Saturday, 27 February 2016

नमस्कार लाईव्ह २७-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- अतिरेक्याचा आयफोन डेटा देण्याचा कोर्टाचा आदेश, अॅपलचा सपशेल नकार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- महिला प्रवाशाचा एक ट्वीट, रेल नीर 20 ऐवजी 15 रुपयांना 
३- मालगाडीचे 4 डबे घसरुन भुसावळ-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प 
४- ट्रेनमधील ब्लँकेटची दोन महिन्यांतून एकदा धुलाई 
५- दिग्विजयसिंह आज करणार आत्मसमर्पण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- मुख्यमंत्र्यांनी माणिकराव ठाकरेंवर ठोकला मानहानीचा दावा 
७- मराठीदिन निमित्त मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर अभिमान गीत 
८- 'स्मृती इराणी संसदेत खोटे बोलल्या'- रोहितचे कुटुंबीय 
९- ओडिशामध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार तर २ जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- भिवंडी; नगरसेवकाचा प्रताप, पाणीटंचाईची तक्रार करणाऱ्या महिलेच्या घरावर दगडफेक 
११- कोपरगावात दोन बेवारस मृतदेहांची कचरागाडीतून वाहतूक 
१२- कल्याण; टीव्ही रिमोटवरून बहिणीशी झालेल्या वादानंतर ११ वर्षीय मुलाची आत्महत्या 
१३- गांधीनगर; पंतप्रधान मोदींच्या गावातील सरकारी शाळांमध्येच नाहीत स्वच्छतागृहे 
१४- नाशिक; पेट्रोल साडेतीन, डिझेल अडीच रुपये होणार स्वस्त 
१५- पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, १ ठार तर २ गंभीर जखमी 
१६- विदर्भातील काही तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- ख्रिस गेलच्या गिफ्टमुळे बिग बी भारावले 
१८- अस्सं सासर सुरेख, अभिनेत्री मृणाल दुसानिस विवाहबंधनात 
१९- आशिया चषकात ब्लॉकबस्टर मुकाबला, भारत-पाक आज भिडणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
हर्षवर्धन गायकवाड, स्नेहा राठोर, बंटी गायकवाड, प्रवीण काडवादे, लक्ष्मीकांत साखरे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे नशिबाचा एक भाग असतो, पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणे हे आपले कौशल्य असते 
[अरविंद पांचाळ, दाभडकर]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


=====================================

मराठीदिन निमित्त मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर अभिमान गीत

#मराठीदिन निमित्त मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर अभिमान गीत
मुंबई : मराठी राजभाषा दिवसाचं औचित्य साधून रेल्वेतर्फे मुंबईत एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर मराठी भाषा अभिमान गीत वाजवलं जात आहे.
मध्य रेल्वेने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि संगीतसृष्टीतील विविध सुप्रसिद्ध गायक-गायिकांच्या आवाजात असलेलं मराठी अभिमान गीत ऐकवलं जात आहे. हे गीत कवी सुरेश भट यांच्या लेखणीतून उतरलं आहे.
कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने रेल्वेने अनोख्या पद्धतीने मांडलेला मायमराठीचा जागर कौतुकास्पद ठरत आहे.
=====================================

महिला प्रवाशाचा एक ट्वीट, रेल नीर 20 ऐवजी 15 रुपयांना

महिला प्रवाशाचा एक ट्वीट, रेल नीर 20 ऐवजी 15 रुपयांना
नवी दिल्ली : प्रवाशांच्या ट्वीटची तातडीने दखल घेऊन त्यांच्या समस्या दूर करण्याचा चंगच रेल्वे मंत्रालयाने बांधला आहे. अजीमाबाद एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने पाण्याच्या बाटलीचे वाढीव दर आकारत असल्याचा ट्वीट केला नि आश्चर्य म्हणजे विभागीय रेल्वे व्यवस्थापकच पाण्याची बाटली घेऊन हजर झाले.अजीमाबाद एक्स्प्रेसच्या एसी फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या स्वाती यांनी पाण्याच्या बाटलीची छापील किंमत 15 रुपये असूनही 20 रुपये आकारले जात असल्याचा ट्वीट केला. रेल्वे मंत्रालयाने स्वाती कुमारी यांच्या ट्वीटची दखल घेऊन अधिक तपशील द्यावेत, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर अलाहाबादमध्ये खुद्द डीआरएम म्हणजे विभागीय रेल्वे व्यवस्थापकच 15 रुपयांची पाण्याची बाटली घेऊन आले.स्वाती यांनी पाण्याची बाटली विकत घेतल्यानंतर रेल्वे मंत्र्यांचे ट्विटरवरुन आभारही मानले. दुसरीकडे अलाहाबाद रेल्वे मंडळाने रेल नीरसाठी अतिरिक्त पैसे वसूल करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी प्रवाशांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन विक्रेते अवाजवी शुल्क आकारत असल्याचं अनेकदा ऐकायला मिळतं.
=====================================

मालगाडीचे 4 डबे घसरुन भुसावळ-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प

मालगाडीचे 4 डबे घसरुन भुसावळ-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प
जळगाव : भुसावळ यार्डात मालगाडीचे 4 डबे घसरून भुसावळ – नागपूर रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागपूरहून मुंबईला येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या जागीच थांबल्याने मोठा खोळंबा झाला आहे.
शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतूक अशीच ठप्प राहण्याची शक्यता आहे.
या अपघातामुळे एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. डबे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
=====================================

ख्रिस गेलच्या गिफ्टमुळे बिग बी भारावले

ख्रिस गेलच्या गिफ्टमुळे बिग बी भारावले
मुंबई : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या गिफ्टने बिग बी अमिताभ बच्चन चांगलेच भारावून गेले आहेत. गेलच्या गिफ्टने नव्हे तर गेल आपल्याला ओळखतो, हीच मोठी बाब असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ख्रिस गेलने त्याची स्पार्टन बॅट भेट दिली आहे. स्वत: बिग बींनी याबाबत ट्विट केलं आहे.
“ख्रिस गेल…तोच ख्रिस गेल जो हिंदी सिनेमांचा चाहता आहे. त्याने मला त्याने सही केलेली सोनेरी बॅट दिली आहे. माझ्यासाठी हा साक्षात्कारच आहे” असं ट्विट बिग बींनी केलं आहे.
=====================================

ट्रेनमधील ब्लँकेटची दोन महिन्यांतून एकदा धुलाई

ट्रेनमधील ब्लँकेटची दोन महिन्यांतून एकदा धुलाई
नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात तुम्हाला पुरवल्या जाणाऱ्या चादरी, ब्लॅंकेट, बेडशीट, उशी यासारख्या वस्तूंच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारं वृत्त आहे. रेल्वेतील ब्लँकेटची दोन महिन्यांतून एकदाच धुलाई होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
‘पूर्वी प्रवासी उशी, चादर यासारख्या वस्तू घरुन आणत. ही प्रक्रिया बरी होती’, असं राज्यसभेचे सभापती हामिद अन्सारी यांनी सांगितलं असता काँग्रेस खासदाराने रेल्वे राज्यमंत्र्यांकडे यासाठी परवानगी मिळेल का, अशी विचारणा केली. त्यावर, ही सूचना चांगली असून रेल्वेची कोणतीही हरकत नाही, असं रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी स्पष्ट केलं. 
राज्यमंत्र्यांच्या माहितीनुसार सध्या रेल्वेकडे फक्त 41 मशिन लाँड्री आहेत. पुढील दोन वर्षांत हा आकडा 25 ने वाढवण्याचा प्रयत्न आहे. सध्या जिथे मशिन लाँड्री नाहीत, तिथे बाहेरुन धुलाई प्रक्रिया केली जाते, अशी माहिती सिन्हांनी दिली. 
रेल्वेतील ब्लँकेटची दोन महिन्यांतून एकदाच धुलाई होत असली तरी चादरी, बेडरोल रोज स्वच्छ केले जातात, अशी माहिती राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात देण्यात आली.
=====================================

अस्सं सासर सुरेख, अभिनेत्री मृणाल दुसानिस विवाहबंधनात

अस्सं सासर सुरेख, अभिनेत्री मृणाल दुसानिस विवाहबंधनात
मुंबई : ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस विवाहबंधनात अडकली आहे. 25 तारखेला नाशिकमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
लग्नानंतर मृणाल दुसानिस मिसेस मृणाल मोरे झाली आहे. नीरज मोरे असं तिच्या पतीचं नाव असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मुळचा पुण्याचा असलेला नीरज गेली सहा वर्षे अमेरिकेत राहत आहे. तो अमेरिकत असला तरीही मृणालचं ‘सुरेख सासर’ पुण्यात आहे. तिथेच त्यांचा चहा-पोह्यांचा कार्यक्रम झाला होता. 
सध्या कलर्स मराठीवर मृणालची ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका सुरु आहे. मालिकेचा शेवट झाल्यानंतर मृणाल अमेरिकेला रवाना होणार असल्याचं समजतं. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ‘तू तिथे मी’ या मृणालच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. शिवाय एकापेक्षा एक अप्सरा आलीमध्ये तिचा डान्सही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
=====================================

आशिया चषकात ब्लॉकबस्टर मुकाबला, भारत-पाक आज भिडणार

आशिया चषकात ब्लॉकबस्टर मुकाबला, भारत-पाक आज भिडणार
मिरपूर: बांगलादेशातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला ब्लॉकबस्टर मुकाबला रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी मिरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर आज आमनेसामने येतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता या सामन्याची सुरुवात होणार आहे.
टीम इंडियानं बांगलादेशला 45 धावांनी हरवून आशिया चषकात विजयी सलामी दिली. भारताला आता स्पर्धेतल्या दुसऱ्या लढतीत सामना करायचा आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा. वर्षभरापूर्वी म्हणजे 15 फेब्रुवारी 2015 रोजी अॅडलेड ओव्हलवर वन डे विश्वचषकाच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांना भिडले होते. तेव्हा भारतानं पाकिस्तानला 76 धावांनी लोळवलं होतं. त्यानंतर गेल्या वर्षअखेरीस दोन देशांमध्ये प्रस्तावित मालिका रद्द झाली. त्याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही टीम्स पुन्हा एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहे.
=====================================

कोपरगावात दोन बेवारस मृतदेहांची कचरागाडीतून वाहतूक

कोपरगावात दोन बेवारस मृतदेहांची कचरागाडीतून वाहतूक
कोपरगाव : कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला सन्मानपूर्व वागणूक देण्याची पद्धत आहे. मात्र कोपरगाव नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी याला हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बेवारस आयुष्य जगलेल्या दोघांच्या नशिबी मृत्यूनंतरही कचरा गाडी आली. एक बेवारस महिला आणि एका बेवारस पुरुषाच्या मृतदेहाची कचऱ्याच्या गाडीतून विल्हेवाट लावल्याने माणुसकी कुठं हरवली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन दिवसांपूर्वी दोघांचा मृत्यू झाला होता. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शववाहिनी असतानाही कचरा गाडी का वापरण्यात आली, असे माणुसकीला काळे फासणारे आदेश कोणी दिले, हाच प्रश्न विचारला जात आहे.
शिर्डीमध्ये काहीच दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची जवळच असलेल्या कोपरगावात पुनरावृत्ती झाल्याने जनसामान्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
=====================================

अतिरेक्याचा आयफोन डेटा देण्याचा कोर्टाचा आदेश, अॅपलचा सपशेल नकार

अतिरेक्याचा आयफोन डेटा देण्याचा कोर्टाचा आदेश, अॅपलचा सपशेल नकार
कॅलिफोर्निया: सॅन बर्नार्डिनोमध्ये दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचा आयफोन  अनलॉक करण्यास अॅपलनं चक्क कोर्टालाही नकार दिला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेल्स कोर्टानं मंगळवारी अॅपल फोनच्या चौकशीसाठी एफबीआयच्या मदतीचे आदेश दिले आहेत.
कंपनीला ऑटो इरेज फंक्शन निष्क्रिय करण्यास कोर्टानं सांगितलं आहे. तर फोनचा पासवर्ड आणि त्यातील डेटा मिळविण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचाही आदेश कोर्टानं दिला आहे. पण दुसरी अॅपलचा सीईओ टीम कुकनं मात्र, या गोष्टीला नकार दिला आहे. कोर्टाचा हा आदेश अतिशय धोकादायक असून या आदेशाला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे.
कोर्टाच्या आदेशनुसार याचे अनेक सुरक्षा फीचर निष्प्रभ होतील आणि हे ग्राहकांच्या सुरक्षेबाबत चुकीचे ठरेल असं अॅपलचं म्हणणं आहे
=====================================

मुख्यमंत्र्यांनी माणिकराव ठाकरेंवर ठोकला मानहानीचा दावा

मुख्यमंत्र्यांनी माणिकराव ठाकरेंवर ठोकला मानहानीचा दावा
मुंबई: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंविरुद्ध मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तशी नोटीस माणिकरावांना धाडली आहे. तसेच या नोटीशाला दोन आठवड्यात माणिकरावांनी उत्तर द्यावं असंही बजावण्यात आलं आहे.
अक्सिस बँकेत जी काही खाती उघडण्यात आली त्याच्याशी माझा आणि माझ्या पत्नीचा काहीही संबंध नाही. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ही नोटीस पाठवली आहे.
दरम्यान, एसआरए योजनेत पैसे भरण्यासाठी अॅक्सिस या खासगी बँकेत खातं उघडण्यात आली. आपल्या पत्नीला नोकरीत फायदा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला होता.
मुख्यमंत्र्याच्या पत्नी मुंबईत ज्या शाखेत काम करतात त्याच शाखेत एसआरए खाते धारकांना खातं उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्यात अनेक राष्ट्रीयकृत बँकांचं जाळ असताना मुख्यमंत्र्यांनी अॅक्सिस बँकेचीच का निवड केली? असा सवाल ठाकरेंनी विचारला होता.
=====================================

भिवंडी; नगरसेवकाचा प्रताप, पाणीटंचाईची तक्रार करणाऱ्या महिलेच्या घरावर दगडफेक

नगरसेवकाचा प्रताप, पाणीटंचाईची तक्रार करणाऱ्या महिलेच्या घरावर दगडफेक
भिवंडी: पाणीटंचाईची तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरावर राष्ट्रवादीच्या नगरेसवकाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास बाळू पाटील यांच्यासह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी शहरातील भंडारी कम्पाऊंड परिसरात राहणाऱ्या वैशाली झा पाणी टंचाईसंदर्भात तक्रार करण्यासाठी नगरसेवक विकास पाटील यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी विकास पाटील यांनी अपशब्द वापरून वैशाली झा यांना परतावून लावलं. तसंच विकास पाटील यांनी गुंडांना पाठवून घरावर दगडफेक केल्याचा आरोप वैशाली झा यांनी केला आहे.
या प्रकरणी नगरसेवक विकास पाटील यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
=====================================

कल्याण; टीव्ही रिमोटवरून बहिणीशी झालेल्या वादानंतर ११ वर्षीय मुलाची आत्महत्या


  • कल्याण, दि. २७ - रिमोट कंट्रोलने टीव्ही चॅनेल बदलण्याच्या मुद्यावरून बहिणीशा झालेल्या वादानंतर ११ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या मुलाच्या वडिलांनी तीन वर्षांपूर्वी  राहत्या घरीच आत्महत्या केली होती, तेव्हापासूनच तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता, असे समजते.
    मृत मुलगा एस.व्ही.एम. इंग्रजी शाळेचा विद्यार्थी असून कल्याण पूर्वेकडील शिवाजी नगर परिसरातील एका इमारतीत आई, चार बहिणी व एका लहान भावासह रहात होता. बुधवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास टीव्ही पाहण्यावरून त्याचा मोठ्या बहिणीशी वाद झाला. त्यामुळे रागावलेला मुलगा दुस-या खोलीत निघून गेला आणि त्याने थेट पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. थोड्या वेळाने त्याची दुसरी बहीण त्या खोलीत गेली असता, तिला आपला भाऊ पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
    या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना विशेषत: त्याच्या आईला मोठा धक्का बसला. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीच्या आत्महत्येनंतर त्या मुलांसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या व पतीचे किराणा मालाचे दुकान सांभाळू लागल्या. आर्थिक तंगी असतानाही त्यांनी अथक मेहनत करून सर्व मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवले होते. मात्र आपल्या मुलाच्या या कृत्यामुळे त्या पूर्णपणे खचूगेल्या आहेत. ' माझा मुलगा अभ्यासात अतिशय हुशार होताच, पण त्याने असे ( आत्महत्येचे) पाऊल का उचलले मला समजत नाही !  आपल्यालाही एक दिवस चांगल जीवन जगता येईल अशा माझ्या सर्व आशा आता धुळीत मिळाल्या आहेत' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
=====================================

गांधीनगर; पंतप्रधान मोदींच्या गावातील सरकारी शाळांमध्येच नाहीत स्वच्छतागृहे


  • गांधीनगर, दि. २७ -  संपूर्ण देशाच्या तुलनेत गुजरातमध्ये सर्वाधिक स्वच्छतागृह बांधल्याचा दावा गुजरात सरकारने केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जन्मगाव असलेल्या वडनगरमध्येच सरकारी शाळांमध्ये स्वच्छतागृहं (शौचलये) नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हीच परिस्थिती गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मेहसाणा जिल्ह्यातील विजापूर या जन्मगावातही आहे. 
    मेहसाणा जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी किती सरकारी शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सोय नाही व त्यासाठी सरकारने काय पावले उचलली आहेत? असा सवाल आमदार प्रल्हाद पटेल यांनी राज्यभेत विचारला होता. त्यासंबंधी उत्तर देताना राज्य शिक्षण मंत्री भूपेंद्रसिह चुडासामा यांनी विजापूर व वडनगरमध्ये सरकारी शाळांत स्वच्छतागृहे नसल्याचे स्पष्ट केले. 
    २०१६-१७ या वर्षात ७ लाख स्वच्छतागृह बांधण्याचे गुजरात सरकारचे लक्ष्य असून त्यासाठी ७८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
    अधिकृत माहितीनुसार, २०१२ मधील बेसलाईन सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये ७०, २९,१९९ कुटुंबे रहात असून त्यापैकी ३३,२१,०४७ घरांमध्ये शौचालये नाहीत. जून २०१५ पर्यंत सुमारे ६ लाख ४८ हजार ९८१ शौचालये बांधण्यात आली मात्र अद्याप २६ लाख ७२ हजार ०६६ शौचालयांचे बांधकाम बाकी आहे.
=====================================
स्मृतीजींसारखी आई आम्हाला नको-विद्यार्थी
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लक्षात घ्यावे की विद्यापीठातील विद्यार्थी त्यांची मुले नाहीत आणि आम्हाला तुमच्यासारखी आई नको आहे, असे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला विद्यार्थी अनंत प्रकाश नारायण याने म्हटले आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) भारताविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारसह सात जणांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर देशभर गदारोळ सुरु असून, स्मृती इराणी यांनी लोकसभेत निवेदन दिले होते. लोकसभेत समोर विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांनी अत्यंत आक्रमक आणि प्रक्षोभकतेकडे झुकणारे भाषण केले होते.
यावर बोलताना विद्यार्थी अनंत नारायण म्हणाला की, स्मृती इराणींनी एकाच धर्माला प्राधान्य देत हेट स्पीच दिले. इराणींनी दिलेले भाषण आरएसएसची विचारधारा पसरविण्याचा प्रयत्न होता. मी डाव्या विचारसरणीचा असून, देवाला मानत नाही. त्यामुळे दुर्गा व महिषासूर यांच्यावर माझा विश्वास नाही. आपल्या देशातील नागरिक महिषासूर आणि रावणाचीही पूजा करतात, हे इराणींना माहिती नाही का?
=====================================
दिग्विजयसिंह आज करणार आत्मसमर्पण
नवी दिल्ली - मध्य प्रदेश विधानसभा भरती गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांच्या अटकेचे आदेश निघाल्यानंतर आज (शनिवार) ते न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहेत.

या प्रकरणात भाजपने दिग्विजयसिंह यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिग्विजयसिंह उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट प्रसिद्ध केले होते. अखेर आज दिग्विजयसिंह न्यायालयात आत्मसमर्पण करणार असून, आपली बाजू मांडतील.

त्यापूर्वी दिग्विजयसिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपला लक्ष्य केले आहे. व्यापमं भ्रष्टाचार प्रकरणात भाजपला उजेडात आणल्यानेच भाजपने माझ्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नसलेले 20 वर्षांपूर्वीचे प्रकरण पुन्हा चर्चेत आणले आहे. या हुकुमशाहीविरोधात मी आवाज उठवत राहणारच.
=====================================
पेट्रोल साडेतीन, डिझेल अडीच रुपये होणार स्वस्त
नाशिक - पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा विशेष अधिभार रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल साडेतीन रुपये आणि डिझेल 2 रुपये 42 पैशांनी स्वस्त होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा पेट्रोल, डिझेल वेल्फेअर असोसिएशनचे सचिव विजय ठाकरे यांनी दिली. 

तेल कंपन्यांनी विशेष अधिभाराची वसुली महाराष्ट्रात थांबवावी, यासाठी ग्राहक संरक्षणमंत्री गिरीष बापट यांनी मंत्रालयात संयुक्त बैठक घेतली. सन 2002 मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 1 रुपया 20 पैसे अधिभार (सेस) लावण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर 2014मध्ये पेट्रोल व डिझेलचे दर पूर्णपणे नियंत्रणमुक्त करण्याचा व त्याचे दर ठरविण्याचा अधिकार तेल उत्पादक कंपन्यांना देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. या निर्णयामुळे महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा अधिभार 2014 मध्येच हटविणे गरजेचे होते. पण तसे न करता पेट्रोल, डिझेलवरील सेस आकारणी चालूच होती. 
सध्या पेट्रोलवर प्रति लिटर साडेतीन रुपये आणि डिझेलवर अडीच रुपये प्रति लिटर अधिभार आकारला जातो. याप्रकरणी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांच्याकडे गेल्या महिन्यात तक्रार करून राज्यात डिझेल व पेट्रोलवर सुरू असलेली अधिभारवसुली बंद करण्याची मागणी केली. याची दखल घेत मंत्री गिरीष बापट यांनी पेट्रोल, डिझेल व अन्य बारा पेट्रोलियम पदार्थांवर महाराष्ट्रात किती अधिभार वसुली झाली याचा अहवाल पंधरा दिवसांत मागवला आहे. यासंदर्भात सतरा फेब्रुवारीला मंत्रालयात झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर बापट यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना एक पत्र लिहून महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार रद्द करावा, अशी मागणी केली आहे.  
=====================================
'स्मृती इराणी संसदेत खोटे बोलल्या'
हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी संसदेमध्ये दिलेले स्पष्टीकरण खरे नसून, त्या खोटे बोलल्या आहेत, असा गंभीर आरोप रोहितच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला. रोहितसहित तीन विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले होते. ज्या दिवशी रोहितचा मृत्यू झाला त्या दिवशी पोलिस आणि डॉक्‍टरांना त्याच्या खोलीमध्ये जाऊ दिले गेले नाही. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करता आला असता; पण याबाबत जाणीवपूर्वक खोटी माहिती प्रसारित करण्यात आली, असा आरोप रोहितच्या कुटुंबीयांनी केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितची आई राधिका आणि भाऊ राजा हे दोघे सहभागी झाले होते. 
विद्यापीठाच्या डॉक्‍टरांनी सायंकाळी सातच्या सुमारास रोहितला मृत घोषित केले होते. याबाबत त्यांनी 25 जानेवारी रोजी समोर येऊन वक्तव्यही केले होते. जोपर्यंत आपण घटनास्थळी पोचलो तेव्हा रोहितचा मृत्यू झाला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियात व्हारयल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या खोलीत रोहितने आत्महत्या केली होती, त्याच खोलीत एका बाजूस त्याचा मृतदेह आणि पोलिस स्पष्टपणे दिसत आहेत. ज्या विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने हा निर्णय घेतला, त्यामध्ये एकही दलित प्रतिनिधी नव्हता, असा दावा कुटुंबीयांनी केला. विद्यापीठाचे कुलगुरू आणि अध्यक्ष अप्पाराव यांना मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनीच नेमले असून, कार्यकारी समितीच्या अकरा सदस्यांमध्ये अनुसूचित जाती अथवा जमातीमधील एकही सदस्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 
=====================================

No comments: