Tuesday, 9 February 2016

नमस्कार लाईव्ह ०९-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 

१- सियाचीन; हिमस्खलनात गाडलेल्या 10 जवानांपैकी एक जवान जिवंत 

२- न्यूयॉर्क; पगडी घातल्यामुळे शीख अभिनेत्याला विमानात प्रवेश नाकारला 

३- नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे निधन  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

४- हेडलीची सलग दुसऱ्या दिवशी साक्ष सुरु, पाकचा नापाक चेहरा समोर 

५- अंजली दमानिया आणि अलेक पदमसी उभारणार टॅक्स न देण्यासाठी संघटना 

६- आयसिसविरोधी कारवाईत निष्पाप मुस्लीम भरडू नयेत : बुखारी 

७- मुंबई २६/११ हल्ला : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयबरोबर निकटचे संबंध असल्याचे हेडलीने मान्य केले - उज्वल निकम 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

८- पंकज भुजबळ ईडी कार्यालयात, भुजबळ समर्थक विमानतळावर 

९- गेल्या 15 वर्षातील सत्ताधीशांची संपत्ती थक्क करणारी: मुख्यमंत्री 

१०- बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर कानडी सक्ती, ही असहिष्णुता नाही का? -उद्धव ठाकरे 

११- आज भुजबळांची ‘घरवापसी’, समर्थक शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत  

१२- केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांच्या हेलिकॉप्टरचं झाले इमरजन्सी लँडिंग 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

१३- जालना;  कारच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, 3 जखमी

१४- पुणे; अनिरुद्धचा भीमपराक्रम, कोवळ्या वयात 50 गड-किल्ले सर 

१५- सानपाडाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, वाशी-पनवेल मार्गावरील लोकल ठप्प 

१६- अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा: आकृती डेव्हलपर्सचे मालकांना अटक 

१७- नाशिक : पिंपळगावात भाव पडल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला,  ठोक बाजारात कांदा 6 रुपये किलो

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

१८- VIDEO: 'बी.ए पास'चा सीक्वल 'एम.ए पास'चा ट्रेलर रिलीज 

१९- आज भारत विरुद्ध श्रीलंका, पुण्यात टी-20चा थरार 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[नांदेड]

२०- जि.प. च्या निम्म्या कर्मचाऱ्यांची दांडी, अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर प्रशासन करणार कारवाई 

२१- मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा ड्रेसकोड बदलणार, आयुक्तांच्या शिक्षण विभागाला सूचना 

२२- किनवट; गणेशपूर येथील विद्यार्थ्याची विष पिवून आत्महत्या 

२३- कंधारला दुष्काळाचे १३ कोटी ६० लाख 

२४- माहूर; तस्करांचा वनरक्षकांवर हल्ला 

२५- बरड; शेतकऱ्याच्या गोठ्यास आग, शेतीची अवजारे, ठिबक साहित्य जळून खाक 

२६- प्रदुषणावर लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेतर्फे रस्ता रोको 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[वाढदिवस]

अतुल यादव, अनमोल जैन, विजय कुमार, अजय जगताप, अर्णव फालोर, शैलेन्द्र, परमेश्वर नखाते 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

हसण्यानं आयुष्य निरोगी होतं आणि दुसऱ्यावर हसण्यानं निरुपयोगी 

(उत्तम मन्ना, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

विकणे आहे 

भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.

संपर्क- 7350625656

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चॉकलेट-डे साठी खास चॉकलेट 

प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट उपलब्ध, अगदी लगेच...

लिप्स चॉकलेट, हार्ट चॉकलेट, गिफ्ट चॉकलेट आणि बरेच प्रकार 

अधिक माहितीसाठी कॉल करा.

संपर्क- 9423785456, 7350625656 

ढिंच्याक चॉकलेटच्या अधिक माहितीसाठी लिंक- https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/05/blog-post_17.html

व्हिडीओ पहा - https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/dhinchyak-chocklate.html

*****************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://goo.gl/uS8DX4

=======================================================

पंकज भुजबळ ईडी कार्यालयात, भुजबळ समर्थक विमानतळावर

पंकज भुजबळ ईडी कार्यालयात, भुजबळ समर्थक विमानतळावर
मुंबई : समन्स बजावल्यानंतर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनायाच्या कार्यालयात छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी हजेरी लावली आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील पैसा हा पंकज आणि समीर यांच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये वर्ग केल्याचा आरोप, दोघांवर आहे.
याप्रकरणी समीर भुजबळ यांना आधीच अटक झाली असून त्यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांच्यापाठोपाठ पंकज भुजबळ यांचीही अटक होते का, हे पाहणं महत्वाचं आहे.
छगन भुजबळ आज भारतात
दरम्यान, छगन भुजबळ हे अमेरिहून आज भारतात परतत आहे. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. मुंबई विमानतळावर समर्थकांनी गर्दी केली आहे.
समीर, पंकज यांचा पासपोर्ट जप्त
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ कुटुंबीयांची अडचणी वाढतच आहे. अंमलबजावणी संचलनालयाने समीर भुजबळ यांच्यापाठोपाठ पंकज भुजबळ यांचा पासपोर्ट शनिवारी जप्त केला आहे. देशाबाहेर जाऊ नये यासाठी ईडीने ही कारवाई केली आहे.
समीर भुजबळ यांना अटक
दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी  भुजबळ यांचे  पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचलनालयाने सोमवारी 1 फेब्रुवारीला रात्री उशिरा अटक केली.
ईडीने त्याच महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने कालच छगन भुजबळ, पंकज तसंच समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारले होते.
=======================================================

अनिरुद्धचा भीमपराक्रम, कोवळ्या वयात 50 गड-किल्ले सर

अनिरुद्धचा भीमपराक्रम, कोवळ्या वयात 50 गड-किल्ले सर !
पुणे: गिर्यारोहण, गिरीभ्रमंती हा तसा जोखमीचा छंद आहे. त्यामुळे ट्रेकिंगला जायचं म्हटलं की पहिला विरोध घरातूनच होतो. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील अनिरुद्ध पाटील या बाल गिर्यारोहकाने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 50 गड-किल्ले पालथे घालून एक नवा आदर्श घालून दिला आहे. अवघ्या सात वर्षांच्या या चिमुरड्या ट्रेकरने हा भीमपराक्रम केला आहे.
बघता क्षणी जवळ घ्यावं आणि अगणित लाड करावेत, असं गोंडस रुपडं असलेला तरीही अत्यंत काटक आणि धाडसी असणारा बॉर्न ट्रेकर अनिरुद्ध सुनील सिद्धगोंडा-पाटील! टीव्हीपुढे बसून छोटा भीम पाहण्याचा आनंद लुटण्याच्या वयात हा अनिरुद्ध सह्याद्रीच्या कड्या-कप-यांमध्ये घुसून भीमपराक्रम गाजवत आहे.
Aniruddha Patil Trekker
मूळचे कोल्हापूरचे हे कुटुंब नोकरी व्यवसायासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये स्थाईक झालेले. वडील सुनील सिद्धगौंडा-पाटील हे एका खासगी कंपनीत कामाला. एव्हरेस्ट मोहीम फत्ते केलेल्या भोसरीच्या सागरमाथा संस्थेचे सदस्य. त्यामुळे ‌अनिरुद्धच्या घरातच गिर्यारोहणाचे बाळकडू मिळाले. अनिरुद्ध पाच वर्षाचा असताना त्याला त्याच्या वडिलांनी पहिल्या ट्रेकसाठी घरातून बाहेर काढले आणि त्यानंतर तो घरापेक्षा घराबाहेर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्येच जास्त रमू लागला.
मुळशी तालुक्यातील कैलासगड हा अनिरुद्धचा पहिला ट्रेक! 20 जुलै 2013 ला त्याने हा किल्ला सर केला. तेव्हा त्याचे वय होते अवघे पाच वर्षे!  नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनी त्याने नाशिक जिल्ह्यातील साल्हेर या अत्यंत अवघड मानल्या जाणा-या किल्ल्यावर चढाई करीत अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे 23 ते 26 जानेवारी या चार दिवसांत अनिरुद्धने मांगी-तुंगी, हरगड, मुल्हेर, मोरा, सालोटा आणि साल्हेर असा सहा किल्ल्यांचा उत्तुंग ‘सिक्सर’च लगावला. साधारणतः महिन्याला दोन या प्रमाणे अवघ्या दोन वर्षांत अनिरुद्धनं 50 किल्ल्यांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या रविवारी त्याने एबीपी माझासोबत लोहगड या त्याच्या 51 व्या गडावर यशस्वी चढाई केली.
Aniruddha Patil Trekker
पिंपरी-चिंचवडमधील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकणा-या अनिरुद्धचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला कोणाच्याही ओळखीची गरज भासत नाही. ट्रेकर माणूस दिसला त्याला काका बनविणे हा त्याचा शिरस्ता. कमालीचा लाघवी स्वभाव तसेच आवाज आणि डोळ्यातील मिश्किल भाव, ओठांवरील निरागस हास्य यामुळे  तो समोरच्याच्या काळजालाच हात घालतो. अनुभवी गिर्यारोहकांचेही पाय लटपटू लागतात, अशा ठिकाणी हे पिल्लू अत्यंत सराईतपणे वावरतं. भीती हा शब्द त्याला माहीतच नसावा. धडाडी जितकी तितकाच गोड निरागसपणाही उपजत आहे.स्टॅमिना म्हणाला तर अत्यंत अनुभवी ट्रेकरला देखील लाजवणारा. असा हा अनिरुद्ध अर्थात पिल्लू हा त्यांच्या ग्रुपच्या गळ्यातील ताईत बनला नाही तर नवल!
Aniruddha Patil Trekker
निसर्ग हाच खरा गुरू, असे मानणा-या वडिलांनी अनिरुद्धला वयाच्या पाचव्या वर्षापासून गुरुच्या हवाली केले आणि एकलव्याच्या निष्ठेनं अनिरुद्ध निसर्गाची विद्या आत्मसात करत आहे. त्याच्या या भटकंतीमुळे त्याच्यात नैसर्गिक शहाणपण आलं आहे. त्याच्या वयाच्या अन्य मुलांमध्ये त्याचे वेगळेपण उठून दिसते. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यामुळे  तो शरीरानेही काटक बनला आहे. गेल्या दोन वर्षात तो एकदाही आजारी पडला नाही, असं त्याची आई अभिमानाने सांगते. सुरूवातीला मुलाला ट्रेकला पाठवताना काळजी वाटायची, मात्र आता आई आणि अनिरुद्धची चिमुकली बहीण सैयू देखील या गड-किल्ल्यांच्या प्रेमात पडले आहेत.
=======================================================

हेडलीच्या आजच्या साक्षीतील महत्त्वाचे मुद्दे

हेडलीच्या आजच्या साक्षीतील महत्त्वाचे मुद्दे
मुंबई : मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील दहशतवादी डेव्हिड हेडलीची आज पुन्हा साक्ष नोंदवली जात आहे. अमेरिकेतील जेलमधून विशेष मकोका कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरुआहे. काल दिलेल्या साक्षीत हेडलीने पाकिस्तानचा नापाक चेहरा जगासमोर आणला. आजही हेडली पाकिस्तानचा बुरखा फाडत आहे.
डेव्हिड हेडलीच्या आजच्या साक्षीतील महत्त्वाचे मुद्दे
– मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पोलीस मुख्यालय, नौदलाचा हवाईतळ निशाण्यावर होता.
– जानेवारी 2002 मध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’ संघटनेत सामील झालो
– ऑगस्ट 2004 मध्ये प्रशिक्षणाला सुरुवात झाली
– हाफिज सईद आणि लख्वीला प्रशिक्षणात भेटलो
– लष्करवरील बंदीविरोधात मी दोघांना सल्ला दिला
– न्यायालयीन प्रक्रिया किचकट असल्याने नकार दिला
– मेजर पाशा हा ‘6 बलुची रेजिमेंट’चा निवृत्त मेजर होता, पण पाशा लष्कर सोडून अल् कायदामध्ये गेला
– मी पाकिस्तानात पत्नी शाझियासोबत राहात होतो
– दुसरी पत्नी फैजाने छळाची तक्रार दाखल केली होती, त्यामुळे मला एक रात्र तुरुंगात काढावा लागला होता.
– लख्वी हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये कमांडर आहे
– हाफिज सईद हा आध्यात्मिक गुरु आहे
– लष्करचा म्होरक्या हाफिज सईदनंच लख्वीला आणलं
– भारताविरुद्धच्या कारवायांची सूत्रे लख्वीच्या हाती दिली
– मुजफ्फराबादमध्येच लष्कर-ए-तोयबाचं मुख्यालय आहे
– जैश-ए-मोहम्मदचा तळही पाकिस्तानातच आहे
– हिज्बुल,जैश, लष्कर, हरकत-ए- मुजाहिद्दीन या संघटना कार्यरत
– या संघटनांची युनायटेड जिहाद कौन्सिल आहे.
-मौलाना मसूद अझरला मी एकदा पाहिलं, पण भेटलो नाही
– ऑक्टोबर 2003 मध्ये लष्करच्या कार्यक्रमात मसूद पाहुणा होता
– मसूदने भारताविरुद्धच्या बाबी, आध्यात्मिक गोष्टी सांगितल्या.

मुंबई हल्ल्याबाबत हेडलीची साक्ष

– नोव्हेंबर 2007 मध्ये मुजफ्फराबादच्या मीटिंगमध्ये मुंबई हल्ल्याचा प्लॅन
– या मीटिंगमध्ये मी साजिद मीर आणि अबू काफाला भेटलो
– ताज हॉटेल हल्ल्याची सर्व जबाबदारी माझ्यावर होती
– माहिती गोळा करणे, रेकी करण्याचं काम मला दिलं
– कॉन्व्हकेशन हॉलमध्ये ‘इंडियन डिफेन्स सायंटिस्ट’ची बैठक होती, त्याच बैठकीवर हल्ला करण्याचा आमचा प्लॅन होता.
=======================================================

जालन्यात कारच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, 3 जखमी

जालन्यात कारच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, 3 जखमी
जालना: जालना जिल्ह्यातील मंठा येथे एका भीषण कार अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त समजते आहे. या अपघातात चार मृतांपैकी दोन महिलांचा समावेश आहे.
मंठा-जालना रोडवर हा अपघात झाला आहे. समोर आलेल्या दुचाकीला धडक देत कार झाडावर आदळल्यानं हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यात गाडीचा समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
दरम्यान, अपघातातील तीनही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
=======================================================

VIDEO: 'बी.ए पास'चा सीक्वल 'एम.ए पास'चा ट्रेलर रिलीज!


मुंबई: 2013 साली प्रदर्शित झालेला बोल्ड सिनेमा ‘बी.ए पास’ची बरीच चर्चा झाली होती. आता याच सिनेमाचा सिक्वेल ‘एम.ए पास’ येणार असून त्याचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. ट्रेलर एका मुलीच्या आयुष्यावर आधारित असून ज्यामध्ये अनेक चढउतार आहेत. 
बी.ए पास सिनेमातील एकाही कलाकाराला एम.ए पास सिनेमात घेतलेलं नाही. तसंच ट्रेलर पाहून आपल्याला अंदाज लावता येईल की, या सिनेमाचं कथानकही मागील सिनेमापेक्षा वेगळं आहे. पण यंदाही या सिनेमात बोल्ड सीन पाहायला मिळतील. 
एम.ए पास सिनेमात कृतिका सचदेवा, सशो, इंद्रानिल सेनगुप्ता, आरव चौधरी, संघमित्रा, सौरभ दुबे, शुभांगी लतकर, सुखबीर लांबा यांच्यासारख्या नव्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे. तर शादाब खान यांनी दिग्दर्शन केलं आहे.
शिल्पा अभिनीतची प्रमुख भूमिका असलेला बी.ए पास सिनेमा 2013 साली प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा अजय बहलने दिग्दर्शित केला होता.
=======================================================

सानपाडाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, वाशी-पनवेल मार्गावरील लोकल ठप्पसानपाडाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, वाशी-पनवेल मार्गावरील लोकल ठप्प


मुंबई: हार्बर मार्गावर सानपाडा स्थानकादरम्यान अप मार्गावर सिग्नलमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाशी ते पनवेल मार्गावरील गाड्या ठप्प झाल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाशी-सानपाडा दरम्यान अप मार्गावर सिग्नलमध्ये बिघाड झाल्यानं हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. तूर्तास दुरुस्तीचं काम सुरु असून वाशी ते पनवेल दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. तर सीएसटी ते वाशी दरम्यानची वाहतूक धीम्या गतीनं सुरु आहे. हार्बर मार्गावर वारंवार लोकल गाड्यांचा खोळंबा होत असल्यानं हे शुक्लकाष्ठ कधी संपणार? असाच प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
=======================================================

अंजली दमानिया आणि अलेक पदमसी उभारणार टॅक्स न देण्यासाठी संघटना

अंजली दमानिया आणि अलेक पदमसी उभारणार टॅक्स न देण्यासाठी संघटना!
मुंबई : जोपर्यंत सरकारला भ्रष्टाचार थांबवता येत नाही तोपर्यंत त्यांनी टॅक्स भरू नये असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवल्यानंतर काही करदात्यांनी कर न भरण्यासाठी एक संघटना बनवण्याचा निर्णय घेतलाय. ‘आप’ नेत्या अंजली दमानिया आणि अॅड गुरू अलेक पदमसी या दोघांनी सरकारला अधिक जबाबदार बनवण्यासाठी आणि टॅक्सला नकार देण्यासाठी एक संघटना उभारणार आहेत.
उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतानंतर अंजली दमानिया यांनी सर्वात पुढे येऊन, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना अटक होत नाही तोवर सरकारला कोणतेही टॅक्स न भरण्याचा निर्णय जाहीर केला होता. अंजली दमानिया आता या मोहीमेला अधिक व्यापक रूप देणार आहेत.
आधीच्या सरकारमधील भ्रष्टाचारी नेत्यांना तुरूंगात डांबण्याचं आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेत आलं मात्र त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत हे सरकार काहीच कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळेच अंजली दमानिया यांनी टॅक्स न भरण्याचं ठरवलं आहे, या मोहीमेत त्यांना आता अॅड गुरू अलेक पदमसी यांचीही साथ मिळालीय. सर्वच पातळ्यांवर वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे टॅक्स न भरण्याच्या कल्पनेवर अनेक वर्षांपासून विचार करत असल्याचं अलेक पदमसी सांगतात, मात्र त्यांना आता प्रत्यक्ष कृती करायची आहे, यासाठी त्यांनी टेलिफोनवरून अंजली दमानिया यांच्याशीही चर्चा केलीय.
अंजली दमानिया, अलेक पदमसी आणि अन्य काही समविचारी व्यक्तींमध्ये आज याबाबत औपचारिक बैठकही होणार आहे.
=======================================================

गेल्या 15 वर्षातील सत्ताधीशांची संपत्ती थक्क करणारी: मुख्यमंत्री

गेल्या 15 वर्षातील सत्ताधीशांची संपत्ती थक्क करणारी: मुख्यमंत्री
पालघर : गेल्या 15 वर्षांपासून ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांची संपत्ती थक्क करणारी आहे. अजून अनेकांचा खुलासा होणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीतील भ्रष्ट मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. पालघर पोटनिवडणुकीतील युतीचे उमेदवार अमित घोडांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी चौफेर टोलेबाजी केली.
“बाहेर असणारे फार काळ बाहेर राहणार नाहीत”
काही बाहेर आहेत ते देखील आता जास्त बाहेर राहणार नाहीत, असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं न घेता मुख्यमंत्र्यांना इशारा दिला. “आमचा कुणाबद्दलही राजकीय आकस नाही. मात्र, जनतेच्या तिजोरीतून लुटलेला पैसा परत जनतेच्या तिजोरीत टाकू”, असं ते यावेळी म्हणाले.
“नारायण राणे कोकणातले दलाल”
मुख्यमंत्र्यांनी यावेळी नारायण राणेंवरही चौफेर प्रहार केला. नाव न घेता त्यांना कोकणातले दलाल असं म्हटलं. मश्चिमारांचा पर्शिननेटचा प्रश्न हा दहा वर्ष तसाच ठेवला त्यामुळे मत्स दुष्काळाची परिस्थिती मच्छिमार बांधवांवर आली आहे. 12 नॉटीकल माईलपर्यंत पर्शिननेट बोटींना बंदीच्या फाईलवर सहीच केली नाही. सरकारमध्ये पर्शिननेटचे दलाल होते. ते ही कोकणातले होते असा टोळा नाव न घेता नारायण राणेवर हाणला.
=======================================================

आज भारत विरुद्ध श्रीलंका, पुण्यात टी-20चा थरार

आज भारत विरुद्ध श्रीलंका, पुण्यात टी-20चा थरार
पुणे: धोनीची टीम इंडिया आणि दिनेश चंडिमलची टीम श्रीलंका यांच्यामधल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आज पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवरून सुरुवात होत आहे. उभय संघ बांगलादेशातल्या टी-20 आशिया चषकाची आणि भारतातल्या टी-20 विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून या मालिकेकडे पाहात आहेत.
टीम इंडियानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 3-0 असा व्हाईटवॉशचा दणका दिल्यानं धोनी आणि त्याच्या शिलेदारांचं मनोबल खूपच उंचावलेलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टी-20 सामन्यांमधलं ते विजयी सातत्य आता मायदेशातही कायम राखण्याचा भारतीय संघ प्रयत्न राहिल. ऑस्ट्रेलियातल्या पराक्रमानं टीम इंडियाला आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिलं असून, ते स्थान कायम राखणंही धोनी आणि त्याच्या शिलेदारांसमोरचं उद्दिष्ट असेल.
धोनीच्या टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत प्रकर्षानं उणीव जाणवेल ती, इनफॉर्म फलंदाज विराट कोहलीची. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये विराटनं नाबाद 90, नाबाद 59 आणि 50 अशा अफलातून खेळी उभारून भारताच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
=======================================================

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा: आकृती डेव्हलपर्सचे मालकांना अटक

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा: आकृती डेव्हलपर्सचे मालकांना अटक
मुंबई: राज्यातील गाजलेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आकृती डेव्हलपर्सचे मालक विमल शहा यांना अटक करण्यात आली आहे. घोटाळ्याचा तपास करत असलेल्या सीआयडीच्या पथकाने काल शहा यांना अटक केली आहे.
घोटाळ्यातील 106 कोटींचा निधी शहांच्या कंपनीत चुकीच्या पद्धतीनं वळवण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सूत्रांनी, दिलेल्या माहितीनुसार मातंग आणि इतर समजासाठी देण्यात आलेला पैसा शहा यांच्या कंपनीत वळवण्यात आला. ज्या पैशातून पेडर रोड परिसरात 8 हजार फुटाचा अलिशान फ्लॅट खरेदी करण्यात आला आहे.
शहा यांच्यासोबत त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या 2 अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
=======================================================

सियाचीनमध्ये चमत्कार, हिमस्खलनात गाडलेल्या 10 जवानांपैकी एक जवान जिवंत

सियाचीनमध्ये चमत्कार, हिमस्खलनात गाडलेल्या 10 जवानांपैकी एक जवान जिवंत
सियाचीन : सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन गाडले गेलेल्या 10 जवानांपैकी एका जवानाला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. हणमंतप्पा कोप्पड असं जिवंत सापडलेल्या जवानाचं नाव असू त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे.

Statement
आतापर्यंत पाच जवानांचे मृतदेह भारतीय लष्कराच्या हाती लागल्याचीही माहिती मिळते आहे. सहा दिवसांपूर्वी सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर आणि मद्रास रेजिमेंटचे 9 जवान बर्फाखाली गाडले गेले.
=======================================================

आयसिसविरोधी कारवाईत निष्पाप मुस्लीम भरडू नयेत : बुखारी

आयसिसविरोधी कारवाईत निष्पाप मुस्लीम भरडू नयेत : बुखारी
नवी दिल्ली : देशात आयसिससंबंधी सुरु असलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मुस्लीम तरुणांना अटक केली जात आहे. निष्पाप मुस्लीमांना अटक होत असल्याची चिंता व्यक्त करत दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 
भारतात आयसिससंबंधी सुरु असलेल्या कारवाईत पारदर्शकता असावी अशी मागणी बुखारींनी पंतप्रधानांकडे केली. शिवाय दहशतवादी असल्याच्या संशयावरुन मोठ्या प्रमाणावर निष्पाप मुस्लीम तरुणांना अटक करून तुरुंगात टाकलं जात आहे, त्यामुळे संबंधित तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होत असल्याची चिंता बुखारींनी बोलून दाखवली. 
बुखारींच्या या चिंतेवर विचार करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.
=======================================================
बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर कानडी सक्ती, ही असहिष्णुता नाही का? -उद्धव ठाकरे

मुंबई – 09 फेब्रुवारी : बेळगावसारख्या सीमाप्रश्नात अडकलेल्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर कानडी भाषेची सक्ती केली जाते. कोणत्याही भाषेला आपला विरोध नाही. पण मातृभाषा शिकवू न देता कानडी भाषेची जबरदस्ती करणे, ही असहिष्णुता नाही का ? असा खरमरीत सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारलाय.
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र कृती समिती मनोरंजन मैदानाचं उद्घाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. सरकार कुठलंही असो. या भागात राहाणार्‍या मराठी बांधवांवरचे अन्याय काही थांबत नाहीत. सीमाभागात कानडी भाषेच्या सक्तीवर उद्धव ठाकरे बरसले.
बेळगावसारख्या सीमाप्रश्नात अडकलेल्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर कानडी भाषेची सक्ती केली जाते. कोणत्याही भाषेला आपला विरोध नाही. पण मातृभाषा शिकवू न देता कानडी भाषेची जबरदस्ती करणे, ही असहिष्णुता नाही का ? असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. त्याच बरोबर सीमा प्रश्नावर आधारित मराठी टायगर्स हा चित्रपट पाहाण्याचं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं.बृहन्मुंबई महापालिकेतर्फे नायगांव इथल्या बॉम्बे डाईंग भूखंडावर `बेळगांव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती मनोरंजन मैदान` विकसित करण्यात आलंय. नायगांव येथे सुमारे 8.15 एकर क्षेत्रावरील बॉम्बे डाइंग भुखंडावर विकसित करण्यात आले असून महापालिकेचे उद्यान हे अनेकविध वैशिष्ट्यांनी नटलेले आहे.
मुंबईतील सर्वांत मोठ्या उद्यानांमध्ये त्याची गणना होणार आहे. मुख्यत्वे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रतिकात्मक संकल्पना उद्यान (थीम गार्डन) तसंच स्मृतीस्तंभ, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा व आसन व्यवस्था, झेन (जपानी) उद्यान, जॉगिंग ट्रॅक, रॉक गार्डन, कलात्मक हिरवळ आणि हिरवळीच्या लहान टेकड्या, छोट्या असणार आहे.
=======================================================
आज भुजबळांची ‘घरवापसी’, समर्थक शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत 

नाशिक – 09 फेब्रुवारी : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी गोत्यात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आज (सोमवारी) अमेरिकेहून भारतात परतणार आहेत. दुपारी 12 वाजता ते मुंबई एअरपोर्टवर येणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाचं आयोजन केलंय. विशेष, म्हणजे शरद पवारांनी आंदोलन करणार नाही असं जाहीर केलंय. पण त्यांचे आदेश झुगारून भुजबळ समर्थक शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहे.
तर दुसरीकडे, आज सकाळी पंकज भुजबळांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलंय. भुजळांच्या 9 कार्यालयांवर ईडीनं छापे टाकले होते आणि भुजबळ कुटुंबीयांच्या व्यवहारांकडे ईडी नजर ठेवून आहे.
दरम्यान, समीर भुजबळ यांच्यापाठोपाठ पंकज भुजबळही अडचणीत आले आहे. त्यांना आज हजर राहण्यासाठी ईडीनं समन्स बजावलंय. भुजबळ कुटुंबियांविरोधातल्या ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी जाहीरपणे आंदोलन करणार नाही. असं दस्तुरखुद्द पवारांनी खरंतर यापूर्वीच स्पष्ट केलंय. तरीही भुजबळ समर्थकांनी शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवलीय. राष्ट्रवादीत आपण काहीसे एकाकी पडल्याचं लक्षात येताच भुजबळांनी नेहमीप्रमाणेच ओबीसीचा मुद्दा पुढे केलाय. मी मागासवर्गीय असल्यानेच सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. म्हणूनच भुजबळांच्या या मुद्याला कितपत समर्थन मिळतंय हे शक्तीप्रदर्शनावरूनच स्पष्ट होईल. तसंच भारतात परतल्यानंतर भुजबळ नेमकं काय बोलताहेत याकडेही राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे अमेरिकेहून भुजबळ परत आल्यानंतर त्यांचे समर्थक कुठं कुठं आणि कसं शक्तीप्रदर्शन करताहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
=======================================================

न्यूयॉर्क; पगडी घातल्यामुळे शीख अभिनेत्याला विमानात प्रवेश नाकारला


न्यूयॉर्क, दि. ९ - विमानात बसण्यापूर्वी सुरक्षा तपासणीदरम्यान पगडी काढण्यास नकार दिल्याने एका शीख अमेरिकन अभिनेत्याला विमानात जाण्यापासून रोखल्याची घटना अमेरिकेत घडली. मेक्सिकोला गेलले ४१ वर्षांचे वारिस अहलूवालिया हे सोमवारी अॅरोमेक्सिकोच्या विमानाने न्यूयॉर्कला परत येणार होते. मात्र ते मेक्सिकोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अॅरोमेक्सिकोच्या काऊंटरवर बोर्डिंग पास घेण्यासाठी गेले असता त्यांना एका कोड नंबरसह प्रथम श्रेणीचा पास देण्यात आला. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा सुरक्षा तपासणी करावी लागणार होती. व तेथे त्यांना पगडी उतरवण्यास सांगण्यात आले, मात्र त्यांनी तसे करण्यास अहलुवालिया यांनी नकार देताच त्यांना विमानातून प्रवास करण्यापासून रोखण्यात आले. 
अहलुवालिया यांनी ट्विटरवर एक फोटो अपलोड करून या प्रकरणाची माहिती दिली. ' माझ्या पगडीमुळे मी न्यूयॉर्कला जाणा-या अॅरोमॅक्सिकोच्या विमानातून प्रवास करू शकत नाही असे मला सांगण्यात आले' असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 
=======================================================
नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे निधन 



भारत आणि नेपाळचे संबंध सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे मंगळवारी पहाटे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाशी झुंझ देत होते. त्यावर त्यांनी बरेच उपचारही केले. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कर्करोगावर उपचार घेऊन ते अमेरिकेहून परतले होते. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भारतात परतल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास निर्माण झाला. कर्करोगाशी झुंझ देताना सोमवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोईराला यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी नेपाळ काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती नेपाळ काँग्रेसचे सचिव प्रकाश मान सिंग यांनी दिली आहे. सुशील कोईराला यांनी १८ महिने नेपाळचे नेतृत्त्व केले. ११ फेब्रुवारी २०१४ ते १० ऑक्टोबर २०१५ या काळात ते नेपाळचे पंतप्रधान होते. 
=======================================================

=======================================================

No comments: