Sunday, 21 February 2016

नमस्कार लाईव्ह २१-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- कैरो; चौघांच्या हत्येप्रकरणी चार वर्षांच्या चिमुरड्याला जन्मठेप 
२- मिशिगन; हल्लेखोराच्या गोळीबारात सहा ठार 
३- सुवा; फिजीस शक्तिशाली वादळाचा फटका 
४- वॉशिंग्टन; जेब बुश यांची निवडणुकीतून माघार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- जाट आंदोलन : मृतांचा आकडा 7 वर, अनेक भागात कर्फ्यू 
६- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद 
७- तरुण मोदींच्या नौटंकीला भुलले:अशोक वाजपेयी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- बस्तर; 'आप' नेत्या सोनी सोरींच्या चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थाने हल्ला 
९- फडणवीस असेपर्यंत आरक्षण मिळणार नाही - राणे 
१०- मनसेच्या चमत्कारासाठी एप्रिलपर्यंत थांबा 
११- महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा कुठे आहे? 
१२- अलीगड; 'बिफ बिर्याणी'च्या उल्लेखाने अलिगडमध्ये खळबळ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- बिहार; वैशाली इथे रोज राष्ट्रगीताने होते कामाची सुरुवात...
१४- दिल्लीत पाणी संकट, सोमवारी शाळा बंद 
१५- सोलापूर; भांडी घासणारे हात फिरू लागले संगणकावर 
१६- जेजुरीतील 25 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशास मनाई 
१७- नाशिक; पाहिजे ती शिक्षा करा, पण माझे माकड द्या... 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- गुरुत्वाकर्षणाच्या लहरीवर जयंत नारळीकरांचा विशेष लेख  
१९- बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सैराट' सुसाट, नागराज जबराट 
२०- प्रितम पाटीलचा धमाका, वन डेत त्रिशतक 
२१- धोनी अखेर निवृत्तीबाबत बोलला 
२२- या कारणांमुळे 251 रुपयांचा मोबाईल घेणं टाळावं?  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
सुभाष दमंवाड, महावीर सिंग, स्वप्नील जाधव, आकाश ढवळे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


======================================

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पम्पोरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत तर 10 जण जखमी असल्याची माहिती आहे.

पेट्रोलिंग करणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हल्लेखोर ईडीआय या कंपनीत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर कंपनीत अडकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं.

तीन ते पाच दहशतवादी इमारतीत लपले असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तवली आहे. दरम्यान लष्कराने संपूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांची धरपकड करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
======================================

चौघांच्या हत्येप्रकरणी चार वर्षांच्या चिमुरड्याला जन्मठेप

चौघांच्या हत्येप्रकरणी चार वर्षांच्या चिमुरड्याला जन्मठेप
कैरो : एक वर्षांचा असताना चौघांची हत्या केल्याच्या आरोपातून इजिप्तमधील कोर्टाने 4 वर्षांच्या मुलाला जन्मठेप सुनावली आहे. अहमद मन्सूर कर्मी असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या चिमुरड्याचं नाव आहे.

चौघांची हत्या, आठ जणांच्या हत्येचा प्रयत्न, संपत्ती बळकावणं आणि जवान तसंच पोलिसांना धमकावणं असे गंभीर आरोप अहमदवर ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गुन्हे करताना त्याचं वय केवळ एक वर्ष असल्याचं समोर आलं आहे.

2014 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांप्रकरणी पश्चिम कैरोमध्ये 115 आरोपींना सामुहिकरित्या जन्मठेपेची सुनावणी करण्यात आली. अहमद हा त्याच 115 जणांपैकी एक आहे. अहमदचे वकील फैजल-अल सय्यद यांनी अहमदचं नाव कोर्टाकडून नजरचुकीने आरोपींच्या यादीत समाविष्ट झाल्याचं म्हटलं आहे. आपण ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे
======================================

जाट आंदोलन : मृतांचा आकडा 7 वर, अनेक भागात कर्फ्यू

जाट आंदोलन : मृतांचा आकडा 7 वर, अनेक भागात कर्फ्यू
चंदीगड: आरक्षणाच्या मुद्द्यावरून हरियाणातील जाट समाजानं हिंसक आंदोलन सुरुच ठेवलं आहे. या आंदोलनादरम्यान झज्जरमध्ये लष्करानं केलेल्या गोळीबारात 4 आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यामुळं मृत आंदोलकांचा आकडा आता 7 वर पोहोचलाय. तर 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

सोनीपतमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हरियाणातल्या एकूण ९ जिल्ह्यात लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ,अर्थमंत्री अरूण जेटली आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर या बैठकीला उपस्थित होते. आंदोलन रोखण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे सुद्धा या बैठकीला हजर होते. त्याशिवाय हरियाणातील नेत्यांनीही गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
======================================

'आप' नेत्या सोनी सोरींच्या चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थाने हल्ला

'आप' नेत्या सोनी सोरींच्या चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थाने हल्ला
बस्तर : छत्तीसगडच्या बस्तरमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या सोनी सोरी यांच्या चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थाने हल्ला केल्याचं वृत्त आहे. दंतेवाडातील गीदम रुग्णालयात प्राथमिक उपचारांनंतर त्यांना जगदलपूरच्या महाराणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जगदलपूरपासून 65 किलोमीटरवर असलेल्या गीदममधल्या घरी सोनी सोरी जात होत्या. त्यावेळी अज्ञात बाईकस्वारांनी चाकूच्या धाकाने त्यांचा रस्ता अडवून ज्वलनशील पदार्थ फेकला, अशी माहिती आपचे प्रदेश संयोजक डॉ. संकेत ठाकूर यांनी दिली आहे.

सोनी सोरी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याची शंका व्यक्त केली होती. दरम्यान, दंतेवाडाचे एसपी कमलोचन कश्यप यांनी सोनी सोरी यांच्यावर अॅसिडफेक झाल्याचा इन्कार केला आहे.
======================================

इथे रोज राष्ट्रगीताने होते कामाची सुरुवात...

इथे रोज राष्ट्रगीताने होते कामाची सुरुवात...
वैशाली (बिहार) : तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता, यावर येणारा दिवस कसा जाणार, हे अवलंबून असतं. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातल्या सरकारी कार्यालयात देशभक्ती जागवून दिवसाची सुरुवात केली जाते. दररोज राष्ट्रगीताने काम सुरु करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे.

वैशालीच्या जिल्हाधिकारी रचना पाटील यांच्या विशेष आदेशानंतर या उपक्रमाला सुरुवात झाली. यावर्षी 1 जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. सरकारी अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचं स्वागतच केलं आहे.

‘राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. देशभक्तीच्या भावनेने आम्हाला कामासाठी नवी ऊर्जा मिळते.’ असं जिल्हाधिकारी सांगतात.


याचप्रमाणे सरकारी कार्यालयात जीन्ससारख्या इनफॉर्मल कपड्यांनाही प्रतिबंध करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर चप्पल घालून तुम्ही कार्यालयात प्रवेश करु नका, असं आवाहन रचना पाटील यांनी केलं आहे.
======================================

बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सैराट' सुसाट, नागराज जबराट

बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सैराट' सुसाट, नागराज जबराट !
मुंबई : ‘फॅन्ड्री’ सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच ‘सैराट’ जगभरात सुसाट सुटला आहे.
Sairat in Barlin4
बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाला भरभरुन दाद मिळाली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीच फेसबुकवर याबाबतची माहिती पोस्ट केली आहे. परदेशातही या सिनेमाला दाद मिळत असल्याने नागराज मंजुळे अक्षरश: भारावून गेला आहे. ‘सैराट’च्या रिलीजसाठी खूप उत्सुक असल्याचं नागराजने म्हटलं आहे.
Sairat in Barlin 1
नागराजची फेसबुक पोस्ट

“काल बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजार- बाराशे लोक बसतील एवढ्या प्रचंड मोठ्या थिएटर मधे सैराटचा वर्ल्ड प्रीमियर झाला. थिएटर हॉउसफुल होते. लोकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादने मी खरंच भारावून गेलो. फिल्म बघत असताना लोकांनी अनेकदा टाळ्या वाजवून दाद दिली. इतक्या मोठ्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिवलमधील हा अनुभव अविस्मरणीय आहे. मी खूप उत्सुक आहे ‘सैराट’च्या रिलीजसाठी” असं नागराज मंजुळेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
======================================

प्रितम पाटीलचा धमाका, वन डेत त्रिशतक

प्रितम पाटीलचा धमाका, वन डेत त्रिशतक
मुंबई : मुंबईच्या क्रिकेटपटूंनी वैयक्तिक धावांचा डोंगर रचण्याचा जणू विडाच उचलल्याचं पाहायला मिळत आहे. कारण प्रणव धनावडेने एकाच सामन्यात एकट्याने नाबाद 1 हजार धावा ठोकल्यानंतर, आता प्रितम पाटीलने वन डे सामन्यात त्रिशतक ठोकलं आहे. प्रितमने नुकताच हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
प्रितमने अवघ्या 134 चेंडूत तब्बल 306 धावा ठोकल्या.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत प्रितमने पीवायसी हिंदू जिमखान्याकडून खेळताना नांदेडविरुद्ध हा पराक्रम गाजवला.
‘पीवायसी’कडून सलामीला उतरलेल्या प्रितमने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. प्रितमने नांदेडच्या गोलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करुन सोडलं.
प्रितमच्या या खेळीमुळेच ‘पीवायसी’ने 50 षटकांत 6 बाद 594 इतका धावांचा डोंगर उभा केला.
या धावा एरव्ही कसोटी ऐकायला मिळतात. मात्र प्रितमच्या धडाकेबाज खेळीमुळे वन डे सामन्यातही इतक्या धावांचा पाऊस पडला.
नांदेडचा 86 धावांत धुव्वा
दरम्यान, 595 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या नांदेडचा अवघ्या 86 धावांत धुव्वा उडाला. त्यामुळे ‘पीवायसी’ने हा सामना तब्बल 508 धावांनी जिंकला.
======================================

धोनी अखेर निवृत्तीबाबत बोलला

 धोनी अखेर निवृत्तीबाबत बोलला !


नवी दिल्ली: महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीचा हा भारताचा कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तातडीनं निवृत्त होणार नाही. दस्तुरखुद्द धोनीनंच ही बाब स्पष्ट करून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकानंतर तो निवृत्त होत असल्याच्या बातम्यांना पूर्णविराम दिला.

भारतीय संघाच्या 2014 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धोनीनं कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं 2015 सालच्या वन डे विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. पण त्यानंतर धोनीची वैयक्तिक कामगिरी ही त्याच्या लौकिकाला साजेशी होत नव्हती. त्यामुळं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकानंतर तो निवृत्त असल्याच्या बातम्यांना ऊत आला होता.
======================================

या कारणांमुळे 251 रुपयांचा मोबाईल घेणं टाळावं? 


*जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणजेच 251 रूपयांना मिळणाऱ्या मोबाईलसाठी दोन दिवसात 5 कोटीहून जास्त नोंदणी झाल्याचा दावा रिंगिंग बेल कंपनीनं केला आहे. मात्र या फोनबाबत काही प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं कंपनीही देऊ शकलेली नाही. हेच प्रश्न तुम्हालाही फोन खरेदी करण्यापासून रोखू शकतात.
*रिंगिंग बेल कंपनी नवखी म्हणजेच अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच सुरु झाली आहे. या कंपनीची वेबसाईट फक्त 4-5 पेजसची आहे. फ्रीडमडॉटकॉम वेबसाईटचा हा अड्रेस याच महिन्यात खरेदी करण्यात आला आहे.
या फोनचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. यामध्ये हा फोन मेक इन इंडिया नव्हे तर चायनीज कंपनी Adcom ने बनवल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यांनी ज्यांनी हा फोन पाहिला आहे, त्यांच्या मते हा फोन Adcom ने लाँच केलेल्या स्मार्टफोनसारखाच आहे. Adcom च्या फोनची किंमत 4081 रुपये आहे.
आतापर्यंत कंपनीने कोणताही मोबाईल स्वत:च्या फॅक्टरीमध्ये बनवलेला नाही. मोबाईल बनवण्यासाठी बीआयएस सर्टिफिकेटची आवश्यक असते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी अनेक महिने लागू शकतात.अवघ्या 251 रुपयांत कंपनी स्मार्टफोन कशी काय विकू शकते, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. इंडियन सेल्युलर असोसिएशनच्या मते, अशा उत्पादनांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत कमीत कमी 2700 रुपयांपर्यंत पोहोचते.
मात्र रिंगिंग बेल कंपनीच्या दाव्यानुसार, फोन बनवण्यासाठी 2500 रुपये खर्च येतो. त्यावरील कर सवलतीनंतर किंमत 500 रुपयांनी कमी होते. त्याशिवाय कंपनीने विक्रीसाठी तिसऱ्या कोणत्या कंपनीची मदत घेतलेली नाही. त्यामुळे मोबाईलची किंमत 251 पर्यंत कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

======================================

दिल्लीत पाणी संकट, सोमवारी शाळा बंद


  • नवी दिल्ली, दि. २१ - आरक्षणाच्या मागणीसाठी हरयाणात सुरु असलेल्या जाट आंदोलनामुळे दिल्लीत पाणी संकट निर्माण झाले आहे. दिल्लीत आता पाणी शिल्लक राहिले नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जाहीर केले. 
    पाणी संकटामुळे सोमवारी दिल्लीतील शाळा बंद रहाणार असून, परिक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दिल्लीला हरयाणातील मुनाक कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र जाट समाजाच्या आंदोलनामुळे मागच्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे दिल्लीत पाणी संकट निर्माण झाले आहे. मुनाक कालव्यातून पाणी सोडण्याची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि हरयाणाच्या मंत्र्यांबरोबर चर्चा सुरु असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्याचे आपण आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्या पाणी संकट लक्षात घेऊन दिल्ली सरकारने शनिवारी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 
======================================

काश्मीरमध्ये चकमक, कॅप्टनसह दोन जवान शहीद


  • श्रीनगर, दि. २१ - जम्मू-काश्मीरच्या पम्पोर जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षापथकांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका कॅप्टनसह सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. एका नागरीकाचाही या चकमकीत मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी सुरु झालेली ही चकमक अद्यापही सुरु आहे. दहशतवादी एका इमारतीत दबा धरून बसले आहेत. जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन जाणा-या सीआरपीएफच्या बसवर आधी अतिरेक्यांनी हल्ला केला त्यानंतर जवळच्या प्रशिक्षण इमारतीत घुसले. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात बसमध्ये असणारे सीआरपीएफचे ११ जवान जखमी झाले. हल्ला केल्यानंतर हे अतिरेकी महामार्गावरील जवळच्या प्रशिक्षण इमारतीत घुसले. त्यावेळी इमारतीत १५० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी होते अशी माहिती अधिका-यांनी दिली. इमारतीत तीन अतिरेकी घुसल्याची शक्यता असून, सुरक्षापथकांनी अतिरेक्यांशी दोन हात करताना सर्वप्रथम इमारतीतील नागरीकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केले आहे. 
======================================
मनसेच्या चमत्कारासाठी एप्रिलपर्यंत थांबा 

राज ठाकरे यांचा इशारा; नाशिकमध्ये मेळावा आपण शांत झालो म्हणजे गप्प आहोत असे नाही. येत्या एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करा. तेव्हा तुम्हाला कळेल मनसे कसा आणि काय चमत्कार दाखवितो असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झाले-गेले विसरून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शनिवारी येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात आयोजित नवनिर्वाचित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. बंद दाराआड झालेल्या मेळाव्यात मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांनी संवाद साधला. नाशिक महापालिका निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. मनसेच्या नगरसेवकांवर भाजप व शिवसेनेची नजर आहे. या एकंदर घडामोडी डोळ्यासमोर ठेवून राज यांनी मार्गदर्शन केल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रुग्णासारखे वागू नये. कोणी डॉक्टर येईल आणि औषधोपचाराने तुम्हाला टवटवीत करेल याची प्रतीक्षा करू नका, असेही ते म्हणाल्याचे संबंधितांनी सूचित केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचा संदर्भ घेऊन राज यांनी सेनेत असताना लहानपणापासून आपण अनेक पराभव पाहिल्याचे नमूद केले. या निवडणुकीच्या निकालावेळी आपले कोण आणि परके कोण हे चांगले समजले आहे. पराभव होत असतात. त्यात नवीन काही नाही. आता पक्ष संघटना वाढविण्यासाठी सर्वानी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. कुंपणावर बसलेल्या नगरसेवकांना त्यांनी सुनावल्याचे सांगण्यात येते. पक्षात कोण येतो, कोण जातो याचा धसका आपण कधीही घेतला नाही. पक्षात दोन कार्यकर्ते राहिले तरी त्यांचे २० लाख कसे करायचे याची आपणास चांगलीच जाणीव आहे. तेवढी क्षमताही आपल्यात असल्याचे सांगून राज यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. 
======================================
महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा कुठे आहे?

गुन्हा रद्द करण्यासाठी विकासकाकडूनच याचिका दाखल नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन, अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि मलबार येथील हायमाऊंट गेस्टहाऊस बांधून देण्याच्या मोबदल्यात शासनाकडून २२ हजार चौरस मीटर चटईक्षेत्रफळ दिले जाणार होते. ही तिन्ही बांधकामे पूर्ण करून देऊनही त्या बदल्यात अद्याप एकही चौरस मीटर चटईक्षेत्रफळ आपल्याला देण्यात आलेले नाही. अशावेळी महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप निराधार असल्याचा दावा करीत या प्रकल्पातील विकासकाने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची प्रत ‘लोकसत्ता’कडे असून त्यात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या याचिकेत म्हटले आहे की, मुळात अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाचा भूखंड हा परिवहन विभागाशी निगडीत होता. १९९१ पासून त्यावर अण्णानगर-कासमनगर झोपडपट्टी होती. त्याचे विकासक आपण होतो. झोपु योजनेसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी आपण परिवहन विभागाकडे गेलो. परिवहन विभागाच्या भूखंडातून निर्माण होणारे अतिरिक्त चटईक्षेत्रफळ विकासकाला द्यावे आणि त्याबदल्यात अंधेरी आरटीओ, महाराष्ट्र सदन, हायमाऊंट गेस्टहाऊस ही बांधकामे करून घेण्याचे ठरले. हे चटईक्षेत्रफळ फक्त २२ हजार चौरस मीटर इतकेच होते. आरटीओच्या भूखंडाची मालकी परिवहन विभागाकडे आहे. आपल्याला फक्त २२ हजार चौरस मीटर चटईक्षेत्रफळ देण्यात येणार होते. त्यापैकी एकही चौरस फूट चटईक्षेत्रफळ दिलेले नाही तर घोटाळा कसा काय होऊ शकतो, हा गुन्हाच रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वारे चमणकर यांनी केली आहे. 
======================================
गुरुत्वाकर्षणाच्या लहरीवर जयंत नारळीकरांचा विशेष लेख 

अंतराळातील कृष्णविवरांच्या टकरीमुळे नुकत्याच शोध लागलेल्या गुरुत्वीय लहरींच्या संशोधनाचा आजवरचा प्रवास, त्यातले अडथळे आणि या शोधात जगभरच्या शास्त्रज्ञांनी उपसलेले अविश्रांत कष्ट, भारतीय शास्त्रज्ञांचे त्यातील योगदान आणि या शोधामुळे विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडण्यास मिळू शकणारी दिशा आदीचा धांडोळा घेणारा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा खास लेख.. ध्वनी इकडून तिकडे जातो तो लहरींच्या रूपात. प्रकाशसुद्धा लहरींच्या रूपात जातो. पाण्यामध्ये खडा टाकला की जलतरंग पसरताना दिसतात. जरी या तीनही उदाहरणांत भौतिकशास्त्राचे आधारभूत नियम वेगळे असले तरी भौतिक प्रभाव लहरींच्या रूपात पसरतात, ही महत्त्वाची गोष्ट. असाच परिणाम गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत दिसून येतो का? न्यूटनने जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडला तेव्हा त्याने असे गृहीत धरले होते की, एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर होणारा आकर्षणाचा परिणाम ‘तत्काल’ स्वरूपाचा असतो.. म्हणजे हा परिणाम अनंत वेगाने इकडून तिकडे जातो. प्राध्यापक हरमन बॉण्डी यांनी एका काल्पनिक प्रयोगाद्वारे यावर भाष्य केले आहे. समजा, जादूने कोणी सूर्य आहे तेथून दूर नेऊन ठेवला तर त्याची जाणीव पृथ्वीवासीयांना केव्हा आणि कशी होईल? सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंत यायला सुमारे ५०० सेकंद इतका वेळ घेतो. तेव्हा सूर्य नाहीसा झाल्याचे आपल्याला कळायला ५०० सेकंदांचा अवधी लागेल. पण न्यूटनच्या वरील सिद्धान्तानुसार, सूर्याचे गुरुत्वाकर्षण नाहीसे झाल्याचे आपल्याला तत्काळ कळेल. त्याचा एक परिणाम म्हणजे पृथ्वीची फिरण्याची कक्षा बदलेल. अशा तऱ्हेने प्रकाश वापरून एक उत्तर (५०० सेकंद), तर गुरुत्वाकर्षण वापरून वेगळे उत्तर (शून्य सेकंद) मिळते. हा विरोधाभास आपले गणित कुठेतरी चुकते, हे सूचित करतो. या उदाहरणाने बॉण्डी यांनी असे दाखवले की, गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्तात सुधारणेची गरज असून सुधारित सिद्धान्तानुसार गुरुत्वीय आकर्षण प्रकाशवेगाने व्हायला हवे. आणि तसे घडण्याची आशा निर्माण झाली १९१५ साली- जेव्हा आइन्स्टाईनने व्यापक सापेक्षतेचा सिद्धान्त मांडला. सूर्यमालेतील वेधांनी हा सिद्धान्त न्यूटनच्या सिद्धान्ताहून अधिक सरस असल्याची ग्वाही दिली. तेव्हा साहजिकच हा प्रश्न निर्माण झाला, की आइन्स्टाईनच्या सिद्धान्तानुसार गुरुत्वाकर्षणाचे प्रभाव प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या लहरींच्या माध्यमाने प्रवास करतात का? प्रश्न अवघड होता. आधीच आइन्स्टाईनचा सिद्धान्त समजायला अवघड होता. त्यानुसार गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव काल आणि अवकाश यांच्या मोजमापासाठी वापरलेल्या भूमितीवर पडतो. कल्पना करा- अवकाशात एक मोठा त्रिकोण प्रकाशकिरणांच्या मार्गानी आखला आहे. आपल्या शालेय पाठय़पुस्तकानुसार या त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८० अंश भरते. पण असाच त्रिकोण सूर्याभोवती काढला तर या कोनांची बेरीज १८० अंशांपेक्षा किंचित जास्त भरेल. (पाहा चित्र क्र. १) अशा प्रकारचे सूक्ष्म परिणाम मापून शास्त्रज्ञांनी आइन्स्टाईनच्या बाजूने कौल दिला होता. पण यापलीकडे जाऊन हे निश्चित करणे गरजेचे होते की, अवकाशात गुरुत्वीय लहरी आहेत का? ज्याप्रमाणे दिवा लावला की त्यातून निघणारा प्रकाश लहरींच्या रूपात पसरतो, तसेच गुरुत्वाकर्षणाचे स्रोतदेखील गुरुत्वीय परिणाम प्रकाशवेगाने पसरवतात का? व्यापक सापेक्षतावादाच्या क्लिष्ट समीकरणातून या प्रश्नाचे ‘हो / नाही’ असे उत्तर शोधून काढणे सोपे नव्हते. उलटसुलट दोन्ही प्रकारची उत्तरे मिळत होती. खुद्द आइन्स्टाईनने एकदा आपल्या गणितातून या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर काढले. आइन्स्टाईनच्या सिद्धान्तात गुरुत्वाकर्षणाच्या लहरी नसतात, हा त्याचा निष्कर्ष अर्थातच महत्त्वाचा होता. त्यावर एक सेमिनार व्हावा असे त्याला वाटले. प्रिस्टन येथील उच्च शिक्षणाच्या त्याच्या संस्थेत सेमिनार आयोजित झालादेखील. पण आदल्या दिवशी आइन्स्टाईनला आपल्या गणितात चूक सापडली आणि ती दुरूस्त केल्यावर त्याला आढळून आले की, लहरींचे अस्तित्व नाकारणारा त्याचा निष्कर्ष चुकीचा होता. तरी त्याने या प्रश्नावर सेमिनार घेतला आणि शेवटी आपण केलेली चूकही दाखवली. ही घटना सांगायचा उद्देश हा की, सैद्धान्तिक रूपात लहरींचे अस्तित्व मान्य व्हायला चार दशकांचा कालखंड जावा लागला. मुळात गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असतात, हे निश्चित झाल्यावरच मग प्रायोगिक मार्गाने त्यांचा शोध घ्यायचे प्रयत्न सुरू झाले. गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचे स्रोत कशा प्रकारचे असावेत? ढोबळ गणित मांडूनसुद्धा दिसून येते की, पुरेशा तीव्रतेच्या लहरी (ज्यांचे अस्तित्व मापू शकणारी यंत्रणा प्रयोगशाळेत उभारता येईल) उत्पन्न करण्याची क्षमता मानवनिर्मित उपकरणांत नाही. त्यासाठी अंतराळात शोध घ्यायला हवा. मूळ स्रोत पुढील प्रकारचे असू शकतील : १. स्फोट होणारे महातारे २. परस्परांभोवती फिरणारे तारे ३. कृष्णविवरांचे एकमेकांवर आपटणे त्याशिवाय जर काही विश्वरचनेच्या सिद्धान्तात म्हटल्याप्रमाणे नव्या वस्तूंचे सृजन चालू असेल तर त्याचेही पडसाद लहरींच्या रूपात उमटतील. अशा स्रोतांतून उमटलेल्या गुरुत्वीय लहरी कशा ‘पकडायच्या’, यावर प्रायोगिक मार्ग शोधण्यासाठी विचारमंथन चालू असतानाच अशा लहरींचे अस्तित्व सिद्ध करणारी एक अनपेक्षित माहिती उजेडात आली. ढरफ 1913 + 16 या सूचिक्रमाने ओळखला जाणारा एक स्पंदक तारा (पल्सार) आणि एक शेजारचा तारा यांचे तारायुगुल रेडिओ दुर्बिणीने पाहत असता जोसेफ टेलर आणि त्यांचे सहकारी हल्स यांना असे दिसून आले की, या तारायुगुलाच्या एकमेकांभोवती फिरण्याच्या आवर्तनकाळात कालानुसार घट होत आहे. जरी तारायुगुलातून ज्या गुरुत्वीय लहरी निघतात, त्या मापण्याचे उपकरण निरीक्षकांना उपलब्ध नव्हते, तरी सैद्धान्तिक गणित मांडून अशा लहरींतून किती ऊर्जा प्रक्षेपित होते याचा हिशोब लावणे शक्य होते. आणि ऊर्जेचे गणित मांडून हेही सांगता येते की, तारायुगुलाच्या आवर्तनकाळात कसा बदल होईल! गुरुत्वाकर्षणाच्या लहरींच्या प्रक्षेपणामागचे हे गणित आवर्तनकाळाच्या बदलाशी बरोबर जुळते. अर्थात वर सांगितल्याप्रमाणे स्रोतांच्या विविध प्रकारांत तारायुगुलाचा एक पर्याय आहेच. या आणि गुरुत्वाकर्षणाच्या आणखी काही सिद्धतेसाठी टेलर व हल्स यांना १९९३ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले. टेलर-हल्स शोधावरून गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध होत असले तरी त्या लहरी प्रत्यक्ष ‘पाहता’ याव्यात यासाठी शास्त्रज्ञांनी नव्याने प्रयत्न सुरू केले. आधुनिक काळात अशा प्रयत्नांना विपुल मनुष्यबळ लाभते. (छकॅड प्रकल्पात एक हजारच्या आसपास शास्त्रज्ञांनी भाग घेतला.) तरी सुरुवातीच्या काळात (१९६०-१९७० च्या दशकात) जोसेफ वेबर या एकटय़ा शास्त्रज्ञाने हे आव्हान स्वीकारले होते हे विसरता कामा नये. पण वेबरच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. याचे मुख्य कारण असे की, अपेक्षित परिणाम अतिशय सूक्ष्म असल्याने त्यासाठी अत्याधुनिक तंत्रशास्त्र लागते. ते वेबरच्या काळात उपलब्ध नव्हते. सध्याच्या तंत्रज्ञानाची भिस्त ‘इंटरफेरॉमीटर’ या उपकरणावर आहे. यामागचा विचार असा : समजा, अइ हा प्रकाशमार्ग उत्तर-दक्षिण, तर अउ हा पूर्व-पश्चिम आहे. प्रकाशकिरण अइ या मार्गाने पाठवण्यात आले तरी एका आरशाने अ येथे काही प्रमाणात वळवली जातात. समजा, निम्मी किरणे अइ दिशेने, तर निम्मी वळवून अउ कडे जातात. अइ आणि अउ ही अंतरे समान असतात. मात्र, अइ कडे जाणारी किरणे इ येथील आरशावर परावर्तित होतात, तर अउ कडे जाणारी उ येथील आरशावर. दोन्ही परावर्तित किरणे परत अ येथे भेटतात तेव्हा एकत्रित रूपात त्यांची छाननी केली जाते. याला स्टेज ७ म्हणू. (पाहा चित्र क्र. २) जर एखाद्या घटनेतून उद्भवणाऱ्या गुरुत्वीय लहरी अइ, अउ वरून गेल्या तर भूमितीच्या बदलाने मार्ग अइ, अउ यांच्या लांबीत फरक होतो. त्यामुळे स्टेज ७ वरील छाननीत बदल होईल- जिचे माप आपल्याकडे असेल. या छाननीवरून गुरुत्वीय लहरींची ऊर्जा किती, याचा अंदाज लावता येतो. ही ऊर्जा किती स्वल्प आहे याचा अंदाज लावायला कल्पना करा की, एका हत्तीच्या पाठीवर एक माशी बसली. हत्तीचे वजन किंचित वाढेल! किती वाढेल? मूळ वजनाच्या सुमारे अब्जांशाने! त्या वाढीचा अब्जांश घेतला तर आपण गुरुत्वीय लहरींनी आपल्या आसमंतात केलेल्या बदलापर्यंत पोहोचू. या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रकाश हा लेसर स्वरूपात घेतला. कारण सामान्य प्रकाशकिरण पसरत जाण्याची भीती असते, तशी लेसरची नसते. त्यातून अइ, अउ मार्गावर पोकळी निर्माण केल्यास लेसर आणखी तीव्र असेल. अइ व अउ चार किलोमीटर (प्रत्येकी) असल्याने इतक्या लांब नळ्यांतून पोकळी निर्माण करून प्रकाशाच्या लेसरना जायला मार्ग निर्माण केला गेला. अशा धर्तीवर अमेरिकेत उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व अशा दोन टोकाला ‘वेधशाळा’ बांधण्यात आल्या. लायगो (छकॅड) नावाच्या ‘लेसर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी’ या वेधशाळा आहेत- एक रिचमंड, वॉशिंग्टन स्टेटजवळ, तर दुसरी लिव्हिंग्स्टन लुइजियाना स्टेटजवळ. दोन्हीतले अंतर ३००२ किलोमीटर आहे. (पाहा चित्र क्र. ३) दोन वेधशाळा कशाला? आपण जे ‘सिग्नल’ मिळवणार ते अतिशय मंद असल्याने ते नक्की दूरच्या स्रोताकडून आलेत याची खात्री करायला कमीत कमी दोन वेधशाळा पाहिजेत. अगदी लहान भूकंप झाला तर त्याच्या जवळची वेधशाळा त्याचे अस्तित्व दाखवेल, पण दूरची वेधशाळा परिणाम दाखवणार नाही. त्याउलट, अंतराळात स्फोट झाला तर दोन्ही वेधशाळा त्याचे परिणाम जवळजवळ सारखे रेकॉर्ड करतील. ‘नॅशनल सायन्स फाऊंडेशन, अमेरिका’ या संस्थेच्या प्रमुख मदतीने आणि इतर काही देशांच्या सहभागाने २००२ साली लायगो प्रकल्प कार्यान्वित झाला आणि या सूक्ष्मदर्शी शोधाला सुरुवात झाली. पण २०१० सालापर्यंत या ६२ कोटी डॉलर खर्चून बांधलेल्या वेधशाळेने शोधांच्या बाबतीत नकारघंटाच वाजवली. तेव्हा तिच्यात अनेक सुधारणा करून ‘अ‍ॅड्व्हान्स्ड लायगो’ नावाखाली फेब्रुवारी २०१५ ला पुन्हा वेध घेण्यास सुरुवात झाली. १४ सप्टेंबर २०१५ या दिवशी सकारात्मक वेध मिळाला असे वाटले. पण खात्री करून घ्यायला पुष्कळ काळजी घेण्यात आली. अखेर खात्री झाल्यावर ११ फेब्रुवारी २०१६ रोजी या शोधावर लिहिलेला निबंध ‘फिजिकल रिवू लेटर्स’ या प्रख्यात नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला. या निबंधाचे लेखक होते लायगो, अमेरिका आणि ‘व्हगरे, युरोपातील १०१२ शास्त्रज्ञ! तसेच ११ तारखेलाच लायगोच्या संचालकांनी घोषणा केली की, लायगोला गुरुत्वीय लहरी सापडल्या! लायगोला सापडलेल्या गुरुत्वीय लहरींचा उगम कुठे झाला? गणित वापरून तज्ज्ञांनी काढलेला निष्कर्ष असा : सूर्याच्या ३० पटीने वस्तुमान असलेली दोन कृष्णविवरे एकमेकांभोवती फिरता फिरता एकमेकांत शिरून त्यातून एक मोठे कृष्णविवर निर्माण होते. अशावेळी निघालेल्या या लहरी सुमारे १.३ अब्ज प्रकाशवर्षे प्रवास करत इथे पोहोचल्या! अर्थात गुरुत्वीय लहरींचे हे पहिलेवहिले उदाहरण. यापुढे आणखी वेध मिळतील तेव्हा आपल्या माहितीत भर पडेल. पण गुरुत्वाकर्षणाच्या लहरींची एक नवी खिडकी उघडली असून विश्वाच्या भूतकाळाबद्दल आपल्या माहितीत निश्चितच भर पडणार. भारताचा सहभाग सुमारे २५ वर्षांपूर्वी बंगलोरमध्ये भरलेल्या एका चर्चासत्रात भारतातील खगोल वैज्ञानिक पंचवार्षिक योजनेत खगोलशास्त्रात नव्या सोयी असाव्यात याचा विचार करीत होते. नुकत्याच अस्तित्वात आलेल्या ‘आयुका’ संस्थेतर्फे संजीव धुरंधर या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाच्या लहरींवर कुठली शोधकार्ये करता येतील यावर सविस्तर चर्चा केली. पण त्यावेळच्या ज्येष्ठ वैज्ञानिकांनी त्या सूचनांना फारसे महत्त्व दिले नाही. त्यानंतर स्वत:च्याच हिमतीवर ‘आयुका’ने या विषयात संशोधन चालू केले. गणिताचा वापर करून पुष्कळ गोंगाटाखाली दडून बसलेली महत्त्वाची माहिती कशी उकरून काढायची, हा या संशोधनाचा एक भाग होता. संजीव आणि त्यांचे विद्यार्थी व सहकारी यांच्या संशोधनाचा आज परिणाम जाणवतो. ‘आयुका’त संशोधन केलेले अनेक तरुण आज जगात इतरत्र असलेल्या ‘लायगो’ आणि तत्सदृश वेधशाळांत दिसतात. खुद्द ‘लायगो’करांना आज गरज भासते आहे ती- त्यांच्या वेधशाळेत भर टाकायला दूरची एक वेधशाळा असावी, याची. ‘लायगो’करांनी निवडलेला प्रकल्प ‘लायगो- भारत’ भारतीय तंत्रज्ञानाला पेलेल असा आत्मविश्वास आणि भारतीय शास्त्रज्ञांची संशोधनक्षमता यातून पुढे आलेला! २५ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आता वास्तवात येणार काय? 

======================================
मिशिगन:हल्लेखोराच्या गोळीबारात सहा ठार
शिकागो - अमेरिकेमधील मिशिगन राज्यातील कलामाझु काऊंटी भागामध्ये एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारामध्ये किमान सहा नागरिक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. 

या गोळीबारात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर एक आलिशान एसयुव्ही गाडी चालवित नागरिकांवर गोळीबार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्लेखोराचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे.
======================================
सत्य साईबाबांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण

रायपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (रविवार) रायपूर येथील सत्य साई मेडिकल इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये आध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

छत्तीसगडमधील नवे रायपूर येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पोचले असून, त्यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजना आणि मुख्यमंत्री आवास योजना या घरकुलाच्या योजनेचेही उद्घाटन झाले. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते.

मोदी म्हणाले की, अनेक वर्षे झाली तरी आपल्या देशातील कोट्यवधी नागरिकांकडे स्वतःचे घर नाही. ते स्वतःचे घर बनवू शकत नाहीत, या विचारांना आपण बदलले पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट, मुद्रा योजनांमुळे देशातील युवकांना मदत मिळत आहे. युवकांनी खासगी व सार्वजनिक क्षेत्राबरोबरच वैयक्तिक सेक्टरवरही भर द्यायला हवा. 
======================================
फिजीस शक्तिशाली वादळाचा फटका
सुवा - प्रशांत महासागरामधील द्वीपकल्प असलेल्या फिजी देशास विन्स्टन या अत्यंत शक्तिशाली वादळाच्या बसलेल्या फटक्‍यानंतर आता येथील नुकसानाची चाचपणी व मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. या वादळामुळे किमान एक नागरिक मृत्युमुखी पडला आहे. फिजीच्या इतिहासामधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असून यामुळे देशातील हजारो घरे अक्षरश: उध्वस्त झाली. याचबरोबर, देशामधील काही गावे पूर्णत: उध्वस्त झाल्याचेही वृत्त आहे.

विन्स्टनमुळे वाहिलेल्या वाऱ्यांचा वेग ताशी 320 किमीपेक्षाही जास्त होता; तसेच किनारपट्टीवर सुमारे 12 मीटर (40 फुट) उंचीच्या लाटा उसळल्या. या आव्हानाचा सामना करण्यासाठी येथील सरकारने किमान साडेसातशे मदतकेंद्रांची स्थापना केली असून राष्ट्रीय पातळीवर संचारबंदी लागू केली होती. या वादळामुळे झालेल्या नुकसानाचा अद्यापी आढावा घेण्यात येत आहे. 

======================================
तरुण मोदींच्या नौटंकीला भुलले:अशोक वाजपेयी
पुणे - ‘देशात सर्व धर्मांचे लोक आनंदाने राहू शकणार नसतील, सर्वांना समान न्याय मिळणार नसेल, हिंसक घटना वाढत जाणार असतील, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अडचणीत येणार असेल, असहिष्णुता वाढतच जाणार असेल, तर आपल्याला "देशद्रोह‘ करावाच लागेल,‘‘ असे मत हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. भारतातील युवा शक्ती सुरवातीला नरेंद्र मोदी यांच्या नौटंकीला भुलली. तीच आता त्यांचा विरोध करताना दिसत आहे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. 

कॉ. गोविंद पानसरे स्मृतिदिनानिमित्ताने लोकायत आणि सोशालिस्ट पार्टी (इंडिया) तर्फे आयोजित व्याख्यानात वाजपेयी बोलत होते. समाजवादी नेते भाई वैद्य, "लाल निशाण‘चे भालचंद्र केरकर, "लोकायत‘च्या अलका जोशी, निरज जैन उपस्थित होते. 

वाजपेयी म्हणाले, ‘मुळात आपला देश स्वातंत्र्य, समता, न्याय या मूल्यांवर उभा आहे; पण ही मूल्य बाजूला सारण्याचे काम काही लोक करत आहेत. अशावेळी आपण प्रश्‍न विचारले पाहिजेत; पण प्रश्‍न विचारण्याचे धाडसही हल्ली अनेकांमध्ये दिसत नाही. आम्ही काही लेखकांनी "पुरस्कार वापसी‘च्या माध्यमातून सरकारला प्रश्‍न विचारला; पण प्रश्‍न विचारणाऱ्यांची "त्यांनी‘ टिंगलटवाळी केली. हे चुकीचे आहे. खरं तर या विषयावर उत्स्फूर्तपणे चळवळच निर्माण झाली. सामान्य माणसांपासून राष्ट्रपतीपर्यंत अनेकांनी या विषयावर भाष्य केले. मात्र, पंतप्रधान या विषयावर भारतात काहीही बोलले नाहीत. रोहित वेमुलाप्रकरणी त्यांनी व्यक्त केलेली भावुकता हीसुद्धा नाटकीच आहे.‘‘ 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्वांत जास्त धोका हिंदू धर्माला आहे. संघाबरोबरच इतर संघटना व पक्षांत असलेली कट्टरता हीसुद्धा तितकीच धोक्‍याची आहे. या विरोधात सत्याग्रह उभा राहत आहे. यात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 
======================================
वॉशिंग्टन; जेब बुश यांची निवडणुकीतून माघार
वॉशिंग्टन - रिपब्लिकन पक्षाचे उत्सुक उमेदवार जेब बुश यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. दक्षिण कॅरोलिनामध्ये स्वीकाराव्या लागलेल्या मोठ्या पराभवामुळे त्यांनी माघार घेतली आहे. जेब बुश हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्लू. बुश यांचे भाऊ आहेत. तसेच ते फ्लोरिडाचे गव्हर्नरही होते.

ट्रंप दक्षिण कॅरोलिनात, हिलरी नेवाडात विजयी
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या हिलरी क्‍लिंटन यांनी बर्नी सँडर्स यांना मागे टाकून नेवाडामध्ये विजय मिळविला. तर, वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी दक्षिण कॅरोलिनामध्ये विजय मिळविला.

दक्षिण कॅरोलिनामध्ये होणाऱ्या निवडणुकीत विजय मिळविण्याचा विश्‍वास ट्रंप यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. ट्रंप यांनी या विजयानंतर मतदारांचे आभार मानत नागरिकांनी मला संधी दिली असे म्हटले आहे. ट्रंप यांचा हा सलग दुसरा विजय आहे. त्यांनी यापूर्वी 9 फेब्रुवारीला न्यू हॅम्पशायरमध्ये विजय मिळविला होता. 

दुसरीकडे डेमोक्रेटिक पक्षाच्या उत्सुक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी नेवाडामध्ये विजय मिळविला. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांच्याविरोधात खूप थोड्या फरकाने विजय मिळविला. याठिकाणी क्लिंटन यांना 52.5 टक्के मते मिळाली, तर सँडर्स यांना 47.5 टक्के मते मिळाली. क्लिंटन यांच्या विजयानंतर सँडर्स यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
======================================
'बिफ बिर्याणी'च्या उल्लेखाने अलिगडमध्ये खळबळ
अलीगड - अलिगड मुस्लिम विद्यापीठ (एएमयू) मेडिकल कॉलेजच्या कॅंटिनच्या मेन्यू कार्डवर "बिफ बिर्याणी‘चा उल्लेख आढळून आल्याने शुक्रवारी शहरात खळबळ उडाली. सोशल मीडियावरून हे मेन्यू कार्ड प्रसारित झाल्याने त्याची दखल घेत विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीने कॅंटिन गाठले आणि सर्व वादग्रस्त बोर्ड काढून टाकले. त्याचबरोबर कॅंटिनचालकास बोर्डवर त्या मेन्यूचा उल्लेख केल्याबद्दल तंबी देत यापुढे काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. एएमयूच्या भोजनकक्षात आणि हॉस्टेलवरही अशा प्रकारचा उल्लेख टाळण्याचे सक्त ताकीद दिली आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर मेन्यू कार्ड व्हायरल झाल्याने बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बाब महापौर शकुंतला भारती यांनी जिल्हा प्रशासनासमोर मांडण्याचे आवाहन केले असून, यासंदर्भात चर्चा करणार असल्याचेही नमूद केले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. राहत अब्रार म्हणाले, की मेन्यू कार्डवर "बिफ बिर्याणी‘चा उल्लेख केला आहे, ते समजण्यास चूक झाली आहे. बाकी काही नाही.
======================================
फडणवीस असेपर्यंत आरक्षण मिळणार नाही - राणे
मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस जोपर्यंत असतील तोपर्यंत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शनिवारी टीका केली.
कॉंग्रेसच्या गांधी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस फक्‍त घोषणा करतात, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यास भारतीय जनता पक्ष सरकार बांधिल असल्याचे वारंवार सांगतात मात्र ते मुख्यमंत्री असेपर्यंत या समाजाला कदापि आरक्षण मिळणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मते मागून भाजप सत्तेवर आला, आता मात्र त्यांना शिवरायांचा विसर पडला. काल झालेल्या शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यात एकही सरकारी कार्यक्रम झाला नाही. मुंबईच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत काहीही प्रगती झाली नाही. शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांनी भले मोठे भाषण ठोकले मात्र, शिवस्मारकाविषयी शब्दही काढला नसल्याकडे राणे यांनी लक्ष वेधले. 
======================================
भांडी घासणारे हात फिरू लागले संगणकावर
डिजिटल क्‍लासमुळे बदलला सोलापूर महापालिका शाळांचा ‘लुक‘ 
सोलापूर - गरीब आणि शैक्षणिक सुविधांपासून वंचित असलेली उपेक्षित मुलेही आता खासगी शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने "डिजिटल‘ शिक्षण घेऊ लागली आहेत. सोलापूर महापालिकेच्या तब्बल 24 शाळांमध्ये "ई-क्‍लास‘ची सुविधा करण्यात येत असून, त्यापैकी 15 शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुरू झाले आहे. भांडी घासणारे चिमुकले हात आता सफाईदारपणे संगणक हाताळत असल्याचे दिसून येत आहे. 

संगणकावर चित्रे काढणे, पुस्तकातल्या गोष्टी दृश्‍य स्वरूपात पाहणे, कोडी सोडविणे, गणिताचा अभ्यास करणे आदी शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होत असून, चित्राद्वारे शिक्षण ही कल्पना त्यांच्यात चांगलीच रुजल्याचे दिसून येत आहे. मजुरीसाठी आई-वडील सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे घरातील कामे करण्याची जबाबदारी या मुलांवर येते. त्यांच्या शिक्षणाबाबतही कोणी गांभीर्याने पाहत नाही. वेळेवर शाळा नाही, पुस्तके नाहीत. अशा स्थितीत शिकण्याची इच्छा असली, तरी शाळेत जायची संधी नाही. शिक्षणासाठी लागणारे साहित्य कोण देणार, हा मोठा यक्षप्रश्‍नच असतो. यावर मात करून शहरातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने डिजिटल क्‍लासची उभारणी केली जात आहे. 

गरिबीमुळे भांडी घासणारी, तसेच पडेल ती कामे करणारी मुले आता थेट संगणकाशी खेळणार आहेत. या सुविधांमुळे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या आणि गुणवत्ता निश्‍चित वाढेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पत्र्याचे डबे, चाळण्या तयार करणे या पिढ्यान्‌ पिढ्यांपासून सुरू असलेल्या परंपरागत व्यवसायाला फाटा देत शिक्षणाची ओढ वैदू वस्तीतील मुला-मुलींमध्ये निर्माण झाली आहे. त्या शाळेतही डिजिटल क्‍लास सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. 

स्पर्धात्मक युगात खासगी शाळांसमोर टिकाव धरण्यासाठी "डिजिटल क्‍लास‘ ही गरज होती. दानशूरांच्या सहकार्याने ती प्रत्यक्षात येत आहे, याचा आनंद वाटतो. 

======================================
जेजुरीतील 25 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशास मनाई
पुणे - जेजुरी येथील खंडोबा मंदिरातील 25 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत पुजाऱ्यांनी कोणत्याही भाविकाकडून देणगी घेऊ नये, असे आदेश धर्मादाय सहआयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत. 

श्री मार्तंड देवस्थानचे विश्‍वस्त आणि पुजारी यांच्यामध्ये न्यासाला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या विभागणीवरून वाद सुरू होता. त्यावर कशी विभागणी करावी, याबाबत जिल्हा न्यायालयाने निकालही दिला आहे. परंतु काही पुजारी भाविकांनी मंदिरात देवासमोर ताटात ठेवलेले पैसे पिशवीत भरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे. ही रक्‍कम दानपेटीत टाकणे आवश्‍यक असताना पुजाऱ्यांनी ती रक्‍कम नेली. काही पुजारी भाविकांकडून पैसे उकळून देवस्थानचे नुकसान करीत आहेत. या प्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप काही कारवाई करण्यात आलेली नाही, असे देवस्थान विश्‍वस्तांच्या वतीने ऍड. दिलीप हंडे यांनी अर्जात नमूद केले होते.

या संदर्भात धर्मादाय सहआयुक्‍त डिगे यांच्यासमोर सुनावणी झाली. पुजाऱ्यांना अभिषेकाच्या पावत्या फाडणे आणि मंदिरातील ताटात जमा होणारी रक्‍कम घेण्याचा अधिकार नाही. परंतु काही पुजारी बेकायदा दक्षिणा गोळा करीत असल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येत आहे. त्यामुळे न्यासाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी 25 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत असून, भाविकांकडून देणगी घेऊ नये. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, असे डिगे यांनी आदेशात नमूद केले आहे.
======================================
पाहिजे ती शिक्षा करा, पण माझे माकड द्या...
नाशिक - जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या मुलाच्या आग्रहास्तव थेट हिंगोलीतून पित्याने माकडाचे पिलू आणले. मुलाने त्या पाळीव माकडाची गळाभेट घेतली; पण नंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माकडासह मुलाच्या पित्याला ताब्यात घेतले असता, पाहिजे तो दंड किंवा शिक्षा करा; मात्र माझे माकड मला परत द्या, अशी विनवणी केली. अखेर अधिकाऱ्यांनी माकड ताब्यात घेऊन गुन्हा दाखल न करता पित्याला सोडून दिले. 

हिंगोली येथील सुधारक शिरसाठ यांची नाशिकला सासुरवाडी असून, कुटुंबीयांसह येथे आले असता, त्यांचा मुलगा आजारी झाला. त्यामुळे त्यास जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मुलगा त्यांच्या घरी पाळलेल्या माकडाची आठवण काढत होता. त्या पाळीव माकडाला भेटण्याची तो वारंवार मागणी करीत असल्याचे पाहून शिरसाठ हे हिंगोलीला गेले आणि मोटारसायकलवरून त्या लहानशा माकडाला घेऊन आज नाशिकला आले.

रुग्णालयात त्यांनी मुलाची भेट त्या माकडाशी घालून दिली. नंतर मोटारसायकलजवळ त्या माकडाला साखळीला बांधून गेले. ही बाब पोलिसांच्या नजरेस पडताच त्यांनी वन विभागाला कळविले. वनरक्षक उत्तम पाटील व शरद थोरात यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन माकड ताब्यात घेतले. शिरसाठ यांनी माकड सोडण्यासाठी विनवण्या केल्या. असेल ती शिक्षा व दंड भरण्याची तयारीही त्यांनी दाखविली. मात्र, वनरक्षकांनी कायद्यानुसार असमर्थता दर्शविली. अखेर गुन्हा दाखल न करता माकड ताब्यात घेऊन वनरक्षक निघून गेले. त्यांनी ते माकड हे त्र्यंबक परिसरातील वन अधिवासात सोडून दिले. मुलासाठी आणलेले माकड हिरावले गेल्याच्या दु:खाला त्यांनी अश्रूतून मोकळी वाट करून दिली.

No comments: