Friday, 12 February 2016

नमस्कार लाईव्ह १२-०२-२०१६चे बातमीपत्र

दिनविशेष:- Hug Day 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[अंतरराष्ट्रीय] 

१- आईनस्टाईनने भाकित केलेल्या गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध 

२- परवेझ मुशर्रफ चक्कर आल्याने बेशुद्ध, आयसीयूमध्ये दाखल 

३- बीजिंग; शुद्ध हवेची विक्री चीनमध्ये तेजीत  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

४- शिवसेना भवनही रडारवर होतं, राजाराम रेगेंच्या मदतीने सेना भवनात घुसलो : हेडली 

५- डेव्हिड हेडलीने दिलेल्या माहितीला कायदेशीर आधार नाही- मुंबई पोलीस  

६- दाभोळकर हत्येप्रकरणी 2 संशयितांची पॉलिग्राफिक टेस्टची सीबीआयची मागणी 

७- शहीद हनुमंतप्पाच्या पार्थिवावर मूळगावी बेटादूरमध्ये अंत्यसंस्कार 

८- सहा तासच चालणार 'रीटर्न' तिकीट 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

९- इशरतबाबतच्या वक्तव्यानंतर धुळ्यात आव्हाडांच्या पुतळ्याचं दहन 

१०- समुद्र, टेकड्या, पर्वतांवरील सहलबंदीचा आदेश मागे 

११- हैदराबाद : फसवणूक प्रकरणी 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजमौलींना नोटीस 

१२- चेन्नई; ऑन ड्यूटी तुरुंग अधिकाऱ्याचे ठुमके, निलंबनाची कारवाई 

१३- हेल्मेटसक्तीमुळे अडीच कोटींची दंडवसुली  

१४- चड्डी-बनियान टोळीतील फरार आरोपींना शोधण्यासाठी पथके 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

१४- धावती लोकल पकडताना तरुणाचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद 

१५- स्नॅपडिलची सॉफ्टवेअर इंजिनिअर बेपत्ता तरुणी अखेर सापडली 

१६- बंगळुरू; वॉटरप्रूफ साडीनंतर आता ७० लाखांच्या घड्याळामुळे सिद्धरामय्या चर्चेत  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

१७- प्रियांका चोप्राच्या मराठी सिनेमाचं नाव ठरलं, कामही सुरु  

१८- मी गुन्हा केला... मला माफ करा: विराट कोहली  

१९- टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', रांचीत रंगणार टी-20चा थरार 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[नांदेड]

२०- भोकर: कासरडे मागासवर्गीय वसतिगृहातील जेवणात आळया; विद्यार्थ्यांची समाजकल्याण विभागाकडे तक्रार 

२१- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना प्राधान्य देणार; समाजकल्याण समितीच्या बैठकीत ठराव 

२२- हिंगोली; जेतवन बुद्धविहारात आज १४ वी धम्म परिषद 

२३- देगलूर; जलयुक्त शिवाराची कामे यंत्रांनी घ्यावीत हाती, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना 

२४- मुदखेड; नगराध्यक्षा शमीम बेगम यांचा राजीनामा 

२५- बिलोली; जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमूर्तीसमोर चप्पल भिरकवण्याचा आरोपीचा प्रयत्न 

२६- कंधार; पशुवैद्यकीय दवाखान्यासामोरील बुटाचे दुकान जळून खाक 

२७- निवघा बाजार येथे चार चोऱ्या; एकाच महिन्यातील मोठ्या चो-याची दुसरी घटना, व्यापारी हादरले 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[वाढदिवस]

शिवाजी कोनापुरे, सत्यनारायण कांकर, जावेद शेख, ज्ञानेश्वर जाधव, मनोज सत्नुरे, अमित महाजन, नरवाल चौधरी, रामेश्वर शिकारवार, कैलाश रामदिनवार, रांगा देशमुख, हर्ष धुत्रे 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

अडचणीच्या काळात कोणी सल्ला मागितला तर नुसता सल्ला देवू नका साथ पण द्या कारण सल्ला चुकीचा ठरू शकतो पण साथ नाही

(विठ्ठल नरसिंग)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

विकणे आहे 

भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.

संपर्क- 7350625656

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून

बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...

व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....

आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html

*****************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://goo.gl/uS8DX4



शिवसेना भवनही रडारवर होतं, राजाराम रेगेंच्या मदतीने सेना भवनात घुसलो : हेडली


मुंबई: 26/11 चा मास्टरमाईंड दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडलीने काल इशरत जहाँचं नाव घेतल्यानंतर आज शिवसेना भवनही त्यावेळी टार्गेट होतं असं कबुल केलं. तसंच शिवसेना भवनाची रेकी केली होती. शिवसेना भवनात प्रवेश मिळवण्यासाठी  राजाराम रेगे यांना दादरच्या शिवसेना भवनात भेटलो होतो. राजाराम रेगेंशी मी चांगली मैत्री केली होती, असा गौप्यस्फोट आज हेडलीने केला. 
इतकंच नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवनावर लष्कर ए तोयबा भविष्यात हल्ला करू शकणार होतं. त्यामुळे शिवसेना भवनाची माहिती घेऊन ती लष्कर ए तोयबाला पुरवण्याच्या हेतून शिवसेना भवनात घुसल्याचं हेडली म्हणाला. त्यासाठी राजाराम रेगे यांच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं हेडलीने कबूल केलं. 
याशिवाय हेडलीने शिवसेना भवनाचं व्हिडीओ शुटिंगही केलं होतं. हे शुटिंग त्याने साजिद मीरकडेसोपवलं होतं. त्यावेळी त्याने राजाराम रेगेशी संपर्क वाढवण्यास सांगितलं होतं, असं हेडली म्हणाला
================================

शहीद हनुमंतप्पाच्या पार्थिवावर मूळगावी बेटादूरमध्ये अंत्यसंस्कार 

LIVE -शहीद हनुमंतप्पाचं पार्थिव मूळगावी बेटादूरमध्ये दाखल
भारतमातेचा सुपुत्र… हिमवीर.. शहीद हनुमंतप्पा यांचं पार्थिव मूळगावी बेटादूरमध्ये पोचलंय…  सियाचीनच्या हिमस्खलनात हनुमंतप्पा बर्फाखाली दबूनही आश्चर्यकारकरित्या बचावले.. सहा दिवसांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं.. मात्र उपचारादरम्यान त्यांचा काल दिल्लीतल्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.. आज दुपारीच लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यस्कार करण्य़ात येतील…
बेटादूर गावावर शोककळा पसरली. मात्र गावाचा जवान देशासाठी कामी आला, हा अभिमानाचा भावही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय….
हनुमंतप्पांना वंदन करण्यासाठी हुबळीत गर्दी, अंत्यदर्शनासाठी पार्थिव नेहरु स्टेडियममध्ये ठेवण्यात आलं आहे. याठिकाणी देशाच्या वीराला वंदन करण्यासाठी कर्नाटकातील नागरिकांनी गर्दी केली आहे.
================================

मी गुन्हा केला... मला माफ करा: विराट कोहली 

मी गुन्हा केला... मला माफ करा: विराट कोहली
मुंबई: एकीकडे संपूर्ण जग व्हॅलेंटाइन वीक सेलिब्रेटी करीत असताना दुसरीकडे बॉलिवूडसाठी मात्र काही आलबेल नाही.
2016 च्या सुरुवातीला बॉलिवूडमधील अनेक जोडपी वेगळ्या झाल्या. त्याच बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांचं अफेअर आणि त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा. 
याच दरम्यान विराट कोहलीनं आपल्या इस्टांग्राम अकांउटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्याचं कॅप्शन होतं ‘हार्टब्रोकन’. म्हणजेच तुटलेलं हृद्य. पण काही दिवसांनी विराटनं तो फोटो डिलीट केला.
================================

प्रियांका चोप्राच्या मराठी सिनेमाचं नाव ठरलं, कामही सुरु 

प्रियांका चोप्राच्या मराठी सिनेमाचं नाव ठरलं, कामही सुरु
मुंबई : जगभरात आपल्या अभिनयाचा ठसा उमटत असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता मराठी चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगलाही सुरुवात झाली आहे. 
प्रियांकाच्या या आगामी मराठी सिनेमाचं नाव ‘वेंटिलेटर’ असं आहे. 
या सिनेमाची निर्मिती स्वत: प्रियांका चोप्रा करणार आहे. तिची प्रॉडक्शन कंपनी ‘पर्पल पेबल पिक्चर्स’च्या बॅनरखाली मराठी सिनेमाची निर्मिती होत आहे. तर राजेश मापुस्कर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
================================

इशरतबाबतच्या वक्तव्यानंतर धुळ्यात आव्हाडांच्या पुतळ्याचं दहन

इशरतबाबतच्या वक्तव्यानंतर धुळ्यात आव्हाडांच्या पुतळ्याचं दहन
धुळे: धुळ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं काल दहन केलं. हेडलीनं दिलेल्या साक्षीनंतर इशरत जहाँ दहशतवादी होती हे स्पष्ट झाल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे. त्याच इशरत जहाँचा भाऊ आव्हाड यांच्या कार्यालयात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. भाजप आमदार अनिल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतिर्थ चौकात हे आंदोलन करण्यात आलं होतं.
================================

धावती लोकल पकडताना तरुणाचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

धावती लोकल पकडताना तरुणाचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद
मुंबई: लोकलच्या अपघातांचं सत्र अद्याप कायम आहे. धावत्या लोकलमध्ये चढताना पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत पुन्हा एकदा घडली आहे. विलेपार्ले स्टेशनवरच्या लोकल पकडताना एका तरुणाचा अपघात झाला असून अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. 
ही घटना 7 फेब्रुवारीची असून रामवरण चौपल असं अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. गर्दी असतानाही रामवरणनं धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण तो लोकलमध्ये चढू शकला नाही. 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता की, धावती ट्रेन पकडण्यासाठी जात असतानाचा रामवरणचा तोल जाऊन तो गाडी खाली आला आणि यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रामवरण आपल्या मित्रांसोबत पार्टी करुन घरी परतत होता त्यावेळी ही घटना घडली. 
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दादर स्थानकावरही अशीच घटना घडली होती. ज्यामध्ये एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले होते.
================================

टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', रांचीत रंगणार टी-20चा थरार

टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', रांचीत रंगणार टी-20चा थरार
रांची: दिनेश चंडिमलच्या नवख्या श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना गवावल्यानंतर धोनीची टीम इंडिया मालिकेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि श्रीलंका संघांमधल्या टी-20 मालिकेतला दुसरा सामना आज रांचीत खेळवला जाणार आहे. 
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवरच्या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 5 विकेट्स राखून धुव्वा उडवून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार धोनीनं या पराभवाचं खापर खेळपट्टीवर फोडलं होतं, पण या सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी अतिशय लाजिरवाणी ठरली हे विसरता कामा नये. 
पुण्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना 20 षटकंही फलंदाजी करता आली नव्हती. पण रांचीचं मैदान हे फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचं दिसतं आहे. कारण, रांचीत खेळवण्यात आलेल्या तीन वन डे सामन्यांपैकी दोन सामन्यांत भारतानं विजय मिळवला आहे. तर एक सामना रद्द झाला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यांत फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळं उद्याच्या टी20 सामन्यातही फलंदाजांकडून मोठ्या खेळींची अपेक्षा केली जाते आहे.
================================

स्नॅपडिलची सॉफ्टवेअर इंजिनिअर बेपत्ता तरुणी अखेर सापडली

स्नॅपडिलची सॉफ्टवेअर इंजिनिअर बेपत्ता तरुणी अखेर सापडली!
नवी दिल्ली: प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅपडीलची सॉफ्टवेअर इंजिनिअर दीप्ती सराना हिचा आज सकाळी ठावठिकाणी कळला असून ती सुखरुप असल्याचं समजतं आहे. गाझियाबादच्या वैशाली मेट्रो स्टेशनवरुन बुधवारी बेपत्ता झालेली दीप्ती हरियाणातील पानिपत येथे असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी तिचं कुटुंबीयांशी बोलणंही करुन दिलं. 
दीप्तीचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता दीप्ती गुडगावहून गाझियाबादमधील निवासस्थानी जाण्यासाठी निघाली. रात्री 8 च्या सुमारास ती गाझियाबादमधल्या वैशाली मेट्रो स्टेशनवर उतरली आणि शेअर रिक्षाने बस स्टँडच्या दिशेने निघाली. बस स्टँडहून दीप्ती नेहमी तिच्या वडिलांसोबत घरी जाते. 
बस स्टँडवर पोहचण्याआधीच रिक्षावाल्याने रिक्षातील एका मुलीला जबरदस्ती खाली उतरवलं आणि दीप्तीसह पोबारा केला. यावेळी दीप्ती ज्या मित्रासोबत फोनवर बोलत होती, त्यानेच या घटनेची माहिती दिली होती. 
दीप्तीच्या बंगळुरुमध्ये राहणाऱ्या मित्राने दीप्तीसोबत काहीतरी विपरित घडल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर दीप्तीच्या कुटुंबीयांनी तिला अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नव्हता. अखेर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली होती. 
दीप्ती प्रवासादरम्यान नेहमी खबरदारी घ्यायची. रिक्षातून एकटीने प्रवास करणं ती टाळायची, तिच्यासोबत नेहमी एखादी मैत्रिण असायची, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. गाझियाबाद पोलिसांनी तिचं लोकेशन ट्रेस करुन दीप्ती आणि अज्ञात रिक्षावाल्याचा शोध सुरु केला होता. अखेर ती आज सकाळी हरियाणात सापडली.
================================

आईनस्टाईनने भाकित केलेल्या गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध

आईनस्टाईनने भाकित केलेल्या गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध
मुंबई : जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी शंभर वर्षांपूर्वी ज्या गुरुत्वाकर्षण लहरींचं भाकित केलं होतं, त्यांचा शोध लागला आहे. अवकाश विज्ञानातील हा सर्वात मोठा शोध मानला जात आहे. यामुळे ब्रह्मांडबाबत आणखी माहिती मिळण्यास मदत होईल, असं म्हटलं जात आहे. 
अवकाशात गुरुत्वार्षण लहरीचं अस्तित्व जगभरातील शास्त्रज्ञांनी मान्य केलं आहे. दीड अब्ज प्रकाशवर्षांपूर्वी झालेल्या कृष्णविवर अर्थात दोन ब्लॅक होलमध्ये काही सेकंदाची धडक होऊन या गुरुत्वाकर्षण लहरी तयार झाल्याचं शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. 
आईनस्टाईन यांची ‘थिएरी ऑफ रिलेटीव्हिटी’
सुमारे शंभर वर्षांपूर्वी अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला होता. या ‘थिएरी ऑफ रिलेटीव्हिटी’मध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, गुरुत्वाकर्षणाच्या लहरी दिसूही शकतात. आता याबाबत आधुनिक काळात नव्या उपकरणांच्या सहाय्याने नवे संशोधन सुरु आहे. या गुरुत्वाकर्षण लहरी दोन कृष्णविवरांच्या मिलनातून किंवा एखाद्या ताऱ्याच्या स्फोटातून निर्माण होत असतात.
================================

परवेझ मुशर्रफ चक्कर आल्याने बेशुद्ध, आयसीयूमध्ये दाखल

परवेझ मुशर्रफ चक्कर आल्याने बेशुद्ध, आयसीयूमध्ये दाखल
कराची : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना कराचीच्या पीएनएस शिफा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुशर्रफ यांना घरातच चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. यानंतर 72 वर्षीय मुशर्रफ यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 
– मुशर्रफ यांना दाखल केल्यानंतर कराचीच्या पीएनएस शिफा हॉस्पिटलच्या सुरक्षव्यवस्थेत वाढ केली आहे.
– डॉक्टरांची टीमचं सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष आहे.
– मुशर्रफ यांना 2014 पासून प्रकृतीच्या कुरबुरी सुरु आहेते. दोन वर्षांपूर्वी कोर्टात हजर होण्यापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. 
दरम्यान, मुशर्रफ यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचं कारण नाही, अशी माहिती ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचे आसिया इशाक यांनी दिली. परवेझ मुशर्रफ यांना केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, असंही इशाक म्हणाले.
================================

फसवणूक प्रकरणी 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजमौलींना नोटीस

फसवणूक प्रकरणी 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजमौलींना नोटीस
हैदराबाद : बाहुबली या जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. राजमौली अडचणीत येण्याची शक्यता आहे. फसवणूक केल्या प्रकरणी हैदराबादमधील स्थानिक कोर्टाने त्यांना 24 तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 
मणीकोंडामधील राजमौली यांच्या निवासस्थानी जाऊन कोर्टाने समन्स बजावल्या प्रकरणी बंजारा हिल्स पोलिस स्टेशनचे अधीक्षक मुरली क्रिश्ना यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
टॉलिवूड इंडस्ट्रीतील निर्माते भुवनेश्वर यांनी या प्रकरणी 2012 मध्ये कोर्टात धाव घेतली होती. बंजारा हिल्सच्या लोटस पाँडमधील फ्लॅट विकण्याबाबत करार करुन राजमौली यांनी दोन लाख रुपये घेतल्याचा दावा भुवनेश्वर यांनी केला आहे. 2011 मध्ये संबंधित फ्लॅट 41 लाखांना विकत घेण्याबाबत करार झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 
‘मात्र काही महिन्यांनंतर राजमौली यांनी भुवनेश्वर यांना नोटीस पाठवून करार रद्द झाल्याचं सांगितलं. तसंच 2 लाखांची रक्कम परत मिळणार नसल्याचंही नोटीसमध्ये कळवलं. 2012 मध्ये मी राजमौलींना ही फसवणूक असल्याचं सांगितलं, मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही’ असा दावा भुवनेश्वर यांनी केला आहे. त्याचप्रमाणे हा फ्लॅट राजमौलींनी दुसऱ्याच व्यक्तीला 47 लाखांना विकल्याची माहितीही मला मिळाली, असं भुवनेश्वर यांनी पुढे म्हटलं. 
एस. राजमौली यांना नुकताच पद्मश्री जाहीर झाला आहे. सध्या ते बाहुबली चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.
================================

समुद्र, टेकड्या, पर्वतांवरील सहलबंदीचा आदेश मागे

समुद्र, टेकड्या, पर्वतांवरील सहलबंदीचा आदेश मागे
मुंबई : शाळा आणि कॉलेज सहलीसंदर्भातील आदेश शिक्षण विभागाने मागे घेतला आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ही माहिती दिली आहे. शिक्षण संस्था आणि पालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 
मुरुड बीचवरील 14 विद्यार्थी बुडाल्यानंतर उंच ठिकाणी, समुद्रकिनाऱ्यांवर तसंच नदीकाठी सहली काढता येणार नाही, असं परिपत्रक शिक्षक विभागाने काढलं होतं. शिवाय सहल काढण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवरील हमीपत्राची अटही मागे घेण्यात आली आहे.
================================

चेन्नई; ऑन ड्यूटी तुरुंग अधिकाऱ्याचे ठुमके, निलंबनाची कारवाई

VIDEO : ऑन ड्यूटी तुरुंग अधिकाऱ्याचे ठुमके, निलंबनाची कारवाई
चेन्नई : ड्यूटीवर असताना ढोलताशांच्या तालावर ठुमके लगावणं एका पोलिस अधिकाऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यामधले 57 वर्षीय पी शंकरन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शंकरन हे अत्तुर सबजेलमध्ये उप तुरुंग अधीक्षक होते. 
शंकरन यांचा 57 सेकंदांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते खाकी वर्दीतच ढोल ताशांवर ताल धरताना दिसत आहेत. एका हातात त्यांनी पोलिसांची टोपी धरली आहे. चौघं जण त्यांना चिअर करत असून त्यात वर्दीतील दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिट्यांचाही जोरदार आवाज घुमताना ऐकू येत आहे. 
प्रजासत्ताक दिनी ड्यूटीवर आले असताना शंकरन यांनी ठेका धरल्याचं म्हटलं जातं, मात्र याला अधिकृत दुजोरा नाही. हा प्रकार कुठे घडला, याची माहिती नसून चौकशी सुरु आहे, असं एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
================================
दाभोलकर हत्येप्रकरणी 2 संशयितांची पॉलिग्राफिक टेस्टची सीबीआयची मागणी 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आणखी पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सनातनचे साधक हेमंत शिंदे आणि निलेश शिंदे यांची पॉलिग्राफिक टेस्ट करण्यासाठी सीबीआयनं शिवाजीनगर कोर्टात अर्ज दाखल केलाय. या टेस्टसाठी आरोपींची संमती आवश्यक असते, तीही मिळालेली आली आहे.
सीबीआय ने हीच नाव बंद लिफाफ्यात उच्च न्यायालयात सादर केली होती या दोघाही साधकांचे मोबाईलचे टॉवर लोकेशन आणि त्यांनी दिलेली माहिती याबाबात बरीच तफावत आढळली आहे.
त्यामुळे पॉलिग्राफिक टेस्टचा अर्ज करण्यात आला आहे.यापूर्वी सनातन संस्थेनं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे दोघेही निर्दोष असल्याचा दावा केला होता.

मात्र, ते सनातन प्रभात या पेपरचं वितरण करत असताना त्यांचे मोबाईल लोकेशन हे दाभोलकारांची हत्या झालेल्या ठिकाणांच्या आसपास असल्याच निदर्शनात आलं होतं.
================================
बंगळुरू; वॉटरप्रूफ साडीनंतर आता ७० लाखांच्या घड्याळामुळे सिद्धरामय्या चर्चेत 


पत्नीसाठी तब्बल १ लाख रुपयाची वॉटरप्रूफ साडी विकत घेणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आता हातात तब्बल ७० लाख रुपयांचे घड्याळ घातल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्यामुऴे आता पोटनिवडणूक व ग्रामपंचायत निवडणुकीतील वातावरण भलतंच तापलं आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सिद्धरामय्या यांच्या घड्याळाचा मुद्दा छेडत त्यांच्याकडे ७० लाख रुपयांचे घड्याळ कुठून आले असा प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांचा चष्माही २ लाख रुपयांचा असल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षानेही सिद्धरामय्यांवर निशाणा साधला होता. आपल्या मुलाच्या चित्रपटासाठी सिद्धरामय्या यांनी ७० कोटी खर्च केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तर आता कुमारस्वामींनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

सिद्धरामय्या यांनी गेल्या महिन्यात पत्नीसाठी तब्बल १.०८ लाखाची वॉटरप्रूफ साडी खरेदी केली. कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीच्या साडया प्रदर्शनाच्या उदघाटनच्यावेळी सिद्धरामय्या यांनी पत्नी पार्वतीसाठी सोन्याचे धागे असलेली नारंगी रंगाची साडी खरेदी केली. मात्र विकत घेण्यापूर्वी त्यांनी साडीवर लिटरभर पाणी त्या ओतून ती ओली होत नाही ना याची खात्रीही करून घेतली होती.
================================

सहा तासच चालणार 'रीटर्न' तिकीट

उपनगरीय लोकलचे रीटर्न तिकीट सहा तासांसाठी ग्राह्य धरण्याची महत्त्वपूर्ण सूचना मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आली आहे. रीटर्न तिकिटाचा होणारा गैरवापर थांबविण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी ही सूचना करण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
उपनगरीय लोकलचे सिंगल तिकीट काढतानाच प्रवाशांकडून अनेकदा रीटर्न तिकीटही काढले जाते. एखाद्या स्थानकातून प्रवाशाने रीटर्न तिकीट काढल्यास ते तिकीट दुसर्‍या दिवशीही परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरले जाते. त्याचप्रमाणे शनिवारी रीटर्न तिकीट काढल्यास सोमवारपर्यंत ते परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येते. मध्य रेल्वेमार्गावर दररोज अशा प्रकारे जवळपास ४0 हजारांहून अधिक रीटर्न तिकिटे काढली जात असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. तथापि, रीटर्न तिकीट काढल्यानंतर काही प्रवासी तेच तिकीट परतीच्या प्रवासासाठी अन्य लोकांकडेही देत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे रेल्वे उत्पन्नापासून वंचित राहत तर आहेच, पण त्यातून काही गैरप्रकारही होत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
================================

डेव्हिड हेडलीने दिलेल्या माहितीला कायदेशीर आधार नाही- मुंबई पोलीस 

मुंबई हल्ल्याच्या (२६/११) आधी मुंबईवर हल्ल्याचे दोन फसलेले प्रयत्न आणि लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) आत्मघाती हल्लेखोर इशरत जहाँबाबत डेव्हिड हेडली याने जी माहिती दिली तिला कायदेशीर आधार नाही, असे मुंबई पोलिसांतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हेडलीने जे काही सांगितले त्याला कायद्याच्या दृष्टीने काहीही मोल नाही; व त्याने जे काही दावे केले आहेत त्याला दुजोरा देणारे काहीही नाही, असे हे अधिकारी म्हणाले.
अधिकारी म्हणाले की, मुंबईवर २००८मध्ये दहशतवादी हल्ला होईल असा अगदी क्षीण म्हणता येईल असा अंदाज गुप्तचर विभागाने (आयबी) व्यक्त केला होता. परंतु वस्तुस्थिती अशी होती की इशरत जहाँ ही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती ही बाब चांगली माहीत होती. पण वादाचा मुद्दा ठरला तो तिला अतिशय थंड डोक्याने चकमकीत मारण्यात आल्याचा. इशरत जहाँचे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यामुळे हेडलीने जे काही सांगितले त्याचा आमच्या प्रकरणावर काय परिणाम होईल याबद्दल केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय) काहीही भाष्य करण्यास तयार नाही.
================================

हेल्मेटसक्तीमुळे अडीच कोटींची दंडवसुली 

परिवहन विभागाने हेल्मेटसक्तीचे आदेश दिल्यानंतर राज्यभर पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. मुंबईतदेखील पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत २६ दिवसांत तब्बल अडीच कोटींची वसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तटस्थ भूमिका घेत गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या पत्नीकडूनही दंड वसूल केला.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने हेल्मेटसक्तीचे आदेश काढले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. पुण्यात काहींनी या सक्तीला पहिल्यांदा विरोध दर्शवला. पुण्यात हेल्मेटसक्तीवरून वाद सुरू असतानाच आता दुचाकीच्या मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी हेल्मेट घातले नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नवीन वादास तोंड फुटले.
================================

चड्डी-बनियान टोळीतील फरार आरोपींना शोधण्यासाठी पथके

बोरीवली येथे कुख्यात चड्डी-बनियान टोळीच्या चार लुटारूंना पोलिसांनी अटक केली आहे. तरी टोळीतील फरार असलेल्या आठ ते नऊ साथीदारांना शोधण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय या टोळीने पूर्वी ज्या लोकांची घरे लुबाडली आहेत, त्या लोकांनीही पोलिसांना संपर्क करण्यास सुरुवात केली आहे.
थरारक मोहिमेंतर्गत पोलिसांनी या टोळीच्या रमेश काळे (३०), संजय काळे (२५), अशोक शिंदे (३५ ) आणि संतोष चव्हाण (३५) या चौघांना अटक केली. सध्या चौघांचीही कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे फरार साथीदार ज्या ज्या ठिकाणी लपण्याची शक्यता आहे, त्या त्या ठिकाणची माहिती पोलीस चौघांकडून घेत आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांचाही लेखाजोखा तपासण्याचे काम सुरू आहे.
टोळीतील फरार आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर पुजारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पुजारी म्हणाले की, विशेष पथके फरार आरोपींच्या मागावर आहेत. शिवाय टोळीने ज्या ठिकाणी दरोडे टाकले होते, त्यातील पीडितांनाही पोलीस संपर्क साधत आहेत. मात्र याबाबत अधिक माहिती तूर्तास तरी देता येणार नाही. मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरात या टोळीच्या लुटारूंचा वावर असून सध्या बोरीवली पोलीस त्यांचा माग घेत आहेत.
================================

बीजिंग; शुद्ध हवेची विक्री चीनमध्ये तेजीत 


बीजिंग : पराकोटीच्या प्रदूषणामुळे बीजिंगसह अनेक मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना मोकळ््या हवेत श्वास घेणेही दुरापास्त झालेल्या चीनमध्ये सातासमुद्रापलिकडची बाटलीबंद शुद्ध हवा विकण्याचा धंदा सध्या तेजीत आला आहे. चिनी नववर्षाच्या दीर्घकालीन सुट्ट्या आणि त्यानिमित्त होणाऱ्या बाजारहाटाचे औचित्य साधून अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर फिरून अशी डबाबंद किंवा बाटलीबंद हवा विकणारे विक्रेते दिसत आहेत.
अर्थात शुद्ध हवेच्या या काही श्वासांसाठी चिनी नागरिक जी किंमत मोजत आहेत ती ऐकली तर तुम्हा-आम्हांसारख्यांचे श्वास नक्कीच रोखले जातील. इंग्लंड व कॅनडा यासारख्या देशांमधील शुद्ध हवा भरलेली एक बाटली येथे चक्क ११५ ते ५०० डॉलरना म्हणजे एक हजार ते ३३ हजार रुपयांना विकली जात
आहे.
हवा विकून बख्खळ पैसा करण्याच्या या गोरखधंद्यात नव्याने हात धुवून घेणाऱ्यांत ब्रिटिश उद्योजक लिओ डी वॉट््स हे ताजे उदाहरण आहे. डी वॅट्स यांनी यासाठी ब्रिटनमध्ये ‘एथाएअर’ नावाची चक्क कंपनी सुरु केली असून ब्रिटिश बेटांच्या मध्य भागातील हिरव्यागार कुरणांनी सजलेल्या डॉरसेट, सॉमरसेट आणि वेल्स इत्यादी परगण्यांमधील शुद्ध हवेची झुळुक बाटलीबंद करून ही कंपनी ती चीनमध्ये विकत आहे.
वॅट्स यांच्या कंपनीच्या बाटलीत ५८० मिली (सुमारे २० औंस) एवढी शुद्ध हवा भरलेली असते. ग्राहकांना या शुद्ध हवा मनसोक्त छातीत भरून घेता यावी यासाठी १५ बाटल्यांचा संच ८८८ डॉलर अशा सवलतीच्या दराने विकण्याची व्यापारी शक्कलही डी वॅट्स लढवीत आहेत. (वृत्तसंस्था)
कल्पना देशी, व्यापारी परदेशी
माणसाला जगण्यासाठी मूलभूत अशी हवेसारखी गोष्ट विकून त्यातून पैसा कमावणारे डी वॅट्स हे पहिले मात्र नाहीत. काही महिन्यांपूर्वी कॅनडातील ‘व्हायटॅलिटी एअर’ या कंपनीने तेथील रॉकी पर्वताच्या परिसरातील शुद्ध हवा डबाबंद स्वरूपात चीनमध्ये आणून विकण्यास सुरुवात केली.
अर्थात एका डब्याला १४ ते २० डॉलर हा कॅनडाच्या हवेचा दर ब्रिटनच्या हवेच्या तुलनेने अगदीच मामुली आहे. पण प्रदूषणाच्या घट्ट विळख्यात अडकलेल्या चिनी नागरिकांना शुद्ध हवा विकण्याचा व्यापार करण्याची कल्पना मात्र मूळची पाश्चात्य व्यापाऱ्यांची नाही. चिनी उद्योजक चेन गुआंगबिआओ यांनी सन २०१३ मध्ये सर्वप्रथम अशा हवेच्या व्यापाराची चीनमध्ये सुरुवात केली. अर्थात चेन परदेशातून आणून नव्हे तर चीनच्याच प्रदूषण नसलेल्या भागातील हवा आणून प्रदूषित शहरांमध्ये विकत होते

No comments: