Sunday, 21 February 2016

नमस्कार लाईव्ह २१-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- कैरो; चौघांच्या हत्येप्रकरणी चार वर्षांच्या चिमुरड्याला जन्मठेप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- मास्टर ब्लास्टर सचिनकडून बीडच्या दुष्काळाची दखल 
३- जाट आंदोलकांकडून दिल्लीत पाणीबाणी, केजरीवांलांकडे टँकर 
४- श्रीनगर; पम्पोर दहशतवादी हल्ला, कॅ. पवनकुमार आणि दोन जवान शहीद 
५- हरयाणात हिंसाचार सुरुच, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू 
६- विमानाप्रमाणे ट्रेनमध्ये आता रेल्वे सुंदरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- जुन्या मुंबईच्या पाऊलखुणा, खोदकामात ट्रामचा ट्रॅक सापडला 
८- मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दादरमध्ये मराठमोळी मॅरेथॉन 
९- राज्यात प्रथमच हाडांचे दान, तीन रुग्णांना दिलासा 
१०- २६/११ हल्ल्यासाठी वापरलेल्या बोटीचा मेकओव्हर, नवीन नाव 
११- ‘सूरज परमारांना पालिका अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागत होते’ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- फेसबुकवरुन वहिनीची बदनामी, गुजरातमधील दीराला मुंबईत बेड्या 
१३- पुण्यात तेलाच्या व्यापार्‍याची हत्या 
१४- बसव महामोर्चास मुखेडहून शिवसैनिक जाणार - बालाजी पा.कबनुरकर 
१५- गडचिरोली; प्राणहीता नदीत नाव पलटी, २२ जणांची सुटका, दहा बेपत्ता
१६- जाट आंदोलनाचा १००० ट्रेन्सवर परिणाम, उत्तर भारतातील ७०० रेल्वे गाडया रद्द 
१७- आंध्रप्रदेशच्या पुट्टाकोटा गावात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- सैन्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करु शकतो - धोनी 
१९- आपण संरक्षणकर्ते आहोत, शांततेने तोडगा काढू - सेहवाग 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,कारण.... काळ इतका ताकदवान आहे की, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिरा बनवतो...!!
(अरविंद कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.


===========================================

जुन्या मुंबईच्या पाऊलखुणा, खोदकामात ट्रामचा ट्रॅक सापडला



मुंबई : मुंबईत 50 वर्षांपूर्वीच्या ट्राम रेल्वेचा ट्रॅक सापडला आहे. कुलाबा परिसरात रस्त्याच्या बाजूला खोदकाम सुरु असताना हा ट्रक आढळला. त्यामुळे सामान्यांच्या मनात कुतूहल वाढीला लागलं आहे. 
ब्रिटीश काळात म्हणजे 1874 साली मुंबईत ट्रामसेवा सुरु झाली. 6 ते 8 घोडे ट्रामला ओढण्याचं काम करत. मुंबईत 900 घोडे ट्रामसेवेसाठी वापरले जायचे. 
1907 मध्ये पहिल्यांदा विद्युत ट्राम सुरु झाली. 1920 डबलडेकर ट्राम आली. कोणे एके काळी 433 ट्राम 47 किलोमीटर धावायच्या. मात्र 1964 मध्ये ट्रामसेवा बंद करण्यात आली. 
सध्या खोदकाम थांबवण्यात आलं आहे. याठिकाणी ट्रॅक काढावा की त्यावरच रस्त्याचं काम करावं, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
===========================================

मास्टर ब्लास्टर सचिनकडून बीडच्या दुष्काळाची दखल 


बीड : बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दुष्काळाचा फटका जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला बसला आहे. याची दखल क्रिकेटचा देव, खासदार सचिन तेंडुलकरने घेतली असून त्याने शनिवारी आपल्या स्वीय सहाय्यकाला बीडच्या दुष्काळी झळा जाणून घेण्यासाठी पाठवलं. 
सचिनच्या स्वीय सहाय्यक नारायण कन्हान यांनी बीडच्या जिल्हाधिकार्‍यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन या भागातील जनतेला मदत करण्याबाबत चाचपणी केली. बीड जिल्ह्याला दर चार-दोन वर्षांनी दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. यंदा तर सलग चौथ्या वर्षी जिल्ह्यासमोर दुष्काळ उभा ठाकला आहे. अशा सततच्या दुष्काळी झळांमुळे जिल्ह्यातील कृषक समाज अडचणीत येत आहे. 
नारायण कन्हान यांनी बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. जिल्ह्यातील दुष्काळाची माहिती घेऊन दुष्काळी भागात काय मदत करता येईल, यासंदर्भात चाचपणी केली. सचिनचे स्वीय सहाय्यक नारायण कन्हान यांना जिल्ह्यातील दुष्काळाच्या तीव्रतेच्या स्थिती विषयी माहिती घेतली. पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची यादी यावेळी
त्यांना देण्यात आली.
===========================================

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दादरमध्ये मराठमोळी मॅरेथॉन


मुंबई : मराठी भाषेचं संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात मराठमोळी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. ‘पार्ले पंचम’ संस्थेच्या वतीने या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. 
मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची पाऊलं शिवाजी पार्क परिसराकडे वळू लागली होती. राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे तसेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली. 
विशेष म्हणजे स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी अमित ठाकरे स्वत: मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी इतर स्पर्धकांबरोबर धावून शर्यत पूर्ण देखील केली. 
12 ते 20, 20 ते 60 आणि ज्येष्ठ नागरिक अशा तीन वयोगटांमध्ये ही  स्पर्धा झाली. यंदा या स्पर्धेचं सलग चौथं वर्ष होतं.
===========================================

जाट आंदोलकांकडून दिल्लीत पाणीबाणी, केजरीवांलांकडे टँकर


अनेक शहरात दळण-वळण ठप्प केल्यानंतर जाट आंदोलकांनी आता दिल्लीचं पाणी थांबवण्याचा निर्धार केला आहे. काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा दिल्लीकरांसाठी शिल्लक आहे. विशेष म्हणजे पाण्याची चणचण आतापासूनच जाणवू लागल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या घरी आज टँकरनं पाणीपुरवठा करावा लागला. 
हरियाणातल्या मुनक या तलावातून दिल्लीला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी जाट आंदोलकांनी या तलावाला घेराव घातला आहे. दरम्यान सोमवारी दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने 
यासंदर्भात केजरीवालांनी बैठकही घेतली. त्यात पंतप्रधान निवास, राष्ट्रपती भवन, आर्मी कॅम्प आणि अग्निशमन दलासाठीचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असा निर्णय घेतला गेला.
===========================================

पम्पोर दहशतवादी हल्ला, कॅ. पवनकुमार आणि दोन जवान शहीद


श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पम्पोरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कॅप्टन पवन कुमार यांच्यासह सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत तर 10 जण जखमी असल्याची माहिती आहे. 
पेट्रोलिंग करणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हल्लेखोर ईडीआय या कंपनीत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर कंपनीत अडकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. 
तीन ते पाच दहशतवादी इमारतीत लपले असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तवली. दरम्यान लष्कराने संपूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांची धरपकड करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
===========================================

फेसबुकवरुन वहिनीची बदनामी, गुजरातमधील दीराला मुंबईत बेड्या


मुंबई : घरगुती वादातून एका व्यावसायिकाने आपल्या भावजयीचं फेसबुक अकाऊण्ट हॅक करुन तिची बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या बीकेसीतील सायबर पोलिसांनी राजकोटमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय इसमाला बेड्या ठोकल्या आहेत. 
आरोपीची पत्नी आणि पीडिता या सख्ख्या जावा. मात्र दोघींचं फारसं पटत नव्हतं. त्यातच आईने आपल्या पत्नीची बाजू न घेता भांडणात वहिनीची बाजू घेतल्याचा राग आरोपीच्या मनात खदखदत होता. याच रागातून त्याने वहिनीचं फेसबुक अकाऊण्ट हॅक केलं आणि तिच्या फ्रेण्ड्सशी अश्लाघ्य संभाषण सुरु केलं. 
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपलं अकाऊण्ट हॅक झाल्याचं आणि आपल्या नावे एक फेक अकाऊण्ट ओपन केल्याचं लक्षात येताच, पीडितेने पोलिसात धाव घेतली. आयपी अॅड्रेस शोधून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असता तो पीडितेचा दीर असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर त्याला राजकोटहून मुंबईत आणून बेड्या ठोकण्यात आल्या.

===========================================

कैरो; चौघांच्या हत्येप्रकरणी चार वर्षांच्या चिमुरड्याला जन्मठेप


कैरो : एक वर्षांचा असताना चौघांची हत्या केल्याच्या आरोपातून इजिप्तमधील कोर्टाने 4 वर्षांच्या मुलाला जन्मठेप सुनावली आहे. अहमद मन्सूर कर्मी असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या चिमुरड्याचं नाव आहे. 
चौघांची हत्या, आठ जणांच्या हत्येचा प्रयत्न, संपत्ती बळकावणं आणि जवान तसंच पोलिसांना धमकावणं असे गंभीर आरोप अहमदवर ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गुन्हे करताना त्याचं वय केवळ एक वर्ष असल्याचं समोर आलं आहे. 
2014 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांप्रकरणी पश्चिम कैरोमध्ये 115 आरोपींना सामुहिकरित्या जन्मठेपेची सुनावणी करण्यात आली. अहमद हा त्याच 115 जणांपैकी एक आहे. अहमदचे वकील फैजल-अल सय्यद यांनी अहमदचं नाव कोर्टाकडून नजरचुकीने आरोपींच्या यादीत समाविष्ट झाल्याचं म्हटलं आहे. आपण ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
===========================================

राज्यात प्रथमच हाडांचे दान, तीन रुग्णांना दिलासा 

मुंबई : मृत्यूनंतर अवयवदानाचा विचार आता नव्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. चेंबूर येथे मृत्यू झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन तीन रुग्णांची मदत केली. यामध्ये हाडांच्या दानाचाही समावेश असून, कर्करुग्णांना उपचारासाठी सहाय्यदेखील केले. अशा प्रकारे राज्यात पहिल्यांदाच हाडांचे दान करण्यात आले आहे.
चेंबूर येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय पुरुषास ११ फेब्रुवारी रोजी छातीत दुखायला लागल्यामुळे सावला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा ईसीजी काढण्यात आला. त्या वेळी त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. त्यामुळे रक्त पातळ करण्यासाठी त्यांना इंजेक्शन देण्यात आले. त्याच रात्री त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे ते कोमात गेले आणि हळूहळू मेंदूचे कार्य कमी झाले. १९ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी रुग्ण ब्रेनडेड झाल्याची माहिती दिली. त्या वेळी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे त्यांचे जावई उत्तम आंबोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
उत्तम यांनी सांगितले, ‘रुग्णाची स्थिती सुधारू शकत नाही. कारण मेंदू कार्यरत नाही, असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. वर्तमानपत्रात अवयवदानाविषयी वाचले होते. त्यामुळे सासरे अवयवरूपाने जिवंत राहावेत, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर रुग्णालयाने सायन आणि केईएम रुग्णालयाशी संपर्क साधला. १९ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता सायन रुग्णालयाचे डॉक्टर येऊन सासऱ्यांना सायन रुग्णालयात घेऊन गेले. सर्व तपासण्या झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी यकृत, मूत्रपिंड, डोळे घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही डॉक्टरांना अजून कोणता अवयव दुसऱ्यांना उपयुक्त असल्यास काढून घ्या, असे सांगितले. त्यांनी हाडेदेखील उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यालाही आम्ही मंजुरी दिली.’
कर्करुग्णांच्या उपचारासाठी हाडे उपयुक्त असतात, पण या आधी गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर अथवा अशी अन्य कोणती शस्त्रक्रिया झाल्यावर काढलेली हाडे उपचारासाठी वापरली जातात.
===========================================

सैन्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करु शकतो - धोनी


  • नवी दिल्ली, दि. २१ - अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरुन देशात गदारोळ माजलेला असताना भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सैन्यदलाचे कौतुक केले आहे. सैन्य दलामुळे आपण आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करण्याच्या स्थितीत आहोत असे टि्वट धोनीने केले आहे. 
    जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्यानंतर जी कारवाई सुरु आहे. त्यावरुन अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा प्रचार सुरु केला आहे. धोनीने हे टि्वट करुन अप्रत्यक्षपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा प्रचार करणा-यांना चपराक लगावली आहे. 
    स्पेशल फोर्सेस, कमांडो युनिटमध्ये जे जवान आहेत ते तुमच्या आमच्यासारखेच सामान्य नागरीक आहेत पण, स्वत:च्या आधी ते देशहित जपण्याला पहिले प्राधान्य देतात असे टि्वटसमध्ये धोनीने म्हटले आहे. संपूर्ण देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन वाद-विवाद सुरु असताना धोनीने व्यक्त केलेल्या या मतांना महत्व आहे. 
===========================================

आपण संरक्षणकर्ते आहोत, शांततेने तोडगा काढू - सेहवाग


  • नवी दिल्ली, दि. २१ - भारताचा माजी तडाखेबंद फलंदाज विरेंद्र सेहवागने जाट आंदोलकांना आरक्षणासाठी सुरु असलेले हिंसक आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे. जाट समाजातील लोक संरक्षणकर्ते आहेत नष्ट करणारे नाहीत. त्यामुळे मी माझ्या सर्व बंधुंना हिंसा थांबवण्याचे आवाहन करतो. 
    त्यांनी त्यांच्या मागण्या संविधानिक मार्गाने मांडाव्यात. आपण संरक्षणकर्ते आहोत, नष्टकर्ते नाहीत असे सेहवागने टि्वटरवरुन आवाहन केले आहे. सेहवाग स्वत: जाट आहे. आपण लष्करात, खेळांमध्ये अनेकदा देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. आपल्यामध्ये जो उत्साह, आवेश आहे त्याचा आपण देशाच्या भल्यासाठी विचार करु असे सेहवागने सांगितले. 
    ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समाजाचे हिंसक आंदोलन सुरु आहे. अनेक जाट नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मोठया प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मात्र तरीही हरयाणाच्या अनेक भागांमध्ये हिंसक आंदोलन सुरु आहे. 
===========================================

विमानाप्रमाणे ट्रेनमध्ये आता रेल्वे सुंदरी


  • नवी दिल्ली, दि. २१- तुम्ही विमान प्रवास करता त्यावेळी हवाई सुंदरी स्मितहास्याने तुमचे स्वागत करते, तुमचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सीटबेल्ट बांधण्यापासून वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करते. असाच अनुभव रेल्वे प्रवासात आला तर. लवकरच ही कल्पना प्रत्यक्षात येणार आहे. ट्रेनमध्ये बसल्यानंतर रेल्वे सुंदरी स्मितहास्य आणि गुलाब पुष्पाने तुमचे स्वागत करेल. त्यावेळी ट्रेनमध्ये कानाला सुखावणारे सुंदर संगीत चालू असेल. दिल्ली-आग्रा मार्गावर धावणा-या गतिमान एक्सप्रेसमध्ये (ट्रेन होस्टेस) रेल्वे सुंदरींची नियुक्ती करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या सुंदरी प्रवाशांचे स्वागत गुलाबाच्या पुष्पाने करणार आहेत. १६० कि.मी.वेगाने धावणारी भारताची ही पहिली रेल्वे आहे. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू देशातील या पहिल्या सेमी-हायस्पीड ट्रेनच्या वैशिष्ट्यांची घोषणा करणार आहेत. या ट्रेनमध्ये हायपावर इर्मजन्सी ब्रेकिंग सिस्टीम आहे. त्याशिवाय आगीची माहिती देणारी अत्याधुनिक यंत्रणा, जीपीएस आणि लाईव्ह माहितीसाठी टीव्ही सुध्दा असेल. विमानसेवेप्रमाणे गतिमान एक्सप्रेसमध्ये सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-याने सांगितले. विमानाच्या दर्जाचे अन्न या ट्रेनमध्ये मिळणार असून, शताब्दी एक्सप्रेसपेक्षा या ट्रेनचे तिकीट २५ टक्के जास्त असेल अशी सूत्रांची माहिती आहे. 
===========================================

२६/११ हल्ल्यासाठी वापरलेल्या बोटीचा मेकओव्हर, नवीन नाव 


  • मुंबई, दि. २१-  मुंबईवरील २६ /११  दहशतवादी हल्ल्याला सात वर्ष उलटली असली  तरी, आजही  मुंबईकरांच्या मनात या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. पण कुबेर बोटीचे मालक हिरालाल मसानी यांनी या आठवणी मागे सोडून आता पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. 
    अजमल कसाब आणि त्याचे नऊ अतिरेकी याच कुबेर बोटीचे अपहरण करुन समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार पोरबंदर स्थित उद्योगपती हिरालाल मसानी त्या २६ /११ च्या कटू आठवणी पुसण्यासाठी फक्त कुबेरचा चेहरामोहराच बदलणार नसून, त्यांनी कुबेरचे नाव बदलून श्री गणेश कुबेर असे नवीन नाव दिले आहे. 
    श्री गणेश हे भाग्याचे प्रतीक आहे, वाईट शक्ती बोटीपासून दूर रहाव्यात यासाठी मी कुबेरचे नाव बदलले असे मसानी यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले. मागच्या आठवडयात पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने अतिरेक्यांनी मुंबईत शिरण्यासाठी वापरलेली बोट केसची संपत्ती करण्याचे आदेश दिले आहेत. 
    पाकिस्तानला बोट देणार ? या प्रश्नावर मसानी म्हणाले की, मी वर्तमानपत्रात पाकिस्तानी कोर्टाच्या आदेशाबद्दल वाचले आहे पण, भारतीय यंत्रणांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर याबद्दल निर्णय घेईन असे मसानी यांनी सांगितले. 
===========================================

हरयाणात हिंसाचार सुरुच, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू 

  • ऑनलाइन लोकमत 
    चंदीगड, दि. २१ - ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जाट समाजाकडून हरयाणामध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून, शनिवारप्रमाणे रविवारीही अनेक भागांमध्ये हिंसाचार, जाळपोळ सुरु आहे. लष्कर, पोलिसांच्या तुकडया तैनात करण्यात आल्यानंतरही हरियाणामधील हिंसाचार नियंत्रणात आलेला नाही. 
    भिवानी आणि सोनीपतमध्ये आंदोलकांनी दोन पोलिस चौक्या, दुकाने आणि एटीएम मशीन जाळल्या. लष्कराने येथे ध्वजसंचलन केले असून, सर्वाधिक वाईट परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये हवाई टेहळणीव्दारे लक्ष ठेवण्यात येत आहे. आतापर्यंतच्या हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू झाला असून, १५० जण जखमी झाले आहेत. जाट आरक्षण आंदोलनामुळे 
    जिंदमध्ये आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल पंपाची नासधूस केली. १५४ एफआयआर दाखल झाले आहेत. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. 
    रोहतक, जिंद, भिवानी, झांज्जर, सोनीपत, हिस्सार या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सर्वाधिक खराब आहे. आंदोलनकर्त्यांनी शनिवारी रात्री बँकेच्या एटीएम मशीनला आग लावली. भिवानीमधील लोहारुमध्ये कोऑपरेटीव्ह बँकेची कागदपत्रे जाळली. मोठया प्रमाणावर जवानांची तैनाती झाल्यानंतरही हिंसाचार सुरु आहे.
  •  राज्याच्या अनेक भागात हिंसाचार सुरु आहे. बसई धानकोट रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटरला जमावाने आग लावली. सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-चंदीगड महामार्गावरील वाहतुकीसाठी बंद केला आहे.  
===========================================
‘सूरज परमारांना पालिका अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागत होते’
suraj parmar_buldier
 सूरज परमार यांना पालिकेच्या अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागत होते असा धक्कादायक खुलासा कॉसमॉस ग्रुपचे वास्तू विशारद सुवर्णा घोष यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
सुरज परमार प्रकरणातील तपासात आणखी धक्कादायक खुलासा झालाय. त्यात कॉसमॉस ग्रुप च्या वास्तू विशारद सुवर्णा घोष यांनी हा खुलासा ठाणे पोलिसांकडे केलाय. बांधकाम व्यवसायात पालिका अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतात याचा पुन्हा खुलासा सुवर्णा घोष यांनी केलाय. त्यासोबत पालिकेच्या अधिकार्‍यांना सूरज परमार यांनी पैसे दिल्याचेही कबुली चौकशी दरम्यान दिली आहे. एवढे सगळे पुरावे समोर आल्या नंतरही आजपर्यंत ठाणे पोलिसांनी ठाणे महानगर पालिकेच्या कोणत्याही अधिकार्‍यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अडवणूक केल्याबद्दल अटक केलेली नाहीय. आयकर विभागाच्या धाडीत आणि इतर ठिकाणीही सर्व सरकारी विभागांना पैसे दिल्याची नोंद सूरज परमार यांनी केलेली आहे असं असताना कोणत्याही सरकारी बाबूला अटक न होणे ही तपासतील त्रुटी दाखवत आहे.
===========================================
पुण्यात तेलाच्या व्यापार्‍याची हत्या 
CrimeScene2

 शिवाजीनगर परिसरातील तेलाचे व्यापारी नारायण हसानंद नागदेव (वय50) यांची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागदेव हे तेलाचे व्यापारी होते. शिवाजीनगर येथील मंगला टॉकीज परिसरात ते राहत होते. मध्यरात्री घरात घुसून त्यांची धारदार शस्त्राने वार करून आणि गळा दाबून हत्या करण्यात आली. घरातून सोन्याचे दागिने आणि दीड लाखाची रोकड गायब झाल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच ही हत्या चोरीच्या हेतूने झाली की अजून वेगळं काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
===========================================
बसव महामोर्चास मुखेडहून शिवसैनिक जाणार - बालाजी पा.कबनुरकर
मुखेड :-
    लिंगायत समाजाचे आराद्य दैवत, महान क्रांतिकारी महामानव जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा नांदेड येथे भव्य पुतळा उभारण्यासाठी आज २२ फेब्रुवारी रोजी नांदेड महानगर पालिकेवर महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समितीच्या वतीने निघणा-या मोर्चास पाठिंबा म्हणुन मुखेड शहर व तालुक्यातुन असंख्य शिवसैनिक जाणार असल्याची माहीती शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनुरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
   नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीतील कौठा येथील नियोजित जागी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभरावा यासाठी मागील अनेक वर्षापासुन समाजबांधवांच्या वतीने आंदोलन चालु असुन मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करित आहे. नियोजित जागी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारावा यामागणी साठी महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समितीच्या वतीने आज २२ फेब्रुवारीला निघणा-या महामोर्चास शिवसेनेचा पुर्ण पाठिंबा असुन या मोर्चामध्ये शामिल होण्यासाठी मुखेड तालुका व शहरातुन समाज बांधवांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहीती पत्रकारांना दिली. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य व्यंकट लोहबंदे, मनोज गौंड, शंकर पाटील लुट्टे, शहरप्रमुख नागनाथ लोखंडे, शहर संघटक राजु गंदपवाड, पवन पोतदार, कृष्णा कामजे, कैलास बेळीकर आदी सह शिवसैनिक उपस्थित होते.
===========================================
बसव मोर्चास आरपीआयचा पाठींबा 

===========================================

No comments: