शेतीची आगोदरच विस्कटलेली घडी त्यात पावसाने मारली दडी, अरे कुठे नेऊन ठेवला पाऊस माझा, सामान्य जणांची आर्त किंकाळी.
----------------------
पावसाने दडी मारली आहे. महाराष्ट्रात कुठेही पाऊस दिसत नाही. पावसाची अवस्था पाहून भारतीय क्रिकेट टीमची आठवण येते . ऐन मोक्याच्या क्षणी अवसान घातकी खेळ करून जिंकण्यासाठी अतिशय सोपा असणारा सामना अवघड करावा व नंतर एकेक धावेसाठी प्राणपणाने लढावे तसेच आता झाले आहे. जुन महिन्याच्या सुरुवातीला सगळीकडे चांगला पाऊस पडला शेतकऱ्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याला आनंदाचे तेज आले. मनाला एक नवीन पालवी फुटली. लगीन घाई होऊन सर्वत्र पेरण्याही झाल्या. त्याच बरोबर ऐन मोक्याचा क्षणी निसर्गाने आपले रंग दाखवले. त्या वेळापासून जी दडी मारली ती आजतागायत........
गेल्या चार वर्षापासून अगोदरच दुष्काळाच्या सावलीमध्ये महाराष्ट्र वावरत आहे. काही भागामध्ये मागील वर्षीही धरणं ज्योत्याच्या खालीच राहिली. मराठवाडा भागातील धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा होता. उन्हाळा सरते शेवटी पिण्यासाठी पण पाणी नव्हते.
पाण्यावाचून जनावरेही मेली. चारापाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे स्वस्तात विकली. टँकरद्वारे पाणी पुरवठा करूनही तो कितीसा पुरणारा. गावेच्या गावे ओस पडली. यामुळे शहरी भागातील नागरिकरणावर भार पडला. ग्रामीण भागात तर आत्महत्येचे सत्रच सुरु झाले. सगळीकडे भयाण अन भीषण वातावरण, मन विदीर्ण करणारी परिस्थिती, अशा वेळी आज कुणी आत्महत्या केली हे पाहण्याएवजी कोणकोण जिवंत आहेत, हेच पाहण्याचे काम चालू होते.
सरकाच्या विविध वेधशाळेनी या वेळी पाऊस कमी पडणार असे अंदाज वर्तविले. कुणी सरासरीच्या ८० टक्के पाऊस पडेल कुणी ९० टक्के पाऊस पडेल असे अंदाज वर्तवित होते. यावरून निष्कर्ष एकच होता पाण्यासाठी दाही दिशा एक कराव्या लागणार. महाराष्ट्र शासनानेही कृत्रिम पाऊस पडण्याचा निर्णय जूनमध्येच जाहीर केला. यावरून सरकारला दुष्काळाची पूर्व कल्पना आलेली आहे. जनतेत घबराट होऊ नये म्हणून वेळ काढू धोरणाने काम चालू आहे. परंतु दुष्काळाची भयाण परिस्थिती लक्षात घेता योग्य व नियोजन पूर्वक काम होणे फार गरजेचे आहे. आतापासूनच पावसाचा थेंब अन थेंब अडवला गेला पाहिजे. कमीतकमी जनावरांसाठी व माणसांसाठी पाण्याचा योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही, पाणी वाया जाणार नाही हे पहिले पाहिजे. अरब देशांप्रमाणे समुद्राचे खारे पाणी गोड करण्याची यंत्रणा राबविण्याची सक्त गरज आहे. अनिर्बंध रीतीने होणारा रेतीचा उपसा व झाडांची कत्तल सक्तीने थांबविण्याची गरज आहे. कारण "तळे राखील तो पाणी चाखील"

No comments:
Post a Comment