Wednesday, 3 February 2016

नमस्कार लाईव्ह ०३-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[आंतरराष्ट्रीय]

१- शहीद भगत सिंहांच्या फाशीविरोधात पाकिस्तानात याचिका, आज सुनावणी 

२- सीरियातील भग्नावस्था अंगावर आणणारा ड्रोन व्हिडिओ 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

३- सरकारने भ्रष्टाचार न रोखल्यास टॅक्स देऊ नका : हायकोर्ट 

४- 'झिका'ला रोखण्यासाठी लस तयार, भारतीय शास्त्रज्ञांचा दावा

५- 'धोकादायक पोल हटवा', लोकल सुरक्षेबाबत कोर्टाकडून रेल्वेची कानउघडणी 

६- पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला, मोदींच्या कारवर महिलेनं फेकली कुंडी  

७- टीव्ही चर्चांमधील भाजप प्रवक्त्यांवर पंतप्रधान नाराज 

८- देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी कुर्ला आणि दादरच्या जागेचा प्रस्ताव 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

९- मुरुड दुर्घटना: माणसं मेल्यावर सरकार जागं होणार का? कोर्टाचा सरकारला सवाल 

१०- मुंबईचंबजेट : पेट्रोल, डिझेल महागणार, कच्च्या तेलाच्या जकातीत वाढ 

११- टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज वरुण अॅरॉनचं लग्न फक्त साडेसात रुपयांत 

१२- धन्यवाद, व्हिसा नको, अनुपम खेर यांचं पाक. उच्चायुक्तांना उत्तर  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

१३- तामिळनाडू; बालसुधारगृहातून सुटला आणि पुन्हा बलात्कार केला 

१४- मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर प्रकाशझोत 

१५- एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा सोलापुरात धुडगूस 

१६- आंध्रप्रदेश : विजयवाडा येथील राजीव गांधी होलसेल मार्केट लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू 

१७- हिंगोली जिल्ह्यातील इसमाची नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात गऴफास घेऊन आत्महत्या, तुकाराम कदम असे या इसामाचे नाव असून आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

१८- ३ हजार ४१८ किमीची भ्रमंती... सशक्त भारतासाठी 

१९- नांदेड; उद्या जिल्‍हास्‍तरीय स्‍वच्‍छतामित्र वक्‍तृत्‍व करंडक स्‍पर्धा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जीवनात जे मिळवायचे ते मिळवा ,फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधी ही लोकांची मने तोडून जाणारा नसावा

(पवन वैष्णव, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

घरांची आर्टिफिशिअल सजावट 

फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://goo.gl/lE9S67

************************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://goo.gl/uS8DX4

===========================


तामिळनाडू; बालसुधारगृहातून सुटला आणि पुन्हा बलात्कार केला


एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर शिक्षा म्हणून दोन वर्षांसाठी बालसुधारगृहात धाडण्यात आलेल्या आरोपीने बाहेर येताच पुन्हा एका मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे. किशोर असे त्याचे नाव असून तामिळनाडू पोलिसांनी कृष्णगिरी जिल्ह्यातील सुलागिरी येथून मंगळवारी रात्री त्याला अटक केली. 
किशोर चौदा वर्षांचा असताना त्याने एका २४ वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता, मात्र त्यावेळी तो अल्पवयीन असल्याने त्याला शिक्षा म्हणून दोन वर्षांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले. अवघ्या काही दिवसांपूर्वीच तो बालसुधारगृहातून सुटला पण त्याने एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलगी घराजवळ खेळत असतानाच आरोपी तिला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. बचावासाठी त्या मुलीने आरडा-ओरड केली असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली, मात्र तिचा आवाज ऐकून गावातील इतर नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे संतापलेल्या तिच्या पित्याने सूलागिरी पोलिस स्थानकांत तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी आरोपीला मंगळवारी पुन्हा अटक केली. 
=======================

३ हजार ४१८ किमीची भ्रमंती... सशक्त भारतासाठी


उडुपी मधील कुंदापूर तालुक्यांतील बसरुर मधील पोर्तुगीज-डचांची पाशवी सत्ता समूळ उखडून काढून, त्या सुभ्यास स्वातंत्र्य बहाल केले. श्री शिवप्रभुंच्या सागरी पराक्रमाच्या या तेजस्वी घटनेस येत्या ८ फेब्रुवारी २०१६ रोजी ३५१ वर्ष पुर्ण होत आहेत. या ऐतिहासिक घटनेचा विजयोत्सव व सागरी सिमांचे संरक्षण करण्याचा संकल्प करुन सशक्त भारत निर्माणाकरीता ‘मराठा आरमाराची भरारी..करुया दर्यावर स्वारी..’या ध्येयाने शिवप्रेमी व शिव इतिहास समविचारींनी आयोजित केलेल्या ३ हजार ४१८ किमी प्रवासाच्या ‘तटीय भारत मैत्री अभियाना’चे  बुधवारी सकाळी दहा वाजता सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची कर्मभूमी असलेल्या अलिबाग मध्ये आगमन झाले, त्यावेळी सरखेलांचे वंशज रघूजीराजे आंग्रे यांनी या अभियानाचे शानदार स्वागत केले.
३५१ वर्षापूर्वीची सागरी सुरक्षा निती, वर्तमान सागरी सुरक्षेत गरजेची
अथांग सागर धोकादायक आहे, स्वराज्याचे शत्रु समुद्रामार्गे येतात, सागरी आक्रमण सहजपणे मोडून काढण्यासारखे नाही, तेव्हा दर्यातून येणारा प्रत्येक शत्रु दर्यातच बुडविला पाहिजे या दुरदृष्टीने भारलेल्या श्री शिवप्रभुंनी आपले संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आरमार निर्माण केले. जलदुर्ग म्हणजेच आरमारी तळ उभारले. सिंधुसागरावरील विदेशी शक्तींच्या अर्निबध वावराला आळा घालण्यासाठी, आक्रमकांच्या मनात धडकी भरवणारी भगवी निशाणे फडकावीत डोलणा ऱ्या मराठी नौसेनेचा धाक निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्ग (मालंडची खाडी) ते उडुपीतील बसरुर अशी ही धाडसी आरमारी मोहीम ३५१ वर्षा पूर्वी यशस्वी करुन सागरी सीमा सुरक्षेचा पहिला वस्तूपाठ आपल्या नेतृत्व कुशलतेतून घालून दिला होता. त्यांची ही सागरी सुरक्षा निती तेव्हा पासूनच पूढे सुयोग्य प्रकारे जोपासली गेली असती तर नेमक्या त्याच सागराच्या सुरक्षे बाबत आज असणारी चिंता वर्तमानात राहीली नसती, आणि म्हणूनच आजच्या या अभियानास आगळे महत्व असल्याचे या मोहिमेच्या आयोजनात सक्रीय सहभागी झालेले सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघूजीराजे आंग्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

===============================================

'झिका'ला रोखण्यासाठी लस तयार, भारतीय शास्त्रज्ञांचा दावा

हैदराबाद : झिका या तापाने सध्या पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिकेपाठोपाठ आता हा ताप उत्तर अमेरिकेतही पोहोचला आहे. या विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अयशस्वी आणि हतबल झाले असतानाच हैदराबादमधील   शास्त्रज्ञांनी झिका रोखण्यासाठी लस विकसित केली असल्याचा दावा केला आहे.
हैदराबदमधील शास्त्रज्ञांनी लस विकसित केल्याचा दावा
हैदराबादमधील ‘भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड’ या संस्थेने झिका रोखण्यासाठी लस विकसित केली असल्याचा दावा केला आहे. “झिकावरील लस आम्ही तयार केली असून आमच्या माहितीनुसार जगात पहिल्यांदाच लस तयार केली आहे. शिवाय, नऊ महिन्यांपूर्वीच झिकावरील लसीचं पेटंट घेतलं आहे.”, असे भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला यांनी दावा केला आहे.
पाश्चिमात्य देशांमध्ये झिका विषाणूचा उद्रेक
जागतिक आरोग्य संघटनेने झिका आणि या आजारामुळे मुलांना जन्मावेळी उदभवणाऱ्या व्यंगांमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. अमेरिका खंडातील 20 पेक्षा अधिक देशांमध्ये झिका विषाणूचा उद्रेक झाला असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
झिका विषाणूंचा उत्तर अमेरिकेत शिरकाव
आधी ब्राझिलपुरतं मर्यादित असणाऱ्या झिका विषाणूंनी आता उत्तर अमेरिकेत शिरकाव केला आहे. त्यामुळे सुमारे 40 लाख अमेरिकन नागरिकांना झिका विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने झिका विषाणूची गंभीर दखल घेत हाय अलर्ट जारी केला आहे.
भारत ‘झिका’चा मुकाबला करण्यासाठी सज्ज
डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्ये झिकाचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण पाश्चिमात्य जगत चिंता व्यक्त केली जात आहे. या तापाचा भारतात शिरकाव होऊ नये, यासाठी भारत सरकारने झिका विषाणूंच्या नियंत्रणासाठी एका विशेष गटाची स्थापना केली आहे. आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी झिका विषाणूंबाबत सरकार गंभीर असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय, या विषाणूंना भारतात शिराकव करु न देण्यासाठी विशेष गटाची स्थापना केल्याचीही जे. पी. नड्डा यांनी माहिती दिली.
झिका म्हणजे काय?
युगांडामधील वनांच्या प्रदेशावरुन झिका हे नाव आले आहे. झिका तापाचे विषाणू एडिस इजिप्ती या डासामार्फत पसरवले जातात. त्यामुळे या डास चावलेल्या व्यक्तींच्या शरीरात हे विषाणू जाऊन त्यांना ताप, डोळे येणे, सांधे दुखणे तसेच भुरळ येणे अशा तक्रारी संभवतात. झिकाचा सर्वात मोठा धोका हा गर्भवतींना आहे.
झिका विषाणू सर्वात प्रथम 1947 साली युगांडात आढळून आला. त्यानंतर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन, इजिप्त, गॅबन, सिएरा लिओन, टांझानिया, युगांडा, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, थायलंड या देशांमध्ये झिका तापाचे रुग्ण आढळून आले. मात्र आता दक्षिण अमेरिकेत वेगाने प्रसारित झाल्यामुळे भीती वाढली आहे.
====================================================

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर प्रकाशझोत


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला. 37 हजार 52 कोटींच्या अर्थसंकल्पात स्मार्ट सिटीसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर बेस्ट उपक्रमासाठी 10 कोटींचं कर्ज महापालिका देणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केल्याचं चित्र आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक रुपयाचीही तरतूद केलेली नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांचाच अर्थसंकल्पावर प्रभाव दिसत आहे.
याशिवाय रस्ते विभागाला 3 हजार 863 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नरिमन पॉईंट ते कांदीवलीपर्यंत 33.20 किमी लांबीचा सागरी रस्त्यासाठी महापालिकेने 1 हजार कोटींची तरतूद केली आहे. हँकॉक ब्रीजच्या पुनर्बांधणीसाठी यंदा 10 कोटी तर गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी 130 कोटींची देण्यात येणार आहे.
कचऱ्यापासून गॅस निर्मिती, वीज निर्मिती करणारे प्रकल्प हातात घेतले जाणार आहेत. तसंच देवनार, मुलुंड डम्पिंग ग्राऊंडमध्ये आवारभिंत, दिवाबत्तीची सोय, सीसीटीव्ही कॅमेरे, रस्ते, सुरक्षेत वाढ इत्यादी सुविधा पुरवण्यात येतील.
====================================================

मुंबईचंबजेट : पेट्रोल, डिझेल महागणार, कच्च्या तेलाच्या जकातीत वाढ


मुंबई: मुंबई महापालिकेचे वार्षिक अर्थसंकल्पात आज मांडण्यात आलं. या अर्थसंकल्पात २०१६-१७ साठी ३७०५२.१५ कोटींच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात अनेक नवनवीन प्रकल्पांसाठी निधींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कच्च्या तेलावरील जकात वाढविण्याच निर्णय पालिकेनं घेतला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल-डिझेल महागणार आहे.
कच्च्या तेलावरील जकातीत वाढ करण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले. याचा थेट परिणाम मुंबईकरांवर होणार असून त्यामुळं पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार आहेत. सध्या कच्चा तेलावर ३% जकात आकारला जातो. त्यात वाढ करण्यात आली असून आता ४.५% जकात आकारला जाणार आहे.
कच्च्या तेलावरील जकात वाढविण्यात आली असली तरी इथेनॉलवरील जकात रद्द करण्यात आला आहे. सध्या 7% एवढा मुल्याधारित कर आकारण्यात येतो. हाच जकात कर रद्द होणार आहे.
====================================================

'धोकादायक पोल हटवा', लोकल सुरक्षेबाबत कोर्टाकडून रेल्वेची कानउघडणी


मुंबई: मुंबईत दिवसेंदिवस लोकल अपघातात वाढ होत असल्यानं मुंबई हायकोर्टानं आज रेल्वेला खडे बोल सुनावले आहेत. अनेक समित्या नेमूनही लोकल अपघातात झालेल्या वाढीमुळे मुंबई उच्च न्यायालयानं सरकार, आणि रेल्वे प्रशासनाचे आज चांगलेच कान उपटले. रुळाला खेटून असणारे धोकादायक खांब, रेल्वे रुळावर टाकला जाणारा कचरा अशा अनेक समस्यांवर न्यायालयानं ताशेरे ओढले.
‘रेल्वे रुळावरील विजेचे खांब हे अजून दहा फूट लांब राहू शकतात. त्यामुळे रेल्वेनं अशा खांबांची जागा बदलावी.’ अशी सूचनाही न्यायालयानं केली. ‘लोकल लाईनमध्ये दुजाभाव करु नका नेहमी पश्चिम आणि मध्य मार्गावरचे जुने डबे हार्बरला दिले जातात.’ या तक्रारीवरही न्यायालयानं लक्ष वेधलं.
रुळाशेजारील वस्त्यांमधून रुळांवर टाकला जाणाऱ्या कचऱ्याबाबत रेल्वेनं पालिकेलाही जाब विचारला. रेल्वे रुळ म्हणजे डंपिंग ग्राऊंड नाहीत. त्यामुळे महापालिकेनं यासाठ विशेष मोहीम राबवावी. असं न्यायालयानं म्हटलं आहे.
====================================================

सीरियातील भग्नावस्था अंगावर आणणारा ड्रोन व्हिडिओ

सीरिया : सीरियातील स्थलांतरितांचा प्रश्न सध्या जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरत आहे. आयलान या चिमुकल्याच्या मृत्यूच्या निमित्ताने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाला. आता सीरियातील भयावहता पोहचवणारा ड्रोन व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेला होम्स शहराचा हा हवाई व्हिडिओ शहरातील भग्नावस्था दाखवतो. वेगवान ड्रोनमुळे इमारती तर अंगावर येतातच मात्र ही भीषणताही अंगावर येते.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर होम्स शहरातून बंडखोर फौजांनी माघार घेतली आणि त्यानंतर 2016 च्या सुरुवातीला हा व्हिडिओ घेण्यात आला.
बॉम्बहल्ल्यांमुळे खिळखिळ्या झालेल्या, मोडकळीस आलेल्या इमारती, बेघर नागरिक क्षणभरासाठी आपल्याला विचार करायला उद्युक्त करतात.
पाहा व्हिडिओ : 

====================================================

====================================================

====================================================

====================================================

====================================================


वरुण अॅरॉनचं लग्न फक्त साडेसात रुपयांत


सेलिब्रिटीचं लग्न म्हटलं की शाही थाट हा आलाच पण, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज वरुण अॅरॉनने या शाही थाटाला बगल देत अवघ्या साडेसात रुपयांत लग्न करून आदर्श पायंडा पाडला आहे. वरुणने त्याच्या लहानपणीपासूनच्या मैत्रिणीसोबत लग्नगाठ बांधून नवी इनिंग सुरू केलीय.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा, सुरेश रैना आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांची लग्नं अलीकडे फारच लक्ष्यवेधी ठरली. हे तिघेही थाटामाटात बोहल्यावर चढले. या लग्नांच्या आधी आणि नंतरही नवदाम्पत्य अनेक कारणांनी चर्चेत राहिली. त्यांच्यानंतर आता वरुण अॅरॉनच्या लग्नाचीही खूप चर्चा सुरू आहे मात्र ती त्याच्या साधेपणामुळे होत आहे. वरुण हा रागिणी सिंह या आपल्या मैत्रिणीशी सोमवारी विवाहबंधनात अडकला. या लग्नाचा त्याने कुठेही गाजावाजा केला नाही. वरुण आणि रागिणीने कुटुंबीय व मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत जमशेदपूर येथील कोर्टात जाऊन लग्न केलं. अर्जाचे दोन रुपये आणि पाच रुपये कोर्ट फी असे मिळून अवघे साडेसात रुपये या लग्नाचा खर्च झाला.

========================================================

पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला, मोदींच्या कारवर महिलेनं फेकली कुंडी 

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील दुर्लक्षामुळे एक अनपेक्षित घटना दिल्लीत घडली. एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदिंच्या ताफ्यावर कुंडी फेकून मारली. मात्र या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. 

पतंप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा विजय चौकातून जात असताना ही घटना घडली. रस्त्यावरून बाजूला होण्यास या महिलेने नकार दिला आणि चिडून तिने कुंडी फेकून मारली, अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला संसद मार्गवरून ताब्यात घेतलं आहे. तिची चौकशी सुरू आहे. पण सतत फेऱ्या मारूनही सरकारी कार्यालयात काम होत नाहीए म्हणून कुंडी फेकून मारली, असं ताब्यात घेतलेल्या महिलेचं म्हणणं आहे.

========================================================

सरकारने भ्रष्टाचार न रोखल्यास टॅक्स देऊ नका : हायकोर्ट

नागपूर : भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यास सरकार अपयशी ठरत असेल, तर नागरिकांनी टॅक्स न भरता असहकार आंदोलन सुरु करावं, असा सल्ला खुद्द हायकोर्टाने दिला आहे.

भ्रष्टाचाराच्या वाढत्या घटनेबाबत चिंता व्यक्त करत, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा सल्ला दिला आहे.
भष्टाचाराचा भस्मासूर
भ्रष्टाचार हा भस्मासुराप्रमाणे वाढत आहे, असं न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी नमूद केलं. त्यामुळे या भस्मासुराविरोधात आता नागरिकांनीच आवाज उठवण्याची गरज असल्याचं न्यायमूर्ती म्हणाले.
“सध्याची भ्रष्टाचाराची प्रकरणं पाहाता आता अती झालं. हा भस्मासूर संपवायला हवा, असं नागरिकांनी सरकारला  सांगायला हवं. जर तरीही भ्रष्टाचार कायम राहिला तर नागरिकांनी असहकार आंदोलन पुकारत टॅक्स देणे बंद करावं” असं हायकोर्टाने म्हटलं आहे.
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील 385 कोटींच्या घोटाळाप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे मत नोंदवलं.
याशिवाय हायकोर्टाने अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे भंडारा जिल्हा प्रबंधक प्रल्हाद पवार यांचा अंतरिम जामीन अर्जही फेटाळला. एससी कॅटेगरीतील मातंग समजाच्या गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानापैकी 24 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप प्रल्हाद पवारांवर आहे.
=============================================================

शहीद भगत सिंहांच्या फाशीविरोधात पाकिस्तानात याचिका, आज सुनावणी


लाहोर: देशासाठी प्राणार्पण केलेल्या शहीद भगत सिंह यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज लाहोरच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
23 मार्च 1931 रोजी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फाशी देण्यात आली होती. त्यांच्यावर ब्रिटिश अधिकारी सँडर्सच्या हत्येचा ठपका ठेवण्यात आला. तेव्हा या हत्येचे 450 साक्षीदार होते. पण एकाचीही साक्ष ऐकून न घेता, भगतसिंह आणि सुखदेव, राजगुरुंना दोषी ठरवण्यात आलं. त्यांच्या वकिलांचंही म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही.
याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी याचिकाकर्ते इम्तियाज कुरेशी यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. भगत सिंह हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं योगदान मोठं असून त्यांना निर्दोष सिद्ध करावं अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
=============================================================

टीव्ही चर्चांमधील भाजप प्रवक्त्यांवर पंतप्रधान नाराज


नवी दिल्ली : टीव्हीवरील चर्चांमध्ये सहभागी होणारे पॅनेलिस्ट आणि भाजप प्रवक्ते यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचं वृत्त आहे. आर्थिक बाबींमध्ये सरकारने मिळवलेलं यश अधोरेखित करण्याऐवजी नको त्या गोष्टींवर अधिक लक्ष दिल्यामुळे पंतप्रधान नाखुष असल्याची माहिती आहे.
एनडीए सरकारच्या जन धन योजना, पीक विमा योजना, पेन्शन स्कीमची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे निर्देश मोदींनी प्रवक्त्यांना दिले आहेत. वाढती असहिष्णुता, जातीय राजकारणासारख्या मुद्द्यांवर भाजपच्या राजकीय विरोधकांनी विनाकारण गोवल्यास त्याला बळी पडू नका, असंही निक्षून सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह प्रवक्ते आणि टीव्ही पॅनेलिस्ट्सच्या परफॉर्मन्सवर खुश नसल्याचं वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ वृत्तपत्राने दिली आहे. गेल्या 19 महिन्यातील सरकारच्या कामगिरीकडे इतरांचं लक्ष वेधून घेण्यात प्रवक्ते अपयशी ठरल्याचं म्हटलं जातं. शेतकरी, ग्रामीण भागातील जनता, आर्थिकदृष्ट्या मागास, स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या योजना पोहचवण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणतात.
‘टीव्हीवरील चर्चांमध्ये फक्त काँग्रेसच नाही तर एक्स्पर्टकडूनही भाजपला लक्ष्य केलं जातं. त्यामुळे भाजप हा मुस्लीमविरोधी किंवा दलितविरोधी पक्ष नाही, हे वाद घालून पटवून देण्यातच वेळ जातो. यूपीए 2 सरकारप्रमाणे भाजपने एकही घोटाळा न केल्यामुळे जातीवाद, दलित, भेदभाव यासारख्या मुद्द्यांवर पक्षाला टार्गेट केलं जातं.’ असं भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने इकॉनॉमिक टाइम्सला सांगितलं.
=============================================================

धन्यवाद, व्हिसा नको, अनुपम खेर यांचं पाक. उच्चायुक्तांना उत्तर 


नवी दिल्ली : पद्मभूषण पुरस्कार विजेते अभिनेते अनुपम खेर यांच्या पाकिस्तान व्हिसा प्रकरणात ट्विस्ट आला आहे. वादानंतर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अनुपम खेर यांना फोन करून व्हिसा घेण्यास सांगितलं. त्यावर अनुपम खेर यांनी धन्यवाद म्हणत व्हिसा नाकारला.
अनुपम खेर म्हणाले, “अब्दुल बासितजी फोन आणि कराचीला जाण्यासाठी व्हिसाची ऑफर केल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्या प्रस्तावाचा आदर करतो. मात्र दुर्दैवाने मी आता माझ्या तारखा दुसऱ्यांना दिल्या आहेत.”
काय आहे प्रकरण?
पाकिस्तानातील कराची शहरात 5 फेब्रुवारीला ‘लिटरेचर फेस्टिव्हल’ होत आहे. या कार्यक्रमाला भारतातून 18 जण जाणार होते. त्यापैकी 17 जणांना व्हिसा मिळाला मात्र आपला व्हिसा पाकिस्तानने नाकारला, असा दावा अभिनेते अनुपम खेर यांनी केला होता.
मात्र अनुपम खेर यांनी व्हिसासाठी अर्जच केला नसल्याचा दावा पाकिस्तानी उच्चायुक्तांनी केला आहे. ‘अनुपम खेर यांच्याकडून व्हिसासाठी कोणताही अर्ज आलेला नाही. त्यांच्याकडे त्यासंदर्भातली पावती असल्यास दाखवावी’ असं पाकिस्तानी उच्चालयाचे प्रवक्ते मन्सूर अली मेमन यांनी म्हटलं होतं.
=============================================================

मुरुड दुर्घटना: माणसं मेल्यावर सरकार जागं होणार का? कोर्टाचा सरकारला सवाल


मुंबई: सोमवारी मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
‘अशी एखादी मोठी घटना झाल्यावरच सरकार जागं होणार का? मुलं एवढीही लहान नव्हती की, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे या घटेनेमागे एवढंच कारण असू शकत नाही.’ अशा शब्दात हायकोर्टानं सरकारला सुनावलं आहे?
‘सरकारनं समुद्रकिनारी सुरक्षेचे कोणते उपाय योजले आहेत?’ असा सवालही कोर्टानं सरकारला विचारला आहे. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भातील जुन्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्यसरकरला खडे बोल सुनावले आहेत.
दरम्यान, सोमवारी मुरुडच्या समुद्र किनारी पोहण्यासाठी गेलेल्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दहा मुली आणि चार मुलांचा समावेश आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सर्व विद्यार्थी पुण्याच्या आबेदा इनामदार कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
=============================================================

एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा सोलापुरात धुडगूस


सोलापूर : एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी शहरात अक्षरशः धुडघूस घातला. काल संध्याकाळी विजापूर वेशीतील अजीज प्लाझा या हॉटेलात घुसून तुफान राडा केला. काचा, फर्निचर आणि  खुर्च्यांची तोडफोड केली. दहा ते बारा जणांच्या या टोळक्याने व्यापारी वर्गात दहशत माजवली.
एमआयएमचा शहर युवक अध्यक्ष इफ्तिकार तुळजापूरे, त्याचा भाऊ  असिफ तुळजापूरे आणि त्याच्या साथीदारांनी हातात काट्या आणि शस्त्र घेऊन हॉटेलात दहशत माजवली. हा सगळा प्रकार सीसी टीव्हीत कैद झालाय.
काय आहे प्रकरण?
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अजीज प्लाझा या हॉटेलात काल संध्याकाळी गावगुंडांनी दहशत माजवली. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलात घुसून प्रचंड गोंधळ घातला. शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची किरकोळ वादावादी झाली. विद्यार्थी वर्गातल्या वादाचं भांडवल करून एमआयएमचे हेपदाधिकारी थेट अजीज प्लाझा या हॉटेलात घुसले. आरडओरडा करत आलेल्या या घोळक्याने थेट तोडफोड सुरु केली. यामुळे हॉटेलातले कर्मचारी निघून गेले.
गेल्या महिन्यापासून सातत्याने एमआयएमचे कार्यकर्ते वादाच्या भोवऱ्यात आहेत. एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख हे यापूर्वीच अपहरण आणि मारहाणीच्या गुन्ह्यात  फरार आहेत.
=============================================================

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी कुर्ला आणि दादरच्या जागेचा प्रस्ताव


नागपूर : मुंबई- अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या जागेसाठी आता दोन नवीन पर्याय पुढे येत आहेत. कुर्ला आणि दादर असे हे दोन नवे पर्याय आहेत.
याआधी बीकेसी याठिकाणी बुलेट ट्रेनचा मुंबईतील स्टार्टिंग पॉईंट नियोजित होता. मात्र, या प्रस्तावास राज्य सरकारनं नकार दिला. ही जागा राज्याने आपल्या आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटरसाठी आधीच नियोजित केल्यामुळे ती देण्यास नकार दिला होता.
त्याऐवजी आता कुर्ला आणि दादर या दोन ठिकाणांचा विचार व्हावा, असं पत्र खुद्द मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला लिहिल्याचं सांगण्यात येत आहे. बुलेट ट्रेनसाठी लागेल तेवढी मुबलक जमीन इथे असल्याचं सांगण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे या दोन्ही जागा रेल्वेच्याच असल्यामुळे त्यात हस्तांतरणाची भानगड राहणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीतील एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना लिहिले आहे. शिवाय यासाठी फ्यायओव्हर, पायाभूत सुविधा अशा सर्व गोष्टींसाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
=============================================================

मोदी सरकारचे समर्थन केल्याने व्हिसा नाकारला: अनुपम खेर



पाकिस्तानने व्हिसा नाकारल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काश्मिरी पंडितांचा प्रश्न उपस्थित करणे, मोदी सरकारचे समर्थन करणे यामध्ये गैर काय, असा सवाल अनुपम खेर यांनी केला आहे. 

अमुपम खेर यांना कराची साहित्य महोत्सवासाठी आयोजकांनी निमंत्रित केले होते. या महोत्सवाला उप‌स्थित राहणाऱ्या अन्य १७ जणांना मात्र व्हिसा देण्यात आला आहे. व्हिसा मंजूर झालेल्यांमध्ये काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, अभिनेत्री नंदिता दास यांचा समावेश आहे. 'कराची साहित्य महोत्सवासाठी १८ भारतीयांपैकी १७ जणांना पाकिस्तानने व्हिसा दिला. फक्त मला सोडून सर्वांनाच व्हिसा मिळाला. काश्मिरी पंडितांचा प्रश्न उपस्थित करणे, मोदी सरकारचे समर्थन करणे यामध्ये गैर काय,' असा सवाल अनुपम खेर यांनी उप‌स्थित केला आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात बोलावले जाते. त्यांचा आपल्याकडे गौरव होतो. मात्र, पाकिस्तानकडून आपल्याला अशी वागणूक मिळताना दिसत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 
=============================================================

नांदेड; उद्या जिल्‍हास्‍तरीय स्‍वच्‍छतामित्र वक्‍तृत्‍व करंडक स्‍पर्धा


नांदेड, 3- शुध्‍द पाणी व स्‍वच्‍छतेसंदर्भात महाविद्यालयीन युवकांचा सहभाग घेण्‍यासाठी राज्‍य शासनाच्‍या पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाच्‍या वतीने स्‍वच्‍छतामित्र वक्‍तृत्‍व करंडक स्‍पर्धा आयोजित करण्‍यात येतात. वरिष्‍ठ आणि कनिष्‍ठ महाविद्यालयीन युवकांसाठी उद्या दिनांक 5 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्‍ये जिल्‍हास्‍तरीय वक्‍तृत्‍व करंडक स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहेत.
       जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात सकाळी दहा वाजता ही स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहे. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई गुंडले यांच्‍याहस्‍ते या स्‍पर्धेचे उद्घाटन करण्‍यात येणार आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्ष दिलीप धोंडगे, आरोग्‍य व शिक्षण सभापती संजय बेळगे, अर्थ व बांधकाम सभापती दिनकर दहिफळे, समाजकल्‍याण सभापती स्‍वप्निल चव्‍हाण, महिला व बालकल्‍याण सभापती वंदनाताई लहानकर, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जी.एल. रामोड, यू.ए. कोमवाड, दिपक चाटे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
      तालुकास्‍तरावर घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेत दोन्‍हीही गटातून प्रथम व व्दितीय आलेल्‍या युवक-युवतींची जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धेसाठी निवड करण्‍यात आली आहे. ही स्‍पर्धा उद्या दिनांक 5 फेब्रुवारी रोजी घेण्‍यात येणार आहेत. वरिष्‍ठ महाविद्यालयीन युवकांसाठी तरुणाईचे नवे धडे स्‍वच्‍छतेतून समृध्‍दीकडे, करु सांडपाण्‍याचे व्‍यवस्‍थापन, धरतीचे होईल नंदनवन, करु तपासणी पाण्‍याची हमी आरोग्‍यदायी जीवनाची, माझ्या स्‍वप्‍नातील स्‍वच्‍छ सुंदर निर्मल व समृध्‍द महाराष्‍ट्र व बहू असोत सुंदर स्‍वच्‍छ महादेश हा असे विषय असून कनिष्‍ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी स्‍वच्‍छ निर्मल शाळा बालकास लावी लळा, शुध्‍द थेंब पाण्‍याचा लाभ आरोग्‍यदायी जीवनाचा, कचरा नव्‍हे कांचन घनकच-याचे व्‍यवस्‍थापन, मिळून सा-या जणी मिळवू स्‍वच्‍छ व शुध्‍द पाणी तसेच साठवू थेंब थेंब पाण्‍याचा विचार पाऊस संकलनाचा हे विषय वक्‍तृत्‍वासाठी ठेवण्‍यात आले आहेत.
      तरी निवड झालेल्‍या युवक-युवतींनी शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा  वाजता स्‍पर्धेसाठी उपस्थित रहावे असे आवाहन उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड व जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक मिलिंद व्‍यवहारे यांनी केले आहे. 
=============================================================

=============================================================

=============================================================

=============================================================

=============================================================

=============================================================

=============================================================

=============================================================

No comments: