Friday, 26 February 2016

नमस्कार लाईव्ह २६-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- तेहरान - इराणमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात 
२- नेपाळ; पुन्हा विमान अपघात, ११ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान चिलखया येथे कोसळले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- महिषासुरावरून संसदेत महासंग्राम 
४- कन्हैय्या कुमार मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना नोटीस 
५- अफजल गुरुला समर्थन करणारेच त्याच्या हल्यात मारले गेले असते - माजी न्यायाधीश एस एन ढिंगरा 
६- राज, उद्धव, शरद पवार, राहुल गांधींना प्रत्येकी 25 हजारांचा दंड 
७- आर्थिक सर्व्हे सादर, भरघोस रोजगार निर्मितीची आशा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- महाराष्ट्र रजनी आग : 'विझक्राफ्ट'विरोधात गुन्हा 
९- कोल्हापूर; नो हमाल, नो दलाल, थेट शेतातून फ्रेश माल
१०- नागपूर; तृतीयपंथीयांचा पोलिस स्टेशनमध्ये राडा, कपडे काढून अश्लिल हावभाव 
११- पटना; आमदाराशी संबंध ठेवायला भाग पाडणारी अटकेत 
१२- ठाणे; कारचालकाची महिला पोलिसाला बेदम मारहाण 
१३- अनेक प्रयोगशाळांमध्ये लिंगनिदान केलं जात, मात्र कायदा असूनही कारवाई केली जात नाही आहे - खासदार विजय दर्डा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- पुणे : हनुमान टेकडीवर कॉलेज विद्यार्थिनीवर बलात्कार, आरोपी अटकेत 
१५- विरार; प्रवाशांची झुंडशाही, लोकलमध्ये दादागिरी 
१६- पंढरपूर; इंदापूरमध्ये वाळू माफियांनी तहसीलदाराच्या चालकाला उडवलं 
१७- अंबड; अनाथ मुलीशी विवाह करून टाळला खर्च  
१८- लुधियाना; बलात्कारानंतर पेटवून दिलेल्या मुलीचा मृत्यू 
१९- बीड - दुष्काळाची तिव्रता वाढली, विहीरीतील पाणी काढताना ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू 
२०- डासमुक्‍तीचा नांदेड पॅटर्न सातासमुद्रापार 
२१- शोषखड्डयाव्‍दारे पाणी जमिनीत मुरवून गावे डासमुक्‍त केल्‍यास नागरीकांचे आरोग्‍यमान उंचावेल - संजय भोसीकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- मुंबईकडून सौराष्ट्रचा धुव्वा, 41 व्यांदा रणजीचं जेतेपद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दु:ख सहन करायला काय हरकत आहे
(पंकज सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.



=======================================

पुणे : हनुमान टेकडीवर कॉलेज विद्यार्थिनीवर बलात्कार


पुणे: पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमधील विद्यार्थिनीचा विनयभंग आणि लुटल्याची घटना हनुमान टेकडी परिसरात घडली आहे. पीडित तरुणी हनुमान टेकडीवर अभ्यास करत असताना हा प्रकार घडला. 24 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली. 
नेहमीप्रमाणे संबंधित विद्यार्थिनी 24 तारखेलाही हनुमान टेकडीवर संध्याकाळी फिरायला गेली होती. त्यानंतर टेकडीच्या सेनापती बापट रस्त्याकडील उतारावर पुस्तक वाचत बसली होती. त्यावेळी मागून आलेल्या एका 25 ते 30 वर्षीय तरुणाने तिचं तोंड दाबून खालच्या निर्मनुष्य बाजूला फरफटत नेलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. 
एवढंच नाही तर माणसं येण्याची चाहूल लागताच आरोपीने तिच्याकडील मोबाईल आणि अन्य ऐवज लुटला आणि फरार झाला. 
दरम्यान घाबरलेल्या तरुणीने ताबडतोब घर गाठून पालकांना फोनवरुन झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर महाविद्यालयात जाऊनही याची कल्पना दिली. मानसिक आधार मिळाल्यानंतर तिने चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात 376 आणि 392 कलमांतर्गत जबरी चोरी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 
पीडित 19 वर्षीय तरुणी परराज्यातील असून ती पुण्यातील कॉलेजमध्ये शिकते. 
दरम्यान ज्या रस्त्यावर महाविद्यालयं आहेत, आणि त्यामुळे ज्या टेकडीवर नेहमीच वर्दळ असते, अशा ठिकाणी ही घटना झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
=======================================

विरारच्या प्रवाशांची झुंडशाही, लोकलमध्ये दादागिरी

विरारच्या प्रवाशांची झुंडशाही, लोकलमध्ये दादागिरी
मुंबई: लोकलमधील झुंडशाही दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. चर्चगेटवरून विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये काही मुठभर लोकं कसे जागा अडवतात याचा प्रत्यय अनेकांना आला असेल. विरारची ही मंडळी ग्रुपनं चर्चगेट स्टेशनवर चढतात आणि त्यानंतर येणाऱ्या स्थानकांवरच्या प्रवाशांना लोकलमध्ये शिरू देत नाही. 
एबीपी माझाचे प्रतिनिधी शाम गुप्ता यांनाही काल असाच अनुभव आला. त्यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. लोकलमध्ये जे काही दोन तीन लोक स्टेशनवर चढतात, त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न होतो. जागा तर सोडा उभं राहायलाही जागा देत नाही. मोकळ्या जागेत हा ग्रुप ठाण मांडून बसतो, दरवाजाजवळ हे लोक अक्षरशः सांडलेले असतात. 
दादर स्टेशन गेल्यावर मोकळ्या जागेत खात- पीत जागा अडवून ठेवतात. त्याविरोधात कोणी काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर, मारहाण करायलाही हे लोक मागेपुढे पाहात नाहीत. अनेकवेळा प्रवाशांच्या तक्रारी येऊनही रेल्वे प्रशासन आणि पोलीस यावर कुठलीही कारवाई करत नाही.याशिवाय संध्याकाळी 7 च्या सुमारास दादर-विरार लोकलची कहाणी तर औरच आहे. विरारकडे जाणारे प्रवासी जागा अडवण्यासाठी दादरकडे जाणारी ट्रेन वांद्र्याला पकडतात. त्यावेळी ते ट्रेनमध्ये चढताना महिला, लहान मुलं किंवा वृद्धांना अक्षरश: तुडवत आत जातात. आतल्या प्रवाशांना बाहेर उतरूच देत नाहीत.
=======================================

कोल्हापूर; नो हमाल, नो दलाल, थेट शेतातून फ्रेश माल

नो हमाल, नो दलाल, थेट शेतातून फ्रेश माल
कोल्हापूर: नो हमाल, नो दलाल, थेट शेतातून फ्रेश माल… कोल्हापूर शहरात उभ्या असलेल्या गाडीवर लागलेला हा बार्ड सध्या कोल्हापुरकरांचं लक्ष्य वेधून घेतोय. याला कारणही तसंच आहे.. बाजारात मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा स्वस्त आणि फ्रेश भाजीपाला मिळत असेल तर तो कोणाला नकोय. पड्या भावानं मार्केटला या भाजीपाल्याची विक्री करण्याऐवजी, तो थेट ग्राहकांना विकण्याचा निर्णय मिलिंद पाटील या शेतकऱ्यानं घेतला. उसामध्ये फ्लॉवरचं आंतरपीक घेतलं. बाजारभाव नाही म्हणून फेकून देण्यापेक्षा थेट ग्राहकांना विकण्याचा निर्णय मिलिंद यांनी घेतला.
=======================================

तृतीयपंथीयांचा पोलिस स्टेशनमध्ये राडा, कपडे काढून अश्लिल हावभाव

तृतीयपंथीयांचा पोलिस स्टेशनमध्ये राडा, कपडे काढून अश्लिल हावभाव
नागपूर : नागपूरच्या नंदनवन पोलिस स्थानकात तृतीयपंथीनी अभूतपूर्व गोंधळ घातला. उत्तम बाबा नावाच्या तृतीयपंथीयाने इतर तृतीयपंथीचे आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र त्याच्याकडे जमा करुन घेतले होते. आपल्याला एका कार्यक्रमासाठी बाहेर जायचे आहे असे सांगून सर्व तृतीयपंथीचे कागदपत्रे त्याने गोळा केले होते. मात्र नंतर त्याने सर्वांची कागदपत्रं हरवल्याचे सांगून कागदपत्रे देण्यास नकार दिला. यानंतर सर्व तृतीयपंथीयांनी पोलिसात धाव घेतली.आमची कागदपत्रे परत मिळवून द्या, या मागणीसाठी सर्व तृतीयपंथी नंदनवन पोलिस स्थानकात पोहोचले आणि उत्तमबाबाला अटक करा अशी मागणी करू लागले.सर्व तृतीयपंथी आणि स्वतः आरोपी उत्तमबाबा पाचपावली परिसरातले असल्यामुळे पोलिसांनी पाचपावली पोलिस स्थानकात तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे पोलिस उत्तमबाबाची पाठराखण करत आहेत, असा गैरसमज झालेले तृतीयपंथी चिडले आणि त्यांनी पोलिस स्थानकात आपले कपडे काढत गोंधळ करायला सुरुवात केली. अश्लील हातवारे करत पोलिसांना शिव्या देऊ लागले.19 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता ही घटना घडली.सुरूवातीला पुरुष पोलिस कर्मचारी या प्रकाराने गोंधळून गेले. मात्र नंतर सर्व तृतीयपंथीची समजूत घालत त्यांना पाचपावली पोलिस स्थानकात नेऊन त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली
=======================================

महाराष्ट्र रजनी आग : 'विझक्राफ्ट'विरोधात गुन्हा

महाराष्ट्र रजनी आग : 'विझक्राफ्ट'विरोधात गुन्हा
मुंबई : मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी विझक्राफ्ट कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१४ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटीवर झालेल्या या सोहळ्यात अचानक स्टेजला आग लागली होती. यात जवळपास पाच कोटींचं नुकसान झालं होतं. 
या आगीला या कार्यक्रमाची आयोजक कंपनी विझक्राफ्टला जबाबदार धरत, त्यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या डीबी मार्ग पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. 
मुंबई अग्निशमन दलानं दिलेल्या अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदोष इलेक्ट्रीक सर्किटमुळे ही आग लागल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. तसंच कार्यक्रमाआधी फायर ऑडिटही करण्यात आलं नसल्याची माहिती मिळतेय.
=======================================

महिषासुरावरून संसदेत महासंग्राम


महिषासुरावरून संसदेत महासंग्राम
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिषासूर दिनप्रकरणाबाबत माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. महिषासूर दिनावरून सुरु झालेलं रणकंदन आज सलग तिसऱ्या दिवशी सुरु आहे. आज राज्यसभेत स्मृती इराणी यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं. ‘जेएनयू’सारख्या मोठ्या विद्यापीठात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काय चालतं याचा पुरावा देण्यासाठी पत्रक वाचल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी स्वतः एक हिंदू असून ते वाचताना मलाही दुःखच होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकऱणी स्मृती इराणींनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.
काय आहे प्रकरण? 
स्मृती इराणी यांनी जेएनयूमधील महिषासूरमर्दिनीबाबतचं पत्रक लोकसभेत वाचून दाखवलं होतं.याला काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतला. 
जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी जे केलं ते चूकच आहे. मात्र इराणींनी ते भर संसदेत वाचून दाखवून मोठी चूक केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. याच मुद्द्यावरुन संसदेचं कामकाज बंद पाडण्याचा इशारा काँग्रेसनं दिला.
=======================================

इंदापूरमध्ये वाळू माफियांनी तहसीलदाराच्या चालकाला उडवलं

इंदापूरमध्ये वाळू माफियांनी तहसीलदाराच्या चालकाला उडवलं
पंढरपूर : इंदापूरमध्ये पुन्हा एकदा वाळू माफियांची दहशत दिसून आली आहे. इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या वाहनचालकाला वाळू माफियांनी उडवलं. या घटनेत चालक अनिल काळेचा मृत्यू झाला. वाळू माफियांच्या तवेरा गाडीने अनिल काळेंच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली.
Indapur_Sand_Mafia
दरम्यान इंदापूर पोलिसांनी तवेरा गाडीचालकाविरोधात भारतीय दंडविधान कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच या प्रकरणी दोन जणांना अटकही केली.
=======================================

कन्हैय्या कुमार मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना नोटीस


  • नवी दिल्ली, दि. २६ - पतियाळा न्यायालयात कन्हैय्या कुमारला मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 3 वकिलांना नोटीस पाठवली आहे. विक्रम चौहान, यशपाल सिंग आणि ओम शर्मा या तिघांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना तुमच्याविरोधात अवमान केल्याप्रकऱणी कारवाई का करण्यात येऊ नये ? यावर उत्तर देण्यास सांगितल आहे. 
    सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनादेखील नोटीस पाठवली आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा तपास करावा चौकशी करावी तसंच वकिलांविरोधात अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणा-या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे.  वकिल कामिनी जाधव यांनी ही याचिका केली आहे. सर्वोच्च न्यायालय 4 मार्चला या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे.
=======================================

अफजल गुरुला समर्थन करणारेच त्याच्या हल्यात मारले गेले असते - माजी न्यायाधीश एस एन ढिंगरा


  • नवी दिल्ली, दि. २६ - अफजल गुरुला फाशीची शिक्षा सुनावणारे उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस एन ढिंगरा यांनी अफजल गुरुचं समर्थन करणा-यांना फटकारल आहे. अफजल गुरुला समर्थन करणारे राजकारणीदेखील त्याच्या हल्यात मारले गेले असते हे त्यांनी लक्षात ठेवाव असं ढिंगरा बोलले आहेत.  
    एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ढिंगरा यांनी अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रम घेणा-या जेएनयूमधील विद्यार्थ्यांची बाजू घेणा-यांवर आक्षेप नोंदवला आहे. जे राजकारणी अफजल गुरुचं समर्थन करत आहेत त्यांच्यापैकी अजून 40-50 जण हल्यात मारले गेले असते तर आज दृष्य वेगळं असतं. फक्त 15 जणांचा मृत्यू झाला म्हणून आपण त्याला शहीद म्हणत आनंद साजरा करणार आहोत का ? अस सवालदेखील ढिंगरा यांनी विचारला आहे.  अफजल गुरुच्या फाशीला न्यायालयीन हत्या म्हणणा-यांवरदेखील ढिंगरा यांनी टीका केली आहे. समाजासाठी घातक असणा-याचा खात्मा करण्याचा अधिकार आपल्याला न्यायव्यवस्थेने दिला आहे. जर ही न्यायालयीन हत्या असेल तर मग कारागृहवासाची शिक्षा सुनावण्याला तुम्ही न्यायालयाने जीवनाचा केलेला विनाश म्हणणार का ? असा सवाल ढिंगरा यांनी केला आहे. 
=======================================
अंबड; अनाथ मुलीशी विवाह करून टाळला खर्च 
दसक-पंचक - समाजात मुलीचा जन्मदर सातत्याने कमी होत असताना आजही वंशाला दिवा असावा, या हट्टापायी अनेक मुली नकोशा ठरतात. अशाच एका अनाथ व नकोशीसारख्या वैशाली खराडेशी अंबड येथे कामाला असणाऱ्या अमोल खरोटे याने विवाह केला. त्याचबरोबर विवाहासाठी झालेला खर्च टाळत एक सामाजिक आदर्श निर्माण केला. अनाथ वैशालीला सुखी कुटुंब व सुशिक्षित जोडीदार मिळाल्याने या विवाहाचा दसक परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
दसक येथील नारी विकास केंद्रातील दिनकर दाम्पत्य अनाथ, निराधार मुली व महिलांचे पुनर्वसन करण्याचे काम करते. आत्तापर्यंत त्यांनी २५-३० अनाथ मुलींचे कन्यादान केले आहे. येथे दाखल होणाऱ्या मुलींच्या संगोपनाबरोबरच केंद्रातील उपवर मुलीच्या विवाहाची जबाबदारी दिनकर दाम्पत्य पार पाडत आहे. केंद्रातील मुलींचे विवाह निश्‍चित करताना त्यांच्या नावावर काही रक्कम ‘फिक्‍स डिपॉझिट’ केली जाते. तसा करार करूनच विवाह नक्की केला जातो. त्याप्रमाणे सात अटींच्या सप्तपदीनुसार विवाह धूमधडाक्‍यात पार पडला. 
वैशालीचे बालपण पुणे येथील बालकल्याण समितीच्या अनाथालयात गेले. १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर तिला दसक येथील नारी विकास केंद्रात दाखल केले. अनाथ असूनसुद्धा महत्त्वाकांक्षी असलेली वैशाली मिळेल ते काम करत संगणक, शिवणकाम यांसारखी वेगवेगळी कौशल्य शिकून स्वावलंबी बनली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी मिळवली. नांदेड येथे अध्यापनशास्त्राची पदविका उत्तीर्ण झाली. सर्वसाधारण मुलींप्रमाणे आपल्या वैवाहिक जीवनाची स्वप्ने रंगवत असताना नारी विकास केंद्रात वास्तव्य करून मेडिकल दुकानात काम केले. काही काळ शिक्षिकेची नोकरी केली. 
=======================================
लुधियाना; बलात्कारानंतर पेटवून दिलेल्या मुलीचा मृत्यू
लुधियाना- एका बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून पेटवून दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शहरामध्ये बारा वर्षाच्या मुलीवर सुनील (वय 19) याने बलात्कार केला होता. बलात्कारानंतर अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. याघटनेत पीडित मुलगी 95 टक्के भाजली होती. उपचारासाठी तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.‘
उपचारादरम्यान पीडित मुलीने बलात्कार झाल्याचा जबाब नोंदविला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. परंतु, मुख्य आरोपी फरार आहे. त्याचा तपास सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक नरेंद्र भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
=======================================
पटना; आमदाराशी संबंध ठेवायला भाग पाडणारी अटकेत
पाटणा- राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) एका आमदारासोबत शरीर संबंधासाठी विद्यार्थिनीला भाग पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नालंदा पोलिसांनी दिली. 
नालंदाचे पोलिस अधीक्षक कुमार आशीष यांनी सांगितले की, ‘एका विद्यार्थिनीला 6 फेब्रुवारी रोजी ‘आरजेडी‘चे आमदार राजबल्लभ यादव सोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी महिला भाग पाडत होती. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. खद्दी गावातून राधा देवी व तिच्या दोन मुली व मोतीराम नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आमदारालाही लवकरच अटक केली जाईल.‘ 
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, ‘पक्षाने आमदार यादवला निलंबित केले आहे. शिवाय, न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यामुळे तो कोठेही पळाला तरी त्याला अटक केली जाईल.‘
=======================================

कारचालकाची महिला पोलिसाला बेदम मारहाण

कारचालकाची महिला पोलिसाला बेदम मारहाण
फोटो सौजन्य: टाइम्स नाऊ
ठाणे : गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकानं महिला पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिवीगाळ करणाऱ्या शशीकांत या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टानं त्याला एकदिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.

वाहनचालक शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात असलं तरी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी त्याचा साफ इन्कार केला आहे.

गुरुवारी सकाळी ठाण्यातल्या नितीन कंपनी जंक्शनजवळ हा वाहनचालक मोबाईलवर बोलत गाडी चालवत होता. त्याच्यामागे गाड्यांची रांग लागत असल्यानं तिथे असलेल्या महिला पोलिसानं त्याला हटकलं आणि पुढे जाण्याची विनंती केली. मात्र पुढे जाण्याऐवजी कारचालकानं पोलीस महिलेला शिवीगाळ केली. तसंच हातही उगारला होता.
=======================================

राज, उद्धव, शरद पवार, राहुल गांधींना प्रत्येकी 25 हजारांचा दंड

राज, उद्धव, शरद पवार, राहुल गांधींना प्रत्येकी 25 हजारांचा दंड
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगप्रकरणी देशातील बड्या राजकीय नेत्यांना दंड ठोठावलाय. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, सपा नेते मुलायम सिंग यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, सचिन अहिर आणि शर्मिला ठाकरे यांच्यासह एकूण ४७ जणांचा समावेश आहे. यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

जर या व्यक्तींनी दंड भरला नाही तर त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय नोटीस जारी करणार आहे.

शिवाय यापुढे अनधिकृत बॅनर, होर्डिंग लावल्यास, बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना दंड ठोठावला जाईलच पण, संबंधीत पक्षालादेखील दंड ठोठावला जाईल असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

तर याच सुनावणीदरम्यान गेल्या सुनावणीला भाजप नेते आशिष शेलार, पराग अळवणी आणि इतर राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश दिले होते. त्यांनी आज न्यायालयात दंडाची रक्कम जमा केली.
=======================================

मुंबईकडून सौराष्ट्रचा धुव्वा, 41 व्यांदा रणजीचं जेतेपद

मुंबईकडून सौराष्ट्रचा धुव्वा, 41 व्यांदा रणजीचं जेतेपद
पुणे : आदित्य तरेच्या मुंबई संघाने सौराष्ट्राचा एक डाव आणि 21 धावांनी धुव्वा उडवून रणजी करंडकावर नाव कोरलं आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मुंबईने रणजी करंडक जिंकण्याची ही 41वी वेळ ठरली.

पुण्याच्या एमसीए स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रासमोर डावाचा मारा चुकवण्यासाठी 136 धावांचं आव्हान होतं. पण सौराष्ट्राच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात प्रतिकार करण्याची हिंमतच दाखवली नाही. त्यांचा डाव  115 धावांत आटोपला आणि मुंबईने 41व्यांदा रणजी करंडकाचा मान मिळवला.

मुंबईतर्फे शार्दूल ठाकूरने 5, तर धवल कुलकर्णी आणि बलविंदर संधू यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय अभिषेक नायरने सौराष्ट्रच्या एका फलंदाजाला माघारी धाडलं. तर श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड यांनीही मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.
=======================================

आर्थिक सर्व्हे सादर, भरघोस रोजगार निर्मितीची आशा

आर्थिक सर्व्हे सादर, भरघोस रोजगार निर्मितीची आशा
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. गेल्या वर्षभरातील आर्थिक स्थिती आणि विविध विकास कार्यक्रमांचा हा समीक्षा अहवाल आहे. 
यानुसार वर्ष 2016 मध्ये देशाचा जीडीपी विकासदर 7 ते 7.75 टक्के इतका राहिल असा अंदाज आहे. तर पुढील म्हणजे 2017 मध्ये जीडीपी विकास दराचं लक्ष्य 7-7.75 टक्के निश्चित करण्यात आला आहे. 
असं असलं तरी पुढील काही वर्षात विकास दर 8 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. 
मान्सूनने धोका दिल्यानंतरही आर्थिक विकास दरात सकारात्मक वाढ होण्याचे संकेत आहेत. याशिवाय रोजगार उपलब्धीचे पर्यायही सांगण्यात आले आहेत. रोजगारनिर्मितीसाठी अनेक क्षेत्रात काम सुरु आहे. 
या सर्व्हेनुसार वेतन आयोगाच्या शिफारशींचा महागाईवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2017 मध्ये किरकोळ महागाई दर 4.5 ते 5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर आर्थिक वर्ष 2016 मध्ये 3.9 टक्के आर्थिक तुटीचं लक्ष्य पार करण्याचे संकेत आहेत.
=======================================
डासमुक्‍तीचा नांदेड पॅटर्न सातासमुद्रापार 
नांदेड, 26- डासमुक्‍तीचा नांदेड पॅटर्न राज्‍यात यापूर्वीच लागू झाला असून आता याची ख्‍याती सातासमुद्रापार पोहोचली आहे. मुंबई येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पर्यावरणातील बदल व त्‍याचा सार्वजनिक आरोग्‍यावर होणारा परिणाम या विषयावर कार्यशाळा संपन्‍न झाली. या कार्यशाळेत डासमुक्‍ती अभियानाचे सादरीकरण जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाचे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केले.
     यावेळी वॉशिंग्‍टन येथील पर्यावरण अभ्‍यास केंद्राचे संचालक डॉ.जॉन बल्‍बस व आरोग्‍य विभागाच्‍या प्रधान सचिव श्रीमती सुजाता सौनिक, युनियेफच्‍या प्रमुख राजेश्‍वरी चंद्रशेखर, राजलक्ष्‍मी आय्यर, डॉ. पाडके, युसुफ कबीर, पुणे बुरोचे डॉ. सी.पी. जैयस्‍वाल, मुक्‍ता गाडगीळ, डॉ. राजेश दिक्षीत, डॉ. पार्थ सारथी गांगुली, डॉ.एन.डी. देशमुख, पथमेश रायचुरा, जगदीश ठक्‍कर, नितीन आंनद, मोहित कार्ला, मोहंमदअली खोराजा, सुर्या तेजस पूल्‍लेल आदींची उपस्थिती होती.
     या सादरीकरणात नांदेड जिल्‍हयात राबविण्‍यात आलेल्‍या डासमुक्‍त गाव अभियानात करण्‍यात आलेल्‍या उपक्रमाचे डॉ.बालाजी शिंदे यांनी सादरीकरण केले. यात आजारांमधून होणा-या खर्चात बचत, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ, वृक्ष लागवड तसेच गावस्‍तरावरील गटारांवर होणारा प्रशासनाचा होणारा खर्च कमी झाला आहे. याविषयी या कार्यशाळेत साधक बाधक चर्चा करण्‍यात आली.  डॉ.जॉन बल्‍बस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून वॉशिंग्‍टन इथल्‍या आमच्‍या अभ्‍यास केंद्रात याचा अभ्‍यास केला जाणार आहे. तसेच नांदेड जिल्‍हयातील गावांची पाहणीही करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
     दूषित पाण्यामुळे तसेच डासांपासून होणा-या आजारांवर ग्रामीण भागातील नागरीकांचा मोठया प्रमाणात खर्च होतो. हा खर्च टाळण्‍यासाठी शोषखड्डयांमुळे होणारे डासमुक्‍त गाव हा उत्‍तम पर्याय ठरत आहे. याचा आरोग्‍यमानावर होणारा परिणाम पाहण्‍यासाठी किमान दोन ते तीन वर्षाचा अभ्‍यास करणे आवश्‍यक असल्‍याचे आरोग्‍य विभागाच्‍या प्रधान सचिव सुजाता सौनिक म्‍हणाल्‍या.
      जिल्‍हा पषिदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री अभिमन्‍यू काळे यांच्‍या मार्गदर्शनात जिल्‍हयात डासमुक्‍ती अभियान राबविण्‍यात येत आहे. जिल्‍हयातील सुमारे शंभर गावे आजमितीला डासमुक्‍त झाली आहेत. 1309 ग्राम पंचायतीमधून शोषखड्रडयाची कामे चालु असून टप्‍प्‍या टप्‍प्‍याने संपुर्ण जिल्‍हा डासमुक्‍त करण्‍यात येणार आहे. त्‍याचबरोबर संपूर्ण ग्राम पंचायतीमध्ये पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी आरो बसविण्‍यात येणार आहेत, याचे सादरीकरणही डॉ. बालाजी शिंदे यांनी मुंबई येथील कार्यशाळेत केलेले आहे. शौचालय बांधकामातही राज्‍यात नांदेड जिल्‍हयाचा पहिला क्रमांक लागतो. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्‍यमानात सुधारणा होण्‍यासाठी नांदेड जिल्‍हयात राबविण्‍यात येणा-या उपक्रमाचे या कार्यशाळेत कौतुक करण्‍यात आले.
      डासमुक्‍ती अभियानाचा एकत्रित अभ्‍यास करण्‍यासाठी वॉशिंग्‍टन येथील पर्यावरण अभ्‍यास केंद्र, राज्‍य शासनाचा आरोग्‍य विभाग आणि युनिसेफच्‍या वतीने अभ्‍यास केला जाणार आहे. यामुळे आता नांदेड जिल्‍हयातील शोषखड्रडयामुळे होणा-या फायद्याचा अभ्‍यास देश-विदेशातील तज्ञ मंडळी करणार आहे.  मुंबई येथे झालेल्‍या आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेनिमित्‍त नांदेड जिल्‍हयाचा डासमुक्‍तीचा पॅटर्न आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. वॉशिंग्‍टन इथल्‍या पर्यावरण अभ्‍यास केंद्रात याचा सखोल अभ्‍यास डॉ.जॉन बल्‍बस हे करणार असून याचे संशोधन सर्वांसाठी उपयुक्‍त ठरणार आहे. अभ्‍यासाअंती शोषखड्डयाची मोहिम यशस्‍वीरित्‍या राबविण्‍यात आल्‍यास आजारांचे प्रमाण कमी होणार आहे. 
=======================================
शोषखड्डयाव्‍दारे पाणी जमिनीत मुरवून गावे डासमुक्‍त केल्‍यास नागरीकांचे आरोग्‍यमान उंचावेल - संजय भोसीकर 


नांदेड, 26 शोषखड्डयाव्‍दारे पाणी जमिनीत मुरवून गावे डासमुक्‍त केल्‍यास नागरीकांचे आरोग्‍यमान उंचावेल असे प्रतिपादन संजय भोसीकर यांनी केले. कंधार तालुक्‍यातल्‍या पानभोसी येथे डासमुक्‍ती अभियानांतर्गत घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बालाजी भातमोडे, मन्‍मथ नाईकवाडे, शैलेश भोसीकर, हनमंतराव पेटकर यांची उपस्थिती होती.
     पानभोसी येथे 915 कुटुंब असून 151 शोषखड्डे तयार करण्‍यात आले आहेत. मार्च अखेर संपूर्ण गाव डासमुक्‍त करण्‍याचा संकल्‍प ग्रामस्‍थांनी केला आहे. यावेळी बोलतांना संजय भोसीकर म्‍हणाले, सांडपाण्‍याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी शोषखड्डयाव्‍दारे पाणी जमिनीत मरविणे हा एक उत्‍तम पर्याय आहे. यामुळे गावस्‍तरावरील गटारावरील होणारा खर्च वाचणार आहे. शिवाय उघडयावर पाणी नसल्‍यामुळे डासांची उत्‍पत्‍ती बंद होऊन आरोग्‍यावर होणारा कुटुंबांचा खर्च वाचणार आहे. यासाठी प्रत्‍येक कुटुंबांनी शोषखड्डे तयार करुन गाव डासमुक्‍त करावे असे आवाहन त्‍यांनी केले.
=======================================

No comments: