यार्थी संघटना असा वाद रंगला आहे. दोन्ही बाजूंकडून नव-नवे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. 
नुकतंच एबीव्हीपीने नवा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये जेएनयू कॅम्पसमध्ये विद्यार्थी देशविरोधी घोषणा देताना दिसत आहे. यामध्ये “अफजल गुरू हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल ज़िंदा हैं… भारत तेरे टुकड़े होंगे… इंशाअल्लाह, इंशाअल्लाह.  हम क्या चाहते हैं… आजादी… आज़ादी…” अशा भयानक घोषणा ऐकायला येत आहेत.
jnu1 jnu 2
यापूर्वी ‘काश्मिर की आझादी तक, भारत की बर्बादी तक’ अशा घोषणा विद्यापीठात दिल्याचा व्हिडीओही एबीव्हीपीने शेअर केला होता. 
मात्र या घोषणा एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनीच दिल्याचा दावा करणारा व्हिडीओ एआयएसएफ विद्यार्थी संघटनेने केला होता. 
पण आता एबीव्हीपीने नवा व्हिडीओ शेअर करून, आणखी एक नवा दावा केला आहे.
===========================================

मीटर डाऊन, मुंबईतील एक लाख रिक्षाचालक संपावर 

मीटर डाऊन, मुंबईतील एक लाख रिक्षाचालक संपावर
मुंबई : सामान्य मुंबईकरांसाठी आजचा दिवस डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील तब्बल एक लाख रिक्षाचालकांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. 
विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी हा संप पुकारला आहे. ओला, उबेर यासारख्या खासगी वाहतुकीमुळे रिक्षाचालकांच्या व्यवयासावर परिणाम झाल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. तसंच परवाना मिळवण्यासाठी सरकारने नियम कठोर केल्याने अडचणी वाढल्याचं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. 
दरम्यान, या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी रिक्षाचालकांवर बळजबरी केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. संपात सहभागी होण्यासाठी रिक्षाचालक एकमेकांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. ‘माझा’च्या कॅमेऱ्यात यासंदर्भातली दृश्यं कैद झाली आहेत.
===========================================

सिनेअभिनेत्री प्रणिता सुभाषचा अपघात, किरकोळ जखमी 

सिनेअभिनेत्री प्रणिता सुभाषचा अपघात, किरकोळ जखमी
हैदराबाद दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता सुभाषच्या कारला अपघात झाला आहे. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात नियंत्रण सुटलेली कार उलटल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात प्रणिता किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. 
प्रणिता सुभाषसोबत कारमध्ये तिची आई आणि इतर चार जण होते. खम्मामहून हैदराबादला परतत असताना सूर्यापेट-खम्माम मार्गावर कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कारमधील सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत.अपघातानंतर तातडीने आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलवून घेतली आणि जखमी असलेल्यांना सूर्यापेटच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. 
प्रणिता या अपघातानंतर हैदराबादला रवाना झाली. काही वेळाने ट्विटरवर प्रणिताने अपघाताचे फोटो अपलोड केले. शिवाय, आपण सुखरुप असल्याचंही तिने ट्विटरवर नमूद केलं.
===========================================

महाविद्यालयांमध्ये नक्षलवादी कनेक्शन, 46 विद्यार्थी संघटनांची यादी तयार

महाविद्यालयांमध्ये नक्षलवादी कनेक्शन, 46 विद्यार्थी संघटनांची यादी तयार
नवी दिल्ली जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील वाद सुरु असतानाच नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनांवर टाच आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने सुरु केल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्रातल्या अशा 46 विद्यार्थी संघटनांची यादी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याच्या गुप्तचर विभागाकडे सुपुर्द केली आहे. 
महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या या संघटना असून त्यांचा नक्षलवादी संलग्न संस्थांशी संबंध थेट संबंध असल्याचा सरकारचा निष्कर्ष आहे. त्यामुळे जेएनयु विद्यापीठातील वातावरण पाहता आगामी काळात या संघटनांवर चांगलीच पाळत राहण्याची शक्यता आहे. तसेच काही संघटनांवर कारवाईची कुऱ्हाडही कोसळू शकते. 
शिवाय, नक्षलवादी चळवळ शहरांकडे वळू लागली असल्याचं आणि शहरांमधील तरुणांना चळवळीत ओढून घेण्याचं वाढत असल्याचं गेल्या काही वर्षांमध्ये काही घटनांवरुन समोर आले आहे. त्यामुळे केंद्राच्या अहवालानंतर राज्य गुप्तचर यंत्रणा कशाप्रकारे कारवाई करते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
===========================================

महाराष्ट्र रजनीच्या कार्यक्रमात काय झालं? संपूर्ण घटनाक्रम 


महाराष्ट्र रजनीच्या कार्यक्रमात काय झालं? संपूर्ण घटनाक्रम
काहीच वेळापूर्वी अमिताभ बच्चन यांचा कार्यक्रम सादर झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यपाल, अभिनेता आमीर खान यासारखे अनेक लहानमोठे कलाकार यावेळी उपस्थित होते.
मुंबई : मेक इन इंडिया अंतर्गत आयोजित मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सुरु असलेल्या महाराष्ट्र रजनीच्या सेटवर आगीची घटना घडली आहे. मंचावर लावणीचा कार्यक्रम सुरु असतानाच मेक अप रुमला आग लागून पसरत गेली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांसारखे अनेक दिग्गज उपस्थित होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. 
सायंकाळी 7.30 वाजता अभिनेत्री हेमामालिनी यांचं भरतनाट्यम आणि गणेशवंदना 
सायंकाळी 7.40 वाजता लोकनृत्यं सादर 
सायंकाळी 7.50 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यपाल सी विद्यासागर राव, महापौर यासारखे व्हीआयपी मंचावर 
सायंकाळी 7.55 वाजता मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांचं भाषण 
सायंकाळी 7.58 वाजता सर्व मान्यवर मंचावरुन खाली 
रात्री 8.03 वाजता प्रसून जोशी लिखित महाराष्ट्रावरील कवितेचं बिग बींकडून सादरीकरण 
रात्री 8.07 वाजता बिग बींचं सादरीकरण समाप्त 
रात्री 8.17 वाजता महाराष्ट्राची लोकधारामध्ये अभिनेत्री पूजा सावंतचा वाजले की बारावर परफॉर्मन्स 
रात्री 8.20 वाजता सेटवर आग
===========================================

महाराष्ट्र रजनीच्या सेटवरील भीषण आग 

महाराष्ट्र रजनीच्या सेटवरील भीषण आग आटोक्यात

===========================================

पुण्यात व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीत तरुणीवर बलात्कार 

पुण्यात व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीत तरुणीवर बलात्कार
पुणे : व्हॅलेंटाईन डेला पुण्यामध्ये गालबोट लागलं आहे. हडपसरमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीमध्येच तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 
व्हॅलेंटाईन डेच्या पार्टी निमित्त पीडिता मित्रासोबत गेली होती. त्यावेळी मित्रासोबत आलेल्या तरुणाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. हडपसर पोलिसांनी आरोपी फिरोज शेखला अटक केली आहे.
रविवारी पहाटे ही घटना घडली. पी़डित तरुणी कोलकाताची असल्याची माहिती आहे.
===========================================
गडचिरोली - नऊ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण 

 डीव्हीसी तसेच दोन सेक्शन कमांडरसह एकूण ४६ लाखांचे बक्षीस असलेल्या नऊ जहाल नक्षल्यांनी अलीकडेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे.
शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला नक्षल्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, २०१५मध्ये ५६, तर २०१६च्या दीड महिन्यात १२ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये १६ लाखांचे बक्षीस असलेला व नक्षल्यांच्या कसनसूर विभागीय समितीचा सदस्य (डीव्हीसी) सुनील ऊर्फ रामजी सुनसी मट्टामी, कंपनी क्रमांक ४ चा सेक्शन कमांडर शिवा ऊर्फ सत्तू ऊर्फ भिमा राजू नरोटे व त्याची पत्नी राखी ऊर्फ रेखा तिम्मा (प्रत्येकी आठ लाखांचे बक्षीस), कंपनी क्र.१० ची सदस्य मीरा देवू नरोटे, टिप्पागड दलम सदस्य कमला ऊर्फ रम्मी बाजीराव हिडको, गट्टा दलम सदस्य सोमजी ऊर्फ लेबू मोडी आतलामी, कसनसूर दलम सदस्य लक्ष्मण ऊर्फ लालू सोमा नरोटे, गट्टा दलम सदस्य दोडगे दुगे आत्राम, मंगू ऊर्फ रामजह आंदरु मट्टामी यांचा समावेश आहे. परिसरातील १७ चकमकी, १४ जाळपोळी व ९ हत्या प्रकरणात सुनीलचा सहभाग होता. शिवा नरोटे ११ गुन्ह्यांत सहभागी होता. राखी तिम्मा हिने ९ गुन्हे केले आहेत, तर मीरा नरोटे ही दोन गुन्ह्यांमध्ये सहभागी होती. टिप्पागड दलम सदस्य असलेली कमला हिडको ही उत्तर गडचिरोलीतील नक्षल्यांच्या जनताना सरकारचा प्रमुख सावजी याची पत्नी आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कमलाने चोवीस तासांच्या आतच आत्मसमर्पण केल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली. 
===========================================
जेएनयू’तील देशद्रोही विद्यार्थ्यांना गोळ्या घाला- साक्षी महाराज 
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता भाजप खासदार साक्षी महाराज यांनी वादग्रस्त विधान करून या प्रकरणात उडी घेतली आहे. ‘जेएनयू’त राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱया देशद्रोह्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे मत साक्षी महाराज यांनी व्यक्त केले आहे. साक्षी महाराज यांच्या या विधानामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ‘जेएनयू’तील देशद्रोह्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवण्यापेक्षा त्यांना फासावर लटकवा नाहीतर पोलिसांनी त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. मदरशांमधून दहशतवादाचे शिक्षण दिले जात असल्याचे मी याआधीपासूनच म्हणत आलो आहे. त्यानंतर अनेक दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली होती. आता हा दहशतवाद ‘जेएनयू’सारख्या जागतिक स्तरावरील महाविद्यालयात देखील पोहोचला आहे. देशाचा अपमान कोणत्याही प्रकारे सहन केला जाऊ शकत नाही. सीताराम येचुरींसारखे नेते अशा विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन गलिच्छ राजकारण करत आहेत, असे साक्षी महाराज म्हणाले. 
===========================================
केवळ सामंजस्य कराराने मेक इन महाराष्ट्र अशक्य’- अशोकराव चव्हाण 
मागास जिल्ह्य़ांमध्ये उद्योग यावेत -अशोक चव्हाण उद्योगसमूहांबरोबर केवळ सामंजस्य करार करून ‘मेक इन महाराष्ट्र’ होणार नाही, तर मराठवाडा आणि विदर्भातील मागास जिल्ह्य़ांमध्ये उद्योग यायला हवेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. नागपुरात रवी भवनात ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी महाराष्ट्र सरकारचा रेमंड्स, स्टरलाइट, कोकाकोला या उद्योगसमूहांबरोबर सामंजस्य करार झाला. त्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, सामंजस्य करार होणे आणि प्रत्यक्षात उद्योग उभारणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ‘मेक इन इंडिया’चे आम्ही स्वागत करतो, पण उद्योगांची ही परिषद सामंजस्य करारापुरती राहू नये. राज्यातील मागास जिल्ह्य़ांमध्ये उद्योग सुरू व्हावेत. भुजबळ कुटुंबीय आणि इतर लोकांवर झालेल्या कारवाईबद्दल ते म्हणाले, राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी द्वेषबुद्धीने, सूडबुद्धीने कारवाई होत आहे. विरोधकच राहू नयेत, ही व्यवस्था त्यांनी सुरू केली आहे. लोकशाहीत अशा गोष्टी चालत नसतात. उलट विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर शासनाने लोकहितार्थ निर्णय घेणे अपेक्षित आहे. राज्यात दुष्काळाची तीव्रता आहे; महागाई, बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात आहे, त्यावर विरोधी पक्षाने बोलायचे नाही का? विरोधकांना गप्प करण्यासाठी चालवलेला हा खेळ आहे. अशा कारवाईमुळे विरोधक गुपचूप बसतील व शासनाच्या विरोधात काहीच बोलणार नाही, अशी यांची अपेक्षा असेल तर आम्ही त्याला जुमानणार नाही. 
===========================================
‘मेक इन’ कार्यक्रमात आग, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 

सर्व कलाकार व सेलिब्रेटी सुरक्षित; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश ‘मेक इन इंडिया’ सप्ताहअंतर्गत रविवारी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेला ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रम सुरू असतानाच व्यासपीठाला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात आग लागली. जोरदार वाऱ्यांमुळे आग दहा मिनिटांत संपूर्ण व्यासपीठावर पसरली. आग लागताच व्यासपीठासमोर बसलेले राज्यपाल, मुख्यमंत्री, राजकीय नेते, मान्यवर तसेच विदेशातील राजनैतिक अधिकारी यांना तातडीने सुरक्षितस्थळी नेण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा घटनास्थळ गाठून आग आटोक्यात येईपर्यंत तेथे तळ ठोकला. आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात कोणतेही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
===========================================
महाराष्ट्रात आणखी आठ एकात्मिक वस्त्रोद्योग संकुले

४० हजार कोटींची गुंतवणूक, ११ हजार रोजगार; ‘मेक इन इंडिया’ सप्ताह मंचावर राज्याची घोषणा मेक इन इंडिया सप्ताहाच्या मुहूर्तावर रेमंडच्या रूपात राज्यात पहिल्या एकात्मिक वस्त्रोद्योग संकुल योजना मार्गी लागल्याने उत्साहित झालेल्या महाराष्ट्राने या धर्तीवर राज्यात आणखी ८ वस्त्रोद्योग संकुले उभारण्याचा संकल्प केला आहे. यामार्फत राज्यात ४०,००० कोटींची गुंतवणूक होणार असून ११ हजार रोजगारनिर्मिती होईल. लिनन प्रकारच्या वस्त्रनिर्मितीसाठी राज्यातील औद्योगिक विकास महामंडळाने रेमंडबरोबर शनिवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीत करार केला होता. १,४०० कोटींच्या या अमरावती जिल्हय़ातील नांदगाव पेठेतील प्रकल्पाचा लाभ परिसरातील ५,००० शेतकऱ्यांना होणार आहे. अशी आणखी संकुले उभारण्यासह त्यातील प्रकल्प, गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांपर्यंत अनुदान, सवलती देण्यात येणार आहेत. भारतीय औद्योगिक महासंघ व केंद्रीय व्यापार धोरण व प्रोत्साहन विभागाच्या वतीने आयोजित मेक इन इिंडया सप्ताहांतर्गत रविवारी महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग चर्चासत्र रंगले. त्यात या क्षेत्रातील उद्योजक, संघटना तसेच शासकीय अधिकारी सहभागी झाले होते. याचदरम्यान मुख्यमंत्र्यांनीही चर्चेत सहभाग घेतला. 
===========================================

शरीरसंबंधांसाठी सेक्सवर्करची सहमती असेल तर, कारवाई नको - सर्वोच्च न्यायालय समिती 

शरीर विक्रीय करणा-या महिला जर सहमतीने शरीरसंबंध ठेवत असतील तर त्यांच्याविरुध्द गुन्हेगारी कारवाई करु नये किंवा पोलिसांनी हस्तक्षेप करु नये असे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने म्हटले आहे.  
शरीरविक्रीय करणा-या महिलांच्या हक्कांसाठी तसेच त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २०११ मध्ये ही समिती स्थापन केली होती. पुढच्या महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.  
भारतात वेश्वाव्यवसाय बेकायद नाही पण सध्या जे कायदे अस्तित्वात आहेत त्यामुळे या व्यवसायात असणा-या महिलांना अत्यंत वाईट अनुभवातून जावे लागते. स्वच्छेने शरीरसंबंध ठेवणे बेकायद नाही. पण कुंटणखाना चालवणे गुन्हा आहे.  
छापा मारल्यानंतर वेश्या व्यवसाय करणा-या महिलेला अटक करु नये किंवा दंड ठोठावू नये असे समितीने आपल्या अहवालात म्हटल्याचे हिंदुस्थान टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. आयटीपीए कायद्यातील कलम आठचा कायदा राबवणा-या यंत्रणांनी दुरुपयोग केला आहे.  
यामध्ये शरीरसुखाला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेऊन गुन्हा दाखल करण्याची जी तरतुद आहे ती रद्द करावी अशी शिफारस समितीने केली आहे. कायद्यानुसार वेश्या व्यवसाय करणा-या महिला शारीरीक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करु शकत नाही. जर प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध झाला तर, सहा महिने तुरुंगवास आणि ५०० रुपये दंड ठोठवण्याची शिक्षा आहे. 
===========================================

गुरगाव; व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणा-या तरुणाला इमारतीवरुन फेकून दिले 


फेसबुकवरच्या मैत्रिणीसोबत व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला गेलेल्या २७ वर्षीय तरुणाला बहुमजली इमारतीवरुन फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरगावमध्ये घडली आहे. ईश्वर असे या युवकाचे नाव असून, तो मूळचा दिल्लीचा आहे.  
रविवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ईश्वरचा मृत्यू झाला. मागच्या सात महिन्यांपासून ईश्वर फेसबुकवरुन तरुणीच्या संपर्कात होता. दोघांनी गुरगावमध्ये एकत्र व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायचा ठरवला होता. त्यानुसार तरुणीला तो हुडा सिटी सेंटर येथे भेटला. 
त्यानंतर दोघे गुरगावमधील पॉश वस्ती असलेल्या सुशांत लोक परिसरात गेले. ही तरुणी तिथे रहाते. ईश्वर आणि तरुणी तिच्या फ्लॅटवर जाऊन बसले होते. इतक्यात तरुणीचा भाऊ रमेश आणि ड्रायव्हर अनिल कुमार तिथे आला. 
ईश्वरला तिथे पाहून रमेश संतापला. रमेश आणि अनिलने मिळून आधी ईश्वरला बेदम मारहाण केली. त्यानंतर घराच्या खिडकीतून खाली टाकून दिले. दोघांच्या विरोधात सुशांत लोक पोलिस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. ईश्वरचा जागीच मृत्यू झाला नव्हता. आरोपींनी त्याला गाडीत टाकून खांडसा रोडवर नेले. तिथे रस्त्यावर फेकले जेणेकरुन रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे प्रकरण दाखल व्हावे. 
===========================================

ठाण्यामध्ये धावणार हायब्रिड बस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : आरामदायी प्रवासाबरोबरच इंधनाची बचत
मुंबई : स्वीडिश तंत्रज्ञानाचा वापर  करून भारतात बनविलेल्या पर्यावरणपूरक व्होल्वो हायब्रिड बसचे रविवारी लोकार्पण करण्यात आले.स्वीडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलात हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आरामदायक आणि पर्यावरणपूरक राहावी यासाठी स्वीडिश तंत्रज्ञानाचा वापर करून या व्होल्वो हायब्रिड बसची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्रात ही बस धावणार आहे. नवी मुंबई व ठाणे महापालिका आणि व्होल्वो बस कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार झाला. स्वीडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान यांनी या बसची प्रतीकात्मक चावी मुख्यमंत्र्यांना सुपुर्द केली.या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक विस्तारित आणि बळकट करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. प्रदूषणविरहित इंधन सेवा असलेल्या बसेसच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम केले जात आहे.
===========================================

मोदी-जेटलींनी जनतेला फसवले- ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी 

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी स्विस बँकेतील काळा पैसा परत आणू, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले. त्यासाठी दोघांनी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. उलट जनतेची फसवणूकच केली, असा हल्लाबोल ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी रविवारी केला. काँग्रेस काय किंवा भाजपा काय सगळेच एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह येथे टॉप मॅनेजमेंट काँझोरिअमच्या वतीने ‘इफेक्टिव्ह फंक्शनिंग आॅफ पार्लमेंट फॉर व्हायब्रंट डेमॉक्रॉसी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात ते बोलत होते. या वेळी सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब मुजुमदार, माजी न्यायमूर्ती पी. बी़ सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते.
जेठमलानी म्हणाले, ‘काळ्या पैशांचा साठा करणाऱ्या व्यक्तींची यादी २०१०मध्ये स्विस बँकेकडून जर्मनीला देण्यात आली होती. मात्र, भारताने ही यादी मिळण्यासंबंधी साधे पत्रही लिहिले नाही. उलट स्वित्झर्लंडबरोबर पूर्वीचे काही मागणार नाही, अशा स्वरूपाचा ‘दुहेरी कर आकारणी टाळण्याचा’ करार करण्यात आला. तरीही विरोधी पक्षातील असल्याने ती यादी मिळावी, अशी मागणी मी जर्मन सरकारला पत्राद्वारे केली. त्यावर ‘विरोधी पक्षनेत्याचे पत्र द्या,’ असे मला सांगण्यात आले. मात्र, लालकृष्ण आडवाणी यांनी मला पत्र दिले नाही.’‘लोकसभा निवडणुकीत भाजपाने हाच मुद्दा घेतला आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन जनतेला दिले. या एका मुद्द्यासाठी बिहार निवडणुकीमध्ये आपण भाजपाचा प्रचार केला, परंतु मोदी आणि जेटलींनी काळा पैसा परत आणण्यासाठी कोणते प्रयत्न केले नाहीत,’ असे ते म्हणाले. 
===========================================

स्वीडनसाठी पुणे औद्योगिक व गुंतवणुकीचे ‘हब’ 

  • पुणे : स्वीडनसाठी पुणे हे औद्योगिक आणि गुंतवणुकीचे ‘हब’ आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेमध्ये स्वीडनचे मोठे योगदान असून, याद्वारे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होतील, असे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफव्हेन यांनी सांगितले.
    मुंबईतील ‘मेक इन इंडिया’ सप्ताहानिमित्त भारतात आलेले पंतप्रधान लोफव्हेन यांनी शनिवारी चाकण येथील ‘एमआयडीसी’तील ‘टेट्रा पॅक’ आणि ‘एरिक्सन‘ या स्वीडिश कंपन्यांच्या प्रकल्पांना भेट दिली. त्यानंतर दोन्ही प्रकल्पांतील अधिकारी व माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. या वेळी स्वीडनचे भारतातील राजदूत हॅरॉल्ड सँडबर्ग, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागासाठीच्या स्वीडिश कॉन्सुलर जनरल फ्रेड्रिका आॅर्नब्रांट, स्वीडिश चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि ‘टेट्रा पॅक’ साउथ आशिया मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प सिंग, एरिक्सनचे भारत विभागप्रमुख पाओलो कोलेला व अध्यक्ष मॅट्स ओलसन आदी उपस्थित होते. लोफव्हेन म्हणाले, ‘भारताने ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून खूप चांगला पुढाकार घेतला आहे. भारतातील उत्पादनवाढ खूप महत्त्वाची आहे.’
===========================================
टी-20 विश्वकरंडकाचा भारत दावेदार-धोनी

विशाखापट्टणम - घरच्या मैदानावर खेळणे आणि आयपीएल अनुभवाच्या जोरावर भारतीय संघच ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा प्रमुख दावेदार असल्याचे भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने म्हटले आहे.

भारताने श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळविला आहे. त्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-0 अशी जिंकली होती. त्यामुळे मायदेशाती ट्वेंटी-20 मालिकेत खेळणाऱ्या भारतीय संघाकडे विजेतेपदाचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे.

धोनी म्हणाला, ‘‘सुरवातीचे फलंदाज जबरदस्त फॉर्मात असल्याने आम्ही प्रबळ दावेदारांमध्ये आहे. संघातील अद्याप काही फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावण्याचीही संधी मिळालेली नाही. प्रत्येकाला फलंदाजीची संधी दिली जाईल. पण, फलंदाजांचा क्रम खोलवर आहे. सहा, सात व आठच्या क्रमांकावरील फलंदाजांनाही संधी मिळेल, कारण तेही मोठे फटके मारु शकतात. कमी षटकांच्या स्पर्धांमध्ये आम्ही नेहमीच दावेदार असतो. फिरकीपटूंनीही चांगली कामगिरी केल्याने आम्हाला याचा फायदाच झाला आहे. तसेच आयपीएलमध्ये मायदेशात खेळण्याचा  फायदा सतत आम्हाला होत असतो.‘‘
===========================================
अर्धापूर; लग्नातील खर्च वाचवून दुष्काळग्रस्तांना मदत

अर्धापूर : कामठा (ता. अर्धापूर) येथील मुस्तरे व महादेववाडी (ता. वसमत) येथील बेदरे कुटूंबियांनी हुंडा न घेण्याची परंपरा कायम ठेवत व दुष्काळी परिस्थितीच्या सामना करणाऱ्या कामठा गावातील नागरिकांना पाणी टंचाई निवारणासाठी मदत व्हावी यासाठी लग्न समारंभात होणारा खर्च टाळून ग्रामपंचायतीतील पाणीटंचाई निवारणासाठी 51 हजाराचा निधीचा धनादेश रविवारी (ता. 14) दिला. हे दोन्ही कुटूंब शेतकरी असून, वधू-वर उच्च शिक्षीत आहेत.

अर्धापूर तालुक्‍यात दुष्काळी परिस्थितीचे मान ठेवून साखर पुड्यातच विवाह सोहळे होत असून, भोगाव व खैरगाव या दोन गावात रविवारी (ता. 14) एकाच दिवशी विवाह सोहळे झाले आहेत. विनाखर्च विवाह सोहळा ही संकल्पना रुजत आहे.
===========================================
राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करावे-तिवारी 

नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन देणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केली आहे.

जेएनयूमध्ये नऊ फेब्रुवारीला संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुच्या फाशीविरोधात झालेल्या कार्यक्रमात भारतविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरून जेएनयू संघटनेचा नेता कन्हैया कुमारसह अन्य सात जणांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलेला आहे. या अटकेविरोधात झालेल्या आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाले होते. 
तिवारी म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी देशद्रोही वक्तव्ये करणाऱ्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे त्यांची संसदेतील सदस्यत्व रद्द करावे. देशविरोधी कृत्यांमध्ये राहुल गांधी कोणत्या कारणावरून सहभागी झाले. त्यांनी त्याठिकाणी जायला नको हवे होते. असे राजकारण देशाला महागात पडू शकते.‘‘
===========================================
सीताराम येचुरी यांना धमकीचा फोन
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (सीपीआयएम) सीताराम येचुरी यांना रविवारी रात्री धमकीचा फोन केला आहे.
दिल्लीतील सीपीआयएमच्या कार्यालयात रविवारी रात्री साडेदहा ते एक वाजेपर्यंत धमकीचे फोन येत होते. कार्यालयातील रिसेप्शनिस्ट दीपक कुमार यांनी सांगितले, की येचुरींनी जे काही केले आहे ते चुकीचे केले आहे. त्यांनी आता देश सोडला पाहिजे. तसेच त्याने येचुरी यांना शिवीगाळही केली. धमकी देणारा स्वतःला आम आदमी बलवीर सेनेचा सदस्य असल्याचे सांगत होता. या प्रकरणी मंदीर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जेएनयू संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या सुटकेसाठी आज (सोमवार) आंदोलन करण्यात येणार आहे. कन्हैया कुमारची पोलिस कोठडीची मुदत संपली असून, आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. भारतविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे कन्हैया कुमारसह अन्य सात जणांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलेला आहे.
===========================================
नागपूर; उसाच्या शेतीने जागविले आशेचे किरण

नागपूर - दिवसेंदिवस शेतीचा लागवड खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे काहींनी शेतीला रामराम ठोकला. मात्र काहींनी आव्हान स्वीकारून पिकांच्या लागवड पद्धतीत बदल केला. पारंपरिक पिकांना बगल देत आडसाली उसाची लागवड करून एकरी 90 टन उत्पादन घेतले. यातून संकटातील शेतकऱ्यांना आशेचा किरण गवसला. 

उसाची लागवड केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातच शक्‍य असल्याचे मानत विदर्भातील शेतकरी ऊस लागवडीसाठी फारसे उत्सुक नाहीत. भिवापूर तालुक्‍यातील उखळी येथील एका शेतकऱ्याने हे आव्हान स्वीकारले. उसाची लागवड करून एकरी 90 टन आडसाली उसाचे उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला. राजेंद्र शांभाले असे ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी ऑगस्ट 2014 मध्ये दोन एकरवर आडसाली उसाची लागवड केली. त्यानंतर योग्य व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. तर काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्याकडून लागवडीचे तंत्र जाणून घेतले. या सर्व गोष्टींची शिदोरी उराशी बाळगून उसाची शेती करण्यास सुरुवात केली. त्यांची मेहनत आणि मार्गदर्शनाचा त्यांना पहिल्याच वर्षी झालेल्या उत्पादनातून लाभ झाला. त्यांनी दोन एकरवर उसाची लागवड केली. त्यात त्यांनी तब्बल 180 टन उसाचे उत्पादन घेतले. उसाची लागवड करून त्यांना जेवढे उत्पन्न मिळाले तेवढे उत्पन्न इतर पिकांच्या लागवडीतून मिळाले नसते, असे राजेंद्र शांभाले सांगतात. शिवाय आपल्या भागात ऊस होत नसल्याच्या गोष्टीलासुद्धा त्यांनी बगल देत इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला. भंडारा व नागपूर जिल्ह्यात स्थापन झालेल्या साखर कारखान्यांमुळे या भागातील बरेच शेतकरी ऊस लागवडीकडे वळले. मात्र कारखान्यांची जेवढी क्षमता आहे तितका ऊस मिळत नसल्याने बरेचदा कारखाने बंद असतात. या मागील मुख्य कारण या भागातील शेतकरी ऊस लागवड करण्यास उत्सुक नाहीत. मात्र शांभालेंसारख्या शेतकऱ्यांमुळे निश्‍चितच कारखान्यांपुढील संकट टळणार असून उसाच्या शेतीच्या रूपाने एक नवा पर्यायदेखील शेतकऱ्यांना गवसला आहे. 
===========================================
दिप्ती सरना अपहरण प्रकरणी 5 जणांना अटक 

गाझियाबाद - स्नॅपडीप कंपनीतील कर्मचारी दिप्ती सरना हिचे गेल्या आठवड्यात झालेल्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून हे अपहरण झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
दिप्ती सरना या 24 वर्षीय तरुणीचे बुधवारी दिल्लीजवळ कामावरुन घरी परतत असताना अपहरण झाले होते. दिप्ती रिक्षाने घरी येत असताना रिक्षाचालकास मारहाण करुन तिचे अपहरण करण्यात आले. यानंतर दोन दिवसांनी शुक्रवारी तिच्या वडीलांना तिचे अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याच दिवशी दिप्ती सुरक्षित घरी परतली होती आणि तिला रेल्वेमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले होते. अखेर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये नुकताच हरियानातील कारागृहातून बाहेर आलेल्या एका माथेफिरु कैद्याचाही समावेश आहे.
दिप्तीने आपले चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याचे म्हटले आहे. तसेच अपहरणकर्त्यांनी आपली काळजी घेतल्याचे आणि खंडणी मागितली नसल्याचेही तिने म्हटले आहे.
===========================================
लोणावळा:विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या 
लोणावळा येथील सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्याने आज (सोमवार) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. कॉलेजच्या वसतिगृहात गळफास घेऊन रोहितने आत्महत्या केली आहे. रोहित हा मूळचा सांगली येथील रहिवाशी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, लोणावळा ग्रामीणचे पोलिस घटनास्थळी दाखल आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
===========================================
नागपूर; अपंगाच्या पंखांना बळ देणारा देवदूत

नागपूर - लहानपणापासून पोलिओग्रस्त. घरची आर्थिक परिस्थिती बेताची व शिक्षणसुद्धा जेमतेमच. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आपल्या वाटेला आलेले आयुष्य इतरांच्या वाट्याला येऊ नये याच ध्येयाने अपंगाच्या आयुष्याला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने तो गेल्या पाच वर्षांपासून काम करीत आहे. त्याच्या पुढाकाराने आजवर शंभरावर अपंगांना कृत्रिम पाय लावून आत्मनिर्भर केले असून, त्यांच्यासाठी तो देवदूत ठरला आहे. 
शक्तिमातानगरचा रहिवासी असलेल्या सुमित ताटेला (वय 24) लहानपणापासून पोलिओ असल्यामुळे अनेक गोष्टींपासून वंचित राहावे लागले. पायाला त्रास असल्याने ये-जा करण्यासाठी त्रास व्हायचा. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सुखसुविधांचा अभाव होताच. मात्र, याही परिस्थितीत अपंगांसाठी काही तरी करण्याच्या तळमळीतून 2009 मध्ये सुमितने आधार अपंग विकास संस्थेची स्थापना केली. भावाकडे कुरियरच काम करून एकट्याच्या जोरावर संस्थेचा कार्यभार सांभाळला. हळूहळू संस्थेशी लोक जुळत गेले. आठ लोकांचा गट तयार झाला. संस्थेमार्फत आतापर्यंत चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर या भागातील अपंगांना इंडोलाइट कंपनीचे कृत्रिम पाय लावून देण्यात आले. प्रत्येकाच्या अपंगत्वाचा अंदाज घेऊन कृत्रिम पाय तयार केला जातो  
कृत्रिम पाय बसविण्यात आलेले काही जण सहज गाडी चालवितात. दूरपर्यंतचा प्रवास करतात. संस्थेकडून दहा वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंतच्या अपंगांना कृत्रिम पाय बसवून दिला जातो. त्यामुळे आधार या नावाप्रमाणेच ही संस्था अंपगासाठी आधार झाली आहे. 
===========================================
लातूर; घोटभर पाण्यासाठी रक्ताच्या चिळकांड्या
टॅंकरचा पाठलाग करून अनेक जण होताहेत घायाळ 
लातूर - उमरदरा हे गावाचं नावही तसं कुणी फारसं ऐकलेलं नसतं... पण जळकोट तालुक्‍यात (जि. लातूर) एका छोट्याशा ठिपक्‍यावर दुष्काळानं काळवंडलेला चेहरा घेऊन ते आपलं अस्तित्व दाखवून उभं राहिलेलं... दिवसभर टॅंकरची वाट बघत आणि घोटभर पाण्यासाठी त्याच्यामागे धावाधाव करणारं... अशाच घोटभर पाण्यासाठी मंदाबाईही हंडा-भांडी घेऊन धावत होती... पाणी मिळाल्यावरच तिच्या घरातली चूल जागी होणार होती, अन्न शिजणार होतं... ती धावत असतानाच आपल्या पोटातलं सारं पाणी रिकामं करून टॅंकर रिव्हर्स जात होता... टॅंकरला पकडण्याच्या प्रयत्नात टॅंकरच तिच्या पायावरून गेला आणि उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या... एक-दोन नव्हे, तर तेवीस टाके पडले... थेंब थेंब पाणी आणि हातभर टाके... 

गावात नुसताच टॅंकर येऊन चालत नाही, तर साऱ्या गावाचे ओठ निदान ओले तरी होतील एवढं पाणी लागतं त्यात... पण त्याची खात्री नसल्यानं पाण्याचा टॅंकर नुसताच पाणी घेऊन येत नाही, तर अपुरं पाणी पकडायला लावण्यासाठी जणू एक युद्धही घेऊन येतो. उमरदऱ्यात असंच एक युद्ध झालं आणि त्यात मंदाबाई घायाळ झाली. टॅंकरमागं धावण्याची क्षमता आता तिच्यात नाही. पाय हातात घेऊन बसण्याची वेळ आली. अनेक दुष्काळी गावांनी अनेक मंदाबाईंना जन्माला घातलंय... दौऱ्यात नजरलेला पडलेली ही एक मंदाबाई. 

...तर टॅंकर वळणंवळणं घेत नेहमीच्या ठरलेल्या जागेवर येऊन उभा राहीपर्यंत टॅंकरच्या छाताडावर चढून त्याच्या पोटात पन्नासपेक्षा अधिक पाइप डोळ्याचं पातं लवण्याच्या आतच गेले; आणि अवघ्या साडेचार मिनिटांत दहा हजार लिटरचा टॅंकर खडखडीत झाला... टॅंकरभोवतीचं मोहोळ शांत झालं... लगबगीनं पाण्यासाठी धावणारी पावलं शेवटची पाण्याची फेरी घेऊन शांतपणे घराकडं जाऊ लागली... काही जण रिकामी भांडी घेऊन हात हलवतच परतले. 
गावात दिवसातून तीन वेळा टॅंकर येतो आणि तो असाच चार ते पाच मिनिटांत संपून जातो. त्या पाच मिनिटांत त्या गावात जे युद्ध उभं राहतं, त्यात म्हाताऱ्याकोताऱ्यांकडं पाहिलं जात नाही, की शेजाऱ्यापाजाऱ्यांकडं पाहिलं जात नव्हतं. अशाच युद्धात गेल्या आठवड्यात मंदा लाडगे यांच्या पायाच्या घोट्यावरून पाण्याचा टॅंकर गेला. रक्‍ताचा पाट वाहू लागला होता; पण कोणालाच त्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. मंदाबाईंच्या पायाच्या रक्‍ताचा सडा पडला होता आणि इकडं पाण्याचं युद्ध थांबलं होतं. मंदाबाईंना सार्वजनिक रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्या पायाला 30 टाके पडले. यापुढे बाई दोन महिन्यांसाठी अंथरुणावर पडून असणार आहे. "पुढच्या महिन्यात दोन नंबरच्या मुलीचं लग्न आहे. नवऱ्याला दोन महिन्यांपूर्वी पक्षाघाताचा झटका आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता माझं हे असं झालं. गावातला टॅंकर बंद होईल म्हणून गाववालेपण टॅंकरवाल्याला काही बोलले नाहीत. मला आर्थिक मदतही मिळाली नाही,‘ असं मंदाबाईंनी सांगितलं. 

मंदा लांडगेंचं वय 37, त्यांच्या यजमानांचं 42. त्यांना पाच मुली आणि एक मुलगा. मंदाबाईंचे यजमान हॉटेलमध्ये नोकरी करायचे; पण पक्षाघाताचा झटका आल्याने ते आता घरीच असतात. एका मुलीचं लग्न झालंय, तर दुसरीचं पुढच्या महिन्यात आहे. स्वतःच्या घरावर पत्रापण नाही. मुली वयात आल्यात म्हणून एक हजार रुपये भाड्यानं हे घर घेतलंय. पण, गरिबांसाठी असलेल्या सरकारच्या कुठल्याच योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. सरकारी योजनांचा लाभ ग्रामसेवकाच्या जवळच्या असणाऱ्यांनाच मिळतो, याचा पाढा वाचायला त्यांनी सुरवात केली. त्यांचीच "री‘ ओढत, "गेली चाळीस वरसं माझं झोपडंच हाये; पण घरकुल योजनेत आमचा नंबर कधीच लागत नाही,‘ निवृत्ती गितेंनी तक्रार केली. हीच तक्रार अंगणवाडीत खिचडी बनवणाऱ्या विधवा कालिंदी केद्रेंचीपण होती. 

या गावात 2003 पासून दर वर्षी उन्हाळ्यात टॅंकर येतो. या वर्षी मात्र डिसेंबरपासूनच टॅंकर सुरू झाला आहे. दरदिवशी नेहमी तीन टॅंकर या गावात येतात; पण त्याचं नियोजन शून्य आहे. गावात तीन विहिरी आहेत; पण खूप गाळ असल्यानं टॅंकरचं पाणी विहिरीत ओतलंच जात नाही. त्यामुळे अख्खा दिवस संपूर्ण गाव टॅंकरची वाट पाहतं. तीन टॅंकरसाठी होणाऱ्या बारा ते पंधरा मिनिटांच्या पाणीयुद्धात गाव सहभागी होतं. दिवसभर कोणाची किती भांडी भरली यावर चर्चा सुरू होते. 

गाळ का नाही हटत? 
विहिरीतला गाळ काढून त्यामध्ये टॅंकरचं पाणी ओतण्यासाठी कोणी पुढाकार का घेत नाही? अशा प्रकारचे अपघात, लोकांचा वेळ आणि सर्वांना पाणी मिळावं यासाठी विहीर स्वच्छ का केली जात नाही? याचं मात्र कोणाकडेच उत्तर नव्हतं. अगदी मंदाबाईंच्या पायाला पडलेल्या टाक्‍यांकडेही नाही. 
===========================================

कोल्हापूर; एसटी चालकाचा स्टेअरिंगवरच हार्ट अॅटकने मृत्यू, बस झाडावर आदळली

एसटी चालकाचा स्टेअरिंगवरच हार्ट अॅटकने मृत्यू, बस झाडावर आदळली
कोल्हापूर बस चालवताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मीरज-गणपतीपुळे एसटीचा अपघात झाला. पन्हाळा तालुक्यातील नावली गावाजवळ सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. 
अपघातात चालक बाबुराव सावंत यांचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत.
Kolhpaur accident
मिळालेल्या माहितीनुसार गाडी चालवत असताना सावंत यांना ह्रदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याच्या तोंडातून फेस यायला लागल्याने त्यांचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस झाडाला जाऊन आदळली. 
अपघातातील जखमींवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पण या अपघातामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा कामावारच्या ताणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
===========================================

भारतीय रेल्वे कर्मचारी (एन.एफ.आई.आर.) दिनांक ११ एप्रिल २०१६ पासून अनिश्चित कालीन देशव्यापी संपावर जाणार


साऊथ सेन्ट्रल रेल्वे इम्पलोयीज संघ, नांदेड आणि नेशनल फेडरेशन ऑफ इंडिअन रेल्वेमेन यांच्या वतीने  दिनांक ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या  विरोधात देशव्यापी संपावर जाण्या विषयी गुप्त मतदान पद्धतीने मत विचारण्यात आले. यात संपूर्ण नांदेड विभागातून जसे कि परभणी, जालना, औरंगाबाद, अकोला, खांडवा, वाशीम, हिंगोली, आदिलाबाद, किनवट आणि पूर्णा येथून ९९ % रेल्वे कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्यास आपला होकार दर्शविला. अशाच प्रकारचे गुप्त मतदान पद्धतीने भारतीय रेल्वेत नेशनल फेडरेशन ऑफ इंडिअन रेल्वेमेन यांच्या वतीने रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांचे संपावर जाण्या विषयी मत विचारले होते. यात ९९% रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपला होकार दर्शविल्याचे श्री. यु. वेंकटेशवर्लू, विभागीय सचिव, नांदेड यांनी कळविले. 
या नुसार दिनांक ११ मार्च २०१६ रोजी भारत सरकारला या संपाची नोटीस बजावण्यात येणार आहे. आणि दिनांक ११ एप्रिल २०१६ पासून संपूर्ण भारतीय रेल्वे वर अनिश्चित कालीन संप पुकारण्यात येणार आहे. 

७ व्या वेतन आयोगाने ज्या जाचक शिफारशी केल्या आहेत त्या विरोधात हे आंदोलन कण्यात येणार आहे. नेशनल फेडरेशन ऑफ इंडिअन रेल्वेमेन ह्या  प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत –
१.      रेल्वे बोर्डाने नेमलेल्या समितीच्या शिफारशी नुसार कमीत कमी वेतन २६,०००/- रुपये करणे.
२.      ७ व्या वेतन आयोगाने सुचविलेला २.५७ % चा फार्मुला ना मानता पाचव्या आणि  सहाव्या वेतन आयोगा प्रमाणे पगार वाढ करणे.
३.      नवीन पेन्शन पद्धत रद्ध करणे.
४.      निजीकरण, कंत्राट दारी पद्धत ला विरोध.
५.      वार्षिक वेतन वाढ ५ % प्रमाणे करणे.
६.      कामगार कायद्यात सुचविलेला अमानुष बदल रद्द करणे.

या प्रसंगी श्री. यु. वेंकटेशवर्लू , विभागीय सचिव, नांदेड यांनी कळविले कि भारत सरकार रेल्वे विभागाला कमजोर करून याचे निजीकरण करण्याचे प्रयत्न करत आहे. याला सर्व रेल्वे कामगार संघटनांचा विरोध आहे. या विरोधात हि देशव्यापी हडताल करण्यात येणार आहे. या साठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे मत गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आले आहे. 

गुप्त मतदान पद्धतीने या धरणे आंदोलना विषयी मत नोंदविण्याचे काम श्री कार्तिक सोनुले, विभागीय अध्यक्ष, श्री एम. श्रीधर, उप विभागीय सचिव, श्री प्रकाश हाटकर, उप विभागीय सचिव, श्री संजीव दासरवार, राजेश शिंदे,  सागर तेजराव, जाधव, विनोद मगर, सुशील कुमार सिंग, रवि वर्मा, रवि धोंडू आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केले 

No comments: