[आंतरराष्ट्रीय]
१- दाऊद इब्राहिमवर इंग्लंडने लादले आर्थिक निर्बंध
२- ब्रिटन: समलैंगिकावर बलात्कार, भारतीय व्यक्तीला पाच वर्षाची शिक्षा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- भुजबळ कुटुंबीयांविरोधात भाजपचं षडयंत्र : समीर भुजबळ
४- मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित सुटणार?
५- छगन भुजबळ, सुनील तटकरेही जेलमध्ये दिसू शकतात: दानवे
६- हैदराबादमधील मतदाराच्या आयडीवर 'सलमान'चा फोटो
७- समलैंगिक संबंधांच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टात आज निर्णय
८- गर्भलिंग निदान चाचणी अनिवार्य करावी : मेनका गांधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- 'पर्ल्स'च्या गुंतवणूकदारांसाठी आशेचा किरण
१०- सरकार जाणीवपूर्वक भुजबळांना टार्गेट करतंय : पवार
११- नाशिक; भुजबळ समर्थकांचा राडा, रास्ता रोको आणि तोडफोड
१२- अंडाकरी, मासे, मोदक, भाजप मंत्र्यांचे डब्बे शिवसेना मंत्र्यांनी खाल्ले !
१३- शनिशिंगणापूरमध्ये महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे - शरद पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींना ढकललं जातंय पोर्नोग्राफीमध्ये
१५- पटना; रुग्णाची नस न मिळाल्यानं डॉक्टर चिडला, नर्सचा हातच मोडला!
१६- लातूर : उद्गीरमध्ये ८० विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- आगामी बॉलिवूडपटात हा दिग्गज अभिनेता 'असा' दिसणार
१८- विराट कोहली आयसीसी क्रमवारीत नंबर वन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,कारण.... काळ इतका ताकदवान आहे की, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिरा बनवतो...!!
(अरविंद कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
************************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
========================================================
झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींना ढकललं जातंय पोर्नोग्राफीमध्ये
झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांना पोर्नोग्राफी करण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस करत आहेत. झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींना शहरांमध्ये घरगुती कामासाठी न्यायचे आणि नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचे तसेच पोर्नोग्राफिक चित्रपट बनवायचे असा हा सगळा प्रकार असून त्यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात व्यक करण्यात आला आहे.
अशा प्रकारे दरवर्षी हजारो मुलींना लैंगिक अत्याचारांची शिकार व्हावं लागतं असा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे. झारखंड पोलीसांकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार २००५ पासून आत्तापर्यंत ३,८३८ मुलं हरवली आहेत आणि त्यापैकी १,२८१ मुलांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही.
========================================================
हैदराबादमधील मतदाराच्या आयडीवर 'सलमान'चा फोटो
हैदराबादमधील एका मतदाराच्या ओळखपत्रावर चक्क बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचे नाव आणि फोटो आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलमानचा फोटो पाहून मतदान केंद्रावरील अधिकारीही अवाक झाले. ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होत असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
गोवालीपुरा येथे मतदानासाठी आलेल्या एका इसमाचे व्होटर आयडी सर्वांनांच धक्का बसला. त्याच्या व्होटर आयडीवर चक्क अभिनेता सलमान खानचे नाव व फोटो होता, तसेच त्याच्या वडिलांच्या नावासमोरही सलीम खान यांचे नाव होते. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या सलमान खानचे वय होते, ६४ वर्ष. या सर्व घटनेनंतर तेथील अधिका-यांनी त्या इसमास मतदान करू देण्यास नकार देत तेथून परत पाठवले. मात्र मुंबईतील सलमान खानचे हैदराबादमधील हे व्होटर आयडी दिवसभरात सर्व सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल झाले.
या घटनेमुळे निवडणूक यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे.
================================================
दाऊद इब्राहिमवर इंग्लंडने लादले आर्थिक निर्बंध
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीवर इंग्लंडने टाच आणली असून त्याचा समावेश आर्थिक निर्बंध घातलेल्यांच्या यादीत केला आहे. भारतातला मोस्ट वाँटेड गुंड असलेल्या दाऊदचं नाव इंग्लंडच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या दस्तावेजात आलं असून २७ जानेवारी रोजी ही यादी अद्ययावत करण्यात आली आहे, आणि यामध्ये दाऊदचे चारही निवासाचे पत्ते पाकिस्तानमध्ये कराचीत असल्याचे नोंद करण्यात आले आहे.
दाऊद इब्राहिम कासकर घर क्र. ३७, ३० वा रस्ता, डिफेन्स, हाउसिंग अथॉरिटी कराची, घर क्र. २९, मरगल्ला रोड तसेच व्हाईट हाऊस व क्लिफ्टन येथे राहतो असं या दस्तावेजात म्हटलं आहे.
दाऊदचं राष्ट्रीयत्व भारतीय असून त्याचा पासपोर्ट भारताने रद्द केल्यानंतर त्याने भारतीय व पाकिस्तानी अनेक बनावट पासपोर्ट केले व त्याचा गैरवापर केला आहे, असेही यात म्हटले आहे.
दाऊदविरोधात आंतरराष्ट्रीय पकड वॉरंट असून प्रथम असे वॉरंट ७ नोव्हेंबर २००३ मध्ये जारी करण्यात आल्याचा तपशील देण्यात आला आहे.
या निर्बंधांमुळे दाऊदला इंग्लंडमध्ये आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत, त्याच्या मालमत्ता आढळल्यास जप्त होतील.
जानेवारी २०१६मध्ये जारी केलेल्या या यादीत लिट्टे, खलिस्थानवादी संघटना आणि हिजबुल मुजाहिदीनचा समावेश आहे.
================================================
भुजबळ कुटुंबीयांविरोधात भाजपचं षडयंत्र : समीर भुजबळ
मुंबई: माझ्या आणि भुजबळ कुटुंबीयांविरोधात भाजपने षडयंत्र रचल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला.
समीर भुजबळ यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. वैद्यकीय तपासणीसाठी जाताना समीर भुजबळांनी आपली प्रतिक्रिया एबीपी माझाकडे मांडली.
भाजपचे काही नेते सूडबुद्धीनं राजकारण करत असल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला. भाजप नेते किरीट सोमय्यांना कारवाईची पूर्वकल्पना आधीच कशी होती, असा सवालही समीर यांनी केला. चौकशीत पूर्ण सहकार्य करत असून, सर्व सगळे पुरावेही ईडीला दिल्याचं त्यांनी सांगितलं. या पुराव्यावरून निर्दोषत्व सिद्ध होत असतानाच मला अटक करण्याचा डाव खेळण्यात आल्याचा आरोप समीर यांनी केला.
मला न्यायप्रक्रियेवर पूर्णत: विश्वास असून मी लवकरच निर्दोष सिद्ध होईन, असा दावा समीर यांनी केला.
==================================================
'पर्ल्स'च्या गुंतवणूकदारांसाठी आशेचा किरण
नवी दिल्ली: पर्ल्स कंपनीमधील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी. कारण 15 हजार कोटींच्या पर्ल्स घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती गुतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी प्रयत्न करणार असून, त्यासाठी कंपनीची संपत्ती विकूनही गुंतवणूकदाराचे पैसे परत केले जाऊ शकतात.
त्यामुळं गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या समितीमध्ये सेबीच्या एका अधिकाऱ्याचाही सहभाग असेल, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं.
जनलोक प्रतिष्ठानच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला. कोर्टाच्या या निर्णयामुळं पर्ल्स कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांना आशेचा किरण दिसतोय.
==================================================मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित सुटणार?
मुंबई : 2008 च्या मालेगाव स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह आठ जणांविरोधातील मोक्का काढण्यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने कायदा मंत्रालयाकडून सल्ला मागितला आहे.
एनआयएने यासंदर्भात कायदा मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. कायदा मंत्रालयाने अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांच्याकडून सल्ला घ्यावा, अशी मागणी एनआयने पत्रात केली आहे.
जर कायदेशीर सल्ला 15 एप्रिल 2015 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी मिळताजुळता असेल तर प्रज्ञा आणि पुरोहित यांना थोडा दिलासा मिळू शकतो, असं काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. विशेष कोर्टाने या प्रकणातील आरोपींच्या जामीनावर मोक्काशिवाय सुनावणी करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
एनआयए प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, “तपाय यंत्रणेने काही मुद्द्यांवर कायदा मंत्रालय आणि गृहमंत्रालयाकडून सल्ला मागितला आहे. तिथून उत्तर आल्यानंतर आम्ही अंतिम अहवाल सादर करु.”
==================================================
छगन भुजबळ, सुनील तटकरेही जेलमध्ये दिसू शकतात: दानवे
नाशिक : येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही जेलमध्ये दिसू शकतात, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. रावसाहेब दानवेंनी छगन भुजबळांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळांच्या अटकेचं समर्थन केलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
ईडीला चौकशीत सहकार्य न केल्यामुळे समीर भुजबळांना अटक झाली आहे. न्यायालयात असलेल्या खटल्याच्या कारवाईशी भाजपचा किंवा सरकारचा कुठलाही संबंध नाही, असेही दानवे म्हणाले.
भाजप कुठल्याही पक्षावर सूडबुद्धीने कारवाई करत नाही, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी समीर भुजबळ आणि छगन भुजबळांच्या आरोपालाही उत्तर दिलं आहे.
==================================================नाशिक; भुजबळ समर्थकांचा राडा, रास्ता रोको आणि तोडफोड
नाशिक/ मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांना अटक झाल्यानंतर भुजबळ समर्थकांनी राडेबाजी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये ठिकठिकाणी रास्तारोको केला. समीर भुजबळांना आज कोर्टात हजर केलं जात आहे. कोर्टाबाहेरही समर्थक घोषणाबाजी करत आहेत.
रास्तारोकोनंतर भुजबळांचे समर्थक तोडफोडीवरही उतरले. नाशिकच्या औरंगाबाद नाका आणि कॉलेज रोड परिसरात समर्थकांनी २ एसटी बस फोडल्या.
त्याआधी नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी रास्ता रोकोचाही प्रयत्न केला. तर बीड-धुळे-सोलापूर महामार्गावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत अटकेचा निषेध नोंदवला. यानंतर नाशिक, बीडसह अनेक ठिकाणातून आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलं.
==================================================ब्रिटन: समलैंगिकावर बलात्कार, भारतीय व्यक्तीला पाच वर्षाची शिक्षा
लंडन: भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला ब्रिटनमध्ये एका नाइट क्लबमध्ये समलैंगिक व्यक्तीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
पीडीत व्यक्तीच्या डीएनमध्ये आरोपी शिवांश जगनानी याचे अंश मिळाल्यानं त्याला दोषी ठरविण्यात आलं आहे. काल या प्रकरणाची मॅनचेस्टर क्राउन कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळेस डीएन रिपोर्ट हा पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात आला. मात्र, आपण निर्दोष असल्याचं जगनानीचं म्हणणं आहे.
आरोपी जगनानीने कोर्टात सांगितले की, ‘मी त्याच्यासोबत काहीही चुकीचं केलं नाही किंवा त्याच्यावर काहीही जबरदस्तीही केली नाही. त्याला ज्या गोष्टी नको होत्या त्या मी केल्या नाहीत.’
‘मॅनचेस्टर इव्हिनिंग न्यूज’च्या वृत्तानुसार, आरोपीला जेलमध्ये पाठविण्याआधी त्याच्यासमोर पीडित व्यक्तीचा जबाब वाचण्यात आलं. “जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा मी खूप घाबरलो होते आणि स्वत:चं रक्षण करण्यास असमर्थ होतो. याआधी जेव्हा कधी मी संकटात अडकलो त्यावेळेस मी बाहेर पडलो पण, यावेळेस असं नाही झालं. त्याने माझी अब्रू लुटलीच.’
==================================================
==================================================
सरकार जाणीवपूर्वक भुजबळांना टार्गेट करतंय : पवार
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीशिवाय अनेक सरकार पाहिली, पण सत्तेचा गैरवापर करणारं सरकार शिवसेना-भाजपच्या रुपाने पाहात आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. छगन भुजबळ यांचा पुतण्या आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने काल अटक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन, राज्य सरकारवर तोफ डागली.
भुजबळ कुटुंबीयांना टार्गेट केलं जातंय – पवार
“भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. सध्याची कारवाई पाहाता भुजबळ कुटुंबीयांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचं दिसतंय. सत्तेचा गैरवापर करण्याची ही पद्धत मी आतापर्यंत कधी पहिली नाही. सत्तेचा गैरवापर करुन राजकीय खेळी केली जात आहे” असं टीकास्त्र शरद पवारांनी सोडलं.
आमची भूमिका स्वच्छ
सत्तेत असताना छगन भुजबळांनी जे जे निर्णय घेतले, ते त्यांचे एकट्याचे नव्हते. निर्णयाला संपूर्ण मंत्रिमंडळाची मंजुरी असते. त्यामुळे आमची भूमिका स्वच्छ आहे चिंतेचं कारण नाही. पण चौकशीची भूमिका संशयास्पद, असं पवार म्हणाले.
तीन-तीनवेळा चौकशी का?
एकच व्यक्ती,एकच आरोप,मग तीन-तीनवेळा चौकशी का? भुजबळांना जाणीवपूर्क टार्गेट केलं जात असल्याचं दिसून येतंय, असं पवारांनी नमूद केलं. ईडीला तक्रार करणारे लोक हे राजकीय लोक आहेत. तसंच चौकशीदरम्यान दबाव टाकला जात असल्याचं म्हणत पवारांनी भाजप खासदार किरीट सोमय्या यांचं नाव न घेता निशाणा साधला.
पंकज भुजबळ यांना अटक
दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचलनालयाने काल रात्री उशिरा अटक केली.
ईडीने कालच महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने कालच छगन भुजबळ, पंकज तसंच समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारले होते. काल मुंबईत त्यांना अटक करण्यात आली.
आज कोर्टात हजेरी
समीर भुजबळ यांना आज कोर्टात सादर करण्यात येणार आहे. कोर्टात त्यांना जामीन मिळणार का याकडे भुजबळ समर्थकांचं लक्ष लागलं आहे.
किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
“आम्ही करुन दाखवलं. समीर भुजबळांना ईडीने अटक केली, आता पंकज भुजबळांचा नंबर,” अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
समीरची अटक सूडबुद्धीने : छगन भुजबळ
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात समीर भुजबळांना झालेली अटक ही सूडबुद्धीनं केली असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. छगन भुजबळ सध्या अमेरिकेतील वॉशिग्टनमध्ये आहेत.
==================================================समलैंगिक संबंधांच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टात आज निर्णय
नवी दिल्ली : देशभरात समलिंगी संबंध गुन्हा ठरणार की नाही, याबाबत आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. भारतीय दंड विधान संहितेचं कलम 377 बाबत आज फैसला होणार आहे.
कलम 377 अर्थात समलिंगी संबंधांना कायदेशीर बंदी घालण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. समलैंगिक संबंधाच्या बाजूनं असलेले नाज फाऊंडेशन आणि इतर संघटनांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयास पुर्नविचार करण्याची विनंती केली होती. त्यावर आज दुपारी ३ च्या दरम्यान सुनावणी होणं अपेक्षित आहे.
काय आहे कलम 377 ?
भारतीय दंडविधान कलम 377 नुसार अनैसर्गिक शारीरिक संबंध हा गुन्हा
नैसर्गिक संबंधांव्यतिरिक्त स्त्री. पुरुष किंवा प्राण्यांशी संंबंध हा गुन्हा
समलिंग संबंध ठेवल्यास दहा वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा
दिल्ली उच्च न्यायालयाकडून 23 मार्च 2012 रोजी कलम रद्द
12 डिसेंबर 2013 रोजी हे कलम घटनाबाह्य नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
कोण करणार सुनावणी?
याप्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टातील तीन वरीष्ठ न्यायमूर्तींचं खंडपीठ करणार आहे. यामध्ये न्यायमूर्ती टी एस ठाकूर, न्यायमूर्ती ए आर दवे आणि न्यायमूर्ती जगदीश सिंह खेर यांचा समावेश आहे.
क्युरेटिव्ह पिटीशनची सुनावणी चेंबरमध्ये होते, मात्र आजची सुनावणी खुल्या न्यायालयात होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे क्युरेटिव्ह याचिकेवरील सुनावणीसाठी तीन वरीष्ठ न्यायमूर्तींशिवाय निर्णय देणारे न्यायमूर्ती उपस्थित असावे लागतात. मात्र निर्णय देणारे दोन्ही न्यायमूर्ती जीएस सिंघवी आणि न्यायमूर्ती ए ज मुखोपाध्या निवृत्त झाले आहेत.
यापूर्वीच्या सुनावणीत काय झालं?
यापूर्वी दिल्ली हायकोर्टाने 2009 मध्ये समलैंगिकतेला अपराध मानण्याची निर्णय रद्द केला होता. मात्र दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टाने डिसेंबर 2013 मध्ये दिल्ली हायकोर्टाचा आदेश रद्द ठरवत, IPC च्या कलम 377 नुसार समलिंगी संबंध गुन्हा असेल असा निर्णय दिला होता. इतकंच नाही तर दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याबाबत दाखल झालेली पुनर्विचार याचिकाही फेटाळून लावली होती.
चार न्यायमूर्तींची सुनावणीला परवानगी
23 एप्रिल 2014 रोजी चार न्यायमूर्तींनी क्युरेटिव्ह पीटिशिनवरील खुल्या सुनावणीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये तत्कालीन सरन्यायाधीश पी सथाशिवम, न्यायमूर्ती आर एम लोढा, न्यायमूर्ती एच एल दत्तू आणि न्यायमूर्ती एस जे मुखोपाध्याय यांचा समावेश होता. मात्र आता हे चारही न्यायमूर्ती निवृत्त झाले आहेत
==================================================अंडाकरी, मासे, मोदक, भाजप मंत्र्यांचे डब्बे शिवसेना मंत्र्यांनी खाल्ले !
मुंबई : शिवसेना – भाजपच्या मंत्र्यांमधील दुरावा दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोखी शक्कल लढवली. कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मंत्र्यांमध्ये समन्वय वाढावा म्हणून सहभोजनाची कल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली. ही कल्पना आज सत्यातही उतरली.
शिवसेना – भाजपच्या मंत्र्यांनी आज एकत्र बसून सहभोजनाचा लाभ घेतला. शिवसेना- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून डब्बा आणून सहभोजन घेण्याची ही पहिलीच वेळ होती. भाजपच्या मंत्र्यांनी डब्बे आणले होते, मात्र शिवसेनेच्या रामदास कदम, दीपक सावंत, एकनाथ शिंदे यांनी डब्बे आणले नव्हते. त्यांनी भाजपच्या मंत्र्यांच्या डब्याचा आस्वाद घेतला.
अंडाकरी, मोदक, उसळची भाजी ते मासे सर्व पदार्थांवर शिवसेना-भाजपच्या मंत्र्यांनी ताव मारला.
शिवसेना – भाजपचे आमदार, मंत्री हे सत्तेत आल्यापासूनच एकमेकांना पाण्यात पाहात आहेत. त्यामुळे हे सत्ताधारी आहेत की विरोधक असा प्रश्न विरोधकच उपरोधाने विचारतात. मात्र आज मंत्रालयात सेना-भाजपचे मंत्री खेळी-मेळीत दिसले.
एकमेकांच्या डब्ब्यावर ताव मारणाऱ्या मंत्र्यांमध्ये खरोखरच गोडवा येणार का, हे येत्या काही दिवसात पाहावं लागेल.
==================================================आगामी बॉलिवूडपटात हा दिग्गज अभिनेता 'असा' दिसणार
मुंबई : ‘पा’ चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी मेकअपच्या सहाय्याने बदललेला लूक सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला होता. हॉलिवूडमध्ये अशा लूक्सची परंपरा कॉमन असली तरी बॉलिवूडमध्ये संपूर्ण लूकचे कायापालट क्वचितच होतात. यात आणखी एका दिग्गज अभिनेत्याची भर पडली आहे.
‘कपूर अँड सन्स’ या आगामी चित्रपटात अभिनेता ऋषी कपूर 80 वर्षांच्या वृद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी चिंटू कपूरने आपला लूक पूर्णपणे बदलून टाकला आहे. ट्विटर अकाऊण्टवर त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.
करण जोहरच्या ‘कपूर अँड सन्स’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट, फवाद खानही दिसणार आहेत. ऋषी कपूर सिद्धार्थ आणि फवाद या भावंडांच्या आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
काहीच दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी सनम रे या चित्रपटातील त्यांचा लूकही ट्विटरवर शेअर केला होता. दिव्या खोसला कुमारच्या चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात यामी गौतम, पुलकित सम्राट, उर्वशी रौतेला दिसणार आहेत.
==================================================गर्भलिंग निदान चाचणी अनिवार्य करावी : मेनका गांधी
गर्भलिंग चाचणी सध्या कायद्याने गुन्हा असला तरी ती सक्तीची करण्यात यावी असा सल्ला केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी दिला आहे. या चाचणीमुळे महिलांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळावर लक्ष ठेवता येईल असा दावा त्यांनी केला आहे.
प्रत्येक मातेला तिच्या पोटात मुलगा वाढतोय की मुलगी हे माहित असणं गरजेचं असल्याचं आपलं वैयक्तिक मतही त्यांनी मांडलं. नोंदणी झाल्यानंतर ज्या महिलांच्या गर्भात स्त्री भ्रूण आहे, त्यांनी बाळाला जन्म दिला की नाही, हे पाहता येईल, असं त्या म्हणाल्या.
गर्भात वाढणाऱ्या अर्भकांची हत्या रोखण्यासाठी सध्या कायदा असला तरी तो पुरेसा नाही. त्यासाठी समाजाच्या मानसिकतेतच बदल होणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या. अल्ट्रासाऊण्ड चाचणीने गर्भलिंगनिदान करणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवणं कठीण असून त्यांना पकडणं हा समस्येवरील उपाय नसल्याचं मतही मेनका गांधी यांनी व्यक्त केलं.
मी केवळ सल्ला देत असून यासंबंधी अधिक चर्चा झाल्यानंतर निष्कर्ष काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
==================================================
पटना; रुग्णाची नस न मिळाल्यानं डॉक्टर चिडला, नर्सचा हातच मोडला!
पाटणा (बिहार): बिहारमधील पाटण्यातील एनएमसीएच रुग्णालयात रुग्णाची नस न सापडल्यानं डॉक्टरने नर्सला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शिशु विभागातील एका ज्युनिअर डॉक्टरनं रुग्णालयातील वॉर्डमध्येच नर्सला मारहाण केली. ज्यामध्ये तिचा हात तुटला आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णावर सुरु असलेल्या उपचारादरम्यान त्याला इंजेक्शन द्यायचं होतं. नर्स बराच प्रयत्न करीत होती पण तिला रुग्णाची नस मिळत नव्हती. हे पाहून डॉक्टरचा पारा चांगलाच चढला. त्याने नर्सच्या हाताला पकडून तिला जोरात बाजूला खेचलं.
अचानक झालेल्या या प्रकारामुळं नर्स घाबरली आणि ती खाली पडली. याच दरम्यान तिच्या हात मोडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घडल्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये बराच रोष आहे. त्यामुळं आता रुग्णालय प्रशासन आरोपी डॉक्टरवर कारवाई करण्याची शक्यता आहे.
==================================================विराट कोहली आयसीसी क्रमवारीत नंबर वन
मुंबई: धोनीच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा विजय मिळवून गाजवलेल्या पराक्रमाचं सर्वात मोठं इनाम विराट कोहलीला मिळालं आहे.
विराट कोहली ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या आयसीसी क्रमवारीत नंबर वन फलंदाज ठरलाय.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत विराटनं नाबाद 90, नाबाद 59 आणि 50 धावांच्या खेळी उभारल्या. या कामगिरीनं त्याला 47 रेटिंग गुणांची कमाई करून दिली आणि त्या कमाईनंच विराटला नंबर वनच्या शर्यतीत अॅरॉन फिन्चवर आघाडी मिळवून दिली.
सिडनी ट्वेन्टी ट्वेन्टीतल्या भारताच्या विजयाचे शिल्पकार सुरेश रैना आणि रोहित शर्मा हे ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे तेराव्या आणि सोळाव्या क्रमांकावर आहेत.
No comments:
Post a Comment